कथा * रमणी माटेगावकर
आज सकाळीच दादाचा फोन आला, ‘‘छोटी, अगं राधा गेली...थोड्या वेळापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला.’’ दादाचा कंठ दाटून आला होता. डोळेही अश्रू गाळत असावेत.
मी एकदम स्तब्ध झाले. कधी ना कधी दादाकडून ही बातमी मला कळणार हे मी जाणून होते. वहिनीला फुफ्फुसाचा कॅन्सर झालाय हे दादाकडून कळल्यापासून मला धास्ती वाटत होती. मी मनोमन प्रार्थना करत होते की तिचा रोग बरा होऊन तिला काही वर्षांचं आयुष्य अजून मिळावं. पण तसं घडलं नाही. वहिनी जेमतेम चाळीशीची होती. हे वय काही मरायचं थोडीच असतं? अजून तिने आयुष्य उपभोगलंच कुठे होतं? मुलंही लहानच आहेत. हा विचार मनात येताच मला हुंदका फुटला.
मेंदू बधीर झाला होता. हातापायातली शक्ती जणू कुणी ओढून घेतली होती. पण दादाकडे जायला हवं. मी मुकाट्याने बॅग भरायला लागले. कपाटात मला पांढऱ्या मलमलच्या कापडात बांधलेला बनारसी शालू दिसला. शालू बघताच मला जुने दिवस आठवले.
वहिनीने किती हौसेने हा शालू विकत घेतला होता. एकदा दादाला ऑफिसच्या कामाने बनारसला जायचं होतं. त्याने वहिनीलाही बरोबर येण्याचा आग्रह केला. ‘‘अगं, इथून अंतर फार नाहीए. दोन दिवसांत तर आपण परतही येऊ. आई बघेल दोन दिवस मुलांना.’’
‘‘दादा, मीही येणार तुमच्याबरोबर,’’ मी हट्टाने म्हटलं.
‘‘चल, तूही चल,’’ दादाने हसून म्हटल.
आम्ही तिघंही बनारसला खूप भटकलो. वहिनी सतत माझी काळजी घेत होती. आम्ही एका खादीच्या दुकानात शिरलो. ‘‘बनारसला येऊन बनारसी शालू घ्यायचा नाही, असं कसं होईल? बघ राधा, काय आवडतंय तुला...’’ दादा म्हणाला.
वहिनीने बऱ्याच साड्या बघितल्या. तेवढ्यात तिला तो गुलाबी रंगाचा शालू दिसला. तिला तो फारच आवडला. पण त्यावरची किमतीचं लेबल बघून तिने तो पटकन् बाजूला सरकवला.
‘‘का गं? काय झालं? आवडलाय ना तो शालू? मग घे ना?’’ दादाने म्हटलं.
‘‘नको, फार महाग आहे तो...एखादी कमी किमतीची साडी बघते,’’ वहिनी म्हणाली.