कथा * पूनम अहमद
मी बेडरूमच्या खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होते. अमित अजून अंथरूणातच होते. जागे होते पण मोबाइलवर गर्क होते. मी खिडकीतून हात बाहेर काढून हलवला. नेमकं तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.
‘‘कोण आहे?’’ त्यांनी विचारलं.
‘‘मला माहीत नाही...’’ मी उत्तरले.
‘‘तर मग हात कुणाला बघून हलवलास?’’
‘‘मला त्याचं नांव ठाऊक नाही...’’
‘‘रिया, काय बोलतेस हे कळतंय का तुला? ज्याचं नांव माहीत नाही, त्याला बघून हात हलवतेस?’’
मी गप्प बसले. त्यांनीच चेष्टेच्या सुरात विचारलं, ‘‘आहे कोण? स्त्री की पुरूष?’’
‘‘पुरूष...’’
‘‘अरेच्चा? कमालच आहे...अगं, सांग तरी कोण आहे?’’
‘‘मित्र आहे माझा...’’
ताडकन अमित उठले. रविवारी सकाळी इतकी स्फूर्ती? मला कौतुकच वाटलं. मी बोलूनही दाखवलं, ‘‘अरे व्वा? इतक्या चपळाईनं उठलात? काय झालं?’’
‘‘काही नाही, बघायचं होतं कुणाला बघून तू हात हलवंत होतीस ते...सांगत का नाहीस कोण होता तो?’’
एव्हाना अमित थोडे नाराज झाले होते अन् खूपच बैचेनही दिसंत होते. मी त्यांच्या गळयात हात घातले. अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, ‘‘खरंच सांगत, मला त्याचं नांव ठाऊक नाही. तो काय करतो, कुठला आहे, मला काहीही ठाऊक नाही.’’
‘‘मग त्याला हात का केलास?’’
‘‘तेवढीच ओळख आहे...’’
अमितला काही समजलं नाही. माझे हात गळ्यातून काढत म्हणाले, ‘‘काय बोलतेस काही कळंत नाहीए...ओळख ना पारख...अन् हात हलवला.’’
‘अहो, त्याचं नावं नाही ठाऊक पण ओळख आहे ना?’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘असाच जाता येता दिसतो कधीमधी. एकाच सोसायटीत राहतो...किती तरी लोकांशी हाय, हॅलो होतंच ना? त्या सर्वांची नांवं गावं ठाऊक असायला हवीत असं कुठं लिहिलंय?’’
‘‘ठीक आहे...मी वॉशरूममधून येतो तोवर चहा, नाश्ता काय करतेस ते बघ.’’ अमितनं विषय तिथंच संपवला.
रविवार असल्यानं मुलंही उशीरा उठणार होती. मी सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला घेतला.
कांदा चिरताना सहज माझी नजर खिडकी बाहेर गेली. तो नेमका बाहेरून काहीतरी पार्सल पॅक करून घेऊन येताना दिसला. आज रविवार...त्याची बायकोही आज आराम करत असणारर. त्याची माझी नजरानजर झाली. तो हसला अन् निघून गेला.