अखेरची भेट

 * गरिमा पंकज

‘‘माझी एक इच्छा आहे, मला वचन दे तू ती पूर्ण करशील,’’ जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.

‘‘मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ,’’ मी भावनाविवश होत म्हटले.

‘‘बरं मग मी सांगते,’’ असे म्हणत ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळयांत माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होते की, तिच्या शांत, आनंदी, निळया डोळयांत माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहात होते… माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला.

तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता… आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, ‘‘फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की, मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन.’’

तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, ‘‘मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. मी एकटा राहून काय करणार?’’ असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले.

तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन माझी जान्हवी होती.

महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती जान्हवी होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की, हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. जान्हवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबीयांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीत राहिली. काही वर्षे आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो.

शिक्षण पूर्ण करून मी परत आलो तेव्हा लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. जान्हवीही एका कंपनीत काम करत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो.

एके दिवशी सकाळीच जान्हवी माझ्या मिठीत शिरली आणि हळूच म्हणाली, ‘‘नवरोबा आता तयारीला लागा. लवकरच तुला घोडा व्हावे लागेल.’’

तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘‘असे काय बोलतेस? घोडा आणि मी? का, कशासाठी?’’

‘‘तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का?’’ असे मला विचारताना जान्हवी लाजली. तिला काय सांगायचंय ते माझ्या लक्षात आले. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचा हात धरून म्हणालो, ‘‘आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’’

आम्ही दोघे एका वेगळयाच जगात पोहोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दल जास्त गप्पा होऊ लागल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचे, ते कसे ठेवायचे, तो काय आणि कसा बोलेल, काय करेल, यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो. एक संपूर्ण खोली मी बाळाच्या सामानाने भरली होती. जान्हवीची पूर्ण काळजी घेणे, तिला योग्य आहार आणि औषधे देणे, तिच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे, हे सर्व करताना मला आनंद मिळत होता.

काळ पंख लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला. जान्हवीच्या गरोदरपणाला ५ महिने उलटून गेले होते. त्या आनंदाच्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, पण आमच्या सुखाला गालबोट लागेल, हे आम्हाला कुठे माहीत होते?

तो मार्च २०२० चा महिना होता. संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानामुळे त्रासले होते. भारतातही कोरोना संसर्ग झपाटयाने पसरू लागला होता. मी जान्हवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता. त्यामुळे मी तिच्या आईला आमच्या घरी बोलावले, जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती जान्हवीची काळजी घेईल.

दरम्यान, एके दुपारी जान्हवीची बालपणीची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली. तिला भेटून जान्हवीला खूप आनंद झाला. जेव्हा जान्हवीने सांगितले की, प्रिया दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टनहून परतली आहे तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, ‘‘जान्हवी हे बरोबर नाही. तुला माहिती आहे का? परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात. जान्हवी, तू तिच्या जवळ जायला नको होतेस.’’

‘‘म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की, माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवे होते की, तू आत येऊ शकत नाहीस. मला भेटू शकत नाहीस. असे वागणे बरोबर आहे का अमन?’’

‘‘हो, बरोबरच आहे जान्हवी. तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहिती आहे का? आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे.’’

‘‘हो, पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते.’’

‘‘असेलही, पण जान्हवी माझे मन सांगतेय की, तू योग्य केले नाहीस. तू गरोदर आहेस. तुला जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपडयांमध्येही असतात. ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपा कर पण, माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस,’’ मी तिला समजावले.

‘‘ठीक आहे, पुन्हा कधीच नाही.’’

तो विषय आम्ही तिथेच थांबवला. दरम्यान, रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते.

त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला. मी ६-७ दिवस घरी जाऊ शकलो नाही. मी जान्हवीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे. कोरोना रुग्णांसोबत राहावे लागत असल्याने मी स्वत:हून घरी जाणे टाळत होतो, कारण हा विषाणू माझ्याकडून जान्हवीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते.

दरम्यान, एके दिवशी फोनवरून मला जान्हवीची प्रकृती बरी नसल्याचे समजले. मी विचारले असता २-३ दिवसांपासून कोरडा खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले. तापाची साधी औषधे घेऊन ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.

मी खूप घाबरलो. ही सर्व लक्षणे कोरोनाची होती. मी सुन्न झालो. एकीकडे जान्हवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २४ तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो. तिची प्रकृती बिघडतच चालली होती. तिच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की जान्हवीला वाचवणे आता शक्य नाही.

तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की, मला अश्रू अनावर झाले. माझा जीव असलेली जान्हवी मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळयांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो.

मला सुरुवातीपासून आजपर्यंतची जान्हवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला जान्हवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. शेवटी जवळ असण्याचे वचन. मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन.

मला माहीत होते की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेहही कुटुंबीयांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकचे आवरण घातले जाते. जान्हवी पुन्हा कधीच दिसणार नाही, तिला स्पर्श करता येणार नाही, अशी वेळ जवळ आली आहे हेही मला समजत होते. मी माझे वचन नक्की पूर्ण करेन, असे मी मनोमन ठरवले होते.

मी इतर डॉक्टर आणि परिचरिकांसह जान्हवीच्या खाटेपासून थोडया अंतरावर उभा होतो. सर्वांनाच काळजी वाटत होती. तेव्हाच मी माझा गाऊन काढला, हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून राहण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही.

मला माहीत होते की, आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. जान्हवीजवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठया कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले. काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हातांनी आधार दिला. आमच्या दोघांच्या डोळयांतून अश्रू वाहत होते.

तेवढयात जान्हवी माझ्यापासून दूर झाली आणि कसेबसे स्वत:च्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करू लागली, ‘‘नाही अमन नाही. कृपया जा, अमन, जा… माझे तु?यावर खूप प्रेम आहे.’’

‘‘माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे…’’ असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला, पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभे राहावे लागले.

माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांसोबत माझे ओठही सॅनिटाइज केले. मला लगेच अंघोळीसाठी पाठवण्यात आले.

अंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण जान्हवीसोबतची ती माझी अखेरची भेट होती हे मला माहीत होते.

ते सात दिवस

कथा * रितु वर्मा

मानसीचा आज आपल्या सासरी पहिला दिवस होता. भावजय, नणंद, काकी सर्वजणी मस्करी करून हसत होत्या. अक्षत खोलीत येताच सुधा काकीने तिचा कान ओढत म्हटले, ‘‘अरे लबाडा, थोडेही थांबवत नाही का तुला? आयुष्यभराची सोबत आहे… थोडा धीर धर.’’

मानसीने बघितले की, सर्वजण थट्टा-मस्करी करत होते. मात्र अक्षतची आई म्हणजे मानसीची सासू माधुरीच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. महागडे कपडे आणि दागदागिने घालूनही ती अतिशय सर्वसाधारण दिसत होती.

मानसी आणि अक्षतचे लग्न धुमधडाक्यात झाले होते. कुंदन हार आणि मोत्याच्या रंगाच्या घागरा-चोळीत मानसी अतिशय सुंदर दिसत होती. तर क्रीम रंगाच्या शेरवानीत अक्षतही देखणा दिसत होता.

दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामी झाले. आता घरात फक्त मानसी, अक्षत, अक्षतची मोठी बहीण निधी आणि अक्षतचे वडील विनोद आणि आई माधुरी होते.

दुसऱ्या दिवशी माधुरीला पाचपरतावनासाठी माहेरी जायचे होते. कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढयात तिला वाटले की सासूबाईंनाच विचारुया. त्यानंतर हातात साडया घेऊन ती सासूबाईंकडे गेली. ‘‘आई सांगा ना, पिवळया आणि नारंगी रंगापैकी उद्या कोणती साडी नेसू?’’ तिने विचारले.

माधुरी म्हणाल्या, ‘‘बाळा, तुला जी चांगली वाटेल ती नेस, पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल.’’

तितक्यात विनोद रागाने म्हणाले, ‘‘तू तर अडाणीच राहिलीस… डोळयांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो, एप्रिल महिन्यात नाही.

माधुरी एकदम गप्प बसल्या. विनोद म्हणाले, ‘‘माधुरी बाळा, तू निधी ताईला विचार.’’

मानसीला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंशी असे वागणे अजिबात आवडले नाही. सोबतच तिला अशी भीतीही वाटू लागली की, अक्षतचा स्वभावही त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे? शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच.

दुसऱ्या दिवशी मानसी पिवळया रंगाची शिफॉनची साडी नेसून गेली. माधुरी यांनी सकाळी बटाटयाची भाजी आणि मूग डाळीचा हलवा बनवला होता. निधी म्हणाली, ‘‘आई, तू आम्हाला लठ्ठ करणार असे वाटत आहे.’’

अक्षत रागाने म्हणाला, ‘‘आई, किती वेळा सांगितले आहे की, डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा.’’

विनोद म्हणाले, ‘‘तुझी आई हे सर्व कुठून शिकणार? तिला स्वत:च्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते.’’

तितक्यात मानसी म्हणाली, ‘‘मी तर इतका सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे.’’

मानसीने केलेले कौतुक ऐकून माधुरीचा चेहरा खुलला.

त्यानंतर अक्षत आणि मानसी १५ दिवसांसाठी हनिमूनला गेले. त्यावेळी माधुरीच्या असे लक्षात आले की, अक्षतच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा बहीणच फोन करतात.

अक्षत आणि मानसी गोव्याहून परत आले तेव्हा निधी ताई तिच्या सासरी निघून गेली होती. मानसीने गोव्याहून आणलेल्या भेटवस्तू सासूबाईंना दाखवल्या. मानसी सासऱ्यांसाठी टी शर्ट आणि सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती.

माधुरीसाठी आणलेल्या भेटवस्तू पाहून विनोद म्हणाले, ‘‘मानसी बाळा, हे काय घेऊन आलीस तू तुझ्या सासूबाईंसाठी? माधुरीने गॉगल कधीच घातलेला नाही. इतकी वर्षे शहरात राहूनही ती थोडीशीही बदललेली नाही. ती काय गॉगल लावणार…?’’

मानसी म्हणाली, ‘‘अहो बाबा, आधी लावला नाही तर बिघडले कुठे? आता लावेल.’’

दुसऱ्या दिवशी विनोद आणि अक्षत कामावर गेले. मानसीकडे अजून ७ दिवसांची सुट्टी शिल्लक होती. ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाचे लाडू बनवत होत्या. मानसीकडे पाहात त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, ‘‘बाळा, तुला बेसनाचे लाडू आवडतात ना? तेच बनवत आहे.’’

मानसी लाडू खात म्हणाली, ‘‘सासूबाई, खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे.’’

माधुरी निराश होऊन म्हणाली, ‘‘बाळा, गेल्या ३० वर्षांपासून जेवण बनवत आहे. त्यामुळे जेवण चांगलेच बनवता आले पाहिजे ना?’’

मानसी म्हणाली, ‘‘आई, तुम्ही खरंच खूप चांगले जेवण बनवता. सर्वांनाच इतके चांगले जेवण बनवता येत नाही.’’

मानसीच्या लक्षात आले की, तिची सासूबाई घरकामात पारंगत होती, पण ती अजिबातच नीटनेटकी राहायची नाही.

संध्याकाळ होताच माधुरी या विनोद आणि अक्षतसाठी पोहे बनवू लागल्या. तितक्यात मानसी तिकडे आली आणि म्हणाली, ‘‘आई, मी चहा बनवते. तुम्ही जा आणि तयार व्हा.’’

माधुरी म्हणाल्या, ‘‘कशासाठी तयार व्हायचे?’’

मानसीने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली, ‘‘तुम्हाला नीटनेटके पाहून बाबा खुश होतील.’’

विनोद आणि अक्षत घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत अक्षत मानसीला त्याच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागला. विनोद यांनी माधुरीकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि टोमणा मारत म्हणाले, ‘‘माधुरी, मीही तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतो तर किती बरे झाले असते…’’

माधुरी डोळयातील अश्रू लपवत स्वयंपाकघरात गेल्या. कपडे बदलताना विचार करू लागल्या की, विनोद यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिला नव्हता. सतत तिला अडाणी म्हणायचे. त्यामुळे आपण पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही माधुरी यांना विसर पडला होता.

रात्री मानसीला राहवले नाही, तिने अक्षतला विचारले, ‘‘बाबा सतत आईचा अपमान का करतात?’’

‘‘अगं, बाबा खूप हुशार आहेत आणि आई बावळटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात,’’ अक्षतने सांगितले.

नंतर मानसीला मिठीत घेत म्हणाला की, ‘‘प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो की, त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर पत्नी मिळेल.

दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी आणि मानसी एकट्या होत्या तेव्हा माधुरी म्हणाली, ‘‘आई, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का? तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता?’’

माधुरी म्हणाल्या, ‘‘बाळा, मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही. शिवाय स्वत:च्या पायावर उभी नाही.

मानसी म्हणाली, ‘‘तुम्ही सुंदर दिसता. तुमचा बांधाही कमनीय आहे… फक्त चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवायची गरज आहे.

माधुरी म्हणाल्या, ‘‘उगाच मस्करी करू नकोस. माझी सासू, नणंद, भावजय इतकेच नाही तर माझी मुलेही मला अडाणी समजतात.’’

मानसी म्हणाली, ‘‘आई तुम्हाला असे वाटते, कारण तुम्ही तसा विचार करता… तुम्ही जसा तुमच्याबद्दल विचार कराल तसाच दुसरेही करणार.’’

रात्री जेवताना मानसीने विनोद यांना विचारले की, ‘‘बाबा, आपल्या आई खूप छान जेवण करतात. आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर…?’’

विनोद हसत म्हणाले, ‘‘बाळा आजचे जग सादरीकरणाचे आहे… माधुरीसारखे जेवण तर कोणीही बनवू शकते. मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार? तुझी सासूबाई कोणाच्या पुढयात साधे दोन शब्द बोलू शकत नाही… तिने आयुष्यभर काहीच केले नाही, मग आता ५१ वर्षांच्या वयात काय करणार?’’

दुसऱ्या दिवशी जेव्हा माधुरी स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा मानसीने व्यवसायासंदर्भातील सर्व आराखडा तयार केला. तिने ‘माधुरीचे स्वयंपाकघर’ नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला. त्यानंतर म्हणाली, ‘‘आई, तुम्ही जे काही बनवाल त्याचा मी व्हिडीओ तयार करेन. हळूहळू सबस्क्रायबर वाढतील आणि त्यातूनच लोकांना तुमच्या हाताच्या चवीबद्दल समजेल. शिवाय यातूनच तुम्ही तुमचे स्वत:चे उत्पन्न मिळवू शकाल.’’

माधुरी घाबरून म्हणाल्या, ‘‘बाळा, मला हे जमणार नाही.’’

मानसीने खूपच आग्रह केल्यामुळे माधुरी तयार झाल्या, मात्र घाबरून त्यांच्या हातून शेव भाजी करपली. माधुरी म्हणाल्या, ‘‘सांगितले होते ना तुला,  मी बावळट आहे. काहीच करू शकत नाही.’’

मानसी मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. संध्याकाळी म्हणाली, ‘‘आई, सर्वात आधी तुम्ही तयार व्हा. त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा. आपण या नाश्त्यापासूनच सुरुवात करू.’’

मानसीने कसाबसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला. मानसीने त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तोच व्हिडीओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला. संध्याकाळपर्यंत माधुरीच्या व्हिडीओला २०० व्ह्यूज आणि ३-४ कमेंट मिळाले.

एकाने लिहिले होते, ‘‘बायको असावी तर अशी सुंदर, सुशील आणि पाककलेत निपुण.’’

मानसीने सांगितले, ‘‘बघा आई, कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला.’’

दुसऱ्या दिवशी माधुरी स्वत:च पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या. या नवीन व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास दिसत होता. सून मानसीसोबतचे ते ७ दिवस कधी गेले हेच माधुरीला समजले नाही. त्या ७ दिवसांत माधुरी हसायला आणि स्वत:वर विश्वास ठेवायला शिकल्या.

मानसी कार्यालयात जायची तयारी करत होती. माधुरी तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, ‘‘बाळा, आता त्या चॅनलचे काय होणार?’’

मानसी म्हणाली, ‘‘आई, आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडीओ बनवूया. शिवाय कुणाच्याही मदतीशिवाय स्वत:चा व्हिडीओ कसा बनवायचा, हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन.’’

मानसीकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे माधुरी यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला. सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागले. हळूहळू मानसीच्या मदतीने त्या ऑनलाइन ऑर्डर घेऊ लागल्या.

आज माधुरी यांना त्यांचा १० हजारांचा पहिला चेक मिळाला. रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव माधुरी यांना झाली. त्या व्यक्त होऊ लागल्या होत्या. अडाणी, बावळट राहिल्या नव्हत्या. आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून विनोदही आश्चर्यचकित झाले.

अक्षत म्हणाला, ‘‘आई ७ दिवसांत सुनेने तुझा कायापालट करून टाकला.’’

मानसी म्हणाली, ‘‘हुशार त्या आधीपासूनच होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती.’’

माधुरी मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या.

अक्कल दाढ

 * लीना खत्री

मी लहानपणापासून हे ऐकून कंटाळले होते की, मला जराही अक्कल नाही. एके दिवशी जेव्हा मी हे ऐकून चिडून रडू लागले तेव्हा माझ्या आत्येने मला प्रेमाने समजावले की, ‘‘बाळा, अजून तू लहान आहेस, पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला अक्कल दाढ येईल आणि तेव्हा कोणीही असे म्हणणार नाही की, तुला अक्कल नाही.’’

आत्येचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि मी रडणे बंद करून खेळायला गेले. माझी अशी पक्की खात्री झाली होती की, कधीतरी मलाही नक्कीच अक्कल येईल. हळूहळू मी मोठी होऊ लागले आणि याची वाट पाहू लागले की, आता लवकरच मलाही अक्कल देणारी दाढ येईल. या दरम्यान माझे लग्न झाले.

आता सासरीही मला हेच टोमणे ऐकायला मिळू लागले की, तुला तर जराही अक्कल नाही. आईने तुला काहीच शिकवले नाही. हे सर्व टोमणे सहन करत वेळ पुढे निघून चालली होती, पण अक्कल दाढ काही केल्या यायला तयार नव्हती. आता जेव्हा मी वयाची चाळीशी ओलांडली तेव्हा मला अक्कल दाढ येईल, ही आशाच सोडून दिली. एके दिवशी अचानक माझी चावून खायची दाढ प्रचंड दुखू लागली. वेदना असह्य झाल्यामुळे गालावर हात ठेवून मी ओरडत घरात फिरू लागले.

माझी दाढ दुखतेय हे ज्या कोणाला समजले त्या प्रत्येकाने मला हेच सांगितले की, ‘‘अगं, तुला अक्कल दाढ येत असेल. म्हणूच तुला इतकं दुखतंय.’’

मला अत्यानंद झाला. वाटले, उशिराने का होईना, पण आता मला अक्कल येईल. मात्र जेव्हा प्रचंड वेदनेने मी कळवळू लागले तेव्हा वाटले की, यापेक्षा मला अक्कल नव्हती तेच बरे होते. दातांच्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमची कोपऱ्यातली दाढ कीड लागून सडली आहे. ती काढून टाकावी लागेल.

तेव्हा मी कुतूहलाने विचारले, ‘‘ही माझी अक्कल दाढ होती का?’’

माझ्या या प्रश्नावर दातांचे डॉक्टर हसत म्हणाले, ‘‘होय, ही तुमची अक्कल दाढच होती.’’

आता सांगा? मी तरी काय बोलणार होते? एक तर आधीच उशिरा आली आणि कधी सडून गेली ते मला समजलेदेखील नाही. असह्य वेदना सहन करण्यापेक्षा ती काढून टाकणेच मला जास्त योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी ३ दिवसांनंतर दाढ काढायला गेले. तिथे दातदुखीमुळे त्रासलेली आणखीही काही माणसे बसली होती. त्यांच्यामध्ये एक छोटीशी ५ वर्षांची मुलगीही होती. तिच्या समोरच्या दुधाच्या दाताला कीड लागली होती. तो दात काढायला ती आली होती. मी तिला तिचे नाव विचारले, मात्र तिने उत्तर दिले नाही. ती रागाने गाल फुगवून बसली होती.

तिच्या आईने सांगितले की, ३ दिवसांपासून ती दातदुखीमुळे त्रासून गेली आहे. सुरुवातीला दात काढून घ्यायला तयार नव्हती, पण आता सहन होत नसल्यामुळे दात काढायला तयार झाली आहे.

माझा नंबर त्या मुलीच्या नंतर होता. तिला डॉक्टरांनी बोलावले आणि गाल सुन्न होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचा गाल सुजला. आता माझा नंबर आला. तशी तर मी दिसायला सुदृढ आहे, पण माझे मन भित्र्या सशासारखे आहे. काय करणार? इंजेक्शन घ्यावेच लागले. त्यांनतर १० मिनिटांनी डॉक्टर माझी दाढ काढणार होते. मी गाल पकडून तिथेच सोफ्यावर बसले.

घाबरून बसलेल्या मला १० मिनिटांनी आत बोलावण्यात आले आणि माझी अक्कल देणारी दाढ काढून टाकण्यात आली. दाढ काढताना मला विशेष दुखले नाही, पण त्यानंतर त्या जागेवर डॉक्टरांनी औषधाचा कापूस लावला आणि त्या औषधाच्या घाणेरडया वासाने मला तिथेच उलटी झाली. तेव्हा नर्सने माझ्याकडे खाऊ की गिळू, अशाच काहीशा नजरेने बघितले. ते पाहून मी चटकन गाल पकडून बाहेर आले. माझा छोटा मुलगा माझ्यासोबत होता. एक तासभर कापूस काढायचा नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याने मला डॉक्टरांचा निरोप दिला. तो एक तास कसाबसा गेला आणि मला आइस्क्रीम खायला मिळाले.

सुजलेले तोंड घेऊन आईस्क्रीम खाताना मी विचित्र दिसत होते. माझे वेडेवाकडे होणारे तोंड पाहून मुलांना हसू येत होते. मला दाढदुखीमुळे आणि ती काढताना जो त्रास झाला तो झाला, पण हे माझ्यासोबत चुकीचे घडले होते की, ज्या अक्कलदाढेची मी कित्येक वर्षे वाट पाहिली ती अशा प्रकारे आली आणि निघूनही गेली. शेवटी मी मात्र तशीच राहिले. हो, आधी होते तशीच…बेअक्कल.

फक्त एक साजन हवा

‘‘सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए…’’ एफएमवर वाजत असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनूची आठवण आली.

ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुणायची. मनमौजी… फुलपाखरू… फटाकडी… अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती. पण ती मात्र ‘पालथ्या घडयावर पाणी’ अशाच अविर्भावात वावरत असे. लोकांनी काहीही म्हटले तरी त्याचा तिच्यावर परिणाम होत नसे. स्वत:च्या अटी-शर्थींनुसार, स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती. पण मला माहिती होते की, ती खुल्या पुस्तकासारखी आहे. फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडया संयमाची गरज होती.

असे म्हणतात की, चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतोच… तनूच्या बाबतही असे म्हणता येईल की, ती नेमकी कशी आहे, हे जरा उशिरानेच समजते.

तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही… ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे. तिच्या हृदयाच्या छोटयाशा नभांगणात कितीतरी इच्छा, अपेक्षांचे पाखरू स्वत:च्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतूर झाले होते. एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे. या मुलीला नेमके काय हवे आहे, हे कधीकधी माझ्याही आकलनापलीकडचे होते.

८ वीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की, ती आमचा वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला समजेनासे झाले. रवीसोबत गप्पा मारणे, खेळणे, मौजमजा करणे तिला मनापासून आवडते, असे तनूने मला सांगितले. तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय, हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते. तरीही न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालली होती.

एके दिवशी रवीने लिहिलेले प्रेमपत्र तिने मला दाखवले आणि ते पाहून मी घाबरले. मी म्हटले, ‘‘फाडून फेकून दे हे पत्र… चुकून जरी सरांच्या हाती लागले तर तुमच्या दोघांची खैर नाही,’’ असे तिला समजावून सांगत मी तिची मैत्रीण असल्याचे कर्तव्य पार पाडले.

‘‘अगं यात घाबरण्यासारखे काहीच नाही… आयुष्यात एक जिवाभावाचा मित्र असायलाच हवा ना? बस एक सनम चाहीए, आशिकी के लिए…’’ असे हिंदी गाणे गुणगुणत तिने सांगितले.

‘‘तर मग मी तुझी जिवाभावाची नाही का?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘तुला समजले नाही. जिवाभावाचा मित्र म्हणजे जो माझ्यावर खूप प्रेम करेल. फक्त प्रेम आणि प्रेम… तू मैत्रीण आहेस, मित्र नाहीस…’’ तनूने मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर एके दिवशी प्रचंड रागाने म्हणाली, ‘‘मी रवीचा तिरस्कार करते.’’

मी कारण विचारले असता तिने सांगितले की, आज सकाळी खेळाच्या तासात बॅडमिंटन खेळताना त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

मी म्हटले, ‘‘तुला खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र हवा होता ना?’’

‘‘माझा प्रश्न ऐकून तनू काहीशी गोंधळली. नंतर म्हणाली, ‘‘हो, हवा होता मला माझ्यावर खूप प्रेम करणारा जिवाभावाचा मित्र, पण हे सर्व तेव्हाच जेव्हा प्रेम करताना त्याच्यासोबत माझी मर्जीही असेल. माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही स्पर्श करू शकणार नाही.’’ असे म्हणत तिने रवीने लिहिलेली सर्व प्रेमपत्रे फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि स्वत:चे हात झटकले.

‘‘वय केवळ १४ वर्षे आणि वागण्याची ही अशी तऱ्हा?’’ मी घाबरून गेले.

९ वीत असताना आम्ही दोघींनी आमची शाळा सोडून मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. शाळा घरापासून फार लांब नसल्याने आम्ही सर्व मैत्रिणी सायकलवर बसून शाळेत जायचो. १० वीचे आमचे वर्ष सुरू होण्यापूर्वी एके दिवशी तिने मला सांगितले की, ‘‘आपण सायकलवरून शाळेत येताना नेहमी एक मुलगा आपल्या मागून येऊन पुढे निघून जातो. तो मला खूप आवडतो. असे वाटतेय की, मी पुन्हा प्रेमात पडलेय…’’

मी तिला पुन्हा एकदा आगीशी न खेळण्याचा सल्ला दिला. मात्र ती स्वत:च्या मनाशिवाय इतर कुणाचे कधीच ऐकत नसे, त्यामुळे तिने माझे ऐकण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता तर शाळेतून येता-जाताना माझी नजरही त्या मुलावर पडू लागली होती.

शाळेत येताना आणि जाताना तनू त्या मुलाकडे तिरप्या कटाक्षाने एकटक पाहात असे आणि तो मुलगाही तिच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी आल्यानंतर तनू शेवटचे त्याच्याकडे पाहत असे आणि त्यानंतर तो तिथून निघून जात असे.

वर्षभर त्यांची अशी नजरानजर सुरू होती. त्यानंतर दोघे एकमेकांना प्रेमपत्र देऊ लागले. १-२ वेळा त्यांनी एकमेकांना छोटयामोठया भेटवस्तूही दिल्या होत्या. अनेकदा शाळा सुटल्यावर दोघे गप्पा मारत. पूर्वीप्रमाणेच घडलेली प्रत्येक गोष्ट तनू मला सांगत असे. आता आम्ही दोघी १२ वीत गेलो होतो. मी एके दिवशी तनूला विचारले, ‘‘तुझे हे प्रेम असे किती दिवस चालणार?’’

तनू हसत म्हणाली, ‘‘जोपर्यंत हे प्रेम फक्त प्रेम असेल. ज्या दिवशी माझ्या शरीराकडे तो वाईट नजरेने बघेल तो दिवस आमच्या नात्यातला शेवटचा दिवस असेल.’’

‘‘अगं, अशी मुले रिक्षासारखी असतात. एकाला बोलावले तर कितीतरी समोर येऊन उभ्या राहतात,’’ तनू खटयाळपणे हसत म्हणाली.

तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिले. मी विचारले, ‘‘तनू तुला असे वागताना भीती वाटत नाही का?’’

‘‘यात घाबरण्यासारखे काय आहे? जर हे सर्व करून मला आनंद मिळत असेल तर तो मिळविण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि हो, ही मुले तरी कुठे घाबरतात? मग मी का घाबरायचे? केवळ मुलगी आहे म्हणून?’’ तनू काहीशी रागावली होती. माझ्याकडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते.

त्या दिवशी आमच्या शाळेत निरोप समारंभ होता. शाळेच्या नियमानुसार आम्हाला साडी नेसून जायचे होते. लाल काठाच्या मोत्याच्या रंगाच्या साडीमध्ये तनू फारच सुंदर दिसत होती. आम्ही सायकलवरून नव्हे तर टॅक्सी करून शाळेत गेलो. येताना तनूने माझ्या कानात सांगितले की, ‘‘मी आज माझे नाते कायमचे संपवून टाकले.’’

‘‘पण तू तर संपूर्ण वेळ माझ्यासोबतच होतीस. मग त्याला कधी, कुठे आणि कशी भेटलीस?’’ मी आश्चर्याने एका मागून एक प्रश्न विचारू लागले.

‘‘शांत रहा… जरा हळू बोल.’’ तनूने मला गप्प बसायला सांगितले आणि त्यानंतर म्हणाली, ‘‘टॅक्सीतून उतरून तुम्ही सर्व जणी जेव्हा शाळेत जात होता तेव्हा माझी साडी माझ्याच चपलेत अडकली होती, आठवले का?’’

‘‘हो… हो… तू मागेच राहिली होतीस,’’ मी तो क्षण आठवत म्हणाले.

‘‘तो तेथेच उभा होता, टॅक्सी मागे लपला होता. सुरुवातीला त्याची नजर मला न्याहाळत होती. त्यानंतर त्याने माझा हात धरला आणि माझी परवानगी न घेताच मला मिठीत घेतले. तो माझे चुंबन घेणारच होता, पण त्यापूर्वीच मी त्याच्या एक जोरदार कानाखाली लगावली. पाचही बोटे उमटली असतील गालावर…’’ रागाने लालबुंद होत तनू म्हणाली.

‘‘हे मात्र तू अतीच केलेस… अगं इतका तर हक्क आहेच ना त्याला…’’ मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

‘‘नाही, मुळीच नाही. माझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे,’’ अजूनही तनू रागात होती.

त्यानंतर परीक्षा झाल्या. सुट्टी पडली आणि निकाल लागल्यावर नवीन महाविद्यालयीन जीवन सुरू झाले. तो शाळेवेळी दिसणारा मुलगा काही दिवस आमच्या महाविद्यालयाच्या वाटेवरही घुटमळताना मला दिसला, पण तनूने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यानेही त्याचा रस्ता बदलला.

समजतच नव्हते की, कशी होती तनू? तिला प्रेम तर हवे होते, पण त्यात वासनेचा लवलेशही नको होता. महाविद्यालयीन ३ वर्षांच्या जीवनात तिने ३ मित्र बदलले. प्रत्येक वर्षाला एक नवीन मित्र. मी सतत तिला समजावत होते की, कोणाकडे तरी गांभीर्याने बघ. फुलांवर फुलपाखरासारख्या घिरटया कशाला घालतेस?

‘‘फुलांवर घिरटया घालणे हे फक्त भुंग्याचेच काम आहे का? फुलातील मकरंद चाखण्याचा अधिकार फुलपाखरालाही तितकाच असतो…’’ तनू आवेशात बोलत होती.

तनूमध्ये एक खास वैशिष्टय होते की, जोपर्यंत समोरचा त्याच्या मर्यादांचे पालन करत असे तोपर्यंतच ती ते नाते जपायची. त्याने मर्यादांचे उल्लंघन करताच तो तिच्या नजरेतून उतरायचा. त्या नात्यापासून ती लगेच दूर जायची. ‘‘माझ्या मर्जीने माझे सर्वस्व मी कोणाच्याही हाती सोपवेन, पण माझ्या मर्जीविरोधात मी कोणाला माझा साधा हातही पकडू देणार नाही,’’ असे ती मला अनेकदा सांगायची.

महाविद्यालयीन शिक्षण संपवून आता आम्ही नोकरीला लागलो होतो. सध्या मी माझ्या बॉससोबत फिरते, असे तिने मला सांगितले. त्यावेळी ‘‘आतातरी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने बघ आणि आयुष्याचा जोडीदार निवड,’’ असे मी तळमळीने म्हटले.

‘‘माझ्या साध्याभोळया मैत्रिणी, तू नाही ओळखत या मुलांना. बोट पकडायला दिले तर ते हात पकडतात. गळाभेट घेतली तर थेट बिछान्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मी होकार देऊनही जो स्वत:च्या वासनेवर नियंत्रण ठेवेल, असा मुलगा मला ज्या दिवशी भेटेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन,’’ तनूने सांगितले.

‘‘तर मग कुमारीच रहा, असा मुलगा तुला शोधूनही सापडणार नाही.’’

त्यानंतर काहीच महिन्यात माझे लग्न झाले. तनूनेही जयपूरमधील नोकरी सोडली आणि मुंबईत नोकरीला लागली. त्यानंतर काही दिवस आम्ही एकमेकींच्या संपर्कात होतो, पण हळूहळू मी संसार, मुलांमध्ये एवढी व्यस्त झाली की तनू माझ्या हृदयाच्या कप्प्यात आठवण बनून राहिली.

आज आशिकी चित्रपटातील गाणे लागताच तनूची प्रकर्षाने आठवण झाली. तिच्याशी बोलावेसे वाटू लागले. ‘तिला तिच्या मनासारखा साजन मिळाला असेल का…,’ असा विचार करीत मी जुन्या डायरीतून तिचा नंबर शोधून लावला, पण तो बंद होता.

‘काय करू? एवढया मोठया जगात तनूला कुठे शोधू?’ असा विचार मनात घोळत असतानाच मला एक कल्पना सुचली आणि मी लॅपटॉपवर फेसबूक सुरू केले. सर्चमध्ये ‘तनू’ असे लिहिताच तनू नावाचे कितीतरी आयडी समोर आले. त्या फोटोंमधील एकीचा चेहरा ओळखीचा वाटला, ती माझीच तनू होती. मी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

२ दिवस काहीच उत्तर मिळाले नाही, पण तिसऱ्या दिवशी इनबॉक्समध्ये तिचा मेसेज पाहून मला आनंद झाला. तिने तिचा मोबाईल नंबर दिला होता व रात्री ८ वाजायच्या आधी फोन करायला सांगितले होते. सुमारे ७ वाजता मी फोन केला. तीही कदाचित माझ्याच फोनची वाट पाहात होती.

फोन घेताच नेहमीच्याच बिनधास्त शैलीत तिने विचारले, ‘‘प्रिय मैत्रिणी, कशी आहेस? आज अचानक माझी आठवण कशी झाली? मुले आणि भाओजींमधून वेळ मिळाला का?’’

‘‘अगं बाई, एकत्र एवढे सर्व प्रश्न? जरासा श्वास तरी घे,’’ मी हसतच म्हणाले. त्यानंतर तिला त्या गाण्याची आठवण करून दिली जे ती अनेकदा गुणगुणत असे.

माझे बोलणे ऐकून तनू मोठयाने हसली आणि म्हणाली, ‘‘काय करू मैत्रिणी, मी अशीच आहे. प्रेमवेडया साजनाशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘अजून तोच प्रकार सुरू आहे का? तुला हवा तसा साजन भेटला नाही का?’’ मी आश्चर्याने विचारले.

‘‘अगं, तुला मी सांगितले नाही का? मी राजीवशी लग्न केले.’’ तनूने नवे गुपित सांगितले होते.

‘‘आपण भेटलोच नाही, मग तू मला कधी सांगणार होतीस? पण मी खूप खुश आहे. अखेर माझ्या मेनकेला विश्वामित्र मिळालाच.’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘हो, २ वर्षे आम्ही छान फिरून घेतले. मी त्याला पारखण्याचा बराच प्रयत्न केला. प्रसंगी माझ्या मर्यादांची सीमा लांघून त्याला माझ्या शरीराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. हा नक्की पुरुष आहे ना? असा संशयही मला आला. एखादी मुलगी स्वत:हून इतका पुढाकार घेत असताना तो मात्र ब्रह्मचारी असल्यासारखा वागत होता.’’ तनूच्या बोलण्याची गाडी वेगाने धावू लागली होती. माझीही उत्सुकता वाढली होती.

‘‘हो का? पुढे काय झाले?’’ मी विचारले.

‘‘बहुतेक राजीव आला असे वाटतेय, उरलेल्या गप्पा उद्या,’’ असे म्हणत माझी उत्सुकता तशीच ताणून ठेवून तिने फोन बंद केला.

‘‘अरे वा, हा फारच छान निर्णय आहे तुमचा. माफीचे राहू दे. पुढे काय झाले ते सांग.’’ मी तिला आठवण करून दिली.

पुढे काय घडले सांगताना तनू म्हणाली, ‘‘राजीव माझ्यावर खूप प्रेम असल्याचे सतत सांगायचा, मात्र जेव्हा मी त्याच्या जवळ जात असे तेव्हा स्पष्टपणे सांगायचा की, आपली मैत्री असली तरी शारीरिक संबंध मात्र लग्नानंतरच ठेवणे योग्य आहे. असे संबंध ठेवणे म्हणजे भावी पत्नीचा विश्वासघात करण्यासारखे आहे, असे त्याचे मत होते,’’ तनूने सांगितले.

‘‘खूपच छान. तू तर असाच जोडीदार शोधत होतीस,’’ मी आनंदाने म्हटले.

‘‘हो. त्यानंतर आम्ही लग्न केले.’’

‘‘म्हणजे शेवट गोड झाला,’’ मी खूपच खुश होत म्हटले.

‘‘नाही, खरी कथा तर त्यानंतर सुरू झाली,’’ तनू काहीशी अडखळत म्हणाली.

‘‘आता काय झाले? राजीव खरंच पुरुष नाही का?’’ माझ्या मनाला उगाचच भीती वाटली.

‘‘तो पक्का पुरुष होता.’’ तनूने सांगितले.

‘‘म्हणजे काय?’’ मला काहीच समजेनासे झाले होते.

‘झाले असे की, लग्नाला वर्ष होत नाही तोच मला अस्वस्थ वाटू लागले होते. सवयीनुसार कोणाच्या तरी प्रेमासाठी माझे मन व्याकूळ झाले होते. विवेक आमच्या सोसायटीत नवीन आला होता. माझे मन त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. सर्वांची काळजी घेण्याचा त्याचा स्वभाव मला आवडू लागला होता. ही गोष्ट एका पतीला आणि त्यातही राजीवसारख्या पतीला कशी काय मान्य झाली असती?’’ तनूने सांगितले.

‘‘पण का? राजीवच्या प्रेमात काही कमी होती का?’’ मी काळजीने विचारले.

‘‘अगं मैत्रिणी, समजून घे. जेव्हा आपण मित्राला पती बनवतो तेव्हा एक चांगला मित्र गमावून बसतो. खूप गोष्टी अशा असतात ज्या आपण पतीला नाही तर फक्त मित्राला सांगू शकतो. माझ्यासोबही असेच घडले. ही मुले लग्नानंतर एवढी भावूक का होतात, हेच मला समजत नाही,’’ तनू आपले मन माझ्याकडे मोकळे करत होती.

‘‘बरं, मग पुढे काय झाले?’’ मी सवयीनुसार कुतूहलाने विचारले.

‘‘काय होणार होते? आमच्या नात्यात दुरावा वाढू लागला. मी विवेकचे नाव घेताच राजीवच्या चेहऱ्यावरील रंग उडून जायचा. माझे विवेकला भेटणे, हसणे, बोलणे त्याला अजिबात आवडत नव्हते. लग्नानंतर पर पुरुषाशी मैत्री करणे म्हणजे चरित्रहीनता, असे त्याचे मत होते. पण मीही माझ्या मनाला समजावू शकत नव्हते. प्रेमाशिवाय मी राहू शकत नव्हते.’’

‘‘पुढे काय झाले?’’

‘‘काय होणार? एके दिवशी मी राजीवचा हात माझ्या हातात घेऊन त्याला विचारले की, अगदी खरं सांग. जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तुला माझ्या चारित्र्याबद्दल काय वाटायचे? त्याने सांगितले की, माझ्यासारखी ठाम मते असलेली मुलगी त्याने पाहिली नव्हती आणि माझ्या याच स्वभावाच्या तो प्रेमात पडला. मी त्याला समजावले की, जर लग्नाआधी अनेक मुलांसोबत मैत्री करूनही मी माझे कौमार्य अबाधित ठेवले तर मग तो असा विचार करूच कसा शकतो की, माझ्या मैत्रीत पवित्र भावना असणार नाही.’’

‘‘ज्या दिवशी माझ्या एखाद्या मित्राचा हात माझ्या खांद्यावरून पुढे सरकत जाईल त्याच क्षणी मी त्याचा हात झटकून टाकेन. माझ्या शरीरावर आणि मनावर फक्त तुझाच अधिकार आहे, असा विश्वास मी राजीवला दिला. जिवाभावाचा मित्र असल्याशिवाय मी आयुष्यात खुश राहूच शकत नाही, हे त्याला समजावून सांगितले.’’ तनूने सांगितले.

‘‘पुढे?’’

‘‘राजीवच्या हे लक्षात आले की, मी मित्राशिवाय आनंदी राहू शकत नाही आणि जर मी आनंदी नसेन तर त्याला आनंदात कसे ठेवू शकेन?’’ तनू म्हणाली.

‘‘बरं झालं,’’ मी आनंदाने म्हणाले.

‘‘त्यानंतर त्याने मला विवेकशी मैत्री करण्यापासून रोखले नाही. मीही त्याला वचन दिले की, जेव्हा तो माझ्या सोबत असेल तेव्हा त्या वेळेवर फक्त त्याचा हक्क असेल.’’ तनूने तिचे बोलणे पूर्ण केले.

यापुढेही संपर्कात राहू, असे ठरवून आम्ही फोनवरील संभाषण थांबवले. तनूने फोन ठेवला होता, पण मी अजूनही माझा मोबाईल कानाला तसाच लावून विचार करीत होती की, खरंच खूप धीट आहे तनू. तिच्या म्हणण्यात तथ्य आहे. आयुष्यात असा एखादा जिवाभावाचा मित्र असायलाच हवा जो आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करेल. त्यात वासना नसेल. आपल्यातील सर्व वाईट गोष्टींसह आपला स्वीकार करेल. ज्या गोष्टी पतीला सांगणे शक्य नाही त्या सर्व बऱ्या-वाईट गोष्टी आपण त्याला सहजपणे सांगू. अगदी पतीबाबत असलेली गुपितेही.

