कथा * सिद्धार्थ जानोरीकर
सकाळी सकाळीच मनीषानं उत्स्फुर्तपणे विचारलं, ‘‘बाबा, आज आईला काय गिफ्ट देताय तुम्ही?’’
‘‘आज काय विशेष आहे बुवा?’’ प्रश्नार्थक चेहऱ्यानं मी लेकीला विचारलं?
‘‘कमाल करता बाबा तुम्हीसुद्धा! गेली कित्येक वर्ष तुम्ही आजचा हा दिवस विसरता आहात. अहो, आज ना, व्हॅलेंटाइन डे आहे. ज्या व्यक्तिवर आपण प्रेम करतो त्याला आजच्या दिवशी काहीतरी भेट द्यायची असते.’’
‘‘ते मला ठाऊक आहे, पण इंग्रजांच्या या असल्या फालतू चालीरिती आपण का म्हणून पाळायच्या?’’
‘‘बाबा, प्रश्न देशीविदेशीचा नाहीए, फक्त प्रेम व्यक्त करण्याचा आहे.’’
‘‘मला नाही वाटत खऱ्या प्रेमाला कधी व्यक्त करण्याची गरज असते म्हणून. तुझ्या आईच्या आणि माझ्यामधलं प्रेम तर जन्मोजन्मीचं आहे.’’
‘‘मनू, तूसुद्धा पण कुणाला समजावण्याचा प्रयत्न करते आहेस?’’ माझी जीवन संगिनी तिरसटून म्हणाली. ‘‘हे सगळं यांना सांगणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. ज्यात पाच दहा रूपयेच खर्च होण्याची शक्यता असते. तेवढंदेखील गिफ्ट हे कधी देऊ शकत नाहीत.’’
‘‘सीमा, अगं असं काय बोलतेस? माझ्या या हृदयाचा तरी थोडा विचार कर...अगं, महिन्याचा अख्खा पगार तुला हातात आणून देतो ना?’’ मी दु:खी चेहऱ्यानं अन् भरल्या गळ्यानं बोललो.
‘‘हो आणि पै न् पैचा हिशेबही मागून घेता ना? नाही दिला तर भांडण काढता...एक तर माझा सगळा पगार जातो कार आणि घराचे हप्ते फेडण्यात...स्वत:च्या मर्जीनं खर्चायला शंभर रूपयेही मिळत नाहीत मला...’’
‘‘हा आरोप तू करतेस? अगं, ठासून कपाट भरलंय साड्यांनी...काय दिवस आलेत. लेकीच्या नजरेत बापाची किंमत कमी व्हावी म्हणून आईच खोटं बोलतेय?’’
‘‘पुरे झाला नाटकीपणा. एक सांगा. त्या कपाटातल्या किती साड्या तुम्ही आणून दिल्या आहेत मला? प्रत्येक सणावाराला माझ्या माहेरून साड्या मिळतात मला. म्हणून निदान मैत्रिणींपुढे तोऱ्यात वावरतेय मी...नाही तर कठीणच होतं.’’
‘‘बाबा, आईला खूष करायला कुठं तरी दोन-चार दिवस फिरवून आणा ना?’’ मनीषानं आमचं भांडण थांबवण्यासाठी विषय बदलला.
‘‘पुरे गं तुझं!! या घराच्या रामरगाड्यातून बाहेर पडून थोडा मोकळा श्वास घेईन, असं भाग्य नाहीए माझं!’’ स्वत:चं कपाळ बडवून घेत सीमा नाटकीपणानं म्हणाली.