मिश्किली * कुशला पाठक
त्यादिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोहोचलो. सौ.नं. दार उघडलं अन् अत्यंत उत्साही आवाजातत म्हणाली, ‘‘अहो, ऐकलंत का? आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काखेत कळसा अन् गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना तिथं एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा. अन् अगदी फुक्कट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर.’’
‘‘तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात सतत अशी शिबिरं होतच असतात,’’ मी म्हणालो.
सौ. संतापलीच, ‘‘तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वत:च सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवंतय का, त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं. काय तर म्हणे, त्याच्या चवळीच्या शेंगेसारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन, म्हणाला होतात. तर तो लठ्ठपणाच समूळ नष्ट करण्यासाठी ही शिबिरं घेतली जातात.
रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे अन् मघाच मी सांगितलं ना, हे अगदी फुक्कट आहे. नि:शुल्क...पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब?’’
‘‘छान, छान! जरूर जा त्या शिबिरीला. पण त्या आनंदात माझा पामराचा चहा फराळ विसरलीस का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो गं!’’ मी तिला थोपवत बोललो.
‘‘हो तर! चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयिस्करपणे विसरता तुम्ही. रविवार अन् माझं शिबिर पण विसराल, स्वत:चं जेवणखाणं नाही विसरत कधी,’’ संतापानं पाय आपटत सौ. स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळआपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रे मधून बाहेर आलेला चहा अन् पोहे मात्र फक्कडच होते.
परवाच रविवार होता. शनिवारी रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातींचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्रीपुरूषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं तीन खुर्च्यांवर तीन सुंदऱ्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्टे्रशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं.