कथा * रश्मि शर्मा
शनिवारी सायंकाळीच मी ऑफिसातून थेट माझ्या माहेरच्या घरी एका रात्रीच्या मुक्कामासाठी आले. सीमाताई अन् भावजी पण दोन दिवसांसाठी आले होते. म्हटलं चला, तेवढीच आई आणि ताईसोबत गप्पा गोष्टी करण्यातली मजा अनुभवता येईल. पण मी पोहोचतेय तिथं, तोवरच रवीचा, माझ्या नवऱ्याचा फोन आला.
मी त्यावेळी वॉशरूममध्ये होते म्हणून फोन आईनंच घेतला.
मी आरामात सोफ्यावर येऊन बसले. चहाचे कप सखूबाईंनी सर्वांच्या हातात दिले अन् मग आई जरा रागानं म्हणाली, ‘‘रवीचा फोन होता. तुझ्या सासूला ताप आलाय म्हणून सांगत होता.’’
मी एकदम तडकलेच. ‘‘इथं येऊन अजून तासभरही झाला नाहीए अन् लगेच बोलावून घेताएत. सासूबाईंना तर माझं एक दिवसाचं स्वातंत्र्यही बघवंत नाही. तापच चढतो त्यांना.’’
‘‘कुणास ठाऊक, खरंच ताप आलाय की उगीचच तुला बोलावून घेण्यासाठी नाटक करताहेत.’’ ताईनं शंका बोलून दाखवली.
‘‘आज सकाळी जेव्हा मी त्यांच्याकडे एक रात्र इथं राहण्याची परवानगी मागितली, तेव्हाच त्यांचा चेहरा बदलला होता, फुगल्याच होत्या...ताई, तुझी मजा आहे बाई! एकटी राहतेस, सासूसासऱ्यांचा काच नाहीए तुला.’’ माझा मूड फारच बिघडला होता.
‘‘तुला या काचातून सुटायचं असेल तर तू तुझ्या सासूला तुझ्या थोरल्या जावेकडे राहायला पाठव ना? हटूनच बैस. सत्याग्रह कर.’’ ताईनं मला सल्ला दिला. माझ्या लग्नानंतर एक महिन्यानंतर आम्ही भेटलो तेव्हा ही तिनं मला हेच सांगितलं होतं.
‘‘माझी मोठी जाऊ महा कजाग अन् जहांबाज आहे. तिच्याकडे जायला सासूबाई राजी नाहीत अन् तिकडं त्यांना पाठवायला त्यांचा धाकटा लेक तयार नाही. तुला ठाऊक आहे का, मागच्या महिन्यात मी सासूबाईंना जावेकडे पाठवण्याचा हट्ट धरला तर यांनी मला चक्क घटस्फोटाची धमकी दिली. ताई, अगं, यांना आईपुढे माझी काहीही व्हॅल्यू नाहीए.’’
‘‘तू त्याच्या घटस्फोटाच्या धमकीला घाबरू नकोस. कारण रवीचं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे हे तर आम्हाला सर्वांनाच कळंतय, दिसतंय, जाणवतंय. तुझी व्हॅल्यू तर आहेच!’