कथा * देवेंद्र माने
ती माझ्या अगदी समोरून निघून गेली. ही अशी...अन् अगदी अकस्मात! तिने खरं तर मला बघितलंही असावं पण अजिबात न बघितल्यासारखं करून ती निघून गेली. जणू मी कुणी परका, अनोळखी माणूस होतो. जणू आम्ही कधी भेटलोच नव्हतो...पण माझा तिच्यावर कोणताच, कसलाच हक्क नव्हता. मी कसा काय तिला अडवणार होतो? विचारावं वाटलं होतं, कशी आहेस? काय करतेस हल्ली? पण...न जाणो तिला माझं दिसणं हा अपशकून वाटला असेल...मी दिसल्यामुळे उरलेला दिवस वाईट गेला असेल...कशाला हा दिसला असंही वाटलं असेल...
ही तीच मुलगी होती. म्हणजे पूर्वीची मुलगी. आता एक विवाहित स्त्री, कुणाची तरी पत्नी. पण जेव्हा प्रथम मी भेटलो तेव्हा ती एक सुंदर मुलगी होती. माझ्या भेटीसाठी आतुरलेली, मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी.
आम्ही प्रथम भेटलो तो दिवस मला अजून आठवतो. तिने कॉलेजच्या पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतलं होतं. मी दुसऱ्या वर्षांला होतो. नव्या विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्याची फार वाईट पद्धत त्या काळात होती. सीनिअर्सने तिला एकटीला गाठलं अन् तिला आय लव्ह यू म्हणायला सांगितलं. तिने नकार दिला. मग तिला बियर प्यायला सांगितलं. तिने पुन्हा नकार दिला. मग म्हणाले, सलवार किंवा कमीज (टॉप) यापैकी एक काही तरी काढ. तिने मान खाली घालून पुन्हा नकार दिला, मग सीनियर्स संतापले, चेकाळले त्यांनी तिला थोबाडायला सुरूवात केली.
ती जोरजोरात रडायला लागली. एकेक जण यायचा, गालावर मारून जायचा. मी तिच्या जवळ गेलो. ती संताप, लज्जा अन् अपमानाने थरथरत होती. अश्रू ओघळत होते. मी तिच्या समोरून तिला हातही न लावता निघून गेलो. मुलांनी तिचे कपडे फाडायचाही प्रयत्न केला, पण मी काही सज्जन पण दांडगट मित्रांच्या मदतीने त्यांना हुसकून लावलं. ती बेशुद्ध पडली होती. मी तिला इस्पितळात पोहोचवलं. कॉलेजातून तिचा पत्ता, फोन नंबर मिळवून तिच्या घरच्यांना कळवलं.