आपण बायका आयुष्यभर आपल्या पतीमध्ये मित्र शोधत असतो, पण पती हा पतीच असतो तो मित्र बनू शकत नाही.

जाणीव

कथा * सोनाली बढे

सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला, तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली अन् मनात काहीतरी खळ्ळकन् फुटलं. आज नऊ जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज एक वर्ष पूर्ण झालं होतं.

जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला एक वर्ष झालं. जुई त्याची पत्नी. म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायेदशीर दृष्टीनं ती दोघं पतीपत्नी होती. पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईनंदेखील कायेदशीर घटस्फोट घेतला नव्हता.

मनात घोंघावणाऱ्या वादळानं आता राघव पार अवस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप अन् मोबाइल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. काम करणाऱ्या शांती मोलकरणीला ‘एक कप कॉफी कर’ असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकीट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात ‘राघव’ असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं.

‘‘राघव या कोऱ्या कागदांवर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापताहेत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीए. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटतं. काल मला पुन्हा तेच भीतिदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्यातरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते अन् बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत, खुनशी हास्य उमटतं.

बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला, किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजातच मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतिदायक…चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर दोन शिंग, तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा ‘तू तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्नं मला पुन्हा:पुन्हा पडत होतं.

आता विचार करते तेव्हा लक्षात येतं की किती छोटीशी गोष्ट होती. माझं वजन एकदम वाढलं होतं. खरंतर मनातली असुरक्षितपणाच्या भावनेनंच मला थायराइडचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. वरवर बघता गोष्ट साधी होती. आईसबर्गवरवर बघताना केवढासा दिसतो. त्याचा पाण्याखालचा भाग मात्र खूपच मोठा अन् अदृश्य असतो. म्हणूनच मोठाली जहाजं त्याच्यावर आपटून फुटतात. त्या न दिसणाऱ्या कामासारखंच माझं झालं होतं. मनातही भीती, आधाराचा अभाव यामुळे मी सैरभैर असायची.

वाचतावाचता राघवचे डोळे भरून आले. त्याला आठवलं, तो हल्ली किती संतापी झाला होता. बारीक सारीक गोष्टींवरून संतापायचा. सगळा राग जुईवर काढायचा, हेच त्याचं रूटीन झालं होतं. सुरूवातीला असं नव्हतं. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखी होतं. हळूहळू कामाचा त्याग, नोकरीतली जीवघेणी स्पर्धा यामुळे तो खूप बदलला, सगळं फ्रस्टे्रशन मग जुईवर काढायचा.

खरंतर पुढे वाचायचं धाडस होत नव्हतं राघवला. पण ते वाचायलाच हवं, तिच त्याची शिक्षा होती. त्यानं वाचायला सुरूवात केली.

‘‘आठ महिन्यांपूर्वी केलेल्या ब्लडटेस्टमध्ये मला हायपोथायरॉईडिझम आहे हे लक्षात आलं. त्यामुळे वजन एकदम वाढतं. त्यात माझा काय दोष होता?’’

‘‘जाडी, ढप्पी, म्हैस कुठली…’’ तू ओरडायचा, ‘‘लठ्ठ, मठ्ठ, जाडी’’, ‘‘कुरूप, बेढब, बोदी’’ तू मला हेच सतत ऐकवायचास…कदाचित अगदी पहिल्यापासूनच मी तुला आवडत नसेन. वाढलेलं वजन हे एक कारण किंवा निमित्त मिळालं होतं तुला. लोकांना माझा हसरा चेहरा आणि खळखळून हसणं आवडायचं. पण तुला तेही नकोसं वाटायचं. खरंय, एखादं माणूस आवडेनासं झालं की त्याचं काहीच मग आपल्याला आवडत नाही. आपल्याला त्याचा रागच राग येतो.

‘‘जर तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर माझ्या वाढलेल्या वजनामुळे तू असा तिरस्कार केला नसता. किमान तू संवेदनशील असावं असं मला वाटायचं. पण तू तर सतत मला टोमणे मारायचास, शोधून शोधून, उकरून उकरून माझे दोष काढायचास. लोकांपुढे माझा अपमान करायचास, माझ्या किती तरी सवयी मी तुझ्यासाठी बदलल्या .पण तू तर अजिबात बदलला नाहीस. दारू पिणं, सिगारेट ओढणं, उशिरापर्यंत दिवा लावून काम करत बसणं, मित्र जमवून पत्ते कुटत बसणं, यातलं काय सोडलंस तू? मी मात्र तुझी प्रत्येक आवडनिवड जपली. तुला जे आवडतं, तेच मी करत होते. तुला आवडणारं शिजवत होते, तुला आवडणारे खात होते, तुला आवडणारेच कपडे, रंग वापरत होते, तुला आवडेल तेच बोलत होते, तेवढेच ऐकत होते. मला माझं अस्तित्त्वच उरलं नव्हतं. मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वत:चं असं काही उरलंच नव्हतं. माझी स्वत:ची ओळखच उरली नव्हती.’’

राघवच्या डोक्यात जणू कुणी घणाचा घाव घातला होता. पण ते दु:ख आज तो सहन करणार होता. जुईला त्याच्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या दु:खाचा तेवढाच एक उतारा होता. जुईचं हरवलेलं अस्तित्त्व पुन्हा मिळवून द्यायला हवं. तो पुढे वाचू लागला.

‘‘तू घातलेले पसारे मी आवरायची, तुझे मळवून आणलेले कपडे मी धुवायची, केर काढायची, लादी पुसायची, बाथरूम-टॉयलेट स्वच्छ करायची, स्वयंपाक मी करायची, बाजारहाट, निवडणं, चिरणं, भाजणं सगळं सगळं मी करत होते. तू फक्त ऑफिसात जाऊन यायचा की, ‘दमलो’ म्हणून सोफ्यावर बसायचा, आवडीचे टीव्ही प्रोग्रॉम बघायचास, एक ग्लास पाणी कधी हातानं घेऊन प्यायला नाहीस, इतर कामाचं काय सांगायचं? पण तू थकत होतास अन् मी मात्र तुला ताजी, टवटवीत हवी असायची. तक्रारी फक्त तूच करणार, टोमणे फक्त तूच देणार कारण वाईट मी होते. दोष माझ्यात होते.

‘‘तू तर जणू देवदूत होतास. तुझ्यात फक्त गुण होते. माझ्या अपेक्षा काही फार नव्हत्या. बायकोला नवऱ्याकडून थोडं कौतुक, थोडं प्रेम हवं असतं, तेवढंही तू मला देत नव्हतास. घरकामात मदत कुठून करणार होतास? मुळात मी तुला आवडतच नव्हते. मी फक्त काम करणारं मशीन होते अन् रात्री तुला सुखवणारी दासी.

‘‘अंथरूण अन् स्वयंपाकघर या पलीकडेसुद्धा एक स्त्री असते, ही तुझ्या समजूतीपलीकडची गोष्ट होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वजनामुळे मी त्रस्त असतानाही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुला खटकत होतं, सहन होत नव्हतं. तू किती चिडायचास? का? मला येणारा थकवा, मानसिक ताण दूर करण्यासाठी मी हसत होते तर चिडत का होतास तू? तुझ्या संगतीतले ते त्रस्त दिवस अन् झोपेवाचून घालवलेल्या असंख्य रात्रीचं काय? तुला वाटायचं, मी आपल्या वजनामुळे लज्जित व्हावं, का म्हणून? माझा दोष थोडीच होता तो? लज्जित तू व्हायला हवंय. तुझ्यामुळे मला त्रास झालाय.

‘‘राघव, तुला ठाऊक आहे, तुला टक्कल पडायला लागलंय. तुझ्या चेहऱ्यावर एक ओंगळ मसा आलाय, पण मी तर कधीही म्हटलं नाही की त्यामुळे तू वाईट दिसतोस? खरं तर माझं वाढलेलं वजन हे एक निमित्त मिळालं होतं तुला. तुझा राग काढायला, माझा अपमान करायला ते एक निमित्त होतं. आता माझा थायरॉइड आटोक्यात आलाय. नियमित औषधोपचार, व्यायाम, प्राणायम करून मी आता वजन बऱ्यापैकी कमी केलंय. तरीही तू कधी एका शब्दानं मला म्हटलं नाहीस, मी खूप आशेनं तुझ्याकडे बघायची, माझ्यात झालेला बदल तुला जाणवतोय का हे मला बघायचं होतं. पण नाही…राघव, घृणेचा, तिरस्काराचा वटवृक्ष वाढतो, पसरतो तशी याची मुळंही खोलवर जातात. मलाच स्वत:चं नवल वाटतं की इतकी वर्षं मी का अन् कशी काढली तुझ्याबरोबर? सतत स्वत:चं मन मारायचं, इच्छा मारायच्या, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व, स्वत:ची ओळखही विसरायची…सोपं नव्हतं!

‘‘पण आता बस्स झालं! खूप झालं! तुझ्याकडून मार खाणं, तुझ्याकडून घाणेरडं बोलणं ऐकणं, स्वत:चा अपमान सहन करणं आता मला मान्य नाही. माझा रोग शारीरिक होता. पण तू मानसिक रूग्ण आहेस. तुझ्यासारख्या मनाच्या रोग्याबरोबर राहून मला रोगी व्हायचं नाहीए. हा जन्म एकदाच लाभतो. हे आयुष्य भरभरून जगायचंय मला. मी आज स्वत:ला तुझ्या बंधनातून मुक्त करते आहे. मला मोकळ्या मनानं जगायला आवडतं, खळखळून हसायला, प्रसन्न चेहऱ्याने वावरायला आवडतं. माझ्या वाढलेल्या वजनासकट ज्यांनी मला प्रेमानं स्वाकीरलं, ती माणसं मला आवडतात. माझ्याशी प्रेमाने बोलणारी, मला सन्मानानं वागवणारी माणसं मला आवडतात. पण तू त्यातला नाहीस. प्रेम कधी केलंच नाहीस माझ्यावर.

थरथरणाऱ्या हातात ते पत्रही थरथरत होतं. राघव सुन्न बसून होता. या एक वर्षांनं त्याला खूप काही शिकवलं होतं. बायको फक्त शोपीस नसते. ती आयुष्यातली मौल्यवान मिळकत असते. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. या वर्षभरात अनेक मुली त्याच्या आयुष्यात आल्या. कुणाला त्याचा भरपूर पगार दिसत होता तर कुणाला उच्च पद, पण प्रत्येकीनं स्वत:चे नखरे दाखवले. एकदा सॅली डिसुझाबरोबर जेवण घेत असताना त्याचा फोन वाजला. तो पाचच मिनिटे फोनवर बोलत होता, तेवढ्यात संतापून ती जेवण टाकून निघून गेली. जुईनं कधीच असा त्रागा केला नव्हता. एकदा रात्री झोपायला पिंकी ग्रेवाल त्याच्यासोबत हॉटेलात गेली अन् त्याच्या सिगरेटच्या वासानं भडकून तिथं एकटाच सोडून निघून गेली. जुईनं तक्रारीचा चकार शब्द कधी काढला नव्हता. कधीही घरात, अंथरूणात किंवा एरवीही तिच्या काहीच मागण्या नव्हत्या.

गेल्या वर्षभरात बरेचदा त्यानं ठरवलं होतं की जुईला फोन करूयात. आपल्या वागणुकीबद्दल क्षमा मागूयात…पण ते जमलं नव्हतं. पण आता मात्र तो अजिबात थांबणार नाहीए. तो आत्ताच तिच्याकडे जाणार आहे अन् तिची क्षमा मागणार आहे. तिच्या मोठेपणाची त्याला जाणीव आहे. तिच्या कष्टांची त्याला जाणीव आहे. तिनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. तो तिच्या ऋणात आहे. एवढंच नाही तर तो हे ही सांगणार आहे की तिचं हसणं त्याला खूप आवडतं. तिच्या हायपोथायरॉइडची तो काळजी घेईल. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. ती जशी आहे, तशीच त्याला खूप खूप आवडते.

हेच सत्य आहे

कथा * मोनिका अत्रे

‘‘कुठं होतीस तू? केव्हापासून फोन करतोय मी. माहेरी गेली की वेडीच होतेस तू…’’ खूप वेळानं मोनीनं फोन उचलला तेव्हा सुमीत रागावून म्हणाला.

‘‘अहो…तो मोबाइल कुठं तरी असतो अन् मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. अन् सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला…बरं, ते जाऊ देत. फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काय विशेष?’’ मोनीनं त्याच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं.

‘‘म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही? तुझी अन् मुलांची चौकशी नाही करू शकत? तेवढाही हक्क नाहीए मला? बरोबर आहे आता त्यांच्यावर आजीआजोबा, मामामामींचा हक्क आहे ना?’’ मोनीवर भडकलाच सुमीत. त्याला वाटलं होतं की मोनी त्याच्या रागावण्यावर सॉरी म्हणेल, प्रेमानं बोलेल…

इकडे मोनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वांतत्र्य हवं असायचं. ‘‘तुम्ही भांडायला फोन केला आहे का? तसं असेल तर मला बोलायचंच नाहीए. एक तर इथं इतकी माणसं आहेत. काय काय चाललंय, त्यातच मनीषाला जरा…’’ बोलता बोलता तिनं जीभ चावली.

‘‘काय झालंय मनीषाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीणभावंडात रमली असशील…तिला बरं नाहीए तर तुमचं परतीचं तिकिट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाहीए अन् तू इकडे तिकडे भटकतेस? बेजबाबदारपणाचा कळस आहेस. इतकं दुर्लक्ष?’’ साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. सुमीतनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘अहो, थोडं अंग तापलंय तिचं…पण आता ती बरी आहे अन् हे बघा, मला धमकी देऊ नका. दहा दिवसांसाठी आलेय, तर पूर्ण दहा दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे, माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो, तेव्हा तिथं बारा-बारा तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीत असते, तुमच्या तालावर नाचते तेव्हा नाही काही वाटत. पण दहा दिवस माहेरी आले तर लगेत तमाशे सुरू करता….’’ मोनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं. पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं.

‘‘अस्सं? मी तमाशे करतो.? पारच जोर चढतो तुला तिथं गेल्यावर. आता तिथंच राहा, इथं परत यायची गरज नाहीए. दहा दिवस काय आता वर्षभर राहा. खबरदार इथं परत आलीस तर…’’ संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला.

मोनीनंही मोबाइल आदळला अन् सोफ्यावर बसून ती रडायला लागली. तिची आई तिथंच बसली होती. सगळं ऐकलं होतं. तिनं म्हटलं, ‘‘अगं बाळी, तो कसं काय चाललंय हे विचारायला फोन करत होता, उशीरा फोन उचलल्यामुळे रागावला होता, तर तू अशावेळी सबुरीनं घ्यायचंस…सॉरी म्हणायचं मग तो ही निवळला असता…जाऊ दे. आता रडूं नकोस. उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल…’’

मोनीला आणखीनच रडायला आलं. ‘‘आई, अगं फक्त दहा दिवसांसाठी माहेरी पाठवतात. इथं मी आनंदात असते. ते बघवत नाही त्यांना, नवरे असे का गं असतात? खंरतर त्यांना आमची खूप आठवण येतेय, मी नसल्यानं त्यांना त्रासही होतोय. पण अशावेळी प्रेमानं बोलायचं मोकळ्या मनानं कबूल करायचं, तर ते राहिलं बाजूला, आमच्यावरच संतापायचं, ओरडायचं…माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वैर धरायचं, त्यांना नावं ठेवायची… ही काय पद्धत झाली?’’

‘‘अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटत असतो. बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपला तिच्यावरचा हक्क कमी झालाय. त्यामुळे मनातल्या मनात संतापतात, कुढतात अन् बायकोनं जरा काही शब्द वावगा उच्चारला तर त्याचा अहंकार लगेच फणा काढतो अन् मग उगीचच भांडण होतं. तुझे बाबापण असंच करायचे.’’ मोनीला जवळ घेऊन थोपटत आईनं म्हटलं.

‘‘पण आई, स्त्रीला असं दोन भागात का वाटतात हे पुरूष? मी सासरची आहे अन् माहेरचीही आहे. माहेरी आले तर लगेच सासरची, तिथल्या माणसांची उपेक्षा केली असं थोडंच असतं? ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावी लागतात?’’ मोनी हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजालाच विचारत होती जणू.

आईनं तिला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ‘‘अगं, पुरूषाचा अहंकार अन् त्याचं सासर म्हणजे बायकोचं माहेर यात छत्तीसचा आकडा असतो. मोनी, बाळे, पुरूष असेच असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. काही जन्मजात काही पुरूषी समाजानं जोपासलेला. स्त्रीला दोन भागात वाटायचं हेच काम असतं. एक भाग माहेराचा, एक भाग सासरचा. जसे दोन अर्धगोल एकत्र आल्यावर एक पूर्ण गोल होतो तसेच हे दोन अर्धगोल एकत्र आले की स्त्रीही पूर्ण होते.’’

‘‘दोन अर्धगोल…एक पूर्ण गोल…पूर्णत्त्व…’’ मोनी गप्प बसून सर्व ऐकत होती. काही तिला कळत होतं. काही तिला कळून घ्यायचं नव्हतं. फक्त आहे हे सत्य आहे, हेच तिला जाणवलं होतं.

वारसा

कथा * पल्लवी पुंडे

अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. म्हणजे मी टेलिव्हिजनवरच्या क्रिमिनल आणि अध्यात्मिक कार्यक्रमांनी भारावून गेलोय म्हणून असं म्हणतोय असं समजू नका. मी रोज धर्मग्रंथ वाचतो असंही समजू नका. मी कुणा बुवा बांबांचा भक्तही नाही अन् पश्चात्तापाचं महत्त्व मला कळलंय असंही नाही.

सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री, तिच्या रमण नामक सहकाऱ्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे, हे माझ्या काळजीचं कारण आहे. राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सीनिअर मॅनेजर आहे. राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढतेय हे मला खटकत होतं. खरंतर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यू जर्सीला यू.एस.ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं, जो निर्णय घ्यायचा होता, तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता.

मुजफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिऱ्हाड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम दोनच वर्षं काढणार होतो. त्यामुळे बिऱ्हाड मांडायचा विचार नव्हता.

बँकेला जवळ असं एक छोटसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरूण स्त्री आणि तिची दोन मुलं, बहुधा जुळी असावीत. तिसरी-चौथीत शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवरा ही बँकेतच होता. काही वर्षांपूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती, पण आता तिनं इथं स्वतंत्र बिऱ्हाड केलं होतं.

‘‘विनय सर, सांभाळून रहा हं! बाई एकदम चालू आहे.’’ रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता.

सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला आहे. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरूण देखणी स्त्री असते, तेव्हा तर आम्ही पुरूष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो.

मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो, तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यांवर बसून होती.

‘‘तुम्ही इथं का बसला आहात?’’ मी विचारलं. ‘‘सर, काय झालं…म्हणजे, माझी किल्ली हरवलीए. मुलं येतीलच आता…त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघतेय त्यांची.’’ ती कशीबशी बोलली.

‘‘तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या.’’

‘‘अं?’’

‘‘म्हणजे, माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो.’’

‘‘मी इथंच थांबते…तुम्ही किल्लीचं बघा.’’

‘‘ठिक आहे.’’

थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं अन् मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. दहा मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार अन् गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली.

माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन् मजेमजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून.

बँकेत दोन दिवसांचा स्ट्राइक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती.

दारात उभं राहून मी विचारलं, ‘‘आत येऊ शकतो का?’’

‘‘विनय सर? तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली?’’

आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाटतेय. तिनं मागचं आवरलं, मग आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो. रचनाला मी विचारलं, ‘‘बरं नाहीए का?’’

‘‘डोकं दुखतंय सकाळपासून.’’ ती उत्तरली.

मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो अन् हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलांवरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. काही तरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले अन् मी ते माझ्या ओठांनी बंद केले.

त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता, उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती.

‘‘डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे.’’ मी तिच्या कानांत हळूवार बोललो.

किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, ‘‘रागावली नाहीस ना माझ्यावर?’’

‘‘मला स्वत:चाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात…असं घडायला नको होतं.’’

‘‘रचना, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसंबसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे.’’

‘‘पण, लग्न ते लग्नच ना?’’

‘‘रचना, सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवराबायकोत सेक्स घडतोच. पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चात्ताप होतोय का?’’

‘‘विनय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चात्ताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं. मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरूष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मीच जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना…त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलंत. माणूस म्हणून वागवलंत…अन् मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला. पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे.’’

त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. अधूनमधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं.

अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ, खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता दोन वर्षं झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रचना आमच्या संबंधांना काही तरी नाव, नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती. अन् मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो.

रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझा कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार अन् माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं.

‘‘तुम्ही दिल्लीला जाताय?’’

मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच.

‘‘हो…जावं लागणारच ना?’’

‘‘मला सांगावं असंही वाटलं नाही?’’

‘‘हे बघ रचना, हे नातं आता आपण संपवूयात.’’

‘‘पण तुम्ही तर माद्ब्रयावर प्रेम करत होता?’’

‘‘हो, करत होतो, आता नाही करत?’’

‘‘आता नाही करत?’’

‘‘तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानात आहे.’’

‘‘पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझायाशी लग्न करणार होता…मग? आता काय झालं?’’

‘‘वेडी आहेस तू? दोन दोन बायका कशा करणार मी? अन् शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार?’’

‘‘पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ?’’

‘‘उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाहीए. जे घडत होतं, ते तुझ्या इच्छेनंच घडत होतं.’’

‘‘ठिक आहे. तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं, यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाहीए तुमच्यात. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात, त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी?’’

‘‘तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस.’’

‘‘केवढा दांभिकपणा! मला वापरून घेतलंत अन् आता चक्क फेकून देताहात?’’

‘‘हो, हो! वापरलं तुला. काय करून घेशील? अन् तुला ही सुख मिळालंच ना? पुरेपूर पैसे दिलेत मी. किती खर्च केलाय ते विसरलीस का?’’

मी खरंतर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रचनानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो. चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो.

‘‘तुम्ही अन् तुमच्यासारख्या पुरूषांनी असहाय, एकटया स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वत:चीच लाज वाटतेय, इतक्या हीन, हलकट माणासावर मी प्रेम केलं…देह अन् मन समर्पित केलं.’’

‘‘रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली. ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा अन् तिच्या माहरेची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली. मी अक्षरश: रडून रडून शोभाची क्षमा मागितली.

‘‘मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना, माझे एखाद्या पुरूषाशी असे संबंध झाले असते अन् मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती?’’

मी काही बोलूच शकलो नाही.

‘‘उत्तर द्या विनय, गप्प बसू नका,’’ शोभा म्हणाली.

‘‘न…नाही…बहुधा.’’

‘‘बहुधा…अं? तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरूष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली, व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच, मला रचनाचा राग येत नाहीए, तिरस्कार वाटत नाहीए, मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येतेय. तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येतेय अन् तिनं दांभिक पुरूषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय.’’

मी घायकुतीला आलो, ‘‘तू मला क्षमा करणार नाहीस.’’

‘‘मी तिच्यासारखी धाडसी नाहीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे. एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल.’’

सगळ्या आळीतले लोक रचनालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्वगुण संपन्न असण्यावर जळणाऱ्या बायका अन् ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरूष अशावेळी मागे कसे राहणार? एकटी, देखणी विधवा स्त्री…तिला कोण आधार देणार?

रचना कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती अन् सामाजिक पाठिंबा होता.

रचनाला कुणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती.

‘‘माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्याभाबड्या जिवाचा विश्वासघात करू नका, मुलांनाही करू देऊ नका.’’

ती निघून गेली…मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अन् शोभात जो दुरावा निर्माण झाला होता, तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरूषाला चारित्र्यहिन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वत:ला कुठं क्षमा करू शकलो होतो? अन् रचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो?

मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू याक्षणी माझ्यापुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या.

मी ताडकन् उठलो…नाही, राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही? मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो, माझा मुलगी आहे ती, माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन. त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. राशीलाच सांगून काम भागेल.

मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथच थबकलो अन् आडूनच ऐकू लागलो.

‘‘तुझ्यात अन् रमण सरांमध्ये काय चाललंय?’’

‘‘या वयात जे चाललं तेच!’’ जोरात हसून राशीनं म्हटलं.

‘‘तुला ठाऊक आहे ना. ते विवाहित आहेत.’’

‘‘ठाऊक आहे मला.’’

‘‘तरीही तू?’’

‘‘राशी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय, जो माणूस स्वत:च्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही…तुला केव्हाही डच्चू देतील ते…’’

खदाखदा हसली राशी. ‘‘पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरूषांना.’’ दंभ होता तिच्या बोलण्यात.

‘‘अरे, आता तो कोंबडा स्वत: मरायला तयार आहे. तर त्यात माझी काय चूक? अं? त्याला बावळ्याला वाटतंय, मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाहीए की मी त्याचा वापर करते आहे. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे. ज्या दिवशी तो मी अन् माझा स्वप्नं, माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल, त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियानांच न्याय मिळतो.’’

माझ्या छातीत जोरदार कळ उठली अन् मी खाली कोसळलो. माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते. ‘‘तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका…’’

पण वारसा मुलांना मिळाला होता…

थांब शबनम

कथा * गरिमा पंकज

आज शबनम अजूनपर्यंत रुग्णालयात आली नव्हती. २ वाजत आले होते. इतर दिवशी तर ती १० वाजताच येत असे. कधी सुट्टीही घेत नसे. मला तिची काळजी वाटू लागली होती.

जेव्हापासून कोरोनाचे संकट गडद होऊ लागले होते तेव्हापासून ती माझ्यासोबत जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत होती. मी डॉक्टर आहे आणि ती नर्स. पण तिला वैद्यकीय क्षेत्राची इतकी माहिती झाली आहे की, कधी मी नसलो तरीही ती माझ्या रुग्णांना चांगल्या प्रकारे आणि अगदी सहजपणे सांभाळते.

मी आज मात्र माझ्या रुग्णांना एकटेच सांभाळत होतो. रुग्णालयातील दुसरी एक नर्स स्नेहा माझ्या मदतीसाठी आली तेव्हा मी तिलाच विचारले, ‘‘काय झाले, आज शबनम आली नाही. ठीक तर आहे ना ती?’’

‘‘हो, ठीक आहे. पण काल संध्याकाळी घरी जाताना सांगत होती की, काही शेजारी तिला त्रास देऊ लागले आहेत. ती मुस्लीम आहे ना? आता तिच्या जातीतील कोरोना रुग्ण जसे वाढू लागले आहेत तसे सोसायटीतील कट्टरपंथी तिलाच दोषी मानत आहेत. तिला सोसायटीतून हाकलून देण्याची मागणी करीत आहेत आणि गद्दार असे संबोधून तिच्याकडे तिरस्काराने पाहत आहेत. बिचारी एकटीच राहते. त्यामुळे ते लोक तिला अधिकच त्रास देत आहेत. मला वाटते की, म्हणूनच ती आली नसेल.’’

‘‘कसे जग आहे? धर्म किंवा जातीच्या आधारावर एखाद्याची पारख करणे चुकीचे आहे. एक नर्स अहोरात्र लोकांची सेवा करीत आहे. तिच्यावरच इतका घाणेरडा आरोप…?’’ मला प्रचंड राग आला होता.

स्नेहालाही शबनमची काळजी वाटत होती. ‘‘सर, तुम्ही बरोबर बोलत आहात. शबनमने आपले जीवन रुग्णसेवेसाठी अर्पण केले आहे. रुग्ण हिंदू आहे की मुस्लीम, असा विचार तिने कधीच केला नाही. असे असताना लोक मात्र तिच्या धर्माकडे का पाहत आहेत? देशाचे विभाजन करू पाहणारे कट्टरपंथीच अशा चुकीच्या विचारांना हवा देत आहेत.’’

