कथा * पद्मा आगाशे
रात्रीचे दोन वाजून गेलेले. अजून प्रसून घरी आला नव्हता. गेले काही दिवस तो रोजच रात्रीपर्यंत घराबाहेर असायचा. उमाही त्याची वाट बघत जागी होती.
गेटच्या आवाजानं ती उठून बाहेर आली. ड्रायव्हरनं दारुच्या नशेत असलेल्या प्रसूनला आधार देत घरात आणलं.
उमा संतापून ओरडली, ‘‘अरे काय दुर्दशा करून घेतली आहेस स्वत:ची? किती अधोगती अजून करून घेशील? स्वत:ची अजिबात काळजी नाहीए तुला?’’
प्रसूनही तसाच ओरडला. शब्द जड येत होते पण आवाज मोठाच होता, ‘‘तू आधी उपदेश देणं बंद कर. काय केलं आहेस गं तू माझ्यासाठी? मला लग्न करायचंय हजारदा सांगतोए, पण तुला तुझ्या आरामातून वेळ मिळेल तेव्हा ना? स्वत:चा मुलगा असता तर दहा ठिकाणी जाऊन मुलगी शोधली असती.
‘‘तुला माझ्या पैशांवर मजा मारायला मिळतेय, साड्या, दागिने, आलिशान गाडीतून फिरायला मिळंतय, तुला काय कमी आहे? पण मला तर माझ्या शरीराची भूक भागवायला काहीतरी करायलाच हवं ना? आधीच मी त्रस्त असतो त्यात तुझ्या बडबडीने डोकं उठतं.’’ तो लटपटत्या पायांनी त्याच्या खोलीत निघून गेला. धाडकन् दार लावून घेतलं.
प्रसूनच्या बोलण्यानं उमाच्या हृदयाला भोकं पडली. ती उरलेली सगळी रात्र तिनं रडून काढली. प्रसून तिच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यासाठी तिनं आपलं सगळं आयुष्य वेचलं. वडिलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. लग्न केलं नाही. सगळं लक्ष केवळ प्रसूनवर केंद्रित केलं होतं.
मीराताईचे यजमान सुरुवातीला प्रसूनला भेटायला यायचे. पण उमाच्या लक्षात आलं त्यांचा तिच्यावरच डोळा आहे. एकदा त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं सरळ त्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर ते कधीच इकडे फिरकले नाहीत. उमानंही त्यानंतर कुठल्याही पुरुषाला आपल्या आयुष्यात जागा दिली नाही.
प्रसूनच तिचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ होता. त्याच्या आनंदातच तिचाही आनंद होता. तिच्या अती लाडानंच खरं तर तो बिघडला होता. अभ्यासात बरा होता. पण त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्नं मात्र पैसेवाला, बडा आदमी बनण्याची होती.