कथा * राजलक्ष्मी तारे
रात्रभर नंदना बेचैन होती. झोप लागत नव्हती. असं का होतं ते तिला समजत नव्हतं. सगळं अंग मोडून आल्यासारखं वाटत होतं.
सकाळी उठली अन् तिला घेरीच आली. कशीबशी पलंगावर बसली. डोकं गरगरत होतं. ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात तनुजा वहिनीचा आवाज ऐकू आला.
‘‘नंदू, उठतेस ना? ऑफिसला जायला उशीर होईल...’’
‘‘उठलेय वहिनी, आवरून येतेय.’’ नंदनानं तिथूनच म्हटलं.
पण नंदनाच्या थकलेल्या आवाजावरून तनुजाला थोडी शंका आली. ती हातातलं काम तसंच टाकून नंदनाच्या खोलीत आली. ‘‘काय झालं गं? बरं नाहीए का?’’
‘‘हो गं!’’ नंदनानं म्हटलं.
तिच्या अंगाला हात लावून तनुजानं म्हटलं, ‘‘ताप नाहीए, पण डोकं दुखतंय का? नेमकं काय होतंय?’’
तेवढ्यात नंदना उठून बाथरूममध्ये धावली. तिला ओकारी झाली. तनुजानं तिच्या पाठीवरून हात फिरवला. चुळा भरून झाल्यावर नंदनाला हाताला धरून तिनं बेडवर बसवलं.
तनुजाला काळजी वाटली, ‘‘नंदुला काय झालं?’’ नंदनाचा भाऊ म्हणजे तनुजाचा नवरा सध्या परगावी गेलेला होता. तिनं नंदनाला दिलासा देत म्हटलं, ‘‘नंदू, आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा आणते. तू फक्त ऑफिसात फोन करून कळव.’’
नंदनानं केवळ मान हलवली.
तनुजा तिच्यासाठी चहा घेऊन आली, तेव्हा नंदना अश्रू गाळत होती. ‘‘काय झालं गं?’’ तिचे डोळे पुसत तनुजानं विचारलं.
‘‘वहिनी, किती काळजी घेतेस गं माझी. तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीवच कधी झाली नाही. कायम माझ्यावर माया करतेस, माझ्या चुका पोटात घालतेस, माझी इतकी काळजी घेतेस...पण तरीही आज मला बरंच वाटत नाहीए.’’
‘‘काळजी करू नको, चहा घे. आवर...आपण दोघी ब्रेकफास्ट घेऊन डॉक्टरकडे जाऊन येऊ. बरं वाटेल तुला,’’ तनुजानं तिच्या खांद्यावर थोपटत दिलासा दिला.
थोड्या वेळानं दोघी घराबाहेर पडल्या. डॉ. माधवी तनुजाची मैत्रिण होती. निघण्यापूर्वीच तनुजानं तिला फोन केला होता.
माधवीनं नंदनाला जुजबी प्रश्न विचारले, तपासलं अन् नंदनाला बाहेर पाठवून तनुजाला केबिनमध्ये बोलावलं, ‘‘तनुजा, नंदना विवाहित आहे का?’’ तिनं विचारलं.