कथा * अर्चना पाटील
‘‘बाबा, मिठाई वाटा.’’
‘‘का, काय झालं?’’
‘‘मला शिक्षिकेचा जॉब मिळालाय जवळच्याच गावात.’’
‘‘ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी माझी मुलगी जीवनात काहीतरी बनलीच.’’
आज शाळेचा पहिला दिवस होता. मी खूप खूश आहे. माझे बाबाही माझ्यासोबत शाळेत आले आहेत. पहिला दिवस तर बरा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी उभे होतो. इतक्यात हेडमास्तर जवळ आले आणि सांगू लागले, ‘‘मॅडम, नोकरी मिळालीय, तर चहा तरी पाजा स्टाफला.’’
‘‘अं.. अजून मला पहिला पगारही मिळाला नाही. नंतर सर्वांना चहा पाजेन.’’
‘‘अहो मॅडम, एक कप चहासाठी महिनाभर वाट पाहायला लावणार का?’’
‘‘सर, मी सांगितलं ना, पहिला पगार झाल्यावर देणार. मला माफ करा.’’
अजित सर बाजूलाच उभे होते. हेडमास्तर निघून गेले.
‘‘मी काही बोलू का?’’ अजित सर हळू आवाजात म्हणाले.
‘‘बोला...’’
‘‘चहा पाजा, जर पैसे नसतील, तर मी देतो. पगार झाल्यावर परत करा.’’
‘‘मला उधार घ्यायला आवडत नाही.’’
सर्वजण वर्गात गेले. माझ्या वर्गात २० विद्यार्थी होते. १० मुले व्यवस्थित शिकत होती. १० मुलांना वेगळं शिकवावं लागत होतं. मी जशी ऑफिसमध्ये जायचे, तसे स्टाफचे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने चहावरच येऊन थांबत असत आणि माझी मस्करी करत असत. एके दिवशी माझं डोकं गरम झालं व मी बोलून गेले, ‘‘एक कप चहासाठी एवढे का मरत आहात, आता तर पहिल्या पगाराचा चहाही पाजणार नाही मी तुम्हाला.’’
शाळेचे मिश्रा, गुप्ता, शर्मा आणि हेडमास्तर माझं उत्तर ऐकून क्रोधित झाले, पण कोणी काही बोलले नाही. पण माझ्या रोखठोक उत्तराने शाळेत माझ्या विरोधात राजकारण सुरू झाले.
एके दिवशी मोठे साहेब अग्रवाल सर शाळेत आले. साहेबांसाठी मिश्राजी पटकन नाश्ता घेऊन आले. मलाही ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. मीही सर्वांसोबत एक समोसा खाल्ला. अग्रवाल सर जाताच हेडमास्तर २० रुपये मागू लागले.
‘‘एका समोशाचे २० रुपये?’’
‘‘मॅडम, गाडीला पेट्रोल नाही लागले का?’’ गुप्ताजी म्हणाले. मी पटकन वीस रुपये काढून त्यांच्या तोंडावर फेकले आणि माझ्या वर्गात गेले. माझ्यामागून अजित सरही माझ्या वर्गात आले.