तितक्यात माझा मोबाईल वाजला. शबनमचा फोन होता. ‘‘हॅलो शबनम, तू ठीक आहेस ना?’’ मी काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘नाही सर, मी ठीक नाही. सोसायटीतील काही लोकांनी माझ्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लादले आहेत. एक प्रकारे मला नजर कैदेत ठेवले आहे. त्यातच दुपारी मी बाथरूममध्ये पडले. आता तर मला हेही समजत नाही की औषध आणायला कशी जाऊ?’’

‘‘तू घाबरू नकोस. १-२ तास आराम कर. मी स्वत: तुझ्यासाठी बँडेज आणि औषधांची सोय करतो,’’ असे सांगून मी फोन ठेवला.

आता मला शबनमसाठीची माझी जबाबदारी पार पाडायची होती. तिने आतापर्यंत नेहमीच मला साथ दिली आहे. माणुसकीच्या नात्यातून आता माझा धर्म आहे की, मला तिची साथ द्यायला हवी.’’

५ वाजल्यानंतर रुग्णांना तपासून झाल्यावर मी प्रथमोपचार पेटी, आवश्यक औषधे आणि काही फळे तसेच भाज्या घेऊन तिच्या घरी गेलो. तिच्या सोसायटीच्या बाहेर पोलीस तैनात होते. मी डॉक्टर असूनही बरीच चौकशी तसेच माझी कसून तपासणी केल्यानंतरच मला आत पाठवण्यात आले. शबनमचे घर दुसऱ्या माळयावर होते. मी तिच्या दरवाजावरची घंटी वाजवताच लंगडत बाहेर येत तिने दरवाजा उघडला. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

‘‘डॉक्टर अविनाश, तुम्ही स्वत: आलात?’’

‘‘हो शबनम, दाखव कुठे लागले आहे तुला? व्यवस्थित बँडेज करून देतो.’’

‘‘बँडेजचे सामान माझ्याकडे होते. मी पट्टी बांधली आहे.’’

‘‘बरं, ही काही गरजेची औषधे आणि फळे तसेच भाज्या आहेत. तुझ्याकडे ठेव.’’

‘‘सर, तुमची खूप खूप आभारी आहे.’’ कृतज्ञतेने शबनमच्या डोळयात अश्रू तरळले. मी तिच्या खांद्यावर थोपटत तेथून बाहेर पडत सांगितले, ‘‘शबनम, कधीही कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास मला अवश्य सांग. तसे तर या सोसायटीतून तुला घेऊन जाण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. रुग्णालयाजवळ माझे दोन खोल्यांचे घर आहे, तिथे तुझी राहण्याची व्यवस्था करतो. सध्या मीही तिथेच राहतो, कारण तेथून रुग्णालय जवळ आहे. शिवाय माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, ही भीतीही सतावत असते.’’

‘‘ठीक आहे सर, जसे तुम्हाला योग्य वाटेल,’’ असे शबनमने सांगताच मी तेथून निघालो.

त्यानंतर २-३ वेळा खाण्याचे पदार्थ व इतर आवश्यक वस्तू घेऊन मी तिच्याकडे गेलो.

सोसायटीतील लोक माझ्याकडे रागाने बघत. एके दिवशी तर हद्दच झाली. सोसायटीतील लोकांच्या सांगण्यावरून एका उच्च जातीच्या पोलीस एसआय असलेल्या नीरज यांनी मला २-३ दंडुके मारले. मी रागाने ओरडलो, ‘‘एका डॉक्टरला अशा प्रकारची वागणूक दिली जाते का?’’

‘‘तुम्ही डॉक्टर आहात तर मग त्या मुस्लीम मुलीच्या घरी का येता? दोघे एकमेकांना सामील आहात ना? संगनमताने काय करणार आहात?’’

‘‘सर, मी डॉक्टर आहे आणि ती माझ्यासोबत काम करणारी नर्स आहे. आमच्यामध्ये केवळ एवढेच नाते आहे. उच्च आणि नीच जात, हिंदू, मुस्लीम असा भेदभाव मी मानत नाही,’’ रागाने आरडाओरडा करीतच मी घरी आलो, पण आता शबनमची मला अधिकच काळजी वाटू लागली होती.

त्याच दिवशी मी ठरवले की, शबनमला माझ्या घरी घेऊन यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी तिला माझ्या घरी घेऊन आलो.

आता शबनम माझ्यासोबत माझ्या घरी होती आणि रुग्णालयही जवळच होते. त्यामुळे हट्टाने ती रुग्णालयात जाऊ लागली. लंगडत असून आणि त्रासात असतानाही ती मनापासून रुग्णसेवा करीत होती. त्यामुळे माझ्या मनातील तिच्याबाबतचा आदर अधिकच वाढत होता.

ती घरातही माझ्यासाठी पौष्टिक जेवण बनवत असे. माझे कुटुंबीय माझ्यासोबत नव्हते. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या जेवणाचे हाल होत होते. रुग्णालयातील कँटीनमध्ये मी जेवत असे. पण जशी शबनम माझ्या घरी आली, तसे तिने मी नको म्हणत असतानाही स्वयंपाकघराचा ताबा घेतला. पाय दुखत असतानाही ती मला माझ्या आवडीचे पदार्थ बनवून देत असे. मी कुटुंबापासून दूर आहे, याची जाणीवही ती मला होऊ देत नव्हती.

रुग्णालयात ती माझ्या मदतनीस होतीच, पण घरातही माझ्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देत होती. आम्ही दोघेही न बोलताच एका वेगळया नात्यात बांधले जात होतो. तिचा त्रास मला समजत होता आणि मला होणाऱ्या त्रासाचे ओझे ती स्वत: वाहायला तयार होती. आमचा धर्म वेगळा होता. जात वेगळी होती, पण मन एक झाले होते. आम्ही एकमेकांना स्वत:पेक्षा जास्त ओळखू लागलो होतो.

दुसरीकडे माझ्या शेजारी आमच्यावरून चर्चा रंगू लागली होती. लोकांना हे समजले होते की ती दुसऱ्या धर्माची आहे. त्यांना असा प्रश्न पडला होता की, ती माझ्यासोबत माझ्या घरात का राहत आहे? माझे तिच्याशी काय नाते आहे?

शबनमच्या सोसायटीतील काही लोकांनीही माझ्या काही शेजाऱ्यांना भडकवण्याचे काम केले. मला थेट येऊन कोणी काहीही विचारले नव्हते, पण त्यांच्या डोळयांतील प्रश्न मला दिसत होते.

एके दिवशी मी घरी आलो तेव्हा माझी तब्येत बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. घसा खवखवत होता, डोकेही दुखत होते. मी स्वत:ला क्वारंटाईन केले.

शबनमलाही निघून जायला सांगितले. पण तब्येत खराब असताना मी तुम्हाला सोडून जाणार नाही, असे तिने ठामपणे सांगितले. त्यानंतर मी तिला माझ्या खोलीत येण्यास बंदी घातली. ती दुरूनच माझी काळजी घेत होती.

एके दिवशी दोघे शेजारी माझ्या घरी आले आणि शबनमबाबत चौकशी करू लागले. मी सर्व काही खरे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा लक्षात आले की, घराबाहेरून बराच आवाज येत आहे. एकीकडे माझी तब्येत बिघडली होती तर दुसरीकडे कट्टरपंथी एकत्र जमून माझ्या घराबाहेर घोषणाबाजी करीत होते. मला गद्दार म्हटले जात होते. शबनमसोबत नाव जोडून मला सोसायटीतून हाकलून देण्याची मागणी केली जात होती.

मला काय करावे ते सूचत नव्हते. बराच वेळ घराबाहेर गोंधळ सुरूच होता. तोपर्यंत शबनम तिचे कपडे गोळा करू लागली.

ती घाबरून म्हणाली, ‘‘सर, आता मी येथे अजिबात राहू शकत नाही. माझ्यामुळे तुम्हालाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मी तर म्हणेन की, तुम्हीही चला. तुम्ही रुग्णालयात स्वत:ला दाखल करून घ्या. तुमची तब्येत ठीक नाही. तुमच्या कुटुंबीयांना बोलावून घेऊ का?’’

‘‘नको, नको. तू माझ्या घरच्यांना काहीही सांगू नकोस. ते उगाचच माझी काळजी करू लागतील. तू जा. मी सर्व सांभाळून घेईन.’’

‘‘मी आधीच सांगितले आहे की, काहीही झाले तरी तुम्हाला असे एकटयाला सोडून मी जाणार नाही. ते लोक तुमचे जगणे अवघड करतील. तुमची तब्येतही जास्त बिघडत चालली आहे. मी डॉक्टर अतुल यांना फोन करते. ते आपल्याला येथून घेऊन जातील.’’

‘‘ठीक आहे, जसे तुला योग्य वाटेल,’’ मी म्हटले. तितक्यात  कोणीतरी दरवाजा वाजवला. सोसायटीचे अध्यक्ष दारात उभे होते. ‘‘हे पहा अविनाश, आमच्या सर्वांनी नर्णय घेतला आहे की, तुम्ही या सोसायटीत राहू शकत नाही.’’

‘‘ठीक आहे, आम्ही जातोय. थरथरत्या आवाजात मी सांगितले.

शबनमने घाईघाईत सर्व तयारी केली. कसेबसे आम्ही रुग्णालयात पोहोचलो. कोरोना झाल्याचा संशय असल्यामुळे मला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत वेगाने खराब होऊ लागली होती. पण शबनमने जगण्याची आस आणि माझी साथ दोन्ही कायम ठेवली. ती सतत माझी सेवा करीत राहिली. माझ्यात सकारात्मक ऊर्जा जागवत राहिली.

प्रदीर्घ उपचारानंतर हळूहळू मी बरा होऊ लागलो. त्यानंतरही पुढचे १४ दिवस मला रुग्णालयातच ठेवण्यात आले. या दरम्यान शबनमबाबत माझ्या मनातील ओढ वाढू लागली. समर्पित भावनेतून ती रुग्णांची तसेच माझी करीत असलेली सेवा पाहून मला असे वाटले की, हिच्यापेक्षा चांगली मुलगी मला भेटूच शकत नाही.

एके दिवशी मला शबनम दु:खी दिसली. मी विचारले असता म्हणाली, ‘‘तुम्ही बरे होण्याची मी वाट पाहत होते. डॉक्टर, आता मी या विभागात आणखी राहू शकत नाही. लोक माझ्याशी खूप वाईट वागले. तुमच्यासोबत माझे नाव जोडून तुम्हालाही बदनाम केले. माझी काहीच चूक नव्हती, तरीही माझ्या या व्यवसायाचादेखील मान ठेवला नाही. माझे मन लागत नव्हते. मी आतापर्यंत फक्त तुमच्यासाठी येथे थांबले होते. आता मला जायची परवानगी द्या. मला रुग्णालयातील नोकरी सोडून जायचे आहे.’’

शबनमच्या अश्रूंनी भरलेल्या डोळयांमध्ये माझ्यासाठी असलेले प्रेम मला स्पष्टपणे दिसत होते. मी तिला अडवले. ‘‘थांब शबनम, तू कुठेही जाणार नाहीस. जे नाव त्यांनी बदनाम करण्यासाठी जोडले ते मी प्रत्यक्षात जोडू इच्छितो.’’

शबनमने आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहिले. मी हसत म्हटले, आजच या रुग्णालयात आपण लग्न केले तर? उशीर करण्याची गरजच काय?’’

शबनमने लाजून नजर खाली झुकवली. तिचे उत्तर मला मिळाले होते.

रुग्णालयात हजर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसने झटपट आमच्या लग्नाची तयारी केली. अशा प्रकारे एक हिंदू डॉक्टर आणि मुस्लीम नर्स कायमचे एकमेकांचे जोडीदार झाले.

सप्तरंगांची उधळण

कथा * प्राची भार्गवे

मनीष आपल्या पत्नीसोबत, मुक्तासोबत बाल्कनीत बसून चहा पित होता. दिवसभरात ऑफिसमध्ये घडलेल्या काही घटना तिला ऐकवत होता. मुक्ताही दिवस कसा गेला, काय, काय झालं ते सांगत होती. नुकतंच दोघांचं लग्न झालं होतं. नवा संसार सुरू झाला होता. दोघांनाही त्या नव्याची नवलाई अनुभवताना गंमत वाटत होती.

समोश्याचा घास घेत मनीषनं म्हटलं, ‘‘व्वा! चविष्ट समोसा, तोही तुझ्या हातचा अन् एयर फ्रायमध्ये तयार केलेला…म्हणजे रूचकर पदार्थ अन् तोही अत्यंत हेल्दी…खरोखर तू एक उत्तम पत्नी आहेस.’’

मुक्ता स्वत:ची स्तुती ऐकून लाजली. ती हसून काही बोलणार तेवढ्यात मनीषचा मित्र गोपाळ तिथं आला.

‘‘अरे? गोपाळ? ये ना, ये बैस. मुक्ता, गोपाळलाही चहा आवडतो.’’

मुक्ता तत्परतेनं स्वयंपाकघराकडे वळली.

‘‘अरे? मी येताच वहिनीला का आत पाठवलंस?’’ गंमतीनं मनीषच्या पाठीवर थाप देत गोपाळनं म्हटलं. ‘‘एका परीनं चांगलंच केलंस. मी तुला एक बातमी द्यायला आलो होतो. तुझी प्रिया तिच्या आईकडे परत आलीये. आज मला मार्केटात भेटली. तुझ्याबद्दल विचारत होती. तुझा फोननंबर मागितला. म्हणाली, तिचा मोबाइल चोरीला गेल्यामुळे तिच्याकडे आता कुणाचेच नंबर नाहीएत…’’

गोपाळ पुढेही काहीबाही सांगत होता, पण मनीषला काहीच ऐकू येत नव्हतं. तो भूतकाळात जाऊन पोहोचला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचं सगळं आयुष्य, त्याचं अवघं अस्तित्व याच नावाभोवती फिरत होतं. त्याची प्रिया, त्याचा प्राण, त्याचं पहिलं प्रेम…

कमलाकरनं दिलेल्या पार्टीत त्या दिवशी प्रत्येकाची नजर प्रियावर खिळलेली होती. मनीषचा स्वभाव लाजराबुजरा असल्यामुळे तो फक्त लांबूनच तिच्याकडे बघत होता. पार्टी संपली तेव्हा प्रत्येकानं आपापल्या घरी परतण्याची तयारी सुरू केली. कुणीतरी म्हणालं, ‘‘प्रियाचं घर मनीषच्या वाटेवर आहे.’’ प्रियाला घरी पोहोचवण्याची जबाबदारी ओघानंच मनीषवर आली आणि त्यानं ती आनंदानं स्वीकारली. प्रियाचं सौंदर्य, स्मार्टनेस आणि अवखळपणानं तोही वेडावला होताच. प्रिया कॉलेजात शिकतेय हे त्याला समजलं. कॉलेज संपवून तो प्रशासनिक सेवापरीक्षेच्या तयारीला भिडलाय हे त्यानं प्रियाला सांगितलं.

‘‘म्हणजे तू खूपच हुषार आहेस तर? मला अभ्यासात अडचण आली तर मी तुला विचारू शकते का?’’

‘‘केव्हाही ये.’’ मनीष तात्काळ उत्तरला. आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन डोळे, तसं झालं.

मनीष आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिल नोकरीच्या निमित्तानं दुसरीकडे असायचे. आई अगदी साधीशी…प्रिया मनीषच्या खोलीत अभ्यासासाठी बराच वेळ बसते यात तिला काही गैरही वाटलं नाही. प्रियाकडे तर मनीष केव्हाही जाऊ शकत होता. प्रियाची आई घटस्फोटिता होती अन् ती दिवसभर कुठं ना कुठं भटकत असायची.

प्रिया अन् मनीषची मैत्री झपाट्यानं वाढत होती. वयाचाही दोष होताच…लहान अवखळ वय, स्वप्नं बघण्याचं…‘आय लव्ह यू’ हे शब्द न उच्चारताच दोघांनी आपल्या भावना एकमेकांना सांगून टाकल्या. दिवसाचा बराचसा वेळ दोघं एकत्रच असायची अन् उरलेला वेळ व्हॉट्सअॅपवर. प्रिया मनीषच्या प्रत्येक बाबतीत होकारच द्यायची. मनीष तिला सतत भेटवस्तू द्यायचा. कपडे, नेलपॉलिश, लिपस्टिक, परफ्यूम एवढंच काय, तिला ऑनलाइन शॉपिंग करता यावं म्हणून त्यानं तिला क्रेडिट कार्डही दिलं होतं. मनीषच्या संकोची व लाजाळू स्वभावामुळे मनीष तिला स्पर्शही करत नसे. पण त्यानं काहीही केलं असतं तरी तिची हरकत नव्हती. तरीही एका दुपारी प्रियानं मनीषला देह समर्पित केला. त्या प्रसंगानंतर मात्र मनीषला प्रियाखेरीज काहीच सुचेनासं झालं.

‘‘प्रिया, मी तुझ्यावाचून जगूच शकत नाही. तू माझ्या आयुष्यात नव्हतीस तेव्हा माझं आयुष्य किती भकास होतं. तू माझ्या आयुष्यात सप्तरंगांची उधळण केलीस.’’ मनीष म्हणायचा. त्यानं तिच्यावर कविताही केली होती.

माझ्या डोळ्यांनी माझं जगणं अवघड केलं आहे. उघडे असतात तेव्हा केवळ तुलाच शोधतात आणि मिटले की फक्त तुझीच स्वप्नं बघतात.

या प्रेमामुळे मनीषच्या अभ्यासावरही परिणाम झाला होता. तो मन लावून अभ्यास करू शकत नव्हता. फक्त प्रिया आणि प्रियाच! परिणाम व्हायचा तोच झाला. तो यूपीएससीच्या परीक्षेत नापास झाला. एव्हाना मनीषचे वडिल रिटायर झाले होते. त्यांच्या पेन्शनमध्ये घरखर्च भागवावा लागत होता. त्यामुळे आता मनीषचा पॉकेटमनी, क्रेडिट कार्ड वगैरे सर्व बंद झालं होतं.

मनीषचे मित्र त्याला भेटायला, त्याला धीर द्यायला आले होते. त्यांच्याबरोबर प्रियासुद्धा आली होती. पण तिच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा अपराधीपणाची भावना नव्हती. उलट जेव्हा मनीषच्या एकदोन मित्रांनी थेटपणे म्हटलं की प्रियाच्या संगतीत अधिक वेळ घालवल्यामुळे मनीष नापास झाला, तेव्हा निर्लज्जपणे हसून ती म्हणाली होती की एक तर तो नापास झाला अन् वरून दोष कुणा दुसऱ्याच्याच माथी मारला जातोय? वा रे न्याय? तिच्या सुरात सांत्वन नव्हतं तर उपेक्षा अन् धिक्कार होता.

त्याक्षणी खरं तर मनीषला तिचा खूप राग आला होता, पण प्रियाचा अल्लडपणा मानून त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. अजूनपर्यंत त्यानं तिला लग्नाबद्दल विचारलंही नव्हतं. त्यानं स्वत:च्या मनाची समजूत घातली की जेव्हा लग्न होईल तेव्हा तिला कळेल की एकाची जबाबदारी दुसराही आपलीच जबाबदारी समजतो. त्याला खात्री होती, प्रियाच्या संगतीत तो खूप समाधानी अन् यशस्वी होईल. त्यामुळे त्यानं एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली.

प्रिया एकदम स्तब्ध झाली. मग तिनं अगदी स्पष्टच सांगितलं, ‘‘मनीष, भलतंच काय बोलतो आहेस? मला तू आवडतोस हे जरी खरं असलं तरी लग्न करायची काय गरज आहे? मी तुझाच तर आहे ना?’’ ‘‘पण प्रिया, असं कुठवर चालेल? माझ्या आईवडिलांना लग्न करून घरात सून यायला हवी आहे. तुझ्या आईचाही विचार कर, तिलाही तुझ्या लग्नाची काळजी असेलच ना? मला आत्ताच एक बऱ्यापैकी नोकरीही मिळते आहे. आपण त्यात भागवू शकू.’’ मनीषनं समजावलं.

‘‘बऱ्यापैकी नोकरी? समजून घे मनीष, अरे संसाराला भरपूर पैसा लागतो. पैशाशिवाय जगणार कसं? तू बघ हल्ली तू मला काही गिफ्ट देत नाहीस, हॉटेलात नेत नाहीस, शॉपिंगला नेत नाहीस…मग लग्नाचा विचार कसा करायचा? आणि लग्न म्हणजे घर सांभाळा, स्वयंपाक करा, मुलं जन्माला घाला, त्यांना वाढवा, संसाराची काळजी करत आयुष्य जगा हे सगळं मला मान्य नाही. मला तिटकारा आहे त्याचा. मी स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. माझ्या आईकडे बघ, कशी स्वतंत्र, एकटी अन् मजेत जगते आहे, मलाही तसंच आयुष्य हवंय.’’

प्रियाच्या या उत्तरानं मनीष गप्पच झाला. पण त्या दिवसानंतर मनीषला लक्षात आलं की प्रिया त्याला टाळते आहे. तिची वागणूकही बदलली आहे. किती किती दिवस ती त्याला भेटत नसे. फोनही करत नसे. कधी कुठं अवचित भेट झालीच तर भांडायच्या सुरातच म्हणायची, ‘‘एवढंच ओळखलंस का रे तू मला? मी तुला विसरू शकत नाही मनीष, एक वेळ मी स्वत:ला विसरेन. पण तू तर माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला आहेस रे…’’

ती मनीषला इमोशनली ब्लॅकमेल करायला बघायची. मनीषला वाटे, तिला विचारावं, इतकं जर प्रेम करतेस माझ्यावर तर ते दिसत का नाही तुझ्या डोळ्यात? जाणवत का नाही तुझ्या वागण्यात? पण तो बोलत नसे. त्याला भीती वाटे की प्रिया जर दुखावली गेली तर कदाचित संगळंच संपेल. तो थांबायला तयार होता. पण प्रियाबरोबर आयुष्य घालवण्याचं त्याचं सोनेरी स्वप्नं त्याला भंगू द्यायचं नव्हतं.

प्रियाला मिळवायचं तर मला आधी स्वत:ला सिद्ध करावं लागेल हे विचारात घेऊन त्यानं पुन्हा प्रशासनिक सेवेच्या परीक्षेची तयारी सुरू केली. जीव तोडून तो अभ्यास करत होता. कधीतरी प्रियाशी थोडंफार फोनवर बोलला की त्याला अभ्यासाला हुरूप यायचा.

एक दिवस प्रियानं सांगितलं की ती तिच्या मामाकडे जात आहे. खरं तर तिला तिथं जायची इच्छा नाहीए, त्याच्याशिवाय तिला तिथं करमायचं नाही. पण हे सगळं ती त्याच्यासाठी करते आहे. त्याच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणूनच ती इथून दूर जाते आहे. ‘‘मनीष, ही आपल्या प्रेमाचीही परीक्षा आहे. आपण त्यात उत्तीर्ण व्हायला हवं.’’ तिनं त्याला बजावलं.

मनीषला हे पचवणं फार जड गेलं. पण इलाज नव्हता.

प्रिया मामाकडे निघून गेल्यावर तर मनीषचा कशातच जीव रमेना. त्याला सतत तिची आठवण यायची. पण काळ सतत पुढे जात असतो. परीक्षा जवळ आली होती. मनीष अभ्यासाला भिडला. पण रोज तो तिच्या पत्राची वाट बघायचा. तीन महिन्यांनी प्रियानं पत्र पाठवलं. पत्रात खूप काही लिहिलं होतं. मनीषशिवाय प्रिया कशी अपूर्ण आहे, तिला किती आठवण येते. रात्री झोपही लागत नाही वगैरे वगैरे…हे सगळं वाचून मनीषचे डोळे भरून आले. त्यानं स्वत:लाच दूषणं   दिली…का म्हणून तो प्रियावर अविश्वास दाखवतो? प्रत्येकाची प्रेम करण्याची, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून प्रिया एक मुलगी आहे. तिला काही मर्यादा पाळावीच लागते. मुलींना व्यक्त होताना संकोच वाटतो, लाजही वाटते आणि काही गोष्टी न बोलताही समजून घ्यायच्या असतातच ना? ती खरोखर प्रेम करते आहे. तिच्यावर अविश्वास नको दाखवायला. प्रियाचे प्रिय पात्र आपण आहोत! याचा त्याला अभिमान वाटला.

यथावकाश परीक्षा आटोपली. रिझल्टही आला. त्याच्या या यशानं आईवडिल आनंदले. त्यांनी घरीच एक छोटीशी पार्टी ठरवली. सगळे मित्र जमले. मनीषला प्रियाची फार आठवण येत होती. ही बातमी त्याला स्वत: प्रियाला सांगायची होती. तिला किती आनंद होईल या कल्पनेनंच तो रोमांचित होत होता.

त्यानं कमलाकरकडे प्रियाचा पत्ता मागितला. कमलाकर जसा मनीषचा मित्र होता, तसाच प्रियाचाही मित्र होता. मनीषनं म्हटलं, ‘‘ही बातमी प्रियालाही सांगायची. खरं तर आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून प्रिया इथून निघून गेली. एकमेकांपासून दूर राहून आम्ही खरोखर एक फार मोठी परीक्षा दिली आहे. प्रियानं माझ्या यशासाठी किती मोठा त्याग केला आहे. आता मला चांगली नोकरी लागेल.’’

कमलाकर गंभीरपणे म्हणाला, ‘‘मनीष, तुझ्यासारखा समंजस अन् हुषार मुलगा प्रियासारख्या फुलपाखरी वृत्तीच्या मुलीच्या जाळ्यात कसा अडकला याचं आम्हा सर्वांनाच फार आश्चर्य वाटायचं. उडत्या मैत्रीसाठी प्रिया ठीक आहे रे, पण लग्न? अशक्य! स्वत:च्या पायावर कुऱ्हाड नको मारून घेऊस.’’

नंतर बराच वेळ कमलाकर मनीषशी बोलत होता. त्यानं प्रियाबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून मनीष स्तब्ध झाला.

‘‘प्रियाचे अनेक प्रियकर आहेत. अनेकांशी तिचे जवळीकीचे संबंध आहेत. तिची आईही तशीच आहे.’’

मनीषचा विश्वास बसत नव्हता. त्याची प्रेमनायिका एकाएकी खलनायिका झाली होती. कमलाकर सांगतोय ते खरं आहे का? की प्रियासारखी मुलगी त्याच्याशी लग्न करत नाही म्हणून तो खोटंनाटं सांगतोय? पण कमलाकर असा नाहीए. हा निर्णय मनीषच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा निर्णय होता. तो तडकाफडकी नको घ्यायला.

त्यानं आडून आडून अनेक लोकांकडे प्रियाची चौकशी केली. त्याला धक्काच बसला. किती लोकांना तिच्याबद्दल काय काय माहीत होतं अन् प्रियाच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या मनीषला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रियानं अनेक मुलांना गंडवलं होतं. अनेकांचे जीव पोळले होते. प्रियाला श्रीमंती, सुखासीन आयुष्य हवं होतं. त्यासाठी ती नवे नवे लोक हेरत असायची.

आता कदाचित मनीषचं यश, मिळणारी मोठी सरकारी नोकरी यामुळे कदाचित प्रिया लग्नाला हो म्हणेलही…पण आता मनीष सावरला होता. उघड्या डोळ्यांनी माशी पडलेलं दूध तो कसा पिणार? इकडे आईवडिलांनी लग्नाचा धोशा लावलेला.

शेवटी मनीष आईवडिलांबरोबर एक मुलगी बघायला गेला. मुलगी सुंदर होती. शिकलेली, शालीन होती. घरदार आईबाबांनी आधीच पारखून घेतलेलं. मुलगा, मुलगी, दोन्ही कडचे घरचे लोक सर्वांच्या पसंतीनं, सहमतीनं लग्न ठरलं. मनीषनं मुक्ताला भेटायची परवानगी मागितली. त्याला तिच्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. मुक्ता खूपच संकोचली होती.

मनीषनं बोलायला सुरूवात केली, ‘‘आपण दोघांनी एकत्र आयुष्य काढण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा मला तुला काही सांगायचं आहे. तू शांतपणे ऐकून घे अन् मगच निर्णय सांग. तुझा निर्णय मला मान्य असेल.’’ मग मनीषनं तिला त्याच्या आयुष्यातलं प्रिया प्रकरण प्रामाणिकपणे सांगून टाकलं.

मुक्ता शांतपणे ऐकत होती. मनीषचं बोलणं ऐकल्यावर काही क्षण ती शांत बसली होती. मग हसून म्हणाली, ‘‘चला, कडू का होईना पण प्रेमाचा एक अनुभव तुम्हाला घेता आला…आता निदान आपण प्रेमच केलं नाही, करू शकलो नाही, ही खंत मनात राहणार नाही. मलाही वाटायचं, आपण लव्ह मॅरेज करावं…पण आमच्याकडे तर मुलींनी मान वर करून बघणंही निषिद्ध आहे…’’

‘‘म्हणून तू उदास आहेस का?’’

मुक्ता बोलली नाही पण तिच्या डोळ्यांनी होकार दिलाच.

‘‘तू मोकळेपणानं बोललीस हे छान झालं. मला आवडलं. आपल्यात आता कोणात्याही प्रकारचा संकोच नसावा.’’

‘‘खरं तर मलाही प्रेमात पडण्याचा, त्या वेडेपणाचा आनंद उपभोगावा असं वाटायचं, कसं वाटतं प्रेम करताना, तो अनुभव घ्यायचा होता. प्रेमात आयुष्य बदलून टाकण्याची शक्ती असते म्हणे…’’ बोलता बोलता मुक्ता थांबली अन् जीभ चावून म्हणाली, ‘‘क्षमा करा हं! वेड्यासारखी काहीबाहीच बोलले मी…’’

पण मनीषला तिचं ते भाबडेपण अन् प्रामाणिकपणा खूपच आवडला. मनीषनं प्रेमात पडण्याचा अनुभव घेतला होता आणि आता तो आईवडिलांनी निवडलेल्या मुलीशी ‘अरेंज मॅरेज’ करत होता. मुक्ताला स्वत:च्या मनानं प्रियकर निवडून प्रेम करण्याची संधीच मिळाली नव्हती.

त्या क्षणापासून मनीषनं मुक्ताच्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरायला सुरूवात केली. तिला प्रेमविवाहाचा आनंद मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागला. मुक्तालाही मनीषच्या रूपात प्रियकर मिळाला. लग्न होईपर्यंतचा काळ तिनं एका वेगळ्याच धुंदीत काढला. तिलाही वाटायला लागलं की आपलं ‘लव्ह मॅरेज’ आहे.

म्हणतात ना, लग्नाच्या गाठी आधीच बांधलेल्या असतात…नंतर फक्त लग्नं होतात. मनीष अन् मुक्ताची लग्नगाठ आधीच ठरलेली होती. एकमेकांना खरोखरच दोघंही अगदी अनुरूप अन् परस्पर पूरक होती.

ज्यामुळे मनीषचं जग डोलत असे, आंदोलित होत असे. त्याच भूकंपाची बातमी घेऊन गोपाळ आत आला होता. पण मनीष आता अगदी शांत आणि स्थिर होता. त्याचं जग आज आनंद आणि समाधानाच्या हिंदोळ्यावर झुलत होतं अन् त्याची दोरी मुक्ताच्या हातात होती. दोघंही प्रेमाच्या सप्तरंगी उधळणीत न्हाऊन निघाली होती.

लाच

कथा * अर्चना पाटील

‘‘बाबा, मिठाई वाटा.’’

‘‘का, काय झालं?’’

‘‘मला शिक्षिकेचा जॉब मिळालाय जवळच्याच गावात.’’

‘‘ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी माझी मुलगी जीवनात काहीतरी बनलीच.’’

आज शाळेचा पहिला दिवस होता. मी खूप खूश आहे. माझे बाबाही माझ्यासोबत शाळेत आले आहेत. पहिला दिवस तर बरा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी उभे होतो. इतक्यात हेडमास्तर जवळ आले आणि सांगू लागले, ‘‘मॅडम, नोकरी मिळालीय, तर चहा तरी पाजा स्टाफला.’’

‘‘अं.. अजून मला पहिला पगारही मिळाला नाही. नंतर सर्वांना चहा पाजेन.’’

‘‘अहो मॅडम, एक कप चहासाठी महिनाभर वाट पाहायला लावणार का?’’

‘‘सर, मी सांगितलं ना, पहिला पगार झाल्यावर देणार. मला माफ करा.’’

अजित सर बाजूलाच उभे होते. हेडमास्तर निघून गेले.

‘‘मी काही बोलू का?’’ अजित सर हळू आवाजात म्हणाले.

‘‘बोला…’’

‘‘चहा पाजा, जर पैसे नसतील, तर मी देतो. पगार झाल्यावर परत करा.’’

‘‘मला उधार घ्यायला आवडत नाही.’’

सर्वजण वर्गात गेले. माझ्या वर्गात २० विद्यार्थी होते. १० मुले व्यवस्थित शिकत होती. १० मुलांना वेगळं शिकवावं लागत होतं. मी जशी ऑफिसमध्ये जायचे, तसे स्टाफचे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने चहावरच येऊन थांबत असत आणि माझी मस्करी करत असत. एके दिवशी माझं डोकं गरम झालं व मी बोलून गेले, ‘‘एक कप चहासाठी एवढे का मरत आहात, आता तर पहिल्या पगाराचा चहाही पाजणार नाही मी तुम्हाला.’’

शाळेचे मिश्रा, गुप्ता, शर्मा आणि हेडमास्तर माझं उत्तर ऐकून क्रोधित झाले, पण कोणी काही बोलले नाही. पण माझ्या रोखठोक उत्तराने शाळेत माझ्या विरोधात राजकारण सुरू झाले.

एके दिवशी मोठे साहेब अग्रवाल सर शाळेत आले. साहेबांसाठी मिश्राजी पटकन नाश्ता घेऊन आले. मलाही ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. मीही सर्वांसोबत एक समोसा खाल्ला. अग्रवाल सर जाताच हेडमास्तर २० रुपये मागू लागले.

‘‘एका समोशाचे २० रुपये?’’

‘‘मॅडम, गाडीला पेट्रोल नाही लागले का?’’ गुप्ताजी म्हणाले. मी पटकन वीस रुपये काढून त्यांच्या तोंडावर फेकले आणि माझ्या वर्गात गेले. माझ्यामागून अजित सरही माझ्या वर्गात आले.

‘‘तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘नाही, का बरं?’’

‘‘तर मग वीस रुपयांसाठी एवढा राग का?’’

‘‘पाच रुपयांच्या समोशासाठी वीस रुपये का?’’

‘‘कारण मिश्रा, गुप्ता आणि शर्मा पैसे देणार नाहीत, ते आपल्याकडून वसूल करण्यात आले. हेडमास्तर व अग्रवाल सरांचे पैसे मी दिले.’’

‘‘हा तर अन्याय आहे ना…’’

‘‘इथे असंच चालतं. कोणत्याही सरकारी शाळेत असंच होतं. सीनिअर लोक जसं सांगतात, तसं करावं लागतं. तुम्ही अजून नवीन आहात.’’

एका आठवड्यानंतर ऑफिसमधून ट्रेनिंगसाठी पत्र आलं. मला माहीत होतं, मलाच पाठवलं जाणार. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा ट्रेनिंगसाठी पत्र आलं. पुन्हा मलाच पाठवण्यात आलं. कधी एखादी मिटिंग असली की मलाच जावं लागायचं. वर्गात वीस मुले होती, परंतु केवळ १२ विद्यार्थीच शाळेत येत होते. मी खूप वेळा त्यांच्या घरी जाऊन आले, परंतु जोपर्यंत त्यांना बोलावण्यासाठी कोणी जात नसे, तोपर्यंत ते शाळेत येत नसत. ही रोजचीच गोष्ट होती. दर दिवशी त्या विद्यार्थ्यांना बोलवावं लागत असे.

एके दिवशी माझ्या बाजूला राहणाऱ्या राजूची जुनी स्कूल बॅग मी एका विद्यार्थिनीला दिली. पहिली आणि दुसरीच्या वर्गात ती शाळेत बसतच नव्हती. आपली पुस्तकांची पिशवी वर्गात ठेवून पळून जात असे. परंतु जुनी का होईना, स्कूल बॅग मिळाल्यानंतर ती रोज शाळेत येऊ लागली. एका स्कूल बॅगमुळे ती रोज शाळेत येऊ लागली, तेव्हा मला जरा बरं वाटू लागलं. आता या शाळेत मला ३ वर्षे झाली होती. गुप्ता, मिश्रा, शर्मा आणि हेडमास्तर रोज एखादी गोष्ट तर वाकडी बोलतच असत.  परंतु अजित सर आपल्या शांत आणि विनोदी स्वभावाने मला शांत करत असत. अजित सरांचे माझ्याशी प्रेमळ वागणे स्टाफला आवडत नसे. एके दिवशी अजित सर आणि ते चार सैतान ऑफिसमध्ये एकत्र बसले होते.

‘‘काय मग लग्न करायचा विचार आहे का मॅडमशी?’’

‘‘नाही तर?’’

‘‘करूही नका. मॅडम आपल्या समाजाच्या नाहीत आणि शिवाय शाळेत लव्ह मॅरेजच्या नादात सस्पेंड व्हाल. टीचर लोकांना लव्ह मॅरेज करणे अलाऊड नसते, माहीत आहे ना…’’

अजित सर काहीच बोलले नाहीत. कारण मनातल्या मनात ते माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होते. एके दिवशी अग्रवाल सर वर्गात आले. वर्गात मुले कमी होती.

‘‘वीसमधील फक्त १५ विद्यार्थी?’’

‘‘अं.. रोज तर येतात.’’

‘‘आज मी आलोय, म्हणून आली नाहीत का?’’

‘‘हो…’’ काय उत्तर द्यावे मला कळत नव्हते.

‘‘उठ बाळा, तुझं नाव काय आहे?’’

‘‘निखिल.’’

‘‘फळ्यावर आपल्या मित्राचं नाव लिही.’’

निखिलने फळ्यावर आपल्या मित्राचं नाव पियूषच्या ऐवजी पिउष लिहिलं.

‘‘मॅडम, काय शिकवता तुम्ही मुलांना. तू उठ, तुझं नाव काय आहे?’’

‘‘स्नेहल.’’

‘‘सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो?’’

‘‘सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त…’’

स्नेहलने उत्तर दिलं नाही. अग्रवाल सर ओरडू लागले, ‘‘तुम्हाला नोटीस देऊ का, देऊ का नोटीस?’’

मी नजर झाकवून उभी होते. हेडमास्तर हसत होते. अग्रवाल सर वर्गातून निघून गेले. मी स्वत: अजित सरांच्या वर्गात गेले.

‘‘मला माहीत आहे, हेडमास्तर जाणीवपूर्वक अग्रवाल सरांना माझ्या वर्गात घेऊन आले. सर मला ओरडले, तेव्हा त्यांचा जीव शांत झाला असेल.’’

‘‘जर तुम्ही एक चहा दिला असता तर…’’

‘‘माझ्यापेक्षा जास्त पगार तर हे लोक घेतात आणि सर्व कामे माझ्याकडूनच करून घेतात. मिश्रा, गुप्ता आणि शर्माजींना का नाही ट्रेनिंगला पाठवत? कारण ते अग्रवाल सर आणि त्यांच्या बायको-मुलांना मोठमोठी गिफ्टस् देतात.’’

‘‘जर तुम्ही कधीतरी काही गिफ्ट दिलं असतं तर…’’

मला माहीत होतं, अजितसरांकडे माझं मन शांत होणार नाही. मी पुन्हा माझ्या वर्गात गेले. संध्याकाळी घरात भांड्यांचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांनी हाक मारली.

‘‘एवढा आवाज का करतेस?’’

‘‘मोठे साहेब आले होते शाळेत. सांगत होते नोटीस देणार.’’

‘‘मग देऊ दे ना, सरकारी नोकरीत तर ही नेहमीची गोष्ट आहे.’’

‘‘सांगत होता, जर मी शिकवत नाही, तर पगार का घेते? मी तर रोज शिकवते, मुले शिकत नाही, तर मी काय करू? मिश्रा, गुप्ता आणि शर्माच्या वर्गात गेले नाहीत. माझ्याच वर्गात तोंड वर करून येतात. रोज येणारी मुले आज घरी राहिली होती. मी काय करणार?’’

‘‘अगं बेटा, एवढी उदास होऊ नकोस. एके दिवशी सर्व नीट होईल.’’

पण तरीही मुलांनी अग्रवाल सरांच्या समोर उत्तर का नाही दिले? नोटीस देईन, हे शब्द कानाला टोचत होते आणि मिश्रा, गुप्ता, शर्माचे हसणारे चेहरे डोळ्यांसमोरून जात नव्हते. जे होते, ते चांगल्यासाठी होते, असा विचार करून नवीन सुरुवात केली. बहुतेक माझ्या शिकवण्यातच काहीतरी कमतरता आहे, असा विचार करून नवीन उत्साहाने शिकवायला सुरुवात केली आणि एके दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर आली. अग्रवाल सरांनी ऑफिसमधून ऑर्डर पाठवली होती.

आज या शाळेतील शेवटचा दिवस होता.

हेडमास्तर बोलू लागले, ‘‘तुमच्या ट्रान्सफरमध्ये माझा काही हात नाहीए. मी अग्रवाल सरांना सांगितलं होतं, मुलगी आहे, जाऊ द्या. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही.’’

‘‘५०० रुपये हातावर ठेवले असतेस, तर ही पाळी आली नसती,’’ मिश्राजी म्हणाले.

‘‘अग्रवाल एवढा स्वस्त आहे मला माहीत नव्हतं.’’

‘‘जा आता जंगलात, प्राण्यांमध्ये. रोज एक तास बसने जावे लागेल. त्याच्यापुढे ५ किलोमीटर चालत जावे लागेल. रात्री घरी यायला ८ वाजतील. माझ्या मुलीसारखी आहेस, म्हणून सांगतोय, दुनियादारी शिक. लाच देणे सामान्य गोष्ट आहे,’’ शर्माजी म्हणाले.

‘‘तुमच्यासारख्या माणसांमध्ये राहण्यापेक्षा उत्तम आहे, मी प्राण्यांसोबत राहीन. जर तुम्ही पहिल्या दिवशीच मुलगी म्हणाला असता, तर आज ही पाळी आली नसती, शर्माजी.’’

ऑफिसच्या बाहेर अजित सर माझी वाट पाहात होते.

‘‘कधी काही समस्या असेल, तर मला फोन जरूर करा.’’

‘‘हो नक्कीच. या शाळेत फक्त तुम्हीच माझी आठवण काढाल असं वाटतंय.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें