आधुनिक

कथा * ममता रैना

‘‘तर मग तुम्ही किती दिवसांसाठी गावी जाताय?’’ समोरच्या प्लेटमधला ढोकळा उचलून तोंडात टाकत दीपालीनं प्रश्न केला.

‘‘किमान आठ दहा दिवस तरी जातील तिथं.’’ कंटाळलेल्या आवाजात सलोनं म्हटलं.

ऑफिसच्या लंच अवरमध्ये त्या दोघी बोलत होत्या.

सलोनीचं काही महिन्यांपूर्वीच दीपेनशी लग्न झालं होतं. एकाच ऑफिसात काम करताना प्रेम जमलं अन् लगेच लग्नंही झालं. आत्ताही दोघं एकाच ऑफिसात काम करताहेत. दोघांचे विभाग फक्त वेगळे आहेत. पण मजा म्हणजे दिवसभर एकाच ऑफिसात असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ नसतो. हे आयटीचं क्षेत्रच असं आहे.

‘‘बरं, एक सांग मला, तू तिथे राहतेस कशी? तूच सांगितलं होतं अगदी खेडवळ गाव आहे तुझं सासर म्हणजे.’’ दीपालीनं आज सलोनीला चिडवायचा चंगच बांधला होता. सासरच्या नावानं सलोनी खूप चिडते हे तिला माहीत होतं.

‘‘जावं तर लागणारच. एकुलत्या एका नणंदेचं लग्न आहे. सहन करावं लागेल काही दिवस.’’ खांदे उडवून सलोनी उत्तरली.

‘‘आणि तुझी ती जाऊ? भारतीय नारी, अबला बिचारी, असं असं काहीसं म्हणतेस ना तूं तिच्याबद्दल?’’ दोघी फस्सकन् हसल्या.

‘‘खरंच गं! अवघड आहे. त्यांना बघून मला जुन्या हिन्दी सिनेमातल्या हिरॉइन्स आठवतात. अगदीच गावंढळ आहेत. हातभर बांगड्या, कपाळावर मोठं कुंकू, भांगात शेंदूर अन् सारा वेळ डोक्यावर पदर असतो. असं कोण राहतं गं आजच्या काळात? खरं तर या अशाच बायकांमुळे पुरूष आम्हा बायकांना दुय्यम दर्जाच्या समजतात. किती, काय शिकल्या आहेत कुणास ठाऊक.’’ सोनालीनं म्हटलं.

‘‘मग?’’ दीपालीनं म्हटलं.

‘‘ठीकाय, मला काय? काही दिवस काढायचे आहेत. काढेन. कसे तरी…चल, लंच टाईम संपला, निघायला हवं.’’

सलोनी लहानपणापासून शहरात राहिलेली. लहान गावं किंवा खेडी तिनं कधी बघितलीच नव्हती. लग्नांनंतर प्रथमच ती सासरी गेली तेव्हा तिथलं ते वातावरण बघून ती खूपच नर्व्हस झाली. दीपेनवरच्या प्रेमामुळे कसेबसे चार दिवस काढून ती परत नोकरीवर रूजू झाली.

शहरात कायम स्कर्ट, टॉप, जीन्स-टॉप घालून वावरणाऱ्या सलोनीला सतत साडीत अन् साडीचा पदर डोक्यावर ठेवणं खूपच कठीण होतं. सासरची माणसं रूढावादी, पारंपरिक विचारांची होती. दीर तसे बरे होते पण त्यांच्याशी फार बोलणं होत नव्हतं. मात्र जाऊ खूपच समजूतदार होती.

धाकटी नणंद गौरी सतत नव्या वहिनीच्या अवतीभोवती असायची. गावातल्या स्त्रियांची विचारसरणी, राहणी हे सगळं बघून सलोनीला विचित्रच वाटायचं. तशी ती मनानं चांगली होती. पण या वातावरणाशी तिचा कधीच संबंध आला नव्हता. त्यामुळे या गृहिणी वर्गाबद्दल थोडी हीनत्त्वाची भावना तिच्या मनांत होती. नोकरी न करता या कशा जगू शकतात हेच तिला कळंत नसे.

सलोनी अन् दीपेननं शहरात आपला वेगळा संसार थाटला होता. इथं सासू, नणंद वगैरे कुणीच येत नसे. जे मनांत येईल ते करायची मुभा होती. अटकाव करणांरं कुणीच नव्हतं. दीपेनचे तिचे मित्र, सहकारी वेळी अवेळी यायचे. घरी सतत पार्ट्या व्हायच्या. दिवस एकदम मजेत चालले होते.

गौरीचं, धाकट्या नणंदेचं लग्न ठरलं होतं. तिथं जाणं गरजेचं होतं. सगळं घर पाहुण्यांनी भरलं होतं.

उन्हाळ्याचे दिवस, त्यातून वीज गेलेली. हातपंख्यानं वारा घेता घेता हात दुखू लागले. त्यात साडी अन् डोक्यावरचा पदर सांभाळण्याची कसरत…एयरकंडिशन्ड ऑफिस अन् एयर कंडिशन्ड घरात रहायची सलोनीला सवय…या उलट जुनाट परंपरावादी वातावरणाचा तिला उबग आला.

एकांत मिळताच सलोनीचा उद्रेक झाला. ‘‘कुठं मला आणून टाकलंस दीपेन? मला नाही जमत अशा ठिकाणी राहणं…साडीचा पदर सतत डोक्यावर…शी, मी इथं यायला नको होतं.’’

‘‘सलोनी, जरा हळू बोल. अगं, थोडे दिवस एडजेस्ट कर. लग्नाचा दुसऱ्या दिवशी आपण इथून निघणार आहोत,’’ दीपेननं तिची समजूत घातली.

सलोनीनं वाईट तोंड केलं. कधी एकदा हे लग्न आटोपतंय असं तिला झालं होतं. ढीगभर पाहुणे होते घरात. सगळ्यांची जबाबदारी घरच्या सुनांवर होती. सलोनीला स्वयंपाकाची सवय, आवड, अनुभव नव्हता. घरातली कामं तिला नेहमीच दुय्यम दर्जाची वाटायची. घरी, माहेरीसुद्धा कधी तिनं आईला घरकामात मदत केली नव्हती. असं असताना घरातल्या कुणी तिला काम सांगितलं तर तिला घाम फुटायचा. तिची जाऊ अवनी तिच्याहून काही वर्षांनीच मोठी होती पण सगळं घर इतकं छान सांभाळत होती की प्रत्येकाच्या तोंडी अवनीचं नाव होतं. सलोनीही घरातली सून होती पण तिचं नाव कोणीच घेत नव्हतं.

घरात सतत होणारं अवनीचं कौतुक बघून सलोनीला तिचा मत्सर वाटू लागला. कुणाचं काहीही काम असू दे. प्रत्येकजण अवनीवर विसंबून असे.

‘‘वहिनी, माझ्या शर्टाचं बटन तुटलंय, जरा लावून दे ना,’’ अंघोळ करून आलेल्या दीपेननं म्हटलं.

स्वयंपाकघरात मटार सोलंत बसलेली सलोनी लगेच दीपेनकडे येऊन रागानं म्हणाली, ‘‘इतक्या साध्या गोष्टीसाठी अवनी वहिनी कशाला लागते तुला? मला सांगायचं, मी लावून दिलं असतं.’’

तिचा राग बघून दीपेन घाबरला…बावचळला…म्हणाला, ‘‘मला नव्हतं माहीत तुला हे काम येतं म्हणून.’’

‘‘मला इतकी मतीमंद समजलास का?’’ म्हणंत तिनं त्याच्या हातून शर्ट व बटन हिसकून घेतलं अन् फडताळातला सुई दोरा बटन व्यवस्थित शिवून दिलं.

हळूहळू सलोनीच्या लक्षात आल अवनी का सर्वांना आवडते. सकाळी सर्वांच्या आधी उठून अंघोळ ओटापून ती सर्वांसाठी चहा करायची. त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता, वृद्ध सासऱ्यांसाठी पथ्याचं खाणं, बिनसाखरेचा चहा, कारण ते डायबिटिक आहेत. सासूबाईंचं काय पथ्यपाणी असेल ते बघायचं. नवऱ्याचा, मुलांचा डबा झाला की स्वयंपाकाची तयारी. पाहुण्यांपैकी कुणाच काही मागणी असायची. तेवढ्यात भांडी घासणारी बाई काही तरी म्हणायची, कपडे धुणारी परटीण साबण मागायची. दारात मांडव घालणारी माणसं आलेली असायची. चारीकडे अवनीची बारीक नजर असे. हसंत मुखानं ती सगळी काम करायची.

सलोनीला तिचं हसणं खोटं वाटायचं. ती उगीच देखावा करते असं वाटायचं. स्वत:चं महत्त्व जाणवून देण्यासाठी सलोनी काहीतरी काम करायला जायची अन् नेमका घोटाळा व्हायचा. त्यामुळे ती स्वत:वरच चिडायची. मग स्वत:च्या समाधानासाठी म्हणायची, ‘‘तसंही हे स्वयंपाक घर म्हणजे अडाणी, निरक्षर लोकांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या मुलीला याची गरजच नाही.’’

सलोनीच्या हातून लोणच्याची बरणी पडून फुटली. घाईनं येत असलेल्या अवनीचा त्या तेलावरून पाय घसरला. ती पडली. तिचा पाय मुरगळला. सगळे धावले, तिची काळजी घेतली जाऊ लागली. पण ती अंथरूणावर असल्यामुळे घरात सर्वत्र अव्यवस्था झाली.

मोठ्या आत्यानं सलोनीला स्वयंपाकघरातल्या कामाला लावलं. तिला कधीच इतका मोठा स्वयंपाक करण्याची सवय नव्हती. कसाबसा ती स्वयंपाक करायची पण तो चविष्ट होत नसे. दोघी आत्या करवादायच्या.

अवनीला सलोनीची स्थिती समजंत होती. ती तिला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायची. मोठ्या आत्यांना ती म्हणाली, ‘‘तुम्ही सलोनीला बोल लावू नका. ती हुषार आहे पण ती शहरात राहिलेली, गावाकडच्या पद्धती तिला कुठून ठाऊक असणार? ती हळूहळू सर्व शिकेल.’’

धाकट्या आत्यानं सलोनीला खीर करायला सांगितलं. सलोनीला ती सतत ढवळायचा कंटाळा आला. मोठ्या आचेवर खीर पातेल्यात खाली लागली. जळक्या वासाची खीर कुणीच खाल्ली नाही.

‘‘तुला काही येतं की नाही गं? कुठलंच काम कसं नीट होत नाही?’’ सगळ्या नातलगांसमोर धाकटी आत्या सलोनीवर ओरडली.

लाजेनं सलोनीचा चेहरा लाल लाल झाला. तिला खरंच काही येत नव्हतं. पण तिचा त्यात काय दोष होता? पुन्हा अवनी मदतीला धावली. ‘‘आत्या, सलोनी शिकलेली, शहरात राहणारी, नोकरी करणारी मुलगी आहे. तुम्ही तिच्याकडून इतक्या अपेक्षा करूच नका. आपल्या घरात अजून ती नवी आहे ना? शिकेल सगळं.’’

ज्या लग्नासाठी सगळे जमले होते ते लग्न थाटात पार पडलं. एक एक करत आलेली पाहुणे मंडळीही निघून गेली. एव्हाना अवनीशी सलोनीची खूप छान गट्टी जमली होती. अवनीनं तिला कामातल्या अनेक सोप्या सोप्या टीप्स दिल्यामुळे सलोनीला कामंही बऱ्यापैकी जमू लागली होती.

दोन दिवसांनी त्यांना निघायचं होतं. एका दुपारी सलोनी जुने अल्बम बघत होती. अवनीचा पदवी घेतानाचा फोटो होता त्यात.

‘‘हाच फोटो आम्हाला तिच्या घरच्यांनी बघायला पाठवला होता.’’ दीपेन म्हणाला.

‘‘काय शिकल्याय त्या?’’

‘‘वहिनी डबल एम ए अन् पीएचडी आहे. पूर्वी ती नोकरीही करायची पण एकदा आई आजारी झाली. बरेच दिवस आजारपण झालं. वहिनीनं आईची प्राणपणानं सेवा केली. नोकरी सोडली. घर सगळं सांभाळलं. तिच्या सेवेमुळेच आई जगली. आम्ही सर्व तिचे उपकार मानतो. या घरासाठी तिनं खूप काही केलंय. नोकरी सोडली. आराम सोडला…केवळ कुटुंबालाच प्राधान्य दिलं.’’

ज्या अवनीला सलोनी अशिक्षित समजत होती ती इतकी उच्चशिक्षित होती…पुन्हा सर्व घर एकटी सांभाळत होती. तिनं स्वत:च्या शिक्षणाचा तोरा मिरवला नाही, उलट या घरासाठी नोकरी, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र वगैरे सर्व बासनात बंधून ठेवलं.

सलोनीला आपल्या केल्या विचारसरणीची लाज वाटली. आपण उच्चशिक्षित आहोत पण इतर अनेक बाबतीत कमी पडतो. आपल्या लोकांसाठी इथं यायला हवं, इथल्या पद्धती, इथले नियम सगळं समजून घ्यायला पाहिजे, याची तिला जाणीव झाली. आधुनिक असणं म्हणजे शहरात राहणं अन् तीच जीवनशैली अंगिकारणं नाही…

अवनी वहिनीनं खोलीत येत म्हटलं, ‘‘तुम्ही अजून आवरलं नाहीत? आज बिट्टूच्या शाळेत कार्यक्रम आहे. जायचंय आपल्याला.’’

‘‘हो, हो, आवरतोच…’’ दोघंही एकदम म्हणाली…जरा गडबडलेच ते…

बिट्टूला शाळेतला ‘बेस्ट स्टूडंट’ अवॉर्ड मिळालं होतं. सर्व विषयात त्यानं उच्चांकी मार्क मिळवले होतेच शिवाय इतर सर्व एक्टिव्हिटीजमध्येही तो अव्वल होता. त्याला बक्षीस देऊन सन्मानित केल्यानंतर प्रिन्सिपॉलनं पालकांपैकी कुणी येऊन दोन शब्द बोलावेत अशी विनंती केली. दादांनी अवनीला म्हटलं, ‘‘तूच जा.’’

अत्यंत आत्मविश्वासानं माइक हातात घेत अवनीनं मोजक्या शब्दात, अस्खलित इंग्रजीत पालक, मुलं, शिक्षक यांचे संबंध व मुलांचा सर्वांगिण विकास यावर भाष्य केलं. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी तिला दाद दिली.

घरी परतताना सलोनी  म्हणाली, ‘‘आपली दोघांची रजा अजून शिल्लक आहे, ती वापरून अजून काही दिवस इथं राहूयात का?’’

आश्चर्यानं दीपेननं म्हटलं, ‘‘तुला इथं आवडत नाही ना?’’

‘‘आता आवडतंय, अवनी वहिनीबरोबर अजून थोडी राहिले तर मला बरंच काही  शिकता येईल.’’ सलोनी मनापासून बोलली.

‘‘चला, निदान चांगलं जेवण तरी मिळेल मला.’’ दिपेनच्या बोलण्यावर सलोनीनं हसून दाद दिली.

लाच

कथा * अर्चना पाटील

‘‘बाबा, मिठाई वाटा.’’

‘‘का, काय झालं?’’

‘‘मला शिक्षिकेचा जॉब मिळालाय जवळच्याच गावात.’’

‘‘ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी माझी मुलगी जीवनात काहीतरी बनलीच.’’

आज शाळेचा पहिला दिवस होता. मी खूप खूश आहे. माझे बाबाही माझ्यासोबत शाळेत आले आहेत. पहिला दिवस तर बरा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी उभे होतो. इतक्यात हेडमास्तर जवळ आले आणि सांगू लागले, ‘‘मॅडम, नोकरी मिळालीय, तर चहा तरी पाजा स्टाफला.’’

‘‘अं.. अजून मला पहिला पगारही मिळाला नाही. नंतर सर्वांना चहा पाजेन.’’

‘‘अहो मॅडम, एक कप चहासाठी महिनाभर वाट पाहायला लावणार का?’’

‘‘सर, मी सांगितलं ना, पहिला पगार झाल्यावर देणार. मला माफ करा.’’

अजित सर बाजूलाच उभे होते. हेडमास्तर निघून गेले.

‘‘मी काही बोलू का?’’ अजित सर हळू आवाजात म्हणाले.

‘‘बोला…’’

‘‘चहा पाजा, जर पैसे नसतील, तर मी देतो. पगार झाल्यावर परत करा.’’

‘‘मला उधार घ्यायला आवडत नाही.’’

सर्वजण वर्गात गेले. माझ्या वर्गात २० विद्यार्थी होते. १० मुले व्यवस्थित शिकत होती. १० मुलांना वेगळं शिकवावं लागत होतं. मी जशी ऑफिसमध्ये जायचे, तसे स्टाफचे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने चहावरच येऊन थांबत असत आणि माझी मस्करी करत असत. एके दिवशी माझं डोकं गरम झालं व मी बोलून गेले, ‘‘एक कप चहासाठी एवढे का मरत आहात, आता तर पहिल्या पगाराचा चहाही पाजणार नाही मी तुम्हाला.’’

शाळेचे मिश्रा, गुप्ता, शर्मा आणि हेडमास्तर माझं उत्तर ऐकून क्रोधित झाले, पण कोणी काही बोलले नाही. पण माझ्या रोखठोक उत्तराने शाळेत माझ्या विरोधात राजकारण सुरू झाले.

एके दिवशी मोठे साहेब अग्रवाल सर शाळेत आले. साहेबांसाठी मिश्राजी पटकन नाश्ता घेऊन आले. मलाही ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. मीही सर्वांसोबत एक समोसा खाल्ला. अग्रवाल सर जाताच हेडमास्तर २० रुपये मागू लागले.

‘‘एका समोशाचे २० रुपये?’’

‘‘मॅडम, गाडीला पेट्रोल नाही लागले का?’’ गुप्ताजी म्हणाले. मी पटकन वीस रुपये काढून त्यांच्या तोंडावर फेकले आणि माझ्या वर्गात गेले. माझ्यामागून अजित सरही माझ्या वर्गात आले.

‘‘तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘नाही, का बरं?’’

‘‘तर मग वीस रुपयांसाठी एवढा राग का?’’

‘‘पाच रुपयांच्या समोशासाठी वीस रुपये का?’’

‘‘कारण मिश्रा, गुप्ता आणि शर्मा पैसे देणार नाहीत, ते आपल्याकडून वसूल करण्यात आले. हेडमास्तर व अग्रवाल सरांचे पैसे मी दिले.’’

‘‘हा तर अन्याय आहे ना…’’

‘‘इथे असंच चालतं. कोणत्याही सरकारी शाळेत असंच होतं. सीनिअर लोक जसं सांगतात, तसं करावं लागतं. तुम्ही अजून नवीन आहात.’’

एका आठवड्यानंतर ऑफिसमधून ट्रेनिंगसाठी पत्र आलं. मला माहीत होतं, मलाच पाठवलं जाणार. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा ट्रेनिंगसाठी पत्र आलं. पुन्हा मलाच पाठवण्यात आलं. कधी एखादी मिटिंग असली की मलाच जावं लागायचं. वर्गात वीस मुले होती, परंतु केवळ १२ विद्यार्थीच शाळेत येत होते. मी खूप वेळा त्यांच्या घरी जाऊन आले, परंतु जोपर्यंत त्यांना बोलावण्यासाठी कोणी जात नसे, तोपर्यंत ते शाळेत येत नसत. ही रोजचीच गोष्ट होती. दर दिवशी त्या विद्यार्थ्यांना बोलवावं लागत असे.

एके दिवशी माझ्या बाजूला राहणाऱ्या राजूची जुनी स्कूल बॅग मी एका विद्यार्थिनीला दिली. पहिली आणि दुसरीच्या वर्गात ती शाळेत बसतच नव्हती. आपली पुस्तकांची पिशवी वर्गात ठेवून पळून जात असे. परंतु जुनी का होईना, स्कूल बॅग मिळाल्यानंतर ती रोज शाळेत येऊ लागली. एका स्कूल बॅगमुळे ती रोज शाळेत येऊ लागली, तेव्हा मला जरा बरं वाटू लागलं. आता या शाळेत मला ३ वर्षे झाली होती. गुप्ता, मिश्रा, शर्मा आणि हेडमास्तर रोज एखादी गोष्ट तर वाकडी बोलतच असत.  परंतु अजित सर आपल्या शांत आणि विनोदी स्वभावाने मला शांत करत असत. अजित सरांचे माझ्याशी प्रेमळ वागणे स्टाफला आवडत नसे. एके दिवशी अजित सर आणि ते चार सैतान ऑफिसमध्ये एकत्र बसले होते.

‘‘काय मग लग्न करायचा विचार आहे का मॅडमशी?’’

‘‘नाही तर?’’

‘‘करूही नका. मॅडम आपल्या समाजाच्या नाहीत आणि शिवाय शाळेत लव्ह मॅरेजच्या नादात सस्पेंड व्हाल. टीचर लोकांना लव्ह मॅरेज करणे अलाऊड नसते, माहीत आहे ना…’’

अजित सर काहीच बोलले नाहीत. कारण मनातल्या मनात ते माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होते. एके दिवशी अग्रवाल सर वर्गात आले. वर्गात मुले कमी होती.

‘‘वीसमधील फक्त १५ विद्यार्थी?’’

‘‘अं.. रोज तर येतात.’’

‘‘आज मी आलोय, म्हणून आली नाहीत का?’’

‘‘हो…’’ काय उत्तर द्यावे मला कळत नव्हते.

‘‘उठ बाळा, तुझं नाव काय आहे?’’

‘‘निखिल.’’

‘‘फळ्यावर आपल्या मित्राचं नाव लिही.’’

निखिलने फळ्यावर आपल्या मित्राचं नाव पियूषच्या ऐवजी पिउष लिहिलं.

‘‘मॅडम, काय शिकवता तुम्ही मुलांना. तू उठ, तुझं नाव काय आहे?’’

‘‘स्नेहल.’’

‘‘सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो?’’

‘‘सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त…’’

स्नेहलने उत्तर दिलं नाही. अग्रवाल सर ओरडू लागले, ‘‘तुम्हाला नोटीस देऊ का, देऊ का नोटीस?’’

मी नजर झाकवून उभी होते. हेडमास्तर हसत होते. अग्रवाल सर वर्गातून निघून गेले. मी स्वत: अजित सरांच्या वर्गात गेले.

‘‘मला माहीत आहे, हेडमास्तर जाणीवपूर्वक अग्रवाल सरांना माझ्या वर्गात घेऊन आले. सर मला ओरडले, तेव्हा त्यांचा जीव शांत झाला असेल.’’

‘‘जर तुम्ही एक चहा दिला असता तर…’’

‘‘माझ्यापेक्षा जास्त पगार तर हे लोक घेतात आणि सर्व कामे माझ्याकडूनच करून घेतात. मिश्रा, गुप्ता आणि शर्माजींना का नाही ट्रेनिंगला पाठवत? कारण ते अग्रवाल सर आणि त्यांच्या बायको-मुलांना मोठमोठी गिफ्टस् देतात.’’

‘‘जर तुम्ही कधीतरी काही गिफ्ट दिलं असतं तर…’’

मला माहीत होतं, अजितसरांकडे माझं मन शांत होणार नाही. मी पुन्हा माझ्या वर्गात गेले. संध्याकाळी घरात भांड्यांचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांनी हाक मारली.

‘‘एवढा आवाज का करतेस?’’

‘‘मोठे साहेब आले होते शाळेत. सांगत होते नोटीस देणार.’’

‘‘मग देऊ दे ना, सरकारी नोकरीत तर ही नेहमीची गोष्ट आहे.’’

‘‘सांगत होता, जर मी शिकवत नाही, तर पगार का घेते? मी तर रोज शिकवते, मुले शिकत नाही, तर मी काय करू? मिश्रा, गुप्ता आणि शर्माच्या वर्गात गेले नाहीत. माझ्याच वर्गात तोंड वर करून येतात. रोज येणारी मुले आज घरी राहिली होती. मी काय करणार?’’

‘‘अगं बेटा, एवढी उदास होऊ नकोस. एके दिवशी सर्व नीट होईल.’’

पण तरीही मुलांनी अग्रवाल सरांच्या समोर उत्तर का नाही दिले? नोटीस देईन, हे शब्द कानाला टोचत होते आणि मिश्रा, गुप्ता, शर्माचे हसणारे चेहरे डोळ्यांसमोरून जात नव्हते. जे होते, ते चांगल्यासाठी होते, असा विचार करून नवीन सुरुवात केली. बहुतेक माझ्या शिकवण्यातच काहीतरी कमतरता आहे, असा विचार करून नवीन उत्साहाने शिकवायला सुरुवात केली आणि एके दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर आली. अग्रवाल सरांनी ऑफिसमधून ऑर्डर पाठवली होती.

आज या शाळेतील शेवटचा दिवस होता.

हेडमास्तर बोलू लागले, ‘‘तुमच्या ट्रान्सफरमध्ये माझा काही हात नाहीए. मी अग्रवाल सरांना सांगितलं होतं, मुलगी आहे, जाऊ द्या. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही.’’

‘‘५०० रुपये हातावर ठेवले असतेस, तर ही पाळी आली नसती,’’ मिश्राजी म्हणाले.

‘‘अग्रवाल एवढा स्वस्त आहे मला माहीत नव्हतं.’’

‘‘जा आता जंगलात, प्राण्यांमध्ये. रोज एक तास बसने जावे लागेल. त्याच्यापुढे ५ किलोमीटर चालत जावे लागेल. रात्री घरी यायला ८ वाजतील. माझ्या मुलीसारखी आहेस, म्हणून सांगतोय, दुनियादारी शिक. लाच देणे सामान्य गोष्ट आहे,’’ शर्माजी म्हणाले.

‘‘तुमच्यासारख्या माणसांमध्ये राहण्यापेक्षा उत्तम आहे, मी प्राण्यांसोबत राहीन. जर तुम्ही पहिल्या दिवशीच मुलगी म्हणाला असता, तर आज ही पाळी आली नसती, शर्माजी.’’

ऑफिसच्या बाहेर अजित सर माझी वाट पाहात होते.

‘‘कधी काही समस्या असेल, तर मला फोन जरूर करा.’’

‘‘हो नक्कीच. या शाळेत फक्त तुम्हीच माझी आठवण काढाल असं वाटतंय.’’

भीष्म प्रतिज्ञा

कथा * शलाका शेर्लैकर

माझा नवरा अपूर्व आणि दोन्ही मुलांना माझी टिंगल करायची चांगली संधी मिळाली होती. तसेही ते तिघं एक होऊन नेहमीच माझी फिरकी घ्यायला बघतात. धाकट्या ऋतिकनं मोबाइल हातात घेतला अन् म्हटलं, ‘‘मम्मा, मी आजीला फोन करून सांगून टाकतो की तू मामाच्या लग्नाला येणार नाहीस. कारण तू भीष्म प्रतिज्ञा केली आहेस की आमच्यासोबत कुठंही जाणार नाहीस.’’

त्याच्या हातून फोन घेत नवरा, म्हणजे अपूर्वनं म्हटलं, ‘‘अरे बाळा, मी असताना तुम्ही आजीशी बोलावं हे मला योग्य वाटत नाही. फोन मलाच करू दे. मी आजीला नीट समजावून सांगतो की तुमची लाडकी लेक लग्नाला येणार नाही. तिनं कुठंही न जाण्याची प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा लग्नाची सगळी तयारी एकट्यानं करायची तयारी ठेवा.’’

माझ्या चढलेल्या पाऱ्यावर आईच्या फोननं थंड पाण्याचं काम केलं होतं. पण या तिघांच्या या अशा वागण्यानं माझा पारा पुन्हा चढायला लागला.

मुळात झालं असं होतं की आम्ही एक आठवडा सिमल्याला जाऊन आलो होतो. मुलांना सुट्या होत्या. अपूर्वनंही रजा घेतली होती. प्रवास छान झाला. सिमल्याचा मुक्कामदेखील सुखद होता. परतीचा प्रवास करून आम्ही तासाभरापूर्वीच आपल्या घरात आलो होतो. घरात शिरताच अपूर्व अन् दोन्ही मुलं टीव्ही अन् एसी सुरू करून सोफ्यावर, खुर्च्यांवर पसरले होते. आल्या आल्या अपूर्वनं हुकूम सोडला, ‘‘बबिता पटकन झकास चहा कर बरं, कधी एकदा घरचा चहा मिळेल असं झालंय.’’

‘‘मम्मा, प्लीज चहाबरोबर गरमागरम कांदाभजीही कर ना, कधीची इच्छा आहे मला. तिथं सिमल्याहून निघताना तो टपरीवाला तळत होता ना, तेव्हापासून नाकात वास घुमतोय माझ्या…’’ गौरवनं, मोठ्या चिरंजीवांनी म्हटलं.

‘‘मम्मा, तू मला प्रॉमिस केलं होतं, घरी पोहोचलो की तू मला मस्त थालीपीठ करून खायला घालशील म्हणून, तू तुझं प्रॉमिस विसरली तर नाहीस ना? धाकटे चिरंजीव ऋतिकनं, हम भी कुछ कम नहीं, हे सिद्ध केलं.’’

मी त्यांचं बोलणं ऐकत होते, पण माझं सगळं लक्ष घरातल्या पसाऱ्यावर होतं.

बाल्कनीत वर्तमान पत्रांचा ढीग साठला होता.

कारण आम्ही पेपरवाल्याला ‘पेपर टाकू नकोस’ हे सांगायलाच विसरलो होतो. ती रद्दी जागेवर ठेवणं गरजेचं होतं. मागच्या अन् पुढच्या बाल्कनीला कुंड्यांमधल्या झाडांनी पाण्याअभावी माना टाकल्या होत्या. त्यांना आधी पाणी द्यायला हवं होतं. घरात भरपूर धूळ साठली होती. सखूबाई उद्या सकाळी येणार म्हणजे आत्ता निदान घराचा केर काढायलाच हवा. अंथरूणाच्या (बेडवरच्या) चादरी बदलायच्या, स्वयंपाकाचा ओटा निदान पुसून काढायचा. प्रवासातल्या बॅगा रिकाम्या करायच्या. प्रवासात न धुतलेले कपडे मशीलना घालायचे. धूवून झाले की वाळायला घालायचे.

त्या खेरीज हॉटेलचं जेवण जेवून कंटाळलेल्या नवऱ्याला अन् मुलांनाही चवीचं काहीतरी स्पेशल स्वयंपाक हवाच. नुसत्या खिचडीनं किंवा पिठलंभातानं भागणार नाही.

चार दिवसही घराबाहेर राहून आलं की आल्यावर हा जो कामाचा डोंगर समोर दिसतो ना की जीव घाबरा होतो. असं वाटतं कशाला गेलो आपण बाहेर? नवरा अन् मुलांचं बॅगा घरात आणून आपटल्या की काम संपतच. त्यानंतर त्यांना काही काम नसतं. ते तिघं त्यांच्या कोषात, त्यांच्या विश्वात दंग अन् मी एकटी सर्व कामं करता करता मेटाकुटीला येते.

आपापल्या फर्माइशी सांगून ते तिघं टीव्हीपुढे बसलेले अन् मी स्वयंपाकघरात ओट्याशी विचार करत उभी की कामाला सुरूवात कुठून करू?

त्यांची पोटपूजा झाल्याखेरीज ती शांत होणार नाही अन् तोपर्यंत मलाही काही सुचू देणार नाहीत हे मला माहीत होतं. खरंतर प्रवासातून आल्या आल्या आधी स्वच्छ अंघोळ करायची इच्छा होती, पण तो विचार बाजूला सारून मी फक्त हातपाय, तोंड धुतलं अन् पदर खोचून कांदा चिरायला घेतला. एकीकडे कढईत तेल तापत ठेवलं, दुसरीकडे तव्यावर थालीपीठ लावलं, तिसऱ्या शेगडीवर चहाचं आधण चढवलं. भरभरा कांदा भजी, थालीपीठ, चहा अन् बिस्किटं असा सगळा सरंजाम टेबलावर मांडला. मंडळी त्यावर तुटून पडली. मीही शांतपणे चहा घेतला अन् लगेच कामाला लागले.

सगळ्यात आधी धुवायचे कपडे मशीनला घालावे म्हणजे मशीन कपडे धुवेल तेवढ्यात मला इतर कामं उरकता येतील.

मशीन सुरू करायचं म्हणताना मला पाण्याची टाकी आठवली. ओव्हरहेड टँकमध्ये किती पाणी असेल कुणास ठाऊक, कारण आठ दिवस आम्ही इथं नव्हतो. मी ऋतिकला म्हटलं, ‘‘जरा गच्चीवर जाऊन बघ टाकीत पाणी आहे की नाही तर तो दिवटा तोंडावरून पांघरूण घेऊन झोपला. त्यापूर्वी त्यानं मोठ्या भावाकडे बोट दाखवून त्याला वर पाठव एवढं मात्र सुचवलं.’’

मला भयंकर राग आला. धाकट्याकडे दुर्लक्ष करून मी बाहेर आले तोवर मोठ्याला काही तरी जाणीव झाली. तो पटकन् उठला, ‘‘मम्मा, मी बघून येतो अन् गरज असली तर मोटरही सुरू करतो.’’ त्याच्या बोलण्यानं मला बरं वाटलं. चला, कुणाला तरी दया आली म्हणायची. मी प्रवासातल्या बॅगा, सुटकेस रिकामी करायला लागले.

‘‘मम्मा, टाकी पूर्ण भरलेली आहे…आता कृपा करून एक तासभर तरी मला टीव्हीवरचा माझा अगदी आवडता कार्यक्रम बघू दे. प्लीज डिस्टर्ब करू नकोस.’’ त्यानं वरून आल्यावर मला सांगितलं अन् तो टीव्हीपुढे बसला.

सगळ्या पसाऱ्याचा, कामाचा मला इतका ताण येतोय अन् नवरा आणि मुलं मात्र बिनधास्त आहेत. कुणी तोंडदेखलंही मदत करायला म्हणत नाहीएत. बाहेर कुठं जायचं तर हीच तिघं आघाडीवर असतात. उत्साह नुसता फसफसत असतो. पण जाण्याच्या तयारीतही कुणी मदत करत नाहीत की प्रवासातून परतून आल्यावर आवरायलाही मदत करत नाहीत.

आता मात्र अति झालं हं. मी फार सरळ साधी आहे ना, म्हणून यांचं फावतंय. मी एकटी मरते खपते अन् यांची प्रत्येक गरज, मौज, इच्छा पूर्ण करते. पण यांना माझी अजिबात पर्वा नाहीए. आपलं काही चुकतंय याची एवढीशीही जाणीव नाहीए. यांना त्यांच्या जबाबदारीचीही जाणीव करून द्यायलाच हवीय. मी मनोमन विचार करत होते. कपडे मशीनमध्ये धुतले जात होते. घराचा केर काढून झाला होता. बेडवरच्या चादरी बदलल्या गेल्या होत्या. रद्दी जागेवर गेली होती. कुंड्यांना पाणी घातल्यामुळे मातीचा सुंदर वास सुटला होता. मी पुन्हा हॉलमध्ये पोहोचले.

‘‘ऐकताय का? मी ही तुमच्यासारखा प्रवास करून आलेय. तुमच्यासारखीच मीही दमलेय. मलाही आराम करावासा वाटतोय. पण मला तो हक्क नाही. कारण घरातली सगळी कामं मीच करायला हवीत हे तुम्ही गृहित धरलयं. म्हणूनच मी आता ठरवलंय की यापुढे मी कधीही तुमच्याबरोबर कुठंही येणार नाही. कार्यक्रम ठरवताना तुम्ही पुढाकार घेता, पण तयारी करताना मात्र अजिबात उत्साह नसतो. तिच तऱ्हा परतून आल्यावरही असते. प्रवासाला जाताना, तिथं गेल्यावर आपण काय कपडे घालायचे आहेत ठरवावं लागतं. कोणते कपडे बरोबर घ्यायचे हे बघावं लागतं. तुम्ही तिघंही ते ठरवत नाही. स्वत:चे कपडे बॅगेत भरण्यासाठी काढून देत नाही. मी माझ्या मनानं कपडे घेतले तर तिथं गेल्यावर, ‘‘मम्मा, हा शर्ट मला आवडत नाही, हाच का आणलास? मम्मा, ही जिन्स लहान झालीय. ही मी घालणार नाही, बबिता अगं, हे कुठले सोंगासारखे कपडे मला घालायला देते आहेस? कमालच करतेस…’’ हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. का नाही तुम्ही आपापले कपडे निवडून, मला ठेवायला देत? आतासुद्धा तुम्ही तिघंही मला कामात मदत करू शकला असता, अजूनही करू शकता, पण तुम्हाला कुणाला ती जाणीवच नाहीए. तुम्हाला सगळ्यांना आराम हवाय…मला नको का विश्रांती.’’

माझ्या भाषणाचा थोडा परिणाम झाला. गौरवनं पटकन् टीव्ही बंद केला. एसी बंद करून पेपर बाजूला टाकून नवरा उठला. धाकट्यानं अंगावरचं फेकून दिलं. तोही येऊन उभा राहिला.

तिघंही आपल्याला काय काम करता येईल याचा अंदाज घेत इथं तिथं बघत असतानाच माझा मोबाइल वाजला. रागात होते म्हणून फोनही उचलायची इच्छा नव्हती. पण माझ्या आईचं नाव दिसलं म्हणून पटकन् फोन घेतला. ‘‘हॅलो बबिता, अगं आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अगं, अभिषेकचं लग्न ठरलं हं! मुलीकडची मंडळी आता इथंच आहेत. साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवतोय. अजून लवकरचीच तारीख बघतोय तारीख नक्की झाली की पुन्हा फोन करते. तुला तयारीला वेळ मिळावा म्हणून घाईनं फोन केलाय. तू लवकर आलीस तर मलाही इथं कामं सुधरतील. एकटीला तर मला घाबरायलाच होतंय.’’ आईनं फोन बंद केला.

माझा फोन स्पीकरवर असल्यानं तिघांनीही आईचं बोलणं ऐकलं होतंच. तरीही मी आनंदाने चित्कारले, ‘‘बरं का, अभिषेकचं लग्न ठरलंय. लग्नाची तारीख लवकरचीच निघतेय. आईनं आपल्याला तयारीला लागा म्हणून सांगितलं.’’

‘‘पण मम्मा,’’ धाकटा अत्यंत निरागसपणे म्हणाला, ‘‘तू जाशील मामाच्या लग्नाला?’’

‘‘म्हणजे काय? मी का जाणार नाही? अन् तुम्हीदेखील याल ना मामाच्या लग्नाला?’’ मी आश्चर्यानं म्हटलं.

‘‘अगं, पण एवढयात तू म्हणाली होतीस की यापुढे तू आमच्याबरोबर, कुठंही, कधीही जाणार नाहीस म्हणून?’’ थोरल्यानं म्हटलं.

अन् मग सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे संवाद झाला. तिघंही माझी चेष्टा करू लागले. मघाच्या माझ्या रागावण्याचा जो परिणाम तिघांवर झाला होता. माझी मदत करायला ते तयार झाले होते, त्यावर आईच्या फोननं पाणी फिरवलं.

माझा मूड चांगला झालाय बघून पुन्हा तिघंही आपापल्या खोलीत गेले अन् मीही आरडाओरडा न करता आपल्या कामाला लागले.

दुसऱ्या दिवसापासून अपूर्वचं आफिस, मुलांच्या शाळा वगैरे रूटीन सुरू झालं. मी माझी कामं सांभाळून अभिषेकच्या लग्नाचं प्लॅलिंग सुरू केलं.

पण अभिषेकच्या लग्नाला जायचं, लग्नासाठी लागणारे आपले कपडे, पोषाख वगैरेची खरेदी, शिंप्याकडच्या फेऱ्या, जाताना बॅगा भरणं, आल्यावर बॅगा उपसणं वगैरे सर्व मनात येताच मला टेन्शन आलं.

अपूर्व अन् दोन्ही मुलांच्या असहकारामुळेच मला हल्ली कुठं जाणं नको वाटायला लागलं होतं. खरंतर नवरा अन् मुलं माझ्यावर खूप प्रेम करतात. पण मला अपेक्षित असलेली लहानलहान कामाची मदत मात्र ते करत नाहीत. सगळ्यात मोठी अडचण असते ती त्या तिघांच्या कपड्यांच्या बाबतीत. कुठल्या दिवशी, कोणत्या प्रंसगाला कुणी काय घालायचं हेसुद्धा मलाच ठरवावं लागतं. मुलांना म्हटलं, ‘‘चला, आपण दुकानातून तयार शर्ट, पॅन्ट, जीन्स, ट्राउझर्स विकत आणूयात,’’ तर म्हणणार, ‘‘प्लीज मम्मा, आम्हाला शॉपिंग करायला अजिबात आवडत नाही. तूच जा अन् घेऊन ये.’’

‘‘अरे पण मला तुमची निवड, आवड समजत नाही…’’

‘‘तू व्हॉट्सएॅपवर फोटो पाठव. आम्ही पसंत करतो.’’ हे उत्तर मिळतं.

दुकानातून मेसेज केला, फोटो पाठवले तर त्यावर उत्तरच येत नाही. शेवटी मी माझ्या बुद्धिप्रमाणे खरेदी करून घरी येते, तेव्हा एकाला रंग आवडलेला नसतो, दुसऱ्याला कॉलरचं डिझाइन. मला वैतागलेली बघून म्हणतात, ‘‘जाऊ दे गं! नको टेन्शन घेऊस, आम्ही आहेत तेच कपडे घालू…रिलॅक्स!’’

आता यांना कसं समजावून सांगू की जोपर्यंत नवरा आणि मुलं नवे कपडे घालत नाही, तोवर बायको किंवा आई स्वत:च्या अंगावर नवे कपडे घालूच शकत नाही. मुलांची वागणूक आणि त्यांची चांगली राहणी यावरूनच तर गृहिणीची, आईची ओळख पटते. त्यामुळेच अपूर्व आणि ऋतिक, गौरव यांचे कपडे स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असावेत म्हणून मी खूप काळजी घेते. मुलं लहान असताना एक बरं होतं. ती ऐकायची.

पण आता ती मोठी झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच मी शिंप्याकडून शिवून घेतलेले किंवा तयार विकत आणलेले कपडे ती घालंतच नाहीत. त्यांना जे आवडतं, तेच ती घालणार. कित्येकदा मी चिडून म्हणालेसुद्धा, ‘‘तुम्हा दोघांच्या ऐवजी दोघी मुली असत्या तर हौशीनं माझ्याबरोबर खरेदी करायला आल्या असत्या. शिवाय घरकामांतही मला मदत केली असती.’’

मुद्दाम करतात असंही नाही, पण मला गोत्यात आणायची कला बापाला अन् लेकांनाही उपजत असावी. कुठं लग्नाला गेलो असताना नेमक्या प्रसंगी घालायचे कपडे दोन्ही मुलांनी रिजेक्ट केले. एकाची झिप (चेन) खराब झाली होती. दुसऱ्याला झब्बा टाइट होत होता. त्या परक्या ठिकाणी मी कुणी ऑल्टर करून देणारा भेटतोय का किंवा पटकन् झब्बा मिळेल असं दुकान शोधत होते.

यावेळी मी मनातल्या मनात ठरवलं की मी असं काही तरी केलं पाहिजे, ज्यामुळे यांना माझ्या मन:स्थितीची, माझ्या टेन्शनची, माझ्या काळजीची कल्पना येईल. आपण बेजबाबदार वागतो त्याचा हिला त्रास होतो ही जाणीव होईल…अन् मला एक कल्पना सुचली. अंमलात आणायलाही सुरूवात केली.

एकुलत्या एका मामाच्या लग्नाला जायला ऋतिक आणि गौरव उत्सुक असणार अन् एकुलत्या एक धाकट्या मेहुण्याच्या लग्नात ज्येष्ठ जावई म्हणून मिरवायला यांनाही आवडेल हे मी जाणून होते. माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाला जायला मी ही खूपच उत्साहीत असणार हे त्यांनाही माहीत होतं. माझी आयडिया यावरच आधारित होती.

अभिषेकच्या लग्नाला बरोबर एक महिना होता. तेवढ्या वेळातच मला स्वत:ची तयारी करायची होती. शिवाय आईनं सांगितलेल्या अनेक गोष्टी, ज्या इथं मिळतात त्याही खरेदी करायच्या होत्या. वेळ म्हटलं तर कमीच होता. ही तिघं घराबाहेर असायची, तेवढ्या वेळात मी बाजारात जाऊन खरेदी करून घरी यायची. आणलेलं सामान व्यवस्थित कपाटात रचून ठेवायची. बाहेर कधीच कुठल्या पिशव्या नव्या वस्तू कुणाला दिसत नव्हत्या. मी ही घरातच दिसायची. माझ्या मनाजोगती माझी खरेदी अन् तयारी झाल्यामुळे मी खुश होते. पण वरकरणी तो आनंद दिसू न देता मी अगदी नॉर्मल वागत होते. लग्नाचा विषयसुद्धा मी एवढ्या दिवसात काढला नाही.

१५-१७ दिवस असेच निघून गेले. लग्नाचा विषय कुणाच्या डोक्यात नव्हता. मी अगदी शांत आहे हेसुद्धा कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. मग एक दिवस रात्री जेवायच्या टेबलावर अपूर्वनं विषय काढला. माझी प्रतिक्रिया अत्यंत थंड होती…सगळेच दचकले. तिघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी शांतपणे भात कालवत होते. ‘‘बबिता, अगं मी अभिषेकच्या लग्नाबद्दल बोलतोय. तुझ्या डोक्यात शिरतंय का? तू इतकी थंडपणे बसली आहेस? लग्नाची तयारी करायची नाहीए का? तुझी तब्येत बरी आहे ना?’’ अपूर्वनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘मी बरी आहे की!’’ मी बोलले.

माझा निर्विकार प्रतिक्रिया बघून अपूर्व सावधपणे माझ्याकडे बघत म्हणाले, ‘‘काही प्रॉब्लेम आहे का?’’

माझा बाण बरोबर लक्ष्यावर लागलाय हे बघून मला खूपच आनंद झाला. माझी योजना यशस्वी होतेय तर! मनातून वाटणारं समाधान चेहऱ्यावर न दिसू देता मी निर्विकारपणे म्हटलं, ‘‘मी लग्नाला जात नाहीए.’’

‘‘काय म्हणतेस? काय झालंय…काय,’’ तिघंही उडालेच!

‘‘माझी भीष्मप्रतिज्ञा विसरलास का?’’ मी ऋतिककडे बघत विचारलं.

‘‘अगं मम्मा, अभिषेक मामाचं लग्न होऊन जाऊ दे. मग पुन्हा कर भीष्म प्रतिज्ञा.’’ तो चेष्टेच्या सुरात म्हणाला. खरं तर मला हसायला येत होतं, पण मी गंभीरपणे म्हणाले, ‘‘मी सीरीयसली बोलतेय. उगाच काहीतरी कॉमेडी करू नका,’’ मी पटापट जेवले अन् आपलं ताट सिंकमध्ये ठेवून आपल्या खोलीत निघून गेले.

जाता जाता मी ऐकलं, गौरव अपूर्वला म्हणत होता, ‘‘पप्पा, आई बहुतेक आपल्यावर रागावली आहे. दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी आईचा राग घालावतो.’’ अपूर्वनं मुलांना आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी दुपारीच अपूर्वनं ऑफिसातून फोन केला, ‘‘बबिता, अगं, आज मी ऑफिसातून लवकर घरी येतोय. आपण अभिषेकच्या लग्नासाठी खरेदी करूयात. माझ्याकडे लग्नात घालण्यासारखे कपडे नाहीएत. काही कपडे मी घेतो विकत. तुझ्यासाठीही काही नवीन साड्या घेऊयात. एकुलत्या एका भावाच्या लग्नात तुला जुन्या साड्या नेसताना बघून बरं वाटेल का?’’

मला त्यांचं बोलणं ऐकून खरं तर हसायला येत होतं. कसंबसं मी स्वत:ला आवरत होते. इतकी वर्ष मी जेव्हा मनधरणी करत होते, तेव्हा माझ्याबरोबर दुकानात यायलाही ते तयार नव्हते अन् मी माझा पवित्रा बदलल्याबरोबर कसे सरळ झाले.

गौरव कॉलेजातून आला अन् म्हणाला, ‘‘ बरं का मम्मा, मी ना, नेटवर सर्व केलंय ऑनलाइन. खूप छान शर्ट आणि ट्राझर्स मिळताहेत…मी विचार करतोय की मी आजच ऑर्डर करतो म्हणजे मला मामाच्या लग्नासाठी बॅग भरता येईल. तुला उगीच दुकानात जा, कपडे निवडा, वगैरे टेन्शन नकोच!’’

मी हसून मान डोलावली. म्हणजे माझा ‘तीर निशाने पे लगा था.’ अपूर्व अन् दोन्ही मुलं आपापल्या कपड्यांचं सिलेक्शन करत होती. प्रथम माझा अन् नंतर एकमेकांचा सल्ला घेत होती, तेव्हा मला खूपच मजा वाटत होती. माझ्या साड्यांची निवड करायला मी अपूर्वलाच सांगितलं.

गौरवनं वर चढून बॅगा काढून दिल्या अन् दोघं पोरं अन् त्यांचा बाप आपापले कपडे बॅगेत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागले, तेव्हा मात्र मला राहवेना. मी पुढे होऊन त्यांना थांबवलं. थांबा मी नीट व्यवस्थित भरते बॅगा. बघा फक्त म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही आपल्या आवडीचे प्रसंगाला अनुरूप असे कपडे खरेदी केले हीच तुमची मदत फार मोलाची आहे. मला खूप बरं वाटतंय.

‘‘मम्मा, तू बॅगा जमव. आज बाबांनी डिनरपण ऑर्डर केलाय बाहेरून, म्हणजे स्वयंपाकात तुझा वेळ जायला नको,’’ अपूर्वनं म्हटलं.

‘‘आणि ना, परत आल्यावरही आम्ही तुला घर आवरायला मदत करणार आहोत हं!’’ माझ्या गळ्यात पडून ऋतिकनं म्हटलं.

मला तरी याहून जास्त काय हवं होतं?

कार पामिस्ट्री आणि वधूची निवड

मिश्किली * सुदर्शन सोनी

पूर्वी लग्नं जुळवताना पत्रिका अन् कुंडलीचं भारीच प्रस्थ होतं. शास्त्री, पंडित, गुरूजी वगैरे मंडळी मुलाची अन् मुलीची पत्रिका तपासायचे, अभ्यासायचे अन् मग त्यांचे गुण कितपत जुळतात ते बघायचे. जास्तीत जास्त गुण जुळले तर वर पक्ष आणि वधू पक्ष दोन्हीकडे आनंदी आनंद साजरा व्हायचा. लग्न ठरायचं. मग साक्ष गंध, साखरपुडा, श्रीमंती, लग्न वगैरे वगैरे…खरं तर पत्रिकेत चौतीस, छत्तीस गुण जुळले म्हणून ते लग्न अगदी शंभर टक्के यशस्वी होईल असं काही नसतं. प्रत्येकातच काही गुण, काही अवगुण असतात. त्यामुळे पतीपत्नीत मतभेद होतात, भांडणं होतात, मनभेद झाले तर एकमेकांबद्दल घृणा, तिरस्कार निर्माण होऊन संसाराचे तीन तेरा होतात.

पण हल्ली बरं का, पत्रिका बघून गुण जुळवण्याचं प्रस्थ थोडं कमी झालंय. आता इतर बरंच काही बघतात. मुळात मुलीचं शिक्षण अन् तिचं कमवतं असणं, ती किती कमवते याला महत्त्व आलंय. मुलांमध्येही हेच बघतात, मग इतर काही अवगुण, दोष याकडे दुर्लक्ष करून कमवण्यालाच महत्त्व आणि पसंती दिली जाते. तरीही बेबनाव, मतभेद, मनभेद होतातच. आईबापही त्रस्त असतात की असा मुलगा किंवा मुलगी कशी मिळवावी, जी आयुष्यभर घरात टिकून राहील. मधेच सोडून निघून जाणार नाही. आम्हाला तर वाटतं, तो काळ दूर नाही जेव्हा अशा संसारात टिकून राहणाऱ्या लोकांचा जाहीर सत्कार केला जाईल.

