राहो चमकत प्रतिबिंब

कथा * मधु शर्मा कटिहा

अभिनव जाताच अनन्या शांतपणे खाटेवर पहुडली. आठवडाभराकरिता ऑफिसच्या कामासाठी अभिनव लखनऊला निघाला होता. पण जातेवेळी नेहमीप्रमाणेच रुक्षपणे ‘निघतो’ एवढेच बोलून गेला. किती आठवण आली होती तिला अभिनवची जेव्हा तो मागच्या महिन्यात गोव्याला गेला होता. त्यावेळी अनन्या त्याची आतुरतेने वाट पाहात होती. त्याच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होती. इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून काही पदार्थही बनवायला शिकली होती.

जेव्हा अभिनव घरी आला तेव्हा नोकराकडून स्वयंपाक बनवून न घेता तिने स्वत:च्या हाताने त्याच्यासाठी कोफ्ते आणि खुसखुशीत पराठे बनविले. जेवण झाल्यावर अभिनय हसून तिला ‘धन्यवाद’ म्हणाला तेव्हा अनन्याला खूपच छान वाटले होते.

या वेळेस तिला अशी अपेक्षा होती की, अभिनव बऱ्याच सूचना देऊन जाईल. जसे की, या वेळेस माझी जास्त आठवण काढत बसू नकोस… स्वत:साठी चांगले जेवण बनवून जेवत जा… रात्री उशिरापर्यंत जागू नकोस वगैरे वगैरे. पण अभिनव नेहमीप्रमाणे फक्त ‘निघतो’ एवढेच सांगून टॅक्सीत जाऊन बसला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मनात असे विचार चक्र सुरू असतानाच अनन्याचा डोळा लागला. त्यानंतर मोबाईलची रिंग वाजली आणि ती जागी झाली.

‘‘नुकतीच फ्लाईट लँड झाली आहे,’’ अभिनवचा फोन होता.

‘‘बरं… आता आणखी काही वेळ लागेल ना विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी? त्यानंतर ऑफिसच्या गेस्ट हाऊसला पोहोचण्यासाठी आणखी १ तास लागेल… तुम्ही ऑफिसमध्ये सांगून गाडीची व्यवस्था करून घेतली आहे ना? रात्री टॅक्सीने जाणे धोकादायक असते… स्वत:ची काळजी घ्या,’’ अनन्याला नेहमीप्रमाणेच अभिनवची काळजी वाटत होती. तिच्यापासून दूर गेलेल्या अभिनवशी बोलण्यासाठी ती काही ना काही बहाणा शोधत असे.

‘‘बरं ठीक आहे,’’ असे मोघम बोलत अभिनवने फोन कट केला.

अनन्याला रडू आले. ती विचार करू लागली की, अभिनव नक्कीच आणखी थोडा वेळ बोलू शकत होता… लग्नाला फक्त ६ महिने झाले आहेत, एवढयातच अभिनव मला कंटाळला आहे असे वाटते… दिव्याचे लग्नही आमच्या लग्नाच्या वेळेसच झाले होते. ते दोघे अजूनही प्रत्येक दिवस हनिमूनसारखाच मजेत घालवत आहेत. त्या दिवशी ती बाजारात नवऱ्याच्या हातात हात घालून मिरवत होती… आणि एक मी आहे जिला अभिनवला खुश ठेवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करावे लागत आहेत.

अंधार होऊ लागताच अनन्याला जणू निराशेच्या काळोखाने घेरले. या उदास करणाऱ्या विचारचक्रातून बाहेर पडण्यासाठी तिने व्हॉट्सअपवर जाऊन जुन्या मित्र-मैत्रिणींची चॅट उघडली.

‘‘अरे वा, उद्या सर्वांनी इंडिया गेटवर भेटायचे ठरविले आहे… कितीतरी दिवसांनी सर्व भेटणार आहेत… खूप मजेत जाणार उद्याचा दिवस,’’ असा विचार करून अनन्या आंनदी झाली.

‘‘मीही येणार,’’ असे लिहून ती उद्यासाठीच्या ड्रेसची निवड करण्यासाठी कपटाकडे गेली. ड्रेससोबत मॅचिंग दागिने काढून ते टेबलावर ठेवून आनंदाने झोपली.

सकाळी कामवाल्या बाईकडून लवकरात लवकर काम करून घेऊन आनंदाने निघण्याची तयारी करू लागली. करडया रंगाच्या पँटवर गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि रुबीचा चोकर घालून जेव्हा ती लिपस्टिक लावू लागली तेव्हा आरशात स्वत:चे सुंदर रूप पाहून स्वत:वरच खुश झाली. हसतच हातात बॅग घेऊन इंडिया गेटच्या दिशेने रवाना झाली.

तेथे पोहोचली तर संजना, मनिष, निवेदिता, सारांश आणि कार्तिक तिच्या आधीच आले होते.

‘‘हाय ब्यूटीफुल,’’ मनिष नेहमीप्रमाणेच तिला पाहून म्हणाला.

‘‘कोण म्हणेल की तुझे लग्न झाले आहे,’’ सारांश तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणाला.

तितक्यात कोणीतरी मागून येऊन अनन्याचे डोळे बंद केले.

‘‘साक्षी… ओळखले मी तुला,’’ साक्षीच्या हातांना आपल्या हातांनी बाजूला सारत आनंदाने अनन्या म्हणाली.

साक्षी डोळे विस्फारून अनन्याकडे पाहातच राहिली. ‘‘अरे, माझे तर लग्नाच्या २ महिन्यांनंतरच वजन वाढले… पण तू मात्र अजूनही जशीच्या तशी आहेस…’’

संजनाही लगेचच अनन्याचे कौतुक करत म्हणाली, ‘‘महाविद्यालयातही सर्वांच्या नजरा हिच्या सौंदर्यावर खिळून राहायच्या… संपूर्ण हॉस्टेलमध्ये उत्तराखंडमधून आलेल्या या मुलीचीच चर्चा होती… आम्ही सर्व तर हिला बाहुली म्हणायचो… किती सुंदर दिसतेस…’’

‘‘तुम्ही सर्व कोणत्याही नावाने हाक मारा, पण मी मात्र हिला चुनचून म्हणायचो आणि तेच म्हणणार…’’ संजनाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच नमन आला आणि नेहमीप्रमाणेच अनन्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लागला.

‘‘चुनचुन… हो, चुनचुन म्हणायचास तू तिला, पण हेच नाव का ठेवलेस तू या बाहुलीचे?’’ संजनाने उत्सुकतेने विचारले.

‘‘अगं, ते सुंदरसे गाणे आहे ना, चुनचुन करती आई चिडीया… आणि हीदेखील होती ना, छोटीशी चुनचुन करती चिडीया,’’ अनन्याचा गाल ओढत नमन म्हणाला.

‘‘हो…हो… प्रत्येक गोष्टीसाठी गाणे गाण्याची तुझी सवय माझ्या अजूनही लक्षात आहे… पण हे आजच समजले की, चुनचुन हे नावही तू गाण्यातूनच चोरले होतेस…’’ हसतच अनन्या नमनकडे पाहात म्हणाली. तितक्यात तिला स्वातीची आठवण झाली, जी अनन्याच्या या नावाला जळून तिला खूप चिडवत असे.

‘‘स्वाती अजून आली नाही… काल ग्रुपवर तर लिहिले होते की, नक्की येईन,‘‘ अनन्या म्हणाली.

‘‘अगं तिकडे बघ, ती आली… सोबत बहुतेक तिचा नवरा आहे,‘‘ दुरूनच स्वातीला येताना पाहून मनिष म्हणाला.

स्वातीने आल्यानंतर सर्वांची विचारपूस केली. ती नवऱ्याची ओळख करून देणारच होती मात्र त्याआधी तिचा नवराच स्वत:हून म्हणाला, ‘‘हिच्याशिवाय माझे मनच लागत नाही, म्हणून तिचा पदर धरून तिच्या मागोमाग आलो.’’

एकमेकांसोबत मौजमजा करण्यात मग्न झालेले सर्व मित्रमैत्रिणी अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच भासत होते. खाण्या-पिण्यात, आनंदाने गप्पागोष्टी करण्यात संपूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळ होऊ लागली तसे पुन्हा भेटायचे ठरवून सर्वजण आपापल्या घरी निघाले.

अनन्या घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. चहा बनवून चहासोबत दोन बिस्किटे खाऊन तिने व्हॉट्सअप सुरू केला. ग्रुपवर सर्व आपापल्या मोबाईलमधून काढलेले फोटो शेअर करीत होते. नमनने ग्रुपवर फोटो टाकण्यासोबतच अनन्याच्या नंबरवर तिला तिचा एक फोटो पाठवून त्याखाली एका गाण्याची ओळ लिहिली. ‘‘लडकी ब्यूटीफुल, कर गई चुल…’’

हे वाचून अनन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हिंदी चित्रपट आणि गाण्यांची आवड असलेल्या नमनला प्रत्येक गोष्टीसाठी चित्रपटातील संवाद आणि गीतांच्या ओळींचा वापर करण्याची सवय होती, हे अनन्याला चांगलेच माहीत होते.

नमन नेहमीच तिचे कौतुक करायचा. पण आज त्याने असे खोडसाळपणे वागून अनन्याच्या सुंदरतेचे केलेले कौतुक तिला खूपच आवडले होते. अभिनवने कधीच मोकळेपणाने तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली नव्हती.

तिने नमनचे आभार मानले तेव्हा त्याचे उत्तर आले, ‘‘मॅडम, मैत्रीत माफी आणि धन्यवादासाठी जागा नसते… ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमानने असे सांगितले आहे,’’ असे लिहिण्यासोबतच नमनने चुंबन घेत असल्याचा इमोजीही पाठवला.

‘‘हो… हो… मैत्री आहे ते मान्य, पण हा चुंबन घेतानाचा इमोजी कोणासाठी पाठवला आहेस?’’

‘‘तुझ्यासाठीच मैत्रिणी… जर मैत्रीण तुझ्याइतकी सुंदर असेल तर तिच्यावर जीव जडतोच.’’

प्रेमाच्या या गप्पा येथेच संपविण्याच्या हेतूने अनन्याने विषयांतर करीत लिहिले, ‘‘आणखी फोटो पाठव… तू आपल्या ग्रुपमधील सर्वात चांगला फोटोग्राफर आहेस… आज तू बरेच फोटो काढलेस.’’

नमनने भरपूर फोटो पाठवले. ते सर्व अनन्याचेच होते. अनन्याच्या मनाला हे सर्व आवडत होते, पण बुद्धी सतत आठवण करून देत होती की, एका विवाहित महिलेने परपुरुषाशी एवढया मोकळेपणाने बोलणे चांगले नाही.

हसणाऱ्या स्मायलीसह अनन्याने लिहिले, ‘‘अरे वा, माझे एवढे फोटो? उगाच वेळ का वाया घालवतोस तुझा? आता तुही लग्न कर… मग तुझी ती दिवसरात्र गाणे गात राहील, ‘तू काढ माझो फोटो प्रिया…’ आणि मग काढ तिचे भरपूर फोटो.’’

नमनचे उत्तर आले, ‘‘तुझ्यासारखी कोणी असेल तर सांग… करतो लग्न… ‘जगभर फिरलो, पण तुझ्यासारखे कोणीच नाही…’’’

अनन्याला नमचे हे बोलणे असे वाटले जसे तप्त वाळवंटात कोणीतरी पाण्याचा वर्षाव करीत आहे. अभिनवचे रुक्ष वागणे आणि सतत गप्प बसून राहण्याच्या स्वभावामुळे कंटाळलेल्या अनन्याला नमनचे प्रेमळ बोलणे खूपच भावले. ती आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती, पण ते तर तिच्या हातून निसटून चालले होते.

रात्री उशिरापर्यंत अनन्या नमनसोबत चॅटिंग करीत होती. तिने कितीही विषयांतर करण्याचा प्रयत्न केला तरी तो मात्र पुन्हा तिच्या सौंदर्याबाबतच बोलत होता. एकमेकांना ‘शुभ रात्री’ असे लिहून चॅटिंग बंद केल्यावर जेव्हा अनन्या झोपायला गेली तेव्हा नमनच्या रंगात रंगून ‘भागे रे मन कही…’ हे गाणे गुणगुणत स्वत:शीच हसली.

पुढचे २-३ दिवस नमन आणि अनन्याने भरपूर चॅटिंग केली. महाविद्यालयीन दिवसांची आठवण काढत नमनने तिला सांगितले की, एके दिवशी त्याच्या बालपणीचा एक मित्र महाविद्यालयात त्याला भेटायला आला होता. तेव्हा अनन्या आपली गर्लफ्रेंड असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते.

हे वाचल्यावर अनन्याला आश्चर्य वाटले. तिने हसणारे तीन इमोजी टाकले.

‘‘हे काय… तू कशाला हसतेस…? तू माझी गर्लफ्रेंड व्हावीस अशीच माझी इच्छा आहे… जीवन खूप सुंदर होऊन जाईल आपले.’’

‘‘अरे… अरे… असे काय बोलतोस? एका विवाहितेला मागणी घालतोस?’’

‘‘मी असे कुठे म्हटले की, तुझ्या नवऱ्यासोबतचे नाते तोडून तू मला गाणे ऐकवावेस की, ‘मेरे सयाजी से आज मैने ब्रेकअप कर लिया…’ माझी गर्लफ्रेंड हो एवढेच तर सांगत आहे.’’

‘‘महाविद्यालयात असताना असे का नाही विचारलेस मला?’’

‘‘बस… बस… अनन्या, अजून ऐकवू नकोस. उद्या महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी मी अहमदाबादला जाणार आहे… तेथून परत आल्यावर तुला जेवायला घेऊन जाईन. आणि हो, मी कधीच विनंती करीत नाही. फक्त एकदाच सांगतो आणि तेच सांगणे माझ्यासाठी पहिले आणि शेवटचे असते.’’

‘‘अरे वा, किती छान बोललास… ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खान… जेवायला जाणे पहिले आणि शेवटचे असेल तर उरलेल्या गप्पा तिथेच मारू,’’ अनन्याने लिहिले आणि त्यानंतर दोघांनी काही दिवसांसाठी एकमेकांचा निरोप घेतला.

नमन गेल्यानंतर काही दिवस अनन्याला एकटेपणा जाणवू लागला. फेसबूकवर मित्र-मैत्रिणींचे स्टेटस आणि त्यांचे फोटो पाहून त्यांना कमेंट देण्यात कसेबसे १-२ दिवस गेले. अखेर अभिनव परत येण्याचा दिवस उजाडला.

अभिनवने आल्यानंतर जे सांगितले ते ऐकून अनन्या आनंदी होण्यासोबतच उदासही झाली. अभिनवच्या कामावर खुश झाल्यामुळे वरिष्ठांनी त्याला बढती दिली होती. अभिनवने सांगितले की, १५ दिवसांच्या आतच त्यांना दिल्लीहून कायमचे हैदराबादला रहायला जावे लागेल.

नमनच्या मैत्रीमुळे खुललेली अनन्या निराश झाली, पण तिच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता. दुसऱ्याच दिवसापासून ती जाण्याची तयारी करू लागली.

हैदराबादला गेल्यानंतर अभिनव कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडल्यामुळे जास्तच व्यस्त झाला. अनन्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत नव्या घरातील सामानाची व्यवस्था लावण्यात थकून जात असे. कामवाली बाई रोजचे काम उरकायची पण इतर कामात अनन्या तिची मदत घेऊ शकत नव्हती. अनन्याला तेलुगू येत नव्हते आणि कामवाल्या बाईला हिंदी फारसे समजत नव्हते. त्यामुळे कोणत्या कामासाठी मदत हवी आहे, हे अनन्या तिला सांगू शकत नव्हती.

काही दिवसांनंतर अनन्याला अशक्तपणा जाणवू लागला. सतत झोप येऊ लागली. दुपारी जेव्हा ती एखादे पुस्तक वाचायला घ्यायची तेव्हा डोळयावरची झोप तिला एक शब्दही वाचू देत नसे. सकाळीही तिला उठायला उशीर होऊ लागला. सकाळचा फेरफटका मारायला जाणेही बंद झाले होते. झोप आणि सुस्तीपासून दूर राहण्यासाठी ती घरातले काही ना काही काम करत राहण्याचा प्रयत्न करायची, पण झोप तिच्यावर ताबा मिळवायचीच. स्वत:मध्ये होत असलेल्या या बदलांमुळे तिला काळजी वाटू लागली होती. फक्त जेव्हा कधी नमनसोबत चॅटिंग करायची तेवढयापुरतेच तिला थोडे प्रसन्न वाटायचे.

हैदराबादला येऊन ३ महिने झाले होते. त्या दिवशी दोघांना शेजारच्या मुलाच्या वाढदिवसाला जायचे होते. अनन्याने कपाटातून ड्रेस काढला, पण तो तिला खूपच घट्ट होऊ लागला. तिला वाटले की, धुतल्यामुळे ड्रेसचा कपडा आकसला असेल. त्यामुळे ३-४ आणखी ड्रेस काढून ते घालण्याचा प्रयत्न केला, पण कोणताच ड्रेस तिला होत नव्हता. येथे आल्यापासून घरातले काम वाढल्यामुळे ती सैल कुरता आणि गाऊनच घालत असे. त्यामुळे आपले वजन वाढत आहे, हे तिच्या लक्षात आले नाही.

त्यानंतर अनन्याने सकाळचा फेरफटका मारणे, व्यायाम करणे सुरू केले. तरीही वजन नियंत्रणात येत नव्हते, शिवाय प्रचंड थकवा जाणवू लागला होता. चेहराही निस्तेज झाला होता. जेव्हा तिला पाय सुजल्यासारखे वाटू लागले तेव्हा ती अभिनवसोबत डॉक्टरांकडे गेली.

डॉक्टरांनी तिला रक्ताची चाचणी करण्यास सांगितले. चाचणीचा अहवाल आल्यानंतर समजले की, अनन्याला हायपोथायरॉईडिज्म आहे. आपल्या गळयात असलेली थायरॉईड नावाची ग्रंथी जेव्हा जास्त सक्रियपणे काम करू शकत नाही तेव्हा हा आजार होतो. यामुळे शरीराला आवश्यक हार्मोन्स मिळू शकत नाहीत.

डॉक्टरांनी तिला दररोजसाठीची औषधे लिहून दिली आणि काही दिवसांनंतर पुन्हा रक्ताची चाचणी करण्यास सांगितले, जेणेकरून औषधांची योग्य मात्रा ठरवता येईल. सोबतच हेही सांगितले की, एकदा या ग्रंथी निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा सक्रिय होणे जवळपास अशक्य असते. पण सध्या तरी घाबरण्याचे कारण नाही.

काही दिवसांनंतर अभिनवला एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला जायचे होते. अनन्यानेही त्याच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या मित्र-मैत्रिणी, विशेष करून नमनला भेटण्याची ही चांगली संधी होती. नमन नेहमी अशी तक्रार करीत असे की, तो प्रशिक्षणावरून परत येण्याआधीच ती हैदराबादला निघून गेली. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही.

दिल्लीत आल्यावर ते एका हॉटेलमध्ये थांबले. तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिने आपल्या मित्र-मैत्रिणींना जेवणासाठी बोलवायचे ठरविले. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या हॉटेलचा पत्ता सर्वांना पाठवून तिने तेथेच जेवणाची व्यवस्था केली. आपल्या आवडीचा ड्रेस घालून अनन्या आतुरतेने मित्र-मैत्रिणींची वाट पाहू लागली.

मनिष सर्वात आधी आला. त्याला पाहून अनन्याला खूपच आनंद झाला. पण तिला पाहून चेहरा पाडून आणि डोळे बारीक करून मनिष म्हणाला, ‘‘अरे हे काय? तू… तू इतकी लठ्ठ? हे काय झाले?’’

अनन्याने उत्तर देण्याआधीच नमनही आला. त्यानंतर १-१ करून सर्व आले.

‘‘मी अनन्याला भेटत आहे की एखाद्या काकूबाईला… केवढी जाड झाली आहे… आळशासारखी पडून राहून भरपूर खात असतेस का संपूर्ण दिवस?’’ नमनने हसतच विचारले.

अनन्या रडवेली झाली. ‘‘अरे नाही. मी आळशी झालेली नाही. खूप खाते असेही काही नाही… हायपोथायरॉईडिज्मचा आजार झाला आहे मला… सांगितले तर होते नमन तुला, काही दिवसांपूर्वीच.’’

‘‘माझ्या वहिनीलाही हा आजार आहे, पण तू तर थोडी जास्तच…’’ हसू येणारे आपले गाल फुगवत आणि हातांनी जाड झाल्याचा हावभाव करीत स्वाती म्हणाली आणि मोठयाने हसली.

सर्वांच्या बोलण्यामुळे उदास झालेल्या अनन्याने जेवण मागवले. जेवतानाही मित्र-मैत्रिणी तिला ‘जाडे, आणखी किती खाशील,’ असे चिडवत होते. नमनही त्यांना साथ देत ‘बस… खूप खाल्लेस,’ असे म्हणून सतत तिची प्लेट बाजूला ठेवत होता. जेवण झाल्यानंतर अनन्या सर्वांना बाहेरपर्यंत सोडायला आली.

‘‘ओके… बाय चुनचुन… नाही टूणटूण…’’ असे नमनने म्हणताच सर्व मोठयाने हसले. अनन्याला खूपच वाईट वाटले. उदास होऊन ती हॉटेलच्या आपल्या खोलीत येऊन बसली.

घरी गेल्यानंतर नमनने तिला कुठलाच मेसेज केला नाही, शिवाय तिच्या एकाही मेसेजला उत्तरही दिले नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा अनन्याने त्याला फोन केला तेव्हा, ‘सध्या कामात खूपच व्यस्त आहे… वेळ मिळाला की स्वत:च फोन करेन,’ असे सांगून त्याने फोन कट केला.

अनन्या रोज वाट पाहात होती, पण नमनचा फोन किंवा मेसेज आलाच नाही. हैदराबादला परत जाण्याचा दिवसही जवळ येत चालला होता.

अनन्याने परत जाण्याच्या एक दिवस आधी नमनला रागावून मेसेज केला.

त्यावर नमनचे उत्तर आले. ‘एवढी का रागावली आहेस? तुझा राग पाहून मला ‘जवानीदिवानी’ चित्रपटातील एक गाणे आठवले… ‘खल गई, तुझे खल गई, मेरी बेपरवाही खल गई… तू कोणत्या दगडाची बनली आहेस ते तरी सांग?’ असे विचारत त्याने जीभ बाहेर काढून एक डोळा बंद केलेला इमोजी टाकला.

त्याचे हे उत्तर वाचून अनन्याला खूपच राग आला. एकेकाळी नमन माझ्या दिल्लीला येण्याची आतुरतेने वाट पाहात होता आणि आता बोलणे तर दूरच… सतत माझा अपमान करीत आहे. मी तर तीच आहे ना, जी पूर्वी होते… बाह्य सौंदर्य नमनसाठी जास्त महत्त्वाचे आहे का? त्याच्यासाठी अनन्या म्हणजे फक्त गोऱ्या रंगाची ५ फूट १ इंचाची सडपातळ मुलगी होती का…? आता ते रूप उरले नाही म्हणून अनन्या ही अनन्या राहिली नाही…

रात्री झोपण्यासाठी ती खाटेवर गेली आणि अभिनवच्या जवळ जात त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत गुपचूप पडून राहिली.

‘‘काय झाले? तब्येत तर बरी आहे ना तुझी? उद्या परत जाणार आहोत म्हणून कदाचित उदास आहेस,’’ तिच्या पाठीवर हात ठेवत अभिनव म्हणाला.

काही वेळ तशीच पडून राहिल्यानंतर अभिनवकडे पाहात अनन्या म्हणाली, ‘‘अभिनव, एक विचारू? मी इतकी लठ्ठ झाले आहे, हे तुला खटकत नाही का? चेहराही सुजलेला, बदलल्यासारखा वाटत आहे… तू तर एका सडपातळ, सुंदर, गोऱ्या मुलीशी लग्न केले होतेस, पण तीच मुलगी आता कशीतरीच झालीय.’’

‘‘हा… हा… अभिनव मोठयाने हसला. नंतर स्मितहास्य करून अनन्याकडे पाहात म्हणाला, ‘‘हे काय अनन्या, हा कसला प्रश्न आहे? हे खरे आहे की, तुला एक आजार झाला आहे आणि त्यात वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते… पण तूच सांग की, आपण जसे लग्नावेळी दिसायचो तसेच शेवटपर्यंत दिसू शकतो का? माझे केस गळू लागले आहेत. मला टक्कल पडले किंवा म्हातारपणी माझे दात पडले तर मीही खराब दिसू लागेन ना?’’

‘‘तुझे अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना?’’ अनन्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती.

अभिनव पुन्हा एकदा मोठयाने हसला. ‘‘अनन्या ऐक, तू इतकी समजूतदार आहेस की माझे मन कधी तुझ्याशी प्रेमाने जोडले गेले, हे माझे मलाही समजले नाही. तू माझी काळजी तर घेतेसच, शिवाय प्रत्येक गोष्ट मला सांगतेस. विनाकारण कधीच भांडत नाहीस… मी ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो तरीही मला समजून घेतेस.

‘‘पण याआधी तर तू असे कधीच सांगितले नव्हतेस.’’ अभिनवचे आपल्यावरील प्रेम पाहून भावनाविवश होत अनन्याने विचारले.

‘‘मी असाच आहे… मला बोलायला कमी आणि ऐकायला जास्त आवडते… अनन्या विश्वास ठेव, मला अगदी तुझ्यासारखीच जोडीदार हवी होती.‘‘

अनन्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

‘‘एक गोष्ट आणखी सांगेन… शरीराची काळजी घेणे आपल्या सर्वांसाठीच गरजेचे आहे, पण तनाच्या सुंदरतेने कधीच मनाच्या सुंदरतेचा ताबा घेता कामा नये… तू माझ्या मनात डोकावून तुझा चेहरा पाहशील तेव्हा तुला तोच सुंदर चेहरा दिसेल जो काल होता, आज आहे आणि उद्याही तसाच असेल…’’

‘‘बस, अभिनव… आता आणखी काहीच नकोय मला. कोणी मला काहीही म्हटले तरी आता मला त्याची पर्वा नाही… फक्त तुझ्या मनाच्या आरशात माझे प्रतिबिंब असेच चमकत राहो,’’ असा विचार करत अनन्या पाणावलेल्या डोळयांनी अभिनवच्या मिठीत शिरली. त्याच्या प्रेमात विरघळून तिला खूपच शांत, अगदी हलके झाल्यासारखे वाटत होते.

ती ९ मिनिटे

कथा * आरती प्रियदर्शिनी

‘‘निम्मो, संध्याकाळचे दिवे लावण्याची तयारी करून ठेव. लक्षात आहे ना, आज ५ एप्रिल आहे.’’ आत्येने आईला आठवण करून देत सांगितले.

‘‘अगं ताई, तयारी काय करायची? बाल्कनीत फक्त एक दिवा तर लावायचा आहे. शिवाय जर दिवा नसला तर मेणबत्ती, मोबाईलची फ्लॅश लाईट किंवा बॅटरी लावू.’’

‘‘अरे, तू गप्प बस.’’ असे म्हणत आत्येने वडिलांना गप्प केले.

‘‘मोदीजींनी दिवे लावा, असे उगाचच सांगितलेले नाही. आज संध्याकाळी ५ वाजल्यानंतर प्रदोष काळ सुरू होत आहे. अशा काळात रात्री तुपाचे खूप सारे दिवे लावले तर महादेव प्रसन्न होतात. शिवाय तुपाच्या दिव्यांमुळे आजूबाजूचे सर्व किटाणूही मरून जातात. माझ्या हातात असते तर मी नक्कीच १०८ दिव्यांच्या माळेने घर उजळवून टाकले असते आणि माझी देशभक्ती दाखवून दिली असती’’, आत्येने वायफळ बडबड करीत आपले दु:ख व्यक्त केले.

दिव्याने काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलेच होते, पण तेवढयात आईने तिला गप्प राहण्याची खूण केली. ती बिचारी आत्येच्या प्रश्नांची उत्तरे न देताच निमूटपणे गप्प बसली.

‘‘अहो ताई, हे घर तुमचे नाही का? तुम्ही तुम्हाला हवे तितके दिवे लावा. मी लगेचच सर्व सामान शोधून घेऊन येते,’’ आईच्या अशा समजूतदारपणाचा फायदा आत्ये वर्षानुवर्षे घेत आली आहे.

आत्ये वडिलांची मोठी बहीण असून विधवा आहे. तिला दोन मुले असून दोघांनीही वेगवेगळया शहरात स्वतंत्रपणे संसार थाटला आहे. आत्ये कधी एकाकडे तर कधी दुसऱ्या मुलाकडे जाऊन राहते. पण तिचा तापट स्वभाव सहन करीत शांतपणे राहणे केवळ आईलाच जमते. म्हणूनच ती वर्षातील ६ महिने आमच्याकडेच राहते. तसे तर यामुळे कोणाला काही विशेष त्रास होत नाही, कारण आई सर्व सांभाळून घेते. पण, आत्येच्या जुन्या, बुरसटलेल्या विचारसरणीचा मला खूपच राग येतो.

काही दिवसांपासून मला आईचाही खूप राग येत होता. आमच्या लग्नाला फक्त १५-२० दिवसच झाले होते. आत्येचे सतत घरात असणे आणि नोएडातील आमचा फ्लॅट छोटा असल्यामुळे मी आणि दिव्या मन भरून एकमेकांना भेटूही शकत नव्हतो.

कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आमचे लग्न कसेबसे उरकले होते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्यामुळे हनिमूनची तिकिटेही रद्द करावी लागली. आत्येला गाझियाबदला जायचे होते, परंतु, कोरोना मातेच्या भीतीने तिने आधीच स्वत:ला घरात बंद करून घेतले होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आणि २५ मार्चला पंतप्रधानांनी लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर कोरोनासारख्या महामारीला हरविण्यासाठी आपण सर्व आपापल्या घरात कैद झालो. सोबतच कैद झाल्या त्या माझ्या आणि दिव्याच्या त्या कोमल, प्रेमळ भावना, ज्या लग्नापूर्वी आम्ही एकमेकांच्या डोळयात पहिल्या होत्या.

दोन खोल्यांच्या छोटयाशा फ्लॅटमधील एक खोलीत आत्या आणि तिच्या अगणित देवांचा एकाधिकार होता. आईला तर ती नेहमीच स्वत:सोबत ठेवत असे. दुसरी खोली माझी आणि दिव्याची आहे. पण, आता मी आणि वडील या खोलीत झोपतो, तर दिव्या हॉलमध्ये, कारण वडिलांना दम्याचा त्रास असल्यामुळे ते एकटे झोपू शकत नाहीत. आत्ये घरात असताना आई कधीच वडिलांसोबत झोपत नाही, कारण असे झाले तर आत्येची तिरस्काराने पाहणारी नजर जणू, तिला जाळून भस्म करून टाकेल. कदाचित हेच सर्व पाहून दिव्याही माझ्यापासून लांबच राहते, कारण आत्येची नजर सतत तिच्यावरही असते.

‘‘बाळा, जमल्यास बाजारातून मेणबत्त्या घेऊन ये,’’ आईचा आवाज ऐकताच मी माझ्या विचारचक्रातून बाहेर पडलो.

‘‘हे काय आई, तुही या सर्व गोष्टींमध्ये कशाला अडकतेस? दिवे लावून वेळ निभावून ने. सतत बाहेर जाणे चांगले नाही. नुकत्याच झालेल्या जनता कर्फ्यूवेळी टाळया, थाळया वाजवून मन भरले नाही का, ज्यामुळे आता दिवे आणि मेणबत्त्या लावणार आहात,’’ मी नाराजीच्या स्वरात आईला विचारले सोबतच बाजारात जाण्यासाठी मास्क आणि ग्लोव्हज घालू लागलो, कारण मला माहीत होते की आई ऐकणार नाही.

कसेबसे कोरोना योद्धयांच्या दंडुक्यांपासून स्वत:ला वाचवत मेणबत्त्या आणि दिवे घेऊन आलो. हे सर्व लावण्यासाठी रात्री ९ वाजण्याची वाट पाहावी लागणार होती. परंतु, माझ्या डोक्यात तर त्याआधीच प्रकाश पडला. प्रेमाने आतूर झालेल्या मनाला शांत करणारी कल्पना सुचली. लगेचच मोबाईल काढला आणि व्हॉट्सअॅपवर दिव्याला मी केलेले नियोजन समजावून सांगितले, कारण आजकाल आमच्या दोघांमध्ये केवळ व्हॉट्सअॅपवरच गप्पा होत असत. ‘‘मी जसे सांगतो तसेच कर, बाकी सर्व मी सांभाळून घेईन. पण हो, तू काही गडबड करू नकोस. तू माझी साथ दिलीस तरच ती ९ मिनिटे कायम आठवणीत राहतील.’’

‘‘बरं… मी पाहाते,’’ दिव्याच्या या उत्तरामुळे मला आंनद झाला आणि मी त्या ९ मिनिटांच्या नियोजनाबाबत विचार करू लागलो. रात्रीचे पावणे नऊ वाजताच आईने मला सांगितले की, घरातील विजेचे सर्व दिवे बंद कर. सर्वांनी बाल्कनीत या. मी स्पष्टपणे सांगितले की, ‘‘आई, हे सर्व तुम्हीच करा. मला ऑफिसचे खूप काम आहे. त्यामुळे मी येणार नाही.’’

‘‘यांना राहू द्या आई, चला मी येते,’’ आधीच ठरल्याप्रमाणे दिव्याने आईचा हात धरून तिला खोलीतून बाहेर नेले. आई आणि आत्येसोबत तिने २१ दिवे लावण्याची तयारी केली. आत्येचे असे म्हणणे होते की, २१ दिवसांच्या लॉकडाऊनसाठी २१ दिवे उपयोगी पडतील.

‘‘आई, मी सर्व दिव्यांमध्ये तेल घातले आहे. मेणबत्ती आणि काडेपेटीही इकडेच ठेवली आहे. तुम्ही दिवे लावा, तोपर्यंत मी घरातले सर्व दिवे बंद करून येते.’’ दिव्याने पूर्वनियोजनानुसार सांगितले.

घरात येऊन ती दिवे बंद करू लागली, त्याचवेळी मी दिव्याच्या कमरेत हात घालून तिला आमच्या खोलीत ओढले. दिव्यानेही तिच्या हातांची माळ माझ्या गळयात घातली.

‘‘अरे वा, तू तर आपले नियोजन पूर्णत्वास नेलेस.’’ मी दिव्याच्या कानात पुटपुटलो.

‘‘ते तर मी करणारच होते. तुझे प्रेम आणि सहवासासाठी मीही आतूर झाले होते.’’ दिव्याच्या या मादक आवाजामुळे माझ्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या.

‘‘फक्त ९ मिनिटे आहेत आपल्याकडे…’’ दिव्या आणखी काही बोलण्याआधीच मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले. प्रेमाची जी ठिणगी आमच्या दोघांच्याही मनात धगधगत होती तिने आता आगीचे रूप धारण केले होते. वाढलेल्या आमच्या श्वासांदरम्यान ९ मिनिटांची कधी १५ मिनिटे झाली, हे समजलेच नाही.

जोरजोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून आम्ही भानावर आलो.

‘‘अरे बाळा, झोपलास का? जरा बाहेर ये… येऊन बघ दिवाळीसारखे वातावरण झाले आहे,’’ आईचा आवाज ऐकताच मी स्वत:ला सावरत दरवाजा उघडला. तोपर्यंत दिव्या बाथरूममध्ये गेली.

‘‘द… दिव्या इकडे आली नाही. ती तुमच्या सोबतच असेल,’’ मी गोंधळलेल्या स्वरात म्हणालो आणि आईचा हात पकडून बाहेर आलो.

बाहेरचे वातावरण खरोखरच दिवाळीसारखे भासत होते. तेवढयात दिव्याही स्वत:ला सावरून बाल्कनीत आली.

‘‘तू कुठे गेली होतीस दिव्या? मी आणि आई तुला कधीपासून शोधत होतो,’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘मी गच्चीत गेले होते, दिव्यांचा हा उत्सव पाहण्यासाठी,’’ दिव्याने माझ्याकडे एकटक पाहात सांगितले. त्याचवेळी मी खोडकरपणे हसून, काळोखाचा फायदा घेत आणि आत्येपासून नजर चोरत हाताने दिव्याला फ्लाईंग किस केले.

मारून टाकले या महागाईने

मिश्किली * दीपा पांडे

‘‘अरे मित्रा, तोंड पाडून का बसला आहेस? जा, मजा कर. तुझी प्रियतमा लवकरच तुझी जीवनसाथी होणार आहे. बघ, किती छान नशीब आहे तुझे,’’ रमेश जेव्हा मूडमध्ये असायचा तेव्हा लखनवी अंदाजात बोलायचा.

विजय उदास होऊन म्हणाला, ‘‘अजून तुझे लग्न ठरलेले नाही. म्हणूनच तू माझे दु:ख समजू शकत नाहीस.’’

‘‘म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला? मला खरेच काही समजले नाही. मी तर असेच ऐकले होते की, प्रेम विवाह फिक्स करताना तोंडचे पाणी पळते. पण तुझा तर महिनाभरानंतर साखरपुडा आणि पुढच्या ६ महिन्यांत लग्न आहे…’’

तेवढयात विजयच्या मोबाईलवर मेसेज आला, ‘‘फ्री आहेस का?’’ विजय आपले बोलणे अर्धवट थांबवत उठून उभा राहिला.

विजय आणि रश्मी कॉलेजपासून एकमेकांना पसंत करीत होते. हे सर्व बीटेकच्या पहिल्या वर्षांपासूनच मित्रमैत्रिणींच्या लक्षात आले होते. त्या दोघांनीही हे लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विजय ब्राह्मण, तर रश्मी वैश्य कुटुंबातील होती. फेअरवेल पार्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणींनी गंमत म्हणून त्यांचे खोटे लग्नही लावून दिले होते.

विजयने सर्वात आधी रश्मीची पोस्ट आणि तिच्या पगाराबाबत आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर तिची जात सांगितली. त्याची ही युक्ती कामाला आली. रश्मीचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता.

विजयचे वडील म्हणाले, ‘‘सध्या जातीपातीहूनही मोठी महागाई झाली आहे. हे चांगले आहे की, रश्मीचा पगार तसा बऱ्यापैकी आहे. बंगळुरुसारख्या महागडया शहरात तुम्हाला चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता यावा यासाठी दोघांनी मिळून कमाविणे खूपच गरजेचे आहे. पण, तुझा प्रेम विवाह आहे. त्यामुळे आम्ही हुंडा मागू शकत नाही. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक असा निर्णय घेतला आहे की, तुम्ही दोघांनी स्वत:च्या लग्नाचा खर्च स्वत:च करावा.’’

तिकडे रश्मीच्या आईनेही फोनवरून लगेचच निर्णय देऊन टाकला की, ‘‘जातीपातीबाहेर तुझे लग्न लावून देऊ, पण तुझ्या छोटया बहिणींच्या लग्नात हेच लोक जास्त हुंडा मागतील. म्हणूनच तू तुझ्या लग्नाचा खर्च स्वत: कर… ३-४ वर्षांची सेव्हिंग तुझ्याकडेच आहे. आम्ही तुझ्याकडून कधीच काही घेतले नाही.’’

त्यानंतर फोन ठेवून रश्मीच्या वडिलांना सांगितले की, ‘‘हुंडा द्यायचा असेल तर मग लव मॅरेजचा फायदा काय… मी स्पष्टपणे नकार दिला आहे… आपल्या मर्जीने लग्न करायचे असेल तर स्वत: खर्च कर. सुशिक्षित, कमावत्या मुलीला आपल्या जातीपातीच्या बाहेर देत आहोत… सर्व टोमणे तर आपल्यालाच ऐकावे लागणार. शिवाय आपलीच तिजोरी रिकामी करायची, हे नाही जमणार.’’

दोन्ही कुटुंब लग्नाचा खर्च करायला तयार नव्हते. विजय आणि रश्मी स्वत:च्या कामातून थोडासा वेळ काढून लग्नाच्या खर्चाचे नियोजन करू लागले होते. विजय कॉफीच्या मशीनमधून २ कप कॉफी घेऊन मागे वळला. तिथे रश्मी उभी होती.

‘‘साखरपुडयाचे ठिकाण ठरवलेस का?’’ कॉफीचा कप हातात घेत रश्मीने विचारले.

‘‘लखनऊमधील सर्वच हॉटेल्स खूपच महागडी आहेत. त्यातल्या त्यात ७०० ते १००० रुपयांपर्यंत जेवणाचे ताट असलेली थोडी बरी हॉटेल्स आहेत. पण वरून डीजे आणि सजावटीचा खर्च… म्हणजे आणखी १५ ते २० हजार गृहीत धर,’’ विजयने सांगितले.

‘‘दोन्हीकडचे पाहुणे मिळून शंभर, सव्वाशे होतील,’’ रश्मी विचार करीत म्हणाली.

‘‘आमच्या पाहुण्यांना तर टिळक लावून लग्नाची मिठाईही द्यावी लागेल,’’ असे विजयने सांगताच रश्मीने तोंड वाकडे केले, ते पाहून विजयला हसू आले.

‘‘आपल्या दोघांचे कपडे? तेही खरेदी करावे लागतील,’’ रश्मी म्हणाली.

‘‘काय घालणार? लेहंगा, गाऊन की साडी?’’ विजयने विचारले. ‘‘मलाही त्यानुसारच कपडे शिवावे लागतील.’’

‘‘असे करते की, एखादा इंडो-वेस्टर्न ड्रेस खरेदी करते आणि तू सूट घाल… नंतर इतरांच्या लग्नातही घालता येईल,’’ रश्मीने सांगितले.

विजय चिडला, ‘‘सर्व बचत माझ्या कपडयांमध्येच का? तुझा इंडो-वेस्टर्न ड्रेस कधी कामाला येणार? त्यापेक्षा असे कर, तू साडी नेस. तिचा ट्रेंड वर्षानुवर्षवर्षे असतो.’’

हे ऐकून रश्मीने तिचा कप ट्रेमध्ये ठेवला आणि मागे वळून न बघताच निघून गेली. विजयही आपल्या जागेवर जाऊन बसला.

२ दिवस दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. पुढाकार विजयलाच घ्यावा लागला. शनिवारी सकाळी बराच विचार करून त्याने फोन लावला, ‘‘हॅलो रश्मी, आज शॉपिंगला जाऊया का?’’

‘‘कसली शॉपिंग?’’

‘‘अगं, अजून नाराज आहेस का? मला माफ कर, लग्नात तुला जे हवे ते घाल.’’

‘‘सांगतो तर असे आहेस जसे की, पैशांचा पाऊसच पडणार आहे… मी माझ्या काही मैत्रिणींना विचारले तर, कुणाचा १५ हजारांचा ड्रेस होता तर कोणाचा ५० हजारांचा. ड्रेससोबत इतर खर्च धरला तर साखरपुडयाचाच खर्च ४ लाखांपेक्षा कमी होणार नाही.’’

‘‘खरे आहे… सोनेही प्रती तोळा ४० हजारांच्या आसपास गेले आहे… अंगठीही खूप महाग झाली आहे,’’ विजय हताश होऊन म्हणाला.

‘‘मी स्वप्न पाहिले होते की, साखरपुडयाला मी प्लॅटिनमची हिरेजडित कपल रिंग घईन… एक महागडा इंडो-वेस्टर्न ड्रेस घालेन, पण नशीबच वाईट आहे. मेकअप, फोटोग्राफरचा खर्च विचारलास का?’’

‘‘याचा तर मी विचारच केला नव्हता.’’

‘‘२ दिवसांपासून झोपला होतास का? मी सर्व माहिती काढली आहे. महागडे जाऊ दे पण, स्वस्तात स्वस्त फोटोग्राफरही ५० हजारांपेक्षा कमी घेत नाहीत. मेकअपवाली ब्रायडलसाठी २० हजार आणि साखरपुडयाच्या दिवसासाठी १० हजार मागत आहे.’’

‘‘काय?’’ एखाद्या विंचवाने नांगी मारावी तसे काहीसे ओरडतच विजयने विचारले, ‘‘बरं झालं तू आठवण करून दिलीस. बँडबाजाचाही खर्च करावा लागेल ना?’’

‘‘त्याचीही माहिती घेतली आहे. आतषबाजी आणि घोडा नसेल तर १८ हजार लागतील.’’ रश्मीने सांगितले.

‘‘मग तर तू संपूर्ण बजेट काढले असशील. ग्रेट रश्मी,’’ विजय कौतुकाने म्हणाला.

‘‘हो, आपण आपल्या बजेटनुसार साखरपुडा किंवा लग्न यापैकी काहीतरी एकच धुमधडाक्यात करू शकतो.’’

असे करूया, सध्या साखरपुडा उरकून घेऊ. त्यानंतर सोबतच राहू, म्हणजे जेवण, घरभाडे अशी बरीच बचत होईल. जेव्हा १०-१२ लाख जमतील तेव्हा लग्न करू.’’

‘‘अरे वा, काय प्लॅनिंग आहे,’’ रश्मी उपरोधिकपणे म्हणाली. ‘‘जरा तुझ्या कट्टरपंथी आईवडिलांना याबाबत विचारून मग मला सांग.’’

‘‘तर मग तूच सांग, काय करूया? आपल्या दोघांचे मिळूनही ११ लाखांपेक्षा जास्त पैसे नाही,’’ विजय उदासपणे म्हणाला.

‘‘साखरपुडा नकोच, पुढच्या महिन्यात सरळ लग्न करूया… सोबत राहिलो तर थोडी फार बचत होईल… मी हनिमूनला परदेशात जाण्यासाठी काही पैसे बाजूला काढून ठेवले होते… हनिमून तर दूरची गोष्ट, इथे लग्नाचा खर्च करणेही अवघड जात आहे.’’

‘‘मी तर एका आलिशान गाडीचे स्वप्न पाहिले होते… ठरविले होते की, लग्नानंतर तुला सरप्राईज देईन… बँकेतून थोडे कर्ज घेईन… आता सर्वच स्वप्नांचा चुराडा झाला.’’

‘‘असे कर, तू मला २ वाजता शॉपिंग मॉलमध्ये भेट. काहीतरी प्लॅन करूया,’’ रश्मीने असे सांगताच विजयने होकार दिला.

शॉपिंग मॉलमध्ये त्यांना रमेश भेटला. तिघेही फूड कोर्टमध्ये जाऊन बसले. दोघांना शांतपणे बसलेले पाहून त्यांची मस्करी करीत रमेश म्हणाला, ‘‘अरे मित्रांनो, तुमच्या जीवनात असे काय घडले आहे, म्हणून दु:खात आहात?’’

‘‘अरे, आमचे कुटुंबीय लग्नासाठी तर तयार आहेत, पण खर्च करण्यासाठी तयार नाहीत. आमची इतकीही बचत नाही की, धुमधडाक्यात लग्न करता येईल.’’

विजयचे बोलणे ऐकल्यावर रमेश काहीसा विचार करीत म्हणाला, ‘‘खरेच आहे, कांदे १२० रुपये किलो, लसूण २०० रुपये किलो आहे. तरी बरे की, तुमच्या लग्नात नॉनव्हेज नसेल नाहीतर काहीच खरे नव्हते. खर्च वाढला असता… तू तुझ्या घरातून रश्मीच्या घरापर्यंत वरात घेऊन जा… हॉटेलचा विचारच करू नकोस. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न पौर्णिमा किंवा एकादशीला कर.’’

‘‘असे का?’’ दोघांनी एकत्र विचारले.

‘‘अरे, या दिवशी लसूण, कांद्याशिवायचे जेवण बनवता येईल. तुमची ८-१० हजारांची बचत होईल. लोकही खुश होतील की, आमचा उपवास लक्षात घेऊन जेवण बनविले.’’

‘‘ठीक आहे, पण हॉटेल, जेवणाव्यतिरिक्त इतर अनेक खर्च आहेत, त्याचे काय?’’ रश्मीने विचारले.

‘‘लग्नाचे दागिने आणि कपडे भाडयाने घ्या. फक्त मेकअप आणि फोटोग्राफर जर बरा असायला हवा… नंतर फक्त फोटोच तर राहतात.

विजय बराच वेळ विचार करीत असल्याचे पाहून रमेश म्हणाला, ‘‘आता काय झाले? तुझी चिंता तर मिटली ना?’’

‘‘सर्व पैसे लग्नातच खर्च होऊन जातील… आमच्या नवीन संसारासाठीचे सामान कुठून येणार? नवीन घराचे भाडे, करार, असे कितीतरी खर्च कसे करणार?’’ विजयने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘तर मग असे करा, कोर्टात लग्न करा आणि वाचलेल्या पैशांतून नव्या संसाराची सुरुवात करा,’’ रमेशने उपाय सुचवला.

‘‘पण मग माझ्या स्वप्नांचे काय? मेहंदी, साखरपुडा, लग्नातील विधी, मौजमजेचे काय?’’ रश्मीने नाराजीच्या स्वरात विचारले.

विजय त्रासून म्हणाला, ‘‘आता काय करायचे ते तूच सांग? मारून टाकले आपल्याला या महागाईने…?

प्रेमाला पूर्णविराम

कथा * इंजी आशा शर्मा

‘‘कशी आहेस पुन्नू?’’ मोबाईलवर आलेला एसएमएस वाचून पूर्णिमाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या.

‘मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल? अजय तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? शिवाय त्याला १० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली असेल? आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीच संपले आहे,’ मनात आलेल्या विचारांना थांबवत पूर्णिमाने तो नंबर ट्रुकॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला. तो अजयच होता. पूर्णिमाने त्या एसएमएसला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला.

अजय तिचा भूतकाळ होता… महाविद्यालयीन दिवसांत त्यांच्या प्रेमाला बहर आला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण त्याच्या प्रेमात एकाधिकारशाही अधिक होती. अजयचे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातील पूर्णिमाला स्वत:चा खूपच अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर मिळल्यामुळे तिला आभाळही ठेंगणे वाटू लागले होते. पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेडयांप्रमाणे वाटू लागले. त्याच्या प्रेमाच्या पाशात अडकलेल्या पूर्णिमाचा श्वास कोंडू लागला.

अजयला कुठलीही व्यक्ती पूर्णिमाच्या जवळ साधी उभी जरी राहिली तरी आवडत नसे. पूर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि पूर्णिमाने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. कित्येक दिवस अजय रुसून बसायचा.

पूर्णिमा त्याच्या मागे-पुढे फिरायची. समजूत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची… मी तुझीच आहे असे शपथ घेऊन सांगायची… स्वत:ची काहीही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पूर्णिमा सुटकेचा नि:श्वास टाकायची. मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा.

महाविद्यालयात अनेक मित्र होते, बरेच कार्यक्रम व्हायचे. अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे. पण असे घडताच तो पूर्णिमाशी बोलणे बंद करायचा. मग काय, ती पुन्हा एकदा त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करायची.

हळूहळू पूर्णिमाच्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे भीतीने घर केले. इतर कुणाशीही बोलताना ती घाबरून जायची. तिचे सर्व लक्ष याकडेच असायचे की, अजय आपल्याला असे बोलताना पाहात तर नाही ना… जर अजयने बघितलेच तर मी काय उत्तर देऊ… त्याची समजूत कशी काढू… त्याला काहीही कारण सांगितले तरी त्याचे समाधान होणार नाही… माझ्या मनात इतर कुणाबद्दल काहीच नाही, याचा मी त्याला काय पुरावा देणार इत्यादी.

अखेर महाविद्यालयातील शेवटचे वर्ष संपायला आले असताना तिने अजयसोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. तिला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की, तिच्या या निर्णयामुळे अजय खूपच दु:खी होईल. पण हेही नाकारता येत नव्हते की, जर यावेळी ती भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात तिच्या प्रेमाची नाव अजयच्या संशयी स्वभावाच्या वादळात अडकून बुडून जाईल. हे कोणाच्याच भल्याचे नसेल, अजयच्याही नाही आणि स्वत: पूर्णिमाच्याही नाही.

पूर्णिमाने काळजावर दगड ठेवून तिच्या वडिलांच्या पसंतीचा मुलगा रवीशी लग्न केले. आता या जुन्या शहराशी तिचे नाते केवळ सुट्टीच्या दिवसांत माहेरी येण्यापुरतेच राहिले होते. अजयही नोकरीसाठी शहर सोडून गेला आहे, हे तिला तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींकडून समजले होते. मागील १० वर्षांत आयुष्य बदलून गेले. पूर्णिमा २ मुलांची आई झाली. खासगी महाविद्यालयात शिकवत होती. वेळ पंख लावून कधी उडून गेली हे, रवी, मुले आणि संसारात मग्न झालेल्या पूर्णिमाला समजलेदेखील नाही. पण आज अचानक अजयच्या आलेल्या या एसएमएसमुळे ती घाबरून गेली. काळाची जी तप्त राख आता थंड झाली आहे असे तिला वाटत होते त्यात अजूनही एखादी ठिणगी जळत होती. तिचा थोडासा बेजबाबदारपणाही या ठिणगीचा भडका उडवेल आणि आगीच्या या भडक्यात न जाणो कितीतरी जणांच्या आशा-अपेक्षा जळून खाक होतील, याची जाणीव पूर्णिमाला झाली.

पुढील ३-४ दिवस अजयकडून कुठलाच एसएमएस आला नाही. तरीही पूर्णिमा अजयकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता, त्यामुळेच त्याच्या डोक्यात कटकारस्थान शिजत असल्याचे ती समजून गेली होती. अजय शांत बसणाऱ्यांपैकी मुळीच नव्हता.

आज नेमके तेच घडले ज्याची पूर्णिमाला भीती होती. तासिका संपवून ती कॉमन रूममध्ये बसली होती आणि तेवढयातच तिचा मोबाईल वाजला. फोन अजयचा होता. तिने घाबरतच तो उचलला.

‘‘कशी आहेस पुन्ना?’’ अजयचा आवाज थरथरत होता.

‘‘माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही,’’ पूर्णिमाने अनोळखी असल्याप्रमाणे उत्तर दिले.

‘‘मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही… तू मला कशी विसरू शकतेस पुन्नू?’’ अजयने भावूक होत विचारले.

पूर्णिमा काहीच बोलली नाही.

‘‘मी अजय बोलत आहे… १० वर्षे लोटली… पण एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तूझी आठवण आली नसेल… आणि तू मला विसरलीस? पण हो, एक गोष्ट नक्की… तू अजूनही तशीच दिसतेस… अगदी महाविद्यालयीन तरुणी… काय करणार? फेसबूकवर तुला बघून कशीबशी मनाची समजूत काढतो…’’

अजय मनाला वाटेल तसे बोलत होता, दुसरीकडे पूर्णिमाला काय करावे तेच सूचत नव्हते. आपल्या सुखी भविष्यावर संकटाचे ढग आल्याचे तिला स्पष्ट दिसत होते.

अजयचे फोन कॉल्स आणि एसएमएसची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अधूनमधून व्हॉट्सअपवरही मेसेज येऊ लागले. पूर्णिमा त्याला ब्लॉक करू शकत होती, पण तिला माहीत होते की, प्रेमभंग झाल्यामुळे जखमी झालेला प्रियकर सापासारखा असतो… त्यामुळेच ती कठोरपणे वागली तरी रागाच्या भरात अजय न जाणो कोणते पाऊल उचलेल जे तिच्यासाठी धोकादायक ठरेल, याची तिला भीती होती. पण हो, ती त्याच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देत नव्हती. स्वत:हून त्याला फोनही करत नव्हती. पण अजयचा फोन उचलत होती, जेणेकरून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार नाही.

अजयच्या बोलण्याकडे ती विशेष लक्ष देत नव्हती. फक्त हा, हू म्हणत फोन कट करायची. अजयनेच बोलण्याच्या ओघात तिला सांगितले होते की, ज्या दिवशी पूर्णिमाचे लग्न झाले त्याच दिवशी त्याने झोपेच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. २ वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता. त्यानंतर कसेबसे त्याने स्वत:ला सावरले. आईवडिलांच्या आग्रहामुळे विभाशी लग्न केले, पण पूर्णिमाला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता. विभा त्याची खूप काळजी घेत असे. आता तोही २ मुलांचा बाबा झाला होता, काही दिवसांपूर्वीच त्याची बदली या शहरात झाली इत्यादी…

अजयचे या शहरात असणे पूर्णिमासाठी त्रासदायक ठरत होते. ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघायची तेव्हा अनेकदा एखाद्या रस्त्यावर आतूर प्रियकर बनून अजय उभा असल्याचे पाहायची. १-२ वेळा तिचा पाठलाग करत तो महाविद्यालयापर्यंत आला होता. ती सतत याच काळजीत होती की, अजयने काहीही चुकीचे वागू नये, ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल.

‘‘पुन्नू तुला २० एप्रिल आठवतोय?’’ आपली पहिली भेट… अजयने उत्साहाने पूर्णिमाला फोनवर विचारले.

‘‘आठवत तर नव्हता, पण आता तूच आठवण करून दिलीस,’’ पूर्णिमाने शांतपणे सांगितले.

‘‘ऐक २० एप्रिल जवळ येत आहे… मला तुला एकटीला भेटायचे आहे… कृपा करून नाही म्हणू नकोस… अजयने विनंतीच्या स्वरात सांगितले.

‘‘अजय, मला शक्य होणार नाही… हे शहर छोटे आहे… आपल्याला कोणी एकत्र पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल,’’ पूर्णिमाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

‘‘इथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे चल, पण नक्की भेट पुन्नू. तुझ्या मनात आले तर काहीच अशक्य नाही… जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या महाविद्यालयासमोर उभा राहीन,’’ अजय हट्ट सोडायला तयार नव्हता.

‘‘अजय, अजून २० एप्रिल यायला बराच वेळ आहे… मी आताच कुठलेही आश्वासन देऊ शकत नाही… शक्य झाल्यास बघू,’’ असे सांगून तिने विषय टाळला.

पण अजय सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. तो दर दोन दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून २० एप्रिलला भेटण्यासाठी पूर्णिमावर मानसिक दबाव आणत होता.

१५ एप्रिलला अचानक पूर्णिमाला महाविद्यालयीन प्रशासनाकडून सूचना सांगण्यात आले की, तिला एनसीसी कॅडेट्सला घेऊन प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे आहे. १९ ते २५ एप्रिलपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या शिबिरासाठी महाविद्यालयातील मुलींना घेऊन तिला १८ एप्रिलला दिल्लीला जायचे होते. अजयला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल पूर्णिमाने नियतीचे मनोमन आभार मानले आणि नंतर गाणे गुणगुणत दिल्लीला जायची तयारी करू लागली.

‘‘आपण भेटणार आहोत ना २० एप्रिलला?’’ अजयने १७ तारखेला तिला व्हॉट्सअप मेसेज केला.

‘‘मी २० तारखेला शहराबाहेर आहे,’’ पूर्णिमाने पहिल्यांदाच अजयच्या मेसेजला उत्तर दिले.

‘‘कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस… काहीही करून तुझे जाणे रद्द कर… फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक… त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही,’’ अजयने रडक्या इमोजीसह मेसेज पाठवला.

यावेळी मात्र पूर्णिमाने कुठलेच उत्तर दिले नाही.

‘‘कुठे जाणार आहेस, एवढे तर सांगू शकतेस ना?’’ अजयने पुन्हा मेसेज केला.

‘‘दिल्ली.’’

‘‘मीही येऊ?’’ अजयने मेसेज करून विचारले.

‘‘तुझी मर्जी… या देशाच्या प्रत्येक नागरिकाला कुठेही येण्या-जाण्याचा अधिकार आहे,’’ असे टाईप करून त्याच्यासह दोन स्मायली टाकून तिने मेसेज केला.

‘‘तर मग २० एप्रिलला मीही दिल्लीला येत आहे,’’ अजयने लिहिले.

पूर्णिमाला असे वाटले की, एकतर तो दिल्लीला येणार नाही आणि आला तरी चांगलेच होईल… कदाचित तिथे एकांतात त्याला सत्याचा आरसा दाखवून वर्तमानकाळात आणता येईल… वेडा, अजूनही १० वर्षांपूर्वीच्या काळात अडकला आहे.

पूर्णिमा आपल्या ग्रुपसह १९ एप्रिलला सकाळी दिल्लीत पोहोचली. शिबिरात मुलींच्या राहण्याची व्यवस्था इतर ग्रुपच्या मुलींसोबत तर ग्रुपसोबत आलेल्या लीडर्सची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती. चहा-नाश्ता आणि जेवणासाठी एकच हॉल होता, जिथे नियोजित वेळेनुसार सर्वांना हजर राहायचे होते.

नाश्ता झाल्यावर मुली शिबिरात रमल्या तर पूर्णिमा आपल्या खोलीत येऊन खाटेवर पहुडली. बऱ्याच वर्षांनंतर तिला असा निवांतपणा मिळाला होता. तिला झोप आली. ती उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहा पिण्यासाठी ती हॉलच्या दिशेने निघाली.

तितक्यात तिचा फोन वाजला, ‘‘मी इकडे आलो आहे… तू दिल्लीत कुठे थांबली आहेस?’’

‘‘अजय, तुझे इकडे येणे शक्य नाही… तू उगाचच त्रास करून घेत आहेस,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला टाळण्याचा प्रयत्न केला.

‘‘मला तुझ्याकडे येणे शक्य नसेल, पण तू तर माझ्याकडे येऊ शकतेस ना… मी माझा पत्ता पाठवतोय… उद्या तुझी वाट पाहीन,’’ असे सांगून अजयने फोन कट केला. त्यानंतर थोडयाच वेळात पूर्णिमाच्या फोनवर अजयच्या हॉटेलचा पत्ता आला.

२० तारखेच्या सकाळी जेव्हा मुली शिबिरात सराव करीत होत्या तेव्हा पूर्णिमा कॅब करून अजयने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली. रिसेप्शनला अजयच्या रूमबद्दल विचारले व त्याला मेसेज पाठवला. अजयने तिला रूमवरच बोलावले.

दरवाजा उघडाच होता, पण आत खूपच अंधार होता. पूर्णिमाने आत पाऊल टाकताच सर्व लाईट एकदम सुरू झाल्या. अजय तिच्यासमोर लाल गुलाबांचा गुलदस्ता घेऊन उभा होता.

‘‘हॅप्पी अॅनिव्हर्सरी,’’ असे म्हणत त्याने तिला फुले दिली.

ती घ्यावीत की नाहीत, हेच पूर्णिमाला समजत नव्हते. तरीही शिष्टाचार म्हणून तिने ती घेतली व बाजूच्या टेबलवर ठेवून ती सोफ्यावर बसली. काही वेळ तेथे शांतता होती.

‘‘असे म्हणतात की, एखाद्यावर मनापासून प्रेम असेल तर संपूर्ण सृष्टीच तुमची आणि त्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागते,’’

चित्रपटातील या संवादाची आठवण करून देत अजयने शांततेचा भंग केला.

‘‘अजय, तुला काय हवे आहे? स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस? जर वादळ उठले तर खूप काही नेस्तनाबूत होऊन जाईल,’’ पूर्णिमाने पुन्हा एकदा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

‘‘कृपा कर, आज कुठलाही उपदेश नको… कितीतरी प्रयत्नांनंतर तुला असे जवळून पाहता, बोलता येत आहे… मला याचा आनंद घेऊ दे,’’ अजय तिच्या खूपच जवळ गेला होता.

त्याच्या अधीर झालेल्या श्वासांची जाणीव पूर्णिमाच्या गालांना झाली. त्यामुळे ती गोंधळून त्याच्यापासून थोडी दूर गेली.

अजयच्या हे लक्षात आले. त्यामुळे तो दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला. मग जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले…

अनेक जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या… कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पटलावर आले आणि निघून गेले… कधी दोघे मनमोकळेपणाने हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले… थोडयाच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले.

२ वेळा कॉफी घेतल्यानंतर पूर्णिमा म्हणाली, ‘‘भूक लागली आहे… जेवणाची सोय करणार नाहीस का?’’

‘‘येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया?’’ अजयने विचारले. त्यानंतर पूर्णिमाच्या इच्छेनुसार त्याने रूममध्येच जेवण मागविले. जेवणानंतर पुन्हा गप्पा… गप्पा… आणि खूप साऱ्या गप्पा…

‘‘बरं अजय, आता मी निघते… तुला भेटून खूप छान वाटले. अशी आशा करते की, यापुढे तू माझ्यासाठी स्वत:ला त्रास करून घेणार नाहीस,’’ पूर्णिमाने घडयाळ बघितले. संध्याकाळ होत आली होती.

‘‘एकदा गळाभेट नाही घेणार?’’ अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. न जाणो काय होते त्याच्या डोळयात ज्यामुळे पूर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली.

अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. त्यानंतर अलगद आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला. नंतर तिचे तोंड स्वत:कडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या प्रेमात पूर्णिमा विरघळत चालली होती. अजयने तिला उचलून बिछान्यावर आणले..

तेवढयात तिचा मोबाईल वाजला आणि पूर्णिमा जणू झोपेतून जागी झाली. अजयने पुन्हा तिला स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आता पूर्णिमा भानावर आली होती. तिने फोन उचलला. तो रवीचा होता. पूर्णिमा आपल्या आतूर श्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती येथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले.

‘‘अजय, मी तुझा हट्ट पूर्ण केला. आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस, माझे म्हणणे ऐकशील ना?’’ पूर्णिमाने अजयचा हात स्वत:च्या हातात घेत त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली.

जवळपास २ महिने झाले… अजयने एकही फोन, मेसेज न केल्याने पूर्णिमा निश्चिंत झाली होती. पण तिचा हा आंनद जास्त दिवस टिकू शकला नाही. अजय पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला. कधी पूर्णिमाच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभा राहायचा तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर… कधी एसएमएस करायचा तर कधी व्हॉटट्सअप मेसेज… आता पूर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती. पण हो, या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. तरीही ती मनातल्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती, कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत. अशा वेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल, याची तिला भीती होती.

काहीतरी करावेच लागेल… पण काय? रवीला सर्व सत्य सांगू का? नाही नाही, पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कुणी तिच्यावर प्रेम करीत आहे, हे त्याला कसे सहन होणार… तर मग काय करू? अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का? नको, असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही… तर मग नेमके करू तरी काय? पूर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची.

पुढच्या महिन्यात पूर्णिमाचा वाढदिवस होता. अजय पुन्हा एकदा शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला. पूर्णिमा त्याच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नव्हती. मात्र अजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. कधीकधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की, पूर्णिमाच्या मनात असो किंवा नसो… तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच.

ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली. ते अजयच्या एका सहकर्मचाऱ्याचे घर होते, जे तो भाडयाने द्यायचा. मात्र भाडेकरू न मिळाल्यामुळे सध्या घर रिकामेच होते. अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाडयाने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती.

जसे पूर्णिमाला वाटत होते त्याचप्रमाणे अजयने केक, फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती. टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती. पूर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

आज ती पूर्णपणे सावध होती. भावनात्मक रुपात तिच्यावर वर्चस्व गाजविण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही. काहीवेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पूर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला. त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाने मात्र प्रतिसाद दिला नाही.

थोडया वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. ‘‘विभा तुझ्यावर खूप प्रेम करते ना अजय?’’

‘‘हो, करते,’’ अजयच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले.

‘‘कधी तू तिला विचारले आहेस का की, लग्नापूर्वी तिचे कोणा दुसऱ्यावर प्रेम होते का ते?’’ पूर्णिमाने विचारले.

‘‘नाही… नाही विचारले आणि मला ते माहिती करून घ्यायचे नाही, कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो,’’ अजयने अगदी शांत स्वरात उत्तर दिले.

‘‘जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असेल तर?’’ पूर्णिमाने रागाची ठिणगी उडवणारा प्रश्न विचारला.

‘‘नाही, विभा चरित्रहीन असूच शकत नाही… ती माझ्याशी कधीच बेईमानी करू शकत नाही,’’ अजय रागाने लालबुंद झाला होता.

‘‘अरे वा अजय, जर विभाने तिचा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडलेस तर ते प्रेम… कशी दुहेरी मानसिकता आहे ना… मानली तुझी विचारसरणी,’’ पूर्णिमा उपहासाने म्हणाली.

अजयला काय उत्तर द्यावे तेच सुचले नाही. तो विचारात पडला.

‘‘अजय, जसा विचार तू करतोस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबाबत करीत असतो… कदाचित रवीही… त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटतेय का?’’ पूर्णिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

‘‘नाही, कधीच नाही. मला माफ कर पुन्नू… तुला गमाविणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ते यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो… हे विसरून गेलो होतो की, माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे,’’ अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता.

‘‘हो ना, जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असशील तर तुला त्या प्रेमाची शपथ… यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस… या नात्याला आता येथेच पूर्णविराम दे,’’ पूर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयच्या समोर ठेवला. अजयने तो घट्ट पकडला.

पूर्णिमाने शेवटचे अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यानंतर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाजाच्या दिशेने पुढे गेली.

रविवारची एक संध्याकाळ

कथा * रमा अवस्थी

संध्याकाळ होत आली होती. पर्वताच्या मार्गावर संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. शैलेन गाडीत बसून विचार करीत होता की, कुठे मुंबईतील गर्दी आणि कुठे ही डोंगरांमधील शुद्ध हवा. आज कितीतरी वर्षांनंतर तो आपल्या घरी आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला होता. त्याचे घर कुर्ग येथे होते. कुर्ग निसर्ग सौंदर्य आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बहीण इरा, जी त्याची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती ती अमेरिकेहून आली होती. जास्त करून त्याचे आईवडिल त्याच्यासोबत मुंबईत राहत, कारण आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या शैलेनकडे वेळ नव्हता. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. परंतु यावेळी इरा आली होती आणि तिला यावेळेस आपला वेळ कुर्गमध्ये घालवायचा होता. तिला भेटण्यासाठी आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शैलेन ३ दिवसांसाठी आपल्या घरी निघाला होता. मायसोरच्या पुढे असलेली तांदळाची शेती आणि स्वच्छ, सुंदर गावांना मागे टाकत त्याची गाडी पुढे निघाली होती. त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नयनरम्य होता.

सहजच शैलेनला आठवण झाली की, इराला तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटून त्यांच्यासह शाळेत जाण्याची इच्छा आहे. यावेळेस तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती. इरा आणि तिच्या सर्व मैत्रिणी एकाच शाळेत शिकल्या होत्या. त्यांना पुन्हा एकत्र मिळून शाळेत जायचे होते आणि खूप वर्षांनंतर अखेर ती संधी मिळाली होती.

‘‘मला, बरेच झाले,’’ शैलेनने मनातल्या मनात विचार केला. तोही त्याच शाळेत शिकला होता. इरा आणि तिच्या मैत्रिणींपेक्षा तो ३ वर्षांनी मोठा होता. भाऊबहीण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी तर होतेच, पण सोबतच सर्व गुपिते एकमेकांना सांगत असत. एकमेकांची रहस्ये सर्वांपासून लपवून ठेवत. याची आठवण होताच शैलेनला हसू आले. त्याला इराच्या मैत्रिणी आठवल्या. त्या सर्व इराप्रमाणेच खोडकर होत्या. अनेकदा तो इराच्या मैत्रिणींना सोडायला त्यांच्या घरी जात असे. त्याने इराच्या बऱ्याच मैत्रीणींना सायकल चालवायला शिकविली होती.

या वेळेस तो इराला विचारणार होता की, तिच्या सर्व खोडकर मैत्रिणी कुठे आहेत व कशा आहेत? तसे तर फेसबूक आणि व्हॉट्सअपमुळे सर्व एकमेकांच्या संपर्कात होत्या. शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे आठवू लागले. हे चेहरे आणि नावे त्याच्या आयुष्यासाठी विशेष महत्त्वाची नव्हती, पण या सर्वांसोबत त्याच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. शैलेनला आठवले की, जेव्हा त्याचे लग्न मुंबईत होणार, असे पक्के झाले होते तेव्हा इराच्या सर्व मैत्रिणी खूपच निराश झाल्या होत्या. त्या सर्वांना त्याच्या लग्नात सहभागी व्हायचे होते, कारण त्यांच्यासाठी भरपूर मजा करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नव्हती. नंतर जेव्हा रिसेप्शन कुर्गमध्ये होणार, असे ठरले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला.

गाडी कॉफीच्या बागांमधून पुढे चालली होती आणि शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आठवू लागली होती. या चेहऱ्यांमधील एक वेगळा चेहराही होता ज्याची आठवण होताच शैलेनचा जीवनातील उत्साह अधिकच वाढल्यासारखे वाटायचे. तो चेहरा वेदाचा होता. वेदा ही इराच्या खास मैत्रिणींपैकी एक होती. वेदात असे वैशिष्ट्य होते की, ती तिच्या चेहऱ्यावरील खोडकरपणाला निरागसतेत सहज बदलू शकत होती. तसा तर शैलेन इराच्या सर्व मैत्रिणींना भेटत असे. पण एका रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले की, त्यानंतर त्याला वेदाला भेटताना अवघडल्यासारखे वाटू लागले होते.

शैलेन वेदाला शेवटचे भेटला त्या गोष्टीलाही आता १६ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ती शैलेनच्या रिसेप्शनलाही येऊ शकली नव्हती. त्या रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले होते की, जे आजही शैलेनला जगण्याची प्रेरणा देत असे. तसे तर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी जे काही हवे ते सर्व त्याच्याकडे होते, पण तरीही रविवारची ती संध्याकाळ नसती तर सर्व अधुरे राहिले असते. १६ वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेस चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र लिहिली जायची. त्या रविवारच्या संध्याकाळी अशीच एक चिठ्ठी शैलेनला मिळाली होती. त्या चिठ्ठीत त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक मदतीसाठी (सायकल शिकविणे, गृहपाठासाठी मदत करणे इत्यादी) धन्यवाद देण्यासह शेवटी असे लिहिले होते की, शैलेनने त्या रात्री ८ वाजता फोनची वाट पाहा. पत्राच्या शेवटी वेदाचे नाव लिहिले होते.

शैलेन ती चिठ्ठी हातात घेऊन तिथेच बसून राहिला. तसे तर त्या चिठ्ठीत त्याच्यावर प्रेम असल्याबाबत कुठलाच उल्लेख उघडपणे केलेला नव्हता, पण चिठ्ठी लिहिणारी मुलगी वेदाच होती, हे स्पष्ट झाले होते. तिला तो आवडत असे. पहिल्या आणि कदाचित शेवटच्या वेळेस असे घडले होते की, एखाद्या मुलीने त्याचे कौतुक केले होते. महानगरांमध्ये आणि त्याच्या परदेशातील प्रवासात अनेक महिला मैत्रिणींनी आणि महिला सहकर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते, पण त्या सर्वंमध्ये नाटकीपणा जास्त होता. ही चिठ्ठी आणि त्यातील भावना शैलेनला दवबिंदूच्या थेंबाप्रमाणे सुखावह वाटत असे.

त्या काळात भावनांमध्ये खरेपणाची ऊब होती, आजच्याप्रमाणे त्या वरवरच्या, थंड नव्हत्या. आजही ती चिठ्ठी शैलेनने जपून ठेवली होती. जेव्हा कधी शैलेनला ती चिठ्ठी आणि त्यात लिहिलेले शब्द आठवायचे तेव्हा त्याचा थकवा बऱ्याच अंशी निघून जायचा.

तो त्या रविवारच्या संध्याकाळी फोनची वाट पाहत होता. पण वेदाने ८ वाजताची चुकीची वेळ निवडली होती. रविवारच्या रात्री शैलेनचे वडील सर्वांसोबत जेवत आणि फोनही त्याच खोलीत होता. वेदा फोन करण्यासाठी वेगळा एखादा दिवस निवडू शकत होती.

शैलेन रात्रीचे ८ वाजण्याची वाट पाहात होता. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे फोन आला आणि तोही ८ वाजताच. फोन वडिलांनी घेतला. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तेच फोन घ्यायचे. पण फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही. पुढचे काही दिवस शैलेनने वेदाचा विचार करण्यात घालवले. त्यानंतर तो वेदाला भेटला, पण तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की, तो तिला चिठ्ठीबाबत विचारू शकला असता. त्यानंतर हळूळू सर्व आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

शैलेन मुंबईला आला. इरा अमेरिकेला आणि वेदा बंगळुरुला गेली. त्यानंतर असे ऐकायला मिळाले होते की, वेदाचे लग्न बंगळुरुलाच झाले होते. पण शैलेन ती चिठ्ठी विसरू शकला नाही. आजही रविवरचीच संध्याकाळ होती आणि शैलेन आपल्या घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता. आता त्याची गाडी वळणदार रस्यावरून घराच्या दिशेने निघाली होती. अचानक मोबाईल वाजला. इराने फोन केला होता.

‘‘आणखी किती वेळ लागेल?’’ इराने उतावीळपणे विचारले.

‘‘बस आणखी अर्धा तास… कॉफी तयार ठेव… मी पोहोचतोच आहे,’’ शैलेनने उत्तर दिले.

तेवढयात इराने विचारले, ‘‘ओळख कोण आहे माझ्यासोबत?’’

तिने अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे शैलेन गोंधळला. कोण असेल बरं?

तितक्यात इरा म्हणाली, ‘‘अरे माझी सर्वात प्रिय मैत्रीण वेदा.’’

शैलेनचे हृदय धडधडू लागले. त्याला पुन्हा एकदा ती चिठ्ठी आणि रविवारची संध्याकाळ आठवली. तो स्वत:शीच हसला. वेदा आली होती, या गोष्टीचा त्याला आनंद झाला. संध्याकाळ गडद होत चालली होती. शैलेन घरी पोहोचला. तेथे पोहोचताच आईवडिलांच्या पाया पडला.

तेवढयात मागून आवाज आला, ‘‘हॅलो, कसा आहेस?’’

शैलेनने मागे वळून पाहिले असता वेदा समोर उभी होती.

‘‘हॅलो वेदा, कशी आहेस?’’

शैलेनने तिच्याकडे पाहात हसत विचारले.

‘‘मजेत,’’ वेदाने उत्तर दिले.

शैलेनने पाहिले की, वेदात फारसा बदल झाला नव्हता. तेच डोळे, तसाच चेहरा, तोच निरागसपणा आणि या सर्वांमागे तोच खोडकर स्वभाव. काही औपचारिक गोष्टी आणि एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केली. शैलेन मनोमन विचार करू लागला की, वेदा रविवारची ती संध्याकाळ विसरली असेल का? तसे पाहायला गेल्यास आठवणीत ठेवण्यासारखे होते तरी काय? एका चिठ्ठीचा विसर पडणे सोपे होते. पण शेवटी काहीही झाले तरी ती चिठ्ठी वेदाने स्वत:च्या हाताने लिहिली होती. स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीला ती कशी काय विसरली? तसेही आजच्या फेसबूकच्या युगात एका छोटयाशा चिठ्ठीचे महत्त्व तरी कितीसे असणार? पण त्या काळात चिठ्ठीमुळेच दोन हृदये जोडली जात होती.

त्या चिठ्ठीने शैलेनला एक जाणीव करून दिली होती. कोणाला तरी आपण आवडत असल्याची सुखद जाणीव.

ही जाणीव जीवनात अत्यावश्यक असलेल्या हवा आणि पाण्याइतकी महत्त्वाची नसली तरी तिचे असणे जीवन आणखी सुंदर बनविते. पण आश्चर्य म्हणजे वेदाला हे काहीच आठवत नव्हते. वेदा आणि शैलेन, दोघेही आपापल्या आयुष्यात गर्क होते, हे खरे असले तरी भूतकाळात जगलेल्या काही क्षणांची आठवण नव्याने जागी करायला काहीच हरकत नव्हती. म्हणूनच वेदाने ज्या भावना एके दिवशी पत्राच्या रुपात शब्दबद्ध केल्या होत्या त्या भावना शैलेनच्या नसतानाही त्याला आठवत होत्या, पण असे वाटत होते की, वेदा विसरून गेली होती.

शैलेनला या सर्वांची जाणीव होताच अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. रात्रीचे १० वाजले होते. तो बाल्कनीत बसला होता. तेवढयात इरा कॉफी घेऊन आली. शैलेन तसे तर इरापासून काहीच लपवित नसे, पण न जाणो कोणता विचार करून वेदाच्या चिठ्ठीबाबत त्याने इराला काहीच सांगितले नव्हते. आज अनेक वर्षांनंतर शैलेनला असे वाटू लागले की, वेदाच्या चिठ्ठीबद्दल इराला सांगायला हवे. इरा तेथेच बसून कॉफी पीत होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहात होती.

‘‘वेदा कुठे कामाला जाते का?’’ शैलेनने विषयाला हात घातला.

‘‘हो’’, मोघम उत्तर देऊन इरा पुन्हा मोबाईल पाहू लागली.

‘‘कुठे?’’ शैलेनने विचारले.

‘‘तिचे बंगळुरूमध्ये एनजीओ आहे.’’ इराचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते.

शैलेन पुढे बोलण्यासाठी उगाचच गळा खाकरत म्हणाला, ‘‘तुला माहीत आहे का, वेदाने मला एक चिठ्ठी लिहिली होती. खूप आधी, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिकत होता. मी त्या चिठ्ठीला कोणतेच उत्तर दिले नव्हते.’’

आता मात्र इराने मोबाईल बाजूला सारत भावाकडे पाहिले. ‘‘कोणती चिठ्ठी, तीच का, जी छोटूच्या हातून पाठविण्यात आली होती?’’ इराने हसून विचारले.

‘‘हो, हो, तीच… तुला माहीत आहे का?’’ शैलेनला इराने त्या चिठ्ठीचा विषय हसण्यावारी घेतल्याचा राग आला होता. तो सोडून त्या चिठ्ठीशी जोडले गेलेले इतर सर्वच ही गोष्ट एवढी हसण्यावारी का घेत होते?

‘‘ती चिठ्ठी वेदाने लिहिली नव्हती. मधू आणि चंदाने लिहिली होती,’’ इराने जांभई देत सांगितले.

‘‘याचा अर्थ काय? मधू आणि चंदाने लिहिली होती, कशासाठी?’’ शैलेनने विचारले. मधू आणि चंदाही इराच्या मैत्रिणी होत्या आणि त्याही खूपच खोडकर होत्या.

शैलेनने विचारलेला प्रश्न ऐकून इरा हसू लागली. ‘‘अरे भावा, तू विसरून गेलास का? तो दिवस एप्रिल फूलचा होता.’’

मधू आणि चंदाचा चेहरा शैलेनच्या डोळयांसमोर आला.

‘‘पण चिठ्ठीखाली नाव वेदाचे होते.’’ शैलेनने सांगितले.

‘‘आता कोणाचे तरी नाव लिहावेच लागणार होते, त्यामुळे वेदाचे नाव लिहिले,’’ इराने उत्तर दिले.

‘‘वेदाला ही गोष्ट माहिती होती का?’’ शैलेनने आश्चर्यचकित होत विचारले.

‘‘कोणती गोष्ट? चिठ्ठीची का? सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण नंतर त्यांनी मला आणि वेदाला सांगितले होते की, त्यांनी १ एप्रिल असल्याने तुला वेदाच्या नावाने मूर्ख बनवले होते,’’ इराने आळसावत सांगितले.

‘‘पण त्यांनी वेदाचे नाव लिहायला नको होते,’’ शैलेन पुटपुटला.

‘‘हो, लिहायला तर नको होते, पण त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांना माहीत होते की, तू एक सज्जन मुलगा आहेस,’’ डोळयांवर प्रचंड झोप असतानाही इराने उत्तर दिले.

शैलेन मनोनम हसत असा विचार करू लागला की, तो १ एप्रिल संपूर्ण १६ वर्षे साजरा झाला, असे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. पण काही का असेना, भलेही तो त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न असला तरी त्या घटनेने त्याच्या जीवनातील आनंदात भर घातली होती. अजाणतेपणी का होईना, पण त्या मुलींनी असे काही केले होते ज्यामुळे शैलेनच्या जीवनातील आनंद वाढला होता.

यंग फॉर एव्हर थेरेपी

मिश्किली * नरेश कुमार

पहाटे कूस बदलून हात लांबवला तर उशी हातात आली. याचा अर्थ सौ. सकाळीच उठली होती. दिवसाची सुरूवात रोमँटित झाली म्हणजे छान वाटतं. सौ. कुठं असेल असा विचार करत असतानाच स्वयंपाकघरातून खमंग वास आला. मी स्वयंपाकघरात आलो. सौ. ओट्यावर गरमागरम पराठे करत होती. मी मागून जाऊन तिच्या गळ्यात हात टाकले. तशी मला झिडकारत ती म्हणाली, ‘‘पुरे हो, मुलांना उठवा. शाळा आहे त्यांना. म्हातारपणी कसला रोमांस करताय.’’

मीही अजूनही त्याच मूडमध्ये होतो. मी बोलून गेलो, ‘‘अगं म्हातारपण शरीराचं असतं. तू म्हातारी शरीरानं झाली आहेस. पण मनात तरूण राहा ना. ओ मेरी जोहराजबी, तुझे मालम नहीं…तू अभी तक है हसीन और मैं, जवान…अगं. यंग फॉर एव्हर थेरेपी करून तर बघ.’’

‘‘तर तर? तुम्ही आहात सदाबहार तरूण आणि रोमँटिक…मी तर झालेच ना म्हातारी, अन् सौंदर्यही गेलं लयाला. संसाराचा रामरगाड्यात पिचतेय मी. तरूण आणि सुंदर कशी राहणार होते? अन् ही कुठली थेरेपी काढली आहे? रोमँटिक बनायची की तरूण दिसायची?’’

‘‘अगं, हा फॉर्मुला ट्राय करून बघ. एकदम बार्बी डॉलसारखी सुंदर अन् आकर्षक दिसायला लागशील,’’ मी तिला मिठीत घेत म्हटलं.

तेवढ्यात मुलं उठून स्वयंपाकघरात आली. आम्हाला तशा अवस्शेत बघून गोंधळली. मीसुद्धा सौ.ला सोडून बाथरूममध्ये गीझर ऑन करायला धावलो.

बायकांना, कुणी मावशी किंवा म्हातारी म्हटलेलं अजिबात खपत नाही. चुकून रिक्षावाल्यानं किंवा भाजीवाल्यानं असा उल्लेख केला तर त्याची धडगत नसते. पण सौ.ने स्वत:च, स्वत:चा उल्लेख म्हातारी असा केला, तेव्हा मात्र मला खूपच आश्चर्य वाटलं. तिला दिलासा द्यावा म्हणून मी म्हटलं, ‘‘तू फॉरएव्हर यंग दिसलं पाहिजे. म्हणजे वय वाढलं तरी ते तिथंच थांबलंय असं वाटलं पाहिजे. मग बघ, तूसुद्धा रोमँटिक गाणी गायला लागशील.’’

‘‘पण आता वाढलेलं वय कमी कसं दिसणार? घरातली कामं संपली तर ना इतर काही करता येईल? तुम्ही तर मला सतत स्वयंपाकघरातच अडकवून ठेवलंत. लग्नाला पंधरा वर्षं होताहेत अन् मी पन्नाशीची दिसायला लागलेय. शरीर बघा केवढं थुलथुलीत झालंय…’’ वाढलेला पोटाचा घेर दाखवत सौ. म्हणाली.

मी बोलून गेलो, ‘‘थोडं वॉकिंग, जॉगिंग, एक्सरसाइज वगैरे करून आपली फिगर मेंटेन केली पाहिजे. स्वत:च्या आरोग्याचा विचार कर राणी. बघ कशी छान गोजिरवाण्या बाहुलीसारखी दिसायला लागशील. मी तर म्हणतो आजपासूनच आपण सुरू करूयात यंग फॉरएव्हरचं युद्ध!’’

मी काय म्हणतोय ते सौ.च्या मेंदूत कितपत शिरलं मला समजलं नाही, पण तिला एवढं मात्र पक्क समजलं की तिला ‘बुढि़या’ नाही, ‘गुडि़या’ दिसायचं आहे. अगदी बार्बी डॉलसारखी सुंदर. मग त्यासाठी कितीही श्रम करायची, कष्ट करायची तिची तयारी होती.

दुसऱ्या दिवशीपासून तिनं मेकअपपासून एरोबिक्स, योगासनं, आहार अन् इतर अनेक विषयांवरचं इतकं साहित्य वाचायला सुरूवात केली की सांगता सोय नाही. इतका अभ्यास कॉलेजच्या वयात केला असता तर नुसती डिग्रीच नाही, पीएचडीपण मिळाली असती.

सौ.नं. अगदी सीरियसली गुडिया दिसण्याचं मनावर घेतलं होतं. ती रोज सकाळी लवकर उठून जॉगिंगला जायला लागली. जाताना आम्हाला सूचनावजा ताकीद द्यायची, ‘‘गॅसवर कुकरमध्ये डाळ शिजतेय. दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करा, मुलांना उठवून दूध द्या, नाश्ता द्या.’’

मी मुलांना उठवतोय तेवढ्यात दोनच्या ऐवजी चार पाच शिट्या होऊन जायच्या. मुलांना अंघोळी घालतोय तोवर दुध उतू जायचं. वरणाला फोडणी घालेपर्यंत भाजी करपायची. कसं बसं सगळं मॅनेज केलं तर मुलांना उशीर व्हायचा. मग त्यांना शाळेत सोडून यावं लागायचं.

सौ.च्या रोज नव्या मागण्या सुरू झाल्या. मोसंबीचा रस, बदाम, अक्रोड, भिजवलेले हिरवे मुग…एकूण पौष्टिक पण वजन न वाढवणारा आहार करायचा.

एक दिवस जॉगिंग करून आल्या आल्या तिनं फर्मान काढलं, ‘‘या कपड्यांमध्ये योगासनं करता येत नाहीत. टॅ्रकसूट घ्यावा लागेल…शिवाय जॉगिंग शूजही हवेत. शूज अन् टॅ्रकसूटचा खर्च काही हजारांत गेला. पण दुसऱ्यादिवशी सूटबूट घालून जाताजाता प्रेमानं एवढं बजावलं, तेवढं बदाम भिजवायला अन् हिरवे मूग मोडवायला विसरू नकां हं! अन् पालकचं सूप तयार ठेवाल ना?’’

मी हो किंवा नाही म्हणायच्या आत ती घराबोहर पडलीही होती. पण एक मात्र खरं, टॅ्रक सूटमध्ये एकदम स्मार्ट दिसत होती सौ. आज रविवार होता. मुलांना शाळेत पाठवण्याची भानगड नव्हती. म्हटलं आपणही जरा बागेत जाऊन येऊयात. बघूयात तरी सौ.चा फॉर्मुला काय आहे तो…मी बदाम भिजवले. मूग फडक्यात बांधले, पालकचं सूप तयार करून ठेवलं अन् पार्कात गेलो.

तिथलं दृश्य बघून माझा जळफळाट झाला. एक हलकट म्हातारा (योगा टीचर होता तो) सौ.ला योगासनं शिकवण्याच्या निमित्तानं कधी तिचे हात धरत होता, कधी शीर्षासन करताना पाय धरून तोल सांभाळत होता. ते बघून माझा अगदी कोळसा झाला. पण काय करणार? त्यांना डिस्टर्ब न करता गुपचुप घरी आलो.

थोड्याच वेळात तो म्हातारा धावत धावत घराकडे येताना दिसला. पुढे पुढे सौ. धावत होती. घरात आल्यावर माझ्याशी ओळख करून देत म्हणाली, ‘‘हे आमचे व्यायाम शिकवणारे शिक्षक आहेत. योगासनं फार छान करतात.’’ मनातल्या मनात मी करवादलो, ‘बघितलंय मघाच, योगासनं शिकवण्याच्या निमित्तानं कुठं कुठं, कसे कसे स्पर्श करतोय, बुड्ढा.’ रागीट चेहऱ्यानंच मी त्याच्याशी हात मिळवला.

सौ.नं विचारलं, ‘‘नाश्ता…?’’ मी भिजवलेले बदाम अन् ओले हरभरे समोर ठेवले.

‘‘खा रे योग्या.’’ मनातच पुन्हा मी त्याच्यावर डाफरलो.

पण त्यांनी ‘‘नको’’ म्हटलं. तोंडात दातच नव्हते काय खाणार?

तो गेला तसा मी बायकोवर राग काढला, ‘‘‘यंग फॉरएव्हर’ व्हायला म्हटलं होतं. फास्ट फारॅवर्ड व्हायला नव्हतं म्हटलं. तू तर त्या म्हाताऱ्यासोबत योग करायला निघालीस. तो म्हातारा काही तरूण होणार नाहीए. आपल्या रोमांसचे मात्र बारा वाजतील…’’

माझा संताप सुरूच होता. पण सौ. पाय आपटत आत निघून गेलीय. तिही रागावली होती. मग तिचा राग घालवायची युक्ती मला शोधावी लागली.

पण एक खरं, सौ. दिवसें दिवस खरंच तरूण दिसायला लागली होती. (मी मात्र स्वयंपाकघर अन् घरातली इतर तंत्र सांभाळत फार म्हातारा होऊ लागलो होतो.) त्या म्हाताऱ्या योगा टीचरचा तर असा राग यायचा. पण तो राग व्यक्तही करता येत नव्हता.

दिवसभर ऑफिसातून दमून भागून यायचं, जाण्यापूर्वी अन् आल्यावर स्वयंपाक. मुलांचं सगळं. बायकोचा डाएट वगैरे आटोपून थकलेला मी रात्री जरा रोमांसच्या मूडमध्ये आलो की बायको मला दूर ढकलून म्हणायची, ‘‘झोपू द्या ना, सकाळी लवकर उठायचं, बुढियाची गुडिया व्हायला हवंय ना मी तुम्हाला? तुमच्यासाठी केवढा त्रास सोसतेय बघा!’’

मी मुकाट्यानं सगळा रोमांस विसरून कूस बदलून झोपी जायचो.

त्या दिवशी ऑफिसातून निघाल्यापासून सौ.च्या फोनची वाट बघत होतो. पूर्वी तर लगेच तिचा फोन असायचा. ‘‘किती वेळात पोहोचताय? चहा ठेवू ना? की थोड्या वेळानं ठेवू?’’

मला थोडी काळजी वाटू लागली, तेवढ्यात फोन वाजलाच. मी आनंदाने सौ. फोनवर हुकुम देत होती. ‘‘घरी पोहोचल्यावर आधी डाळ कुकरला लावा. दोन भाज्या ओट्यावर धुवून ठेवलेल्या आहेत, तेवढ्या चिरून फोडणीला घाला. मी जिममध्ये आहे. आजच सुरू केलंय जिम. घरी पोहोचायला उशीर लागेल.’’

मला स्वत:चाच राग आला. सकाळी, योग, जॉगिंग कमी होतं की म्हणून आता हे जिम सुरू केलंय? कुठून सौ.ला बुढिया म्हटलं अन् कुठून तिला गुडिया बनायला सांगितलं असं झालं मला. पण पुन्हा जरा शांतपणे विचार केला. तीसुद्धा माझे पांढरे केस लपावेत म्हणून दर आठवड्याला मला मेंदी लावून देतेच ना? माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुर्त्या कमी व्हाव्यात म्हणून न जाणो कुठले कुठले पॅक तयार करून मला चेहऱ्यावर लावून देत असते ना? मग?

स्वयंपाक आटोपून मुलांना जेवायला घातलं अन् सौ.ची वाट बघत होतो, तोवर दाराची घंटी वाजली. दारात सौ. उभी होती. तिच्याकडे बघताना माझे विस्फारलेले डोळे मिटेनात की वासलेलं तोंड बंद होईना. सौ. चक्क स्लीव्हलेस टी शर्ट आणि शार्ट्समध्ये होती.

‘‘असे काय बघताय? जिम टे्रनरनंच सांगितलं होतं, असा पोशाख घ्यायला. जिममध्ये तोच लागतो.’’ कपडे तोकडे होते, पण खर्च मात्र त्यावर भरपूरच झाला होता. एकूणच यंग फॉरएव्हरमुळे खर्च भरमसाठ वाढला होता हे खरं!

सकाळच्या जोडीनं सायंकाळचं घरकामही आता माझ्याच गळ्यात आलं होतं. मुलं मात्र बिचारी खूपच कोऑपरेट करत होती.

त्यादिवशी विचार केला, ऑफिसातून थोडं लवकर निघून सौ.च्या जिममध्ये डोकावून यावं. तिथं पोहोचलो तेव्हा तिथलं वातावरण बघून माझा पाराच चढला. सौ. टे्रडमिलवर धावत होती अन् इतर पुरूष आपला व्यायाम थांबवून नेत्रसुख घेत होते. सौ.ची बांधेसूद सेक्सी फिगर अधाश्यासारख्या नजरेनं बघत होते. तिथला टे्रनरसुद्धा डंबेल्स अन् बँन्चप्रेस वगैरे व्यायाम करवताना इथं तिथं हात लावण्याची संधी सोडत नव्हता.

मी काही न बोलता तिथून निघणार होतो. तेवढ्यात सौ.चं लक्ष माझ्याकडे गेलं. तिनं सगळ्यांशी माझी ओळख करून दिली. घरी आल्यावर मी माझा सगळा संताप व्यक्त केला.

‘‘तुला यंग फॉरएव्हर करता करता मी पार म्हातारा आणि बॅकवर्ड झालोय. सांभाळ आपली मुलं अन् संसार. फार दुर्लक्ष होतं सर्वांकडे.

‘‘सुटलेलं शरीर आटोक्यात येईल. वाढलेल्या वजनामुळे व्याधी निर्माण होतात त्या होऊ नये अन् मनही प्रसन्न राहावं म्हणून ही थेरेपी फॉलो कर म्हटलं तर तू तोकडे, आखूड कपडे घालून फिरायला लागली. कसली कसली माणसं कसे अन् कुठे स्पर्श करतात, का सहन करतेस हे सगळं?’’

माझी काळजी सौ.ला कळलीच नाही, तिला वाटलं आम्ही तिच्यावर जळतोय, ईष्या वाटतेय मला, तीही भडकली अन् मलाच काहीबाही बोलली.

सौ. हल्ली खरंच छान सडसडीत झाली होती. घोटीव बांधा अन् मुळचं देखणं रूप यामुळे खूपच सुंदर दिसू लागली होती. आसपासच्या स्त्रिया तिचं रहस्य जाणून घ्यायला उत्सुक होत्या. एकदा त्या सगळ्या घरीच येऊन धडकल्या. मी त्यांचं स्वागत केलं. येण्याचं कारण विचारलं. सौ.ला भेटायला आल्याचं त्यांनी सांगितल्यावर ती जिमला गेल्याचं मी सांगितलं.

त्या आपसात बोलंत सोफ्यावर बसल्या होत्या. एकापेक्षा एक बेढब अन् लठ्ठभारती. कुणीतरी म्हणालं, ‘‘काल रात्री बघितलं मी त्यांना बागेत…बहुधा वडील होते त्यांच्याबरोबर…’’

मी दचकलो. काल रात्री आम्ही दोघं बागेत फिरत होतो. मी सौ.चा बाप दिसत होतो? संताप संताप झाला. हल्ली सौ.चं माझ्कडेया लक्षच नाहीए. केसांना मेंदी नाही. चेहऱ्याला फेसपॅक नाही…म्हातारा तर दिसणार होतोच!

त्या विचारात होत्या सौ.नं असं रूप कसं काय मिळवलं. एकदा वाटलं सांगून टाकावी आपली थेरेपी. पण उगीच स्वत:च्या तोंडानं स्वत:ची तारीफ करणं बरं नाही म्हणून म्हटलं ती येईलच एवढ्यात. तिलाच विचारा, मी चहा करून आणतो.

बायका चहा पित होत्या. तेवढ्यात सौ. आलीच. आम्हाला वाटलं ती आता माझी थेरेपी, मी तिला केलेलं सहकार्य, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, घरकाम, मुलांना सांभाळणं, तिच्यासाठी केलेला अफाट खर्च वगैरेंबद्दल भरभरून बोलेल. इतर बायका माझं कौतुक करतील. बायकोला म्हणतील, ‘भाग्यवान आहेस, असा नवरा तुला लाभला.’ पण कसलं काय?

सौ. वदली, ‘‘मी जिमला जाते, योगा करते, जॉगिंग करते, त्यामुळे मी बारीक झाले. जिम टे्रनर आणि योगा शिक्षकांच्यामुळेच अशी सुंदर फिगर झालीय माझी.’’ मी कपाळ बडवून घेतलं. त्या बायका गेल्यावर मी सगळा संताप बोलून दाखवला. सौ.ला माझ्या कष्टाचं, त्यागाचं, तिच्यासाठी केलेल्या खर्चाचं काहीच कौतुक नाही. कृतज्ञता तर अजिबात नाही वगैरे वगैरे खूपच आकांडतांडव केलं.

दुसऱ्यादिवशी आमच्यात अबोला होता. मी घरात काहीही मदत केली नाही. ऑफिसातून घरी परतताना मी एका बागेत बसलो. शांतपणे विचार केला. संसार रथाची दोन्ही चाकं एकसारखी असायला हवी. एक चाक जीर्णशीर्ण, दुसरं नवं कोरं…गाडी कशी चालेल?

बायकोची काळजी घेता घेता आपलीही काळजी घ्यायला हवी. आता यंग फॉरएव्हर थेरेपी स्वत:वर अप्लाय करायची.

डोकं आता बऱ्यापैकी शांत झालं होतं.

रात्री सौ.नं बनवलेलं जेवण जेवून मी अंथरूणावर येऊन झोपलो. सौ.ला वाटलं मी रागात आहे. ती जवळ येऊन म्हणाली, ‘‘तुमच्या रोमांसला काय झालंय? तुम्ही पण आता यंग फॉरएव्हर थेरेपी अंमलात आणा ना?’’

‘‘तेच ठरवलंय. घरकाम दोघं मिळून करूयात. एकत्रच जिम, योगा, जॉगिंग करू. मुलांना दोघं मिळून सांभाळू अन् दोघंही तरूण दिसू. आता मला झोपू दे.’’

‘‘सकाळी लवकर उठायचं आहे अन् हो, रात्रीच बदाम अन् हरभरे भिजवून ठेव. मूगही मोडवायला हवेत.’’ एवढं बोलून मी तोंडावरून पांघरूण घेऊन झोपलो.

सौ. गाणं गुणगुणू लागली, ‘‘चादर ओढ कर सो गया…मेरा बभलम बुड्ढा हो गया…’’

तुझ्या सुखात माझे सुख

कथा * आशा सराफ

आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा. म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो.

संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडी फार ती भिजलीही, पण कुठं तरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. पाच वर्षं झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दु:खीही. आनंद राकेशबरोबर आहे म्हणून आणि दु:ख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून.

लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच. पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. पाच वर्षांत तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही.

लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्षं झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की दोन तरूण मुलं तिच्या पाठी आहेत. पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन अन् ही दोन उनाड मुलं…तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन् स्कूटी थांबवली.

‘‘काय प्रॉब्लेम आहे मॅडम?’’ एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला.

‘‘जरा बघा बरं, चालताना अडकतेय सारखी…काय झालंय कुणास ठाऊक,’’ प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती.

‘‘मॅडम, स्कूटीत काही दोष नाही,’’ स्कूटी चेक करून तो तरूण म्हणाला.

‘‘नीट बघा, चाकात काही दोष असेल…’’ ती वेळकाढूपणा करत होती. ती दोन मुलं जाण्याची वाट बघत होती.

तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरूण म्हणाला, ‘‘चाकंही व्यवस्थित आहेत.’’

‘‘तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना? माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?’’ ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा नि:श्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला.

‘‘किती पैसे द्यायचे?’’

‘‘काहीच नाही…पैसे नाहीच द्यायचे.’’ तो तरूण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला.

‘‘ठिकाय…’’ घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली अन् अवचित ती दोन्ही पोरं स्कूटरसमेत तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना…ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली.

‘‘मॅडम, तुमची पर्स…तुम्ही विसरला होता.’’ अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला.

ती मुलं पळाली अन् भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, ‘‘पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?’’

‘‘होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं म्हणूनच मी इथवर आलो.’’

‘‘धन्यवाद! तुम्ही वाचवलंत मला.’’

‘‘आता गप्पा नंतर. आधी लवकर चला. नाही तर पेपरला उशीर होईल.’’

‘‘तुम्हाला कसं कळलं, माझा पेपर आहे ते?’’

‘‘नंतर सगळं सांगतो. चला लवकर…’’ त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला.

परीक्षा संपेपर्यंत तो तरूण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता.

तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद! आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला, त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता.

‘‘धन्यवाद!’’ त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली.

‘‘तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?’’ त्यानं हसून प्रश्न केला.

‘‘तुम्हाला?’’ कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं.

‘‘धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावंही घेतलं नाहीए.’’ हसत हसत त्यानं म्हटलं.

त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं.

‘‘ओह सॉरी,’’ ओशाळून संजनानं म्हटलं, ‘‘तुमचं नावं काय आहे?’’

‘‘राकेश.’’

‘‘बरं तर, राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात?’’ संजना थोडी सावरून म्हणाली.

‘‘जवळच एक कॅफे आहे. तिथं कॉफी पिऊयात?’’ गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं.

संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रूबाबदार होता तो. स्वत:चं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला दोन धाकट्या बहिणीही होत्या.

पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्नं बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं.

वडील बिथरलेच. ‘‘ कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही, आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दळीद्री…काय बघितलंस तू?’’

‘‘बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे.’’ मान खाली घालून संजनानं सांगितलं.

‘‘स्वभावाचं काय लोणचं घालाचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस.’’ बाबांचा राग शांत होत नव्हता.

‘‘बाबा, मी राहू शकेन. मी राहीन.’’ हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली.

‘‘हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी…पैसा नसला की दोन दिवसांत प्रेमाचे बारा वाजतात.’’

‘‘नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे.’’ संजनानं नम्रपणेच सांगितलं.

आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘हे बघ संजना, संसार असा होत नाही. आत्ता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजुक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे, श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दु:खाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्नं करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील?’’

बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना अन् राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कंच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं अन् राकेश ते तिला भरभरून देत होता.

पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते.

‘‘राकेश, कधी आलास?’’ त्याच्याकडे वळून तिनं विचारलं.

तिला बाहूपाशात घेत त्यानं म्हटलं, ‘‘मी तर सकाळपासून इथंच आहे.’’

‘‘चल, खोटं बोलतोस…’’ त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं.

‘‘तुझ्या हृदयाला विचार ना? मी कशाला खोटं बोलू?’’

संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती. पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता.

एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली…‘‘अरे ही तर पूनम…तिची धाकटी बहिण.’’

पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं, ‘‘ताई…’’ तिनं संजनाला मिठीच मारली.

‘‘कशी आहेस पूनम?’’ संजनाला एकदम भरून आलं.

‘‘तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघतेय तुला.’’

‘‘घरी सगळे बरे आहेत ना?’’ थोड्याशा संकोचानंच संजनानं विचारलं.

‘‘थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात.’’ पूनमननं संजनाला ओढतच तिथं नेलं.

कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली.

‘‘घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते.’’

‘‘कशाला खोटं बोलतेस? आई बाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना?’’ संजनाला एकदम रडू अनावर झालं.

‘‘नाही ताई, तसं नाहीए. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीकाय, जे व्हायचं ते होऊन गेलंय, आता त्याचं काय? तू कशी आहेस? भावजी कसे आहेत?’’

राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली.

‘‘राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत.’’ तिनं अभिमानानं सांगितलं.

‘‘तुझ्यावर प्रेम करतात ना?’’ तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं.

‘‘प्रेम? अगं त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरंच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रूबाबात राहतेय. स्वत:चा छोटासा फ्लट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय अन् जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो…मला असा नवरा मिळाला हे माझं मोठंच भाग्य आहे पूनम.’’

‘‘खरंच ताई? खूप बरं वाटलं ऐकून.’’

‘‘माझ्या आयुष्यात दु:ख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे.’’ क्षणभर संजनाचा चेहरा दु:खानं झाकोळला, पण लगेच स्वत:ला सावरून तिनं म्हटलं, ‘‘ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत?’’

‘‘माझं सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आलेय. छोटी चंदीगडला असते…पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.’’

वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरंच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही.

पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं.

संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं.

‘‘राकेश, हे माझे आईबाबा आहेत.’’ संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला.

‘‘खुशाल रहा. सुखी रहा.’’ बाबांनी तोंड भरून आशिर्वाद दिला. ‘‘पूनमनं संजनाबद्दल सांगितलं, आम्हालाही पोरीचं सुखंच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही. पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नकोय आम्हाला.’’ बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंडभरून आशिर्वाद दिले.

संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले, तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा, संजनानं म्हटलं, ‘‘कुठं गेला होतास?’’

‘‘अगं तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का?’’ तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं.

काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला.

त्यादिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं ती अतीव आनंदानं डॉक्टकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राइज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लानिंग करून ठेवलंय. ती घरी पोहोचली, तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. किती तरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचं होतं. पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना.

‘‘प्रिय संजना,

हे पत्र वाचून तुला खूप दु:ख होईल ते मला ठाऊक आहे. खरंतर मी तुला सोडून जाऊच शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाहीए. केव्हा येईन सांगता येत नाही पण येईन हे त्रिवार सत्य! गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वत:ची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे.

तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…

तुझाच राकेश.’’

प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली.

काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, कुणालाच काही माहीत नव्हतं. नऊ महिने तिला कसेबसे काढले, तिलाच ठाऊक, नऊ महिने उलटले अन् तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. पाच वर्षं ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव.

सहा वर्षं उलटली. राकेश नाही, त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती.

एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा, तेव्हा असाच सुंदर वास दरवाळयचा. राकेश तिच्यासमोर खरोखरंच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळली अन् तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले.

‘‘कोण तू? मी तुला ओळखत नाही.’’

‘‘संजना…’’ चेहऱ्यावरचं तेच लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर.

‘‘मेली संजना…इथं नाही राहत ती…’’

संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन् मग स्वत:च त्याला मिठी मारली.

‘‘कुठं गेला होतास तू?’’

‘‘दुबईला?’’ तिचे अश्रू पुसून तो म्हणाला.

‘‘दुबईला? कशाला?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘पैसे मिळवायला.’’

‘‘न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?’’

‘‘मला तुला सुखात ठेवायचं होतं.’’

‘‘सुखासाठी पैसे लागतात? मी कधी मागितले पैसे? कधी तरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते.’’

‘‘नाही संजना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणंजाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरीबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस कारण तिथं सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. ‘मला वेळ नाही, जमणार नाही, म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं.’’

‘‘तुला आठवतंय, आईनं दिलेली निळी साडी…’’

‘‘ती ४०,००० ची?’’

‘‘हो. तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेय?’’ खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती…मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली…अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. अन् मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो?

‘‘एक दिवस एका मित्रानं म्हटलं तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना, आता तू तुझ्या नातालगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठ्ठा बंगला, झगमगीत गॅरेज…सगळं सगळं देईन मी तुला.

‘‘अरे, पण निदान मला सांगून जायचंस?’’

‘‘सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस? तू तर हेच म्हणाली असतील, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नकोय, पण मी तुला गेल्या काही वर्षांत फारच फार दुखवलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण…प्लीज…संजना.’’ त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते.

तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिटरवर ठेवलेल्या फोटोफ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं.

‘‘माझी मुलगी आहे.’’ संजनानं हात सोडवून घेत म्हटलं.

‘‘नाही, आपली मुलगी आहे.’’ त्यानं ठासून म्हटलं, ‘‘राशी नाव ठेवलं ना हिचं?’’ त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं.

‘‘तुला इतकी खात्री होती?’’ संजनानंच आता आश्चर्याने विचारले.

‘‘खरं तर माझ्यावर, स्वत:वर माझा जेवढा विश्वास नाहीए, तेवढा तुझ्यावर आहे संजना.’’ त्यानं मिठीत घेतलं.

खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन् आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो?

हेच सत्य आहे

कथा * मोनिका अत्रे

‘‘कुठं होतीस तू? केव्हापासून फोन करतोय मी. माहेरी गेली की वेडीच होतेस तू…’’ खूप वेळानं मोनीनं फोन उचलला तेव्हा सुमीत रागावून म्हणाला.

‘‘अहो…तो मोबाइल कुठं तरी असतो अन् मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. अन् सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला…बरं, ते जाऊ देत. फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काय विशेष?’’ मोनीनं त्याच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं.

‘‘म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही? तुझी अन् मुलांची चौकशी नाही करू शकत? तेवढाही हक्क नाहीए मला? बरोबर आहे आता त्यांच्यावर आजीआजोबा, मामामामींचा हक्क आहे ना?’’ मोनीवर भडकलाच सुमीत. त्याला वाटलं होतं की मोनी त्याच्या रागावण्यावर सॉरी म्हणेल, प्रेमानं बोलेल…

इकडे मोनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वांतत्र्य हवं असायचं. ‘‘तुम्ही भांडायला फोन केला आहे का? तसं असेल तर मला बोलायचंच नाहीए. एक तर इथं इतकी माणसं आहेत. काय काय चाललंय, त्यातच मनीषाला जरा…’’ बोलता बोलता तिनं जीभ चावली.

‘‘काय झालंय मनीषाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीणभावंडात रमली असशील…तिला बरं नाहीए तर तुमचं परतीचं तिकिट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाहीए अन् तू इकडे तिकडे भटकतेस? बेजबाबदारपणाचा कळस आहेस. इतकं दुर्लक्ष?’’ साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. सुमीतनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘अहो, थोडं अंग तापलंय तिचं…पण आता ती बरी आहे अन् हे बघा, मला धमकी देऊ नका. दहा दिवसांसाठी आलेय, तर पूर्ण दहा दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे, माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो, तेव्हा तिथं बारा-बारा तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीत असते, तुमच्या तालावर नाचते तेव्हा नाही काही वाटत. पण दहा दिवस माहेरी आले तर लगेत तमाशे सुरू करता….’’ मोनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं. पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं.

‘‘अस्सं? मी तमाशे करतो.? पारच जोर चढतो तुला तिथं गेल्यावर. आता तिथंच राहा, इथं परत यायची गरज नाहीए. दहा दिवस काय आता वर्षभर राहा. खबरदार इथं परत आलीस तर…’’ संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला.

मोनीनंही मोबाइल आदळला अन् सोफ्यावर बसून ती रडायला लागली. तिची आई तिथंच बसली होती. सगळं ऐकलं होतं. तिनं म्हटलं, ‘‘अगं बाळी, तो कसं काय चाललंय हे विचारायला फोन करत होता, उशीरा फोन उचलल्यामुळे रागावला होता, तर तू अशावेळी सबुरीनं घ्यायचंस…सॉरी म्हणायचं मग तो ही निवळला असता…जाऊ दे. आता रडूं नकोस. उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल…’’

मोनीला आणखीनच रडायला आलं. ‘‘आई, अगं फक्त दहा दिवसांसाठी माहेरी पाठवतात. इथं मी आनंदात असते. ते बघवत नाही त्यांना, नवरे असे का गं असतात? खंरतर त्यांना आमची खूप आठवण येतेय, मी नसल्यानं त्यांना त्रासही होतोय. पण अशावेळी प्रेमानं बोलायचं मोकळ्या मनानं कबूल करायचं, तर ते राहिलं बाजूला, आमच्यावरच संतापायचं, ओरडायचं…माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वैर धरायचं, त्यांना नावं ठेवायची… ही काय पद्धत झाली?’’

‘‘अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटत असतो. बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपला तिच्यावरचा हक्क कमी झालाय. त्यामुळे मनातल्या मनात संतापतात, कुढतात अन् बायकोनं जरा काही शब्द वावगा उच्चारला तर त्याचा अहंकार लगेच फणा काढतो अन् मग उगीचच भांडण होतं. तुझे बाबापण असंच करायचे.’’ मोनीला जवळ घेऊन थोपटत आईनं म्हटलं.

‘‘पण आई, स्त्रीला असं दोन भागात का वाटतात हे पुरूष? मी सासरची आहे अन् माहेरचीही आहे. माहेरी आले तर लगेच सासरची, तिथल्या माणसांची उपेक्षा केली असं थोडंच असतं? ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावी लागतात?’’ मोनी हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजालाच विचारत होती जणू.

आईनं तिला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ‘‘अगं, पुरूषाचा अहंकार अन् त्याचं सासर म्हणजे बायकोचं माहेर यात छत्तीसचा आकडा असतो. मोनी, बाळे, पुरूष असेच असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. काही जन्मजात काही पुरूषी समाजानं जोपासलेला. स्त्रीला दोन भागात वाटायचं हेच काम असतं. एक भाग माहेराचा, एक भाग सासरचा. जसे दोन अर्धगोल एकत्र आल्यावर एक पूर्ण गोल होतो तसेच हे दोन अर्धगोल एकत्र आले की स्त्रीही पूर्ण होते.’’

‘‘दोन अर्धगोल…एक पूर्ण गोल…पूर्णत्त्व…’’ मोनी गप्प बसून सर्व ऐकत होती. काही तिला कळत होतं. काही तिला कळून घ्यायचं नव्हतं. फक्त आहे हे सत्य आहे, हेच तिला जाणवलं होतं.

परदेश प्रवास

कथा * सुनीत भाटे

‘‘मॅडम, प्रिन्सिपल सरांनी तुमचं काम संपल्यावर त्यांना भेटून जा म्हणून सांगितलंय.’’

शाळेच्या शिपायानं हा निरोप सांगताच अवनीला काळजी लागली. का बरं बोलावलं असेल? मागची एक कडवट आठवण अजून तिच्या मनातूनच गेली नव्हती…त्यांनी अप्रत्यक्षपणे तिच्यावर तिच्या कामावर ताशेरे ओढले होते.

शेवटचा पिरियड संपवून अवनीनं घाईघाईनं आपलं सामान आवरलं अन् ती भराभर चालत सरांच्या ऑफिसकडे निघाली.

वाटेत नलिनी भेटली. ‘‘इतक्या घाईनं कुठं निघाली?’’ तिनं विचारलं.

‘‘प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलावलंय…’’

‘‘अरेच्चा? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे?’’

‘‘मला…भीती वाटते त्यांची…’’

‘‘अवनी, तू पण ना…जा. भेटून ये, मी निघते.’’

अवनीनं सरांच्या ऑफिसच्या दारात उभं राहून विचारलं, ‘‘मे आय कम इन सर?’’

‘‘या, या, अवनी…’’

‘‘बसा…कॉफी घेणार?’’

अवनी संकोचली, कशीबशी म्हणाली, ‘‘चालेल.’’

‘‘यावेळी तुमच्या वर्गातल्या सर्वच मुलांचे मार्क्स उत्तम आहेत…म्हटलं, तुमचं अभिनंदन करावं.’’

‘‘थँक्यू सर.’’

‘‘सध्या स्टाफरूमध्ये पगारवाढीसाठी कुणाचं नावं चर्चेत आहे?’’

‘‘सर, सगळेच एकमेकांचे नाव घेत असतात.’’

‘‘असं होय? बरं, ते जाऊ दे…तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट असेल ना?’’

‘‘नाही…नाहीए सर,’’ कशीबशी अवनी म्हणाली.

‘‘तर मग करून घ्या. यंदा टीचर्सचं जे डेलिगेशन जर्मनीला जाणार आहे, त्यासाठी तुमचं नाव पाठवायचं माझ्या मनात आहे म्हणून तुम्ही पासपोर्ट लवकर बनवून घ्या.’’

‘‘ओ. के. सर.’’

‘‘परदेश प्रवासाची तयारीही सुरू करा.’’

अवनीचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना. तिनं जरा निरखून सरांच्या चेहऱ्याकडे बघितलं.

६०-६५ वर्षांचे प्रिन्सिपल सर शर्ट पॅन्ट अन् कोट, टायमध्ये होते. सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला. अवनीला एकदम तिचे वडिल आठवले.

‘‘सर, कधी जावं लागेल?’’

‘‘अजून नक्की तारीख आलेली नाहीए…पण ही मिटिंग सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असते.’’

अवनीला आपला आनंद लपवता आला नाही.

‘‘अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो, ‘भारतीय स्त्रियांची सार्वत्रिक आगेकूच’ या विषयावर एक छानसं आर्टिकल तयार करा. त्या लोकांना भारतीय स्त्रीच्या प्रगतीविषयी, पर्यायानं देश किती पुढे गेलाय याविषयी कळायला हवं.’’

‘‘दोन तीन दिवसातच आर्टिकल तयार करून मी तुम्हाला आणून देते सर.’’

‘‘घाई नाहीए…आठवडाभरही वेळ घ्या. पण ठसठशीत उदाहरणं देऊन, व्यवस्थित आकडेवारी देऊन आर्टिकल लिहा. मी सुगंधालाही सांगतो. तिच्या आर्टिकलमध्ये  काही वेगळं अन् महत्त्वाचं वाटलं तर ते ही तुमच्या आर्टिकलमध्ये घालून एक उत्तम आर्टिकल तयार करू. तेच तुम्ही वाचून दाखवाल.’’

‘‘होय सर.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता. पण पासपोर्टचं मात्र लवकरात लवकर बघा.’’

‘‘थँक्यू सर.’’

आपलं परदेशी जाण्याचं स्वप्नं इतक्या लवकर पूर्ण होईल असं अवनीला कधी   वाटलं नव्हतं. तिचा आनंद मनात मावत नव्हता. प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसमधून बाहेर पडताच तिनं आपला आनंद शेयर करण्यासाठी हर्षदला, नवऱ्याला मेसेज टाकला की तिला घाईनं पासपोर्ट काढून घ्यायला हवाय. या वर्षी शाळेकडून जर्मनीला जाणाऱ्या डेलिगेशनमध्ये तिची निवड झाली असून तिला जर्मनीला जावं लागणार आहे.

हर्षदनं ताबडतोब उत्तर पाठवलं, ‘‘काळजी करू नकोस, पासपोर्टचं काम नक्की होईल.’’

आपल्या पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाची कल्पनाच अवनीला रोमांचित करत होती. आनंदानं तिचा चेहरा फुलला होता. आपल्याला पंख फुटले असून आपण पक्ष्याप्रमाणे ढगात उडतोय असं तिला वाटत होतं.

तीस वर्षांची अवनी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती. अभ्यासात प्रथमपासूनच हुषार होती. पहिला नंबर कधी सोडला नव्हता. इंग्रजी साहित्यात एम.ए. केल्यावर तिला एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजीची लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली होती. तिचं शिकवणं छान होतं. जीव तोडून ती आपलं काम करायची. त्यामुळे शाळेत तिचं नाव चांगलं होतं. स्टाफरूमच्या डर्टी पॉलिटिक्स अन् ग्रुपीझमपासून ती लांबच असायची.

इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे शाळेत परदेशी विद्यार्थी बरेच असायचे. त्या मुलांना बघून तिला आपलं परदेश प्रवासाचं स्वप्नं आठवायचं, पण ते असं अवचित अन् इतक्या तडकाफडकी पूर्ण होईल असं तर तिला वाटलंच नव्हतं.

ती मोबाईल पर्समध्ये ठेवत होती, तेवढ्यात पुन्हा नलिनीच समोर आली. तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत तिनं प्रश्न केला, ‘‘का बरं बोलावलं होतं सरांनी?’’

‘‘काही नाही…यंदा क्लासचा रिझल्ट फार छान आलाय…त्याप्रित्यर्थ अभिनंदन केलं त्यांनी.’’

‘‘ओ. के.’’

ती घाईघाईनं घरी पोहोचली. मनात तुडुंब आनंद भरलेला होता, त्यामुळे आज थकवा वगैरे काही वाटत नव्हता. तिनं हर्षदच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवला. मग छान फ्रेश होऊन सुंदर नवी साडी नेसली. थोडा मेकअप केला. लिपस्टिक लावून आरशात बघितल्यावर स्वत:वरच खुष झाली. तेवढ्याच डोअरबेल वाजली. तिनं दार उघडलं.

तिला अशी छान नटलेली बघून हर्षद दचकला…‘‘कुठं बाहेर जायचंय का? मी फार दमलोय. आधी एक कप गरम चहा पाज. मग बघूयात.’’

‘‘नाही हो, जायचं कुठंही नाहीए. मी तर अशीच आवरून बसलेय.’’ तिनं त्याला आश्वस्त केलं.

शाळेतून येतानाच अवनीनं हर्षदच्या आवडीचे समोसे आणले होते. ते तिनं मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घेतले. गरम चहासोबत गरमागरम समोसे बघून हर्षद आनंदला.

हसून म्हणाला, ‘‘अच्छा, तर तुझ्या जर्मनी ट्रिपबद्दल मला ट्रीट दिली जातेय तर? बरं मला सांग, तुला पासपोर्ट कधीपर्यंत हवाय?’’

‘‘तसा बराच वेळ आहे. सर म्हणाले आहेत, मीट मार्च महिन्यांत असते.’’

‘‘ठीकाय, मी ऑनलाइन फॉर्म भरून देतो. जेव्हा त्यांच्याकडून सूचना येईल, तेव्हा तुला एक दिवस रजा घ्यावी लागेल. सगळी सर्टिफिकेट्स आणि पेपर्स घेऊन पासपोर्ट ऑफिसला जावं लागेल. तिथं बराच वेळ लागतो.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा सुट्टी घेईन.’’

‘‘किती दिवसांसाठी जायचंय?’’

‘‘अजून त्यांनी तेवढं सविस्तर सांगितलं नाही.’’

हर्षद थोडा उदास होऊन म्हणाला, ‘‘मी परदेश प्रवासाची स्वप्नंच बघत बसलोय अन् तू फुर्र..कन उडणार आहेस.’’

आपल्याच आनंदात मग्न असलेल्या अवनीनं त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही.

‘‘बरं का, आपल्याला एक स्ट्रोलर बॅग विकत घ्यावी लागेल…शिवाय एक मोठी नवी पर्स…’’

‘‘हो, हो…घेऊयात. तू एक यादी करायला घे. त्याप्रमाणे आपण हळूहळ सगळी खरेदी करूयात.’’

‘‘अजून काय लागेल?’’

‘‘बाई गं, मी तर अजून परदेशी गेलो नाहीए. तू तुझ्या शाळेतच चौकशी कर. चांगली माहिती मिळेल.’’

अवनी अजूनही मनानं जर्मनीतच होती. तिनं इंटरनेटवरून माहिती काढली,

‘‘हर्षद, त्यावेळी जर्मनीत तर कडाक्याची थंडी असेल, मला ओव्हरकोटही घ्यावा लागेल.’’

‘‘तो फार महाग पडेल गं! शिवाय नंतर तो इथं नुसताच पडून राहील.’’

‘‘ते ही खरंच आहे म्हणा.’’

‘‘माझा तर कोट ही लग्नातलाच आहे, खरं तर त्याच्याही आधीचाच…तोही पार कामातून गेलाय.’’

हर्षदला ओशाळल्यासारखं झालं. तो थोडा चिडचिडल्यासारखा झाला होता. थोडा नाराज होऊन म्हणाला, ‘‘आधी अकाउंटला किती पैसे आहेत ते बघायला हवं. त्यानंतर खरेदीचं बघावं लागेल. आजच गावाकडून आईचा फोन आला होता. बाबांनी अंथरूण धरलंय, म्हणून एकदा येऊन बघून भेटून जा. राधा दर महिन्याला येते. गरजेचं सामान देऊन जाते. जावईबापू फारच भले आहेत. तिला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत.’’

अवनीचा मूड एकदम बिघडला. तिनं नाराजीनं डोळे मिटून घेतले.

‘‘झोपलीस का गं?’’ त्यानं विचारलं.

हर्षदची झोप उडाली होती. आधी तयारीसाठी इतका खर्च अन् मग तिथं शॉपिंगसाठी पैसे…खर्चच खर्च…कसं जमवायचं सगळं?

अवनीनं डोळे मिटून घेतले होते. पण मनात विचार सुरूच होते. ओव्हरकोट कुणाकडून तात्पुरता मागून घेता येईल. इतर गोष्टींचा विचार करायला हवा…

हर्षदनं ऑनलाइन पासपोर्टसाठी फॉर्म भरला होता.

अवनीनं इंटरनेटवरून माहिती काढून आपलं आर्टिकल उत्तम लिहून काढलं होतं.    ते सरांच्या ऑफिसात ती देऊनही आली होती. आर्टिकल मनासारखं झाल्यामुळे अवनीच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं होतं.

फॉरेन ट्रिपच्या स्वप्नात दंगलेली अवनी शाळेतल्या आपल्या कामाची जबाबदारी अधिकच नेटानं अन् प्रामाणिकपणे पार पाडत होती. प्रिन्सिपलच्या ऑफिसमधल्या तिच्या फेऱ्या हल्ली वाढल्या होत्या. सरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाची प्रुफं तपासण्याचं काम तिच्यावर सोपवलं होतं. हल्ली त्यांनी अशी फालतू कामं तिच्याकडून करवून घेण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे तिचं त्यांच्याकडे जाणंयेणं जास्त होत होतं. खरं तर कामाचा ताणही जाणवत होता, पण परदेश प्रवासाच्या लोभापायी नाही म्हणता येत नव्हतं. त्यांना नाराज करून चालणार नव्हतं. सरांनी तिच्या आर्टिकलची खूप स्तुती केली होती. त्यामुळेही ती त्यांनी दिलेली कामं मुकाट्यानं करत होती.

एक दिवस ती स्टाफरूममध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत बसलेली असताना नलिनी आली. ‘‘अवनी, आज प्रिन्सिपल सरांनी त्याच टॉपिकवर मला आर्टिकल लिहायला सांगितलंय,’’ ती म्हणाली.

‘‘होय, ते अजून काही जणांकडून लिहून घेणार म्हणाले होते.’’

‘‘तुझं झालं लिहून?’’

‘‘हो…मी त्यांना देऊनही आलेय. त्यांनी अगदी मुक्त कंठानं स्तुती केली.’’

‘‘तू कोण कोणते पॉइंट्स कोट केलेत?’’

क्षणभर अवनी थबकली. हिला दाखवावं की नाही? पण मग तिनं फाईल दाखवली. खरं तर तिला नलिनीचं वागणं नेहमीच संशयास्पद अन् गूढ वाटायचं. दुसरं म्हणजे ती सतत अवनीवर ताशेरे झाडायची.

‘‘अवनी, अगं आता तरी थोडी बदल. जर्मनीला जायचंय…जरा पार्लरला वगैरे जाऊन ये. अगदीच काकूबाई दिसतेस.’’

अवनीला राग यायचा. पण ती वरकरणी हसून विषय टाळायची.

‘‘तुझा पासपोर्ट आला का?’’

‘‘अजून नाही आला.’’

‘‘माझा तर पुढल्या वर्षात एक्सपायर होतो. मला रिन्यू करायचा आहे.’’ नलिनी निघून गेली.

पस्तीस वर्षांची नलिनी सावळ्या रंगाची फॅशनेबल स्त्री आहे. अविवाहित आहे. स्कर्ट किंवा ट्राउझर, स्लीव्हलेस टॉप, कापलेले केस, भरपूर मेकअप, गडद लिपस्टिक, मॅचिंग इयरिंग, नेलपॉलिश अन् सॅन्डल्स ही तिची ओळख आहे.

वयानं तिच्याहून लहान असलेल्या अन् रूपानं अन् बुद्धीनं तिच्याहून उजव्या असलेल्या अवनीलासुद्धा अनेकदा वेस्टर्न कपडे वापरण्याची इच्छा व्हायची. पण तिच्यातली आदर्श भारतीय स्त्री तिला कधीच तसं करू देत नसे. खरं तर हर्षदनंही तिला वेस्टर्न ड्रेसेस घालण्याबद्दल सुचवलं होतं. त्याच्याकडून आडकाठी नव्हती, पण अवनीनंच कधी ते मनावर घेतलं नव्हतं.

नलिनीनं ठरवलं आज घरी जाण्यापूर्वी आपण पार्लरलाच जाऊन यावं. सुट्टी झाल्यावर ती वर्गाबाहेर पडली अन् तिचं लक्ष सहजच समोर गेलं तर नलिनी अन् प्रिन्सिपल सर अगदी हसून हसून काहीतरी बोलत होते. त्याक्षणी अवनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचा मूडच बिघडला. ती तडक घरी पोहोचली.

तिचा चेहरा बघून हर्षदनं विचारलं, ‘‘काय झालं? तू अशी का दिसतेस?’’

‘‘हर्षद, मला शंका येतेय, नलिनी काही तरी डाव खेळतेय…तिची लक्षणं बरी दिसत नाहीत.’’

‘‘उगाच काही तरी विचार मनात आणू नकोस. चल, चहा घेऊयात…तू  आवरून घे, आपण शॉपिंगला जाऊ.’’

‘‘नाही,…नको, मला इच्छा नाहीए.’’ अवनीचा पासपोर्ट तयार होऊन आला. ती सरांच्या केबिनमध्ये गेली. आज तिला सोक्षमोक्ष लावून घ्यायचा होता, खरंच तिचं नाव डेलिगेशनमध्ये आहे की सगळं हवेतच आहे.

सरांनी अत्यंत प्रेमानं तिला समजावलं की तिनं काळजी करू नये. तिच्या आर्टिकलची निवड झाली आहे. पण अजून कन्फरमेशनची मेल आली नाहीए…पण ती येईलच. प्रवासाची तयारी करून ठेवा. लवकरच व्हिसाच्या इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल.

अवनीच्या मनावरचं ओझं उतरलं. पुन्हा ती हलकी होऊन आकाशात उडू लागली.

पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचा आगळावेगळा रोमांच ती कल्पनेतच अनुभवत होती. हर्षदनंही त्या आठवड्यातच तिच्या यादीतली प्रत्येक वस्तू तिला आणून दिली  होती.

स्टाफरूममध्ये टीचर्स तिचं अभिनंदन करत होते. सरांच्या बोलण्यामुळे तिला आता पूर्ण खात्री वाटत होती.

तिनं हर्षदला फोन केला. आज तिला पार्लरला जायचंय, घरी यायला उशीर होईल. पार्लरला प्रथमच जात असल्यामुळे मनात उत्सुकता होती. थोडी धास्तीही होती. तिनं फेशियल केलं, केसांचा मॉर्डन कट अन् नंतर दुकानातून स्वत:साठी ट्राझर अन् शर्टही खरेदी केला.

नव्या अवतारात ती घरी पोहोचली, तेव्हा हर्षदनं तिला ओळखलंच नाही…अन् मग आनंदून त्यानं तिला मिठीतच घेतली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ट्राउझर शर्टमध्ये शाळेत गेली तेव्हा सगळेच तिच्याकडे बघत राहिले.

‘‘किती सुंदर अन् तरूण दिसते आहेस गं!’’ प्रियानं तिला मिठीच मारली.

‘‘अवनी, अगं फॉरेनला जाण्यासाठी टोटल चेंज केलंस स्वत:ला? मस्तच दिसतेस.’’ श्रेयानं म्हटलं.

ती स्टाफरूममधून निघाली अन् वर्गावर जाणार तेवढ्यात राऊंडवर निघालेले प्रिन्सिपॉल भेटले. ‘‘गुड मॉर्निंग सर,’’ तिनं अभिवादन केलं. ‘‘माझ्या ऑफिसात येऊन भेटा. महत्त्वाचं बोलायचं आहे.’’

अवनीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. सर नक्कीच व्हिसाच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलणार असतील. स्वत:ला सावरत ती वर्गावर गेली. आज प्रथमच शिकवताना ती बेचैन होती. शिकवण्यात लक्ष लागलं नाही.

पुढला तास रिकामा होता. ती सरांच्या ऑफिसमध्ये गेली.

‘‘या…प्लीज सिट डाऊन. या नव्या हेयर स्टाइलमध्ये फारच छान दिसताय तुम्ही.’’

‘‘थँक्यू सर.’’

‘‘कॉफी घेऊयात?’’

‘‘चालेल.’’

ती घामाघूम झाली होती.

‘‘तुम्ही इतक्या घाबरलेल्या का असता? जर्मनीत आपल्याला आठवडाभर एकत्र राहायचंय.’’

‘‘नाही सर, तसं काही नाही.’’

ती कॉफीचा कप त्यांना देत असताना त्यांनी जाणूनबुजून तिच्या हाताला स्पर्श केला.

‘‘फारच नाजूक आहेत तुमचे हात.’’

अवनी घाबरली. तिनं सरांकडे बघितलं, तेव्हा त्यांची कामुक दृष्टी तिच्या सर्वांगावरून फिरत होती. तिनं घाबरून मान खाली घातली.

‘‘तुम्ही फारच लाजाळू आहात बुवा. नुसत्या बोलण्यानं अशा घाबरून कोमेजता आहात?’’

ती कसंबसं ओशाळं हसली.

‘‘या बाबतीत नलिनी एकदम फ्रेंडली आहे.’’

अवनीचं डोकं तडकलं. कॉफीचा कप तसाच टाकून तिनं विचारलं, ‘‘सर, मी जाऊ?’’

‘‘हो हो, जा…’’

घाबरलेली, भांबावलेली ती तडक तिथून उठून आली. सरांचं वागणं आता बदललं होतं. पुन्हा ते तिच्यावर खेकसू लागले होते. नसलेल्या उणीवा दाखवू लागले होते.

नलिनी मात्र सतत सरांच्या भोवती असे. हल्ली तर ते रोज गाडीनं तिला घरीही सोडत होते.

अवनीला काही कळत नव्हतं. एक दिवस हर्षदनं विचारलं, ‘‘तुझ्या व्हिसा इंटरव्ह्यूची तारीख अजून आली नाही का?’’

हर्षदला मिठी मारून ती गदगदून रडू लागली. ‘‘हर्ष, परदेश प्रवासाच्या नावाखाली प्रिन्सिपल सर माझ्याकडून भलंतच काही एक्सपेक्ट करताहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं मला कधीच जमणार नाही. नलिनीचंच नाव ते पाठवतील असं वाटतंय.’’

तिला शांत करत, समजूत घालत हर्षदनं म्हटलं, ‘‘अगं, तू काळजी करू नकोस, आता परदेश प्रवास तेवढा अवघड राहिलेला नाही. मी जमवतो बघ, आपण दोघंही जाऊयात अन् फक्त जर्मनीच नाही तर संपूर्ण युरोपचा प्रवास करून येऊ. तू आता हस बघू…आपण नक्की नक्की परदेश प्रवास करू. तुझी तयारी आहेच. मलाच फक्त तयारी करावी लागेल.’’

दुसऱ्याच दिवशी नलिनी तिच्या व्हिसाच्या इंटरव्ह्यूबद्दल सांगत आली, वर अवनीला ऐकवलं, ‘‘अवनी, बी प्रॅक्टिकल. अगं, सरळ सरळ गिव्ह अॅन्ड टेक असं डील आहे. तुला ते जमलं नाही. सो सॉरी…येते मी…सर माझी वाट बघातहेत…’’

स्तंभित झालेली अवनी गिव्ह अॅन्ड टेकचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करू   लागली.

विवाह

कथा * अर्चना पाटील

क्षितिज आज खूप आनंदात होता. विदिशाला भेटण्यासाठी तो पुण्यात आलेला होता. दोघेही मुलींच्या होस्टेलपासून जवळच असलेल्या एका आइसक्रीमच्या दुकानात भेटले.

‘‘मला उशीर झाला का?’’

‘‘नाही, मीच लवकर आलो होतो.’’

‘‘मी तुम्हाला एक विचारू का?’’

‘‘जे काही विचारायचे आहे, सगळेच विचारून टाक. लग्नानंतर गोंधळ नको.’’

‘‘तुम्ही एमएससी केमिस्ट्री, मग गावाकडे का राहता? पुण्यात येऊन नोकरी का करत नाही? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करत नाही?’’

‘‘शंभर एकर शेती आहे आपली? शिवाय आता मी देशमुखांचा एकटाच वारसदार. माझ्याशिवाय ती शेती कोणी पाहणार नाही. नोकरीतून जो पगार मिळेल त्यापेक्षा जास्तच उत्पन्न घेतो की मी शेतीतून. मग काय गरज नोकरीची?’’

क्षितिजच्या उत्तरातून विदिशाच्या लक्षात आलं की हा मुलगा कधीही त्याचे गाव सोडून शहरात येणार नाही.

‘‘तुमच्या आईचा स्वभाव कसा आहे?’’

क्षितिज खदखदून हसायलाच लागला.

‘‘एकदम सासूवरच आली की तू. माझ्या आईनेच पसंत केली आहे तुला. पण खरं सांगू का तूझा फोटो पाहिला आणि मी प्रेमातच पडलो तुझ्या. ग्रामीण भागातील असूनही पुण्यात बीएससी कॉम्प्युटर शिकते तू, इतकं भारी इंग्रजी बोलते तू. तुझं बोलणं, हसणं सगळंच आवडतं मला. कधी एकदा तू लग्न करून माझ्या आयुष्यात येशील असं झालं आहे मला.’’

विदिशाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तिने लाजून मान खाली घातली. लग्नाचा दिवस येईपर्यंत क्षितिज आणि विदिशाने एकमेकांच्या आवडीनिवडी, इच्छा, हनीमुन स्पॉट सर्व गोष्टींवर गप्पा मारल्या होत्या. एक मार्च लग्नाचा दिवस उजाडला. नवरदेवाची वरात पारावरून येऊन मंडपात उभी राहिली. पण नवरदेवाला ओवाळण्यासाठी वधुपक्षाकडून कोणीही पुढे येईना. कारण नवरी एक चिठ्ठी लिहून पळून गेली होती.

‘‘तात्या, मी खूप मोठी चूक करते आहे. पण लग्न करून आयुष्यभर अॅडजस्ट करायला माझं मन तयार होत नाहीए. आईसारखं केवळ चुल आणि मुल करायला नाही जमणार हो मला. तुम्ही शोधलेल्या स्थळात काहीच कमतरता नाही. त्यामुळे मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी माझ्या या विवाहबंधनातून सुटका नाही. म्हणूनच तुम्हाला न सांगता मी हे घर कायमचे सोडून जाते आहे.’’

‘‘शिकवा अजून शिकवा पोरीला,’’ तात्या स्वत:च्या बायकोवर ओरडतही होते आणि रडतही होते. वरपक्षाच्या घरीही स्मशानशांतता होती. देशमुखांच्या छातीत दुखायला लागले होते.सगळया गावासमोर नाचक्की झालेली होती. पण तरीही आपल्या कुटुंबाकडे पाहून क्षितिजने स्वत:ला सावरले.

विदिशाने पुण्यात येऊन होस्टेल सोडले. वेदिका नावाच्या मुलीसोबत एका फ्लॅटमध्ये ती भाडयाने राहू लागली. एका कंपनीत तिला नोकरी मिळाली होती. वेदिका खुप दारू प्यायची, पाटर्यांना जायची. पण पर्याय नव्हता म्हणून विदिशा तिच्यासोबत राहत होती. चार वर्षे अशीच गेली. एका रात्री वेदिका दोन लाख कॅश असलेली बॅग घेऊन आली. विदिशा काही विचारणार तेवढयात तिच्यामागे एक रूमाल चेहऱ्यावर बांधलेला तरुण फ्लॅटच्या आत शिरला.

‘‘बॅग इकडे आण नाहीतर फुकट मरशील.’’

‘‘बॅग मिळणार नाही. तु आधी बाहेर हो.’’

त्या तरूणाने पुढच्याच क्षणी वेदिकाच्या पोटात चाकू खुपसला आणि बॅग घेऊन फरार झाला. विदिशाला काहीच समजत नव्हते. फ्लॅट संस्कृतीत तिच्यासाठी कोणी दरवाजाही उघडणार नव्हते. तिने पटकन चाकू वेदिकाच्या पोटातून बाहेर काढला आणि रिक्षा घेण्यासाठी खाली गेली. एका रिक्षावाल्याला सोबत घेऊन ती फ्लॅटमध्ये पुन्हा आली तर रिक्षावाला ओरडतच खाली पळाला. विदिशा वेदिकाजवळ गेली तर तिचा श्वास बंद झालेला होता. तेवढयात वॉचमन फ्लॅटमध्ये आला. पोलीस स्टेशनमध्ये फोन करण्यात आला. विदिशा आता निराश झाली होती. वेदिका प्रकरण आपल्याला खूप महाग पडणार हे तिला समजून चुकलं होतं. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. पोलीस संपूर्ण फ्लॅटमध्ये फिरत होते. वेदिकाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी विदिशाला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. सकाळी नऊ वाजताच विदिशा पोलीस स्टेशनला जाऊन बसली. कधी हे प्रकरण संपेल असं झालं होतं तिला.

‘‘साहेब आले नाहीत अजून. दहा वाजता येतील. केबिनमध्ये जाऊन बसा,’’ पोलिस हवालदार म्हणाला.

केबिनमध्ये शिरताच टेबलवरील क्षितिज देशमुख ‘पाटी’ वाचली आणि विदिशाच्या डोळयांतून टपटप पाणी यायला लागले. तेवढयात क्षितिज दाखल झाला. तो येताच विदिशा पटकन उभी राहिली.

‘‘वेदिका मर्डर केस. चाकूवर तुझ्याच बोटाचे ठसे आहेत. हॉलमध्येही सगळीकडे फक्त तुझ्याच हाताचे ठसे आहेत. फक्त तू खुन का केला? खुनामागचे कारण समजत नाहीए .ते तुच सांगून टाक आणि प्रकरण मिटव.’’

‘‘मी खून केलेला नाहीए.’’

‘‘पण पुरावे तर तेच सांगत आहेत.’’

‘‘काल काय झालं होतं ते मी लेखी जबाबात सांगितलं आहे.’’

‘‘पण ते सगळं खोटं आहे. तू तुरुंगात नक्कीच जाणार. आजपर्यंत केलेल्या सगळयाच गुन्ह्यांची मी शिक्षा देणार आहे, मिस विदिशा.’’

‘‘हे बघा…’’

‘‘चुप, बिलकूल चुप. कदम, गाडी काढा. आमदारांनी बोलवलंय आपल्याला. मॅडम, रोज सकाळी यायचं इथे चौकशीला. समजलंना.’’

विदिशाला दिवसभर काय करावं काहीच समजत नव्हतं. संध्याकाळी ती पुन्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर क्षितिजची वाट पाहू लागली. रात्री नऊ वाजता क्षितिज बाहेर आला. तो बाईकला किक मारणार तेवढयात विदिशा त्याच्यासमोर आली.

‘‘मला बोलायचं आहे तुमच्याशी.’’

‘‘बोल.’’

‘‘मी खूप चुकीचे वागले होते चार वर्षांपूर्वी. मला माफ करा. पण मी हा खून केलेला नाही. प्लीज, मला यातून सोडवा.’’

‘‘लॉजवर चलते का, हनीमुनसाठी महाबळेश्वरला जाऊ शकलो नाही तर लॉजवरच जाऊन येऊ. तुझे सगळे गुन्हे माफ. बसते का मग बाइकवर.’’

‘‘क्षितिज…’’ काय बोलावे तेच समजत नव्हतं विदिशाला आणि पुढच्याच क्षणी क्षितिज निघून गेला.

दुसऱ्या दिवशी विदिशा पुन्हा केबिनमध्ये येऊन बसली.

‘‘काय काम करतेस तू?’’

‘‘कंपनीत आहे.’’

‘‘लग्न झालं का बाकी आहे तुझं? ओह सॉरी, असलम बॉयफ्रेंड आहे तुझा. लग्न न करताही सगळया गोष्टी करतात आजचे तरूण आणि तरूणी. नाही का?’’

‘‘तुम्ही मला चुकीचं समजत आहात. असलम माझा नाही वेदिकाचा मित्र होता.’’

‘‘दोन मुलींचा एकच मित्र असू शकतो ना?’’

‘‘मी अजून असलम नावाच्या व्यक्तिचं तोंडदेखील पाहिलेलं नाही.’’

‘‘कमाल आहे बुवा. तू असलमला पाहिलं नाही. वॉचमनने रूमालाने तोंड झाकलेला तरूण पाहिलेला नाही. पैशांची बॅग तर अजून तुझ्याशिवाय कोणीच पाहिलेली नाही. बाकीचं उद्या पाहू. निघ.’’

रोज सकाळी पोलीस स्टेशनला येणे. तीन चार वाजता केबिनमध्ये जाणे. अर्धा तास क्षितिजला सामोरे जाणे असे चक्र सुरू होते. क्षितिज विदिशाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नसे. कधी लेडी कॉन्स्टेबलसमोर तर कधी स्टाफसमोर. दोन महिन्यापासून हे चक्र सुरू होतं. विदिशाची नोकरी गेलेली होती. गावाकडे विदिशाची चिंता करून करून आई दवाखान्यात अॅडमिट झालेली होती. सतत चोवीस तास एक माणूस सतत तिच्यामागे फिरत होता. नेहमीप्रमाणेच आजही चौकशी चालू झाली.

‘‘रोज रोज चकरा मारत आहात. त्यापेक्षा गुन्हा कबूल करा ना.’’

विदिशा काहीच बोलत नव्हती. ती फक्त खाली मान घालून बसली होती.

‘‘जी मुलगी मायबापाला झाली नाही ती मैत्रिणीला काय होणार? असलम कोण? बॉयफ्रेंड आहे? कालच पकडलं आहे मी त्याला. दोन लाख कॅश असलेली बॅग सापडली आहे त्याच्याकडे,’’ क्षितिज विदिशाच्या खुर्चीशेजारीच टेबलवर बसून बोलू लागला.

पण तरीही विदिशा काहीच बोलत नव्हती. आपल्याला तुरुंगात जावंच लागणार आहे. आपण आपल्या आईवडिलांना आणि देशमुख कुटुंबीयांना जो त्रास दिला, त्याचीच शिक्षा आपल्याला मिळणार आहे. हे तिला समजून चुकलं होतं.

तेवढयात तात्या केबिनमध्ये दाखल झाले. तात्यांनी केबिनमध्ये शिरताच दोन्ही हात जोडून क्षितिजच्या पायावर डोके ठेवले.

‘‘साहेब, माझी बायको खूप सिरीयस आहे. आमच्या मुलीकडून चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो. माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीला खुनाच्या या केसमधून सोडवा ही नम्र विनंती करतो तुम्हाला.’’

‘‘अहो तात्या, सगळं काही ठीक होईल. तुम्ही घरी जा आता.’’

विदिशा पाठमोरी बसूनच सगळं ऐकत होती. तात्यांच्या नजरेला नजर देण्याची हिंमतच नव्हती तिच्याकडे. पण तात्या बाहेर पडताच टेबलवर डोकं ठेवून धाय मोकलून ती रडू लागली.

‘‘तू बाहेर निघ आता, संध्याकाळी बोलू.’’

‘‘का, संध्याकाळी का? आताच बोला. मी खून केला आहे ना. असंच स्टेटमेंट पाहिजे आहे ना तुम्हाला. मी तयार आहे गुन्हा कबूल करायला. सहन नाही होत मला आता. बंद करा हा खेळ. तुमच्यासोबत लग्न म्हणजे केवळ देशमुख वाडयातील शोभेची बाहूली बनणं होते. स्वत:ची निर्णयक्षमता गहाण ठेऊन नवऱ्याच्या मागे चालणं पटत नव्हतं मला. माझं शिक्षण, माझी मेहनत वाया जाणार होती. तुमच्या घरी आणि तात्यांना सांगून काही उपयोग नव्हता. मग काय करायला हवं होतं मी?’’ विदिशा रडतही होती आणि संतापून बोलतही होती.

‘‘मला सांगायला हवं होतं ना, मी बोललो असतो तात्यांशी.’’

‘‘तुमचं ऐकून तात्यांनी मला पुण्यात पाठवलं असतं का? अगोदरच त्यांचा मुलींच्या शिक्षणाला विरोध होता. आईने भांडून भांडून मला पुण्यात शिकायला पाठवलं. शेवटच्या क्षणी असह्य झालं आणि मंडप सोडून पळाले मी.’’

‘‘आणि माझं काय? माझ्यासोबत चार महिने फिरलीस, माझ्या भावनांशी खेळलीस, त्याचं काय? माझ्या आईवडिलांचा यात काय दोष होता.’’

‘‘मला वाटत होतं तुम्हाला फोन करावा पण हिंमत होत नव्हती.’’

‘‘तुला जे करायचं होतं ते तू केलंस, आता मला जे करायचं आहे ते मी करेन. निघ बाहेर.’’

विदिशा हताश होऊन पुन्हा बाहेरच्या बाकडयावर येऊन बसली, पण डोळयातील अश्रू थांबत नव्हते.

‘‘सर, ती मुलगी खुपच रडते आहे बाहेर. तिला घरी पाठवू का?’’

क्षितिज काहीच बोलला नाही. शेवटी कदमने स्वत:च विदिशाला घरी सोडून दिले. विदिशा गावाकडे गेली. आईला भेटली. दोघीही गळयात गळे घालून रडू लागल्या.

‘‘माझी पोरगी, कशात अडकलीस? तुझ्याकडून खुन होणे शक्यच नाही. कशी सुटशील तु आता यातून?’’

‘‘मी तुम्हाला सगळयांना छळलंना म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे आई. म्हणतात ना पेरतो तेच उगवतं.’’

‘‘काही होणार नाही आहे तुमच्या पोरीला. केस सॉल्व्ह झाली आहे मावशी. असलम नावाच्या माणसाने गुन्हा कबूल केला आहे. वेदिकाचा प्रियकर होता तो. दोघांचाही पैशावरून वाद होता आणि त्यातच हा खुन झाला. तुमची मुलगी निर्दोष आहे. आता लवकर बऱ्या व्हा आणि दवाखाना सोडा,’’ क्षितिज पटपट बोलून निघून गेला. विदिशाचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती क्षितिजच्या मागे पळू लागली.

‘‘सर, सर मी तुमचे हे उपकार कसे फेडू?’’

‘‘लग्न कर माझ्याशी,’’

‘‘काय?’’

‘‘जस्ट जोकिंग. मुलगा आहे मला आता एक वर्षाचा, मिस विदिशा.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें