कथा * श्री प्रकाश
झारखंडमधल्या ‘बोकारो’ शहरात राहणारा तपन काही कामानं कोलकत्त्याला गेला होता. तिथून परत येण्यासाठी त्यानं बसचं तिकिट काढलं. शेजारच्या सीटवर एक सुंदर तरूणी बसली होती. साधारण पंचविशीची असावी. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण होतं. दोघंही आपापल्या सीटवर मासिक वाचत बसली होती. बस कोलकत्त्याच्या बाहेर पडल्यावर बसमध्ये अल्पोपहार दिला गेला. दोघांनी आपापली मासिकं बंद करून बाजूला ठेवली अन् ते एकमेकांकडे बघून हसले.
‘‘हॅलो, मी तपन.’’ स्वत:ची ओळख करून देत तपननं म्हटलं.
तिनं हसून म्हटलं, ‘‘मी चित्रा.’’
खाताखाता दोघांनी जुजबी गप्पा मारल्या अन् पुन्हा ती दोघं आपापल्या मासिकात दंग झाली. दुर्गापूरला बसचा थांबा होता. दहा मिनिटं बस थांबणार होती. तपननं खाली उतरून दोन कप चहा आणला. एक कप चित्राला दिला. तिनं ‘‘धन्यवाद’’ म्हणत चहा घ्यायला सुरूवात केली.
आसनसोल आता जवळ आलं होतं. तेवढ्यात बस थांबली. काही प्रवासी पेंगले होते, काही जागे होते. बस अचानक थांबल्यामुळे पेंगलेले लोकही जागे झाले.
‘‘काय झालं?’’ ‘‘बस का थांबली?’’ वगैरे प्रश्न आपसातच विचारले गेले. कारण कुणालाच ठाऊक नव्हतं. थोड्याच वेळात कंडक्टर माहिती काढून आला, वाटेत एक मोठा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक दोन्ही बाजूंनी बंद झालं होतं. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता मोकळा व्हायला बराच वेळ? लागणार होता. तोवर प्रवाशांनी गाडीतच विश्रांती घ्यावी असं त्यानं सांगितलं. काही प्रवाशी खाली उतरले, काही गाडीतच थांबले.
तपनही खाली उतरला. चित्रा मात्र गाडीत बसून होती. ती फार काळजीत वाटत होती. तपननं तिला बसमधून उतरायला लावलं. बाहेर हवा छान होती, पण चित्राच्या चेहऱ्यावर खूपच काळजी दाटून आली होती.. ती थोडी घाबरलेलीही वाटत होती.
तपननं तिला तिच्या काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, ‘‘बोकारोच्या बस स्टॅन्डवर माझे एक दूरचे नातेवाईक मला घ्यायला यायचेत. आता बस कधी तिथं पोहोचेल, सांगता येत नाही. ते रात्रभर काही माझी वाट बघत थांबून राहू शकत नाहीत. काय करू? शिवाय आज रात्री माझं बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे.’’