गंगूरामकडे एक लेटेस्ट टेक्निक आहे. बऱ्याच अभ्यासानंतर ती त्यानं विकसित केलेय. तसं तर माणसाला पारखायला त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घ्यायला हस्ताक्षर, जन्मतारीख, फूल हुंगून वगैरे अनेक प्रकारे परीक्षा करण्याच्या पद्धती आहेत. पण गंगूनं शोधलेली ही टेक्निक  खूपच यशस्वी ठरते आहे. वधू-वराला व वर-वधूला पसंत करत आहे.

या नव्या टेक्निकमध्ये तुम्ही फक्त प्रॉस्पेक्टिव वधूला गाडी चालवत असताना ऑबझर्व्ह करायचं आहे की ती कार कशी चालवते? त्यावेळी कशी वागते. यामागेही एक कथा आहे. एका सकाळी गंगू मॉर्निंगवॉकला निघाला होता. समोरून एक कार आली. आता कार येणं यात विशेष ते काय? पण विशेष होतंच. कारण ती कार कुणी खडूस, कठोर हातांचा पुरूष चालवत नव्हता, तर एक कोमलांगी सुंदरी, तरूणी चालवत होती.

तर समोरून एक कार येत होती. रस्ता खूपच अरूंद होता. पण त्या सुंदरीनं आपली गाडी रस्त्याच्या खाली घेतली नाही तर समोरच्या गाडीला खाली उतरायला भाग पाडलं…बस्स! तेव्हापासून गंगूची ट्यूब पेटली. अगदी साक्षात्कारच झाला म्हणाना. आता गंगूनं चक्क अभ्यासच सुरू केला. विषय: मुली कोणत्या परिस्थितीत, कार कशी चालवतात. अर्थात् त्यासाठी त्याला खूपच कष्ट करावे लागले. अनेक कारचा पाठलाग करावा लागला. काही वेळा तर मार खाण्यापर्यंत वेळ आली. पण, सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर गंगूला काही गोष्टी लक्षात आल्या. त्या त्यानं ‘कार पामिस्ट्री’ या नव्या विषयांअंतर्गत तुमच्या आमच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत. तेव्हा वाचकहो, वाचाच!

पहिलाच मुद्दा हा की जर अशा मुलीला तुम्ही सून म्हणून घरात आणणार असाल तर लक्षात घ्या, ही पॅट्रीआर्कल नाहीए, मॅट्रिआर्कल आहे. म्हणजे मातृसत्ताक पद्धतीवर ठाम विश्वास ठेवणारी आहे. तुमच्या मुलावर ही कायम दबाव आणेल. त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची किल्ली कायम गाडीच्या किल्लीप्रमाणेच तिच्या पर्समध्ये अथवा खिशात राहील.

दुसरा मुद्दा जर कार ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. मागे तर कार आहेतच, पुढेही अर्धा किलोमीटरपर्यंत कार्सची रांग लागली आहे, अन् ही बया कर्कश्श आवाजात सतत आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत असेल तर तुम्हाला वॉर्न करतो की ही फार कडक स्वभावाची पोरगी असेल. ती अजिबात वाट बघू शकत नाही. तिच्यात पेशन्स नाहीत. तिला सगळंच ताबडतोब हवंय.

तिसरा मुद्दा कारचा गेअर बदलताना ती कारला हादरा देत असेल तर या मुलीत आत्मविश्वासाची कमतरता आहे. तिचा आत्मविश्वास कमी पडतो हे मानून चाला. काही केलं तर केलं…नाही तर नाही. पण त्याचवेळी ती स्वत:ला गावातील सर्वात उत्तम कारड्रायव्हर मानत असते. अशी मुलगी जर सून म्हणून घरात आली आणि तिनं स्वयंपाकघरात पदार्थ तयार केला तर मत देताना जरा विचार करून द्या. फार परखड मत देऊ नका. तिला राग येईल.

चौथा मुद्दा थोड्याच अंतरावर ट्रफिक खूप आहे किंवा वळण आहे वा स्पीड ब्रेकर आहे हे माहीत असूनही कार हळू चालवत नाही. याउलट भरधाव वेगानं गाडी चालवत असेल तर सेव्ह एनर्जी या सिद्धांतावर ती विश्वास ठेवत नाही हे जाणून घ्या. तिला सून म्हणून घरात आणलं तर पंखा, दिवा, एसी, वॉशिंग मशीन वगैरे बंद करण्यासाठी एक नोकर घरात घेऊन यावा लागेल. ते परवडत नसेल तर तुम्हाला किंवा तुमच्या लाडक्याला हे काम करावं लागेल ही खूणगाठ मनाशी बांधून घ्या. वीज महामंडळात नोकरी असेल तर उत्तमच!

पाचवा मुद्दा कार मागे घेताना जर मुलगी मागे वळून न बघता गाडी रिव्हर्स करत असेल तर ती अत्यंत बेजबाबदार आहे असं मानायला हरकत नाही. कारण तिची विचारसरणी अशी आहे की प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो तेव्हा तिनं मागे बघण्यापेक्षा इतरांनीच पुढे अन् सगळीकडे बघत आपला जीव वाचवणं हे अधिक योग्य ठरतं. अशी मुलगी घरातल्या कुणाचीही काळजी घेणार नाही. घरात एकच अंड आणि दोनच ब्रेड स्लाइस असतील तर ती पटकन् त्या खाऊन मोकळी होईल. कारण ज्याला गरज असेल तो जाईल अन् पुन्हा घेऊन येईल.

सहावा मुद्दा अशी मुलगी जी सतत जोरातच गाडी हाणत असते, तर ती हायपर असते. गल्ली असो, रूंद रस्ता असो, हायवे असो की लोवे असो हिचा स्पीड कायम हायच असतो. तिला सतत ताणात राहण्याची सवय असते. टेन्स पर्सनॉलिटीला, शांतपणे, संयमानं कोणतंही काम करता येत नाही अन् टेन्शनमध्ये असणं हीच फॅशन असते असं मानणारी ही मुलगी असेल.

सातवा मुद्दा जर कार चालवताना मुलगी समोर खड्डा दिसत असतानाही कार दाणकन् खड्यात घालते तर याचा अर्थ ती भलतीच बिनधास्त आहे. ती मॉलमध्ये खरेदीला गेली तर नवऱ्याचे सगळे खिसे रिकामे केल्याशिवाय परत येणार नाही. क्रेडिट कार्ड बरोबर न ठेवण्याचा शहाणपणा नवऱ्यानं दाखवावा, नाहीतर कंगालच व्हाल. पण अशा मुली बोल्ड असतात, वेळ पडल्यास साहस दाखवण्यात नवरा क्लीन बोल्ड होईल पण ही महामाय समोरच्याला बुकलून काढेल. जोखीम घ्यायला तिला आवडतं.

आठवा मुद्दा मागून एखादी गाडी पौंपौं करत आली अन् कार चालवणारीनं पटकन् तिला साइड दिली तर पोरगी ‘एडजेसिटंग नेचर’ची आहे यावर विश्वास ठेवा. ‘जा रे बाबा, तुलाच घाई आहे, जा तू पुढे,’ असं समजुतीनं घेणारी आहे हे त्यावरून कळतं, याउलट मागून येणाऱ्या गाडीनं कितीही हॉर्न दिला तरीही मख्खपणे गाडी चालवत राहणं आणि साईड न देणं ही गोष्ट अजिबात एडजेस्ट न करणाऱ्या स्वभावाची निर्देशक आहे. हटवादी अन् ताठर स्वभाव यातून लक्षात येतो.

मग मंडळी, आता आपण आपल्या ‘कु’ किंवा ‘सु’ पुत्रासाठी वधूसंशोधन करणार असाल तर उगीचच इतर गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा, मुलीकडून फक्त कार चालवून घ्या…म्हणजे मुलीचे गुण तुम्हाला पटकन् कळतील अन् निर्णय घेणं सोपं होईल.

मी इथंच बरा आहे

कथा * सुधा गुप्ते

‘‘आयुष्य किती सोपं झालंय. एक बटन दाबा अन् हवं ते मिळवा. ही छोटीशी डबी खरोखर आश्चर्यच आहे. कुठंही कुणाशीही बोला,’ मोनूदादा एकदम खुशीत होता.

कालच १० हजारांचा मोबाइल घेऊन आलाय मोनूदादा. खरंतर त्याची आधीची डबी म्हणजे मोबाइलसुद्धा चांगलाच होता. पण बाजारात नवा ब्रॅन्ड आल्यावर जुनाच ब्रॅन्ड आपण वापरणं म्हणजे स्टॅन्डर्डला शोभत नाही ना? या डबीला तर इंटरनेट आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठीतच आलंय ना?

त्या दिवशी किती वेळ वाद चालला होता मोनूदादा अन् बाबांमध्ये. बाबांना आता एवढे पैसे मोबाइलवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. आईचा खांदा हल्ली फार दुखतोय. तिच्यासाठी चांगलं वॉशिंगमशीन घ्यायची त्यांची इच्छा होती. पण मोनूदादानं असं काही तारांगण घातलं की आईनं, ‘‘दुखू देत खांदा, मी धुवीन कपडे, पण त्याला मोबाइल घेऊन द्या,’’ असं बाबांना सांगितलं. ‘अभावात जगा पण शांतता राखा’ असा आईचा स्वभाव आहे.

‘‘तू मागितला असतास तर नसता दिला पण मोनूला नाही म्हणता आलं नाही. तो आईविना मुलगा आहे. त्याची आई व्हायचंय मला,’’ आई म्हणाली.

मनांत आलं की तिला सांगावं, ‘‘बिना आईचा तर मी आहे. त्याला आई आहे. ज्या दिवसापासून मी अन् आई मोनूदादा अन् बाबांच्याबरोबर राहायला आलो आहोत, त्या दिवसापासून जणू मी अनाथ झालो आहे. वडील आधीच गेलेले अन् आता आईही माझ्या वाट्याला फारच कमी येते. मोनूला आई नाहीए. ती त्याला अन् बाबांना सोडून पळून गेली आहे. त्याची शिक्षा नकळत का होईना मला भोगावी लागते आहे.

माझी आई तर माझीच आहे. माझंच जे आहे ते माझ्यापासून कोण हिसकावून घेणार? पण मला दु:ख हेच आहे की आई माझी असून माझी नाहीए. तिलाही कदाचित असंच वाटत असेल की सावत्र शब्द मधे आला की त्या सावत्रपणाच्या छायेतून बाहेर पडायला फार श्रम घ्यावे लागतात. फार चिकाटी ठेवावी लागते. जो आपला नाही, त्याला आपला करायचाय…जो आपलाच आहे, त्याला, आपलाच आहे हे सिद्ध करायला प्रयत्न करण्याची गरजच काय?

बरेचदा असं होतं. नको असलेल्या नात्यात माणूस अडकतो. माझ्या आजोबांची फार इच्छा होती की त्यांच्या सुनेनं दुसरं लग्न करावं. त्यांच्या एका मित्राचा मुलगा, त्याची बायको घरातून पळून गेल्यामुळे कसंबसं आयुष्य रेटत होता. दोघा मित्रांनी आपापल्या अपूर्ण मुलांना पूर्णत्त्व यावं यासाठी त्यांचं लग्नं करून दिलं. दोघांनाही आपली जबाबदारी पूर्ण झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य वाटलं, कदाचित माझी आई आणि मोनूचे बाबाही सुखावले असतील.

मी वडिलांना कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे मी कुणालाच बाबा म्हणत नव्हतो. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात आलेले पुरूष काका, मामा, आजोबा किंवा दादाच असायचे. गेली सतरा वर्षं आईच माझी आई अन् बाबा होती. मी माझ्या आजोबांनाच बाबा म्हणत होतो. आईच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर रात्रभर मी बेचैन होतो. मला झोप लागली नाही. पण आजोबांनीच मला समाजावलं की आईच्या चांगल्या, सुखमय भविष्यकाळासाठी मी तिच्या लग्नाला विरोध करू नये.

‘‘हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस. आता तू अठरा वर्षांचा आहेस. आणखी  ८-१० वर्षांत तू नोकरीला लागशील. तुझं लग्न, तुझा संसार यात गुंतलास की तुझी आई खूपच एकटी पडेल. तिला कुणाची सोबत, कुणाचा आधार लागेलच ना? इतक्या वर्षांत तिच्या दुसऱ्या लग्नाचा योग आला नव्हता, तो आता आलाय…तर हे लग्न होऊन जाऊ दे…तुला जिथं वाटेल तिथं तू राहा. हे घर तुझंच आहे. तेही घर तुझंच आहे. आम्ही तुझेच आहोत अन् तू आमचा आहेस.’’

वडील नसले की मुलं लवकरच समजूतदार होतात. मीही आईकडे आता वडिलांच्या दृष्टीतून बघू लागलो. कोर्टात दोघांनी सह्या केल्या. एकमेकांना हार घातले अन् दोन अपूरी, अर्धीमुर्धी कुटुंब मिळून एक संपूर्ण कुंटुंब झालं. मी आईला प्रथमच असं नटलेलं बघितलं. कपाळावर कुंकु, गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याच्या, काचेच्या बांगड्या अन् जरीची राणी रंगाची साडी…आई इतकी सुंदर दिसत होती…एक संपूर्ण अनोळखी कुटुंब आईचं होत गेलं अन् मी मात्र आईपासून दूर होत होत बहुतेक घरातून बाहेरच होईन असं वाटतंय.

‘‘काय झालंय तुला? असा गप्प का आहेस विजय?’’ मीरा, माझी क्लासमेट आहे. पण खूपच समजूतदार आहे. माझी समजूत घालण्याचं काम तिचंच असतं.

‘‘आज आईकडे नाही जाणार? आजोबांच्या घरी जातो आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का?’’

मी काय सांगू? कसं सांगू? माझी आईच माझ्यापासून दूर दूर जाते आहे…म्हणजे मला असुरक्षित वाटतंय असं नाहीए. आईच्या हृदयातला एक कोपरा मी आनंदानं मोनूदादासाठी दिला असता पण तो त्या लायकीचा नाहीए…आई इतकी त्याच्या मागेपुढे फिरते. त्याचं कौतुक करते पण तो मात्र आईचा मान अजिबात ठेवत नाही…उलट अपमानच करतो. हे सगळं मला सहन होत नाही.

माझ्याहून मोठा आहे मोनूदादा, वीस एकवीसचा सहज असेल. त्याला इतकंही कळू नये? आई बिचारी त्याला ‘आपला’ म्हणत असते. सतत त्याच्यासाठी झटत असते. पण त्याच्या मनात काय पूर्वग्रह आहे कुणास ठाऊक…पण जसं त्याच्या वडिलांना माझेही वडील म्हणून मी स्वीकारलं आहे, तसा तो माझ्या आईला त्याची आई म्हणून स्वीकारतच नाहीए…’’

मीरानं माझ्या हातावर थोपटून मला शांत केले. ‘‘वेळ लागतो विजय…आत्तापर्यंत त्या घरात त्याचं एकछत्र साम्राज्य होतं. आता तुम्ही दोन नवीन माणसं त्याच्या अधिकारावर अतिक्रमण करताय…’’

तिला पुरतं बोलू न देता मी म्हटलं, ‘‘अधिकारावर अतिक्रमण कसं म्हणतेस तू? अन् आई एकटीच त्यांच्या घरात गेलीय. मी तर बहुतेक वेळ आजीआजोबांकडेच राहतो. फार क्वचित मी तिथं जातो.’’

‘‘फार क्वचित जातो म्हणजे?’’ मीरानं आश्चर्यानं विचारलं. ‘‘कधीतरीच तिथं जाशील तर त्या घरात रमशील कसा? ते घर तुझं वाटेल कसं तुला?’’

‘‘ते घर मला माझं वाटण्याला काही अर्थ नाहीए…माझ्या बाबांचं, आजोबांचं घर आहे ना माझ्यासाठी. ते माझ्या आईचं घर आहे. तिनं तिथं रूळायला, रमायला हवंय आणि ती रमलीय तिथं. आपला नवा संसार सजवण्यात, ते घर नीट ठेवण्यात, नव्यानं त्याची मांडणी करण्यात ती इतकी गुतंली आहे की आठ आठ दिवस मी तिकडे फिरकत नाही हेही तिच्या लक्षात येत नाही. ‘इतके दिवस आला का नाहीस?’ एवढंही ती मला विचारत नाही. अर्थात आजोबांना अन् मलाही तेच हवं होतं…आईला जोडीदार मिळावा, ती एकटी राहू नये अन् तिनं सुखाचा संसार करावा. तसंच होतंय.’’

‘‘पण या आधी कधी तू बोलला नाहीस? मला तर वाटलं, गेलं वर्षभर तू तुझ्या नव्या घरातच राहतो आहेस.’’

‘‘खरं सांगायचं तर ते घर मला ‘माझं’ वाटत नाही. फारच कमी दिवस मी राहलोय तिथं.’’

‘‘पण तुझं नवे बाबा काही म्हणत नाहीत? तू इथंच थांब म्हणून आग्रह नाही करत?’’

‘‘सुरूवातीला म्हणायचे…मोनूदादाची खोलीही मला दिली होती. मला खोलीचा मोह नाहीए. आजोबांचं अख्खं घर आहे माझ्यासाठी. प्रश्न अधिकाराचाही नाहीए. प्रश्न प्रेम अन् मान राखण्याचा आहे. जागेसाठी मी तिथं राहत नाही. तिथं राहताना मला सतत जाणवतं की मोनू माझ्या आईशी नीट वागत नाही. तिला लागेल असं बोलतो अन् ते मला खटकतं. कदाचित मी आईच्या बाबतीत फार हळवा असेन. मी कदाचित अधिक संकुचित वृत्तीचा असेन. काही गोष्टी पचवणं मला जमत नाहीए. पूर्वी माझी आई फक्त माझी होती, पण आज ती एका अशा पुरुषाबरोबर आनंदात आहे जो माझा पिता नाहीए. मी जर माझ्या आईवरचा अधिकार सोडतोय तर मोनूनं तिचा मान राखायला हवा ना?’’

‘‘त्याचं मन तुझ्याएवढं मोठं नसेल विजय अन् त्याची समजही तुझ्याएवढी परिपक्व नसेल?’’ मीरानं म्हटलं.

‘‘कदाचित त्याला मीरासारखी मैत्रीण भेटली नसेल…’’ मी हसत म्हटलं. मीराही हसली.

पण वरकरणी मी जरी हा विषय संपवला होता तरीही मनातून मी माझ्या आईची काळजी करतच होतो. एखाद्या बापानं आपल्या मुलीची करावी तशी…आईचा पुनर्विवाह तिच्यासाठी काही नवं संकट तर नाही ना उभं करणार?

पण नवे बाबा आईची खूप काळजी घेतात. आईमुळे घराला आलेलं घरपण, उजळलेलं रूप, आईचा कामसूपणा या सगळ्यामुळे ते प्रसन्न दिसतात. त्यांच्या वागण्या बोळण्यातून आईविषयीचा आदर व कृतज्ञता जाणवते.

बस्स, मला फक्त मोनूदादाचं वागणं आवडत नाही. मी आईचा चेहरा वाचू शकतो. तिची सहनशक्ती अफाट आहे. कधीतरी तिचीही सहनशक्ती संपेल त्यानंतर काय होईल? मी तर तिथं राहतच नाही. मुळात आई आणि मोनूदादात माझ्यामुळे दुरावा यायला नकोय मला. आईचं घर, आईचा संसार अभंग राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आजीआजोबा पण जणू माझ्या पाळतीवर असतात. माझा चेहरा वाचायचा प्रयत्न करतात. मी आईला भेटतो की नाही, कधी भेटलो होतो वगैरे अगदी खोदून खोदून विचारतात. कधी तरी सांगतो मी की भेट झाली नाही, कधी तरी भेटल्याचं सांगतो. कधी खोटं तर कधी खरं. पण मला या सगळ्याचा फार त्रास होतोय. जीव गुदमरतोय माझा.

मीराला माझी मन:स्थिती कळतेय. ‘‘अरे, वार्षिक परीक्षा डोक्यावर आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. सारखा त्या मोनूचाच विचार करशील तर पास कसा होशील? आई आधीच त्या मोनूच्या वागण्यानं दु:खी आहे, तू आणखी तिच्या दु:खात भर का घालतोस? हे सगळं चालतंच रे, अन् हळूहळू सगळं मार्गीही लागतं. तू अभ्यास पूर्ण कर, नोकरीला लाग त्यामुळेच आईलाही बरं वाटेल ना?’’ मीरानं मला खूपच छान समजावलं.

अन् मीही जोरदार अभ्याला लागलो. मीरानं म्हटलं ते खरच होतं. मी कर्तबगार निघालो तरच मी आईला आधार देईन ना? तिला तेवढंच बरं वाटेल.

आता मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच अभ्यास करत बसायचो. आजी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. आजोबा कधी सफरचंद तर कधी पपई कापून आणून द्यायचे. कधी आजी अक्रोड, बदाम त्यांच्या हाती पाठवायची तर कधी खसखसशीचा शिरा. दोघंही माझ्यासाठी खूप श्रम घेत होते.

‘‘तू अभ्यास नीट कर. इतर कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासाठी?’’ आजीआजोबा सांगायचे.

कधीतरी आईशी फोनवर बोलून घेत होतो. ती तिथं रमली आहे हेच मला खूप समाधान होतं. माझ्या विझणाऱ्या दिव्याला तेवढं समाधान तेलासारखं होतं.

परीक्षा एकदाची संपली अन् मला ‘हुश्श’ झालं. पेपर फारच छान गेले होते. शेवटचा पेपर देऊन मी घरी आलो तेव्हा आईबाबा येऊन बसलेले दिसले. मला सुखद आश्चर्य वाटलं. शेवटी आईला माझी आठवण झाली म्हणायची. मी आईकडे बघितलं. तिच्या कपाळावर ढीगभर आठ्या होत्या. बाबांनी मला जवळ घेऊन माझ्या खाद्यांवर थोपटलं.

‘‘आम्ही तुला घ्यायला आलोय बाळा, पेपर छान गेले ना? आता आपल्या घरी चल…’’ बाबा म्हणाले.

‘‘नाही…नाही…मी येणार नाही. ते घर माझं नाहीए…मी इथंच बराय. हेच माझं घर आहे.’’ नकळत मी बोलून गेलो.

‘‘अरे, इतके दिवस तुझ्या परीक्षेचा ताण होता तुझ्यावर, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता चल त्या घरी.’’

‘‘नाही बाबा, मला नाही जायचंय…प्लीज माझ्यावर बळजबरी करू नका.’’

‘‘मोनूशी भांडण झालंय का तुझं? तो सांगत होता तू त्याच्या आईचं नाव घेऊन त्याची बदनामी केलीस म्हणून?’’ आई रागानं म्हणाली.

बाबा आईला न बोलण्याबद्दल सांगत होते, पण ती मात्र पूर्ण शक्तिनिशी मला दोषी ठरवत होती.

‘‘तू मोनूच्या आईचं नांव घेऊन त्याला हिणवलंस, टोमणे दिलेस, लाज नाही वाटत असं वागायला? काय बोलावं अन् काय बोलू नये हे कळण्याइतका मोठा झाला आहेस तू. लहान नाहीएस.’’

क्षणभर वाटलं सगळे एका बाजूला झाले आहेत अन् मी एकटा एका बाजूला आहे. मी मोनूला कधी त्याच्या आईबद्दल वाईटसाईट बोलले,  मी तर त्याला टाळतंच असतो. शक्यतो समोरासमोर येत नाही कारण मुळात त्याचं वागणंच बरोबर नसतं.

‘‘तू असं का केलंस बेटा? तू तर समजूतदार आहेस ना राजा?’’ आजीनंही मलाच विचारलं.

आजोबाही न्यायाधिशाच्या भूमिकेत दिसले. इतके दिवस सगळे गप्प होते कारण माझी परीक्षा होती. आज शेवटचा पेपर झाला अन् सगळ्यांचाच संयमाचा बांध फुटला. माझं वर्षभर गप्प राहाणं, संयमानं स्वत:वर बंधनं घालणं सगळं गेलं आलं…माझ्या आईसाठी माझं मन सतत आक्रोशत होतं ते सगळं बेकारच म्हणायचं. मी जणू अपराधी आहे असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की या आक्रमणासाठी अजिबातच तयारीत नव्हतो. परीक्षा संपल्याच्या आनंदात घरी आलो होतो. कसं छान हलकं हलकं वाटत होतं. घरी अजून एक परीक्षा वाट बघतेय हे कुठं ठाऊक होतं?

मी जरा सावरतोय तेवढ्यात आईनं प्रश्न केला, ‘‘तू मोनूना असं विचारलंस की त्याची आई कुणाबरोबर पळून गेली म्हणून? विचारलं होतंस असं?’’

मी चकितच झालो…कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवली अन् कशी लोकांसमोर मांडली मोनूनं? स्वत:चं वागणं नाही सांगितलं…मी काही बोलणार तेवढ्यात बाबांनी माझा हात धरून मला माझ्या खोलीत आणलं अन् खोलीचं दार आतून लावून घेतलं. माझ्यासमोर उभं राहून ते बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बघत होते. मग म्हणाले, ‘‘मला कळतंय, तुझा संयम संपला असेल तेव्हाच तू काहीतरी बोलला असशील…काय घडलंय बाळा? तू तुझ्या आईपासून दूरदूर का राहतोस? माझं घर नांदतं व्हावं अन् तू एकटा पडावास असं मलाही नकोय. तू तिथं का येत नाहीस?’’

‘‘मोनू माझ्या आईला मान देत नाही…वाईट वागतो. ते मला बघवत नाही, सहन होत नाही, म्हणून मी तिथं येत नाही.’’

‘‘काय म्हणतो मोनू? मला सांग तर खरं…तूही माझा मुलगा आहे. तुझाही माझ्यावर तेवढाच अधिकार आहे.’’

‘‘मला कुठलाच अधिकार नकोय बाबा. अधिकाराची एवढी हाव असती तर मी आईला तुमच्याकडे पाठवलंच नसतं. आईच्या आनंदासाठी, आईला मी माझ्यापासून दूर केलंय…या घरात तिला काय कमी होतं? खाणं, पिणं, कपडालत्ता, मानसन्मान सगळंच होतं…आजी आजोबा अन् मीही तिच्यावर जिवापाड प्रेम करतो.’’

मोनू कॉलेज कॅन्टीनमध्ये माझी चेष्टा करतो. मित्रांना सांगतो, ‘‘याची आई माझ्या घरी पळून आली आहे… तो असं का म्हणतो? मला माझ्या आईला सांभाळता येत नव्हतं का? माझी आई तर वडिधाऱ्यांच्या सांगण्यावरून अगदी राजरोसपणे लग्न करून तुमच्या घरात आली आहे. पण मोनूचा आई कुठं भटकते आहे हे त्याला ठाऊक आहे का? माझी आई कुठं आहे हे मला ठाऊक आहे? बाबा तुम्हीच सांगा, मी त्याला हे विचारलं यात माझं काय चुकलं? अपमान त्यानं माझा केलाय की मी त्याचा केलाय?’’

बाबा खरोखर अवाक् झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वत:च्या मुलाच्या वर्तणुकीची लाज स्पष्ट दिसत होती. ते दुखावलेही गेले होते.

‘‘बाबा, तुम्हालाही वाटतं माझ्या आईनं तुमच्याशी लग्न केलं ही वाईट गोष्ट आहे? त्यामुळे माझा अपमान होणं बरोबर आहे का?’’

‘‘नाही रे बाळा, असं बोलू नकोस, माझं तर आयुष्यच आता कुठं सुरू झालंय…तू अन् तुझी आई माझ्या आयुष्यात आलात …तेव्हापासून…अन्… खरं तर आईची माया काय असते ते मोनूलाही तुझ्या आई घरात आल्यावरच समजलंय.’’

‘‘समजलंय तर तो आईशी कृतज्ञतेनं का वागत नाही? तिचा अपमान का करतो? तिचा मान ठेवत असता तर चार फालतू मित्रांमध्ये बसून माझ्या आईबद्दल असं बोलला नसता. तुमच्या अन् आईच्या लग्नानंतर लगेचच काही दिवसात तो असं बोलला. त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघतही नाहीए. मला फक्त इतकंच समजतंय की तो माझ्या आईला मान देत नाही. मी त्याला काहीही म्हणालो नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी त्याच्या आईचा अपमान का करेन?’’

बाबा गप्प होते. माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मग मला जवळ घेऊन कुरवाळू लागले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शानं मला एकदम रडू आलं.

‘‘पण मग इतके दिवस तू हे सगळं माझ्याजवळ बोलला का नाहीस? इतकं सगळं मनात का ठेवलंस?’’

‘‘मला मोनूची मन:स्थिती समजतेय बाबा, त्याला तुमच्यावरचा अधिकार विभागला गेलेला सहन होत नाहीए. पण ज्याच्या आईचा स्वत:चाच पत्ता ठिकाणा नाहीए, त्यानं दुसऱ्याच्या आईबद्दल अपमानकारक का बोलावं?’’

‘‘मोनूनं असं बोलायला नको होतं. मी विचारेन त्याला?’’

‘‘नका विचारू बाबा, आईला कळलं तर मोनूबद्दल तिच्या मनात किल्मिष येईल. मग ती मोनूना माया देऊ शकणार नाही. ती माझी आई आहे. ती माझीच राहील. दूर किंवा जवळ राहण्यानं ती माझ्यापासून दुरावेल असं नाही. पण मोनूला आईची अधिक गरज आहे. म्हणूनच मी आईच्या प्रेमात वाटेकरी होऊन तिथं राहू इच्छित नाही. मला इथंच राहू देत. तिथं राहिल्याने तर नित्य नवं काहीतरी घडेल. तुम्हाला अन् आईला त्याचा त्रास होईल…ते मला नकोय. ते घर मोनूचं आहे, हे घर माझं आहे. मी खरं काय ते तुम्हाला सांगितलं, मी मोनूला चिडवलं नाही, टोमणा दिला नाही फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. माझं बोलणं त्याला झोंबलं, तर त्याच्या बोलण्याचा मला त्रास नसेल झाला?’’

बाबा शांतपणे ऐकत होते. पुन्हा मला कुशीत घेतलं अन् हसून म्हणाले, ‘‘मी खरोखर भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखा शहाणा, समजूतदार मुलगा मिळाला. मला तुझं म्हणणं समजलंय. आता माझंही म्हणणं ऐकून घे. तू अन् तुझी आई, दोघंही माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहात. आधीपासूनच तुम्हा दोघांविषयी माझ्या मनां असलेला आदर अन् कृतज्ञता आता आणखी वाढली आहे, मला वाटतं, आपण चौघांनी एकत्र राहावं.’’

‘‘बाबा, मी काय किंवा मोनू काय, आता लहान नाही आहोत. किती दिवस तुमच्यापाशी राहू? बाहेर जावंच लागेल…मनात तेढ ठेवून जवळ राहण्यापेक्षा दुरून गोडीनं राहावं, भेटताना मोकळ्या मनानं भेटावं हे चांगलं नाही का?’’

बाबांचे डोळे भरून आले. ते मला जवळ घेऊन काही क्षण स्तब्ध उभे होते. मला प्रथमच जाणवलं की मी माझ्या बाबांच्या कुशीत आहे. मला माझे वडिल भेटले.

मला स्वत:पासून दूर करत ते म्हणाले, ‘‘सुखी रहा बाळा, पण स्वत:ला एकटा समजू नकोस, मी तुझाच आहे. जे लागेल ते हक्कानं माग. आज उद्या कधीही…मी तुझाच आहे. मोनूला थोडा वेळ देऊ या. एकेकाला समज उशीरा येते. काळही बरंच काही शिकवतो. त्यालाही हळूहळू नाती कळायला लागतील.’’

आई बाहेरून खोलीचं दार सारखं वाजवत होती. बहुधा ती घाबरली होती…बाबांसाठी किंवा माझ्यासाठी कदाचित दोघांनी आत काय गोंधळ घातला असेल म्हणून. बाबांनी दार उघडलं. आईच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या होत्या. तिच्या एकूण देहबोलीवरून ती माझ्यावर किती रागावली आहे हे मला कळत होतं. ती तिच्या नव्या संसारात रमली आहे हे मला कळलं होतं. मलाही तेच हवं होतं. आई तिच्या घरात आनंदात राहावी. माझं काय? मी जिथं आहे तिथंच बरा आहे.

मी आहे मदतीला

कथा * दीपा पांडे

लग्न समारंभ एका देखण्या अन् प्रशस्त लॉनवर आयोजित केला होता. सजावट बघणाऱ्याचं मन मोहून घेत होती. काही पोरं डीजेच्या गाण्यावर नाचत होती. अजून रिसेप्शन सुरू व्हायला अवकाश होता. सगळी व्यवस्था उत्तम होती.

खुर्चीवर बसलेल्या एका स्त्रीकडे थोड्या अंतरावरून टक लावून सीमा बघत होती. सतत बघितल्यानंतरही जेव्हा त्या स्त्रीनं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही तेव्हा सीमा स्वत:च उठून तिच्या जवळ गेली. ‘‘तू तू रागिणीच आहेस ना? रागिणी, मी सीमा. तू ओळखलं नाहीस मला? अंग मघापासून तुझ्याकडे बघतेय मी…पण तू ओळख दाखवली नाहीस…मग म्हटलं आपणच ओळख द्यावी…किती वर्ष झालीत गं आपल्याला दुरावून?’’ सीमानं तिला गदागदा हलवलं अन् मिठी मारली.

रागिणी जणू झोपेतून जागी झाली. तिनं आधी डोळे भरून सीमाकडे बघितलं अन् एकदम आनंदानं चित्कारली, ‘‘सीमा…मला सोडून का गं निघून गेलीस? तू नसल्यामुळे मला किती एकटं वाटत होतं.’’ रागिणीनं आता सीमाला मिठी मारली. दोघींचे डोळे पाणावले.

‘‘तू इथं कशी?’’ सीमानं विचारलं.

‘‘अगं नवरीमुलगी माझी चुलत बहीण आहे. तुला आठवतं का? ती उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे यायची. लिंबूटिंबू म्हणून आपण तिला आपल्यात खेळायला घेत नसू, कारण वयानं ती आपल्यापेक्षा बरीच लहान होती.’’ सीमा हसून म्हणाली.

‘‘हो, हो…आठवतंय मला.’’ मेंदूला ताण देत रागिणी म्हणाली.

मग वरात येईपर्यंत त्या दोघींची गप्पा खूपच रंगल्या. शिक्षण, जुन्या मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमा, नाटक कित्तीतरी विषय होते. रागिणी तर किती तरी दिवसांनी इतकी बोलत होती. बालपणाची मैत्री मोठं झाल्यावरही निरागसता जपत असते. तिच्यात औपचारिकपणा अजिबात नसतो.

तेवढ्यात एकदम गडबड उडाली…चार वर्षांची एक मुलगी दिसेनाशी झाली होती. सगळेच धावपळ करत होते. व्हॉट्सअॅप करून तिचे फोटे पाठवले गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. लग्न जिथे होतं ते एक भलं मोठं फार्म हाऊस होतं. व्यवस्था उत्तम होती पण लहान मुलगी दिसेनाशी होणं काळजी निर्माण करणारं होतं.

अर्धा तास हुडकल्यावर ती सापडली. जिथं खेड्यातला सेट लावला होता तिथं पाट्यावर चटणी वाटणाऱ्या बाईशी गप्पा मारत होती. रागिणीनीच तिला हुडकून आणली होती. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं, आभार मानले. त्या मुलीची तरूण आई मैत्रिणींसोबत डीजेच्या तालावर नाचण्यात मग्न होती. कधी मुलगी तिथून निसटली ते तिला कळलंच नाही. आजीला जेव्हा नात दिसेना तेव्हा तिनं हळकल्लोळ माजवला. मुलगी तर मिळाली. सासूनं सुनेचा सगळ्यांसमोर उद्धार केला. थोड्याच वेळात सर्व स्थिर स्थावर झालं.

लोक खाण्यापिम्यात मग्न झाले. सीमा व रागिणी पुन्हा आपल्या खुर्च्यांवर येऊन बसल्या. ‘‘तुझे डोळे खूपच तीक्ष्ण आहेत हं! पोरीला बरोबर हुडकून काढलंस.’’ सीमानं म्हटलं.

रागिणी उदासपणे म्हणाली, ‘‘तिला शोधू शकले नसते तर पार वेडी झाले असते. अर्धी वेडी तर आत्ताच आहे ती.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. तुला वेडी कोण म्हणेल? अंगावरचे हिऱ्याचे दागिने, एवढी महागडी साडी, असा स्टायलिश अंबाडा अन् इतका सुंदर चेहरा…अशी वेडी आजपर्यंत कुणी बघितली नसेल…’’ सीमा हसत म्हणाली.

‘‘ज्याचं जळंतं, त्यालाच कळंतं…माझी वेदना तुला नाही कळायची.’’ रागिणी रडू आवरत म्हणाली.

‘‘असं कोणतं दु:ख, व्यथा, वेदना आहेत तुझ्या ज्याच्या ओझ्यानं तू वेडी झाली आहेस? प्रतिष्ठित घराण्यातली सून, उच्चपदस्थ इंजिनियर नवरा, भरपूर पैसा-अडका…अजून काय हवंय?’’ सीमानं विचारलं.

‘‘सोड गं! तुला नाहीच समजायचं.’’ टोमणा मारत रागिणी म्हणाली.

‘‘मी? मला नाही समजायचं? अन् तुला मी किती समजले आहे गं? काय ठाऊक आहे तुला माझ्या आयुष्यातलं? आज दहा वर्षांनी भेटतोय आपण, या दहा वर्षात किती काय घडून गेलंय हे तुला ठाऊक आहे.’’

सीमा एकाएकी भडकली. ‘‘तुला काय वाटतं? माझ्या आयुष्यात काही दु:ख, ताणतणाव आलेच नाहीत? तरीही मी तुझ्या समोर अगदी खंबीरपणे उभी आहे. एकच सांगते. भूतकाळापासून धडा घ्यायचा. भविष्यकाळाची स्वप्नं रंगवायची अन् वर्तमानकाळात अगदी मजेत, आत्मविश्वासानं जगायचं हे ध्येय बाळगलंय मी. भूतकाळातल्या वेदनादायक घटना दु:स्वप्नं समजून विसरायच्या. उगीच त्यांचं ओझं घेत आपलं आयुष्य का म्हणून कुस्करायचं? सीमाचा चेहरा लाल लाल झाला होता.’’

रागिणीनं सीमाचा हात घट्ट धरला…‘‘तुझ्यावरही कधी कुणी बलात्कार केला होता?’’ तिनं विचारलं.

सीमा दचकली…‘‘तुझ्यावरहीचा काय अर्थ? तुझ्या बाबतीतही असं घडलंय का?’’ तिनं रागिणीच्या हातावर थोपटत म्हटलं.

‘‘हो ना गं! ते क्षण माझा पिच्छा सोडत नाहीएत. वर्तमानपत्रातल्या बातम्या, सिरियल्स, सिनेमा, नाटक कुठंही काही ऐकलं, वाचलं, बघितलं की मला तो प्रसंग आठवतो. प्रचंड घाम फुटतो, रडू येतं. माझी तहानभूक हरपते. असं वाटतं…असं वाटतं, त्या नराधमाचा जीव घ्यावा, नाहीतर आपण तरी मरूण जावं…अशावेळी औषधांची मदत होते, गोळ्या घेते अन् झोपून जाते. मग मला काहीही कळंत नाही. माझ्या सासूबाई, मोलकरणीच्या मदतीनं घर चालवताता. अन् सतत माझ्या नावानं शंख करतात की त्यांच्या लाख मोलाच्या हिऱ्यासारख्या मुलाची फसवणूक झाली. इतक्या छान छान मुली सांगून येत होत्या आम्ही हिच्या सौंदर्यावर भाळलो…अशी आजारी मुलगी आमच्या नशिबी आली. माझा नवरा खूप खूप चांगला आहे गं…पण मीच कमी पडले…मी तरी काय करू?’’ रागिणीला अश्रू अनावर झाले.

सीमानं तिला जवळ घेतलं. तिला शांत करत ती म्हणाली, ‘‘अशा प्रसंगातून जाणारी तू एकटीच नाहीएस रागिणी, अगं इथं या ठिकाणीसुद्धा अशा कित्येकजणी असतील ज्यांच्यावर असा प्रसंग आला असेल. पण त्या कुणीच झोपेच्या गोळ्या घेऊन जगत नाहीत. तो एक अपघात होता असं मानून आपण पुढे जायचं. असं बघ तू व्यवस्थित रस्त्याच्या डाव्या बाजूनं चालते आहेस अन् समोरून येऊन कुणी तुझ्यावर धडकला तर चूक त्याची आहे ना? राँग साइडनं तो आला, तुझी काय चूक? ज्यानं आमच्यावर बलात्कार केला, माणूसकीचा विश्वासघात केला तो दोषी आहे…आपण नाही, आपण निर्दोष आहोत. शुद्ध आणि स्वच्छ आहोत. अपराध त्यानं केलाय, त्यानं जळतकुठत आयुष्य काढायला हवं…आपण का म्हणून तोंड लपवून जगायचं? उलट त्यांनाच लाजीरवाणं वाटेल अशा तऱ्हेनं त्यांना अद्दल घडवायची. अशी चूक पुन्हा ते करणार नाहीत असा दम त्यांना द्यायचा…’’ सीमा अगदी पोटतिडकीनं अन् आत्मविश्वासानं बोलत होती.

‘‘तूं केलंस असं?’’ रागिणीनं विचारलं.

‘‘माझा तर चांगला मित्रच माझा वैरी झाला होता. दहा वर्षांपूर्वी जेव्हा बाबांची बदली दिल्लीला झाली, तेव्हाच आपली ताटातूट झाली. तुझी उणीव खूप जाणवायची पण नवं शहर, नवी शाळा. नवं वातावरण यामुळे मी खूप उत्तेजित आणि उत्साहित होते. लवकरच मी वर्गातली हुषार आणि अष्टपैलू विद्यार्थिनी म्हणून आपला ठसा उमटवला.

‘‘माझ्या वर्गातला ध्रुव जो आत्तापर्यंत पहिला येत असे, तो दुसऱ्या क्रमांकावर गेला. मनांतून तो माझ्यावर डूख धरून होता पण वरकणी मात्र मैत्री ठेवून होता. मला मात्र याची कल्पनाच नव्हती. दहावी बोर्डात मी टॉप केलं त्यामुळे तो अधिकच बिथरला अन् बारावीतही प्रिलिम्समध्ये टॉप केलं तेव्हा तर तो अपमानानं अन् संतापानं पेटून उठला. वरकरणी तोंड भरून माझं अभिनंदन केलं अन् मला स्पेशल ट्रीट म्हणून हॉटेलात लंचला नेलं. आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही नेहमीच वाढदिवस किंवा इतर काही सेलिब्रेशन्स म्हणून एका ठराविक रेस्टॉरंटमध्ये जात होतो. यावेळी मात्र आम्ही दोघंच होतो. ध्रुववर अविश्वास करण्याचा प्रश्नच नव्हता.’’

जेवताना त्यानं म्हटलं, ‘‘आज वेळ आहे तेव्हा माझ्या घरी येतेस का? आईला तुला भेटायचं. पहिली येणारी मुलगी कशी असते ते बघायचंय.’’

मला गंमत वाटली. त्याच्या आईला भेटायला नाही कशाला म्हणायचं? जेवण करून आम्ही त्याच्या घरी गेलो. घराचं कुलुप त्यानं खिशातून किल्ली काढून उघडलं तेव्हा मला नवल वाटलं पण तो म्हणाला, ‘‘तू घरात थांब, आई शेजारी गेली असेल. मी तिला बोलावून आणतो.’’

त्यानं फ्रिजमधून ऑरेंजची बाटली काढून मला दिली व तो निघून गेला. पोटभर जेवण झालं होतं. ऑरेंज पिऊन संपवताच मला झोप आली. नकळत मी सोफ्यावर आडवी झाले.

जागी झाले तेव्हा माझ्या लक्षात आलं ध्रुवनं मला फसवलं आहे. मला लुटलं आहे. तो दारूच्या नशेत बरळंत होता, ‘‘मला हरवतेस का? बघ, आज तुला हरवलंय…आता मिरवून दाखव आपली मिजास…’’ मी खाडकन् भानावर आले. स्वत:चे कपडे नीट केले. हॉलमध्येच पडलेली हॉकी स्टिक उचलून त्याच्या नाजुक अंगावर फटका मारला. तो वेदनेनं विव्हळू लागला. आणखी एक फटका देत मी ओरडले, ‘‘आता दाखव आपली मर्दानगी.’’ सरळ घरी आले.

प्रिलिम्समध्ये टॉप केलं होतं. आता बारावी बोर्डात टॉप करायचं होतं. सगळं काही विसरून सगळं लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केलं. बोर्डात पहिली आले.

ध्रुवनं तर शाळेत येणं बंदच केलं. बहुधा ते कुटुंब दिल्ली सोडून कुठं तरी गेलं असावं. पण त्यानंतर ध्रुवचा विषय संपला. सीमा काही क्षण थांबली. पाण्याचा ट्रे घेऊन फिरणाऱ्या बेयराकडून तिनं पाण्याचा ग्लास घेतला व घटाघटा पाणी पिऊन रिकामा ग्लास त्याला परत करून ती पुन्हा रागिणीकडे वळली.

आईला जेव्हा मी या घटनेबद्दल सांगितलं तेव्हा तिनं मला समजावलं की, ‘‘ही घटना विसर…यात तुझा काही दोष नाही. कौमार्य, स्त्रीत्त्व, पावित्र्य वगैरे सर्व पोकळ कल्पना असतात. तू आजही आधी होतीस तशीच आहेस. आईच्या त्या शब्दांनी माझ्या मनांतली अपराधीपणाची भावना नाहीशी झाली. त्या आधारावर मी पुढे जात राहिले. कधीच मागे वळून बघितलं नाही.’’ सीमा म्हणाली.

‘‘मी तर माझा भूतकाळ विसरू शकत नाही. कारण माझ्या माहेरच्या घराशेजारी राहतो तो हलकट, पाजी माणूस. मी तर माहेरी जाणंही बंद केलंय,’’ रागिणीचे डोळे पुन्हा अश्रूंनी डबडबले.

‘‘तू त्या चॉकलेट काकांबद्दल म्हणतेस का? त्यांनी केलं असं? मला आठवताहेत ते. पांढरा लेंगा झब्बा घालून असायचे. आपण बॅडमिंटन खेळत असताना मध्येच येऊन असा शॉट मारा, अशी रॅकेट धरा वगैरे शिकवायचे अन् खिशातून चॉकलेट काढून द्यायचे. मुलांनी त्यांचं नावच चॉकलेट काका ठेवलं होतं.’’

‘‘तो मुखवटा होत गं! कौतुक करण्याच्या बहाण्यानं किती जोरात गालगुच्चे घ्यायचे…अन् रॅकेट अशी धरा म्हणत हात दाबून धरायचे…मला त्यांचा राग यायचा पण सांगणार कोणाला? तू गेल्यावर तर मी एकटी पडले.’’

‘‘तू गेल्यानंतर महिन्याभरातच ते घडलं. आईनं उकडीचे मोदक केले होते ते शेजारी देऊन ये म्हणून सांगितलं. माझ्या आईला तरतऱ्हेचे पदार्थ बनवून आळीत सर्वांना वाटायला फार आवडायचं अन् मग स्वत:च्या सुग्रणपणाचं कौतुक ऐकणं हा तिचा छंद होता. तिला जणू नशा चढायची स्वत:च्या कौतुकाची.’’

‘‘त्या दिवशी काकू घरी नव्हत्या. काका खोटं बोलले, ‘ती स्वयंपाकघरात आहे’ म्हणून मी स्वयंपाक घरात जाताच त्यांनी माझ्यावर झडप घातली. आज तुला एक मजेदार खेळ सांगतो म्हणाले…मला काहीच कळेना. तोंडातून शब्द फुटत नव्हता. माझा प्रतिकार दुबळा ठरत होता. शेवटी एकदाचा तो खेळ संपला. त्यांनी कपाटातून रिवॉल्वर काढलं अन् माझ्या कपाळावर टेकवून धमकी दिली, यातलं एकही अक्षरही बाहेर काढलं तरी तुझ्या आईवडिलांना मारून टाकेन.’’

शारीरिक, मानसिक वेदना सोसत, उद्ध्वस्त होऊन मी घरी आले. हॉलमध्ये भिशीच्या मैत्रिणी मोदकांवर तुटून पडल्या होत्या. मनसोक्त चरत होत्या. आईचे गोडवे गात होत्या. अन् मी माझ्या खोलीचं दार बंद करून ओक्साबोक्शी रडत होते. मला माझ्या शरीराची किळस वाटत होती.

या सर्व प्रकाराचा प्रचंड परिणाम माझ्या मनांवर झाला होता. आईला काही सांगायचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. मी अगदी एकाकी पडले. माझं हसणं, बोलणं, मैत्रिणींकडे जाणं एवढंच काय अभ्यास करणंही थांबलं…परिणाम म्हणजे मी दहावीला चक्क नापास झाले. त्यावरूनही आईनं खूप म्हणजे खूपच ऐकवलं. मी झोपले तर चोवीस तास झोपून रहायची. दोन दोन दिवस जेवत नव्हते. कुठे तरी नजर लावून बसायची. घरातल्यांना वाटलं मला नापास होण्याचा धक्का बसला आहे. ‘हिला मनोरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन आणा.’ कुणीतरी सुचवलं. मानसिक रूग्णाचा शिक्का बसणं तर आईला अजिबातच सहन होईना. शेवटी एकदाची त्या डॉक्टरकडे गेले.

तीन चार सीटिंगनंतर मी तिच्याशी थोडं थोडं बोलू लागले. माझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल तिला सांगितलं. तिनं आईला बोलावून घेतलं. आईची समजूत घालायचा प्रयत्न केला पण ती ऐकूनच घेईना. थयथयाट केला. ‘‘स्वत: अभ्यास केला नाही, दुसऱ्याला दोष देतेय. आधीच नापास होऊन अन् मनोरूग्ण होऊन आमचं नाक कापलं. समाजात पत राहिली नाही, आता आणि शेजाऱ्यांशी वितुष्ट घ्यायचं का? इतकी वर्षं शेजारी राहतोय आम्ही…’’ इतक्या थयथयाटानंतर मी गप्पच झाले.

त्यानंतर मी गप्पच झाले. हे स्थळ आलं. माझ्या रूपामुळे लग्न झालं…नवरा खूप समजूतदार अन् प्रेमळ आहे पण मी त्यालाही न्याय देऊ शकले नाही. मन सतत आक्रंदन करतं, त्याला न्याय हवाय, तो ताण सहन झाला नाही की मन शांत करण्यासाठी गोळी घेते अन् त्या गुंगीत तासन् तास पडून राहते. तूच सांग काय करू मी? आहे का काही उपाय?

तिचे हात आपल्या हातात घेत सीमानं आत्मविश्वासानं म्हटंल, ‘‘उपाय आहे. शोधला की सापडतो. आता मी इथं आलेय ना, लवकरच आपण तुझ्या माहेरी जाण्याचा कार्यक्रम ठरवू. मुद्दाम त्या चॉकलेट कांकाच्या घरी जाऊ. बलात्कारावर बोलू. बलात्काऱ्यांना खूप शिव्या देऊ अन् त्या काकूंसमोरच त्या हलकटाचा मुखवटा ओढून काढू. मग बघ, त्याची काय अन् कशी दैना होते ती. काकूही लाटण्यानं बदडतील त्याला. आता म्हातारपणी ती बाई त्याची सेवा करणार नाही. तो म्हातारा तुझ्या पायावर लोटांगण घालून क्षमा मागेल, मी सांगते.’’ सीमाचा आत्मविश्वास व तिच्या हातातून जाणवणारा आधार यामुळे रागिणीही तणावमुक्त झाली. नकळंत तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्याचवेळी तिचा नवरा रमण तिथं आला. रागिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ‘‘बालपणीची मैत्रीण भेटली अन् तू एकदम बदललीस…’’

आपल्या हातातले रागिणीचे हात रमणच्या हातात देत सीमानं म्हटलं, ‘‘भावजी, आता ही कायम अशीच आनंदी राहील, बघाल तुम्ही..आता तिची काळजी सोडा…मी आले आहे ना आता तिला आधार द्यायला, तिच्या मदतीला…खरं ना रागिणी?’’

गोड हसून रागिणीनं मान डोलावली.

थोर तुझे उपकार

कथा * राजलक्ष्मी तारे

रात्रभर नंदना बेचैन होती. झोप लागत नव्हती. असं का होतं ते तिला समजत नव्हतं. सगळं अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं.

सकाळी उठली अन् तिला घेरीच आली. कशीबशी पलंगावर बसली. डोकं गरगरत होतं. ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात तनुजा वहिनीचा आवाज ऐकू आला.

‘‘नंदू, उठतेस ना? ऑफिसला जायला उशीर होईल…’’

‘‘उठलेय वहिनी, आवरून येतेय.’’ नंदनानं तिथूनच म्हटलं.

पण नंदनाच्या थकलेल्या आवाजावरून तनुजाला थोडी शंका आली. ती हातातलं काम तसंच टाकून नंदनाच्या खोलीत आली. ‘‘काय झालं गं? बरं नाहीए का?’’

‘‘हो गं!’’ नंदनानं म्हटलं.

तिच्या अंगाला हात लावून तनुजानं म्हटलं, ‘‘ताप नाहीए, पण डोकं दुखतंय का? नेमकं काय होतंय?’’

तेवढ्यात नंदना उठून बाथरूममध्ये धावली. तिला ओकारी झाली. तनुजानं तिच्या पाठीवरून हात फिरवला. चुळा भरून झाल्यावर नंदनाला हाताला धरून तिनं बेडवर बसवलं.

तनुजाला काळजी वाटली, ‘‘नंदुला काय झालं?’’ नंदनाचा भाऊ म्हणजे तनुजाचा नवरा सध्या परगावी गेलेला होता. तिनं नंदनाला दिलासा देत म्हटलं, ‘‘नंदू, आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा आणते. तू फक्त ऑफिसात फोन करून कळव.’’

नंदनानं केवळ मान हलवली.

तनुजा तिच्यासाठी चहा घेऊन आली, तेव्हा नंदना अश्रू गाळत होती. ‘‘काय झालं गं?’’ तिचे डोळे पुसत तनुजानं विचारलं.

‘‘वहिनी, किती काळजी घेतेस गं माझी. तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीवच कधी झाली नाही. कायम माझ्यावर माया करतेस, माझ्या चुका पोटात घालतेस, माझी इतकी काळजी घेतेस…पण तरीही आज मला बरंच वाटत नाहीए.’’

‘‘काळजी करू नको, चहा घे. आवर…आपण दोघी ब्रेकफास्ट घेऊन डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरं वाटेल तुला,’’ तनुजानं तिच्या खांद्यावर थोपटत दिलासा दिला.

थोड्या वेळानं दोघी घराबाहेर पडल्या. डॉ. माधवी तनुजाची मैत्रिण होती. निघण्यापूर्वीच तनुजानं तिला फोन केला होता.

माधवीनं नंदनाला जुजबी प्रश्न विचारले, तपासलं अन् नंदनाला बाहेर पाठवून तनुजाला केबिनमध्ये बोलावलं, ‘‘तनुजा, नंदना विवाहित आहे का?’’ तिनं विचारलं.

‘‘नाही माधवी, तिचं लग्न बरंच लांबलंय. आता एका स्थळाकडून होकार येण्याची आशा आहे. का गं? तू हे का विचारते आहेस?’’

‘‘तनुजा, प्रसंग गंभीर आहे. नंदनाला दिवस गेलेत.’’

‘‘बाप रे!’’ तनुजाच्या पायाखालची जमीन सरकली. असं कसं घडलं? नंदनाचं पाऊल घसरलं कसं? मला तिनं कसं सांगितलं नाही?

तात्पुरतं बरं वाटावं म्हणून डॉ. माधवीने लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघी घरी आल्या. नंदनाला कसं विचारावं तेच तनुजाला कळत नव्हतं. तिनं पटकन् स्वयंपाक केला. नंदनाला जेवू घातलं. गोळ्या दिल्या अन् नंदनाला झोपायला लावलं.

सायंकाळपर्यंत नंदनाला थोडं बरं वाटेल. मग तिला शांतपणे सर्व विचारू असं तनुजानं ठरवलं.

पाच वाजता तनुजानं चहा केला अन् ती नंदनाच्या खोलीत गेली. नंदना रडत होती. ‘‘नंदू, चहा घे. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे.’’ तनुजा म्हणाली.

डोळे पुसून चहाचा कप घेत नंदनानं म्हटलं, ‘‘हो वहिनी, मलाही तुला काही सांगायचं आहे.’’

दोघी चहा घेऊन एकमेकींकडे बघत बसल्या. सुरूवात कुणी करावी हेच कळत नव्हतं.

शेवटी तनुजानं धीर एकटवून विचारलं, ‘‘नंदू, तू प्रेग्नंट आहेस हे तुला माहीत आहे का?’’

नंदूनं दचकून तिच्याकडे बघितलं, ‘‘नाही वहिनी, पण मला बरं वाटत नाहीए,’’ ती म्हणाली.

तनुजाला काय बोलावं तेच कळेना, ‘‘नंदना, अगं, तू तिशीला येतेस अन् तुला दिवस गेलेत हे ही कळलं नाही? अगं, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस कशी? आता तुझ्या दादाला अन् तुझ्या बाबांना मी काय तोंड दाखवू? काय उत्तर देऊ? त्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे गं!…’’

रडत रडत नंदना म्हणाली, ‘‘वहिनी, अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित आहे. चार चार महिने मला पाळीच येत नाही. मागे तू मला डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यायला लावले, तेव्हा बरी नियमित झाली होती. मग मी कंटाळून औषधं बंद केल्यावर पुन्हा तसंच सुरू झालं.’’

‘‘बरं, मला सांग, तुझे कुणावर प्रेम आहे का? तुला मर्यादा ओलांडण्याचा मोह कोणामुळे झाला? कुणी पुरूष आवडला आहे तर मला का सांगितलं नाहीस? अजूनही सांग, तुझं त्याच्याशी लग्न करून देऊया.’’

‘‘वहिनी…दादाचे बॉस वीरेंद्र…ते आणि मी…’’

‘‘सत्यानाश! बापरे. अगं वीरेंद्रचं तर लग्न झालंय, दोन मुलंही आहेत त्याला…तो तुझ्याशी लग्न करणार आहे का?’’

‘‘मला नाही माहीत…’’ नंदना घाबरून म्हणाली, ‘‘दादानं त्यांच्याशी माझ्या एका पार्टीत ओळख करून दिली. तेव्हापासून ते माझ्या मागे आहेत. त्यांचं लग्न झालंय हेही मला आत्ता तुझ्याकडूनच कळतंय…’’

नंदनाचं बोलणं ऐकून तनुजाला काय करावं तेच समजेना. तिला नंदनाचा राग आला अन् मग कीवही आली. वीरेंद्रला तर फटके मारावेत इतका त्याचा राग आला. ‘‘नंदना, अगं चार दिवसांत तुझे दादा अन् बाबा येतील घरी…त्यांना काय सांगायचं आपण…?’’

‘‘वहिनी, काहीही कर, पण मला वाचव. दादा तर जीवच घेईल माझा…’’ भीतिनं पांढरी फटक पडली होती नंदना.

‘‘शांत हो, आपण काही तरी मार्ग काढूया.’’ तनुजानं तिला मिठीत घेऊन दिलासा दिला.

रात्रभर दोघींना झोप नव्हती. खूप विचार केल्यावर तनुजानं ठरवलं की रजतला म्हणजे नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायचं. तो संतापेल, त्रागा करेल, पण काहीतरी मार्ग काढेलच.

सकाळीच तनुजानं रजतला फोन करून सर्व सांगितलं.

तनुजाचं बोलणं ऐकून रजत अवाक् झाला. काही क्षण तसेच गेले. मग म्हणाला, ‘‘मी दुपारच्या फ्लाइटनंच निघतोय तोपर्यंत तू माधवीशी बोलून अॅबॉर्शन करता येईल का विचार. बाकी सर्व मी आल्यावर बघूयात. पण तो वारेंद्र इतका हलकट असेल असं मला वाटलं नव्हतं. माझाच विश्वासघात केला हरामखोरानं,’’ रजतनं फोन ठेवला.

तनुजानं नंदनाला चहा आणि ब्रेकफास्ट दिला. स्वत:ही घेतला अन् आवरून दोघी डॉक्टरकडे निघाल्या. नंदना सतत रडत होती. तिला जवळ घेत तनुजानं म्हटलं, ‘‘अशी सारखी रडू नकोस. थोडी धीट हो.’’

तनुजानं माधवीला अॅबार्शन करायचं आहे असं सांगितलं. माधवीनं नंदनाला काळजीपूर्वक तपासलं. तिचा चेहरा गंभीर झाला.

नंदनाला तपासल्यावर माधवीनं तनुजाला बोलावून घेतलं, ‘‘आय एम सॉरी तनु, पण आपल्याला अॅबॉर्शन करता येणार नाही. अंग साडे चार महिने झाले आहेत. नंदनाच्या जिवाला त्यात धोका आहे.’’

नंदना हताश झाली. हवालदिल झाली. काही दिवसांत ही गोष्ट जगजाहीर होईल. नंदनाचं कसं होणार? आता हिच्याशी लग्न कोण करणार? भोळी भाबडी पोर…कशी त्या वीरेंद्रला भुलली अन् मर्यादा ओलांडून या परिस्थितीत अडकली. नंदनाची एक चूक तिला केवढी महागात पडणार होती. तनुजाचेही डोळे आता भरून आले होते.

ती माधवीच्या व्हिजिटर्स लाउंजमध्ये दोन्ही हातात डोकं धरून बसली होती. तेवढ्यात रजत तिथं पोहोचला. ‘‘कशी आहेस तनू? माधवी काय म्हणाली? सगळं ठीक आहे ना?’’

त्याला बघताच तनुजाचा बांध फुटला. त्याला मिठी मारून ती रडू लागली.

‘‘काहीही ठिक नाहीए रजत, माधवीनं सांगितलं की अॅबॉर्शन करता येणार नाही. त्यात नंदनाचा जीव जाऊ शकतो. भाबडी पोर, केवढी मोठी चूक करून बसलीय…’’

रजत संतापून म्हणाला, ‘‘जाऊ दे जीव, तसंही आता आपण लोकांना काय तोंड दाखवणार आहोत?’’

‘‘असं नको म्हणूस रजत…अरे, आपल्या मुलीसारखी आहे ती…चुकली ती, पण आपण तिला सावरायला हवं ना? तू धीर सोडू नकोस…मार्ग काढूया आपण…’’

तिघंही घरी परतली. संतापलेल्या रजतनं नंदूकडे बघितलंही नाही. बोलणं तर दूरच. त्याला स्वत:चाही राग येत होता. त्यानंच तर वीरेंद्रशी नंदूची ओळख करून दिली होती. ‘हिच्यासाठी मुलगा बघ’ असंही सांगितलं होतं. पण तो तर हलकटच निघाला.’’

घरी पोहोचातच नंदूनं दादाचे पाय धरले अन् ती धाय मोकलून रडू लागली. ‘‘दादा, मला मार, माझा जीव घे, पण बोल माझ्याशी…’’

रजतचेही डोळे पाणावले. तिला आवेगानं मिठीत घेतली. तिला थोपटलं…शांत केलं अन् तो खोलीत निघून गेला.

तनुजानं पकटन् स्वयंपाक केला, पण जेवण कुणालाच गेलं नाही. तनुजानं रजतला म्हटलं, ‘‘चार सहा दिवसातच बाबाही येतील…त्यांना काय सांगायचं? नंदनाचं हे असं ऐकून तर त्यांना हार्ट अटॅकच येईल.’’

विचार करून रजतनं म्हटलं, ‘‘मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस तुम्ही काकांकडेच राहा. घरात थोडं रिपेअरिंगचं काम काढलंय. तोवर विचार करायला वेळ मिळेल.’’

दुसऱ्या दिवशी तनुजा रजतला म्हणाली, ‘‘मी काही दिवस नंदनाला घेऊन सिमल्याला जाते.’’

‘‘तिथं काय करशील? तुझा भाऊ तिथं एकटाच असतो ना?’’

‘‘हो. त्यानं लग्न केलं नाही…एकदम माझ्या मनात आलं, त्याला विचारावं, नंदनाशी लग्न करशील का?’’

‘‘अगं, पण…नंदनाच्या अशा अवस्थेत…तो होकार देईल?… पण एक सांग, आता तो ३७-३८ वर्षांचा असेल, त्यानं लग्न का केलं नाही?’’

‘‘ही एक टॅ्रजेडीच होती. ज्या मुलीवर त्याचं प्रेम होतं, तिनं त्याला लग्नाचं वचनही दिलं होतं अन् लग्न त्याच्या मित्राशी केलं. त्यामुळे तो खूप दुखावला गेला. त्यानंतर त्यानं बरीच वर्षं लग्नाचा विचार केला नाही. आम्ही मुली दाखवल्या पण तो नाकारत होता. मला आता एकदम आठवलं, मागे एकदा तो आपल्याकडे आला असताना त्यानं नंदूला बघितली होती. ती त्याला आवडली असल्याचंही तो बोलला होता. पण तेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या. त्यानंतर त्या गेल्या. बाबांना धक्क्यातून सावरायचं, नंदूला सांभाळायचं या सगळ्या गडबडीत मी ते विसरले. आपण नंदूसाठी नंतर स्थळ बघायला लागलो, तेव्हाही माझ्या डोक्यात माझ्या भावाचं स्थळ आलं नाही…आता बघते विचारून…’’

दुसऱ्याच दिवशी नंदूला घेऊन तनुजा भावाकडे सिमल्याला गेली. तिनं प्रवासात नंदूला स्वत:च्या भावाबद्दल सांगितलं अन् तो तयार असेल तर तुझेही मत मला सांग असंही समजावलं.

अचानक आलेल्या बहिणीला बघून विमलेश आनंदला. त्यानं प्रेमानं, अगत्यानं दोघीचं स्वागत केलं तनुजानं आपल्या येण्याचा हेतू त्याला सांगितला. नंदनाची परिस्थितीही सांगितली.

विमलेश म्हणाला, ‘‘एकीनं माझा विश्वासघात केला. त्यानंतर मला आवडलेली मुलगी म्हणजे नंदनाच होती. पण तेव्हा काही लग्नाचा योग आला नाही. तिच्याकडून अजाणता चूक घडली आहे. पाप नाही. मी तिला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे. तिला फक्त तिची इच्छा विचार.’’

‘‘विमलेश, मी तुम्हाला खात्री देते…आपला संसार खूप सुखाचा होईल. त्या संसारात फक्त प्रेम, विश्वास अन् समर्पण असेल…’’ खोलीतून बाहेर येत नंदनानं म्हटलं. विमलेशनं तिला जवळ घेतलं. ‘‘होय नंदना, आपलं पूर्वायुष्य विसरून आपण एकमेकांना साथ देऊ,’’ तो म्हणाला.

तनुजालाही अश्रू अनावर झाले. तिच्या अत्यंत प्रेमाची दोन माणसं एकमेकांच्या आधारानं उभी राहत होती. त्यांची आयुष्य आता बहरणार होती.

तिनं फोन करून रजतला सगळं सागितलं. रजतही मोठेपणानं भारावला. त्यानं बाबांना फोनवर नंदनाचं लग्न ठरलंय एवढंच सांगितलं. बाबा घरी आल्यावर त्यांनी विमलेशच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. नंदनाच्या गरोदरपणाविषयी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. अजून पोट दिसत नसल्यानं कुणाला काहीच शंका आली नाही. नंदना विमलेशचं लग्न थाटात झालं.

निघताना नंदनानं तनुजालाही मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, ‘‘वहिनी, खूप उपकार आहेत तुझे…आणि विमलेशचे…मी जन्मभर लक्षात ठेवीन. तुझ्यासारखी चांगली वहिनी मीही होईन…मला आशीर्वाद दे…’’

सल

कथा * कुमुद भटनागर

‘‘गाडीचा स्पार्क प्लग तर धड लावता येईना अन् म्हणे यांना इंजिनियर व्हायचंय…’’ साहिलला लेकावर डाफरताना बघून रहिलला हसायला आलं.

‘‘यात हसण्यासारखं काय आहे?’’ आता साहिल अजून वैतागला.

‘‘काही नाही. सहजच एक जुनी आठवण आली. या वर्षी दिल्लीच्या ख्यातनाम स्वाइन सर्जन डॉ. गुलाम रसूलला पद्मविभूषण मिळालंय ना, तो लहानपणी आमच्या शेजारी रहायचा. एकदा त्यांचा स्वयंपाकी आला नव्हता. त्याच्या आईनं त्याला मासळी कापून दे म्हणून म्हटलं. त्याला काही ते जमणारं नव्हतं, थरथरत्या हातात मासळी घेऊन तो माझ्या घरी आला अन् ही कापून स्वच्छ करून दे म्हणून मला गळ घालू लागला. गयावया करत होता…आज इतका यशस्वी सर्जन झालाय.’’

‘‘एकदम इतका फरक कसा काय पडला?’’

‘‘कुणास ठाऊक…नंतर माझ्या अब्बूची तिथून बदली झाल्यामुळे आमचा त्या कुटुंबाशी संबंधंच उरला नाही. नंतर परत लखनौला आल्यावर भेट झाली, तेव्हा कळलं तो पी.एम.टी. ची तयारी करतोय. त्याचं इंग्रजी कायम कच्चं होतं. त्यामुळे आमची भेट होताच त्यानं माझी मदत मागितली.’’

‘‘अन् तू ती केलीस?’’

‘‘हो ना, लहानपणापासून मी त्याला मदत करतेय. इंग्रजीत मदत मिळाल्यावर त्याला पी.एम.टीमध्ये चांगले मार्क मिळाले अन् लखनौ मेडिकल कॉलेजात प्रवेशही मिळाला. तरीही इंग्रजीची त्याला धास्ती वाटायची. म्हणून रोज माझा अभ्यास सांभाळून मी त्याला इंग्रजी अन् इंग्रजीतून संभाषण करायला शिकवायचे.’’

तेवढ्यात फोनची घंटी वाजली अन् हे संभाषण तिथंच संपलं. आज त्याच संभाषणाचा धागा पकडून साहिल रहिलाला म्हणत होता की तिनं त्याच्या बॉसच्या कुटुंबाबरोबर दिल्लीला जावं अन् डॉ. रसूलच्या ओळखीच्या बळावर ताबडतोब अपॉइंटमेंट घेऊन बॉसचं ऑपरेशन करवून घ्यावं.

साहिलचे बॉस म्हणजे जनरल मॅनेजर राजेंद्र यांना फॅक्टरीत अपघात झाला होता. त्यांच्या मणक्यांना गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी लवकरात लवकर तज्ज्ञ सर्जनकडून ऑपरेशन व्हायला हवं असं सांगितलं होतं. थोडाही उशीर घातक ठरला असता. जन्मभराचं पंगुत्त्व आलं असतं.

याक्षणी सगळे पद्मविभूषण डॉ. गुलाम रसूल यांचंच नाव सुचवत होते. ते फक्त अत्यंत गुंतागुंतीचीच ऑपरेशन्स करायचे. ऑपरेशनला सात आठ तास लागतात. पेंशट शुद्धीवर आल्यावरच ते घरी जातात. थकवा उतरला की दुसरं ऑपरेशन सुरू होतं. त्यांची भेट मिळणं दुरापास्तच होतं.

‘‘इतक्या वर्षांनंतर आता पद्मविभूषण डॉ. गुलाम रसूलना रहिलाची आठवण तरी असेल का?’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस रहिला? तुझ्या इतकी मदत करणारी बालपणीची मैत्रीण कुणी विसरू शकेल का?’’ साहिलनं म्हटलं.

‘‘मदत लक्षात ठेवली असती तर संबंध बिघडलेच कशाला असते?’’ अवचित रहिला बोलून गेली.

‘‘म्हणजे? काही भांडण तंडण झालं होतं का?’’ साहिलनं विचारलं.

नकारार्थी मान हलवत रहिला म्हणाली, ‘‘नाही, तसं नाही. नेहमीप्रमाणे अब्बूंची बदली झाली. आमच्या बरेलीच्या घराचा पत्ता रसूल कुटुंबानं मागितला नाही, आम्हीही दिला नाही. दिवस तर भराभर जातातच. आत्ता पेपरला त्याच्या पद्मविभूषणची बातमी वाचली, तेव्हा कळलं की तो दिल्लीला असतो.’’

‘‘आता कळलंच आहे तर त्याचा फायदा घेत राजेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला नवं आयुष्य मिळवून दे रहिला, अजून त्यांचं वय किती लहान आहे. नोकरीत प्रमोशन ड्यू आहे. वेळेवर उपचार नाही मिळाले तर सगळंच संपेल गं! त्याची लहान लहान मुलं, त्याची बायको यांचा तरी विचार कर. तिच्याशी तर चांगली मैत्री आहे तुझी.’’

‘‘साहिल, प्रश्न मैत्रीचा नाही, माणुसकीचा आहे, अन् मला का कुणास ठाऊक असं वाटतंय की त्या माणसाकडून माणुसकीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. भेटणं तर दूरच, मला कदाचित तो फोनवर ओळखणारही नाही. त्यात वेळ घालवण्याऐवजी आपण इंटरनेटवर अजून पर्याय शोधूयात.’’

‘‘सगळे तेच करताहेत पण टक रेकॉर्ड डॉ. गुलाम रसूलचाच सर्वोत्तम आहे. प्लीज, एकदा तू त्यांना फोन करून तर बघ.’’ अत्यंत अजीजीनं साहिलनं म्हटलं.

‘‘पण त्यांचा नंबर कुठाय?’’

‘‘अगं, तू त्यांना ओळखतेस म्हटल्यावर राजेंद्र सरांची बायको सारिका मॅडमनं, डॉ. रसूलचा मोबाइल नंबर, लँडलाइन नंबर आणि पत्ता मागवून घेतलाय. तू लवकर फोन केला नाहीस तर सारिका मॅडम स्वत: येतील इथं, तुझ्या मदतीच्या अपेक्षेनं, ते आवडेल का तुला?’’

रहिला शहारली. बॉसची बायको असली तरी सारिका तिच्याशी कायम मैत्रिणीसारखी वागायची. केवळ सारिकासाठी रहिलानं आपला स्वाभिमान, अभिमान बाजूला ठेवत त्याचा नंबर लावला. डॉ. रसूलकडून जरी अपमान अवेहलना झाली असती तरी सहन करण्याच्या तयारीनं रहिलानं नंबर लावला. तो स्विच्ड ऑफ होता.

घरचा फोन तिथल्या घरगड्यानं उचलला.

‘‘डॉक्टरसाहेबांचा फोन ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यावरच सुरू होईल. तुम्ही मोबाइलवरच प्रयत्न करत रहा. डॉक्टर घरी कधी येतील काहीच सांगता येत नाही.’’

‘‘तू सतत प्रयत्न करत रहा. काहीही करून राजेंद्रसरांच्या ऑपरेशनसाठी त्यांना राजी करून घे. प्रश्न माझ्या नोकरीचा नाहीए रहिला…ती मला कुठेही मिळेल. एका भल्या माणसाच्या आयुष्याचा अन् त्याहून अधिक माणुसकीचा आहे.’’ साहिल गंभीरपणे म्हणाला.

‘‘तुझी नोकरी तर राजेंद्र सरांच्या परिस्थितीनं अधिकच पक्की झली आहे. त्यांची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. खरा प्रश्न आपल्या नैतिकतेचा अन् प्रामाणिकपणाचा आहे. आपल्याला त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते करावंच लागेल. डॉ. रसूलला सतत फोन करत राहते.’’ रहिलानं म्हटलं.

‘‘कर प्रयत्न. तोवर मी हॉस्पिटलमध्ये सारिका मॅडमजवळ थांबतो.’’ गडबडीनं साहिल निघून गेला. रहिला जुन्या आठवणींमध्ये दंग झाली.

गुलाम रसूलवर तिचं लहानपणापासून प्रेम नव्हतं. पण कॉलेजात मुलामुलींची प्रेमप्रकरणं बघून ऐकून तिला उंच, सडपातळ रसूल आपल्या स्वप्नांचा राजकुमार वाटू लागला होता. एक दिवस त्यानं तिला विचारलं, ‘‘तुझ्या इंग्लिश लिटरेचरमध्ये माझ्यासारखा हॅन्डसम हिरो आहे का? कारण तुम्ही मुली पुस्तकातल्या हिरोवरच प्रेम करता,’’ असं म्हणून तिच्या अबोल प्रेमाला जणू त्यानं फुंकर घातली होती.

अभ्यासाच्या ओझ्याखाली त्यांच्या भेटीगाठी तशा कमी झाल्या होत्या. मग रसूलही होस्टेलला रहायला निघून गेला. घरी यायचा तेव्हा भेटायचा, पण भेटीही ओझरत्या असायच्या. रहिलाला एम.ए. झाल्याबरोबर कॉलेजात नोकरी मिळाली. गुलाम रसूलही डॉक्टर झाला.

रहिलाच्या अब्बूंनी रसूलच्या अब्बूंना विचारलं, ‘‘गुलाम अली, या दोघांचं लग्न करून देऊयात का?’’

ते आनंदाने बोलले, ‘‘शम्शुल हक, छान सुचवलंत. प्रोफेसर आणि डॉक्टरची जोडी छान आहे. सुखाचा संसार करतील. मी रसूल आणि त्याच्या अम्मीला सांगतो. उद्या चांगला दिवस आहे. मिठाई वाटून सगळ्यांना बातमी देऊयात.’’

मात्र दुसऱ्या दिवशी अब्बूंनी विचारलं, तेव्हा गुलाम अली जरा तुटकपणेच म्हणाले, ‘‘रसूल अजून लग्नाला तयार नाहीए. एमडी करायचं म्हणतोय.’’

‘‘तसंही इतक्यात लग्न कोण करतंय? रहिलाला एम फिल अन् पुढे पीएचडी करायचं आहे. दोघांचं एवढं शिक्षण आटोपल्यावरच लग्न होईल ना?’’

‘‘हो, पण त्याला प्रोफेसर मुलगी नकोय. त्याच्या व्यवसायातली, डॉक्टर मुलगीच हवीय त्याला. शाळाकॉलेजात शिकवणारी शिक्षिका नकोय.’’ गुलाम अलींनी सांगून टाकलं.

अब्बूंना अन् रहिलाही हा आपला अपमान वाटला. दोन्ही कुटुंबातला जिव्हाळा कमी झाला. खरं तर दुरावाच निर्माण झाला. संबंध अधिक बिघडण्याआधीच अब्बूंची बदली झाल्यानं त्या गावचा संपर्कच उरला नाही. रहिलासाठी अब्बूंनी इंजिनियर साहिलला पसंती दिली.

तेवढ्यात साहिल आणि सारिका धापा टाकत आले, ‘‘रहिला, डॉ. रसूलला फोन लाव. दिल्लीहून माझ्या भावाचा फोन आलाय, डॉ. रसूल ऑपरेशन थिएटरबाहेर आले.’’ सारिका म्हणाली.

रहिलानं स्पीकर ऑन करून नंबर लावला. पलीकडून अत्यंत थकलेल्या आवाजातलं हॅलो ऐकायला आलं. रहिलानं आवाज ओळखला.

‘‘हॅलो, नमस्कार, मी रहिला बोलतेय, रहिला शम्स.’’

‘‘बोल रहिला.’’ थकलेल्या आवाजात आता उत्साह जाणवला. ‘‘शम्स वगैरे सांगायची काय गरज आहे?’’

‘‘नाही, मला वाटलं एकदम रहिला म्हटल्यावर ओळखाल की नाही. मी फार महत्त्वाच्या कामासाठी फोन करतेय, एका व्यक्तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.’’ एका श्वासात संपूर्ण परिस्थिती तिने सांगून टाकली.

‘‘अगं, पण अशा पेशंटला भोपाळहून दिल्लीला कसं आणता येईल?’’

‘‘एयर अॅब्युलन्सनं, डॉक्टर,’’ साहिलनं सांगितलं.

‘‘कारण ऑन ड्यूटी अॅक्सिडेंट झालाय म्हणून कंपनीनं एयर एब्युलन्सची व्यवस्था केली आहे.’’

‘‘तर मग ताबडतोब निघा. एब्युलन्समध्ये जे डॉक्टर पेशंटबरोबर असतील, त्यांची माझी बोलणी करून द्या. मी इथं माझ्या स्टाफला सगळया सूचना देऊन ठेवतो. इथं पोहोचताच पेशंटला इमर्जन्सीत शिफ्ट करतील, स्पेशल आयसीयू रूमही देतील. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. तुम्ही निश्चिंत मनानं पेशंटला घेऊन या.’’ एवढं बोलून डॉक्टरांनी फोन बंद केला.

साहिल आणि सारिका तर आनंदानं वेडेच झाले. पण रहिला मात्र पुन्हा एकदा आपला अपमान झाल्यासारखं वाटलं. तिच्याशी काहीही न बोलता रसूलनं फोन कट केला हे तिला फारच लागलं.

साहिलनं सारिकाला म्हटलं, ‘‘मॅडम, तुम्ही ताबडतोब दिल्लीला जाण्याची तयारी करा. मी तुम्हाला घरी सोडतो अन् मग हॉस्पिटलमध्ये जाऊन सरांबरोबर जाणाऱ्या डॉक्टरशी डॉक्टर रसूलची फोनवर गाठ घालून देतो. रहिला, तुलाही चारपाच दिवस दिल्लीला रहावं लागेल.’’

‘‘मी?…मी कशाला? दिल्लीला जाऊन मी काय करणार? डॉक्टर रसूलशी बोलणं महत्त्वाचं होतं, ते झालं.’’

‘‘अगं, अजून खूप गरज आहे तुझी अन् मुख्य म्हणजे मला तुझा आधार हवा आहे रहिला. दिल्लीला तुझं जाणं फार गरजेचं आहे.’’ रहिलाचे दोन्ही हात आपल्या हातात घेत साहिलनं म्हटलं.

मुकाट्यानं रहिलानं आपली बॅग भरायला घेतली.

थोड्याच वेळात साहिल परत आला. ‘‘रहिला, इथून बरोबर जाणाऱ्या डॉक्टरांशी डॉक्टर रसूलचं बोलणं झालं आहे. प्रवासात काय काय सावधगिरी बाळगायची हे त्यांनी नीट समजावून सांगितलं आहे. अन् तुम्ही काळजी करू नका. तुम्ही माझे पाहुणे आहात. नि:शंक मनानं या हे पण सांगितलं.’’ तो म्हणाला.

‘‘अरे व्वा! आता तर मी जाण्याची गरजच नाहीए,’’ रहिलानं म्हटलं.

‘‘अगं, गरज कशी नाहीए? सरांचं ऑपरेशन कितीतरी तास चालेल. त्या दरम्यान सारिका मॅडमना तुझाच आधार असणार आहे.’’

‘‘पण हॉस्पिटलमध्ये फक्त सारिकाच पेशंटपाशी थांबू शकेल. मी कुठं राहणार?’’

‘‘हॉस्पिटलच्या समोरच एक गेस्ट हाउस आहे. तिथं कंपनीनं दोन तीन खोल्या बुक केल्या आहेत. कंपनीची पीआरओ अनिता अन् फायनान्स डिपार्टमेंटचा जितेंद्रही तुमच्या बरोबर असेल. दोघांनाही तू छान ओळखतेस.’’

रहिलानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘‘इतकी सगळी मंडळी अॅम्ब्युलन्समध्ये बसतील?’’

‘‘नाही, फक्त डॉक्टर, पेशंट अन् मॅडम. तुम्ही तिघं सायंकाळच्या फ्लाइटनं जाताहात.’’

रहिला हॉस्पिटलमध्ये पोहोचली, तेव्हा राजेंद्रना तिथं अॅडमिट करून झालं होतं. सारिकाचा भाऊ तिच्याबरोबर होता. दोघंही डॉ. रसूलबद्दल अत्यंत आदरानं अन् कौतुकानं बोलत होते. डॉक्टरांनी अत्यंत आत्मीयतेनं त्यांची चौकशी केली होती. पेशंट पूर्ण बरा होईल याची खात्री दिली होती. त्यांच्या राहण्या जेवण्याच्या व्यवस्थेबद्दलही बोलले होते.

‘‘माझ्याबद्दल चौकशी नाही ना केली?’’ धडधडत्या हृदयावर हात ठेवून आपल्या भावनांना आवर घालत रहिलानं विचारलं.

‘‘एवढा वेळच नव्हता ना त्यांच्याकडे.’’ भाबडेपणानं सलीलनं, सारिकाच्या भावानं म्हटलं.

रहिलाचं मन कडवट झालं, तिच असते रिकामटेकडी कधी अभ्यासात मदत करायला नाही तर कुणाची तरी शिफारस करायला. तिनं वरवर काही दाखवलं नाही पण मनात ठरवून टाकलं, सारिकाच्या सोबतीला तिचा भाऊ आहे, तेव्हा ती उद्याच ऑपरेशन झाल्यावर भोपाळला परत जाईल.

सकाळपासून सायंकाळपर्यंत रहिला सारिकाच्याबरोबर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभी होती. ओ.टीचं दार उघडलं अन् डॉ. रसूल बाहेर आला. दोघांची नजरानजर होताच त्याच्या डोळ्यात ओळखीची चमक दिसली. पुढच्याच क्षणी तो सारिकाकडे वळून बोलला. ‘‘मी ऑपरेशन अगदी उत्तम केलंय. आता तुम्ही त्यांची छान काळजी घ्या. लवकरच ते पूर्ववत होतील. सध्या ते रिकव्हरीत आहेत. त्यांना आयसीयूत शिफ्ट करण्याआधी क्षणभर तुम्ही पाहू शकता, आता तुम्हीही रिलॅक्स होऊन विश्रांती घ्या. पेशंटची सेवा करण्यासाठी तुम्ही ठणठणीत असणं गरजेचं आहे.’’

‘‘तुमचे किती अन् कसे आभार मानू डॉक्टर…’’

‘‘आभार माझे नाही,’’ रसूल पुढे बोलणार तेवढ्यात नर्सनं सारिकाला आत जायची खूण केली. रहिलाही पटकन् पाठोपाठ निघाली.

‘‘आत फक्त पेशंटची पत्नी जाऊ शकते, तू नाही.’’ रसूलनं तिला अडवलं, ‘‘तशी तू थांबली कुठं आहेस?’’

‘‘समोरच्या गेस्ट हाउसमध्ये.’’

‘‘मग आता तिकडेच जा. हॉस्पिटलमध्ये विनाकारण गर्दी नको,’’ एवढं बोलून रसूल भराभर चालत निघून गेला.

संताप संताप झाला रहिलाचा. चिडचिडून ती गेस्ट हाउसच्या रूममध्ये आली. किती अपमान सहन करायचा? आता पुरे झालं. ऑपरेशन तर झालेलंच आहे. जितेंद्रला सांगून उद्याच्या पहिल्या फ्लाइटचं बुकिंग करून घ्यायचं. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला.

‘‘मॅडम तुम्ही कुठं आहात?’’ जितेंद्रनं विचारलं.

‘‘ताबडतोब हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये या. सरांची परिस्थिती बघून सारिका मॅडम खूपच घाबरल्या आहेत. खूपच बेचैन आहेत.’’

‘‘अनिताला सांग, त्यांची समजूत घालेल…सलीलही असेलच ना तिथं? अन् जितेंद्र, तिथून सवड मिळाली की ताबडतोब इथं या, गेस्ट हाऊसवर.’’ तिनं फोन बंद केला.

थोड्याच वेळात प्रचंड घाबरलेल्या सारिकाला सांभाळत अनिता अन् त्यांचं सामान घेऊन जितेंद्र अन् सलील गेस्ट हाउसवर पोहोचले.

‘‘आम्ही मॅडमना इथंच घेऊन आलो…’’

‘‘हॉस्पिटलच्या नियमानुसार आयसीयूत पेशंटचे लोकच राहू शकतात.’’ रहिलानं अनिताला सांगितलं.

‘‘ताई फार अपसेट आहे. मी रात्री राहीन तिथं भावजींसोबत. भाओजींचा चेहरा सुजला आहे. निळा निळा झालाय…’’ सलील म्हणाला.

‘‘ते सगळं अगदी स्वाभाविकच आहे.’’ सारिकाला स्वत:जवळ बसवून घेत, तिच्या पाठीवरून हात फिरवत रहिलानं म्हटलं, ‘‘स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन होतं त्यामुळे त्यांना इतके तास पालथं झोपवावं लागलं. ते अनेस्थिशिया दिल्यामुळे बेशुद्ध होते. त्यामुळे रक्त प्रवाह नेहमीसारखा नव्हता. त्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि निळेपणा आलाय. सूज हळूहळू उतरेल. अजिबात घाबरायचं नाही.’’ रहिलानं सारिकाचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन चोळले…आता ती थोडी सावरली होती.

‘‘रहिलाताई, हेच मी ताईला सांगतोय पण तिला माझं म्हणणं समजतच नव्हतं.’’ सलीलही बिचारा रडकुंडीला आला होता. ‘‘तुम्ही ताईला तुमच्याच जवळ ठेवा. तिच्या जेवणाचं अन् झोपेचं बघा, भाओजींजवळ मी राहतो.’’

‘‘पण मी तर उद्या परत जातेय.’’ जरा तुटकपणे रहिलानं म्हटलं.

‘‘हे…हे कसं शक्य आहे?’’ अनिता अन् जितेंद्र एकदमच बोलले. दोघंही बावचळले होते.

सारिका तर रडायलाच लागली. ‘‘मला इथंच टाकून तू कशी जाऊ शकतेस रहिला? अगं, राजेंद्र अजून आयसीयूत आहेत. शुद्धीवर आलेले नाहीत. डॉ. रसूल सांगतील, तेव्हाच त्यांना क्लीनचिट मिळेल. दोन दिवस सतत ऑपरेशन करून डॉ. रसूल खूपच दमले आहेत अन् दोन दिवस इकडे फिरकणारही नाहीएत म्हणे…अशात काही झालं तर मी काय करणार? रहिला, मला सोडून जाऊ नकोस…’’

हे सगळं कमी होतं म्हणून की काय साहिलचा फोन आला. कंपनीचे चेयरमन तिला धन्यवाद देत होते. ते म्हणाले, ‘‘मॅडम, अजून काही दिवस तुम्ही दिल्लीला थांबा.’’ साहिलही तिच्याशी थोडा बोलला. फोन बंद झाला. रहिलाला अगदी नको नको झालं होतं. रात्री तिनं सारिकाला बळेबळे जेवायला घातलं. झोपेची गोळी देऊन निजवलं. पण रहिलाला मात्र झोप येत नव्हती. या सगळ्यांना वाटतंय डॉ. रसूलशी रहिलाची मैत्री म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना तेवढ्यासाठी ती हवीय. पण तिच्या दृष्टीनं डॉ. रसूलशी मैत्री व ओळख म्हणजे एक शाप होता. उपलब्धी इतरांच्या दृष्टीनं होती.

रसूलनं तिचा मास्तरीण म्हणून केलेला उपहास तिच्या जिव्हारी लागला होता. त्या उपेक्षेमुळे ती इतकी दुखावली होती की अभ्यासातलं तिचं लक्षच उडालं. कसंबसं तिनं एमफिल पूर्ण केलं. पण पीएचडीला अॅडमिशन मिळेल असे मार्क नव्हते पडले. तिच्या अब्बूंनी तिच्यासाठी इंजिनियर साहिलचं स्थळ आणलं होतं. तिनं साहिलशी लग्न करून संसार थाटला. साहिल खरोखर प्रेमळ, काळजी घेणारा नवरा होता. ती त्याच्याबरोबर पूर्णपणे सुखात होती. तिच्या शैक्षणिक योग्यतेमुळे अन् शिकवण्याच्या अनुभवामुळे तसंच कौशल्यामुळे ती एमबीए अन् यूपीएससीचं कोचिंग देणाऱ्या संस्थांमध्ये, पी.जी.च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवायची. छान चाललं होतं तिचं…एकच खंत होती की रसूलच्या नाकावर टिचून तिनं उत्तम अभ्यास करून एमफिल अन् पीएचडी करून घ्यायला हवं होतं. डॉ. रहिला कॉलेजची प्रिंसिपल म्हणून मिरवली असती.

रात्री किती तरी उशीरापर्यंत तमळत ती जागी होती. नंतर केव्हा तरी झोप लागली. सकाळी अर्थात्च खूप उशीरा जाग आली. सारिका खोलीत नव्हती. स्व:तचं सर्व आवरून ती खोलीबाहेर आली, तेव्हा अनिता तिची वाट बघतच होती.

‘‘सलीलचा फोन आला होता, सर शुद्धीवर आले आहेत, म्हणून सारिका मॅडम व जितेंद्र तिकडे गेलेत. तुम्ही ब्रेकफास्ट आटोपून घ्या. मग आपणही जाऊ.’ तिनं म्हटलं.

त्या दोघी पोहोचल्या, तेव्हा सलील आणि जितेंद्र हॉस्पितळच्या बाहेरच भेटले.

‘‘थोड्या वेळापूर्वी डॉ. रसूल आले होते. त्यांनी भाओजींना उभं करून काही पावलं चालवलं. ते म्हणाले सगळं काही उत्तम आहे. आता त्यांना आयसीयूमधून साध्या रूममध्ये शिफ्ट करताहेत. इथेही पेशंटसोबत एकच  कुणी राहू शकतो. आता ताई आहे तिथं. नंतर तिला लंच आणि विश्रांतीसाठी तुमच्याकडे पाठवून मी इथं थांबेन.’’ सलील इतका भारावला होता की सांगता सोय नाही. ‘‘इथला स्टाफ सांगत होता की प्रथमच सलग दोन दिवस डॉक्टरांनी ऑपरेशन केलंय अन् इतके थकलेले असतानाही पुन्हा पेशंटला बघायला तत्परतेनं आले. रहि ताई, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. तुमची शिफारस कामी येतेय.’’

‘‘मी काहीच केलेलं नाहीए सलील. फक्त पेशंटची अत्यंत सीरियस अवस्था सांगितली होती. अशा नाजूक अवस्थेत असलेल्या पेशंटला बरा करण्याचं आव्हान कोणताही कुशल सर्जन स्वीकारतोच! ती संधी असते त्यांच्यासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची.’’ रहिला म्हणाली.

‘‘मॅडम, इथं आपल्याला थांबता येणार नाही. अन् गेस्टहाउसमध्ये तुम्ही एकट्या काय करणार? दिल्लीचा फेरफटका करून येणार असलात तर गाडीची व्यवस्था करून देऊ का?’’ जितेंद्रने विचारलं.

‘‘नको, त्यापेक्षा असं करा, तू अन् अनिता, दोघं दिल्लीचेच आहात, तेव्हा वाटल्यास तुम्ही तुमच्या घरी भेटून या. मी गेस्टहाउसमध्येच विश्रांती घेते. सारिका मॅडमच्या लंच अन् विश्रांतीचंही बघते. सायंकाळपर्यंत तुम्ही दोघंही परत या.’’ घरी जायला मिळाल्यानं आनंदी झालेल्या त्या दोघांनी रहिलाचे मनापासून आभार मानले.

ती गेस्टहाउसमध्ये रूमवर परतली. तिला थोडा एकांत हवा होता. तेवढ्यात दारावर टक्टक् झाली. समोर रसूल उभा होता. वयपरत्वे अंगानं भरला होता. पण डोळ्यातली चमक अन् चंचलपणा तसाच होता.

‘‘क्षमा कर रहिला. माझ्या शहरात येऊनही तुला असं गेस्ट हाउसमध्ये रहावं लागतंय…पण इच्छा असूनही मी तुला माझ्याघरी चल, असं म्हणू शकत नाही…’’ रसूलनं एकदम बोलून टाकलं.

‘‘का बरं? तुझ्या बेगमला अनोळखी पाहुणे घरी आलेले आवडत नाही का?’’ इच्छा नसतानाही तिरकसपणे बोलून गेली ती.

रसूलनं एक दीर्घ श्वास घेतला. मग म्हणाला, ‘‘बेगम स्वत:च पाहुण्यांसारख्या घरात येतात, रहिला, ती उत्तम गायनॉकॉलिजिस्ट आहे. कितीही गुंतागुंतीचं बाळंतपण ती सहज करते अन् मुलं होऊ नये म्हणून करायची ऑपरेशन्स पण म्हणजे हिस्टरेक्टोमी ऑपरेशन्स करताना तिला सवड नसते. वेळी अवेळी कॉल्स असतात.’’

‘‘अन् मुलं? त्यांना कोण बघतं?’’

‘‘दोन मुलं आहेत. नैनीतालच्या होस्टेलवर ठेवलंय त्यांना. सुट्ट्यांमध्ये ती इथं न येता लखनौला आजी आजोबांकडेच जातात.’’ पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणाला, ‘‘अत्यंत हुषार अन् कर्तव्यदक्ष गायनॅक आहे ती. कितीतरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत तिनं. डॉ. जाहिदा सुलताना.’’

‘‘व्वा! फारच छान. मियां पद्मविभूषण स्पाइन सर्जन अन् बेगम आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या गायनॉकोलॉजिस्ट. तोडीस तोड आहात की, उत्तम जोडी!!’’

‘‘कसली जोडी रहिला. एकाच घरात राहतो आम्ही पण दोन दोन दिवस आमची भेट होत नाही….तुझे मियांजी काय करतात?’’

‘‘एका मल्टीनॅशनल कंपनीत डेप्यूटी जनरल मॅनेजर आहेत. कामात तर असतात. पण बायको मुलांसाठी वेळ काढतात. त्यांच्याकडे लक्ष देतात.’’

‘‘तू काय करतेस?’’

‘‘आयएएस, एमबीए करणाऱ्या मुलांना इंग्रजी शिकवते. पहिल्यापासून इंग्रजी उत्तम होतं माझं…मुलांचं बघते, घर सांभाळते. नवरा अन् मुलं खुष आहेत माझ्यावर.’’

‘‘एकूण तू सुखात आहेस तर!’’

‘‘होय. आयुष्य सुखाचं आहे आणि परिपूर्णही. तुझं कसं काय?’’

‘‘ठाऊक नाही रहिला. मला सांगता येत नाही. जाहिदाबद्दल काहीच तक्रार नाही. माझ्या बरोबरीनं ती व्यवसाय सांभाळते आहे. माझा साथीदार आहे पण फक्त व्यवसायापुरती. स्वत:चं म्हणून आयुष्य असतं हे तर आम्ही दोघं विसरलोच आहोत..’’ रसूलनं एक सुस्कारा सोडला. आता नेहमी वाटतं त्यावेळी अब्बूंनी डॉक्टर प्रोफेसरची जोडी जमवली होती, तर मी त्यांची टिंगल केली. तुलाही विनाकारण दुखवलं मी. तो सल रात्रंदिवस छळतोय मला. पण तू सुखात आहेस हे बघून खूप बरं वाटलं.

रहिला फक्त बघत होती त्याच्याकडे. तिच्या मनांत आलं, ‘रसूल, माझ्या मनांतला सल आता गेलाय पण तुझ्या मनांतलं सल बघून मी मुक्काम ठोकलाय याची गंमत वाटतेय. माझा सुखी संसार बघून तुला आनंद झाला असेलही पण तो सळ मात्र तुला होणाऱ्या पश्चात्तापाच्या रूपानं सतत तुला छळेल…सलंत राहील.’

वेडं मन

कथा * ममता राणे

इथं आल्यापासून ईशानं चिनार वृक्षांचा सहवास मनमुराद अनुभवला. त्याच्या पानांचा सुवास तिच्या मनांत, देहात मिळाला. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावरून ती चिनारचं एक पान डायरीत ठेवायला उचलून घ्यायची. चिनार वृक्ष तिचा अत्यंत आवडता होता.

‘‘ईशा…’’ आपल्या नावाची हाक ऐकून ती भानावर आली. त्या उताराच्या पायवाटेवरून ती धावत, उड्या मारत हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर आली.

‘‘बराच उशीर झालाय, निघूयात आता.’’ शर्मिलानं म्हटलं, ‘‘सकाळी लवकर पहलगामसाठी निघायचंय, आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे.’’

‘‘ईशा वहिनी इथं आल्यावर एकदम लहान मुलगी झाल्या आहेत. मी बघितलं मघाशीच टेकडीवर फुलपाखरामागे काय छान धावत होत्या.’’ विरेंद्रनं म्हटलं. ईशा लाजली. ती स्वत:तच इतकी गुंग झाली होती की नवरा परेश अन् त्याचा मित्र व त्याची बायको या सर्वांचा जणूं तिला विसर पडला होता. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याबद्दल तिनं खूप ऐकलं आणि वाचलं होतं. सिनेमात हिरोहिरोईन बर्फात प्रणय करताना, प्रणय गीत गाताना बघितलं होतं. स्वत: काश्मीरला आल्यावर तिला जणू पंख फुटले होते.

इतक्या लांब आपण काश्मीरला कधी येऊ असा विचारही तिनं केला नव्हता. इथं आल्यावर किती तरी दिवसांनी तिला इतकं मोकळं मोकळं अन् आनंदी वाटत होतं. दिवसभर फिरून झालं होतं. आता हॉटेलात परतायची वेळ झाली होती.

सायंकाळनंतर डोंगरावर रिमझिम पाऊस झाला होता. हवेतला गारवा वाढला होता. हॉटेलातल्या मऊ गुबगुबीत अंथरूणावर ईशा मात्र कूस पालटत झोपेची आराधना करत होती. शेजारी परेश, तिचा नवरा गाढ झोपेत होता. रात्र बरीच झाली असावी. तिनं घड्याळात बघितलं, वेळ संपता संपत नव्हता. दिवसभर भरपूर फिरणं झाल्यावरही तिला दमणूक अजिबात जाणवत नव्हती.

मनांत विचारांची गर्दी झाली होती अन् अवचित दोन निळे डोळे तिच्यापुढे आले. निळ्या सरोवरासारखे रशीदचे निळे डोळे. गेले दोन तीन दिवस तो त्यांचा गाईड कम ड्रायव्हर म्हणून त्यांच्याबरोबर होता. ते ज्या दिवशी हॉटेलात पोहोचले तेव्हापासून परेशनं त्याची गाडी बुक केली होती. दिसायला रशीद खूपच देखणा होता. एखाद्या युरोपियन मॉजेलसारखा गोरा, गुलाबी रंग, निळे डोळे, धारदार नाक आणि बोलायला गोड, वागायला नम्र. मदतीला तत्पर असलेला रशीद जवळच राहत असल्यामुळे केव्हाही बोलावलं तरी पटकन् हजर व्हायचा.

marathi-love-story

दोन दिवसांतच रशीदनं त्यांना किती तरी प्रेक्षणीय स्थळं दाखवली. त्याला प्रत्येक जागेची संपूर्ण माहितीही होती अन् सांगण्याची पद्धतही आकर्षक. ईशाला डायरी लिहिण्याची आवड होती. ती प्रत्येक स्थळाची सगळी माहिती डायरीत टिपून घ्यायची. बरोबर असलेली इतर तिघं फक्त जेवढ्या, तेवढं बोलत असत पण ईशाच्या बोलक्या स्वभावामुळे ती रशीदला सतत प्रश्न विचारत होती. रशीदही अगदी तत्परतेनं त्याला माहित असलेल्या गोष्टी तिला सांगायचा. बरोबरीच्या वयामुळे असेल कदाचित. दोघांच्या बऱ्याच आवडी निवडी एकसारख्या आहेत हे दोघांनाही कळलं होतं.

ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेल्या ईशाचं सहजच समोर लक्ष गेलं तर समोरच्या आरशात तिला रशीदचे डोळे तिचाच शोध घेताहेत असं जाणवायचं. ती पटनकन् आपली नजर इतरत्र वळवायची. रशीददेखील थोडा कावराबावरा व्हायचा. त्याच्या बोलण्यात आलं होतं की तो सुशिक्षित आहे, चांगलं काम शोधतो आहे, तोवर हेच काम त्याला आधार देतंय. धाकट्या बहिणीचं लग्न करायची त्याच्यावर जबाबदारी आहे, त्यासाठी तो पैसे जमवतोय. त्याचा साधेपणा, प्रामाणिकपणा यामुळे ईशाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. मैत्रीची भावनाही निर्माण झाली होती.

परेश आणि ईशाच्या लग्नाला फार दिवस झाले नव्हते. पण हे लग्न ईशाच्या इच्छेविरूद्ध झाल्यामुळे ती मनोमन नाराज होती. ईशाला भरपूर शिकून स्वत:च्या पायावर उभं रहायचं होतं, पण घरचे लोक तसे जुन्या वळणाचे होते. तिचं शिक्षण अपूर्ण असतानांच त्यांना हे परेशचं स्थळ मिळालं. चांगला व्यवसाय, आटोपशीर कुटुंब, शिकलेला, निरोगी, निर्व्यसनी मुलगा बघून त्यांनी ईशाचं लग्न करून टाकलं.

ईशानं बराच विरोध केला होता पण वडिलांनी हार्टअटॅक आल्याचं जबरदस्त नाटक केलं. घाबरून ईशानं विरोध मागे घेतला. आईनंही समजावलं. श्रीमंत व्यवसायी घरातल्या सुनांनी थाटात राहून घर सांभाळायचं असतं.

लग्नानंतर ईशाला जाणवलं की परेशच्या अन् तिच्या स्वभावात, आवडीनिवडीत खूप तफावत आहे. आधीच मनाविरूद्ध लग्न झालेलं त्यातून ही तफावत त्यामुळे दोघांची मनं जुळली नव्हती. दोघांमधला मानसिक दुरावा दूर करण्याचा प्रयत्न ईशानं केला नाही, परेशच्या तर ते गावीही नव्हतं. दोघांचे देह जरी भेटत असले तरी मन अलिप्तच होते. तो त्या घरातला एकुलता एक मुलगा होता. व्यवसायासाठी भरपूर वेळ देत होता, मात्र बायकोसाठी वेळ द्यावा हे त्याला समजत नव्हतं.

नदीच्या दोन काठांसारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं. समांतर असूनही एकमेकांशी भेट नाही, अशी अवस्था होती. इतका मोठा नावारूपाला आलेला व्यवसाय सांभाळणं सोपं नाही. घरातली सुबत्ता घरातील दोन कर्त्या पुरूषांच्या कष्टामुळेच आहे हे ईशाला कळत होतं…पण ती सुखी नव्हती हेच तिचं दु:ख होतं.

ईशा अवखळ, बडबडी होती पण लग्नानंतर मात्र ती उदास, अबोल झाली होती.

खरंतर परेश इतर नवऱ्यांसारखा अरेरावी करणारा नव्हता. तसं म्हटलं तर दोघांमध्ये वाद, भांडणं असंही काही नव्हतं. पण लग्नानंतरच्या नव्या नव्हाळीत एकमेकांविषयी जी ओढ तरूण दाम्पत्यात असते, तीही नव्हती.

विरेंद्र अन् परेशची जुनी मैत्री होती. त्याच्या बायकोशी, शर्मिलाशी ईशाची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. विरेंद्रला परेशच्या अत्यंत साध्या स्वभावाची चांगलीच ओळख होती. त्याच्या लक्षात ईशाचं अबोलपण आलं. त्यांनंच सुचवलं की परेश ईशानं दोघांनीच कुठं तरी फिरून याव. घराबाहेरच्या मोकळ्या वातावरणांत दोघंही थोडे खुलतील.

विरेंद्र परेश-ईशाचा हितचिंतक आहे हे ईशा जाणून होती. पण प्रॉब्लेम असा होता की ईशाला अजून परेशचा स्वभाव नीटसा कळलेलाच नव्हता. तो अबोल होता पण त्याला खुलवण्याचा प्रयत्न ईशानंही केला नव्हता. एक तऱ्हेनं ती मनाविरूद्ध लग्न झाल्याचा सूड उगवत होती.

तिच्या मनांत तिच्या आईवडिलां एवढाच परेशही दोषी होता. त्यानं तिला नाकारलं असतं तर हे लग्न झालंच नसतं. हे लग्न तिला पसंत नाही हे तिला लोकांना दाखवून द्यायचं होतं.

लग्नानंतर दोघं हनीमूनसाठी जाऊ शकले नव्हते. ईशानंही कधी बाहेर कुठं जाऊयात असा उत्साह दाखवला नव्हता. ईशाला भीती वाटली की दोघंच प्रवासाला गेले तर कदाचित दोघांनाही कंटाळवाणं होईल, त्यापेक्षा अजून कुणी बरोबर असलेलं चांगलं, म्हणून तिनं विरेंद्र अन् शर्मिलालाही बरोबर चलण्याचा आग्रह केला. सगळ्यांनी मिळून काश्मीरची निवड केली अन् ते आता काश्मीरला आले होते.

रात्रीच्या अंधारात शिकारा (हाऊसबोट)च्या दिव्यांचं प्रतिबिंब सरोवरातल्या पाण्यात पडलं, तेव्हा हजारो हिरे झगमगताहेत असं सुंदर दृष्य दिसतं, मंद लाटांच्या हेलकाव्यानं प्रतिबिंबही हलायचं अन् त्यातून अनेक मजेदार आकार निर्माण व्हायचे. तासन् तास त्याकडे बघत बसायची ईशा. त्या निसर्गरम्य वातावरणांत खरं तर ईशाच्या प्रणय भावना उचंबळून आल्या होत्या, तिला वाटत होतं की परेशनं तिच्या जवळ यावं, तिला मिठीत घ्यावं, मनांतलं गूज तिला सांगावं. खरं तर तिनं पुढाकार घेतला असता तर कदाचित परेशनं तिला साथ दिली असती पण तिचा अहंकार आडवा येत होता. त्यामुळेच काश्मीरच्या असा नयनरम्य वातावरणांतही ती दोघं एकमेकांपासून दुरावलेलीच होती.

शर्मिलाशी ईशाची मैत्री अलीकडचीच, त्यामुळे त्या दोघी जिवलग मैत्रिणी नव्हत्या. तिच्याशी मनातलं बोलावं एवढी जवळीक नव्हती. म्हणूनच ईशाला फारच एकटं एकटं वाटत होतं.

कंटाळून ईशा खोलीत आली. अजून परेश खोलीत आला नव्हता. तिनं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण त्यात मन रमेना. वैतागून पुस्तक आपटलं.

शर्मिला जागी असेल तर गप्पा मारूयात असा विचार करून ती त्यांच्या खोलीकडे आली. बंद दारावर टकटक केलं. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा ती उलट पावली आपल्या खोलीत येऊन अंथरूणावर आडवी झाली. तिला खूप एकटं एकटं वाटलं अन् रडू फुटलं. तिच्या अश्रूंनी उशी चिंब भिजली. आज झोप नाराजच होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भटकंती सुरू केली. नेहमीप्रमाणे रशीद वेळेवर येऊन उभा होता. आज डोंगरावर जायचं होतं. पायीच डोंगर चढायचा होता. ती अवघड चढाची वाट ईशानं सहज पूर्ण केली अन् सर्वात आधी ती उंच पठारावर पोहोचली. तिला खूप बरं वाटलं. ती खळखळून हसली. रशीदनं तिला पाण्याची बाटली दिली. वरून ईशानं बघितलं चढाईच्या पायवाटेवरून तिघे हळूहळू येत होते. घनदाट जंगलानं वेढलेला डोंगर किती सुंदर दिसत होता.

‘‘मॅडम, तुम्ही तर कमाल केलीत. किती चपळाईनं अन् त्वरेनं डोंगर चढून आलात. शहरातल्या नाजूक मुलींना हे जमत नाही.’’ रशीदनं म्हटलं.

ईशानं दोन्ही हात पसरून एक दीर्घ श्वास घेतला. जंगलातल्या त्या शुद्ध प्राणवायूंचा वास तिनं आपल्या शरीरात करून घेतला.

‘‘रशीद, तू किती सुंदर जगात राहतोस रे.’’ ती कौतुकानं म्हणाली.

रशीदनं हसून मान तुकवली. इतक्या प्रेमानं आजवर रशीदशी कुणी वागलं नव्हतं. ईशाचे प्रश्न संपत नव्हते अन् रशीदही शांपणे तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होता.

एव्हाना इतरही मंडळी वर पोहोचली होती. तिघंही धापा टाकत होती. थकलेल्या परेशनं एका दगडावर बैठक मारली. ईशाला त्याच्याकडे बघून हसायला आलं. धंद्यात कितीही कामं असली तरी स्वत:ला निरोगी अन् फिट ठेवायला परशेनं रोज व्यायाम करायला हवा. हे तिला प्रकर्षानं जाणवलं.

विरेंद्रने सर्वांचे फोटो काढले. सगळे त्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत असतानांच एकाएकी ढग दाटून आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. घाईनं त्यांनी एक आडोसा गाठला.

बराच वेळ पाऊस पडत होता. खालून काही घोडेवाले पर्यटकांना घ्यायला आले. सर्वांनी घेड्यावरून खाली उतरायचं ठरवलं. उतरताना रस्ता उताराचा होता. ईशाच्या घोड्याबरोबर रशीद चालत होता. ईशा फार घाबरत होती. त्यामुळे तिचा घोडा हळू चालत होता. बाकीची तिघं पुढे निघून गेले. ईशा रशीदला म्हणाली, ‘‘रशीद घोड्याला हळूहळू चालू दे. मला भीती वाटतेय, मी पडेन म्हणून.’’

‘‘घाबरू  नका मॅडम, अजिबात घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही. पण आधीच आपण फार मागे राहिलो आहोत. पुढे गेलेले आपले लोक आपली काळजी करत असतील.’’ रशीद तिला धीर देत होता. पावसामुळे वाट निसरडी झाली होती. घोडा थोडासा ठेचकळाला अन् वर बसलेली ईशा घोड्यावरून घसरली. घाबरून तिनं किंकाळी फोडली.

रशीदनं चपळाईनं तिला धरलं खरं, पण ओल्या जमीनीवरून पाय निसटल्यामुळे रशीद खाली पडला…ईशा त्याच्या अंगावर कोसळली. तिचे ओेले मोकळे केस त्याच्या चेहऱ्यावर विखुरले. घाबरल्यामुळे तिची छाती धडधडत होती. दोघं एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांचे श्वास एकमेकांना जाणवंत होते. त्याच्या स्पर्शानं ईशाला जणू विजेचा झटका बसला.

ईशा कशीबशी सावरली, उठून बसली. रशीदही उठला. भिजल्यामुळे ईशाचे कपडे अंगाला चिकटलेले होते. रशीदकडे बघताच ईशा लाजेनं लाल झाली. त्या एका क्षणांत त्यांच्यातली सहज मैत्री जणू संपली होती. एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं.

संपूर्ण वाटेत दोघंही गप्प होते. ईशाला खरं तर काहीच समजत नव्हतं. कधी ते हॉटेलात पोहोचले तेही तिला कळलं नाही. समोरच शर्मिला, विरेंद्र आणि परेश तिची काळजी करत असलेले दिसले.

पटकन् परेश तिच्याजवळ आला. ईशाच्या कपड्यांना चिखल लागला होता. तिनं सांगितलं, ती घोड्यावरून पडली तेव्हा तर परेश, शर्मिला विरेंद्र सगळ्यांनाच खूप काळजी वाटली की ईशाला काही गंभीर दुखापत तर द्ब्राली नाहीए? पण ईशानं त्यांना आश्वस्त केलं तिला लागलं नाहीए, पण ती पडल्यामुळे अन् तुम्ही लोक न दिसल्यामुळे खूप घाबरली होती. आता ती ठीक आहे. तुम्ही सर्व दिसल्यावर तर आता मुळीच भीती वाटत नाहीए.

बाथरूममध्ये गरम पाण्याच्या शॉवरखाली ईशा स्नान करत होती. तिला तिच्या मनांतल्या भावनांचा कल्लोळ समजत नव्हता. राहून राहून तिचं घोड्यावरून पडणं, तिला रशीदनं सावरणं…दोघांचं चिखलात पडणं, त्याचा निकट स्पर्श, त्या स्पर्शानं जाणवलेला करंट पुन:पुन्हा आठवत होता. असं पूर्वी कधी जाणवलं नव्हतं. परेश रात्रीच्या अंधारात तिच्या शरीराला स्पर्श करायचा तेव्हाही शरीराला अशा झिणझिण्या जाणवंत नव्हत्या.

जेवताना तो म्हणाला, ‘‘ईशा, घरून फोन आला होता, मला उद्याच जावं लागेल…’’

‘‘अचानक? तसेही दोन दिवसांनी परतणारच आहोत ना आपण?’’ ईशानं विचारलं.

‘‘तू इथंच थांब, मला एकट्यालाच जावं लागेल. दुकानांत काही अडचण आली आहे. तू काळजी करू नकोस. तुझी इथली सर्व व्यवस्था करूनच मी जाईन. उद्या आपण श्रीनगरला जातो आहोत. तिथूनच मी एयरपोर्टवरून परत जातो.’’

‘‘पण मग मला एकटीला इथं बरं वाटणार नाही. बघा ना दोन दिवस राहता आलं तर?…’’ ईशाला परेशचं वागणं आकलत नव्हतं. एकत्र आलोय तर एकत्रच जाऊयात, ती इथं शर्मिला अन् विरेंद्रसोबत एकटी कशी राहील?

‘‘ईशा, समजून घे, धंद्यात असे प्रसंग येतात. हे एक मोठं डील आहे आणि मी गेलो नाही तर फार मोठं नुकसान होईल. तशीही तुला अजून इथं थांबायची इच्छा आहेच ना? पुन्हा विरेंद्र अन् शर्मिला वहिनीही आहेत सोबतीला. तू अगदीच एकटी नाहीएस. तुझ्यासाठी रोख रक्कम, चेक, हॉटेल रिझर्वेशन, टॅक्सी बुकिंग सगळी व्यवस्था अगदी चोख करतोय मी.’’

परेश तसा मनाचा उदार होता. इथेच काय पण घरीही ईशाला तो काही कमी पडू देत नव्हता. फक्त ईशाशी अजूनही त्याचे मनाचे तार जुळले नव्हते. खरं तर ईशानंही तसा प्रयत्न कुठं केला होता? मुळात हे लग्न ईशाच्या मर्जीविरूद्ध झालंय हेही त्याला ठाऊक नव्हतं. ईशाला त्याचा उगीचच राग आला. तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीए? जेवण आटोपून शाल पांघरून ईशा बाल्कनीत येऊन उभी राहिली.

ईशाचं लक्ष गेटजवळ उभ्या असलेल्या गाडीकडे गेलं. सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून रशीदनं गाडी आतच पार्किंगमध्ये लावून ठेवली होती. रशीद गाडीला टेकून उभा होता. तिच्याकडेच बघत होता. त्यानं हात हलवून तिला येण्याची खूण केली.

परेश टीव्हीवर बातम्या ऐकत होता. ती बाल्कनीचा जिना उतरून खाली गेटापाशी आली. ‘‘काय झालं?’’ तिनं विचारलं… एका ड्रायव्हरच्या बोलण्यावरून आपण इथवर आलो याचा तिला विषाद वाटला.

रशीद जवळ आला. त्यानं मूठ उघडली. ईशाच्या कानांतला द्ब्राबा होता. नकळत ईशानं आपले कान चाचपले. एका कानातला द्ब्राबा नव्हता. ती घोड्यावरून पडली तेव्हा त्या घाईगर्दीत कानांतून तो पडला असावा. पण तेवढ्या एका द्ब्राब्यासाठी रशीद इतका वेळ वाट बघत उभा होता. एव्हाना त्यानं निघून जायला हवं होतं. ईशानं त्याच्याकडे बघितलं, तो टक लावून तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातले भाव ईशाला खटकले.

‘‘उद्या सकाळी हे देता आलं असतं.’’ तिच्या आवाजात राग अन् जरब होती. ती खोलीत परत आली. परेश टीव्ही बंद करून ढाराढूर झोपला होता. ती आपली डायरी घेऊन सीटिंग एरियात आली. बराच वेळ ती डायरी लिहित होती. लिहिणं थांबलं तेव्हा विचार चक्र पुन्हा सुरू झालं.

लग्न झाल्यापासूनचे दिवस तिला आठवले. परेश त्याच्या परीनं तिची काळजी घेत होता. ती आनंदी राहील, मोकळेपणानं राहील यासाठी प्रयत्न करत होता. पण हट्टीपणानं ही गोष्ट ती  नजरेआड करत होती, मान्य करत नव्हती. तिच्या अहंकारानं तिला पत्नी म्हणून पूर्णपणे समर्पित होऊ दिलं नव्हतं. परेशनं स्वत:ची इच्छा तिच्यावर कधीही लादली नव्हती.

ती कधीच परेशबरोबर मोकळेपणानं बोलली नव्हती. फक्त त्याचा रागराग करत होती. तिनं मोकळेपणानं बोलायला काय हरकत होती. इतका अहंकार कशाचा होता? पुढाकार परेश घेता आला नव्हता तर तिनं पुढाकार घ्यायला काय हरकत होती?

पण आज मात्र तिच्या मनांत परेशविषयी कोमल भावना निर्माण झाल्या होत्या. त्याच्याविषयी प्रेम अन् आदर दाटून आला होता.

खूप उशीरा केव्हा तरी ईशाला झोप लागली. परेश तिला वारंवार जागं करण्याचा प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. शेवटी ईशा धडपडून उठून बसली. तिला खूपच संकोचल्यासारखं झालं. पटापट सर्व आवरून ती सगळ्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसली.

गाडी जोरात धावत होती. सभोवारचा सुंदर निसर्ग मागे जात होता. जेव्हा जेव्हा ईशाची नजर समोर जायची तेव्हा रशीदचे दोन निळे डोळे तिच्याकडे बघत असायचे. निसर्गाकडे बघताना सर्वच अबोल झाले होते. गाडीतल्या रेडियोवर किशोर कुमारच्या मादक आवाजात एक धुंद गाणं सुरू होतं. ‘‘प्यार कर लिया तो क्या, प्यार है खता नहीं.’’ रशीदनं मुद्दामच व्हॉल्यूम वाढवला अन् पुन्हा एकदा आरशातून थेट तिच्याकडे बघितलं.

ईशाला वाटलं, तिच्या मनांतला चोर जणू गाडीतल्या इतरांनी पकडला. तिला खूपच लाज वाटली. ती विवाहित आहे. चांगल्या कुळातली लेक आणि सून आहे. तिनं अशी मर्यादा ओलांडणे बरोबर नाही. आज परेश परत जाणार अन् उरलेली तीन माणसं अजून दोन दिवस रशीदच्या गाडीतून भटकणार. ईशाच्या जीवाला टोचणी लागली, काही तरी चुकतंय नक्कीच!

कालची घटना तिच्या मनांत ताजी होती. रात्री तिचा कानांतला द्ब्राबा परत करताना रशीदची नजर काही वेगळंच बोलत होती. यापुढे दोन दिवस अजून ती त्याच्या सहवासात राहिली तर कदाचित तिचाही स्वत:वरचा संयम सुटेल. छे छे असं होता कामा नये. एकाएकी तिला वाटलं परेशच्या मिठीत असावं. ती त्याची पत्नी आहे. इतर कुणी तिला कुठल्याही हेतूनं मोहात पाडू शकत नाही.

तिनं मानेला जोरात झटका दिला. मनातले विचार झटकून टाकले. तिनं मनांला बजावलं, असं वेड्या कोकरागत इकडे तिकडे हुंडायचं नाही. जबाबदार शालीन कुलवधूसारखं वागायचं. परेशचं अन् तिचं नातं असायला हवं तेवढं घट्ट अन् आत्मीय नाहीए, पण ती आता त्यासाठी पुढाकार घेईल. इतर कुणीही त्यांच्या नात्यात असणार नाही.

गाडी एयरपोर्टवर पोहोचली. सगळे उतरले. परेशच्या सामानाबरोबर ईशानं आपली बॅगही काढून घेतली.

‘‘तुझी बॅग का काढते आहेस?’’ परेशनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘मी तुमच्याबरोबर परत चलते आहे, मला तिकिट मिळेल ना?’’ तिच्या या आकस्मिक निर्णयानं विरेंद्र अन् शर्मिलाही चकित झाली. अजून दोन तीन दिवस इथं राहण्यासाठी कालपर्यंत तिचाच हट्ट सुरू होता.

‘‘आता समजलं, ईशावहिनी परेश भाऊंशिवाय एक दिवसही राहू शकत नाहीत. परेश भाऊजी, भाग्यवान आहात, इतकं प्रेम करणारी बायको मिळालीय तुम्हाला.’’ शर्मिलानं दोघांकडे कौतुकानं बघत म्हटलं.

परेशलाही सुखद आश्चर्य वाटत होतं. वरकरणी कोरडी वाटणारी ईशा मनांतून त्याच्यासाठी इतकं प्रेम बाळगून आहे?

ईशाच्या डोळ्यांवर गॉगल होता. तिनं डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं. रशीद आपल्या निळ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत त्यांचीच वाट बघंत होता.

परेश व ईशाला आत जायचं होतं. विरेंद्र अन् शर्मिलानं हात हलवून त्यांना निरोप दिला. ईशानं वळून बघितलं, रशीदच्या चेहऱ्यावर आश्चर्य अन् उदासीचे भाव होते. ईशा मात्र अगदी शांत होती. तिला एकाएकी काही तरी आठवलं. ती भराभर चालत रशीदजवळ आली.

दुखावलेल्या सुरात रशीदनं म्हटलं, ‘‘तुम्ही जाताहात हे सांगितलं नाही?’’

ईशानं आपली पर्स उघडून आतून एक पाकीट काढलं अन् रशीदपुढे धरलं.

त्यानं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं.

‘‘तुझ्या बहिणीच्या लग्नाला मी येऊ शकणार नाही. छान कर तिचं लग्न. तिला माझ्याकडून ही छोटीशी भेट.’’

‘‘नको, नको…’’ रशीदनं नकार दिला तेव्हा एखाद्या मोठ्या बाईच्या अधिकारानं तिनं रशीदचा हात धरून त्याच्या हातात पाकिट दिलं.

पुन्हा एकदा चार डोळे भेटले. ईशानं गोड हसून मुक्त मनानं त्याचा निरोप घेतला.

पावसाळी शेवाळं

कथा *प्राची भारद्वाज

संध्याकाळ व्हायला आली तशी दीपिकानं पलंगावरच्या चादरी, उशा वगैरे आवरायला सुरूवात केली. तिचे रेशमी सोनेरी केस वारंवार तिच्या गुलाबी गालावर रूळायला बघत होते अन् आपल्या नाजूक लांबसडक बोटांनी ती पुन:पुन्हा त्यांना मागे सारत होती.

‘‘आता ऊठ ना, मला चादर बदलायची आहे.’’ दीपिकानं संतोषला हलवत म्हटलं. तो अजूनही आरामात बेडवर लोळत होता.

‘‘का पुन:पुन्हा त्या बटा मागे ढकलते आहेस? छान दिसताहेत तुझ्या सुंदर चेहऱ्यावर…जणू ढगात लपलेला चंद्र…’’ संतोषने म्हटलं.

‘‘सायंकाळ व्हायला आलीय. आता या ढगांना घरी हाकललं नाही तर तुझ्या चंद्रालाच घराबाहेरचा रस्ता धरावा लागेल. कळलं का?’’

‘‘तू घाबरतेस कशाला? तुला घरंही आहेत अन् घरी घेऊन जायला तत्पर असणारेही आहेत. ज्या दिवशी तू होकार देशील त्याच दिवशी मी…’’

‘‘पुरे पुरे…मी होकार दिलाच आहे ना? आता निघ तू…उद्या येतीलच थोड्या वेळात, तोवर मला हे सर्व आवरायला हवं.’’ दीपिका भराभर आवरत म्हणाली. चादरी, उशा सर्व व्यवस्थित ठेवून, इतर सर्व गोष्टी नीटनेटक्या केल्यावर तिनं विचारलं, ‘‘उद्या कधी येणार गुरूदेव?’’

‘‘असाच बाराच्या सुमाराला.’’ संतोषनं म्हटलं.

तो जरा तक्रारीच्या सुरात पुढे म्हणाला, ‘‘हे असं चोरून भेटणं मला अजिबात आवडत नाहीए. असं वाटतं आपण प्रेम नाही, गुन्हा करतोय…अपराध केल्यासारखं वाटतं.’’

‘‘गुन्हा तर करतोच आहोत संतोष…आपलं लग्न झालेलं असतं तर गोष्ट वेगळी होती…पण मी आता उदयची पत्नी आहे. तू माझ्या घरी मला संगीत शिकवायला म्युझिक टीचर म्हणून येतो आहेस. अशा परिस्थितीत आपल हे नातं म्हणजे गुन्हाच ठरतो ना?’’

‘‘का बरं? आधी आपलं दोघांचं प्रेम होतंच ना? उदय तर तुझ्या आयुष्यात नंतर आलाय. तुझ्या अन् माझ्या घरच्यांनी हे जाती पर जातीचं प्रस्थ माजवलं नसतं, आपल्या लग्नाला विरोध न करता लग्न लावून दिलं असतं तर? पण त्यांनी अगदी घाई घाईनं तुझं लग्न दुसरीकडे लावून टाकलं.’’

‘‘सोड त्या जुन्या गोष्टी. या दुसऱ्या शहरात येऊनही आपण दोघं पुन्हा भेटलो. माझ्या मनांतलं तुझ्या विषयीचं प्रेम बहुधा नियतीलाही हवं असावं. म्हणूनच आपली पुन्हा गाठ पडली.’’ दीपिकानं विषय संपवला.

उदय व दिपिकाच्या लग्नाला आता दोन वर्षं होऊन गेली होती. सुरूवातीला दीपिका खूपच कष्टी अन् उदास असायची. उदयला वाटे नवं लग्न, नवी माणसं, नवं शहर यामुळे ती अजून स्वत:ला अॅडजेस्ट करू शकली नाहीए…हळूहळू रूळेल. पण खरं कारण वेगळंच होतं. संतोष, तिचं पहिलं प्रेम तिच्यापासून दुरावल्यामुळे ती दु:खी होती. एकदा ती व संतोष सिनेमा बघून हातात हात घालून घरी परतत असताना तिच्या थोरल्या भावानं बघितलं. दीपिकावर जणू वीज कोसळली. त्यानं तिथूनच तिला धरून ओढत घरी आणून तिच्या खोलीत कोंडून घातलं. कुणी तिला भेटणार नाही, ती कुणाला भेटू शकणार नाही…त्या खोलीतच तिनं रहायचं. दीपिकानं अन्न सत्याग्रह पुकारला. पण कोणीही दखल घेतली नाही. शेवटी तीन दिवसांनी भूक असह्य झाल्यावर तिनं मुकाट्यानं शरणागती पत्करली. संतोषला भेटावं कसं ते कळत नव्हतं. घरातलं वातावरण फार जुनाट विचारांचं. त्यातून संतोषची जातही वेगळी होती.

‘‘त्या मुलाचा जीव वाचावा असं वाटंत असेल तर त्याचा नाद सोड.’’ भावानं तिला बजावलं होतं. ‘‘बाबा, तुम्ही फक्त आदेश द्या, त्या हलकटाच्या देहाचा तुकडासुद्धा कुणाला सापडणार नाही असा धडा शिकवतो.’’

‘‘मला तर वाटतंय या निर्लज्ज पोरीलाच विष देऊन ठार करावं,’’ ही अन् अशीच वाक्यं तिला सतत ऐकवली जात होती. ती खूप घाबरली नर्व्हस झाली. अन् पंधरा दिवसात घरच्यांनी दूरच्या शहरात राहणाऱ्या उदयशी तिचं लग्न लावूनही टाकलं. दीपिका जणू बधीर झाली होती. होणारा नवरा, पुढलं आयुष्य कशा विषयीच तिला जाणून घ्यावंसं वाटलं नाही. लग्नातही ती मुकाटपणे सांगितलेले विधी करत होती. सासरी सासू, सासरे, दीर, नणंद वगैरे सर्व होते, पण ती वेगळ्या ठिकाणी राहत होती. इथं फक्त उदय अन् तीच राहणार होते.

खरं तर उदय खूपच सज्जन आणि प्रेमळ तरूण होता. निरोगी, निर्व्यसनी, शिकलेला, उत्तम पगार मिळवणारा…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकोला समजून घेणारा होता. कुणाही मुलीला अभिमान वाटेल असा नवरा होता तो. पहिल्या रात्री दीपिकेचा उदास चेहरा बघून त्यानं तिला अजिबात त्रास दिला नाही. नव्या ठिकाणी नव्या नवरीला रूळायला थोडा वेळ हवाच असतो. हळू हळू ती मोकळी होईल हे त्यानं समजून घेतलं.

काही दिवसानंतर दीपिकेनंही तडजोड करायची असं ठरवलं. नव्या जागी, नव्या संसारात, नव्या नात्यात रमायला तिला जमू लागलं. तशी ती गृहकृत्य दक्ष होतीच.

एकदा सायंकाळी घरात एक पार्टी होती. उदयचे काही मित्र त्यांच्या बायकोसह आले होते. घरात काम करताना उदयनं दीपिकेला गाणं गुणगुणताना ऐकलं होतं. एक दोघांनी गाणं म्हटल्यावर कुणीतरी दीपिकेलाही गाणं म्हणायचा आग्रह केला. दीपिकेनं गाणं म्हटलं अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळेच तिच्या सुरेल आवाजावर अन् तिच्या गाण्याच्या पद्धतीवर खुश द्ब्राले. उदयनं म्हटलंही, ‘‘माझी बायको इतकं छान गाते हे मला कुणी सांगितलंच नव्हतं. आज कळतंय मला.’’ उदयला तर बायकोचं किती अन् कसं कौतुक करू तेच समजेना.

सगळी मंडळी निघून गेल्यावर उदयनं दीपिकेला म्हटलं, ‘‘तू खरं म्हणजे गाणं शिकायला हवं. तुझी कला वाढीस लागेल. तुला जीव रमवायला एक साधनही मिळेल…’’

दीपिका गप्प बसली तरी उदयनं एका चांगल्या नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करत इकडे तिकडे चौकशी करून तिच्यासाठी एक संगीत शिक्षक शोधून काढला. ‘‘आजपासून हे तुला गाणं शिकवायला येतील.’’ त्यानं सांगितलं.

संतोषला संगीत शिक्षक म्हणून समोर बघून दीपिका चकितच झाली. उदयनं दोघांची ओळख करून दिली. अन् ‘ऑल द बेस्ट’ म्हणून तो ऑफिसला निघून गेला.

उदय गेल्यावर दीपिका पहिलं वाक्यं बोलली, ‘‘तू इथं कसा? माझा पाठलाग करत इथवर आलास?’’

‘‘नाही दीपू, मी तुझ्या मागावर नव्हतो, मी तर या शहरात नोकरी शोधत आलोय. कुणीतरी मला या घराचा पत्ता दिला. इथं संगीत शिक्षक हवाय म्हणून मी इथं आलो.’’

‘‘मला दीपू म्हणू नकोस. माझं लग्न झालंय आता संतोष, तुझ्या दृष्टीनं मी दुसऱ्या कुणाची पत्नी आहे.’’

नियतीचा खेळच म्हणायचा, पुन्हा दीपिका व संतोष समोरासमार आले होते. दोघंही एकमेकांना विसरून नव्यानं आयुष्य सुरू करत होते अन् पुन्हा ही भेट झाली.

‘‘दीपू, सॉरी, दीपिका, मला इथं शिकवणीसाठी येऊ दे. मला पैशांची, नोकरीची गरज आहे. या ट्यूशनमुळे अजूनही एक दोन लोकांकडून बोलावणं येईल असं मला त्यांनी सांगितलंय…त्यांनी म्हणजे ज्यांनी तुझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल सांगितलं…त्यांनी. उदयसमोर मी आपलं गत काळातलं नातं कधीही उघड करणार नाही असं वचन देतो मी तुला.’’ यावर दीपिकाला काही बोलता आलं नाही. काही काळातच दोघांमधला दुरावा नाहीसा झाला. हसणं, बोलणं, चेष्टा मस्करी, गाण्याचा रियाज सर्व सुरू झालं.

दुसऱ्या दिवशी रियाज आटोपल्यावर दीपिकेनं संतोषला म्हटलं, ‘‘आपल्या भूतकाळाचा विचार करून दु:खी होण्यात काय अर्थ आहे. यापुढील आयुष्याचा विचार केला पाहिजे. त्यातच शहाणपणा आहे.’’ संतोषचा दुर्मुखलेला चेहरा बघून तिला वाईट वाटत होतं.

‘‘तुला कळायचं नाही दीपिका…दुसऱ्या कुणाची पत्नी म्हणून तुझ्याकडे बघताना मला काय वाटतं ते कसं सांगू. तू माझी होतीस अन् आता…’’ बोलता बोलता संतोषनं दीपिकाचे दंड दोन्ही हातांनी घट्ट धरले.

त्यानंतर दीपिका एकदम आनंदात असायची. घर आता अधिक टापटीप असायचं, जेवायला नवीन चविष्ट पदार्थ बनवले जायचे. एकूणच तिची पूर्वीची उदासीनता, गप्प असणं…सगळंच बदललं होतं. उदयला वाटे, तिला तिच्या आवडीचे संगीत शिक्षण घेता येतंय, यामुळेच ती आनंदात आहे.

दीपिका आकाशी निळ्या रंगाचं स्वेटर विणत होती. तो प्रसन्न रंग अन् त्यावर घातलेली ती सुंदर आकर्षक नक्षी बघून उदयनं म्हटलं, ‘‘माझ्यासाठीही असं सुंदर, याच रंगाचं, याच डिझाइनचं स्वेटर करून दे ना.’’

‘‘पुढचं स्वेटर तुमच्यासाठीच विणेन. हे मी माझ्या चुलत भावासाठी विणतेय. पुढल्याच महिन्यांत त्याचा वाढदिवस आहे ना?’’

‘‘तर मग तू माहेरी जाऊन ये ना, गेलीच नाहीएस तू खूप दिवसांत.’’

‘‘नाही हो, मला नाही जायचंय…तुमच्या जेवणाची आबाळ होते ना मग?’’

‘‘अगं, मी काही कुक्कुळं बाळ नाहीए, इतकी काळजी का करतेस? अन् माहेरी जायला तर सगळ्याच मुलींना आवडतं. तू बिनधास्त जा…सगळ्यांना भेट. त्यांनाही बरं वाटेल. मी माझी काळजी घेईन. तू अगदी निशिचंत रहा.’’ उदयनं तिला आश्वस्त केलं. दीपिकेला त्यानंतर नाही म्हणता आलं नाही.

‘‘आता कसं करायचं? चार दिवस मी माहेरी गेले तर आपली भेट कशी होणार? त्या शहरात भेटणं तर केवळ अशक्य आहे. तिथं सगळेच आपल्याला ओळखतात.’’ दीपिकेनं संतोषला अडचण सांगितली. तिचं आज गाण्यातही लक्ष लागत नव्हतं.

‘‘तू काळजी करू नकोस. तुला भेटल्याशिवाय मी तरी कुठं राहू शकतो? काहीतरी युक्ती करावी लागेल. बघूयात काय करता येतंय…’’ संतोषनं थोडा विचार करून एक योजना सांगितली, ‘‘तू इथून ट्रेननं निघ. पुढल्याच स्टेशनवर मी तुला भेटतो. आपण त्याच शहरात हॉटेलात चार दिवस राहू. तूच उदयला फोन करत राहा. खोलीच्या बाहेर पडलोच नाही तर आपल्याला कुणी बघणारही नाही.’’ बोलता बोलता संतोषचे हात दीपिकेच्या शरीरावर खेळू लागले होते.

उदयनं दीपिकेला ट्रेनमध्ये बसवलं. त्याला बाय करून तिनं निरोप दिला. पुढल्याच स्टेशनवर संतोषनं तिला उतरवून घेतलं. दोघं एका चांगल्या हॉटेलात गेली. रिसेप्शन डेस्कवर खोटी नावं सांगायची असं मनांत होतं पण हल्ली आयकार्ड, घरचा पत्ता, पॅनकार्ड वगैरे सगळंच सांगावं लागतं. दोघांची वेगवेगळी नावं सांगताना दोघंही मनांतून घाबरलेले होते. हॉटेलात जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे लागलेले होते. तोंड लपवता लपवता दीपिकेची वाट लागली. आपण कॉलगर्ल आहोत असं घाणेरडं फीलिंग तिला यायला लागलं.

खोलीत आल्यावर ती वैतागून म्हणाली, ‘‘असं काही असतं याची थोडीही कल्पना असती तरी मी इथं आले नसते.’’

‘‘आता तर खोलीत आपण सुरक्षित आहोत ना? आता विसर सगळं आणि ये माझ्या मिठीत.’’ संतोष तर असा अधीर झाला होता जणू आज त्याची लग्नाची पहिली रात्र आहे.

‘‘थांबरे, आधी उदयला फोन तर करू देत. मी पोहोचले म्हणून सांगायला हवं ना?’’

‘‘अगं…अगं…हे काय करतेस? तू उद्या सकाळी पोहोचते आहेस. तू अजून ट्रेनमध्येच आहेस. विसरू नकोस.’’ संतोषनं तिला मिठीत घेत खिदळंत म्हटले. त्याचं ते खिदळणं दीपिकेला अजिबात रूचलं नाही.

हॉटेलच्या त्या बंद खोलीत कुणाचीही भीती नसतानादेखील दीपिकेला संतोषचा स्पर्श सुखाचा वाटत नव्हता. काय होतंय ते तिला समजत नव्हतं. ‘डोकं फार दुखतंय’ म्हणून ती रात्री न जेवताच लवकर झोपली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दीपिकेनं चहाची ऑर्डर दिली. चहा घेऊन येणारा वेटर आपल्याकडे रोखून बघतोय, संशयानं बघतोय असं तिला वाटलं. चोराच्या मनांत चांदणं म्हणतात ते खोटं नाही. दीपिकेला स्वत:चीच चिड आली…शी: काय म्हणत असेल तो आपल्याला.

‘‘आता फोन करू का उदयला? एव्हांना गाडी आपल्या शहरात पोहोचत असेल ना?’’ दहा मिनिटांत तिनं इतक्यांदा हा प्रश्न संतोषला विचारला की संतोषही संतापून म्हणाला, ‘‘कर गं बाई! एकदाचा फोन कर.’’

उदयच्या सुरात काळजी होती. ‘‘तू नीट पोहोचलीस ना? ट्रेन लेट का बरं झाली?’’ तिनं म्हटलं, ‘‘नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नंतर फोन करते.’’ ती प्रचंड घाबरली होती. असं अन् इतकं खोटं कधी बोलली नव्हती. घरात आपण किती सुरक्षित असतो हे तिला पदोपदी जाणवत होतं. ‘‘मी वेळेवर पोहोचले असं नाही सांगितलं हे किती बरं झालं? बापरे! मला खूप भीती वाटतेय संतोष…’’

‘‘चल, आज खाली रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट घेऊयात. तुलाही थोडं बरं वाटेल. कालपासून तू टेन्शनमध्येच आहेस.’’ सतोषनं म्हटलं.

उदयबरोबर राहून दीपिका दूध ओट्स, दूध कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट-ब्रेड वगैरे सारखे पदार्थ नाश्त्याला घ्यायला लागली होती. आत्ताही तिनं ओट्स आणि ऑमलेट मागवलं. संतोषनं आलूपराठे आणि कचोरी मागवली.

‘‘का गं? इतका साधा आणि कमी ब्रेकफास्ट? पोट बरं आहे ना तुझं?’’ संतोषनं विचारलं.

‘‘आता आपण कॉलेजमधील नाही आहोत संतोष, वयानुरूप खाण्याच्या सवयीही बदलायला हव्यात. उदय तर म्हणतात…’’ दीपिकानं पटकन् जीभ चावली. एकदम गप्प झाली ती.

‘‘मी खूप बोअर होतेय…थोडं बाहेर भटकून येऊयात का?’’ दीपिकानं असं म्हणताच संतोष पटकन् तयार झाला. सतत खोलीत बसून टीव्ही बघून तोही कंटाळला होता.

सायंकाळी उशीरापर्यंत दोघं तिथल्या बाजारात मनसोक्त भटकले. संतोषने दीपिकेला अगदी लगटून घेतलं होतं. बाजारात तमाशा नको म्हणून तिनं तो नको असलेला स्पर्श सहन केला. बाहेरच काही तरी खाऊन रात्री दोघं हॉटेलच्या खोलीत परत आले. तिने कपडे बदलले अन् ती बेडवर आडवी झाली. पण या क्षणी तिला संतोषचा स्पर्श नको नको वाटत होता. मनांतून खूप अपराधी वाटत होतं. उदयशी खोटं बोलल्याचा पश्चात्ताप होत होता.

दीपिकानं काहीच उत्तर दिलं नाही. तिला स्वत:लाच समजत नव्हतं की स्वत:च्या घरात असताना संतोषच्या जवळीकीसाठी ती इतकी अधीर, आतुर असायची. आता तिला ती जवळीक नको का झालीय?

दुसऱ्या दिवशी दीपिकानं दोन वेळा उदयला फोन लावला. दोन्ही वेळा तो अगदी कोरडेपणांनं मोजकंच बोलला.

‘‘उदय का बरं असं वागला? इतका कोरडेपणा गेल्या दोन वर्षांत कधी जाणवला नव्हता. त्याचा मूड कशानं बिघडला असावा?’’ दीपिकानं म्हटलं.

‘‘ऑफिसच्या कामात गढलेला असेल, कामाचं टेन्शन असेल, तू काय त्याच्या मूडबद्दल बोलायला इथे आली आहेस का?’’ चिडून संतोष म्हणाला. ज्या विचारानं त्यानं हॉटेल बुक केलं होते, तसं काहीच घडत नव्हतं. संतोषला दीपिकेचं रसरशीत तारूण्य, तिचं सौंदर्य उपभोगायचं होतं पण ती तर अजिबात प्रतिसाद देत नव्हती. लोकांच्या नजरांची (खरं तर सगळे अपरिचित होते, तरीही) तिला भीती वाटत होती. त्यामुळे खोलीबाहेर जाता येत नव्हतं. विनाकारण हॉटेलचं बिल वाढत होतं. हा दिवसही असाच कंटाळवाणा गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत जायचं असं शेवटी दोघांनी ठरवलं.

‘‘मला लवकर आलेली बघून उदयला नवल वाटेल, पण मी त्यांना सांगेन की तुमची फार आठवण येत होती म्हणून मी परत आले.’’ दीपिका म्हणाली.

‘‘उदय, उदय, उदय! खरोखरंच त्याची फार आठवण येतेय का?’’ संतोषनं संतापून विचारलं. दीपिकेनं उत्तर दिलं नाही. पण न बोलताही सत्य काय ते संतोषला समजलं. दीपिकेला तिच्या घरी सोडून संतोष आपल्या खोलीवर निघून गेला.

सकाळीच दीपिकेला घरात बघून उदयला जरा नवल तर वाटलं.

‘‘सरप्राइज!’’ दीपिकेनं उदयच्या गळ्यात हात टाकत म्हटलं.

‘‘इतक्या लवकर कशी आलीस तू? दोन दिवस अजून राहणार होतीस ना?’’ अगदी संथ सुरात त्यानं विचारलं. ती लवकर आल्याचा जणू त्याला आनंद झालाच नव्हता.

‘‘का? तुम्हाला आनंद नाही झाला का? मला तुमची फारच आठवण यायला लागली म्हणताना मी लगेचच निघाले.’’ दीपिकानं म्हटलं.

ब्रेकफास्ट घेऊन झालेला होता. दुपारचं जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच घेईन एवढं बोलून उदय ऑफिसला निघून गेला.

सायंकाळी उदय घरी परतला तोवर दीपिकेनं घर साफसूफ करून, फर्निचरची रचना बदलून नव्यानं मांडामांड केलेली होती. स्वयंपाक ओट्यावर तयार होता. उदय गप्पच होता. त्यानं चहाही नको म्हणून सांगितलं.

‘‘तुम्ही असे थकलेले अन् गप्प का आहात? बरं नाही वाटत का?’’

‘‘जरा थकवा आलाय. लवकर झोपतो. विश्रांती मिळाल्यावर बरं वाटेल.’’ एवढं बोलून उदय खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिससाठी उदय आवरत असतानाच संतोष घरात शिरला. ‘‘आज इतक्या लवकर कसे आलात संतोष? दीपिकेशिवाय करमत नाही वाटतं? अजून किती दिवस ट्यूशन चालू राहील तुमची?’’

उदयचं बोलणं, एकूणच त्याचे हावभाल बघून दीपिका अन् संतोष दोघंही भांबावले. चकितही झाले.

जेवणाचा डबा घेऊन उदय निघून गेल्यावर चहाचा कप घेऊन तिनं संतोषला सोफ्यावर बसवलं. स्वत:ही चहाचा कप घेऊन त्याच्यासमोर बसली आणि अत्यंत स्थिर आवाजात बोलायला लागली,

‘‘संतोष, तू आयुष्यात आलास अन् मी आता विवाहित आहे उदयची पत्नी अन् त्याच्या कुटुंबातली सून आहे, हे मी अगदी विसरले…अल्लड किशोरीसारखी तुझ्या प्रेमात वेडी झाले. प्रियकराच्या बाहुच्या विळख्यात सुख शोधू लागले…जर तू या घरापासून दूर, त्या हॉटेलच्या खोलीत नेलं नसतं तर मी, माझ्या संसारात किती रमले आहे. उदयवर प्रेम करू लागले आहे. त्याच्या प्रेमाची किंमत मला कळली आहे, हे काहीच मला जाणवलं नसतं. तू इथं माझ्या घरात येतो, तेव्हा या माझ्या घराच्या चार भिंतीत मी सुरक्षित असते पण घराबहेर पाऊल टाकल्यानंतर मला कळलं की या घरामुळे मला पूर्णत्त्व आलंय. या घराची मालकीण, उदयची पत्नी म्हणून माझी ओळख आहे.

‘‘उदयनं तर माझ्यावर मनांपासून प्रेम केलं. मला हवं ते सर्व माझ्यासमोर ठेवलं. माझी काळजी घेतात ते, मला काय हक्क आहे त्यांचा अपमान करण्याचा? माझ्या अनैतिक वागण्यानं समाजात त्यांची मानहानी होईल, याचं भान मीच ठेवायला हवं. माझ्या या निर्लज्ज वागण्यानं त्यांचा प्रेमावरचा, निष्ठेवरचा विश्वासच उडेल. माझ्या आयुष्यात तुझ्या प्रेमाचा रंग भरण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर काजळी फासण्याचा मला खरंच हक्क नाहीए.

दीपिका विचार करत होती, विवाहित असून ती अशी चुकीच्या मार्गावर कशी भरकटली? मनाच्या सैरभैर अवस्थेत ती घरातल्या प्रत्येक खोलीतून फिरत होती. सर्व तऱ्हेनं विचार करून ती या निष्कर्षावर पोहोचली की खरं काय ते उदयला सांगून टाकायचं. मनावर हे पापाचं ओझं घेऊन सगळं आयुष्य काढणं अवघडच नाही तर अशक्य आहे.

सायंकाळी उदय घरी परतल्यावर दीपिकेनं त्याला चहा करून दिला आणि शांत आवाजात सगळी हकीगत त्याला सांगितली. ती खाली मान घालून बोलत होती. तो खाली मान घालून ऐकत होता. शेवटी ती म्हणाली, ‘‘उदय, मला क्षमा करा. माझ्या हातून फार मोठा गुन्हा घडलाय. माझं पुढलं आयुष्य तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे.’’

ऑफिसच्या कामासाठी उदय शेजारच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून सायंकाळी तो तिथल्या मार्केटमध्ये पाय मोकळे करायला म्हणून गेला. तिथल्या एका मिठाईच्या दुकानातली मैसूरपाकाची वडी दीपिकेला फार आवडायची. आलोच आहोत तर तो मैसूरपाक घेऊन जाऊ अशा विचारानं मार्केटमध्ये फिरत असताना त्याला दीपिकेनं विणलेला निळ्या स्वेटरसारखा स्वेटर कुणाच्या तरी अंगात दिसला. तोच रंग, तेच डिझाइन. उदयनं उत्सुतकेनं त्या माणसाच्या न कळत त्याचा माग घेतला. उदय चकित झाला. तो माणूस म्हणजे संतोष होता. अन् दीपिका त्याला लगटून होती. संताप, अपमान, तिरस्कार, सुडाची भावना अशा अनेक संमिश्र भावना त्याच्या मनांत दाटून आल्या. त्यानं दीपिकेच्या माहेरी फोन केला. दीपिकेबद्दल चकार शब्दही काढला नाही. जनरल बोलणं झालं पण त्यावरून एक गोष्ट नक्की झाली की दीपिका माहेरी गेली नाहीए, हे सिद्ध झालं. कसा बसा तो टॅक्सी करून आपल्या घरी परत आला. दीपिकानं असा विश्वासघात करावा? ज्या पत्नीची तो इतकी काळजी घेतो, तिच्यावर जिवापाड प्रेम करतो तिनंच असा दगा द्यावा? त्याला काहीच सुचेनासं झालं होते. तिला जबरदस्त शिक्षा द्यावी का? पण तिच्याकडून काही कळतंय का याचीही वाट बघायला हवी. संताप, विश्वासघाताच्या आगीत तो होरपळत होता. पण स्वत: दीपिकानंच आपली चूक कबूल केली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पश्चात्तापाच्या अश्रूंनी त्याच्या हृदयातील आग शांत झाली होती.

सगळी रात्र याच मानसिक द्वंद्वात संपली. दीपिकेला घराबाहेर काढायचं? की तिचा पश्चात्ताप अन् स्वत:च आपल्या गैरवर्तनाची कबुली देण्याचा प्रामाणिकपणा बघून तिला क्षमा करायची? दीपिकेला शिक्षा देताना तो ही त्यात होरपळून निघणारंच ना? स्वत:चा संसार मोडून तो लोकांना कोणत्या तोंडानं सामोरा जाणार आहे? पण आता तो दीपिकेवर पूर्वीप्रमाणे विश्वास ठेवू शकेल का?

सकाळी लवकर उठून दीपिका घरकामाला लागली. चहा तयार करून ती चहाचा ट्रे घेऊन उदयजवळ आली. चहाचा कप त्याला देऊन तिनं म्हटलं, ‘‘तुम्ही काय निर्णय घेतलाय? तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे.’’

‘‘आपण आधी चहा घेऊयात.’’ तो शांतपणे म्हणाला. दोघांनी न बोलता चहा घेतला. मग उदयनं म्हटलं, ‘‘दीपिका, तू काही सांगण्याआधीच मला हे कळलं होतं. परवा मला माझ्या ऑफिसच्या कामानं करीमगंजला जावं लागलं. काम संपवून मी बाजारात भटकत असताना तुम्हा दोघांना लगटून चालताना मी बघितलं. तू विणलेला निळा स्वेटर संतोषच्या अंगात होता. मी तुझ्या माहेरी फोन केला तेव्हा त्यांनीच मला दीपिका कशी आहे, केव्हा माहेरी येणार असं विचारल्यावर तू माहेरी गेली नाहीएस हे तर मला कळलंच. तू काय म्हणते आहेस हेच मला ऐकायचं होतं. तू बोलली नसतीस तर मीच विषय काढणार होतो.’’ उदयच्या या बोलण्यामुळे पुन्हा दीपिकेच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले.

‘‘जर मी तुला क्षमा केली नाही तर या आगीत मीही आयुष्यभर जळेन. पण क्षमा करणंही इतकं सोपं नाहीए. मी तुझ्यावर पुन्हा तेवढाच विश्वास ठेवू शकेन की नाही, मलाच ठाऊक नाहीए…पण मला आपला संसार मोडायचा नाहीए. सारी रात्र मी विचार करतोय. तुझ्या डोळ्यातील पश्चात्तापाचे अश्रू आणि गेल्या दोन वर्षात आपण घालवलेले सुखाचे क्षण यांच्या तुलनेत तू केलेला विश्वासघात नक्कीच क्षमा करण्यासारखा आहे.’’

खरंय ना? पावसाळ्यात आपल्या अंगणात शेवाळं साठतं म्हणून आपण अंगण फोडून टाकतो का? आपण तिथलं पाणी काढून शेवाळं खरवडून स्वच्छ करतो. पुन्हा शेवाळं वाढू नये म्हणून सजग राहतो. आपल्या अंगणात दोष आहे म्हणून पावसाळी शेवाळं वाढतं असं नाही तर आपल्या अंगणात थोडी अधिक लक्ष देण्याची, निगा ठेवण्याची गरज आहे असाच त्याचा अर्थ असतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें