बनारसी शालू

कथा * रमणी माटेगावकर

आज सकाळीच दादाचा फोन आला, ‘‘छोटी, अगं राधा गेली…थोड्या वेळापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला.’’ दादाचा कंठ दाटून आला होता. डोळेही अश्रू गाळत असावेत.

मी एकदम स्तब्ध झाले. कधी ना कधी दादाकडून ही बातमी मला कळणार हे मी जाणून होते. वहिनीला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय हे दादाकडून कळल्यापासून मला धास्ती वाटत होती. मी मनोमन प्रार्थना करत होते की तिचा रोग बरा होऊन तिला काही वर्षांचं आयुष्य अजून मिळावं. पण तसं घडलं नाही. वहिनी जेमतेम चाळीशीची होती. हे वय काही मरायचं थोडीच असतं? अजून तिने आयुष्य उपभोगलंच कुठे होतं? मुलंही लहानच आहेत. हा विचार मनात येताच मला हुंदका फुटला.

मेंदू बधीर झाला होता. हातापायातली शक्ती जणू कुणी ओढून घेतली होती. पण दादाकडे जायला हवं. मी मुकाट्याने बॅग भरायला लागले. कपाटात मला पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधलेला बनारसी शालू दिसला. शालू बघताच मला जुने दिवस आठवले.

वहिनीने किती हौसेने हा शालू विकत घेतला होता. एकदा दादाला ऑफिसच्या कामाने बनारसला जायचं होतं. त्याने वहिनीलाही बरोबर येण्याचा आग्रह केला. ‘‘अगं, इथून अंतर फार नाहीए. दोन दिवसांत तर आपण परतही येऊ. आई बघेल दोन दिवस मुलांना.’’

‘‘दादा, मीही येणार तुमच्याबरोबर,’’ मी हट्टाने म्हटलं.

‘‘चल, तूही चल,’’ दादाने हसून म्हटल.

आम्ही तिघंही बनारसला खूप भटकलो. वहिनी सतत माझी काळजी घेत होती. आम्ही एका खादीच्या दुकानात शिरलो. ‘‘बनारसला येऊन बनारसी शालू घ्यायचा नाही, असं कसं होईल? बघ राधा, काय आवडतंय तुला…’’ दादा म्हणाला.

वहिनीने बऱ्याच साड्या बघितल्या. तेवढ्यात तिला तो गुलाबी रंगाचा शालू दिसला. तिला तो फारच आवडला. पण त्यावरची किमतीचं लेबल बघून तिने तो पटकन् बाजूला सरकवला.

‘‘का गं? काय झालं? आवडलाय ना तो शालू? मग घे ना?’’ दादाने म्हटलं.

‘‘नको, फार महाग आहे तो…एखादी कमी किमतीची साडी बघते,’’ वहिनी म्हणाली.

‘‘किमतीची काळजी तू कशाला करतेस? पैसे मी देणार आहे,’’ म्हणत दादाने दुकानदाराला तो शालू पॅक करून द्यायला सांगितलं.

‘‘शशीसाठीही काहीतरी घेऊयात ना?’’ वहिनीने म्हटलं.

‘‘शशी अजून साड्या कुठे नेसते? तिच्यासाठी सलवार कुडत्याचं कापड घेऊयात. लग्नाला शशीलाही बनारसी शालू घ्यायचा आहे,’’ दादा म्हणाला अन् आम्ही दुकानाबाहेर पडलो.

त्या सुंदर सुंदर साड्या बघून मलाही एक साडी घेण्याची फार इच्छा झाली होती. पण दादाने माझ्यासाठी साडी घेतली नाही. मी रागावले होते. घरी आल्या आल्या मी आईकडे तक्रार केली. आईकडे तक्रार करणं म्हणजे स्फोटकांच्या कोठारात पेटती काडी टाकणं असायचं.

आई एकदम भडकली. ‘‘प्रशांत, अरे, स्वत:ची नाही, मनाची काही लाज?’’ तार सप्तकात आईचा तोफखाना सुरू झाला. ‘‘स्वत:च्या बायकोसाठी आठ हजार रुपये खर्च केले. धाकटी बहीण बरोबर होती, तिलाही एखादी साडी घेऊन दिली असती तर काय बिघडलं असतं? बिचारीचा बाप हयात नाही म्हणून तुझ्या दयेवर जगणं नशिबी आलंय.’’

‘‘आई, अगं तिच्यासाठी एवढ्यात साडी कशाला घ्यायची? ती साड्या नेसतच नाही, म्हणून तर तिला भारीतला सलवार सूट घेऊन दिला ना?’’

‘‘म्हणून काय झालं? पुढे साड्या नेसेलंच ना ती? बायकोवर खर्च करायला पैसा असतो अन् सगळे हिशोब आमच्यावर खर्च करतानाच आठवतात.’’

दादा काहीच बोलला नाही. आई दोन तास त्यानंतरही संतापून बडबडत होती.

वहिनीने शालूची घडी आईसमोर ठेवत हळुवारपणे म्हटलं, ‘‘आई, हा शालू आपण शशीसाठीच ठेवूयात…खूप शोभेल हा रंग तिला.’’

आईने रागाने साडी दूर लोटली. ‘‘असू दे सूनबाई, आम्ही शालूसाठी आसुरलेले नाही आहोत. इतकाच पुळका होता तर आधीच तिच्यासाठी आणलं असतं. आता हा देखावा कशासाठी? तुमचा शालू तुम्हालाच लखलाभ होवो…’’ आई जोरजोरात रडायला लागली. ‘‘प्रशांतचे बाबा जिवंत होते तेव्हा खूप चांगलं चांगलं नेसलो. ते मला राणीसारखी ठेवायचे. आता तुमच्या भरवशावर आहोत ना? जसं ठेवाल, तसे राहू. जे द्याल ते वापरू, जे द्याल ते खाऊ…’’ किती तरी वेळ तो शालू तसाच जमिनीवर पडून होता. मग वहिनीने ती घडी उचलली अन् कपाटात ठेवली.

त्यानंतर काही महिन्यांनी दादाच्या एका सहकाऱ्याचं लग्न होत. आम्हा सर्वांना तो घरी येऊन अगत्याचं आमंत्रण देऊन गेला होता.

‘‘आज तो बनारसी शालू नेस ना? घेतल्यापासून तुझ्या अंगावर तो बघितलाच नाहीए…’’ दादाने वहिनीला आग्रह केला.

वहिनी शालू नेसून आली तेव्हा इतकी सुंदर दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरची नजर काढू नये असं वाटत होतं. दादाही मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघत होता.

‘‘चला, चला…सगळे गाडीत बसा…’’ दादा घाई करू लागला.

आईने दादाकडे बघितलं अन् ती तिरस्काराने बोलली, ‘‘हे कपडे घालून तू लग्नाला चलतो आहेस?’’

‘‘का? नवा शर्ट आहे, छान आहे ना?’’

‘‘काय छान आहे? बाहीवर उसवलाय.’’

‘‘अरे च्चा! असं झालं होय? माझ्या लक्षातच आलं नाही…’’ दादा सरळपणे म्हणाला.

‘‘आता तू फाटका शर्ट घालून लग्नाला जा…अन् बायको मिरवतेय बनारसी शालू नेसून. तुला काही कळत का नाही? लोक बघतील तर काय म्हणतील?’’

‘‘मी शर्ट बदलून येतो.’’

‘‘आणा इकडे मी दोन मिनिटांत टाके घालून देते,’’ वहिनी म्हणाली.

दादावहिनी दोघंही पुन्हा खोलीत गेली. दादाने शर्ट बदलला होता. वहिनीनेही बनारसी शालू उतरवून ठेवून साधी सिल्कची साडी नेसली होती.

‘‘का गं बदललीस साडी? किती सुंदर दिसत होतीस?’’ दादा दुखावला गेला होता.

‘‘नाही हो, मला वाटलं, नवऱ्यामुलीपेक्षा मीच जास्त झगझगीत दिसेन की काय म्हणून बदलली.’’ वहिनीने उदास हसत सारवासारव केली.

दादा काहीच बोलला नाही.

त्या दिवसानंतर वहिनीने कधीही तो शालू नेसला नाही. दरवर्षी एकदा उन्हं दाखवून कापूर किंवा लवंगेच्या पुरचुंड्या घालून ती तो व्यवस्थित पांढऱ्या मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवायची.

वहिनीला आईचं बोलणं जिव्हारी लागलंय, हे मला कळत होतं. आमच्या वडिलांच्या अकाली निधनाने आई भयंकर चिडचिडी झाली होती. वहिनीशी तर ती फारच दुष्टपणे वागायची अन् अल्लड वयामुळे मीही अधूनमधून वहिनीची कागाळी आईकडे करून आगीत तेल घालण्याचं काम करत होते.

घरात मी धाकटी होते. सर्वांची लाडकी होते. मला वडिलांची उणीव भासू नये यासाठी दादा सतत प्रयत्न करायचा. शिवाय आम्ही त्याच्या आश्रयाने जगतो आहोत असा न्यूनगंड आईला किंवा मला येऊ नये म्हणूनही तो प्रयत्न करायचा. तरीही आई सतत त्याला टोचून बोलायची, दूषणं द्यायची. स्वत:तच मग्न असतो, बायकोचं कौतुक करतो, आईची-बहिणीची काळजी घेत नाही, एक का दोन…बिच्चारा दादा…कसं सगळं सोसत होता, त्याचं तोच जाणे.

दादा शासकीय अधिकारी होता. पगार फार नव्हता. पण शहरात त्याचा दरारा होता. प्रामाणिक व स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी म्हणून लौकिक होता. बेताच्या पगारामुळे काही वेळा महिन्याच्या शेवटी पैसे संपले की काटकसर करावी लागायची. एकदा ऐन दिवाळीत दादाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्याने आईला विश्वासात घेऊन त्याची परिस्थिती सांगितली. यंदा कुणालाच नवे कपडे नको करूयात अन् फटाके, दिव्यांच्या रोषणाईचा खर्चही बेतात ठेवूयात, वगैरे गोष्टींवर दोघांचं एकमत झालं.

‘‘पण छोटीसाठी मात्र दोन नव्या साड्या घ्यायलाच हव्यात हं! नवे कपडे नाही मिळाले तर तिची दिवाळी आनंदात जाणार नाही. त्यातून पोरीची जात..किती दिवस आपल्याकडे राहाणार आहे? शेवटी परक्याचं धन…’’

‘‘बरं!’’ दादाने मान हलवली.

नव्या साड्या नेसून मी घरभर हुंदडत होते. इतर कुणालाही नवे कपडे नव्हते. पण वहिनीच्या चेहऱ्यावर कुठेही त्रागा, औदासीन्य काहीही नव्हतं. ती मनापासून माझं कौतुक करायची. आई मात्र सतत तिचा राग राग करत असे. दादावहिनी कधी दोघंच कुठे बाहेर जायला निघाली की आईचा पारा चढायचा. ती तोंड फुगवायची. ती दोघं परत आली की आईच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘प्रशांत, अरे, घरात लग्न न झालेली बहीण आहे, आधी तिच्या लग्नाचं बघ. मग तुम्ही नवराबायको हवं ते करा…मी काही बोलणार नाही.’’

कधीतरी वहिनीने केसात फुलं माळली, गळ्यात मोत्यांची माळ घातली तरी आईचा तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. ‘‘सुने, अगं सगळा वेळ नटण्याथटण्यात घालवशील तर तुझ्या मुलांकडे कधी बघशील? मुलं जन्माला घातलीत तर त्यांच्याकडे लक्ष नको द्यायला?’’

नवी साडी नेसून, मॅचिंग ब्लाउज, बांगड्या घालून वहिनी दादाबरोबर बाहेर जायला निघाली की आई तोंड वाकडं करून म्हणायची, ‘‘दोन मुलं झाली तरी अजून साजशृंगाराची हौस फिटली नाहीए. नटमोगरी कुठली…’’

banarasi-sari

वहिनीने नटावं, आपल्याबरोबर बाहेर यावंजावं असं दादाला वाटे. तिला छान साडी नेसून कानातलं, गळ्यातलं घालून तयार झालेली बघितली की त्याचा चेहरा खुलायचा. हेच बहुधा आईला आवडत नसे. तिला वाटे वहिनीने दादावर जादू केली आहे. म्हणूनच तो तिला कधी बोलत नाही. रोज सायंकाळी तो घरी आला की आई त्याच्यापाशी बसून वहिनीच्या कागाळ्या सांगायची. खरं तर ती इतकी सोशिक अन् शांत होती, की मलाही तिचं नवल वाटायचं. मला किंवा आईला तिने कधीही एका शब्दाने दुखावलं नव्हतं. तिच्या या गुणामुळेच दादा तिच्या प्रेमात होता. आई सदैव तिचा अपमान करायची, घालूनपाडून बोलायची, पण वहिनीने कधी दादाकडे तक्रार केली नाही. फारच झालं तर बिच्चारी आपल्या खोलीत बसून रडून घ्यायची. वहिनीचे दोघे धाकटे भाऊ होते. शाळेत शिकणारी ती मुलं कधीमधी बहिणीला भेटायला यायची. भाऊ आले की वहिनीला फार आनंद वाटायचा. ती त्यांच्यासाठी काहीतरी नवा पदार्थ करायची.

त्यावेळी आईच्या संतापाचा पारा चढायचा. ‘‘व्वा! आज तर उत्साह उतू जातोय सूनबाईचा. चला, भावांच्या निमित्ताने का होईना सर्वांनाच चांगलंचुंगलं खायला मिळेल. पण महाराणी सरकार, एक सांगा, तुमचे बंधुराज येताना नेहमीच रिकाम्या हाताने का येतात? बहिणीकडे जाताना काही भेटवस्तू न्यावी हे त्यांना कळत नाही का? येतात आपले रिकाम्या हातांनी…’’

वहिनी हळूच म्हणायची, ‘‘आई, अजून शाळकरी आहेत हो दोघंही…भेटवस्तू घेण्याइतके पैसे कुठे असतात त्यांच्याकडे?’’

‘‘म्हणून काय झालं?’ दहा पाच रुपयांची बिस्किटं तरी आणता येतात ना? पण नाही. दळभद्री कुटुंबातली आहेत ना? त्यांना रीतभात कशी ठाऊक असणार?’’

वहिनीला अशावेळी रडू अनिवार व्हायचं.

पुढे माझं लग्न ठरलं. माझ्या सासरची माणसं फार सजन्न होती. त्यांनी हुंडा, मानपान काहीही घेतलं नाही. दादाने खूप हौसेने माझं लग्न लावून दिलं. पाठवणीच्या वेळी वहिनीने तो बनारसी शालू माझ्या सूटकेसमध्ये ठेवला. ‘‘छोटी, माझ्याकडून तुला ही भेट.’’

‘‘वहिनी, अगं हा तुझा लाडका शालू…’’

‘हो गं, पण नेसायची वेळ येतेय कधी? तू नवी नवरी, तुला तो शोभेल अन् नेसलाही जाईल. नेसशील तेव्हा माझी आठवण काढ.’’

मी वहिनीला मिठी मारली. मनात म्हटलं, ‘‘खरंय वहिनी, तुझी आठवण नेहमीच काढेन. तुझ्यासारख्या स्त्रिया जगात किती कमी असतात. इतक्या उदार मनाच्या, इतक्या सोशिक, कधीही तोंडातून तक्रारीचा सूर न काढणाऱ्या…मी तुझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेन.’’

माझं सासरचं घर भरलं गोकुळ होतं. एक धाकटा दीर, दोघी नणंदा, सासू, सासरे, कुठल्याही नवपरीणित जोडप्याप्रमाणे आम्हा नवराबायकोलाही एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवावा असं वाटे. सायंकाळी नवरा घरी आल्यावर आम्ही दोघं बाहेर फिरायला जाण्याचा बेत असायचा. मी आवरायला लागले की नणंद म्हणायची, ‘‘मीही येऊ का तुमच्याबरोबर?’’

सासूबाई म्हणायच्या, ‘‘काही गरज नाही. आधी होमवर्क पूर्ण कर अन् संध्याकाळच्या स्वयंपाकात मला थोडी मदत कर.’’ नणंद चिडायची. धुसफुसायची पण सासूबाईंचं म्हणणं कुणी टाळत नसे.

मला कळायचं, आम्हाला मोकळेपणा मिळावा म्हणून त्या सीमाला आमच्याबरोबर पाठवत नव्हत्या. मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटायची अन् त्याचवेळी माझी आई माझ्या वहिनीशी कशी वागायची हेही आठवयाचं.

एकदा दादा मला भेटायला आला होता. आईने त्याच्याबरोबर काही भेटवस्तू पाठवल्या होत्या…सासूबाईंनी सर्व वस्तूंचं मनापासून कौतुक केलं होतं. सर्वांना वस्तू दाखवल्या. आईला व दादाला नावाजलं.

मला म्हणाल्या, ‘‘शशी, तुझा दादा प्रथमच आलाय आपल्या घरी. त्याच्या आवडीचा स्वयंपाक कर. एक दोन पक्वान्नं कर.’’ माझंही मन आनंदलं अन् पुन्हा आईची अन् सासूबाईंची तुलना मनाने केलीच. वहिनीच्या माहेरचं कुणी घरी आलं की आईचा रूद्रावतार ठरलेला. स्वत:चा राग, असंतोष व्यक्त करण्यासाठी ती स्वयंपाकघरात जोरजोरात भांडी आपटायची.

माझं लग्न झाल्यावर आईने मला एकांतात बोलावून बजावलं होतं, ‘‘हे बघ छोटी, तुझा नवरा देखणा आहे. त्या मानाने तू डावी आहेस. तुला सांगते ते नेहमी लक्षात ठेव. कायम नटूनथटून व्यवस्थित राहा. स्वत:ला आकर्षक ठेव, तरच नवरा तुझ्यावर प्रेम करेल.’’

‘‘पण वहिनी थोडीही नटली तर तू तिला केवढी ओरडायचीस?’’ मी म्हटलं.

‘‘तिची गोष्ट वेगळी, तुझी गोष्ट वेगळी.’’ आई म्हणाली होती.

इथे माझ्या सासरी कोणताही सण, समारंभ, उत्सव असला की माझी सासू आग्रह करून मला नवी साडी नेसायला लावायची. दागिने घालायला लावायची. सगळ्यांना सांगायची, ‘‘बघा, माझी सून कशी छान दिसतेय ना?’’

तिथे माझ्या आईने लक्ष्मीसारख्या माझ्या वहिनीला सतत धारेवर धरलं होतं. एक दिवस कधी बिचारी सुखाने राहिली नाही. सतत टोमणे, सतत संताप, दादाच्या आयुष्यातही तिने विषय कालवलं होतं. वहिनी तर बिचारी करपून गेली होती.

मला वाटतं त्यामुळेच वहिनीला जीवनाची आसक्ती उरली नव्हती. कॅन्सर झालाय हेदेखील तिने दादाला कळू दिलं नाही. मुकाट्याने घरकामाचा डोंगर उपसत राहिली. दादाच्या लक्षात आलं तेव्हा फार उशीर झाला होता.

मी दादाच्या घरी पोहोचले तेव्हा प्रेतयात्रेची तयारी झाली होती. मी बरोबर आणलेला बनारसी शालू तिच्या निष्प्राण देहावर पसरवला अन् अत्यंत आदराने तिला नमस्कार केला

‘‘छोटी, अगं काय करते आहेस? थोड्या वेळातच सगळ्याची राख होणार आहे.’’ आईने मला बाजूला घेऊन दमात घेतलं.

‘‘होऊ दे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मला डोळ्यांपुढे वहिनीचं ते नववधूचं रूप दिसत होतं. सुंदर सतेज चेहरा, ओठावर सलग हास्य अन् डोळ्यांत नव्या संसाराची कोवळी स्वप्नं…

तिरडी उचलली तेव्हा आईचा आक्रोश सर्वांपेक्षा अधिक होता. ती हंबरडा फोडून रडत होती. दादा तर जणू दगड झाला होता. दोन्ही मुलं रडत होती पण धाकटी पाच वर्षांची स्नेहा काहीच न समजल्यामुळे बावरून उभी होती. मी तिला उचलून घेतली. दहनविधी आटोपून घरी परतलेल्या दादाला मी म्हटलं, ‘‘मुलं मोठी आहेत. काही दिवसांनी त्यांना हॉस्टेलला ठेव. हिला मी नेते. मी हिला सांभाळेन, वाढवेन. अन् तू म्हणशील तेव्हा तुझ्याकडे परत पाठवेन.’’

तेवढ्यात आईने म्हटलं, ‘‘छोटी, अगं भलतंच काय बोलतेस? तुझ्यावर कशाला तिची जबाबदारी? उगीचच तुला त्रास?’’

‘‘नाही आई, मला अजिबात त्रास होणार नाही. उलट, ती इथे राहिली तर तूच तिला सांभाळायला असमर्थ ठरशील.’’

‘‘अगं पण, तुझ्या सासूला विचारलं नाहीस, अन् एकदम हिला नेलीस तर त्यांना काय वाटेल? त्या काय म्हणतील?’’

‘‘माझी सासू तुझ्यासारखी नाहीए. त्यांना माझा निर्णय आवडेल. त्या मला पाठिंबाच देतील,’’ मी ठामपणे बोलले.

मला वाटतं वहिनी वरून आमच्याकडे बघते आहे.?शांत, प्रसन्न हास्य तिच्या चेहऱ्यावर आहे… ‘‘वहिनी,’’ मी मनातच बोलले, ‘‘तुजी ही लेक मी नेते आहे. तुझा ‘अनमोल ठेवा’ म्हणूनच मी तिला वाढवेन. मला खात्री आहे, ही तुझेच संस्कार घेऊन जन्माला आली आहे. तुझं रूप मी तिच्यात बघते आहे. तू निश्चिंत राहा…’’

व्हॅलेंटाइन डे (प्रेमाचा स्विकार)

कथा * सिद्धार्थ जानोरीकर

सकाळी सकाळीच मनीषानं उत्स्फुर्तपणे विचारलं, ‘‘बाबा, आज आईला काय गिफ्ट देताय तुम्ही?’’

‘‘आज काय विशेष आहे बुवा?’’ प्रश्नार्थक चेहऱ्यानं मी लेकीला विचारलं?

‘‘कमाल करता बाबा तुम्हीसुद्धा! गेली कित्येक वर्ष तुम्ही आजचा हा दिवस विसरता आहात. अहो, आज ना, व्हॅलेंटाइन डे आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो त्याला आजच्या दिवशी काहीतरी भेट द्यायची असते.’’

‘‘ते मला ठाऊक आहे, पण इंग्रजांच्या या असल्या फालतू चालीरिती आपण का म्हणून पाळायच्या?’’

‘‘बाबा, प्रश्न देशीविदेशीचा नाहीए, फक्त प्रेम व्यक्त करण्याचा आहे.’’

‘‘मला नाही वाटत खऱ्या प्रेमाला कधी व्यक्त करण्याची गरज असते म्हणून. तुझ्या आईच्या आणि माझ्यामधलं प्रेम तर जन्मोजन्मीचं आहे.’’

‘‘मनू, तूसुद्धा पण कुणाला समजावण्याचा प्रयत्न करते आहेस?’’ माझी जीवन संगिनी तिरसटून म्हणाली. ‘‘हे सगळं यांना सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. ज्यात पाच दहा रूपयेच खर्च होण्याची शक्यता असते. तेवढंदेखील गिफ्ट हे कधी देऊ शकत नाहीत.’’

‘‘सीमा, अगं असं काय बोलतेस? माझ्या या हृदयाचा तरी थोडा विचार कर…अगं, महिन्याचा अख्खा पगार तुला हातात आणून देतो ना?’’ मी दु:खी चेहऱ्यानं अन् भरल्या गळ्यानं बोललो.

‘‘हो आणि पै न् पैचा हिशेबही मागून घेता ना? नाही दिला तर भांडण काढता…एक तर माझा सगळा पगार जातो कार आणि घराचे हप्ते फेडण्यात…स्वत:च्या मर्जीनं खर्चायला शंभर रूपयेही मिळत नाहीत मला…’’

‘‘हा आरोप तू करतेस? अगं, ठासून कपाट भरलंय साड्यांनी…काय दिवस आलेत. लेकीच्या नजरेत बापाची किंमत कमी व्हावी म्हणून आईच खोटं बोलतेय?’’

‘‘पुरे झाला नाटकीपणा. एक सांगा. त्या कपाटातल्या किती साड्या तुम्ही आणून दिल्या आहेत मला? प्रत्येक सणावाराला माझ्या माहेरून साड्या मिळतात मला. म्हणून निदान मैत्रिणींपुढे तोऱ्यात वावरतेय मी…नाही तर कठीणच होतं.’’

‘‘बाबा, आईला खूष करायला कुठं तरी दोन-चार दिवस फिरवून आणा ना?’’ मनीषानं आमचं भांडण थांबवण्यासाठी विषय बदलला.

‘‘पुरे गं तुझं!! या घराच्या रामरगाड्यातून बाहेर पडून थोडा मोकळा श्वास घेईन, असं भाग्य नाहीए माझं!’’ स्वत:चं कपाळ बडवून घेत सीमा नाटकीपणानं म्हणाली.

‘‘कशाला खोटं बोलतेस गं? दरवर्षी तू आपल्या भावाकडे महिना-पंधरा दिवस राहून येतेस ना?’’ मी लगेच तिला आठवण करून दिली.

‘‘बाबा, मी सिमला किंवा मसुरीविषयी बोलत होते.’’ मनीषानं विषय स्पष्ट करून सांगितला.

‘‘तू का अशा नको त्या गोष्टी बोलते आहेस गं? कधीही मी यांना एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊयात ना, असं म्हटलं की काय म्हणायचे ठाऊक आहे? अगं अंघोळ करून ओल्या कपड्यात गच्चीवर फेऱ्या मार…मस्त हिल स्टेशनला गेल्यासारखं वाटेल.’’

‘‘अरेच्चा? गंमत केली तर तेवढंही लेकीला सांगून माझ्याविरूद्ध भडकवते आहेस तिला?’’ मला रागच आला.

माझ्या रागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सौ. आपल्या तक्रारी सांगतच होती. ‘‘यांच्या चिक्कूपणामुळे खूप खूप सहन करावं लागलंय मला. कधी तरी मला वाटायचं, आज घरी नको करूयात स्वयंपाक, हॉटेलमध्ये जेऊयात. तर हे माझ्या सुग्रणपणाचं इतके गोडवे गायचे की काय सांगू? जणू मीच जगातली सर्वोत्कृष्ट कुक आहे…’’

‘‘पण आई, हा तर बाबांचा चांगलाच गुण झाला ना? तुझं, तुझ्या सुग्रणपणाचं कौतुक करतात…’’ मनीषानं माझी बाजू घेतली.

‘‘डोंबलाचं कौतुक…’’ सीमा कडाडली, फक्त पैसे वाचवायचे, हॉटेलचा खर्च करायला नको म्हणून हे सगळं!’’

‘‘ओफ!’’ लेकीनं माझ्याकडे अशा नजरेनं बघितलं जणू मी खलनायक होतो.

‘‘माझा वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस असो, फक्त पाव किलो मिठाई आणली की यांचं कौतुक संपलं! रसमलाई नाही तर गुलाबजाम…तेही फक्त पाव किलो…कधी फुलांचा बुके नाही की साडी अथवा दागिना नाही.’’ सीमाचा राग कडकलेलाच.

मनु, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. या व्हॅलेंटाइन डेनं हिचं डोकंच फिरलंय. माझ्या बायकोसारख्या सरळसाध्या बाईचं डोकं फिरवणारा हा वाह्यात दिवस मी कधीही साजरा करणार नाही.’’ मी ठामपणे माझा निर्णय जाहीर केला. दोघी मायलेकी माझ्यावर रागावल्या होत्या बहुतेक. दोघींपैकी कुणी एक, काही बोलणार तेवढ्यात बाहेरच्या दाराची घंटी वाजली.

मी दार उघडलं अन् आश्चर्यानं ओरडलो, ‘‘अरे बघा तरी किती सुंदर पुष्पगुच्छ आलाय…’’

‘‘कुणी पाठवलाय?’’ माझ्या?शेजारी येऊन उभी राहिली होती सीमा. तिला नवल वाटलं होतं.

‘‘मुळात कुणाला पाठवलाय?’’ माझ्या हातातून तो बुके घेऊन त्यावरील कार्डावरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत मनीषा म्हणाली. मी पुन्हा तिच्या हातून तो बुके माझ्या हातात घेतला. या कार्डावर लिहिलंय, ‘‘हॅप्पी व्हॅलेंटाइन डे.’’

‘‘माय स्वीट हार्ट.’’ कोण कुणाला स्वीट हार्ट म्हणतंय.

‘‘ते काही कळत नाहीए.’’ मी बावळटासारखा बोललो.

‘‘मनु, इतका सुंदर बुके तुला कुणी पाठवलाय?’’ सीमानं अगदी गोड आवाजात लेकीला विचारलं.

पुष्पगुच्छ स्वत:च्या हातात घेऊन मनीषानं तो चारही बाजूंनी नीट निरखून बघितला. मग, जरा वैतागून म्हणाली, ‘‘मॉम, मला काहीच कळत नाहीए.’’

‘‘राजीवनं पाठवला असेल का?’’

‘‘छे छे एवढा महाग बुके त्याच्या बजेटच्या बाहेर आहे.’’

‘‘मग मोहितनं?’’

‘‘तो तर हल्ली त्या रीतूच्या मागेपुढे शेपूट हलवत फिरतोय.’’

‘‘दीपक?’’

‘‘नो मॉम, वी डोंट लाइक ईच अदर व्हेरी मच…’’

‘‘मग कुणी बरं पाठवली असतील इतकी सुंदर फुलं?’’

‘‘एक मिनिट! तुम्ही मायलेकी जरा सांगाल का? आता जी नावं घेतली ती कोण मुलं आहेत?’’ माझ्यातला बाप जरबेनं म्हणाला.

‘‘इश्श! ती सगळी मनीषाच्या कॉलेजातली मुलं आहेत.’’ झटकून टाकल्यासारखं सीमानं म्हटलं.

‘‘पण ही सगळी नावं तुला कशी माहीत?’’

‘‘अरेच्चा? मनीषा रोज मला तिच्या कॉलेजमधल्या घडामोडी सांगत असते ना? मी काही दिवसरात्र तुमच्याप्रमाणे पैशापैशाचा हिशेब करत बसत नाही.’’

‘‘मी तो हिशेब ठेवतो म्हणूनच कुणापुढे हात पसरावा लागत नाही…समजलं? ते सोड, विषय सध्या वेगळा आहे…ज्या मुलांची नावं तू आता घेतलीस…’’

‘‘ती सगळी तिच्या कालेजमधली मुलं आहेत. मित्र आहेत तिचे.’’

‘‘मनीषा, तू कॉलेजमध्ये अभ्यासासाठी जातेस ना? की फक्त सोशल सर्कल वाढवते आहेस?’’ मी विचारलं.

‘‘बाबा, माणूस म्हणून व्यक्तित्त्वाचा पूर्ण विकास व्हायला हवा ना?’’ मनीषा फुत्कारली.

‘‘ते खरंय, पण पुष्पगुच्छ पाठवणाऱ्यांची संभावित यादी बघून मी जरा धास्तावलो आहे.’’

‘‘जस्ट रिलॅक्स बाबा! हल्ली मुलं देणंघेणं फार कॉमन, अगदी साधी गोष्ट आहे. फुलं देताना, ‘मी तुद्ब्रयावर प्रेम करतो/करते, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही’ असं कुणी म्हणत नाही. तो फालतूपणा ठरतो आता.’’ लेक अगदी कूल होती.

‘‘हल्ली घटस्फोटाचं प्रमाण का वाढलंय, या विषयावर आपण नंतर कधी तरी चर्चा करूयात. पण आता मला एवढीच खात्री करून घ्यायची आहे की हा पुष्पगुच्छ तुला पाठवला गेलेला नाहीए, हे नक्की ना?’’

‘‘सॉरी पप्पा, हा बुके माझ्यासाठी नाहीए…’’

तिचं उत्तर ऐकून मी मोर्चा सीमाकडे वळवला. थोडं तिरकसपणे विचारलं, ‘‘तुझ्यावर जीव टाकणाऱ्या १०-२० लोकांची नावं तूही सांगून टाक राणी पद्मावती.’’

‘‘आता ही पद्मावती कुठून उपटली मध्येच?’’ मनीषानं म्हटलं.

‘‘मिस इंडिया, थोडा वेळ गप्प बसता येईल का?’’ मी ओरडलो तशी मनीषा गप्प बसली.

‘‘फुकटे प्रियकर पाळत नाही मी. त्यापेक्षा एखादं कुत्र पाळेन.’’ सीमा रागानं माझ्याकडे बघत फुत्कारली.

‘‘बाबा, मला काही सांगायचंय…’’ मनीषाच्या चेहऱ्यावर लबाड हसू अन् खट्याळ भाव होता.

‘‘तुला गप्प बसायला सांगितलं होतं ना? पण नाही, शेवटी तूही स्त्री आहेस. कुठलाही पुरूष स्त्रीला गप्प बसवू शकत नाही…ते सोड, काय म्हणायचंय तुला?’’

‘‘बाबा, मला वाटतं, मीना मावशीच्या मुलीच्या लग्नात तुमचे चुलत भाऊ, ते…रवीकाका आले होते…त्यांचे मित्र नीरज…त्यांनी तर हा बुके मॉमसाठी पाठवला नसेल?’’

‘‘म्हणजे, तुला म्हणायचंय, तो मिशीवाला नालायक तुझ्या आईवर लाइन मारतोय?’’

‘‘मिशीचं सोडा बाबा, पण तो माणूस स्मार्ट आहे.’’

‘‘तुमचं काय म्हणणं आहे बाईसाहेब?’’ मी सीमाला विचारलं.

‘‘मी कशाला काय म्हणू? तुम्हाला जी काही विचारपूस चौकशी करायची असेल, ती त्या मिशीवाल्याकडे करा.’’ झुरळ झटकावं तसा सीमानं विषय झटकला.

‘‘अगं, पण निदान इतकं तरी कळू देत की तू तुझ्याकडून त्याला काही संकेत दिला होता का?’’

‘‘ज्यांना दुसऱ्यांच्या बायका बघून तोंडाला पाणी सुटतं, त्यांना साधं हसून कुणी नमस्कार केला तरी संकेत वाटतो?’’

‘‘मनू, मला नाही वाटत त्या मिशीवाल्याकडे तुझी आई प्रभावित वगैरे झाली असेल…इतर कुणाची नावं सुचव.’’ मी लेकीला डोळा मारला.

‘‘अगंऽऽ! मला वाटतं,  ममाच्या ऑफिसमधले ते आदित्य साहेब ते ऑफिसच्या पार्टीत नेहमी ममाभोवती घुटमळत असतात…’’ काही क्षण विचार करून लेकीनं आपल्या आईच्या चाहत्यांच्या यादीत एका नावाची भर घातली.

‘‘तो इतका सुंदर बुके नाही पाठवणार…’’ मी नकारार्थी मान हलवंत बोललो. ‘‘एक तर त्याची पर्सनॅलिटी काहीच्या काहीच आहे. शिवाय बोलताना किती थुंकी उडवत असतो.’’

‘‘आठवलं…बाबा…आपल्या गल्लीच्या तोंडाशी राहणारे ते महेशजी? ते असतील का?’’ लेकीनं विचारलं.

‘‘त्यांचं नाव कशाला घेते आहेस तू?’’

‘‘बाबा, त्यांचा घटस्फोट झालाय अन् सकाळी आई फिरायला जाते. तेव्हाच तेही फिरत असतात. कदाचित त्यांचा काही गैरसमज झाला असेल…’’

‘‘तू म्हणतेस तसं असू शकतं बरं का?’’

‘‘काय असू शकतं? डोंबलं तुमचं?’’ सीमा एकदम भडकली.

‘‘पार्कात ते म्हातारं सारखं कफ थुंकत चालत असतं. अन् तुम्ही दोघं, प्लीज असल्या कुणाबरोबर माझं नाव जोडू नका सांगून ठेवते…जर हा पुष्पगुच्छ माझ्यासाठी असेल तर पाठवणाऱ्यांचं नाव मला ठाऊक आहे.’’ सीमा चक्क हसली.

‘‘क…क…कोण…कोण आहे तो?’’ तिला हसताना बघून मी एकदम नर्व्हस झालो. चक्क ‘ततपप’ झालं.

‘‘नाही सांगणार…’’ सीमाच्या चेहऱ्यावर गूढ हास्य…मी गांगारलो.

माझ्या मन:स्थितीची अजिबात कल्पना नसलेली मनीषा सहजपणे म्हणाली, ‘‘आई, हा बुके पप्पांसाठीही असू शकतो ना?’’

‘‘नो!’’ ठामपणे सीमानं म्हटलं अन् माझ्याकडे बघून हसायला लागली.

‘‘मायासाठी का नसावा?’’ मी भडकलोच. ‘‘अजूनही बायका माझ्यावर लाइन मारतात. त्यांच्या डोळ्यांत प्रेम दिसतं माझ्याविषयी.’’

‘‘मम्मा, बाबांची पर्सनॅलिटी तशी वाईट नाहीए…’’ मनीषा म्हणाली.

‘‘एक्सक्यूज मी…पर्सनॅलिटी तशी वाईट नाहीएचा काय अर्थ?’’ मी संतापून मनीषाला विचारलं. माझ्या संतापाकडे दुर्लक्ष करून ती चक्क हसायला लागली.

‘‘मनू, प्रश्न पर्सर्नेलिटीचा नाहीए…यांच्या चिक्कूपणाचा आहे. अगं स्त्रियांना पैसे खर्च करणारे पुरूष आवडतात. हे जर पैसेच खर्च करणार नाहीत तर कोण स्त्री यांच्यावर भाळेल?’’

‘‘आई, तुला कुणा एकाही बाईचं नाव आठवत नाहीए, जी बाबांना हा बुके गिफ्ट म्हणून पाठवेल?’’

‘‘नाही.’’

‘‘बाबा, काय हे? तुमची मार्केट व्हॅल्यू तर अजिबातच नाहीए…’’ लेकीनं मला सहानुभूती दाखवली.

‘‘पोरी, घर की मुर्गी दाल बराबर, तसं चाललंय हे…’’ मी ऐटीत आपली कॉलर टाइट केली तर सीमा हसायला लागली.

‘‘आता तर खरंच अवघड झालंय. कुणी पाठवला असेल हा बुके?’’ मनीषाच्या चेहऱ्यावर आता काळजी दिसू लागली. सीमाही त्रस्त होती.

काही वेळ सगळेच गप्प होतो. मग मीच मधाचा गोडवा अन् अधिकाऱ्याचा रूबाब आवाजात आणून विचारलं, ‘‘सीमा, प्रेमभावना प्रकट करणारा हा सुंदर पुष्पगुच्छ मी तुला पाठवला, तुझ्यासाठी खरेदी केला असं नाही का होऊ शकत?’’

‘‘इंपॉसिबल! याबाबतीतली तुमची कंजूसी तर जगप्रसिद्ध आहे,’’ सीमा फाडकन् उत्तरली.

माझ्या चेहऱ्यावर दु:ख दाटून आलं. त्यांना तो माझा अभिनय वाटला अन् दोघी खळखळून हसू लागल्या.

मग हसण्याचा भर थोडा ओसरल्यावर सीमानंही नाटकीपणानं एक दीर्घ उसासा सोडून म्हटलं, ‘‘एवढं कुठलं माझं मेलीचं भाग्य की नवरा एवढा महागाचा, सुंदर बुके मला भेट देईल?’’

‘‘मला वाटतं फूलवाल्यानं चुकून आपल्याकडे बुके दिला असावा, थोड्याच वेळात तो हा बुके परत घ्याला येईल.’’ मनीषानं एक नवाच विचार मांडला.

‘‘हा कागद बघा, यावर आपल्या घराचा पत्ता लिहिलाय. अन् हे अक्षर तुम्ही दोघी ओळखता.’’ मी खिशातून एक कागद काढून दाखवला.

‘‘हे तर तुमचंच अक्षर आहे.’’ आश्चर्यानं मनीषा म्हणाली.

‘‘पण हा कागद तुम्ही आम्हाला का दाखवता आहात?’’ कपाळाला आठ्या घालून सीमानं विचारलं.

‘‘ही चिठ्ठी घेऊनच तो फुलवाल्याचा पोरगा आमच्या घरापर्यंत आला होता. मला वाटतं, माझ्या शरीरातही एक प्रेम करणारं हृदय धडधडत असतं हे तुम्ही विसरला आहात. सतत पैशाच्या हिशोबात मी गुंतलेला असतो हे खरंय पण उत्पन्न कमी अन् खर्च जास्त यामुळे मी असा झालोय…मलाही माझं प्रेम व्यक्त करावंसं वाटतं पण ते व्यक्त करता येत नाही. अव्यक्त प्रेम माझ्या माणसांना कळत नाही.’’ मी आपल्या भावना व्यक्त केल्या अन् थकलेल्या पावलांनी बेडरूमकडे जाऊ लागलो.

‘‘आय एम सॉरी बाबा, तुम्ही तर माझे लाडके हिरो आहात.’’ मला बिलगंत मनीषानं म्हटलं. तिचे डोळे पाणावले होते.

‘‘मलाही क्षमा करा डार्लिंग, माय स्वीट हार्ट.’’ सीमाही जवळ येऊन बिळगली. तिचेही डोळे डबडबले होते.

मी त्यांना दोघींना प्रेमानं जवळ घेऊन थोपटलं अन् म्हणाले, ‘‘क्षमा मागायची   गरजच नाहीए. आजच्या या व्हॅलेंटाइन दिवसानं आपल्याला धडा शिकवला आहे. आता यापुढे मी ही लवकर अन् वरचेवर माझं प्रेम व्यक्त करत जाईन. मला  बदलायलाच हवं. नाहीतर खरोखरंच कोणी महाभाग पुढल्या व्हॅलेंटाइन डेला माझ्या हृदयेश्वरीला फुलांचा गुच्छ पाठवायचा…’’   मी म्हणालो.

‘‘इश्श! भलतंच काय? माझ्या मनात फक्त तुम्हीच आहात. तिथं दुसरा कुणी येऊच शकणार नाही.’’ सीमानं म्हटलं…अन् ती चक्क लाजली.

‘‘आई, मला पण असं प्रेम करण्याची अन् एकच मूर्ती मनांत जपण्याची कला शिकव हं!’’ खट्याळपणे हसत मनीषानं आम्हां दोघांना मिठी मारली. आम्ही तिघं एकमेकांवर किती प्रेम करतो अन् एकमेकांच्या किती जवळ आहेत आम्हाला कळलं होतं.

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

कथा * ऋता गुप्ते

ऑफिसात नवीन जनरल मॅनेजर येणार होते. प्रत्येकाच्या तोंडी तोच विषय. जुने जी.एम जाणार. त्यांना सेंड-ऑफ द्यायचा. नवीन जी.एम. येणार त्यांना वेलकम करायचं. ऑफिसातल्या रिकामटेकड्यांना उद्योग मिळाला. नवे साहेब कुठून येताहेत. स्वभाव कसा आहे. बायको, मुलंबाळं किती, कशी? पण त्यांना फारशी माहिती मिळत नव्हती. मात्र त्यांच्या खूपच खूप बदल्या झाल्या आहेत एवढंच कळलं होतं.

ठरलेल्या दिवशी साहेब आले. जंगी स्वागत झालं. जुने साहेबही निरोप घेताना गहिवरले. हळूहळू सगळं आपापल्या जागी ठीकठाक झालं.

आपल्या वातानुकूलित चेंबरमध्ये बसलेला शशांक म्हणजे नवा जी. एम. घामाघूम झाला होता. त्याच्या मनातला तो संशायचा किडा त्याला सुखानं जगू देत नव्हता. समोरचा माणूस आपल्याला खुनी किंवा अपराधी मानतो आहे का असं त्याच्या मनात यायचं. त्यामुळेच तो लोकांशी बोलताना धास्तावलेला असायचा. लोकांना खरं तर काहीही ठाऊक नसतं. पण आपलाच संशय आपल्याला सुखानं जगू देत नाही. अनेक लोकांना त्याच्या या वागण्याचं नवल अन् कुतुहल वाटे. तरीही हळूहळू शशांकचा विनम्र स्वभाव, त्याची हुशारी, इतरांना समजून घेण्याची अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे तो ऑफिसात लोकप्रिय झाला होता.

शशांक या ऑफिसात आला, तेव्हा नीरज दीड महिन्याच्या रजेवर होता. परतून आल्यावर त्यानं जनरल मॅनेजर म्हणून शशांकला बघितलं, तेव्हा तो एकदम आनंदला. कारण पूर्वी तो आणि शशांक एकत्र काम करून चुकले होते. तो उत्साहानं शशांकला भेटायला आला. पण मनात चोर असलेल्या शशांकनं अत्यंत थंडपणानं त्याचं स्वागत केलं अन् जेमतेम काही वाक्य बोलून तो आपल्या फायलीत डोकं घालून बसला. शशांकवर कदाचित नव्या ऑफिसच्या जबाबदारीचं दडपण असेल असं समजून नीरजनंही त्याची रजा घेतली.

नीरज चेंबरबाहेर गेला, तेव्हा शशांकचे कान बाहेरच्या हालचालींकडेच होते. त्याला दरदरून घाम फुटला. आता नीरजनं बाहेर जाऊन स्टाफला काय काय सांगितलं असेल? लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील?

आता त्याचं कामांत लक्ष लागेना. फायली तशाच बाजूला सारून तो बसून राहिला. घड्याळाकडे बघितलं अजून फक्त बाराच वाजले होते. वाटलं, घरी निघून जावं. पण घरी तरी जाऊन काय करणार? घरात अरूणा नाहीए ना?

एव्हाना नीरजनं सर्वांना सांगितलं असेल…त्याला तरी खरं खोटं कितपत ठाऊक आहे? नीरजलाही वाटत असेल का की मीच अरूणाला पेटवलं…जाळून मारलं…शशांक विचार करत होता.

आठवणींचं ते बोचकं उघडू उघडू बघत होतं. शशांक त्यावर वर्तमानकाळाचं दडपण ठेवू बघत होता. पण त्या आठवणी उसळून बाहेर आल्याच…विसरू म्हणता त्या विसरून होत नव्हत्या.

नुकतंच लग्न झालं होतं शशांकचं. ‘‘अरूणा, किती सुंदर आहेत तू. माझ्या आईनं तुझी निवड केली म्हणून मी तिला धन्यवाद देत असतो.’’

अरूणा लाजली. गाल लाल लाल झाले. शशांक अधिकच वेडा झाला.

खरोखर भारलेलेच दिवस होते ते. सोन्याचे दिवस अन् चांदीच्या रात्री. शशांक अरूणाच्या सौंदर्यावर सुंदर कविता करायचा. त्याच्या डायरीत त्या कविता समाधानानं विसावल्या होत्या. त्याचं हृदय अत्यंत कोमल होतं. संवेदनाक्षम होतं. त्या उलट अरूणा अत्यंत कठोर आणि व्यवहारदक्ष होती. तिचा रूक्ष स्वभाव तिच्या सौंदर्याशी फारच विसंगत होता. मनीऑर्डरची ती बारकशी पावती की काय अन् त्यावरून तिनं घातलेला धिंगाणा काय.

‘‘शशांक, हे दोन हजार रूपये तुम्ही कुणाला पाठवले आहेत?’’ अरूणानं कठोर आवाजात प्रथमच विचारलं.

‘‘अरेच्चा? ही पावती माझ्या डायरीत होती. याचा अर्थ तू माझी डायरी बघितलीस अन् तुझ्यावर लिहिलेल्या कविताही वाचल्यास?’’ तिला प्रेमानं मिठीत घेत शशांक म्हणाला.

अरूणा गुश्शातच होती.

‘‘अगं, आईला पाठवले. मी दर महिन्याला तिला पाठवतो पैसे.’’ अगदी मोकळेपणानं शशांकनं सांगितलं अन् तो ऑफिसमध्ये घडलेली एक मजेदार घटना तिला सांगू लागला.

अरूणामध्ये झपाट्यानं होणारा बदल त्याच्या आधी लक्षात आला नाही. त्याच्या कविमनाला अरूणाचा रूक्ष व्यवहारवाद खटकला तरी ध्यानात आला नाही. अरूणा आता सतत नव्या नव्या मागण्या करायची. मागणी पूर्ण झाली नाही तर भांडण करायची.

‘‘अरूणा, या महिन्यात आपल्याला पडदे करणं जमणार नाहीए. पुढल्या महिन्यात नक्की करूयात…अन् खरं सांगू का? तुझ्या गुलाबी गालांना मॅच होणारे हे गुलाबी पडदेच मला फार आवडतात.’’

शशांकला वाटायचं, अरूणानं नीट बजेट आखावं. त्याप्रमाणे खर्च करावा. आईला तो फक्त दोन हजार पाठवायचा. उरलेले बारा हजार अरूणाच्याच हातात द्यायचा. एवढा पैसा हातात असूनही अरूणा समाधानी नव्हती.

‘‘वडील कमवतात ना तुमचे? मग आईला तुम्ही पैसे पाठवायची काय गरज आहे?’’ अरूणा फणकारली.

‘‘अगं, बाबांचा पगार कमी आहे. काही कर्ज फेडायचं आहे. मला एवढं शिकवलं, मोठा ऑफिसर झालो. आईच्या कष्टावरच ना? तिला किती इच्छा माराव्या लागल्या त्या काळात. आता थोडी निवांत जगेल…म्हणून पाठवतो तिला पैसे.’’

शशांकने समजावलं तरी अरूणा हातातले बारा हजार विसरून त्या दोन हजारांसाठी रोज भांडण उकरून काढायची. सर्व गरजा भागवून, थोडी फार चंगळ करूनही बारा हजार रूपये मोठीच रक्कम होती. पण रोजची वादावादी, तणाव यामुळे शशांक दु:खी झाला. त्याच्या गुलाबी डायरीतल्या कविता पार कोमेजल्या.

वेळ मिळाला की कविता करणारा शशांक आता अधिक पैसे कसे मिळवायचे अन् अरूणाला खुश कसं ठेवायचं यातच गुंतला. लहानगा कौशल त्या दोघांना जोडणारा दुवा होता. पण अरूणाला संतापाचा झटका आली की ती त्याच्याकडेही साफ दुर्लक्ष करायची. तिचा मूड बिघडू नये म्हणून हल्ली शशांक आपल्या आईवडिलांना पाठवलेले पैसे तिच्यापासून चोरून, लपवून ठेवायचा.

त्या दिवशी अरूणानं घराची साफसफाई करायला घेतली होती.

‘‘हे तुमच्या वडिलांचं पत्र सापडलंय मला. दोन महिन्यांपूर्वी आलेलं दिसतंय. त्यांनी तुमच्याकडे दहा हजार रुपये मागितले आहेत. तुम्ही पाठवले नाहीत ना?’’

अरूणाच्या प्रश्नानं शशांक एकदम भांबावला. त्यानं तर पैसे पाठवून दिले होते. फक्त अरूणानं चिडू नये, भांडू नये म्हणून तिला चोरून पाठवले होते. मागच्या महिन्यात त्याला प्रमोशन अन् एरियर्स मिळाले होते. ते त्यानं घराच्या डागडुजीसाठी वडिलांना पाठवले होते.

अरूणा संतापली. शशांकचा चेहरा खोटं बोलू शकला नाही.

‘‘थांबा जरा, तुम्हाला चांगला धडा शिकवते. जन्मभर लक्षात राहील.’’

खरंतर आता शशांकचा पगार भरपूर वाढला होता, पण अरूणा त्या दहा हजार रुपयांसाठी भांडत होती. रोजच ती आत्महत्त्येची धमकी द्यायची. तिच्या धमक्यांना शशांक कंटाळला होता. अरूणाच्या बडबडीकडे लक्ष न देता कौशलचा हात धरून शशांक घराबाहेर पडला. त्याला शाळेत सोडलं अन् मग तो ऑफिसला गेला. तो तिथं पोहोचतोय तोवर सहकाऱ्यानं सांगितलं, ‘‘लवकर घरी जा. तुझ्या शेजाऱ्यांचा फोन आला होता. वहिनींना खूप भाजलंय.’’

ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेली अरूणा दहा दिवस हॉस्पिटलमध्ये तडफडत होती.

‘‘मला वाचवा शशांक…मला जगायचंय. मी तर फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी पेटवून घेतलं होतं…’’ अरूणाचे ते शब्द तो विसरू शकला नव्हता. आपल्या क्रोधाग्नीत तिनं स्व:तलाच भस्म केलं होतं असं नाही तर लहानग्या कौशल अन् प्रेमळ शशांकचं आयुष्यही पार होरपळून निघालं होतं. आयुष्यातल्या सगळ्या आनंदाला करपट वास येत होता. कुणी काही म्हणायचं, कुणी काही बोलायचं. पोलीस केस झाली. पेपरला बातम्या…पण सुदेवाने अरूणानं मृत्यूपूर्वी स्वत:ची चूक कबूल केली. पण व्हायची ती मानहानी जालीच होती. त्याचे आईबाबा तर अवाक् होते. त्यांनी हाय खाल्ली. दोघंही एका मागोमाग एक मरण पावली.

उरले फक्त शशांक व कौशल. या बाप लेकांसमोर उभं आयुष्य वैराण वाळवंटासारखं पसरलं होतं. अरूणानं आई म्हणून अन् पत्नी म्हणून कर्तव्यात खरोखर कसूर केली होती. अन् शिक्षा हे बापलेक भोगत होते. कुणीही भेटलं की अरूणाचा विषय निघायचाच. स्वत:ची सफाई देता देता, स्वत:ला निर्दोष सिद्ध करता करता शशांक दमला होता. अरूणाबद्दलची घृणा मनातून जात नव्हती. तो सतत बदली करून घेत नव्या नव्या जागी पोहोचत होता.

अरूणाच्या मृत्यूमुळे शशांक बरोबरच कौशलही आत्मविश्वास घालवून बसला होता. त्यामुळे तो तोतरं बोलायचा.

एकदा घरात काम करत असताना शशांकला जाणवलं की कौशल त्याच्याकडे टक लावून बघतो आहे.

‘‘काय झालं कौशल? असा का बघतोस?’’

‘‘बा…बाबा…तू…तुम्ही आईला मा…मारलं?’’ तोतरत कौशलनं विचारलं.

‘‘कुणी सांगितलं तुला? मी नाही रे मारलं. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिनं स्वत:ला जाळून घेतलं.’’ मुलाला मिठीत घेत शशांक म्हणाला.

‘‘त…तो…रो…हि…त…म्हणत हो होता…’’

शशांकला कळेना लेकाची समजूत कशी घालावी. ‘‘रोहित म्हणत होता, तुझे बाबा आई खूप भांडायचे अन् बाबांनी आईला जाळलं…’’ हे शब्द त्या भाबड्या मुलानं कसे बसे उच्चारले. त्याच्या वाचेवर परिणाम झाला होता.

शशांकही कायम घाबलेला असायचा. कुणी काही म्हटलं नाही तरी त्याला वाटे लोक आपल्याबद्दलच बोलतात. कुणी म्हणे, हुंडा दिला नाही तिच्या वडिलांनी, कुणी म्हणे तिचं प्रेमप्रकरण होतं, कुणी काही म्हणे, कुणी काही बोले…शशांक दूर पळत होता, या गावातून त्या गावात…एका जागेवरून दुसऱ्या जागेवर…पण तो आता थकलाय. आता तो पळणार नाही…मुलाला सगळं समजावून सांगणार. स्वत:चा व त्याचा गमावेला आत्मविश्वास परत मिळवणार.

केबिनच्या भिंतीवरच्या घड्याळानं एकचा ठोका दिला. दचकून शशांक भानावर आला. एक वाजता कौशल शाळेतून यतो. त्याच्याबरोबर जेवण्यासाठी शशांक घरी जातो. आजही तो केबिनबाहेर आला. अजून लोक आपापल्या टेबलावरच होते.

‘‘चला मंडळी, लंच ब्रेक घ्या. मीही येतोच लंच आटोपून.’’ शशांकने म्हटलं. सर्वांनी हसून हो म्हटलं.

घरी पोहोचल्यावर शशांकनं स्वयंपाक्याला विचारलं, ‘‘कौशल आला का?’’

‘‘होय साहेब, कौशल बाळा कपडे बदलताहेत. तुम्ही हात धुवून घ्या. जेवण तयार आहे.’’ तो अदबीनं म्हणाला.

‘‘बाबा, आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही विसरलात, आम्ही नाही. हॅप्पी बर्थ डे.’’ कौशलनं त्याच्या गळ्यात हात टाकले.

‘‘आजचा दिवस कसा होता? इथली शाळा आवडली का तुला?’’ शशांकने विचारलं…मनातून त्याला भीती वाटत होती इथंही कौशलला कुणी टोचणारं, छळणारं भेटतंय की काय? पण कौशलच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं.

‘‘बाबा, मॅथ्स टीचर खूप छान शिकवतात. सायंस आणि इंग्रजीच्या मॅडमही मला आवडतात. इथं मला खूप मित्र मिळाले आहेत. बाबा ती सगळी ना, खूप हुशार आहेत. मलाही त्यांच्याबरोबर खूप मेहनत करावी लागेत. म्हणून तर टिचर माझं कौतुक करतात.’’

शशांक कौशलकडे बघत होता. कौशलचा तोतरेपणा जवळजवळ नाहीसा झाला होता. तो खुष होता. त्याला आत्मविश्वास वाटत होता…आता शशांकनं स्वत:च स्ट्राँग व्हायला हवं. झालं गेलं गंगेला मिळालं. आता तो आणि त्याचा कौशल खूप छान आयुष्य जगणार आहेत. कुणालाही घाबरायचं नाही, कुणालाही बिचकायचं नाही. सगळ्यांना धिटाईनं सामोरं जायचं. चूक आपली नाही तर अपराधी तरी का वाटून घ्यायचं?

सायंकाळी शशांक घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आधी नीरज तिथं हजर होता. स्वयंपाकी, ड्रायव्हर आणि कौशलनं मिळून एक छोटीशी पार्टी ठेवली होती. त्यात नीरजचीही मदत झाली होती. कौशल खूप आनंदात होता. त्याचे नवे मित्र-मैत्रिणी अन् शशांकच्या ऑफिसचे काही निवडक लोक पार्टीला आले होते. किती तरी दिवसांनी कौशल आनंदात होता अन् घरात चैतन्य जाणवत होतं.

संध्याकाळ खूपच आनंदात गेली. जाताना नीरजनं शशांकला मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

आता शशांक अन् कौशल दोघंच उरले.

‘‘बाबा, तुम्हाला आवडलं का? आता माझे मित्र नेहमी आपल्या घरी येतील. ते मलाही बोलावतात ना? मग आपणही त्यांना बोलावलं पाहिजे ना?’’ कौशल म्हणाला.

शशांकनं आवेगानं लेकाला मिठीत घेतलं. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले.

‘‘बाबा, ही डायरी, तुमची ‘बर्थ डे गिफ्ट.’ तुम्ही पुन्हा डायरी लिहा…’’ बाबांना डायरी देऊन, गुड नाईट म्हणून कौशल झोपायला गेला.

किती तरी दिवसांनी शशांकच्या मनात गाणं घुमायला लागलं…‘‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले, मुक्या भावनांना…’’

तो बाल्कनीत येऊन उभा राहिला. मघा ढगाआड गेलेला चंद्र आता आकाशात शांत हसत होता. ‘‘मी बघ, आलो ना काळ्या मेघांना दूर सारून? तू ही आता काळ्या छायेतून बाहेर आला आहेस…असाच राहा, निर्भय…  निशं:क मनानं जग…’’ चंद्र जणू त्याला सांगत होता…कळ्यांची, फुलांची, शब्दांची धुंदी त्याच्या मनावर चढत होती.

तू माझ्यासाठी काय केलंस

कथा * पद्मा आगाशे

रात्रीचे दोन वाजून गेलेले. अजून प्रसून घरी आला नव्हता. गेले काही दिवस तो रोजच रात्रीपर्यंत घराबाहेर असायचा. उमाही त्याची वाट बघत जागी होती.

गेटच्या आवाजानं ती उठून बाहेर आली. ड्रायव्हरनं दारुच्या नशेत असलेल्या प्रसूनला आधार देत घरात आणलं.

उमा संतापून ओरडली, ‘‘अरे काय दुर्दशा करून घेतली आहेस स्वत:ची? किती अधोगती अजून करून घेशील? स्वत:ची अजिबात काळजी नाहीए तुला?’’

प्रसूनही तसाच ओरडला. शब्द जड येत होते पण आवाज मोठाच होता, ‘‘तू आधी उपदेश देणं बंद कर. काय केलं आहेस गं तू माझ्यासाठी? मला लग्न करायचंय हजारदा सांगतोए, पण तुला तुझ्या आरामातून वेळ मिळेल तेव्हा ना? स्वत:चा मुलगा असता तर दहा ठिकाणी जाऊन मुलगी शोधली असती.

‘‘तुला माझ्या पैशांवर मजा मारायला मिळतेय, साड्या, दागिने, आलिशान गाडीतून फिरायला मिळंतय, तुला काय कमी आहे? पण मला तर माझ्या शरीराची भूक भागवायला काहीतरी करायलाच हवं ना? आधीच मी त्रस्त असतो त्यात तुझ्या बडबडीने डोकं उठतं.’’ तो लटपटत्या पायांनी त्याच्या खोलीत निघून गेला. धाडकन् दार लावून घेतलं.

प्रसूनच्या बोलण्यानं उमाच्या हृदयाला भोकं पडली. ती उरलेली सगळी रात्र तिनं रडून काढली. प्रसून तिच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यासाठी तिनं आपलं सगळं आयुष्य वेचलं. वडिलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. लग्न केलं नाही. सगळं लक्ष केवळ प्रसूनवर केंद्रित केलं होतं.

मीराताईचे यजमान सुरुवातीला प्रसूनला भेटायला यायचे. पण उमाच्या लक्षात आलं त्यांचा तिच्यावरच डोळा आहे. एकदा त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं सरळ त्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर ते कधीच इकडे फिरकले नाहीत. उमानंही त्यानंतर कुठल्याही पुरुषाला आपल्या आयुष्यात जागा दिली नाही.

प्रसूनच तिचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ होता. त्याच्या आनंदातच तिचाही आनंद होता. तिच्या अती लाडानंच खरं तर तो बिघडला होता. अभ्यासात बरा होता. पण त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्नं मात्र पैसेवाला, बडा आदमी बनण्याची होती.

तो बी. कॉम झाल्यावर उमानं एमबीएला एडमिशन मिळवण्यासाठी खूप पैसे खर्च केले. एकदा त्याला नोकरी लागली की छान मुलगी बघून लग्न करून द्यायचं अन् आपण आपलं म्हातारपण आनंदात घालवायचं असा उमाचा बेत होता.

प्रसून दिसायला वडिलांसारखाच देखणा होता अन् त्यांच्यासारखाच लंपट अन् बेजबाबदारही. जेव्हा तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता तेव्हाच जया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. खरं तर त्यानं तिच्या करोडपती वडिलांचा पैसा बरोबर हेरला होता. त्याच्या देखण्या रूपावर अन् गोड गोड बोलण्यावर भाळलेल्या जयानं एक दिवस घरातून खूपसे दागिने घेऊन पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी उमाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला बिचारीला काहीच कल्पना नव्हती. ती पोलिसांना काय सांगणार? दोन दिवस पोलीस कोठडीत काढल्यावर तिची सुटका झाली.

दोन महिने लपतछपत काढल्यावर शेवटी पोलिसांनी जया व प्रसूनला शोधून काढलंच. जयाच्या वडिलांनी आपला पैसा व प्रतिष्ठेच्या जोरावर लेकीला तर सोडवली पण प्रसून मात्र दोन वर्षं तुरुंगात होता.

उमासाठी हा फार मोठा धक्का होता. पैसा गेला, समाजात नाचक्की झाली. पण प्रसूनचं प्रेम ती विसरू शकली नाही. तो तुरूंगातून सुटून आला तेव्हा ती त्याच्यासाठी तुरुंगाबाहेर उभी होती. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रसून लहान मुलासारखा रडला. मग त्यांनी ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला.

थोडंफार सामान घेऊन दोघंही पुण्याला आली. बऱ्याशा वस्तीत छोटं घर घेतलं. प्रसून नोकरी शोधू लागला. उमानं काही ट्यूशनस मिळवल्या. प्रसूनला एका प्लेसमेंट एजन्सीत नोकरी मिळाली. अंगभूत हुशारी व तीक्ष्ण नजर या जोरावर प्रसूननं तिथली कामाची पद्धत पटकन शिकून घेतली. त्या धंद्यातले बारकावे जाणून घेतले. वर्षभरातच त्यानं स्वत:ची कंपनी सुरू केली.

पाच-सहा वर्षं चांगली गेली. आता पॉश कॉलनीत बंगला, आलिशान गाडी, शोफर, पैसा अडका सगळं होतं, पण प्रसूनचं लग्न होत नव्हतं. एक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सहा महिने राहिली पण मग तीही सोडून गेली.

प्रसून अत्यंत तापट अन् अहंकारी होता. पत्नीला गुलाम म्हणून वागवण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच मुली लग्नाला नकार द्यायच्या.

प्लेसमेण्टसाठी येणारी मुलं कमिशन देऊन निघून जायची. पण श्रेयाला त्यानं चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंधही ठेवले. वर त्याची फोटोग्राफी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. ती घाबरून त्याला भरपूर पैसे देऊ लागली. मग तर त्यानं अनेक मुलींना या पद्धतीनं फसवलं. श्रेयानं व इतर दोघींनी पोलिसात तक्रार केल्यावर ऑफिसवर पोलिसांनी धाड घातली. कसाबसा तो त्या प्रकरणातून सुटला. या सर्व गोष्टींचा उमाला अजिबात पत्ता नव्हता.

दुसऱ्यादिवशी सकाळी चहाचा ट्रे घेऊन उमा जेव्हा प्रसूनच्या खोलीत गेली, तेव्हा तो चांगल्या मूडमध्ये होता. रात्रीच्या रागाचा कुठे मागमूसही नव्हता.

‘‘प्रसून तू इंटरनेटवर तुझा प्रोफाइल रजिस्टर करून घे. एखादी चांगली मुलगी भेटेलही.’’ तिनं प्रेमानं म्हटलं.

‘‘होय, मावशी, मी केलंय.’’ तो ही उत्तरला.

‘‘मी ही प्रयत्न करतेय.’’ मावशी म्हणाली.

‘‘मावशी, कुणी घटस्फोटितही चालेल. मीही आता चाळीशीला आलोच की!’’ प्रसून म्हणाला.

मावशीनं मॅरेज ब्यूरोमध्ये नांव नोंदवलं. प्रोफाइल बनवून नेटवर टाकलं. चांगले फोटो त्यावर टाकले.

इकडे प्रसूनला ऑनलाइन चॅटिंग करताना मान्यताची फ्रेण्डरिक्वेस्ट दिसली. त्यानं होकार दिला. दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मान्यता स्वच्छ मनाची मुलगी होती. तिनं  स्वत:विषयी सगळं खरं खरं प्रसूनला सांगितलं. प्रसूननंही तिला खूप गोड गोड बोलून भुलवलं. त्यानं अधिक खोलात जाऊन माहिती मिळवली की मान्यताच्या वडिलांचा व्यवसाय आहे. कनॉट प्लेसमध्ये तीन मजली घर आहे. खाली दुकानं आहेत. त्यांचं भाडंच लाखात येतं अन् मान्यताच त्या सगळ्याची एकमेव वारस आहे.

त्यानं उमाला म्हटलं, ‘‘मावशी माझ्यासाठी हे स्थळ खूपच योग्य आहे. मान्यताचा घटस्फोट झालाय. तिला एक लहान मुलगा आहे. आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पुन्हा लग्न करणार नाही म्हणतेय. पण तिला लग्नासाठी राजी करावं लागेल. त्यानं प्रोफाइल उघडून मान्यताचे फोटो मावशीला दाखवले.’’

अशाबाबतीत हुशार प्रसूननं एजंटच्या मध्यस्तीने मान्यताच्या घराच्या जवळच एक फ्लॅट भाड्यानं मिळवला. उमा तिथं शिफ्ट झाली. तिनं सोसायटीत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. तिथल्या किटी पार्टीची ती सभासद झाली.

एक दोनदा प्रसून येऊन गेला. ‘माझा मुलगा’ अशी तिनं ओळख करून दिली. सोसायटीत तर बस्तान चांगलं बसवलं.

मग एका किटी पार्टीत मान्यताच्या आईशीही ओळख झाली. ती ओळख उमानं जाणीवपूर्वक वाढवली. मुद्दाम त्यांच्याकडे येणंजाणं वाढवलं.

‘‘माझा मुलगा आहे. शिक्षण, रूप, पैसा, व्यवसाय सगळं आहे पण लग्न करायचं नाही म्हणतो. तरूण वयात कुणा मुलीच्या प्रेमात होता. तिनं विश्वासघात केला. प्रेमभंगांचं दु:ख अजून पचवता आलेलं नाहीए. मध्यंतरी यावरूनच आमचा वाद झाला. त्याच्या रागावर मी इथं येऊन राहिलेए.’’ असं उमानं त्यांना सांगितलं.

उमानं एकदा मुद्दामच विचारलं, ‘‘माफ करा, पण तुम्ही अन् मान्यता, तिचे बाबा असे उदास अन् दु:खी का दिसता?’’

मान्यताच्या आईला, निशाला एकदम रडू फुटलं, ‘‘काय सांगू ताई तुम्हाला? अहो, इतक्या थाटामाटात आम्ही मान्यताचं लग्न करून दिलं होतं. श्रीमंत कुटुंबातला एकुलता एक मुलगा. पण वर्षभरही आमची पोरगी राहू शकली नाही. त्या मुलाचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध होते. हे असं कोणती पत्नी सहन करेल?’’

मान्यतानं नवऱ्याला प्रेमानं खूप समजावलं, पण तो ऐकत नव्हता. आम्ही दोघांनीही जावयाची समजूत घातली. मुलीचा संसार उधळू नये असंच आम्हालाही वाटत होतं. पण त्यानं जणू न सुधारण्याची शपथच घेतली होती.

त्यात एक दिवस त्यानं मान्यताला मारहाण केली. त्यानंतर ती जी इथं आली ती परत गेलीच नाही. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्या सासूसाऱ्यांना मुलाचं प्रकरण माहित होतं पण चांगली सून घरात आली की तो बदलेल या आशेवर त्यांनी लेकाचं लग्न केलं होतं.

त्यांनी हात जोडून क्षमा मागितली. आम्ही दिलेलं सर्व सामान, दागिने, कपडे सगळं परत केलं. एक कोटी रुपयांची एफडी मान्याताच्या नावे केली, पण त्या पैशानं सुखसमाधान कसं मिळणार?

आमचं तर आयुष्यच अंधकारमय झालंय. तिच्या लहानग्या आयुष्यामुळेच आमच्या आयुष्यात थोडा फार आनंद आहे. मान्यता तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीए. लग्न करायला नाहीच म्हणते. तिच्या बाबांनी तिला विरंगुळा म्हणून शाळेत नोकरी लावून दिली आहे.

आता उमानं लहानग्या आयुषवर लक्ष केंद्रित केलं. ती त्याला कधी बागेत न्यायची, कधी होमवर्क करवून घ्यायची, कधी गाणी गोष्टी सांगायची. प्रसून दिल्लीला आलेला असताना मुद्दाम उमानं निशा अन् मदनला, मान्यताच्या बाबांना घरी चहाला बोलावलं. त्याचं देखणं रूप, त्याची मर्यादेशील वागणूक व हसरा, आनंदी स्वभाव बघून दोघांनाही तो खूप आवडला. पण आपली मुलगी घटस्फोटित आहे, या प्रथमवराला कसं विचारावं या विचारानं ते गप्प बसले.

प्रसून अन् उमानं ठरवलेल्या योजनेप्रमाणेच सगळं चाललेलं होतं. आता त्यांनी मान्यतावर लक्ष केंद्रित केलं. आता प्रसून पुन्हा पुन्हा दिल्लीला येत होता. उमानं निशा व मदनला सांगितलं की प्रसूनला मान्यता आवडली आहे. तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आयुषलाही तो आपला मुलगा मानायला तयार आहे.

निशा व मदनला तर फारच आनंद झला. प्रसूनही बराच वेळ आयुषबरोबर घालवायचा. येताना त्याच्यासाठी खाऊ व खेळणी आणायचा. त्याच्याबरोबर व्हिडिओ गेम्स खेळायचा.

एक दिवस आयुषनं मान्यताला म्हटलं, ‘‘मम्मा, प्रसून काका किती छान आहेत. मला आवडतात ते.’’

मान्यतालाही प्रसूनविषयी आर्कषण वाटत होतं. त्याचं देखणं रूप अन् मोठमोठ्या गोष्टी यामुळे तीही त्याच्यात गुंतत चालली होती. हळूहळू तो आयुष व मान्यताला आइसक्रीम खायला नेऊ लागला. कधी तरी उमा,   मान्यता अन् प्रसून सिनेमालाही गेले. आता तर उमानं उघडच बोलून दाखवलं की मान्यता व प्रसूनचं लग्न झालं तर किती छान होईल म्हणून निशा व मदननं विचार केला की एकदा प्रसूनच्या एजन्सीविषयी माहिती काढावी. मदनलाही मुलगा आवडला होता. त्यांनी पुण्याला जाऊन यायचं ठरवलं. पण ही गोष्ट उमा अन् प्रसूनला कशी समजली कोण जाणे. प्रसून तर सरळ त्यांना एअरपोर्टला रिसीव्ह करायला पोहोचला. त्यांना आपलं ऑफिस दाखवलं. मोठा बंगला दाखवला. गाडीतून सगळीकडे फिरवलं. पंचतारांकित हॉटेलात त्यांना लंचला नेलं.

इतर कुणाला त्यांच्याजवळ येऊ दिलं नाही. कुणाला त्यांना भेटू दिलं नाही. साध्या सरळ मदनला प्रसूनचं वैभवी आयुष्य खरंच वाटलं. आता त्यांना मान्यता व प्रसूनचं एकत्र असणं यात गैर वाटेना. दोघांच्या लग्नाचा बेत त्यांच्या मनात पक्का होता.

लबाड प्रसूननं मान्यताच्या वाढदिवसाला एका पार्टीचा कार्यक्रम ठरवला. मान्यतासाठी हे सरप्राइजच होतं. त्या दिवशी उमानं तिला एक डिझायनर साडी भेट म्हणून दिली. मान्यताही मनापासून नटली. त्या साडीत ती खूपच छान दिसत होती. आई, वडिल, आयुष यांच्याबरोबर जेव्हा ती हॉटेलात पोहोचली तेव्हा तिथं खूपच मोठी पार्टी बघून ती चकित झाली. प्रसूननं केवढा मोठा केक ऑर्डर केला होता. मान्यताला प्रसूनबद्दल आदर वाटला. त्यातच भर म्हणून तिच्या आईवडिलांनी या वेळीच मान्यता व प्रसूनच्या साखरपुड्याची अनाउंसमेट केली. मदननं दोन हिऱ्यांच्या आंगठ्या प्रसून व मान्यताच्या हातात देऊन त्या एकमेकांना घालायला लावल्या. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला. मान्यताही खूप आनंदात होती. तिनं प्रसूनसोबत डान्सही केला.

आता तर तिला सतत प्रसूनजवळ असावं असं वाटायचं. त्यांचं गोड गोड बोलणं, तिचं कौतुक करणं तिला फार आवडायचं. आयुषनं तर एक दिवस तिला म्हटलं, ‘‘आता प्रसून काकांना बाबा म्हणणार आहे. शाळेत सगळ्या मुलांचे बाबा येतात. माझेच बाबा येत नाहीत. आता मी माझ्या मित्रांना दाखवेन की हे बघा माझे बाबा.’’

लग्नाची खरेदी जोरात सुरू होती. आमंत्रण पत्रिकाही छापून झाल्या. अजून मान्यतानं तिच्या?शाळेत तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तिच्या बोटातली हिऱ्याची अंगठी बघून तिच्या सहकारी टीचर्सनं तिला छेडलं तरी तिनं त्यांना दाद दिली नव्हती.

पण प्रिन्सिपल मॅडमनं एकदा तिला ऑफिसात बोलावून विचारलंच, ‘‘मान्यता, लग्न ठरलंय म्हणे तुझं? मनापासून अभिनंदन. नवं आयुष्य सुरू करते आहेस…सुखात राहा. कुठं जाणार आहेस आता?’’

‘‘पुणे,’’ मान्यातानं सांगितलं.

‘‘मला खरंच खूप आनंद झाला ऐकून. अगं तरुण वयात मी ही फसवुकीला सामोरी गेले आहे. विश्वासघाताचं दु:ख मी ही पचवलं आहे. पण अक्षयसारखा नवरा भेटला अन् त्याच्या प्रेमामुळे जीवनातील कटू विषारी अनुभव पचवून आता सुखाचा संसार करते आहे.’’

‘‘होय मॅडम, प्रसूनही फार चांगले आहेत. आयुषवरही ते फार प्रेम करतात. त्यामुळेच मी लग्नाला तयार झालेय.’’

‘‘नाव काय सांगितलंस तू? पुन्हा सांग बरं.’’

‘‘प्रसून! प्रसून नाव आहे त्यांचं. पुण्यात प्लेसमेंट एजेंसी चालवतात. खूप छान व्यवसाय आहे.’’

मॅडम जरा विचारात पडल्या. मग म्हणाल्या, ‘‘साखरपुड्याचे फोटो असतील ना? मला बघायचाय तुझा नवरा.’’

‘‘आता माझ्याकडे नाहीएत फोटो, पण मी तुमच्या ईमेलवर पाठवते. खूपच देखणे आहेत ते.’’

मॅडम जया त्या स्कूलच्या ओनर होत्या. साखरपुड्याचे फोटो बघताच त्या दचकल्या. हो तोच प्रसून ज्याच्या म्हणण्यावरून तरुण अल्लड जया घरातले  दागिने घेऊन पळाली होती. मान्यताला सांगावं का? पण नको, कदाचित इतक्या वर्षांत प्रसून बदलला असेल, सुधारला असेल. तरीही शोध घ्यायला हवा. शहानिशा करावीच लागेल. त्यांनी आपल्या एका वकील मित्राला फोन करून प्रसून व त्याची एजन्सी याची चौकशी करायला सांगितली. तो पुण्यातच राहात होता.

दुसऱ्याच दिवशी त्या मित्रानं बातमी दिली. प्लेसमेट एजन्सीच्या आड सेक्स रॅकेट चालवलं जातं. एजन्सीवर पोलिसांनी बरेचदा धाड घातली आहे. प्रसून अत्यंत नीच व बदनाम माणूस आहे. पोलिसही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करताहेत.

आता जयाचा संशय खात्रीत बदलला. हा तोच नराधम आहे. तिनं मान्यताला फोन करून ताबडतोब घरी बोलावून घेतलं. ‘‘मान्यता, आय अॅम सॉरी, बातमी वाईट आहे पण तुझ्या भल्यासाठीच सांगते. हा तोच प्रसून आहे ज्यानं मला दगा दिला होता. माझे दागिने लांबवून त्यानं मला भिकेला लावलं होतं. सध्या तो प्लेसमेंट एजेन्सीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो. अनेक मुलींना त्यानं असंच फसवलं आहे. माझ्या मते तुझ्याशी लग्नही केवळ तुझ्या प्रॉपर्टीसाठी करतोय तो. भयंकर लोभी माणूस आहे.’’

ऐकताच मान्यता रडायला लागली. ‘‘मॅडम, माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येणारच नाहीत का? असं काय घडतंय माझ्या आयुष्यात…’’

‘‘मान्यता, धीर धर, आधी या नीच माणसाला पोलिसात देऊयात. त्याला कळणार नाही इतक्या पद्धतशीरपणे आपण प्लॅन करूया.’’

मान्यतानं डोळे पुसले. ‘‘होय मॅडम, याला अद्दल घडवलीच पाहिजे. उद्याच याला पोलिसांच्या हवाली करते. तुम्ही उद्या सायंकाळी माझ्या घरी याल का? पाच वाजता?’’

‘‘नक्की येते. पाच वाजता.’’

घरी येऊन मान्यतानं प्रसूनला फोन केला. ‘‘प्रसून जरा येऊन जा. आईबाबा त्यांचं विल करताहेत. तुझी गरज लागेल.’’

‘‘विल करताहेत हे फारच छान आहे. मी उद्या येतो.’’ प्रसून म्हणाला.

प्रसून घरी आला. निशा व मदन त्याचं अतिथ्य करू लागले. त्यांना आदल्या दिवशी घडलेलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रसूननं मान्यताला म्हटलं, ‘‘आईबाबा तुला जे काही दागिने व कॅश लग्नात देताहेत ते सगळं तू घे. ‘नको नको’ म्हणू नकोस. अन् त्यांनी विल केलं म्हणालीस, ते कुठंय? त्यांच्यानंतर तर सगळं आपल्यालाच मिळणार आहे ना?’’

‘विल’, ‘दागिने’, ‘कॅश’, ‘त्याच्यानंतर सगळं आपलं’ ही भाषा निशा व मदन दोघांनाही खटकली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. प्रसून खिडकीपाशी उभं राहून मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी निशानं म्हटलं, ‘‘मला तर हा लोभी वाटतोय. कॅश अन् विलच्या गोष्टी आत्ता का बोलतोए? आधीच आपल्याकडून धंदा वाढवायचा म्हणून वीस लाखांचा चेक घेतलाए. मान्यतालाही हे कळलं तर ती लग्नाला नकार देईल.’’

‘‘मलाही आज त्यांचं वागणं संशयास्पद वाटतंय. पैशासाठी आमचा खूनही करेल हा.’’ मदन म्हणाले.

तेवढ्यात जया आल्याचा निरोप वॉचमननं दिला. तो जयाला मान्यताच्या दाराशी सोडून गेला. प्रसूननं जयाला प्रथम ओळखलं नाही. मान्यतानं मुद्दाम ओळख करून दिली. ‘‘मॅडम जया, हे माझे होणारे पती प्रसून.’’

जयानं दरडावून म्हटलं, ‘‘अजून किती जणींना फसवून पैसा गोळा करणार  आहेस प्रसून? तुझ्या पापाचा घडा भरलाय. पुण्याहून तुझ्याबद्दलची सगळी माहिती मला मिळाली आहे. ती मी दिल्ली पोलिसांना दिली आहे.’’

हे ऐकून बाबांना तर घेरीच आली. आईही धाय मोकलून रडू लागली. ‘‘मावशी रडू नका. तुमची मुलगी एका नरपिशाच्चाच्या तावडीतून सुटली म्हणून आनंद माना,’’ जयानं त्यांना समजावलं.

प्रसून पळून जायला बघत होता. तेवढ्यात सिक्युरिटीवाल्यांनी त्याला घेरलं. उमा पण तिथं आलेली होती. ती म्हणाली, ‘‘याला क्षमा करा. आम्ही इथून निघून जातो. मी हात जोडते…’’

प्रसून तिच्यावर ओरडला, ‘‘गप्प बैस, तू माझ्यासाठी काय केलं आहे. फक्त सतत म्हणायची लग्न कर, लग्न कर…झालं माझं लग्न…’’

आता उमाचाही संयम संपला, ‘‘माझं सगळं आयुष्य मी याच्यासाठी झिजवलं. तरी याचं म्हणणं मी याच्यासाठी काहीच केलं नाही…आता तर मीच पोलिसांना सांगेन याचे सगळे प्रताप. कोर्टात याच्याविरूद्ध मी साक्ष देईन.’’ ती म्हणाली.

पोलीस प्रसूनला घेऊन गेले.

भोचक भवानी

कथा * नीता श्रीवास्तवश

शेजारच्या घरातली घंटी वाजली तशी शिखा पळतंच आपल्या दारापाशी पोहोचली अन् पडद्याआडून बाहेर डोकावून बघू लागली. आपलं काम करत बसलेल्या शिखाच्या नवऱ्याला, सुधीरला तिचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. यापूर्वीही अनेकदा यावरून त्याचे अन् शिखाचे खटके उडाले होते. शिखा मात्र आपली सवय सोडायला तयार नव्हती.

शेजारी पाजारी कोण कुणाकडे आलंय, कोण कुठं जातंय, काय विकत आणलंय, कुणाचं काय चाललंय या गोष्टींमध्ये शिखाला प्रचंड इंटरेस्ट होता. कुठं नवरा बायकोची भांडणं होतात, कुठं नवरा बायकोचं ‘गुलुगुलु’ चालतं हे सगळं जाणून घेणं ही जणू तिची जबाबदारी होती.

सुधीरला बायकोच्या या सवयीचा खूप राग येत असे. कधी प्रेमानं, कधी समजुतीनं तर कधी रागावून तो तिला या सवयीपासून परावृत्त करायला बघायचा, ‘‘शिखा, अगं का अशी सतत भोचकपणा करत असतेस. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा आपल्या घरात जरा लक्ष घाल. घर तरी घरासारखं वाटेल.’’

सुधीरला वाचनाचा नाद होता. तो शिखासाठीही कितीतरी पुस्तकं, मासिकं, पाक्षिक वाचायला आणायचा. पण शिखा कधी एक पानही उघडून बघायची नाही. सगळा वेळ दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघण्यातच संपायचा.

पण आज मात्र तिच्या या सवयीमुळे तो इतका संतापला की उठून त्यानं पडदा एकदम जोरात ओढला. तो रॉडसकट जमीनीवर आदळला. ‘‘आता बघ, अजून सगळं स्पष्ट दिसेल.’’ रागावलेला सुधीर खेकसला.

दचकून शिखा दारापासून दूर झाली. बघणं तर दूर तिला अंदाजही लावता आला नाही की जयाकडे कोण आलं होतं अन् कशासाठी आलं होतं.

सुधीरच्या संतापामुळे ती थोडी घाबरली तरी ओशाळी होऊन हसू लागली. सुधीरचा मूडच गेला. त्यानं हातातलं काम आवरून ठेवलं अन् तो कपडे बदलू लागला.

आता मात्र शिखाला राहवेना. तिनं विचारलं, ‘‘आता या वेळी कुठं निघालात? संध्याकाळी मूव्ही बघायला जायचंय की नाही.’’

‘‘तू तयार रहा, मी वेळेवर घरी येतोय.’’ एवढं बोलून कुठं जातोए, का जातोए वगैरे काहीच न सांगता सुधीरनं गाडी स्टार्ट केली अन् तो निघून गेला.

संतापानं पेटलेला सुधीर काही वेळ तर रस्त्यावर निरूद्देश गाडी पळवंत होता. त्याला समजतंय की थोडा फार भोचकपणा सर्वच बायका करत असतात. अनेक पुरूषांनाही ही सवय असते. पण शिखाची सवय संताप आणणारीच आहे. त्यानं कित्येकदा तिला म्हटलं की इतकी सर्व बित्तबातमी असते तर पत्रकारीतेत जायचं. चांगल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सहज जॉब मिळेल. पण शिखा तशी बथ्थड अन् निर्लज्जही होती. तिच्यावर कशाचाच परिणाम होत नव्हता.

मागच्याच आठवड्यातली गोष्ट. तो ऑफिसातून बराच उशीरा घरी आला होता. तो घरात शिरताच शिखाची रेकॉर्ड सुरू झाली. दोन्ही मुलांना पुलाव खायला घालून तिनं झोपवलं होतं. शेखरसमोर पुलाव, दही, लोणचं ठेवून तिनं बोलायला सुरूवात केली. ‘‘तुम्हाला माहित आहे का? हल्ली ना, तो अमन रोज ऑफिसातून दोन तास आधीच घरी येतो. माझ्या बरंच आधीच ते लक्षात आलं होतं. इकडे आई प्रवचनात गेली अन् दोघी मुली कोचिंगक्लासला गेल्या की या नवरा बायकोला एकांत…घराचे दरवाजे खिडक्या पाचलाच बंद होतात…’’

‘‘अंग बाई, कुणाच्या खिडकीदरवाज्यात मला काहीही रस नाहीए. मला पापड हवाय. तळून दिलास तर बरं होईल.’’

सुधीरचा मूड बघून शिखानं गप्प बसणं पसंत केलं. एरवी तिची मेल सुसाट गेली असती.

जेवण झाल्यावर सुधीर टी.व्ही बघत बसला. शिखा स्वयंपाक घरातलं सर्व आवरून त्याच्या शेजारी येऊन बसली. तिच्या जवळ बसण्यानं सुधीर सुखावला. त्याचा छोटासा संसार…दोघी मुली, सुविद्य सुंदर पत्नी, त्याची चांगली नोकरी, स्वत:चं घर…सगळं कसं छान आहे. जर शिखानं रिकाम्या वेळात काही काम सुरू केलं तर एडिशन इनकम होईल अन् ही इकडे तिकडे डोकावून भोचकपणा करण्याची सवयही सुटेल. त्याच्या मनांत विचार येत होते.

‘‘सुधारेल काही दिवसांनी, थोडे दिवस अजून वाट बघूयात,’’ असा विचार करून तो तिला मिठीत घेणार तेवढ्यात शिखा चित्कारली, ‘‘अरेच्चा, तो अमनचा किस्सा तर अर्धवट राहिला…तर, मला आधीपासूनच कळलं होतं पण आज अगदी शिक्कामोर्तब झालं त्यावर. अमनची बायको आशा, तिनंच त्या नेहाला सांगितलं की मुली मोठ्या झाल्यामुळे आता घरात एकांत मिळत नाही, म्हणून आम्ही हा उपाय शोधलाय.’’ एवढं बोलून शिखानं सुधीरकडे असा विजयी कटाक्ष टाकला जणू एखादा किल्ला सर केलाय.

तिचं बोलणं ऐकून सुधीरनं स्वत:चं डोकं धरून बसला. लग्न करतेवेळी शिखा अशी असेल असं त्याला वाटलंच नव्हतं. त्याची तर आजही बायकोकडून एवढीच अपेक्षा होती की तिनं घर व्यवस्थित चालवावं, स्वच्छ, सुंदर ठेवावं. शेजारी अन् नाते वाईकांशी प्रेमाचे, सल्लोख्याचे संबंध ठेवावेत. पण हे अशक्य आहे.

अशक्य शब्दाशी सुधीर अडखळला. प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते, हे सुभाषित आठवलं. प्रयत्न केला पाहिजे असं त्यानं ठरवलं. घड्याळ बघितलं, शोची वेळ झाली होती. पण आज शिखाचा फारच राग आला होता.

घरी न जाता सुधीर एका महागड्या रेस्टारंटमध्ये जाऊन बसला. असा एकटा  तो कधीच जात नसे पण आजचा दिवसच वेगळा होता. रविवार असल्यानं बहुतेक पुरूष पत्नी मुलांसह आलेले होते. स्वत:चं एकटेपण त्याला सलू लागलं. बसायचं की निघायचं अशा विचारात असतानाच त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेलं. त्याचे शेजारी दस्तूर तिथं पत्नी व मुलांसह बसले होत. ते चौघं खाण्यापिण्यात अन् आपल्याच गप्पांमध्ये इतके रमलेले होते की कुणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. सुधीर त्या सुखी कुटुंबाकडे तृषार्त दृष्टीनं बघत होता.

दस्तूर आणि सुधीर एकाच कंपनीत होते. त्यातून शेजारी असल्यानं एकमेकांकडे थोडंफार जाणं येणं, बोलणं बसणंही होतं. पण शिखाला ते कुटुंब अजिबात आवडत नसे अर्चना दस्तूरबद्दल तर तिला खूपच राग होता. ‘‘ती शिष्ट आहे. सगळ्यांपासून दूर असते. अलिप्त राहते. फारच कमी बोलते. दिसायला सुंदर आहे याचा अर्थ तिला गर्व आहे,’’ एक ना दोन.

या उलट सुधीरला अर्चनाचं सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व आवडायचं. ती हुषार होती. पूर्वी सेंट्रल स्कूलला टीचर होती. आजही ती एक उत्तम आई अन् उत्तम गृहिणी म्हणून लौकिक मिळवून आहे. म्हणूनच शिखाला तिचा राग येतो. शिखाच्या थिल्लर वागणुकीमुळे सुधीर खूपच दु:खी झाला होता. तिथून तो उठला. रात्रीचे नऊ वाजले हेते पण घरी जावंसं वाटेना. पुन्हा निरूद्देश भटकत राहिला. रात्री अकरा वाजता घरी पोहोचला तेव्हा शिकानं दार उघडताच प्रश्नांचा भडिमार केला.

‘‘तुमचा दुसरा कुठला कार्यक्रम ठरला होता तर मला का सांगितलंत सिनेमाला जाऊ म्हणून? मी तयार होऊन वाट बघत होते. कुठं होता एवढा वेळ? कुणाबरोबर होता?’’

‘‘सांगू? अर्चनासोबत होतो बराच वेळ.’’ आज सुधीरनं मनाशी काही एक निर्णय घेतला होता.

शिखा अजूनही छान तयार होऊन सुंदर साडी नेसून बसली होती. तिच्याकडे बघून त्याला बरं वाटलं पण त्यानं स्वत:वर ताबा ठेवत सोफ्यावर बसून बूट, मोजे काढायला सुरूवात केली.

शिखा अवाक् होऊन त्याच्याकडे बघत होती.

‘‘शिखा, तूच अर्चनाबद्दल इतकं काही सांगितलं होतंस की तिला जरा जवळून निरखायची इच्छा मला स्वस्थ बसू देईना! आज संधी मिळाली मला. संपूर्ण कुटुंब रेस्टॉरंटमध्ये होतं. मी समोरच्याच टेबलवर होतो. पण  बाईला नवरा अन् मुलांसमोर दुसरं काही दिसतंच नव्हतं. सगळा वेळ ती त्या तिघांमध्ये गुंतलेली. अगदी आनंदात…मी एकटा बसलोय तर निदान माझी विचारपूस करावी, तर तेही नाही, माझ्याकडे लक्षही गेलं नाही तिचं. त्यामुळे मला मात्र तिचं छान निरीक्षण करता आलं. साडी फार सुरेख नेसते ती. कॅरी ही छान करते. इतका सुरेख अंबाडा घातला होता…’’

सुधीरचं बोलणं ऐकून शिखा रडकुंडीला आली. ती तिथून जाणार तेवढ्यात सुधीरनं म्हटलं, ‘‘आता एकेकदा आशा, शैला, नेहा सगळ्यांना असंच बघणार आहे.’’

हे मात्र आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. शिखाला एकदम रडू फुटलं. तिचा नवरा असा कुणा स्त्रीबद्दल बोलू शकतो हे तिच्या समजुती पलीकडचं होतं. दुसऱ्यांच्या घरात काय घडतंय हे बघण्यात शिखा इतकी गुंतली होती की नवऱ्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे ही तिला समजलं नव्हतं. ‘त’ वरून ताकभात ओळखणारी शिखा स्फुंदून रडत होती.

‘‘आत्ता इतक्या मोठ्यांदा रडून काय तू सर्व आळी गोळा करणार आहेस का? अर्चनाकडून शीक काही तरी. तिला तर दस्तूरनं इतक्या थपडा मारल्या तरी तिनं ‘स्स्’ नाही केलं.’’ शिखाला समजवण्याऐवजी सुधीरनं तिनं सांगितलेली बातमी ऐकवली.

काही दिवसांपूर्वी सकाळी तो अजून अंथरूणातच होता, तेव्हा गुडमॉर्निंग न्यूज सांगावी तशी शिखानं त्याला बातमी दिली होती. सुधीरला ठाऊक होतं की आजही दस्तूरला शेड नाइट इन्स्पेक्शनला जायचंय. कालही गेला होता. पण शिखा तर सर्वज्ञानी असल्याच्या थाटात बोलत सुटली होती. ‘‘तुम्ही झोप काढा, काल काय घडलं ठाऊक तरी आहे का? दस्तूरसाहेब इन्स्पेक्शनहून रात्री दोन वाजता घरी परतले त्यांच्या गाडीच्या आवाजानं माझी झोप उघडलीच. बराच वेळ ते घंटी वाजवत होते. बाई दार उघडेना, मला तर वाटलं की आता सगळी आळी जागी होतेय की काय, पण ती अर्चना कसली घोडे विकून झोपली होती…बऱ्याच वेळानं दार उघडलं. मी खिडकीच्या फटीतून बघितलं दस्तूरसाहेब बहुधा चिडलेले होते. नंतर आपल्या बेडरूमच्या खिडकीतून ती त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची चाहूल घेत होते तर त्या दस्तूर साहेबांच्या बडबडण्याचा आवाज येत होता अन् फटाक फटाक थोबाडीत दिल्याचाही आवाज ऐकू आला…’’

‘‘भलतंच काय बोलतेस सकाळी सकाळी?’’

त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुन्हा म्हणाली, ‘‘मी स्वत:च्या कानांनी ऐकलंय फटक्यांचा आवाज. उघडं पडलं ना पितळ तुमच्या अर्चनाचं? मोठं कौतुक आहे तिच्या शालीनपणाचं, हुषारीचं, कर्तबगारीचं…’’

सुधीर खरोखर स्तब्ध झाला होता. एरवी तो अर्चनाचं बोलणं इतक्या गंभीरपणे घेत नाही पण इथं प्रश्न दस्तूर पतीपत्नीचा होता.

या कुटुंबाबद्दल त्याला आदर व कौतुक होतं. त्यांच्याकडे अशी मारामारी ही खेदाची अन् आश्चर्याचीच बाब होती. इतका सभ्य सुसंस्कृत पुरूष पत्नीवर हात उचलेल हे अशक्यच. त्यातून दस्तूर साहेबांना तर पत्नी व मुलांचं प्रचंड अप्रूप आहे.

त्या दिवशी अशाच विमनस्क अवस्थेत तो ऑफिसला पोहोचला. संधी मिळताच दस्तूरच्या टेबलापाशी गेला. एकदम कालच्या घटनेवर बोलणं शक्यच नव्हतं म्हणून प्रथम ऑफिस, हवामान वगैरे जुजबी विषयावर बोलणं झालं. मग हळूच विषय काढला. ‘‘काही म्हणा दस्तूर, उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीची ड्यूटी बरी पडते. ठंडा, ठंडा, कूल, कूल…’’

दस्तूर म्हणाला, ‘‘नाही रे बाबा, नाइट ड्यूटी म्हणजे आपल्या झोपेचं खोबरं, घरातल्यांच्या झोपेचं वाटोळं. काल रात्री घरी गेलो. वैताग झाला नुसता.’’

सुधीरनं ताबडतोब विचारलं, ‘‘का? वहिनींनी घरात घेतलं नाही का?’’

‘‘एकवेळ तेही पत्करलं, पण माझी बायको मी येईपर्यंत जागी होती. पुस्तक वाचत…नेमका मी आलो तेव्हा ती वॉशरूममध्येच होती. त्यामुळे बाथरूममधून बाहेर येऊन दार उघडायला वेळ लागला. माझा जीव घाबरा झाला होता. काय झालं? का दार उघडंत नाहीए? एवढ्यात तिला बी.पी.ची त्रास सुरू झालाय. तिला धडधाकट बघितली अन् जीव भांड्यात पडला.

आनंदात बेडरूममध्ये आलो तर लेकीनं मच्छरदाणी उघडी ठेवलेली. किती तरी डास शिरले होते. आमची मच्छर मारण्याची रॅकेट तो जोशी घेऊन गेलेला, अजून त्यानं ती परत केली नाही. दोन्ही हातांनी ते दहा वीस डास मारले, त्यानंतर कुठं झोपू शकलो. बायकोला तर एक डास सहन होत नाही…या सगळ्यापेक्षा उकाड्याची दिवसाची ड्यूटीच बरी हो…’’

दस्तूर मनापासून बोलत होते. ते खोटं बोलत नाही. पण शिखानं स्वत:च्या मनांत जे तर्कट रचलं होतं त्यामुळे तो मनातल्या मनांत शरमिंदा झाला. शिखाच्या हल्ली त्याला कंटाळा यायला लागला होता. त्यादिवशी तो घरी आल्यावर शिखाला काही बोलला नाही पण आज मात्र त्याला त्या फटक्याचं रहस्य सांगावंच लागलं.

ते ऐकून शिखा चकित नजरेनं सुधीरकडे बघत राहिली. ती काय उत्तर देणार होती अन् कोणत्या तोंडानं?

सुधीर एकच प्रश्न पुन्ह:पुन्हा विचारत होता, ‘‘अगं, ज्या माणसाला आपल्या बायकोला एक डास सहन होत नाही हे ठाऊक आहे, तिच्यासाठी जो जिवाचा आटापिटा करतो तो आपल्या बायकोला मारेल हे शक्य तरी आहे का? बोल ना, बोल शिखा,करेल का तो असं?’’

शिखा खाली मान घालून गप्प बसली होती. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. यावेळी शिखाला कुठंही हालचाल जाणवंत नव्हती. नवऱ्यानं दाखवलेल्या आरशात आपली ओंगळ छबी बघून तिला लाज वाटत होती. तिनं ठरवलं की आता आपण इतरांच्या घरात डोकावण्याचा भोचकपणा बंद करायचा. आपल्या संसारात, आपल्या घरात अधिक लक्ष द्यायचं.

काही दिवस बरे गेले. शिखानं स्वत:च्या सवयीवर बऱ्यापैकी ताबा मिळवला होता. पण जित्याची खोड ती…अशी सहजी बदलते थोडीच? काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं. नवरा अन् मुलं बाहेर जाताना त्यांना निरोप देण्याच्या निमित्तानं ती गेटापर्यंत जाऊन एक नजर कॉलनीच्या दोन्ही टोकांपर्यंत टाकायची.

या चाहूल घेण्याच्या, डोकावण्याच्या सवयीला अजून एक सोय उपलब्ध झाली होती दिवाळीच्या निमित्तानं. यावेळी सुधीरला दिवाळीत दुप्पट बोनस मिळाल्यामुळे त्यांनी अगदी धूमधडाक्यात खरेदी केली होती.

ड्रॉइंगरूमच्यासाठी सोफा कव्हर्स, कुशन्स, पडदे, शोभेच्या वस्तू अशी छान छान खरेदी झाली. त्या दुकानांत शिखाला जाळीचे पडदे दिसले. अत्यंत सुंदर असे ते पडदे तिनं तत्काळ खरेदी केले. दिवाळीत घर इतकं छान दिसत होतं की येणाऱ्या प्रत्येकानं शिखाचं कौतुक केलं. शिखा जणू ढगांत विहरंत होती.

आता एक फायदा असा झाला की शिखाला आता चाहुल घ्यायला, डोकावून बघायला दाराखिडक्यांच्या आड लपायची किंवा इकडून तिकडून कशाचा तरी आडोसा शोधायची गरजच नव्हती. खिडकी दरवाजांच्या जाळीदार पडद्यामागे ती उभी राहिली तर तिला सगळं दिसायचं पण ती कुणालाच दिसत नसे.

पण यात एक गैरसोय अशी होती की रात्री दिवे लागल्यावर बाहेरूनही घरातलं सगळं दिसे. म्हणून सायंकाळ होताच ती जाळीच्या आतून लावलेले दुसरे पडदेही ओढून घेत असे.

सायंकाळी तिला हल्ली इकडं तिकडं बघायला वेळ फारसा मिळत नसे. मुलांचे अभ्यास, सायंकाळचा संपूर्ण स्वयंपाक यामुळे सायंकाळ बिझी असायची. मात्र सकाळी अन् दुपारी कोण आलं, कुणाकडे आलं, किती जण होते, काय घेऊन आले होते वगैरे सर्व तपशील अप टू डेट असायचा…

त्या दिवशी दुपारी शिखा मेथीची जुडी निवडायला खिडकीशी बसली होती. नजर मेथीच्या जोडीनंच बाहेर रस्त्यावरही होतीच.

तेवढ्यात एका कर्कश्श हॉर्नच्या आवाजानं ती एकदम दचकली. शेजारच्या अनंत साहेबांकडे कुणीतरी आलं असावं. त्यांचं फाटक उघडण्याचा आवाज तिनं ऐकला अन् लगेच ती बघू लागली. दुपारच्या वेळी अशी खटारा मोटरसायकल घेऊन त्यांच्याकडे कोण आलं असावं?

तीन तरूण मोटर सायकलवरून आले होते अन् डोअर बेल न वाजवता त्यांनी बेडरमच्या उघड्या खिडकीतून आत उड्या घेतल्या.

ते बघून क्षणभर शिखा भीतीनं गारठली पण लगेच तिला अशा घटना आठवल्या. टी. व्ही, पेपर, व्हॉट्स एपवर आलेल्या बातम्या आठवल्या.

यावेळी रूची घरात एकटी असते. अनंतसाहेब ऑफिसात अन् मुलं होस्टेलला…

क्षण दोन क्षणांत तिनं तीनचार घरी मोबाइलवर मेसेज टाकले अन् ती आपलं दार बंद करून त्यांच्या घरी पोहोचली. त्यांची कडी बाहेरून लावून ती मोठमोठ्यांदा मदतीसाठी ओरडू लागली.

आतून रूचीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. शिखानं बाहेरून कॉलबेल वाजवण्याचा अन् हाकांचा सपाटा लावला. तेवढयात शेजारी पाजारी राहणारे अनेकजण तिथं पोहोचले होते. कुणीतरी पोलिसांना कळवलं होतं. पोलीस पोहोचण्यापूर्वीच खिडकीतून उड्या मारून पळण्याच्या प्रयत्नातल्या त्या तिघांना लोकांनी धरून त्यांचे हातपाय बांधून टाकले होते. त्यांची मोटरसायकल आडवी पाडली होती.

शिखानं बाहेरून दाराची कडी काढली अन् रूचीनं आतून दार उघडलं. ती तीन मुलं तिच्याकडून कपाटाच्या किल्ल्या मागत होती. त्यांच्या हातात चाकू होते अन् त्यांना घराबद्दल पूर्ण माहिती होती.

‘‘शिखा आज तू मला वाचवलंस, माझं घर वाचवलंस, तू आली नसतीस, इतकी माणसं गोळा केली नसतील तर त्यांनी मला मारून टाकलं असतं.’’ एवढं बोलून रूची रडायला लागली.

सगळे लोक शिखाच्या प्रसंगावधानाचं, तिच्या सतर्कतेचं कौतुक करत होते. कानोसा घेऊन, चाहुल घेऊन अंदाज बांधण्याच्या तिच्या सवयीपायी तिनं कित्येकदा नवऱ्याची बोलणी खाल्ली होती, त्याच सवयीनं आज रूचीचं घर अन् रूचीचा जीव वाचवला होता.

महिला इन्स्पेक्टरनंही शिखाला शाबासकी देत इतर सर्वांनाच सांगितलं की, ‘‘महिलांनी जागरूक राहायला हवं. आपलंच घर नाही तर इतरांच्या घराकडेही लक्ष ठेवायला हवं. थोडीही संशयास्पद व्यक्ती, संशास्पद हालचाली दिसल्या तर लगेच एकमेकांना मेसेज टाका, आरडाओरडा करा. एकमेकांना मदत करा.’’

सुधीरच्या ऑफिसातही ही बातमी पोहोचली. घरी येण्यापूर्वीच शिखाचं धैर्य व जागरूकतेची माहिती त्याला मिळाली.

सुधीर हसंतच घरात शिरला अन् त्यानं शिखाला मिठीत घेतलं. ‘‘शिखा तुझ्या भोचकपणामुळेच आज एक मोठी दुर्घटना टळली. आता मी तुला कधीही रागावणार नाही.’’ त्यानं म्हटलं.

शिखानं त्याला दूर ढकलंत रडवेल्या आवाजात म्हटलं, ‘‘आजही माझी चेष्टा करताय का?’’

‘‘नाही गं, मी मनांपासून म्हणतोय, मलाही तुझं खूप कौतुक वाटतंय.’’ तिला पुन्हा मिठीत घेत सुधीर म्हणाला. ‘‘पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘पण मला आता वेगळीच काळजी वाटतेय. आता तर तूं रोजच नवे नवे किस्से सांगशील अन् मला मुकाट्यांनं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल, कारण तुझ्या नावावर आता हा एक किस्सा कायमचा चिकटला आहे ना?’’

‘‘चला, काहीतरीच तुमचं!’’ म्हणंत शिखाही त्याला बिलगली.

पाठीराखे

कथा * सिद्धार्थ जयवंत

समीर ऑफिसच्या गोष्टी घरात कधीच बोलत नाही, त्यामुळेच त्याच्या ऑफिसात अधूनमधून होणाऱ्या पार्ट्यांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. ऑफिसमधल्या ‘ऑफिसेत्तर बातम्या’ मला तिथेच समजतात.

कुणीही नवरा आपलं ‘लफडं’ किंवा ‘प्रकरण’ घरी कधीच सांगत नाही, पण इतरांचं काही असलं तर मात्र आवर्जून घरी सांगतो. मग तीच ‘मसालेदार’ झणझणीत बातमी बायको पार्टीत इतरांबरोबर शेयर करते त्यावेळी सांगणारीच्या डोळ्यांतली चमक अन् ऐकणाऱ्यांची उत्सुकता अगदी बघण्यासारखी असते.

मागच्या आठवड्यात जी पार्टी झाली त्यात सर्व बायकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मी होते. मला सर्वांसमोर अपमानित करत सगळ्यात आधी नीलमने म्हटलं, ‘‘तुझ्या समीरचं, त्या अकाउंट सेक्शनच्या बडबड्या रितूबरोबर प्रकरण सुरू आहे, खरं का.’’

त्यानंतर इंदू, नेहा, कविता, शोभा सगळ्यांनीच या बातमीला दुजोरा देत त्यांना सिनेमाला जाताना, हॉटेलात कॉफी पिताना वगैरे बघितल्याचं सांगितलं. त्यामुळे शंकेला जागा नव्हतीच… मनातून मी हादरले. दु:खीही झाले, पण वरकरणी मात्र शांत व हसतमुखच होते. बातमीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्यात मी यशस्वी ठरले.

त्यांचे सल्ले अन् सहानुभूती मला नको होती म्हणून मी सरळ प्रसाधनगृहात शिरले. तिथल्या एकांतात  मला दोन गोष्टी सुचल्या. एक तर अशा वेळी नवऱ्याशी भांडण करून फायदा होत नसतो. भांडणाचा परिणाम उलटा होतो. दुसरं म्हणजे अशा वेळी रडूनभेकूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा काही तरी वेगळीच युक्ती करायला हवी.

यांचं प्रकरण नेमकं किती पाण्यात आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी प्रसाधनगृहातून बाहेर पडले अन् पार्टी हॉलमध्ये गेले.

हॉलच्या एका कोपऱ्यात ती दोघं मला हसतबोलत असलेली दिसली. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणलं अन् बेदरकारपणे चालत त्या दोघांपाशी पोहोचले.

मला अचानक आपल्याजवळ बघून दोघंही एकदम दचकलीच! त्यांच्या मनात चोर असणार हे सांगणारा तो पुरावाच होता.

‘‘रितू, किती सुंदर दिसते आहेस? तुझा ड्रेसही फार छान आहे हं! मी तिची स्तुती केल्याने ती जरा खूष झाली.

मग मी असंच थोडं इकडचंतिकडचं बोलत राहिले. एखादा विनोद ऐकवला. तीही त्यामुळे मोकळी झाली. मोकळेपणाने हसूबोलू लागली.

समीरला माझ्या वागण्यात कोणतीच आक्षेपार्ह गोष्ट न आढळल्यामुळे तो निर्धास्त झाला अन् तेथून निघून गेला. दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळला.

मनातला राग अन् तिरस्कार लपवत मी खूपच वेळ रितूबरोबर घालवला. त्यामुळे रितू व समीर यांना एकत्र येण्याची संधी मी मिळू दिली नाही.

मी रितूला खूपदा ‘एकदा घरी ये ना.’ असं म्हणत होते. शेवटी एकदाचं तिनेही मला ‘घरी या,’ असं आमंत्रण दिलं. मला तेच हवं होतं.

मनातून मी उदास होते. समीरच्या विश्वासघाताने मी दुखावली गेले होते. पण वरकरणी तसं काहीच भासवत नव्हते. मनातून मात्र दोघांना धडा कसा शिकवायचा याचा बेत ठरवत होते.

माझं औदासीन्य सासूबाईंच्या नजरेतून सुटलं नाही. त्या तोंडाच्या फटकळ, पण मनाच्या फारच प्रेमळ आहेत. त्यांनी खोदूनखोदून विचारल्यावर मी त्यांना सगळं काही सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवस आम्ही खूप काही विचारविनियम केला. एकूणच त्यांच्यापाशी बोलल्यामुळे माझं औदासीन्य दूर झालं अन् माझ्यात नवा उत्साह संचारला.

नंतरच्या आठवड्यात समीर तीन दिवसांच्या टूरवर गेला. मी नेमका शनिवार निवडला अन् सकाळी दहाच्या सुमाराला रितूच्या घरी पोहोचले.

रितूने हसून माझं स्वागत केलं, तरी पण तिच्या डोळ्यांत काळजी अन् आश्चर्याचे भाव होतेच.

‘‘अगं, समीर टूरवर गेलाय, मला वेळ होता, तुझी आठवण झाली. म्हटलं नव्या मैत्रीला खतपाणी घालायचं तर वरचेवर भेटायला हवं. म्हणून तुझ्याकडे आले,’’ मी अगदी आपलेपणाने बोलले.

‘‘तुमचं स्वागत आहे सीमाताई, राहुलला का नाही आणलंत?’’ तिने ड्रॉइंगरूमकडे जात विचारलं.

‘‘माझी नणंद आलीए माहेरी, राहुल तिच्या दोन मुलांबरोबर खेळतोय.’’

‘‘काय घ्याल? चहा की कॉफी?’’

‘‘चहा चालेल… रितू अगं, रिक्शातून उतरताना माझ्या कमरेत उसण भरलीए… मी जरा आडवी होऊ का?’’

‘‘हो, हो….’’ तिने पटकन मला उशी दिली अन् मी तिच्या बेडवर आरामात लोळले. ती चहा करायला गेली.

चहाबरोबर तिने बरंच काही फराळाचंही आणलं होतं. आम्ही मजेत चहाफराळ आटोपला. लवकरच आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलू लागलो.

बोलताबोलता मी तिच्या लग्नाचा विषय काढला. ती थोडी बावरली, घाबरली.

‘‘तू लव्ह मॅरेज करणार की, ठरवून लग्न करणार?’’

या प्रश्नावर ती जरा बावचळली. ‘‘बघूया कसं काय ते,’’ ती कशीबशी उत्तरली.

‘‘तुझ्यासारख्या देखण्या, स्मार्ट, मिळवत्या मुलीला तर किती तरी मित्र असतील. कुणाशी तरी नक्कीच प्रकरण चालू असणार… हो ना? सांग ना? तो भाग्यवंत कोण आहे?’’ मी तिचा पिच्छाच पुरवला.

आता ती कशी सांगणार की तिचं प्रकरण माझ्याच नवऱ्याबरोबर चाललंय म्हणून? मी अजून थोडा वेळ याच विषयावर छेडून तिला छळलं… मला त्यात खूपच मजा येत होती.

तेवढ्यात माझ्या मोबाइलवर दोन फोन आले. एक माझ्या सासूबाईंचा अन् दुसरा माझ्या भिशीतल्या मैत्रिणीचा. दोघींनाही मी आता रितूकडे आल्याचं अन् माझ्या कमरेत उसण भरल्याचं अगदी रंगवून सांगितलं.

मध्ये जेमतेम अर्धा तास गेला असेल तेवढ्यात माझ्या सासूबाई, नणंद स्नेहा, तिची दोन मुलं अन् रोहित असे सगळेच रितूच्या घरात दाखल झाले. मुलांनी सरळ टीव्हीकडे मोर्चा वळवला अन् ती कार्टून चॅनल लावून बसली. सासूबाई अन् स्नेहा सोफ्यावर बसून माझ्या कमरेतल्या उसणीबद्दल चौकशी करू लागल्या.

‘‘आई, तुम्ही माझी फारच काळजी करता,’’ मी भरल्या गळ्याने बोलले.

‘‘तू एक नंबरची बेपर्वा मुलगी आहेस. हजारदा सांगितलंय तुला की वजन कमी कर, पसारा आटोक्यात आण. एवढं वजन असल्यावर कमरेत उसण भरणारच. पण तुला ऐकायला नको…’’ सासूबाई कडाडल्या. मी ओशाळून रितूकडे बघितलं.

सासूबाईंचा कडकलक्ष्मी अवतार बघून रितू घाबरली होती. ती प्रथमच त्यांना बघत होती.

‘‘समीरदादा जेव्हा एखाद्या सुंदर फुलपाखराच्या मागे जातील तेव्हा वहिनीचे डोळे उघडतील,’’ स्नेहाने म्हटलं. त्यावर सासूबाई भडकून उठल्या.

‘‘तुझ्या दादाच्या तंगड्या तोडीन अन् त्या फुलपाखराचे पंख उपटीन. समजलीस?’’ त्यांचा आवाज तापलेला होता.

‘‘अगं, मी गंमत केली, चिडतेस काय?’’

‘‘मग असं मूर्खासारखं बोलतेस कशाला?’’

स्नेहाने तोंड वाकडं केलं अन् ती गप्प बसली. रितू उगीचच बोटं एकमेकांत गुंफत, पुन्हा मोकळी करत जमिनीकडे दृष्टी लावून उभी होती. सासूबाईंकडे बघण्याचं धाडस तिला होत नव्हतं.

सासूबाई मला अन् स्नेहाला सांगू लागल्या, ‘‘हल्लीच्या पोरींना समजूतही नाही अन् धीरही नाही. आपला संसार सांभाळण्याची अक्कलही नसते. उगाच याच्या त्याच्या नादी लागायचं… प्रेमविवाह तरी ठीक आहे, पण नुसतंच प्रेम करायचं याला काय अर्थ आहे? जी वाट आपल्या कामाची नाही, त्या वाटेवर चालायचंच कशाला? खरं ना, रितू?’’

‘‘अं?… हं… हो!’’ रितू दचकून हो म्हणाली.

‘‘तुझं लग्न झालंय?’’

‘‘नाही…’’

‘‘कधी करते आहेस लग्न?’’

‘‘लवकरच!’’

‘‘व्हेरी गुड! तुझे आईबाबा कुठेत?’’

‘‘माझे बाबा वारले… आई आहे, ती आज माझ्या मावशीला भेटायला गेली आहे.’’

‘‘कधी येईल?’’

‘‘संध्याकाळी.’’

‘‘मी येईन त्यांना भेटायला. सुने, अगं आज काय इथेच रहायचा बेत आहे का तुझं काय म्हणतंय दुखणं?’’

‘‘आई, दुखणं तर वाढलंय… फार त्रास होतोय…’’ मी कण्हत म्हणाले.

‘‘डॉक्टरांना बोलावूयात का?’’

‘‘नको, नको,’’ मी घाबरल्याचं भासवून म्हणाले, ‘‘रितू तुझ्याकडे आयडेक्स असेल का?’’

‘‘आणते. लगेच आणते,’’ म्हणत रितू पटकन आत गेली. तिच्याकडून मी आयोडेक्स लावून घेतलं.

रितूला माझ्या सासूबाई, तरुण पोरींनी कसं वागायला हवं यावर लेक्चर देत होत्या. स्नेहा मुद्दाम वाकड्यात शिरून त्यांना अधिक चिडवायला भाग पाडत होती. कुठल्याही क्षणी दोघी कडाडून भांडायला लागतील असं वातावरण होतं. त्या वातावरणात रितूचं टेन्शन वाढलं होतं.

तेवढ्यात डोअर बेल वाजली. स्नेहाने जाऊन दार उघडलं. ती परतली तेव्हा तिच्यासोबत माझ्या भिशी ग्रुपच्या तिघी मैत्रिणी अनीता, शालू व मेघा होत्या.

या तिघी खूपच बडबड्या आहेत. त्यांच्या येण्याने मायलेकींमधलं वाक्युद्ध थांबलं. पण खोलीतला कोलाहल मात्र एकदम वाढला.

‘‘आपल्या नव्या मैत्रिणीकडून सेवा करवून घेत आहेस ना, सीमा?’’ डोळे मोठे करत अनीताने म्हटलं अन् सगळेच हसले.

‘‘रितू, तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय सीमाकडून… सीमा सारखी तुझ्याबद्दल बोलतेय सद्या… बघ हं, तिच्या हृदयात विराजमान होऊन आम्हाला तिथून हाकलून लावू नकोस हं! तू प्लीज, आमच्याशीही मैत्री कर,’’ शालूने रीतूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

‘‘आमच्या नवीन मैत्रीचा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही गरमागरम समोसे, जिलबी अन् ढोकळाही आणला आहे.’’ मेघाने अशा काही आविर्भावात म्हटलं की रितूलाही हसायला आलं.

आपापली ओळख करून देऊन तिघी बेधडक स्वयंपाकघरात शिरल्या. आयोडेक्स जागेवर ठेवून हात धुऊन रितू स्वयंपाकघरात जाईपर्यंत त्यांचा चहादेखील करून झाला होता.

एक गोष्ट मात्र खरी की, रितूच्या घरात प्रत्येक गोष्ट होती अन् ती जागच्या जागी होती.

मुलांसाठी स्नेहाने फ्रीजमधून ज्यूसचा कॅन काढला. आम्ही सगळे चहा, समोसे, जिलबी खात मजेत गप्पा मारत होतो. रितूच्या फ्लॅटमध्ये इतका दंगा कधीच झाला नसेल.

माझ्या मैत्रिणींनी रितूशी लगेच मैत्री केली. तीही अगदी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होती. जणू खूप जुनी ओळख असाव.

‘‘सीमा, रितूशी मैत्री होण्याचा एक फायदा तुला नक्कीच होईल,’’ खट्याळपणे शालूने म्हटलं.

‘‘कसला फायदा?’’ मीही उत्सुकतेने विचारलं.

‘‘अगं, समीरच्याच ऑफिसमध्ये असल्याने रितू तुला तिथली बातमी बरोबर देईल. म्हणजे जर तुझ्या समीरचं तिथे कुणाशी लफडं झालं तर ही तुला लगेच सूचना देईल की!’’

‘‘अगंबाई खरंच? रितू, तू माझे डोळे बनून समीरवर लक्ष ठेवशील?’’ मी खूपच प्रेमाने रितूला गळ घातली.

रितूचे गाल एकदम गुलाबी झाले. तिने उत्तर दिलं नाही. फक्त मान डोलावली अन् मग ती टेबलावरचं आवरायला लागली.

खोलीतला पसारा आवरून होतोय तेवढ्यात माझे सासरे तिथे पोहोचले. ते येताच वातावरण बदललं.

माझे सासरे एकदम कडक आहेत. माझ्या मैत्रिणींनी पटापट पदर दोन्ही खांद्यावरून घेतला अन् वाकून त्यांना नमस्कार केला. सगळ्या अशा गप्प झाल्या जणू त्यांना बोलायला येतंच नाही.

‘‘सूनबाई, घरी चलण्याच्या स्थितीत आहेस की अॅम्ब्युलन्स मागवू?’’ त्यांनी गंभीरपणे विचारलं.

‘‘चलेन बाबा,’’ मी नम्रपणे उत्तरले.

‘‘तू धसमुसळेपणाने चढतेस, उतरतेस, जरा सावकाशीने कामं करावीत ना?’’

‘‘होय बाबा.’’

‘‘मी डॉक्टर मेहंदळ्यांना फोन केलाय. घरी जाताजाता त्यांना दाखवून, घरी जाऊ.’’

‘‘होय बाबा’’

‘‘इथे कशाला आली होतीस?’’

‘‘या रितूला भेटायला आले होते.’’

‘‘हिला कधी बघितली नाही… नवी ओळख आहे का?’’

‘‘हो बाबा, ही ना यांच्याच ऑफिसात काम करते.’’

‘‘रितू बाळा, तू एकटीच राहातेस इथे?’’

‘‘नाही काका, आई असते माझ्याबरोबर.’’ बाबांच्या आवाजानेच रितूला कापरं भरलं होतं.

‘‘असू दे, असू दे. बाबा नाहीत तरी आम्ही आहोत ना? तुला कधीही गरज वाटली तर आम्हाला सांग,’’ बाबा बोलले मग आमच्याकडे वळून म्हणाले, ‘‘आता निघा…’’

बाबा निघाले तसे आम्हीही उठलो.

निघतानिघता सासूबाई रितूला म्हणाल्या, ‘‘रितू बेटा, आता लवकर तुझ्या लग्नाचं आमंत्रण आमच्या हातात पडू दे. उशीर झाला तर चांगली मुलं मिळत नाहीत.’’

‘‘रितू, तुला आम्ही आमच्या भिशी ग्रुपची मेंबर करून घेऊ. मी तुला नंतर फोन करते.’’ अनीताच्या या प्रस्तावाला आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं.

तिन्ही मुलं, ‘‘थँक्यू आंटी,’’ म्हणत बाहेर निघून गेली. सर्वात शेवटी मी रितूचा आधार घेत दाराबाहेर आले.

‘‘रितू, या सगळ्यांचं इतक्या मोकळेपणाने लोळणं, वागणं तुला खटकलं तर नाही ना?’’ मी तिला जरा काळजीने विचारलं.

‘‘नाही ताई, ही सगळी तर खूपच भली माणसं आहेत.’’ ती म्हणाली. पण मनातून ती थोडी नर्व्हस झाली होती.

‘‘तुला सांगते, रितू, ही खरोखर फार भली माणसं आहेत. आणि मुख्य म्हणजे यांचा मला आधार आहे. यांच्यामुळे मला स्वत:ला खूपच सुरक्षित वाटतं. हे माझे पाठीराखे, सतत मला मदत करतात. माझ्या संसाराकडे कुणी वाकड्या नजरेने बघायचं धाडसही करू शकत नाही. यांच्याशी भांडण करणं, यांना चॅलेंज करणं महाकठीण आहे. आपली मैत्री झाली आहे. तू माझी मैत्रीण म्हटल्यावर ही सगळी माणसं तुझ्याही पाठीशी उभी राहातील. असे पाठीराखे भाग्याने मिळतात. स्वत:ला सुरक्षित वाटणं ही फार मोठी गोष्ट असते. रितू, एरवी लोक किती भीत भीत जगत असतात.’’

रितूने मान डोलवली. ‘‘सांभाळून जा,’’ तिने म्हटलं… आम्ही प्रेमाने एकमेकींचा निरोप घेतला.

दोन्हीतिन्ही गाड्यांमध्ये सर्वांनी बसून घेतलं होतं. माझे पाठीराखे माझी  वाटच बघत होते. रितूचा आधार सोडून मी व्यवस्थित चालत त्यांच्यात जाऊन मिसळले. माझ्या कमरेत उसण भरलीच नव्हती. सगळं काही ठरवलेल्या योजनेप्रमाणेच पार पडलं होतं.

मी दोन बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करताच सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

कपाळावरची लाल टिकली

कथा * दीपा पांडे

अजून लोकल ट्रेन यायला पंधरा मिनिटांचा अवकाश होता. रम्या वारंवार प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला बघत होती. राघव अजून पोहोचला नव्हता. ही लोकल चुकली तर पुढे अर्धा तास वाट बघावी लागणार होती.

तेवढ्यात रम्याला राघव येताना दिसला. तिनं हसून हात हलवला. राघवनंही हसून प्रतिसाद दिला. सकाळचे सात वाजले होते. गर्दी फारशी नव्हती. स्टेशनवर तुरळक माणसं होती. शाळेत जाणारी तीन चार मुलं, एक दोन जोडपी अन् थोड्या अंतरावर एक तरूणांचं टोळकं…बाकी कुणी नव्हतं.

रम्या बाकावरून उठून प्लॅटफॉर्मच्या मध्यावर आली. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला. ती मोबाइल ऑन करतेय तेवढ्याच कुणीतरी मागून तिच्या पाठीत सुरा खुपसला. धक्क्यानं ती कोलमडून खाली पडली. डोकं आपटल्यामुळे जखम झाली…ती बेशुद्ध पडली.

राघव तिच्याजवळ पोहोचतो हल्ला करणारा पळून गेला होता. सगळे लोक घाबरून ओरडत होते. रेल्वे पोलिसांनी ताबडतोब तिला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. रम्याच्या मोबाइलवरून तिच्या बाबांना फोन केला. ते स्टेशनच्या जवळच होते. रम्याबरोबर ते स्टेशनला आले होते. तिथं त्यांना कुणीतरी भेटणार होतं. रम्याला रोज ट्रेन बदलून महिंद्रा सिटीत आपल्या ऑफिसला जावं लागायचं.

अचानक असा फोन आलेला बघून रम्याच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांच्यासोबत असलेल्या माणसानं धीर देऊन त्यांना इस्पितळात नेलं.

रम्याला आयसीयूत नेलं होतं. घरून तिची आई, थोरली विवाहित बहीण आणि तिचा नवरा ही तिथं आली होती. आई अन् बहिणीचे अश्रू थांबत नव्हते. बहिणीचा नवरा सगळी धावपळ करत होता.

राघव कोपऱ्यातल्या एका बाकावर डोकं धरून बसला होता. रम्याच्या कुटुंबीयांना त्यानं प्रथमच बघितलं होतं. त्यांच्याशी काय अन् कसं बोलावं तेच त्याला समजत नव्हतं. रम्यानं त्याला सांगितलं होतं की तिचे आईवडिल खेड्यात राहतात. त्यांना तामिळखेरीज इतर कोणतीही भाषा येत नाही. ती स्वत: अभ्यासात हुशार होती. शहरात हॉस्टेलला राहून शिकली. इंजीनियर झाली. थोरल्या बहिणीचं लग्न तर बारावी होता होताच जवळच्या गावातल्या एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात करून दिलं होतं. राघव सकाळपासून आपल्या जागेवरून उठलाही नव्हता. आत कुणालाच जाऊ देत नव्हते. त्यानं ऑफिसतल्या काही सहकाऱ्यांना फोन करून रम्याची बातमी कळवली होती. सायंकाळी ते लोक येणार होते. ती मंडळी आल्यावरच तो रम्याच्या आईवडिलांजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकणार होता.

गेली दोन वर्ष राघव आणि रम्या, ऑफिसच्या एकाच बिल्डिंगमध्ये कामाला होती. रम्या एका श्रीमंत शेतकरी तामिळ कुटुंबातली, उच्च ब्राह्मण कुळातली मुलगी होती तर राघव उत्तर प्रदेशातल्या छोट्या गावातला मागासवर्गीय कुटुंबातला तरूण होता. दोघांचा म्हटलं तर कधीही संबंध नव्हता. तरी एका अदृश्य ओढीनंच ती दोघं एकत्र आली होती.

रम्याची व त्याची पहिली भेटही याच लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर झाली होती. चेंग्लप्त स्टेशनवरून त्याला परानुरूसाठी लोकल पकडायची होती. गळ्यात कंपनीचं आयडी कार्ड लटकवून उभ्या असलेल्या रम्याकडे तो बिचकतच गेला. इंग्रजीत दोघांचं संभाषण सुरू झालं. पण रम्या सेंट्रल स्कूलमध्ये शिकलेली असल्यानं हिंदीही बोलू शकत होती. तो प्रथमच लोकलनं प्रवास करतोय हे ऐकल्यावर तिनं त्याला सल्लाही दिला की जर पेइंगगेस्ट म्हणून राहायचं असेल तर परानुरूच्या महिंद्रा सिटीत जागा बघ. रोजची चेंग्लप्त-परानुरू धावपळ वाचेल.

रम्याला स्वत:लाही रोज दोन ट्रेन बदलून ऑफिसला पोहोचावं लागत होतं. कारण तिचं घर खेडेगावातच होतं. ती दोघं बोलताहेत तोवर ट्रेन आली. रम्या पटकन् चढली पण राघवच्या लक्षात येई तो ट्रेन सुरूही झाली होती. त्याला प्लॅटफॉर्मवरच उभा पाहून रम्यानं पटकन् ट्रेनमधून उडी मारली.

राघव तर पार गांगरला होता. घाबरलाही होता. कसंबसं बोलला, ‘‘तुम्ही असं करायला नको होतं.’’

‘‘अरे, तू अजून इथं नवा आहेस, काहीच माहीत नाही. उगीच चुकीच्या लोकलमध्ये बसून भलतीकडे पोहोचला तर? म्हणून मी उडी मारली.’’ निर्मळ हसून रम्यानं म्हटलं.

आता त्यानं नीट बघितलं तिच्याकडे, कुरळे केस, सावळा रंग, हसरा चेहरा, तरतरीत नाक अन् ओठांवरचं स्निग्ध, निर्मळ हास्य…त्याला वाटलं ही एक मूर्ती आहे. काळ्या मातीतून तयार केलेली. त्याचे वडील त्याला मूर्ती बनवून द्यायचे अन् त्यावर रंगकाम करायला सांगायचे. त्याची त्याला आठवण झाली. तिच्या रूंद कपाळावर छोटीशी काळी टिकली शोभून दिसत होती.

‘‘कसला विचार करतो आहेस?’’

आता तोही एकेरीवर आला, ‘‘तुला काही झालं असतं तर? मी स्वत:ला आयुष्यभर क्षमा करू शकलो नसतो. एका अनोळखी माणसासाठी एवढी जोखीम घेतलीस? असं करायला नको होतंस…’’

‘‘ब्लड…ब्लड…’’ डॉक्टर जे काही बोलत होता, त्यातले तेवढे दोनच शब्द त्याला समजले. डॉक्टर रम्याच्या वडिलांशी व मेहुण्याशी बोलत होते.

राघव चटकन् उठून त्यांच्यापाशी गेला. ‘‘डॉक्टर, माय ब्लड ग्रुप इज ओ पॉझिटिव्ह.’’

‘‘कम विथ मी.’’ डॉक्टर म्हणाले. राघव त्यांच्याबरोबर चालू लागला. डॉक्टरांनी सांगितलं, ‘‘अजून तीन-चार बाटल्या रक्ताची गरज लागू शकते.’’ राघवनं म्हटलं, ‘‘आमच्या ऑफिसचे सहकारी सायंकाळी येतील ते ही रक्त देऊ शकतात.’’

रक्तदान करून राघव इस्पितळाच्या आवारातल्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. त्यानं कॉफी मागवली. एक बिस्किटाचा पुडा घेतला अन् तो काफी बिस्किटं घेऊ लागला. सकाळपासून उपाशीच होता ना?

समोर लक्ष गेलं तर रम्याचे वडिलही कॉफी पिताना दिसले. पण भाषेचा मोठ्ठा अडसर असल्यामुळे तो त्यांच्याशी बोलू शकला नाही.

तेवढ्यात पोलीस तिथं आले. राघवचं स्टेटमेंट घेतलं. पोलिसांना सांगितल्याशिवाय शहर सोडायचं नाही आणि एकूणच केसमध्ये पोलिसांना सहकार्य करायचं असं बजावून ते निघून गेले.

सायंकाळी सहा वाजता त्याचे ऑफिसातले सहकारी आले, तेव्हा त्याच्या जिवात जीव आला. त्यांच्यापैकीही तिघा चौघांनी आधी रक्तदान केलं. मग ते रम्याच्या आईवडिलांना भेटले. राघवची त्यांच्याशी ओळख करून दिली.

रम्याची आई म्हणाली, ‘‘हो, सकाळपासूनच यांना इथं बसलेलं बघितलंय, पण ते रम्याचे सहकारी असतील हे ठाऊक नव्हतं. धन्यवाद तुम्हाला.’’ शेवटचे दोन शब्द राघवसाठी होते. त्याचे हात हातात घेऊन ती रडू लागली. राघवनं थोपटून तिला शांत केलं.

सहाकाऱ्यांसोबत राघव परत आला. त्यानंतर तो रोजच सायंकाळी सात ते नऊ इस्पितळाच असायचा. पंधरा दिवस रम्या आयसीयूमध्ये होती. त्यानंतर तिला प्रायव्हेट वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, तेव्हा प्रथमच राघव तिला भेटला. रम्याच्या पाठीवरची जखम भरत आली होती, पण तिच्या शरीराच्या डाव्या भागाला पक्षाघाताचा झटका आल्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. सतत ती रडत असायची. राघव तिला धीर द्यायचा. लवकर बरी होशील म्हणून तिचा उत्साह वाढवायचा. हळूहळू सहा महिने उलटले.

रम्या खरोखर पूर्णपणे बरी झाली. ज्या दिवशी ती प्रथमच ऑफिसला जाणार होती, त्यादिवशी सकाळपासून तिला सहकाऱ्यांचे अनेक फोन येऊन गेले. ‘नक्की ये’ आज राघवची?फेयर वेल पार्टी होती. राघवची बदली चंदिगड ब्रँचला झाली होती. तो त्याच्या त्या ऑफिसमधला शेवटचा दिवस होता.

कंपनीच्या गेटापर्यंत रम्याला तिचे अप्पा सोडायला आले होते. तिच्या स्वागतासाठी तिचे सहकारी, मित्रमैत्रिणी गेटमध्येच उभे होतो. तिनं हात जोडून, हसून सर्वांना अभिवादन केलं. धन्यवाद दिले. सगळ्यात मागे राघव हातात फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता.

रम्यानं स्वत: पुढे होऊन त्याच्या हातातून तो पुष्पगुच्छ घेतला, ‘‘हा तू माझ्याचसाठी आणला आहेस ना?’’

सगळ्यांना हसायला आलं. ‘‘तुझा हाच स्वभाव मला फार आवडतो,’’ मनातल्या मनात राघवनं म्हटलं.

ऑफिसात आल्यावरच रम्याला राघवच्या बदलीचं, त्याच्या फेयर वेल पार्टीचं आणि तिच्या वेलकम पार्टीचंही समजलं. काहीही न बोलता दोघं आपापल्या कामात गर्क झाले.

राघवच्या मनात आलं, तो किती आतुरतेनं रम्या बरी होऊन पुन्हा कामावर रूजू होण्याच्या दिवसाची वाट बघत होता. आज तो दिवस उगवला, पण आजच तो तिच्यापासून दूर जाणार होता.

रम्या विचार करत होती की मी इस्पितळात असताना रोज राघव यायचा. किती मला समजावायचा. आईला उगीचच शंका येत होती की यानंच मारेकरी धाडला असावा. अन् आता हिरो बनून रोज भेटायला येतोय. अप्पांना तिच्या धाकट्या मामांवर संशय होता. कारण तो नोकरी व्यवसाय करत नव्हता. त्याला संगत चांगली नव्हती, म्हणून रम्यानं त्याची लग्नाची मागणी धुडकावली होती. कदाचित त्या रागामुळे त्यानं हे कृत्य केलं असावं. आमच्याकडे मामा भाचीचं लग्न होतं हे ऐकून राघव चकित झाला होता. त्यांच्यात असं कधीच होत नाही.

यावेळी घरात किती टेन्शन होतं…सगळ्यांकडेच संशयी नजरेनं बघितलं जात होतं. इतके दिवस इस्पितळात रहावं लागलं. फिजियोथेरेपी घ्यावी लागली. आता सगळं ठीक होतंय. राघव आला की माझी कळी खुलायची, हे अप्पा अम्माला समजलं होतं.

आईच्या माहेरानं रागावून संबंध तोडले होते. दोन महिन्यांपूर्वी एकदाचा तो गुन्हेगार पकडला गेला. नाहीतर राघवलाही पोलिसांनी बाहेर जाण्याची परवानगी दिली नव्हती. कारण शेवटचा कॉल त्यालाच केला होता. ‘‘मी स्टेशनवर आलेय, तू कुठं आहेस?’’ त्यानंतरच्या कॉलकडे बघत असतानाच सुरा मारला गेला.

राघवनं सांगितलं की तो उत्तरप्रदेशातल्या बाराबंकी जिल्ह्यातला असून कुंभार कुटुंबातला आहे. लहानपणी वडील मूर्ती घडवायचे व राघव रंगकाम करून मूर्ती नटवायचा. त्यानं क्लेपासून एक सुंदर मुर्ती बनवून रम्याला दिली होती.

मधल्या काळात रम्याही एखाद्या निर्जीव मूर्तीसारखी झाली होती. तिला हालचाल करता येत नव्हती. बोलता येत नव्हतं. पण राघव तिच्याशी बोलायचा. त्याला आठवायचं, त्याचे बाबा मूर्ती तयार झाल्यावर त्याला रंगवायला द्यायचे, तेव्हा तो त्या मूर्तींशी बोलत बोलत रंगवायचं काम करायचा. त्याच्या रंगकामानं ती निर्जीव मूर्ती झळाळून उठायची. तिही जणू त्याच्याशी बोलायची.

हळूहळू रम्याही बोलू लागली. दोघांच्या अनेक विषयांवर गप्पा व्हायच्या. आयुष्यात हळूहळू रंग भरू लागला होता. पण राघवला हेच कळत नव्हतं की कोण कुणाच्या आयुष्यात रंग भरतंय. आता रम्याचं आयुष्य इंद्रधनुषी झालंय. आईबाबांच्या सावलीत ती सुखात राहतेय. आता तिला राघवची गरज नाहीए. तो आता इथून जातो आहे. व्हॉट्सएप, फेसबुकवर जेवढा संबंध राहील तेवढाच.

‘‘चला, चला…, आज सगळे एकत्र लंच घेणार आहोत, लक्षात आहे ना? लंच टाइम झालाय.’’ रमणनं सर्वांना हाक दिली.

सगळे एकत्र डायनिंग एरियात जमले, तेव्हा रम्या म्हणाली, ‘‘मला सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, तुम्ही माझा प्राण वाचवला…’’

‘‘सॉरी, मी तुला मधेच अडवतोय, पण सगळ्यात आधी तू राघवचे आभार मान, त्यानं सर्वात आधी रक्त दिलं, आम्हाला तुझ्या स्थितीची कल्पना दिली, रक्तही द्यावं लागेल हे सांगितलं.’’ रमण म्हणाला.

‘‘ठीक आहे, मी त्याला वेगळ्यानं धन्यवाद देईन.’’ हसत रम्यानं म्हटलं. राघवनं तिच्याकडे बघितलं अन् त्याच्या लक्षात आलं आज तिनं काळ्या टिकलीऐवजी लाल रंगाची टिकली लावली आहे अन् नेहमीपेक्षा किंचित मोठीशी आहे.

‘‘अगं, पण तो तुझा मारेकरी भयंकरच होता ना? तुम्हाला कधी त्याच्याविषयी संशय नाही आला?’’ शुभ्रानं विचारलं.

‘‘नाही आला…तो आमच्या शेजारीच राहायचा. माझ्याहून वयानं दोन तीन वर्ष लहानही आहे. अभ्यासाचे काही तरी प्राब्लेम घेऊन यायचा माझ्याकडे. पण तो माझ्यावर एकतर्फी प्रेम करतोय हे आम्हा कुणालाच कळलं नाही.’’ रम्या म्हणाली.

‘‘पण, पकडला गेला हे बरं झालं.’’ मुरली मोहननं म्हटलं.

सगळ्यांचं जेवण आटोपलं. जो तो आपापल्या वर्क टेबलकडे वळला. राघव आपल्या कॉफीच्या कपाकडे टक लावून बघत होता.

‘‘राघव, तुला काय वाटतं त्या मुलाविषयी?’’ रम्यानं राघवच्या जवळ बसत विचारलं.

‘‘माझ्या मते प्रेम म्हणजे दुसऱ्याला काही देणं…आनंद, अभिमान, सुख…घेणं हे कधी प्रेमाचं लक्षण असू शकत नाही. प्रतिदान मागतो तो स्वार्थ असतो…आसक्ती असते…प्रेमही फारच मौल्यवान आणि खूपच वरच्या पातळीवरची भावना असते.’’

‘‘हं? आणखी काही सांगायचं आहे? काही महत्त्वाचं?’’ खटयाळपणे रम्यानं विचारलं.

‘‘हो…अशीच नेहमी हसत राहा, आनंदी राहा. तुझ्या मित्रांच्या यादीत माझंही नाव राहू देत. आता फक्त तेच एक माध्यम असेल आपल्या संपर्काचं.’’

‘‘ठिक आहे…पण तू मला नाही विचारलंस काही?’’ ‘‘काय?’’

पुन्हा तेच हसू रम्याच्या चेहऱ्यावर होतं. ‘‘हेच, की मला काही सांगायचं आहे की नाही?’’

राघव विचारात पडला.

‘‘मनातल्या मनात कसला विचार करतो आहेस राघव? आता माझं ऐक. पुढल्या महिन्यात माझे अप्पा बाराबंकीला तुझ्या घरी येतील आपल्या लग्नाबद्दल बोलायला.’’

‘‘त्यांना माझी जात माहीत आहे का?’’ राघव दचकला.

‘‘राघव, अरे, तू दिलेलं, तुझं रक्त आज माझ्या देहात आहे. आयुष्याचा धडा माणसाला खूप काही शिकवून जातो. अप्पाही तो शिकले आहेत. माणूसकीचं दर्शन झालंय त्यांना. आता त्यांना कशाचीच तमा नाहीए.’’ रम्यानं आपल्या हातात त्याचा हात घेत म्हटलं, ‘‘आता अप्पाही तुझं माझं रक्त वेगळं काढू शकणार नाही.’’

राघव तिच्याकडे बघत होता. एकदम म्हणाला, ‘‘आज तू लाल टिकली लावली आहेस?’’

‘‘तुझ्या लक्षात आलं ना? हा तूच दिलेला लाल रंग आहे. आजा माझ्या टिकलीत दिसतोय…अन् लवकरच कुंकू बनून माझं अस्तित्वात झळकेल. समजलं?’’

राघवनं हसून मान डोलावली. एकमेकांचा हात धरून दोघं आयुष्याच्या कॅनव्हासवर नवे रंग भरण्यासाठी निघाले.

प्रायश्चित्त

कथा * सुधा कोतापल्ले

वरात नवरीच्या निवासस्थानापर्यंत येऊन पोहोचली होती. नवरदेवावरून ओवाळायला पाण्याची कळशी घेतलेल्या स्त्रिया व औक्षणाचं तबक घेऊन वधूची आई दारातच उभ्या होत्या. नवरदेवाला घोड्यावरून उतरवून घेण्यासाठी वधूचे वडिल आणि भाऊ पुढे आले. घोड्यावरून उतरतानाच नवरदेव भडकला. कसाबसा उभा राहिला. पण बोहल्यापर्यंत पोहोचेतो त्या दोघांच्या लक्षात आलं, नवरदेव भरपूर दारू ढोसून आलेला आहे. त्यामुळे त्याचा चालताना तोल जातोय. कसंबसं त्याला स्टेजपर्यंत आणून खुर्चीवर बसवलं. बापलेकांचं डोळ्यांच्या भाषेतच बोलणं झालं.

मुलानं वडिलांचं टेन्शन कमी करण्यासाठी हळूच म्हटलं, ‘‘बाबा, कदाचित लग्नाच्या आनंदात त्यांना जास्त झाली असेल, काळजी करू नका…’’

तो पुढे काही बोलणार होता, तेवढ्यात वधुवेषात नटलेली तनीषा तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात स्टेजवर पोहोचली. तिच्या हातातली वरमाला त्याच्या गळ्यात घालायला, त्याला खुर्चीतून उठून तिच्यासमोर उभं राहायला हवं होतं. दोनदा तो कसाबसा उठला अन् पुन्हा खुर्चीवर धप्पकन बसला. दोघांनी धरून त्याला उभा केला. तनीषाच्या गळ्यात माळ घालण्यासाठी त्याच्या हातात फुलांचा हार दिला. त्यानं हात उचलले, पण ते खाली आले. दोनदा असंच झाल्यावर लोक कुजबुजायला लागले.

वधुवेषातल्या लाजऱ्याबुजऱ्या तनीषानं हा सगळा प्रकार बघितला अन् तिचं डोकं तडकलं. हातातली वरमाला तिनं स्टेजवर फेकली अन् ती कडाडली, ‘‘मला अशा दारूड्याशी लग्न करायचं नाहीए.’’ ताडकन् वळून ती चालायला लागली. या अनपेक्षित घटनेनं सगळेच भांबावले. तनीषाला अडवायला मैत्रिणी धावल्या तोवर तिनं आपल्या खोलीत जाऊन धाडकन् दरवाजा लावून घेतला होता.

‘‘तनीषा दार उघड,’’ पुन्हा पुन्हा आईवडिल म्हणत होते.

तनीषानं सांगितलं, ‘‘एकाच अटीवर दार उघडेन, माझा निर्णय कुणी बदलायचा नाही.’’ तिनं दार उघडलं तेव्हा तिनं वधुवेष व सगळा शृंगार उतरवून नेहमीचे साधे कपडे घातलेले होते.

‘‘अगं, वेड लागलंय का तुला?’’ आईनं म्हटलं, ‘‘अशी दारातून वरात परत पाठवतात का कुणी? विचार कर एकदा. लग्न मोडलं तर पुन्हा लग्न करताना किती प्रॉब्लेम येतात. इतका झालेला खर्च वाया जाईल. दूरदूरच्या गावाहून पाहुणे आले आहेत. तू आततायीपणा करू नकोस..पुढे सगळं नीट होईल.’’ आईला अजूनही काही बोलायचं होतं पण बाबांनी मधेच तिला अडवलं.

‘‘तिचा निर्णय योग्य आहे. मी माझ्या मुलीला विहिरीत ढकलू शकत नाही. लग्नासारख्या पवित्र कार्यात तो असा पिऊन आला आहे तर त्याची खात्री कुणी द्यायची? एरवीही तो पितच असेल. लग्नानंतरही त्यानं दारू नाहीच सोडली तर? माझी लेक शिक्षित आहे. नोकरी करते, तिला तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा हक्क आहेच. मी जरा तिकडे मुलाकडच्या मंडळींची परिस्थिती बघतो. निर्णय फक्त तनीषा घेईल.’’

‘‘हिच्याबरोबर तुमचीही बुद्धी भ्रष्ट झाली का? ती लहान आहे. तुम्ही जरा विचार करा ना?’’ आईला अश्रू आवरेनात.

‘‘मी जीव देईन पण व्यसनी, दारूड्या माणसाशी लग्न करणार नाही. माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये किती हसू झालंय माझं. दारूड्यांची मी नक्कल करायचे. दारूबंदी झालीच पाहिजे म्हणून वाद घालायचे…अन् माझ्याच नशिबी असा दारूड्या यावा? शक्यच नाही,’’ तनीषानं आपला निर्णय सांगितला.

आईची रेकॉर्ड सुरू झाली. ‘‘म्हणूनच म्हणत होते, मुलीला फार शिकवायची गरज नाहीए…आता भोगा आपल्या कर्माची फळं…आमच्यावेळी तर…’’

ती अजूनही पुढे बोलणार तेवढ्यात नवरदेवाचा भाऊ त्यांना शोधत तिथे आला आणि त्याचे आईवडिल भेटू इच्छितात असं सांगू लागला.

तनीषाच्या बाबांनी आईला व तनीषाला तिथंच सोडलं आणि ते आपला मुलगा व तनीषाच्या मामाला घेऊन नवरदेवाच्या आईवडिलांना भेटायला निघाले. सगळे समोरासमोर बसल्यावर काही वेळ कुणीच बोललं नाही. नवरदेव असलेल्या पनवच्य आईबाबांचे चेहरे शरमेनं काळवंडले होते…पवनचे वडील हात जोडून म्हणाले, ‘‘आम्हाला क्षमा करा. आमच्या मुलामुळे तुमची व आमचीही अप्रतिष्ठा झाली आहे. त्याला प्यायची सवय आहे पण आजच्या दिवशी तो इतकी ढोसेल अन् अशी परिस्थिती येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. दोष त्याच्या मित्रांचा आहे. हल्लीच्या मुलांवर त्यांच्या मित्रांचा, त्यांच्या लाइफस्टाइलचा खूप प्रभाव असतो. पण मी तुम्हाला सांगतो, लग्नानंतर तुम्हाला कधी तक्रार करायची संधी मिळणार नाही. कृपा करून हे लग्न लावून द्या. नातं तोडू नका, यातच दोन्ही कुटुंबांचं भलं आहे.’’

‘‘रमेशसाहेब, आमच्या कुटुंबाचं भलं कशात आहे हे तुम्ही आम्हाला सांगू नये. पण मला असला व्यसनी, दारूडा जावई नको आहे. तुम्ही आमचा विश्वासघात केलाय. आधीच तुम्ही त्याच्या व्यसनाबद्दल आम्हाला सांगायला हवं होतं. बरं झालं लग्न लागायच्या आधीच सर्व समजलं. नाही तर माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आमचा झालेला खर्च आणि अपमान, गेलेली अब्रू याची नुकसान भरपाई कशी होणार? माझ्या मुलीला या सर्व प्रकारानं जो मानसिक धक्का बसला आहे, त्यावरचा उपाय आहे का तुमच्याकडे?’’ तनीषाच्या बाबांनी म्हटलं.

‘‘मी पुन्हा तुमच्यापुढे हात जोडतो…आम्हाला वाटलं होतं की लग्न झाल्यावर पवन सुधरेल. आम्ही तर त्याला समजावून थकलो होतो.’’

तनीषाचे मामा संतापून म्हणाले, ‘‘सुधरवण्यासाठी तुम्हाला आमचीच मुलगी मिळाली का? स्वत:च्या स्वार्थासाठी त्या पोरीच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याचा काय हक्क आहे तुम्हाला? हे लग्न होणार नाही. आत्तापर्यंत दागिने, कपड्यांसाठी जो खर्च दोन्हीकडून झालाय, त्याचा हिशेब करून टाका?’’

एव्हाना नवरदेवाची दारू उतरली होती. तो खाली मान घालून बसला होता. त्याचे वडील जड पावलांनी उठले. त्यांनी मुलाला खांद्याला धरून उभं केलं अन् गाडीकडे निघाले. नवऱ्याची आई व भाऊही सजवलेल्या गाडीत बसून निघून गेले पाठोपाठ इतर वराती मंडळींही झालेला अपमान मनात घेऊन निघून गेली.

काही वेळापूर्वी जिथं हास्य, विनोद, संगीत, लगबग होती, तिथं आता भकास शांतता पसरलेली होती. तनीषाच्या लग्नाचा आता पुन्हा विचार करावा लागणार…जे आईबाप स्वत:च्या मुलाचं व्यसन सोडवू शकले नाहीत, त्यांनी परक्या घरातली मुलगी व्यसन सोडवेल हे कसं काय ठरवलं? तनीषा कोपऱ्यात गुडघ्यात मान घालून बसली होती. आईवडील पलंगावर आडवे झाले होते, फक्त धाकटा भाऊ आशिष तेवढा भाड्यानं आणलेलं सगळं सामान परत करण्यासाठी झटत होता. गडी माणसांना सूचना देत होता.

नवरदेव पनवलाही या सर्व प्रकारामुळे खूपच जोराचा झटका बसला होता. तो स्वत: उच्चशिक्षित होता. चांगल्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी होती. पण वाईट मित्रांच्या संगतीत अडकला अन् त्याला दारूची सवय लागली. सवयीचं पर्यावसन व्यसनात झालं. पण ऐन लग्नाच्या मुर्हुतावर मित्र इतकी दारू पाजतील असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. सगळ्या प्रकारानं त्याला अंतर्बाह्य हादरवलं होतं. त्याला स्वत:चीच किळस वाटली, घृणा आली. आईवडिल, नातलग सगळेच किती अपमानित अन् दु:खी झाले होते. त्यांचा असा अपमान करण्याचा, नातलगांसमोर त्यांना खाली मान घालायला लावण्याचा त्याला काय अधिकार होता? त्याला खूपच पश्चात्ताप वाटत होता. हे सगळं बदलायला हवं. प्रायश्चित्त घ्यायला हवं.

एकदा ठरवल्यावर अशक्य काहीच नसतं. सगळ्यात आधी त्यानं त्या मित्रांची संगत सोडली. दारूच्या बाटल्या गटारात रिकाम्या केल्या. आईवडिलांच्या पायाला विळखा घालून मनसोक्त रडून घेतलं. त्यांची परोपरीनं क्षमा मागितली. त्या क्षणी ते ही काही बोलले नाहीत.

पवनला तनीषाच्या घरी जाण्याचं धाडस झालं नाही. पण त्यानं तिच्या मोबाइलवर क्षमा याचना करणारा व दारूला कायमची सोडचिठ्ठी दिली असल्याचा मेसेज तेवढा टाकला. झाल्या प्रकारासाठी तो सर्वस्वी दोषी असून या कृत्यासाठी प्रायश्चितही घेतो आहे हेही कळवलं. तनीषानं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही.

पवननं सरळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू केले. समुपदेशन, व्यायाम, उपचार यामुळे बदल दिसू लागला. ऑफिस व घर यातच तो मन रमवू लागला. जोडीला व्यायाम, चांगलं वाचन याचाही आधार होता. सुरूवातीला दारूची फार आठवण यायची. जिवाची तगमग व्हायची पण हळूहळू सगळंच सावरलं.

पवनच्या आईवडिलांनाही हा सुखद बदल आवडला. ते मनोमन तनीषाला धन्यवाद देत होते. तिनं अपमान करून धुडकावून लावल्यामुळे पवन असा बदलला आहे, हे त्यांना लक्षात आलं होतं. असंच सगळं सुरळीत राहिलं तर पवनचं भवितव्य उज्जवल होतं. कदाचित तनीषा पुन्हा हो म्हणेल असंही त्यांना वाटत होतं.

इकडे तनीषाच्या घरात तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली होती. तो विषय निघाला की तिला फार वाईट वाटायचं. ती तिथून उठून जायची. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. कारण साखरपुड्यानंतर ती दोन तीन वेळा पवनला भेटली होती. फोनवरही त्यांचं संभाषण व्हायचं. पण त्यावेळी तिला त्याच्या या व्यसनाबद्दल लक्षात आलं नव्हतं. त्यावेळी तिला त्याच्या दारूबद्दल समजलं असतं तरी तिनं तेव्हाच लग्न मोडलं असतं. कदाचित साखरपुडाही झाला नसता. तनीषानं आईबाबांना सांगितलं की तिला अजून मानसिकदृष्ट्या सावरायला थोडा वेळ हवा आहे. नोकरी तर सुरूच होती. मन रमवण्यासाठी तिनं एक दोन हॉबी क्लासही लावून घेतले होते.

बघता बघता वर्ष उलटलं. एव्हाना पवनची दारू पूर्णपणे सुटली होती. वर्षभर केलेल्या परिक्षणामुळे त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वातही आकर्षक बदल झाला होता. एक दिवस धाडस करून तो तनीषाच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याला अवचित आलेला बघून ती थोडी भांबावलीच! तरीही त्याच्यातल्या बदलाची नोंद तिच्या नजरेनं आणि मेंदूनं घेतलीच. वरकरणी कोरडेपणानं तिनं म्हटलं, ‘‘तू इथं कशाला आला आहेस? मला तुझ्याशी अजिबात संबंध नकोय.’’

‘‘फक्त एकदाच माझं ऐक. माझ्यावर विश्वास ठेव. मी दारू पूर्णपणे सोडलीय.’’

पण तनीषानं त्याचं ऐकून घेतलं नाही. अर्थातच पवनला प्रतिक्रियेची कल्पना होती. त्याच्या डॉक्टरांनी आणि समुपदेशकांनीही त्याला त्याबद्दल सूचना दिलेल्याच होत्या.

आठ दिवसांनी तो पुन्हा एकदा तिला भेटला. ‘‘मी प्रायश्चित्त घेतोय…मला क्षमा कर, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.’’ त्याच्या बोलण्याकडे यावेळीही तनीषानं दुर्लक्षच केलं.

पण पवननं चिकाटी सोडली नाही. तो तिला वरचेवर भेटतच राहिला. एकदा तर त्यानं तिला त्याच्या डॉक्टर व समुपदेशकाकडे नेऊन भेटवून आणलं. त्यांनीही पवनच्या एकूण प्रगतीबद्दल तिला खात्री दिली. पवन पुन्हा पुन्हा तिला भेटत होता. क्षमा मागत होता. त्याचं तिच्यावर प्रेम आहे व तो तिच्याशिवाय आयुष्याची कलप्नाच करू शकत नाही हे ही तिला पटवून देत होता. शेवटी तनीषाही विरघळली. तिचंही त्याच्यावर प्रेम होतंच. तिरस्कार त्याच्या व्यसनाचा होता.

दोघांच्या भेटीतून हे निश्चित झालं की दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे आणि घडलेली घटना एक अपघात समजून विसरून जायची व नव्यानं संसाराचा डाव मांडायचा.

तनीषानं आईवडिलांना व भावाला सगळं सांगितलं. तनीषा पुन्हा लग्नाला तयार आहे हे ऐकूनच त्यांना आनंद झाला. ते पवनच्या आईवडिलांना भेटायला तयार झाले.

‘‘पण तनू, जर पुन्हा पवन व्यसनाकडे वळला तर?’’ वडिलांना शंका वाटली.

‘‘बाबा, त्याला अद्दल घडलीय. पश्चात्ताप झालाय अन् त्यानं प्रायश्चित्तही घेतलंय…आता तो कधीच पुन्हा त्या वाटेवर जाणार नाही.’’ तनीषा म्हणाली, ‘‘आता तो पूर्णपणे बदलला आहे. माझा त्याच्यावर विश्वास आहे.’’

पवनच्या घरी निरोप पोहोचला. तनीषाचे आईबाबा व तनीषा त्यांना भेटायला येताहेत. तेव्हा तेही खूप आनंदले. त्यांनी या मंडळींच्या स्वागताची, आतिथ्याची जोरदार तयारी केली.

पवनची तपश्चर्या फळाला आली. दोन्ही कुटुंब आंनदानं एकमेकांना भेटली.

पवनचे वडील म्हणाले, ‘‘तुमच्या पोरीच्या ऋणात आहोत. आम्हाला आमचा मुलगा सांभाळता आला नाही, पण तिनं त्याला सुधारला.’’

‘‘खरंय, आता लवकर दोघांचं लग्न लावून देऊयात.’’ तनीषाचे बाबा म्हणाले.

‘‘पण एक अट आहे,’’ हे ऐकून तनीषाचे बाबा चकित झाले.

तनीषाच्या बाबांना चकित झालेलं पाहून पवनचे वडील म्हणाले, ‘‘यावेळी लग्नाचा सगला खर्च मी करणार.’’

अट ऐकून सगळेच हसायला लागले. टाळ्या वाजवून सर्वांनी संमती दिली. पवन व तनीषाही एकमेकांना बघून हसत होते.

मृगजळ

गृहशोभिका टीम

‘‘ओह! इट्स टू टायरिंग, सो लाँग ट्रिप…’’ घाम पुसत पुनीतनं आपली सूटकेस दारासमोर लावली. डोअरबेल वाजवली अन् दार उघडण्याची वाट बघू लागला. घरात सर्वत्र शांतता होती. कुठं गेली सगळी? त्यात पुन्हा एकदा घंटीचं बटन दाबलं. दाराला कान लावून तो आतली चाहूल घेऊ लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष दारावर लटकलेल्या कुलुपाकडे गेलं. खिशातून रूमाल काढून पुन्हा एकदा घाम पुसला. खांद्यावरची एयरबॅग सूटकेसवर ठेवली अन् त्यानं इकडेतिकडे बघितलं.

त्याचं घर दोन मजली होतं. त्यानं वरच्या मजल्याकडे नजर टाकली. त्या लेनमधील सगळी घरं एक सारखीच होती. घराचं छप्पर दोन्ही बाजूंनी उतरतं होतं. त्याच्या मधोमध पांढरी भिंत अन् भिंतीवर काळ्या अक्षरात पेंट केलेला घरनंबर वरच्या खिडक्याही बंद होत्या. पडदे ओढलेले होते. ‘कुठं बरं गेले असावेत हे लोक?’ मनाशीच पुटपुटत तो घराच्या मागच्या बाजूला गेला. तेच कुंपण, तेच लॉन अन् तिच झाडं…तीन वर्षांपूर्वी जसं होतं तसंच अजूनही आहे. गॅरेज उघडं होतं, गाडी नव्हती…म्हणजे गाडी घेऊन कुठं गेलेत का? कदाचित ते सकाळपासून वाट बघत असतील अन् आत्ताच त्यांना बाहेर जावं लागलं असेल…पण निदान जाताना दारावर एक चिठ्ठी अडकवायला काय हरकत होती? कधीपर्यंत परत येणार हे तरी समजलं असतं.

पुनीत तिथंच पायऱ्यांवर बसला. संध्याकाळचे सात वाजायला आले होते. अंधार दाटून आला होता. आता पुनीतला काळजी वाटायला लागली. हे लोक कुठं गेले असतील? आईला गाडी चालवता येत नाही अन् बाबांना संध्याकाळचं कमी दिसतं. ड्रायव्हर बोलावला असेल का? एव्हाना त्याच्या पोटात भुकेनं कावळे कोकलू लागले होते. त्यांनं सॅकमधून पाण्याची बाटली काढली अन् थोडं पाणी प्यायला. शेजारी पाजारीही तो कुणाला ओळखंत नव्हता. एक शिखा होती जिला विचारता आलं असतं, पण त्यानं तिला जी वागणूक दिली होती, त्यानंतर तर तिच्यासमोर जाणंही त्याला जमणार नव्हतं.

त्याची फ्लाइट बरीच लेट झाल्यामुळे त्याला घरी पोहोचायला एवढा उशीर झाला होता. पण आईबाबांनी वाट बघायला हवी होती. त्याला थोडा रागही आला. पण तो रागावूही शकत नाही. ज्या परिस्थितीत तो पुन्हा परत आला आहे त्या परिस्थितीत त्याला रागवायचा तर काय त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचाही हक्क उरलेला नाही. त्यावेळी शिखा आणि आईबाबांना तो ज्या परिस्थितीत सोडून गेला होता, त्यानंतर कोण त्याची वाट बघणार होतं? वाट बघता बघता त्याला तीन वर्षांपूर्वीच्या त्या सगळ्या घटना आठवू लागल्या. आई त्यावेळी किती रडत होती. बाबा खाली मान घालून खुर्चीला खिळून बसले होते.

खरं तर ऑस्ट्रेलियाला जाणं पुनीतसाठी नवं नव्हतं. कारण पूर्वीही तो तिथं जाऊन आला होता. तिथं त्याला एका उत्तम कंपनीत भरगच्च पगाराची नोकरी होती. पण यावेळी त्यानं जे काही सांगितलं होतं, त्यासाठी मात्र कुणाचीच तयारी नव्हती. त्याला क्रिस्टिन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन मुलीशी लग्न करायचं होतं. त्याला लवकरात लवकर तिथलं नागरिकत्व मिळवायचं होतं. तिथंच सेटल व्हायचं होतं. त्याच्या आईबाबांनाही कळत नव्हतं की आपला आज्ञाकारी, लाजराबुजरा मुलगा एकदम इतकी मोठी उडी कशी काय घेतोय? आत्ता आत्तापर्यंत त्याला कपडे खरेदी करतानाही आईबाबा बरोबर लागायचे, तो ऑस्ट्रेलियाला गेल्यावर इतका बदलला? आईबाबा जुनाट विचारांचे नक्कीच नव्हते. पण काही गोष्टी त्यांना पचवणं जड जात होतं. मुख्य म्हणजे शिखाशी इथं लग्न ठरलेलं असताना तिथं दुसऱ्या परदेशी मुलीशी लग्न करायचं? त्यांना पटतंच नव्हतं. शेवटी त्यांनी स्वत:ला मुलाच्या मोहातून मुक्त करून घेतलं.

शिखा पुनीतची मैत्रीण होती. त्यांचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबातून त्याला सहर्ष संमती होती अन् आता पुनीत म्हणतोय तो क्रिस्टिनशी लग्न करून तिथली सिटीझनशिप घेणार. शिखानं काहीच म्हटलं नाही. ती गप्प, गंभीर होती. शेवटी आईवडिलांचा आशिर्वाद, निरोप काहीच न घेता पुनीत निघून गेला.

पुनीतनं ऑस्ट्रेलियात क्रिस्टिनशी लग्न केलं. तिथली सिटीझनशिपही मिळवली, पण वर्षभरातच त्याची अक्कल ठिकाणावर आली. तो ट्रिपिकल भारतीय कुटुंबातला मुलगा होता. घरात कुठलंही काम न करणारा अन् क्रिस्टिना तर लहानपणापासून स्वच्छंद वातावरणात वाढलेली. तिला मुळात घरकामाचा कंटाळा होता. नाईलाजानं जे करावं लागायचं, त्यातही तिला पुनीतनं मदत करावी असं वाटायचं. पुनीतला स्वयंपाक करताना आईच्या हातच्या गरमागरम मऊसूत पोळ्या आठवायच्या, मॉलमध्ये भाजी आणायला गेला की डोळ्यापुढे भाजीच्या पिशव्या घेऊन येणारे बाबा दिसायचे. क्रिस्टिनाचं कुणाबरोबरही मोकळं-ढाकळं वागणं, त्याला खूप खटकायचं. अशावेळी हमखास शिखाची आठवण यायची. शालीन, सोज्वळ शिखा…साधी राहणी, शांत प्रेमळ स्वभाव लवकरच क्रिस्टिनालाही पुनीतचा कंटाळा आला. दोघांमध्ये सतत भांडणं, सतत वाद अगदी नको नको झालं त्याला. शेवटी घटस्फोट घेणं नक्की झालं. पण त्यात सगळ्या सोपस्कारांत तीन वर्ष गेली.

परदेशी मुलीशी लग्न करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. मुळात त्यांच्या आणि आपल्या संस्कारात, संस्कृतीत खूप फरक आहे. नव्याची नवलाई संपता संपता सगळंच उघडं वागडं सत्य समोर येतं. ते पचवणं भारतीय घरातल्या मुलांना शक्यच नसतं. आईवडिल, होणारी वधू सर्वांना दुखवून तो इथं आला अन् मिळवलं काय? तर फक्त फ्रस्टे्रेशन. ज्या क्रिस्टिनसाठी त्यानं शिखाला दूर लोटलं होतं, तिच क्रिस्टिन आज त्याला डोळ्यांपुढे नको वाटत होती. तिचा उधळ्या स्वभाव म्हणजे तर डोकेदुखीच ठरला होता. स्वत:च्या कमाईचा पैसा उधळून वर पुनीतचाही पैसा तिला हवा असायचा. शिल्लक टाकायला एक डॉलरही उरत नव्हता. अशावेळी त्याला अल्पसंतुष्ट, समाधानी वृत्तीची शिखा आठवायची. खरोखर हातातलं रत्न सोडून त्यानं गारगोटी निवडली होती.

घटस्फोट झाला. तिथलं बिऱ्हाड मोडून, नोकरीचा राजीनामा देऊन पुनीत भारतात परतला. त्यानं आईला तसं कळवलंही होतं. पण मग ती आज घरी का नाहीए? काय करावं? कुणाला विचारावं. या विचारात असतानाच त्याला समोरून येणारे रमेशकाका दिसले. दोन घरं पलिकडेच त्यांचा बंगला होता. त्यांनी पुनीतला ओळखलं अन् विचारलं, ‘‘अरे पुनीत? कधी आलास?’’

काकांना नमस्कार करून पुनीतनं म्हटलं, ‘‘बराच वेळ झाला. आईबाबा कुठं आहेत?’’

‘‘अरे, बाबांना बरं नव्हतं वाटत. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. श्वास घ्यायला त्रास होत होता.’’

‘‘बाबांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेलंत का?’’

‘‘नाही. शिखानंच नेलं.’’

‘‘शिखा?’’

पुनीत आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होता. ‘‘अरे, तुला ठाऊक नसेल शिखा आता इथंच राहते. सेंट्रल स्कूलमध्ये नोकरी आहे तिला.’’

पुनीत गप्प होता. रमेश काकाच पुढे म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी तिचे आईवडिल एका अपघातात मृत्यूमुखी पडले, तेव्हापासून शिखा इथंच राहतेय. तुझ्या आईबाबांची सर्वतोपरी काळजी घेतेय…’’

पुनीतला स्वत:चीच लाज वाटली. त्याच्यामुळे आईबाबा, शिखा सर्वांनाच केवढा त्रास झालाय. तो स्वत:च्याच दु:खात मग्न होता…‘‘काका, बाबा कुठल्या इस्पितळात आहेत? मी जातो तिथे.’’ त्यानं म्हटलं.

काकांनी त्याला हॉस्पिटलचा पत्ता दिला. त्यानं आपलं सामान त्यांच्या घरी ठेवलं अन् तो लगेच हॉस्पिटलमध्ये निघाला.

तिथं पोहोचल्यावर त्याला आई व शिखा वेटिंगलाउंजमध्ये दिसल्या. त्यानं सरळ जाऊन आईला मिठी मारली अन् तो गदगदून रडू लागला. बाबा कसे आहेत हेदेखील त्याला विचारायचं सुचलं नाही.

आईनं त्याला थोपटून शांत केलं. मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिनं म्हटलं, ‘‘काळजीचं कारण नाहीए. बाबा आता बरे आहेत. शिखानं अगदी वेळेत निर्णय घेऊन त्यांना इथ आणलं, म्हणूनच त्यांचा जीव वाचला. तू गेल्यापासून शिखाच आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीतनं अत्यंत कृतज्ञतेनं तिच्याकडे बघितलं. ती संकोचून थोडी दूर जाऊन उभी होती. तिचा निरागस चेहरा बघून त्याला भरून आलं. स्वत:चा किती धिक्कार करू असं वाटलं त्याला.

‘‘शिखाचे आईबाबा एका अपघातात अचानक गेले,’’ आईपुढे सांगू लागली, ‘‘शिखा अगदीच एकटी पडली. मीच तिला आपल्या घरी घेऊन आले. आम्हीही खूप एकटे होतो. तू गेल्यावर…शिखानं स्वत:ला सावरलं अन् म्हणाली, ‘यापुढे आपणच तिघं एकमेकांचा आधार आहोत. कुणीही स्वत:ला एकटं, दुर्बळ, बिच्चारं समजायचं नाही,’ तेव्हापासून ती आमचा मुलगा बनून आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीत खाली मान घालून ऐकत होता. काही क्षण शांततेत गेले. मग आई म्हणाली, ‘‘तू ज्या मृगजळामागे धावत होतास, त्यात फक्त दमछाक झाली. आंधळेपणानं धावण्याच्या शर्यतीत हाती काहीच लागत नाही. हव्यास कधीच संपत नाही. पण आज तू, ते सर्व सोडून परत आला आहेस, मला खूप समाधान वाटलं. हे घर तुझंच आहे. आता शिखाशी लग्न करून सुखाचा संसार थाट. शिखाशी बोल…बाबांशी आता तुला भेटता बोलता येणार नाही. डॉक्टरांनी भेटायला नाही म्हटलं. त्यांना विश्रांतीची गरज आहे. उद्या निवांतपणे तू त्यांना भेट.’’

पुनीत हळूच उठला अन् शिखाजवळ गेला. ‘‘शिखा, मला क्षमा करू शकशील? आपण नवं आयुष्य सुरू करूयात,’’ त्यानं शिखाचे हात आपल्या हातात घेतले.

शिखानं फक्त मान डोलावली. त्यानं तिचे हात अधिकच घट्ट धरले. यापुढे तो कधीच तिला अंतर देणार नव्हता.

सौ.चं श्वान प्रेम आणि मी

मिश्किली * संतोष शेणवी

काही सिनेमा नट्यांना कुत्र्यांसमवेत फोटो काढून ते छापायची फार हौस असते. असे डॉगी किंवा पपी सोबतचे त्यांचे फोटो बघितले की सौ. उसासे टाकते.

‘‘माझ्याकडेही असाच एखादा छकुला, गब्दुल्ला डॉगी असता तर…’’ ती स्वत:शी पुटपुटते…‘‘मग मी ही असाच झोकात सेल्फी काढून घेतला असता. त्याला घेऊन रोज वॉकिंगला गेले असते, मैत्रीणींवर इंप्रेशन मारलं असतं.’’

एकदा ऑफिसातून घरी पोहोचलो, तेव्हा सौ.च्या मैत्रिणीची पार्टी चालू होती. सौ. सांगत होती, ‘‘अगं काय सांगू? हल्ली तर डॉगींचाच काळ आहे, म्हणजे सध्या ना तिच फॅशन आहे. एकाहून एक सरस देशी, विदेशी कुत्रे मिळताहेत…मलाही असा एखादा डॉगी मिळाला तर किती मज्जा येईल. डॉगीचीही एक वेगळीच ऐट असते हं!’’

त्यावर तिच्या (मूर्ख) सख्यांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे तिला सल्ले दिले, आपली मतं सांगितली. थोड्याच वेळात त्या निघून गेल्या. सौ. बेडरूममध्ये जाऊन रडत बसली. रडताना ती माझा उद्धार करतच होती.

‘‘कुठल्या दरिद्री माणसाशी लग्न झालंय माझं…एक कुत्रा नाही खरेदी करता येत त्याला. नशिबच फुटकं आहे माझं. लग्नापूर्वी किती स्वप्नं बघितली होती मी…ऐटीत मी चालतेय…सोबत झोकात चालणारा डॉगी आहे.’’

मनातल्या मनात मी म्हटलं, ‘‘अरेच्चा, मी कुणा डॉगीपेक्षा कमी आहे की काय? लग्न झाल्यापासून सतत सौ.च्याच अवतीभोवती घुटमळतो, घोटाळतो आहे. प्रामाणिकपणे, अगदी इमाने इतबारे मी तिचाच आहोत. तरीही शेवटी एकदा ऑफिसला रजा टाकून मी कुत्रा ऊर्फ डॉगी शोधायला निघालो.’’

सगळ्यात आधी मी डॉगी विकणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. तेव्हा समजलं डॉगीच्या किंमती हजारोंमध्ये (हजारो रूपयात) असतात. शिवाय त्यांचा आहारही त्यांच्या डाएट चार्ट प्रमाणे असतो. (भलेही तुम्ही उपाशी राहा.) शिवाय त्यांना वेळोवेळी इजेक्शन वगैरे द्यावी लागतात. डॉगीचा स्पेशल डॉक्टरांकडून ‘चेकअप’ करवून घ्यावा लागतो. तुम्ही उन्हाळ्यानं बेजार, हैराण व्हा किंवा थंडीत कुडकुडत बसा. डॉगीसाठी घरात कूलर आणि हिटर हवाच हवा. ही विलायती कुत्री, सॉरी, डॉगी तशीही नाजूक असतात. जरा दुर्लक्ष झालं तरी ती लगेच कोमेजतात म्हणे.

हे सर्व ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की घरात एक तर मी राहणार किंवा डॉगी…पण सौ. तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती.

प्रसंगाचं गांभिर्य समजूत घेत मी सौ.ची समजूत घातली की आपले देशी डॉगीही चांगलेच असतात. आपण एखादं देशी कुत्रंच पाळूया. ते बिचारं आपल्याला दुवा देईल. त्याचंही भलं होईल, आपली हौस भागेल. त्याला विलायती डॉगीसारखा मेकअप करून देऊया.

दुसऱ्याच दिवशी सकाळी मी फिरून येत असताना एक गावठी कुत्रं माझ्या मागे मागे येऊ लागलं. मी जरा चुचकारलं अन् ते थेट घरातच आलं की! प्रथम मी त्याला दूधपोळी खाऊ घातली. मग समोरच्या व्हरांड्यात साखळीनं बांधून ठेवलं. सौ.नं त्याच्याकडे इतक्या प्रेमाने अन् अभिमानानं बघितलं की खरं सांगतो माझा अगदी तिळपापड का काय म्हणतात तो झाला. लग्नानंतर आतापर्यंत एकदाही सौ.नं इतक्या प्रेमानं अन् अभिमानानं माझ्याकडे बघितलं नव्हतं.

वर मानभावीपणे म्हणते कशी, ‘‘बरं का, आता मी माझं सगळं प्रेम या डॉगीवर उधळणार आहे. अन् बरं का, तुमच्याबद्दल असं प्रेम मला वाटलंच नव्हतं हो!’’

दुसऱ्याच दिवशी सकाळी सौ.नं डॉगीची साखळी हातात घेतली अन् त्यांची जोडी फिरायला बाहेर पडली. आता ते गावठी कुत्रंही ऐटीत चालत होतं. तेवढ्यात दुसऱ्या मोहोल्ल्यातील तीन चार कुत्री आमच्या डॉगीवर भुंकायला लागली. सौ.च्या हातात काठी होती, त्यामुळे आमच्या डॉगीवर त्यांनी हल्ला चढवला नाही. पण सौ. पुढे पुढे, मागे मागे कुत्र्यांची फौज, एक डोळा त्या कुत्र्यांवर, दुसरा डोळा आपल्या डॉगीवर, सतत एका हातात डॉगीची साखळी, दुसऱ्या हातानं काठी आपटत भुंकणाऱ्या कुत्र्यांना दूर ठेवणं या गडबडीत सौ.चा पाय खड्ड्यात गेला. जबरदस्त मुरगळला. कशीबशी जोडी घरात आली. सौ.चा दुखरा पाय बरा करण्यासाठी भरपूर पैसे खर्च झाले. त्या काळात ती अंथरूणातून उठतच नव्हती.

आमच्या काळज्या, चिंता अन् कटकटी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या. मला डॉगीला सांभाळण्यासाठी ऑफिसातून रजा घ्यावी लागली. त्याला बांधून ठेवला तर तो भुंकून कहर करायचा. लोकांनी सल्ला दिला की त्याला मोकळा राहू दे. मग तर त्यानं संपूर्ण घराचाच ताबा घेतला. सर्व स्वैर संचार करायचा. त्याला न्हाऊ घालायची जबाबदारीही आता माझ्यावर आली.

डॉगीला घरी आणलं, तेव्हा आमची रमाबाई मोलकरीण महिन्याची रजा घेऊन गावी गेली होती. ती रजा संपवून कामावर आली. नवा चेहरा, नवा माणूस बघून डॉगीनं भुंकत तिच्यावर उडी घेतली. घाबरून रमाबाई पळायला लागली अन् पायऱ्यांवरून धडपडली. तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं. आमच्या डॉगीमुळे, आमच्याच उपचारांचा खर्चही आमच्याच डोंबलावर आला. प्लॅस्टर निघेपर्यंत दोन महिने भरपगारी रजा शिवाय इतर घरातल्या कामांनाही ती जाऊ शकणार नाही म्हणून वर दहा हजार रूपये रोख द्यावे लागले. (त्या सटवीनं पोलिसात जायची धमकी दिली ना?) रमाबाई येऊन काम सांभाळेल, मला थोडा दिलासा, थोडी विश्रांती मिळेल वगैरे सर्व आशा पार मावळल्या. डॉगीचं अन् घरातलं करता करता पुरता दम निघाला.

घरात डॉगी आहे म्हणताना आम्ही नि:शंकपणे सिनेमाला, पार्ट्यांना रात्री उशिरापर्यंत जाऊ शकत होतो. पण आमचा डॉगी हल्ली आळशी व्हायला लागला होता. एकदा आम्ही नसताना घरात चोरी झाली. हा हरामखोर मजेत ब्रेडमटण खात बसला होता. मी ऐकून होतो की कुत्रा आपल्या मालकाशी कधीही दगलबाजी करत नाही पण चोरानं ब्रेडमटण खायला घातलं अन् हा स्वामीभक्ती विसरला.

वर सौ.नं मलाच ऐकवलं, ‘‘अहो, डॉगी पळालाय. उंदीर नाही. आजपर्यंत तुम्ही कधी त्याला ब्रेडमटण खायला घातलंत का? नाही ना? मग ज्यानं ते दिलं, त्याच्याशी तो प्रामाणिक राहिला.’’

हेही सत्यच होतं. एक धडा शिकलो. तोंड मिटून गप्प बसलो.

माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात मी कधी एका पैचं घेतलं नव्हतं. पण या डॉगीच्या पायी माझ्यावर कर्जाचा डोंगरच झाला होता.

एका रात्री डॉगी जरा जास्तच भुंकत होता. माझ्या एक लक्षात आलं होतं की गल्लीतली कुत्री रात्री अपरात्री गळे काढतात, तेव्हा लोकांना त्रास होत नाही. पण आमचा डॉगी भुंकतोय म्हटल्यावर शेजाऱ्यांना खूपच त्रास होतो. कुणा हलकटानं पोलिसांना फोन केला अन् पोलिस, त्यांच्यासोबत पशुसंरक्षणवाले आमच्या घरात दाखल झाले. आमच्यावर कुत्र्याला उपाशी ठेवण्याचा गुन्हा दाखल झाला.

मी आपल्या परीनं त्यांना समजावत होतो, ‘‘भाऊ साहेब, तुमचा गैरसमज झालाय, हे बघा अजूनही याच्याजवळ ब्रेडबटर ठेवलेलं आहे. मला कर्ज घ्यावं लागलंय तरीही कुत्र्याला आम्ही अजिबात त्रास होऊ दिला नाहीए.’’

पोलीस इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, ‘‘तर मग साहेब, थोडं कर्ज अजून घ्या, म्हणजे हे प्रकरण मिटेल नाही तर तुम्हाला मुक्या जिवाला त्रास दिल्याच्या, छळ केल्याच्या आरोपावरून तुरूंगात जावं लागेल.’’

शहाण्याला शब्दाचा मार. मी दुसऱ्याच दिवशी कुत्र्याच्या पालनपोषणासाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेतलं. ताबडतोब ते मंजूर झालं. माझ्या तब्येतीसाठी पैसे हवे होते, ते आजतागायत मिळालेले नाहीत.

त्यातल्या त्यात समाधानाची अन् आनंदाची बाब म्हणजे हल्ली सौ.चं श्वानप्रेम कमी कमी व्हायला लागलं होतं. एक दिवस ती म्हणाली, ‘‘बरं का, जे झालं ते झालं. डॉगीमुळे आपली शान वाढली होती हे तर खरंच शिवाय कुत्र्यापासून सावधानचा बोर्ड दारावर लावला गेला. आता तो बोर्ड आपण नको काढूयात. काढला तर लोकांना चेष्टा करायला एक विषय मिळेल. माझं ना, फारच चुकलं. मी तुमचा मान राखला नाही. तुमची किंमत मला कळली नाही. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला समजलं होतं की तुम्ही माझे सगळ्यात जास्त विश्वासू पती आहात. तर आता तो विश्वास तुम्हालाही सार्थ ठरवावा लागेल. म्हणजे असं की दाराशी कुणाचीही चाहूल लागली की तुम्ही डॉगीसारखं, भुंकायला लागायचं, मग मी म्हणेन, ‘‘ऐकलंत का, जरा, डॉगीला मागच्या व्हरांड्यात बांधून ठेवा. बाहेर कुणी आलंय, मी दार उघडते, समजलं का?’’

या डॉगी प्रकरणानं मी इतका वैतागलो होतो की सौ. जे म्हणेल, ते करायला मी तयार होतो. मग एकदा रात्रीच्या अंधारात मी डॉगीला लांब, खूप लांब सोडून आलो.

आता सौ. आणि घराच्या इभ्रतीसाठी मी वेळी अवेळी भो भो भो भो भुंकत असतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें