कथा * दीपा पांडे
लग्न समारंभ एका देखण्या अन् प्रशस्त लॉनवर आयोजित केला होता. सजावट बघणाऱ्याचं मन मोहून घेत होती. काही पोरं डीजेच्या गाण्यावर नाचत होती. अजून रिसेप्शन सुरू व्हायला अवकाश होता. सगळी व्यवस्था उत्तम होती.
खुर्चीवर बसलेल्या एका स्त्रीकडे थोड्या अंतरावरून टक लावून सीमा बघत होती. सतत बघितल्यानंतरही जेव्हा त्या स्त्रीनं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही तेव्हा सीमा स्वत:च उठून तिच्या जवळ गेली. ‘‘तू तू रागिणीच आहेस ना? रागिणी, मी सीमा. तू ओळखलं नाहीस मला? अंग मघापासून तुझ्याकडे बघतेय मी...पण तू ओळख दाखवली नाहीस...मग म्हटलं आपणच ओळख द्यावी...किती वर्ष झालीत गं आपल्याला दुरावून?’’ सीमानं तिला गदागदा हलवलं अन् मिठी मारली.
रागिणी जणू झोपेतून जागी झाली. तिनं आधी डोळे भरून सीमाकडे बघितलं अन् एकदम आनंदानं चित्कारली, ‘‘सीमा...मला सोडून का गं निघून गेलीस? तू नसल्यामुळे मला किती एकटं वाटत होतं.’’ रागिणीनं आता सीमाला मिठी मारली. दोघींचे डोळे पाणावले.
‘‘तू इथं कशी?’’ सीमानं विचारलं.
‘‘अगं नवरीमुलगी माझी चुलत बहीण आहे. तुला आठवतं का? ती उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे यायची. लिंबूटिंबू म्हणून आपण तिला आपल्यात खेळायला घेत नसू, कारण वयानं ती आपल्यापेक्षा बरीच लहान होती.’’ सीमा हसून म्हणाली.
‘‘हो, हो...आठवतंय मला.’’ मेंदूला ताण देत रागिणी म्हणाली.
मग वरात येईपर्यंत त्या दोघींची गप्पा खूपच रंगल्या. शिक्षण, जुन्या मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमा, नाटक कित्तीतरी विषय होते. रागिणी तर किती तरी दिवसांनी इतकी बोलत होती. बालपणाची मैत्री मोठं झाल्यावरही निरागसता जपत असते. तिच्यात औपचारिकपणा अजिबात नसतो.
तेवढ्यात एकदम गडबड उडाली...चार वर्षांची एक मुलगी दिसेनाशी झाली होती. सगळेच धावपळ करत होते. व्हॉट्सअॅप करून तिचे फोटे पाठवले गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. लग्न जिथे होतं ते एक भलं मोठं फार्म हाऊस होतं. व्यवस्था उत्तम होती पण लहान मुलगी दिसेनाशी होणं काळजी निर्माण करणारं होतं.