करमणूक

मिश्किली * मधु गोयल

‘‘तुम्ही प्रेसच्या कपडयांमध्ये अंडरवेअरदेखील दिली होती काय?’’ शिखाने तिचा पती शेखरला विचारले.

‘‘बहुधा… चुकून कपडयांसोबत गेली असावी,’’ शेखर म्हणाला.

‘‘प्रेसवाल्याने तिचेदेखील रुपये ५ लावले आहेत. आता असे करा की उद्या अंडरवेअर घालाल तेव्हा त्यावर पँट घालू नका. रुपये ५ जे लागले आहेत,’’ शिखा म्हणाली.

‘‘तू पण ना… नेहमी विनोदाच्या मूडमध्येच असते. कधीकधी तू सिरीयसही होत जा.’’

‘‘अहो, मी तर आहेच अशी… म्हणूनच आजही वयाच्या ५० व्या वर्षीही कुणीही माझ्याशी लग्न करेन.’’

मुलगी नेहा म्हणाली, ‘‘बाबा, तू माझ्यासाठी व्यर्थ मुलगा शोधत आहेस… आईचे लग्न लावून द्या. तसेही मला लग्न करायचे नाहीए.’’

शेखरने विचारले, ‘‘का मुली?’’

‘‘पपा, मी आतापर्यंत जे आयुष्य जगले आहे त्यात असेच जाणवले आहे… लग्न करून मी माझे स्वातंत्र्य गमावणार आहे… लग्न एक बंधन आहे आणि मी बंधनात बांधली जाऊ शकत नाही. मी याबद्दल माझ्या आईशी सर्व काही सामायिक करेन,’’ नेहाने स्पष्ट उत्तर दिले.

तेवढयात शेखरची नजर दारावर पडली. एक कुत्रा घुसला होता. शेखर शिखाला म्हणाला, ‘‘तू बाहेरचा दरवाजाही नीट बंद केला नाहीस. बघ कुत्रा आत आला.’’

‘‘अहो, जरा व्यवस्थित तर बघत जा, हा कुत्रा नाही, कुत्री आहे. बहुधा तुम्हांला भेटायला आली असेल. भेटून घ्या. मग तिला बाहेरचा मार्ग दाखवा,’’ शिखा म्हणाली.

‘‘तू तर सदैव माझ्या पाठीच लागून राहतेस,’’ शेखर रागाने फणफणत म्हणाला.

शिखा त्वरित उत्तरली, ‘‘तुमच्या पाठी नाही लागणार तर मग काय शेजाऱ्याच्या पाठी लागणार? तेही तुला आवडणार नाही आणि असे तर होतच आले आहे की पती पुढे-पुढे आणि पत्नी मागे-मागे,’’ शिखाने पटकन् उत्तर दिले.

‘‘बरं, सोड मी तुझ्याशी जिंकू शकत नाही.’’

‘‘लग्न हीदेखील एक लढाई आहे. तुम्ही त्यात मला जिंकूनच तर आणले आहे. हाच सर्वात मोठा विजय आहे… अशी पत्नी शोधूनही मिळणार नाही,’’ असे शिखा म्हणाली.

‘‘बरं सोड, आपले गुण खूप गाऊन झालेत तुझे. आता माझे ऐक,’’ शेखर म्हणाला.

‘‘मी आतापर्यंत तुमचेच तर ऐकत आहे.’’

‘‘आपल्या नेहासाठी संबंध जुळवून येत आहेत… नेहाने मला सांगितले होते की तिला लग्न करायचे नाही. तू जरा तिच्याशीच बोल.’’

‘‘ठीक आहे श्रीमानजी, जशी आपली आज्ञा… लग्नाच्या या लढाईत तुम्ही पत्नीला जिंकून आणले होते. तेव्हापासून आतापर्यंत तुमच्याच इशाऱ्यावर मी नाचत आहे,’’ शिखा म्हणाली.

‘‘ठीक आहे. मला खूप जोराची भूक लागली आहे. आता काहीतरी खायला-प्यायला दे,’’ शेखर म्हणाला.

‘‘बघा, मी खायला घालण्याची-भरवण्याची नोकरी नाही बजावली. आता तुम्ही लहान मूल तर नाही आहात… आपल्या मुलीसाठी मुलगा शोधत आहात. ते वय तर तुमचे संपून गेले.’’

‘‘बरं, माझ्या आई, तू एकदा देशील तर खरं.’’

‘‘बघा, आई हा शब्द वापरू नका. घाटयात राहाल. विचार करा, मग काहीही मिळणार नाही. फक्त आईच्या प्रेमावरच अवलंबून राहाल.’’

‘‘अरे यार, तुझ्या पालकांनी काय खाऊन तुला जन्माला घातले होते?’’ शेखरच्या तोंडातून बाहेर आले.

‘‘मी जाऊन त्यांना विचारेल की तुमच्या जावयाला तुमचे रहस्य जाणून घ्यायचे आहे… इतक्या वर्षांनंतर ते आज खरवडून पाहत आहेत.’’

‘‘ठीक आहे, ठीक आहे, आता पुरे,’’ शेखर म्हणाला.

‘‘अरे नेहा, मुली माझा चष्मा कुठे आहे?’’ शेखरने मुलीला आवाज दिला.

‘‘अरे पप्पा, चष्मा तुझ्याच डोक्यावर टेकला आहे. तू इकडे-तिकडे का शोधत आहेस?’’ नेहा हसत म्हणाली.

शिखा म्हणाली, ‘‘काखेत कळसा अन गावाला वळसा हा यांचा हिशोब आहे.’’

‘‘विचारेल बच्चू …’’ शेखर तोंड वाकडे करत म्हणाला.

‘‘व्वा व्वा, कधी बच्चू, कधी माई, कधी आई. अहो, जे नाते आहे, त्यातच रहा ना?’’

‘‘तुला समजणार नाही… तसेही दिव्याखाली अंधार… संपूर्ण जगात शोध घेतला असता तरी असा नवरा मिळाला नसता. कालचीच गोष्ट घे ना. साखरेचा डबा फ्रीजमध्ये ठेवला आणि जगभर शोधत त्रासून जात होती… मी तरुण आहे अशी वार्ता करतेस… ही वृद्धावस्थाची चिन्हे नाहीत तर अजून काय आहे?’’

‘‘चल, सोड आता. पुरे झाले. एक कप चहा मिळेल का?’’

‘‘एक कप नाही तर एक बादलीभर घ्या,’’ शिखा म्हणाली.

‘‘बस्स खूप झाले. जेव्हा एखादा सिंह जखमी होतो ना, तेव्हा तो अधिक क्रुर होतो, माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नकोस. भाषेत गोडवाच नाही.’’

‘‘हो-हो, माझ्या जीभेत तर विष विरघळले आहे. विहिरीतल्या बेडकासारखे डराव-डराव करत जाल,’’ शिखा म्हणाली.

‘‘तुला कधीच समजणार नाही… हे शब्दच आयुष्यात गोंधळ निर्माण करतात. स्मितहास्य आयुष्य सुरळीत करते, समजले?’’

‘‘अगं मुली नेहा, एक कप चहा बनवून दे. एक कप चहा मागणे गुन्हा झालाय.’’

‘‘हो-हो, चहा तर नेहाच बनवेल… आयुष्यभर छातीवर बसवून ठेवा तिला… माझ्या हाताला तर विष आहे,’’ शिखा हात नाचवत म्हणाली.

‘‘नाही नाही… तुझ्या हाताला नाही, तुझ्या जिभेत विष आहे,’’ शेखर म्हणाला.

‘‘माझ्यासाठी, तर प्रेमाचे दोन शब्दही नाहीत… आता काय मी इतके वाईट झाले?’’

‘‘मी कधी बोललो? अगं वेडे, तुझ्यापेक्षा जगात कुणीही चांगले असूच शकत नाही… फक्त थोडेसे जास्त नाही शांत राहणे शिकून घे, प्रत्येक गोष्टीवर उलटून हल्ला करत जाऊ नकोस… वेडे, आता या वयात मी कुठे जाणार?’’ शेखर म्हणाला.

‘‘तुम्ही चहा घेणार?’’ शिखाने खालच्या स्वरात विचारले.

‘‘अगं, मी तर कधीपासून चहासाठी तळमळत आहे.’’

‘‘अगं मुली नेहा, जरा बटाटे सोल बरे… मी विचार करते चहासोबतच वडे पण बनवून घेऊ. काय हो?’’ शिखाने विचारले.

‘‘उशीरा का होईना शहाणपण सुचले,’’ शेखर हसत म्हणाला.

वैभवातलं दु:ख

कथा * रवी चांदेकर

ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. साक्षी आपलं सामान आवरत होती. तिनं स्वत:चे केस व्यवस्थित केले. चेहरा स्वच्छ पुसला. नवऱ्यालाही आवरून घ्यायला सांगितलं. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या शर्टकडे गेलं. ‘‘हे काय? कसला डाग पडलाय शर्टवर?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं, काल रात्री जेवताना सांडलंय काहीतरी,’’ तो खजील होऊन म्हणाला.

साक्षी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. सावळी पण अत्यंत आकर्षक. नवरा सौरभ सरकारी नोकरीत साधा क्लार्क होता. लग्नाला पंधरा वर्षं झाली होती. एक मुलगा होता तेरा वर्षांचा.

साक्षीच्या गावात एकच सरकारी कॉलेज होतं. गावातील अन् आसपासच्या कसब्यातील गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा सर्वच थरातील मुली तिथंच शिकायच्या. गावातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी कामिनीही साक्षीच्याच वर्गात होती. खरंतर आर्थिक दृष्टीनं कामिनी मोठ्या शहरातल्या कॉलेजात शिकू शकली असती. पण घरातून तिला बाहेर गावी पाठवण्याची परवानगी नसल्यानं तिनं इथंच शिकायचं ठरवलं.

एकाच वर्गात, एकाच कॉलेजात असल्यानं साक्षी व कामिनीची खूपच छान मैत्री होती. कॉलेजव्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा दोघी एकत्र असायच्या. त्यांच्या मैत्रीचं घरच्यांना अन् गावातील लोकांनाही कौतुक होतं.

ग्रॅज्यूएट झाल्या झाल्या कामिनीला एक चांगलं स्थळ सांगून आलं अन् ती लग्न करून सासरी दिल्लीला निघून गेली.

साक्षीचं लग्न ठरण्यात सर्वात मोठी अडचण त्यांची आर्थिक परिस्थिती होती. सोनं, हुंडा, मानपान त्यांना गरीबीमुळे शक्य नव्हतं अन् पैशाशिवाय चांगलं स्थळ मिळत नव्हतं. शेवटी एकदाचं साक्षीचंही लग्न ठरलं. गावातलंच सासर मिळालं. लग्नानंतर दोघां मैत्रिणींची ताटातूट झाली. कामिनी दिल्लीला असेल एवढंच साक्षीला माहीत होतं. पण पत्ता वगैरे काहीच ठाऊक नव्हता. कामिनीच्या वडिलांनीही इथला व्यापार व्यवसाय आवरून दिल्लीलाच मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. आता माहेरच या गावात नाही म्हटल्यावर कामिनी तरी मुद्दाम वाकडी वाट करून इकडे कशाला येणार? त्यामुळेच दुरावा जास्त जाणवत होता.

साक्षीचा नवरा सरकारी नोकरीत होता, पण साधा कारकून होता. बेताच्या उत्पन्नात ती कसाबसा संसार रेटत होती. सकाळ व्हायची, दुपार व्हायची, रात्र व्हायची, दिवसामागून दिवस असेच कंटाळवाणे जात होते. साक्षीला या नीरस आयुष्याचा कंटाळा आला होता. काहीतरी बदल, कुठला तरी प्रवास असं तिला हवं होतं. अशावेळी तर तिला कामिनीची खूपच आठवण यायची. मनात यायचं, कामिनी श्रीमंतीत, दिल्लीसारख्या ठिकाणी किती मजेत राहत असेल. लग्नाला चौदा वर्षं झाली. एवढ्या अवधीत साक्षीला कामिनीची काहीही माहिती मिळाली नव्हती. कॉलेजमधल्या सोबत शिकणाऱ्या मुलींपैकी कधी कुणी गावी माहेरी आल्या तर भेटायच्या.

याच सुमारास दिल्लीहून कुठल्यातरी कामासाठी कामिनीचे वडील आपल्या जुन्या गावी आले होते. ते आवर्जून साक्षीला भेटले. त्यांनी साक्षीला कामिनीचा पत्ता व फोन नंबर दिला. साक्षीला खूप आनंद झाला. आता दोघी मैत्रीणी फोनवर बोलायच्या. दोघींजवळ सांगायला इतक्या वर्षांतल्या कितीतरी घडामोडी होत्या.

कामिनी तिला म्हणायची, ‘‘दिल्लीला ये. तुला दिल्ली दाखवेन.’’ साक्षीला ठाऊक होतं, आपला नवरा तयार होणार नाही. त्याला आपलं काम बरं, आपण बरे असं वाटायचं. त्यामुळे साक्षी तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हती.

शेवटी एकदा साक्षीचा नवरा दिल्लीला यायला राजी झाला. साक्षीला खूप आनंद झाला. तिनं कामिनीला ती नवऱ्यासह येत असल्याचं कळवलं. कामिनीनंही ती स्वत: रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करायला येईल हे कळवलं. कितीतरी दिवसांनी साक्षी प्रवासाला निघाली होती. त्यातून दिल्लीला, लाडक्या मैत्रीणीकडे…साक्षी खूपच आनंदात होती. तिनं ऐकलं होतं साक्षीच्या सासरी खूप वैभव आहे. गाडी, बंगला, नोकरचाकर, नवराही दिसायला चांगला अन् वागायला समजूतदार आहे. कामिनीचा संसार बघायची, तिला कडकडून भेटायची साक्षीला घाई झाली होती.

गाडी स्टेशनवर आली. सामानासह साक्षी उतरली. कामिनी तिला घ्यायला आली होती. दोघींनी एकमेकांना बघितलं अन् त्यांचे चेहरे आनंदानं फुलले. कामिनी तर आता अधिकच सुंदर दिसत होती. तिचं वय जणू तिथंच थांबलं होतं. जीन्स आणि टॉपमध्ये ती अजूनच स्मार्ट दिसत होती. कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती.

कामिनी स्वत:च कार ड्राइव्ह करत होती. दिल्लीच्या रूंद गुळगुळीत डांबरी रस्त्यांवरून तिची गाडी चालली होती. साक्षी तिच्या शेजारी बसली होती. सौरभ मागे बसला होता.

‘‘तू एकटीच का आलीस? भावोजी का नाही आले?’’ साक्षीनं बाळबोध प्रश्न विचारला.

‘‘अगं बाई, ही दिल्ली आहे. इथे, जो तो आपापल्या वाट्याचं आयुष्य जगत असतो,’’ कामिनीनं तिला महानगरातल्या आयुष्याची कल्पना दिली.

‘‘तुझ्या भावजींशी पटत नाही का?’’ साक्षीनं पुन्हा भाबडेपणानं विचारलं.

‘‘तसं नाही गं! म्हणजे काय आहे, वैभव रात्री उशीरा घरी येतात, आल्यावरही बराच वेळ कॉम्प्युटरवरच काम करत असतात, त्यामुळे सकाळी लवकर उठणं त्यांना जमत नाही,’’ कामिनीनं खुलासा केला.

‘‘अस्सं होय! पण हे तर अवघडंच आहे गं बाई!’’

‘‘अवघड कसलं आलंय? आता तर हेच रूटीन आयुष्य झालंय,’’ कामिनी म्हणाली.

बोलताबोलता कितीतरी अंतर कापून कार घरी पोहोचलीसुद्धा. कामिनीचं घर म्हणजे राजमहालच होता. कितीतरी लक्झरी कार्स उभ्या होत्या. घरासमोर गार्ड होता. बागेत दोन तीन माळी काम करत होते. गार्डनं अत्यंत शोभिवंत अन् भक्कम असा लोखंडी दरवाजा म्हणजे कंपाउंड गेट उघडलं. कामिनीनं गाडी सरळ आत घेतली. लगेच दोन नोकर धावत आले. हे सगळं बघून साक्षीला कामिनीचा हेवा वाटला…काय थाट आहे हिचा…व्वा!

‘‘गाडीतलं सामान काढा आणि गेस्ट हाउसमध्ये ठेवा,’’ कामिनीनं मालकिणीच्या रूबाबत म्हटलं.

मग साक्षी अन् सौरभकडे बघून तिनं प्रेमानं म्हटलं, ‘‘ये साक्षी, भाओजी, या ना…प्लीज.’’

साक्षी अन् सौरभ चकित होऊन बघत होते. सगळीकडे श्रीमंती अन् उत्तम व्यवस्था जाणवत होती. सौरभनं कोपरानं साक्षीला डिवचून खुणेनंच म्हटलं, ‘‘काय मस्त आहे ना?’’ त्यांनी तर फक्त सिनेमात असे महाल बघितले होते. एखाद्या फिल्मच्या सेटवरच आलोय असं त्यांना वाटलं.

त्यांना दिलेल्या गेस्टरूमच्या किंगसाईज बेडवर पडून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. मग त्यांच्या स्वत:च्या घरातल्या हॉलएवढ्या मोठ्या बाथरूममध्ये स्नान उरकून घेतलं. स्वच्छ, शुभ्र संगमरवरी बाथरूममध्ये उत्तम प्रतीच्या पोर्सेलिनची सॅनिटरी वेयर्स होती. गरम थंड पाण्याच्या स्टीलच्या चकचकीत तोट्या, उंची साबण व शांपू, पावडर, सेंट शॉवर खाली अंघोळ केल्यावर खूपच प्रसन्न वाटलं. एवढ्यात नोकरानं दारावर टकटक करून सांगितलं की बाईसाहेब नाश्त्यासाठी वाट बघताहेत.

सकाळचे अकरा वाजत आलेले. ब्रेकफास्ट टेबलाशी कामिनी व वैभव बसले होते. साक्षी व सौरभ तिथं पोहोचले. साक्षीनं टेबलकडे एक नजर टाकली…अनेक पदार्थ तिथं मांडलेले होते.

‘‘ये साक्षी, या भाओजी, हे वैभव, माझे पती.’’ कामिनीनं ओळख करून दिली. वैभवनं साक्षीकडे बघितलं तर तिच्या आकर्षक चेहऱ्यावर त्याची दृष्टीच खिळून राहिली. देखण्या कामिनीपेक्षाही साक्षीचं रूप त्याला अधिक आकर्षक वाटलं. सौरभच्या लक्षात आलं, वैभव टक लावून साक्षीकडे बघतोय. त्यानं पटकन् पुढे होत हॅलो म्हणत वैभवशी शेकहॅन्ड केला, ‘‘मी सौरभ,’’ त्यानं म्हटलं.

‘‘हो, ही माझी मैत्रीण साक्षी आणि हे माझे भाओजी आपण जिजू म्हणतो ना? तेच हे,’’ कामिनी म्हणाली.

नाश्ता करताना कामिनीला वैभवनं विचारलं, ‘‘आज तुमचा काय कार्यक्रम असेल?’’

‘‘माझा सगळाच वेळ आता साक्षी अन् जिजूबरोबर असणार आहे. जोपर्यंत हे दिल्लीत आहेत, तोवर मी ह्यांच्याच बरोबर राहीन,’’ साक्षीच्या हातावर आपला हात ठेवत कामिनी म्हणाली.

‘‘ठीक आहे. यांची नीट काळजी घे. त्यांना भरपूर फिरवून आण. सगळी दिल्ली दाखव. मला आता निघायचं आहे. रात्री माझी वाट बघू नकोस. मी कदाचित घरी येईन, कदाचित बाहेरच रात्री राहावं लागेल,’’ वैभव म्हणाला.

‘‘प्लीज वैभव, निदान एक दोन दिवस तरी…’’ पुढे कामिनीला बोलायचं होतं,

पण जरा कडक आवाजातच. वैभव म्हणाला, ‘‘जरा समजून घेत जा. माझी महत्त्वाची डील्स एवढ्यातच व्हायची आहेत…मी सध्या बिझीच असेन.’’

‘‘ओ. के.’’ कामिनीनं म्हटलं. ज्या पद्धतीनं वैभव तिला बोलला होता ते नक्कीच अपमानास्पद होतं. तिनं डोळ्यांतलं पाणी लपवत साक्षीची नजर टाळली.

साक्षीला जाणवलं की कामिनी आणि वैभवचे संबंध चांगले म्हणजे निकोप नाहीत. ती काहीच बोलली नाही, पण वैभव सतत तिच्याकडे बघतोय याची जाणीव झाल्यामुळे थोडी कावरीबावरी झाली होती.

कामिनीनं संपूर्ण दुपार साक्षी व सौरभला खूप फिरवलं. इंडिया गेट, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसदभवन, लोधी गार्डन… किती तरी गोष्टी दाखवल्या. त्यांना खूप खायला प्यायला घातलं. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. दिवसभर तिघं गप्पा मारत होते. सायंकाळी घरी परतले.

रात्रीची जेवणं आटोपल्यावर कामिनीनं साक्षीला म्हटलं, ‘‘आजच्या रात्री तू भाओजींना सोड अन् माझ्याजवळ झोप. खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येतील.’’

‘‘तू रोज माझ्याजवळ राहशील तर तुझ्या भाओजींना मी नेहमीकरता सोडू शकते,’’ गमतीनं हसत साक्षी म्हणाली.

‘‘नको गं, इतका अन्याय होऊ देणार नाही. फक्त इथं तुम्ही आहात, तेवढे दिवस तू माझ्याजवळ झोप,’’ कामिनीनं म्हटलं.

कामिनीनं साक्षीला तिच्या संसाराबद्दल विचारलं. ‘‘भाओजींबरोबर तू सुखात आहेस ना? संसार कसा चाललाय? मुलगा तुझ्याबरोबर आला असता तर छान झालं असतं. तो त्याच्या काकांकडे किती दिवस राहणार आहे? झी दिनचर्या काय असते? तुला काही प्रॉब्लेम तर नाहीए ना?’’

कामिनीचे प्रश्न संपत नव्हते. साक्षी म्हणाली, ‘‘आमचं काय घेऊन बसलीस गं? आमचं जगच मुळात छोटंसं आहे. आम्ही मध्यमवर्गीय माणसं. नवरा सकाळी नऊला ऑफिसात जातो. संध्याकाळी सहाला घरी परत येतो. तसं ऑफिस घरापासून फार लांब नाहीए. त्यामुळे कधी कधी जेवायला घरीच येतात. रात्री आठला जेवतात अन् दहापर्यंत झोपतोही आम्ही. सकाळी लवकर उठून आम्ही दोघं वॉकला जातो…बस्स! एवढंच आमचं आयुष्य…हीच आमची दिनचर्या.’’ साक्षी म्हणाली.

‘‘तुला काही त्रास तर नाहीए ना साक्षी? भाओजी नीट वागतात ना?’’

‘‘छेछे, तसा त्रास काहीच नाही. नवरा मला मान देतो. माझी काळजी घेतो, कामात मला मदतही करतो. तसा त्यांचा स्वभाव शांत आहे. एकूणात सगळं बरं चाललंय…पण तुझ्यासारखं  वैभव, तुझ्यासारखी श्रीमंती नाहीए ना माझ्याजवळ…’’ साक्षी खिन्नपणे म्हणाली.

‘‘नाहीए तेच चांगलं आहे गं! जे तुझ्याजवळ आहे ते सगळंच माझ्यापेक्षा चांगलं आहे. तू सुखी आहेस साक्षी…’’

‘‘काय’’ चेष्टा करतेस गं कामिनी? कुठं तू, कुठं मी? या वयातही तू स्वत:ला किती छान मेंटेन केलं आहेस अन् नाहीतर मी, तुझ्याजवळ खूप काही आहे गं कामिनी…’’ साक्षीनं म्हटलं.

कामिनीचे डोळे भरून आले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

साक्षी हतप्रभ झाली, ‘‘काय झालं कामिनी? का गं रडतेस?’’ तिनं प्रेमानं विचारलं.

‘‘काही नाही गं! आपले ते गावातले जुने दिवस आठवले.’’ कामिनी दाटून आलेल्या कंठानं म्हणाली.

‘‘कामिनी, खरं सांग, काय झालं? तू इतकी इमोशनल का झालीस?’’ तिचे अश्रू पुसत साक्षीनं विचारलं.

अन् मग कामिनी बोलायला लागली…

‘‘साक्षी, तू हा जो सगळा थाटमाट, वैभव, पैसा बघते आहेस ना, हे काही खरं नाही. दिसायला दिसंतय ते पण त्यात मनाला सुख नाही, समाधान नाही. हे आयुष्य जगताना किती देखावा, किती खोटेपणा करावा लागतो ते तुला ठाऊक नाहीए. फक्त पैसा असला म्हणजेच सुख असतं असं नाही. हा फक्त वरवरचा झगमगाट आहे. यात सुख नाही, मानसिक शांतता नाही. नवरा रात्री उशीरा घरी कधी येतो, मला कळत नाही. आल्यावर माझ्याजवळ येऊन कधी झोपतो तेही मला कळत नाही. कित्येक दिवस आमच्यात संवादही घडत नाही. म्हणायला मी मॉडर्न आहे. अजूनही तरूण दिसते, पण हे सगळं कुणासाठी? माझ्या रात्री मी एकटीच तळमळत काढते अन् दिवस जातो मैत्रीणींच्या किटी पार्टीत. खरं सांगते, माझं स्वत:चं असं काहीच नाहीए. माझ्या मर्जीनं मला जगता येत नाही. मी काय खावं, काय घ्यावं, काय घालावं हे दुसरंच कुणी ठरवतं. मला तर असं वाटतं साक्षी की स्त्री कितीही शिकली, कितीही उच्च पदावर असली, स्वत:चा व्यवसाय करत असली तरी एकदा तिनं घरात पाऊल टाकलं की ती नवऱ्याच्या ताब्यात असते.. स्त्रीला अपूर्ण अन्न पुरतं, साधे कपडे चालतात, शारीरिक व्यंग असलेला नवराही चालून घेते. पण मानसिकदृष्ट्या अपंग असलेला, अजिबात समजूतदारपणा नसलेला काहीसा विकृत किंवा कामांध नवरा कसा खपवून घ्यायचा? कसं त्याला सांभाळायचं?’’

कामिनी बोलत होती. मनातलं सगळं सांगत होती आणि साक्षी चकित होऊन ऐकत होती. तिची व्यथा, वेदना, पीडा साक्षीला नवी होती.

‘‘साक्षी, मला सांग, ज्या पुरुषाची स्वत:चीच काही ओळख नाही, स्वत:चीच काही आयडेंटिटी नाही, त्याच्या पत्नीला काय महत्त्व असणार गं? वैभव तीन भावात सर्वात मोठे आहेत, पण आमचा सगळा व्यवसाय, सगळा पैसा धाकट्या दोघांच्या हातात आहे. त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी दिलेला आदेश वैभवला ऐकून घ्यावा लागतो. त्यामुळेच मी किंवा माझी मुलंही आश्रिताचं जीणं जगतोय. धाकटे भाऊ जे काम सांगतात, तेच वैभव करतो, ते जिथं पाठवतात, तिथं जातो. आपल्या भावांना तो काही म्हणूच शकत नाही. भावांनी त्यांना चांगलं म्हणावं म्हणून ते त्यांच्याशी लाळघोटेपणा करतात अन् माझ्याकडे, मुलांकडे साफ दुर्लक्ष करतात. मला शंभर रुपये जरी हवे असले तरी धाकट्या दिरांकडे हात पसरावा लागतो,’’ कामिनी म्हणाली.

‘‘पण कामिनी, एकत्र कुटुंबात असं…’’ तिला मध्येच थांबवत कामिनीनं म्हटलं,

‘‘होय साक्षी, एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते. पण कुणाच्या दडपणाखाली दुसऱ्याचा ‘स्व’च चिरडला जात असेल तर? पत्नीला स्वत:च्या नवऱ्याबरोबर जगण्याचा हक्क आहे ना? तो तिला मिळू नये? आपल्या बायकोचा बळी एवढ्यासाठी द्यायचा की भावांनी आपल्याला वाईट म्हणू नये. मला तर नवऱ्याला काही म्हणायचाही हक्क नाही. तू खरोखर सुखी आहेस साक्षी. तुला माहीत आहे तुझा नवरा कधी घरी येईल…आल्यावर तुम्ही दोघं एकत्र जेवाल…गप्पा माराल, एकत्र  झोपाल. तुला, त्यांना किती पगार मिळतो ते माहीत आहे. मला तर वैभवबद्दल काहीच माहीत नसतं. कधी तो येईल, कधी तो येणार नाही, बरोबर जेवेल, रात्री झोपेल काहीच नाही,’’ कामिनी म्हणाली.

कामिनीनं स्वत:चं आयुष्यच उलगडून ठेवलं साक्षीसमोर. ‘‘चल, कामिनी आता झोपूयात, रात्रीचा एक वाजून गेला आहे,’’ साक्षीनं म्हटलं.

‘‘खरंच गं! झोपायला हवं. तुलाही प्रवास करून आल्यावर विश्रांती मिळाली नाहीए,’’ कामिनी म्हणाली.

‘‘मी जरा सौरभला बघून येते. तो झोपला नसेल तर मी तिथंच झोपते, नाहीतर तुझ्याकडे येते.’’

‘‘ठीक आहे. बघून ये,’’ कामिनी बेडवर आडवी होत म्हणाली.

साक्षीच्या मनात खळबळ माजली होती. वैभव कामिनीशी असा का वागतो? इतकी सुंदर, तारूण्यानं रसरसलेली, हुषार, प्रेमळ बायको असताना तो तिच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो? अन् आज सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी तो ज्या पद्धतीने साक्षीकडे बघत होता ती नजर कामुक होती. त्या नजरेत एक आकर्षण होतं आणि आमंत्रणही.

विचारांच्या नादात ती आपल्या गेस्टरूमकडे जात असताना तिला एका खोलीत उजेड दिसला. यावेळी कोण असेल या खोलीत? तिच्या मनात उत्सुकता दाटली. तिनं सहज खोलीत डोकावून बघितलं तर वैभव नाइट सूट घालून एका खुर्चीवर बसलेला दिसला. समोर टेबल होतं अन् शेजारीच एका काचेच्या कपाटात विलायती दारूच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या. टेबलावरही दोन तीन बाटल्या अन् एक अर्धवट भरलेला ग्लास होता.

‘‘भाओजी तुम्ही? कधी आलात तुम्ही?’’ आश्चर्यानं साक्षीनं विचारलं अन् ती सरळ खोलीत शिरली.

‘‘अरे? साली साहेबा. या, आत या,’’ तिला येताना बघून वैभवनं म्हटलं.

‘‘तुम्ही आलात कधी? आल्याचं सांगितलं का नाही? मी अन् कामिनी खोलीत बोलत बसलो होतो,’’ साक्षी उत्साहानं बोलत होती.

‘‘मी थोड्या वेळापूर्वीच आलो, तुम्ही दोघी गप्पा मारत होतात, मग म्हटलं तुमच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब नको,’’ वैभवनं म्हटलं. तो अधूनमधून दारूचे घोट घेत होता. डोळ्यात दारूची धुंदी स्पष्ट दिसत होती. तरीही सक्षीला त्याच्याशी बोलायची इच्छा होती. तिनं विचारलं ‘‘जिजू, तुम्ही दारू का पीता?’’

‘‘दारू कुणी आनंदानं पित नाही, सालीसाहेबा, माणसाच्या मनात खोलवर रूतून बसलेलं दु:ख असतं. ते विसरण्यासाठी माणूस दारू पितो,’’ त्याचे डोळे भरून आले होते. तो भावनाविवश झाला होता.

त्याचं नाटक भाबड्या मनाच्या साक्षीच्या लक्षात आलं नाही. ती ही भावनाविवश झाली. त्याच्याजवळ येत त्याचे अश्रू पुसत म्हणाली, ‘‘प्लीज जिजू तुम्ही रडू नका…मला सांगा, तुम्हाला काय दु:ख आहे ते.’’

तिला जवळ आलेली बघून वैभवनं तिच्या कंबरेला मिठी मारली. तो खुर्चीवर बसून होता.

इकडे कामिनी साक्षीची वाट बघत होती, ती येते आहे की नाही हे तिला कळेना. म्हणाली होती सौरभ झोपला असेल तर परत येते. तिची वाट बघत असल्यामुळे तिला झोप  येत नव्हती. बघून येऊ साक्षीच्या खोलीपर्यंत जाऊन असा विचार करून ती साक्षीच्या खोलीकडे निघाली. वैभवच्या खोलीत दिवा जळत होता        आणि बोलण्याचा आवाजही येत होता. ती एकदम सावध झाली अन् झटकन् खोलीत शिरली.

समोरचं दृश्य बघून ती हादरलीच. वैभवनं खुर्चीवर बसूनच उभ्या असलेल्या साक्षीच्या कमरेला मिठी मारली होती. वैभवला कामिनी खोलीत आलेली दिसताच त्यानं साक्षी भोवतीचे हात काढून घेतले.

‘‘वैभव काय करतो आहेस? अरे निदान माझ्या मैत्रीणीला तरी वासनेपासून लांब राहू दे, लाज नाही वाटली तुला?’’ कामिनी आरेडलीच.

साक्षी पाठमोरी असल्यानं तिला कामिनी दिसलीच नव्हती. साक्षी त्या आवाजानं एकदम दचकली.

‘‘ओरडतेस कशाला? काय केलंय मी?’’ वैभवही ओरडला.

‘‘बघ साक्षी…हे या वैभवचं मायावी रूप आहे. रडून भेकून सहानुभूती मिळवायची. रोज नवी स्त्री लागते यांना…मी कसं सहन करायचं हे?’’ साक्षीला गदागदा हलवत कामिनीनं म्हटलं.

‘‘मला क्षमा कर कामिनी…अजाणता…,’’ कामिनीनं साक्षीला पुरतं बोलूच दिलं नाही. ती म्हणाली, ‘‘तू ही त्यातलीच एक व्हायची होतीस…थोडक्यात बचावलीस…’’

हा आरडाओरडा रात्रीच्या वेळी शांत वातावरणात सौरभच्याही गेस्टरूमपर्यंत पोहोचला. काय प्रकार आहे बघायला तो खोलीच्या दिव्याच्या अन् आवाजाच्या अनुरोधानं निघाला.

चतुर अन् सावध कामिनीनं सौरभला येताना बघितलं…क्षणभर ती घाबरली…जर सौरभला वैभवच्या या कृत्याबद्दल कळलं तर? छेछे, अनर्थ होईल. तिने पटकन निर्णय घेतला.

‘‘काय झालं कामिनी? काय झालंय साक्षी?’’ खोलीत येत सौरभनं विचारलं.

अगदी शांतपणे, सौम्य हसत कामिनीनं म्हटलं, ‘‘काहीच नाही, भाओजी, वैभव आत्ताच आलेत अन् न जेवता झोपायचं म्हणताहेत तर मी त्यांना रागावत होते.’’

एवढा वेळ दगडासारखी निश्चल झालेली साक्षी आता भानावर आली.

‘‘एवढंच ना? मला काही तरी वेगळंच वाटलं. आरडा ओरडा ऐकण्यासारखं वाटलं…भास झाला असेल,’’ सौरभनं म्हटलं.

कामिनीनं वेळ मारून नेली. प्रसंग सांभाळून घेतला हे बघून साक्षीच्या जिवात जीव आला. तिनं केवढी मोठी चूक केली होती? रात्रीच्या वेळी, दारू पीत असलेल्या अनोळखी पुरूषाच्या खोलीत जायची गरजच काय होती? काही भलतंच घडलं असतं म्हणजे? का तिनं वैभवला आपल्याजवळ येऊ दिलं?

‘‘साक्षी, तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोपा. रात्र खूपच झाली आहे,’’ कामिनीनं म्हटलं. साक्षीनं कृतज्ञतेनं  कामिनीकडे बघितलं अन् काही न        बोलता ती सौरभबरोबर आपल्या खोलीकडे निघाली.

वैभवला तिथंच सोडून कामिनीही आपल्या खोलीत आली. खोलीत येताच तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिनं आपलं दु:ख विसरण्यासाठी मैत्रीणीला आपल्याकडे बोलावलं होतं. पण तिचा नालायक नवरा मैत्रीणीच्याच अब्रूवर उठला होता.

दुसऱ्यादिवशी कामिनीनं परतीच्या प्रवासाची दोन तिकिटं साक्षी व सौरभला दिली. तिला व वैभवला अचानक कुणा नातलगाच्या मृत्यूमुळे अहमदाबादला जावं लागणार होतं. तिनं सौरभची पुन्ह:पुन्हा क्षमा मागितली. सौरभला रात्रीच्या प्रसंगाची कल्पना नव्हती  अन् घरची मालकमालकीणच घरात नसतील तर त्या घरी राहण्यात अर्थ काय होता? साक्षीला मात्र आपल्या मैत्रीणीचं दु:ख कळलं होतं. स्वत:चा साधा संसार अन् नवऱ्याकडून मिळत असलेला मान याची किंमत कळली होती.

वाऱ्याची झुळूक

कथा * अर्चना पाटील

‘‘सौ मित्र, मजा आहे यार तुझी.’’

‘‘का रे निनाद, काय झालं?’’

‘‘सोन्यासारखी दोन मुले आहेत. स्वत:चं घरसुद्धा घेतलंस, चारचाकी गाडी आहे, कस्तुरीसारखी समजुतदार बायको आहे, अजून काय पाहिजे यार आयुष्यात.’’

गाडी ऑफीसच्याच दिशेने जात होती. सौमित्र ड्रायव्हिंग करत होता. तेवढयात ऑफिसमधीलच दोन मुली बसस्टॉपवर दिसल्या.

‘‘निनाद, सोडायचं का यांना ऑफिसला?’’

सौमित्रने निनादला बोलण्याची वेळच येऊ दिली नाही, मुलींजवळच गाडी नेऊन थांबवली.

‘‘शाल्मली मॅडम, सोडू का ऑफिसला?’’

‘‘हो ,हो सोडा की,’’ मनवा पटकन बोलली आणि दरवाजा उघडून गाडीत बसली. त्यामुळे शाल्मलीही बसली.

‘‘तुम्ही रोजच इथून बसमधे चढता ना.’’

‘‘हो,’’ मनवानेच उत्तर दिलं

‘‘आम्हीही रोज इकडूनच जातो. सोडत जाऊ तुम्हालाही, काय रे निनाद.’’

‘‘हो ना, काय हरकत आहे. संध्याकाळी थांबा. आपण सोबतच येऊ. वीस पंचवीस मिनीटांचा रस्ता आहे.’’

सौमित्रला सावळया रंगाची शाल्मली त्याच्या गाडीत हवी होती. त्याचा उद्देश सफल झाला. सौमित्र दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये त्याची पोस्टिंगही चांगली होती. ऑफिसच्या सर्वच लेडीज त्याच्या मागेपुढे करायच्या. शाल्मलीलाही तो आवडू लागला होता. सतत सगळयांना हसवायचा. पार्टी अरेंज करायचा. नवनवीन कलरचे शर्ट्स आणि जिन्स, एकदमच भारी पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर तर काळा गॉगल शोभून दिसायचा. हळूहळू सौमित्र शाल्मलीशी जवळीक वाढवू लागला.

‘‘खुपच कमी वयात नोकरी करत आहेस तू, सॉरी हं… मी पटकन एकेरीवर येतो. अजून कॉलेज शिकायला हवं होतं.’’

‘‘वडील आजारी असतात माझे, म्हणून शिक्षण सोडलं. घरी पैशांची चणचण असते.’’

‘‘तुला एक सांगु का? तुझा रंग जरी सावळा असला तरी तू माझ्या दृष्टीने खुप सुंदर आहेस. या ऑफिसमध्ये तुझ्याइतकं हुशार कोणीच नाहीए.’’

‘‘धन्यवाद सर.’’

‘‘धन्यवाद काय, चल कॉफी घेऊ बाहेर. थोडं मोकळं बोलता येईल.’’

‘‘नाही नको, हे जरा जास्तच होईल.’’

‘‘काय जास्त होईल? मी सांगतो आहे ना. चल गुपचूप.’’

शाल्मलीही निमुटपणे निघून गेली. ऑफिसमध्ये दोघांची चर्चा चांगलीच रंगली.

‘‘सौमित्र, काय सध्या शाल्मलीच्या मागेमागे फिरतो? ‘दोघंही आज मँचिंग…’ अशीच चर्चा ऑफिसमध्ये सुरू असे. शाल्मलीला सगळे समजत होते पण तिच्यासाठी सौमित्र म्हणजे सुखाची सर. त्यामुळे नाव जरी खराब होत होतं तरी ती बिनधास्त सौमित्रसोबत फिरत असे. शाल्मली आणि सौमित्रच्या संबंधांना आता सहा महिने झाले होते. सौमित्र सतत शाल्मलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यासाठी, तिच्या कुटुंबातील लोकांसाठी सतत काहीतरी नवीन वस्तु घेत असे. एक दिवस सौमित्र तिला घेऊन गावाबाहेरच्या हॉटेलवर आला. दुपारचे बारा वाजले होते. शाल्मलीला वाटतं होतं हा नेहमीसारखाच कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन आला. त्यामुळे ती बिनधास्तपणे बोलत होती, हसत होती. सौमित्रने बुक केलेल्या रूममध्ये ते दोघे आले.

‘‘काय गं, काय जेवशील माझी शामू.’’

‘‘काहीही मागवा. नेहमी तुम्हीच ऑर्डर देता ना.’’

‘‘शाल्मली, मला तू खुप आवडतेस. मी सतत तुझं निरीक्षण करत असतो. फक्त एकदा माझ्या मिठीत ये.‘‘

‘‘काहीतरीच काय सौमित्र, आपण केवळ चांगले मित्र आहोत.’’

‘‘काहीतरीच काय, माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर. म्हणुनच तर मी सतत तुझ्यासोबत फिरत असतो. त्यामुळेच मला तुला स्पर्शही करावासा वाटतो.‘‘

‘‘सौमित्र, एक मिनीट, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. तुम्ही विवाहीत आहात. माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाहीए.’’

‘‘काहीच नाही म्हणजे, मग का हसतेस, बोलतेस माझ्याशी.’’

‘‘एक स्त्री आणि पुरूषात कधीच निकोप मैत्री होऊ शकत नाही हेच खरं. माझ्या अडचणी तुम्ही समजून घेता. कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आयुष्य एन्जॉय करायला तुम्ही मला शिकवलं. धन्यवाद सर. पण कदाचित त्यामुळे तुम्ही मला वेगळंच समजलात. माझी चुक झाली. येते मी,’’ शाल्मली खोलीतून बाहेर निघायला लागली. तेवढयात सौमित्रने दरवाजा बंद करून तिचा रस्ता अडवला.

‘‘थांब, शाल्मली, कशाला एवढा भाव खातेस? सावळया रंगाची तर आहेस तू. तुझ्यापेक्षा सुंदर मुली मी सहज पटवू शकतो.’’

‘‘सर, माझा तर रंगच काळा आहे. तुमचं तर मन काळं आहे. तुम्ही विवाहीत आहात. तुम्हाला दोन मुलं आहेत. तरीही तुम्ही माझ्यासारख्या अविवाहीत मुलीकडून शरीरसुखाची अपेक्षा करतात? निघते मी. कदाचित मी तुमच्यासोबत सहा महिने ऑफिसच्या बाहेर फिरले नसते, तर आज हा दिवस आला नसता. म्हणून मीच तुमची माफी मागते. सर, तुम्ही मनाने खुप चांगले आहात. कशाला एका क्षणाच्या मोहासाठी स्वत:च्या चारित्र्यावर कलंक लावून घेताय? तुमची बायको कस्तुरी, ती आयुष्यभर तुमच्याशी एकनिष्ठ राहणार आहे. कमीत कमी तिचा तरी विचार करा. माझंही उद्या कोणाशीतरी लग्न होईल. त्यावेळी मी नववधुच असले पाहिजे. जाऊ द्या मला.’’

सौमित्र दरवाजातून बाजुला सरकला. शाल्मलीही रडतरडतच हॉटेलमधून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये दोघांची भेट झाली.

‘‘सौमित्र, मला बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही एक वाऱ्याची झुळुक बनुन माझ्या आयुष्यात आलात. खुप खूप प्रेमाचा वर्षाव केलात. पण यापुढे परत कोणत्याच स्त्रिच्या आयुष्यात प्रेमाचा वर्षाव करू नका. कारण स्त्रिया खूप भावनिक असतात. एखाद्या पुरूषाकडून जेव्हा त्यांचा अपमान होतो, तेव्हा तो क्षण त्यांना असह्य असतो. मी तुम्हाला आवडते. मलाही तुमचा सहवास आवडतो. पण त्यासाठी आपण नैतिकतेचे नियम तर धुळीला मिळवू शकत नाही ना.’’

‘‘शाल्मली, मी चुकलो. मला माफ कर. मला नव्या नजरेने तुझ्याशी मैत्रीची सुरूवात करायची आहे.’’

‘‘सॉरी सर, आता मला उभ्या आयुष्यात पुन्हा कोणत्याच पुरूषासोबत मैत्री करायची नाहीए. मला माझी चुक सुधारायची आहे. या सहा महिन्यात तुम्ही मला जो मानसिक आधार दिलात, त्याबद्दल मी तुमची आयुष्यभर ऋणी राहिन.’’

कर्माचं फळ

कथा * गिरीजा पाठक

आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं, कुठं जावं हेच त्याला समजेनासं होतं. सुनयना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती. काही क्षणांत तिचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

आज सकाळी सुशांत त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. सहजच काही वाक्य तिच्या कानांवर पडली. ‘‘ओ. के. डियर, बरोबर पाच वाजता मी पोहोचतोय, हो, हो. नक्षत्र हॉटेलमध्ये…आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय अन् प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस.’’ असं म्हणून त्यानं फोनवरच तिचा मुका घेतला. हे बघून सुनयनाला धक्काच बसला.

सुनयना मध्यमवर्गीय कुटुंबातली, शिक्षण अर्धवट सुटलेलं…रूप मात्र देखणं, त्यामुळेच गर्भश्रीमंत सुशांतशी लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोगताना ती सुशांतला दबून असायची. बंगला, शोफर ड्रिव्हन तिची स्वत:ची कार, स्वयंपाकी, घरगडी, मोलकरीण, माळी असं सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती. पूर्णपणे समर्पित होती. दागदागिने, कपडालत्ता, हौसमौज कशातच उणीव नव्हती, पण आज हे काय भलंतच? तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा. तीही पाच वाजण्याच्या प्रतिक्षेत होती. नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती. खात्री करून घेणार होती.

पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेलपासून काही अंतरावर पार्क केली अन् ती हॉटेलच्या लाउंजमध्ये येऊन बसली. तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता. काळा गॉगलही लावला होता. हातात वाचायला पुस्तक होतं. त्यामुळे चेहरा झाकला जात होता.

बरोबर पाच वाजता ऐटबाज कपडे घातलेला सुशांत गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला. त्याचवेळी एक मुलगीही तिथं आली. दोघांची गळाभेट झाली अन् हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाली. नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केलेली असणार.

सुनयनाचे डोळे भरून आले. घशाला कोरड पडली. तिला वाटलं आता इथंच आपण जोरजोरात रडू लागणार. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं. काही वेळ स्तब्ध बसून राहिली. जरा शांत झाल्यावर उठली, गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली. आता ती मुक्तपणे रडू शकत होती. बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं. ती विचार करत होती, तिच्या प्रेमात, तिच्या सेवेत, तिच्या समर्पणांत कुठं उणीव राहिली होती म्हणून सुशांतला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ वाटली? ती जरी फार शिकलेली नाही, तरी सुसंस्कृत, चांगल्या वळणाची आहे. सुंदर आहे, निरोगी आहे…सुशांतची काळजी घेते. त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही…तरीही?

तिनं तिच्या जिवलग मैत्रिणीला फोन लावला. सुप्रियाला सुनयनाच्या आवाजावरूनच काही तरी बिनसलं आहे हे लक्षात आलं. ‘‘काय झालं सुनयना? तू बरी आहेस ना?’’

सुनयनला पुन्हा रडू फुटलं. कशीबशी तिनं सर्व हकिगत सुप्रियाला सांगितली. तिला समजंवत म्हटलं, ‘‘तू शांत हो अन् धीर सोडू नकोस. अगं, आयुष्यात असे प्रसंग येतातच…दुसऱ्यावरचा काय, स्वत:वरचाही विश्वास उडेल असं कित्येकदा घडतं. अगं, मलाही खूपदा भीती वाटते, मी अजून लग्न केलं नाहीए. न जाणो, कुणाच्या प्रेमात पडले अन् त्यानं विश्वासघात केला तर? पण म्हणून रडत बसायचं नाही. उलट आपलं मन इतरत्र रमवायचं.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय गं! पण मी तर माझं सगळं आयुष्यच सुशांतला वाहिलेलं आहे ना?’’

‘‘पण असं फक्त तुझ्याच बाबतीत घडतंय असं नाही…सुनयना, तुला नेहा आठवतेय?’’

‘‘नेहा? तिची आई आपल्या शाळेत क्लर्क म्हणून काम करायची, ती?’’

‘‘हो गं! तीच, तिला मी अधूनमधून माझ्या आईच्या मदतीला बोलावून घेत असते. सध्या ती कुठंतरी नोकरीही करते आहे. आमच्या घराजवळच राहते. तिचीही एक कहाणीच आहे. लव्ह मॅरेज केलं होतं…नवरा बदफैली निघाला.’’

‘‘अगंबाई…तीही माझ्यासारखीच रडते ना?’’

‘‘छे! ती बरी पक्की आहे. नवऱ्याला तिनं चांगलंच खडसावलं. यापुढे नीट राहिला नाही तर ती घटस्फोट देणार आहे त्याला. तिनं पोलिसातही तक्रार दिलीय.’’

‘‘चांगलं केलं तिनं…पण मी असं नाही करू शकणार…या सुखासीन आयुष्याची सवय लागलीय…शिक्षण बेताचं…’’ निराश सुरात सुनयनानं म्हटलं.

‘‘अगं, होतं असं कधीकधी, काय करावं याचा निर्णय असा पटकन् घेता येत नाही. विशेशत: ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं, तोच असा विश्वासघात करतो, आपल्या प्रेमाची किंमत मातीमोल ठरवतो, तेव्हा फारच वाईट वाटतं…तू आत्ता फार विचार करू नकोस. शांत मनानं झोपायचा प्रयत्न कर…नंतर यावर विचार करता येईल.’’

‘‘ही गोष्ट इतकी छोटी नाहीए प्रिया, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे…’’

‘‘कळतंय मला. तरीही आता फोन बंद कर.’’ प्रियानं एका झटक्यात फोन बंद करून टाकला.

सुनयनानंही हातातला रिसीव्हर खाली ठेवला. ती पलंगावर आडवी झाली. मन मात्र परत परत त्याच प्रसंगावर केंद्रित होत होतं. सुशांतचं फोनवरून किस करणं, त्या दोघांची गळाभेट, हातात हात घालून लिफ्टकडे जाणं.

अन् हे काही प्रथमच घडलंय असंही नाही. यापूर्वीही रेवाबरोबर त्याचे घनिष्ट संबंध होते. पण तेव्हा सुशांतनं तिची क्षमा मागितली होती. रेवा त्याची जुनी मैत्रीण आहे. तिला दुखवायचं नाही म्हणून मैत्री ठेवतो वगैरे म्हणाला होता.

सुनयानानं तेव्हा फार त्रागाही केला नव्हता. कारण ती सुशांतवर मनापासून प्रेम करत होती. त्यांनही तिला त्याच्या प्रेमाची ग्वाही दिली होती. शिवाय सुशांतची श्रीमंती व शिक्षणामुळे तिला स्वत:ला फारच न्यूनगंड जाणवायचा. त्यानं काही कारणामुळे तिला घरातून हाकूलनच दिलं तर? या प्रश्नानं तिची झोप उडायची. त्याच्यामुळेच आपण इतकं सुखासीन आयुष्य जगतोय हेही तिला मान्य होतं…तरीही आज तिला सुशांतचा राग आला. रेवाशी त्याची मैत्री होती, कदाचित प्रेमही असेल पण आज जे काही होतं, ती फक्त वासना होती. शारीरिक सुखाची ओढ होती.

रात्री उशीरा घरी परतलेला सुशांत जणू काहीच घडलं नाहीए असं वागत होता. सुनयननाही शांतच होती. नियतीचा खेळ मुकाट्यानं बघण्याखेरीज तिच्या हातात याक्षणी काहीच नव्हतं. मागच्या वर्षीच तिच्या लक्षात आलं की सुशांत अधूनमधून ड्रग्ज घेतो. प्रचंड आटापिटा करून तिनं त्यातून त्याला बाहेर काढलं होतं.

दोन महिने असेच गेले. सुनयना शांतपणे सुंशातवर नजर ठेवून होती. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं की त्याचे दोनतीन स्त्रियांबरोबर संबंध आहेत. एकदोनदा तिनं त्याला म्हणतात तसं ‘रंगे हाथों’ पकडलं पण तो निर्लज्जपणे हसला होता. इतका बेडरकारपणा सुशांत करू शकतो हे बघून तिलाच लाज वाटली होती.

मनातल्या मनात ती झुरत होती. एकदा तिनं आईला फोन करून सांगायचा प्रयत्न केला. पण आईनं ऐकूनच घेतलं नाही. श्रीमंत जावयाबद्दल काहीही ऐकून घ्यायला ती तयार नव्हती. उलट, ‘‘तो तुला कमी करत नाहीए ना? मग राहा तिथंच सुखानं…इतक्या छोट्या गोष्टीसाठी घर सोडू नकोस.’’ आईनं तिलाच दटावलं होतं.

काय करावं? घर सोडायचं? घटस्फोट घ्यायचा? पण मग जगायचं कसं? गरीब माहेरी तिला कुणी आधार, आश्रय देणार नव्हतं. शिक्षण बेताचं…नोकरी तरी कशी मिळणार? सुखासीन आयुष्याची सवय झालेली…कष्ट करणं जमेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल, कशी असेल? दुसरं लग्न करावं तर कोण व्यक्ती भेटेल कशी असेल याची खात्री नाही…त्यापेक्षा जे चाललंय ते चालू दे. निदान समाजात इभ्रत, अब्रू, मानसन्मान आहे. सुनयना तासन्तास विचार करत होती…निश्यच होत नव्हता.

एक दिवस सकाळीच प्रियाचा फोन आला. ‘‘अगं, एक बातमी आहे. आपली नेहा…नवऱ्याला सोडून आली आहे. तिनं त्याला घटस्फोटाची नोटिस दिलीय.’’

‘‘काय सांगतेस?’’ सुनयनानं दचकून विचारलं, ‘‘इतका मोठा निर्णय तिनं तडकाफडकी घेतलादेखील?’’

‘‘हो ना, चांगला निर्णय घेतला. त्याला धडा शिकवला तिनं. मला तर वाटतं तूही तसंच करायला हवंय.’’

सुनयनानं फोन ठेवला. दिवसभर, रात्रभर ती तळमळत होती…काय करावं हा विचार डोकं पोखरत होता. शेवटी सकाळी तिचा निर्णय झाला. ‘‘ठीक आहे. मीही आता नेहासारखा घर सोडायचाच निर्णय घेते. सुशांतला धडा शिकवते. माझ्या प्रेमाची समर्पणाची किंमत नाहीए त्याला. स्वत:च्या श्रीमंतीचा माज आहे…तुझी श्रीमंती तुला लखलाभ…’’ पटकन् तिनं आवरलं अन् नीटनेटकी तयार होऊन पर्स घेऊन ती घराबाहेर पडली. सुशांतला काही सांगावं, त्याचा निरोप घ्यावा या भरीला पडलीच नाही. त्यानं पुन्हा क्षमा मागितली तर तिचा निश्चय डळमळेल म्हणून न सांगताच बाहेर पडली. सुशांतनं केलेला विश्वासघातही नको अन् त्याची बायको म्हणून सुरक्षित, सुखनैव आयुष्यही नको…काय व्हायचं ते होईल.

नवऱ्याचं घर सोडलं, माहेरी जाणं शक्य नाही…काय करायचं? बराच वेळ मेट्रो रेल्वेच्या स्टोजवर ती सुन्न, बधीर होऊन बसली होती. तेवढ्यात सुप्रियाचा फोन आला. ‘‘कुठं आहेस तू? घरचा फोन लावला तर सुशांतनं उचलला. तू घरी नाहीएस म्हणाला. तुझा मोबाईलही तू उचलत नव्हतीस. बरी आहेस ना?’’

‘‘मी…मी घर सोडलंय…’’ दाटलेल्या कंठानं ती एवढंच बोलू शकली.

सुप्रियाही हादरलीच… ‘‘आता कुठं जाणार आहेस? मुळात तू आहेस कुठे?’’

‘‘आहे. मेट्रो रेल्वे स्थानकावर…कुठं जायचं तेच कळत नाहीए.’’

‘‘ताबडतोब माझ्या घरी ये. मी आज रजा टाकतेय, निवांतपणे तुझ्या आयुष्याची दिशा ठरवूयात. लगेच निघ. मी वाट बघतेय.’’ सुप्रियानं म्हटलं. खरोखर ती धाडसी अन् विचारी होती. ती ही एकटीच होती. दोघी एकत्र राहिल्यावर एकमेकींचा आधार होईल.

सुनयनानं आल्याबरोबर प्रियाला मिठी मारली अन् भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रियानं तिला मनसोक्त रडू दिलं. मग पाण्याचा ग्लास तिच्यासमोर ठेवून तिनं चहा केला. चहा घेताघेता म्हणाली, ‘‘जे काही रडणं आहे ते फक्त आज. यापुढे फक्त लढायचं आहे. स्वत:ला सिद्ध करायचं तू. मनांतली सगळी भीती काढून टाक. मी तुझ्या पाठीशी आहे.’’

सुनयनाला सावरायला थोडा वेळ हवा होता. प्रियानं तिला सुचवलं की ती शिवण काम छान करायची. थोड्या सरावानं ती पुन्हा ते काम करू शकते. घरात बसून काम होईल…पैसा हातात येऊ लागेल. सध्या शिवणावर बायका व पुरूष टेलरही खूप पैसा मिळवत आहेत.

सुनयना तयार झाली. शिवणाचं मशीन सुप्रियानं विकत आणलं. कापड आणलं. त्यातून काही पोषाख, ब्लाउज वगैरे तयार झाले. सोसायटीतच ग्राहक भेटले. कामं मिळू लागली.

काही दिवस गेले अन् सुनयनाला जाणवलं की ती आई होणार आहे. डॉक्टरांकडे तपासून घेतल्यावर तर पक्कीच खात्री झाली. सुशांतपासून दूर झाली तरी सुशांतशी संबंध संपलेच नव्हते…काय करावं? ती पुन्हा घाबरी झाली. सुप्रियानं पुन्हा धीर दिला. ‘‘हे बाळ आपण वाढवू…तू काळजी करू नकोस,’’ असं समजावलं. सुनयनाबद्दल ती खूप काळजी घेत होती. दिवस पूर्ण भरले अन् सुनयना एका गोंडस मुलीची आई झाली.

सुप्रियाला नोकरीत भराभर बढत्या मिळत गेल्या. तिनं शहराच्या लांबच्या भागात चांगला फ्लॅट घेतला. सुनयनाचा आता जुन्या जगाशी, सुशांतशी काहीच संबंध नव्हता. मधल्या काळात तिची आईही वारली. आता तर माहेरचाही संबंध संपला. पण ती सुप्रिया, आपली लेक अन् स्वत:चं काम यात अगदी रमली होती. आनंदात होती. तिचं कामही जोरात सुरू होतं. मुलीला उत्तम शाळेत अॅडमिशन मिळाली होती. इकडे सुशांतची मात्र परिस्थिती अगदीच वाईट होती. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक फटका बसला होता. पैशासाठीच त्याला जवळ करणाऱ्या त्या सर्व मुली त्याला सोडून गेल्या होत्या. त्याच्या वागण्यामुळे पुरूष मित्रही दुरावले होते. फारच एकटा पडला होता. तब्येतीच्या कुरबुरीही सुरू झाल्या होत्या. सुनयनाची फार आठवण यायची. तिचं प्रेम, साधं वागणं, समर्पण आठवून तो हळवा व्हायचा…तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. कुणाला विचारणार? पोलिसात तक्रार देणं त्याच्या इभ्रतीला शोभलं नसतं.

एक दिवस असाच निराश मन:स्थितीत तो टीव्हीसमोर बसून चॅनेल बदलत होता. एका चॅनलनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. ‘सुपर चाइल्ड रिएलिटी शो’ नामक कार्यक्रम सुरू होता. प्रेक्षकांमध्ये समोरच सुनयना दिसली त्याला. तो लक्षपूर्वक बघू लागला.

स्टेजवर एक लहानशी मुलगी अतिशय सुरेख गाणं म्हणत तेवढंच सुंदर नृत्यही करत होती. सुशांत भान हरपून बघत होता. तिचं नृत्य संपलं तेव्हा सर्व परीक्षक व प्रेक्षक उठून उभे राहून टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करू लागले.

सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. परीक्षकांनी त्या कलाकार मुलीला तिच्या पालकांबद्दल विचारलं, तेव्हा कॅमेरा सुनयनावर स्थिरावला. चकित होऊन सुशांत बघत होता…म्हणजे ही मुलगी सुनयनाची आहे? म्हणजे त्याचीच ना? की तिनं दुसरं लग्न केलंय?

मुलीनं प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सुनयना व सुप्रियाला हातानं धरून स्टेजवर आणलं…‘‘मला बाबा नाहीएत…पण दोन ‘आई’ आहेत. याच दोघी माझे आईबाबा आहेत. मी जी काही आहे ती यांच्या कष्टामुळे, संस्कारामुळे आहे.’’

‘सुपर चाइल्ड’, ‘सिंगल मदर’ सगळेच अभिनंदन करत होते. प्रेक्षकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या. सुशांतला कळत नव्हतं या मुलीचे बाबा कोण? तो की कुणी दुसरा? सुनयनाला कुठं अन् कसं भेटावं? मुलीला प्रेमानं मिठीत घ्यावं असं वाटत होतं. पण तो फक्त रडत होता.

सुनयना लेकीला मिठीत घेऊन रडत होती. आनंद, अभिमान, कष्टाचं सार्थक, मुलीबद्दलची अपार माया तिच्या चेहऱ्यावरून ओसंडत होती. प्रियानं तिला आधार दिला होता.

सुशांत फक्त अश्रूभरल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होता. एकटाच!! असहाय!!

भरलं घर की राजाराणीचा संसार

कथा * पौर्णिमा अत्रे

‘‘हे स्थळ मला सर्वार्थानं योग्य वाटतंय. एकदा तनूला विचारून घेतो अन् मग फायनल करून टाकू,’’ गिरीशनं आपल्या बायकोला, सुधाला म्हटलं.

‘‘हो, पण तिनं आधी होकार तर द्यायला हवा ना? त्रस्त झालेय या मुलीपायी. इतकी छान छान स्थळं येताहेत पण काही तरी खुसपट काढून नाकारतेय ती सगळ्यांना. त्यातून एकत्र कुटुंब म्हटलं की संतापतेच! आता मात्र मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही. आता खरं म्हणजे हे स्थळ तिच्या अपेक्षेनुरूपच आहे, पण एकच डोक्यात घेऊन बसलीय की एकत्र कुटुंबात सून म्हणून जाणार नाही…काही तरी एकेक खुळं या मुलींची!’’ सुधानं म्हटलं.

तुला माहीत आहे ना, हे सगळं त्या तिच्या लाडक्या मैत्रिणीमुळे झालंय. अशी पूर्वी नव्हती आपली तनु, पण हल्ली त्यांच्यावर आई वडिलांपेक्षा मित्र मैत्रिणींचाच प्रभाव जास्त असतो.

नवरा बायको सचिंत चेहऱ्यानं बोलत असतानाच तनु ऑफिसातून घरी परतली. आईवडिलांचे चेहरे बघून तिनं हसून विचारलं, ‘‘आज पुन्हा एखादं स्थळ आलेलं दिसतंय?’’

तिचा हसरा चेहरा अन् विचारण्याची पद्धत यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिघांनी एकत्र बसून चहा घेतला. मग सुधानं म्हटलं, ‘‘हे स्थळ खरंच छान आहे. इथं लखनौमध्येच मुलाचे आईवडिल त्यांच्या थोरल्या लेकसुनेसह राहताहेत. धाकटा मुंबईला असतो. तो एका औषधांच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आहे.’’

तनुनं क्षणभर विचार केला. मग हसून म्हणाली, ‘‘म्हणजे, तो तिथं एकटा राहतो?’’

‘‘होय.’’

‘‘तर मग हरकत नाही…फक्त त्याच्या आईवडिलांनी वारंवार मुंबईला येऊन धडकू नये…’’

‘‘कसं गं बोलतेस तनु? अगं त्याचे आईवडिल आहेत. ते काय आपल्या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीत? अशी, इतकी तुसडी अन् माणूसघाणी कशी गं झालीस तू? हे काय नवीनच फॅड तुझं? आम्हाला आजही वाटतं, घरात कुणी वडिलधारं असावं…पण सगळेच खूष आणि निवर्तले अन् तुला घरात फक्त नवरा हवाय…अगं सासरच्या घरात किती तरी नाती असतात. नातलग असतात…ते ही सगळं महत्त्वाचंच असतं…’’ जरा चिडूनच सुधानं म्हटलं.

‘‘नाही…नाही आई, मला भीती वाटते…रिया सांगत होती.’’

सुधा तडकन् उठून उभी राहिली. संतापून म्हणाली, ‘‘नाव नको घेऊस तिचं, आचरट पोरगी…त्या पोरीमुळे आमची चांगली गुणाची पोर बिघडली आहे. बुद्धीभेद केलाय तिनं तुझा. अगं, आपलं फक्त तीन माणसांचं कुटुंब. तुला तर भरल्या घराची, मोठ्या कुटुंबाची किती हौस होती. पण या रियानं निगेटिव्ह गोष्टी सांगून तुझं डोकं बिघडवलंय.’’

तनुला पण राग आला. ती ही रागाने धुमसत आपल्या खोलीत निघून गेली. गिरीश अन् सुधा प्रश्नार्थक मुद्रेनं एकमेकांकडे बघत होती.

तनूची पक्की मैत्रीण रियाचं लग्न सहा महिन्यांपूर्वी दिल्लीतल्याच एका कुटुंबात झालं होतं. घरी सासूसासरे अन् नवरा अनुज अशी मंडळी होती. एक मोठा दिर वेगळा राहत होता अन् नणंदेचं लग्नही वर्षभरापूर्वीच झालं होतं. चांगलं नामांकित, समृद्ध कुटुंब होतं. रियाही नोकरी करत होती. तनुकडूनच रियाची बातमी सुधाला कळायची. दिवसा दोघी व्हॉटसअॅपवर चॅटिंग करायच्या. सुट्टीच्या दिवशी एकमेकींशी भरपूर गप्पा व्हायच्या. जे काही बोलणं कानांवर पडायचं त्यावरून सुधाला एवढं जाणवलं होतं की रिया सतत सासूसासरे अन् नवऱ्याबद्दल तक्रारी सांगत असते. ती तनुची लाडकी मैत्रीण होती. तिच्याबद्दल काहीही म्हटलेलं तनुला आवडत नसे. पण तनु आईला मात्र सगळं सांगायची. त्यामुळेही सुधाला रियाबद्दल बरंच काही कळत असे.

एकदा तनुनं म्हटलं, ‘‘आज सकाळी रियाला जास्त वेळ झोपायचं होतं, पण नवऱ्यानं तिला रोजच्याप्रमाणे लवकर उठवलं. ती दोघं मॉर्निंगवॉकला एकत्रच जातात ना? पण बिच्चारी रिया, तिला मनाप्रमाणे झोपायलाही मिळत नाही. आज रियाचा मूड त्यामुळेच फारच वाईट आहे.’’

एकदा पुन्हा तनूनं सांगितलं, ‘‘रियाची सासू खूपच हेल्थकाँशस आहे. घरातल्या सर्वांच्या तब्येती त्यांच्यामुळेच चांगल्या आहेत. पण त्यामुळे रियाला रोजच ‘हेल्दी फूड’ खावं लागतं.’’

सुधानं विचारलं, ‘‘स्वयंपाक, ऑफिसचे, शाळेचे डबे सगळं सासूबाईच करतात का?’’

‘‘हो ना, रियाला जॉबवर जावं लागतं. सगळं घर त्याच सांभाळतात. स्वयंपाकाला बाई आहे, पण सासू सगळं स्वत:च्या देखरेखीखाली करवून घेतात.’’

‘‘मग हे तर खूपच छान आहे. आयता डबा मिळतो रियाला. यात तक्रार कशाला करायची? रियानं तर आनंदातच राहायला हवं.’’

‘‘कसली डोंबलाची आनंदात राहणार? तिला ते जेवण मुळीच आवडत नाही. ती तिच्या मैत्रीणीला आपला डबा देते अन् स्वत:साठी हॉटेलमधून लंच मागवते. बिच्चारी रिया…!’’

‘‘बिच्चारी…कशानं झाली? चांगला आयता घरच्या चांगल्या जेवणाचा डबा मिळतोय तर हॉटेलचं महागडं अन्  कुणीतरी केलेलं, कसलंतरी जेवण कशला मागवायचं?’’

तनूला राग आला, ‘‘तुला रियाची बाजू समजून का घेता येत नाही?’’

‘‘काही गरज नाहीए. काहीतरी खुसपटं काढून स्वत:चं अन् तुझं डोकं बिथरवून टाकतेय ती.’’

दोन दिवस तनू गप्प होती. मग पुन्हा तिचं सुरू झालं. ‘‘रियाच्या सासरची सगळीच माणसं दिल्लीला असतात. कुणा ना कुणाकडे सतत काही ना काही होतंच असतं. दीर, नणंदा, आत्या, काका, मावशी, मामा…कोण न् कोण सतत ते तिच्या घरी येतात नाही तर तर हिला तरी त्यांच्या घरी बोलावतात. रिया बिच्चारी कंटाळून जाते.’’

सुधाला कळतंच नव्हतं, रियाला त्रास काय होता. तिची नोकरी तशी आरामाची होती. शनिवार रविवार सुट्टी असायची. घरात अगदी कपाटं आवरून देण्यापासून सगळ्या कामांना गडी मोलकरीण होत्या. जायला यायला शोफर सकट गाड्या होत्या. तरीही तिला सगळ्याचा त्रासच व्हायचा. तनूची विचारसरणी बदलते आहे अन् ती रियाची नकारात्मक वृत्ती स्वीकारते आहे एवढंच सुधाला कळत होतं, खटकत होतं.

काही दिवस मध्ये गेले मग रजतचं स्थळ नक्की केलं गेलं. तनू आणि रजत भेटले. दोघांनी मोकळेपणानं गप्पा मारल्या अन् मग दोघांच्या पसंतीनुसार लग्न ठरलं. साखरपुडा वेगळ्यानं न करता लग्नच करणं जास्त सोयिस्कर होतं. कारण रजत मुंबईला एकटाच राहत होता. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना लग्नाची घाई होती.

लग्न थाटात पार पडलं. रिया नवऱ्याबरोबर लग्नाला आली होती. परत जाताना म्हणाली, ‘‘तनू तुझी मजाच मजा आहे गं! मुंबईला एकटी राहशील…मी तर भरल्या घरात अशी अडकले आहे ना?’’

सुधाला रियाचा राग आला. पण तो न दाखवता तिनं आहेर देऊन रियाला व अनुजला निरोप दिला. तनूनं लग्न ठरताच मुंबईला बदली व्हावी म्हणून अर्ज केला होता. तो मंजूर झाला आणि तिला मुंबईला बदलीही मिळाली. रजतची सुट्टी होती तेवढे दिवस तनू सासरच्या घरीच होती. थोरला दीर, जाऊ, त्यांची दोन मुलं, सासू सासरे सगळ्यांच्या संगतीत वेळ खूप छान गेला. भटकणं, हास्यविनोद, मनसोक्त खाणंपिणं अन् भरभरून प्रेम आणि कौतुक करणारी सासरची माणसं यांच्यात वेळ कसा गेला कळलंच नाही.

दोघांचीही रजा संपली तशी बॅगा भरल्या गेल्या. दोन्ही घरातली मंडळी निरोप द्यायला एयरपोर्टवर गेली होती. रियाही भेटायला आली होती. तनूला बाजूला घेऊन म्हणाली, ‘‘उगीच सर्वांना मुंबईला या, मुंबईला या म्हणू नकोस. येतील सगळेच्या सगळे अन् तुझ्याकडे मुक्काम ठोकतील.’’ तनूनं फक्त हसून विषय टाळला.

मुंबईला रजतबरोबर तनूचा नवा संसार सूरू झाला. रजतबरोबर ती अगदी मजेत होती. दोघंही सकाळी कामावर जायची ती रात्रीच घरी परतायची. वीकएन्डला थोडा निवांतपणा असायचा.

सकाळी लताबाई यायची अन् स्वयंपाकासकट सर्व आटोपून जायची. तनूही डबे करून घ्यायची. घर नीट आहे ना खात्री करून लॉक करून निघायची. तसं दोघांचं काम असं फारसं नसे. पण दमून आल्यावर नाश्ता रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा यायचा

रजतनं अनेकदा म्हटलं, ‘‘रात्रीच्या स्वयंपाकालाही बाई ठेवून घेऊयात.’’

‘‘पण आपली यायची वेळही रोजची ठरलेली नसते. बाईला किल्ली देऊन ठेवायला मला आवडत नाही.’’

‘‘ठीक आहे. रात्रीचा स्वयंपाक आपण दोघं मिळून करत जाऊ,’’ रजतनं सुचवलं. रियाशी रोजच तनुचं चॅटिंग चालायचं. तनुच्या स्वातंत्र्याचा रियाला हेवा वाटायचा. ती सतत आपल्या एकत्र कुटुंबाला नावं ठेवायची. लग्नाला सहा महिने झाले होते. रजतला ऑफिसकडून एक आठवडा सिंगापूरला ट्रेनिंगसाठी जायला लागणार होतं. त्यानं म्हटलं, ‘‘मी इथं नसताना तू एकटी पडशील, लखनैहून आईबाबांना बोलावून घेऊ का? नाही तरी अजून इथं आलेच नाहीएत ती दोघं.’’

‘‘आत्ता नको, आत्ता रियाला इथं येण्याची फार इच्छा आहे. तिला यावेळी येऊन जाऊ दे. पुढल्या वेळी आईबाबांना बोलावून घेऊ. चालेल?’’ तनूनं म्हटलं. रजतला काहीच हरकत नव्हती.

तनूनं लगेच रियाला फोन केला, ‘‘प्रोग्रॅम नक्की ठरला आहे. आता बदल करू नकोस. कुठलीही सबब सांगू नकोस.’’

‘‘नक्की येतेय…या गर्दीतून बाहेर पडायला आसुरलेले आहे मी. अगदी शांत, निवांत राहायचं आहे मला तुझ्याकडे.’’

ज्यादिवशी सकाळी रजत गेला त्याच दिवशी दुपारपर्यंत रियाही मुंबईत पोहोचली. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या गप्पा अखंड सुरू होत्या. रात्री उशीरापर्यंत रिया बोलतच असायची. सासूसासरे, दिर नणंदा सगळ्यांबद्दल सांगायची. एकत्र होणारे सणवार, उत्सव, गेट टूगेदर काय अन् काय. दुसऱ्या दिवशी तनूनं रजा घेतली होती. सकाळपासूनच दोघी भटकायला बाहेर पडल्या. भरपूर फिरल्या. सिनेमा बघितला, शॉपिंग झालं. बाहेरचं खादाडी केली. रात्री उशीरा घरी परतल्या.

‘‘वॉव! असं वाटतंय दुसऱ्या जगात आलेय मी…! किती शांत अन् छान वाटतंय गं तुझ्या घरात. व्वा! खूपच मज्जा आली हं!’’ रिया म्हणाली.

तनू फक्त हसली…‘‘दमलोय आपण, आता झोपूयात. उद्या मला कामावर जायला लागेल. सकाळी लताबाई येईल अन् सगळं काम करून जाईल. तू आरामात ऊठ. लताबाई तुझ्यासाठी ब्रेकफास्ट अन् जेवणही करून ठेवेल.’’

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सर्व आवरून तनु ऑफिसला निघून गेली. बारा वाजता रियाचा फोन आला. ‘‘तनू अगं, काय सांगू, इतकी मज्जा येतेय, इतक्यात झोपून उठलेय. किती शांती आहे गं तुझ्या घरात, कुठला आवाज नाही, कुणी माणूस नाही…वॉव!’’

सुधाला, रिया मुंबईला आठ दिवसांसाठी आली आहे हे तनुकडूनच समजलं होतं, तिनं तनुला म्हटलं, ‘‘बघ, रियाच्या सासरची माणसं किती चांगली आहेत. आठ दिवस सुनेला पाठवून दिलीय मैत्रीणीकडे…रियाला चांगल्या माणसांची किंमत नाहीए.’’

रियानं आरामात उठून आवरलं. ब्रेकफास्ट घेतला. थोडावेळ टीव्ही बघितला. काही वेळ बाल्कनीत बसून रस्त्यावरच्या रहदारीची गंमत बघितली. मग मजेत अंघोळ ओटापून, जेवण करून पुन्हा मस्त ताणून दिली. सायंकाळी तनू घरी आल्यावर दोघींनी चहा घेतला, गप्पा चालूच होत्या. रिया म्हणाली, ‘‘तू सांग ना तुझं काही…मीच एकटी माझं सांगतेय.’’

‘‘माझेयाकडे सांगायला काहीच नाहीए, काय सांगू? आम्ही दोघंच ना इथे. सकाळी जातो ते रात्रीच येतो. आठवडा असा धावपळीत संपतो. त्यातल्या त्यात वीकएन्डला जरा आराम मिळतो. घरी बोलायलाही कुणी तिसरं माणूस नाहीए.’’

‘‘हो गं! पण किती शांतता आहे इथं. तिथं घरातून निघताना सासूबाईंच्या सूचना अन् घरात शिरताच त्यांचं चहा घेतेस ना? तुझ्या आवडीची थालपिठं केली आहेत. असं काही बाही बोलायला लागतात. मला तर दमायला झालंय माणसांच्या गराड्यात. रोजच काही ना काही चालू असतं.’’

तनुला आज प्रथमच रियाचं बोलणं खटकलं. तिला मनांतून एकाएकी फार उदास वाटलं. तिनं रात्रीचा स्वयंपाक केला. रिया बोलतच होती. मधून मधून तिच्या नवऱ्याचा अन् सासू सासऱ्यांचाही फोन येऊन गेला.

दोघी झोपायला बेडरूममध्ये आल्या. दोघींच्या मनात वेगवेगळे विचार होते. रिया मनांत म्हणत होती, ‘‘किती छान आयुष्य आहे तनुचं. घरात फक्त दोघंच. किती शांतता असते घरात. कुठलेच आवाज नाहीत. उगीचच बांलणं, सल्ले, विचारपूस नाहीए, कुठं जाते, काय खाल्लं, कोणी विचारणार नाही. आपल्या मनात येईल ते करावं…इकडे तनुच्या मनांत येत होतं, रिया म्हणते मज्जा आहे तुझी…एकटीच राहतेस…पण मला तर एकट्यानं राहण्यात काय मज्जा आहे तेच कळत नाही. इथं आमच्या दोघांखेरीज कुणी तिसरं माणूस नाही. सकाळी मेड सर्व्हंट येते मशीनप्रमाणे कामं उरकते अन् निघून जाते. आमची काळजी करणारं, प्रेमानं विचारपूस करणारं कुणीही नाही. माहेरी तीनच माणसं…मला तर केवढी हौस होती भरल्या घराची एकत्र कुटुंबाची. तिथं किती तऱ्हेची नाती मिळतात…सून, जाऊ, मामी, काकी, वहिनी…प्रत्येक नात्याची वीण वेगळी, मजा वेगळी. इथं वीकएन्डला एखादा सिनेमा बघतो, घरी आल्यावर दमलेलो असतो. विचारणांरही कुणी नाही. रियाला काय असं एकटं राहण्यात सुख वाटतं कुणास ठाऊक…दीरनणंदेची थट्टा चेष्टा मस्करी नाही. जावेची प्रेमळ कुरकुर नाही, सासूसासऱ्यांची प्रेमळ देखरेख अन् काळजी नाही…हे काय आयुष्य म्हणायचं?’’

दोघी एकमेकींच्या आयुष्याबद्दल विचार करत होत्या. तनुनं ठरवलं, उद्या सकाळी लखनौला फोन करायचा अन् सासरच्या माणसांना इथं यायचा आग्रह करायचा. तिकडची सगळी माणसं इथं यायला हवीत. आयुष्यात प्रत्येक नात्याचा आनंद उपभोगायला हवा ना? सहजच तिचं लक्ष रियाकडे गेलं. रियानंही त्याचवेळी तिच्याकडे बघितलं. दोघीही हसल्या.

रियानं विचारलं, ‘‘कसला विचार करते आहेस?’’

‘‘तुझ्याबद्दल अन् तू कसला विचार करत होती?’’

‘‘तुझ्याबद्दल विचार करत होते?’’

दोघीही हसल्या, तनुच्या हसण्यात सामावलेलं गूढ रियाला कळणारच नव्हतं.

सप्तरंगांची उधळण

कथा * प्राची भार्गवे

मनीष आपल्या पत्नीसोबत, मुक्तासोबत बाल्कनीत बसून चहा पित होता. दिवसभरात ऑफिसमध्ये घडलेल्या काही घटना तिला ऐकवत होता. मुक्ताही दिवस कसा गेला, काय, काय झालं ते सांगत होती. नुकतंच दोघांचं लग्न झालं होतं. नवा संसार सुरू झाला होता. दोघांनाही त्या नव्याची नवलाई अनुभवताना गंमत वाटत होती.

समोश्याचा घास घेत मनीषनं म्हटलं, ‘‘व्वा! चविष्ट समोसा, तोही तुझ्या हातचा अन् एयर फ्रायमध्ये तयार केलेला…म्हणजे रूचकर पदार्थ अन् तोही अत्यंत हेल्दी…खरोखर तू एक उत्तम पत्नी आहेस.’’

मुक्ता स्वत:ची स्तुती ऐकून लाजली. ती हसून काही बोलणार तेवढ्यात मनीषचा मित्र गोपाळ तिथं आला.

‘‘अरे? गोपाळ? ये ना, ये बैस. मुक्ता, गोपाळलाही चहा आवडतो.’’

मुक्ता तत्परतेनं स्वयंपाकघराकडे वळली.

‘‘अरे? मी येताच वहिनीला का आत पाठवलंस?’’ गंमतीनं मनीषच्या पाठीवर थाप देत गोपाळनं म्हटलं. ‘‘एका परीनं चांगलंच केलंस. मी तुला एक बातमी द्यायला आलो होतो. तुझी प्रिया तिच्या आईकडे परत आलीये. आज मला मार्केटात भेटली. तुझ्याबद्दल विचारत होती. तुझा फोननंबर मागितला. म्हणाली, तिचा मोबाइल चोरीला गेल्यामुळे तिच्याकडे आता कुणाचेच नंबर नाहीएत…’’

गोपाळ पुढेही काहीबाही सांगत होता, पण मनीषला काहीच ऐकू येत नव्हतं. तो भूतकाळात जाऊन पोहोचला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचं सगळं आयुष्य, त्याचं अवघं अस्तित्व याच नावाभोवती फिरत होतं. त्याची प्रिया, त्याचा प्राण, त्याचं पहिलं प्रेम…

कमलाकरनं दिलेल्या पार्टीत त्या दिवशी प्रत्येकाची नजर प्रियावर खिळलेली होती. मनीषचा स्वभाव लाजराबुजरा असल्यामुळे तो फक्त लांबूनच तिच्याकडे बघत होता. पार्टी संपली तेव्हा प्रत्येकानं आपापल्या घरी परतण्याची तयारी सुरू केली. कुणीतरी म्हणालं, ‘‘प्रियाचं घर मनीषच्या वाटेवर आहे.’’ प्रियाला घरी पोहोचवण्याची जबाबदारी ओघानंच मनीषवर आली आणि त्यानं ती आनंदानं स्वीकारली. प्रियाचं सौंदर्य, स्मार्टनेस आणि अवखळपणानं तोही वेडावला होताच. प्रिया कॉलेजात शिकतेय हे त्याला समजलं. कॉलेज संपवून तो प्रशासनिक सेवापरीक्षेच्या तयारीला भिडलाय हे त्यानं प्रियाला सांगितलं.

‘‘म्हणजे तू खूपच हुषार आहेस तर? मला अभ्यासात अडचण आली तर मी तुला विचारू शकते का?’’

‘‘केव्हाही ये.’’ मनीष तात्काळ उत्तरला. आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे, तसं झालं.

मनीष आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिल नोकरीच्या निमित्तानं दुसरीकडे असायचे. आई अगदी साधीशी…प्रिया मनीषच्या खोलीत अभ्यासासाठी बराच वेळ बसते यात तिला काही गैरही वाटलं नाही. प्रियाकडे तर मनीष केव्हाही जाऊ शकत होता. प्रियाची आई घटस्फोटिता होती अन् ती दिवसभर कुठं ना कुठं भटकत असायची.

प्रिया अन् मनीषची मैत्री झपाट्यानं वाढत होती. वयाचाही दोष होताच…लहान अवखळ वय, स्वप्नं बघण्याचं…‘आय लव्ह यू’ हे शब्द न उच्चारताच दोघांनी आपल्या भावना एकमेकांना सांगून टाकल्या. दिवसाचा बराचसा वेळ दोघं एकत्रच असायची अन् उरलेला वेळ व्हॉट्सअॅपवर. प्रिया मनीषच्या प्रत्येक बाबतीत होकारच द्यायची. मनीष तिला सतत भेटवस्तू द्यायचा. कपडे, नेलपॉलिश, लिपस्टिक, परफ्यूम एवढंच काय, तिला ऑनलाइन शॉपिंग करता यावं म्हणून त्यानं तिला क्रेडिट कार्डही दिलं होतं. मनीषच्या संकोची व लाजाळू स्वभावामुळे मनीष तिला स्पर्शही करत नसे. पण त्यानं काहीही केलं असतं तरी तिची हरकत नव्हती. तरीही एका दुपारी प्रियानं मनीषला देह समर्पित केला. त्या प्रसंगानंतर मात्र मनीषला प्रियाखेरीज काहीच सुचेनासं झालं.

‘‘प्रिया, मी तुझ्यावाचून जगूच शकत नाही. तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हा माझं आयुष्य किती भकास होतं. तू माझ्या आयुष्यात सप्तरंगांची उधळण केलीस.’’ मनीष म्हणायचा. त्यानं तिच्यावर कविताही केली होती.

माझ्या डोळ्यांनी माझं जगणं अवघड केलं आहे. उघडे असतात तेव्हा केवळ तुलाच शोधतात आणि मिटले की फक्त तुझीच स्वप्नं बघतात.

या प्रेमामुळे मनीषच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता. तो मन लावून अभ्यास करू शकत नव्हता. फक्त प्रिया आणि प्रियाच! परिणाम व्हायचा तोच झाला. तो यूपीएससीच्या परीक्षेत नापास झाला. एव्हाना मनीषचे वडिल रिटायर झाले होते. त्यांच्या पेन्शनमध्ये घरखर्च भागवावा लागत होता. त्यामुळे आता मनीषचा पॉकेटमनी, क्रेडिट कार्ड वगैरे सर्व बंद झालं होतं.

मनीषचे मित्र त्याला भेटायला, त्याला धीर द्यायला आले होते. त्यांच्याबरोबर प्रियासुद्धा आली होती. पण तिच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा अपराधीपणाची भावना नव्हती. उलट जेव्हा मनीषच्या एकदोन मित्रांनी थेटपणे म्हटलं की प्रियाच्या संगतीत अधिक वेळ घालवल्यामुळे मनीष नापास झाला, तेव्हा निर्लज्जपणे हसून ती म्हणाली होती की एक तर तो नापास झाला अन् वरून दोष कुणा दुसऱ्याच्याच माथी मारला जातोय? वा रे न्याय? तिच्या सुरात सांत्वन नव्हतं तर उपेक्षा अन् धिक्कार होता.

त्याक्षणी खरं तर मनीषला तिचा खूप राग आला होता, पण प्रियाचा अल्लडपणा मानून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अजूनपर्यंत त्यानं तिला लग्नाबद्दल विचारलंही नव्हतं. त्यानं स्वत:च्या मनाची समजूत घातली की जेव्हा लग्न होईल तेव्हा तिला कळेल की एकाची जबाबदारी दुसराही आपलीच जबाबदारी समजतो. त्याला खात्री होती, प्रियाच्या संगतीत तो खूप समाधानी अन् यशस्वी होईल. त्यामुळे त्यानं एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली.

प्रिया एकदम स्तब्ध झाली. मग तिनं अगदी स्पष्टच सांगितलं, ‘‘मनीष, भलतंच काय बोलतो आहेस? मला तू आवडतोस हे जरी खरं असलं तरी लग्न करायची काय गरज आहे? मी तुझाच तर आहे ना?’’ ‘‘पण प्रिया, असं कुठवर चालेल? माझ्या आईवडिलांना लग्न करून घरात सून यायला हवी आहे. तुझ्या आईचाही विचार कर, तिलाही तुझ्या लग्नाची काळजी असेलच ना? मला आत्ताच एक बऱ्यापैकी नोकरीही मिळते आहे. आपण त्यात भागवू शकू.’’ मनीषनं समजावलं.

‘‘बऱ्यापैकी नोकरी? समजून घे मनीष, अरे संसाराला भरपूर पैसा लागतो. पैशाशिवाय जगणार कसं? तू बघ हल्ली तू मला काही गिफ्ट देत नाहीस, हॉटेलात नेत नाहीस, शॉपिंगला नेत नाहीस…मग लग्नाचा विचार कसा करायचा? आणि लग्न म्हणजे घर सांभाळा, स्वयंपाक करा, मुलं जन्माला घाला, त्यांना वाढवा, संसाराची काळजी करत आयुष्य जगा हे सगळं मला मान्य नाही. मला तिटकारा आहे त्याचा. मी स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. माझ्या आईकडे बघ, कशी स्वतंत्र, एकटी अन् मजेत जगते आहे, मलाही तसंच आयुष्य हवंय.’’

प्रियाच्या या उत्तरानं मनीष गप्पच झाला. पण त्या दिवसानंतर मनीषला लक्षात आलं की प्रिया त्याला टाळते आहे. तिची वागणूकही बदलली आहे. किती किती दिवस ती त्याला भेटत नसे. फोनही करत नसे. कधी कुठं अवचित भेट झालीच तर भांडायच्या सुरातच म्हणायची, ‘‘एवढंच ओळखलंस का रे तू मला? मी तुला विसरू शकत नाही मनीष, एक वेळ मी स्वत:ला विसरेन. पण तू तर माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला आहेस रे…’’

ती मनीषला इमोशनली ब्लॅकमेल करायला बघायची. मनीषला वाटे, तिला विचारावं, इतकं जर प्रेम करतेस माझ्यावर तर ते दिसत का नाही तुझ्या डोळ्यात? जाणवत का नाही तुझ्या वागण्यात? पण तो बोलत नसे. त्याला भीती वाटे की प्रिया जर दुखावली गेली तर कदाचित संगळंच संपेल. तो थांबायला तयार होता. पण प्रियाबरोबर आयुष्य घालवण्याचं त्याचं सोनेरी स्वप्नं त्याला भंगू द्यायचं नव्हतं.

प्रियाला मिळवायचं तर मला आधी स्वत:ला सिद्ध करावं लागेल हे विचारात घेऊन त्यानं पुन्हा प्रशासनिक सेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. जीव तोडून तो अभ्यास करत होता. कधीतरी प्रियाशी थोडंफार फोनवर बोलला की त्याला अभ्यासाला हुरूप यायचा.

एक दिवस प्रियानं सांगितलं की ती तिच्या मामाकडे जात आहे. खरं तर तिला तिथं जायची इच्छा नाहीए, त्याच्याशिवाय तिला तिथं करमायचं नाही. पण हे सगळं ती त्याच्यासाठी करते आहे. त्याच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणूनच ती इथून दूर जाते आहे. ‘‘मनीष, ही आपल्या प्रेमाचीही परीक्षा आहे. आपण त्यात उत्तीर्ण व्हायला हवं.’’ तिनं त्याला बजावलं.

मनीषला हे पचवणं फार जड गेलं. पण इलाज नव्हता.

प्रिया मामाकडे निघून गेल्यावर तर मनीषचा कशातच जीव रमेना. त्याला सतत तिची आठवण यायची. पण काळ सतत पुढे जात असतो. परीक्षा जवळ आली होती. मनीष अभ्यासाला भिडला. पण रोज तो तिच्या पत्राची वाट बघायचा. तीन महिन्यांनी प्रियानं पत्र पाठवलं. पत्रात खूप काही लिहिलं होतं. मनीषशिवाय प्रिया कशी अपूर्ण आहे, तिला किती आठवण येते. रात्री झोपही लागत नाही वगैरे वगैरे…हे सगळं वाचून मनीषचे डोळे भरून आले. त्यानं स्वत:लाच दूषणं   दिली…का म्हणून तो प्रियावर अविश्वास दाखवतो? प्रत्येकाची प्रेम करण्याची, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून प्रिया एक मुलगी आहे. तिला काही मर्यादा पाळावीच लागते. मुलींना व्यक्त होताना संकोच वाटतो, लाजही वाटते आणि काही गोष्टी न बोलताही समजून घ्यायच्या असतातच ना? ती खरोखर प्रेम करते आहे. तिच्यावर अविश्वास नको दाखवायला. प्रियाचे प्रिय पात्र आपण आहोत! याचा त्याला अभिमान वाटला.

यथावकाश परीक्षा आटोपली. रिझल्टही आला. त्याच्या या यशानं आईवडिल आनंदले. त्यांनी घरीच एक छोटीशी पार्टी ठरवली. सगळे मित्र जमले. मनीषला प्रियाची फार आठवण येत होती. ही बातमी त्याला स्वत: प्रियाला सांगायची होती. तिला किती आनंद होईल या कल्पनेनंच तो रोमांचित होत होता.

त्यानं कमलाकरकडे प्रियाचा पत्ता मागितला. कमलाकर जसा मनीषचा मित्र होता, तसाच प्रियाचाही मित्र होता. मनीषनं म्हटलं, ‘‘ही बातमी प्रियालाही सांगायची. खरं तर आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून प्रिया इथून निघून गेली. एकमेकांपासून दूर राहून आम्ही खरोखर एक फार मोठी परीक्षा दिली आहे. प्रियानं माझ्या यशासाठी किती मोठा त्याग केला आहे. आता मला चांगली नोकरी लागेल.’’

कमलाकर गंभीरपणे म्हणाला, ‘‘मनीष, तुझ्यासारखा समंजस अन् हुषार मुलगा प्रियासारख्या फुलपाखरी वृत्तीच्या मुलीच्या जाळ्यात कसा अडकला याचं आम्हा सर्वांनाच फार आश्चर्य वाटायचं. उडत्या मैत्रीसाठी प्रिया ठीक आहे रे, पण लग्न? अशक्य! स्वत:च्या पायावर कुऱ्हाड नको मारून घेऊस.’’

नंतर बराच वेळ कमलाकर मनीषशी बोलत होता. त्यानं प्रियाबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून मनीष स्तब्ध झाला.

‘‘प्रियाचे अनेक प्रियकर आहेत. अनेकांशी तिचे जवळीकीचे संबंध आहेत. तिची आईही तशीच आहे.’’

मनीषचा विश्वास बसत नव्हता. त्याची प्रेमनायिका एकाएकी खलनायिका झाली होती. कमलाकर सांगतोय ते खरं आहे का? की प्रियासारखी मुलगी त्याच्याशी लग्न करत नाही म्हणून तो खोटंनाटं सांगतोय? पण कमलाकर असा नाहीए. हा निर्णय मनीषच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा निर्णय होता. तो तडकाफडकी नको घ्यायला.

त्यानं आडून आडून अनेक लोकांकडे प्रियाची चौकशी केली. त्याला धक्काच बसला. किती लोकांना तिच्याबद्दल काय काय माहीत होतं अन् प्रियाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मनीषला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रियानं अनेक मुलांना गंडवलं होतं. अनेकांचे जीव पोळले होते. प्रियाला श्रीमंती, सुखासीन आयुष्य हवं होतं. त्यासाठी ती नवे नवे लोक हेरत असायची.

आता कदाचित मनीषचं यश, मिळणारी मोठी सरकारी नोकरी यामुळे कदाचित प्रिया लग्नाला हो म्हणेलही…पण आता मनीष सावरला होता. उघड्या डोळ्यांनी माशी पडलेलं दूध तो कसा पिणार? इकडे आईवडिलांनी लग्नाचा धोशा लावलेला.

शेवटी मनीष आईवडिलांबरोबर एक मुलगी बघायला गेला. मुलगी सुंदर होती. शिकलेली, शालीन होती. घरदार आईबाबांनी आधीच पारखून घेतलेलं. मुलगा, मुलगी, दोन्ही कडचे घरचे लोक सर्वांच्या पसंतीनं, सहमतीनं लग्न ठरलं. मनीषनं मुक्ताला भेटायची परवानगी मागितली. त्याला तिच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. मुक्ता खूपच संकोचली होती.

मनीषनं बोलायला सुरूवात केली, ‘‘आपण दोघांनी एकत्र आयुष्य काढण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा मला तुला काही सांगायचं आहे. तू शांतपणे ऐकून घे अन् मगच निर्णय सांग. तुझा निर्णय मला मान्य असेल.’’ मग मनीषनं तिला त्याच्या आयुष्यातलं प्रिया प्रकरण प्रामाणिकपणे सांगून टाकलं.

मुक्ता शांतपणे ऐकत होती. मनीषचं बोलणं ऐकल्यावर काही क्षण ती शांत बसली होती. मग हसून म्हणाली, ‘‘चला, कडू का होईना पण प्रेमाचा एक अनुभव तुम्हाला घेता आला…आता निदान आपण प्रेमच केलं नाही, करू शकलो नाही, ही खंत मनात राहणार नाही. मलाही वाटायचं, आपण लव्ह मॅरेज करावं…पण आमच्याकडे तर मुलींनी मान वर करून बघणंही निषिद्ध आहे…’’

‘‘म्हणून तू उदास आहेस का?’’

मुक्ता बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी होकार दिलाच.

‘‘तू मोकळेपणानं बोललीस हे छान झालं. मला आवडलं. आपल्यात आता कोणात्याही प्रकारचा संकोच नसावा.’’

‘‘खरं तर मलाही प्रेमात पडण्याचा, त्या वेडेपणाचा आनंद उपभोगावा असं वाटायचं, कसं वाटतं प्रेम करताना, तो अनुभव घ्यायचा होता. प्रेमात आयुष्य बदलून टाकण्याची शक्ती असते म्हणे…’’ बोलता बोलता मुक्ता थांबली अन् जीभ चावून म्हणाली, ‘‘क्षमा करा हं! वेड्यासारखी काहीबाहीच बोलले मी…’’

पण मनीषला तिचं ते भाबडेपण अन् प्रामाणिकपणा खूपच आवडला. मनीषनं प्रेमात पडण्याचा अनुभव घेतला होता आणि आता तो आईवडिलांनी निवडलेल्या मुलीशी ‘अरेंज मॅरेज’ करत होता. मुक्ताला स्वत:च्या मनानं प्रियकर निवडून प्रेम करण्याची संधीच मिळाली नव्हती.

त्या क्षणापासून मनीषनं मुक्ताच्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरायला सुरूवात केली. तिला प्रेमविवाहाचा आनंद मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागला. मुक्तालाही मनीषच्या रूपात प्रियकर मिळाला. लग्न होईपर्यंतचा काळ तिनं एका वेगळ्याच धुंदीत काढला. तिलाही वाटायला लागलं की आपलं ‘लव्ह मॅरेज’ आहे.

म्हणतात ना, लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात…नंतर फक्त लग्नं होतात. मनीष अन् मुक्ताची लग्नगाठ आधीच ठरलेली होती. एकमेकांना खरोखरच दोघंही अगदी अनुरूप अन् परस्पर पूरक होती.

ज्यामुळे मनीषचं जग डोलत असे, आंदोलित होत असे. त्याच भूकंपाची बातमी घेऊन गोपाळ आत आला होता. पण मनीष आता अगदी शांत आणि स्थिर होता. त्याचं जग आज आनंद आणि समाधानाच्या हिंदोळ्यावर झुलत होतं अन् त्याची दोरी मुक्ताच्या हातात होती. दोघंही प्रेमाच्या सप्तरंगी उधळणीत न्हाऊन निघाली होती.

धंधा ज्याचा त्याचा

कथा * संजीव जाधव

भक्तांनो, हे शरीर नश्वर आहे. यात असलेला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याचं परमात्म्याशी मिलन होणं हाच परमानंद आहे. पण यांच्या मिलनात काम, क्रोध, लोभ, मोह असे अनेक अडसर आहेत. हे अडसर जेव्हा तुम्ही ओलांडू शकाल त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालू लागाल…’’ स्वामी दिव्यानंदांची ओजस्वी वाणी श्रोत्यांना खिळवून ठेवत होती.

महानगरातल्या सर्वात महागड्या, सर्व सोयींनी युक्त वातानुकूलित हॉलमध्ये उंच व्यासपीठावर स्वामी विराजमान होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी ते अधिकच भव्य दिसत होते. माथ्यावर केशर चंदनाचा टिळा, गळ्यात रूद्राक्षाच्या माळा, बोटात झगमगणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त वाटत होतं.

लोकांमध्ये चर्चा असायची की स्वामीजींना सिद्धी प्राप्त आहेत. ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी होते, त्यांची सर्व दु:ख दूर होतात. संपूर्ण शहरात स्वामीजींची मोठमोठी पोस्टर्स लावलेली होती. दूरदूरच्या गावांमधून लोक स्वामींच्या दर्शनाला अन् प्रवचनं ऐकायला येत असत. प्रवचनांना प्रचंड गर्दी व्हायची. गर्दीतही स्वामींच्या सिद्धींची अन् चमत्कारांचीच चर्चा असे.

दिवसातून तीनदा स्वामींचं दर्शन आणि प्रवचन असायचं. आत्ताचं हे त्यांचं दिवसातलं शेवटचं प्रवचन होतं. संपूर्ण हॉलमध्ये रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. व्यासपीठ गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं होतं. सुंदर सुवास दरवळत होता.

स्वामींच्या पायांवर डोकं टेकवून आशिर्वाद घेणाऱ्यांची रांग लागली होती. आश्रमातले स्वामींचे स्वयंसेवक भक्तांना अधिकाधिक देणगी अर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

रात्रीचे नऊ वाजून गेलेले. स्वामींनी हात उंचावून सर्व भक्तांना आशिर्वाद दिला. त्यांच्या जयजयकारानं संपूर्ण हॉल दुमदुमला. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून स्वामीजी उठले अन् आपल्या निवासाकडे निघाले. हळूहळू सर्व भक्त पांगले. स्वामींचे दोन विश्वासपात्र शिष्य श्रद्धानंद महाराज आणि सत्यानंद महाराज यांनी सर्व स्वयंसेवकांनाही निरोप दिला आणि हॉलचा मुख्य दरवाजा बंद केला.

‘‘चला, आता आजची मजूरी एकत्र करूयात.’’ आपल्या भगव्या कफनीच्या बाह्या वर सारत श्रद्धानंद महाराज म्हणाले.

‘‘दिवसभर या मूर्ख भक्तांच्या स्वागत सत्कारात इतकं दमायला होतं ना की आता अगदी पूर्ण विश्रांती घ्यावी असं वाटायला लागतं…आता पटापट हे काम आटोपून घेऊयात,’’ हात ताणून आळस देत सत्यानंद महाराज बोलले.

‘‘जशी आपली आज्ञा,’’ हसून श्रद्धानंदांनी म्हटलं अन् व्यासपीठावरील फुलांचा ढीग विखरून ते त्यात शोधाशोध करू लागले. कारण देणगी, दक्षिणा भक्त फुलांच्या बरोबरच अर्पण करायचे. दोघांचे हात भराभर नोटा, नाणी अन् फुलं वेगळी करत होते, पण त्यांना अजून काहीतरी हवं होतं.

पुन्हा एकदा तो फुलांचा ढीग उलटापालटा केला अन् त्यांचे डोळे आनंदानं चमकले. ‘‘ते बघा,’’ दोघं एकदमच बोलले.

लाल रंगांच्या रेशमी रूमालात बांधलेलं काहीतरी तिथं होतं. घाईघाईनं त्यांनी रूमाल उघडला. आत एक लाख रुपयांची गड्डी होती.

‘‘स्वामीजी, आज तो पुन्हा एक लाख रुपये देवून गेला आहे.’’ गड्डी घेऊन सत्यानंद स्वामींकडे धावले. श्रद्धानंदही त्यांच्या मागे मागे होते.

स्वामी दिव्यानंद महाराज सुंदरशा मंचकावर लोळत पडले होते. ते पटकन् उठून बसले. हातात घेऊन त्या गड्डीचं नीट निरीक्षण केलं. नोटा खऱ्या आहेत याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी विचारलं, ‘‘कोण आहे हा माणूस. काही कळलं का?’’

‘‘स्वामी, आम्ही खूप प्रयत्न केला पण कोण, केव्हा ती गड्डी ठेवून जातो ते कळलंच नाही.’’ सत्यानंद म्हणाले.

‘‘तुम्ही दोघं फुकटचं खाऊन माजला आहात. एक माणूस गेले पाच दिवस एक लाख रुपये देऊन जातो आहे आणि तुम्हाला त्याचा ठावठिकाणा कळत नाही?’’ स्वामींचे डोळे संतापानं लाल झाले होते.

‘‘क्षमा करा स्वामी, आम्ही खूप लक्ष ठेवून असतो…’’

‘‘कसलं कर्माचं लक्ष ठेवता तुम्ही?’’ स्वामीजी त्यांना पुढे बोलू न देता ओरडले.

‘‘मूर्ख आहात तुम्ही दोघं, कुचकामी!! आता आम्हालाच काही तरी केलं पाहिजे.’’ त्यांनी आपला मोबाइल काढला आणि एक नंबर फिरवून ते म्हणाले, ‘‘हॅलो, अरे निर्मल, मी स्टेजवर बसतो त्याच्या बरोबर वर सी.सी.टीव्ही कॅमेरा लावून जा बरं!’’

‘‘पण स्वामीजी, तुम्हीच तिथं कॅमेरा लावायला नको म्हणाला होतात? बाकी सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत अन् तिथं व्यवस्थित रेकॉर्डिंगही होतंय.’’ निर्मल म्हणाला.

‘‘वत्स, ही सृष्टी परिवर्तनशील आहे. इथं काही स्थिर किंवा स्थायी नसतं.’’ स्वामीजी हसून म्हणाले.

‘‘तुला ठाऊक आहे ना माझे निर्णय काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलतात. त्यामुळेच मी इतका यशस्वी झालो आहे…तेव्हा तू फक्त एवढंच सांग की हे काम किती वेळात करशील? काम तुझं, पैसा आमचा.’’

‘‘स्वामी, सुर्योदयापूर्वी तुमचं काम पूर्ण झालेलं असेल.’’ निर्मलनं त्यांना खात्री दिली…त्यानंतर त्यानं जरा दबकत म्हटलं, ‘‘स्वामी, जरा पैशांची अडचण आहे. तुम्ही थोडी कृपा केलीत तर…’’

खोट्या रागानं स्वामी म्हणाले, ‘‘अरे हरामखोर, तुझा विश्वास नाहीए का माझ्यावर?’’ मग श्रद्धानंदकडे बघत त्यांनी सांगितलं, ‘‘निर्मलला आत्ताच पैसे पोचते करा. काम ताबडतोब व्हायलाच हवं.’’

‘‘आज्ञा शिरसावंद्य, स्वामी!’’ श्रद्धानंद म्हणाले अन् लगेच आत निघून गेले.

निर्मलनं म्हटल्याप्रमाणे काम चोख केलं. सूर्योदय होण्यापूर्वी स्वामींना हवा होता तिथं सी.सी. कॅमेरा बेमालूम बसवला गेला. इकडे त्या भक्तानंही आपली सेवा चोख बजावली. लाल रेशमी रूमालात बांधलेली एक लाख रुपयांची नोटांची गड्डी स्वामींच्या चरणी अर्पण झाली होती. श्रद्धानंद आणि दिव्यानंद आजही त्या माणसाला शोधू शकले नाही.

रात्री अकरा वाजता स्वामी अत्यंत चौकसपणे सी. सी. कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग तपासत असताना अचानक बोलले, ‘‘हे, इथं रिवाइंड करा…’’

श्रद्धानंदानं रेकॉर्डिंग रिवाइंड केलं. स्वामींनी अजून दोन वेळा तेवढाच भाग रिवाइंड करून लक्षपूर्वक तपासला. श्रद्धानंदला त्यात काहीच विशेष जाणवत नव्हतं. पण स्वामींची आज्ञा पाळणं गरजेचं होतं.

‘‘थांबा थांबा, इथंच थांबा…’’ स्वामीजी ओरडलेच. श्रद्धानंदानं ताबडतोब तिथंच थांबवलं.

‘‘क्षमा करा…’’ स्वामींनी आज्ञा केली. लगेच तेवढं रेकॉर्डिंग झुम केलं गेलं.

‘‘हा बघा सापडला…’’ सोफ्यावरून उठत स्वामी म्हणाले. ‘‘हे इथं थोडंसं रिवाइंड करून स्लो मोशनमध्ये दाखवा.’’

श्रद्धानंदनं तसंच केलं. रेकॉर्डिंगमध्ये सुमारे ४५ वर्षं वयाचा एक माणूस हातात फुलांचा द्रोण घेऊन स्वामींजवळ येताना दिसला. जवळ येऊन त्यानं फुलं स्वामींच्या पायांवर वाहिली. डोकं त्यांच्या पायांवर टेकवलं अन् अत्यंत सावधपणे पण चपळाईनं खिशातून लाल रूमालाची पुरचंडी काढून फुलांच्या खाली ठेवली. पुन्हा एकदा चरणांवर माथा टेकवून तो शांतपणे उठून निघून गेला.

‘‘हा कुणीतरी फार पैसेवाला असामी दिसतोय. त्याचा चेहरा नीट बघून ठेवा. मला हा माणूस हवाय…काय वाट्टेल ते करून हवाच आहे.’’ स्वामींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.

‘‘निश्चिंत असा स्वामी! उद्या त्याला धरून आणतोच!’’ सत्यानंद म्हणाला.

‘‘नाही वत्सा,’’ आपला उजवा हात उचलून शांतपणे स्वामी म्हणाले, ‘‘तो आमचा अनन्य भक्त आहे. त्याला धरून नाही, तर सन्मानानं माझ्यापाशी आणा. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका.’’

‘‘आज्ञा शिरसावंद्य स्वामी,’’ सत्यानंद आणि श्रद्धानंद स्वामींना नमस्कार करून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी दोघेही सर्व भक्तांकडे अत्यंत निरखून बघत होते. रात्री आठच्या सुमाराला दोघंही पार दमले असतानाच तो माणूस त्यांना येताना दिसला.

‘‘तो बघ,’’ सत्यानंदने श्रद्धानंदाला कोपरानं ढोसलं.

‘‘हो…तोच दिसतोय. त्याला स्वामींकडे नेऊयात?’’ श्रद्धानंदनं विचारलं.

‘‘नाही, आत्ता नाही. आधी त्याला स्वामींना फुलं व पैसे अर्पण करू देत म्हणजे आपली खात्री पटेल, हा तोच आहे म्हणून.’’ सत्यानंदनं हळूच म्हटलं.

रोजच्याप्रमाणे तो माणूस स्वामीपाशी आला. फुलं वाहिली. पायांवर डोकं टेकवलं. लाल रूमालातली गड्डी हळूच फुलांच्या खाली सरकवली. पुन्हा डोकं पायांवर ठेवलं अन् पटकन् उठून बाहेर निघाला.

श्रद्धानंद त्याच्या मागे गेला आणि आदरानं त्याला म्हणाला, ‘‘महाशय, जरा इकडे येता का?’’

‘‘का बरं?’’

‘‘स्वामींना भेटायचंय तुम्हाला,’’?श्रद्धानंद म्हणाला.

‘‘मला? का? काय केलंय मी?’’ घाबरून त्यानं विचारलं.

‘‘तुमच्या भक्तीनं स्वामी प्रसन्न झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला विशेष दर्शन देऊन आशिर्वाद देणार आहेत.’’ सत्यानंदनं सांगितलं. ‘‘अहो, मोठेमोठे मंत्री, ऑफिसर, उद्योगपती रांगेत ताटकळत असतात. तुम्ही भाग्यवान आहात की स्वामींनी स्वत: तुम्हाला बोलावून घेतलंय. तुमचा भागोदय निश्चित समजा.’’

हे ऐकून तो माणूस आश्वस्त झाला. स्वामींच्या दोन्ही शिष्यांनी त्याला एका छानशा खोलीत सोफ्यावर बसवलं. चहा, पाणी विचारलं.

सुमारे अर्ध्या तासातच स्वामी आले. हसून त्याच्याकडे बघून शांत व आश्वासक सुरात म्हणाले, ‘‘वत्सा, तुझ्या ललाट रेषा मला सांगताहेत की तू आयुष्यात फार मोठं यश मिळवणार आहेस.’’

एवढं ऐकताच त्या माणसानं स्वामींच्या पायावर लोळण घेतली. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. स्वामींनी त्याला धरून उठवलं अन् सोफ्यावर बसवत म्हटलं, ‘‘रडू नकोस…एक नवी पहाट तुझ्या प्रतिक्षेत उभी आहे.’’

दोन्ही हात जोडून तो दाटल्या कंठानं म्हणाला, ‘‘स्वामी, तुम्ही दर्शन दिलंत…मी धन्य झालो.’’

त्याच्या शेजारी सोफ्यावर बसत स्वीमींनी विचारलं, ‘‘वत्सा, माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं देशील?’’

‘‘स्वामी, आपण आज्ञा करा…मी तुमच्यासाठी माझे प्राणही देईन.’’

स्वामींनी आपली दिव्य दृष्टी त्याच्या चेहऱ्यावर स्थिर केली. त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाले, ‘‘रोज तू एक लाख रुपयांची गड्डी माझ्या पायांवर का वाहतोस?’’

त्या माणसानं डोळे मिटून घेतले. त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं की त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू आहे. काही क्षणांनंतर त्याने डोळे उघडले. हात जोडून दाटलेल्या कंठानं तो बोलू लागला, ‘‘स्वामी, मी अरबपती होतो. पण व्यापारात प्रचंड नुकसान झालं…मी पार रस्त्यावर आलो. नातेवाईक, मित्र, परिचित…सगळ्यांनीच माझ्याशी संबंध तोडले. फक्त पत्नी मात्र सतत माझ्यासोबत आहे. एक दिवस मला समजलं की युरोपमध्ये एक बंद कारखाना अगदी स्वस्तात विकला जातोय…माझ्या बायकोनं सुचवलं, तो कारखाना आपण विकत घेऊयात. ती तुमची भक्त आहे. फार श्रद्धा आहे तिची. राहतं घर आणि बायकोचे दागिने विकून मी तो कारखाना विकत घेतला. वीस टक्के भागीदारी तुमच्या नावानं ठेवली होती. मी तो कारखाना सुरू केला. सुरूवातीला बराच त्रास झाला, पण मागच्या आठवड्यात मला त्या कारखान्यातून फायदा मिळू लागला होता. रोज पाच लाख मिळताहेत. त्यातून वीस टक्केप्रमाणे एक लाख मी तुम्हाला अर्पण करतोय.’’

‘‘पण ही गोष्ट तू लपवून का ठेवलीस? मला तरी सांगू शकला असतास?’’

बायको म्हणाली, ‘‘स्वामींना लोभ मोह नाहीए, त्यांना सांगून त्यांच्या साधनेत व्यत्यय आणायचा नाही…स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. ते समजून घेतील.’’ अत्यंत भाबडेपणानं तो बोलत होता.

‘‘वत्सा, धन्य आहेस तू. तुझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तींमुळेच हे जग टिकून आहे, नाही तर कधीच रसातळाला गेलं असतं.’’ गंभीरपणे स्वामी म्हणाले. मग एक दीर्घ श्वास घेऊन, हात उंचावून आशिर्वाद देत म्हणाले, ‘‘परमेश्वरानं तुझी हाक ऐकली आहे. लवकरच तुला पाच कोटींचा, रोजचा पाच कोटींचा फायदा होणार आहे.’’

‘‘आपली कृपा स्वामी!’’ मान झुकवून प्रणाम करत तो माणूस म्हणाला,

‘‘युरोपातच एक बंद पडलेली खाण आहे. ती विकताहेत…मी चौकशी केली आहे. मी ती विकत घेतली अन् काम सुरू केलं तर मला महिन्याला पाच कोटींचा फायदा नक्कीच मिळणार…’’

‘‘मग ती विकत का घेत नाही?’’

‘‘स्वामी, ती विकत घ्यायला लागणारे वीस कोटी रुपये माझ्याकडे नाहीएत. खूप धावपळ केली पण पैसा उभा करता येत नाहीए. व्यापारात इतकं मोठं नुकसान झाल्यामुळे बँका माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. फायनान्सरनाही रिस्क नको वाटतेय. काय करू समजत नाहीए,’’ तो माणूस अत्यंत निराश झाला होता. डोळे भरून आले होते.’’

‘‘वत्सा, पैशांची काळजी करू नकोस. परमेश्वराने तुला माझ्यापाशी पाठवलं आहे…सगळं काही सुरळीत होईल.’’ स्वामींनी हसून त्याला दिलासा दिला.

‘‘कसं होईल स्वामी?’’

‘‘आमच्याकडे अनेक दानी माणसे धन देऊन जातात. ते धन माझ्या कामाचं नाहीए. तू तो पैसा घे आणि खाण खरेदी कर.’’ स्वामींनी म्हटलं.

त्या माणसाचे डोळे आश्चर्यानं विस्फारले, ‘‘स्वामी, तुम्ही मला फायनान्स करणार?’’

‘‘नुसतेच नाही देणार,’’ स्वामींनी हसत म्हटलं, ‘‘मला भक्तकल्याणासाठी जी अनेक कामं करायची असतात, त्यासाठी मला पैसा लागतोच. तू जी खाण खरेदी करशील, त्यात ५० टक्के शेयर माझा असेल.’’

‘‘स्वामी तुम्ही धन्य आहेत…’’ त्या माणसानं स्वामींच्या पायांवर लोळण घेतली.

‘‘श्रद्धा आणि सत्या, तुम्ही आत्ताच यांच्यासोबत यांच्या घरी जा. भागीदारीची कागदपत्रं तयार करा. लवकरात लवकर खाण विकत घेतली गेली पाहिजे.’’ स्वामींनी आज्ञा केली.

दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन व्यवहार पूर्ण झाला. स्वामींनी वीस कोटी रुपये त्या माणसाला दिले. तो युरोपला निघून गेला.

स्वामींची प्रवचनं रंगत होती. डोळ्यावर सोनेरी स्वप्नं चमकत होती. पण महिना उलटून गेला तरीही त्या माणसाकडून काहीच संदेश आला नाही, तेव्हा त्यांनी सत्या व श्रद्धाला पुन्हा त्या माणसाच्या घरी पाठवलं. तिथं जाऊन चौकशी केली, तेव्हा तिथला वॉचमन म्हणाला, ‘‘ते साहेब तर फक्त एक महिन्यासाठी हा बंगला भाड्यानं घेऊन राहिले होते. पण अचानक सगळं आवरून इथून निघून गेले. तुमच्यासाठी एक पाकिट देऊन गेलेत. त्यानं आपल्या रूममधून एक पाकीट आणून त्यांच्या हातात ठेवलं.’’

ते दोघं कसेबसे स्वामींपाशी आले. ते पत्र दिलं.

स्वामींनी पाकीट उघडलं. आत पत्र होतं :

‘‘आदरणीय स्वामी,

साष्टांग दंडवत…तुम्हाला खात्री पटलीच असेल की हे शरीर नश्वर आहे. यात असलेला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याचं परमात्म्याशी मिलन होणं हाच परमानंद आहे पण काम, क्रोध, मोह हे अडसर त्यात बाधा आणतात हे अडसर तुम्ही ओलांडू शकाल त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालू लागाल. तुम्ही भक्तांच्या मार्गातले अडसर दूर करता. मीही एक अडसर दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याला आपण, ‘धंदा ज्याचा त्याचा’ असंही म्हणू शकतो.’’

आपलाच नम्र सेवक.

हतबद्ध होऊन स्वामी हातात पत्र घेऊन उभे होते अन् सत्या, श्रद्धा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते.

कोडं

कथा * रश्मि शर्मा

शनिवारी सायंकाळीच मी ऑफिसातून थेट माझ्या माहेरच्या घरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी आले. सीमाताई अन् भावजी पण दोन दिवसांसाठी आले होते. म्हटलं चला, तेवढीच आई आणि ताईसोबत गप्पा गोष्टी करण्यातली मजा अनुभवता येईल. पण मी पोहोचतेय तिथं, तोवरच रवीचा, माझ्या नवऱ्याचा फोन आला.

मी त्यावेळी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन आईनंच घेतला.

मी आरामात सोफ्यावर येऊन बसले. चहाचे कप सखूबाईंनी सर्वांच्या हातात दिले अन् मग आई जरा रागानं म्हणाली, ‘‘रवीचा फोन होता. तुझ्या सासूला ताप आलाय म्हणून सांगत होता.’’

मी एकदम तडकलेच. ‘‘इथं येऊन अजून तासभरही झाला नाहीए अन् लगेच बोलावून घेताएत. सासूबाईंना तर माझं एक दिवसाचं स्वातंत्र्यही बघवंत नाही. तापच चढतो त्यांना.’’

‘‘कुणास ठाऊक, खरंच ताप आलाय की उगीचच तुला बोलावून घेण्यासाठी नाटक करताहेत.’’ ताईनं शंका बोलून दाखवली.

‘‘आज सकाळी जेव्हा मी त्यांच्याकडे एक रात्र इथं राहण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांचा चेहरा बदलला होता, फुगल्याच होत्या…ताई, तुझी मजा आहे बाई! एकटी राहतेस, सासूसासऱ्यांचा काच नाहीए तुला.’’ माझा मूड फारच बिघडला होता.

‘‘तुला या काचातून सुटायचं असेल तर तू तुझ्या सासूला तुझ्या थोरल्या जावेकडे राहायला पाठव ना? हटूनच बैस. सत्याग्रह कर.’’ ताईनं मला सल्ला दिला. माझ्या लग्नानंतर एक महिन्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा ही तिनं मला हेच सांगितलं होतं.

‘‘माझी मोठी जाऊ महा कजाग अन् जहांबाज आहे. तिच्याकडे जायला सासूबाई राजी नाहीत अन् तिकडं त्यांना पाठवायला त्यांचा धाकटा लेक तयार नाही. तुला ठाऊक आहे का, मागच्या महिन्यात मी सासूबाईंना जावेकडे पाठवण्याचा हट्ट धरला तर यांनी मला चक्क घटस्फोटाची धमकी दिली. ताई, अगं, यांना आईपुढे माझी काहीही व्हॅल्यू नाहीए.’’

‘‘तू त्याच्या घटस्फोटाच्या धमकीला घाबरू नकोस. कारण रवीचं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे तर आम्हाला सर्वांनाच कळंतय, दिसतंय, जाणवतंय. तुझी व्हॅल्यू तर आहेच!’

‘‘सीमा, खरं बोलतेय शिखा, तू फक्त प्रेमानं त्याला वळव. तुझ्या सासूला दोन्ही सुनांकडेल बरोबरीनंच राहायला हवं. अगदी एका सुनेकडेच सारखं राहायचं म्हणजे काय?’’ आईनं ताईच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

मी एक नि:श्वास सोडला. चहाचा कप टीपॉटवर ठेवत मी म्हटलं, ‘‘आई, आता तर मला निघायलाच हवंय!’’

‘‘वेड्यासारखं नको करूस,’’ आई भडकलीच! ‘‘अगं, इतक्या दिवसांनी येते आहेस, रात्रभर राहून जा. तेवढीच विश्रांती!’’

‘‘आई, माझ्या नशिबात विश्रांती नाही. मला परत गेलंच पाहिजे.’’ मी आपली पर्स उचलली.

‘‘शिखा, अगं तू इतकी का घाबरतेस? रवीनं आईला एकदाही, शिखाला परत पाठवा, असं म्हटलं नव्हतं,’’ ताई मला अडवंत, मला समजावंत म्हणाली.

‘‘नको ताई, मी गेले नाही तर यांचा मूड फारच बिघडेल. तुला माहीत आहे ना, किती संतापी आहेत ते?’’

बाबाही बिचारे मला थांब म्हणंत होते. पण कुणाच्या समजावण्याचा काहीही उपयोग नव्हता. तासाभरातच भावजींनी गाडी काढली अन् ताई व ते मला सोडायला घरापर्यंत आले. पण त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी ते घरात आले नाहीत.

मला अचानक आलेली बघून रवी दचकले, ‘‘अगं? तू परत का आलीस? मी तुला बोलावण्यासाठी फोन केला नव्हता…’’ ते म्हणाले पण त्यांच्या डोळ्यातली आनंदाची चमक लपवता आली नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तक्रारीच्या सुरात म्हटलं, ‘‘एक रात्रही आईबाबांकड राहू दिलं नाहीत तुम्ही…एक रात्र तुम्ही तुमच्या आईला सांभाळू शकत नव्हता का?’’

‘‘परत बोलवायचं नव्हतं, तर मग फोन केलातंच का?’’

‘‘स्वीटहार्ट, फोन फक्त तुला सूचना देण्यासाठी केला होता.’’

‘‘ही सूचना उद्या सकाळी दिली असती तरी चाललं असतं ना?’’ मी चिडूनच विचारलं. त्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही.

त्यांना तिथंच सोडून मी माझा मोर्चा सासूबाईंच्या खोलीकडे वळवला.

त्यांच्या खोलीत शिरताच मी एका श्वासात, वरच्या सुरात त्यांना ढीगभर प्रश्न विचारले, ‘‘आई, तुम्हाला एवढा तेवढा ताप आला तर इतकं घाबरून का जाता तुम्ही? समजा आला ताप तर एक रात्र तुमचा लाडका लेक सेवा करू शकत नाही का? मला फोन करून बोलावून घ्यायची काय गरज होती? एक रात्र मी माझ्या माहेरी राहू शकत नाही का?’’

‘‘हे बघ, मी चक्कार शब्दांनं रवीला तुला बोलावून घे असं म्हटलं नव्हतं. या बाबतीत माझ्यावर ओरडायचं नाही. समजलं ना?’’ सासूबाईही आघाडी सांभाळून होत्या.

‘‘यांच्यासाठी आईनं डबा दिलाय. तुम्ही काय खाल?  सकाळी मी मुगाचं वरण…’’

‘‘मला काही वरण फिरण खायची इच्छा नाहीए.’’ त्या रागातच होत्या.

‘‘मग हॉटेलातून छोले भटूरे किंवा वडापाव मागवून देऊ?’’

‘‘सूनबाई, तू उगीच माझं डोकं फिरवू नकोस.’’

‘‘हो ना, डोकं माझंच फिरलंय…तुमच्या आजारपणाबद्दल ऐकून तशीच धावत आले…ज्या बाईपाशी इतक्या जोरानं बोलायची आणि भांडायची एनर्जी आहे, ती आजारी कशी असेल?’’

बोलता बोलता मी त्यांच्या कपाळावर माझा तळवा टेकवला अन् मी दचकले. त्यांना सणसणूनताप भरला होता.

‘‘तू अजून माझा संताप वाढवायला आली आहेस का? सांगून ठेवते, माझ्यावर उपकार केल्याचा आव आणू नकोस.’’

त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी, मघाशीच खोलीत आलेल्या रवींना म्हटलं, ‘‘तुम्ही उभ्या उभ्या बघताय काय? आईंच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवता येत नाहीत का? केवढा ताप आहे त्यांच्या अंगात…’’

रवी एकदम गडबडले, ‘‘ठेवतो…ठेवतो गार पाण्याच्या घड्या…’’ म्हणत ते स्वयंपाक घराकडे धावले.

‘‘मी तुमच्यासाठी छानशी मुगाची खिचडी करते. चव येईल तोंडाला.’’

‘‘मी काहीही खाणार नाही. माझ्यासाठी एवढे कष्ट घेण्याची गरजही नाहीए.’’ त्या अजून रागातच होत्या.

‘‘सूनबाई, कान उघडून नीट ऐकून घे. हे घर माझं आहे…आणि मी इथंच राहणार. तुझ्यानं होत नसतील माझी कामं तर नको करूस…’’ सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.

‘‘उगीच नको ते बडबडण्यापेक्षा चहा घ्याल का ते सांगा. उगीच माझं डोकं उठवू नका.’’ मी कपाळावर हात मारून बोलले.

‘‘तू माझ्याशी नीट का बोलत नाहीस सूनबाई?’’ आता त्यांनी अगदी शांतपणे विचारलं.

‘‘काय चुकीचं बोलले मी?’’

‘‘तू चहाचं विचारतेस की काठीनं हाणते आहेस?’’

मला हसायला आलं. ‘‘तुम्ही ना जन्मभर माझ्या तक्रारीच करत राहणार,’’ मी हसून स्वयंपाक घराकडे वळले.

स्वयंपाक घरात मी एकीकडे चहाचं आधण ठेवलं. दुसरीकडे मुगाची डाळ, तांदूळ धुवून ठेवले. तेवढ्यात रवीनं पटकन् मला मिठीत घेतलं. भावनाविवश होऊन म्हणाले, ‘‘बरं झालं तू लगेच आलीस. आईचा ताप बघून मी खूप घाबरलो होतो. खरं तर एक रात्रही तुला माहेरी राहू दिलं नाही याबद्दल खूप खूप सॉरी…’’

‘‘मोठे आलात सॉरी म्हणणारे…माझी काळजी कधी करता तुम्ही?’’ मी पटकन् त्यांच्या ओठांवर माझे ओठ ठेवून त्यांचं तोंड बंद केलं.

माझं चुंबन घेत ते म्हणाले ‘‘तू मनाची खूप स्वच्छ आणि प्रेमळ आहेस. तोंडानं मात्र जहर कडू बोलतेस.’’

‘‘सगळं कळतंय मला. तुमच्या आजारी आईची मी सेवा करावी म्हणून माझी खोटी प्रशंसा करताय? काही गरज नाहीए त्याची.’’

‘‘नाही गं! खरंच तू मनाची फार चांगली आहेस.’’

‘‘खरंच?’’

‘‘तर मग प्रयत्न तरी का करताय? जा, आपल्या आईजवळ जाऊन बसा.’’ मी हसत हसत त्यांना स्वयंपाक घराच्या बाहेर ढकळलं.

ते खरं म्हणाले. महिन्याभरापासून माझ्या वागणुकीत झालेल्या बदलामुळे मी म्हणजे सासूबाई अन् नवरा दोघांसाठीही एक कोडंच ठरले होते.

सासूबाईंबरोबर आजही मी बोलते तिखटंच. पण त्यांची सर्व कामं मी मनापासून अन् त्यांच्या सोयीनुसार करते. त्यामुळे त्यांची खूप सोय होते अन् समाधानही होतं.

गंमत म्हणजे मी बदलल्यामुळे माझ्या सासूबाईदेखील बदलल्या आहेत. आता त्या त्यांची सुखदु:खं मोकळेपणाने माझ्याशी बोलतात. पूर्वी आमच्यात एक वरवरची आणि खोटी शांतता असायची. पण आता आम्ही एकमेकींशी कडकडून भांडलो तरी मनातून एकमेकींवर प्रेम करतो, एकमेकींची काळजी घेतो अन् खरोखरंच आनंदात असतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमच्या भांडणांमुळे रवींना टेन्शन येत नाही. त्यांचं बी.पी एकदम नॉर्मल असतं. खरं सांगायचं तर नवऱ्याची तब्येत उत्तम राहावी अन् संसार सुखानं चालावा यासाठी मी स्वत:ला बदललं आहे.

‘‘माझ्या आणि सासूबाईंच्या भांडणात मध्ये पडलात तर बघा.’’ मी यांना महिन्यापूर्वीच धमकी दिली होती. आता आमची भांडणं बघत ते स्वत:शीच हसंत असतात.

‘‘बाइलवेडा आहेस, बायकोचा गुलाम, कधी तरी आईची कड घेऊन बोलत जा,’’ सासूबाई मुद्दाम यांना चिडवतात तेव्हा ते अगदी मोकळेपणांनं हसतात.

सासूसासऱ्यांपासून दूर दूर राहणाऱ्या सीमा ताईच्या आयुष्याशी माझ्या आयुष्याशी तुलना करताना पुन्हा माझ्या मनांत थोडे निगेटिव्ह विचार येताहेत. पण सासूबाई बऱ्या झाल्या की मी त्यांच्याशी एकदा कडकडून भांडून घेईन म्हणजे माझं मन मोकळं होईल. त्यांनाही बरं वाटेल. टेन्शन संपलं की आनंदी आनंद.

एक मित्र आहे माझा

कथा * पूनम अहमद

मी बेडरूमच्या खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होते. अमित अजून अंथरूणातच होते. जागे होते पण मोबाइलवर गर्क होते. मी खिडकीतून हात बाहेर काढून हलवला. नेमकं तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.

‘‘कोण आहे?’’ त्यांनी विचारलं.

‘‘मला माहीत नाही…’’ मी उत्तरले.

‘‘तर मग हात कुणाला बघून हलवलास?’’

‘‘मला त्याचं नांव ठाऊक नाही…’’

‘‘रिया, काय बोलतेस हे कळतंय का तुला? ज्याचं नांव माहीत नाही, त्याला बघून हात हलवतेस?’’

मी गप्प बसले. त्यांनीच चेष्टेच्या सुरात विचारलं, ‘‘आहे कोण? स्त्री की पुरूष?’’

‘‘पुरूष…’’

‘‘अरेच्चा? कमालच आहे…अगं, सांग तरी कोण आहे?’’

‘‘मित्र आहे माझा…’’

ताडकन अमित उठले. रविवारी सकाळी इतकी स्फूर्ती? मला कौतुकच वाटलं. मी बोलूनही दाखवलं, ‘‘अरे व्वा? इतक्या चपळाईनं उठलात? काय झालं?’’

‘‘काही नाही, बघायचं होतं कुणाला बघून तू हात हलवंत होतीस ते…सांगत का नाहीस कोण होता तो?’’

एव्हाना अमित थोडे नाराज झाले होते अन् खूपच बैचेनही दिसंत होते. मी त्यांच्या गळयात हात घातले. अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, ‘‘खरंच सांगत, मला त्याचं नांव ठाऊक नाही. तो काय करतो, कुठला आहे, मला काहीही ठाऊक नाही.’’

‘‘मग त्याला हात का केलास?’’

‘‘तेवढीच ओळख आहे…’’

अमितला काही समजलं नाही. माझे हात गळ्यातून काढत म्हणाले, ‘‘काय बोलतेस काही कळंत नाहीए…ओळख ना पारख…अन् हात हलवला.’’

‘अहो, त्याचं नावं नाही ठाऊक पण ओळख आहे ना?’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘असाच जाता येता दिसतो कधीमधी. एकाच सोसायटीत राहतो…किती तरी लोकांशी हाय, हॅलो होतंच ना? त्या सर्वांची नांवं गावं ठाऊक असायला हवीत असं कुठं लिहिलंय?’’

‘‘ठीक आहे…मी वॉशरूममधून येतो तोवर चहा, नाश्ता काय करतेस ते बघ.’’ अमितनं विषय तिथंच संपवला.

रविवार असल्यानं मुलंही उशीरा उठणार होती. मी सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला घेतला.

कांदा चिरताना सहज माझी नजर खिडकी बाहेर गेली. तो नेमका बाहेरून काहीतरी पार्सल पॅक करून घेऊन येताना दिसला. आज रविवार…त्याची बायकोही आज आराम करत असणारर. त्याची माझी नजरानजर झाली. तो हसला अन् निघून गेला.

दहा वर्षांपूर्वी आम्ही अंधेरीतल्या या सोसायटीत फ्लॅट घेतला. सुंदर अन् मोठी सोसायटी आहे. बऱ्याच बिल्डिंगा आहेत. आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याचा फ्लॅट आहे. मी तिसऱ्या माळ्यावर राहते. तो पाचव्या. सुरूवातीपासूनच मी त्याला बघतेय. कधी ‘हॅलो’ म्हणायला लागले ते आठवंत नाही पण आजतागायत ते सुरू आहे.

या दहा वर्षांच्या काळातही मला त्याचं नांव नाही कळलेलं. त्यालाही माझं नांव ठाऊक नसेल. खरं तर आमच्यात असं काही नातंही नाहीए की नांवं माहीत असावीत. पण इतक्या वर्षांत एवढं मात्र झालं आहे की आता आम्ही सहज म्हणून नाही तर जाणून बुजून एकमेकांकडे बघतो. त्याचा एकुलता एक मुलगा आता बारा वर्षांचा होतोय. नकळंतच मला त्याचं सगळं रूटीन माहीत झालंय.

माझ्या बेडरूमच्या खिडकीतून त्याची कोणत्या तरी खोलीची खिडकी दिसते. साधारण वर्षभरापूर्वीच तो त्या खिडकीपाश उभा असलेला अवचित दिसला तेव्हा मला कळलं की तो तिथं राहतो. मात्र तो खिडकीपाशी उभा आहे हे जाणवलं की मी तिकडं बघंतही नाही. आपण त्याच्या खिडकीकडे बघावं हे मला पटलंही नाही.

हो,पण एक खरं, तो रस्त्यावरून जाताना आवर्जून माझ्या खिडकीकडे बघंत जातो. जर मी तिथं असले तर आम्ही एकमेकांना हात हलवून अभिवादन करतो. कधीकधी मी सोसायटीच्या बागेत वॉक घ्यायला जाते तेव्हा तो त्याच्या बायको मुलासोबत बागेत आला तर बायकोच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं हसून हॅलो म्हणतो. मला गंमत वाटते अन् हसायला येतं.

मला त्याचं सगळं रूटीन लक्षात आलंय. सकाळी सात वाजता तो मुलाला शाळेच्या बसवर सोडायला येतो. मग त्याची नजर माझ्या किचनच्या खिडकीवर रेंगाळते. नजरानजर झाली की तो गोड हसतो. साडे नऊला त्याची सुंदर बायको ऑफिसला जाते. दहाच्या सुमाराला तो निघतो. चारपर्यंत परत येतो अन् सोसायटीच्या डेकेअर सेंटरमधून मुलाला घेतो. सातपर्यंत त्याची बायको परत येते.

माझ्या बेडरूम अन् किचनच्या खिडकीतून आमच्या सोसायटीचा मेनरोड दिसतो. घरातले सगळे माझी चेष्टा करतात…अमित आणि मुलं म्हणतात, ‘‘सगळ्यांची बित्तबातमी असते तुला?’’

‘‘ममा, किती मस्त टाइमपास असतो तुझा. तुला घराबाहेर पडावंही लागत नाही. मनोरंजन अन् बातम्या तुला घर बसल्या मिळतात.’’ मुलांची कमेंट असते.

‘‘रिया, माझं आटोपलं आहे…’’ अमितनं हाक दिली.

‘‘हो आलेच,’’ आम्ही दोघं डायनिंग टेबलवर येतोय तोवर मुलंही आलीच. मोठी तनुश्री वीस वर्षांची. धाकटा राहुल १७ वर्षांचा.

रविवारची निवांत सकाळ. मनाजोगता नाश्ता सगळेच प्रसन्न मूडमध्ये होते. तनुनं म्हटलं, ‘‘आज आम्ही सगळे उमाच्या घरी पिक्चर बघणार आहोत. तिची आई आम्हाला लंच देते आहे.’’

‘‘कोण कोण आहेत?’’ मी विचारलं.

‘‘आमचा संपूर्ण ग्रुप आहे. मी, पल्लवी, निशा, टीना, रिद्धी, नीरज, विनय आणि संजय.’’

अमित म्हणाले, ‘‘नीरज, विनयला तर मी ओळखतो पण संजय कोण आहे?’’

‘‘आमचा नवा मित्र.’’

मला चिडवण्यासाठी अमितनं म्हटलं. ‘‘ठीक आहे, पण मुलांनो, तुम्हाला मम्मीचा मित्र ठाऊक आहे का?’’

राहुलनं दचकून विचारलं, ‘‘काय?’’

‘‘हो ना, तुझ्या मम्मीचाही एक मित्र आहे.’’

‘‘पप्पा, उगीच का चिडवताय मम्मीला?’’ तनु गुरगुरली.

‘‘आईचा कसा मित्र असेल?’’ राहुलनं म्हटलं.

अत्यंत भाबडा चेहरा करून अमितनं म्हटलं, ‘‘विचार तिलाच! मी खोटं कशाला बोलू?’’

आमच्या घरातलं वातावरण मोकळं आहे. मुलांशीही आम्ही मित्रत्त्वानं वागतो. एकमेकांची चेष्टामस्करी, एकमेकांची खेचणं असं सतत चालतं. त्यामुळे घरात हास्याची कारंजी सतत उसळंत असतात अन् वातावरण प्रसन्न राहतं.

तनुनं जरा गंभीरपणे विचारलं, ‘‘मम्मा, बाबा खोटं बोलताहेत ना?’’

का कुणास ठाऊक पण मी जरा बैचेन झाले. ‘‘नाही, खोटं तर नाहीए…’’

‘‘मॉम, काय चेष्टा करतेस? कोण आहे? काय नांव?’’

मी हळूच म्हणाले, ‘‘नांव मला नाही माहीत.’’ त्यावर तिघंही मोठ्यांदा हसले.

राहुलनं विचारलं, ‘‘मम्मा, तुझा मित्र राहतो कुठं?’’

‘‘नाही माहीत.’’ नकळंत मी खोटं बोलले. यावर तिघंही इतके हसले, इतके हसले की सांगता सोय नाही. तो समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो हे मी मुद्दामच नाही सांगितलं. अमितचं सगळं लक्ष मग कायम त्या बिल्डिंगकडे असेल. उगाचच स्वत:च्या जिवाला घोर लावून घेतील.

तनु म्हणाली, ‘‘बाबा तुम्ही उगीचच मस्करी करताय हं! मम्मीला तर काहीच ठाऊक नाहीए…मग कुणी तिचा मित्र कसा असेल?’’

‘‘अगं पोरी, तुझी आई त्याची मैत्रीण आहे. म्हणून तर त्याच्या हॅलोला हात हलवून उत्तर देत होती.’’

मी म्हटलं, ‘‘तुम्ही तिघांचे मित्र असू शकतात तर माझा मित्र असायला हरकत का असावी? आज तुमच्या बाबानं मला हात हलवताना बघितलं तेव्हापासून त्यांचा जीव थाऱ्यावर नाहीए. संशय घेताहेत ते…’’

‘‘अगं, पण आम्हाला आमच्या मित्रांची नांव अन् ठावठिकाणा माहीत असतो…’’ तिघं पुन्हा जोरात हसली.

यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं…मग मी ही त्यांच्या हास्यात सामिल झाले. तेवढ्यात मोलकरीण आली आणि मी तिथून उठून स्वयंपाकघरात आले. तिला घासायची भांडी काढून द्यायला लागले. मुलं अन् अमित त्यांच्या कामाला लागले.

माझे हात कामं उरकंत होते पण मन मात्र विचार करत होतं. मला त्याचं नावं माहीत नाहीए पण त्याला जाता येताना बघणं हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. काहीही न सांगता बोलता मला इतकं जाणवलंय की बायकोबरोबर असली तर तो हात हलवंत नाही. फक्त एक स्माइल देतो. मुलाला स्कूलबसमध्ये बसवलं की तो माझ्या किचनकडे नक्कीच बघतो. मला आता त्याच्या कारचा नंबर पाठ झालाय. मी दुरूनही त्याची कार ओळखू शकते.

त्याच्या पार्किंगची जागा मला ठाऊक आहे. खरं तर हे सगळं जरा विचित्र आहे पण हे जे काही ‘जरा’ आहे ना ते मला आवडतं. सार दिवस मला एक एनर्जी मिळते. हे ‘जरा’ कुणाचं नुकसानही करत नाहीए.

माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे ‘जरा’ त्या प्रेमात बाधा आणंत नाही…म्हणजे या ‘जरा’मुळे तसा काहीच त्रास किंवा प्रॉब्लेम नाहीए. अमित आणि मुलांच्या बरोबर असताना या ‘जरा’चा अजिबात त्रास नसतो. आमचं आयुष्य मजेत जातंय.

तो फार देखणा आहे असं नाही. अमित खरोखरंच देखणे आहेत. त्याची बायको माझ्यापेक्षा सुंदर आहे तरीही हे जे काही ‘जरा’ आहे ते मला एक आनंद, एक आत्मविश्वास देतं की मला एक मित्र आहे. भलेही मला त्याचं किंवा मला त्याचं नांव माहीत नाही…पण म्हणून काय झालं? जे आहे ते खूप छान आहे…छानच आहे.

तडा गेला विश्वासाला

कथा * सुमन बाजपेयी

सकाळपासून भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ घरात सुरू झाली होती. फोनही सतत वाजत होता. लॅन्डलाईन नंबर आणि मोबाइल अटेंड करण्यासाठीही एका चपराश्याची ड्यूटी लावलेली होती. तोच फोनवर सर्वांना सांगत होता, ‘‘साहेब आता व्यस्त आहेत. थोड्या वेळानं बोलतील,’’ तो सर्वांची नावं अन् नंबरही टिपून ठेवत होता. कुणी एखादा फारच अडून बसला तर तो चपरासी साहेबांकडे बघायचा, त्यांनी नाही म्हणून मान हलवली की तो क्षमा मागून फोन बंद करायचा.

साहेबांना इतक्या लोकांनी गराडा घातला होता की त्यांच्यापर्यंत पोहोचणंच मुळात अवघड होतं. त्यातला प्रत्येकजण अगदी हिरिरीनं सिद्ध करू बघत होता. जणू तोच रमणसाहेबांचा एकमेव जवळचा आहे. तोच त्यांचा आधार आहे. त्यांच्यावर आलेल्या संकटातून तोच एकटा त्यांना सांभाळू शकतो. धीर देणारी सांत्वन करणारी एकाहून एक सरस वाक्य त्या माणसांच्या मुखातून निघत होती.

‘‘ऐकून धक्काच बसला हो.’’

‘‘घडलं हे फारच वाईट झालंय…’’

‘‘सर, आम्ही इतकी वर्षं ओळखतोय तुम्हाला, तुम्ही कसे आहात ते आम्हाला ठाऊक आहे. तुमच्यासारखा सज्जन आणि प्रामाणिक माणूस असं करणारच नाही. तिनं मुद्दाम घडवून आणलंय हे सगळं.’’

‘‘होय ना? रमण सरांना कोण ओळखत नाही? ज्या डिपार्टमेन्टमध्ये लाच घेतल्याशिवाय एक कागद पुढे सरकत नाही, त्या डिपार्टमेंटमध्ये ते इतकी वर्ष स्वच्छ चारित्र्यानं वावरले. कधी एक पैसा कुणाकडून घेतला नाही अन् एका स्त्रीवर बळजबरी केल्याचा आरोप लावला जातोय त्यांच्यावर!’’

‘‘सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यावर हा आरोप लावू देणार नाही.’’

‘‘एमसीडी इतकं मोठं व्यवस्थापन आहे…इथं तर असं काही तरी नेहमीच चालू असतं.’’

‘‘सर तुम्ही हे मनाला लावून घेऊ नका. सीमा तशीही चवचाळ स्त्री आहे. तिला सगळेच ओळखतात.’’

गर्दी वाढत होती तशा चर्चाही वाढत होत्या. सहानुभूती दाखवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता.

कारण रमण अत्यंत शुद्ध, स्वच्छ चारित्र्याचा होता. इतरांना त्याचा हेवा वाटे, धाकही वाटे. ज्यांना त्यानं लाच घेऊ नका असा सज्जड दम दिला होता. त्यांना तर आज त्याच्यावर एका स्त्रीनं तिच्या अब्रूवर रमण उठलाय असा डांगोरा पिटलाय म्हटल्यावर मनांतून त्यांना सुप्त समाधान वाटत होतं. आता जर सस्पेंड झाला तर काय होईल? कोर्टात केस होईल. अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातील. घरीदारी कोणी मान तरी देईल का?

रमणची बायको अनुराधा सकाळपासून स्वत:च्या खोलीतून बाहेरही आली नव्हती. जेव्हापासून तिला तिच्या नवऱ्यावर आलेला आळ आणि त्याला कदाचित सस्पेंड करतील ही बातमी कळली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबलेच नव्हते. रमण असं करणार नाही याबद्दल तिला खात्री होती, पण इतका उघड आरोप झालाय म्हणजे…काहीतरी असेलही ही शंका जीव कुरतडत होती. एमसीडीमधला इतका मोठा अधिकारी इतकी खालची पातळी गाठू शकतो या कल्पनेनंच ती अर्धमेली झाली होती.

दुपारपर्यंत घरी आलेले सगळे लोक रमणचा निरोप घेऊन, त्यांच्याशी हात मिळवून निघून गेले होते. रविवार होता म्हणून इतकी मंडळी येऊही शकली होती. बरेच लोक सुट्टी घ्यावी लागली नाही म्हणून, अनेकजण न येण्याबद्दल काही कारण द्यावं लागलं नाही, म्हणून आनंदातच होते. त्यांच्यावर जळणारे, त्यांचा हेवा करणारेदेखील, दिलाशाचे बोल बोलून निघून गेले. थकलेले, त्रासलेले आणि इभ्रतीवर डाग लागल्यामुळे दुखावलेले रमण पार गोंधळून गेले होते.

इतकी वर्ष चारित्र्य निष्कलंक ठेवलं अन् आता मान खाली घालायची वेळ आली. एवढीशीही चूक नसताना इतका अपमान सहन करावा लागतोय…घरच्यांना, नातलग, परिचितांना काय उत्तर द्यायचं? पाय ओढत कसेबसे रमण आपल्या खोलीत आले.

त्यांना बघताच पत्नी अनुराधा तिथून उठून बाहेर जाऊ लागली. तिच्या सगळ्या नातलगांनी त्याच खोलीत ठिय्या दिला होता. रमणनं तिचा हात धरला. ते इतर लोकांना म्हणाले,

‘‘मला अनुराधेशी थोडं बोलायचं आहे. तुम्ही सर्व काही वेळासाठी बाहेर गेलात तर बरं होईल.’’

‘‘मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीए.’’ त्यांचा हात झटकून टाकत अनुराधा रागानं म्हणाली, ‘‘काय उरलंय आता सांगायला अन् ऐकायला? कुठं तोंड दाखवायला जागा नाही उरली मला. अहो, निदान मुलांचा तरी विचार करायचा होता. दोन मुलं आहेत तुम्हाला अन् बेचाळीस वर्षांचं वय आहे. या वयात असं वागताना लाज नाही वाटली?’’ बोलता बोलता तिला परत रडू कोसळलं.

‘‘राधा, तू शिकलेली आहेस. रोज पेपर वाचतेस, अगं, स्त्रियांच्या बाजूने कायदे झाल्यापासून पुरूषांना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. अगं, मला अडकवलंय यात…यातलं एकही अक्षर खरं नाहीए. आक्रस्ताळ्या अन् कष्ट न करता सर्व हवं असलेल्या स्त्रिया असं वागतात हे तर तुलाही ठाऊक आहे ना? अन् तू मला ओळखत नाहीस का? माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, मुलांवर आणि संसारावर. तुला माहीत आहे ना? मी असं कसं वागेन? तू तरी निदान मला समजून घेशील ना?’’

‘‘इतकं सगळं झाल्यावर आता आणखी काय समजून घ्यायचं शिल्लक राहिलं आहे? तुम्हीच विचार करा. कुणीही स्त्री असं कशाला करेल? त्यात तिचीही बेअब्रू आहेच ना? ती ही विवाहित आहे. विनाकारण इतका मोठा आरोप तुमच्यावर का करेल ती? तिनं खोटेपणा केला हे सिद्ध झालं तर तिची नोकरी जाईल, ती सस्पेंड होईल एवढंच नाही तर तिचाही संसार उद्ध्वस्त होईल ना? मला उगीच काही तरी सांगू नका. पुढे काय होईल कुणास ठाऊक पण आता तरी मी तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. मी मुलांना घेऊन आजच माहेरी जाते आहे. इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात तुमच्यावर कायम विश्वास ठेवला मी, तुम्ही मात्र विश्वासघात केलात माझा,’’ राधा फुत्कारली.

‘‘उगीच भलते आरोप करू नकोस. मी कोणतीही चूक केली नाहीए. न केलेल्या गोष्टींची शिक्षाही मी भोगणार नाही. इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते समोर येईलच. मागे ही मी तुला सांगितलं होतं की माझ्या हाताखाली काम करणारी सीमा फार आळशी अन् कामचोर आहे. ती माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेते. साहेबांनीच मागितले आहेत म्हणून खोटं बोलते. त्यामुळे तिचं प्रमोशन होत नाहीए. एमसीडी असा विभाग आहे जो सर्वात वाईट अन् भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. तिथंही मी माझं नाव निष्कलंक ठेवलंय. आमच्या विभागात तर एकापेक्षा एक निकम्मी बिनकामाची माणसं पैसेवाली होऊन बसली आहेत.’’

‘‘मी लाच घेत नाही, अन् कुणाला घाबरतही नाही. काम स्वच्छ अन् प्रामाणिकपणे करतो म्हणून मला पुढे शत्रूही खूप आहेत. बरेच दिवसांपासून सीमा प्रमोशनसाठी मागे लागली आहे. खूप त्रास देते आहे. मी तिला मध्यंतरी रागावलो, जरा समज दिली, तेव्हाच तिनं मला धमकी दिली की ती मला बघून घेईल. गुरूवारी पुन्हा ती माझ्या केबिनमध्ये आली आणि प्रमोशन देताय की नाही असं विचारलं.

‘‘मी जेव्हा ‘नाही’ म्हटलं तेव्हा तिनं स्वत:च आपला ब्लाऊज फाडला. साडी फाडली अन् मोठमोठ्यानं रडून ओरडून मी तिच्यावर बळजबरी करतोय असा कांगावा केला. लोक लगेच गोळा झाले. मी तिला मॉलेस्ट करतोय. असं ती रडून रडून सांगू लागली. स्टाफमधल्या स्त्रियांनी तिला बाहेर नेलं. काही लोक माझ्या बाजूनं बोलू लागले. काहींनी सीमाची बाजू घेतली. आता इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते कळेलच. माझ्या शिपायानं सांगितलंय की त्यावेळी माझ्या केबिनमधला सी.सी. कॅमेरा चालू होता. त्यात सगळं रेकॉर्ड झालंच असेल. मी निर्दोष आहे.’’ उत्तजेना अन् अशक्तपणामुळे रमण थरथरत होता.

याचवेळी त्याला पत्नीची अन् मुलांच्या आधाराची गरज होती. पण पत्नीच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यामुळे त्याला फारच मोठा मानसिक धक्का बसला होता. अंगातली शक्ती संपल्यासारख वाटत होतं. विश्वासाच्या मुळांनांच हादरा बसला होता, त्यामुळे नातीही दुभंगली होती. त्याला कळेना, कुठं चुकलं त्याचं? बायकोमुलांवर आयुष्य उधळलं, तरी असं का व्हावं?

‘‘उगीच काही तरी रचून कहाणी सांगू नका, इतके मोठे ऑफिसर आहात अन् एका सामान्य स्त्रीला बदनाम करताय? तुम्हाला बदनाम करून तिला काय मिळणार आहे? अन् ती जर खरीच चवचाल असती तर तिनं इतरांबरोबरही असाच प्रयोग केला असता ना? अजून कुणी काही तक्रार नाही केलीये तिच्याबद्दल…’’ राधा काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती.

‘‘तुझं म्हणणं खरं आहे. तिनं हे असं प्रथमच केलंय. पण तिच्याबद्दल सगळे लोक वाईटच बोलतात. तिची राहणी हा तर सर्व पुरूषांच्या मनोरंजनाचा विषय आहे. पुरूषांना जाळ्यात ओढायलाच जणू ती अशी वागते.’’

‘‘शी:शी, रमण, असे विचार आहेत तुमचे?’’ राधा पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या माहेरची मंडळी आत आली.

‘‘अनु, कसला विचार करते आहेस? अजूनही या माणसाबरोबरच रहायचंय तुला? सगळीकडे छी थू, चाललीय त्याच्या नावानं, मुलांवर किती वाईट परिणाम होईल या गोष्टीचा. शाळेतली इतर मुलं किती त्रास देतील तुझ्या मुलांना…चल, तू आमच्याबरोबर चल.’’ अनुराधेच्या भावानं म्हटलं.

‘‘नाही तर काय? तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुला आधार द्यायला. शिवाय तू नोकरीही करते आहेस, राधाच्या आईनं अत्यंत तिरस्कारानं जावयाकडे बघत म्हटलं. जणू त्यांचा अपराध सिद्ध झाला होता.

आजपर्यंत सासरची जी माणसं रमणच्या चांगुलपणाचे गोडवे गातावा थकत नव्हती ती आता त्यांचा तिरस्कार करत होती. रमणला खूप वाईट वाटलं, तो स्वत: निर्दोष होता हे त्रिवार सत्य होतं. पण अजून ते लोकांच्या पचनी पडत नव्हतं. त्यांनी रमणला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं.

‘‘बाबा, तुम्ही तरी समजवा ना यांना,’’ रमणनं सासऱ्याकंडे बघत विनवणी केली. अनुराधेचे बाबा अत्यंत शांत व समंजस होते. विचार केल्याशिवाय ते कोणतीही कृती करत नसत.

‘‘हो गं अनु. तू नवऱ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. माझा रमणवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इतकी वर्ष एकत्र राहताय…तुला ठाऊक आहे रमण किती सज्जन अन् स्वच्छ चारित्र्याचा आहे. तो असं वागणारच नाही. तू आपला संसार मोडू नकोस?’’ बाबा म्हणाले.

सासूबाई एकदम भडकल्या, ‘‘आपल्या मुलीची कड घेण्याऐवजी तुम्ही या माणसाची बाजू घेता आहात ज्यानं एका स्त्रीच्या अब्रूला हात घातला? आत्तापर्यंत कुणास ठाऊक किती जणींशी त्याचे संबंध आले असतील. आमची पोर गरीब…तिला कळलंच नसेल काही, भलेपणाच्या आड माणूस काय वाट्टेल ते करू शकतो.’’

‘‘आई, काय बोलताय? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. संकटाच्या वेळीच आपल्या माणसांचा आधार हवा असतो. पण तुम्ही आणि राधाही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. इतक्या वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतरही जर नवरा बायकोतला विश्वास भक्कम नसेल तर नात्याला अन् एकत्र राहण्याला तरी काय अर्थ आहे?’’

‘‘राधा, आता मी तुला अडवणार नाही, माझ्याकडून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण एकच सांगतो, हे घर तुझंच होतं, तुझंच आहे, पुढेही तुझंच राहील.’’

क्षणभर राधाचं मन डगमगलं. ती चूक करतेय का? रमणसारखा पती अन् पिता दुसरा नसेल. इतक्या वर्षांत त्यानं कधी तिला दुखावलं नव्हतं. कधी अपमान केला नव्हता. कुठली बंधनं घातली नव्हती. कधी काही कमी पडू दिलं नव्हतं. तर मग आज तिचा विश्वास का डळमळतोय? दुसऱ्या कुणी काही सांगितलं तर तीही लगेच दोष का काढते आहे? ती क्षणभर थबकली. रमणशी काही बोलणार तेवढ्यात आईनं हात धरून ओढत तिला खोली बाहेर काढलं. मुलं बावरून कोमेजून उभी होती.

‘‘आई, बाबा काय म्हणताहेत ते नीट समजून घे ना.’’ अठरा वर्षांची मोठी मुलगी पुढंही काही बोलणार तोच तिची आजी कडाडली, ‘‘गप्प राहा तू, लहान आहेस, तुला काय कळतंय?’’

आजीचा ओरडा ऐकून ती गप्प बसली. पण तिचा बाबांवर पूर्ण विश्वास होता अन् आईनंही बाबांचं म्हणणं समजून घ्यावं असं तिला वाटत होतं. चौदा वर्षांचा धाकटा भाऊ रडायला लागला होता. तिनं त्याला जवळ घेऊन धीर दिला. ती त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली. तिला स्वत:लाही रडायला येत होतं. आजीसकट सगळ्यांचा खूप खूप राग आला होता. तिच्या बाबांना कुणी नावं ठेवलेली तिला अजिबात आवडत नव्हती.

राधा आणि मुलं निघून गेल्यावर ते घर रमणला खायला उठलं. त्यांना आता सीमाची भीती वाटू लागली. ती कोर्टातही सांगेल की रमणनं पूर्वीही तिच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. एवंढच नव्हे तर सेक्स संबंधासाठीही विचारलं होतं. रमणची बाजू कितीही भक्कम असली तरी त्याच्याकडे पुरावा कुठं होता. एकमेव भिस्त होती ती खोलीतल्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजवर, पण ती फिल्म त्यांनी डोळ्यांनी बघितलीच नव्हती. कारण ती आता कोर्टातच दाखवली जाणार. पण कायदे अशा बाबतीत स्त्रियांच्या बाजूचे असतात. त्यातून हे सर्व प्रतिष्ठित ऑफिसच्या प्रतिष्ठित ऑफिसरसोबत घडलं होतं. जो अत्यंत भीरू होता. कायदा विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. जे एरवी गुंडपुंड सहज करतात.

बायकोमुलं सोडून गेली. बरेचसे नातलगही दूर झाले. मित्रही थोडेच उरले…रमणला एकाएकी खूप भीती वाटली. घशाला कोरड पडली. घरात अंधारात एकटेच बसून होते. पाणी हवं होतं प्यायला पण उठवंसं वाटेना. सवयीप्रमाणे ‘राधा…’ म्हणून हाक मारणार तेवढ्यात आठवलं की ती इथं नाहीए.

अन् अचानक समोर अनुराधा दिसली. हा भास की वस्तुस्थिती? तो दचकून सावरून बसला. खोलीतला दिवा लावत राधा म्हणाली, ‘‘मला क्षमा करा रमण. मी तुमच्यावर रागावले, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. विश्वास ठेवला नाही. या गुन्ह्यांसाठी द्याल ती शिक्षा मी भोगेन. फक्त मला क्षमा करा. मला खरं काय ते कळलं आहे, तुमची बाजू कळली आहे.’’ तिनं त्यांना मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. पश्चात्ताप झाला होता तिला.

‘‘अगं, पण अजून केस, इनव्हिगेशन पूर्ण कुठं झालंय?’’ रमणच्या मनातली भीती आता पूर्णपणे गेली होती. खोलीतल्या उजेडात, राधाच्या मिठीत त्यांना खूप सुरक्षित वाटत होतं.

राधानं त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. ती बोलू लागली.

‘‘सीमाचा नवरा मला भेटायला आला होता. त्यांनी मला सांगितलं की ते सार्वजनिकरित्या हे बोलू शकणार नाही. कारण ते स्वत: आजारी आहेत. घर सीमाच चालवते. पण त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे. कारण सीमानं हा सगळा बनाव मुद्दाम घडवून आणला आहे. एरवी तुमच्या प्रामाणिकपणाची अन् शुद्ध चारित्र्याची तिलाही भीती वाटते पण ती फार महत्त्वाकांक्षी आहे. कष्ट न करता सगळं मिळावं हा एक अजून दुर्गण तिच्यात आहे. तिच्यामुळे आपण विभक्त झालो हे त्यांच्या मनाला फार लागलंय. त्यांनीच मला सांगितलयकी मी तुमच्याजवळच रहावं. केसचा निकाल लागला की कलंकही धुतला जाईल.’’

‘‘तुम्ही तिला पैसे खाऊ देत नव्हता. प्रमोशन देत नव्हता, तिच्या विरूद्ध अॅक्शन घेण्याची वॉर्निंगही दिली होती. म्हणूनच तिनं हा डाव रचला.’’

‘‘या संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू. मला खात्री आहे तुमचं प्रेम, तुमचं चारित्र्य, सगळ्याचाच मला अभिमान वाटतोय यापुढे मी असा वेडेपणा करणार नाही.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें