आधुनिक

कथा * ममता रैना

‘‘तर मग तुम्ही किती दिवसांसाठी गावी जाताय?’’ समोरच्या प्लेटमधला ढोकळा उचलून तोंडात टाकत दीपालीनं प्रश्न केला.

‘‘किमान आठ दहा दिवस तरी जातील तिथं.’’ कंटाळलेल्या आवाजात सलोनं म्हटलं.

ऑफिसच्या लंच अवरमध्ये त्या दोघी बोलत होत्या.

सलोनीचं काही महिन्यांपूर्वीच दीपेनशी लग्न झालं होतं. एकाच ऑफिसात काम करताना प्रेम जमलं अन् लगेच लग्नंही झालं. आत्ताही दोघं एकाच ऑफिसात काम करताहेत. दोघांचे विभाग फक्त वेगळे आहेत. पण मजा म्हणजे दिवसभर एकाच ऑफिसात असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ नसतो. हे आयटीचं क्षेत्रच असं आहे.

‘‘बरं, एक सांग मला, तू तिथे राहतेस कशी? तूच सांगितलं होतं अगदी खेडवळ गाव आहे तुझं सासर म्हणजे.’’ दीपालीनं आज सलोनीला चिडवायचा चंगच बांधला होता. सासरच्या नावानं सलोनी खूप चिडते हे तिला माहीत होतं.

‘‘जावं तर लागणारच. एकुलत्या एका नणंदेचं लग्न आहे. सहन करावं लागेल काही दिवस.’’ खांदे उडवून सलोनी उत्तरली.

‘‘आणि तुझी ती जाऊ? भारतीय नारी, अबला बिचारी, असं असं काहीसं म्हणतेस ना तूं तिच्याबद्दल?’’ दोघी फस्सकन् हसल्या.

‘‘खरंच गं! अवघड आहे. त्यांना बघून मला जुन्या हिन्दी सिनेमातल्या हिरॉइन्स आठवतात. अगदीच गावंढळ आहेत. हातभर बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, भांगात शेंदूर अन् सारा वेळ डोक्यावर पदर असतो. असं कोण राहतं गं आजच्या काळात? खरं तर या अशाच बायकांमुळे पुरूष आम्हा बायकांना दुय्यम दर्जाच्या समजतात. किती, काय शिकल्या आहेत कुणास ठाऊक.’’ सोनालीनं म्हटलं.

‘‘मग?’’ दीपालीनं म्हटलं.

‘‘ठीकाय, मला काय? काही दिवस काढायचे आहेत. काढेन. कसे तरी…चल, लंच टाईम संपला, निघायला हवं.’’

सलोनी लहानपणापासून शहरात राहिलेली. लहान गावं किंवा खेडी तिनं कधी बघितलीच नव्हती. लग्नांनंतर प्रथमच ती सासरी गेली तेव्हा तिथलं ते वातावरण बघून ती खूपच नर्व्हस झाली. दीपेनवरच्या प्रेमामुळे कसेबसे चार दिवस काढून ती परत नोकरीवर रूजू झाली.

शहरात कायम स्कर्ट, टॉप, जीन्स-टॉप घालून वावरणाऱ्या सलोनीला सतत साडीत अन् साडीचा पदर डोक्यावर ठेवणं खूपच कठीण होतं. सासरची माणसं रूढावादी, पारंपरिक विचारांची होती. दीर तसे बरे होते पण त्यांच्याशी फार बोलणं होत नव्हतं. मात्र जाऊ खूपच समजूतदार होती.

धाकटी नणंद गौरी सतत नव्या वहिनीच्या अवतीभोवती असायची. गावातल्या स्त्रियांची विचारसरणी, राहणी हे सगळं बघून सलोनीला विचित्रच वाटायचं. तशी ती मनानं चांगली होती. पण या वातावरणाशी तिचा कधीच संबंध आला नव्हता. त्यामुळे या गृहिणी वर्गाबद्दल थोडी हीनत्त्वाची भावना तिच्या मनांत होती. नोकरी न करता या कशा जगू शकतात हेच तिला कळंत नसे.

सलोनी अन् दीपेननं शहरात आपला वेगळा संसार थाटला होता. इथं सासू, नणंद वगैरे कुणीच येत नसे. जे मनांत येईल ते करायची मुभा होती. अटकाव करणांरं कुणीच नव्हतं. दीपेनचे तिचे मित्र, सहकारी वेळी अवेळी यायचे. घरी सतत पार्ट्या व्हायच्या. दिवस एकदम मजेत चालले होते.

गौरीचं, धाकट्या नणंदेचं लग्न ठरलं होतं. तिथं जाणं गरजेचं होतं. सगळं घर पाहुण्यांनी भरलं होतं.

उन्हाळ्याचे दिवस, त्यातून वीज गेलेली. हातपंख्यानं वारा घेता घेता हात दुखू लागले. त्यात साडी अन् डोक्यावरचा पदर सांभाळण्याची कसरत…एयरकंडिशन्ड ऑफिस अन् एयर कंडिशन्ड घरात रहायची सलोनीला सवय…या उलट जुनाट परंपरावादी वातावरणाचा तिला उबग आला.

एकांत मिळताच सलोनीचा उद्रेक झाला. ‘‘कुठं मला आणून टाकलंस दीपेन? मला नाही जमत अशा ठिकाणी राहणं…साडीचा पदर सतत डोक्यावर…शी, मी इथं यायला नको होतं.’’

‘‘सलोनी, जरा हळू बोल. अगं, थोडे दिवस एडजेस्ट कर. लग्नाचा दुसऱ्या दिवशी आपण इथून निघणार आहोत,’’ दीपेननं तिची समजूत घातली.

सलोनीनं वाईट तोंड केलं. कधी एकदा हे लग्न आटोपतंय असं तिला झालं होतं. ढीगभर पाहुणे होते घरात. सगळ्यांची जबाबदारी घरच्या सुनांवर होती. सलोनीला स्वयंपाकाची सवय, आवड, अनुभव नव्हता. घरातली कामं तिला नेहमीच दुय्यम दर्जाची वाटायची. घरी, माहेरीसुद्धा कधी तिनं आईला घरकामात मदत केली नव्हती. असं असताना घरातल्या कुणी तिला काम सांगितलं तर तिला घाम फुटायचा. तिची जाऊ अवनी तिच्याहून काही वर्षांनीच मोठी होती पण सगळं घर इतकं छान सांभाळत होती की प्रत्येकाच्या तोंडी अवनीचं नाव होतं. सलोनीही घरातली सून होती पण तिचं नाव कोणीच घेत नव्हतं.

घरात सतत होणारं अवनीचं कौतुक बघून सलोनीला तिचा मत्सर वाटू लागला. कुणाचं काहीही काम असू दे. प्रत्येकजण अवनीवर विसंबून असे.

‘‘वहिनी, माझ्या शर्टाचं बटन तुटलंय, जरा लावून दे ना,’’ अंघोळ करून आलेल्या दीपेननं म्हटलं.

स्वयंपाकघरात मटार सोलंत बसलेली सलोनी लगेच दीपेनकडे येऊन रागानं म्हणाली, ‘‘इतक्या साध्या गोष्टीसाठी अवनी वहिनी कशाला लागते तुला? मला सांगायचं, मी लावून दिलं असतं.’’

तिचा राग बघून दीपेन घाबरला…बावचळला…म्हणाला, ‘‘मला नव्हतं माहीत तुला हे काम येतं म्हणून.’’

‘‘मला इतकी मतीमंद समजलास का?’’ म्हणंत तिनं त्याच्या हातून शर्ट व बटन हिसकून घेतलं अन् फडताळातला सुई दोरा बटन व्यवस्थित शिवून दिलं.

हळूहळू सलोनीच्या लक्षात आल अवनी का सर्वांना आवडते. सकाळी सर्वांच्या आधी उठून अंघोळ ओटापून ती सर्वांसाठी चहा करायची. त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता, वृद्ध सासऱ्यांसाठी पथ्याचं खाणं, बिनसाखरेचा चहा, कारण ते डायबिटिक आहेत. सासूबाईंचं काय पथ्यपाणी असेल ते बघायचं. नवऱ्याचा, मुलांचा डबा झाला की स्वयंपाकाची तयारी. पाहुण्यांपैकी कुणाच काही मागणी असायची. तेवढ्यात भांडी घासणारी बाई काही तरी म्हणायची, कपडे धुणारी परटीण साबण मागायची. दारात मांडव घालणारी माणसं आलेली असायची. चारीकडे अवनीची बारीक नजर असे. हसंत मुखानं ती सगळी काम करायची.

सलोनीला तिचं हसणं खोटं वाटायचं. ती उगीच देखावा करते असं वाटायचं. स्वत:चं महत्त्व जाणवून देण्यासाठी सलोनी काहीतरी काम करायला जायची अन् नेमका घोटाळा व्हायचा. त्यामुळे ती स्वत:वरच चिडायची. मग स्वत:च्या समाधानासाठी म्हणायची, ‘‘तसंही हे स्वयंपाक घर म्हणजे अडाणी, निरक्षर लोकांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलीला याची गरजच नाही.’’

सलोनीच्या हातून लोणच्याची बरणी पडून फुटली. घाईनं येत असलेल्या अवनीचा त्या तेलावरून पाय घसरला. ती पडली. तिचा पाय मुरगळला. सगळे धावले, तिची काळजी घेतली जाऊ लागली. पण ती अंथरूणावर असल्यामुळे घरात सर्वत्र अव्यवस्था झाली.

मोठ्या आत्यानं सलोनीला स्वयंपाकघरातल्या कामाला लावलं. तिला कधीच इतका मोठा स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. कसाबसा ती स्वयंपाक करायची पण तो चविष्ट होत नसे. दोघी आत्या करवादायच्या.

अवनीला सलोनीची स्थिती समजंत होती. ती तिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायची. मोठ्या आत्यांना ती म्हणाली, ‘‘तुम्ही सलोनीला बोल लावू नका. ती हुषार आहे पण ती शहरात राहिलेली, गावाकडच्या पद्धती तिला कुठून ठाऊक असणार? ती हळूहळू सर्व शिकेल.’’

धाकट्या आत्यानं सलोनीला खीर करायला सांगितलं. सलोनीला ती सतत ढवळायचा कंटाळा आला. मोठ्या आचेवर खीर पातेल्यात खाली लागली. जळक्या वासाची खीर कुणीच खाल्ली नाही.

‘‘तुला काही येतं की नाही गं? कुठलंच काम कसं नीट होत नाही?’’ सगळ्या नातलगांसमोर धाकटी आत्या सलोनीवर ओरडली.

लाजेनं सलोनीचा चेहरा लाल लाल झाला. तिला खरंच काही येत नव्हतं. पण तिचा त्यात काय दोष होता? पुन्हा अवनी मदतीला धावली. ‘‘आत्या, सलोनी शिकलेली, शहरात राहणारी, नोकरी करणारी मुलगी आहे. तुम्ही तिच्याकडून इतक्या अपेक्षा करूच नका. आपल्या घरात अजून ती नवी आहे ना? शिकेल सगळं.’’

ज्या लग्नासाठी सगळे जमले होते ते लग्न थाटात पार पडलं. एक एक करत आलेली पाहुणे मंडळीही निघून गेली. एव्हाना अवनीशी सलोनीची खूप छान गट्टी जमली होती. अवनीनं तिला कामातल्या अनेक सोप्या सोप्या टीप्स दिल्यामुळे सलोनीला कामंही बऱ्यापैकी जमू लागली होती.

दोन दिवसांनी त्यांना निघायचं होतं. एका दुपारी सलोनी जुने अल्बम बघत होती. अवनीचा पदवी घेतानाचा फोटो होता त्यात.

‘‘हाच फोटो आम्हाला तिच्या घरच्यांनी बघायला पाठवला होता.’’ दीपेन म्हणाला.

‘‘काय शिकल्याय त्या?’’

‘‘वहिनी डबल एम ए अन् पीएचडी आहे. पूर्वी ती नोकरीही करायची पण एकदा आई आजारी झाली. बरेच दिवस आजारपण झालं. वहिनीनं आईची प्राणपणानं सेवा केली. नोकरी सोडली. घर सगळं सांभाळलं. तिच्या सेवेमुळेच आई जगली. आम्ही सर्व तिचे उपकार मानतो. या घरासाठी तिनं खूप काही केलंय. नोकरी सोडली. आराम सोडला…केवळ कुटुंबालाच प्राधान्य दिलं.’’

ज्या अवनीला सलोनी अशिक्षित समजत होती ती इतकी उच्चशिक्षित होती…पुन्हा सर्व घर एकटी सांभाळत होती. तिनं स्वत:च्या शिक्षणाचा तोरा मिरवला नाही, उलट या घरासाठी नोकरी, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र वगैरे सर्व बासनात बंधून ठेवलं.

सलोनीला आपल्या केल्या विचारसरणीची लाज वाटली. आपण उच्चशिक्षित आहोत पण इतर अनेक बाबतीत कमी पडतो. आपल्या लोकांसाठी इथं यायला हवं, इथल्या पद्धती, इथले नियम सगळं समजून घ्यायला पाहिजे, याची तिला जाणीव झाली. आधुनिक असणं म्हणजे शहरात राहणं अन् तीच जीवनशैली अंगिकारणं नाही…

अवनी वहिनीनं खोलीत येत म्हटलं, ‘‘तुम्ही अजून आवरलं नाहीत? आज बिट्टूच्या शाळेत कार्यक्रम आहे. जायचंय आपल्याला.’’

‘‘हो, हो, आवरतोच…’’ दोघंही एकदम म्हणाली…जरा गडबडलेच ते…

बिट्टूला शाळेतला ‘बेस्ट स्टूडंट’ अवॉर्ड मिळालं होतं. सर्व विषयात त्यानं उच्चांकी मार्क मिळवले होतेच शिवाय इतर सर्व एक्टिव्हिटीजमध्येही तो अव्वल होता. त्याला बक्षीस देऊन सन्मानित केल्यानंतर प्रिन्सिपॉलनं पालकांपैकी कुणी येऊन दोन शब्द बोलावेत अशी विनंती केली. दादांनी अवनीला म्हटलं, ‘‘तूच जा.’’

अत्यंत आत्मविश्वासानं माइक हातात घेत अवनीनं मोजक्या शब्दात, अस्खलित इंग्रजीत पालक, मुलं, शिक्षक यांचे संबंध व मुलांचा सर्वांगिण विकास यावर भाष्य केलं. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी तिला दाद दिली.

घरी परतताना सलोनी  म्हणाली, ‘‘आपली दोघांची रजा अजून शिल्लक आहे, ती वापरून अजून काही दिवस इथं राहूयात का?’’

आश्चर्यानं दीपेननं म्हटलं, ‘‘तुला इथं आवडत नाही ना?’’

‘‘आता आवडतंय, अवनी वहिनीबरोबर अजून थोडी राहिले तर मला बरंच काही  शिकता येईल.’’ सलोनी मनापासून बोलली.

‘‘चला, निदान चांगलं जेवण तरी मिळेल मला.’’ दिपेनच्या बोलण्यावर सलोनीनं हसून दाद दिली.

मी आहे मदतीला

कथा * दीपा पांडे

लग्न समारंभ एका देखण्या अन् प्रशस्त लॉनवर आयोजित केला होता. सजावट बघणाऱ्याचं मन मोहून घेत होती. काही पोरं डीजेच्या गाण्यावर नाचत होती. अजून रिसेप्शन सुरू व्हायला अवकाश होता. सगळी व्यवस्था उत्तम होती.

खुर्चीवर बसलेल्या एका स्त्रीकडे थोड्या अंतरावरून टक लावून सीमा बघत होती. सतत बघितल्यानंतरही जेव्हा त्या स्त्रीनं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही तेव्हा सीमा स्वत:च उठून तिच्या जवळ गेली. ‘‘तू तू रागिणीच आहेस ना? रागिणी, मी सीमा. तू ओळखलं नाहीस मला? अंग मघापासून तुझ्याकडे बघतेय मी…पण तू ओळख दाखवली नाहीस…मग म्हटलं आपणच ओळख द्यावी…किती वर्ष झालीत गं आपल्याला दुरावून?’’ सीमानं तिला गदागदा हलवलं अन् मिठी मारली.

रागिणी जणू झोपेतून जागी झाली. तिनं आधी डोळे भरून सीमाकडे बघितलं अन् एकदम आनंदानं चित्कारली, ‘‘सीमा…मला सोडून का गं निघून गेलीस? तू नसल्यामुळे मला किती एकटं वाटत होतं.’’ रागिणीनं आता सीमाला मिठी मारली. दोघींचे डोळे पाणावले.

‘‘तू इथं कशी?’’ सीमानं विचारलं.

‘‘अगं नवरीमुलगी माझी चुलत बहीण आहे. तुला आठवतं का? ती उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे यायची. लिंबूटिंबू म्हणून आपण तिला आपल्यात खेळायला घेत नसू, कारण वयानं ती आपल्यापेक्षा बरीच लहान होती.’’ सीमा हसून म्हणाली.

‘‘हो, हो…आठवतंय मला.’’ मेंदूला ताण देत रागिणी म्हणाली.

मग वरात येईपर्यंत त्या दोघींची गप्पा खूपच रंगल्या. शिक्षण, जुन्या मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमा, नाटक कित्तीतरी विषय होते. रागिणी तर किती तरी दिवसांनी इतकी बोलत होती. बालपणाची मैत्री मोठं झाल्यावरही निरागसता जपत असते. तिच्यात औपचारिकपणा अजिबात नसतो.

तेवढ्यात एकदम गडबड उडाली…चार वर्षांची एक मुलगी दिसेनाशी झाली होती. सगळेच धावपळ करत होते. व्हॉट्सअॅप करून तिचे फोटे पाठवले गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. लग्न जिथे होतं ते एक भलं मोठं फार्म हाऊस होतं. व्यवस्था उत्तम होती पण लहान मुलगी दिसेनाशी होणं काळजी निर्माण करणारं होतं.

अर्धा तास हुडकल्यावर ती सापडली. जिथं खेड्यातला सेट लावला होता तिथं पाट्यावर चटणी वाटणाऱ्या बाईशी गप्पा मारत होती. रागिणीनीच तिला हुडकून आणली होती. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं, आभार मानले. त्या मुलीची तरूण आई मैत्रिणींसोबत डीजेच्या तालावर नाचण्यात मग्न होती. कधी मुलगी तिथून निसटली ते तिला कळलंच नाही. आजीला जेव्हा नात दिसेना तेव्हा तिनं हळकल्लोळ माजवला. मुलगी तर मिळाली. सासूनं सुनेचा सगळ्यांसमोर उद्धार केला. थोड्याच वेळात सर्व स्थिर स्थावर झालं.

लोक खाण्यापिम्यात मग्न झाले. सीमा व रागिणी पुन्हा आपल्या खुर्च्यांवर येऊन बसल्या. ‘‘तुझे डोळे खूपच तीक्ष्ण आहेत हं! पोरीला बरोबर हुडकून काढलंस.’’ सीमानं म्हटलं.

रागिणी उदासपणे म्हणाली, ‘‘तिला शोधू शकले नसते तर पार वेडी झाले असते. अर्धी वेडी तर आत्ताच आहे ती.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. तुला वेडी कोण म्हणेल? अंगावरचे हिऱ्याचे दागिने, एवढी महागडी साडी, असा स्टायलिश अंबाडा अन् इतका सुंदर चेहरा…अशी वेडी आजपर्यंत कुणी बघितली नसेल…’’ सीमा हसत म्हणाली.

‘‘ज्याचं जळंतं, त्यालाच कळंतं…माझी वेदना तुला नाही कळायची.’’ रागिणी रडू आवरत म्हणाली.

‘‘असं कोणतं दु:ख, व्यथा, वेदना आहेत तुझ्या ज्याच्या ओझ्यानं तू वेडी झाली आहेस? प्रतिष्ठित घराण्यातली सून, उच्चपदस्थ इंजिनियर नवरा, भरपूर पैसा-अडका…अजून काय हवंय?’’ सीमानं विचारलं.

‘‘सोड गं! तुला नाहीच समजायचं.’’ टोमणा मारत रागिणी म्हणाली.

‘‘मी? मला नाही समजायचं? अन् तुला मी किती समजले आहे गं? काय ठाऊक आहे तुला माझ्या आयुष्यातलं? आज दहा वर्षांनी भेटतोय आपण, या दहा वर्षात किती काय घडून गेलंय हे तुला ठाऊक आहे.’’

सीमा एकाएकी भडकली. ‘‘तुला काय वाटतं? माझ्या आयुष्यात काही दु:ख, ताणतणाव आलेच नाहीत? तरीही मी तुझ्या समोर अगदी खंबीरपणे उभी आहे. एकच सांगते. भूतकाळापासून धडा घ्यायचा. भविष्यकाळाची स्वप्नं रंगवायची अन् वर्तमानकाळात अगदी मजेत, आत्मविश्वासानं जगायचं हे ध्येय बाळगलंय मी. भूतकाळातल्या वेदनादायक घटना दु:स्वप्नं समजून विसरायच्या. उगीच त्यांचं ओझं घेत आपलं आयुष्य का म्हणून कुस्करायचं? सीमाचा चेहरा लाल लाल झाला होता.’’

रागिणीनं सीमाचा हात घट्ट धरला…‘‘तुझ्यावरही कधी कुणी बलात्कार केला होता?’’ तिनं विचारलं.

सीमा दचकली…‘‘तुझ्यावरहीचा काय अर्थ? तुझ्या बाबतीतही असं घडलंय का?’’ तिनं रागिणीच्या हातावर थोपटत म्हटलं.

‘‘हो ना गं! ते क्षण माझा पिच्छा सोडत नाहीएत. वर्तमानपत्रातल्या बातम्या, सिरियल्स, सिनेमा, नाटक कुठंही काही ऐकलं, वाचलं, बघितलं की मला तो प्रसंग आठवतो. प्रचंड घाम फुटतो, रडू येतं. माझी तहानभूक हरपते. असं वाटतं…असं वाटतं, त्या नराधमाचा जीव घ्यावा, नाहीतर आपण तरी मरूण जावं…अशावेळी औषधांची मदत होते, गोळ्या घेते अन् झोपून जाते. मग मला काहीही कळंत नाही. माझ्या सासूबाई, मोलकरणीच्या मदतीनं घर चालवताता. अन् सतत माझ्या नावानं शंख करतात की त्यांच्या लाख मोलाच्या हिऱ्यासारख्या मुलाची फसवणूक झाली. इतक्या छान छान मुली सांगून येत होत्या आम्ही हिच्या सौंदर्यावर भाळलो…अशी आजारी मुलगी आमच्या नशिबी आली. माझा नवरा खूप खूप चांगला आहे गं…पण मीच कमी पडले…मी तरी काय करू?’’ रागिणीला अश्रू अनावर झाले.

सीमानं तिला जवळ घेतलं. तिला शांत करत ती म्हणाली, ‘‘अशा प्रसंगातून जाणारी तू एकटीच नाहीएस रागिणी, अगं इथं या ठिकाणीसुद्धा अशा कित्येकजणी असतील ज्यांच्यावर असा प्रसंग आला असेल. पण त्या कुणीच झोपेच्या गोळ्या घेऊन जगत नाहीत. तो एक अपघात होता असं मानून आपण पुढे जायचं. असं बघ तू व्यवस्थित रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालते आहेस अन् समोरून येऊन कुणी तुझ्यावर धडकला तर चूक त्याची आहे ना? राँग साइडनं तो आला, तुझी काय चूक? ज्यानं आमच्यावर बलात्कार केला, माणूसकीचा विश्वासघात केला तो दोषी आहे…आपण नाही, आपण निर्दोष आहोत. शुद्ध आणि स्वच्छ आहोत. अपराध त्यानं केलाय, त्यानं जळतकुठत आयुष्य काढायला हवं…आपण का म्हणून तोंड लपवून जगायचं? उलट त्यांनाच लाजीरवाणं वाटेल अशा तऱ्हेनं त्यांना अद्दल घडवायची. अशी चूक पुन्हा ते करणार नाहीत असा दम त्यांना द्यायचा…’’ सीमा अगदी पोटतिडकीनं अन् आत्मविश्वासानं बोलत होती.

‘‘तूं केलंस असं?’’ रागिणीनं विचारलं.

‘‘माझा तर चांगला मित्रच माझा वैरी झाला होता. दहा वर्षांपूर्वी जेव्हा बाबांची बदली दिल्लीला झाली, तेव्हाच आपली ताटातूट झाली. तुझी उणीव खूप जाणवायची पण नवं शहर, नवी शाळा. नवं वातावरण यामुळे मी खूप उत्तेजित आणि उत्साहित होते. लवकरच मी वर्गातली हुषार आणि अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून आपला ठसा उमटवला.

‘‘माझ्या वर्गातला ध्रुव जो आत्तापर्यंत पहिला येत असे, तो दुसऱ्या क्रमांकावर गेला. मनांतून तो माझ्यावर डूख धरून होता पण वरकणी मात्र मैत्री ठेवून होता. मला मात्र याची कल्पनाच नव्हती. दहावी बोर्डात मी टॉप केलं त्यामुळे तो अधिकच बिथरला अन् बारावीतही प्रिलिम्समध्ये टॉप केलं तेव्हा तर तो अपमानानं अन् संतापानं पेटून उठला. वरकरणी तोंड भरून माझं अभिनंदन केलं अन् मला स्पेशल ट्रीट म्हणून हॉटेलात लंचला नेलं. आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही नेहमीच वाढदिवस किंवा इतर काही सेलिब्रेशन्स म्हणून एका ठराविक रेस्टॉरंटमध्ये जात होतो. यावेळी मात्र आम्ही दोघंच होतो. ध्रुववर अविश्वास करण्याचा प्रश्नच नव्हता.’’

जेवताना त्यानं म्हटलं, ‘‘आज वेळ आहे तेव्हा माझ्या घरी येतेस का? आईला तुला भेटायचं. पहिली येणारी मुलगी कशी असते ते बघायचंय.’’

मला गंमत वाटली. त्याच्या आईला भेटायला नाही कशाला म्हणायचं? जेवण करून आम्ही त्याच्या घरी गेलो. घराचं कुलुप त्यानं खिशातून किल्ली काढून उघडलं तेव्हा मला नवल वाटलं पण तो म्हणाला, ‘‘तू घरात थांब, आई शेजारी गेली असेल. मी तिला बोलावून आणतो.’’

त्यानं फ्रिजमधून ऑरेंजची बाटली काढून मला दिली व तो निघून गेला. पोटभर जेवण झालं होतं. ऑरेंज पिऊन संपवताच मला झोप आली. नकळत मी सोफ्यावर आडवी झाले.

जागी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं ध्रुवनं मला फसवलं आहे. मला लुटलं आहे. तो दारूच्या नशेत बरळंत होता, ‘‘मला हरवतेस का? बघ, आज तुला हरवलंय…आता मिरवून दाखव आपली मिजास…’’ मी खाडकन् भानावर आले. स्वत:चे कपडे नीट केले. हॉलमध्येच पडलेली हॉकी स्टिक उचलून त्याच्या नाजुक अंगावर फटका मारला. तो वेदनेनं विव्हळू लागला. आणखी एक फटका देत मी ओरडले, ‘‘आता दाखव आपली मर्दानगी.’’ सरळ घरी आले.

प्रिलिम्समध्ये टॉप केलं होतं. आता बारावी बोर्डात टॉप करायचं होतं. सगळं काही विसरून सगळं लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं. बोर्डात पहिली आले.

ध्रुवनं तर शाळेत येणं बंदच केलं. बहुधा ते कुटुंब दिल्ली सोडून कुठं तरी गेलं असावं. पण त्यानंतर ध्रुवचा विषय संपला. सीमा काही क्षण थांबली. पाण्याचा ट्रे घेऊन फिरणाऱ्या बेयराकडून तिनं पाण्याचा ग्लास घेतला व घटाघटा पाणी पिऊन रिकामा ग्लास त्याला परत करून ती पुन्हा रागिणीकडे वळली.

आईला जेव्हा मी या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा तिनं मला समजावलं की, ‘‘ही घटना विसर…यात तुझा काही दोष नाही. कौमार्य, स्त्रीत्त्व, पावित्र्य वगैरे सर्व पोकळ कल्पना असतात. तू आजही आधी होतीस तशीच आहेस. आईच्या त्या शब्दांनी माझ्या मनांतली अपराधीपणाची भावना नाहीशी झाली. त्या आधारावर मी पुढे जात राहिले. कधीच मागे वळून बघितलं नाही.’’ सीमा म्हणाली.

‘‘मी तर माझा भूतकाळ विसरू शकत नाही. कारण माझ्या माहेरच्या घराशेजारी राहतो तो हलकट, पाजी माणूस. मी तर माहेरी जाणंही बंद केलंय,’’ रागिणीचे डोळे पुन्हा अश्रूंनी डबडबले.

‘‘तू त्या चॉकलेट काकांबद्दल म्हणतेस का? त्यांनी केलं असं? मला आठवताहेत ते. पांढरा लेंगा झब्बा घालून असायचे. आपण बॅडमिंटन खेळत असताना मध्येच येऊन असा शॉट मारा, अशी रॅकेट धरा वगैरे शिकवायचे अन् खिशातून चॉकलेट काढून द्यायचे. मुलांनी त्यांचं नावच चॉकलेट काका ठेवलं होतं.’’

‘‘तो मुखवटा होत गं! कौतुक करण्याच्या बहाण्यानं किती जोरात गालगुच्चे घ्यायचे…अन् रॅकेट अशी धरा म्हणत हात दाबून धरायचे…मला त्यांचा राग यायचा पण सांगणार कोणाला? तू गेल्यावर तर मी एकटी पडले.’’

‘‘तू गेल्यानंतर महिन्याभरातच ते घडलं. आईनं उकडीचे मोदक केले होते ते शेजारी देऊन ये म्हणून सांगितलं. माझ्या आईला तरतऱ्हेचे पदार्थ बनवून आळीत सर्वांना वाटायला फार आवडायचं अन् मग स्वत:च्या सुग्रणपणाचं कौतुक ऐकणं हा तिचा छंद होता. तिला जणू नशा चढायची स्वत:च्या कौतुकाची.’’

‘‘त्या दिवशी काकू घरी नव्हत्या. काका खोटं बोलले, ‘ती स्वयंपाकघरात आहे’ म्हणून मी स्वयंपाक घरात जाताच त्यांनी माझ्यावर झडप घातली. आज तुला एक मजेदार खेळ सांगतो म्हणाले…मला काहीच कळेना. तोंडातून शब्द फुटत नव्हता. माझा प्रतिकार दुबळा ठरत होता. शेवटी एकदाचा तो खेळ संपला. त्यांनी कपाटातून रिवॉल्वर काढलं अन् माझ्या कपाळावर टेकवून धमकी दिली, यातलं एकही अक्षरही बाहेर काढलं तरी तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन.’’

शारीरिक, मानसिक वेदना सोसत, उद्ध्वस्त होऊन मी घरी आले. हॉलमध्ये भिशीच्या मैत्रिणी मोदकांवर तुटून पडल्या होत्या. मनसोक्त चरत होत्या. आईचे गोडवे गात होत्या. अन् मी माझ्या खोलीचं दार बंद करून ओक्साबोक्शी रडत होते. मला माझ्या शरीराची किळस वाटत होती.

या सर्व प्रकाराचा प्रचंड परिणाम माझ्या मनांवर झाला होता. आईला काही सांगायचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. मी अगदी एकाकी पडले. माझं हसणं, बोलणं, मैत्रिणींकडे जाणं एवढंच काय अभ्यास करणंही थांबलं…परिणाम म्हणजे मी दहावीला चक्क नापास झाले. त्यावरूनही आईनं खूप म्हणजे खूपच ऐकवलं. मी झोपले तर चोवीस तास झोपून रहायची. दोन दोन दिवस जेवत नव्हते. कुठे तरी नजर लावून बसायची. घरातल्यांना वाटलं मला नापास होण्याचा धक्का बसला आहे. ‘हिला मनोरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन आणा.’ कुणीतरी सुचवलं. मानसिक रूग्णाचा शिक्का बसणं तर आईला अजिबातच सहन होईना. शेवटी एकदाची त्या डॉक्टरकडे गेले.

तीन चार सीटिंगनंतर मी तिच्याशी थोडं थोडं बोलू लागले. माझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तिला सांगितलं. तिनं आईला बोलावून घेतलं. आईची समजूत घालायचा प्रयत्न केला पण ती ऐकूनच घेईना. थयथयाट केला. ‘‘स्वत: अभ्यास केला नाही, दुसऱ्याला दोष देतेय. आधीच नापास होऊन अन् मनोरूग्ण होऊन आमचं नाक कापलं. समाजात पत राहिली नाही, आता आणि शेजाऱ्यांशी वितुष्ट घ्यायचं का? इतकी वर्षं शेजारी राहतोय आम्ही…’’ इतक्या थयथयाटानंतर मी गप्पच झाले.

त्यानंतर मी गप्पच झाले. हे स्थळ आलं. माझ्या रूपामुळे लग्न झालं…नवरा खूप समजूतदार अन् प्रेमळ आहे पण मी त्यालाही न्याय देऊ शकले नाही. मन सतत आक्रंदन करतं, त्याला न्याय हवाय, तो ताण सहन झाला नाही की मन शांत करण्यासाठी गोळी घेते अन् त्या गुंगीत तासन् तास पडून राहते. तूच सांग काय करू मी? आहे का काही उपाय?

तिचे हात आपल्या हातात घेत सीमानं आत्मविश्वासानं म्हटंल, ‘‘उपाय आहे. शोधला की सापडतो. आता मी इथं आलेय ना, लवकरच आपण तुझ्या माहेरी जाण्याचा कार्यक्रम ठरवू. मुद्दाम त्या चॉकलेट कांकाच्या घरी जाऊ. बलात्कारावर बोलू. बलात्काऱ्यांना खूप शिव्या देऊ अन् त्या काकूंसमोरच त्या हलकटाचा मुखवटा ओढून काढू. मग बघ, त्याची काय अन् कशी दैना होते ती. काकूही लाटण्यानं बदडतील त्याला. आता म्हातारपणी ती बाई त्याची सेवा करणार नाही. तो म्हातारा तुझ्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागेल, मी सांगते.’’ सीमाचा आत्मविश्वास व तिच्या हातातून जाणवणारा आधार यामुळे रागिणीही तणावमुक्त झाली. नकळंत तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्याचवेळी तिचा नवरा रमण तिथं आला. रागिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ‘‘बालपणीची मैत्रीण भेटली अन् तू एकदम बदललीस…’’

आपल्या हातातले रागिणीचे हात रमणच्या हातात देत सीमानं म्हटलं, ‘‘भावजी, आता ही कायम अशीच आनंदी राहील, बघाल तुम्ही..आता तिची काळजी सोडा…मी आले आहे ना आता तिला आधार द्यायला, तिच्या मदतीला…खरं ना रागिणी?’’

गोड हसून रागिणीनं मान डोलावली.

पावसाळी शेवाळं

कथा *प्राची भारद्वाज

संध्याकाळ व्हायला आली तशी दीपिकानं पलंगावरच्या चादरी, उशा वगैरे आवरायला सुरूवात केली. तिचे रेशमी सोनेरी केस वारंवार तिच्या गुलाबी गालावर रूळायला बघत होते अन् आपल्या नाजूक लांबसडक बोटांनी ती पुन:पुन्हा त्यांना मागे सारत होती.

‘‘आता ऊठ ना, मला चादर बदलायची आहे.’’ दीपिकानं संतोषला हलवत म्हटलं. तो अजूनही आरामात बेडवर लोळत होता.

‘‘का पुन:पुन्हा त्या बटा मागे ढकलते आहेस? छान दिसताहेत तुझ्या सुंदर चेहऱ्यावर…जणू ढगात लपलेला चंद्र…’’ संतोषने म्हटलं.

‘‘सायंकाळ व्हायला आलीय. आता या ढगांना घरी हाकललं नाही तर तुझ्या चंद्रालाच घराबाहेरचा रस्ता धरावा लागेल. कळलं का?’’

‘‘तू घाबरतेस कशाला? तुला घरंही आहेत अन् घरी घेऊन जायला तत्पर असणारेही आहेत. ज्या दिवशी तू होकार देशील त्याच दिवशी मी…’’

‘‘पुरे पुरे…मी होकार दिलाच आहे ना? आता निघ तू…उद्या येतीलच थोड्या वेळात, तोवर मला हे सर्व आवरायला हवं.’’ दीपिका भराभर आवरत म्हणाली. चादरी, उशा सर्व व्यवस्थित ठेवून, इतर सर्व गोष्टी नीटनेटक्या केल्यावर तिनं विचारलं, ‘‘उद्या कधी येणार गुरूदेव?’’

‘‘असाच बाराच्या सुमाराला.’’ संतोषनं म्हटलं.

तो जरा तक्रारीच्या सुरात पुढे म्हणाला, ‘‘हे असं चोरून भेटणं मला अजिबात आवडत नाहीए. असं वाटतं आपण प्रेम नाही, गुन्हा करतोय…अपराध केल्यासारखं वाटतं.’’

‘‘गुन्हा तर करतोच आहोत संतोष…आपलं लग्न झालेलं असतं तर गोष्ट वेगळी होती…पण मी आता उदयची पत्नी आहे. तू माझ्या घरी मला संगीत शिकवायला म्युझिक टीचर म्हणून येतो आहेस. अशा परिस्थितीत आपल हे नातं म्हणजे गुन्हाच ठरतो ना?’’

‘‘का बरं? आधी आपलं दोघांचं प्रेम होतंच ना? उदय तर तुझ्या आयुष्यात नंतर आलाय. तुझ्या अन् माझ्या घरच्यांनी हे जाती पर जातीचं प्रस्थ माजवलं नसतं, आपल्या लग्नाला विरोध न करता लग्न लावून दिलं असतं तर? पण त्यांनी अगदी घाई घाईनं तुझं लग्न दुसरीकडे लावून टाकलं.’’

‘‘सोड त्या जुन्या गोष्टी. या दुसऱ्या शहरात येऊनही आपण दोघं पुन्हा भेटलो. माझ्या मनांतलं तुझ्या विषयीचं प्रेम बहुधा नियतीलाही हवं असावं. म्हणूनच आपली पुन्हा गाठ पडली.’’ दीपिकानं विषय संपवला.

उदय व दिपिकाच्या लग्नाला आता दोन वर्षं होऊन गेली होती. सुरूवातीला दीपिका खूपच कष्टी अन् उदास असायची. उदयला वाटे नवं लग्न, नवी माणसं, नवं शहर यामुळे ती अजून स्वत:ला अॅडजेस्ट करू शकली नाहीए…हळूहळू रूळेल. पण खरं कारण वेगळंच होतं. संतोष, तिचं पहिलं प्रेम तिच्यापासून दुरावल्यामुळे ती दु:खी होती. एकदा ती व संतोष सिनेमा बघून हातात हात घालून घरी परतत असताना तिच्या थोरल्या भावानं बघितलं. दीपिकावर जणू वीज कोसळली. त्यानं तिथूनच तिला धरून ओढत घरी आणून तिच्या खोलीत कोंडून घातलं. कुणी तिला भेटणार नाही, ती कुणाला भेटू शकणार नाही…त्या खोलीतच तिनं रहायचं. दीपिकानं अन्न सत्याग्रह पुकारला. पण कोणीही दखल घेतली नाही. शेवटी तीन दिवसांनी भूक असह्य झाल्यावर तिनं मुकाट्यानं शरणागती पत्करली. संतोषला भेटावं कसं ते कळत नव्हतं. घरातलं वातावरण फार जुनाट विचारांचं. त्यातून संतोषची जातही वेगळी होती.

‘‘त्या मुलाचा जीव वाचावा असं वाटंत असेल तर त्याचा नाद सोड.’’ भावानं तिला बजावलं होतं. ‘‘बाबा, तुम्ही फक्त आदेश द्या, त्या हलकटाच्या देहाचा तुकडासुद्धा कुणाला सापडणार नाही असा धडा शिकवतो.’’

‘‘मला तर वाटतंय या निर्लज्ज पोरीलाच विष देऊन ठार करावं,’’ ही अन् अशीच वाक्यं तिला सतत ऐकवली जात होती. ती खूप घाबरली नर्व्हस झाली. अन् पंधरा दिवसात घरच्यांनी दूरच्या शहरात राहणाऱ्या उदयशी तिचं लग्न लावूनही टाकलं. दीपिका जणू बधीर झाली होती. होणारा नवरा, पुढलं आयुष्य कशा विषयीच तिला जाणून घ्यावंसं वाटलं नाही. लग्नातही ती मुकाटपणे सांगितलेले विधी करत होती. सासरी सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे सर्व होते, पण ती वेगळ्या ठिकाणी राहत होती. इथं फक्त उदय अन् तीच राहणार होते.

खरं तर उदय खूपच सज्जन आणि प्रेमळ तरूण होता. निरोगी, निर्व्यसनी, शिकलेला, उत्तम पगार मिळवणारा…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकोला समजून घेणारा होता. कुणाही मुलीला अभिमान वाटेल असा नवरा होता तो. पहिल्या रात्री दीपिकेचा उदास चेहरा बघून त्यानं तिला अजिबात त्रास दिला नाही. नव्या ठिकाणी नव्या नवरीला रूळायला थोडा वेळ हवाच असतो. हळू हळू ती मोकळी होईल हे त्यानं समजून घेतलं.

काही दिवसानंतर दीपिकेनंही तडजोड करायची असं ठरवलं. नव्या जागी, नव्या संसारात, नव्या नात्यात रमायला तिला जमू लागलं. तशी ती गृहकृत्य दक्ष होतीच.

एकदा सायंकाळी घरात एक पार्टी होती. उदयचे काही मित्र त्यांच्या बायकोसह आले होते. घरात काम करताना उदयनं दीपिकेला गाणं गुणगुणताना ऐकलं होतं. एक दोघांनी गाणं म्हटल्यावर कुणीतरी दीपिकेलाही गाणं म्हणायचा आग्रह केला. दीपिकेनं गाणं म्हटलं अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेच तिच्या सुरेल आवाजावर अन् तिच्या गाण्याच्या पद्धतीवर खुश द्ब्राले. उदयनं म्हटलंही, ‘‘माझी बायको इतकं छान गाते हे मला कुणी सांगितलंच नव्हतं. आज कळतंय मला.’’ उदयला तर बायकोचं किती अन् कसं कौतुक करू तेच समजेना.

सगळी मंडळी निघून गेल्यावर उदयनं दीपिकेला म्हटलं, ‘‘तू खरं म्हणजे गाणं शिकायला हवं. तुझी कला वाढीस लागेल. तुला जीव रमवायला एक साधनही मिळेल…’’

दीपिका गप्प बसली तरी उदयनं एका चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करत इकडे तिकडे चौकशी करून तिच्यासाठी एक संगीत शिक्षक शोधून काढला. ‘‘आजपासून हे तुला गाणं शिकवायला येतील.’’ त्यानं सांगितलं.

संतोषला संगीत शिक्षक म्हणून समोर बघून दीपिका चकितच झाली. उदयनं दोघांची ओळख करून दिली. अन् ‘ऑल द बेस्ट’ म्हणून तो ऑफिसला निघून गेला.

उदय गेल्यावर दीपिका पहिलं वाक्यं बोलली, ‘‘तू इथं कसा? माझा पाठलाग करत इथवर आलास?’’

‘‘नाही दीपू, मी तुझ्या मागावर नव्हतो, मी तर या शहरात नोकरी शोधत आलोय. कुणीतरी मला या घराचा पत्ता दिला. इथं संगीत शिक्षक हवाय म्हणून मी इथं आलो.’’

‘‘मला दीपू म्हणू नकोस. माझं लग्न झालंय आता संतोष, तुझ्या दृष्टीनं मी दुसऱ्या कुणाची पत्नी आहे.’’

नियतीचा खेळच म्हणायचा, पुन्हा दीपिका व संतोष समोरासमार आले होते. दोघंही एकमेकांना विसरून नव्यानं आयुष्य सुरू करत होते अन् पुन्हा ही भेट झाली.

‘‘दीपू, सॉरी, दीपिका, मला इथं शिकवणीसाठी येऊ दे. मला पैशांची, नोकरीची गरज आहे. या ट्यूशनमुळे अजूनही एक दोन लोकांकडून बोलावणं येईल असं मला त्यांनी सांगितलंय…त्यांनी म्हणजे ज्यांनी तुझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल सांगितलं…त्यांनी. उदयसमोर मी आपलं गत काळातलं नातं कधीही उघड करणार नाही असं वचन देतो मी तुला.’’ यावर दीपिकाला काही बोलता आलं नाही. काही काळातच दोघांमधला दुरावा नाहीसा झाला. हसणं, बोलणं, चेष्टा मस्करी, गाण्याचा रियाज सर्व सुरू झालं.

दुसऱ्या दिवशी रियाज आटोपल्यावर दीपिकेनं संतोषला म्हटलं, ‘‘आपल्या भूतकाळाचा विचार करून दु:खी होण्यात काय अर्थ आहे. यापुढील आयुष्याचा विचार केला पाहिजे. त्यातच शहाणपणा आहे.’’ संतोषचा दुर्मुखलेला चेहरा बघून तिला वाईट वाटत होतं.

‘‘तुला कळायचं नाही दीपिका…दुसऱ्या कुणाची पत्नी म्हणून तुझ्याकडे बघताना मला काय वाटतं ते कसं सांगू. तू माझी होतीस अन् आता…’’ बोलता बोलता संतोषनं दीपिकाचे दंड दोन्ही हातांनी घट्ट धरले.

त्यानंतर दीपिका एकदम आनंदात असायची. घर आता अधिक टापटीप असायचं, जेवायला नवीन चविष्ट पदार्थ बनवले जायचे. एकूणच तिची पूर्वीची उदासीनता, गप्प असणं…सगळंच बदललं होतं. उदयला वाटे, तिला तिच्या आवडीचे संगीत शिक्षण घेता येतंय, यामुळेच ती आनंदात आहे.

दीपिका आकाशी निळ्या रंगाचं स्वेटर विणत होती. तो प्रसन्न रंग अन् त्यावर घातलेली ती सुंदर आकर्षक नक्षी बघून उदयनं म्हटलं, ‘‘माझ्यासाठीही असं सुंदर, याच रंगाचं, याच डिझाइनचं स्वेटर करून दे ना.’’

‘‘पुढचं स्वेटर तुमच्यासाठीच विणेन. हे मी माझ्या चुलत भावासाठी विणतेय. पुढल्याच महिन्यांत त्याचा वाढदिवस आहे ना?’’

‘‘तर मग तू माहेरी जाऊन ये ना, गेलीच नाहीएस तू खूप दिवसांत.’’

‘‘नाही हो, मला नाही जायचंय…तुमच्या जेवणाची आबाळ होते ना मग?’’

‘‘अगं, मी काही कुक्कुळं बाळ नाहीए, इतकी काळजी का करतेस? अन् माहेरी जायला तर सगळ्याच मुलींना आवडतं. तू बिनधास्त जा…सगळ्यांना भेट. त्यांनाही बरं वाटेल. मी माझी काळजी घेईन. तू अगदी निशिचंत रहा.’’ उदयनं तिला आश्वस्त केलं. दीपिकेला त्यानंतर नाही म्हणता आलं नाही.

‘‘आता कसं करायचं? चार दिवस मी माहेरी गेले तर आपली भेट कशी होणार? त्या शहरात भेटणं तर केवळ अशक्य आहे. तिथं सगळेच आपल्याला ओळखतात.’’ दीपिकेनं संतोषला अडचण सांगितली. तिचं आज गाण्यातही लक्ष लागत नव्हतं.

‘‘तू काळजी करू नकोस. तुला भेटल्याशिवाय मी तरी कुठं राहू शकतो? काहीतरी युक्ती करावी लागेल. बघूयात काय करता येतंय…’’ संतोषनं थोडा विचार करून एक योजना सांगितली, ‘‘तू इथून ट्रेननं निघ. पुढल्याच स्टेशनवर मी तुला भेटतो. आपण त्याच शहरात हॉटेलात चार दिवस राहू. तूच उदयला फोन करत राहा. खोलीच्या बाहेर पडलोच नाही तर आपल्याला कुणी बघणारही नाही.’’ बोलता बोलता संतोषचे हात दीपिकेच्या शरीरावर खेळू लागले होते.

उदयनं दीपिकेला ट्रेनमध्ये बसवलं. त्याला बाय करून तिनं निरोप दिला. पुढल्याच स्टेशनवर संतोषनं तिला उतरवून घेतलं. दोघं एका चांगल्या हॉटेलात गेली. रिसेप्शन डेस्कवर खोटी नावं सांगायची असं मनांत होतं पण हल्ली आयकार्ड, घरचा पत्ता, पॅनकार्ड वगैरे सगळंच सांगावं लागतं. दोघांची वेगवेगळी नावं सांगताना दोघंही मनांतून घाबरलेले होते. हॉटेलात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे लागलेले होते. तोंड लपवता लपवता दीपिकेची वाट लागली. आपण कॉलगर्ल आहोत असं घाणेरडं फीलिंग तिला यायला लागलं.

खोलीत आल्यावर ती वैतागून म्हणाली, ‘‘असं काही असतं याची थोडीही कल्पना असती तरी मी इथं आले नसते.’’

‘‘आता तर खोलीत आपण सुरक्षित आहोत ना? आता विसर सगळं आणि ये माझ्या मिठीत.’’ संतोष तर असा अधीर झाला होता जणू आज त्याची लग्नाची पहिली रात्र आहे.

‘‘थांबरे, आधी उदयला फोन तर करू देत. मी पोहोचले म्हणून सांगायला हवं ना?’’

‘‘अगं…अगं…हे काय करतेस? तू उद्या सकाळी पोहोचते आहेस. तू अजून ट्रेनमध्येच आहेस. विसरू नकोस.’’ संतोषनं तिला मिठीत घेत खिदळंत म्हटले. त्याचं ते खिदळणं दीपिकेला अजिबात रूचलं नाही.

हॉटेलच्या त्या बंद खोलीत कुणाचीही भीती नसतानादेखील दीपिकेला संतोषचा स्पर्श सुखाचा वाटत नव्हता. काय होतंय ते तिला समजत नव्हतं. ‘डोकं फार दुखतंय’ म्हणून ती रात्री न जेवताच लवकर झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दीपिकेनं चहाची ऑर्डर दिली. चहा घेऊन येणारा वेटर आपल्याकडे रोखून बघतोय, संशयानं बघतोय असं तिला वाटलं. चोराच्या मनांत चांदणं म्हणतात ते खोटं नाही. दीपिकेला स्वत:चीच चिड आली…शी: काय म्हणत असेल तो आपल्याला.

‘‘आता फोन करू का उदयला? एव्हांना गाडी आपल्या शहरात पोहोचत असेल ना?’’ दहा मिनिटांत तिनं इतक्यांदा हा प्रश्न संतोषला विचारला की संतोषही संतापून म्हणाला, ‘‘कर गं बाई! एकदाचा फोन कर.’’

उदयच्या सुरात काळजी होती. ‘‘तू नीट पोहोचलीस ना? ट्रेन लेट का बरं झाली?’’ तिनं म्हटलं, ‘‘नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नंतर फोन करते.’’ ती प्रचंड घाबरली होती. असं अन् इतकं खोटं कधी बोलली नव्हती. घरात आपण किती सुरक्षित असतो हे तिला पदोपदी जाणवत होतं. ‘‘मी वेळेवर पोहोचले असं नाही सांगितलं हे किती बरं झालं? बापरे! मला खूप भीती वाटतेय संतोष…’’

‘‘चल, आज खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट घेऊयात. तुलाही थोडं बरं वाटेल. कालपासून तू टेन्शनमध्येच आहेस.’’ सतोषनं म्हटलं.

उदयबरोबर राहून दीपिका दूध ओट्स, दूध कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट-ब्रेड वगैरे सारखे पदार्थ नाश्त्याला घ्यायला लागली होती. आत्ताही तिनं ओट्स आणि ऑमलेट मागवलं. संतोषनं आलूपराठे आणि कचोरी मागवली.

‘‘का गं? इतका साधा आणि कमी ब्रेकफास्ट? पोट बरं आहे ना तुझं?’’ संतोषनं विचारलं.

‘‘आता आपण कॉलेजमधील नाही आहोत संतोष, वयानुरूप खाण्याच्या सवयीही बदलायला हव्यात. उदय तर म्हणतात…’’ दीपिकानं पटकन् जीभ चावली. एकदम गप्प झाली ती.

‘‘मी खूप बोअर होतेय…थोडं बाहेर भटकून येऊयात का?’’ दीपिकानं असं म्हणताच संतोष पटकन् तयार झाला. सतत खोलीत बसून टीव्ही बघून तोही कंटाळला होता.

सायंकाळी उशीरापर्यंत दोघं तिथल्या बाजारात मनसोक्त भटकले. संतोषने दीपिकेला अगदी लगटून घेतलं होतं. बाजारात तमाशा नको म्हणून तिनं तो नको असलेला स्पर्श सहन केला. बाहेरच काही तरी खाऊन रात्री दोघं हॉटेलच्या खोलीत परत आले. तिने कपडे बदलले अन् ती बेडवर आडवी झाली. पण या क्षणी तिला संतोषचा स्पर्श नको नको वाटत होता. मनांतून खूप अपराधी वाटत होतं. उदयशी खोटं बोलल्याचा पश्चात्ताप होत होता.

दीपिकानं काहीच उत्तर दिलं नाही. तिला स्वत:लाच समजत नव्हतं की स्वत:च्या घरात असताना संतोषच्या जवळीकीसाठी ती इतकी अधीर, आतुर असायची. आता तिला ती जवळीक नको का झालीय?

दुसऱ्या दिवशी दीपिकानं दोन वेळा उदयला फोन लावला. दोन्ही वेळा तो अगदी कोरडेपणांनं मोजकंच बोलला.

‘‘उदय का बरं असं वागला? इतका कोरडेपणा गेल्या दोन वर्षांत कधी जाणवला नव्हता. त्याचा मूड कशानं बिघडला असावा?’’ दीपिकानं म्हटलं.

‘‘ऑफिसच्या कामात गढलेला असेल, कामाचं टेन्शन असेल, तू काय त्याच्या मूडबद्दल बोलायला इथे आली आहेस का?’’ चिडून संतोष म्हणाला. ज्या विचारानं त्यानं हॉटेल बुक केलं होते, तसं काहीच घडत नव्हतं. संतोषला दीपिकेचं रसरशीत तारूण्य, तिचं सौंदर्य उपभोगायचं होतं पण ती तर अजिबात प्रतिसाद देत नव्हती. लोकांच्या नजरांची (खरं तर सगळे अपरिचित होते, तरीही) तिला भीती वाटत होती. त्यामुळे खोलीबाहेर जाता येत नव्हतं. विनाकारण हॉटेलचं बिल वाढत होतं. हा दिवसही असाच कंटाळवाणा गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जायचं असं शेवटी दोघांनी ठरवलं.

‘‘मला लवकर आलेली बघून उदयला नवल वाटेल, पण मी त्यांना सांगेन की तुमची फार आठवण येत होती म्हणून मी परत आले.’’ दीपिका म्हणाली.

‘‘उदय, उदय, उदय! खरोखरंच त्याची फार आठवण येतेय का?’’ संतोषनं संतापून विचारलं. दीपिकेनं उत्तर दिलं नाही. पण न बोलताही सत्य काय ते संतोषला समजलं. दीपिकेला तिच्या घरी सोडून संतोष आपल्या खोलीवर निघून गेला.

सकाळीच दीपिकेला घरात बघून उदयला जरा नवल तर वाटलं.

‘‘सरप्राइज!’’ दीपिकेनं उदयच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘इतक्या लवकर कशी आलीस तू? दोन दिवस अजून राहणार होतीस ना?’’ अगदी संथ सुरात त्यानं विचारलं. ती लवकर आल्याचा जणू त्याला आनंद झालाच नव्हता.

‘‘का? तुम्हाला आनंद नाही झाला का? मला तुमची फारच आठवण यायला लागली म्हणताना मी लगेचच निघाले.’’ दीपिकानं म्हटलं.

ब्रेकफास्ट घेऊन झालेला होता. दुपारचं जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच घेईन एवढं बोलून उदय ऑफिसला निघून गेला.

सायंकाळी उदय घरी परतला तोवर दीपिकेनं घर साफसूफ करून, फर्निचरची रचना बदलून नव्यानं मांडामांड केलेली होती. स्वयंपाक ओट्यावर तयार होता. उदय गप्पच होता. त्यानं चहाही नको म्हणून सांगितलं.

‘‘तुम्ही असे थकलेले अन् गप्प का आहात? बरं नाही वाटत का?’’

‘‘जरा थकवा आलाय. लवकर झोपतो. विश्रांती मिळाल्यावर बरं वाटेल.’’ एवढं बोलून उदय खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिससाठी उदय आवरत असतानाच संतोष घरात शिरला. ‘‘आज इतक्या लवकर कसे आलात संतोष? दीपिकेशिवाय करमत नाही वाटतं? अजून किती दिवस ट्यूशन चालू राहील तुमची?’’

उदयचं बोलणं, एकूणच त्याचे हावभाल बघून दीपिका अन् संतोष दोघंही भांबावले. चकितही झाले.

जेवणाचा डबा घेऊन उदय निघून गेल्यावर चहाचा कप घेऊन तिनं संतोषला सोफ्यावर बसवलं. स्वत:ही चहाचा कप घेऊन त्याच्यासमोर बसली आणि अत्यंत स्थिर आवाजात बोलायला लागली,

‘‘संतोष, तू आयुष्यात आलास अन् मी आता विवाहित आहे उदयची पत्नी अन् त्याच्या कुटुंबातली सून आहे, हे मी अगदी विसरले…अल्लड किशोरीसारखी तुझ्या प्रेमात वेडी झाले. प्रियकराच्या बाहुच्या विळख्यात सुख शोधू लागले…जर तू या घरापासून दूर, त्या हॉटेलच्या खोलीत नेलं नसतं तर मी, माझ्या संसारात किती रमले आहे. उदयवर प्रेम करू लागले आहे. त्याच्या प्रेमाची किंमत मला कळली आहे, हे काहीच मला जाणवलं नसतं. तू इथं माझ्या घरात येतो, तेव्हा या माझ्या घराच्या चार भिंतीत मी सुरक्षित असते पण घराबहेर पाऊल टाकल्यानंतर मला कळलं की या घरामुळे मला पूर्णत्त्व आलंय. या घराची मालकीण, उदयची पत्नी म्हणून माझी ओळख आहे.

‘‘उदयनं तर माझ्यावर मनांपासून प्रेम केलं. मला हवं ते सर्व माझ्यासमोर ठेवलं. माझी काळजी घेतात ते, मला काय हक्क आहे त्यांचा अपमान करण्याचा? माझ्या अनैतिक वागण्यानं समाजात त्यांची मानहानी होईल, याचं भान मीच ठेवायला हवं. माझ्या या निर्लज्ज वागण्यानं त्यांचा प्रेमावरचा, निष्ठेवरचा विश्वासच उडेल. माझ्या आयुष्यात तुझ्या प्रेमाचा रंग भरण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर काजळी फासण्याचा मला खरंच हक्क नाहीए.

दीपिका विचार करत होती, विवाहित असून ती अशी चुकीच्या मार्गावर कशी भरकटली? मनाच्या सैरभैर अवस्थेत ती घरातल्या प्रत्येक खोलीतून फिरत होती. सर्व तऱ्हेनं विचार करून ती या निष्कर्षावर पोहोचली की खरं काय ते उदयला सांगून टाकायचं. मनावर हे पापाचं ओझं घेऊन सगळं आयुष्य काढणं अवघडच नाही तर अशक्य आहे.

सायंकाळी उदय घरी परतल्यावर दीपिकेनं त्याला चहा करून दिला आणि शांत आवाजात सगळी हकीगत त्याला सांगितली. ती खाली मान घालून बोलत होती. तो खाली मान घालून ऐकत होता. शेवटी ती म्हणाली, ‘‘उदय, मला क्षमा करा. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. माझं पुढलं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.’’

ऑफिसच्या कामासाठी उदय शेजारच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून सायंकाळी तो तिथल्या मार्केटमध्ये पाय मोकळे करायला म्हणून गेला. तिथल्या एका मिठाईच्या दुकानातली मैसूरपाकाची वडी दीपिकेला फार आवडायची. आलोच आहोत तर तो मैसूरपाक घेऊन जाऊ अशा विचारानं मार्केटमध्ये फिरत असताना त्याला दीपिकेनं विणलेला निळ्या स्वेटरसारखा स्वेटर कुणाच्या तरी अंगात दिसला. तोच रंग, तेच डिझाइन. उदयनं उत्सुतकेनं त्या माणसाच्या न कळत त्याचा माग घेतला. उदय चकित झाला. तो माणूस म्हणजे संतोष होता. अन् दीपिका त्याला लगटून होती. संताप, अपमान, तिरस्कार, सुडाची भावना अशा अनेक संमिश्र भावना त्याच्या मनांत दाटून आल्या. त्यानं दीपिकेच्या माहेरी फोन केला. दीपिकेबद्दल चकार शब्दही काढला नाही. जनरल बोलणं झालं पण त्यावरून एक गोष्ट नक्की झाली की दीपिका माहेरी गेली नाहीए, हे सिद्ध झालं. कसा बसा तो टॅक्सी करून आपल्या घरी परत आला. दीपिकानं असा विश्वासघात करावा? ज्या पत्नीची तो इतकी काळजी घेतो, तिच्यावर जिवापाड प्रेम करतो तिनंच असा दगा द्यावा? त्याला काहीच सुचेनासं झालं होते. तिला जबरदस्त शिक्षा द्यावी का? पण तिच्याकडून काही कळतंय का याचीही वाट बघायला हवी. संताप, विश्वासघाताच्या आगीत तो होरपळत होता. पण स्वत: दीपिकानंच आपली चूक कबूल केली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पश्चात्तापाच्या अश्रूंनी त्याच्या हृदयातील आग शांत झाली होती.

सगळी रात्र याच मानसिक द्वंद्वात संपली. दीपिकेला घराबाहेर काढायचं? की तिचा पश्चात्ताप अन् स्वत:च आपल्या गैरवर्तनाची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा बघून तिला क्षमा करायची? दीपिकेला शिक्षा देताना तो ही त्यात होरपळून निघणारंच ना? स्वत:चा संसार मोडून तो लोकांना कोणत्या तोंडानं सामोरा जाणार आहे? पण आता तो दीपिकेवर पूर्वीप्रमाणे विश्वास ठेवू शकेल का?

सकाळी लवकर उठून दीपिका घरकामाला लागली. चहा तयार करून ती चहाचा ट्रे घेऊन उदयजवळ आली. चहाचा कप त्याला देऊन तिनं म्हटलं, ‘‘तुम्ही काय निर्णय घेतलाय? तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे.’’

‘‘आपण आधी चहा घेऊयात.’’ तो शांतपणे म्हणाला. दोघांनी न बोलता चहा घेतला. मग उदयनं म्हटलं, ‘‘दीपिका, तू काही सांगण्याआधीच मला हे कळलं होतं. परवा मला माझ्या ऑफिसच्या कामानं करीमगंजला जावं लागलं. काम संपवून मी बाजारात भटकत असताना तुम्हा दोघांना लगटून चालताना मी बघितलं. तू विणलेला निळा स्वेटर संतोषच्या अंगात होता. मी तुझ्या माहेरी फोन केला तेव्हा त्यांनीच मला दीपिका कशी आहे, केव्हा माहेरी येणार असं विचारल्यावर तू माहेरी गेली नाहीएस हे तर मला कळलंच. तू काय म्हणते आहेस हेच मला ऐकायचं होतं. तू बोलली नसतीस तर मीच विषय काढणार होतो.’’ उदयच्या या बोलण्यामुळे पुन्हा दीपिकेच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले.

‘‘जर मी तुला क्षमा केली नाही तर या आगीत मीही आयुष्यभर जळेन. पण क्षमा करणंही इतकं सोपं नाहीए. मी तुझ्यावर पुन्हा तेवढाच विश्वास ठेवू शकेन की नाही, मलाच ठाऊक नाहीए…पण मला आपला संसार मोडायचा नाहीए. सारी रात्र मी विचार करतोय. तुझ्या डोळ्यातील पश्चात्तापाचे अश्रू आणि गेल्या दोन वर्षात आपण घालवलेले सुखाचे क्षण यांच्या तुलनेत तू केलेला विश्वासघात नक्कीच क्षमा करण्यासारखा आहे.’’

खरंय ना? पावसाळ्यात आपल्या अंगणात शेवाळं साठतं म्हणून आपण अंगण फोडून टाकतो का? आपण तिथलं पाणी काढून शेवाळं खरवडून स्वच्छ करतो. पुन्हा शेवाळं वाढू नये म्हणून सजग राहतो. आपल्या अंगणात दोष आहे म्हणून पावसाळी शेवाळं वाढतं असं नाही तर आपल्या अंगणात थोडी अधिक लक्ष देण्याची, निगा ठेवण्याची गरज आहे असाच त्याचा अर्थ असतो.

लग्नगाठ

कथा * श्री प्रकाश

झारखंडमधल्या ‘बोकारो’ शहरात राहणारा तपन काही कामानं कोलकत्त्याला गेला होता. तिथून परत येण्यासाठी त्यानं बसचं तिकिट काढलं. शेजारच्या सीटवर एक सुंदर तरूणी बसली होती. साधारण पंचविशीची असावी. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण होतं. दोघंही आपापल्या सीटवर मासिक वाचत बसली होती. बस कोलकत्त्याच्या बाहेर पडल्यावर बसमध्ये अल्पोपहार दिला गेला. दोघांनी आपापली मासिकं बंद करून बाजूला ठेवली अन् ते एकमेकांकडे बघून हसले.

‘‘हॅलो, मी तपन.’’ स्वत:ची ओळख करून देत तपननं म्हटलं.

तिनं हसून म्हटलं, ‘‘मी चित्रा.’’

खाताखाता दोघांनी जुजबी गप्पा मारल्या अन् पुन्हा ती दोघं आपापल्या मासिकात दंग झाली. दुर्गापूरला बसचा थांबा होता. दहा मिनिटं बस थांबणार होती. तपननं खाली उतरून दोन कप चहा आणला. एक कप चित्राला दिला. तिनं  ‘‘धन्यवाद’’ म्हणत चहा घ्यायला सुरूवात केली.

आसनसोल आता जवळ आलं होतं. तेवढ्यात बस थांबली. काही प्रवासी पेंगले होते, काही जागे होते. बस अचानक थांबल्यामुळे पेंगलेले लोकही जागे झाले.

‘‘काय झालं?’’ ‘‘बस का थांबली?’’ वगैरे प्रश्न आपसातच विचारले गेले. कारण कुणालाच ठाऊक नव्हतं. थोड्याच वेळात कंडक्टर माहिती काढून आला, वाटेत एक मोठा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक दोन्ही बाजूंनी बंद झालं होतं. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता मोकळा व्हायला बराच वेळ? लागणार होता. तोवर प्रवाशांनी गाडीतच विश्रांती घ्यावी असं त्यानं सांगितलं. काही प्रवाशी खाली उतरले, काही गाडीतच थांबले.

तपनही खाली उतरला. चित्रा मात्र गाडीत बसून होती. ती फार काळजीत वाटत होती. तपननं तिला बसमधून उतरायला लावलं. बाहेर हवा छान होती, पण चित्राच्या चेहऱ्यावर खूपच काळजी दाटून आली होती.. ती थोडी घाबरलेलीही वाटत होती.

तपननं तिला तिच्या काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, ‘‘बोकारोच्या बस स्टॅन्डवर माझे एक दूरचे नातेवाईक मला घ्यायला यायचेत. आता बस कधी तिथं पोहोचेल, सांगता येत नाही. ते रात्रभर काही माझी वाट बघत थांबून राहू शकत नाहीत. काय करू? शिवाय आज रात्री माझं बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे.’’

‘‘हे संकट अवचितच उद्भवलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आधी त्यांना फोन करून बसस्टॅन्डवर जाऊ नका एवढा निरोप द्या. नंतर पुढे काय करता येईल ते बघूयात. ट्रॅफिक मोकळं कधी होईल ते सांगता येत नाही.’’ तपननं सुचवलं.

चित्रानं फोन करून आपल्या नातलगाला तसं कळवलं. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ताण होता. तिचे डोळे भरून आले होते. म्हणजे तिचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नव्हता.

तपननं विचारलं, ‘‘तुम्ही फारच टेन्शनमध्ये आहात, मला सांगू शकाल का काय कारण आहे ते? आपण सगळेच बोकारोला जाणार आहोत…अन् सगळेच इथं अडकले आहोत…पण काही तरी प्रयत्न करता येईल?’’

काही क्षण ती गप्प होती. मग म्हणाली, ‘‘मला आज रात्री बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे. उद्या सकाळी एक फारच महत्त्वाचं काम आहे, वेळेवर पोहोचले नाही, तर फार म्हणजे फारच नुकसान होईल.’’

तपननं म्हटलं, ‘‘खरं तर मला काही म्हणायचा अधिकार नाहीए, तरीही जरा स्पष्ट सांगितलंत तर काही तरी सोल्युशन शोधता येईल.’’

काही क्षण विचार करून, स्वत:ला थोडं सावरत तिनं सांगितलं, ‘‘उद्या सकाळी मला कोर्टात हजर व्हायचं आहे. उद्या कोर्टाचा लास्ट वर्किंग डे आहे. त्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी कोर्ट दोन महिने बंद राहील.’’

‘‘आज रात्री पोहोचायचं झालं तर मी काही पर्याय बघू का?’’

‘‘काही होत असेल तर बघा ना? मी जन्मभर तुमची ऋणी राहीन.’’

तपननं बस कडक्टरला विचारलं की हा ट्रॅफिक जॅम होण्याचं कारण काय आहे?

तेव्हा त्यांनं सांगितलं पुढे पुलावर एक ट्रक बंद पडलाय. त्यामुळे एखादी स्कूटर सोडली तर कोणतंही चार चाकी वाहन निघूच शकत नाहीए. तपननं त्याला म्हटलं की लवकर बोकारोला पोहोचायचं म्हटलं तर काय पर्याय आहे?’’ कंडक्टरनं म्हटलं, ‘‘तुमच्यापाशी फारसं सामान नसेल तर थोडं पायी चालून पुल क्रॉस करा. पुढे जाऊन एखादी रिक्षा मिळेल, त्यानं टॅक्सी स्टॅन्डवर पोहोचा आणि तिथून टॅक्सी करून बोकारोला जाता येईल. मात्र, या बसच्या भाड्याचे पैसे परत मिळणार नाहीत.’’

‘‘राहू देत, भाडं परत मिळालं नाही तरी चालेल. चांगला सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!’’

तपन सरळ चित्राजवळ आला, ‘‘चला, पुढे जाण्याचा मार्ग सापडला आहे. तुमच्याजवळ अवजड सामान नाहीए ना?’’

‘‘नाही, ही एवढी हॅन्डबॅग फक्त आहे.’’

दोघं आपलं सामान घेऊन पायी चालू लागले. पूल ओलांडल्यावर थोड्या वेळातच रिक्षास्टॅन्ड लागला. रिक्षा करून ते टॅक्सीस्टॅन्डकडे निघाले. रस्ता फारच वाईट हाता. खूपच हादरे, हिसके बसत होते. त्यामुळे दोघांना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श होत होता. चित्रा खूपच आवरून, सावरून बसली होती. तपनला मीराची आठवण आली. पाच वर्षांपूर्वी तो त्याच्या पत्नीबरोबर रिक्शातून जाताना असाच तिचा स्पर्श झाला की तो रोमांचित व्हायचा. पण आता मीरा त्याच्या आयुष्यात नव्हती.

टॅक्सीस्टॅन्डवर लगेच बोकारोची टॅक्सी मिळाली. बोकारोला पोहोचायला रात्रीचे दोन वाजले होते.

‘‘तुम्हाला कोणत्या सेक्टरला जायचं आहे?’’ तपननं चित्राला विचारलं.

‘‘मला जायचंय सेक्टर वनला. तिथून कोर्ट जवळ आहे. पण मला त्या नातलगांचा फ्लॅटनंबर लक्षात नाही. माझ्याकडे लिहिलेलाही नाहीए. माझे वडिल एका महत्त्वाच्या टेंडरच्या कामासाठी नेपाळला गेलेत. आईलाही त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्याबरोबर राहावं लागतं. मी एकुलती एक मुलगी आहे. कामच असं आहे की मला एकटीला यावंच लागलं.’’

‘‘आता असं अपरात्री त्यांना शोधणं अशक्य आहे. काही तासांचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या घरी चला.’’

‘‘नाही…नको, मी इथंच थांबते, सकाळी त्यांना फोन करते अन् बोलावून घेते.’’

‘‘भलतंच काय? रात्री थांबायला टॅक्सी स्ट्रन्ड ही सुरक्षित जागा नाहीए.’’ तपननं म्हटलं. त्याने फोन लावला. ‘‘हॅलो आई, अजून जागी आहेस? मी घरी येतोय, पंधरा मिनिटात पोहोचतो.’’ त्यानं फोन बंद केला अन् म्हणाला, ‘‘माझी म्हातारी आई अजून जागी आहे. तुम्ही न घाबरता माझ्या घरी चला. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही.’’

चित्रानं संमतीदर्शक मान डोलावली. ती दोघं पोहोचली. तपननं लॅचकीनं दार उघडलं. आईला कमी दिसायचं, कुणा स्त्रीबरोबर तपन आलाय बघितल्याबरोबर तिनं म्हटलं, ‘‘मीराला घेऊन आला आहेस का?’’

‘‘आई, आता मीरा कधीच येणार नाही. मी आलोय. ही चित्रा?’’ त्यानं थोडक्यात सर्व हकीगत सांगून आईला झोपायला पाठवलं.

मग त्यानं चित्राला गेस्ट रूम दाखवली. ‘‘इथं तुम्ही शातंपणे विश्रांती घ्या.’’ तो म्हणाला.

चित्रानं म्हटलं, ‘‘रागावणार नसाल तर एक विचारू?’’

‘‘हं.’’

‘‘मीरा तुमची बायको आहे का?’’

‘‘आहे नाही, होती, आता आमचा डिव्होर्स झालाय.’’ ‘‘सॉरी! पण योगायोग बघा. उद्या कोर्टात माझ्या डिव्होर्सचीच केस आहे. निर्णय झाला आहे. मी अन् चेतन परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेतोय.’’

काहीवेळ कुणीच बोललं नाही.

मग तपन म्हणाला, ‘‘खरं तर तम्ही शिक्षित आहात, देखण्या आहात, शांत आणि समंजसही आहात, तुमच्या पतीला तुमचा अभिमान वाटायला हवा.’’

‘‘तसं त्याला वाटत नव्हतं. माझं सासर इथंच आहे, पण आता मी घटस्फोट घेतलाय तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. नवरा कोलकत्त्यालाच एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. माझं माहेर पाटण्याला आहे. मी सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. मी अन् माझ्या कॉलेजमधल्या तीन मित्रांनी मिळून एक कंपनी उघडली आहे. स्टार्टअप आहे. सुरूवातीलाच माझ्या नवऱ्याच्या कंपनीच्या गॅरेजमध्ये आम्ही काम सुरू केलं होतं. वर्षभर बरं चाललं होतं. आम्ही एका अमेरिकन कंपनीसाठी प्रॉडक्ट तयार करतो आहोत. रात्री उशीरापर्यंत आम्हाला काम करावं लागायचं. अधूनमधून मी चहा कॉफी करून आणायची. कधी आम्ही चौघं असायचो. कधी तरी मी अन् त्या तिघांपैकी कुणी एक असे दोघंच काम करायचो. कामाचा ताण फार होता. ताण थोडा कमी व्हावा म्हणून मग विनोद सांगणं, थोडं हसणं, गप्पा असंही करत असू. नेमकं हेच चेतनला माझ्या नवऱ्याला खटकत होतं. त्यावरून तो माझ्याशी भांडण करायचा. याचवेळी अमेरिकन कंपनीनं आम्हाला काही फंडही दिला. त्यातून आम्ही शेजारच्याच एका घरात कंपनीचं ऑफिस शिफ्ट केलं. ती जागा भाड्याचीच होती, पण सोयीची होती. काम वेळेत पूर्ण करण्याचंही टेन्शन होतं. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागून काम करावं लागायचं. आम्हा चौघांना आमच्या मेहनतीचे पैसेही भरपूर मिळत होते.

पण चेतनला यातलं काहीच कळत नव्हतं. तो समजून घ्यायला तयारच नव्हता. एक दिवस तर त्यानं चक्क व्यभिचाराचा आरोप केला. ‘‘तुला कंपनी बंद करावी लागेल किंवा मला घटस्फोट द्यावा लागेल.’’ त्यानं स्पष्टच म्हटलं. मी त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. ‘‘आम्ही सर्व पार्टनर्स चारित्र्यवान आहोत. आमच्यावर अशी चिखलफेक करू नकोस.’’ हे समजावलं पण त्याचं एकच म्हणणं, ‘‘कामच्या नावाखाली तुम्ही चैन चंगळ करता, ऐयाशी करता वगैरे वगैरे.’’ शेवटी आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला.

एव्हाना पहाटेचे पाच वाजले होते. तपननं चहा करून आणला. ‘‘चहाबरोबर काही खायला लागेल का? ब्रेकफास्ट तयार व्हायला अजून वेळ आहे.’’

‘‘नको, नुसता चहाच हवाय,’’ चित्रानं म्हटलं. दोघांनी चहा घेतला. सकाळी सहा वाजता चित्रानं नातलगांना फोन केला. ते म्हणाले, त्यांची मॉर्निंग ड्यूटी असल्यानं ते फॅक्टरीत पोहोचले आहेत. दुपारी तीन वाजता भेटू शकतात. चित्रानं त्यांना सांगितलं की आताच बोकारोला पोहोचली आहे. आता ती कोर्टातलं काम पूर्ण करून परस्पर कोलकत्त्याला निघून जाईल.

मग तिनं तपनला विचारलं, ‘‘मीरा अन् तुम्ही वेगळे का झालात?’’

‘‘मी इथं प्लांट इंजिनियर आहे. परचेस डिपार्टमेंटला काम असल्यानं खरेदीसाठी, मशीनचे सुटे पार्ट्स वगैरे घ्यायला मला कोलकत्त्यालाच जावं लागतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मीराचे वडील श्रीमंत बिझनेसमन आहेत. मीराही याच प्लांटमध्ये अकाउंट ऑफिसला नोकरी करायची. आमची ओळख झाली. मग प्रेम जमलं. लग्नंही झालं. सहा महिने खूप आनंदात गेले. मग तिनं हट्ट धरला वेगळं घर करण्याचा. ती म्हणाली आईला आपण एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवूयात. मी मात्र यासाठी तयार नव्हतो. त्यावरून रोज आमची भांडणं होऊ लागली. तिनं शेवटी अल्टिमेटमच दिलं की आई किंवा बायको, कुणा एकाची निवड कर. मी आईला एकटं कसं सोडणार होतो? ती म्हणाली मग मला मोकळी कर. मी खूप प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती. शेवटी घटस्फोट झालाच.’’ तपननं सांगितलं.

‘‘हल्ली आपल्याकडेही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे. ही गोष्ट चांगली नाहीए. खरं तर मुली शिकतात. हुशारी, कर्तबगारी दाखवतात. त्यांना सासरी, नवऱ्याकडूनही मान, सन्मान मिळायला हवा. त्यांनाही करिअर करायचा हक्क मिळायला हवा. मी बरोबर बोलते आहे ना?’’

‘‘होय ते बरोबर आहे, पण एकुलता एक मुलगा असेल तर त्यानं म्हाताऱ्या आईला वाऱ्यावर सोडून स्वत:चा संसार मांडणं योग्य ठरेल का?’’ तपननं म्हटलं. दोघांनीही एकदमच म्हटलं, ‘‘यावर मध्यम मार्ग शोधला पाहिजे.’’

कोर्टात चेतन चित्राच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली. कायदेशीररित्या आता दोघं स्वंतत्र होती. तपन म्हणाला, ‘‘हा असा निर्णय आहे, ज्यावर आनंद व्यक्त करावा की दु:ख व्यक्त करावं तेच समजत नाहीए.’’

तपननं त्या दिवशी रजा टाकली होती. तो चित्राला घेऊन घरी आला. आईनं स्वयंपाक करून ठेवला होता. तिघं जेवायला बसली. आईनं म्हटलं, ‘‘तू तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेतला आहेस?’’

‘‘मी अजून काहीच निर्णय घेतला नाहीए. सध्या काही महिने मी कंपनीच्या कामात इतकी बुडालेली असेन की मला कुठलाही विचार करायला उसंत मिळणार नाहीए.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘काळजी करू नकोस. एक रस्ता बंद होतो, तेव्हा दुसरा रस्ता उघडतोच,’’ आई म्हणाली.

तपन चित्राला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेला. तिचं रिझर्वेशन होतंच, चित्रानं म्हटलं, ‘‘जेव्हा तुम्ही कोलकत्त्याला याल तेव्हा मला भेटा. सध्या सॉल्टलेकच्या फ्लॅमध्येच माझं घर आणि ऑफिस आहे,’’ तिनं तिचं कार्ड तपनला दिलं.

‘‘शुअर!’’ तपननं म्हटलं आणि स्वत:चं कार्ड तिला दिलं.

चित्रा कोलकत्त्याला गेल्यावर दोघांमध्ये टेलिफोनवर संभाषण व्हायचं. दोघं एकमेकांच्या कामाबद्दल, तब्येतीबद्दल बोलायचे, विचारपूस करायचे. आईबद्दल चित्रा आवर्जून विचारायची. कधीतरी तपनची आई तिला विचारायची, ‘‘पोरी, काही निर्णय घेतलाए का?’’ चित्रा म्हणायची, ‘‘अजून मला वेळच कुठं मिळतोय?’’

एकदा आईनं फोन केला अन् चित्राला म्हटलं, ‘‘माझा तपन कसा काय वाटतो तुला?’’

चित्रा गडबडली. या प्रश्नासाठी ती तयारच नव्हती. तरी ती म्हणाली, ‘‘तपन फारच सज्जन अन् परोपकारी वृत्तीचे आहेत.’’

‘‘तपनही तुझं खूप कौतुक करतो. म्हणतो फार हुषार अन् मेहनती मुलगी आहे. खूप प्रगती करेल.’’ आईनं सांगितलं.

‘‘हा तर त्यांचा मोठेपणा आहे.’’ चित्रा संकोचानं म्हणाली.

काही दिवसांनी तपनला कोलकत्त्याला जावं लागलं. तो काम संपवून चित्राला भेटायला गेला. चित्रानं स्वयंपाक केला. दोघं गप्पा मारत जेवली. निघताना चित्रानं त्याच्याशी शेकहॅन्ड केला व ‘‘पुन्हा या.’’ म्हटलं. आता चित्राचा प्रोजेक्ट पूर्ण होत आला होता. तिच्या टेस्ट, परीक्षणं सुरू होती. ते सर्व यशस्वी झाल्यावर ती अमेरिकन कंपनी विकत घेणार होती. त्याचवेळी तपनच्या आईची तब्येत खूप बिघडली. हे चित्राला समजलं तेव्हा ताबडतोब टॅक्सी करून ती तपनकडे गेली व त्याला अन् आईला कोलकत्त्याला घेऊन आली. कारण इथं चांगले डॉक्टर्स अन् चांगली इस्पितळं होती. आईला चांगल्या इस्पितळमिध्ये एडमिट केलं. तपनही रजा घेऊनच आला होता. त्या काळात तो दिवसा घरी व रात्री आईजवळ राहत होता. पंधरा दिवसांनी आईची तब्येत बरीच सुधारली. तिला डिसचार्ज मिळाला. या काळात तपन व चित्रा एकमेकांना समजू शकले.

चित्रानं आईला सरळ आपल्या घरीच आणलं. अजून त्यांना विश्रांतीची गरज होती. तपन आठ दिवसांनी त्याच्या कामावर जाऊन आला. आपलं काम सांभाळून चित्रा आईची सेवा करत होती. एक बाई घरकाम व स्वंयपाकाला होतीच. शिवाय ती आईजवळही थांबायची.

आई पूर्णपणे बरी झाली. निघताना चित्राला जवळ घेऊन म्हणाली, ‘‘पोरी, पोटची लेक काय करेल, इतकं तू माझं केलं आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत…मी जे काही विचारलंय त्यावरही विचार कर.’’

‘‘कशाबद्दल म्हणताय आई?’’

‘‘तपन आणि तुझ्याबद्दल…’’

‘‘तुमच्या आशिर्वादामुळे माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होतोय. दोन आठवड्यात सगळं काम पूर्ण होऊन आम्हाला त्याचा रिझल्टही कळेल…त्यानंतर मी तुमचं म्हणणंही ऐकेन.’’

चित्राच्या या उत्तरावर आई आणि तपन चित्राकडे बघू लागले. आज प्रथमच तिनं तिच्याकडून होकार दर्शवला होता.

चित्राच्या आईवडिलांनाही चित्राची काळजी वाटत असे. चित्रानं त्यांना तपनबद्दल सांगितलंच होतं. तपननं तिला त्या रात्री केलेली मदत ती विसरू शकत नव्हती. चित्राचे वडील एकदा बोकारोला जाऊन तपनची सर्व माहिती काढून आले होते. तपनबद्दल त्यांना फार चांगले रिपोर्ट मिळाले होते. चित्राशी तपननं लग्न केलं तर दोन एकटे जीव प्रेमानं संसार करतील असं त्यांनाही वाटत होतं.

त्यानंतर सुमारे तीन आठवड्यातच तपनला चित्राचा फोन आला. त्यांचं प्रॉडक्ट अमेरिकन कंपनीनं भरपूर किंमत देऊन विकत घेतलं होतं. कंपनीच्या चारही पार्टनर्सना दोन दोन कोटींचा फायदा झाला.

तपनच्या आईनं चित्राला फोनवर म्हटलं, ‘‘खूप खूप अभिनंदन पोरी. खूप कष्ट घेतलेस, त्याचं फळही मिळालं. तू कष्टाळू मुलगी आहेस असं तपन नेहमीच सांगतो. अशीच यशस्वी हो.’’

‘‘तुमचे आशिर्वाद आहेत, आई.’’

‘‘आता तरी तपनचा विचार करशील का?’’

‘‘तपन मला आवडतो. तो फार सज्जन व्यक्ती आहे. आणखी काय बोलू? आमच्या कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘मग अजून पुन्हा वाट बघावी लागेल?’’ आईनं विचारलं.

‘‘आता नाही वाट बघायची,’’ चित्रा म्हणाली.

तपननं फोन घेतला. तिचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, ‘‘एक सरप्राइज माझ्याकडूनही देतो. मला कंपनीनं दोन प्रमोशन्स एकदम दिली आहेत आणि कोलकत्त्याला बदलीही केली आहे. आठवड्याच्या आत मी तिथं जॉईन होतोय.’’

‘‘आईंना घेऊन लवकर ये. मी अन् माझे आईवडिल वाट बघतोय. आईंना सांग, नो मोअर वाट बघणं… आता त्या म्हणतील तसंच मी करणार.’’ चित्रानं सांगितलं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

क्रंदन

कथा * प्राची भारद्वाज

पीयूषनं दोन्ही बॅगा विमानांत चेक इन करून स्वत: आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना? नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वत:च सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो.

पीयूष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्हाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाच वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मतं जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली अन् छान संसार करण्याची वचनंही दिली घेतली.

पीयूषनं हनीमून ट्रीप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपला आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनांत कुठलाही संशय नव्हता. पीयूष स्वत:चं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं अन् खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करण्याचं आहे, दमलो, थकलो म्हणायचं नाही, चिडचिड करायची नाही.

कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं, अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं.

एक दिवस तिची मोलकरीण उशीरा आली.

‘‘कां गं उशीर केलास?’’ तिनं विचारलं.

आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, ‘‘काय करू ताई? काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला अन् तमाशा केला. स्वत: कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो.’’

‘‘पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबराब राबून पैसा मिळवायचा अन् वर मार ही खायचा…आता नवरा छळतोय, मोठा झाला की मुलगा तेच करणार.’’ कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटंत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं.

सायंकाळी पीयूष घरी आल्यावर तिनं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिनं त्याचा उजवा हात आपल्या पोटावर ठेवला.

‘‘खरंच कोकी?’’ आनंदून पीयूषनं विचारलं.

‘‘तू तर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरलेस गं! आपल्या दोघांच्या संसारात तिसरा जीव येतोय याचा मला कित्ती आनंद वाटतोय…तुला काय हवंय ते माग…मी देईन.’’ तो आनंदून म्हणाला.

‘‘मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलंय. आता मला काहीच नकोय.’’ कोकिळाही खूप आनंदात होती.

‘‘मला कुणी नातलग नाहीत. तुझी आता काळजी घ्यायला हवी. आपण तुझ्या आईची मदत घ्यायची का?’’ पीयूषनं विचारलं. ती दोघं कोकिळाच्या माहेरी आली. माहेर तिचं गावातच होतं.

आनंदाच्या बातमीनं कोकिळाच्या माहेरीही आईवडिल प्रसन्न झाले. आईनं तर तऱ्हेची पक्नान्नं तयार करून लेकीला जावयला जेवायला बसवलं. तेवढ्यात कोकिळाचे वडील दोन हातात दारूचे ग्लासेस घेऊन आले.

‘‘बाबा, हे काय करताय?’’ कोकिळेला राग आला. आश्चर्यही वाटलं, बाबांचं वागणं तिला आवडलं नाही.

पीयूषनं म्हटलं, ‘‘असू दे गं! त्यांनासुद्धा आजोबा होणार असल्याचा खूप आनंद द्ब्रालाय. तेच सेलिब्रेट करताहेत ते. तू शांत रहा. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.’’

पण त्यानंतर तर ही पद्धतच रूढ झाली, केव्हाही कोकिळाच्या माहेरी गेलं की सासरे जावई दारी प्यायचे. त्यामुळे कोकिळाला माहेरीही जावसं वाटेना. पण या अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला माहेरची मदतही गरजेची होती.

बघता बघता कोकिळाचे दिवस भरले आणि तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. दोन्ही बाळांचं दोघं मिळून करायची. सुरूवातीला अवघड होतं पण हळूहळू सगळं सवयीचं झालं. दिवसा माझी बाळं मोठी होत होती. बाळांच्या बाळलीला दोघांना तृप्त करत होत्या. कामावरून परतल्यावर दोन्ही बाळांना खेळवणं हा पीयूषच्या आयुष्यातील आनंदाचा भाग होता. कोकिळादेखील न दमता घरकाम व बाळांचं संगोपन उत्तम करत होती.

एका सायंकाळी पीयूष बाहेरून आला तेव्हा कोकिळाला दारूचा वास आला. ती दचकली. तिनं धसकून विचारलं, ‘‘तुम्ही पिऊन आला आहात?’’

‘‘अगं, तो मोहित आहे ना. त्याचं प्रमोशन झालंय. त्यानं पार्टी दिली. सगळेच मित्र पित होते. त्यांच्या अती आग्रहामुळे…’’ पीयूष पटकन् तिथून उठला अन् आपल्या खोलीत गेला.

अन् नंतर तर रोजच पीयूष पिऊन घरी येऊ लागला. रोज नवं कारण असायचं.

कोकिळा त्रस्त झाली. मनांत अनामिक भीतीनं घर केलं. ‘‘असं कसं चालेल पीयूष? तुम्ही रोज पिऊन घरी येता. रोज कुठलं तरी कारण असतंच तुमच्यापाशी. मित्रांचं ठीक आहे हो, पण तुम्ही व्यसनी झाला आहात. सवय लागलीय तुम्हाला…इतक्या कष्टानं उभारलेला धंदा, आपला संसार सगळ्यावर त्याचा परिणाम होतोय. दारू फार वाईट असते.’’ कोकिळेला रडू फुटलं.

‘‘नाव कोकिळा, पण बोलतेस कावळ्यासारखी कर्कश्श.’’ चिडून पीयूष बोलला.

कोकिळाही चिडली. ‘‘रोजच पिऊन आल्यावर तुमचं कौतुक करायचं का?’’

रात्री दोघंही बोलले नाहीत पण सकाळी लवकर उठून पीयूषनं चहा केला. कोकिळेला उठवलं. हात जोडून तिची क्षमा मागितली, ‘‘मला क्षमा कर कोकी, तुला आवडंत नाही ना, मी आजपासून दारू सोडली. नाही पिणार यापुढे.’’

आणि खरोखर तो प्रयत्न करू लागला. त्यानं पिणाऱ्या मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं. तो पार्ट्यांना जाईना. सायंकाळ तर घरातच बाळांसोबत घालवू लागला. कोकिळाला खूप आनंद झाला. आता सगळं नीट होणार हे समाधान तिला लाभलं.

एखादा आठवडाच जेमतेम झाला असेल, अमेरिकेहून पीयूषचे काका, कधी नव्हे ते आले. येताना महागाची दारूची बाटली आणली होती. कसाबसा पीयूषनं दारूवर ताबा मिळवला होता. घरात नेमकी दारूच समोर आली. त्यानं कांकाना टाळण्याचा खूप प्रयत्न केला.

‘‘काका, मी हल्ली दारू सोडली आहे. मला जरा त्रास व्हायला लागला होता,’’ पीयूषनं काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पणा काकाही आडमुठे अन् अमेरिकेत राहिल्यामुळे स्वत:ला जरा ‘मोठे’ समजणारे. त्यांनी उलट पीयूषलाच दटावलं. ‘‘कुठली तरी स्वस्त दारू पीत असशील म्हणून झाला त्रास. ही अमेरिकन महागडी दारू पिऊन बघ, मग सांग मला. आम्ही अमेरिकेत रोज दारू पितो अन् काहीही होत नाही.’’

आपला मोठेपणा मिरवण्याच्या नादात काकांना, दारू सोडणाऱ्याला माणसाला दारूचा आग्रह करू नये, एवढा पोचही नव्हता. दारू शेवटी दारूच असते. देशी काय अन् विलायती काय.

झालं! पीयूषला तेवढंच निमित्त पुरलं. काका होते तोवर रोजच दारू होती. कोकिळाचा जीव कासाविस व्हायचा. ती त्याला विनवायची, धमकी द्यायची, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट एक दिवस तो तिच्यावरच चिडला.

‘‘तुला म्हणायचंय काय? कधी नव्हे ते काका आलेत, त्यांना सांगू, तुम्ही एकटेच घ्या. मी तुम्हाला कंपनी देऊ शकत नाही? तू थोडं समजून घेता, मी फक्त कंपनी देतोय. ज्या दिवशी काका जातील मी दारूकडे बघणारही नाही. तू काळजी करू नकोस. मी वचन देतो…’’

काकांचा मुक्काम एकदाचा हलला पण पीयूषची सवय गेली नाही. तो रोज पिऊनच घरी यायचा. एकदा कोकिळानं रात्री दार उघडलं नाही, ‘‘तुम्ही आपलं वचन विसरताय पण मी नाही विसरत, यापुढे पिऊन आलात तर घराबाहेरच रहा. मी दार उघडणार नाही.’’

‘‘ऐक कोकिळा, आज घरात घे मला. यापुढे मी बाहेरून पिऊन येणार नाही. घरीच घेत जाईन…मग तर चालेल ना?’’

‘‘पियूष, मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करा.’’

‘‘बरं तर, मी बाहेरच्या गॅरेजमध्ये बसून पीत जाईन.’’

कोकिळा काय बोलणार? दारूड्याला स्थळ, काळ, नाती कशाचंही भान नसतं. त्याला फक्त दारू हवी असते. नाराजीनं का होईना पण कोकिळानं त्याला गॅरेजमध्ये बसून पिण्याची परवानगी दिल्यावर तो रोज सायंकाळी गॅरेजचा दरवाजा आतून बंद करून दारू प्यायचा व जेवायला, झोपायला घरात यायचा.

त्या रात्री तो दोनदा धडपडला, त्याला तोल सावरता येत नव्हता. ‘‘पीयूष, काल रात्री तुम्ही अख्खी बाटली संपवलीत? कसं सुटणार हे व्यसन? तुम्ही पक्के दारूडे झाला आहात.’’ चिडून कोकिळानं म्हटलं.

‘‘मला माफ कर कोकिळा, आता बघ, फक्त दोन पेग…यापुढे तूच बघ…फक्त दोन पेग,’’ तो गयावया करत होता.

सकाळी उठला की पीयूष क्षमा मागायचा. रात्र झाली की दारू त्याच्यावर अंमळ गाजवायची.

त्या रात्री पुन्हा एकदा प्रंचड पिऊन घरात आला तेव्हा कोकिळाचा पारा खूपच चढला होता. तिनं त्याला खोलीत येऊ दिलं नाही. ती चिडून म्हणाली, ‘‘माझ्या अन् माझ्या मोलकरणीच्या नवऱ्यात एवढाच फरक आहे की तो तिच्या पैशानं दारू पिऊन तिलाच झोडपतो अन् माझा नवरा स्वत:च्या पैशानं दारू पिऊन गुपचुप झोपून टाकतो. पण शरीराची नासाडी दोघांच्याही होतेच अन् आमच्या संसाराचाही सत्यानाश होतोच. पीयूष, यापुढे माझ्या खोलीत यायचं नाही.’’

यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पीयूष दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. हळूहळू दोघांमधली दरी वाढू लागली. कोकिळा पीयूषवर खूपच नाराज होती. आता तर तिनं त्याला काही म्हणणंही सोडून दिलं होतं.

हल्ली पीयूषची तब्येत सतत बिघडत होती. तो खूप अशक्त झाला होता. डॉक्टरकडे गेला तेव्हा फार उशीर झाला होता. त्याचं लिव्हर पार कामातून गेलं होतं. डॉक्टरांनी त्याला किती तरी टेस्ट करायला लावल्या. रात्रंदिवस डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कोकिळा थकून गेली होती. पीयूषला सांभाळताना तिचं मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. तिच्या मैत्रिणी तिला मदत करत होत्या.

सगळ्या तपासण्या अन् उपचाराचं बिल अठरा लाख रूपये झालं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका पैसा कसा उभा करणार? जमीन, सेव्हींग, सोनंनाणं सगळं विकावं लागणार.

शेयर्स व इन्शुरन्सची कागदपत्र घेऊन कोकिळा व पीयूष वकीलाकडून परतून येताना कोकिळाला रडून अनावर झालं. ‘‘पीयूष, हे काय होऊन बसलं आपल्या सुंदर संसाराचं? कुठं होतो आपण अन् आज कुठं आहोत..तुम्ही खूप आधीच सावध व्हायला हवं होतं.’’

कोकिळेची स्थिती बघून पीयूषचेही डोळे भरून आले. खरंच, किती सांगत होती कोकिळा. त्यानं तिचं ऐकायला हवं होतं. संसार, मुलं सर्वांकडे दुर्लक्ष झालं. आता काय होणार? डबडबलेल्या डोळ्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. गाडी ट्रकवर आदळली. पीयूष व कोकिळा जागच्या जागी ठार झाली.

त्यांची जुळी मुलं या जगात एकटी पडली. कोण त्यांना सांभाळणार? नावाडी जर नांव बुडवायला निघाला तर नावेत बसणाऱ्यांच्या जिवाची काळजी कोण घेणार?

आवाज उठवलाच पाहिजे…

कथा * अर्चना पाटील

‘‘उद्या लवकर ये.’’

‘‘का?’’ हयातने विचारले.

‘‘उद्यापासून रिहानसर येणार आहेत आणि आपले जुने सर रिटायर होत आहेत.’’

‘‘प्रयत्न करेन,’’ हयातने उत्तर दिले, परंतु तिला स्वत:ला माहीत नव्हते की ती वेळेवर येऊ शकेल की नाही.

दुसऱ्या दिवशी रिहानसर शार्प १० वाजता ऑफिसमध्ये पोहोचले. हयात आपल्या खुर्चीवर नव्हती. रिहानसर येताच सर्वांनी उभे राहून गुड मॉर्निंग केले.

रिहानसरांच्या नजरेतून ती खाली खुर्ची सुटली नाही.

‘‘इथे कोण बसते?’’

‘‘मिस हयात, तुमची असिस्टंट, सर,’’ क्षितिजने उत्तर दिले.

‘‘ओके, त्या आल्या की लगेच त्यांना आत पाठव.’’

रिहान लॅपटॉप उघडून बसला होता. कंपनीचे रेकॉर्ड्स तो चेक करत होता. बरोबर १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोकला.

‘‘मे आय कम इन सर…’’

‘‘येस प्लीज, आपण कोण?’’

‘‘अं…मी हयात आहे, आपली असिस्टंट.’’

‘‘मला आशा आहे की उद्या सकाळी मी जेव्हा येईन, तेव्हा आपली खुर्ची रिकामी नसेल. आपण जाऊ शकता.’’

हयात नजर झूकवून केबिनच्या बाहेर आली. रिहानसरांसमोर जास्त बोलणे योग्य नाही, ही गोष्ट हयातच्या लक्षात आली होती. थोड्याच वेळात रिहानने ऑफिस स्टाफची एक मिटिंग घेतली.

‘‘गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझी आपणाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की उद्यापासून कंपनीचे सर्व कर्मचारी वेळेवर येतील आणि वेळेवर जातील. ऑफिसमध्ये आपली पर्सनल लाइफ सोडून कंपनीच्या कामाला आधी प्रायोरिटी देतील. मला आशा आहे की आपल्यापैकी कोणीही मला तक्रारीची संधी देणार नाही. बस एवढेच, आता आपण सर्व जाऊ शकता.’’

‘‘किती खडूस आहे, एक-दोन लाइन जास्त बोलला असता, तर आकाश खाली आले असते की धरती फाटली असती,’’ हयात मनातल्या मनात रिहानला दोष देत होती.

नवीन बॉसचा मूड पाहून प्रत्येक जण कामाबाबत जागरूक झाला. दुसऱ्या दिवशी रिहान पुन्हा ऑफिसमध्ये शार्प १० वाजता दाखल झाला आणि आज पुन्हा हयातची चेअर खाली होती. रिहानने पुन्हा क्षितिजला मिस हयात आल्यावर केबिनमध्ये पाठविण्याची सूचना दिली. ठीक १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोठावला.

‘‘मे आय कम इन सर.’’

‘‘हो जरूर, मी तुमचीच वाट पाहात होतो. आता आपल्याला एका हॉटेलमध्ये मिटिंगसाठी जायचे आहे. तुम्ही तयार आहात का?’’

‘‘हो, कधी निघायचे आहे?’’

‘‘त्या मिटिंगमध्ये तुम्हाला काय करायचे आहे?’’

‘‘अं… तुम्ही मला काल सांगितले असते, तर मी तयारी करून आले असते.’’

‘‘मी आता तुम्हाला सांगणारच होतो, पण बहुतेक वेळेवर येण्याची आपल्याला सवय नाहीए. तुमची सॅलरी किती आहे?’’

हयात काही बोलत नव्हती. ती केवळ नजर झाकवून इकडे-तिकडे बघत होती. रिहान आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. रिहान हयातच्या अगदी जवळ उभा होता. हयात मनातल्या मनात प्रार्थना करत होती की तिची लवकरात लवकर रिहानच्या केबिनमधून सुटका व्हावी.

‘‘तुम्ही तुमची सॅलरी सांगण्याचे कष्ट घेणार आहात का?’’

‘‘अं… ३०,०००/-’’

‘‘जर तुमच्याकडे कंपनीसाठी वेळ नाहीए, तर तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुमच्यासाठी ही शेवटची ताकीद आहे. घ्या फाइल्स, आपल्याला आता निघायचे आहे.’’

हयात रिहानसोबत हॉटेलमध्ये पोहोचली. आज एका हैदराबादी कंपनीसोबत मिटिंग होणार होती. रिहान आणि हयात दोघेही वेळेवर पोहोचले. परंतु समोरच्या पार्टीने बुके पाठवून आज आपण येणार नसल्याचा मेसेज आपल्या कर्मचाऱ्यासोबत पाठवला. तो कर्मचारी जाताच रिहानने तो बुके  उचलला आणि रागाने हॉटेलच्या गार्डनमध्ये फेकून दिला. ‘‘आजचा दिवसच बेकार आहे,’’ असे म्हणत तो आपल्या गाडीत येऊन बसला. रिहानचा राग पाहून हयात थोडीशी त्रासली आणि घाबरून गाडीत बसली. ऑफिसमध्ये पोहोचताच रिहानने हैदराबादी कंपनीसोबत आधी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट्सचं डिटेल्स मागितले. या कंपनीसोबत तीन वर्षांपूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट झाले होते. परंतु तेव्हा हयात इथे काम करत नव्हती. या कंपनीच्या बाबतीत कोणतीही माहिती ती रिहानला सांगू शकत नव्हती.

‘‘मिस हयात, तुम्ही संध्याकाळी फाइल देणार आहात का मला?’’ रिहान केबिनबाहेर येऊन हयातवर ओरडत होता.

‘‘अं…सर, ती फाइल मिळत नाहीए.’’

‘‘मिळत नाही म्हणजे… तुम्ही कोणतेही काम नीट करू शकत नाही. जोपर्यंत फाइल मिळणार नाही, तुम्ही घरी जायचे नाही.’’

हे ऐकताच हयातचा चेहरा उतरला. तसेही सर्वांसमोर ओरडा मिळाल्याने हयातला खूप इन्सल्टिंग वाटत होते. संध्याकाळचे ६ वाजले होते. फाइल मिळाली नव्हती. सर्वजण घरी जायला निघाले होते. हयातच्या बसची वेळ झाली होती. हयात हिंमत करत रिहानच्या केबिनमध्ये गेली.

‘‘सर, फाइल मिळत नाहीए.’’

रिहान काहीही बोलत नव्हता. तो कॉम्प्युटरवर काम करत होता. रिहानच्या गप्प राहण्यामुळे हयात आणखी त्रस्त होत होती. रिहानचे वागणे पाहून ती केबिनच्या बाहेर आली आणि आपली पर्स उचलून घरी निघाली. दुसऱ्या दिवशी हयात रिहानच्या अगोदर ऑफिसमध्ये हजर होती. हयातला पाहताच रिहान म्हणाला, ‘‘मिस हयात, आज तुम्ही गोडावूनमध्ये जा. आपल्याला आज माल पाठवायचा आहे. आय होप हे तरी काम तुम्ही व्यवस्थित कराल.’’

हयात काही न बोलता मान खाली घालून निघून गेली. ३ वाजेपर्यंत कंटेनर आलेच नाहीत. ३ वाजल्यानंतर कंटेनरमध्ये कंपनीचा माल भरायला सुरुवात झाली. रात्री ८ वाजेपर्यंत काम चालू राहिले. हयातची बसही निघून गेली. रिहान आणि त्याचे वडील कंपनीतून बाहेर पडत होते की कंटेनर पाहून तेही गोदामाच्या दिशेने वळले. हयात एका टेबलाजवळ बसली होती आणि रजिस्टरमध्ये काहीतरी लिहीत होती. गोडावूनचा वॉचमन बाहेर उभा होता. गोडावूनमधील शांततेमुळे हयातला भीती वाटत होती, पण आज काम पूर्ण केल्याशिवाय ती घरीही जाऊ शकत नव्हती, हे हयातला चांगले माहीत होते. इतक्यात, रिहान मिझा साहेबांसोबत गोडावूनमध्ये आला. हयातला तिथे पाहून रिहानलाही काहीतरी चूक झाल्याची जाणीव झाली.

‘‘हयात, बेटा, अजून तू घरी गेली नाहीस?’’

‘‘नाही सर, बस आता निघतेच आहे.’’

‘‘असू दे, काही हरकत नाही. ये, आम्ही तुला सोडतो.’’

आपल्या वडिलांचे हयातशी एवढे प्रेमळपणाचे वागणे पाहून रिहानला आश्चर्य वाटत होते, पण तो काही बोलतही नव्हता. रिहानचे तोंड पाहून हयातने, ‘‘नाही सर, मी जाईन.’’ असे बोलून त्यांना टाळले. हयात बसस्टॉपवर उभी होती. मिझासरांनी पुन्हा हयातला गाडीत बसण्याची विनंती केली. यावेळी हयात नाही म्हणू शकली नाही.

‘‘तू कुठे उतरणार?’’

‘‘अं… मला सिटी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे.’’

‘‘सिटी हॉस्पिटलमध्ये का? सर्वकाही ठीक तर आहे ना?’’

‘‘खरे तर माझ्या बाबांना कॅन्सर आहे, त्यांना तिथे अॅडमिट केले आहे.’’

‘‘मग तर तुझ्या बाबांना आम्ही भेटलेच पाहिजे.’’

थोड्याच वेळात हयात आपले मिझासर आणि रिहानसोबत आपल्या वडिलांच्या खोलीत गेली.

‘‘ये, ये हयात बेटा. किती काम करतेस आणि आज यायला एवढा उशीर का केलास? तुझ्या त्या नवीन बॉसने आज पुन्हा तुला त्रास दिला का?’’

हयातच्या बाबांचे बोलणे ऐकून हयात आणि रिहान दोघांचेही चेहरे पांढरे पडले.

‘‘पुरे हा बाबा, किती बोलता तुम्ही. आज तुम्हाला भेटायला माझ्या कंपनीचे बॉस आले आहेत. हे आहेत रिहानसर आणि त्यांचे वडिल मिझार्सर.’’

‘‘तुम्हाला भेटून खूप बरे वाटले, सुलतान महाशय. आता कशी तब्येत आहे तुमची?’’

‘‘माझ्या हयातमुळे कसातरी जीव जगतोय. बस आता लवकरात लवकर एखाद्या चांगल्या घरात हिचे लग्न झाले की मी चिरनिद्रा घ्यायला मोकळा झालो.’’

‘‘सुलतान महाशय, काळजी करू नका, हयातला आपल्या घराची सून करून घेणे ही कुठल्याही खानदानासाठी अभिमानाची गोष्ट असेल. ठीक आहे, मग आम्ही निघतो.’’

या रात्रीनंतर रिहान हयातसोबत थोडेसे मैत्रीपूर्ण वागू लागला. हयातही आता रिहानबाबत विचार करत असे. रिहानला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नटूनथटून येऊ लागली होती.

‘‘काय झाले, आज खूप सुंदर दिसतेस?’’ रिहानचा छोटा भाऊ आमीर हयातच्या समोर येऊन बसला. हयातने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग आपल्या फायलीत डोके खुपसले. आमीर तिच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीवर बसून तिला निरखून पाहात होता. शेवटी कंटाळून हयातने फाइल बंद केली आणि टेबलावर आपले दोन्ही हात डोक्याला लावून डोळे बंद करून आमीरच्या उठण्याची वाट पाहू लागली. इतक्यात, रिहान आला. हयातला आमीरच्या समोर अशा प्रकारे पाहून तो त्रस्त तर झाला, पण त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले.

दुसऱ्या दिवशी रिहानने आपल्या केबिनमध्ये एक मिटिंग ठेवली होती. त्या मिटिंगमध्ये आमीरला रिहानच्या बाजूला बसायचे होते, पण तो जाणीवपूर्वक हयातच्या बाजूला येऊन बसला. हयातला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. परंतु हयात प्रत्येक वेळी त्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करत होती. एके दिवशी तर हद्दच झाली. आमीर ऑफिसमध्ये हयातच्या वाटेत उभा राहिला.

‘‘रिहान तुला महिन्याला तीस हजार देतो, मी एका रात्रीचे देईन. आता तरी तयार हो ना…’’

ही गोष्ट ऐकताच हयातने आमीरच्या एक जोरदार कानशिलात लगावली. ऑफिसमध्ये सर्वांच्या समोर हयात अशाप्रकारे रिअॅक्ट होईल, या गोष्टीची आमीरला मुळीच अपेक्षा नव्हती. हयातने कानशिलात तर लगावली, पण आता तिची नोकरी गेली, हेही तिला माहीत होते. सर्वकाही रिहानच्या समोर घडले होते. मात्र आमीर असे काय म्हणाला की हयातने त्याच्या कानशिलात लगावले, ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. हयात आणि आमीर दोघेही ऑफिसमधून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमीर येताच आधी रिहानच्या केबिनच्या दिशेने गेला.

‘‘दादा, मी या मुलीला एक दिवसही इथे सहन करून घेणार नाही. तू आत्ताच्या आत्ता तिला कामावरून काढून टाक.’’

‘‘मी काय करायला हवे, ते मला माहीत आहे. जर चूक तुझी असेल, तर तुलाही कंपनीतून फायर करेन, छोटे बंधुराज. ही गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘त्या मुलीसाठी तू मला काढून टाकणार?’’

‘‘का नाही…’’

‘‘ही तर हद्दच झाली. ठीक आहे, मग मीच जातो.’’

हयात रिहान तिला कधी आत बोलावतोय, याचीच वाट पाहात होती. शेवटी रिहानने तिला बोलावलेच. रिहान आपल्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी पाहात होता. हयातला त्याच्यासमोर उभे राहून दोन मिनिटे झाली. शेवटी हयातने बोलायला सुरुवात केली.

‘‘मला माहीत आहे, तुम्ही मला इथे फायर करण्यासाठी बोलावले आहे. तसेही तुम्ही माझ्यावर खूश नव्हता. तुमचे काम सोपे झाले. पण माझी काहीही चूक नाहीए, तरीही तुम्ही मला काढून टाकताय, ही गोष्ट माझ्या लक्षात राहील.’’

रिहान अचानक उभा राहून तिच्याजवळ आला, ‘‘आणखी काही…’’

‘‘अं… नाही…’’

‘‘तसे आमीरने काय केले होते?’’

‘‘म्हणत होते की एका रात्रीचे तीस हजार देतो.’’

आमीरचे हे विचार ऐकून रिहानला धक्का बसला.

‘‘मग मी जाऊ?’’

‘‘मुळीच नाही, तुम्ही जे काही केलंत, ते योग्यच केलंत. जेव्हाही एखादा मुलगा आपली मर्यादा विसरतो, मुलीचा नकार समजून घेत नाही, मग तो बॉस असो, पिता असो, बॉयफ्रेंड असो, त्याच्याशी असेच वागले पाहिजे. मुलींनी छेडछाडी विरूद्ध आवाज उठवलाच पाहिजे. मिस हयात तुम्हाला नोकरीवरून काढले जात नाहीए.’’

‘‘धन्यवाद.’’

आता हयातच्या जिवात जीव आला. रिहान तिच्याजवळ येत होता आणि हयात मागे-मागे जात होती. हयातला काही कळेना.

‘‘मिस हयात, तुम्ही खूप सुंदर आहात. जबाबदाऱ्याही चांगल्याप्रकारे पार पाडता आणि एक सशक्त महिला आहात. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे.’’

हयातने लाजून होकार दिला.

भोचक भवानी

कथा * नीता श्रीवास्तवश

शेजारच्या घरातली घंटी वाजली तशी शिखा पळतंच आपल्या दारापाशी पोहोचली अन् पडद्याआडून बाहेर डोकावून बघू लागली. आपलं काम करत बसलेल्या शिखाच्या नवऱ्याला, सुधीरला तिचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. यापूर्वीही अनेकदा यावरून त्याचे अन् शिखाचे खटके उडाले होते. शिखा मात्र आपली सवय सोडायला तयार नव्हती.

शेजारी पाजारी कोण कुणाकडे आलंय, कोण कुठं जातंय, काय विकत आणलंय, कुणाचं काय चाललंय या गोष्टींमध्ये शिखाला प्रचंड इंटरेस्ट होता. कुठं नवरा बायकोची भांडणं होतात, कुठं नवरा बायकोचं ‘गुलुगुलु’ चालतं हे सगळं जाणून घेणं ही जणू तिची जबाबदारी होती.

सुधीरला बायकोच्या या सवयीचा खूप राग येत असे. कधी प्रेमानं, कधी समजुतीनं तर कधी रागावून तो तिला या सवयीपासून परावृत्त करायला बघायचा, ‘‘शिखा, अगं का अशी सतत भोचकपणा करत असतेस. दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यापेक्षा आपल्या घरात जरा लक्ष घाल. घर तरी घरासारखं वाटेल.’’

सुधीरला वाचनाचा नाद होता. तो शिखासाठीही कितीतरी पुस्तकं, मासिकं, पाक्षिक वाचायला आणायचा. पण शिखा कधी एक पानही उघडून बघायची नाही. सगळा वेळ दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघण्यातच संपायचा.

पण आज मात्र तिच्या या सवयीमुळे तो इतका संतापला की उठून त्यानं पडदा एकदम जोरात ओढला. तो रॉडसकट जमीनीवर आदळला. ‘‘आता बघ, अजून सगळं स्पष्ट दिसेल.’’ रागावलेला सुधीर खेकसला.

दचकून शिखा दारापासून दूर झाली. बघणं तर दूर तिला अंदाजही लावता आला नाही की जयाकडे कोण आलं होतं अन् कशासाठी आलं होतं.

सुधीरच्या संतापामुळे ती थोडी घाबरली तरी ओशाळी होऊन हसू लागली. सुधीरचा मूडच गेला. त्यानं हातातलं काम आवरून ठेवलं अन् तो कपडे बदलू लागला.

आता मात्र शिखाला राहवेना. तिनं विचारलं, ‘‘आता या वेळी कुठं निघालात? संध्याकाळी मूव्ही बघायला जायचंय की नाही.’’

‘‘तू तयार रहा, मी वेळेवर घरी येतोय.’’ एवढं बोलून कुठं जातोए, का जातोए वगैरे काहीच न सांगता सुधीरनं गाडी स्टार्ट केली अन् तो निघून गेला.

संतापानं पेटलेला सुधीर काही वेळ तर रस्त्यावर निरूद्देश गाडी पळवंत होता. त्याला समजतंय की थोडा फार भोचकपणा सर्वच बायका करत असतात. अनेक पुरूषांनाही ही सवय असते. पण शिखाची सवय संताप आणणारीच आहे. त्यानं कित्येकदा तिला म्हटलं की इतकी सर्व बित्तबातमी असते तर पत्रकारीतेत जायचं. चांगल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सहज जॉब मिळेल. पण शिखा तशी बथ्थड अन् निर्लज्जही होती. तिच्यावर कशाचाच परिणाम होत नव्हता.

मागच्याच आठवड्यातली गोष्ट. तो ऑफिसातून बराच उशीरा घरी आला होता. तो घरात शिरताच शिखाची रेकॉर्ड सुरू झाली. दोन्ही मुलांना पुलाव खायला घालून तिनं झोपवलं होतं. शेखरसमोर पुलाव, दही, लोणचं ठेवून तिनं बोलायला सुरूवात केली. ‘‘तुम्हाला माहित आहे का? हल्ली ना, तो अमन रोज ऑफिसातून दोन तास आधीच घरी येतो. माझ्या बरंच आधीच ते लक्षात आलं होतं. इकडे आई प्रवचनात गेली अन् दोघी मुली कोचिंगक्लासला गेल्या की या नवरा बायकोला एकांत…घराचे दरवाजे खिडक्या पाचलाच बंद होतात…’’

‘‘अंग बाई, कुणाच्या खिडकीदरवाज्यात मला काहीही रस नाहीए. मला पापड हवाय. तळून दिलास तर बरं होईल.’’

सुधीरचा मूड बघून शिखानं गप्प बसणं पसंत केलं. एरवी तिची मेल सुसाट गेली असती.

जेवण झाल्यावर सुधीर टी.व्ही बघत बसला. शिखा स्वयंपाक घरातलं सर्व आवरून त्याच्या शेजारी येऊन बसली. तिच्या जवळ बसण्यानं सुधीर सुखावला. त्याचा छोटासा संसार…दोघी मुली, सुविद्य सुंदर पत्नी, त्याची चांगली नोकरी, स्वत:चं घर…सगळं कसं छान आहे. जर शिखानं रिकाम्या वेळात काही काम सुरू केलं तर एडिशन इनकम होईल अन् ही इकडे तिकडे डोकावून भोचकपणा करण्याची सवयही सुटेल. त्याच्या मनांत विचार येत होते.

‘‘सुधारेल काही दिवसांनी, थोडे दिवस अजून वाट बघूयात,’’ असा विचार करून तो तिला मिठीत घेणार तेवढ्यात शिखा चित्कारली, ‘‘अरेच्चा, तो अमनचा किस्सा तर अर्धवट राहिला…तर, मला आधीपासूनच कळलं होतं पण आज अगदी शिक्कामोर्तब झालं त्यावर. अमनची बायको आशा, तिनंच त्या नेहाला सांगितलं की मुली मोठ्या झाल्यामुळे आता घरात एकांत मिळत नाही, म्हणून आम्ही हा उपाय शोधलाय.’’ एवढं बोलून शिखानं सुधीरकडे असा विजयी कटाक्ष टाकला जणू एखादा किल्ला सर केलाय.

तिचं बोलणं ऐकून सुधीरनं स्वत:चं डोकं धरून बसला. लग्न करतेवेळी शिखा अशी असेल असं त्याला वाटलंच नव्हतं. त्याची तर आजही बायकोकडून एवढीच अपेक्षा होती की तिनं घर व्यवस्थित चालवावं, स्वच्छ, सुंदर ठेवावं. शेजारी अन् नाते वाईकांशी प्रेमाचे, सल्लोख्याचे संबंध ठेवावेत. पण हे अशक्य आहे.

अशक्य शब्दाशी सुधीर अडखळला. प्रयत्न केला तर कोणतीच गोष्ट अशक्य नसते, हे सुभाषित आठवलं. प्रयत्न केला पाहिजे असं त्यानं ठरवलं. घड्याळ बघितलं, शोची वेळ झाली होती. पण आज शिखाचा फारच राग आला होता.

घरी न जाता सुधीर एका महागड्या रेस्टारंटमध्ये जाऊन बसला. असा एकटा  तो कधीच जात नसे पण आजचा दिवसच वेगळा होता. रविवार असल्यानं बहुतेक पुरूष पत्नी मुलांसह आलेले होते. स्वत:चं एकटेपण त्याला सलू लागलं. बसायचं की निघायचं अशा विचारात असतानाच त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या टेबलाकडे गेलं. त्याचे शेजारी दस्तूर तिथं पत्नी व मुलांसह बसले होत. ते चौघं खाण्यापिण्यात अन् आपल्याच गप्पांमध्ये इतके रमलेले होते की कुणाकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. सुधीर त्या सुखी कुटुंबाकडे तृषार्त दृष्टीनं बघत होता.

दस्तूर आणि सुधीर एकाच कंपनीत होते. त्यातून शेजारी असल्यानं एकमेकांकडे थोडंफार जाणं येणं, बोलणं बसणंही होतं. पण शिखाला ते कुटुंब अजिबात आवडत नसे अर्चना दस्तूरबद्दल तर तिला खूपच राग होता. ‘‘ती शिष्ट आहे. सगळ्यांपासून दूर असते. अलिप्त राहते. फारच कमी बोलते. दिसायला सुंदर आहे याचा अर्थ तिला गर्व आहे,’’ एक ना दोन.

या उलट सुधीरला अर्चनाचं सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व आवडायचं. ती हुषार होती. पूर्वी सेंट्रल स्कूलला टीचर होती. आजही ती एक उत्तम आई अन् उत्तम गृहिणी म्हणून लौकिक मिळवून आहे. म्हणूनच शिखाला तिचा राग येतो. शिखाच्या थिल्लर वागणुकीमुळे सुधीर खूपच दु:खी झाला होता. तिथून तो उठला. रात्रीचे नऊ वाजले हेते पण घरी जावंसं वाटेना. पुन्हा निरूद्देश भटकत राहिला. रात्री अकरा वाजता घरी पोहोचला तेव्हा शिकानं दार उघडताच प्रश्नांचा भडिमार केला.

‘‘तुमचा दुसरा कुठला कार्यक्रम ठरला होता तर मला का सांगितलंत सिनेमाला जाऊ म्हणून? मी तयार होऊन वाट बघत होते. कुठं होता एवढा वेळ? कुणाबरोबर होता?’’

‘‘सांगू? अर्चनासोबत होतो बराच वेळ.’’ आज सुधीरनं मनाशी काही एक निर्णय घेतला होता.

शिखा अजूनही छान तयार होऊन सुंदर साडी नेसून बसली होती. तिच्याकडे बघून त्याला बरं वाटलं पण त्यानं स्वत:वर ताबा ठेवत सोफ्यावर बसून बूट, मोजे काढायला सुरूवात केली.

शिखा अवाक् होऊन त्याच्याकडे बघत होती.

‘‘शिखा, तूच अर्चनाबद्दल इतकं काही सांगितलं होतंस की तिला जरा जवळून निरखायची इच्छा मला स्वस्थ बसू देईना! आज संधी मिळाली मला. संपूर्ण कुटुंब रेस्टॉरंटमध्ये होतं. मी समोरच्याच टेबलवर होतो. पण  बाईला नवरा अन् मुलांसमोर दुसरं काही दिसतंच नव्हतं. सगळा वेळ ती त्या तिघांमध्ये गुंतलेली. अगदी आनंदात…मी एकटा बसलोय तर निदान माझी विचारपूस करावी, तर तेही नाही, माझ्याकडे लक्षही गेलं नाही तिचं. त्यामुळे मला मात्र तिचं छान निरीक्षण करता आलं. साडी फार सुरेख नेसते ती. कॅरी ही छान करते. इतका सुरेख अंबाडा घातला होता…’’

सुधीरचं बोलणं ऐकून शिखा रडकुंडीला आली. ती तिथून जाणार तेवढ्यात सुधीरनं म्हटलं, ‘‘आता एकेकदा आशा, शैला, नेहा सगळ्यांना असंच बघणार आहे.’’

हे मात्र आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. शिखाला एकदम रडू फुटलं. तिचा नवरा असा कुणा स्त्रीबद्दल बोलू शकतो हे तिच्या समजुती पलीकडचं होतं. दुसऱ्यांच्या घरात काय घडतंय हे बघण्यात शिखा इतकी गुंतली होती की नवऱ्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय हे ही तिला समजलं नव्हतं. ‘त’ वरून ताकभात ओळखणारी शिखा स्फुंदून रडत होती.

‘‘आत्ता इतक्या मोठ्यांदा रडून काय तू सर्व आळी गोळा करणार आहेस का? अर्चनाकडून शीक काही तरी. तिला तर दस्तूरनं इतक्या थपडा मारल्या तरी तिनं ‘स्स्’ नाही केलं.’’ शिखाला समजवण्याऐवजी सुधीरनं तिनं सांगितलेली बातमी ऐकवली.

काही दिवसांपूर्वी सकाळी तो अजून अंथरूणातच होता, तेव्हा गुडमॉर्निंग न्यूज सांगावी तशी शिखानं त्याला बातमी दिली होती. सुधीरला ठाऊक होतं की आजही दस्तूरला शेड नाइट इन्स्पेक्शनला जायचंय. कालही गेला होता. पण शिखा तर सर्वज्ञानी असल्याच्या थाटात बोलत सुटली होती. ‘‘तुम्ही झोप काढा, काल काय घडलं ठाऊक तरी आहे का? दस्तूरसाहेब इन्स्पेक्शनहून रात्री दोन वाजता घरी परतले त्यांच्या गाडीच्या आवाजानं माझी झोप उघडलीच. बराच वेळ ते घंटी वाजवत होते. बाई दार उघडेना, मला तर वाटलं की आता सगळी आळी जागी होतेय की काय, पण ती अर्चना कसली घोडे विकून झोपली होती…बऱ्याच वेळानं दार उघडलं. मी खिडकीच्या फटीतून बघितलं दस्तूरसाहेब बहुधा चिडलेले होते. नंतर आपल्या बेडरूमच्या खिडकीतून ती त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची चाहूल घेत होते तर त्या दस्तूर साहेबांच्या बडबडण्याचा आवाज येत होता अन् फटाक फटाक थोबाडीत दिल्याचाही आवाज ऐकू आला…’’

‘‘भलतंच काय बोलतेस सकाळी सकाळी?’’

त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुन्हा म्हणाली, ‘‘मी स्वत:च्या कानांनी ऐकलंय फटक्यांचा आवाज. उघडं पडलं ना पितळ तुमच्या अर्चनाचं? मोठं कौतुक आहे तिच्या शालीनपणाचं, हुषारीचं, कर्तबगारीचं…’’

सुधीर खरोखर स्तब्ध झाला होता. एरवी तो अर्चनाचं बोलणं इतक्या गंभीरपणे घेत नाही पण इथं प्रश्न दस्तूर पतीपत्नीचा होता.

या कुटुंबाबद्दल त्याला आदर व कौतुक होतं. त्यांच्याकडे अशी मारामारी ही खेदाची अन् आश्चर्याचीच बाब होती. इतका सभ्य सुसंस्कृत पुरूष पत्नीवर हात उचलेल हे अशक्यच. त्यातून दस्तूर साहेबांना तर पत्नी व मुलांचं प्रचंड अप्रूप आहे.

त्या दिवशी अशाच विमनस्क अवस्थेत तो ऑफिसला पोहोचला. संधी मिळताच दस्तूरच्या टेबलापाशी गेला. एकदम कालच्या घटनेवर बोलणं शक्यच नव्हतं म्हणून प्रथम ऑफिस, हवामान वगैरे जुजबी विषयावर बोलणं झालं. मग हळूच विषय काढला. ‘‘काही म्हणा दस्तूर, उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीची ड्यूटी बरी पडते. ठंडा, ठंडा, कूल, कूल…’’

दस्तूर म्हणाला, ‘‘नाही रे बाबा, नाइट ड्यूटी म्हणजे आपल्या झोपेचं खोबरं, घरातल्यांच्या झोपेचं वाटोळं. काल रात्री घरी गेलो. वैताग झाला नुसता.’’

सुधीरनं ताबडतोब विचारलं, ‘‘का? वहिनींनी घरात घेतलं नाही का?’’

‘‘एकवेळ तेही पत्करलं, पण माझी बायको मी येईपर्यंत जागी होती. पुस्तक वाचत…नेमका मी आलो तेव्हा ती वॉशरूममध्येच होती. त्यामुळे बाथरूममधून बाहेर येऊन दार उघडायला वेळ लागला. माझा जीव घाबरा झाला होता. काय झालं? का दार उघडंत नाहीए? एवढ्यात तिला बी.पी.ची त्रास सुरू झालाय. तिला धडधाकट बघितली अन् जीव भांड्यात पडला.

आनंदात बेडरूममध्ये आलो तर लेकीनं मच्छरदाणी उघडी ठेवलेली. किती तरी डास शिरले होते. आमची मच्छर मारण्याची रॅकेट तो जोशी घेऊन गेलेला, अजून त्यानं ती परत केली नाही. दोन्ही हातांनी ते दहा वीस डास मारले, त्यानंतर कुठं झोपू शकलो. बायकोला तर एक डास सहन होत नाही…या सगळ्यापेक्षा उकाड्याची दिवसाची ड्यूटीच बरी हो…’’

दस्तूर मनापासून बोलत होते. ते खोटं बोलत नाही. पण शिखानं स्वत:च्या मनांत जे तर्कट रचलं होतं त्यामुळे तो मनातल्या मनांत शरमिंदा झाला. शिखाच्या हल्ली त्याला कंटाळा यायला लागला होता. त्यादिवशी तो घरी आल्यावर शिखाला काही बोलला नाही पण आज मात्र त्याला त्या फटक्याचं रहस्य सांगावंच लागलं.

ते ऐकून शिखा चकित नजरेनं सुधीरकडे बघत राहिली. ती काय उत्तर देणार होती अन् कोणत्या तोंडानं?

सुधीर एकच प्रश्न पुन्ह:पुन्हा विचारत होता, ‘‘अगं, ज्या माणसाला आपल्या बायकोला एक डास सहन होत नाही हे ठाऊक आहे, तिच्यासाठी जो जिवाचा आटापिटा करतो तो आपल्या बायकोला मारेल हे शक्य तरी आहे का? बोल ना, बोल शिखा,करेल का तो असं?’’

शिखा खाली मान घालून गप्प बसली होती. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. यावेळी शिखाला कुठंही हालचाल जाणवंत नव्हती. नवऱ्यानं दाखवलेल्या आरशात आपली ओंगळ छबी बघून तिला लाज वाटत होती. तिनं ठरवलं की आता आपण इतरांच्या घरात डोकावण्याचा भोचकपणा बंद करायचा. आपल्या संसारात, आपल्या घरात अधिक लक्ष द्यायचं.

काही दिवस बरे गेले. शिखानं स्वत:च्या सवयीवर बऱ्यापैकी ताबा मिळवला होता. पण जित्याची खोड ती…अशी सहजी बदलते थोडीच? काही दिवसांनी पुन्हा तेच सुरू झालं. नवरा अन् मुलं बाहेर जाताना त्यांना निरोप देण्याच्या निमित्तानं ती गेटापर्यंत जाऊन एक नजर कॉलनीच्या दोन्ही टोकांपर्यंत टाकायची.

या चाहूल घेण्याच्या, डोकावण्याच्या सवयीला अजून एक सोय उपलब्ध झाली होती दिवाळीच्या निमित्तानं. यावेळी सुधीरला दिवाळीत दुप्पट बोनस मिळाल्यामुळे त्यांनी अगदी धूमधडाक्यात खरेदी केली होती.

ड्रॉइंगरूमच्यासाठी सोफा कव्हर्स, कुशन्स, पडदे, शोभेच्या वस्तू अशी छान छान खरेदी झाली. त्या दुकानांत शिखाला जाळीचे पडदे दिसले. अत्यंत सुंदर असे ते पडदे तिनं तत्काळ खरेदी केले. दिवाळीत घर इतकं छान दिसत होतं की येणाऱ्या प्रत्येकानं शिखाचं कौतुक केलं. शिखा जणू ढगांत विहरंत होती.

आता एक फायदा असा झाला की शिखाला आता चाहुल घ्यायला, डोकावून बघायला दाराखिडक्यांच्या आड लपायची किंवा इकडून तिकडून कशाचा तरी आडोसा शोधायची गरजच नव्हती. खिडकी दरवाजांच्या जाळीदार पडद्यामागे ती उभी राहिली तर तिला सगळं दिसायचं पण ती कुणालाच दिसत नसे.

पण यात एक गैरसोय अशी होती की रात्री दिवे लागल्यावर बाहेरूनही घरातलं सगळं दिसे. म्हणून सायंकाळ होताच ती जाळीच्या आतून लावलेले दुसरे पडदेही ओढून घेत असे.

सायंकाळी तिला हल्ली इकडं तिकडं बघायला वेळ फारसा मिळत नसे. मुलांचे अभ्यास, सायंकाळचा संपूर्ण स्वयंपाक यामुळे सायंकाळ बिझी असायची. मात्र सकाळी अन् दुपारी कोण आलं, कुणाकडे आलं, किती जण होते, काय घेऊन आले होते वगैरे सर्व तपशील अप टू डेट असायचा…

त्या दिवशी दुपारी शिखा मेथीची जुडी निवडायला खिडकीशी बसली होती. नजर मेथीच्या जोडीनंच बाहेर रस्त्यावरही होतीच.

तेवढ्यात एका कर्कश्श हॉर्नच्या आवाजानं ती एकदम दचकली. शेजारच्या अनंत साहेबांकडे कुणीतरी आलं असावं. त्यांचं फाटक उघडण्याचा आवाज तिनं ऐकला अन् लगेच ती बघू लागली. दुपारच्या वेळी अशी खटारा मोटरसायकल घेऊन त्यांच्याकडे कोण आलं असावं?

तीन तरूण मोटर सायकलवरून आले होते अन् डोअर बेल न वाजवता त्यांनी बेडरमच्या उघड्या खिडकीतून आत उड्या घेतल्या.

ते बघून क्षणभर शिखा भीतीनं गारठली पण लगेच तिला अशा घटना आठवल्या. टी. व्ही, पेपर, व्हॉट्स एपवर आलेल्या बातम्या आठवल्या.

यावेळी रूची घरात एकटी असते. अनंतसाहेब ऑफिसात अन् मुलं होस्टेलला…

क्षण दोन क्षणांत तिनं तीनचार घरी मोबाइलवर मेसेज टाकले अन् ती आपलं दार बंद करून त्यांच्या घरी पोहोचली. त्यांची कडी बाहेरून लावून ती मोठमोठ्यांदा मदतीसाठी ओरडू लागली.

आतून रूचीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. शिखानं बाहेरून कॉलबेल वाजवण्याचा अन् हाकांचा सपाटा लावला. तेवढयात शेजारी पाजारी राहणारे अनेकजण तिथं पोहोचले होते. कुणीतरी पोलिसांना कळवलं होतं. पोलीस पोहोचण्यापूर्वीच खिडकीतून उड्या मारून पळण्याच्या प्रयत्नातल्या त्या तिघांना लोकांनी धरून त्यांचे हातपाय बांधून टाकले होते. त्यांची मोटरसायकल आडवी पाडली होती.

शिखानं बाहेरून दाराची कडी काढली अन् रूचीनं आतून दार उघडलं. ती तीन मुलं तिच्याकडून कपाटाच्या किल्ल्या मागत होती. त्यांच्या हातात चाकू होते अन् त्यांना घराबद्दल पूर्ण माहिती होती.

‘‘शिखा आज तू मला वाचवलंस, माझं घर वाचवलंस, तू आली नसतीस, इतकी माणसं गोळा केली नसतील तर त्यांनी मला मारून टाकलं असतं.’’ एवढं बोलून रूची रडायला लागली.

सगळे लोक शिखाच्या प्रसंगावधानाचं, तिच्या सतर्कतेचं कौतुक करत होते. कानोसा घेऊन, चाहुल घेऊन अंदाज बांधण्याच्या तिच्या सवयीपायी तिनं कित्येकदा नवऱ्याची बोलणी खाल्ली होती, त्याच सवयीनं आज रूचीचं घर अन् रूचीचा जीव वाचवला होता.

महिला इन्स्पेक्टरनंही शिखाला शाबासकी देत इतर सर्वांनाच सांगितलं की, ‘‘महिलांनी जागरूक राहायला हवं. आपलंच घर नाही तर इतरांच्या घराकडेही लक्ष ठेवायला हवं. थोडीही संशयास्पद व्यक्ती, संशास्पद हालचाली दिसल्या तर लगेच एकमेकांना मेसेज टाका, आरडाओरडा करा. एकमेकांना मदत करा.’’

सुधीरच्या ऑफिसातही ही बातमी पोहोचली. घरी येण्यापूर्वीच शिखाचं धैर्य व जागरूकतेची माहिती त्याला मिळाली.

सुधीर हसंतच घरात शिरला अन् त्यानं शिखाला मिठीत घेतलं. ‘‘शिखा तुझ्या भोचकपणामुळेच आज एक मोठी दुर्घटना टळली. आता मी तुला कधीही रागावणार नाही.’’ त्यानं म्हटलं.

शिखानं त्याला दूर ढकलंत रडवेल्या आवाजात म्हटलं, ‘‘आजही माझी चेष्टा करताय का?’’

‘‘नाही गं, मी मनांपासून म्हणतोय, मलाही तुझं खूप कौतुक वाटतंय.’’ तिला पुन्हा मिठीत घेत सुधीर म्हणाला. ‘‘पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘पण मला आता वेगळीच काळजी वाटतेय. आता तर तूं रोजच नवे नवे किस्से सांगशील अन् मला मुकाट्यांनं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल, कारण तुझ्या नावावर आता हा एक किस्सा कायमचा चिकटला आहे ना?’’

‘‘चला, काहीतरीच तुमचं!’’ म्हणंत शिखाही त्याला बिलगली.

पाठीराखे

कथा * सिद्धार्थ जयवंत

समीर ऑफिसच्या गोष्टी घरात कधीच बोलत नाही, त्यामुळेच त्याच्या ऑफिसात अधूनमधून होणाऱ्या पार्ट्यांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. ऑफिसमधल्या ‘ऑफिसेत्तर बातम्या’ मला तिथेच समजतात.

कुणीही नवरा आपलं ‘लफडं’ किंवा ‘प्रकरण’ घरी कधीच सांगत नाही, पण इतरांचं काही असलं तर मात्र आवर्जून घरी सांगतो. मग तीच ‘मसालेदार’ झणझणीत बातमी बायको पार्टीत इतरांबरोबर शेयर करते त्यावेळी सांगणारीच्या डोळ्यांतली चमक अन् ऐकणाऱ्यांची उत्सुकता अगदी बघण्यासारखी असते.

मागच्या आठवड्यात जी पार्टी झाली त्यात सर्व बायकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मी होते. मला सर्वांसमोर अपमानित करत सगळ्यात आधी नीलमने म्हटलं, ‘‘तुझ्या समीरचं, त्या अकाउंट सेक्शनच्या बडबड्या रितूबरोबर प्रकरण सुरू आहे, खरं का.’’

त्यानंतर इंदू, नेहा, कविता, शोभा सगळ्यांनीच या बातमीला दुजोरा देत त्यांना सिनेमाला जाताना, हॉटेलात कॉफी पिताना वगैरे बघितल्याचं सांगितलं. त्यामुळे शंकेला जागा नव्हतीच… मनातून मी हादरले. दु:खीही झाले, पण वरकरणी मात्र शांत व हसतमुखच होते. बातमीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्यात मी यशस्वी ठरले.

त्यांचे सल्ले अन् सहानुभूती मला नको होती म्हणून मी सरळ प्रसाधनगृहात शिरले. तिथल्या एकांतात  मला दोन गोष्टी सुचल्या. एक तर अशा वेळी नवऱ्याशी भांडण करून फायदा होत नसतो. भांडणाचा परिणाम उलटा होतो. दुसरं म्हणजे अशा वेळी रडूनभेकूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा काही तरी वेगळीच युक्ती करायला हवी.

यांचं प्रकरण नेमकं किती पाण्यात आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी प्रसाधनगृहातून बाहेर पडले अन् पार्टी हॉलमध्ये गेले.

हॉलच्या एका कोपऱ्यात ती दोघं मला हसतबोलत असलेली दिसली. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणलं अन् बेदरकारपणे चालत त्या दोघांपाशी पोहोचले.

मला अचानक आपल्याजवळ बघून दोघंही एकदम दचकलीच! त्यांच्या मनात चोर असणार हे सांगणारा तो पुरावाच होता.

‘‘रितू, किती सुंदर दिसते आहेस? तुझा ड्रेसही फार छान आहे हं! मी तिची स्तुती केल्याने ती जरा खूष झाली.

मग मी असंच थोडं इकडचंतिकडचं बोलत राहिले. एखादा विनोद ऐकवला. तीही त्यामुळे मोकळी झाली. मोकळेपणाने हसूबोलू लागली.

समीरला माझ्या वागण्यात कोणतीच आक्षेपार्ह गोष्ट न आढळल्यामुळे तो निर्धास्त झाला अन् तेथून निघून गेला. दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळला.

मनातला राग अन् तिरस्कार लपवत मी खूपच वेळ रितूबरोबर घालवला. त्यामुळे रितू व समीर यांना एकत्र येण्याची संधी मी मिळू दिली नाही.

मी रितूला खूपदा ‘एकदा घरी ये ना.’ असं म्हणत होते. शेवटी एकदाचं तिनेही मला ‘घरी या,’ असं आमंत्रण दिलं. मला तेच हवं होतं.

मनातून मी उदास होते. समीरच्या विश्वासघाताने मी दुखावली गेले होते. पण वरकरणी तसं काहीच भासवत नव्हते. मनातून मात्र दोघांना धडा कसा शिकवायचा याचा बेत ठरवत होते.

माझं औदासीन्य सासूबाईंच्या नजरेतून सुटलं नाही. त्या तोंडाच्या फटकळ, पण मनाच्या फारच प्रेमळ आहेत. त्यांनी खोदूनखोदून विचारल्यावर मी त्यांना सगळं काही सांगून टाकलं. त्यानंतर दोन दिवस आम्ही खूप काही विचारविनियम केला. एकूणच त्यांच्यापाशी बोलल्यामुळे माझं औदासीन्य दूर झालं अन् माझ्यात नवा उत्साह संचारला.

नंतरच्या आठवड्यात समीर तीन दिवसांच्या टूरवर गेला. मी नेमका शनिवार निवडला अन् सकाळी दहाच्या सुमाराला रितूच्या घरी पोहोचले.

रितूने हसून माझं स्वागत केलं, तरी पण तिच्या डोळ्यांत काळजी अन् आश्चर्याचे भाव होतेच.

‘‘अगं, समीर टूरवर गेलाय, मला वेळ होता, तुझी आठवण झाली. म्हटलं नव्या मैत्रीला खतपाणी घालायचं तर वरचेवर भेटायला हवं. म्हणून तुझ्याकडे आले,’’ मी अगदी आपलेपणाने बोलले.

‘‘तुमचं स्वागत आहे सीमाताई, राहुलला का नाही आणलंत?’’ तिने ड्रॉइंगरूमकडे जात विचारलं.

‘‘माझी नणंद आलीए माहेरी, राहुल तिच्या दोन मुलांबरोबर खेळतोय.’’

‘‘काय घ्याल? चहा की कॉफी?’’

‘‘चहा चालेल… रितू अगं, रिक्शातून उतरताना माझ्या कमरेत उसण भरलीए… मी जरा आडवी होऊ का?’’

‘‘हो, हो….’’ तिने पटकन मला उशी दिली अन् मी तिच्या बेडवर आरामात लोळले. ती चहा करायला गेली.

चहाबरोबर तिने बरंच काही फराळाचंही आणलं होतं. आम्ही मजेत चहाफराळ आटोपला. लवकरच आम्ही अनेक विषयांवर मोकळेपणाने बोलू लागलो.

बोलताबोलता मी तिच्या लग्नाचा विषय काढला. ती थोडी बावरली, घाबरली.

‘‘तू लव्ह मॅरेज करणार की, ठरवून लग्न करणार?’’

या प्रश्नावर ती जरा बावचळली. ‘‘बघूया कसं काय ते,’’ ती कशीबशी उत्तरली.

‘‘तुझ्यासारख्या देखण्या, स्मार्ट, मिळवत्या मुलीला तर किती तरी मित्र असतील. कुणाशी तरी नक्कीच प्रकरण चालू असणार… हो ना? सांग ना? तो भाग्यवंत कोण आहे?’’ मी तिचा पिच्छाच पुरवला.

आता ती कशी सांगणार की तिचं प्रकरण माझ्याच नवऱ्याबरोबर चाललंय म्हणून? मी अजून थोडा वेळ याच विषयावर छेडून तिला छळलं… मला त्यात खूपच मजा येत होती.

तेवढ्यात माझ्या मोबाइलवर दोन फोन आले. एक माझ्या सासूबाईंचा अन् दुसरा माझ्या भिशीतल्या मैत्रिणीचा. दोघींनाही मी आता रितूकडे आल्याचं अन् माझ्या कमरेत उसण भरल्याचं अगदी रंगवून सांगितलं.

मध्ये जेमतेम अर्धा तास गेला असेल तेवढ्यात माझ्या सासूबाई, नणंद स्नेहा, तिची दोन मुलं अन् रोहित असे सगळेच रितूच्या घरात दाखल झाले. मुलांनी सरळ टीव्हीकडे मोर्चा वळवला अन् ती कार्टून चॅनल लावून बसली. सासूबाई अन् स्नेहा सोफ्यावर बसून माझ्या कमरेतल्या उसणीबद्दल चौकशी करू लागल्या.

‘‘आई, तुम्ही माझी फारच काळजी करता,’’ मी भरल्या गळ्याने बोलले.

‘‘तू एक नंबरची बेपर्वा मुलगी आहेस. हजारदा सांगितलंय तुला की वजन कमी कर, पसारा आटोक्यात आण. एवढं वजन असल्यावर कमरेत उसण भरणारच. पण तुला ऐकायला नको…’’ सासूबाई कडाडल्या. मी ओशाळून रितूकडे बघितलं.

सासूबाईंचा कडकलक्ष्मी अवतार बघून रितू घाबरली होती. ती प्रथमच त्यांना बघत होती.

‘‘समीरदादा जेव्हा एखाद्या सुंदर फुलपाखराच्या मागे जातील तेव्हा वहिनीचे डोळे उघडतील,’’ स्नेहाने म्हटलं. त्यावर सासूबाई भडकून उठल्या.

‘‘तुझ्या दादाच्या तंगड्या तोडीन अन् त्या फुलपाखराचे पंख उपटीन. समजलीस?’’ त्यांचा आवाज तापलेला होता.

‘‘अगं, मी गंमत केली, चिडतेस काय?’’

‘‘मग असं मूर्खासारखं बोलतेस कशाला?’’

स्नेहाने तोंड वाकडं केलं अन् ती गप्प बसली. रितू उगीचच बोटं एकमेकांत गुंफत, पुन्हा मोकळी करत जमिनीकडे दृष्टी लावून उभी होती. सासूबाईंकडे बघण्याचं धाडस तिला होत नव्हतं.

सासूबाई मला अन् स्नेहाला सांगू लागल्या, ‘‘हल्लीच्या पोरींना समजूतही नाही अन् धीरही नाही. आपला संसार सांभाळण्याची अक्कलही नसते. उगाच याच्या त्याच्या नादी लागायचं… प्रेमविवाह तरी ठीक आहे, पण नुसतंच प्रेम करायचं याला काय अर्थ आहे? जी वाट आपल्या कामाची नाही, त्या वाटेवर चालायचंच कशाला? खरं ना, रितू?’’

‘‘अं?… हं… हो!’’ रितू दचकून हो म्हणाली.

‘‘तुझं लग्न झालंय?’’

‘‘नाही…’’

‘‘कधी करते आहेस लग्न?’’

‘‘लवकरच!’’

‘‘व्हेरी गुड! तुझे आईबाबा कुठेत?’’

‘‘माझे बाबा वारले… आई आहे, ती आज माझ्या मावशीला भेटायला गेली आहे.’’

‘‘कधी येईल?’’

‘‘संध्याकाळी.’’

‘‘मी येईन त्यांना भेटायला. सुने, अगं आज काय इथेच रहायचा बेत आहे का तुझं काय म्हणतंय दुखणं?’’

‘‘आई, दुखणं तर वाढलंय… फार त्रास होतोय…’’ मी कण्हत म्हणाले.

‘‘डॉक्टरांना बोलावूयात का?’’

‘‘नको, नको,’’ मी घाबरल्याचं भासवून म्हणाले, ‘‘रितू तुझ्याकडे आयडेक्स असेल का?’’

‘‘आणते. लगेच आणते,’’ म्हणत रितू पटकन आत गेली. तिच्याकडून मी आयोडेक्स लावून घेतलं.

रितूला माझ्या सासूबाई, तरुण पोरींनी कसं वागायला हवं यावर लेक्चर देत होत्या. स्नेहा मुद्दाम वाकड्यात शिरून त्यांना अधिक चिडवायला भाग पाडत होती. कुठल्याही क्षणी दोघी कडाडून भांडायला लागतील असं वातावरण होतं. त्या वातावरणात रितूचं टेन्शन वाढलं होतं.

तेवढ्यात डोअर बेल वाजली. स्नेहाने जाऊन दार उघडलं. ती परतली तेव्हा तिच्यासोबत माझ्या भिशी ग्रुपच्या तिघी मैत्रिणी अनीता, शालू व मेघा होत्या.

या तिघी खूपच बडबड्या आहेत. त्यांच्या येण्याने मायलेकींमधलं वाक्युद्ध थांबलं. पण खोलीतला कोलाहल मात्र एकदम वाढला.

‘‘आपल्या नव्या मैत्रिणीकडून सेवा करवून घेत आहेस ना, सीमा?’’ डोळे मोठे करत अनीताने म्हटलं अन् सगळेच हसले.

‘‘रितू, तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय सीमाकडून… सीमा सारखी तुझ्याबद्दल बोलतेय सद्या… बघ हं, तिच्या हृदयात विराजमान होऊन आम्हाला तिथून हाकलून लावू नकोस हं! तू प्लीज, आमच्याशीही मैत्री कर,’’ शालूने रीतूच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.

‘‘आमच्या नवीन मैत्रीचा पाया भक्कम करण्यासाठी आम्ही गरमागरम समोसे, जिलबी अन् ढोकळाही आणला आहे.’’ मेघाने अशा काही आविर्भावात म्हटलं की रितूलाही हसायला आलं.

आपापली ओळख करून देऊन तिघी बेधडक स्वयंपाकघरात शिरल्या. आयोडेक्स जागेवर ठेवून हात धुऊन रितू स्वयंपाकघरात जाईपर्यंत त्यांचा चहादेखील करून झाला होता.

एक गोष्ट मात्र खरी की, रितूच्या घरात प्रत्येक गोष्ट होती अन् ती जागच्या जागी होती.

मुलांसाठी स्नेहाने फ्रीजमधून ज्यूसचा कॅन काढला. आम्ही सगळे चहा, समोसे, जिलबी खात मजेत गप्पा मारत होतो. रितूच्या फ्लॅटमध्ये इतका दंगा कधीच झाला नसेल.

माझ्या मैत्रिणींनी रितूशी लगेच मैत्री केली. तीही अगदी मोकळेपणाने त्यांच्याशी बोलत होती. जणू खूप जुनी ओळख असाव.

‘‘सीमा, रितूशी मैत्री होण्याचा एक फायदा तुला नक्कीच होईल,’’ खट्याळपणे शालूने म्हटलं.

‘‘कसला फायदा?’’ मीही उत्सुकतेने विचारलं.

‘‘अगं, समीरच्याच ऑफिसमध्ये असल्याने रितू तुला तिथली बातमी बरोबर देईल. म्हणजे जर तुझ्या समीरचं तिथे कुणाशी लफडं झालं तर ही तुला लगेच सूचना देईल की!’’

‘‘अगंबाई खरंच? रितू, तू माझे डोळे बनून समीरवर लक्ष ठेवशील?’’ मी खूपच प्रेमाने रितूला गळ घातली.

रितूचे गाल एकदम गुलाबी झाले. तिने उत्तर दिलं नाही. फक्त मान डोलावली अन् मग ती टेबलावरचं आवरायला लागली.

खोलीतला पसारा आवरून होतोय तेवढ्यात माझे सासरे तिथे पोहोचले. ते येताच वातावरण बदललं.

माझे सासरे एकदम कडक आहेत. माझ्या मैत्रिणींनी पटापट पदर दोन्ही खांद्यावरून घेतला अन् वाकून त्यांना नमस्कार केला. सगळ्या अशा गप्प झाल्या जणू त्यांना बोलायला येतंच नाही.

‘‘सूनबाई, घरी चलण्याच्या स्थितीत आहेस की अॅम्ब्युलन्स मागवू?’’ त्यांनी गंभीरपणे विचारलं.

‘‘चलेन बाबा,’’ मी नम्रपणे उत्तरले.

‘‘तू धसमुसळेपणाने चढतेस, उतरतेस, जरा सावकाशीने कामं करावीत ना?’’

‘‘होय बाबा.’’

‘‘मी डॉक्टर मेहंदळ्यांना फोन केलाय. घरी जाताजाता त्यांना दाखवून, घरी जाऊ.’’

‘‘होय बाबा’’

‘‘इथे कशाला आली होतीस?’’

‘‘या रितूला भेटायला आले होते.’’

‘‘हिला कधी बघितली नाही… नवी ओळख आहे का?’’

‘‘हो बाबा, ही ना यांच्याच ऑफिसात काम करते.’’

‘‘रितू बाळा, तू एकटीच राहातेस इथे?’’

‘‘नाही काका, आई असते माझ्याबरोबर.’’ बाबांच्या आवाजानेच रितूला कापरं भरलं होतं.

‘‘असू दे, असू दे. बाबा नाहीत तरी आम्ही आहोत ना? तुला कधीही गरज वाटली तर आम्हाला सांग,’’ बाबा बोलले मग आमच्याकडे वळून म्हणाले, ‘‘आता निघा…’’

बाबा निघाले तसे आम्हीही उठलो.

निघतानिघता सासूबाई रितूला म्हणाल्या, ‘‘रितू बेटा, आता लवकर तुझ्या लग्नाचं आमंत्रण आमच्या हातात पडू दे. उशीर झाला तर चांगली मुलं मिळत नाहीत.’’

‘‘रितू, तुला आम्ही आमच्या भिशी ग्रुपची मेंबर करून घेऊ. मी तुला नंतर फोन करते.’’ अनीताच्या या प्रस्तावाला आम्ही सगळ्यांनी अनुमोदन दिलं.

तिन्ही मुलं, ‘‘थँक्यू आंटी,’’ म्हणत बाहेर निघून गेली. सर्वात शेवटी मी रितूचा आधार घेत दाराबाहेर आले.

‘‘रितू, या सगळ्यांचं इतक्या मोकळेपणाने लोळणं, वागणं तुला खटकलं तर नाही ना?’’ मी तिला जरा काळजीने विचारलं.

‘‘नाही ताई, ही सगळी तर खूपच भली माणसं आहेत.’’ ती म्हणाली. पण मनातून ती थोडी नर्व्हस झाली होती.

‘‘तुला सांगते, रितू, ही खरोखर फार भली माणसं आहेत. आणि मुख्य म्हणजे यांचा मला आधार आहे. यांच्यामुळे मला स्वत:ला खूपच सुरक्षित वाटतं. हे माझे पाठीराखे, सतत मला मदत करतात. माझ्या संसाराकडे कुणी वाकड्या नजरेने बघायचं धाडसही करू शकत नाही. यांच्याशी भांडण करणं, यांना चॅलेंज करणं महाकठीण आहे. आपली मैत्री झाली आहे. तू माझी मैत्रीण म्हटल्यावर ही सगळी माणसं तुझ्याही पाठीशी उभी राहातील. असे पाठीराखे भाग्याने मिळतात. स्वत:ला सुरक्षित वाटणं ही फार मोठी गोष्ट असते. रितू, एरवी लोक किती भीत भीत जगत असतात.’’

रितूने मान डोलवली. ‘‘सांभाळून जा,’’ तिने म्हटलं… आम्ही प्रेमाने एकमेकींचा निरोप घेतला.

दोन्हीतिन्ही गाड्यांमध्ये सर्वांनी बसून घेतलं होतं. माझे पाठीराखे माझी  वाटच बघत होते. रितूचा आधार सोडून मी व्यवस्थित चालत त्यांच्यात जाऊन मिसळले. माझ्या कमरेत उसण भरलीच नव्हती. सगळं काही ठरवलेल्या योजनेप्रमाणेच पार पडलं होतं.

मी दोन बोटांनी व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करताच सगळ्यांचे चेहरे आनंदाने उजळले.

मृगजळ

गृहशोभिका टीम

‘‘ओह! इट्स टू टायरिंग, सो लाँग ट्रिप…’’ घाम पुसत पुनीतनं आपली सूटकेस दारासमोर लावली. डोअरबेल वाजवली अन् दार उघडण्याची वाट बघू लागला. घरात सर्वत्र शांतता होती. कुठं गेली सगळी? त्यात पुन्हा एकदा घंटीचं बटन दाबलं. दाराला कान लावून तो आतली चाहूल घेऊ लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष दारावर लटकलेल्या कुलुपाकडे गेलं. खिशातून रूमाल काढून पुन्हा एकदा घाम पुसला. खांद्यावरची एयरबॅग सूटकेसवर ठेवली अन् त्यानं इकडेतिकडे बघितलं.

त्याचं घर दोन मजली होतं. त्यानं वरच्या मजल्याकडे नजर टाकली. त्या लेनमधील सगळी घरं एक सारखीच होती. घराचं छप्पर दोन्ही बाजूंनी उतरतं होतं. त्याच्या मधोमध पांढरी भिंत अन् भिंतीवर काळ्या अक्षरात पेंट केलेला घरनंबर वरच्या खिडक्याही बंद होत्या. पडदे ओढलेले होते. ‘कुठं बरं गेले असावेत हे लोक?’ मनाशीच पुटपुटत तो घराच्या मागच्या बाजूला गेला. तेच कुंपण, तेच लॉन अन् तिच झाडं…तीन वर्षांपूर्वी जसं होतं तसंच अजूनही आहे. गॅरेज उघडं होतं, गाडी नव्हती…म्हणजे गाडी घेऊन कुठं गेलेत का? कदाचित ते सकाळपासून वाट बघत असतील अन् आत्ताच त्यांना बाहेर जावं लागलं असेल…पण निदान जाताना दारावर एक चिठ्ठी अडकवायला काय हरकत होती? कधीपर्यंत परत येणार हे तरी समजलं असतं.

पुनीत तिथंच पायऱ्यांवर बसला. संध्याकाळचे सात वाजायला आले होते. अंधार दाटून आला होता. आता पुनीतला काळजी वाटायला लागली. हे लोक कुठं गेले असतील? आईला गाडी चालवता येत नाही अन् बाबांना संध्याकाळचं कमी दिसतं. ड्रायव्हर बोलावला असेल का? एव्हाना त्याच्या पोटात भुकेनं कावळे कोकलू लागले होते. त्यांनं सॅकमधून पाण्याची बाटली काढली अन् थोडं पाणी प्यायला. शेजारी पाजारीही तो कुणाला ओळखंत नव्हता. एक शिखा होती जिला विचारता आलं असतं, पण त्यानं तिला जी वागणूक दिली होती, त्यानंतर तर तिच्यासमोर जाणंही त्याला जमणार नव्हतं.

त्याची फ्लाइट बरीच लेट झाल्यामुळे त्याला घरी पोहोचायला एवढा उशीर झाला होता. पण आईबाबांनी वाट बघायला हवी होती. त्याला थोडा रागही आला. पण तो रागावूही शकत नाही. ज्या परिस्थितीत तो पुन्हा परत आला आहे त्या परिस्थितीत त्याला रागवायचा तर काय त्यांच्याकडे मान वर करून बघण्याचाही हक्क उरलेला नाही. त्यावेळी शिखा आणि आईबाबांना तो ज्या परिस्थितीत सोडून गेला होता, त्यानंतर कोण त्याची वाट बघणार होतं? वाट बघता बघता त्याला तीन वर्षांपूर्वीच्या त्या सगळ्या घटना आठवू लागल्या. आई त्यावेळी किती रडत होती. बाबा खाली मान घालून खुर्चीला खिळून बसले होते.

खरं तर ऑस्ट्रेलियाला जाणं पुनीतसाठी नवं नव्हतं. कारण पूर्वीही तो तिथं जाऊन आला होता. तिथं त्याला एका उत्तम कंपनीत भरगच्च पगाराची नोकरी होती. पण यावेळी त्यानं जे काही सांगितलं होतं, त्यासाठी मात्र कुणाचीच तयारी नव्हती. त्याला क्रिस्टिन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन मुलीशी लग्न करायचं होतं. त्याला लवकरात लवकर तिथलं नागरिकत्व मिळवायचं होतं. तिथंच सेटल व्हायचं होतं. त्याच्या आईबाबांनाही कळत नव्हतं की आपला आज्ञाकारी, लाजराबुजरा मुलगा एकदम इतकी मोठी उडी कशी काय घेतोय? आत्ता आत्तापर्यंत त्याला कपडे खरेदी करतानाही आईबाबा बरोबर लागायचे, तो ऑस्ट्रेलियाला गेल्यावर इतका बदलला? आईबाबा जुनाट विचारांचे नक्कीच नव्हते. पण काही गोष्टी त्यांना पचवणं जड जात होतं. मुख्य म्हणजे शिखाशी इथं लग्न ठरलेलं असताना तिथं दुसऱ्या परदेशी मुलीशी लग्न करायचं? त्यांना पटतंच नव्हतं. शेवटी त्यांनी स्वत:ला मुलाच्या मोहातून मुक्त करून घेतलं.

शिखा पुनीतची मैत्रीण होती. त्यांचं लग्न ठरलं होतं. दोन्ही कुटुंबातून त्याला सहर्ष संमती होती अन् आता पुनीत म्हणतोय तो क्रिस्टिनशी लग्न करून तिथली सिटीझनशिप घेणार. शिखानं काहीच म्हटलं नाही. ती गप्प, गंभीर होती. शेवटी आईवडिलांचा आशिर्वाद, निरोप काहीच न घेता पुनीत निघून गेला.

पुनीतनं ऑस्ट्रेलियात क्रिस्टिनशी लग्न केलं. तिथली सिटीझनशिपही मिळवली, पण वर्षभरातच त्याची अक्कल ठिकाणावर आली. तो ट्रिपिकल भारतीय कुटुंबातला मुलगा होता. घरात कुठलंही काम न करणारा अन् क्रिस्टिना तर लहानपणापासून स्वच्छंद वातावरणात वाढलेली. तिला मुळात घरकामाचा कंटाळा होता. नाईलाजानं जे करावं लागायचं, त्यातही तिला पुनीतनं मदत करावी असं वाटायचं. पुनीतला स्वयंपाक करताना आईच्या हातच्या गरमागरम मऊसूत पोळ्या आठवायच्या, मॉलमध्ये भाजी आणायला गेला की डोळ्यापुढे भाजीच्या पिशव्या घेऊन येणारे बाबा दिसायचे. क्रिस्टिनाचं कुणाबरोबरही मोकळं-ढाकळं वागणं, त्याला खूप खटकायचं. अशावेळी हमखास शिखाची आठवण यायची. शालीन, सोज्वळ शिखा…साधी राहणी, शांत प्रेमळ स्वभाव लवकरच क्रिस्टिनालाही पुनीतचा कंटाळा आला. दोघांमध्ये सतत भांडणं, सतत वाद अगदी नको नको झालं त्याला. शेवटी घटस्फोट घेणं नक्की झालं. पण त्यात सगळ्या सोपस्कारांत तीन वर्ष गेली.

परदेशी मुलीशी लग्न करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. मुळात त्यांच्या आणि आपल्या संस्कारात, संस्कृतीत खूप फरक आहे. नव्याची नवलाई संपता संपता सगळंच उघडं वागडं सत्य समोर येतं. ते पचवणं भारतीय घरातल्या मुलांना शक्यच नसतं. आईवडिल, होणारी वधू सर्वांना दुखवून तो इथं आला अन् मिळवलं काय? तर फक्त फ्रस्टे्रेशन. ज्या क्रिस्टिनसाठी त्यानं शिखाला दूर लोटलं होतं, तिच क्रिस्टिन आज त्याला डोळ्यांपुढे नको वाटत होती. तिचा उधळ्या स्वभाव म्हणजे तर डोकेदुखीच ठरला होता. स्वत:च्या कमाईचा पैसा उधळून वर पुनीतचाही पैसा तिला हवा असायचा. शिल्लक टाकायला एक डॉलरही उरत नव्हता. अशावेळी त्याला अल्पसंतुष्ट, समाधानी वृत्तीची शिखा आठवायची. खरोखर हातातलं रत्न सोडून त्यानं गारगोटी निवडली होती.

घटस्फोट झाला. तिथलं बिऱ्हाड मोडून, नोकरीचा राजीनामा देऊन पुनीत भारतात परतला. त्यानं आईला तसं कळवलंही होतं. पण मग ती आज घरी का नाहीए? काय करावं? कुणाला विचारावं. या विचारात असतानाच त्याला समोरून येणारे रमेशकाका दिसले. दोन घरं पलिकडेच त्यांचा बंगला होता. त्यांनी पुनीतला ओळखलं अन् विचारलं, ‘‘अरे पुनीत? कधी आलास?’’

काकांना नमस्कार करून पुनीतनं म्हटलं, ‘‘बराच वेळ झाला. आईबाबा कुठं आहेत?’’

‘‘अरे, बाबांना बरं नव्हतं वाटत. त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. श्वास घ्यायला त्रास होत होता.’’

‘‘बाबांना हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेलंत का?’’

‘‘नाही. शिखानंच नेलं.’’

‘‘शिखा?’’

पुनीत आश्चर्यानं त्यांच्याकडे बघत होता. ‘‘अरे, तुला ठाऊक नसेल शिखा आता इथंच राहते. सेंट्रल स्कूलमध्ये नोकरी आहे तिला.’’

पुनीत गप्प होता. रमेश काकाच पुढे म्हणाले, ‘‘दोन वर्षांपूर्वी तिचे आईवडिल एका अपघातात मृत्यूमुखी पडले, तेव्हापासून शिखा इथंच राहतेय. तुझ्या आईबाबांची सर्वतोपरी काळजी घेतेय…’’

पुनीतला स्वत:चीच लाज वाटली. त्याच्यामुळे आईबाबा, शिखा सर्वांनाच केवढा त्रास झालाय. तो स्वत:च्याच दु:खात मग्न होता…‘‘काका, बाबा कुठल्या इस्पितळात आहेत? मी जातो तिथे.’’ त्यानं म्हटलं.

काकांनी त्याला हॉस्पिटलचा पत्ता दिला. त्यानं आपलं सामान त्यांच्या घरी ठेवलं अन् तो लगेच हॉस्पिटलमध्ये निघाला.

तिथं पोहोचल्यावर त्याला आई व शिखा वेटिंगलाउंजमध्ये दिसल्या. त्यानं सरळ जाऊन आईला मिठी मारली अन् तो गदगदून रडू लागला. बाबा कसे आहेत हेदेखील त्याला विचारायचं सुचलं नाही.

आईनं त्याला थोपटून शांत केलं. मग त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिनं म्हटलं, ‘‘काळजीचं कारण नाहीए. बाबा आता बरे आहेत. शिखानं अगदी वेळेत निर्णय घेऊन त्यांना इथ आणलं, म्हणूनच त्यांचा जीव वाचला. तू गेल्यापासून शिखाच आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीतनं अत्यंत कृतज्ञतेनं तिच्याकडे बघितलं. ती संकोचून थोडी दूर जाऊन उभी होती. तिचा निरागस चेहरा बघून त्याला भरून आलं. स्वत:चा किती धिक्कार करू असं वाटलं त्याला.

‘‘शिखाचे आईबाबा एका अपघातात अचानक गेले,’’ आईपुढे सांगू लागली, ‘‘शिखा अगदीच एकटी पडली. मीच तिला आपल्या घरी घेऊन आले. आम्हीही खूप एकटे होतो. तू गेल्यावर…शिखानं स्वत:ला सावरलं अन् म्हणाली, ‘यापुढे आपणच तिघं एकमेकांचा आधार आहोत. कुणीही स्वत:ला एकटं, दुर्बळ, बिच्चारं समजायचं नाही,’ तेव्हापासून ती आमचा मुलगा बनून आम्हाला सांभाळते आहे.’’

पुनीत खाली मान घालून ऐकत होता. काही क्षण शांततेत गेले. मग आई म्हणाली, ‘‘तू ज्या मृगजळामागे धावत होतास, त्यात फक्त दमछाक झाली. आंधळेपणानं धावण्याच्या शर्यतीत हाती काहीच लागत नाही. हव्यास कधीच संपत नाही. पण आज तू, ते सर्व सोडून परत आला आहेस, मला खूप समाधान वाटलं. हे घर तुझंच आहे. आता शिखाशी लग्न करून सुखाचा संसार थाट. शिखाशी बोल…बाबांशी आता तुला भेटता बोलता येणार नाही. डॉक्टरांनी भेटायला नाही म्हटलं. त्यांना विश्रांतीची गरज आहे. उद्या निवांतपणे तू त्यांना भेट.’’

पुनीत हळूच उठला अन् शिखाजवळ गेला. ‘‘शिखा, मला क्षमा करू शकशील? आपण नवं आयुष्य सुरू करूयात,’’ त्यानं शिखाचे हात आपल्या हातात घेतले.

शिखानं फक्त मान डोलावली. त्यानं तिचे हात अधिकच घट्ट धरले. यापुढे तो कधीच तिला अंतर देणार नव्हता.

सरिता

कथा * देवेंद्र माने

ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी…अन् अगदी अकस्मात! तिने खरं तर मला बघितलंही असावं पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कुणी परका, अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो…पण माझा तिच्यावर कोणताच, कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला अडवणार होतो? विचारावं वाटलं होतं, कशी आहेस? काय करतेस हल्ली? पण…न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकून वाटला असेल…मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल…कशाला हा दिसला असंही वाटलं असेल…

ही तीच मुलगी होती. म्हणजे पूर्वीची मुलगी. आता एक विवाहित स्त्री, कुणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती. माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी.

आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षांला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सीनिअर्सने तिला एकटीला गाठलं अन् तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा  कमीज (टॉप) यापैकी एक काही तरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला, मग सीनियर्स संतापले, चेकाळले त्यांनी तिला थोबाडायला सुरूवात केली.

ती जोरजोरात रडायला लागली. एकेक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा अन् अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोहोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं.

तिचे वडील शहरातले फार मोठे व्यावसायिक होते. त्यांनी सरळ पोलिसात तक्रार केली. त्यांच्या पोलिसात, राजकारणी लोकात भरपूर ओळखी होत्या. त्यामुळे पोरं घाबरली, सरळ धावत इस्पितळात पोहोचली. वडिलांसमोर मुलीची क्षमा मागितली. चक्क पाय धरले. विषय तिथेच संपला.

तिच्या वडिलांनी माझे आभार मानले. गरिबाचे आभार मानताना त्याला पैसे दिले जातात. ‘प्रेमाने देतोय, नाही म्हणू नकोस’ असं म्हटलं जातं. मला तर पैशांची नितांत गरज होती. मी पैसे घेतले. एक कोट्यधीश व्यावसायिक, समाजात मानसन्मान, राजेशाही बंगला, दारात चमचमत्या चारपाच मोटारी, गेटपाशी वॉचमन. हे सगळं बघून खरं तर मी दबून गेलो. पार बुडालो.

कॉलेजच्या मुलांना ती कोण आहे हे आधी ठाऊक असतं तर हा प्रकार घडलाही नसता. त्यानंतर मात्र सगळेच तिच्याशी व्यवस्थित वागू लागले. पण ती मात्र कुणालाही भाव देत नव्हती फक्त माझ्याशीच बोलायची. सुरुवात तिनेच केली.

‘‘हॅलो, मी सरिता,’’ तिने हात पुढे केला.

‘‘मी देवदत्त,’’ मीही हात पुढे केला.

दोन हात एकमेकांत गुंफले. चार डोळे एकमेकांना भेटले. माझ्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले. हळूहळू आम्ही एकमेकांचे जिवलग झालो. एकमेकांना फोन करत होतो. मेसेजेसची देवाणघेवाण करत होतो. आम्ही प्रेमात सगळं जग विसरलो होतो.

कॉलेजची ट्रिप एका हिलस्टेशला जाणार होती. माझी गरिबी…मी पैसे भरू शकत नाही म्हणून मी ट्रिपला जायला नकार दिला. पण तिने माझे पैसे भरले अन् मला ट्रिपला जावंच लागलं.

तिथल्या रम्य वातावरणात आम्ही दोघंच तळ्याकाठी बसलो असताना तिने म्हटलं, ‘‘मी प्रेम करते तुझ्यावर, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’

‘‘प्रेम मीही करतोय तुझ्यावर…पण याचे परिणाम काय होतील याचा विचार केलाय?’’

‘‘परिणाम काय असणार? सगळ्यांचं जे होतं तेच?’’

‘‘मी फार गरीब आहे.’’

‘‘म्हणून काय झालं?’’

‘‘तुझ्या वडिलांना विचारून बघ…’’

‘‘कमाल करतोस, प्रेम मी केलंय, लग्न मला करायचंय, आयुष्य माझं आहे, मीच ते जगणार आहे तर यात माझ्या वडिलांचा संबंध कुठे येतो?’’

‘‘तेही वडिलांनाच विचार.’’

ती एकदम चिडली. मी तिला समजावलं, तिचा रुसवा काढला. किती प्रयत्न केले तेव्हा ती खळखळून हसली. स्वच्छ खळखळणाऱ्या गंगेप्रमाणे पवित्र भासली ती मला.

त्यानंतर आमचं प्रेम वाढतच गेलं. आमच्या भेटी वाढल्या. सगळ्या कॉलेजात आमच्या प्रेमाचीच चर्चा होती. कित्येक मुलं माझ्यावर जळायची.

‘‘मला तुझ्या घरी घेऊन चल,’’ एक दिवस सरिताने मला म्हटलं, ‘‘तुझ्या घरातल्यांशी माझी ओळख करून दे.’’

मी एकदम घाबरलोच! माझी गरिबी बघून तिला काय वाटेल? ती माझ्यापासून फारकत घेईल का? घरात विधवा आई अन् लग्नाच्या वयाची असूनही केवळ पैसे नाहीत म्हणून लग्न न झालेली बहीण आहे. दोन खोल्यांचं विटामातीचं घर. वैधव्य, गरिबी, हतबलता यामुळे कायम चिडचिड करणारी अन् करवादून बोलणारी आई. तिच्या कष्टामुळे शिकत असलेला मुलगा नोकरी करून पैसा मिळवेल याच एका आशेवर आहे ती अन् मी…? बहिणीच्या लग्नाआधी स्वत:चंच लग्न ठरवलं हे बघून तिला काय वाटेल?

सरिता हटूनच बसली. शेवटी मी तिला घरी आणली. ती आईला भेटली, बहिणीला भेटली. छान बोलली. आईने गोडाचा शिरा केला, बहिणीने चहा केला. निरोप घेऊन सरिता निघून गेली. आई मात्र त्यानंतर गप्प गप्प होती. ती बोलली जरी नाही तरी मला सर्व समजलं. मला लवकरात लवकर नोकरी केली पाहिजे. बहिणीचं लग्न करायचं आहे. माझ्या जबाबदाऱ्या आहेत या, त्यानंतर इतर गोष्टी. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. पण मला यश येत नव्हतं. सतत नकार मिळाल्याने माझं मन आता अभ्यासासाठी लागत नव्हतं. मला फार असहाय वाटत होतं. एकच उपाय होता, मी सरिताशी लग्न करून घरजावई व्हायचं अन् या गरिबीतून कायमचं मुक्त व्हायचं. पण स्वाभिमान आडवा येत होता.

सरिता कोट्यधीश बापाची एकुलती एक कन्या होती. प्रेमात आकंठ बुडाल्यामुळे ती महालातून झोपडीतही येऊन राहायला तयार होती. ती मला झोपडीतून राजमहालातही घेऊन जायला तयार होती. पण काय करू ते मलाच समजत नव्हतं. एका पवित्र खळाळत्या स्वच्छ नदीला मी माझ्या गरिबीच्या दलदलीत आणून सोडू? ती किती दिवस हे सहन करेल? प्रेमाची धुंदी उतरल्यावर ती माझ्याजवळ या गरिबीत राहू शकेल? पण तिला इतकं करायला लावण्याचा मला काय हक्क आहे? तिच्या घरी जाऊन घरजावई म्हणून राहू? पण स्वाभिमान तसं करू देत नव्हता. आईचा एकमेव आधार मी होतो. आईला काय वाटेल?

‘‘तुझी अडचण काय आहे?’’ सरिताने विचारलं.

‘‘मला दोन्ही चालणार आहे. एक तर तू तुझ्या गरिबीतून बाहेर पड, नाहीतर मला येऊ दे तुझ्या घरात. मला फक्त तू, तुझी सोबत हवीय. गरीब, श्रीमंत, महाल, झोपडी, कशानेच फरक पडणार नाही. तू तिथे मी. तुझ्याशिवाय मला महालात स्वास्थ्य नाही.’’

मी गप्प होतो.

‘‘तू बोलत का नाही?’’ वैतागून तिने विचारलं.

‘‘काय बोलू? मला थोडा वेळ दे…’’

वेळ तर झपाट्याने पुढे जात होता. कॉलेज संपलं. मी नोकरी शोधत होतो. मला कुठेही, कसलीही नोकरी मिळेना. सरिता भेटायची, फोनवर बोलायची. मी खरं तर पार मोडून पडलो होतो. अन् सरिताने लग्नाचा धोशा लावला होता. तिच्या प्रेमाचा हक्कच होता तो.

सरिताचंही ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिने तिच्या वडिलांशी माझ्या बाबतीत बोलून ठेवलं. मला म्हणाली, ‘‘बाबांनी घरी बोलावलंय. त्यांना काही बोलायचं आहे.’’

मी त्या अवाढव्य बंगल्यापुढे उभा होतो. आत दांडगी अल्सेशियन कुत्री भुंकत होती. मला बघून दरवानाने दार उघडलं.

बाहेरच्या हिरवळीवरच सरिताचे बाबा चहा घेत होते. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी बसण्याची खूण केली. तेवढ्यात नोकर माझ्यासाठी चहा घेऊन आला. मी भेदरून बसलो होतो. आपण किती खुजे आहोत या जाणीवेने मी खूपच नव्हर्स झालो होतो.

त्यांनी दमदार आवाजात विचारलं, ‘‘काय हवंय?’’

‘‘नाही…काहीच नाही,’’ मी कसाबसा बोललो.

‘‘सरिताशी लग्न करण्याची हिंमत आहे?’’

‘‘न…नाही.’’

‘‘घरजावई व्हायची तयारी आहे?’’

‘‘नाही….’’

‘‘मग पुढे काय ठरवलंय?’’

मी गप्प.

‘‘लग्न तू करू शकत नाहीस. तुला नोकरीही मिळत नाही. गरीब घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आयुष्य संपेल तुझं. माझ्या पोरीचं कसं व्हायचं? तू तिला नाही म्हण…उगाचच वेळ घालवून तिच्या आयुष्याचा खेळखंडोबा करू नकोस.’’

मी गप्पच होतो. काय बोलणार?

‘‘तू तर तुझा आत्मविश्वासही घालवून बसला आहेस. हे बघ देव, एक तडजोड सुचवतो. वाटल्यास त्याला सौदा म्हणूयात.’’

मी मान खाली घालून बसलो होतो. त्यांच्याकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं.

‘‘माझ्या मित्राच्या कंपनीत तुला सुपरवायझर म्हणून नोकरी देतो. बहिणीच्या लग्नासाठी बिनव्याजी कर्जही देतो. पगार भरपूर आहे. तझ्या आईला बरं वाटेल. तिचे पांग फेडल्यासारखं होईल. फक्त तुला सरितापासून दूर व्हावं लागेल.’’

मला नोकरी लागली. बहिणीच्या लग्नासाठी पैसेदेखील मिळाले. म्हातारी, कातावलेली, थकलेली आई जरा हसऱ्या चेहऱ्याने बोलू लागली.

सरिताला त्यानंतर मी भेटलो नाही. काही दिवस माझी बदली दुसऱ्या शहरात झाल्याने सरिताशी संपर्कच झाला नाही. वडिलांनी तिला सांगितलं की त्याने जबाबदारी अन् प्रेम यापैकी जबाबदारीला अधिक महत्त्व दिलं. त्याला घरजावई म्हणून राहायचं नव्हतं. तेव्हा तू त्याला विसर.

आज इतक्या वर्षांनंतर सरिता अशी जवळून निघून गेली, पुसटशी ओळखही तिने दाखवली नाही तेव्हा मी जबाबदाऱ्यांची काय किंमत दिलीय हे मला जाणवलं.

तिच्या मागेच माझा कॉलेजचा मित्र दिसला. रॅगिंग मास्टर समर खोत. ‘‘अरे देव, कसा आहेस?’’

‘‘मी बराय, तू सांग.’’

‘‘माझं छान चाललंय…मजेत आहे मी…’’

‘‘अरे मी कुणा कपाडिया, एस. नामक व्यक्तिला भेटायला आलोय.’’

तो मनमोकळे हसला. ‘‘अरे मीच कपाडिया एस. समर कपाडिया. मीच बोलावलंय तुला.’’

मी चकित! ‘‘कसं शक्य आहे? तू तर समर खोत आहेस. फिरकी घेतोस काय?’’

त्याने मला कॉफी घ्यायला चल म्हटलं. मी एजंट होतो. तो माझा क्लायंट होता. त्याच्याबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं.

समरने कॉफी मागवली. मग मी फॉर्म काढले. त्याला विचारून फॉर्म भरू लागलो. नॉमिनेशनमध्ये सरिता कपाडिया नाव आलं अन् माझा हात थबकला.

‘‘माझ्या हातावर थोपटत समरने म्हटलं, ‘‘तू नकार दिल्यामुळे सरिता पार बावरली होती. सैरभैर झाली होती. कापलेल्या पतंगासारखी अवस्था झाली होती तिची. मीही मध्यमवर्गीयच होतो. मला थाटामाटाचं, श्रीमंती आयुष्य जगायचं होतं. असं समज, तो कापलेला पतंग मी लुटला. मी तिच्या वडिलांना भेटलो. घरजावई व्हायला तयार झालो. सरिताला प्रेमाने बोलून, समजावून नव्याने आयुष्य जगायला उद्युक्त केलं. तिने सावरावं म्हणून अतोनात प्रयत्न केलेत. खरं तर मीही तिच्यावर प्रेम करत होतो. पण ती तुझ्या प्रेमात असल्याने मी गप्प होतो. माझं प्रेम, माझे कष्ट यामुळे ती सावरली. तिच्या वडिलांची अट मान्य करून मी आडनाव अन् जातही बदलली. तिला प्रेमाने जिंकलंच, तिच्या वडिलांची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकाप्रमाणे मानून त्यांनाही जिंकलं. आज माझ्याजवळ सरिता आहे. मानसन्मान, पैसाअडका सगळंच आहे. मीच कपाडिया शेठ.’’

तेवढ्यात सरिता तिथे आली. मला बघून म्हणाली, ‘‘हे इथे कसे?’’

‘‘बऱ्याच दिवसांपासून पॉलिसी घ्यायला फोन करत होता. मी ओळखलं त्याला, पण त्याने मला ओळखलं नाही.’’

सरिता म्हणाली, ‘‘कसे ओळखणार? तुम्ही तर आडनाव, जात सगळंच बदललं. प्रेमात जात, धर्म काहीच आडवं येत नाही…’’

समर हसला. त्याने सरिताने मारलेला टोमणा सहज पचवला.

‘‘देव, घरी सगळे कसे आहेत?’’

‘‘आई मागेच वारली.’’

‘‘तुझी बायको, मुलं?’’

‘‘लग्न नाही केलं मी. बहीण विधवा होऊन दोन मुलांसकट माहेरी परत आली. आता त्यांचंच सगळं करतो आहे. सुपरवायझरची नोकरी सोडून दिली; कारण ती उपकाराच्या ओझ्याखाली काम करण्याची जाणीव देत होती. आता विमा एजंट झालोय. दिवसरात्र तुझ्यासारखे कस्टमर क्लायंट शोधत असतो.’’

‘‘जी माणसं आयुष्यात योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत, मोठे निर्णय घेताना कचरतात त्यांचं आयुष्य असंच जायचं,’’ सरिताने म्हटलं. तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

जुनं प्रेम पुन्हा उफाळून येऊ नये म्हणून समरने घाई केली. ‘‘चल सरिता, आपल्याला निघायला हवं. देव, उद्या भेटतो तुला. हे काम तुझं झालं म्हणून समज.’’ अन् तो सरितासोबत निघून गेला.

घरजावई न होण्याचा स्वाभिमान दाखवून मी काय मिळवलं? जे मिळवलं त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक घालवलं. सरिता शेवटी सागराला मिळाली. वर वर ती सुखी दिसली तरी ती तृप्त नाही हे मला कळत होतं. केवळ माझ्यामुळे ती दु:खी आहे ही सल माझ्या मनात नेहमीच राहील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें