* गरिमा पंकज
‘‘माझी एक इच्छा आहे, मला वचन दे तू ती पूर्ण करशील,’’ जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.
‘‘मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ,’’ मी भावनाविवश होत म्हटले.
‘‘बरं मग मी सांगते,’’ असे म्हणत ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळयांत माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होते की, तिच्या शांत, आनंदी, निळया डोळयांत माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहात होते... माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला.
तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता... आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, ‘‘फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की, मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन.’’
तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, ‘‘मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. मी एकटा राहून काय करणार?’’ असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले.
तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन माझी जान्हवी होती.
महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती जान्हवी होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की, हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. जान्हवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबीयांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीत राहिली. काही वर्षे आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो.