उंच, अजून उंच…

कथा * ऋतुजा कांबळे

बरेच दिवसांपासून अर्धवट विणून ठेवलेला स्वेटर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मी लॉनवरच्या खुर्चीत बसून होते. थंडी असल्यामुळे दुपारचं ऊन सुखदायक वाटत होतं. झाडाच्या सावलीतही ऊब सुखावत होती. त्याचवेळी माझी बालमैत्रीण राधा अवचित समोर येऊन उभी राहिली.

‘‘अरेच्चा? राधा? काय गं, आता सवड झाली होय तुला मैत्रीणीला भेटायला? लेकाचं लग्न काय केलंस, मला तर पार विसरलीसच. किती गप्पा मारतेस सुनेशी अन् किती सेवा करवून घेतेस तिच्याकडून? कधी तरी आमचीही आठवण करत जा की…!’’

‘‘अगं, कसल्या गप्पा अन् कसली सेवा घेऊन बसली आहेस? माझ्या सुनेला तिच्या नवऱ्याशीच बोलायला वेळ नाहीए, ती काय माझ्याशी गप्पा मारेल अन् कसली सेवा करेल? मी तर गेले सहा महिने एका वृद्धाश्रमात राहातेय.’’

बापरे! हे काय ऐकतेय मी? माझ्या पायाखालची जमिनच सरकली जणू. मला काही बोलणंही सुधरेना. काय बोलणार? ज्या राधानं सगळं आयुष्य मुलासाठी वेचलं, आपलं सुख, आपला आनंद फक्त मुलासाठी दिला आज तोच मुलगा आईला वृद्धाश्रमात ठेवतोय?

मधुकर राधेचा एकुलता एक मुलगा. त्याला वाढवताना तिनं आपल्या सर्व सुखांचा त्याग केला. आपल्या म्हातारपणी पैसा आपल्याजवळ असायला हवा याचा विचार न करता त्याला मसुरीच्या महागड्या शाळेत शिकायला पाठवलं. तिथून पुढल्या शिक्षणासाठी तो दिल्लीला गेला. पैशांची फार ओढाताण व्हायची. पण उद्या मुलगा उच्चशिक्षित होऊन मोठ्या पगाराची नोकरी करेल, भरपूर पैसा मिळवेल. एवढ्याच आशेवर ती सर्व कष्ट आनंदानं सहन करत होती. भेटली की सतत मुलाच्या प्रगतीबद्दल सांगायची, ‘‘माझं पोरगं म्हणजे शंभर नंबरी सोनं आहे,’’ म्हणायची.

राधा खूप काही सांगत होती. बरंच काही मला कळतही होतं, पण वर्मावर बोट ठेवावं असं वाटत नव्हतं. सायंकाळ होण्यापूर्वीच राधा तिच्या वृद्धाश्रमात परत गेली.

ती निघून गेली तरीही माझं मन मात्र तिच्यातच गुंतून होतं. बालपण ते तारूण्याचा काळ आम्ही दोघींनी एकत्रच घालवला होता.

आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. राधाला डॉक्टर व्हायचं होतं. ती हुषार होती. अभ्यासूही होती. दहावीला ती संपूर्ण राज्यात दहावी आली होती.

राधा सर्व भावंडात मोठी होती. त्यामुळे बारावीनंतर वडिलांनी तिचं लग्न करून टाकलं. नवऱ्याच्या घरी गेल्यावरही आपण शिक्षण पूर्ण करू असं भाबडं स्वप्नं बघत ती बोहल्यावर चढली. पण नवऱ्याला तिच्या शिक्षणात अजिबात रस नव्हता. तिथल्या एकूण सर्व वातावरणाची कल्पना येताच राधानं डॉक्टर होण्याच्या आपल्या स्वप्नाला तिलांजली दिली. नवरा, सासरचं घर अन् संसार यातच रमण्याचा ती प्रयत्न करू लागली.

तिच्या लग्नानंतर लगेचच सासरे गेले अन् तिचा मुलगा तीन वर्षांचा होतोय तोवर नवराही एका अपघातात दगावला. राधावर म्हातारी सासू अन् लहानग्या मुलाची जबाबदारी आली. वैधव्यानं ती एकदम खचली. पण तरीही तिनं धीर न सोडता नवऱ्याचा व्यवसाय कसाबसा सांभाळायला सुरूवात केली. अनुभव नव्हता, तरीही घर चालवण्याइतपत पैसे ती मिळवू शकली.

नवऱ्यालाही कुणी नातलग नव्हते. त्यामुळे सासरी मार्गदर्शन किंवा आधार देणारं कुणीच नव्हतं. पण राधानं परिस्थितीशी व्यवस्थित झुंज दिली. मुलाला उत्तम शिक्षण मिळेल याची दक्षता घेतली.

तिच्या त्या कष्टाचं फळ म्हणून मधुकर आज आयआयटीतून इंजिनियर झाला असून अहमदाबादच्या प्रसिद्ध कॉलेजमधून एम.बी.ए. पण झालाय. एका मल्टीनॅशनल कंपनीत तो खूप वरच्या पोस्टवर काम करतोय. मुलाच्या यशानं राधा हरखली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अन् तेजच तिची यशोगाथा सांगत होतं. आम्हालाही तिचा आनंद खूप सुखावत होता. आता तिला सुखाचे दिवस आले ही खात्री वाटत असतानाच ती वृद्धाश्रमात राहते अन् तेही मुलाच्या लग्नाला जेमतेम वर्षंच होतंय, तेवढ्यात…ही गोष्ट पचनी पडत नव्हती.

माझ्या लेकीला माझी घालमेल लक्षात आली, ‘‘काय झालंय आई? राधामावशी गेल्यापासून तुझं लक्ष लागत नाहीए कशात?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं माझ्या मनात येतंय की हल्ली शिक्षण इतकं विचित्र झालंय की माणूस पैसे तर खूप कमवतो पण त्याला नात्यागोत्यांची, माया ममतेची किंमत राहात नाही. मोठ्यांना, निदान आईवडिलांना तरी मान द्यावा, त्यांना समजून घ्यावं, एवढीही शिकवण त्यांना मिळत नाही. मग इतक्या डिग्यांचा उपयोग काय?’’

‘‘मम्मा, अगं तू नेहमी तुमच्या वेळचे संस्कार अन् संस्कृतीबद्दल बोलत असतेस, पण तू हे का विसरतेस की काळानुरूप प्रत्येक गोष्टच बदलत असते. तशा या गोष्टीही बदलतीलच ना? आजचं शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यापुरतंच मर्यादित झालंय, ती नोकरी मिळवण्यासाठी जर तेवढाच एक पर्याय किंवा उपाय म्हण, जर शिल्लक असेल तर माणूस मुल्य जपत बसेल की जगण्यासाठी प्रयत्न करेल? सॉरी मम्मा, तुला आवडायचं नाही माझं बोलणं, पण ही वस्तुस्थिती आहे.’’

शिक्षक तरी काय करतील? पालकांना वाटतं की शिक्षकांना भरपूर फी दिली की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या ध्येयाकडे पोहोचवायला हवं. पालकच जर पाल्यांच्या जीवनमुल्यांविषयी असे उदासीन असतील तर शिक्षकांनाही वाटतंच, खड्ड्यात गेले ते संस्कार अन् खड्ड्यात गेली ती संस्कृती. पालक ज्यासाठी पैसे देताहेत तेवढंच करूया. आता हीच विचारसरणी इतकी फोफावली आहे की जीवनमूल्य, आदर्शवाद, देशाभिमान वगैरे गोष्टी बोलणारा किंवा आचरणात आणणारा मूर्ख आणि हास्यास्पद ठरतो. नातीगोती जपणं म्हणजे ‘विनाकारण वेळ घालवणं’ असंच त्यांना वाटतं. कारण आईवडिल तरी मुलांसाठी वेळ कुठं देतात? त्याच्यासाठी पैसा कमावायचं हेच त्यांचंही उद्दिष्ट असतं ना?

म्हणजे आईवडिलच मुलांच्या समोर पैसा कमवणं, प्रतिष्ठा मिळवणं, पॉवर मिळवणं हे आदर्श ठेवत असतात. आईवडिलांना आपला मुलगा फक्त पहिला यायला हवा असतो. त्याची मानसिक भावनिक भूक असते, त्याला प्रेम, प्रोत्साहन अन् प्रेमळ सहवास हवा असतो हे त्यांच्या लक्षातच आलेलं नसतं. तुझ्यासाठी आम्ही इतका खर्च करतोय, आम्हाला कधी असा पैसा बघायलाही मिळाला नव्हता. ऐपतीपेक्षा जास्त खर्च फक्त तुझ्या भल्यासाठी करतोय. असं सतत त्या मुलावर ठसवतात. एक प्रकारे मुलावर ते दडपणंच असतं.

कित्येकदा आईवडिलांच्या या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा मुलं पूर्ण करू शकत नाहीत अन् निराश होतात, आत्महत्त्या करतात. कधी कधी आई वडिलांचाच खून करतात. त्यांना अपयशाला सामोरं जाणं आईवडिल शिकवतच नाहीत. हल्ली तर मुलीही करिअरच्या मागे आहेत. त्यांना नवरा, संसार, मुलबाळ अशी जबाबदारीही नको वाटते. कारण त्यामुळेच त्या करियरवर लक्ष केंद्रित करू शकतात.

लहानपणापासून मुलाला आपण वेगळी ट्रीटमेंट देतो. त्याचा अहंकार जोपासून त्याला समर्थ पुरूष करण्याचा प्रयत्न करतो. त्याला लग्न झाल्यावर घर, संसार, बायको, मुलांकडे दुर्लक्ष करून करियर करायला मुभा असते. पण मुलींच्या बाबतीत आपण वेगळेच वागतो. हल्ली मुलीही मुलांच्या बरोबरीनं सगळं करायला बघतात अन् नात्यात प्रेम न राहता शत्रुत्त्व येतं. पण दोष फक्त मुलांचाच असतो का? मुळात, खरं तर, अप्रत्यक्षपणे आई वडिलच यासाठी दोषी ठरतात,’’ नेहा म्हणाली.

‘‘बोल ना, अजूनही बोल. गप्प का झालीस? ‘‘नीतिमत्तेला तिलांजली द्या अन् सुखोपभोगात लीन व्हा. पैसा, पैसा, पैसा मिळवा अन् संसार विसरा…हेच का तुला शिकवलंय मी? मधुकरनं आपल्या सुखाचा विचार करून आईला वृद्धाश्रमात पाठवलंय, तूही पुढे तशीच वागशील कारण मधुकर पूर्वी तुझा पक्का मित्र होता…’’ मी चिडून बोलले.

‘‘आई, अगं अजून माझं शिक्षण पूर्ण होतंय, तू माझ्या पुढल्या आयुष्याशी कशाला भांडते आहेस? मला कळतंय, राधामावशी वृद्धाश्रमात राहतेय ही बाब तुला खूपच खटकते आहे. तुझ्या दृष्टीनं मधुकर अपराधी आहे. पण मी मधुकरला ओळखते. राधामावशीच तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहे. मुलांच्या वागण्यात, त्यांच्या यश किंवा अपयशात आईवडिलांच्या विचारसरणीचा आणि त्यांना वाढवताना घडणाऱ्या घटनांचा प्रभाव दिसून येतो हे तुलाही मान्य आहे ना? राधामावशीला कायम वाटायचं की मधुकरनं नेहमी पहिला नंबर मिळवायला हवा. तो इतका, इतका उंच जायला हवा की इतर कुणी त्याच्या जवळपासही पोहोचता कामा नये. तिनं त्याला कायम नातेवाईकांपासून, मित्रमंडळींपासून तोडलं. दूर ठेवलं, कारण अभ्यासात व्यत्यय नको. पण तिला सर्वांकडून…म्हणजे नातलग अन् मित्रमंडळीकडूनही हेच ऐकायचं असायचं की ‘हा बघा राधाचा मुलगा…राधानं नवऱ्याच्या मागे एकटीनं वाढवलं त्याला…बघा तो किती मोठा झालाय…कुठल्या कुठं पोहोचलाय…खरंच कौतुक आहे हं राधेचं अन् तिच्या मुलाचंही.’

तुला आठवतंय ना मम्मा, जेव्हा यमुनाबाई म्हणजे राधामावशीची सासू, मधुकरची आजी शेवटच्या घटका मोजत होती, तेव्हा तिचा प्राण फक्त मधुकरच्या भेटीसाठी तळमळत होता. एकदा, फक्त एकदाच तिला तिच्या नातवाला, तिच्या मृत मुलाच्या एकुलत्या एका वारसाला बघायचं होतं. ती पुन्हा पुन्हा ‘त्याला बोलावून घे’ म्हणून राधामावशीला गळ घालत होती, पण राधामावशीनं शेवटपर्यंत त्याला आजीच्या आजारपणाची, तिच्या अंतिम समयाची बातमी लागू दिली नाही, कारण तो त्यावेळी दिल्लीला आयआटीच्या परीक्षेच्या तयारीत गुंतला होता. प्रश्न फक्त दीड दिवसाचा होता. विमानानं आला असता अन् आजीला भेटून निघून गेला असता. पण राधामावशीनं त्याला अभ्यासात डिस्टर्ब नको म्हणून काही कळवलंच नाही. खरं तर मधुकरचा आजीवर खूप जीव होता. आजीसाठी तो नक्कीच आला असता. इतका हुशार होता की तेवढ्या एकदीड दिवसाचा अभ्यास त्यानं कधीच भरून काढला असता. पण राधामावशीनं हटवादीपणा केला अन् यमुनाबाई ‘नातवाला बघताही आलं नाही,’ ही खंत घेऊनच वारल्या. त्या गेल्यानंतरही मधुकरला कळवलं नव्हतं.

आयआयटीत निवड झाल्यावर जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला आजी निवर्तल्याचं समजलं…किती रडला होता तो त्यावेळी. त्यानं आईला खूप दोषही दिला पण राधामावशी आपलं चुकलं हे मान्यच करेना. मी केलं ते बरोबरंच होतं, त्यामुळेच तू आयआयटीत निवडला गेलास हेच ती घोकत होती. अभ्यास, करिअर यापुढे आजी, आजीची इच्छा किंवा प्रेम याला काहीच महत्त्व नाही, हेच तिनं मधुकरला अप्रत्यक्षपणे शिकवलं ना? आता तो आईकडे लक्ष न देता करिअरच्या मागे लागलाय तर त्याचं काय चुकलं?

लहानपणापासून मधुकरनं आईचं ऐकलं. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. तनमनानं तो अभ्यास करत होता. आईच्या इच्छेला मान देताना त्यानं आपली आवड, इच्छा बाजूला ठेवल्या होत्या. त्याची फक्त एकच इच्छा होती ज्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, तिच्याशी त्याला लग्न करू द्यावं.

पण राधामावशीनं तिथंही हटवादीपणा केला. कारण तिला सून तिच्या मुलासारखीच हुशार अन् मोठ्या पगाराची नोकरी असणारी हवी होती. मधुकरचं जिच्यावर प्रेम होतं तिचं अजून शिक्षण संपल नव्हतं. स्वत:ची महत्त्वकांक्षा राधामावशीला मुलाच्या प्रेमापेक्षाही मोठी वाटली. मधुकरची इच्छा तिनं साफ धुडकावून लावली. तिचे शब्द होते, ‘माझ्या मखमलीला मला गोणपाटताचं ठिगळ नकोय.’ तिनं जीव देण्याची धमकी दिली अन् तिच्या आवडीच्या, तिनं पसंत केलेल्या मुलीशीच मधुकरला लग्न करावं लागलं.

राधामावशीच्या मते, तिनं मुलाचं भलं केलं. त्याला साजेशी बायको मिळवून दिली. आज परिस्थिती अशी आहे की सून अन् मुलगा, दोघंही कामाच्या ओझ्याखाली दबली आहेत. ऑफिसच्या कामासाठी कधी मधुकर महिना महिना परदेशी असतो तर कधी सून…कधीकधी दोघंही. आता त्यांना एकत्र राहायला वेळ नाही. एकमेकांसाठी वेळ नाही. कसला संसार, कसली मुलंबाळं. अशात ती दोघं राधामावशीकडे कधी बघणार अन् कधी तिची काळजी घेणार? दोघांनाही आपली नोकरी, आपलं करिअर, आपली प्रमोशन्स सोडवत नाहीएत. मधुकरची बायको रश्मी तशी चांगली आहे, पण ती करिअर सोडणार नाही. हे तिला तिच्या आईवडिलांनीच शिकवलंय. ते तिच्या लहानपणापासून डोक्यात भरवलं गेलंय की ती मुलापेक्षा कमी नाही. लोकांना मुलगा हवा असतो, पण मुलगीही तेवढीच कर्तबगार असते.

जग कितीही बदलू दे मम्मा, पण कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं आपसातलं अंडरस्टॅडिंग. एकमेकांना समजून घेणं. एखादी गोष्ट माझ्या नजरेतून मला बरोबर वाटत असली तरी तुझ्या नजरेतून ती तशीच असेल असं होत नाही. तुला नाही वाटत की राधामावशीनं तिची प्रत्येक इच्छा मधुकरवर लादली म्हणून? तिच्या दृष्टीनं ते योग्य असेलही, पण मधुकरच्या दृष्टीनं ते बरोबर नव्हतं, मधुकर राधामावशीच्या इच्छेप्रमाणे घडला पण आज तो तिला खरं तर दुरावलाच आहे. त्याचं प्रेम जिच्यावर होतं तिला तो अजून विसरू शकला नाहीए.’’

नेहाचं बोलणं ऐकून मी खरं तर सुन्न झाले होते. खरोखर आपण मुलांना माणूस म्हणून वागवत नाही. त्याचं फक्त मशीन करून टाकतो अन् मग माणुसकी, संस्कृती वगैरे महान गोष्टींची अपेक्षा करतो.

एकाएकी मी दचकले. मी नेहाच्या डोळ्यांत बघत विचारलं, ‘‘मधुकरचं तुझ्यावर प्रेम होतं?’’

मनातली वेदना लपवण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा बांध फुटला अन् ती माझ्या गळ्यात पडून रडू लागली. मी पश्चात्ताप करत होते, माझ्या मुलीचं मन मला तरी कुठं कळलं होतं?

खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे. मुलांवर आपल्या अपेक्षा लादायच्या की त्यांना हवं तसं घडू द्यायचं? परदेशातला पैसा किंवा इथंच भरपूर पगार, मोठा बंगला किंवा फ्लॅट, सुखासीन आयुष्य एवढंच महत्त्वाचं आहे की जीवनमूल्यही जपता येणं गरजेचं आहे. नातेसंबंधातून येणारी प्रेमाची जबाबदारी, कर्तव्याची जाणीव, त्यातून मिळणारा आधार आणि सुरक्षितपणाची भावना हे सगळंही महत्त्वाचं असतं ना? खरोखर आमचंही चुकतंच…मी नेहाला जवळ घेत म्हटलं, ‘‘आमच्याकडून फारच मोठी चूक घडली आहे. त्यामुळे तुझं अन् मधुकरचं आयुष्य…खरं तर तुम्ही विनाकारण शिक्षा भोगता आहात. पण आता घडून गेलं ते विसरून तुला पुढं जायला हवं. तुला अजून कुणी चांगला जोडादार भेटेल. एकच सांगते यापुढे प्रत्येक क्षणी मी तुझ्याबरोबर आहे…’’

लठ्ठपणा घालवा : फुक्कट

मिश्किली * कुशला पाठक

त्यादिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोहोचलो. सौ.नं. दार उघडलं अन् अत्यंत उत्साही आवाजातत म्हणाली, ‘‘अहो, ऐकलंत का? आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काखेत कळसा अन् गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना तिथं एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा. अन् अगदी फुक्कट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर.’’

‘‘तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात सतत अशी शिबिरं होतच असतात,’’ मी म्हणालो.

सौ. संतापलीच, ‘‘तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वत:च सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवंतय का, त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं. काय तर म्हणे, त्याच्या चवळीच्या शेंगेसारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन, म्हणाला होतात. तर तो लठ्ठपणाच समूळ नष्ट करण्यासाठी ही शिबिरं घेतली जातात.

रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे अन् मघाच मी सांगितलं ना, हे अगदी फुक्कट आहे. नि:शुल्क…पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब?’’

‘‘छान, छान! जरूर जा त्या शिबिरीला. पण त्या आनंदात माझा पामराचा चहा फराळ विसरलीस का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो गं!’’ मी तिला थोपवत बोललो.

‘‘हो तर! चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयिस्करपणे विसरता तुम्ही. रविवार अन् माझं शिबिर पण विसराल, स्वत:चं जेवणखाणं नाही विसरत कधी,’’ संतापानं पाय आपटत सौ. स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळआपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रे मधून बाहेर आलेला चहा अन् पोहे मात्र फक्कडच होते.

परवाच रविवार होता. शनिवारी रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातींचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्रीपुरूषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं तीन खुर्च्यांवर तीन सुंदऱ्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्टे्रशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं.

या नि:शुल्क शिबिरात रजिस्ट्रेशनसाठी १०० रु. फी होती. स्त्रीपुरूष शंभराच्या नोटा फेकत होते. सौ.नंही १०० रुपये भरले. लोकांकडे अंगावर चरबीचे थर असतात अन् खिशात नोटांचा महापूर असतो.

पहिल्या दिवशी तिथं संन्याशासारखी वेषभूषा असलेल्या काही लोकांची भाषणं झाली. त्यांनी आहार नियंत्रणावर खूप काही सांगितलं. तळलेल्या वस्तू, मिठाया खाऊ नका वगैरे समजावलं. पण बागेच्या एका कोपऱ्यात भजी, मिसळ, भेळ, समोसे वगैरेंचे स्टॉल मांडलेले दिसत होते.

स्टॉल्सच्या जोडीनं काही मॉडर्न सजावटीची रेस्टॉरंट्स पण होती. तिथं रंगीबेरंगी जाहिरातीतले पिझ्झा, बर्गर, डोशाचे मोठमोठे फोटो होते, बघूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे. बऱ्याच लोकांनी तर पाणीपुरी, भेळ, वगैरे चापून खाल्लं. ‘निशुल्क वजन घटवा’ शिबिराचाच हा एक भाग आहे असं त्यांना वाटलं होतं.

लठ्ठपणा, मेद, चरबी, मोटापा वगैरे शब्द वापरत संन्याशासारख्या दिसणाऱ्या अन् भगवे कुर्ते झब्बे घातलेल्या लोकांनी मोठमोठी भाषणं दिली. अधिक वजनामुळे हायब्लडप्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, डिप्रेशन, किडनीचे विकार, सांधेदुखी वगैरे अनेक विकार होतात, खेरीज कॅन्सरचा धोका जाड्या माणसांना अधिक असतो हेही समजावून सांगितलं. पण संन्यासी, बाबामंडळींचं मात्र त्यांना ऐकावसं वाटतं. म्हणूनच देशातील संन्याशी मंडळी बघता बघता कोट्यधीश होताहेत. सर्वांनी आता लठ्ठपणा आणि इतर आजार बरे करण्याचे कारखाने घातलेत अन् बाजारापेठांवर कब्जा केलाय. एक कुणी संन्याशी बाबा तर म्हणे औषधं विकता विकता तुरूंगातही गेलेत आणि तिथंही औषधं विकताहेत.

दोन-तीन दिवस लठ्ठपणा या विषयावर भाषणं पार पडल्यावर मंचावरून घोषणा करण्यात आली की ज्या स्त्री पुरूषांना हार्ट प्रॉब्लेम, हाय किंवा लो प्रेशर, शुगर, किडनी प्रॉब्लेम वगैरे वगैरे असतील, त्यांनी शिबिरात उभारलेल्या स्टॉल्सवरून औषधं विकत घ्यावीत. मुळात तुमचा रोग बरा झाल्याखेरीज तुमचा लठ्ठपणा कमी होणार नाही. झालं! सगळीच्या सगळी लठ्ठ गर्दी त्या स्टॉल्सकडे धावली. प्रत्येक स्टॉलपुढे आता औषधांसाठी रांगा लागल्या.

त्या दिवशी आम्ही सौ. सोबत त्या रांगेत लागू शकलो नव्हतो, कारण ऑफिसमधल्या बॉसनं आम्हाला रजाच दिली नव्हती. सौ.च्या या लठ्ठपणा निवारण शिबिरापायी आमच्या तीन सुट्ट्या आधीच खर्ची पडल्या होत्या. आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा टेबलावर औषधांच्या कित्येक बाटल्या अन् बरेचसे डबे मांडून ठेवलेले दिसले.

‘‘बाबांच्या शिबिरातून पाचशे रुपयांची औषधं आणली आहेत. ते म्हणाले होते की रोग असतो तोपर्यंत चरबी कमी होत नाही.’’

‘‘अगं, पण तुला तर कोणताच रोग नाही…मग इतकी औषधं कशाला?’’ मी आश्चर्यानं विचारलं.

नाराजीनं सौ. उद्गारली, ‘‘तुम्हाला कुठं कळतंय की आम्हाला काय त्रास आहे? कुठला रोग आहे? अहो, मला बद्धकोष्ठ आहे. अन् बाबा म्हणाले माझा हा लठ्ठपणा त्यामुळेच आहे. आता जेव्हा आधी त्या बद्धकोष्ठावर उपाय करेन तेव्हाच ना माझा लठ्ठपणा दूर होईल?’’

‘‘अगं पण, बद्धकोष्ठासाठी एवढी महागाची औषधं कशाला? अर्धी पपई खाल्ली किंवा रोज एक मुळा खाल्ला तर पोट खळखळून स्वच्छ होतं की!’’ मी निरागसपणे बोललो.

सौ. रागाने म्हणाली, ‘‘नुसते पाचशे रुपये ऐकून तुम्ही डोळे पांढरे करताय. बाबांनी सांगितलंय तीन चार वेळा तरी एवढी औषधं घ्यावी लागतील, तेव्हाच बद्धकोष्ठ दूर होईल. मी म्हणते, तुमच्या लक्षात कसं येत नाही की ते लठ्ठपणा दूर करण्यासाठी पैसा घेतच नाहीएत. मग रोग दूर करण्यासाठी औषधांवर थोडा खर्च केला तर बिघडलंच कुठं?’’

दुसऱ्या दिवशी सर्व लठ्ठ भारती शिबिरार्थींना योगासनं शिकवण्याचा कार्यक्रम होता. उत्तानपादासन, धनुरासन, नौकासन, भुजंगासन, चक्रासन वगैरे प्रकार करून दाखवले गेले. कुणाला काय जमेल, आसनं नेमकी कशी करावीत हे काहीही त्यांनी सांगितलंच नाही. ‘सर्व आसनं नियमित करा’ एवढं सांगून शिबिराचा समारोप झाला.

गेल्या काही दिवसात या शिबिरानं मला खूप दमवलं होतं. दुसऱ्या दिवशी इतकी छान झोप लागली असताना अचानक सौ.च्या किंकाळ्या ऐकायला आल्या. धडपडत उठून जाऊन बघितलं तर सौ. लादीवर आडवी तिडवी पडलेली. ‘‘अहो, मेले…मेले…मला उचला. माझी मान मोडलीए…’’ ती विव्हळत बोलली.

मी अजून बहुधा पूर्ण जागा झालो नव्हतो. मी दारातूनच वदलो. ‘‘सकाळी सकाळीच का आरडाओरडा प्रिये? शेजारी पाजारी धावत येतील. काय झालंय चौकश्या करतील, तुलाच त्यांना चहा फराळ द्यावा लागेल, त्यापेक्षा…’’

‘‘आता उभ्या उभ्या भाषण देणार की मला मदत करणार? वरच्या पट्टीत सौ. ओरडली, ‘‘मला आधी डॉक्टरांकडे न्या. मला फार दुखतंय, सहन होत नाहीए. बहुधा मान मोडलीए…ओह…मी मेले…’’

सौ.चा आरडाओरडा वाढतच होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला जवळच्याच नर्सिंगहोममध्ये नेलं. सौ.ला बरीच दुखापत झाली होती. दंडाला प्लॅस्टर घातलं. तीन हजारांचं बिल डॉक्टरनं दिलं.

लठ्ठपणा कुठं इंचभरही कमी झाला नव्हता. तीन हजार प्लॅस्टरचे, हजार रुपयांची औषधं आणि इतर काही असे मिळून पाच हजार खर्च झाले होते. फुक्कट शिबिर आम्हाला चांगलंच महागात पडलं होतं.

लग्नगाठ

कथा * श्री प्रकाश

झारखंडमधल्या ‘बोकारो’ शहरात राहणारा तपन काही कामानं कोलकत्त्याला गेला होता. तिथून परत येण्यासाठी त्यानं बसचं तिकिट काढलं. शेजारच्या सीटवर एक सुंदर तरूणी बसली होती. साधारण पंचविशीची असावी. तिच्या एकूण व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण होतं. दोघंही आपापल्या सीटवर मासिक वाचत बसली होती. बस कोलकत्त्याच्या बाहेर पडल्यावर बसमध्ये अल्पोपहार दिला गेला. दोघांनी आपापली मासिकं बंद करून बाजूला ठेवली अन् ते एकमेकांकडे बघून हसले.

‘‘हॅलो, मी तपन.’’ स्वत:ची ओळख करून देत तपननं म्हटलं.

तिनं हसून म्हटलं, ‘‘मी चित्रा.’’

खाताखाता दोघांनी जुजबी गप्पा मारल्या अन् पुन्हा ती दोघं आपापल्या मासिकात दंग झाली. दुर्गापूरला बसचा थांबा होता. दहा मिनिटं बस थांबणार होती. तपननं खाली उतरून दोन कप चहा आणला. एक कप चित्राला दिला. तिनं  ‘‘धन्यवाद’’ म्हणत चहा घ्यायला सुरूवात केली.

आसनसोल आता जवळ आलं होतं. तेवढ्यात बस थांबली. काही प्रवासी पेंगले होते, काही जागे होते. बस अचानक थांबल्यामुळे पेंगलेले लोकही जागे झाले.

‘‘काय झालं?’’ ‘‘बस का थांबली?’’ वगैरे प्रश्न आपसातच विचारले गेले. कारण कुणालाच ठाऊक नव्हतं. थोड्याच वेळात कंडक्टर माहिती काढून आला, वाटेत एक मोठा अपघात झाल्यामुळे ट्रॅफिक दोन्ही बाजूंनी बंद झालं होतं. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता मोकळा व्हायला बराच वेळ? लागणार होता. तोवर प्रवाशांनी गाडीतच विश्रांती घ्यावी असं त्यानं सांगितलं. काही प्रवाशी खाली उतरले, काही गाडीतच थांबले.

तपनही खाली उतरला. चित्रा मात्र गाडीत बसून होती. ती फार काळजीत वाटत होती. तपननं तिला बसमधून उतरायला लावलं. बाहेर हवा छान होती, पण चित्राच्या चेहऱ्यावर खूपच काळजी दाटून आली होती.. ती थोडी घाबरलेलीही वाटत होती.

तपननं तिला तिच्या काळजीचं कारण विचारलं. ती म्हणाली, ‘‘बोकारोच्या बस स्टॅन्डवर माझे एक दूरचे नातेवाईक मला घ्यायला यायचेत. आता बस कधी तिथं पोहोचेल, सांगता येत नाही. ते रात्रभर काही माझी वाट बघत थांबून राहू शकत नाहीत. काय करू? शिवाय आज रात्री माझं बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे.’’

‘‘हे संकट अवचितच उद्भवलं आहे. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आधी त्यांना फोन करून बसस्टॅन्डवर जाऊ नका एवढा निरोप द्या. नंतर पुढे काय करता येईल ते बघूयात. ट्रॅफिक मोकळं कधी होईल ते सांगता येत नाही.’’ तपननं सुचवलं.

चित्रानं फोन करून आपल्या नातलगाला तसं कळवलं. पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ताण होता. तिचे डोळे भरून आले होते. म्हणजे तिचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झाला नव्हता.

तपननं विचारलं, ‘‘तुम्ही फारच टेन्शनमध्ये आहात, मला सांगू शकाल का काय कारण आहे ते? आपण सगळेच बोकारोला जाणार आहोत…अन् सगळेच इथं अडकले आहोत…पण काही तरी प्रयत्न करता येईल?’’

काही क्षण ती गप्प होती. मग म्हणाली, ‘‘मला आज रात्री बोकारोला पोहोचणं फारच गरजेचं आहे. उद्या सकाळी एक फारच महत्त्वाचं काम आहे, वेळेवर पोहोचले नाही, तर फार म्हणजे फारच नुकसान होईल.’’

तपननं म्हटलं, ‘‘खरं तर मला काही म्हणायचा अधिकार नाहीए, तरीही जरा स्पष्ट सांगितलंत तर काही तरी सोल्युशन शोधता येईल.’’

काही क्षण विचार करून, स्वत:ला थोडं सावरत तिनं सांगितलं, ‘‘उद्या सकाळी मला कोर्टात हजर व्हायचं आहे. उद्या कोर्टाचा लास्ट वर्किंग डे आहे. त्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी कोर्ट दोन महिने बंद राहील.’’

‘‘आज रात्री पोहोचायचं झालं तर मी काही पर्याय बघू का?’’

‘‘काही होत असेल तर बघा ना? मी जन्मभर तुमची ऋणी राहीन.’’

तपननं बस कडक्टरला विचारलं की हा ट्रॅफिक जॅम होण्याचं कारण काय आहे?

तेव्हा त्यांनं सांगितलं पुढे पुलावर एक ट्रक बंद पडलाय. त्यामुळे एखादी स्कूटर सोडली तर कोणतंही चार चाकी वाहन निघूच शकत नाहीए. तपननं त्याला म्हटलं की लवकर बोकारोला पोहोचायचं म्हटलं तर काय पर्याय आहे?’’ कंडक्टरनं म्हटलं, ‘‘तुमच्यापाशी फारसं सामान नसेल तर थोडं पायी चालून पुल क्रॉस करा. पुढे जाऊन एखादी रिक्षा मिळेल, त्यानं टॅक्सी स्टॅन्डवर पोहोचा आणि तिथून टॅक्सी करून बोकारोला जाता येईल. मात्र, या बसच्या भाड्याचे पैसे परत मिळणार नाहीत.’’

‘‘राहू देत, भाडं परत मिळालं नाही तरी चालेल. चांगला सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!’’

तपन सरळ चित्राजवळ आला, ‘‘चला, पुढे जाण्याचा मार्ग सापडला आहे. तुमच्याजवळ अवजड सामान नाहीए ना?’’

‘‘नाही, ही एवढी हॅन्डबॅग फक्त आहे.’’

दोघं आपलं सामान घेऊन पायी चालू लागले. पूल ओलांडल्यावर थोड्या वेळातच रिक्षास्टॅन्ड लागला. रिक्षा करून ते टॅक्सीस्टॅन्डकडे निघाले. रस्ता फारच वाईट हाता. खूपच हादरे, हिसके बसत होते. त्यामुळे दोघांना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श होत होता. चित्रा खूपच आवरून, सावरून बसली होती. तपनला मीराची आठवण आली. पाच वर्षांपूर्वी तो त्याच्या पत्नीबरोबर रिक्शातून जाताना असाच तिचा स्पर्श झाला की तो रोमांचित व्हायचा. पण आता मीरा त्याच्या आयुष्यात नव्हती.

टॅक्सीस्टॅन्डवर लगेच बोकारोची टॅक्सी मिळाली. बोकारोला पोहोचायला रात्रीचे दोन वाजले होते.

‘‘तुम्हाला कोणत्या सेक्टरला जायचं आहे?’’ तपननं चित्राला विचारलं.

‘‘मला जायचंय सेक्टर वनला. तिथून कोर्ट जवळ आहे. पण मला त्या नातलगांचा फ्लॅटनंबर लक्षात नाही. माझ्याकडे लिहिलेलाही नाहीए. माझे वडिल एका महत्त्वाच्या टेंडरच्या कामासाठी नेपाळला गेलेत. आईलाही त्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्याबरोबर राहावं लागतं. मी एकुलती एक मुलगी आहे. कामच असं आहे की मला एकटीला यावंच लागलं.’’

‘‘आता असं अपरात्री त्यांना शोधणं अशक्य आहे. काही तासांचा प्रश्न आहे, तुम्ही माझ्या घरी चला.’’

‘‘नाही…नको, मी इथंच थांबते, सकाळी त्यांना फोन करते अन् बोलावून घेते.’’

‘‘भलतंच काय? रात्री थांबायला टॅक्सी स्ट्रन्ड ही सुरक्षित जागा नाहीए.’’ तपननं म्हटलं. त्याने फोन लावला. ‘‘हॅलो आई, अजून जागी आहेस? मी घरी येतोय, पंधरा मिनिटात पोहोचतो.’’ त्यानं फोन बंद केला अन् म्हणाला, ‘‘माझी म्हातारी आई अजून जागी आहे. तुम्ही न घाबरता माझ्या घरी चला. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही.’’

चित्रानं संमतीदर्शक मान डोलावली. ती दोघं पोहोचली. तपननं लॅचकीनं दार उघडलं. आईला कमी दिसायचं, कुणा स्त्रीबरोबर तपन आलाय बघितल्याबरोबर तिनं म्हटलं, ‘‘मीराला घेऊन आला आहेस का?’’

‘‘आई, आता मीरा कधीच येणार नाही. मी आलोय. ही चित्रा?’’ त्यानं थोडक्यात सर्व हकीगत सांगून आईला झोपायला पाठवलं.

मग त्यानं चित्राला गेस्ट रूम दाखवली. ‘‘इथं तुम्ही शातंपणे विश्रांती घ्या.’’ तो म्हणाला.

चित्रानं म्हटलं, ‘‘रागावणार नसाल तर एक विचारू?’’

‘‘हं.’’

‘‘मीरा तुमची बायको आहे का?’’

‘‘आहे नाही, होती, आता आमचा डिव्होर्स झालाय.’’ ‘‘सॉरी! पण योगायोग बघा. उद्या कोर्टात माझ्या डिव्होर्सचीच केस आहे. निर्णय झाला आहे. मी अन् चेतन परस्पर सामंजस्यानं घटस्फोट घेतोय.’’

काहीवेळ कुणीच बोललं नाही.

मग तपन म्हणाला, ‘‘खरं तर तम्ही शिक्षित आहात, देखण्या आहात, शांत आणि समंजसही आहात, तुमच्या पतीला तुमचा अभिमान वाटायला हवा.’’

‘‘तसं त्याला वाटत नव्हतं. माझं सासर इथंच आहे, पण आता मी घटस्फोट घेतलाय तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. नवरा कोलकत्त्यालाच एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो. माझं माहेर पाटण्याला आहे. मी सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. मी अन् माझ्या कॉलेजमधल्या तीन मित्रांनी मिळून एक कंपनी उघडली आहे. स्टार्टअप आहे. सुरूवातीलाच माझ्या नवऱ्याच्या कंपनीच्या गॅरेजमध्ये आम्ही काम सुरू केलं होतं. वर्षभर बरं चाललं होतं. आम्ही एका अमेरिकन कंपनीसाठी प्रॉडक्ट तयार करतो आहोत. रात्री उशीरापर्यंत आम्हाला काम करावं लागायचं. अधूनमधून मी चहा कॉफी करून आणायची. कधी आम्ही चौघं असायचो. कधी तरी मी अन् त्या तिघांपैकी कुणी एक असे दोघंच काम करायचो. कामाचा ताण फार होता. ताण थोडा कमी व्हावा म्हणून मग विनोद सांगणं, थोडं हसणं, गप्पा असंही करत असू. नेमकं हेच चेतनला माझ्या नवऱ्याला खटकत होतं. त्यावरून तो माझ्याशी भांडण करायचा. याचवेळी अमेरिकन कंपनीनं आम्हाला काही फंडही दिला. त्यातून आम्ही शेजारच्याच एका घरात कंपनीचं ऑफिस शिफ्ट केलं. ती जागा भाड्याचीच होती, पण सोयीची होती. काम वेळेत पूर्ण करण्याचंही टेन्शन होतं. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागून काम करावं लागायचं. आम्हा चौघांना आमच्या मेहनतीचे पैसेही भरपूर मिळत होते.

पण चेतनला यातलं काहीच कळत नव्हतं. तो समजून घ्यायला तयारच नव्हता. एक दिवस तर त्यानं चक्क व्यभिचाराचा आरोप केला. ‘‘तुला कंपनी बंद करावी लागेल किंवा मला घटस्फोट द्यावा लागेल.’’ त्यानं स्पष्टच म्हटलं. मी त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. ‘‘आम्ही सर्व पार्टनर्स चारित्र्यवान आहोत. आमच्यावर अशी चिखलफेक करू नकोस.’’ हे समजावलं पण त्याचं एकच म्हणणं, ‘‘कामच्या नावाखाली तुम्ही चैन चंगळ करता, ऐयाशी करता वगैरे वगैरे.’’ शेवटी आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला.

एव्हाना पहाटेचे पाच वाजले होते. तपननं चहा करून आणला. ‘‘चहाबरोबर काही खायला लागेल का? ब्रेकफास्ट तयार व्हायला अजून वेळ आहे.’’

‘‘नको, नुसता चहाच हवाय,’’ चित्रानं म्हटलं. दोघांनी चहा घेतला. सकाळी सहा वाजता चित्रानं नातलगांना फोन केला. ते म्हणाले, त्यांची मॉर्निंग ड्यूटी असल्यानं ते फॅक्टरीत पोहोचले आहेत. दुपारी तीन वाजता भेटू शकतात. चित्रानं त्यांना सांगितलं की आताच बोकारोला पोहोचली आहे. आता ती कोर्टातलं काम पूर्ण करून परस्पर कोलकत्त्याला निघून जाईल.

मग तिनं तपनला विचारलं, ‘‘मीरा अन् तुम्ही वेगळे का झालात?’’

‘‘मी इथं प्लांट इंजिनियर आहे. परचेस डिपार्टमेंटला काम असल्यानं खरेदीसाठी, मशीनचे सुटे पार्ट्स वगैरे घ्यायला मला कोलकत्त्यालाच जावं लागतं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मीराचे वडील श्रीमंत बिझनेसमन आहेत. मीराही याच प्लांटमध्ये अकाउंट ऑफिसला नोकरी करायची. आमची ओळख झाली. मग प्रेम जमलं. लग्नंही झालं. सहा महिने खूप आनंदात गेले. मग तिनं हट्ट धरला वेगळं घर करण्याचा. ती म्हणाली आईला आपण एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात ठेवूयात. मी मात्र यासाठी तयार नव्हतो. त्यावरून रोज आमची भांडणं होऊ लागली. तिनं शेवटी अल्टिमेटमच दिलं की आई किंवा बायको, कुणा एकाची निवड कर. मी आईला एकटं कसं सोडणार होतो? ती म्हणाली मग मला मोकळी कर. मी खूप प्रयत्न केला पण ती ऐकतच नव्हती. शेवटी घटस्फोट झालाच.’’ तपननं सांगितलं.

‘‘हल्ली आपल्याकडेही घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूप वाढते आहे. ही गोष्ट चांगली नाहीए. खरं तर मुली शिकतात. हुशारी, कर्तबगारी दाखवतात. त्यांना सासरी, नवऱ्याकडूनही मान, सन्मान मिळायला हवा. त्यांनाही करिअर करायचा हक्क मिळायला हवा. मी बरोबर बोलते आहे ना?’’

‘‘होय ते बरोबर आहे, पण एकुलता एक मुलगा असेल तर त्यानं म्हाताऱ्या आईला वाऱ्यावर सोडून स्वत:चा संसार मांडणं योग्य ठरेल का?’’ तपननं म्हटलं. दोघांनीही एकदमच म्हटलं, ‘‘यावर मध्यम मार्ग शोधला पाहिजे.’’

कोर्टात चेतन चित्राच्या घटस्फोटाला मंजुरी मिळाली. कायदेशीररित्या आता दोघं स्वंतत्र होती. तपन म्हणाला, ‘‘हा असा निर्णय आहे, ज्यावर आनंद व्यक्त करावा की दु:ख व्यक्त करावं तेच समजत नाहीए.’’

तपननं त्या दिवशी रजा टाकली होती. तो चित्राला घेऊन घरी आला. आईनं स्वयंपाक करून ठेवला होता. तिघं जेवायला बसली. आईनं म्हटलं, ‘‘तू तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल काय निर्णय घेतला आहेस?’’

‘‘मी अजून काहीच निर्णय घेतला नाहीए. सध्या काही महिने मी कंपनीच्या कामात इतकी बुडालेली असेन की मला कुठलाही विचार करायला उसंत मिळणार नाहीए.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘काळजी करू नकोस. एक रस्ता बंद होतो, तेव्हा दुसरा रस्ता उघडतोच,’’ आई म्हणाली.

तपन चित्राला सोडायला रेल्वे स्टेशनवर गेला. तिचं रिझर्वेशन होतंच, चित्रानं म्हटलं, ‘‘जेव्हा तुम्ही कोलकत्त्याला याल तेव्हा मला भेटा. सध्या सॉल्टलेकच्या फ्लॅमध्येच माझं घर आणि ऑफिस आहे,’’ तिनं तिचं कार्ड तपनला दिलं.

‘‘शुअर!’’ तपननं म्हटलं आणि स्वत:चं कार्ड तिला दिलं.

चित्रा कोलकत्त्याला गेल्यावर दोघांमध्ये टेलिफोनवर संभाषण व्हायचं. दोघं एकमेकांच्या कामाबद्दल, तब्येतीबद्दल बोलायचे, विचारपूस करायचे. आईबद्दल चित्रा आवर्जून विचारायची. कधीतरी तपनची आई तिला विचारायची, ‘‘पोरी, काही निर्णय घेतलाए का?’’ चित्रा म्हणायची, ‘‘अजून मला वेळच कुठं मिळतोय?’’

एकदा आईनं फोन केला अन् चित्राला म्हटलं, ‘‘माझा तपन कसा काय वाटतो तुला?’’

चित्रा गडबडली. या प्रश्नासाठी ती तयारच नव्हती. तरी ती म्हणाली, ‘‘तपन फारच सज्जन अन् परोपकारी वृत्तीचे आहेत.’’

‘‘तपनही तुझं खूप कौतुक करतो. म्हणतो फार हुषार अन् मेहनती मुलगी आहे. खूप प्रगती करेल.’’ आईनं सांगितलं.

‘‘हा तर त्यांचा मोठेपणा आहे.’’ चित्रा संकोचानं म्हणाली.

काही दिवसांनी तपनला कोलकत्त्याला जावं लागलं. तो काम संपवून चित्राला भेटायला गेला. चित्रानं स्वयंपाक केला. दोघं गप्पा मारत जेवली. निघताना चित्रानं त्याच्याशी शेकहॅन्ड केला व ‘‘पुन्हा या.’’ म्हटलं. आता चित्राचा प्रोजेक्ट पूर्ण होत आला होता. तिच्या टेस्ट, परीक्षणं सुरू होती. ते सर्व यशस्वी झाल्यावर ती अमेरिकन कंपनी विकत घेणार होती. त्याचवेळी तपनच्या आईची तब्येत खूप बिघडली. हे चित्राला समजलं तेव्हा ताबडतोब टॅक्सी करून ती तपनकडे गेली व त्याला अन् आईला कोलकत्त्याला घेऊन आली. कारण इथं चांगले डॉक्टर्स अन् चांगली इस्पितळं होती. आईला चांगल्या इस्पितळमिध्ये एडमिट केलं. तपनही रजा घेऊनच आला होता. त्या काळात तो दिवसा घरी व रात्री आईजवळ राहत होता. पंधरा दिवसांनी आईची तब्येत बरीच सुधारली. तिला डिसचार्ज मिळाला. या काळात तपन व चित्रा एकमेकांना समजू शकले.

चित्रानं आईला सरळ आपल्या घरीच आणलं. अजून त्यांना विश्रांतीची गरज होती. तपन आठ दिवसांनी त्याच्या कामावर जाऊन आला. आपलं काम सांभाळून चित्रा आईची सेवा करत होती. एक बाई घरकाम व स्वंयपाकाला होतीच. शिवाय ती आईजवळही थांबायची.

आई पूर्णपणे बरी झाली. निघताना चित्राला जवळ घेऊन म्हणाली, ‘‘पोरी, पोटची लेक काय करेल, इतकं तू माझं केलं आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत…मी जे काही विचारलंय त्यावरही विचार कर.’’

‘‘कशाबद्दल म्हणताय आई?’’

‘‘तपन आणि तुझ्याबद्दल…’’

‘‘तुमच्या आशिर्वादामुळे माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होतोय. दोन आठवड्यात सगळं काम पूर्ण होऊन आम्हाला त्याचा रिझल्टही कळेल…त्यानंतर मी तुमचं म्हणणंही ऐकेन.’’

चित्राच्या या उत्तरावर आई आणि तपन चित्राकडे बघू लागले. आज प्रथमच तिनं तिच्याकडून होकार दर्शवला होता.

चित्राच्या आईवडिलांनाही चित्राची काळजी वाटत असे. चित्रानं त्यांना तपनबद्दल सांगितलंच होतं. तपननं तिला त्या रात्री केलेली मदत ती विसरू शकत नव्हती. चित्राचे वडील एकदा बोकारोला जाऊन तपनची सर्व माहिती काढून आले होते. तपनबद्दल त्यांना फार चांगले रिपोर्ट मिळाले होते. चित्राशी तपननं लग्न केलं तर दोन एकटे जीव प्रेमानं संसार करतील असं त्यांनाही वाटत होतं.

त्यानंतर सुमारे तीन आठवड्यातच तपनला चित्राचा फोन आला. त्यांचं प्रॉडक्ट अमेरिकन कंपनीनं भरपूर किंमत देऊन विकत घेतलं होतं. कंपनीच्या चारही पार्टनर्सना दोन दोन कोटींचा फायदा झाला.

तपनच्या आईनं चित्राला फोनवर म्हटलं, ‘‘खूप खूप अभिनंदन पोरी. खूप कष्ट घेतलेस, त्याचं फळही मिळालं. तू कष्टाळू मुलगी आहेस असं तपन नेहमीच सांगतो. अशीच यशस्वी हो.’’

‘‘तुमचे आशिर्वाद आहेत, आई.’’

‘‘आता तरी तपनचा विचार करशील का?’’

‘‘तपन मला आवडतो. तो फार सज्जन व्यक्ती आहे. आणखी काय बोलू? आमच्या कंपनीला अजून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.’’ चित्रानं म्हटलं.

‘‘मग अजून पुन्हा वाट बघावी लागेल?’’ आईनं विचारलं.

‘‘आता नाही वाट बघायची,’’ चित्रा म्हणाली.

तपननं फोन घेतला. तिचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, ‘‘एक सरप्राइज माझ्याकडूनही देतो. मला कंपनीनं दोन प्रमोशन्स एकदम दिली आहेत आणि कोलकत्त्याला बदलीही केली आहे. आठवड्याच्या आत मी तिथं जॉईन होतोय.’’

‘‘आईंना घेऊन लवकर ये. मी अन् माझे आईवडिल वाट बघतोय. आईंना सांग, नो मोअर वाट बघणं… आता त्या म्हणतील तसंच मी करणार.’’ चित्रानं सांगितलं. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

ते खरंच होतं का?

कथा * गरिमा पाठक

श्रेयानं कपाट आवरायला घेतलं होतं. ड्रॉव्हर स्वच्छ करताना तिला एका डबीत विपुलनं दिलेली खड्याची अंगठी दिसली. तिला विपुलला विसरायचं होतं. त्याची कुठलीही आठवण नको होती. वरवर कितीही प्रयत्न केले तरी मनाच्या तळाशी दडून बसलेली आठवण अशा काही प्रसंगांमुळे उसळून वर यायचीच. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं, त्यानंच आयुष्यातलं सगळ्यात जास्त दु:ख दिलं.

तिच्या सत्ताविसाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीचा दिवस. त्याच दिवशी विपुल अन् नेहा, तिची धाकटी बहीण, दोघांनाही तिनं गमावलं होतं.

ज्या बहिणीसाठी ती नेहमीच ढाल बनून उभी असायची. तिनेच श्रेयाच्या विपुलला तिच्यापासून हिसकावलं होतं. आई गेल्यानंतर तिनं नेहाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. ती विपुलला नेहमी म्हणायची, ‘‘नेहा माझी बहीण नाही, मुलगी आहे. तिला मी फुलासारखी जपते. तिला मी दु:खी अवस्थेत बघूच शकत नाही,’’ त्याच बहिणीनं श्रेयाला डोंगराएवढं मोठं दु:ख दिलं होतं. त्यातून बाहेर पडताना श्रेयाला किती कष्ट झाले होते.

तिचं मन कडू आठवणींनी विपष्ण झालं. विपुलची आठवण आली की नेहमीच असं व्हायचं.

‘‘श्रेया…,श्रेया…कुठं आहे, तू?’’ ज्ञानेश्वरच्या तिच्या नवऱ्याच्या हाकांनी ती भानावर आली.

श्रेया खोलीबाहेर येताच ज्ञानेश्वरनं म्हटलं, ‘‘आज आपल्याला नमनकडे जायचंय, विसरलीस का?’’

‘‘खरंच की! मी विसरलेच होते…मी आवरते हं लवकरच!’’?श्रेयानं म्हटलं. ती भराभर आवरू लागली. आरशासमोर मेकअप करताना तिनं स्वत:लाच दटावलं, ‘‘इतकी का ती आहारी जातेस जुन्या आठवणींच्या? विपुल गेला सोडून तर जाऊ देत ना? आपणही त्याला विसरायला हवं. असं रडत बसून कसं चालेल? तुला ज्ञानेश्वरसारखा भक्कम आधार मिळाला आहे ना? झालं तर मग!’’

ज्ञानेश्वरबद्दल तिच्या मनात अपार आदर दाटून आला. किती प्रेम करतो तो श्रेयावर. ती त्याच्या आवडीची निळी साडी नेसली. त्यावर शोभणारे दागिने व सुंदरसा अंबाडा घालून ती समोर आली, तेव्हा ज्ञानचे डोळे आनंदानं चमकले. पसंतीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मुलगा सौरभ, ज्ञान व ती असे तिघं खूपच दिवसांनंतर एकत्र बाहेर पडले होते. सौरभची लाडीक बालसुलभ बडबड ऐकत असताना श्रेयाच्या मनावरचं मळभ सहजच दूर झालं. नमनकडे त्याच्या मुलाचा साखरपुडा होता. खूपच आनंदी अन् उत्साहाचं वातावरण होतं. श्रेया त्या वातावरणात मुक्तपणे वावरली अन् तिनं ज्ञानसोबत डान्सही केला.

तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघते तो एक वयस्कर स्त्री होती. श्रेयाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. ती भयचकित नजरेनं तिच्याकडे बघू लागली.

ती स्त्री विपुलची आई होती. त्यांच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच वासल्य होतं. अचानक त्यांना बघून श्रेयाला काहीच सुधरेना अन् मग एकाएकी त्या स्त्रीला मिठी मारून श्रेया गदगदून रडू लागली. मनातल्या भावना अश्रूवाटे व्यक्त झाल्या.

त्या बाई तिला हळूवारपणे थोपटत होत्या जणू तिची वेदना, व्यथा त्यांना कळत होती. श्रेया प्रथमच अशी व्यक्त झाली होती. खरं तर श्रेयानंच त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्याशीच नाही तर विपुलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्रत्येत आठवणीशी तिनं फारकत घेतली होती. तिला कुठूनही विपुलशी, त्याच्या नावाशी संपर्क नको होता. पण आज विपुलची आठवण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती.

एकाएकी ती भानावर आली. हे काय करतेय ती? का अशी कुणापुढे हतबल होतेय? जुन्या आठवणीत गुंतायचं नाहीए तिला.

ती झटकन् त्यांच्यापासून दूर झाली. समोर ज्ञान उभा होता. ती अश्रू लपवत तिथून निघून वॉशरूममध्ये शिरली. ज्ञान विपुलच्या आईबरोबर बोलत होता.

परतीच्या वाटेवर श्रेया अभावितपणे विपुलचाच विचार करत होती. तिचं मन तडफडत होतं, ज्या विपुलसाठी सगळं जग सोडायला तयार होती, त्यालाच आयुष्यातून वजा करून ती जगत होती. मस्ती करून, पक्वान्नांवर ताव मारून सौरभ झोपला होता. ज्ञान सावधपणे गाडी चालवत होता.

रात्रभर श्रेया प्रयत्न करूनही विपुलच्या आठवणींमधून स्वत:ला मुक्त करू शकली नाही. जुने क्षण, जुने प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहत होते. हातात हात घालून त्यांनी दोघांनी भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवली होती. किती गुजगोष्टी करत बसायची ती दोघं. विपुल शांत, समजूतदार होता.

आजपर्यंत श्रेयाला कळलं नाहीए की त्याची अन् नेहाची इतकी सलगी कधी अन् केव्हा झाली…विपुलनं नेहासाठी श्रेयाला दूर लोटलं. दुधातल्या माशीप्रमाणे आयुष्यातून काढून टाकलं.

श्रेयाचा विपुलवर किती विश्वास होता. तो तिचा विश्वासघात करेल असा स्वप्नांतही विचार केला नव्हता. तिनं आणि तिची लाडकी बहीण नेहा…तीही अशी वागेल याची तरी कुठं कल्पना होती तिला. नेहा कॉलेजच्या फायनल ईयरला होती. तिचं इंग्रजी थोडं कच्चं होतं. श्रेयानंच विपुलला म्हटलं होतं की नेहाला जरा अभ्यासात मदत कर. आपण आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय हे तेव्हा श्रेयाला समजत नव्हतं.

त्या दिवशी कॉलेजमधून थकून भागून आलेली नेहा भयंकर काळजीतही होती. एकाएकी श्रेयाला मिठी मारून ती जोरजोरात रडायला लागली. पाठोपाठ विपलुही घरात आला. श्रेयानं त्याला बसायची खूण केली अन् ती नेहाला थोपटून शांत करू लागली. तेवढ्यात विपुल म्हणाला, ‘‘श्रेया, तुझ्याशी जरा बोलायचं आहे.’’

‘‘बोलूयात आपण, पण आधी जरा नेहाला शांत करू देत…नेहा, काय झालंय? का रडतेस?’’

‘‘मी कारण आहे तिच्या रडण्याचं,’’ विपुलनं सांगितलं.

‘‘म्हणजे?’’

श्रेयाला काहीच कळेना.

‘‘म्हणजे माझ्यामुळेच नेहा रडतेय.’’

‘‘काय बोलतो आहेस, मला काहीच कळत नाहीए.’’ श्रेयाला अजुनही उलगडा होत नव्हता.

‘‘मला ठाऊक आहे श्रेया, तुला समजायला हे कठीण आहे, पण मला समजून घे. माझा अगदी नाईलाज आहे. मी नेहाच्या प्रेमात पडलोय…मला हिच्याशीच लग्न करायचंय. मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही.’’

‘‘काय?’’ श्रेया केवढ्यांदा किंचाळली. ‘‘तू? तू नेहावर प्रेम करतो आहेस? अन् मग मी माझ्यावर प्रेम करत होतास ना? की ती एक फालतू गोष्ट होती? मनोरंजन, वेळ घालवण्यासाठी एक पोरखेळ नाही विपुल, नाही, माझा यावर विश्वास बसत नाहीए.’’

ती वळली. तिनं लगेच नेहाचे खांदे धरून तिला विचारलं, ‘‘नेहा, विपुल काय म्हणतोय? काय आहे हे सगळं? तो खोटं सांगतोय ना? तू खरं खरं सांग…नेहा सांग!!’’

‘‘ताई, अगं, मला ठाऊक नाहीए…माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते…मी तुला काय सांगू?’’

‘‘फक्त एवढंच सांग की तू आणि विपुल एकत्र आयुष्य घालवणार आहात का? विपुल म्हणाला ते खरं आहे का?’’

नेहानं मान खाली घातली अन् होकारार्थी हलवली. आता श्रेयाकडे विचारण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काहीच नव्हतं. डोक्यावर धाडकन् काही पडावं तसं वाटलं तिला. ती तिथून उठली अन् आपल्या खोलीत जाऊन अश्रूंना वाट करून दिली.

त्यानंतर विपुल कधी श्रेयासमोर आलाच नाही. त्यानं श्रेयाच्या बाबांजावळ नेहाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा घरात वादळच उठलं. घरात श्रेया अन् विपुलच्या लग्नाची तयारी चालू होती अन् इथं मात्र वेगळंच घडलं होतं. घरात आधी वादळ अन् मग त्या नंतरची शांतता भरून होती.

श्रेयाला तर काय करावं, कसं वागावं समजत नव्हतं. विपुलनं लग्नाला परवानगी देत नाहीत म्हणताना नेहाला घेऊन गावच सोडलं…तो लांब कुठं तरी निघून गेला, कुठं गेला हेही फारच कमी लोकांना ठाऊक होतं.

श्रेयाच्या घरच्यांनी विपुल अन् नेहाशी संबंधच तोडले. विपुलनंही परत कधी विचारपूस केली नाही…श्रेयाची प्रेमकहाणी तिचं आयष्य उद्ध्वस्त करून संपली.

काही दिवस सगळ्यांचेच विचित्र अस्वस्थतेत गेले. हळूहळू पुन्हा आयुष्य पूर्वपदावर आलं. घरच्यांनी स्थळं बघायला सुरूवात केली अन् ज्ञानेश्वर सगळ्यांना पसंत पडला. आयुष्याचा डाव पुन्हा मांडण्यासाठी श्रेयाला स्वत:शीच खूप झगडावं लागलं. तिनं ज्ञानशी लग्न केलं पण मनातून पहिलं प्रेम जात नव्हतं. ती मोकळेपणानं ज्ञानला साथ देऊ शकत नव्हती. ज्ञानही समजूतदार होता. त्यानं श्रेयाला समजून घेतलं. सौरभचा जन्म झाल्यावर श्रेयाला आयुष्यात पुन्हा रस वाटू लागला.

सगळी रात्र जुन्या आठवणींच्या आवर्तात गेली. सकाळी उठली तेव्हा श्रेयाचं डोकं जड झालेलं होतं. कशीबशी कामं आटोपत होती. सौरभ शाळेला अन् ज्ञान ऑफिसात गेल्यावर थोडा वेळ झोपावं असा तिनं विचार केला होता. बारा वाजून गेले होते. आता आडवं व्हावं असा विचार करत असतानाचा दराची घंटी वाजली. थोडं वैतागूनच तिनं दार उघडलं अन् ती चकित झाली.

समोर विपुल उभा होता. दमलेला, थकलेला, त्रासलेला…आजारी दिसत होता. क्षणभर श्रेयाला ओळखता आलं नाही. काळे केस पांढरे झाले होते. तजेलदार रंग फिकटला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं…

श्रेयाला अवघडल्यासारखं झालं, ‘‘तू…इथं? तू माझ्याकडे कशाला आला आहेस विपुल? मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीए.’’

‘‘खरंय श्रेया, पुन्हा नाही मी येणार…फक्त हे पत्र तुला द्यायला आलो होतो.’’ हातातलं पाकिट तिला देत तो बोलला. त्याचे डोळे भरून आले होते. पत्र तिला देऊन तो त्वरेनं निघून गेला.

श्रेया अवाक् होऊन काही वेळ तिथंच उभी होती. ज्या व्यक्तिला क्षणभरही आठवायचं नाही असं तिनं ठरवलेलं असतानाच तिच व्यक्ती तिच्या दारी आली होती. तिच्या नकळत तिच्या मनात इच्छा होती की ज्यानं तिला दुखावलं त्यालाही कधी सुख मिळू नये. पण आज त्याला अशा अवस्थेत, डोळ्यांत अश्रू घेऊन उभा असलेला बघून तिला गलबलून आलं. ती दारातून घरात आली. एक दीड तास काहीच न सुचून वेड्यासारखी या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. शेवटी धाडस करून तिनं ते पाकीट उघडलं. हात थरथरत होते. बहिणीचं अक्षर बघून तिला त्या पत्राचा मुका घ्यावासा वाटला…पण दुसऱ्याच क्षणी तिरस्कार उफाळून आला. तिनं पत्र वाचायला सुरूवात केली.

‘‘ताई, क्षमा मागायचा हक्क नाहीए मला, तरी क्षमा मागतेय…हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत कदाचित मी या जगातून गेलेली असेन. इतके दिवस काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. पण आता खरं काय ते सांगते म्हणजे मी मरायला मोकळी.’’

‘‘ताई, माझं विपुलवर किंवा विपुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं…नाहीए…विपुल फक्त तुझेच आहेत. तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांचं अन् म्हणूनच तुझ्या लाडक्या बहिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली…माझ्याशी लग्न केलं. ताई कुणा एका नराधमानं मला नासवलं. त्या प्रकारामुळे मी फार कोलमडले होते. तरीही मी त्याला लग्नाची गळ घालणार होते, पण त्यापूर्वीच एका अपघातात तो मरण पावला. मी सुटकेचा नि:श्वास सोडला, पण माझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता…मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी मला तपासलं अन् सांगितलं की आता गर्भपात जिवावरचा ठरेल.

‘‘मी वेड्यासारखी रडत होते…काय करू सुचत नव्हतं. नेमके त्याचवेळी कुणा नातलगाला घेऊन विपुल डॉक्टराकंडे आले होते. त्या क्षणी ते भेटले नसते तर मी विष खाऊन जीव देणार होते. तसं ठरवलंच होतं, पण विपुलनं तुझी शपथ घालून खरं काय ते माझ्याकडून काढून घेतलं. मी खूप घाबरले होते. बाबांच्या इभ्रतीची काळजी होती. ते हार्ट पेशंट होते. त्यांना हार्ट अॅटक येऊ शकला असता. मी स्वत:ला क्षमा करू शकत नव्हते.

‘‘पण विपुलनं धीर दिला. यातून मार्ग काढू म्हणाले म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. इतक्या लांब बदली करून घेतली…माझ्या प्रेगनन्सीबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही.

मी विचार केला होता की सगळं व्यवस्थित पार पडलं की मी पुन्हा तुझ्याकडे येईन. खरं काय ते सांगेन. पण विपुलनं मला अडवलं. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबायला हवं. तुझ्या लग्नाबद्दल कळलं होतं. पण माझ्या येण्याचा अपशकुन नको म्हणून नाही आले…तुझ्यासमोर येण्याचं धाडसही नव्हतं.

‘‘ताई मला क्षमा कर. आयुष्य संपत आलंय माझं. एक गोष्ट अगदी खरी की माझी काळजी घेतली विपुलनं, माझ्या मुलाला स्वत:चं नाव दिलं, पण त्यांनी मला कधी स्पर्शही केला नाही. मलाही फक्त त्यांचा आधार मिळाला. ते तुझेच आहेत…जमल्यास माझ्या मागे त्यांची काळजी घे.’’

– तुझीच अभागी बहीण नेहा.

पत्र वाचता वाचता श्रेयाला रडू अनावार झालं. किती भोगलं बिचारीनं…अन् विपुल केवढा महान, किती त्याग केला त्यानं प्रेयसीच्या बहिणीसाठी…तिला भेटायला हवं…कुठं…कसं? विपुल तर केव्हाचाच निघून गेला होता.

अंथरूणावर पडून रडता रडता थकून तिला कधीतरी झोप लागली. पत्रं हातात तसंच होतं. तिला जाग आली तेव्हा ज्ञान ऑफिसातून परतला होता. चहा करून घेत होता. ती धडपडून उठली. तेवढ्यात चहाचे कप घेऊन ज्ञानच खोलीच आला.

‘‘चहा घे…आपल्याला जरा बाहेर जायचं आहे,’’ तो गंभीरपणे म्हणाला.

‘‘सॉरी, मी नाही येऊ शकत…’’ ती थकलेल्या आवाजात म्हणाली.

‘‘श्रेया, नाही म्हणू नकोस. तुला यावंच लागेल.’’ ज्ञानच्या आवाजात जरब होती.

जायची तर अजिबात इच्छा नव्हती. कुठं जायचं तेही ठाऊक नव्हतं. पण न जाण्याचं कारण तरी काय सांगणार होती ती? मुकाटयानं आवरून गाडीत जाऊन बसली. ज्ञान न बोलता गाडी चालवत होता. एका मोठ्या हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून ज्ञाननं म्हटलं, ‘‘श्रेया, तुझ्या बहिणीला भेटून ये.’’ त्याच्या आवाजात आता जरब नव्हती, कोवळीक होती.

‘‘काय म्हणताय तुम्ही?’’ दचकून श्रेयानं म्हटलं अन् तिला एकदम रडूच फुटलं.

तिला थोपटून शांत करत तो म्हणाला, ‘‘ही वेळ बोलत बसण्याची नाही. ताबडतोब नेहाला भेट.’’ त्यानं तिला आधार देऊन गाडीतून उतरवलं.

दोघंही जवळजवळ धावतच आत गेले. वॉर्डमधल्या बेडवर नेहा अखेरचे क्षण मोजत होती. खरं तर ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तिचं आयुष्य व्यापलं होतं…त्यानंच कॅन्सरच्या दुखण्याला जन्म दिला होता.

श्रेयाला बोलवत नव्हतं, पण तिचा स्पर्श होताच नेहानं डोळे उघडले…श्रेयाला बघताच तिने टाहो फोडला.

‘‘ताई, मला क्षमा कर…मी तुझी अपराधी आहे.’’

‘‘नको गं असं बोलू..दोष तुझा नव्हता, तुझ्या नशिबाचा होता. स्वत:ला दोषी मानू नकोस.’’

‘‘मी आता वाचणार नाही ताई, तुला भेटायलाच जीव अडकला होता. फक्त विपुलना क्षमा कर.’’ तिनं शेजारी उभ्या असलेल्या विपुलचा हात श्रेयाच्या हातात दिला. विपुलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. दाटलेल्या कंठानं श्रेयानं म्हटलं, ‘‘नेहा, विपुलची तर काही चूकच नाहीए. त्यानं तर स्वत:ची आहुती दिली आहे. मी कोण त्याला क्षमा करणार?’’

नेहाच्या चेहऱ्यावर संतोष झळकला. बराच वेळ श्रेया नेहाचा हात हातात घेऊन बसली होती.

डॉक्टरांनी उपचार संपल्याचं सांगून टाकलं होतं. काही तास फार तर नेहानं काढले असते. ज्ञानेश्वनंही नेहाच्या माथ्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला. विपुलशी हस्तांदोलन करून त्यानं श्रेयाला निघायची खूण केली.

किती वर्ष मध्ये गेली. लाडकी धाकटी बहीण शेवटी का होईना भेटली. मनातलं किल्मिष नाहीसं झालं. विपुलचा मोठेपणा प्रत्ययाला आला…आता मनात राग, चीड, तिरस्कार काहीही नव्हतं. फक्त प्रेम अन् प्रेमच होतं.

पण त्याच क्षणी तिला ज्ञानेश्वरचा मोठेपणाही आठवला.

‘‘ज्ञान, तुम्हाला कसं समजलं, नेहा इथं आहे?’’

‘‘अगं, तू रडता रडता झोपली होतीस, मी घरात आलो तेव्हा पत्र तुझ्या हातात होतं. मी ते वाचलं…मलाही फार वाईट वाटलं…तुझी व नेहाची भेट तर व्हायलाच हवी…मला एकदम विपुलची आई आठवली. नमनकडच्या पार्टीत त्या भेटल्या होत्या…मी त्यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवला होता. मी त्यांना फोन केला…त्यांच्याचकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळाला.’’

श्रेयाच्या मनात ज्ञानबद्दल अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं म्हटलं, ‘‘तुमचे उपकार कसे फिटतील…किती चांगले आहात तुम्ही…’’

‘‘माझे नाही, विपुलचे उपकार मानले पाहिजेत नेहा, त्यानं खरोखर फार मोठा त्याग केलाय. त्याला सांभाळणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याला एकटा पडू द्यायचं नाही. आपल्या घराशेजारीच एखादं घर घेता आलं तर आई, विपुल अन् नेहाचा मुलगा आपल्या सोबतीनं राहू शकतील.’’

‘‘ज्ञान, किती मोठं मन आहे तुमचं…माझं भाग्य म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात…माझं अन् विपुलचं नातं जेवढं मला समजलं नव्हतं, तेवढं तुम्ही समजून घेतलंत…माझी मन:स्थिती जाणून घेऊन नेहाशी माझी भेट घडवून आणलीत. नेहाच्या मृत्युनंतर विपुल किती एकटा पडेल हेही तुम्हालाच समजलं. खरोखर तुम्ही थोर आहात. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले…मला क्षमा करा.’’ श्रेया भरल्या गळ्यानं म्हणाली.

ज्ञाननं हसून तिला आश्वस्त केलं. सगळीच नाती आता स्पष्ट झाली होती.

लज्जास्पद नातं

कथा * कुमुद भटनागर

नितीनच्या आयुष्यात सुख कधी आलंच नाही असं तर म्हणता येणार नाही. पण ते सुख श्रावणातल्या उल्हासासारखं अल्प काळासाठी यायचं. सुख आलंय म्हणेपर्यंत दु:खाचे काळे ढग त्याला झाकून टाकायचे. स्मित हास्याचं रूपांतर मोकळेपणाने हसण्यात होतंय, तोवर डोळ्यांतून दु:खाश्रू गळायला लागायचे.

तसे तर नितीनचे बाबा एक प्रसिद्ध डॉक्टर होते. पैसाही भरपूर कमवत होते. पण घरात मुलंही भरपूर होती. एवढ्या सगळ्यांच्या सगळ्या हौशी पूर्ण करणं किंवा जो जे मागेल ते त्याला देणं शक्यच नव्हतं. नितीन तसा खूपच हौशी अन् रसिक होता. आपल्या हौशी पूर्ण करण्याचा एकच मार्ग त्याच्या लक्षात आला होता की या क्षणी सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचं, उत्तम मार्क मिळवून चांगली नोकरी मिळवायची. मग तो आणि त्याचा पैसा अन् त्याच्या हौशी अन् आवडी.

काही वर्षांतच त्याची इच्छा पूर्ण झाली. भरपूर पगाराची उत्तम नोकरी मिळाली. त्या आनंदाप्रीत्यर्थ दिलेल्या पार्टीतच बाबांना जबरदस्त हार्ट अटॅक आला अन् ते हे जग सोडून गेले. सगळंच वातावरण दु:खाने व्यापलं. सात बहीणभावांत नितीन तिसऱ्या क्रमांकावर होता. बाबांच्या हयातीत सर्वात थोरला लेक व त्याच्यापाठची बहीण एवढ्यांचीच लग्न झाली होती. बाकीची सर्व मुलं अजून शिकत होती.

नितीनने दु:खात बुडालेल्या आईला धीर दिला. तिला वचन दिलं की तो सर्व धाकट्या बहीणभावंडांची जबाबदारी घेईल. त्यांची आयुष्य मार्गी लागल्याखेरीज तो स्वत: लग्न करणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आपल्या हौशी, आपल्या आवडी एवढंच काय, स्वत:च्या करियरचीही आहुती दिली.

खरं तर दुसऱ्या शहरात त्याला अधिक पगाराची नोकरी मिळत होती. पण नितीनने आपलं शहर सोडलं नाही; कारण एक तर इथे रहायला स्वत:चं घर होतं. दुसरं म्हणजे त्याच्या असण्यामुळेच आई अन् इतर भावंडं स्वत:ला सुरक्षित समजत होती. त्याच्याशिवाय राहाण्याची कल्पनाही आईला असह्य वाटायची.

इथेच राहून तो कष्ट करत वरची प्रमोशन्स घेत गेला. दुसऱ्या शहरात राहाणाऱ्या विवाहित भावानेही आपल्या परीने मदत केली. धाकटी भावंडं शिकत गेली, नोकरीधंदा बघून घरातले काही खर्च स्वत:कडे घेतले.

काही वर्षांत सगळं स्थिरस्थावर झालं. मध्यंतरी आईची प्राणज्योतही मावळली. फक्त धाकटी विभा व तिच्याहून लहान निखिल यांचं लग्न व निखिलचं शिक्षण व्हायचं होतं. इतरांचे संसार सुरू झाले होते, त्यांचे त्यांना खर्च होतेच म्हणून नितीनने या दोघांची जबाबदारी एकट्यानेच घ्यायची ठरवलं. प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेऊन विभाने पसंत केलेल्या मुलाशी तिचं लग्न थाटात करून दिलं. निखिलला मेडिकलला अॅडमिशन मिळाली.

निखिल डॉक्टर झाला. त्याला नोकरीही लागली अन् रहायला क्वार्टरही मिळालं. आता त्या घरात नितीन एकटाच उरला. एकेकाळी अपुरं वाटणारं ते घर आता खूपच मोकळं अन् मोठं वाटत होतं. गावातल्या दोघी बहिणी त्याची काळजी घ्यायच्या. इतर भाऊबहिणीही संबंध ठेवून होते. फक्त कन्याकुमारीला असणारा निखिल तेवढा त्याच्याशी बोलत नव्हता. त्याने नितीनबरोबरचे संबंध पूर्णपणे तोडले होते. इतरांशी तो पत्राने, फोनने संबंध ठेवून होता. इतरांकडून त्याची ख्यालीखुशाली कळत होती म्हणून मग नितीननेही त्याचं वागणं मनावर घेतलं नव्हतं.

गावातल्या एका बहिणीच्या, शोभाच्या मुलीचं लग्न ठरलं. तारीख, तिथी नक्की झाली अन् तिच्या नवऱ्याला कंपनीच्या कामाने परदेशी जावं लागलं. ही संधी त्याला नाकारता येत नव्हती; कारण पुढलं बरंच काही या कामावर अवलंबून होतं. लग्नतिथीच्या दोन दिवस आधी फक्त तो आपल्या घरी पोहोचणार होता. मुलाकडची मंडळी लग्नाची तारीख बदलायला तयार नव्हती. शोभाला खूपच टेन्शन आलं. लग्नाची एवढी व्यवस्था, सर्व तयारी ती एकटी कशी करणार?

‘‘तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना तुझ्या मदतीला? तुझ्या नवऱ्यापेक्षा अधिक एफिशियन्ट आहे अन् मला तुम्हा सगळ्यांच्या लग्नाचा अनुभवही आहेच! तू अजिबात काळजी करू नकोस.’’ नितीनने तिला दिलासा दिला.

आणि खरंच नितीन तिच्या मदतीला आला. एक दिवस बाहेरून येणाऱ्या मंडळींची यादी करत असताना त्याने म्हटलं, ‘‘निखिलला आग्रहाने बोलाव गं! त्या निमित्ताने तरी त्याची भेट होईल. किती दिवसांत बघितलंही नाहीए त्याला.’’

‘‘होय दादा, आम्हालाही तसंच वाटतंय, तो यायला तयारही आहे, पण त्याने घातलेली अट आम्हापैकी कुणालाही मान्य नाहीए,’’ शोभा सांगताना खूपच संकोचली.

‘‘अरेच्चा? अशी कोणती अट घातलीए त्याने?’’

‘‘त्याची अट आहे की तू लग्नात नसावंस. तो तुला भेटू इच्छित नाही.’’

‘‘अगं पण का?’’ नितीन दचकलाच! ज्या निखिलच्या शिक्षणाच्या कर्जाचे हप्ते तो आजतागायत फेडतोय, लिझ्शी ओळख करून देताना ज्याने म्हटलं होतं की हा माझा दादा नसता तर ती डॉक्टरच काय, पण साधा माणूसही होऊ शकलो  नसतो तोच निखिल, त्याच दादाला भेटू इच्छित नाही? हे कसं शक्य आहे? अन् का?’’

शोभा गप्पच होती. नितीनने पुन्हा विचारलं, ‘‘निखिल मला भेटायला नाही का म्हणतोय?’’

‘‘कारण लिझाच्या मृत्युला तू जबाबदार आहेस असं त्याचं म्हणणं आहे.’’

‘‘काय बोलतेस तू?’’ चकित होऊन नितीन किंचाळला. ‘‘तुला ठाऊक तरी आहे लिझा कशी मेली ते? पण तुला कुठून ठाऊक असणार? त्यावेळी तू जर्मनीला गेलेली होतीस. ऐकायचीय ती सगळी घटना?’’

‘‘हं! सांग तू.’’

नितीन अस्वस्थपणे खोलीत फेऱ्या मारत होता. कुठून, कशी सुरुवात करावी तेच त्याला समजत नव्हतं. शेवटी त्याने सांगायला सुरुवात केली.

‘‘त्यावेळी मी आपल्या घरात एकटाच राहात होतो. निखिलला शहराबाहेरच्या एका हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट डॉक्टर म्हणून जॉब मिळाला. त्याला तिथेच राहण्याचीही सोय होती. एक दिवस अचानक मला फोन केला की मी सायंकाळी लवकर घरी यावं, तो मला कुणाला तरी भेटवणार आहे. त्या दिवशी जरा जास्तच उकाडा होता म्हणून मी गच्चीवरच चहाफराळाची व्यवस्था केली. थोड्याच वेळात लिझाला घेऊन निखिल घरी आला. ती दोघं हायस्कूलात असल्यापासून एकमेकांवर प्रेम करत होती, अन् आता दोघंही डॉक्टर ?झाल्यावर त्यांना लग्न करण्याची इच्छा होती, पण मी परवानगी दिली तरच!

‘‘लिझा मला एकदम आवडली. खूपच गोड अन् नम्र स्वभावाची होती. तिच्या येण्याने आपल्या त्या घरात जणू एकदम चैतन्य आलं. मी म्हटलं, ‘‘तुम्हा दोघांचं लग्न मी आनंदाने लावून देईन. पण लिझाच्या घरातून एका हिंदू कुटुंबातल्या मुलाशी लग्न करण्याला परवानगी आहे का?’’

‘‘त्यावर लिझा म्हणाली, ‘‘निखिलच्या कुटुंबाने जर मला प्रेमाने स्वीकारलं तर माझ्या आईलाही हे लग्न पूर्णपणे मंजूर आहे.’’

‘‘मी लिझाला म्हटलं, ‘‘निखिल आमच्या घरातला सगळ्यात धाकटा भाऊ असल्याने सगळ्यांचाच लाडका आहे. त्याचा आनंद तो आमचा सर्वांचा आनंद. आमच्या घरात अजून परधर्माची कुणी मुलगी सून म्हणून आली नाहीए, पण मीही लवकरच एका ख्रिश्चन स्त्रीशी लग्न करणार आहे. तीही माझ्याप्रमाणेच एकटी आहे. मी तर निखिलचं लग्न कधी होतंय याचीच वाट बघत होतो. तो एकदा चतुर्भुज झाला की मी आईला दिलेल्या वचनातून मुक्त होईन व माझं आयुष्य जगायला मोकळा होईन.’’

‘‘हे ऐकून निखिललाही खूप आनंद झाला. त्याने विचारल्यावर मी सांगितलं की मी जिच्याशी लग्न करणार आहे ती स्त्री एका मल्टिनॅशनल कंपनीतल्या चेयरमनची सेक्रेटरी आहे. ऑफिसच्या कामासंदर्भातच आमच्या भेटी व्हायच्या. त्यातून मैत्री झाली. तिने मला आधीच सांगितलं की मी तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही विचारू नये. मीही त्याबाबतीत काही विचारलं नाही, ती विधवा आहे की परित्यक्ता तेही मला ठाऊक नाही. तिने सांगितलं की, मैत्रीसाठीसुद्धा ती थोडाच वेळ देऊ शकते; कारण नोकरी अन् तिच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या यामुळे तिच्याजवळ वेळ कमी असतो. मीही तिला सांगितलं की जबाबदारी मलाही आहे. वेळ अन् पैसा दोन्हींचा अभाव मलाही जाणवतो, त्यामुळेच लग्नाबद्दल सध्या विचारही करता येणार नाही.

निखिल अन् लिझाने अधिक उत्सुकता दाखवत आमच्या या प्रेमप्रकरणाबद्दल विचारल्यावर मी सांगितलं की माझ्या बोलण्यामुळे तीही आश्वस्त झाली अन् मैत्रीचा हात तिने पुढे केला. अधुनमधून मिळणारा रिकामा वेळ आम्ही एकत्र घालवू लागलो. त्यामुळे आमच्या वैराण आयुष्यात खरोखरच थोडी गंमत आली.

‘‘आम्ही दोघांनीही इतकी वर्षं स्वत:चा कधी विचारच केला नव्हता; म्हणजे तशी उसंतच मिळाली नव्हती. आता आम्ही स्वत:विषयीही विचार करू लागलो. आम्ही दोघं नेहमीच बोलून दाखवायचो की जेव्हा आमच्या जबाबदाऱ्या संपतील तेव्हा सगळा वेळ आम्ही एकत्र राहू व एकमेकांसाठी वेळ देऊ. काय काय करायचं, कुठे कुठे जायचं याची खूप स्वप्नं आम्ही रंगवली आहेत.’’

‘‘हे ऐकून निखिल एकदम भावनाविवश झाला. म्हणाला, ‘‘दादा, किती सोसलंस रे आमच्यासाठी, अरे, जोवर आपण एकटे असतो तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा कुणाच्या प्रेमात पडलो की मग त्या व्यक्तीपासून दूर राहाणं खूपच अवघड होतं.

‘‘मी त्याला गमतीने विचारलं की तो माझ्यापासून इतकी वर्षं दूर राहिला? तेव्हा तो म्हणाला की एक तर आर्थिकदृष्ट्या त्याला स्वावलंबी व्हायचं होतं व पैसा साठवायचा होता. दुसरीकडे लिझाचंही शिक्षण सुरू होतं. पण आता तीही डॉक्टर झाली आहे. मग त्याने मला म्हटलं, दादा आता मी वेगळा राहातोय अन् कमवायलाही लागलोय तर तू आता लग्न का करत नाहीस?

‘‘कारण तुझ्या होणाऱ्या वहिनीला अजून काही दिवसांचा अवधी हवा आहे,’’ मी म्हटलं.

‘‘यावर तो म्हणाला, ‘म्हणजे अजून तुझं ब्रह्मचर्य संपायचं नाहीए?’

‘‘मी हसून म्हटलं, ‘तू हे घर सोडून गेलास त्या दिवसापासून माझं ब्रह्मचर्य संपलं. एकटाच असतो त्यामुळे कुणाचा धाक नाही, वेळही भरपूर असतो. तिला वाटतं, तेव्हा ती इथे येते अन् आम्ही मुक्त पाखरांप्रमाणे इथे मजेत वेळ घालवतो.’

‘‘लिझा अन् निखिल थोडे आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. मी काही क्षण गप्प बसलो. मग काय वाटलं कुणास ठाऊक, मी म्हणालो, तुम्ही दोघं डॉक्टर आहात. शरीरशास्त्र जाणता, तरीही जीवनातील शाश्वत सत्य व शरीरसुखाबद्दल बोलतोय तर असे संकोच का करता? लवकर लग्न करा आणि वैवाहिक सुखाचा आनंद घ्या. तुम्हाला तर सर्व ठाऊकच असेल. मी तर बालब्रह्मचारी. तिला खेटून बसायला मिळालं तरी सुखावत होतो. पण तिचं लग्न झालेलं, वैवाहिक सुखाचा तिला अनुभव. त्यामुळे तिनेच मला यापुढे एक एक कसं घडतं ते सांगितलं. अजूनही म्हणते यापुढेही बरंच काही आहे, पण ते आपल्या नात्यावर, समाजाच्या अन् कायद्याच्या मान्यतेचा शिक्का लागल्यावर. मीही त्याचीच वाट बघतोय.

‘‘तेवढ्यात माझ्या मोबाइलची घंटी वाजली. फोन तिचाच, सिल्व्हियाचाच होता. ती थोड्याच वेळात इथे पोहोचतेय असं तिने सांगितलं. मी उत्साहाने निखिलला म्हटलं की योगायोग बघ, तुझ्या वहिनी आताच इथे येतेय, तिला भेटूनच तुम्ही निघा. अन् मग त्याला डोळा मारून गंमत करण्यासाठी पुढे म्हटलं, पण भेटून लगेच निघा हं! आमचा फार वेळ घेऊ नका.

‘‘निखिल म्हणाला, आम्हालाही घाई आहे दादा, तू लग्नाला परवानगी दिल्याची बातमी आम्हाला लिझाच्या आईला सांगायचीय.

‘‘मी म्हणालो, तुझ्या वहिनीला विचारूया. तिची तयारी असली तर दोघा भावांची लग्नं एकदमच होऊ देत.

‘‘निखिलला ही कल्पना फारच आवडली. तो म्हणाला, मी लिझाच्या आईशी बोलतो अन् त्यांना ही कल्पना आवडली तर खरंच, दोन्ही लग्न एकदमच होतील.

‘‘तेवढ्यात खाली गाडीचा हॉर्न वाजला. हा तिच्याच गाडीचा हॉर्न होता. मी उत्साहाने म्हणालो, घ्या ती आलीच. लिझाने पटकन उठून गच्चीच्या कठड्यावरून वाकून बघितलं आणि, आणि कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच तिने कठड्यावर चढून खाली उडी मारली.

‘‘धावत धडपडत मी व निखिल खाली पोहोचलो तेव्हा लिझा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती अन् सिल्व्हिया तिची नाडी व श्वास बघत होती. ‘तुम्ही पटकन एक मोठी चादर आणा,’ तिने मला म्हटलं. मी खूप घाबरलो होतो. कसाबसा घरात गेलो व चादर आणली. त्यावेळी सिल्व्हिया निखिलशी बोलत होती. निखिल रडत होता, घाबरलेला होताच.

‘‘पोलीस केस होऊ नये म्हणून तुम्ही इथलं सगळं रक्त स्वच्छ करा. लवकर… प्लीज, मी हिला तिच्या घरी पोहोचवते. सिल्व्हियाने खूपच घाईने निर्णय घेतला.

‘‘चादरीत लिझाला गुंडाळून गाडीत घालून ती दोघं निघून गेली. मीही असा गडबडलो होतो की मलाही धड सुचत नव्हतं. फक्त सिल्व्हियाने सांगितल्याप्रमाणे मी तिथलं सगळं रक्त तेवढं धुऊनपुसून स्वच्छ केलं.

‘‘त्या रात्री सिल्व्हियाचा मोबाइल बंद होता. तिचा घरचा पत्ता अन् फोननंबर तिने मला दिला नव्हता. निखिलचा मोबाइलही बंद होता.

‘‘दुसऱ्या दिवशी सिल्व्हिया ऑफिसला आली नव्हती आणि हॉस्पिटलला फोन केला तेव्हा निखिलही तिथे नाही असं कळलं. त्या दोघांची मन:स्थिती बरोबर नसावी असं मला वाटलं. मलाही वारंवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेली लिझा आठवत होती. त्यामुळे मीही फोन बंदच ठेवला. दुसऱ्या दिवशीही दोघांचे मोबाइल बंद होते. मी निखिलच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा एक धक्कादायक बातमी समजली. निखिलने तिथली नोकरी सोडली होती, तो कुठे गेलाय कुणालाच ठाऊक नव्हतं.

‘‘निखिलच्या वागण्याने मी वैतागलो. इतर भावाबहिणींकडे त्याची तक्रार करायची असं ठरवलं, पण घरी गेल्यावर आणखी एक जबरदस्त धक्का मला बसला. कुरियरने सिल्व्हियाचं पत्र आलं की, हे पत्र मला मिळेपर्यंत ती या जगातून निघून गेलेली असेल.

‘‘मी सिल्व्हियाला विसरणं इतकं सोपं होतं का? मी दीर्घ सुट्टी घेऊन हिमालयात निघून गेलो. पण लहान वयापासून मला घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे काम करायची सवय! मी फार काळ बाहेर राहू शकलो नाही. माझ्याजवळ शिल्लक काही नाही अन् अजून कर्ज फिटायचं आहे; म्हणनू पुन्हा कामावर रुजू झालो. कामाखेरीज इतर कशात मन रमतही नाही. पण रक्ताची नाती सहसा तुटत नाहीत. तुला तुझ्या लेकीच्या लग्नाचं टेन्शन आलेलं बघून तुझ्या मदतीला आलोच ना? आता तूच सांग, लिझाच्या मृत्युला मी जबाबदार कसा?’’

‘‘दादा, तू ना, त्या दिवशी तुझ्या अन् सिल्व्हियाच्या नात्यातल्या जवळकीचा जरा उघडच उल्लेख केलास,’’ शोभा हळू आवाजात बोलली. तिला संकोच वाटत होता.

नितीन एकदम संतापला. तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तसंही घडलं समजा, पण त्यासाठी लिझाने गच्चीवरून उडी मारण्याची काय गरज? काय संबंध या दोन गोष्टींमध्ये?’’

‘‘दादा, लज्जास्पद वाटलं ते लिझाला; कारण सिल्व्हिया तिची आई होती.

क्रंदन

कथा * प्राची भारद्वाज

पीयूषनं दोन्ही बॅगा विमानांत चेक इन करून स्वत: आपल्या नवविवाहित पत्नीला हात धरून आणून सीटवर बसवलं. हनीमूनवर सगळंच कसं छान छान असतं ना? नवरा आपल्या बायकोची पर्सही स्वत:च सांभाळतो. ती दमली तर तिला उचलूनही घेतो. ती उदास आहे हे जाणवलं तर खंडीभर जोक सांगून तिला हसवायला बघतो.

पीयूष आणि कोकिळाचं लग्न ठरवून झालेलं होतं. नव्या लग्नाची नव्हाळी होती. एकमेकांकडे चोरून बघणं, हळूच हसणं, हात हातात घेणं हे सगळं त्यात आलंच. हनीमूनही खूप छान झाला. एकमेकांवर प्रेमाच वर्षाव केला. एकमेकांच्या इच्छा अपेक्षा समजून घेतल्या. मतं जाणून घेऊन मान दिला. कुटुंबियांची माहिती घेतली अन् छान संसार करण्याची वचनंही दिली घेतली.

पीयूषनं हनीमून ट्रीप सर्वार्थानं यशस्वी व्हावी म्हणून खूप श्रम घेतले होते. आपला आयुष्याचा जोडीदार उत्तम आहे याबद्दल कोकिळेच्या मनांत कुठलाही संशय नव्हता. पीयूष स्वत:चं काम मनापासून करत होता. भरपूर कष्ट करायचे आणि भरपूर पैसा मिळवायचा. काम प्रामाणिकपणे करायचं अन् खोटा पैसा घ्यायचा नाही. हेच वय कष्ट करण्याचं आहे, दमलो, थकलो म्हणायचं नाही, चिडचिड करायची नाही.

कोकिळानंही त्याची कमाई प्रेमानं, अभिमानानं हातात घेतली. गरजेवर आधी खर्च करायचा. काही रक्कम शिल्लक टाकायची. उगीच मोठेपणाचा आव आणायचा नाही हे तिनं ठरवलं होतं.

एक दिवस तिची मोलकरीण उशीरा आली.

‘‘कां गं उशीर केलास?’’ तिनं विचारलं.

आपल्या अंगावरचे वळ व सुजलेला चेहरा दाखवत मोलकरीण म्हणाली, ‘‘काय करू ताई? काल नवरा पुन्हा दारू पिऊन आला अन् तमाशा केला. स्वत: कमवत नाही, मला पैसे साठवू देत नाही. माझ्या पैशानं दारू पितो, आम्हालाच मारतो.’’

‘‘पण तू सहन का करतेस? म्हणून म्हणतात थोडं शिकावं. राबराब राबून पैसा मिळवायचा अन् वर मार ही खायचा…आता नवरा छळतोय, मोठा झाला की मुलगा तेच करणार.’’ कोकिळेला मोलकरणीसाठी वाईट वाटंत होतं. त्यावर उपाय शोधायला हवा हे तिनं ठरवलं होतं.

सायंकाळी पीयूष घरी आल्यावर तिनं पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला. त्याचं पाणी पिऊन झाल्यावर तिनं त्याचा उजवा हात आपल्या पोटावर ठेवला.

‘‘खरंच कोकी?’’ आनंदून पीयूषनं विचारलं.

‘‘तू तर माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याचे रंग भरलेस गं! आपल्या दोघांच्या संसारात तिसरा जीव येतोय याचा मला कित्ती आनंद वाटतोय…तुला काय हवंय ते माग…मी देईन.’’ तो आनंदून म्हणाला.

‘‘मला जे हवंय ते सगळं तुम्ही मला दिलंय. आता मला काहीच नकोय.’’ कोकिळाही खूप आनंदात होती.

‘‘मला कुणी नातलग नाहीत. तुझी आता काळजी घ्यायला हवी. आपण तुझ्या आईची मदत घ्यायची का?’’ पीयूषनं विचारलं. ती दोघं कोकिळाच्या माहेरी आली. माहेर तिचं गावातच होतं.

आनंदाच्या बातमीनं कोकिळाच्या माहेरीही आईवडिल प्रसन्न झाले. आईनं तर तऱ्हेची पक्नान्नं तयार करून लेकीला जावयला जेवायला बसवलं. तेवढ्यात कोकिळाचे वडील दोन हातात दारूचे ग्लासेस घेऊन आले.

‘‘बाबा, हे काय करताय?’’ कोकिळेला राग आला. आश्चर्यही वाटलं, बाबांचं वागणं तिला आवडलं नाही.

पीयूषनं म्हटलं, ‘‘असू दे गं! त्यांनासुद्धा आजोबा होणार असल्याचा खूप आनंद द्ब्रालाय. तेच सेलिब्रेट करताहेत ते. तू शांत रहा. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.’’

पण त्यानंतर तर ही पद्धतच रूढ झाली, केव्हाही कोकिळाच्या माहेरी गेलं की सासरे जावई दारी प्यायचे. त्यामुळे कोकिळाला माहेरीही जावसं वाटेना. पण या अशा अवघडलेल्या अवस्थेत तिला माहेरची मदतही गरजेची होती.

बघता बघता कोकिळाचे दिवस भरले आणि तिनं जुळ्या बाळांना जन्म दिला. एक मुलगा, एक मुलगी. त्यांचं चौकोनी कुटुंब पूर्ण झालं. दोघांच्या आनंदाला पारावार नव्हता. दोन्ही बाळांचं दोघं मिळून करायची. सुरूवातीला अवघड होतं पण हळूहळू सगळं सवयीचं झालं. दिवसा माझी बाळं मोठी होत होती. बाळांच्या बाळलीला दोघांना तृप्त करत होत्या. कामावरून परतल्यावर दोन्ही बाळांना खेळवणं हा पीयूषच्या आयुष्यातील आनंदाचा भाग होता. कोकिळादेखील न दमता घरकाम व बाळांचं संगोपन उत्तम करत होती.

एका सायंकाळी पीयूष बाहेरून आला तेव्हा कोकिळाला दारूचा वास आला. ती दचकली. तिनं धसकून विचारलं, ‘‘तुम्ही पिऊन आला आहात?’’

‘‘अगं, तो मोहित आहे ना. त्याचं प्रमोशन झालंय. त्यानं पार्टी दिली. सगळेच मित्र पित होते. त्यांच्या अती आग्रहामुळे…’’ पीयूष पटकन् तिथून उठला अन् आपल्या खोलीत गेला.

अन् नंतर तर रोजच पीयूष पिऊन घरी येऊ लागला. रोज नवं कारण असायचं.

कोकिळा त्रस्त झाली. मनांत अनामिक भीतीनं घर केलं. ‘‘असं कसं चालेल पीयूष? तुम्ही रोज पिऊन घरी येता. रोज कुठलं तरी कारण असतंच तुमच्यापाशी. मित्रांचं ठीक आहे हो, पण तुम्ही व्यसनी झाला आहात. सवय लागलीय तुम्हाला…इतक्या कष्टानं उभारलेला धंदा, आपला संसार सगळ्यावर त्याचा परिणाम होतोय. दारू फार वाईट असते.’’ कोकिळेला रडू फुटलं.

‘‘नाव कोकिळा, पण बोलतेस कावळ्यासारखी कर्कश्श.’’ चिडून पीयूष बोलला.

कोकिळाही चिडली. ‘‘रोजच पिऊन आल्यावर तुमचं कौतुक करायचं का?’’

रात्री दोघंही बोलले नाहीत पण सकाळी लवकर उठून पीयूषनं चहा केला. कोकिळेला उठवलं. हात जोडून तिची क्षमा मागितली, ‘‘मला क्षमा कर कोकी, तुला आवडंत नाही ना, मी आजपासून दारू सोडली. नाही पिणार यापुढे.’’

आणि खरोखर तो प्रयत्न करू लागला. त्यानं पिणाऱ्या मित्रांमध्ये मिसळणं बंद केलं. तो पार्ट्यांना जाईना. सायंकाळ तर घरातच बाळांसोबत घालवू लागला. कोकिळाला खूप आनंद झाला. आता सगळं नीट होणार हे समाधान तिला लाभलं.

एखादा आठवडाच जेमतेम झाला असेल, अमेरिकेहून पीयूषचे काका, कधी नव्हे ते आले. येताना महागाची दारूची बाटली आणली होती. कसाबसा पीयूषनं दारूवर ताबा मिळवला होता. घरात नेमकी दारूच समोर आली. त्यानं कांकाना टाळण्याचा खूप प्रयत्न केला.

‘‘काका, मी हल्ली दारू सोडली आहे. मला जरा त्रास व्हायला लागला होता,’’ पीयूषनं काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पणा काकाही आडमुठे अन् अमेरिकेत राहिल्यामुळे स्वत:ला जरा ‘मोठे’ समजणारे. त्यांनी उलट पीयूषलाच दटावलं. ‘‘कुठली तरी स्वस्त दारू पीत असशील म्हणून झाला त्रास. ही अमेरिकन महागडी दारू पिऊन बघ, मग सांग मला. आम्ही अमेरिकेत रोज दारू पितो अन् काहीही होत नाही.’’

आपला मोठेपणा मिरवण्याच्या नादात काकांना, दारू सोडणाऱ्याला माणसाला दारूचा आग्रह करू नये, एवढा पोचही नव्हता. दारू शेवटी दारूच असते. देशी काय अन् विलायती काय.

झालं! पीयूषला तेवढंच निमित्त पुरलं. काका होते तोवर रोजच दारू होती. कोकिळाचा जीव कासाविस व्हायचा. ती त्याला विनवायची, धमकी द्यायची, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. उलट एक दिवस तो तिच्यावरच चिडला.

‘‘तुला म्हणायचंय काय? कधी नव्हे ते काका आलेत, त्यांना सांगू, तुम्ही एकटेच घ्या. मी तुम्हाला कंपनी देऊ शकत नाही? तू थोडं समजून घेता, मी फक्त कंपनी देतोय. ज्या दिवशी काका जातील मी दारूकडे बघणारही नाही. तू काळजी करू नकोस. मी वचन देतो…’’

काकांचा मुक्काम एकदाचा हलला पण पीयूषची सवय गेली नाही. तो रोज पिऊनच घरी यायचा. एकदा कोकिळानं रात्री दार उघडलं नाही, ‘‘तुम्ही आपलं वचन विसरताय पण मी नाही विसरत, यापुढे पिऊन आलात तर घराबाहेरच रहा. मी दार उघडणार नाही.’’

‘‘ऐक कोकिळा, आज घरात घे मला. यापुढे मी बाहेरून पिऊन येणार नाही. घरीच घेत जाईन…मग तर चालेल ना?’’

‘‘पियूष, मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करा.’’

‘‘बरं तर, मी बाहेरच्या गॅरेजमध्ये बसून पीत जाईन.’’

कोकिळा काय बोलणार? दारूड्याला स्थळ, काळ, नाती कशाचंही भान नसतं. त्याला फक्त दारू हवी असते. नाराजीनं का होईना पण कोकिळानं त्याला गॅरेजमध्ये बसून पिण्याची परवानगी दिल्यावर तो रोज सायंकाळी गॅरेजचा दरवाजा आतून बंद करून दारू प्यायचा व जेवायला, झोपायला घरात यायचा.

त्या रात्री तो दोनदा धडपडला, त्याला तोल सावरता येत नव्हता. ‘‘पीयूष, काल रात्री तुम्ही अख्खी बाटली संपवलीत? कसं सुटणार हे व्यसन? तुम्ही पक्के दारूडे झाला आहात.’’ चिडून कोकिळानं म्हटलं.

‘‘मला माफ कर कोकिळा, आता बघ, फक्त दोन पेग…यापुढे तूच बघ…फक्त दोन पेग,’’ तो गयावया करत होता.

सकाळी उठला की पीयूष क्षमा मागायचा. रात्र झाली की दारू त्याच्यावर अंमळ गाजवायची.

त्या रात्री पुन्हा एकदा प्रंचड पिऊन घरात आला तेव्हा कोकिळाचा पारा खूपच चढला होता. तिनं त्याला खोलीत येऊ दिलं नाही. ती चिडून म्हणाली, ‘‘माझ्या अन् माझ्या मोलकरणीच्या नवऱ्यात एवढाच फरक आहे की तो तिच्या पैशानं दारू पिऊन तिलाच झोडपतो अन् माझा नवरा स्वत:च्या पैशानं दारू पिऊन गुपचुप झोपून टाकतो. पण शरीराची नासाडी दोघांच्याही होतेच अन् आमच्या संसाराचाही सत्यानाश होतोच. पीयूष, यापुढे माझ्या खोलीत यायचं नाही.’’

यावरून दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. पीयूष दुसऱ्या खोलीत जाऊन झोपला. हळूहळू दोघांमधली दरी वाढू लागली. कोकिळा पीयूषवर खूपच नाराज होती. आता तर तिनं त्याला काही म्हणणंही सोडून दिलं होतं.

हल्ली पीयूषची तब्येत सतत बिघडत होती. तो खूप अशक्त झाला होता. डॉक्टरकडे गेला तेव्हा फार उशीर झाला होता. त्याचं लिव्हर पार कामातून गेलं होतं. डॉक्टरांनी त्याला किती तरी टेस्ट करायला लावल्या. रात्रंदिवस डॉक्टरांकडे फेऱ्या मारून कोकिळा थकून गेली होती. पीयूषला सांभाळताना तिचं मुलांकडे दुर्लक्ष होत होतं. तिच्या मैत्रिणी तिला मदत करत होत्या.

सगळ्या तपासण्या अन् उपचाराचं बिल अठरा लाख रूपये झालं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतका पैसा कसा उभा करणार? जमीन, सेव्हींग, सोनंनाणं सगळं विकावं लागणार.

शेयर्स व इन्शुरन्सची कागदपत्र घेऊन कोकिळा व पीयूष वकीलाकडून परतून येताना कोकिळाला रडून अनावर झालं. ‘‘पीयूष, हे काय होऊन बसलं आपल्या सुंदर संसाराचं? कुठं होतो आपण अन् आज कुठं आहोत..तुम्ही खूप आधीच सावध व्हायला हवं होतं.’’

कोकिळेची स्थिती बघून पीयूषचेही डोळे भरून आले. खरंच, किती सांगत होती कोकिळा. त्यानं तिचं ऐकायला हवं होतं. संसार, मुलं सर्वांकडे दुर्लक्ष झालं. आता काय होणार? डबडबलेल्या डोळ्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. गाडी ट्रकवर आदळली. पीयूष व कोकिळा जागच्या जागी ठार झाली.

त्यांची जुळी मुलं या जगात एकटी पडली. कोण त्यांना सांभाळणार? नावाडी जर नांव बुडवायला निघाला तर नावेत बसणाऱ्यांच्या जिवाची काळजी कोण घेणार?

ती एक आठवण

कथा * रूपा श्रोत्री

‘‘राजा, एकदा तरी म्हण ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे.’’ ईशानं राजाच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘होय, माझं फक्त तुझ्यावर अन् तुझ्यावरच प्रेम आहे. तुझ्यावाचून मी जगू शकत नाही. तू परी आहेस, अप्सरा आहेस..अजूनही काय काय आहेस…अजूनही काही डायलॉग ऐकायचे आहेत?’’ राजानं हसतच म्हटलं.

ईशानंही हसतच कबूल केलं, ‘‘झालं…झालं, आता मला बरं वाटलं.’’

गेली आठ वर्ष राजा आणि ईशा एकमेकांना ओळखताहेत. एकाच कॉलेजात शिकायची दोघं. सुरूवातील मैत्री होती. अभ्यास सांभाळून दोघं एकत्र फिरायची, कॉलेजच्या कार्यक्रमात भाग घ्यायची. मैत्री पुढे प्रेमात बदलली. ईशा एका संपन्न कुटुंबातली एकुलती एक मुलगी होती. तिला पैसेवाला नाही, तर प्रेम करणारा, समजून घेणारा नवरा हवा होता. राजाच्या रूपात तिला तो मिळाला होता. ती वाट बघत होती, राजाचं प्रमोशन झालं की ती आईवडिलांकडे राजाबद्दल बोलणार होती.

तसाही राजा एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्यावर कामाला होता पण ईशाला वाटत होतं अजून एक प्रमोशन मिळालं की ती अभिमानानं राजाची तिच्या आईवडिलांशी भेट घालून देईल.

राजाचं प्रमोशन झालं अन् ईशानं त्याचं अभिनंदन करत म्हटलं, ‘‘आजच मी आईबाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलते. मला खात्री आहे, त्यांना तू नक्कीच आवडशील.’’

रात्री जेवताना ईशानं सांगितलं, ‘‘आईबाबा मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देते आहे. मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडला आहे.’’

आश्चर्यानं त्यांनी विचारलं, ‘‘अस्सं? अरे व्वा!! कोण आहे तो?’’

‘‘मी उद्या रात्री त्याला जेवायला बोलावते, म्हणजे तुम्ही त्याच्याशी नीट बोलू शकाल. त्याचं नाव राजा आहे.’’

दुसऱ्यादिवशी राजा ईशाच्या घरी गेला. त्याचं शिक्षण, नोकरीतला हुद्दा, त्याच्या इतर आवडी निवडी सगळंच इतकं छान होतं की ईशाचे आईवडिल एकदम खूश झाले.

‘‘ईशा, तुझी निवड एकदम परफेक्ट आहे. आम्हाला असाच जावई हवा होता.’’ त्यांनी म्हटलं.

पुढल्याच रविवारी ईशाचे आईवडिल राजाच्या घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला गेले.

दोन्ही घराणी सुसंस्कृत, श्रीमंत होती. बोलताना राजाच्या वडिलांनी सांगितलं, ‘‘ईशा आम्हाला पसंत आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो की राजाला आम्ही दत्तक घेतलाय. तो आमचा मुलगा नाही. आम्हाला मुलबाळ नव्हतं. तोही आमच्यावर तेवढंच प्रेम करतो. ईशालाही आमच्या घरात प्रेम अन् सन्मान मिळेल याबद्दल तुम्ही नि:शंक असा.’’

राजाच्या वडिलांचा व्यवसाय जोरात होता. समाजात त्यांना खूप आदर व सन्मान होता. ईशाच्या आईवडिलांना या नात्यात काहीच अडचण नव्हती. मोठ्या थाटात आधी साखरपुडा अन् मग लग्नही झालं. नववधू ईशा इतकी सुंदर दिसत होती. त्यांच्या कॉलेजमधले मित्र व मैत्रिणीही लग्नाला आले होते. काहींची लग्नं झाली होती. काहींची होऊ घातली होती. सगळ्यांनी मिळून लग्नाची शोभा अधिकच वाढवली. सोहळा संपला. वधूची पाठवणी झाली. लक्ष्मीच्या पावलांनी ईशा राजाच्या घरात आली.

राजा आणि ईशाची पहिली रात्र. त्यांची खोली फुलांच्या माळांनी सजवली होती. पलंगावर फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. ईशाचं मुळचं देखणं रूप अलंकार घातल्यामुळे अधिकच खुललं होतं. तिला बघून राजाला प्रेमाचं भरतं आलं. तो टक लावून तिच्याकडे बघत होता. त्यानं हात पुढे करताच ईशा त्याच्या मिठीच विसावली.

दुसऱ्या सकाळी ईशानं स्नान करून सुंदर निळी साडी परिधान केली.

सकाळपासूनच मैत्रिणींचे फोन येऊ लागले. ‘‘ईशा, पहिली रात्र कशी गेली?’’

ती सर्वांना हसून सांगत होती, ‘‘छान गेली. वंडरफुल!’’

राजालाही मित्रांचे फोन येत होते. सगळा दिवस असाच आनंदात, चेष्टा मस्करीत संपला. दोघंही मजेत होती.

बघता बघता एक महिना झाला. राजाला कामावर हजर व्हायला हवं होतं. ऑफिसमधल्या मित्रांनीही त्याचं प्रेमानं स्वागत केलं. थोडी फार चेष्टामस्करी झाली.

भराभर दिवस उलटत होते. सकाळी ईशा राजा जाईपर्यंत त्याच्या भोवती असे. मग सासूसासऱ्यांना काय हवं नको बघे. स्वयंपाक करायला आचारी होता. पण वाढायला ईशा स्वत: तत्पर असायची. सासरे जेवून त्यांच्या कामावर गेले की सासूचं व स्वत:चं जेवण वाढून घेई.

लग्नाला वर्ष झालं. सासू ईशावर प्रसन्न होती. पण तिला नातवंड बघायचे वेध लागले होते. ती ईशाला म्हणायची, ‘‘आता तुम्ही मूल होऊ द्या…’’

ईशाही नम्रपणे म्हणायची, ‘‘होय आई, बरोबर म्हणताय तुम्ही.’’

आई राजालाही म्हणायची, तेव्हा तो हसून म्हणायचा, ‘‘होईल आई, बाळ होईल, घाई काय आहे?’’

बघता बघता लग्नाला दोन वर्षं उलटली. एकदा एकांतात ईशानं राजाला म्हटलं, ‘‘राजा, तू माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नकोस, कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला एक गोष्ट कळत नाहीए की तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस, चुंबन, आलिंगन, प्रत्येक इच्छा पूर्ण करतोस, पण मूल होण्यासाठी आवश्यक असलेला संभोग आपल्यात घडत नाहीए, असं का? लग्नाला दोन वर्षं झाल्यावरही आपण अजून अविवाहितांचं आयुष्य जगतो आहोत…’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय…’’ राजानं कबूली दिली.

त्या रात्री ईशानं खोलीत गुलाबाच्या सुगंधाचा स्प्रे शिंपडला…स्वत: सुंदर गुलाबी नाइटी घालून राजाच्या जवळ आली. राजा तिला बघून प्रसन्न हसला. म्हणाला, ‘‘नुकत्याच उमललेल्या कमळासारखी दिसते आहेस.’’ ईशानं त्याला मिठी मारली. चुंबन आलिंगनानं ईशा उत्तेजित झाली होती. पण तिला स्वत:पासून दूर करत राजानं म्हटलं, ‘‘ईशा, आता नको, चल, झोपूयात…’’

राजाच्या या वागण्यानं ईशा पार कोमेजली…ढग बघून मोरानं पिसारा फुलवावा अन् वाऱ्याच्या झोतानं पाऊस न पडताच ढग निघून जावेत तसं तिचं झालं. तिच्या मनमोराचा पिसाराही मिटून गेला.

ईशा चिकाटीनं, शांतपणे राजाला शारीरिक संबंध घडून येण्यासाठी उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला यश येत नव्हतं.

रोज सायंकाळी नटूनथटून ईशा राजाची वाट बघायची. रात्रीची जेवणं झाली की दोघं गच्चीवरच्या झोपाळ्यावर बसून गप्पा मारायची, कधी चंद्राच्या प्रकाशात तर कधी ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या आभाळाखाली. गप्पा मारताना वेळ कसा सरायचा कळायचंच नाही.

अशाच एका रात्री ईशानं राजाला म्हटलं, ‘‘राजा, आपण कुठंतरी बाहेर फिरून येऊयात ना? खूप दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही.’’

राजा तिची कुठलीच गोष्ट टाळत नसे. त्यानं लगेचच काठमांडूची विमानाची तिकिटं बुक केली. दोघं काठमांडूला गेले. ईशानं तिथं नेपाळी पोषाखात फोटो काढून घेतले. ईशा अजूनही नववधूसारखीच दिसत होती. सात दिवस त्यांनी तिथले सगळे सुंदर स्पॉट्स बघण्यात घालवले.

राजा ईशाचं कुठलंही म्हणणं टाळत नव्हता. त्याचं तिच्यावर जिवापाड प्रेम होतं. ईशलाही ते कळत होतं, जाणवत होतं. तिची कोणतीही इच्छा त्यानं अपूर्ण ठेवली नव्हती. पण…पण रात्रीच्या वेळी तो ईशाला जे हवंय ते देऊ शकत नव्हता.

पहिल्या रात्रीपासून आज लग्नाला चार वर्ष होऊन गेली तरीही…तो तिची क्षमा मागायचा. खूपदा म्हणायचा, ‘‘मला घटस्फोट देऊन तू दुसरं लग्न करून घे. मला इच्छा असूनही तुला जे हवंय ते मी देऊ शकत नाही.’’ बोलता बोलता त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले.

ईशानं त्याला जवळ घेतलं. ‘‘राजा, असं बोलू नकोस. आपण सप्तपदी चाललोय. एकमेकांच्या बरोबर राहण्याचं वचन दिलंय. कुठल्याही परिस्थितीत आपण एकमेकांना सोडणार नाही. राजा माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला कधीच सोडून जाणार नाही…पण आपल्याला एक तरी मूल हवं ना? त्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत.’’

लग्नाला पाच वर्षं झाली. सासू, सासरे, आई, वडिल, नातलग, मैत्रिणी सगळेच ईशाला म्हणायचे, ‘‘पुरे झालं प्लानिंग, लवकर एक बाळ होऊ दे. घरात बाळाच्या येण्यानं चैतन्य येतं…’’

हसून ईशा म्हणायची, ‘‘बरोबर आहे, आता मी विचार करते.’’

पण नुसतं म्हणून काय होणार? मूल होण्यासाठी पतीपत्नीत लैंगिक संबंध घडायला हवा. तिला कळंत नव्हतं. राजाला काय प्रॉब्लेम आहे. तो लैंगिक संबंध टाळायला का बघतो…इतर कशाबद्दलंच तिची तक्रार नव्हती. तो तिला सुखवत होता, सुखात ठेवत होता…एखादं मूल दत्तक घेतलं तर? निदान लोकांचे प्रश्न तरी बंद होतील. तिनं डॉक्टरांचा सल्ला घेतला.

डॉक्टर म्हणाली, ‘‘मला तुझ्या नवऱ्याला भेटावं लागेल. पुरूषाच्या अशा वागणुकीची अनेक कारणं असतात.’’

राजाला तिनं सांगितलं, ‘‘मी डॉक्टरांना भेटून आले आहे. त्यांना तुलाही भेटायचं आहे. उद्या सकाळी अकरा वाजताची वेळ ठरवली आहे.’’

‘‘ठीक आहे. जाऊयात.’’

दुसऱ्यादिवशी डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी ईशा व राजाला अनेक गोष्टी खोदून खोदून विचारल्या. तसं तर सगळंच नॉर्मल होतं. त्यामुळे डॉक्टरही काही क्षण चक्रावल्या. त्यांनी सांगितलं, ‘‘पुरूषांमध्ये लैंगिक संबंधांविषयी उदासीनतेची काही कारणं असतात. अती प्रमाणात धूम्रपान करण्यामुळे पुरूष नपुसंक होतात. इरेक्टाइल डिसफंक्शनचा प्रॉब्लेम येतो, शुक्रजंतूंची संख्या पुरेशी नसते. त्यामुळे कामवासना थंडावते.’’

बरेचदा पुरूषांना डिप्रेशन आलेलं असतं. डिप्रेशनमुळे एकूणच आयुष्यावर खूप परिणाम होतो, तसाच सेक्सलाइफवरही परिणाम होतो. सेक्सच्यावेळी टेंशन किंवा स्टे्रस असला तरी सेक्सवर परिणाम होतो. डिप्रेशनमुळे मेंदूतलं केमिकल कॉम्पिझिशन गडबडतं त्याचा परिणाम सेक्स लाइफवर होतो.

अर्थात् त्यावरही उपाय आहेत. फार सिगारेट पित असलात तर ते बंद करणं, पोषक आणि संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मन शांत राहण्यासाठी प्राणायम, योगासनं करणं, या सर्वांच्या जोडीनं काही औषधं घेतली की समस्या दूर होते. मधुमेह किंवा अतिशय स्थूलता ज्याला ओबेसिटी म्हणतो, त्यामुळेही कामवासनेवर परिणाम होतो. इरेक्टाइल डिसफंक्शन मागे नर्व्हसनेस हेही कारण असू शकतं.

बरेचदा पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाच्या संप्रेरक म्हणजे हारमोनची कमतरता असते. त्यामुळे सेक्स लाइफ बाधित होते. काही पुरूषांमध्ये शीघ्रपतनाची समस्या असते. स्त्रीचं समाधान होण्यापूर्वीच पुरूष स्खलित होतो त्यामुळे तो पत्नीशी संबंध टाळतो.

पण तुम्हा दोघांशी चर्चा केल्यावर मला असा काही प्रॉब्लेम दिसत नाहीए…तरीही राजा, तुम्ही एकदा तुमचं हारमोन लेव्हल तपासून घ्या. तपासणीचे रिपोर्ट मला आणून दाखवा.

राजाच्या हारमोन रिर्पोटमध्ये काही दोष नव्हता. म्हणजे शारीरिक दृष्टया राजा पुरूष म्हणून पूर्णपणे सक्षम होता. ईशावर जिवापाड प्रेमही आहे अन् तरीही त्यांच्यात अजून लैंगिक संबंध घडून येत नाहीए.

डॉक्टरांनी विचार करून ईशा व राजाला म्हटलं, ‘‘मी तुम्हाला सेक्स काउंसिलरकडे पाठवते. माझी चिठ्ठी घेऊन जा. तुमच्या समस्येवर तोडगा नक्कीच निघेल.’’

लगेच दुसऱ्यादिवशी राजा व ईशा सेक्स काउंसलरकडे पोहोचली. त्यांनीही शांतपणे सर्व केस समजून घेतली. मग दोघांना आणखी काही प्रश्न विचारले, त्यातून त्यांना कळलं की राजाला तसा काहीच प्रॉब्लेम नाहीए. ऑफिसातदेखील सगळं आलबेल आहे. उलट गेल्या आठ वर्षांत त्याला घसघशीत तीन प्रमोशन मिळाली आहेत. घरात, समाजात, आर्थिक पातळीवरही कोणतीच समस्या किंवा टेंशन नसतानासुद्धा असं काय आहे की तो पत्नीला संभोगसुखानं तृप्त करू शकत नाही? ‘‘मी. राजा, मला जरा तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे.’’ गंभीरपणे डॉक्टरांनी म्हटलं. ईशा उठून बाहेर गेली.

आता डॉक्टरांनी राजाला अगदी लहानपणापासूनच्या त्याच्या आयुष्यातल्या घटना विचारल्या. सध्या ज्या जोडप्याबरोबर तो राहतोय ते त्याचे दत्तक आईवडिल आहेत. राजा सांगत होता, ‘‘सर, मी व माझे आईबाबा आणि माझी ताई असं आमचं कुटुंब होतं. ताई माझ्याहून बारा वर्षांनी मोठी होती. बाबांनी तिचं लग्न अठराव्या वर्षीच मित्राच्या मुलाशी लावून दिलं होतं.’’

आईबाबा एका अपघातात अवचित दगावले. त्यापूर्वी त्यांनी त्यांचं विल तयार करून ठेवलं होतं. माझ्या नावावर जरा जास्त संपत्ती होती. ताईलाही तिचा वाटा त्यात लिहिलेला होता.

आईबाबा गेले तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. ताई मला आपल्याकडे घेऊन आली, कारण मला बघणारं कुणीच नव्हतं. भाओजींनाही त्यात काही अडचण नव्हती. पण ताईच्या सासूसासऱ्यांच्या मनांत कली शिरला. त्यांना संपत्तीची हाव सुटली. ते ताईकडे बाबांचं मृत्युपत्र मागू लागले. त्यात स्वत:च्या सोयीनं त्यांना बदल करून घ्यायचे होते. भाओजींनाही त्यांनी स्वत:कडे वळवून घेतलं. ते आता रोज तिला मारहाण करून मृत्यूपत्र मागू लागले.

ताईला माझी काळजी वाटू लागली. ते लोक कदाचित माझा जीवही घेतील अशी तिला भीती वाटू लागली होती.

ताईच्या एका मैत्रिणीच्या नातलगांना मूळबाल नव्हतं. ताईनं त्यांना मला दत्तक घेतील का विचारलं, त्यांनी होकार दिला. भाओजी तर दिवसेंदिवस अधिकच हिंसक होत होते. मी अजून ताईजवळच राहत होतो.

एका रात्री भाओजी खूप दारू प्यायले होते. बेभान झाले होते. आल्या आल्या त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला अन् मला व ताईला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली. मी घाबरून रडू लागलो. त्यांनी माझं डोकं भिंतीवर आपटलं अन् ताईला पायांनी तुडवत तोंडानं शिव्यांचा भडिमार करू लागले. मग त्यांनी ताईला अंथरूणावर टाकलं आणि ते सेक्स करू लागले. मी घाबरून डोळे मिटले…माझी शुद्धच हरपली.

सकाळी ताईचा प्राण गेलेला होता. मी खूप घाबरलो होतो. माझे सध्याचे आईवडिल मला त्यांच्या घरी घेऊन आले. ताईच्या मैत्रिणीनं बहुधा पोलिसात कळवलं होतं. पुढलं मला ठाऊक नाही. त्या घटनेतून सावरायला माझ्या सध्याच्या आईबाबांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या प्रेमळपणामुळेच आज मी या ठिकाणी आहे, पण वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी ताईबरोबर भाओजींनी केलेला प्रकार माझ्या मनात रूतून बसला आहे. माझी ताई त्या सेक्समुळेच गेली हे माझ्या मनातून जात नाही. मी ईशाबरोबर सेक्स केल्यावर ईशा मरेल, मला सोडून जाईल, हा विचार त्या क्षणी माझ्या मनात प्रबल होतो अन् मला सेक्स नको वाटतं. ईशाच्या जागी मला ताईचं प्रेत दिसतं अन् मी तिथून बाजूला होतो. हे सगळं आपोआप होतं…माझा स्वत:वर त्यावेळी ताबा राहत नाही.

राजा एका दमात सर्व बोलून गेला. आता तो बऱ्यापैकी रिलॅक्स होता. डॉक्टरांच्या लक्षात सर्व प्रकार आला. राजाला फक्त आता थोड्या समुपदेशनाची गरज होती. त्याच्या मनातली ती भीती दूर व्हायला हवी की मग सगळं व्यवस्थित होईल.

त्यांनी राजाला पुन्हा दोन दिवसांनी यायला सांगितलं. तेवढ्यात त्यांनी राजाच्या आईवडिलांचीही भेट घेतली. राजाच्या बहिणीचे पोस्टमार्टम रिपोर्ट्स त्यांच्याकडे होते. राजाच्या बहिणीचा मृत्यू अमानुष मारहाणीमुळे झाल्याचं त्यात स्पष्ट लिहिलं होतं. राजाचा मेव्हणा पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होता. आता ईशा व राजाच्या आईवडिलांनाही सर्व स्थिती स्पष्ट झाली होती.

राजा जेव्हा डॉक्टरकडे गेला, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमळपणे पण सहज बोलावं अशा पद्धतीनं राजाला म्हटलं, ‘‘तुझ्या बहिणीचा मृत्यु सेक्समुळे नाही तर तिला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला आहे. तुझे भाओजी ताईला खूपदा मारझोड करायचे. ते तू बघितलं होतंस, पण लहान वयात तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार तू बघितलास अन् त्यानंतर तिचं प्रेतही बघितलंस…तुझ्या कोवळ्या मनावर तो फार मोठा आघात होता. सेक्समुळेच ताई मरण पावली असं तुझ्या मेंदूत रूतून बसलं ते तुझ्या तारूण्यातही तू विसरू शकला नाहीस म्हणून तुझं वैवाहिक आयुष्य असं अयशस्वी झालं…’’

काउंसिलरनं राजाला ती फाईल दाखवली.

‘‘ताईच्या मृत्युचा सेक्सशी काहीच संबंध नाही, नव्हता. हे तू डोक्यातून काढून टाक. शारीरिक दृष्ट्या तू सेक्ससाठी पूर्णपणे सक्षम आहेस. आता शांतपणे विचार कर. आपली मानसिक स्थिती बदलण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. मन व चित्त स्थिर होण्यासाठी गोळ्यांचा एक छोटासा कोर्स डॉक्टर लिहून देतील…ऑल द बेस्ट.’’

आता एकूणच स्थिती सोपी झाली होती. ईशानं गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात बुकिंग केलं, तिला राजाला जुन्या वातावरणातून बाहेर काढायचं होतं. राजा कधीच ईशाचं म्हणणं टाळत नव्हता. तो आनंदानं कबूल झाला.

संध्याकाळी समुद्रकिनारी मनसोक्त भटकंती झाली. निसर्गसंपन्न वातावरणात दोघांच्या चित्तवृत्ती उमळून आल्या. त्याला बिलगून वाळुतून चालताना ईशा म्हणाली, ‘‘राजा, तुझे सद्गुण, तुझी हुशारी, मुख्य म्हणजे दुसऱ्याचं मन समजून घेण्याची तुझी कला यामुळेच मी तुझ्या प्रेमात पडले. आजही माझ्या इतकी भाग्यवान कुणी स्त्री नसेल. लग्नात मी तुला सतत साथ देण्याचं वचन दिलंय. आत्ताही हेच सांगते, सुख दु:ख, यश, अपयश काहीही असलं तरी मी सतत तुझ्यासोबत आहे.’’ राजानं आवेगानं तिला मिठीत घेतलं.

रात्री खोलीत आल्यावर झोपण्याच्यावेळी ईशा म्हणाली, ‘‘आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? मग तू घाबरू नकोस. तुझ्यासोबत असताना मला काहीही होणार नाही. तू अगदी मोकळ्या मनानं होऊन मला जवळ घे. माझी इच्छा पूर्ण कर. माझ्यासाठी तू एवढं करच!’’

ती परोपरीनं त्याचा उत्साह वाढवत होती. त्याला धीर देत होती. सात रात्री निघून गेल्या. राजाला आता कसलीही धास्ती नव्हती. त्याला आत्मविश्वास वाटत होता. आता त्याला ताईचं प्रेत आठवंत नव्हतं. तो खुशीत होता. रिलॅक्स होता. ईशानं काउंसिलर व राजाच्या आईला फोन करून सांगितलं, ‘‘आम्ही यशस्वी झालो.’’

पहिल्या सेक्सच्यावेळी राजा थोडा नर्व्हस होता. पण मग तो सावरला. त्यानंतर सगळं सुरळीत पार पडलं.

राजानं ईशाला म्हटलं, ‘‘ईशा, तू केवळ देहानंच सुंदर आहेस असं नाही. तुझं हृदयदेखील फार मोठं आहे. माझ्यातला दोष, माझ्यातली कमतरता समजून घेऊन तू मला साथ दिलीस, कधीही त्याबद्दल नाराजी दाखवली नाहीस, बाहेर त्यावर चर्चा होऊ दिली नाहीस, लोकांच्या टीकेला एकटी सामोरी गेलीस. विवाहित असूनही कुमारकिचं आयुष्य तुला जगावं लागलं…मी तुझा ऋणी आहे, अपराधीही आहे.’’

‘‘तुझा दोषच नव्हता रे, नको स्वत:ला दोष देऊस,’’ ईशानं म्हटलं. दोघं गोव्याहून परतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. राजाच्या आईलाही समाधान वाटलं. दोनच महिन्यात ईशानं बातमी दिली की ती आई होणार आहे.

राजाच्या आईनं तिला ढीगभर आशिर्वाद देत म्हटलं, ‘‘मी जगातली सर्वात भाग्यवान सासू आहे, जिला ईशासारखी सून लाभली आहे.’’

आवाज उठवलाच पाहिजे…

कथा * अर्चना पाटील

‘‘उद्या लवकर ये.’’

‘‘का?’’ हयातने विचारले.

‘‘उद्यापासून रिहानसर येणार आहेत आणि आपले जुने सर रिटायर होत आहेत.’’

‘‘प्रयत्न करेन,’’ हयातने उत्तर दिले, परंतु तिला स्वत:ला माहीत नव्हते की ती वेळेवर येऊ शकेल की नाही.

दुसऱ्या दिवशी रिहानसर शार्प १० वाजता ऑफिसमध्ये पोहोचले. हयात आपल्या खुर्चीवर नव्हती. रिहानसर येताच सर्वांनी उभे राहून गुड मॉर्निंग केले.

रिहानसरांच्या नजरेतून ती खाली खुर्ची सुटली नाही.

‘‘इथे कोण बसते?’’

‘‘मिस हयात, तुमची असिस्टंट, सर,’’ क्षितिजने उत्तर दिले.

‘‘ओके, त्या आल्या की लगेच त्यांना आत पाठव.’’

रिहान लॅपटॉप उघडून बसला होता. कंपनीचे रेकॉर्ड्स तो चेक करत होता. बरोबर १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोकला.

‘‘मे आय कम इन सर…’’

‘‘येस प्लीज, आपण कोण?’’

‘‘अं…मी हयात आहे, आपली असिस्टंट.’’

‘‘मला आशा आहे की उद्या सकाळी मी जेव्हा येईन, तेव्हा आपली खुर्ची रिकामी नसेल. आपण जाऊ शकता.’’

हयात नजर झूकवून केबिनच्या बाहेर आली. रिहानसरांसमोर जास्त बोलणे योग्य नाही, ही गोष्ट हयातच्या लक्षात आली होती. थोड्याच वेळात रिहानने ऑफिस स्टाफची एक मिटिंग घेतली.

‘‘गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. माझी आपणाकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की उद्यापासून कंपनीचे सर्व कर्मचारी वेळेवर येतील आणि वेळेवर जातील. ऑफिसमध्ये आपली पर्सनल लाइफ सोडून कंपनीच्या कामाला आधी प्रायोरिटी देतील. मला आशा आहे की आपल्यापैकी कोणीही मला तक्रारीची संधी देणार नाही. बस एवढेच, आता आपण सर्व जाऊ शकता.’’

‘‘किती खडूस आहे, एक-दोन लाइन जास्त बोलला असता, तर आकाश खाली आले असते की धरती फाटली असती,’’ हयात मनातल्या मनात रिहानला दोष देत होती.

नवीन बॉसचा मूड पाहून प्रत्येक जण कामाबाबत जागरूक झाला. दुसऱ्या दिवशी रिहान पुन्हा ऑफिसमध्ये शार्प १० वाजता दाखल झाला आणि आज पुन्हा हयातची चेअर खाली होती. रिहानने पुन्हा क्षितिजला मिस हयात आल्यावर केबिनमध्ये पाठविण्याची सूचना दिली. ठीक १० वाजून ३० मिनिटांनी हयातने रिहानच्या केबिनचा दरवाजा ठोठावला.

‘‘मे आय कम इन सर.’’

‘‘हो जरूर, मी तुमचीच वाट पाहात होतो. आता आपल्याला एका हॉटेलमध्ये मिटिंगसाठी जायचे आहे. तुम्ही तयार आहात का?’’

‘‘हो, कधी निघायचे आहे?’’

‘‘त्या मिटिंगमध्ये तुम्हाला काय करायचे आहे?’’

‘‘अं… तुम्ही मला काल सांगितले असते, तर मी तयारी करून आले असते.’’

‘‘मी आता तुम्हाला सांगणारच होतो, पण बहुतेक वेळेवर येण्याची आपल्याला सवय नाहीए. तुमची सॅलरी किती आहे?’’

हयात काही बोलत नव्हती. ती केवळ नजर झाकवून इकडे-तिकडे बघत होती. रिहान आपल्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. रिहान हयातच्या अगदी जवळ उभा होता. हयात मनातल्या मनात प्रार्थना करत होती की तिची लवकरात लवकर रिहानच्या केबिनमधून सुटका व्हावी.

‘‘तुम्ही तुमची सॅलरी सांगण्याचे कष्ट घेणार आहात का?’’

‘‘अं… ३०,०००/-’’

‘‘जर तुमच्याकडे कंपनीसाठी वेळ नाहीए, तर तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुमच्यासाठी ही शेवटची ताकीद आहे. घ्या फाइल्स, आपल्याला आता निघायचे आहे.’’

हयात रिहानसोबत हॉटेलमध्ये पोहोचली. आज एका हैदराबादी कंपनीसोबत मिटिंग होणार होती. रिहान आणि हयात दोघेही वेळेवर पोहोचले. परंतु समोरच्या पार्टीने बुके पाठवून आज आपण येणार नसल्याचा मेसेज आपल्या कर्मचाऱ्यासोबत पाठवला. तो कर्मचारी जाताच रिहानने तो बुके  उचलला आणि रागाने हॉटेलच्या गार्डनमध्ये फेकून दिला. ‘‘आजचा दिवसच बेकार आहे,’’ असे म्हणत तो आपल्या गाडीत येऊन बसला. रिहानचा राग पाहून हयात थोडीशी त्रासली आणि घाबरून गाडीत बसली. ऑफिसमध्ये पोहोचताच रिहानने हैदराबादी कंपनीसोबत आधी केलेल्या कॉन्ट्रॅक्ट्सचं डिटेल्स मागितले. या कंपनीसोबत तीन वर्षांपूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट झाले होते. परंतु तेव्हा हयात इथे काम करत नव्हती. या कंपनीच्या बाबतीत कोणतीही माहिती ती रिहानला सांगू शकत नव्हती.

‘‘मिस हयात, तुम्ही संध्याकाळी फाइल देणार आहात का मला?’’ रिहान केबिनबाहेर येऊन हयातवर ओरडत होता.

‘‘अं…सर, ती फाइल मिळत नाहीए.’’

‘‘मिळत नाही म्हणजे… तुम्ही कोणतेही काम नीट करू शकत नाही. जोपर्यंत फाइल मिळणार नाही, तुम्ही घरी जायचे नाही.’’

हे ऐकताच हयातचा चेहरा उतरला. तसेही सर्वांसमोर ओरडा मिळाल्याने हयातला खूप इन्सल्टिंग वाटत होते. संध्याकाळचे ६ वाजले होते. फाइल मिळाली नव्हती. सर्वजण घरी जायला निघाले होते. हयातच्या बसची वेळ झाली होती. हयात हिंमत करत रिहानच्या केबिनमध्ये गेली.

‘‘सर, फाइल मिळत नाहीए.’’

रिहान काहीही बोलत नव्हता. तो कॉम्प्युटरवर काम करत होता. रिहानच्या गप्प राहण्यामुळे हयात आणखी त्रस्त होत होती. रिहानचे वागणे पाहून ती केबिनच्या बाहेर आली आणि आपली पर्स उचलून घरी निघाली. दुसऱ्या दिवशी हयात रिहानच्या अगोदर ऑफिसमध्ये हजर होती. हयातला पाहताच रिहान म्हणाला, ‘‘मिस हयात, आज तुम्ही गोडावूनमध्ये जा. आपल्याला आज माल पाठवायचा आहे. आय होप हे तरी काम तुम्ही व्यवस्थित कराल.’’

हयात काही न बोलता मान खाली घालून निघून गेली. ३ वाजेपर्यंत कंटेनर आलेच नाहीत. ३ वाजल्यानंतर कंटेनरमध्ये कंपनीचा माल भरायला सुरुवात झाली. रात्री ८ वाजेपर्यंत काम चालू राहिले. हयातची बसही निघून गेली. रिहान आणि त्याचे वडील कंपनीतून बाहेर पडत होते की कंटेनर पाहून तेही गोदामाच्या दिशेने वळले. हयात एका टेबलाजवळ बसली होती आणि रजिस्टरमध्ये काहीतरी लिहीत होती. गोडावूनचा वॉचमन बाहेर उभा होता. गोडावूनमधील शांततेमुळे हयातला भीती वाटत होती, पण आज काम पूर्ण केल्याशिवाय ती घरीही जाऊ शकत नव्हती, हे हयातला चांगले माहीत होते. इतक्यात, रिहान मिझा साहेबांसोबत गोडावूनमध्ये आला. हयातला तिथे पाहून रिहानलाही काहीतरी चूक झाल्याची जाणीव झाली.

‘‘हयात, बेटा, अजून तू घरी गेली नाहीस?’’

‘‘नाही सर, बस आता निघतेच आहे.’’

‘‘असू दे, काही हरकत नाही. ये, आम्ही तुला सोडतो.’’

आपल्या वडिलांचे हयातशी एवढे प्रेमळपणाचे वागणे पाहून रिहानला आश्चर्य वाटत होते, पण तो काही बोलतही नव्हता. रिहानचे तोंड पाहून हयातने, ‘‘नाही सर, मी जाईन.’’ असे बोलून त्यांना टाळले. हयात बसस्टॉपवर उभी होती. मिझासरांनी पुन्हा हयातला गाडीत बसण्याची विनंती केली. यावेळी हयात नाही म्हणू शकली नाही.

‘‘तू कुठे उतरणार?’’

‘‘अं… मला सिटी हॉस्पिटलमध्ये जायचे आहे.’’

‘‘सिटी हॉस्पिटलमध्ये का? सर्वकाही ठीक तर आहे ना?’’

‘‘खरे तर माझ्या बाबांना कॅन्सर आहे, त्यांना तिथे अॅडमिट केले आहे.’’

‘‘मग तर तुझ्या बाबांना आम्ही भेटलेच पाहिजे.’’

थोड्याच वेळात हयात आपले मिझासर आणि रिहानसोबत आपल्या वडिलांच्या खोलीत गेली.

‘‘ये, ये हयात बेटा. किती काम करतेस आणि आज यायला एवढा उशीर का केलास? तुझ्या त्या नवीन बॉसने आज पुन्हा तुला त्रास दिला का?’’

हयातच्या बाबांचे बोलणे ऐकून हयात आणि रिहान दोघांचेही चेहरे पांढरे पडले.

‘‘पुरे हा बाबा, किती बोलता तुम्ही. आज तुम्हाला भेटायला माझ्या कंपनीचे बॉस आले आहेत. हे आहेत रिहानसर आणि त्यांचे वडिल मिझार्सर.’’

‘‘तुम्हाला भेटून खूप बरे वाटले, सुलतान महाशय. आता कशी तब्येत आहे तुमची?’’

‘‘माझ्या हयातमुळे कसातरी जीव जगतोय. बस आता लवकरात लवकर एखाद्या चांगल्या घरात हिचे लग्न झाले की मी चिरनिद्रा घ्यायला मोकळा झालो.’’

‘‘सुलतान महाशय, काळजी करू नका, हयातला आपल्या घराची सून करून घेणे ही कुठल्याही खानदानासाठी अभिमानाची गोष्ट असेल. ठीक आहे, मग आम्ही निघतो.’’

या रात्रीनंतर रिहान हयातसोबत थोडेसे मैत्रीपूर्ण वागू लागला. हयातही आता रिहानबाबत विचार करत असे. रिहानला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी नटूनथटून येऊ लागली होती.

‘‘काय झाले, आज खूप सुंदर दिसतेस?’’ रिहानचा छोटा भाऊ आमीर हयातच्या समोर येऊन बसला. हयातने एकदा त्याच्याकडे पाहिले आणि मग आपल्या फायलीत डोके खुपसले. आमीर तिच्या टेबलाच्या समोरच्या खुर्चीवर बसून तिला निरखून पाहात होता. शेवटी कंटाळून हयातने फाइल बंद केली आणि टेबलावर आपले दोन्ही हात डोक्याला लावून डोळे बंद करून आमीरच्या उठण्याची वाट पाहू लागली. इतक्यात, रिहान आला. हयातला आमीरच्या समोर अशा प्रकारे पाहून तो त्रस्त तर झाला, पण त्याने पाहूनही न पाहिल्यासारखे केले.

दुसऱ्या दिवशी रिहानने आपल्या केबिनमध्ये एक मिटिंग ठेवली होती. त्या मिटिंगमध्ये आमीरला रिहानच्या बाजूला बसायचे होते, पण तो जाणीवपूर्वक हयातच्या बाजूला येऊन बसला. हयातला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नव्हता. परंतु हयात प्रत्येक वेळी त्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करत होती. एके दिवशी तर हद्दच झाली. आमीर ऑफिसमध्ये हयातच्या वाटेत उभा राहिला.

‘‘रिहान तुला महिन्याला तीस हजार देतो, मी एका रात्रीचे देईन. आता तरी तयार हो ना…’’

ही गोष्ट ऐकताच हयातने आमीरच्या एक जोरदार कानशिलात लगावली. ऑफिसमध्ये सर्वांच्या समोर हयात अशाप्रकारे रिअॅक्ट होईल, या गोष्टीची आमीरला मुळीच अपेक्षा नव्हती. हयातने कानशिलात तर लगावली, पण आता तिची नोकरी गेली, हेही तिला माहीत होते. सर्वकाही रिहानच्या समोर घडले होते. मात्र आमीर असे काय म्हणाला की हयातने त्याच्या कानशिलात लगावले, ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही. हयात आणि आमीर दोघेही ऑफिसमधून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमीर येताच आधी रिहानच्या केबिनच्या दिशेने गेला.

‘‘दादा, मी या मुलीला एक दिवसही इथे सहन करून घेणार नाही. तू आत्ताच्या आत्ता तिला कामावरून काढून टाक.’’

‘‘मी काय करायला हवे, ते मला माहीत आहे. जर चूक तुझी असेल, तर तुलाही कंपनीतून फायर करेन, छोटे बंधुराज. ही गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘त्या मुलीसाठी तू मला काढून टाकणार?’’

‘‘का नाही…’’

‘‘ही तर हद्दच झाली. ठीक आहे, मग मीच जातो.’’

हयात रिहान तिला कधी आत बोलावतोय, याचीच वाट पाहात होती. शेवटी रिहानने तिला बोलावलेच. रिहान आपल्या कॉम्प्युटरमध्ये काहीतरी पाहात होता. हयातला त्याच्यासमोर उभे राहून दोन मिनिटे झाली. शेवटी हयातने बोलायला सुरुवात केली.

‘‘मला माहीत आहे, तुम्ही मला इथे फायर करण्यासाठी बोलावले आहे. तसेही तुम्ही माझ्यावर खूश नव्हता. तुमचे काम सोपे झाले. पण माझी काहीही चूक नाहीए, तरीही तुम्ही मला काढून टाकताय, ही गोष्ट माझ्या लक्षात राहील.’’

रिहान अचानक उभा राहून तिच्याजवळ आला, ‘‘आणखी काही…’’

‘‘अं… नाही…’’

‘‘तसे आमीरने काय केले होते?’’

‘‘म्हणत होते की एका रात्रीचे तीस हजार देतो.’’

आमीरचे हे विचार ऐकून रिहानला धक्का बसला.

‘‘मग मी जाऊ?’’

‘‘मुळीच नाही, तुम्ही जे काही केलंत, ते योग्यच केलंत. जेव्हाही एखादा मुलगा आपली मर्यादा विसरतो, मुलीचा नकार समजून घेत नाही, मग तो बॉस असो, पिता असो, बॉयफ्रेंड असो, त्याच्याशी असेच वागले पाहिजे. मुलींनी छेडछाडी विरूद्ध आवाज उठवलाच पाहिजे. मिस हयात तुम्हाला नोकरीवरून काढले जात नाहीए.’’

‘‘धन्यवाद.’’

आता हयातच्या जिवात जीव आला. रिहान तिच्याजवळ येत होता आणि हयात मागे-मागे जात होती. हयातला काही कळेना.

‘‘मिस हयात, तुम्ही खूप सुंदर आहात. जबाबदाऱ्याही चांगल्याप्रकारे पार पाडता आणि एक सशक्त महिला आहात. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे.’’

हयातने लाजून होकार दिला.

आंधळं प्रेम

कथा * मीना संभूस

‘‘निक्की, आता कसं वाटतंय?’’ नर्सनं निक्कीच्या रूममध्ये येत विचारलं.

‘‘सिस्टर गुडमॉर्निंग,’’ थकलेल्या स्वरात थोडं हसून निक्कीनं म्हटलं.

‘‘गुड मॉर्निंग…आता कसं वाटतंय?’’ सिस्टरनं पुन्हा विचारलं.

‘‘तसं बरं वाटतंय, पण…फार थकल्यासारखं झालंय.’’ कुशीवर वळत निक्कीनं म्हटलं.

तिला आलेला थकवा शारीरिक व मानसिकही होता…तिच्या बाबतीत घडायला नको ते घडलं होतं.

‘‘विश्रांती घे. लवकरच बरं वाटेल…आता डॉक्टर साहेब येतील. त्यांना ही सांग…ते औषध देतील.’’ तिच्या गालावर प्रेमानं थोपटून नर्सनं समजावलं अन् ती निघून गेली.

निक्की विचार करत होती, तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण? ती? तिची आई की आईचं तिच्या भाच्यावरचं आंधळं प्रेम? कदाचित आईचं अन् माझंही चुकलंच! माझ्यासारख्याच इतर मुलीही अशा त्रासातून जात असतील. आपलं कोण अन् परकं कोण कसं ओळखायचं? सख्ख्या नात्यातली माणसंच अब्रूवर उठतात तर इतरांबद्दल विश्वास कसा वाटणार? खरं तर मी आईलाही किती आडून आडून सांगायचा प्रयत्न करत होते पण तिनं समजून घेतलं नाही. मीही कमी पडले.?थोडं धाडस करून बाबांना सांगायला हवं होतं…लाटणं किंवा केरसुणी घेऊन मोहितलाही मारायला हवं होतं…आज मी इथं अशी हॉस्पिटलमध्ये आहे. बाबांना डिप्रेशन आलंय…आणि आईचे रडून रडून डोळे सुजले आहेत.

निक्कीला तो दिवस आठवला…त्या दिवशी तिची आई आशा आनंदानं गाणं गुणगुणत काय काय पदार्थ तयार करत होती. घरभर खमंग वास दरवळत होता.

शाळेतून घरी परतलेल्या निकितानं विचारलं, ‘‘आई, आज काय आहे? काय काय केलंयस तू? किती छान वास सुटलाय…कुणी पाहुणे यायचे आहेत का?’’

‘‘अगं, मोहित येतोय. तुझा मावसभाऊ. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा…अगदी लहान होता तेव्हा खूप खेळवलं आहे मी त्याला…आता मोठा झालाय…’’ अभिमानानं आशा म्हणाली.

‘‘पण तो का येतोय?’’ निक्कीनं विचारलं.

‘‘मोहितला डॉक्टर व्हायचंय. त्याला इथल्या कॉलेजात अॅडमिशन मिळालं आहे. ताईनं म्हटलं होतं, तो होस्टेलमध्ये राहील म्हणून. पण मीच म्हटलं की त्याची सख्खी मावशी गावात असताना होस्टेलमध्ये कशाला?’’ आशानं सांगितलं.

तेवढ्यात संजय, म्हणजे निक्कीचे बाबाही तिथं आले.

त्यांच्याकडे बघून आशा म्हणाली, ‘‘मी बरोबर बोलले ना?’’

त्यांनी काही उत्तर देण्याआधीच तिनं पुढे म्हटलं, ‘‘निक्की, तुझ्याहून तो पाच वर्षं मोठा आहे. मी त्याला त्याच्या लहानपणी खूप सांभाळलंय, फारच गोड मुलगा आहे…’’

मोहित घरीच राहू लागला. संजयना खरं तर प्रथमदर्शनीच तो फारसा आवडला नाही. पुन्हा घरात वयात आलेली मुलगी असताना असा परका तरूण घरात असणं त्यांना बरं वाटत नव्हतं. कारण निक्की इतकी मोठी होईतो ती तिला कधीच भेटला नव्हता. पण आशाला आपल्या भाच्याचं फारच कौतुक होतं…तिच्यापुढे कोण काय बोलणार?

संजयचा बिघडलेला मूड आशाच्य लक्षात आला. तिनं त्याला सांगितलं, ‘‘तुम्ही उगीचच काळजी करताय. मोहित चांगला मुलगा आहे…अन् मुख्य म्हणजे आपल्या मुलीवर आपण चांगले संस्कार केले आहेत.’’

आशाला वाटायचं निक्कीनं मोहितशी मोकळेपणानं बोलावं. पण निक्कीलाही तो फारसा आवडला नव्हता.

एकदा आशानं निक्कीला म्हटलं, ‘‘तू मोहितबरोबर शाळेत जाऊ शकतेस…तो तुला शाळेत सोडून पुढे त्याच्या कॉलेजला जाईल.’’

आशाला वाटायचं दोघा बहीणभावात प्रेम असावं. घरात त्याला मोकळेपणा वाटेल असं वातावरण मिळायला हवं. सगळ्यांनी एकमेकांशी मोकळेपणानं बोलायला हवं. पण संजय अन् निक्की अजून तेवढे मोकळे झाले नव्हते.

एकदा संजयना ऑफिसच्या कामासाठी आठ दिवस बाहेर जावं लागलं. त्यावेळी नाइलाजानं निक्की मोहितबरोबर शाळेत गेली. तिला शाळेत सोडून तो पुढे आपल्या कॉलेजला निघून जायचा. परतताना तिला तो घेऊनही यायचा. हळूहळू दोघांची मैत्री जुळली. आता निक्कीला मोहितदादाबरोबर गप्पा मारायला आवडू लागलं. कधी तरी तो तिला दुकानात किंवा इतर ठिकाणीही फिरवून आणायचा. पूर्वी एकटेपणामुळे गप्प गप्प असणारी निक्की आता हसू बोलू लागली. हे बघून आशाला बरं वाटलं.

शाळेतून आली की ती सरळ आत मोहितदादाच्या खोलीतच जायची. तिथंच अभ्यास करायची. तिथंच मोबाइल गेम खेळायची, तिथंच मोबाइलवर सिनेमाही बघायची. संजयना हे फार खटकत होतं.

‘‘निकिता, आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष दे. सतत मोबाइल घेऊन बसतेस,’’ संजय एक दिवस निकिताला ओरडलेच. तेवढ्यात मोहित म्हणाला, ‘‘काका, मोबाइलवर तर अभ्यासही करतो आम्ही.’’

आशानं गंमतीत म्हटलं, ‘‘अरे, त्यांना ठाऊकच नाहीए की महागड्या मोबाइलचे असेही फायदे असतात.’’

‘‘मोबाइलवर अभ्यास होतो हे तर खरंच मला ठाऊक नव्हतं.’’ संजयनंही मान्य केलं. त्यानंतर तो विषय तिथंच संपला.

पण मोहितचं वागणं तेवढं निर्मळ नव्हतंच. त्याच्या वागण्यातल्या अनेक गोष्टी निक्कीला खटकू लागल्या होत्या.

काहीही बोलताना, सांगताना तो निक्कीच्या खूप जवळ यायचा. अंगचटीला यायचा. अंगाला हात लावायचा. हसताना तिच्या अंगावर पडायचा अन् मग सॉरी म्हणायचा.

खरं तर निक्कीला हे आवडत नव्हतं. पण लहान वय…नेमकं कसं सांगावं ते कळत नव्हतं. मधूनच मोहित नीटही वागायचा. मग ती पुन्हा गप्प राहायची. कदाचित आपलंच काही चुकत असेल असंही तिला वाटायचं.

घरी असला तर मोहित सतत निक्कीच्या अवतीभवती असायचा. संजयना हेसुद्धा आवडत नव्हतं. पण आशा मात्र याला भावाबहिणीची माया मानून खुश होती.

‘‘निक्की, चल तुला कार्टून दाखवतो.’’ एक दिवस मोहितनं म्हटलं.

‘‘कार्टुन? कुठं? टीव्हीवर?’’

‘‘नाही गं! मोबाईलवर!’’ मोहितनं म्हटलं, ‘‘मावशी, काका, तुम्हीही बघा. फारच सुंदर सीरिअल आहे.’’ मोहितनं त्यांना दोघांनाही त्यात ओढलं. आपण घरातल्या सगळ्याच सभासंदांशी चांगले वागतो हे सिद्ध करायचं होतं त्याला.

हळूहळू संजयच्या मनातली अढी दूर होऊ लागली. कधी कधी संजयही त्याच्या मोबाइल गेममध्ये सहभागी होऊ लागले.

‘‘बाबा, मलाही एक मोबाइल घेऊन द्या नं,’’ एकदा निक्कीनं बाबांना म्हटलं.

आपला मोबाइल पुढे करत मोहितनं म्हटलं, ‘‘तू घे आता माझा…मी नंतर नवा घेणारच आहे.’’

‘‘निक्की बाळा, आता दोनच महिन्यात तुझी परीक्षा सुरू होणार आहे, परीक्षेत उत्तम मार्क मिळव. मोबाइल तुला बक्षीस म्हणून मिळेल.’’ संजय म्हणाले. निक्कीलाही ते पटलं.

निक्की हल्ली मैत्रिणींकडे जात नव्हती. मोहित व ती सतत एकत्र असायची. दोघं हसायची, गप्पा मारायची. मात्र संजयच्या मनात कुठं तरी ते टोचायचं…पण ते उघड काहीच बोलले नाहीत.

आशा आणि संजयला एकदा नात्यातत्या एका लग्नाला जायचं होतं. खरं तर निक्कीनंही यावं असं त्यांना वाटत होतं. पण निक्कीला हल्ली असे समारंभ फार कंटाळवाणे वाटायचे. त्यामुळे ती जायला नाखुष होती.

‘‘निकिता, आम्ही जातो आहोत. दाराचं लॅच तेवढं रात्री लाव, म्हणजे आम्ही बाहेरून किल्लीनं उघडून आत येऊ. यायला उशीर होईल आम्हाला. दोघं वेळेवर जेवून घ्या.’’ नीट बजावून आशा व संजय निघाले.

निक्कीनं अभ्यास संपवला. जेवण गरम करून ती मोहितला बोलवायला आली तेव्हा तो मोबाइलवर काही तरी बघत होता. तिला एकदम आलेली बघून तो गडबडला. ‘‘दादा काय बघतो आहेस?’’ निकितानं विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझ्या एका मित्रानं व्हिडिओ पाठवलाय. तो बघत होतो.’’

‘‘जेवायला चल…’’ निक्कीनं म्हटलं. ‘‘जेवण नंतर करू, तू आधी हा व्हिडिओ बघ, मजेदार आहे.’’ म्हणत मोहितनं मोबाइल तिच्यासमोर केला.

‘‘शी: शी:…हे किती घाणेरडं आहे. मला नको.’’ घाईघाईनं निक्की जायला निघाली तसं मोहितनं तिला अडवलं अन् तो अश्लील चाळे करू लागला.

‘‘दादा हे काय करतोस?…सोड मला…सोड…’’ निक्की धडपड करत म्हणाली. पण मोहितनं तिला सोडलं नाही. त्यानं तिच्यावर बलात्कारच केला. भावाबहिणीच्या नात्याच्या पार चिंध्या झाल्या.

आशा-संजय परत आले, तेव्हा मोहित त्याच्या खोलीत अन् निकिता तिच्या खोलीत झोपले होते.

सकाळी आशा तिला उठवायला गेली तेव्हा निक्की तिच्या गळयात पडून रडू लागली.

‘‘काय झालं बाळा? काय झालं? का रडतेस’’ आशानं घाबरून विचारलं.

तेवढ्यात मोहित तिथं आला. निक्की काही बोलणार तेवढ्यात तो म्हणाला, ‘‘काही नाही मावशी, रात्री भुताचा व्हिडिओ बघितल्यामुळे घाबरलीय ती…’’

‘‘पण तिला असे भीतिदायक व्हिडिओ तू दाखवलेस का?’’ जरा रागावूनच संजय म्हणाले, ‘‘यापुढे असं करू नकोस.’’

जेव्हा जेव्हा निक्की एकटी असायची, तेव्हा तेव्हा मोहित तिच्याशी अतिप्रसंग करायचा, संभोग करण्याचा प्रयत्न करायचा.

‘‘मी आईला सांगेन हं…तू माझ्याशी कसा वागतोस ते…’’ एकदा निक्कीनं त्याला धमकावलं.

त्यावर निर्लज्ज हसत त्यानं तिला त्यांचे दोघांचे असे काही फोटो दाखवले की निक्कीची दातखिळीच बसली. ‘‘काय सांगशील? बोल ना? काय सांगशील?’’ त्यानंच तिला धमकावलं.

निक्की फार घाबरली होती. काय करावं, कुठं जावं, मोहितपासून सुटका कशी करून घ्यावी, तिला काहीच कळत नव्हतं. वर त्यानं तिला धमकी दिली होती की जर याबाबतीत एक शब्दही कुणाला कळला तर तो सगळे फोटो व्हायरल करेल…

बापरे! सगळ्यांना हे समजलं तर आईबाबांचं काय होईल? कल्पनेनंही निक्की घाबरून रडायला लागली.

निक्की आईला आडून आडून सांगायचा प्रयत्न करत होती. पण भाच्याच्या प्रेमात आंधळी झालेली आशा काही समजून घेत नव्हती.

एक दिवस आशाच्या माहेरून फोन आला. तिचे वडील गंभीर आजारी आहेत. येऊन भेटून जा. निक्कीलाही आईबरोबर जायचं होतं. पण आशा म्हणाली, ‘‘अगं, असं काय करतेस? बरेचदा तू माझ्याशिवाय राहतेस शिवाय आता तर मोहित आहे सोबतीला…परीक्षा जवळ आली आहे. मी बाबांना भेटून लगेच येते.’’ निक्कीला काहीच सांगता येईना.

आशा गेल्यावर तर मोहितला रान मोकळं मिळालं. बाबांना काही सांगायचं तिला धाडस होईना. आठवड्यानं आशा परत आली तेव्हा निक्कीची अवस्था बघून तिला नवल वाटलं.

‘‘अगं पोरी, किती अशक्त झाली आहेस? जेवतखात नव्हतीस का? अशी का दिसते आहेस? संजय, तुम्ही हिच्याकडे लक्ष दिलं नाही का?’’ आशानं विचारलं.

‘‘मला गेल्या आठवड्यात ऑफिसमध्येही खूप कामं होती. मी घरून दोन्ही वेळचा स्वयंपाक करून निघत होतो. ही दोघं केव्हा येतात जातात मला काहीच कळत नव्हतं.’’

गेले दोन महिने निकिता हे सगळं सोसत होती. शारीरिक व मानसिक अत्याचार, त्यात मासिक पाळी न येण्याचं टेन्शन…तिला जेवण जात नव्हतं, झोप लागत नव्हती, अभ्यास होत नव्हता…परीक्षा कशी देणार हे टेन्शन होतं.

ती घेरी येऊन खाली कोसळली. ती शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. आई तिथंच रडत बसली होती.

‘‘आई…’’ निक्कीनं खोल गेलेल्या आवाजात हाक मारली.

‘‘बाळा…माझी पोरगी…’’ आईला रडू आवरेना.

तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी निक्कीला तपासलं.

‘‘गर्भपात झामुळे रक्त खूप वाहून गेलंय. पण आता धोका टळलाय. लवकरच ती पूर्ववत होईल.’’ आईबाबांना बाजूला घेऊन डॉक्टर समजावत होते.

‘‘खरं तर तुम्ही पोलिसात रिपोर्ट करायला हवा. अर्थात कलप्रिट घरातलाच आहे अन् कानोकानी चर्चाही होईलच…बघा तुमचा निर्णय तुम्ही घ्या. उद्या परवात हिला घरी जाता येईल. टॉनिक्स, गोळया चालू ठेवा. गरज पडली तर मला फोन करा…मी येईन.’’ आईवडिल दोघंही डॉक्टरांपुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या लाडक्या लेकीला जिवावरच्या संकटातून वाचवलं होतं त्यांनी.

घरी आल्यावरही निक्कीला तेच सर्व आठवत होतं. ‘‘तो हरामखोर पळून गेला नसता तर मी त्याचा जीवच घेतला असता…हे सगळं तुझ्या आंधळ्या प्रेमामुळे घडलं. मला तर सुरूवातीपासूनच त्याचं घरात असणं आवडलं नव्हतं. पण तू मात्र माझा मुलगा, माझा मुलगा करत बसलीस…’’ संतापलेल्या संजयनं आपला राग व्यक्त करत म्हटलं, ‘‘माझ्या निरागस पोरीला किती सोसावं लागलंय.’’

‘‘खरंच माझं चुकलं…मीच अपराधी आहे. मी त्याला मुलगा अन् माझ्या लेकीचा भाऊच समजत होते. तो असं काही करेल, मी स्वप्नांतही कल्पना केली नाही. त्याची आई फोनवरून रडून रडून क्षमा मागत होती…आपल्या पोरीच्या भविष्याचाही प्रश्न होता…नाहीतर खरंच त्याला तुरूंगात पाठवला असता. यापुढे मी असं करणार नाही. माझ्या लेकीचं डोळ्यात तेल घालून रक्षण करेन. तिला यापुढे खूप खूप जपेन. माझ्या आंधळ्या प्रेमाची फारच मोठी किंमत मोजलीय मी…’’ आशाला रडू आवरत नव्हतं.

धुके निवळले, उन्हे पसरली

कथा * राकेश भराडे

आयुषीनं उदासपणे आपल्या बेडरूमवरून नजर फिरवली. कपाटं, ड्रेसिंग टेबल, डबलबेड, इथं तिथं पसरलेले कपडे…सगळ्यांवरच एक उदास सावट पसरलं होतं. तिच्या मनाप्रमाणेच या निर्जीव वस्तूही दु:खानं झाकोळून रडत होत्या.

खोलीत शांतता पसरली होती. तिला या शांततेची भीती वाटली नाही, पण एक तऱ्हेची निराशा दाटून आली. जितका अधिक विचार ती करत होती, तेवढीच निराशा अधिक गडद होत होती.

केवळ बेडरूमच नाही तर संपूर्ण फ्लॅट तिनं खूप मनापासून, खपून सजवला होता. स्वत:साठी अन् प्रियकरासाठीही. त्यावेळी डोळ्यात सप्तरंगी स्वप्नं होती. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच तिनं हे धाडसी पाऊल उचललं होतं. लग्न न करताही ती प्रतीकबरोबर रहायला तयार झाली होती.

आज मात्र तो उत्साह पार मावळला होता. असं का झालं हे तिला कळत नव्हतं. तिनं तर पूर्ण निष्ठेनं समर्पण केलं होतं. आत्यंतिक विश्वासानं आपला देह, आपलं मन त्याला दिलं होतं. पण त्याचं प्रेम मात्र खोटं होतं. तो प्रेमाचा केवळ देखावा होता. त्याला तिचं तारूण्य हवं होतं. त्यासाठीच त्यानं तिला अगदी बेमालूमपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या देहाचा पुरेपूर उपभोग घेतलाच शिवाय तिचाच पैसा वापरून चैनही केली. आता हे तिला कळतंय, पण आता उपयोग काय?

एमबीएचा अभ्यास दोघांनी एकाच कॉलेजात केलेला. यादरम्यान त्यांच्यात ओळख, मैत्री अन् प्रेम निर्माण झालं. एक दिवस प्रतीकनं तिला विचारलं,

‘‘आयुषी, माझ्याबरोबर बाहेर येतेस?’’

‘‘कुठं?’’

‘‘तू म्हणशील तिथं…’’

‘‘तुझी स्वत:ची काहीच इच्छा नाही?’’

‘‘आहे ना. पण तुझ्या सहमतीनंच मी सगळं करणार?’’

‘‘चल तर मग…’’ ती पटकन् उठली.

त्यानंतर ती प्रतीकच्या बोलण्यावागण्यावर इतकी भाळली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

नोकरी मिळताच एकत्र रहायचं त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांवाचून जगणं त्यांना अशक्य वाटत होतं. प्रयत्न करून दोघांनी एकाच कंपनीत नोकरी मिळवली. अन् मागचा पुढचा विचार न करता ती दोघं एकत्र रहायला लागली. दोघांचेही आईवडिल त्यांच्या गावी, या शहरापासून बरेच दूर असायचे. पण आपला असा स्वतंत्र संसार थाटून ती दोघं खूपच आनंदात होती.

जेव्हा दोघं एकत्र रहायला लागली, तेव्हा प्रतीकनं सांगितलं, ‘‘हे बघ आयुषी, आपण दोघं एकत्र राहतो आहेत. पण, तू लक्षात घे, पुढे आपल्याला याचा काही त्रास व्हायला नको.’’

‘‘कसला त्रास?’’ तिनं जरा दचकून विचारलं.

‘‘हे बघ, तुला कळतंय…आपण जर एक अॅफिडेव्हिट बनवून घेतलं तर दोघांच्याही दृष्टीनं ते फायद्याचं ठरेल.’’

‘‘अॅफिडेव्हिट कसलं?’’ तिला काहीच कळेना.

‘‘म्हणजे असं की तू मला लग्न करायला बाध्य करणार नाहीए, आई व्हायची तुझी इच्छा मी पूर्ण करणार नाही.’’

आयुषीला कळेना…तिला काळजीही वाटली. लग्न एकवेळ नाही केलं तरी मूल का नको? नवराबायकोसारखे संबंध आहेत म्हटल्यावर मूल हवंय ना? केवळ देहसुखावर सगळं आयुष्य थोडीच जातं? प्रतीक पुरुष आहे, त्याला मूल नको असेल, पण आयुषी तर स्त्री आहे. तिला मूल हवंच हवं. ती मुलाशिवाय कशी जगेल?

प्रतीक तिला समजावत म्हणाला, ‘‘असं बघ आपण अजून मुलाची जबाबदारी पेलण्याच्या परिस्थितीत नाही आहोत. अॅफिडेव्हिट करून घेण्यात आपला दोघांचाही फायदा आहे. तुझ्याही बघण्यात अशा घटना आहेत ना की एकत्र राहिल्यानंतर काही दिवसांनी मुली लग्न करण्यासाठी मुलांवर दबाव आणतात अन् जर मुलांनी ते मान्य केलं नाही तर आपल्या नातलगांकडून, आईवडिलांकडून लग्नासाठी दबाव आणतात अन् नाहीतर सरळ मुलावर बलात्काराची केस ठोकतात.’’

मनातल्या मनात काही तरी खळबळ, फुटल्यासारखं वाटलं आयुषीला. हा इतकी सावधगिरी का म्हणून बाळगतोय?

ती जरा रागावून, परखडपणे म्हणाली, ‘‘प्रतीक, प्रेम नेहमीच विश्वासाच्या पायावर उभं असतं. जर आपला दोघांचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर आपण एकमेकांवर प्रेम करत नाही असाच अर्थ निघतो. अॅफिडेव्हिटनं आपल्यात प्रेम निर्माण होणार नाही, त्यामुळे दुरावाच वाढेल. मला अॅफिडेव्हिट नकोय. म्हणत असलास तर आपण हे संबंध या क्षणीच संपवूयात.’’

‘‘छे छे असं भलतंच काय बोलतेस?’’ तिला आपल्या बाहुपाशात घेत लगेच प्रतीक म्हणाला. त्याला बहुधा भीती वाटली की अशानं आयुषी हातातून निघून जाईल. हसून तो म्हणाला, ‘‘हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास आहे तेव्हा तूही माझ्यावर विश्वास ठेव. पण बघ, नंतर काही गडबड व्हायला नको.’’

आयुषीच्या मनात एक अढी बसली, पण त्यांचं प्रेम नवं नवं होतं, तिनंही ते फारसं मनावर घेतलं नाही.

भाड्याचा फ्लॅट घेताना सिक्युरिटी डिपॉझिट अन् अॅडव्हान्स आयुषीनंच भरला होता. त्यावेळी प्रतीक म्हणाला होता, ‘‘आयुषी, मला दर महिन्याला घरी पैसे पाठवावे लागतात. सध्या माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. सध्या ही सर्व रक्कम तू भर. मी नंतर तुला देईन सगळे पैसे.’’

आयुषीला हेही थोडं खटकलंच पण प्रेमाची भरती जबरदस्त होती. विवेकाच्या विचारांना एका लाटेतच तिनं धुवून नेलं. पुढे तर त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत हेही ती विसरली.

आयुषीनं घरात स्वयंपाकाची सर्व भांडी व इतर सामान खरेदी केलं. प्रतीकचा याला विरोध होता. घरी लादी पुसणं, साफसफाई व स्वयंपाकासाठी बाई लावली होती. पण घरी स्वयंपाक क्वचितच व्हायचा. प्रतीकच्या म्हणण्यावरून हॉटेलातूनच जेवण मागवलं जाई. दोघं बाहेर फिरायला वगैरे गेली म्हणजेही हॉटेलातच जेवण व्हायचं. हा सर्व खर्च एकटी आयुषी करायची.

सप्तरंगी स्वप्नांत गुरफटलेले काही दिवस मजेत गेले. चारी बाजूला प्रेमच प्रेम होतं. जग इतकं सुंदर आहे हे आयुषीला प्रतीकच्या प्रेमात पडल्यावरच समजलं होतं. पण हळूहळू प्रेमाचे रंग फिकट व्हायला लागला. घरात खर्च करताना प्रतीक कायम हात आखडता घेत असे. घरातली अगदी साधीशी वस्तूही त्यानं स्वत:च्या पैशानं विकत घेतली नव्हती. त्याला काही हवं असलं की म्हणायचा, ‘‘डार्लिंग, चल नं, काही खरेदी करूयात.’’

‘‘मला नको सांगूस, तुझं तुला काय हवं ते आण.’’ ती म्हणायची.

‘‘पण तुला ठाऊक आहे डियर, माझ्याकडे पैसे नाहीत. मी घरी पाठवून दिलेत ना?’’ अन् मग तो तिला मिठीत घ्यायचा, त्याच्या उष्ण श्वासांनी ती रोमांचित व्हायची अन् त्याच्या मिठीत विरघळायची. मग त्याच्या छातीवर हलकेच गुद्दा मारून म्हणायची, ‘‘बरं, चल.’’

प्रतीक तिला प्रेमाच्या गोष्टी करून असा काही भुलवायचा की तिच्या विवेकाचे, विचारांचे सर्व दरवाजे बंद व्हायचे. तिला कळत नसे की प्रतीक स्वत:चे पैसे खर्च करायला नकार का देतो? तो तिच्या देहाचा तर वापर करतोच आहे शिवाय तिचाच सर्व पगारही उडवतोय. जेवण खाण, कपडा लत्ता, बाजार, वाण सामान, घरभाडं, वीजबिल सगळाच खर्च आयुषी करत असते. प्रतीकची काहीच जबाबदारी नाहीए का?

एवढ्या दिवसात प्रतीकनं घरात तर काय पण स्वत:वर किंवा आयुषीवरही एक पैसा कधी खर्च केला नव्हता. सगळं घर तिनं छान छान वस्तूंनी सजवलं होतं. पडद्यांपासून चादरीपर्यंत, डेकोरेशन पीसेसपासून घरातल्या लॅम्पशेड व बल्बपर्यंतच्या एकेक पैशाचा खर्च आयुषीनं केलेला होता.

आयुषीला कधीतरी स्वत:साठी एखादा ड्रेस घ्यावासा वाटे. ‘‘प्रतीक, हा ड्रेस छान आहे ना? घेऊयात?’’ तो म्हणायचा, ‘‘पैसे असतील तुझ्याजवळ तर घे. ड्रेस खरंच छान आहे.’’

आयुषीच्या लक्षात आलं की तिच्या बँक अकाउंटला महिन्याच्या शेवटी काहीही उरत नाही. तिला मिळणारा सर्व पगार घरातच संपतोय. ती एकटी असताना बऱ्यापैकी शिल्लक ती टाकत होती. पण प्रतीकबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना मात्र ती कंगाल झाली होती. प्रतीकनंच आग्रह करून तिला चार चाकी गाडी घ्यायला लावली होती. ते हप्तेही आयुषीच भरत होती, पण गाडी सतत प्रतीक वापरायचा. पेट्रोल आयुषी भरायची.

आता मात्र आयुषीवरचं प्रेमाचं भूत उतरायला लागलं होतं. एक दिवस जरा रागातच तिनं म्हटलं, ‘‘प्रतीक, घरातले सगळे खर्च मी एकटी करतेय. तुझा एकही पैसा खर्च करत नाहीस तू. या सगळ्या पैशांचं करतोस काय? घराची जबाबदारी तुझीही आहेच ना?’’

‘‘हे माझं तुझं कुठून काढलंस? माझे पैसे मी वाचवतोय ते आपल्याला पुढे उपयोगी पडावेत म्हणूनच ना?’’ तो ही आढ्यतेनं बोलला. मात्र बोलत असताना त्यानं तिची नजर टाळली होती.

आयुषीला हे आवडलं नाही. ‘‘प्रतीक नीट माझ्याकडे बघून उत्तर दे. तुझा पैसा उपयोगी पडेल असा दिवस कधी उगवणार आहे? तू सगळे पैसे घेऊन पळून गेल्यावर?’’

इतकं कडू सत्य? आयुषीला स्वत:लाही नवल वाटलं. इतकं ती कसं काय बोलली? कदाचित परिस्थिती तसं बोलायला भाग पाडते.

आयुषी अजूनही बोलत होती. ‘‘मला तुझी लक्षणं तर अशीच दिसताहेत. तुझ्या दृष्टीनं हा फक्त खेळ आहे. प्रेमाचं नाटक करून माझं शरीर उपभोगतोस. माझ्या पैशावर चैन करतोस. जेव्हा तुझ्या लक्षात येईल की माझे पैसैही संपले आहेत अन् देहातलं आकर्षणही संपलेय, तू एखाद्या गिधाडासारखा दुसरं भक्ष्य शोधशील अन् मी भणंग भिकाऱ्यासारखी भीक मागेन.’’

प्रतीक गप्प बसला होता. जणू आयुषीनं त्याच्या थोबाडीत मारली होती. आयुषीला काहीही म्हणायचं धाडस त्याक्षणी तरी त्याच्यात नव्हतं.

आयुषीला जाणवत होतं की प्रतीकचा तिच्यातला इंटरेस्ट संपला होता. तो तिला कधीही सोडून जाईल. मग ती अगदीच एकटी पडेल. पण ती स्वत:ला बजावून सांगायची. हे जे धाडसी पाऊल तिनं उचललं आहे ते तिनं स्वत:च्या मर्जीनं उचललं आहे. आता त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारीही तिचीच असेल. त्यासाठी तिनं पूर्णपणे सक्षम असायलाच हवं. प्रतीक जर तिला सोडून गेला तरी ती रडणार, भेकणार नाही. गेला तर गेला. तिचं आयुष्य तिनं जगायचं.

अशात तिला आपल्या आईबाबांची फार फार आठवण येत असे. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. त्यांना तिच्याविषयी किती अभिमान होता. तिच्याकडून ती खूप काही करेल अशा अपेक्षाही होत्या, पण तिनं खरं तर त्यांचा विश्वासघात केला होता.

छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्याच वाद व्हायचे. आयुषी दुखावली जायची. पुन्हा तडफेनं उभी रहायची. प्रतीकच्या वागण्यात सुधारणा नव्हती. त्यानं मनात आणलं असतं तर त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत: होऊ शकले असते.

आता घरातली कोणतीही वस्तू ती आणणार नाही असं आयुषीनं ठरवलं होतं. प्रतीकचं शेविंग क्रीम संपलं होतं. डिओ खलास झाला होता. बाथरूममध्ये अंगाचा, कपडे धुण्याचा साबण नव्हता. पण आयुषीनं तिकडे साफ दुर्लक्ष केलं. घरात खाण्यापिण्याचे जिन्नस मात्र ती आणत होती.

प्रतीक एक दिवस भडकून बोलला, ‘‘हे काय घर आहे की धर्मशाळा? साबण नाही, शेविंग क्रीम संपलंय.’’

‘‘तू आण ना? तुझ्या गरजेच्या गाष्टी आहेत. तू वापरतोस. तू विकत आण. तूही कमवतो आहेस ना?’’

‘‘असं कसं बोलतेस तू?’’नरमाईनं प्रतीकनं म्हटलं.

‘‘खरं तेच बोलतेय. खरं तर लग्न केल्यावर बायकोचा खर्च नवऱ्यानं करायचा असतो. लग्न केलं नाही म्हणून इथं उलटंच चाललंय. शारीरिक, भावनिक अन् आर्थिकदृष्ट्या तू माझं शोषण करतो आहेस. एकत्र राहून पैसे मीच खर्च करतेय.’’

‘‘तू अशी का वागते आहेस?’’ प्रतीकनं नाटकीपणे उसासा टाकला.

खरंतर प्रतीक अन् आयुषीला पगार सारखाच मिळत होता. पण आयुषीचा सगळा पगार संपत होता. प्रतीकच्या पगाराचं काय व्हायचं ते तोच जाणो. ती तर त्याच्या प्रेमात अशी काही वेडीखुळी झाली होती की तो कुठला राहणारा, त्याच्या घरात कोण, वडील काय करतात काही काही तिनं विचारलं नव्हतं. उलट स्वत:बद्दल मात्र ती सगळं सगळं सांगून मोकळी झाली होती.

त्यांच्यातली भांडणं वाढलीच होती. त्या काळात एकदा आयुषीनं विचारलं, ‘‘प्रतीक, तू तुझ्या घरच्या लोकांबद्दल, तुझ्या कुटुंबातल्या माणसांबद्दल काहीच बोलला नाहीस? तुमचं गाव कोणतं? तुझे बाबा काय करतात? तुला बहीण-भाऊ किती…वगैरे.’’

विचित्र नजरेनं तिच्याकडे बघत प्रतीक म्हणाला, ‘‘का बरं? एकाएकी याची गरज का भासली?’’

‘‘अरे कमाल करतोस. आपण दोघं एकत्र राहतोय तर एकमेकांविषयी कळायला नको का?’’ आयुषी सहजपणे बोलली.

‘‘हे सगळं तू आधीच जाणून घ्यायसा हवं होतं. आता काय माझ्या घरातल्यांच्या विरूद्ध पोलिसात तक्रार द्यायचीय की माझ्या विषयीच्या कागाळ्या घरातल्या लोकांना सांगायच्या आहेत?’’ प्रतीकनं विचारलं.

आयुषीला त्या क्षणी लख्खपणे जाणवलं की प्रतीकचं प्रेम तिच्या प्रेमासारखं खरं नव्हतं. प्रेमात तर दोषही माफ असतात. तिनं त्याचे सारे दोष स्वीकारलेच होते. पण तो मात्र तिचा पैसा, तिचं सौंदर्य अन् तारूण्य यावर डोळा ठेवून होता.

ती कडवटपणे म्हणाली, ‘‘पोलिसात जायला घरचे नकोत, तूच पुरेसा आहे. मला आता तुझं खरं रूप कळलं आहे…मला आधीच हे कळायला हवं होतं.’’

‘‘आधी कळलं असतं तर काय केलं असतंस?’’ त्यानं भडकून विचारलं.

‘‘मी तर आताही काहीच करणार नाहीए. पण मला वाटतंय की तुला आता आपले संबंध पुढे चालू ठेवायचे नाहीत. विनाकारण भांडतोस, चिडतोस. मी तुला आपल्या नात्यातून मोकळा करते.’’

‘‘मला त्यासाठी तुझ्या उपकाराची किंवा परवानगीची गरज नाहीए. मला हवं ते मी करेन.’’

आयुषीच्या मनात आलं लिव्ह इन रिलेशनशिपचा जास्त फायदा पुरूषांनाच मिळतो. मुली मूर्ख असतात. प्रेमानं वेड्याखुळ्या होतात. मुलांच्या गोड गोड बोलण्यावर भाळतात. त्यांच्यावर खरं खरं प्रेम करतात. मुलांचा खोटेपणा त्यांच्या लक्षातच येत नाही अन् त्याची शिक्षा मुली पुढे आयुष्यभर भोगतात.

शिवांगी आयुषची ऑफिसमधली खास मैत्रीण होती. तिच्या लक्षात आलं आयुषीचं उदास असणं, काळजीत असणं, काहीतरी गडबड आहे हे तिनं जाणलं. एकदा लंचटाइममध्ये तिनं आयुषीला विचारलंच, ‘‘तू अशी का दिसतेस? तुझं अन् प्रतीकचं बिनसलं आहे का?’’

शिवांगीनं आधीच आयुषीला या लिव्ह इनबद्दल सावध केलं होतं. ‘शक्य तेवढ्या लवकर लग्न कर’ असाही सल्ला दिला होता. पण त्यावेळी आयुषी प्रतीकच्या प्रेमात इतकी अंतर्बाह्य रंगली होती की तिनं मैत्रीणीचा सल्ला गांभीर्यानं घेतलाच नाही.

‘‘तुझं म्हणणं बरोबर होतं शिवांगी…मीच चुकले,’’ आयुषीनं म्हटलं. तिनं हळूहळू शिवांगीला सगळं सांगितलं. शिवांगीही प्रथम स्तब्ध झाली. मग म्हणाली, ‘‘हरकत नाही. तू अजूनही सावर. प्रतीक ही कंपनी सोडतोय. मला त्याच्या एका खास मित्राकडून ही बातमी समजली आहे. तो बंगलोरला जॉब मिळवण्याच्या तयारीत आहे.’’

‘‘मला शंका होतीच. त्याच्या एकूण वागण्यावरून तो मलाही सोडणार हे मला जाणवत होतं.’’

‘‘मग आता तू काय करशील?’’

‘‘काही नाही…’’

‘‘म्हणजे? आश्चर्यानं शिवांगीनं विचारलं. ‘‘त्यानं तुला फसवलंय, तुझं शोषण केलंय, त्याला असंच सोडशील?’’

‘‘नाही शिवांगी. त्यानं मला फसवलं नाही. माझं शोषण केलं नाही. जे घडलं त्याला माझी सहमती होतीच. मुळात मीच चुकले म्हणताना आता परिणामही मीच भोगायला हवेत. मी त्यासाठी तयार आहे.’’

‘‘खरंच सांगतेस?’’ आश्चर्यानं शिवांगी म्हणाली. ‘‘खरंच सावरली आहेत तू?’’

पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्यी उत्तरली. ‘‘होय, पूर्णपणे.’’

‘‘तुला कधीही माझी गरज पडली तर मला सांग,’’ शिवांगीने तिला आश्वस्त केलं.

आयुषीचे वडिल सरकारी नोकरीत होते. खाऊनपिऊन सुखी. आयुषी त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या शिक्षणावर त्यांनी बराच खर्च केला होता. आता त्यांच्याकडे फार पैसा शिल्लक नव्हता. त्याची गरजही नव्हती. आयुषी नोकरी करतच होती.

त्याचवेळी आयुषीच्या आईचा फोन आला. त्यांच्या गॉलब्लॅण्डरमध्ये स्टोन झाले होते. ऑपरशन करावं लागणार होतं. आईनं तिला येण्याबद्दल सांगितलं. पैसे वगैरे मागितले नव्हते. आयुषीलाच वाटलं थोडे पैसे तिनं त्यांना पाठवले तर वडिलांना आधार होईल. पगाराला अजून अवकाश होता. तिच्या खात्यात पुरेसे पैसे नव्हते. तिनं प्रतीकला म्हटलं, ‘‘मला थोडे पैसे हवेतय’’

आश्चर्यानं प्रतीक आ वासला गेला, ‘‘तुला? पैसे? तुझ्याकडे नाहीत का?’’

‘‘नाहीत. म्हणूनच मागतेय ना?’’ ती असह्यपणे म्हणाली, ‘‘आईचं ऑपरेशन होणार आहे.’’

‘‘तू घरी जाणार आहेस?’’

‘‘विचार करतेय. या निमित्तानं जाऊन येईन. वर्ष दिड वर्षात गेलेच नाहीए.’’

‘‘पैसे नाहीत माझ्याजवळ. कालच मी घरी पाठवलेत पैसे.’’

तो खोटं बोलतोय हे तिला कळलं. ‘‘इतकं धादांत खोटं कसं रे बोलू शकतोस तू? कधी म्हणतोस पैसे शिलल्क ठेवतोय, कधी म्हणतोस घरी पाठवलेत. सगळेच पैसे थेडीच पाठवले असतील? घरात तर एक पैसा खर्च करत नाहीस. माझ्या पैशांवर मजा मारताना तुला लाज वाटत नाही?’’

‘‘तुला माझी गरज आहे. मला तुझी नाही.’’ निर्लज्जपणे तो म्हणाला अन् गाडीची किल्ली उचलून घराबाहेर निघून गेला.

घरी पैसे पाठवण्यासाठी पैसा उभा कसा करावा ते आयुषीला समजेना. स्वत: जाण्यापेक्षा तिनं मैत्रिणीकडून ५० हजार रुपये उसने घेऊन बाबांच्या अकाउंटला भरले.

प्रतीकचा त्याच्या घरच्या मंडळींशी सतत संपर्क होता. सहा महिन्यांनी एकदा तो घरी जाऊन येत असे. आयुषीच गेली दोन वर्षं घरी गेली नव्हती. फोनवर बोलायची. पण अजून नोकरी नवी आहे, कंपनी अमेरिकेला पाठवणार आहे वगैरे कारणं सांगून ती घरी जाणं टाळत होती. आईची इच्छा होती आयुषीनं लग्न करावं पण आयुषी तर लग्नाच्याही पुढं निघून गेली होती.

प्रतीक सुट्टी घेऊन त्याच्या घरी गेला होता. आयुषीनंही सुट्टी घेतली अन् आईबाबांना भेटायला गेली. इतक्या दिवसांनी त्यांना भेटल्यावर तिला किती सुरक्षित अन् प्रसन्न वाटलं. तिला जाणवलं, प्रतीकच्या सहवासात तिला असं सुरक्षित वाटत नव्हतं. जुन्या आठवणी काढताना आईबाबांना गहिवरून येत होतं. तिच्या येण्याचा त्यांना मनापासून आनंद झाला होता. आठ दिवस ती तिथं आनंदात राहिली. मोबाइलही तिनं बंद करून ठेवला होता.

आईबाबांच्या प्रेमळ आश्वासक सहवासात ती सुखावली. तिला प्रतीकची आठवणही आली नाही. ती मुंबईला परतली अन् तिनं प्रतीकला फोन लावला, तो बंद होता. तिला थोडी काळजी वाटली. गेले आठ-दहा दिवस त्यांच्यात संपर्कच नव्हता.

घरात फार एकटं वाटत होतं. उदास वाटत होतं. प्रतीक कसाही असला तरी तिनं त्याच्यावर खरोखर प्रेम केलं होतं. पूर्ण विश्वासानं ती त्याच्या स्वाधीन झाली होती. शेवटपर्यंत ते नातं तिला खरं तर निभवायचं होतं. पण प्रतीकच्या मनात दुसरंच काहीतरी होतं.

ती ऑफिसला पोहोचली अन् शिवांगी तिला भेटायला आली. ‘‘कशी आहेस शिवांगी?’’ तिनं विचारलं.

‘‘मी बरी आहे. तुला कळलं का? प्रतीकनं ही कंपनी सोडली. मागच्या आठवड्यातच त्यानं ईमेलवर त्याचा राजीनामा पाठवलाय.’’

‘‘हं!’’

‘‘मला ठाऊक होतं. प्रतीकसारखी भ्रमर अन् लोभी वृत्तीची मुलं लग्न, जबाबदारी वगैरेवर विश्वास ठेवत नाहीत. प्रेम म्हणजे त्यांच्या लेखी टाइमपास असतो.’’

आयुषीनं शिवांगीकडे बघितलं.

‘‘आयुषी, हे कधी ना कधी घडणारच होतं. तुला धक्का बसणं स्वाभाविक आहे. पण तरीही तुला सावरायला हवं. खरं तर आता तू स्वतंत्र आहेस. आपल्या मर्जीनं आयुष्य जगू शकतेस. चांगला नवरा निवड. सुखाचा संसार कर. गेली दोन वर्षं एक दु:स्वप्न होतं असं समज.’’

‘‘खरंय शिवांगी, तुझं म्हणणं मला पटतंय. मी पूर्वीही भीत्री अन् नेभळट नव्हते. आत्ताही नाही. मी कणखर आहे. सारी परिस्थिती धीरानं हाताळेन.’’

‘‘मी तुझ्याबरोबर रात्री सोबतीला येऊ का?’’

‘‘नाही गं! त्याची गरज नाहीए,’’ पूर्ण आत्मविश्वास तिच्या बोलण्यावागण्यात दिसत होता.

सायंकाळी घरी गेल्यावर तिनं शांतपणे घरावर नजर फिरवली. ज्या वस्तू तिनं प्रतीकबरोबर खरेदी केल्या होत्या त्या वेगळ्या काढल्या. एका मोठ्या चादरीत त्या बांधून त्याचं गाठोडं बांधलं.

रात्री तिनं ते गाठोडं गाडीत घातलं अन् शहराच्या बाहेर एक मोठा तलाव होता, त्या तलावात ते गाठोडं तिनं शांतपणे ढकलून दिलं. थोडा वेळ पाण्यात बुडबुडे अन् तरंग उठले. मग सगळं शांत झालं.

तिही अगदी आतपर्यंत शांत झाली होती. डोळ्यापुढचं धुकं विरलं होतं. विवेकाची उन्हं पसरली होती. खूप प्रसन्न अन् हलकं वाटत होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें