मिश्किली * सुदर्शन सोनी
पूर्वी लग्नं जुळवताना पत्रिका अन् कुंडलीचं भारीच प्रस्थ होतं. शास्त्री, पंडित, गुरूजी वगैरे मंडळी मुलाची अन् मुलीची पत्रिका तपासायचे, अभ्यासायचे अन् मग त्यांचे गुण कितपत जुळतात ते बघायचे. जास्तीत जास्त गुण जुळले तर वर पक्ष आणि वधू पक्ष दोन्हीकडे आनंदी आनंद साजरा व्हायचा. लग्न ठरायचं. मग साक्ष गंध, साखरपुडा, श्रीमंती, लग्न वगैरे वगैरे...खरं तर पत्रिकेत चौतीस, छत्तीस गुण जुळले म्हणून ते लग्न अगदी शंभर टक्के यशस्वी होईल असं काही नसतं. प्रत्येकातच काही गुण, काही अवगुण असतात. त्यामुळे पतीपत्नीत मतभेद होतात, भांडणं होतात, मनभेद झाले तर एकमेकांबद्दल घृणा, तिरस्कार निर्माण होऊन संसाराचे तीन तेरा होतात.
पण हल्ली बरं का, पत्रिका बघून गुण जुळवण्याचं प्रस्थ थोडं कमी झालंय. आता इतर बरंच काही बघतात. मुळात मुलीचं शिक्षण अन् तिचं कमवतं असणं, ती किती कमवते याला महत्त्व आलंय. मुलांमध्येही हेच बघतात, मग इतर काही अवगुण, दोष याकडे दुर्लक्ष करून कमवण्यालाच महत्त्व आणि पसंती दिली जाते. तरीही बेबनाव, मतभेद, मनभेद होतातच. आईबापही त्रस्त असतात की असा मुलगा किंवा मुलगी कशी मिळवावी, जी आयुष्यभर घरात टिकून राहील. मधेच सोडून निघून जाणार नाही. आम्हाला तर वाटतं, तो काळ दूर नाही जेव्हा अशा संसारात टिकून राहणाऱ्या लोकांचा जाहीर सत्कार केला जाईल.
गंगूरामकडे एक लेटेस्ट टेक्निक आहे. बऱ्याच अभ्यासानंतर ती त्यानं विकसित केलेय. तसं तर माणसाला पारखायला त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घ्यायला हस्ताक्षर, जन्मतारीख, फूल हुंगून वगैरे अनेक प्रकारे परीक्षा करण्याच्या पद्धती आहेत. पण गंगूनं शोधलेली ही टेक्निक खूपच यशस्वी ठरते आहे. वधू-वराला व वर-वधूला पसंत करत आहे.
या नव्या टेक्निकमध्ये तुम्ही फक्त प्रॉस्पेक्टिव वधूला गाडी चालवत असताना ऑबझर्व्ह करायचं आहे की ती कार कशी चालवते? त्यावेळी कशी वागते. यामागेही एक कथा आहे. एका सकाळी गंगू मॉर्निंगवॉकला निघाला होता. समोरून एक कार आली. आता कार येणं यात विशेष ते काय? पण विशेष होतंच. कारण ती कार कुणी खडूस, कठोर हातांचा पुरूष चालवत नव्हता, तर एक कोमलांगी सुंदरी, तरूणी चालवत होती.