सत्य वचन वदली प्रिया

मिश्किली * डॉ. गोपाळ नारायण आवटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आमच्या बायकोला व्हॉट्सअॅपचं वेड लागलंय. रात्र रात्र जागून मेसेज पाठवत असते. मेसेज वाचत असते. एकदा रात्री जागा झालो अन् सौ.ला बघून घाबरलोच. ती चक्क एकटीच हसत होती. आम्ही घाबरून विचारलं, ‘‘काय झालं गं?’’

हसू आवरत ती उत्तरली, ‘‘एक जोक आलाय. ग्रूपला जॉइन झेलेय ना मी, त्यामुळे फोटो आणि मेसेजेस येत असतात. ऐकवू?’’ ती फारच उत्साहात होती.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्ही झोपाळू आवाजात म्हणालो, ‘‘ऐकव.’’

बायको ऐकवत होती. जेव्हा तिचं ऐकवून झालं, तेव्हा तिला बरं वाटावं म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘व्वा! फारच छान.’’

‘‘एक बोधकथाही आलीए. तीही ऐकवू?’’ अन् आमच्या ‘हो, नाही’ची वाटही न बघता ती वाचायला लागली.

सौ.च्या गदागदा हलवण्याने आम्ही दचकून जागे झालो. ‘‘का गं? काय झालं?’’

‘‘कशी होती बोधकथा?’’

‘‘कोणाची बोधकथा?’’

‘‘जी मी आता वाचली ती…’’

‘‘सॉरी डियर, आम्हाला झोप लागली होती.’’

‘‘मी कधीची तुम्हाला वाचून दाखवतेय…’’ सौ. रूसून म्हणाली.

‘‘माय लव्ह, रात्री तीन वाजता माणूस झोपेलच ना? रात्रभर जागलो तर सकाळी लवकर उठणार कसे? दुपारी ऑफिसात काम कसं करणार?’’ डोळे चोळत आम्ही म्हणालो.

‘‘तुमचं मुळी माझ्यावर प्रेमच नाहीए,’’ सौ. आता संतापण्याच्या बेतात होती.

आम्ही पटकन् उठून बसलो, ‘‘बरं, वाच,’’ म्हटल्याबरोबर ती मोबाइलवरची कथा वाचायला लागली. साडेतीनपर्यंत आम्ही जागलो अन् ऑफिसला उशिरा पोहोचलो.

पूर्वी बायको आमच्याशी बोलायची. आम्ही ऑफिसातून परतून आलो की चहाफराळाचं बघायची. पण हे व्हॉट्सअॅप आलं अन् ती पार बदलली की हो, आता ती कुणास ठाऊक कुणाकुणाशी सतत मोबाइलवरून मेसेजची देवाणघेवाण करत असते. नेट अन् मोबाइलचं बिल आम्ही भरतोए. अन् जेवायला अगदीच काही तरी थातुरमातुर समोर येतंय अन् सकाळसंध्याकाळच्या ब्रेकफास्ट अन् स्नॅक्सची तर अजूनही वाईट परिस्थिती आहे.

आम्ही विचार केला सासूबाईंची मदत घ्यावी, त्या काही तरी तोड काढतील. तर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘बेबीला रागावू नका…सामोपचाराने तोडगा काढा.’’

आमची प्रौढावस्थेतील सौ. तिच्या आयेला अजून बेबीच वाटतेय…तर आम्ही ठरवलं सौ.शी बोलूयात.

एका रजेच्या दिवशी आम्ही प्रेमाने तिला म्हटलं, ‘‘असं सतत स्मार्ट फोनवर असण्याने डोळे बिघडतील तुझे…’’

‘‘नाही बिघडणार…एक काम करा ना, तुम्हीही एक फोन घ्या अन् आमच्या  ग्रूपमध्ये या. खरंच, अहो आमच्या मित्रांचा एक खूप चांगला ग्रूप आहे. खूप मजा करतो आम्ही. खूप गप्पा करतो. खरंच, किती किती छान शोध लावलाय या मोबाइल फोनचा अन् व्हॉट्सअॅप तर काही विचारूच नका.’’ सौ. आपल्यातच गुंग होती. आम्ही तिला किती वेळा समजावून सांगितलंय, ‘‘हे जग खरं नसतं. हे सगळं आभासी जग आहे,’’ पण ती त्या दुनियेतच रमलेली असते.

आमचं वैवाहिक आयुष्य पार ढवळून निघालंय. आम्ही काय करावं ते सुचत नाहीए. त्यावरचा उपाय आम्हाला सापडत नाहीए.

शनिवारी रात्री आम्ही झोपण्याच्या तयारीत असताना सौ.ने जवळ येऊन प्रेमाने म्हटलं,

‘‘अहो. ऐकलंत का?’’

‘‘काय?’’

‘‘या व्हॉट्सअॅपमुळे ना, खूप चांगल्या लोकांशी मैत्री होते. नव्या नव्या मोठ्या लोकांशी ओळखी होतात.’’

‘‘असं?’’

‘‘खूप श्रीमंत अन् खूप वरपर्यंत पोच असलेल्या स्त्रियांशी गप्पा होतात,’’ सौ. सांगत होती.

आम्हाला त्यात गम्य नव्हतं. आम्ही गप्प होतो.

‘‘मी तर कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या आयुष्यात मी वेगवेगळ्या ग्रूप्समधल्या दीड हजार लोकांशी मैत्री करेन. दीड हजारांची लिस्ट आहे.’’

‘‘ज्याला इतके मित्र असतात त्याचा कुणीही मित्र नसतो. कारण खरे मित्र आयुष्यात एक किंवा दोनच असतात.’’ आम्ही चिडून बोललो.

‘‘तुम्ही जळताय का? जेलस?’’

‘‘हॅ, आम्ही का जळू?’’

‘‘माझे सगळे फ्रेंड चांगल्या खानदानी कुटुंबातले आहेत. शिवाय श्रीमंत आहेत.’’

‘‘तर मग आम्ही काय करू?’’ आमचा संताप संताप चाललेला.

‘‘अहो, मी तर एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार होते.’’

आम्ही सावध झालो. ‘‘कसली गोष्ट.’’

‘‘माझ्या दोनतीन मैत्रिणी उद्या मला भेटायला येताहेत. त्या खूप श्रीमंत आहेत.’’

‘‘तर? आमचा काय संबंध?’’

‘‘प्लीज, उद्या मला बाजारातून छान छान पदार्थ आणून द्या नाश्त्यासाठी…काही मी घरी करेन. अहो, आम्ही ना प्रथमच भेटणार आहोत. अहाहा…किती रोमांचक क्षण असेल ना तो?…अपरिचित मैत्रिणींशी भेट!!’’

‘‘त्या भवान्या राहातात कुठे?’’

‘‘इथेच भोपाळमध्येच!’’

‘‘अच्छा…तर उद्या पार्टी आहे?’’

‘‘पार्टीच समजा, त्या तिघी आहेत. त्या येतील, मग मी पुढे कधी तरी त्यांच्या घरी जाईन. आयुष्य म्हणजे तरी काय हो? एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं याचंच नाव आयुष्य!’’ तत्त्ववेत्त्वाच्या थाटात सौ. बोलत होती.

‘‘ए बाई, प्लीज आम्हाला झोपू दे. अगं महिन्याचा शेवटचा आठवडा आहे अन् तुला पार्ट्या कसल्या सुचताहेत?’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी खर्च करेन ना?’’ सौ.ने समजूत घातली.

‘‘खर्च तू कर किंवा मी कर, पैसे माझेच जातील ना? माय डियर, या आभासी जगातून बाहेर ये. त्यात काही तथ्य नाहीए.’’ आम्ही समजावलं.

‘‘अहो, पण त्या उद्या येताहेत?’’

‘‘येऊ देत. आपण घराला कुलूप घालून बाहेर निघून जाऊ.’’

‘‘छे : छे:, भलतंच काय? असं नाही चालणार. हे तर वचनभंग करण्यासारखं आहे.

मला ते मान्य नाही. मी तसं करणार नाही,’’ सौ. बाणेदारपणे म्हणाली.

‘‘मग? काय करायचं म्हणतेस?’’

‘‘त्यांच्यासाठी खानदानी ब्रेकफास्टची व्यवस्था करा.’’

‘‘एकदा पुन्हा विचार कर. ज्या फेसबुकच्या आभासी दुनियेत तू वावरतेस, तिथल्या लोकांना तू ओळखत नाहीस, कधीही भेटलेली नाहीस, तरी कशाला आमंत्रण देऊन बोलावतेस?’’ आम्ही वैतागून बोललो.

‘‘प्लीज, फक्त एकदा बघूयात. हा अनुभव वाईट ठरला तर मी व्हॉट्सअॅपला कायमचा रामराम ठोकेन.’’ सौ.ने आम्हाला आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी सौ. पहाटेलाच उठली. भराभर स्वत:चं आवरलं. घर साफसूफ केलं. ड्रॉइंगरूम नीटनेटकी केली. नाश्त्यासाठी काही पदार्थ तयार केले. नंतर चहा करून आम्हाला उठवलं. आम्ही निवांतपणे चहा घेतल्यावर ती म्हणाली, ‘‘दहापर्यंत त्या येतील. त्या आधी तुम्ही बाजारातून एवढं सामान आणून द्या.’’

भली मोठी यादी आमच्या हातात देऊन सौ. इतर कामाला लागली.

ती यादी बघूनच आमचा जीव दडपला. बाप रे! एक वेळचा ब्रेकफास्ट आहे की महिन्याभराचं घरसामान? ज्या मिठायांची नावं कधी ऐकली नाहीत, जी फळं बापजन्मात कधी बघितली नाहीत, ती सर्व नावं त्या यादीत होती. पैसे दिलेच नाहीत. आम्ही आमचं पाकीट अन् जुनी खटारा स्कूटर घेऊन बाजारात गेलो. येताना ऑटोरिक्षात सर्व सामान भरून आणलं.

आनंदाने सौ. ने आम्हाला मिठीच मारली. आम्ही आमची कशीबशी सुटका करून घेतली अन् खोलीत गेलो.

सौ. स्वयंपाकघरात पदार्थांची मांडामांड करण्यात दंग होती. आम्ही बावळटासारखे विचार करत होतो. ओळख ना पाळख अन् एवढा स्वागतसत्काराचा सोहळा. तेवढ्यात तिच्या मोबाइलवर मेसेज आला, ‘‘घर शोधतोए, सापडत नाहीए.’’

सौ.ने मेसेज टाकला, ‘‘घिस्सू हलवायाच्या दुकानाशी माझा नवरा तुम्हाला भेटेल.’’

तिने आमच्याकडे बघितलं. आम्ही मुकाट्याने स्कूटर काढली. घिस्सू हलवाई आमच्या एरियातला प्रसिद्ध मिठाईवाला होता. सौ.ने मोबाइलवरून त्यांना आमच्या रंगरूपाची, कपड्याची, स्कूटरच्या रंगाची इत्थंभूत माहिती दिली. आता ओळखायला त्यांना अजिबात त्रास होणार नव्हता.

घिस्सू हलवायाच्या दुकानाशी एक काळ्या रंगाची चकचकीत महागडी मोटार येऊन थांबली. त्यातल्या ड्रायव्हरने आम्हाला विचारलं, ‘‘मिस्टर अमुकतमुक आपणच का?’’

‘‘होय मीच!’’

‘‘तुमच्या घरी जायचंय.’’

‘‘आम्ही घ्यायलाच आलो आहोत.’’ आम्ही वदलो. आत कोण आहे ते दिसत नव्हतं. महागड्या पडद्यांनी गाडीच्या खिडक्या झाकलेल्या होत्या.

आमची खटारा स्कूटर पुढे अन् ती आलीशान गाडी आमच्या मागेमागे.

थोडं पुढे जाऊन आम्ही स्कूटर थांबवली. कारण पुढल्या अरुंद गल्लीत ती भव्य गाडी जाऊ शकत नव्हती. आम्ही वदलो, ‘‘यापुढे पायीपायी जावं लागेल.’’ आम्ही स्कूटर एका घराच्या भिंतीला टेकवून उभी केली.

गाडीचा दरवाजा उघडला. आतून तीन धष्टपुष्ट, भरपूर मेकअप केलेल्या, दागिन्यांनी मढलेल्या महागड्या साड्या नेसलेल्या महिला उतरल्या. आमचं हृदय धडधडू लागलं. प्रथमच बायकोचा अभिमान वाटला की तिच्या मैत्रिणी इतक्या श्रीमंत आहेत.

आमच्या मागे येणारी वरात बघायला मोहल्ल्यातील घरांच्या खिडक्याखिडक्यांतून माणसं गोळा झाली. आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले होते. आमच्यासारख्यांकडे असे भव्यदिव्य पाहुणे म्हणजे नवलच होतं. आम्ही घरापाशी आलो. सौ.ने बसवलं. पंखा सुरू केला. त्या इकडेतिकडे बघत होत्या. बहुधा ए.सी. शोधत असणार.

आमच्या लक्षात आलं, वरवर सौ. प्रसन्न दिसत असली तरी मनातून ती आनंदली नव्हती. काही तरी खटकलं होतं. काय ते आम्हाला कळत नव्हतं.

सौ.ने भराभर पाणी आणलं. खाण्याचे पदार्थ आणून मांडले. एकूणच तिला पाहुणे लवकर जावेत असं वाटत होतं. आम्हाला आपलं वाटलं की आपल्या गरिबीचं टेन्शन तिला आल्यामुळे ती अशी वागतेय की काय. ती फार बेचैन वाटत होती. गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं. मैत्रिणी जाण्यासाठी उठल्या. आम्हीही निरोप द्यायला सामोरे आलो.

‘‘बराय, भावोजी, येतो आम्ही,’’ एक पुरुषी आवाज कानावर आला.

‘‘बराय, बराय.’’

आम्ही त्यांच्यासोबत निघणार तोच दुसरीने म्हटलं, ‘‘असू देत हो, आता आमचे आम्ही जाऊ,’’ तो आवाजही काहीसा वेगळाच, विचित्र वाटला.

निरोप घेऊन त्या गेल्या अन् कपाळावरचा घाम पुसत सौ. सोफ्यावर बसली. एकाएकी आम्हाला उमजलं अन् आम्ही जोरजोरात हसायला लागलो.

हा.हा.हा.हा.हा.हा…

‘‘आता पुरे.’’ सौ. रागावून खेकसली.

‘‘तर या होत्या तुझ्या किन्नर सख्या…’’ आम्हाला पुन्हा हसायला येऊ लागलं.

‘‘त्यांनी ही गोष्ट लपवली होती माझ्यापासून,’’ सौ.ने आपल्याकडून सफाई दिली.

‘‘म्हणजे तुमच्या आभासी जगातल्या, फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवरच्या मैत्रिणी अशा असतात तर?’’ आम्ही पोट धरून पुन्हा हसू लागलो.

आता मात्र सौ. एकदम भडकली. ती एकदम म्हणाली, ‘‘का? किन्नर माणसं नसतात? कुणाशी?भेटावं, बोलावं, मैत्री करावी अशी इच्छा त्यांना होत नसेल? कुणी चांगली मैत्रीण मिळावी, जिवाभावाचा मित्र मिळावा, त्याच्याकडे जावं, आपल्याकडे त्याला बोलवावं असं त्यांना वाटलं तर त्यात गैर काय आहे? सामान्य माणसासारखं जगण्याचा त्यांचा हक्क नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? किती काळपर्यंत आपण त्यांची चेष्टामस्करी करणार? त्यांना दूर ठेवणार? त्यांचे प्रश्न आपण समजून घ्यायला हवेत. त्यांना सन्मानाचं आयुष्य जगता येईल असं व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवं. सामान्य माणूस म्हणूनच त्यांना मित्रत्त्वाच्या भावनेने जवळ करायला हवं.’’

तिचं हे बोलणं ऐकून आमचं हसणं थांबलं. ती जे बोलली ते शंभर टक्के खरं होतं. आपण विचार करायला हवा. माणुसकी जपायला हवी. सौ.चा आम्हाला अभिमान वाटला.

संतुलन

कथा * ऋता गुप्ते

रमा भराभर कामं आटोपत होती. नजर मात्र स्वयंपाकघरातल्या घड्याळाकडे होती, त्याचवेळी कान बाहेरच्या फाटकाच्या आवाजाकडे लागलेले होते. चहाचा घोट घेत तिनं सँडविच टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाइस लावले.

तिनं मुलाला हाक मारली, ‘‘श्रेयांश, अंघोळ लवकर आटोप…शाळेला उशीर होईल.’’

‘‘मम्मा, माझे मोजे दिसत नाहीत.’’

मोजे शोधण्याच्या गडबडीत चहा पार गार झाला. रमानं मोजे दिले. त्याची स्कूल बॅग चेक केली. पाण्याची बाटली भरली.

‘‘चल बाळा, दूध कॉर्नफ्लेक्स घे. केळंही खा.’’

‘‘मम्मा, आज डब्यात काय दिलं?’’

श्रेयांशच्या या प्रश्नालाच ती घाबरत होती. त्याची नजर टाळत तिनं म्हटलं, ‘‘सँडविच.’’

‘‘काय…मम्मा, अगं काल पण तू तेच दिलं होतंस…मला नको डबा…इतर मुलांच्या आया काय काय, नवंनवं देतात डब्यात…’’ रडवेला होऊन श्रेयांश म्हणाला.

‘‘बाळा, आपली मालतीबाई दोन दिवस झाले येत नाहीए. ती आली की तुला रोज छान छान पदार्थ मिळतील डब्यात….प्लीज हट्ट करू नकोस, नाहीतर पैसे देते. स्कूल कॅण्टीनमधून काहीतरी घे आजच्या दिवस.’’

इतर मुलांच्या आया तिच्यासारख्या वर्किंग नव्हत्या. पण ऑफिसमधून येतानाच इतका उशीर झाला की शेवटी येतानाच तिनं रात्रीसाठी डिनर पॅक करून आणला.

घड्याळात सात वाजले. स्कूलबस येणारच होती. मालती अजूनही आलेली नव्हती. श्रेयांशचा लाडाने गालगुच्चा घेत ती त्याच्यासकट पायऱ्या उतरू लागली.

या कामासाठी ठेवलेल्या बायकांनाही स्वत:चं महत्त्व बरोबर ठाऊक असतं. त्यामुळेच त्या कधी उशीरा येतात, कधी दांड्या मारतात. मालती गेली तीन वर्षं तिच्याकडे काम करतेय. सकाळी बरोबर सहाला ती कामावर हजर होते आणि रमा कामावर जाण्याआधी नऊ वाजेपर्यंत तिची कामं आटोपलेली असायची. ती स्वयंपाक फार छान करायची, त्यामुळे लंचबॉक्समध्ये नेहमीच चविष्ट पदार्थ असायचे. सायंकाळी रमा सहापर्यंत घरी यायची, त्यावेळी मालती पुन्हा यायची. सायंकाळच्या चहासोबत काहीतरी खायलाही द्यायची अन् रात्रीचा स्वयंपाक करून निघून जायची.

मालतीचा रमाला खूप आधार होता. तिच्यामुळेच ती ऑफिसच्या कामात पूर्णपणे लक्ष देऊ शकत होती. घराची काळजी नव्हती. त्यामुळेच तीन वर्षांत रमानं दोन प्रमोशन्स मिळवली होती. आता तर तिचा पगार रोहनपेक्षा दुप्पट झाला होता. पण मालती नसली तर मात्र तिच्या हालांना सीमा नसायची. वाढलेला पगार अगणित नव्या जबाबदाऱ्या घेऊनच आला होता. अर्थात वाढलेल्या पगारामुळे घरातली सुबत्ता अन् सुखसुविधाही वाढल्या होत्या. इतक्या पॉश लोकॅलीटीत असा आलिशान फ्लॅट घेणं त्यामुळेच शक्य झालं होतं.

तसं त्यांचं कुटुंब तीन माणसांचंच होतं. त्यामुळे मालती घरकाम करत असताना इतर कुणी नोकर किंवा अजून एखादी कामवाली मदतीला ठेवण्याची गरज भासली नव्हती. मालती साधारण रमाच्याच वयाची होती. कामही मन लावून, प्रामाणिकपणे करायची. त्यामुळेच रमाही तिची खूप काळजी घ्यायची. पगार भरपूर द्यायचीच. शिवाय इतरही बरंच काही करायची. मालती जणू घरातलीच एक सभासद असल्यासारखी झाली होती. पण अलीकडे काही दिवस मालतीचं वागणं बदललं होतं. सकाळी उशीरा यायची. कित्येकदा यायचीच नाही. न सांगता दोन दिवस गैरहजर रहायची. अशावेळी रमाची फारच ओढाताण व्हायची. पण तिच्या कामाचाच तिला इतका ताण असायचा की मालतीला रागवणं अथवा जाब विचारणंही तिला परवडणारं नव्हतं.

श्रेयांशला बसमध्ये बसवून बाय करून रमा घाईनं घरात आली. हॉलमध्ये बऱ्यापैकी पसारा होता. तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून ती स्वयंपाकघरात शिरली. किमान दोन भाज्या अन् पोळ्या करून ठेवायची तिची इच्छा होती कारण आजही तिला ऑफिसात जास्त वेळ थांबावं लागणार होतं.

हात कामं उरकत होते अन् मेंदू आज ऑफिसमध्ये होणाऱ्या मिटिंगमध्ये गुंतला होता. उशीरा एका परदेशी क्लायंटबरोबर एक मोठं डिल व्हायचं होतं. त्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायची होती. एकूणच कामं खूप होती. तिचं स्वयंपाकघरातलं कामंही ओटोपत आलं होतं. आता रोहनला उठवायला हवं, नाहीतर त्यालाही उशीर होणार.

रोहन अगदी टिपिकल नवरा होता. घरकामात रमाला मदत करावी असं त्याला चुकूनही वाटत नसे. उलट कामं वाढवून ठेवायला त्याला मजा यायची. काल रात्री तो बराच उशीरा घरी आला होता. उगीच भांडण व्हायला नको म्हणून रमानं काहीच विचारलं नव्हतं. खरं तर त्याची बँक संध्याकाळी सहालाच बंद व्हायची. तिच्या हेही लक्षात आलं होतं की हल्ली रोहन फार जास्त पैसे खर्च करतोय. त्याचे छंदही महागडे होते. सतत महागड्या हॉटेलातल्या पार्ट्या रमाला आवडत नव्हत्या, पण मग ती विचार करायची इतकं कमवतोय ते कशासाठी? घर, दोन गाड्यांचे दर महिन्याला भरायचे हप्ते अन् त्यावरचं व्याज याबद्दल विचार करताना कामं अधिकच घाईनं व्हायची.

काल तिनं रात्री रोहनला अत्यंत सौम्यपणे म्हटलं, ‘‘ तू श्रेयांशला घ्यायला आईकडे गेला नाहीस. तो वाट बघून तिथंच झोपला. आईचं हार्टचं ऑपरेशन झालंय…तिला दगदग सोसत नाही. लहान मुलाची उठाठेव भरपूर असते…रात्री घरी आल्यावर मी त्याला घेऊन आले.’’

खरंतर मनात होतं त्याला चांगलंच फटकारावं की क्रेडिट कार्डाचं बिल इतकं अवाढव्य का आलंय? पण तिनं तो विषय काढलाच नाही.

पण रोहन तेवढ्यातच भडकला, ‘‘हो तर मी अगदी रिकामटेकडाच आहे ना. मॅडम स्वत: रात्री उशीरा येणार अन् मी लवकर घरी येऊन मुलं सांभाळायची?’’

रोहनच्या या बोलण्यावरही रमा गप्पच राहिली. मुकाट्यानं लॅपटॉपवर काम करत बसली. क्लायंटच्या मिटिंगच्या आधी हे प्रेझेंटेशन तयार करून तिला तिच्या हाताखालच्या लोकांना दाखवणं गरजेचं होतं. तिनं हळूच रोहनकडे बघितलं, रोहन सरळ अंथरूणावर पसरला होता. तिची बोटं विजेच्या गतीनं लॅपटॉपवर फिरत होती.

तिनं चहा करून घेतला. रोहन अजून उठला नव्हता. स्वत:चा चहा घेऊन ती ऑफिसला जायला तयार होऊ लागली. सगळे पेपर्स गोळा केले. लॅपटॉप बंद केला. भराभर थोडंसं खाऊन घेतलं. आज महत्त्वाची मिटिंग होती. फिकट गुलाबी फॉर्मल शर्टवर कोणती पॅण्ट घालावी याचा विचार ती करत होती.

तेवढ्यात रोहन उठल्याची चाहूल लागली. त्याचा चहा त्याला तिथंच द्यावा म्हणून ती खोलीत गेली.

‘‘गुड मॉर्निंग डार्लिंग…लवकर चहा घे. मला आता निघायला हवं.’’

‘‘काय कटकट आहे गं? बघावं तेव्हा तुझी घाईच असते. कधीतरी जरा बैसना माझ्यापाशी.’’ रोहननं पडल्यापडल्याच तिला जवळ ओढायचा प्रयत्न केला. ‘‘मला चहा नकोय. भूक लागली आहे. मी आधी खाणार.’’ तिला अंथरूणात ओढत त्यानं म्हटलं.

‘‘रोहन, आत्ता रोमँटिक होऊ नकोस. मला उशीर होतोय. नाश्ता, लंच बॉक्स तयार आहे.?खाऊन घे. नऊ वाजताहेत, तू ही आवर.’’ स्वत:ला सोडवून घेत ती बाहेर निघाली.

‘‘रोहन मी गेले, दार लावून घे.’’ तिनं खाली येऊन गाडी काढली अन् ऑफिसला निघाली. डोक्यात मिटिंगचेच विचार होते.

उमेशला ती व्हिडिओ कॉन्फरन्सच्यावेळी स्वत:बरोबर ठेवेल. त्याला या प्रोजेक्टची सगळी माहिती आहे. शिवाय तो स्मार्टही आहे. जितेश मार्केटिंगची सगळी डिटेल्स आणतोय. एकदा हे प्रेझेंटेशन सगळ्यांना दाखवलं अन् त्यावर त्यांचं मत घेतलं की फायनल प्रेझेंटेशन रत्ना तयार करेल. ठरल्याप्रमाणे सगळं पार पडलं की आणखी एक प्रमोशन नक्की.

ऑफिसच्या गेटपाशी पोहोचली अन् तिच्या लक्षात आलं की निघायच्या घाई गडबडीत लॅपटॉप, लंच बॉक्स अन् महत्त्वाचे कागद घरीच राहिले आहेत.

कालपासून इतकी दगदग अन् धावपळ चालली आहे की मेंदू पार दमला होता. तिनं कार परत घराकडे वळवली. बाहेर रस्त्यावरच कार उभी करून ती घाईनं पायऱ्या चढून वर गेली. दार उघडंच होतं. आतून हसण्याबोलण्याचे आवाज येत होते.

‘‘व्वा व्वा मितूराणी, तू आज अगदी तृप्त केलंस. पोट भरलं माझं…यू आर ग्रेट,’’ रोहन म्हणाला.

‘‘साहेब, तुम्हीसुद्धा ना…’’

याचा अर्थ मालती आलीय. तिलाच रोहन मितू म्हणतोय. रमाला घेरी आल्यासारखं झालं. पाय जड झाले होते. जीभ टाळ्याला चिकटली होती. रोहनचं हसणं अन् मालतीच्या बांगड्यांची किणकिण डोक्यात हातोडे मारत होती. आल्या पावली ती परत फिरली. पायाखालची जमीन सरकली होती. ती कारमध्ये जाऊन बसली. लॅपटॉप, कागदपत्रं कशाचीही शुद्ध नव्हती.

माझ्या पाठीमागे हे कधीपासून सुरू आहे…मला अजिबात संशय आला नाही. पण रोहननं असा विश्वासघात करावा? सरळ काम करणाऱ्या मोलकरणीशी रत व्हावं? अन् मालती. माझं घर सांभाळता सांभाळता सरळ नवराच ताब्यात घेतला की तिनं. मालतीच्या धाडसानं ती फारच संतापली. विचलितही झाली. रोहन तिच्यापासून इतका दूर कधी गेला?…खरं तर त्याला रमा हवी होती. तो कायम तिला जवळ घ्यायला बघायचा पण कामाच्या नादात नवी आव्हानं, नवे प्रोजेक्ट, प्रमोशनच्या गडबडीत रमानंच त्याला दूर केलं होतं. तो तरी किती काळ संयम ठेवेल?

रोहनला या मार्गावर जाण्याची गरज का पडली? कारण रमाकडून त्याला हवं ते सुख मिळत नव्हतं. अन् हे कसं…केव्हा घडलं…दोघांचा प्रवास एकाच गतीनं एकाच वाटेने सुरू होता, पण नकळत रमाची गती वाढली. खूपच वाढली. ती खूप पुढे निघून गेली. रोहन फार मागे राहिला. पण रमासुद्धा घर, नवरा, मुलगा यांच्यासाठीच खपत होती. भरपूर पैसा मिळवत होती म्हणूनच ही लाइफस्टाइल मिळाली होती. रोहननेही विचार करायला हवा होता. विश्वासघात करणं, परक्या स्त्रीशी संबंध ठेवणं, उधळेपणा करणं, त्याला तरी शोभतं का? मनात विचारांचा कल्लोळ होता. बेभानपणे ती गाडी चालवत होती. शेजारच्या सीटवरचा मोबाइल सतत वाजत होता. ऑफिसमधून फोनवर फोन येत होते. एका बहुराष्ट्रीय कंपनीतली उच्चपदस्थ अधिकारी असलेली रमा याक्षणी स्वत:ला खूपच असहाय्य, पराभूत समजत होती.

रमाला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. रोहन अन् श्रेयांश चिंतातूर मुद्रेनं तिच्याजवळ बसून होते. एकाएकी ब्लडप्रेशर खूपच वाढलं अन् ती बेशुद्ध झाली. सुदैवानं गाडी एका वाळूच्या ढिगावर आपटली. त्यामुळे रमाला फार लागलं नव्हतं. काही दिवस तिला हॉस्पिटलमध्ये रहावं लागलं. ऑफिसमध्ये सहकारी भेटायला आले होते. ती नसल्यामुळे ऑफिसात बरेच प्रॉब्लेम्स झाले होते. रमानं त्यांना आश्वस्त केलं की जरा तब्येत सावरली की ती ऑफिसात यायला लागेल.

रोहनला बघूनच तिच्या मनात तिरस्कार दाटायचा. त्याचं त्या दिवशीचं बोलणं, त्याचं हसणं, मालतीच्या बांगड्यांचा आवाज सगळं कानात दणाणायचं. रोहनला घटस्फोट देण्याचा विचारही मनात येऊन गेला. पण श्रेयांशला बघितलं की तो विचार मागे पडायचा. त्याचं आयुष्य आपल्या निर्णयामुळे उद्ध्वस्त व्हायला नको. अन् एवढी बुद्धिमान कर्तबगार स्त्री स्वत:च्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकते. फार अवघड नाहीए ते.

‘श्रृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही’ ही कविता तिची फार आवडती होती. विपरीत परिस्थितीत शांतपणे झुंजायची प्रेरणा यातून तिला मिळायची. आत्ताही तिनं त्या ओळी गुणगुणच्या…फार बरं वाटलं.

लवकरच ती पुन्हा ऑफिसला जायला लागली. तिथली विस्कटलेली घडी नीट बसवताना बरेच श्रम घ्यावे लागले. पण तिची टीम, तिचा स्टाफ खरोखर खूपच छान होता. सगळ्यांच्या सहकार्यानं लवकरच सगळं ठीकठाक झालं.

ती घरी आली, त्याचवेळी तिची एक मैत्रीण आली होती. ती बरीच वर्षं अमेरिकेत होती. बोलता बोलता तिनं सांगितलं, ‘‘अमेरिकेत कामाला नोकर माणसं, मोलकरीण मिळत नाही. नवरा बायको दोघं मिळून घरातली सगळी कामं करतात. अगदी भांडी धुणं, कपडे धुणं, केरवारे, स्वयंपाक सगळ्याच कामात नवरा बायकोच्या बरोबरीनं मदत करतो. स्वत:च्या घरात काम करताना लाज कशाला वाटायला हवी?’’

रात्री ती रोहनला म्हणाली, ‘‘रोहन, मी विचार केला, मी नोकरीचा राजीनामा देणार आहे. घरी राहून तुझी अन् श्रेयांशची काळजी घेईन. तू म्हणतोस ना मी फार कामात असते, तुला वेळ देत नाही. तुझी तक्रारही दूर होईल.’’

दचकून रोहननं तिच्याकडे बघितलं. ती गंमत करत नव्हती. गंभीरपणेच बोलत होती. एका क्षणात तो भानावर आला. श्रेयांशच्या महागड्या शाळेची फी, फ्लॅट अन् दोन गाड्यांचे हफ्ते हे सगळं त्याच्या पगारात शक्य नव्हतं. अन् हल्ली तर त्याचे ते चैनचंगळीचे छंद हे फक्त रमाच्या भरभक्कम पगारामुळेच शक्य होतं. रमानं खरोखर नोकरी सोडली तर?

‘‘नाही डियर, नोकरी सोडायचं का बरं मनात आलं तुझ्या? मी आहे ना?’’ त्यानं उसनं अवसान आणून म्हटलं.

‘‘मी नोकरीवर गेले म्हणजे तुला मिनू सोबत रंगलीला करता येतील…असंच ना? नाही, आता मी कामाला मोलकरीण ठेवणार नाही…घरकाम मीच करेन.’’

रोहनचा चेहरा शरमेनं काळाठिक्कर पडला. तो चक्क गुडघ्यावर बसून तिची क्षमा मागू लागला…नोकरी न सोडण्याबद्दल विनवू लागला. भारतीय स्त्री, मग ती निरक्षर,   अडाणी असूं दे किंवा उच्चशिक्षित…तिची  इच्छा आपला संसार वाचवण्याचीच असते. रमानंही रोहनला एक संधी द्यायचा विचार केला. एरवी दुसरा पर्याय तिला केव्हाही उपलब्ध होताच!

आता रमाचं घर अन् ऑफिस दोन्ही छान चालू आहे. रोहन अन् श्रेयांशच्या मदतीनं घरकाम आटोपतं. सहकाऱ्यांच्या मदतीमुळे ऑफिसचं काम होतं. घर आणि ऑफिस दोहोंमध्ये संतुलन साधायचं असं तिनं ठरवलंय एखादं प्रमोशन कमी मिळालं तरी चालेल, पण घरासाठी वेळ द्यायचाच अन् आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यायची.

नोकरी सोडण्याच्या धमकीमुळे रोहनही आता वठणीवर आला आहे. दोघांमधले संबंध सुधारले आहेत. सगळ्यात खुश आहे श्रेयांश, कारण आता त्याला आई बाबा दोघांचा सहवास मिळतोय. शिवाय डब्यात रोज छान छान पदार्थ मिळताहेत. तेही आईच्या हातचे त्यात आईचं सगळं प्रेमही समावलेलं असतं. रमाही समाधानी आहे कारण तिला संतुलन साधता आलं आहे. घर अन् ऑफिस आता व्यवस्थित चालू आहे.

गुरू महाराज

कथा * दीपा पांडे

‘‘ते काही नाही, आज मला आश्रमात जायचंय. नाश्ता तयार करून ठेवलाय. सकाळचं जेवण वाटलं तर ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये घ्या किंवा गुरूजींच्या आश्रमातल्या महाभोजन समारंभात या जेवायला.’’ ड्रेसिंग टेबलसमोर बसून आपला साजश्रृंगार करता करता अनीता नवऱ्यावर डाफरत होती.

‘‘आज एक महत्त्वाची मिटिंग आहे ऑफिसात. मला लंचसाठी वेळ मिळतोय की नाही काहीच कल्पना नाही. मिटिंग लांबूही शकते,’’ विनयनं म्हटलं.

४५ वर्षांची अनीता एक अत्यंत कर्कश्श स्वभावाची बाई आहे. सतत ती भांडणाच्या पवित्र्यात असते. घर असो, घराबाहेर असो, भांडायची एकही संधी ती सोडत नाही. नवरा विनय अन् मुलगी नीति तिच्यासमोर तोंड उघडतच नाहीत. शेजारीही सतत टाळत असतात. सगळ्या कॉलनीत ती भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध आहे.

घरात मोलकरीण कधी टिकत नाही. कितीही चांगलं काम करणारी बाई असली तरी दोन तीन महिन्यात ती काहीतरी भांडण करून बाईला हाकलून देते. मधले चार सहा महिने स्वत: काम करते, पुन्हा नवी बाई शोधते. दोन चार महिने झाले की पुन्हा तिला काही तरी कारण काढून कामावरून काढून टाकते. तिच्यातले दोष काढायचे म्हटले तर भलीमोठी यादी तयार होईल. पैसा हातातून सुटत नाही. नवऱ्याला तर सतत धारेवर धरते. तिच्या संमती शिवाय नवरा एक रूपयाही खर्च करत नाही. त्याला दिलेल्या पै न् पैचा हिशेब ती वसूल करते. सरकारी ऑफिसातला उच्च अधिकारी असलेला नवरा घरात चपराशी म्हणून वावरतो. कसा जगत असेल कुणास ठाऊक. पण कधी तरी तो एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलातून डिनर करून येतो. बहुधा त्याचे क्लायंट त्याला नेत असावेत. तो उशिरा घरी आला की त्यांची भांडणं होतात, त्यावरून आम्हाला कळतं. शिवाय अनीता दुसऱ्या दिवशी सकाळीच येते माझ्याकडे कारण माझी सख्खी शेजारीण आहे ती.

मी तिच्या नवऱ्याशी कधीच बोलत नाही. कारण अनीता तेवढ्यावरून माझ्या चारित्र्यावर घसरेल याची मला खात्री आहे. जिचा आपल्या नवऱ्यावर विश्वास नाही, ती माझ्यावर तरी कसा विश्वास ठेवेल? नेहमीच मला येऊन सांगते की तिच्या नवऱ्याचं त्याच्या सेक्रेटरीशी लफडं आहे. ‘‘मी एकदा त्याच्या ऑफिसात जाऊन त्याला रंगेहात पकडणार आहे.’’

‘‘अगं, पण ऑफिसात इतर अनेक लोक असतात ना? त्यांना ऑफिसात लफडं कसं करता येईल?’’

‘‘ते मला माहीत आहे, पण नवऱ्याला स्वतंत्र केबिन आहे. तिथं एक सोफाही आहे.’’ अनीता म्हणाली.

मला हसायलाच आलं, ‘‘म्हणजे सोफा त्यासाठी ठेवलाय?’’

‘‘हसून घे, हसून घे तू. तुझा नवरा नाकासमोर चालणारा आहे, माझ्या नवऱ्यासारखा असता तर कळलं असतं.’’ अनीता संतापली.

मी तर माझ्या नवऱ्याला ऑफिसबद्दल काहीच विचारत नाही. मला माहीत आहे की ऑफिसच्या कामाचं त्यांना एवढं टेन्शन असतं, त्यात रोमान्स करायला वेळच कुठं असतो? त्यामुळे त्यांना भलते प्रश्न विचारून त्यांना भंडावण्यापेक्षा त्यांचा ताणतणाव कमी कसा करता येईल हेच मी बघते.

‘‘माझा नवरा सदैव दुसऱ्या स्त्रियांचीच कौतुकं करत असतो. १०२ वालीचा ड्रेस सेन्स किती छान आहे. १०८ वालीचे केस किती सुंदर आहेत. १०५ वालीची फिगर छान आहे. आता जर हे मी जाऊन त्यांच्या नवऱ्यांना सांगितलं अन् माझा नवरा खरा कसा आहे हे त्या बायकांना सांगितलं तर त्याला असं काही सडकून काढतील की सगळे फ्लॅट नंबर विसरेल तो.’’ अनीता तणतणत होती.

‘‘अगं, त्यांना वाटत असेल ना, ऑफिसातून दमून घरी परततात तेव्हा छान नटून थटून बायकोनं प्रसन्न चेहऱ्यानं स्वागत करावं,’’ मी तिची समजूत घालत म्हणाले.

‘‘आणि घरातली कामं काय त्याचे नातलग येऊन करतील? घराची झाडलोट, स्वच्छता, स्वंयपाक, भांडी, धुणं हे करू की नटून थटून बसू?’’ अनीता प्रत्येक गोष्ट उलट्या बाजूनंच बघते.

‘‘तर मग एक मोलकरीण ठेव ना. कशाला संपूर्ण दिवस कामं करून दमतेस? स्वत:कडेही लक्ष देना जरा.’’

‘‘तुला माहीत नाही, अगं, यांचं तर त्या मोलकरणी बरोबरही लफडं असतं. मी नसताना काय बोलतो तिच्याशी कुणास ठाऊक. मला तर वाटतं चोरून चोरून तिला पैसेही देत असेल. नवरा ऑफिसला जाईपर्यंत तर मी स्नानही करू शकत नाही,’’ अनीता म्हणाली.

ऐकून मला आश्चर्यच वाटलं. मी विचारलं, ‘‘स्नान का करू शकत नाही?’’

‘‘अगं, तुला माहीत आहे, माझी मुलगी सकाळीच कॉलेजला निघून जाते, नंतर आम्ही दोघंच असतो घरात. मी अंघोळीला गेले अन् तेवढ्यात मोलकरीण आली तर यांना एकमदच मोकळीक मिळेल ना तिच्याशी लघळपणा करायला,’’ अनीतानं आपल्या मनांतला संशय बोलून दाखवला.

अनीताच्या संशयी वृत्तीमुळे घर म्हणजे नरक वाटायचा तिच्या नवऱ्याला. गेली दोन तीन वर्ष एका गुरू महाराजांच्या भजनी लागली होती. कधी त्यांनी मंत्रवलेलं पाणी नवऱ्याला पाजायची, कधी प्रसाद खायला लावायची. हल्ली तर मुलीलाही आश्रमात नेत होती. मुलगी कार ड्राइव्ह करायला लागल्यापासून दोघी मायलेकी दर गुरूवारी व रविवारी आश्रमात जायच्या. मुलीचं एमबीए पूर्ण झालं होतं. गुरूजींच्या कुणा शिष्यानं मुलीला कुठल्या तरी कंपनीत नोकरी लावून दिली होती. तेव्हापासून तर मायलेकी गुरूजींच्या पायाचं पाणी तीर्थ म्हणून पित होत्या. विनयलाही ती अधूनमधून भंडारा, महाभोजन वगैरे निमित्तानं आश्रमात घेऊन जायची. विनयची आई कधीतरीच इथं यायची पण तेवढ्या वेळात घरात असं महाभारत रंगायचं की विनय बिच्चारा पुन्हा आईला गावी सोडून यायचा. विनयच्या कोणत्याही नातेवाईकाशी अनीतानं संबंध ठेवले नव्हते. तो फारच एकटा पडला होता.

एक दिवस मलाही ती ओढून आश्रमात घेऊन गेली. ‘‘चल, आज तुला आमच्या नीतिच्या होणाऱ्या नवऱ्याला भेटवते. गुरूजींची फार मोठी कृपा आहे. एका अत्यंत होतकरू, कर्तबगार तरूणाशी त्यांनी आमच्या लेकीचं लग्न ठरवून दिलं. तुला तर ठाऊकच आहे, आपल्या कॉलनीतले लोक माझ्यावर जळतात. तू नितीचं लग्न होईपर्यं ही बातमी कुणालाच सांगू नको. फक्त तुलाच मी सांगते आहे,’’ माझ्यावर उपकार केल्याच्या थाटात ती म्हणाली.

‘‘चल जाऊ या,’’ मी जायला तयार झाले. नाहीतर ती म्हणायची की मी तिच्यावर जळते.

आम्ही कारनं आश्रमात पोहोचलो. चांगली आठ दहा एकर जागा होती आश्रमाची. भरपूर झाडं होती. गुरूजींचं निवासस्थान थोडं बाजूला होतं. तिथं निवडक लोकांनाच जाण्याची परवानगी होती.

बाहेर मोकळ्या वाऱ्यात खरंच छान वाटत होतं, पण अनीतानं मलाही आत ओढून नेलं. आत जाताना दोन तीन ठिकाणी आमची तपासणी केली गेली. इतक्या सिक्युरिटीची काय गरज होती ते मला समजेना. त्यानंतर आम्ही एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो. तिथं व्यवस्थित खुर्च्या मांडलेल्या होत्या. अनीतानं पटकन्  एक खुर्ची बळकावली. दुसरी माझ्यासाठी राखून ठेवली. मी मुकाट्यानं तिच्या शेजारी जाऊन बसले.

थोड्याच वेळात समोरच्या मंचावर गुरू महाराज अवतरले. जयजयकार आणि फुलांचा वर्षाव होऊ लागला. गुरूचं वय ५०-५५ असेल. भगव्या रंगाची कफनी, तशीच लुंगी, गळ्यात, हातात रूद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध फासलेलं, त्यावरच कुंकवाचा टिळा, डोक्याचा तुळतुळीत गोटा, दाढी मिशाही नव्हत्या. रंग गोरा होता. चेहरा गोल अन् त्यावरचे डोळे मिचमिचे, नाक फेंदारलेलं अन् जाड जाड ओठ, एकूणच त्यांचं दर्शन किळसवाणं वाटलं मला. ते काय सांगत होते ते मला डोक्यात शिरलंच नाही. त्यांच्या त्या विचित्र चेहऱ्याकडेच माझं लक्ष पुन्हा पुन्हा जात होतं.

अनीतानं हलकेच माझा हात हिसडला तेव्हा मी भानावर आले. हॉलमध्ये बहुतेक लोक एव्हाना निघून गेले होते. जे उरले होते ते क्रमाक्रमानं गुरूजीजवळ जाऊन आपली समस्या सांगत होत. गुरूजी त्यावरचे उपाय सांगत होते. नंतर त्या व्यक्तिच्या हातांचा किंवा माथ्याचा मुका घेत होते. मला तेही सगळं फारच किळसवाणं वाटत होतं. शेवटी अनीता उठली. मी मात्र लांबच उभी होते. अनीता गुरूजींच्या पायाशी बसली. त्याचवेळी गुरूजींनी खूण केली अन् एक देखणा तरूण येऊन अनीता शेजारी बसला. हाच तिचा भावी जावई असावा असा मी कयास केला. काही वेळ अनीता त्यांच्याशी बोलली. दोघांनाही चुंबनरूपी प्रसाद देऊन गुरूजी तिथून निघून गेले. आता आम्ही तिघंच तिथं होतो. त्या तरूणाचं नाव होतं अभिषेक. मुलगा सुसंस्कृत, निरोगी अन् सज्जन वाटला.

परतीच्या प्रवासात अनीता त्याच्याचबद्दल बोलत होती. ‘‘बघितलंस ना? किती सुंदर आहे माझा जावई. माझ्या सासरची सगळी माणसं तर त्याला बघून आमचा हेवाच करतील. आमच्या घरात असा देखणा, शिकलेला, कर्तबगार अन् मुख्य म्हणजे इतका साधा सज्जन जावई आजतागायत आलेला नाहीए. सासरची माणसं माझ्या गुरूजींची चेष्टा करायची, आता सगळे गुरूजींकडे घेऊन चल म्हणून मागे लागतील. पण कुणालाही मी नेणार नाहीए गुरूंकडे. इतकी वर्ष सेवा केली, त्याचं हे फळ आहे. तुला नेलं एवढ्यासाठी की तूच एकटी मला मदत करतेस.

‘‘तुम्ही लोक कुलीन ब्राह्मण आहात, हा मुलगाही ब्राह्मण आहे का?’’ मी विचारलं.

‘‘तू बघितलं नाहीस का, तो किती देखणा आहे? आता आमच्या जातीचा नाहीए पण हिमाचलच्या कुलीन कुटुंबातला आहे. गुरूजींचे तर आश्रम आणि शिष्य सगळ्या देशभरात आहेत.’’

‘‘तू कधी भेटली होतीस त्याच्या घरच्यांना?’’

‘‘अजून नाही भेटले. इतकी घाईही नाहीए. अगं एकदा आपलं जाणं येणं सुरू झालं की द्यावंही लागतं ना प्रत्येक सणाला. मुलगा मुलगी एकमेकांना पसंत आहेत. आता तो आमच्या घरी येत जाईल. गुरूजी म्हणतात त्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला मदत होते. आम्हालाही कळेल तो कसा आहे,’’ अनीता म्हणाली.

मी यावर काहीच बोलले नाही. तसंही ती माझ्या म्हणण्याला महत्त्व कुठं देत होती?

काही महिन्यांपासून मी बघत होते अभिषेक अनीताकडे येतो. नीति व तो बाहेर फिरायला जातात. तो तिला आश्रमातही नेतो अन् एक दिवस सगळं कुटुंबच तरी निघून गेलं. खूप दिवस घर बंद होतं. कुणीतरी म्हणालं विनयला डेप्युटेशनवर जावं लागल्यामुळे अनीताही मुलीला घेऊन तिकडेच गेली. मग काही महिन्यांनी सगळे परत आले, त्यावेळी नीतिला बाळ झालं होतं. मुलीचं लग्न हिमाचलमध्येच केलं. कारण जावयाला परदेशात नोकरीवर जावं लागलं. कुणाचाच अनीताच्या या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता.

माझी शेजारीणच असल्याने मी बाळाला भेटायला निघाले. बाळासाठी कपडे, खेळणी, बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू वगैरे सामान घेऊन अनीताच्या घरी गेले. मला बघून ती शांत बसून राहिली. मग मीच म्हटलं, ‘‘अनीता अगं, मुलांकडून चुका होतातच…पण तू दोघांचं लग्न पटकन् उरकून घेतलंस हे छान केलं. सगळे परिचित, आप्त, मित्रांना बोलवायला पाहिजे असं गरजेचं नाहीए ना?’’

‘‘हो गं! दृष्टच लागली आमच्या सुखाला. माझी फार इच्छा होती नीतिचं लग्न धूमधडाक्यात करायची. पण सगळ्या इच्छा मनांतच राहिल्या बघ,’’ ती खिन्नपणे म्हणाली.

‘‘काही हरकत नाही. अभिषेक परतून आल्यावर बाळाचा जन्मोत्सव खूप थाटात कर. सगळ्यांची तोंडही बंद होतील. जावईही बघायला मिळेल सर्वांना, तुझी धुमधडाक्याच्या समारंभाची इच्छाही पूर्ण होईल,’’ मी तिला बरं वाटावं म्हणून म्हणाले.

‘‘तुला तर ठाऊकच होतं ना की तो दोन वर्षांसाठी अमेरिकेला जायचा होता. माझ्या मनात होतं की दोन वर्षांनी तो परत आला की लग्न करायचं. पण ते घाईतच उरकावं लागलं. विनयला केवळ आठ दिवस रजा मिळाली होती. सगळं एकटीलाच निस्तरावं लागलं. नीतिच्या सासरची माणसं म्हणाली, इतकं लहान बाळ घेऊन ही एकटी परदेशात कसं करेल? मग मीच हिला माझ्यासोबत घेऊन आले. तिथं सासरी तरी कुणावर विश्वास कसा ठेवायचा. नवरा नाहीए इथं तर तिला धड खायला प्यायला तरी घालतील की नाही, कुणी सांगावं?’’

वातावरणात एक तऱ्हेचा ताण वाटत होता. मी विषय बदलला, ‘‘अगं, बाळाला आण, नीतिलाही बोलाव. मी आज त्यांना भेटायला आले आहे, तुला नाही. मी आत येऊ का?’’

‘‘नको, मी बाळाला आणते इथं. नीतिलाही जरा बरं नाहीए. सकाळीच तिला डॉक्टरकडे नेऊन आणली आहे. ती औषधं घेऊन झोपली आहे. तिला डिस्टर्ब नको करायला.’’ ती म्हणाली.

मी काही बोलणार त्या आधीच ती घाईनं आत निघून गेली. ती आतून बाळाला घेऊन आली. बाळाला माझ्या हातात ठेवत म्हणाली, ‘‘तू बाळाकडे बघ, मी चहा करून आणते.’’

‘‘अगं चहा राहू दे. तू बैस थोडी, गप्पा मारूयात.’’

‘‘छेछे, चहा घेतल्याशिवाय अन् तोंड गोड केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.’’

तिनं चहा, मिठाई व इतर फराळाचे जिन्नस आणले. मी बाळाकडे बघितलं. रंग गोरापान होता. चांगलं गोल गुटगुटीत होतं बाळ. हातपाय पण छान लांब होते. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघताच मी दचकले. पसरट नाक, मिचमिचे डोळे अन् ते जाड ओठ…मला त्या क्षणी ते गुरू महाराज आठवले…नक्की तेच रूप होतं बाळाचं…मला काही सुधरेना. मी बाळाला खाली ठेवलं.

‘‘मला जरा बरं वाटत नाहीए…बहुतेक बी.पी. लो होतोय…मी निघू का?’’ मी म्हटलं.

‘‘नाही अजिबात नाही. मला एक सांग या कॉलनीवाल्यांची तोंडं कशी बंद करू? अभिषेक दोन वर्ष काही येणार नाहीए.’’

 

‘‘तू एक छोटसं गेट टूगेदर कर अन् सर्वांना बोलावून घे. लवकरात लवकर समारंभ आटोपून घे.’’

‘‘असं म्हणतेस?’’ माझा सल्ला तिला पटला बहुधा. तेवढ्यात म्हणाली, ‘‘विनयची बदली दिल्लीला झाली आहे. पुढल्याच महिन्यात आम्ही जाऊ. तर मग मी या लोकांसाठी खर्च तरी कशाला करू?’’

‘‘तुला जे योग्य वाटेल तेच तर,’’ मी तिथून उठत म्हणाले. बाळासाठी आणलेला बाळंतविडाही द्यायला मला सुचलं नाही. मी तशीच ते सामान तिथं ठेवून घरी निघून आले.

निघताना अनीतानं दारात येऊन म्हटलं, ‘‘आता आम्ही लवकरच जाऊ. तू एकदा पुन्हा येऊन जा,’’ मी मान डोलावली…तडकन् घरी आले.

मनात विचारांचा कल्लोळ सुरू होता. खरोखरंच अभिषेकशी लग्न झालं का नीतिचं? बाळाचा बाप अभिषेक असेल तर बाळाचं रूप इतकं गुरूशी मिळतं जुळतं का असावं? भलत्या वेळी बदली का घेतली विनयंन? अनीतानं लग्नाचे फोटोही दाखवले नाहीत. नीति भेटायला समोर का येत नाही?

एमबीए झालेल्या, नोकरी करणाऱ्या तरूण मुलीचं जीवन तर उद्ध्वस्तच झालं. इथून कुठंही ही मंडळी गेली तरी नितिला जन्मभराचा कलंक तर सांभाळावाच लागणार…

वस्तुस्थिती

 * कमल कांबळे

अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये साक्षी दिसली अन् बघता क्षणीच संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन् दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी अन् सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण अन् विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन् साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली.

पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दु:ख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर पाच महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपाएवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन् सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता.

साक्षीला मुलगी झाली. तिच्याचसारखी सुंदर, साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल… पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोनसाखळी गं ती.’’ म्हणून तिचे पटापट मुके घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं.

हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळित चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी चार वर्षांची होती. दिवस गेले अन् मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली.

‘‘पूर्वावहिनी, मी सोनोग्राफी करवून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करवून घेईन.’’

‘‘भलतंच काय बोलतेस, साक्षी? अगं, मुलगी झाली तर बिघडलं कुठे? भलतासलता विचारही मनात आणू नकोस.’’ पूर्वाने तिला प्रेमाने दटावलं.

‘‘नाही वहिनी, तुम्हाला कल्पना नाहीए मुलीला काय काय सहन करावं लागतं, तुम्हाला बहीण नाही, शिवाय मुलगीही नाही. म्हणून असं म्हणताय,’’ उदास चेहऱ्याने साक्षी बोलली.

‘‘अगं, इतक्यातच अशी उदास होऊ नकोस. सकाळीच साक्षी आली. चेहरा पांढराफटक पडलेला. ‘‘पूर्वावहिनी, सोनोग्राफीचा निकाल आलाय. मुलगीच आहे दुसरी मला, अॅबॉर्शन करवून घ्यावं लागेल.

‘‘अगं पण का? संदीपभावोजी काही म्हणाले का?’’

‘‘नाही वहिनी, ते खूप चांगले आहेत. ते काहीच म्हणाले नाहीत, म्हणणारही नाहीत. पण मी खूप सोसलंय मुलगी म्हणून… माझ्या आईने, माझ्या धाकट्या बहिणीनेही. वडील गेले तेव्हा मी दहा वर्षांची, स्वाती सहा वर्षांची अन् धाकटी मीना सवा वर्षांची होती. वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की, तिला नर्व्हस ब्रेकडाउन झाला. मीनाकडे दुर्लक्ष ?ाझाल्याने तिला डायरिया झाला. उपचारांसाठी पैसे नव्हते. ती शेवटी मेली. तरुण, सुंदर विधवा, पदरात दोन देखण्या पोरी, हातात पैसा नाही, नातलग नाहीत कसे जगलो आमचं आम्हाला ठाऊक. मी त्या नरकातून बाहेर पडले, पण आई व स्वाती तिथेच आहेत. संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही.’’

‘‘हेच शेवटचे शब्द ऐकले पूर्वाने, तिच्या लाडक्या साक्षीचे. पूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली. अन् आल्या आल्या तिला साक्षीच्या मृत्युचीच बातमी समजली. अरुण व पूर्वा ताबडतोब तिकडे धावले. साक्षीचा मृतदेह चटईवर होता. साक्षीची सासू धाय मोकलून रडत होती. साक्षीची आई भकास चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती. एका कोपऱ्यात सोनाला जवळ घेऊन स्वाती अश्रू गाळत होती. पूर्वाच्या मनात आलं, आता रडतेय ही सासू, पण हिच्याचमुळे साक्षीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हिचीच सतत कुणकुण होती, ‘मुलगा हवा, मुलगा हवा.’ आता नक्राश्रू ढाळून काय फायदा? तेव्हाच तिला अडवलं असतं, तर मुलीसकट साक्षी आज जिवंत असती.

साक्षीचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला. कितीतरी दिवस पूर्वा व अरुण रोज संदीपकडे जात होती. स्वाती व स्वातीची आई तिथेच राहात होत्या. तेरावं चौदावं झालं अन् पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं.

सोना स्वातीबरोबर रूळली होती. एवढ्याशा जिवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं. पण आई नाही तर मावशीचा आधार होता. बहिणीच्या मृत्युचं दु:ख गिळून स्वाती तिच्या मुलीला जिवापाड सांभाळत होती. स्वातीच्या आठवणी काढत दु:ख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. संदीप या दु:खातून सावरणार नाही असं अरुण व पूर्वाला वाटत होतं. पण काळासारखं औषध नसतं हेच खरं… सगळ्यात मोठी काळजी होती सोनाची, तिला सांभाळणार कोण? आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन् राहाण्याची जागा या कोवळ्या जिवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच.

स्वातीची व तिच्या आईची तुटपुंज्या पगाराची नोकरी, त्या दोघींची गुजराण कशीबशी होईल इतकाच पैसा येत होता. पूर्वा व अरुणही काळजीतच होते.

तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला. खरं तर रविवार होता. पूर्वा व अरुणला रजा होती. थोडं उशिरापर्यंत झोपावं असा पूर्वाचा बेत होता. पण शेजारच्या कमलवहिनींचा फोन आला. ‘‘अग पूर्वा, तुझे संदीपभावोजी भलतेच स्मार्ट निघाले की! अगं, त्यांनी चक्क दुसरं लग्नं केलं.’’

‘‘काही तरीच काय बोलताय, वहिनी?’’

‘‘खरं तेच सांगतेय, काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतंस. तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात हिरवा चुडा होता. मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही, पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी.’’

‘‘तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.’’

‘‘नाही गं! संदीपला मी ओळखते ना? चूक होणार नाही माझ्याकडून…’’

पूर्वाने फोन ठेवला. संदीप कालपरवापर्यंत साक्षीच्या आठवणीने हळवा व्हायचा. आज लग्नही केलं? साक्षीला विसरले ते  सहा महिनेच तर झालेत साक्षीला जाऊन?’’

पूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय. रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती. थकवा अन् झोप अनावर झाली होती. आल्याआल्या अंथरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाढ झोपले. सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली. फोन संदीपचा होता.

‘‘पूर्वावहिनी, मी संदीप…’’

‘‘अरे? इतक्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना, संदीपभावोजी?’’ तिने आश्चर्याने विचारलं होतं.

‘‘काहीच ठीक नाही, वहिनी, साक्षी गेली…’’ तो गहिवरून बोलत होता.

‘‘गेली? कुठे गेली? तुमचं भांडण झालं होतं का? तुम्ही तिला अडवली का नाहीत?’’ पूर्वा बोलत सुटली.

‘‘वहिनी… ती गेली… नेहमीसाठी… सोडून गेली.’’

‘‘काय बोलताय, भावोजी? कुठे आहे साक्षी?’’ पूर्वा किंचाळली…

‘‘पूर्वा, आम्ही इस्पितळात आहोत. साक्षी मरण पावली… अॅबॉर्शन करवून घेताना ती व तिचं बाळ दोघंही गेली…’’ संदीपच्या बहिणीने फोनवर सांगितलं.

‘‘बॉडी मिळायला थोडा वेळ आहे. दोन तासांत घरी पोहचतोय आम्ही, त्यानंतर लगेचच नेऊ… पूर्वा, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? तुझ्या मैत्रिणीला अखेरचं बघून घे.’’ सुनंदाताईने फोन बंद केला.

कमलवहिनींच्या फोनमुळे जागी झालेली पूर्वा चहा करायला स्वयंपाकघरात आली. चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली तर अरुणही जागा झाला होता.

‘‘ज्यांच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं, त्यांना लोक किती पटकन विसरतात?’’ पूर्वाने चहाचा कप अरुणच्या हातात देत म्हटलं.

प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघितलं अरुणने, मग चहाचा घोट घेत विचारलं, ‘‘कुणाबद्दल, कशाबद्दल बोलते आहेस?’’

‘‘कमलवहिनींचा फोन होता. तुमच्या संदीपने दुसरं लग्नं केलंय.’’

हे ऐकून अरुण दचकला नाही, चकित झाला नाही. फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला.

चकित झाली पूर्वा… ‘‘अरुण, तुम्ही काहीच बोलत नाहीए? तुम्हाला नवल वाटलं नाही? राग आला नाही? बरोबरच आहे म्हणा, तुम्ही पुरुष, म्हणून मित्राचीच बाजू घ्याल. पण जर हेच संदीपच्या बाबतीत घडलं असतं, तर साक्षीने असं एवढ्यात दुसरं लग्नं केलं असतं?’’

‘‘नाही, नसतं केलं… नक्कीच केलं नसतं. मला ठाऊक आहे. स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शतांशही आम्हा पुरुषात नसतो. म्हणूनच मी स्त्रीला मान देतो. तिचा आदर करतो. कमलवहिनी अन् त्यांच्यासारख्या इतर बायकांनी तुला उलटसुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो. काल मी संदीपबरोबर होतो. ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो नव्हतो, तर संदीपच्या कामात गुंतलो होतो.’’

‘‘तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत? ती मुलगी कोण आहे?’’ दुखावलेल्या स्वरात पूर्वाने विचारलं.

‘‘स्वाती… साक्षीची बहीण.’’

‘‘स्वाती? साक्षीची बहीण?’’ आश्चर्यच वाटलं पूर्वाला.

‘‘संदीपभावोजी असं कसं करू शकले? अन् ती साक्षीची आई? किती दुटप्पी वागणारी, माणसं आहेत ही? त्यावेळी तर स्वातीला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती. मला म्हणाली, ‘‘आम्ही खूप गरीब आहोत, पण चारित्र्य अन् नीतीला फार महत्त्व देतो आम्ही. या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतलाय, आता दुसरीला मी खूप जपणार आहे. अन् ती स्वाती? भावोजी, भावोजी म्हणायची संदीपला, आता त्याच्याशीच लग्न केलंय? अन् संदीप साक्षीवर एवढं प्रेम करणारा… साक्षी मेली अन् लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला? दुसरी कोणी नव्हती का या जगात? लग्न करायला ती स्वातीच भेटली त्याला?’’ पूर्वाला संताप अनावर झाला होता. खरं तर ती शांत स्वभावाची अन् समंजस होती, पण आज मात्र एकदम खवळली होती. तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं; पण संदीपने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला अन् तो शांतपणे म्हणाला, ‘‘पूर्वा, शांत हो…ऐकून घे मी काय म्हणतोय ते… अगं, हे सगळं स्वाती काय किंवा संदीप काय, कुणासाठीच सोपं नव्हतं. राहिला प्रश्न साक्षीच्या आईचा. तर हा निर्णय तिचा नव्हता… स्वातीचा होता. स्वातीचं म्हणणं होतं की, आता फक्त सोनाच साक्षीची एकमेव खूण उरली आहे. तिच्याखेरीज रक्ताचं नातंच नाहीए. मी सोनाशिवाय अन् सोना माझ्याशिवाय राहू शकणार नाही. सोनाला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सोनाला भेटूही देणार नाही… शिवाय ती सोनाशी कशी वागेल याचीही खात्री नाही. लग्न मला आज ना उद्या करायचंच आहे तर मग संदीपशीच केलं तर काय हरकत आहे? सगळेच प्रश्न मिटतील.’’

साक्षीच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं अन् म्हटलं. ‘‘अरुण, मी जे बोलले होते, त्याच्या विपरीत आज घडतंय… मीच खूप ओशाळले आहे. पण काय करू? संदीपशी स्वातीचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता; अन् आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय. माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाहीए. असता तर कधीच तिला उजवली असती.’’

‘‘पूर्वा, तू तिथे नव्हतीस, त्या खूप काही बोलून गेल्या, तोंडातून अक्षरही न बोलता… त्यांची गरिबी तू बघितली नाहीएस, पण मी बघितली आहे. सोनाला घेऊन तिथे राहाणं अशक्य आहे.

‘‘राहिला प्रश्न संदीपचा. तो म्हणाला, अरुण, आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही. एकुलता एक मुलगा आहे मी. शिवाय सोनाला बघायला कुणी तरी हवंच ना? मग स्वातीच काय वाईट आहे? शिवाय तिचं माझं दु:ख एक आहे. ती जेवढं माझं दु:ख समजून घेईल तेवढं दुसरी कुणी समजून घेणार नाही. सोनाला दुसरी कुणी एवढी माया देऊ शकणार नाही. सगळंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का?’’

पूर्वा गप्प बसून होती. अरुणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं, ‘‘पूर्वा, अशी गप्प राहू नकोस, काही तरी बोल गं!’’

पूर्वाने मान वर करून अरुणकडे बघितलं. एक स्निग्ध हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं. ती म्हणाली, ‘‘मी पुन्हा एकदा चहा करते. मग अंघोळी वगैरे करून आपण संदीपला भेटून येऊ. स्वातीला काहीतरी लग्नभेट द्यायला हवीय. तिलाही बरं वाटेल. आता मला स्वातीतच साक्षी शोधायला हवी. खरं ना?’’

पूर्वाचा निवळलेला चेहरा बघून अरुणही समाधानाने हसला. वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता.

स्वल्पविराम

 * डॉ. विलास जोशी

लग्नाला दहा वर्षं होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का? पतिपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं? अर्थात् हे सर्वच विवाहित स्त्रीपुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे? या क्षणी तरी स्वराला असंच वाटतंय.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं होऊ घातलीत. आठ वर्षांचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे. आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही. घरात आधुनिकपणा अन् संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात. शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची. नंतर तिने जॉब सोडला. आता शिव बऱ्यापैकी मोठा झालाय अन् स्वराचा वेळ शॉपिंग, गॉसिप्स असल्या गोष्टीत जातोय.

आजही बराच वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळाकडे बघितलं. शिवला यायला अजून वेळ होता. आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच. बसूनबसून कंटाळली तेव्हा स्वयंपाक्याला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन गाडी घेऊन ती घराबाहेर पडली.

मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकांकडे होतं. किती तरी जोडपी एकत्र फिरत होती. खरेदी करत होती. आलोक आणि ती अशी एकत्र फिरून किती तरी वर्षं उलटली होती. हल्ली तर आलोकला रोमँटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो. अन् फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो. प्रेमही त्याचं यांत्रिकपणे उरकतो. त्याचा दिवस, म्हणजे रात्रही ठरलेली असते सॅटरडे नाइट. आता तर तिला आलोक रात्री जवळ आला तरी मळमळायला लागतं. ती टाळायलाच बघते. कधी जमतं, कधी आलोकची सरशी होते. तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का? प्रेम तर उन्माद असतो. वादळासारखं ते घोंघावतं, शरीर, मनाचा ताबा घेतं, सुखाची लयलूट करून शांत होतं…पण हे आलोकला कुणी समजवायचं? तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे करतो. पूर्वी असं नव्हतं. पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का?

‘‘एक्सक्यूज मी, मॅडम, एक फॉर्म भरून द्याल का?’’ एक तरुण तिच्या जवळ येऊन अदबीने म्हणाला, तशी ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.

‘‘काय आहे? कसला फॉर्म?’’

‘‘ही आमच्या कंपनीची स्पेशल स्कीम आहे. या फॉर्ममधून दोन फॉर्म्सची निवड होईल अन् लकी विजेत्यांना गोव्याची तीन रात्री चार दिवसांची सहल फुकट मिळेल.’’

‘‘आता नको, मला वेळ नाही,’’ स्वरा त्याला टाळायला बघत होती.

‘‘पण मला वेळ आहे. भरपूर वेळ आहे.’’ कुणीतरी मध्येच बोललं. स्वरा अन् तो मुलगा दोघंही दचकली.

‘अरेच्चा? हा तर किशोर…’ तिच्याबरोबर कॉलेजात होता. त्यावेळी बावळा वाटणारा हा किशोर आता कसला स्मार्ट अन् डॅशिंग वाटतोय. तिला एकदम हसू आलं. तिने त्या मुलाचा नंबर घेऊन त्याला वाटेला लावलं अन् ती किशोरशी बोलत मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. गप्पांमध्ये वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. तेवढ्या वेळात तिला शिवचीही आठवण आली नाही. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

घरी आली तरी डोक्यातून किशोरचा विचार जाईना. किती जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या. किशोर सतत तिच्या गुणांचं, तिच्या रूपाचं कौतुक करत होता. फार दिवसांनी असं स्वत:चं कौतुक ऐकून तीही मोहरली होती.

रात्री जेवण आटोपून झोपायला जात होती तेवढ्यात फोन वाजला. फोन किशोरचा होता. एक क्षण मनात आलं की त्याला दटावून म्हणावं अवेळी फोन करत जाऊ नकोस म्हणून, पण तसं म्हणू शकली नाही अन् मग त्यांच्या गप्पा रात्री एकपर्यंत चालू होत्या.

अन् मग हे रोजचंच झालं. ती दोघं भेटायची किंवा तासन्तास फोनवर गप्पा मारायची. स्वरा हल्ली खुषीत होती. आयुष्यातला हरवलेला आनंद तिला पुन्हा गवसला होता. त्यांच्या गप्पांमध्ये विविध विषय असायचे. कॉलेजच्या जुन्या आठवणींपासून, हल्लीची राजकीय परिस्थिती ते शिक्षणाचा झालेला बाजार. किशोर हिरिरीने मतं मांडायचा. तिला ते आवडायचं. आलोकशी हल्ली असा संवादच घडत नव्हता. तिच्या मनात यायचं, आलोकपेक्षा हा किती वेगळा आहे. आलोकच्या संवेदनाच हल्ली बोथट झाल्या आहेत. किशोर किती संवेदनशील आहे? तिच्या नकळत ती किशोरकडे ओढली गेली होती.

एक दिवस अचानक किशोरने फोन करून स्वराला मॉलमध्ये बोलावून घेतलं. ती तिथे पोहोचली तेव्हा तो म्हणाला, ‘‘स्वरा, मी एक महिन्यासाठी कंपनीच्या कामाने न्यू जर्सीला जातोय…उद्याच निघायचंय…’’

‘‘इतके दिवस?’’

‘‘हो, एवढे दिवस लागणारच! खरं तर जायची अजिबात इच्छा नाहीए पण बिझनेस म्हटला की जबाबदाऱ्याही आल्याच.’’

‘‘नाही रे, तसं नाही, तुला जायलाच हवंय, तू जा. आपण फोनवर बोलूयात.’’

‘‘स्वरा-’’

‘‘बोल ना,’’

‘‘माझ्या मनात एक गोष्ट आहे.’’

‘‘काय?’’

‘‘जाण्यापूर्वी तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचाय.’’

‘‘तेच तर करतोय आपण…’’

‘‘असं नाही. मला तुला एकांतात भेटायचंय…मी काय म्हणतोय, लक्षात आलंय तुझ्या?’’

थोडा विचार करून स्वराने म्हटलं, ‘‘कुठे जाऊयात?’’

‘‘कोणताही प्रश्न विचारू नकोस, फक्त माझ्याबरोबर चल…माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘चल, जाऊयात.’’

किशोरने गाडी एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली.

स्वराला काहीतरी खटकत होतं…‘‘आपण कुठे आलोय?’’?शंकित सुरात तिने विचारलं.

‘‘स्वरा, मला जे काही बोलायचंय ते शांतपणे, एकांतातच बोलायचंय…’’

स्वरा मुकाट्याने गाडीतून उतरली अन् किशोरबरोबर चालू लागली. आलोकला लग्नाआधी ती भेटायची त्यावेळी जशी रोमांचित व्हायची तसं काहीसं तिला वाटत होतं. पण ती ऊर्मी नैसर्गिक होती. त्यात चोरटेपणाची भावना नसायची. आज काही तरी चुकतंय असं वाटत होतं.

रूम उघडून आत जात किशोरने म्हटलं, ‘‘स्वरा, ये ना, आत ये…तू अशी अस्वस्थ का? माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘आहे रे बाबा, पुन:पुन्हा का विचारतो आहेस? विश्वास नसता तर इथवर आले असते का?’’

स्वराच्या हाताला धरून किशोरने तिला सोफ्यावर बसवलं. स्वत: तिच्या पायाशी बसला.

‘‘हे काय? खाली का बसलास?’’

‘‘मला जे सांगायचंय ते इथेच बसून, तुझ्या डोळ्यांत डोळे घालून सांगायचं आहे.’’

‘‘असं काय सांगायचंय?’’

‘‘स्वरा, तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य फार नीरस होतं. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस…बायको सतत भिशी, किटी पार्टी, शॉपिंग यातच मग्न…फक्त दोन मुलांसाठी जगत होतो. पण अचानक तू भेटलीस अन् आयुष्यच बदललं…जग सुंदर वाटायला लागलं. माझ्या लक्षात आलं की आपण दोघंही समदु:खी आहोत. नीरस आयुष्याच्या तुरुंगातले कैदी म्हणून जगतो आहोत. आपण एकमेकांचे होऊयात…सुंदर आयुष्य जगूयात…माझी होशील तू?’’ तो तिच्या एकदम जवळ आला. तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते.

कधी तरी हा क्षण येईल असं स्वरालाही कुठे तरी जाणवलं होतं. त्या क्षणाच्या वेळी ती मोहरेल, रोमांचित होईल असंही तिला वाटलं होतं. वैवाहिक आयुष्यातला कंटाळवाणेपणा, नीरसपणा, मरगळ निघून जाईल असं वाटलं होतं…पण प्रत्यक्षात मात्र तिला किशोरचं जवळ येणं अजिबात आवडलं नाही. त्या क्षणी तिला जाणवलं की मनातून ती कायम आलोकच्याच जवळ आहे. तेवढी जवळीक दुसऱ्या कुणाला शक्यच नाही. फक्त तिला या क्षणी झालेली जाणीव किंवा साक्षात्कार आलोकलाही करून द्यायला हवाय. किशोर मित्रच राहू दे. आलोकची जागा तो कधीच घेऊ शकणार नाही. ती जागा दुसऱ्या कुणाची असूच शकत नाही…ती झटक्यात उठून उभी राहिली.

‘‘काय झालं, स्वरा? काही चुकलं का?’’

‘‘नाही किशोर, चूक नाही…तुझ्यामुळे मला कळलं की आलोकवर माझं किती प्रेम आहे. आम्ही एकमेकांचेच आहोत. आमच्या वैवाहिक आयुष्यात एक स्वल्पविराम आला होता, मी वेडी त्याला पूर्णविराम समजले होते. पण आता गैरसमज दूर झालाय. तो स्वल्पविराम मी प्रयत्नपूर्वक दूर करेन आणि माझा गैरसमज दूर करण्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! प्रिय मित्रा, लेट अस बी फ्रेण्ड्स अॅण्ड फ्रेण्ड्स ओन्ली…’’

स्तंभित झालेल्या किशोरला तिथेच सोडून स्वरा हॉटेलबाहेर आली. पहिला फोन तिने टूर बुकिंग ऑफिसला करून गोव्याची टूर बुक केली. आईला फोन करून शिवला तिच्याकडे ठेवणार असल्याचं सांगितलं अन् तिसरा फोन आलोकला करून ती दोघं गोव्याला जाणार आहेत, रजा टाक असं सांगितलं.

करायला गेली एक

कथा * राजलक्ष्मी भोसले

‘‘अहो, आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का?’’ घराला कुलूप घालता घालता संगीतानं म्हटलं.

राहुलनं रागानं तिच्याकडे बघितलं, ‘‘का? तुला काय झालंय? रोज तूच आणतेस ना?’’

‘‘हो…पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय. तिची तब्येत बरी नाहीए.’’

हे ऐकताच राहुलचं डोकं तापलं, ‘‘तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाही, कधी बाबांचा मूड ठीक नाही,’’ चिडक्या आवाजात राहुल बडबडला.

राहुलचं बोलणं ऐकून संगीता रडवेली झाली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्न ठरवतानाच तिनं राहुलला व सासूसासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी तिला घ्यावी लागेल. त्यावेळी तर राहुलनं अगदी आनंदानं संमती दिली होती. पण आता जेव्हा ती आईकडे जायचं म्हणते राहुल असाच रिएक्ट होतो. एरवी ती शांतपणे ऐकून घेते. समंजसपणे दुर्लक्षही करते, पण आज मात्र ती खूपच दुखावली गेली. थोडी चिडूनच म्हणाली, ‘‘ठीक आहे. मीही आता परत येणार नाही. तिथंच राहीन.’’

राहुलनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तिला तिच्या बसस्टॉपवर सोडून तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.

संगीताचा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावर ती त्याच मन:स्थितीत बसमध्ये चढली. ऑफिसमध्ये गेली. कशाबशा काही फायली तिनं हातावेगळ्या केल्या. पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरली होती. ती ऑफिसातून निघाली अन् थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली.

दारात संगीताला बघताच आनंदानं रितूनं तिला मिठीच मारली. नंतर तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघत तिनं विचारलं, ‘‘काय झालं गं?’’ राहुलशी भांडलीस का?

‘‘छे छे, तसं काही नाहीए,’’ संगीता म्हणाली.

‘‘अस्स? म्हणजे आता तुला माझ्याशी खोटं बोलावं लागतंय तर?’’ रितूनं नाराज होत म्हटलं.

‘‘नाही गं! तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळं ठाऊकच आहे,’’ संगीता म्हणाली.

‘‘बरं तू बस, मी आले,’’ रितूनं तिला सोफ्यावर बसवलं अन् प्यायला पाणी दिलं. मग पटकन् आत जाऊन तिनं जेवणाची दोन ताटं तयार केली अन् संगीताला   स्वत:बरोबर जेवायला लावलं.

पोटात अन्न गेल्यावर संगीतालाही जरा बरं वाटलं. ‘‘आता सांग, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर काळजीचे ढग का आले आहेत,’’ रितूनं म्हटलं.

‘‘अगं काय सांगू? रोजच्या कटकटींनी जीव वैतागलाय. कधीही माहेरी जायचं नाव काढलं की राहुल भडकतोच! तुला माहीत आहे की मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांना माझी गरज भासते. त्यांना माझ्याखेरीज कुणीही नाही. लग्नापूर्वीच हे मी त्याला सांगितलं होतं की मला आईबाबांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तर अगदी उदारपणे ‘हो’ म्हटलं अन् आता आपल्या शब्दाला जागत नाहीए.’’

‘‘म्हणजे पुन्हा तुझ्या माहेरी जाण्यावरुन तुमचं वाजलं अन् तुझा मूड गेलाय,’’ रितूनं म्हटलं, ‘‘पण काळजी नको करूस. आपण यावर उपाय शोधूयात.’’

‘‘कसला बोडक्याचा उपाय? मला तर काही सुचेनासं झालंय…एकीकडे आईबाबा अन् दुसरीकडे राहुल. दोघंही माझेच…अतीव प्रेमाचे…पण दोघांच्या प्रेमात माझं मात्र पार सॅण्डविच झालंय. कधी कधी तर वाटतं की सगळं सोडून कुठंतरी दूर निघून जावं,’’ संगीता म्हणाली.

‘‘खरंय तुझं. कुठंतरी जायला हवं. म्हणजेच राहुलला कळेल की बायको घरात नसली तर घर कसं खायला उठतं.’’ रितूनं म्हटलं.

‘‘म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय तर…’’

‘‘पटतंय ना? उगीच थोडी म्हणतेय मी?’’

‘‘पण जायचं कुठं? हीच तर समस्या आहे.’’

‘‘कुठंही जायची गरज नाही. इथं माझ्याकडेच राहा. वरूण एक महिन्यासाठी अमेरिकेला गेलाय. घरी मी एकटीच आहे. आपण दोघी मजेत राहू.’’

‘‘हे तर फारच छान झालं. मी चार दिवस इथंच थांबते. उद्याच ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देते,’’ संगीता समाधानानं म्हणाली.

‘‘राहुलला काहीच कळू द्यायचं नाही. जरा होऊ दे त्याचीही फजिती. आज तू घरी गेली नाहीस तर कळेलच त्याला तुझी किंमत,’’ रितूनं बजावलं.

संगीताला आता खूपच मोकळं वाटत होतं. रितूलाही संगीताच्या समस्येवर तोडगा निघाल्याचं समाधान वाटत होतं. इथूनच उद्या त्या दोघी मिळून संगीताच्या माहेरी जातील अन् आईबाबांना भेटून येतील असंही त्यांचं ठरलं होतं.

इकडे ऑफिसात गेल्यावर राहुल संगीताशी झालेलं भांडण विसरून आपल्या कामात बिझी झाला. घड्याळानं आठ वाजल्याचं सांगितलं, तेव्हा भानावर आला. घरी पोहोचल्यावर घराला कुलूप बघितलं, तेव्हा त्याला सकाळच्या वादाची आठवण झाली. चिडून तो बडबडत कुलूप उघडू लागला. ‘‘इतक्या वेळा सांगितलं तरी बाईसाहेब आपल्या मनाचंच करणार. नवऱ्याशी भांडण झालं तरी चालेल पण माहेरी जाणारच!’’

रात्री दहा वाजले अन् संगीता घरी आली नाही, तेव्हा राहुलचा राग अधिकच वाढला. आता संगीता घरी आली की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असं त्यानं ठरवलं. पण बारा वाजले, संगीताचा पत्ता नव्हता तेव्हा त्याला सकाळचे तिचे शब्द आठवले, तो म्हणाला होता, ‘‘मग तिथेच का राहात नाही.’’ त्यावर तिनं म्हटलं होतं, ‘‘आता मी तिथंच राहीन.’’ आता मात्र त्याला संगीताचा नाही, स्वत:चाच राग आला. स्वत:वर एवढाही संयम ठेवता येत नाही म्हणजे काय? तिला आईकडे जायला आपण अडवायला नको. तो संगीताला फोन करायचा विचार करत होता एवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यानं धडधडत्या हृदयाने फोन उचलला. फोनवर संगीताचे वडील होते. ‘‘काय झालं बाबा? इतक्या रात्री फोन का केला?’’ त्याने अंमल वैतागूनच विचारलं.

‘‘जरा संगीताशी बोलायचं होतं. ती आज इकडे येणार होती, पण आली नाही, म्हणून काळजी वाटली. तिची तब्येत बरी आहे ना?’’ बाबांनी विचारलं.

हे ऐकून राहुल गडबडलाच. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘म्हणजे? संगीता तुमच्याकडे नाही आलेली? ती निघाली होती तुमच्याकडे…पण ती घरीही नाहीए.’’

‘‘काय सांगतोस? मग माझी पोरगी आहे कुठे?’’ उत्तर न देता राहुलनं फोन बंद केला.

आता मात्र राहुल घाबरला. तो संगीताच्या मोबाइलवर फोन करत होता. पण प्रत्येक वेळी तिचा मोबाइल स्विच ऑफ येत होता.

सकाळी सगळ्यात आधी राहुल संगीताच्या माहेरी गेला. कदाचित ती तिथंच असेल अन् त्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम तिनं हा डाव रचला असेल. पण खरोखर संगीता तिथं नव्हती. अन् काळजीनं आईबाबा काळवंडले होते. त्यानंतर तो तिच्या ऑफिसात गेला. तिथं कळलं की काल ती लंच टाइममध्ये ऑफिसातून गेली ती आलीच नव्हती. अजूनही नाही आलेली. हताश झालेला राहुल सरळ घरी परतला. सगळा दिवस त्याला संगीताचे सगळे चांगले गुण आठवून रडायला येत होतं. आज कदाचित ती घरी परत येईल या आशेवर सगळा दिवस तो घरात तिची वाट बघत होता. पण रात्र झाली तरी संगीताचा पत्ता नव्हता.

इकडे रात्री खूप उशीरापर्यंत रितू अन् संगू गप्पा मारत होत्या. केव्हा तरी उशिरा झोपल्या. सकाळी दारावरच्या घंटीमुळे संगीताची झोप उघडली. रितू अजून गाढ झोपेत होती. कदाचित दूध आलं असेल, आपण ते घेऊ. तेवढयासाठी रितूची झोपमोड कशाला करायला हवी असा विचार करून संगीतानं बाहेरच्या हॉलमध्ये येऊन दार उघडलं.

दारात चार धटिंगण उभे होते. त्यांचे चेहरे बघताच घाबरून संगीता दार लावून घेणार तेवढ्यात त्यातील दोघांनी संगीताला उचललं. एकानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. दुसऱ्यानं तोंडात बोळा कोंबला अन् एकाने गाडीत टाकलं. काही वेळासाठी संगीताची शुद्धच हरपली. ती शुद्धीवर आली तेव्हा तो मोकळी होती, पण एका झोपडीवजा घरात होती. ती घाबरून रडायला लागली.

काय करावं, आपण कुठं आहोत. आपल्याला इथं का आणलंय, काहीच तिला समजत नव्हतं. सकाळपासून ती पाण्याच्या घोटाविना तिथं रडंत बसली होती. चारच्या सुमाराला कुणी दोघंजण आले अन् संगीताला तिच्या नवऱ्याबद्दल विचारायला लागले. तिनं राहुलबद्दल सगळी माहिती त्यांना दिली. तर ते म्हणाले, ‘‘आम्हाला वरुणबद्दल माहिती हवीय. राहुलची नकोय.’’

‘‘माझा नवरा राहुलच आहे. वरूण माझ्या मैत्रिणीचा रितूचा नवरा आहे. तो सध्या अमेरिकेला गेलाय. पण तुम्हाला वरूण कशाला हवाय? अन् तुम्ही मला इथं कशाला आणून ठेवलंय?’’

ती दोघं थोडी चकित होऊन, थोडी भांबावून एकमेकांकडे बघत होती. तेवढ्यात तिनं त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल का विचारलं. एकानं तिला बाहेरून कुठूनतरी एक तांब्याभर पाणी अन् खायला काहीतरी आणून दिलं अन् जाता जाता दुसरा डाफरला, ‘‘जास्त स्मार्टपणा करू नकोस. तुझ्या नवऱ्यानं आमच्या बॉसकडून कर्ज घेतलंय अन् आता पैसे द्यायला नाही म्हणतोय. जोपर्यंत आमचे पैसे तो देणार नाही तोवर तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर तुला विकून पैसे मिळवू.’’

हे ऐकून संगीता भीतिनं पांढरी पडली. बाप रे! कोणत्या संकटात सापडले आहे. इथून कोण सोडवेल? राहुलला निदान फोन करता आला असता तर?

दुसऱ्यादिवशीही संगीता आली नाही, तेव्हा मात्र राहुल पार उन्मळून पडला. तिच्याबद्दल काहीच बातमी नाहीए. याचा अर्थ काहीतरी वाईट घडलं असावं…या विचारानंच तो हवालदिल झाला त्याला रडू यायला लागलं.

तिसऱ्यादिवशी डोअर बेल वाजली. संगीता आली बहुतेक अशा विचारात तो आनंदानं दार उघडायला धावला. दारात त्याचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून त्याचा संयम संपला. तो वडिलांना मिठी मारून रडू लागला.

त्याला असा घाबरून रडताना बघून ती दोघंही बावरली. ‘‘काय झालंय? सगळं ठीकठाक आहे ना?’’ वडिलांनी विचारलं.

‘‘नाही बाबा, काहीही ठीक नाहीए. संगीता तीन दिवसांपूर्वी घर सोडून गेलीय. अजून परतली नाहीए.’’ राहुल कसाबसा बोलला.

‘‘काय? सूनबाई घर सोडून गेलीय? पण का?’’ आश्चर्यानं आईनं विचारलं, ‘‘नक्कीच तू तिच्याशी भांडला असशील. तिला टाकून बोलला असशील.एरवी माझी सून सोशिक अन् समंजस आहे.’’ आई म्हणाली.

‘‘होय आई, मीच तिला लागट बोललो. नेहमीच मी तिला वाईट बोलतो…म्हणूनच ती रागावून निघून गेली,’’ असं म्हणत राहुलने घडलेली सगळी हकीगत त्या दोघांना सांगितली.

‘‘हे तर फार वाईट द्ब्राझालं. अन् तुद्ब्रांझं फारच चुकलंय. तिनं लग्नापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की तिच्या आईबाबांना तिच्याशिवाय कुणीही नाहीए तर मग तू तिच्या माहेरी जाण्यावरून का आक्षेप घेतोस? तिनं तुला कधी आमच्यासाठी खर्च करण्याबद्दल हटकलंय? कधी आमच्या सेवेत तिच्याकडून कमी झालीय? सगळं ती नीट करतेय तर तू तिला मदत करायची, सपोर्ट करायचास…’’ राहुलचे बाबा त्याला समजावत म्हणाले.

‘‘खरंय बाबा, माझंच चुकलं. मी तिला समजून घ्यायला कमी पडलो. एकदा ती परत आली की मी तिची क्षमा मागेन, कधीही भांडणार नाही…तिच्या आईबाबांनाही तुमच्याप्रमाणेच समजेन.’’

राहुलचे बाबा व आई येऊनही अजून एक दिवस गेला, अजून संगीताचा पत्ता नव्हता…आता तेही घाबरले. संगीता फोन का करत नाही? खरोखर काही दगाफटका तर झाला नाहीए ना?

इकडे संगीता अचानक नाहीशी झाल्यामुळे रितूही काळजीत पडली. दार उघडं टाकून अचानक कुठं गेली असेल संगीता? बरं, मोबाइलही नेला नव्हता. कदाचित अचानक राहुलचा फोन आल्यामुळे घाईनं निघून गेली असेल… तीही फक्त अंदाज बांधत होती. संगीता, किमान राहुल, कुणाचा तरी फोन येईल म्हणूनही ती वाट बघत होती. शेवटी ती राहुलच्या ऑफिसात पोहोचली अन् तिनं संगीतानं जे काय ठरवलं होतं ते राहुलला सांगितलं अन् ती न सांगताच निघून गेल्यामुळे किती काळजी वाटली तेही सांगितलं. आता मात्र राहुलच्या हातापायातली शक्तीच गेली.

‘‘असे हातपाय गाळून चालणार नाही राहुल. नक्कीच संगीता संकटात आहे. आपण पोलिसात रिपोर्ट करूया,’’ रितूनं त्याला धीर दिला.

मग दोघं पोलीस स्टेशनला गेली अन् संगीता बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट केला.

पोलिसांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्यादिवशी राहुलला पोलीस ठाण्यातून फोन आला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या गावात गुंडांनी काही स्त्रियांना व मुलींना एका घरात कैद करून ठेवलंय. आम्ही तिथं धाड घालतो आहोत. तुमच्या पत्नीचाही तपास लागू शकतो. तुम्हीही आमच्या सोबत चला.’’

संगीताच्या आईबाबांना घेऊन रितुही आली. राहुलचे आईबाबा व ही सगळी माणसं गाडीतून तिथं गेली. पोलीस पार्टीनं आधीच जाऊन गुंडांना ताब्यात घेतलं होतं. घरातून बायका मुलींना बाहेर काढण्यात येत होतं…पण त्यात संगीता नव्हती. राहुलनं निराशेनं मान हलवली. तेवढ्यात एका बंद खोलीकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. ती खोली उघडण्यात आली. गुडघ्यात मान खाली घालून संगीता तिथं रडत बसली होती. ती पार सुकून गेली होती.

‘‘थँक्यू इन्स्पेक्टर…ही पाहा माझी बायको,’’ राहुल अत्यानंदानं ओरडला. संगीतानं वर मान केली. राहुलला बघताच ती उठली अन् तिनं राहुलला मिठी मारली.

‘‘मला क्षमा कर संगीता…माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला…मी वचन देतो यापुढे तुला मी माहेरी जाण्याबद्दल कधी ही बोलणार नाही…कधीच अडवणार नाही…चल, घरी जाऊ या,’’ राहुललाही रडू येत होतं.

‘‘सूनबाई, चल घरी…तुझा नवरा आता शहाणा झालाय, सुधारलाय.’’ सासूसासरे एकदमच बोलले, तशी रडता रडता संगीता खुदकन हसली. ती आईबाबांच्या पाया पडली. आपल्या आईला व बाबांना तिनं मिठी मारली. रितूलाही हे सगळं बघून भरून आलं. तिनं हलकेच आपले डोळे टिपले.

एक होती इवा

कथा * पूनम साने

फ्रांसचा बीच टाऊन नीस फ्रेंच रिवेरियाची राजधानी आहे. तिथं उत्तम संग्रहालयं आहेत, सुंदर चर्चेस आहेत, रशियन ऑर्थोडॉक्स कैथिड्रल आहे, तिथूनच जवळ असलेल्या हॉटेल नीग्रेस्कोच्या कॅफेटेरियात बसून इवा आणि जावेद कॉफी पित होते. इवाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आलेली होती, ‘‘जावेद,’’ ती कातर आवाजात म्हणाली, ‘‘मला वचन दे, तू कोणतंही वाईट काम करणार नाहीस.’’

‘‘इवा मी फार त्रस्त आहे गं! माझ्या हृदयात एक आग भडकलेली असते. इथं मी फार अपमान सहन केलाय. मी जणू तुच्छ वस्तू आहे असं मला इथले लोक वागवतात. छे, मी कंटाळलोय या छळाला. आता मी फार पुढे गेलो आहे या वाटेवर…मला परत फिरता येणार नाही.’’

‘‘नाही जावेद, मी तुझ्याखेरीज राहू शकत नाही हे तुला ठाऊक आहे, तू पकडला गेलास तर काय होईल, कल्पना तरी आहे का? गोळ्या घालून ठार मारतील तुला…’’

‘‘चालेल मला. पण हे लोक माझा अपमान करतात ते मला सहन होत नाही.’’

इवानं त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहण्याची सोनेरी भविष्याची स्वप्नं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, किती किती गोष्टी ती सांगत होती, पण जावेद अतिरेकी मित्रांच्या सहवासात कट्टर अतिरेकी झालेला होता.

घड्याळ बघत जावेदनं म्हटलं, ‘‘इवा, मला एक महत्त्वाची मिटिंग आहे. प्रथमच मला काही काम देताहेत ते लोक, त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरायला हवं. सायंकाळी वेळ मिळाला तर भेटतो. औरवोर (बाय) बोलून जावेदनं तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले अन् तो निघून गेला.’’

एक नि:श्वास सोडून इवा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंमुळे तिचे सुंदर डोळे झाकोळून गेले.

हॉटेल नीग्रेस्कोमध्ये इवा हॉस्पिटलिटी इंचार्ज होती. खरं तर तिने ड्यूटीवर जायला हवं होतं. पण जावेदच्या बोलण्यामुळे ती फार दु:खी झाली होती. तिनं मैत्रिणीला थोडा वेळ चार्ज घ्यायला सांगितला अन् ती थोडा वेळ बाहेर आली. आत तिचा जीव गुदमरत होता. फॉर्मुला वनचा एक खूपच छान सर्किट नीस आहे. हॉटेलच्या अगदी मागेच, त्या वाटेनं ती बीचवर पोहोचली. क्वेदे एतादयूनीस     बीचवर एका कोपऱ्यात बसून ती तिथं खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली. मुलं आपल्याच नादात मजेत खेळत होती. कुणी वाळूत किल्ले बनवत होती, कुणी फुग्यांमागे धावत होती.

इवा जावेदचाच विचार करत होती. तिला तिची व जावेदची पहिली भेट आठवली.

दोन वर्षांपूर्वी ती एलियांज रिवेरिया स्टेडिअममध्ये फुटबॉलची मॅच बघायला गेली असताना जावेद भेटला. दोघं जवळ जवळ बसली होती. दोघंही लिव्हरपूल टीमचे फॅन होते. दोघंही त्याच टिमला चिअर करत होती. टीमनं केलेल्या प्रत्येक गोलवर दोघंही जल्लोष करत होती. दोघांची नजरानजर झाली की दोघंही हसत होती अन् जेव्हा त्यांचा संघ जिंकला तेव्हा आनंदातिरेकानं त्यांनी एकमेकांना मिठीच मारली. आपण उत्साहाच्या भरात हे काय केलं या विचारानं दोघांना नंतर खूपच हसायलाही आलं. मग त्यांची मैत्रीच झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही वाटलं की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत.

जावेद बांगलादेशातून एमबीए करण्यासाठी आला होता. फुटबॉल म्हणजे त्याला जीव की प्राण. बरेचदा तो इवाला म्हणायचासुद्धा. ‘‘मी खरं तर इथं अभ्यासासाठी नाहीच आलो…मला फुटबॉल मॅच बघायला इथं पाठवलंय.’’

तो आपल्या शाळेत आणि कॉलेजातही फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. अभ्यासात हुशार, वागायला सज्जन, सभ्य अन् व्यक्तिमत्त्व आकर्षक. त्यामुळे इवाला तो मनापासून आवडला होता. जावेदच्या एमबीएनंतर त्याला नोकरी मिळाली की दोघं लग्न करणार होती.

जावेदनं तिला सांगितलं होतं की त्याचे कुंटुंबीय अत्यंत कट्टर मुसलमान आहेत. फ्रेंच मुलगी त्यांच्या घरातली सून होऊ शकणार नाही. पण इवाच्या प्रेमाखातर तो कुटुंबियांना सोडायलाही तयार होता.

हे ऐकून इवानं त्याला मिठीच मारली. ती दोघं आता मनानं जवळ आलीच होती, पण त्यांच्यात शारीरिक जवळीकही निर्माण झाली होती. फ्रेंचच्या क्लासला जाऊन जावेद उत्तम फ्रेंच बोलायला लागला होता. इवाही त्याच्याकडून हिंदीचे धडे घेत होती. प्रेम खरं कोणतीच भाषा, देश, धर्म, रंग मानत नाही. प्रेम होतं तेव्हा फक्त प्रेमच होतं. नाहीतर काहीच होत नाही. एकमेकांची भाषा, संस्कार शिकून घेत त्यांचं प्रेम उंच उंच जात होतं. पण जावेदमध्ये होणारा बदल इवाला खुपत होता. तिला वाटणारी काळजी ती कुणाजवळ बोलूनही दाखवू शकत नव्हती. तशीही एकटी अनाथ होती. मैत्रिणीजवळ तिला हे बोलता येत नव्हतं.

कॉलेजात बरेचदा रेसिझमचा वाईट अनुभव घेतल्यानंतर जावेदच्या मनात सूडाची भावना मूळ धरू लागली होती. इवा त्याची समजूत घालायची पण जावेदला तिचं बोलणं मानवत नव्हतं. खरं तर तो एक साधारण मुलगा होता. काहीतरी बनून दाखवण्यासाठी तो इथं आला होता. आपल्या उज्ज्वळ भविष्याची स्वप्नं आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी होत्या. मग जातीवादाच्या एक दोन घटनांमुळे तो खूपच दुखावला गेला होता. कॉलेजचे कोच मिस्टर मार्टिन नेहमीच जावेदच्या खेळाचं खूप कौतुक करायचे पण कॉलेजच्या टीमची घोषणा झाली तेव्हा जावेदचं नाव कुठेच नव्हतं. त्यानं याचं कारण विचारलं तेव्हा मुलांनी    उत्तर दिलं, ‘‘तू आमच्याबरोबर, आमच्या टीममध्ये खेळण्याचं स्वप्न बघू कसा शकतोस?’’

यावर इतर मुलं फिस्सकन हसली होती अन् जावेद खूप दुखावला गेला होता. त्यानंतरही खूप वेळा कॉलेजच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यानं त्याचं मत सांगितलं तर विद्यार्थी त्याची चेष्टा करायचे. ‘‘आता बांगलादेशी स्टूडंट आम्हाला शिकवणार, त्यांची मतं आम्ही ऐकून घ्यायची.’’

हळूहळू तो रेसिझमचा बळी ठरला होता. आता तो फेसबुकवर सिरियस स्टेटस टाकायचा. ‘लाइफ इज नॉट ईझी’ किंवा ‘तुमची ओळख इथं गुणांवरून नाही तर जातीवरून ठरते’ ‘आय एम टायर्ड’ या आणि अशाच तऱ्हेच्या स्टेटसवरून अगदी स्पष्ट कळत होतं की त्याच्या हृदयात दु:खाचा लाव्हा असून तो बंडखोरी करायला बघतो आहे.

त्याचे हे स्टेटस वाचूनच काही लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता. हळूहळू तो अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकला. दहशतीच्या त्या जगात तो खोल खोल जात होता. आता परतीचा मार्ग बंद झाला होता.

इवाला हे सगळं जाणवत होतं, कळत होतं तिला. हल्ली भीती वाटायला लागली होती. तिनं एक दिवस जावेदला म्हटलं, ‘‘जावेद, मला फक्त तू हवा आहेस. तुझ्या सोबतीनं आयुष्य काढायचं आहे. तू इथं कफर्टे्रबल नसशील तर आपण तुझ्या देशात, तुझ्या गावी जाऊन राहू. मी करीन तुझ्या कुटुंबाशी एडजस्ट. पण तू मला सोडून जाऊ नकोस.’’

‘‘नाही इवा, माझे कुटुंबीय तुला स्वीकारणार नाहीत. तू दु:खी होशील, मी तुला दु:खी बघू शकत नाही. मला आता इथंच आवडतंय.’’

‘‘पण जावेद, इथं तू भरकटला आहेस. तू चुकीचा मार्ग धरला आहेस, त्यामुळे मी दु:खीच आहे.’’

‘‘हा मार्ग चुकीचा नाहीए. हे लोक माझ्या जातीचा उल्लेख करून माझा अपमान करत नाहीत. त्यांच्यासाठी काही केलं तर तो माझा बहुमान ठरेल.’’

‘‘नाही रे जावेद, या वाटेनं गेल्यास तुला काहीही मिळणार नाही. आपण संपून जाऊ. अरे, अजून आपलं आयुष्य सुरू होतंय. अजून आपल्याला संसार करायचाय, घर मांडायचं आहे. अजून किती तरी मॅचेस एकत्र बघायच्या आहेत. आयुष्य जगलोच कुठंय अजून? खूप काही करायचंय…’’

पण जावेदचा ब्रेनवॉश झाल्यामुळे इवाचं कोणतंच बोलणं त्याला त्याच्या मार्गावरून माघारी घेऊन येऊ शकत नव्हतं. आता त्याला एकच गोष्ट कळत होती, दहशतवाद अन् सगळं संपवणं. या गोष्टींनी कधीच कुणाचं भलं केलं नाही. पण तो आता अशाच जगात जगत होता जिथं फक्त आक्रोश होता, अश्रू होते, प्रेत अन् रक्तपात होता.

सायंकाळी तो इवाला भेटायला आला तेव्हा घाबरलेली इवा त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिच्या मनात वाईट शंकांनी थैमान घातलं होतं.

‘‘इवा, मला गुडलक म्हण. आज पहिल्याच मोठ्या मोहिमेवर निघालोय.’’

‘‘कुठं? कुठली मोहीम?’’

‘‘उद्या बेस्टिल डेच्या परेडमध्ये एक ट्रक घेऊन जायचंय.’’

‘‘का? ट्रकचं काय करणार?’’

‘‘काही नाही, त्या गर्दीत ट्रक घुसवायचा.’’

इवा पुन्हा रडू लागली, ‘‘जावेद, वेडा झालाय का तू? अरे कुणाचा जीव गेला म्हणजे? नाही, तू असं काही करायचं नाही.’’

जावेद असं अघोरी काही करेल यावर इवाचा विश्वास नव्हता. एकदोनदा त्यानं मरण्याची धमकी दिली होती. कधी म्हणायचा तो आत्मघातकी होणार आहे. अंगावर बॉम्ब बांधून घेणार आहे, कधी म्हणायचा गननं स्वत:लाच गोळी मारणार आहे. पण इवानं समजूत घातली म्हणजे पुन्हा तो नॉर्मल  व्हायचा.

‘‘सॉरी इवा, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू.’’

‘‘नाही जावेद, जायचं नाही. ही नाटकं बंद कर.’’

जावेदनं तिला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं. त्या एका क्षणात दोघांनाही त्यांनी एकत्र घालवलेले सुखद क्षण आठवले. पटकन् इवाला दूर ढकलत जावेद लांब लांब टांगा टाकत बाहेर निघून गेला.

‘‘जावेद थांब, जाऊ नकोस…’’ इवा हाका मारत होती.

जावेद निघून गेला होता. इवा रडत होती. पण रडून काहीच होणार नव्हतं. ‘जावेदला अडवायला हवं’ तिनं विचार केला, तिचं प्रेम त्याला रोखेल, त्यानं कुणाचा जीव घ्यायला नको. मी त्याला अशी विनाशाच्या वाटेवर जाऊ देऊ शकत नाही. माझ्या प्रेमाच्या बळावर मी त्याला माघारी वळवेन. मी स्वत:च ट्रकसमोर उभी राहीन. तो सांगत होता की त्याला गर्दीत ट्रक घुसवायचा होता.

दुसऱ्या दिवशी १४ जुलैला बेस्टिल डे, फ्रेंच नॅशनल डे साजरा व्हायचा होता. या दिवशी इथे युरोपातली सर्वात मोठी मिलिटरी परेड होते. रस्त्यावर अतोनात गर्दी असते. म्हातारी कोतारी माणसं, तरुण मुलं, मुली सगळेच आतषबाजी बघायला उत्सुक असतात.

इवाला एकदा वाटलं होतं पोलिसांना सांगावं. त्यांची मदत घ्यावी. पण काय नेम, ते तिलाच तुरुंगात डांबतील. जावेद कदाचित बोलतोय, पण असं काही करणारही नाही. तरीही इवा जावेदनं सांगितलेल्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. जावेदचा फोन बंद होता. इवा त्याला गर्दीत शोधत होती.

तेवढ्यात गर्दीकडे येणाऱ्या एका ट्रकला एका बाइकवाल्या पोलिसानं अडवण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबला नाही. इवाला दिसलं ट्रक जावेद चालवत होता. ती स्वत:च ट्रकसमोर जाऊन उभी राहिली.

क्षणभर जावेदचे हात थरथरले. ट्रकसमोर इवा हात पसरून उभी होती. इवा रडत होती. थरथरत होती. पण जावेद आता थांबणार नव्हता. त्यानं ट्रकचा स्पीड कमी केला नाही की ट्रक थांबवला नाही. ट्रक इवाला अन् तिच्याबरोबर इतर अनेकांना चिरडत पुढे निघाला. क्षणात पोलिसांनी गोळ्यांचा पाऊस पाडला. जावेद तिथंच गतप्राण झाला. सगळीकडे आक्रोश, रडारड, रक्ताच्या चिळकांड्या, रक्तमांसाचा चिखल, रक्तात पडलेली प्रेतं, पोरांना घेऊन धावणारे आईबाप, घाबरून रडणारी माणसं…विदारक दृश्य होतं.

इवा अन् जावेद दोघंही मरण पावले होते. प्रेमाचा पराजय झाला होता. दहशतवादाच्या रक्तरंजित खेळात, प्रेतांचा खच, कण्हण्याचे आवाज, घाबरून गेलेल्या लोकांचे चित्कार, तडफडणारी माणसं, भीती, भय, दु:ख अश्रू हेच उरले होते. प्रेमावरचा विश्वास उडालेली इवा मरण पावली होती अन् अतिरेक्यांच्या संगतीत काय घडतं हे जावेदचं प्रेत सांगत होतं.

चार हात लांबच बरी

कथा * शालू गुप्ते

शॉपिंग करून बाहेर आले तेव्हा मी उकाड्यानं हैराण झाले होते. समोरच्या शॉपिंग मॉलच्या कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी घ्यावी अन् काही तरी खावं असा विचार करून मोर्चा तिकडे वळवला. आज मुलांची शाळेची ट्रिप गेली होती अन् माझ्याकडे रिकामा वेळही होता.

पती शशांक सध्या त्यांच्या नव्या बिझनेसमुळे खूपच बिझी आहेत. त्यामुळे मुलं, घरातल्या जबाबदाऱ्या, सासूसासऱ्यांची काळजी घेणं यातच माझा सगळा वेळ संपतो. कित्येकदा वाटतं, स्वत:च्या मनाप्रमाणेही कधी तरी करावं पण जमत नाही. आज मात्र तशी संधी मिळाली होती.

मी ऑर्डर देऊन जरा रिलॅक्स होतेय तोवर फोन वाजला. फोनवर शशांक होते.

‘‘कुठं आहेस?’’ त्यांनी घाईनं विचारलं.

‘‘थोड्याच वेळात घरी पोहोचेन,’’ मी म्हटलं.

‘‘बरं, असं बघ, चार वाजता शिपायाला पाठवतोय, मी टेबलवर जी फाइल विसरून आलोय, ती त्याच्या हाती पाठव,’’ त्यांनी फोन कट केला.

शशांकचं ते कोरडं बोलणं खरं तर मला खटकलं. पण मी स्वत:ची समजूत घातली. ते नक्कीच खूप घाईत असतील. पण तरीही प्रेमाचे दोन शब्द बोलायला तर काहीच हरकत नव्हती.

एके काळी शशांक प्रेमवीराप्रमाणे सतत माझ्याभोवती असायचे. पण नव्या बिझनेसच्या कामाच्या व्यापात बिचारे अगदी कोरडे झाले आहेत. अजून किती दिवस असे जातील कुणास ठाऊक…मी विचार करत होते तेवढ्यात वेटर कॉफी अन् ग्रिल्ड सॅन्डविच टेबलवर ठेवून गेला. मी आपलं लक्ष आता त्यावर केंद्रित केलं.

कॉफीचे दोन घोट घेतेय तोवर ओळखीचं हसू कानावर आलं. वळून बघितलं तर चकित झाले. एका पोक्तशा गृहस्थाबरोबर मानवी बसली होती. आम्ही दोघी कॉलेजात सोबत शिकत होतो.

मानवीला बघून माझं मन एकदम उल्हसित झालं. कॉलेजचे ते फुलपाखरी दिवस पुन्हा आठवले.

खरंच कसले बिनधास्त दिवस होते. आम्ही मुली निर्धास्तपणे कॉलेजात वावरत असू. आमचा एक ग्रुप होता. आम्ही अभ्यासाला कायम महत्त्व दिलं. त्या बरोबरच कॉलेजातल्या इतर अॅक्टीव्हिटीजमध्येही सहभागी होत असू. पण मानवीला मात्र अभ्यासात अजिबात गती नव्हती. तिला फक्त गप्पा, कॅन्टीन, भटकणं, सिनेमा, शॉपिंग एवढंच आवडायचं.

कॉलेजमधले अभ्यासाचे महत्त्वाचे तासही ती सहजपणे बंक करून मुलांबरोबर सिनेमाला निघून जायची. मला ते पटत नसे. आईवडिल आपल्या शिक्षणावर एवढा पैसा खर्च करतात, तर आपण अभ्यास करायला हवा. मानवीला मात्र मुलांना आपल्या नादी लावून झुलवत ठेवायला आवडायचं. एकाच वेळी तिची दोन दोन प्रकरणं सुरू असायची. तिचा हा बिनधास्तपणा मला मानवणारा नव्हता. त्यामुळे मी तिच्यापासून थोडं अंतर ठेवूनच राहायचे.

कधीही तिच्या घरी गेलं तरी ती तोंडाला फेसपॅक लावलेल्या अवस्थेतच सामोरी यायची.

‘‘परीक्षा डोक्यावर आलीए अन् तुला बरे फेसपॅक लावावेसे वाटतात?’’ मी वैतागून म्हणायचे.

‘‘मॅडम, तुमच्यात माझ्यात हाच तर फरक आहे,’’ जोरात हसून म्हणायची,

‘‘विचारांचा मूलभूत फरक…म्हणजे तू अभ्यासासाठी कॉलेजात येतेस, मी मुलांना गटवायला कॉलेज जॉईन केलंय. माझं तर ठाम मत आहे, माया हवी तर, काया म्हणजे देहाची काळजी घ्यावीच लागेल.’’

तिचं हे तत्त्वज्ञान माझ्या मेंदूत शिरत नसे. ज्यावेळी मी अभ्यासासाठी लायब्ररीत बसायचे तेव्हा ती कुणा मुलाबरोबर कॅन्टीनमध्ये असायची.

कॉलेजचे दिवस भराभर संपत होते. आमचा अभ्यास चालू होता. मानवीची प्रेमप्रकरणं रंगत होती. वाहत्या नदीसारखी मानवी सुसाट निघाली होती. कुणीच तिला अडवू शकत नव्हतं. खूप श्रीमंत कुटुंबातली लाडावलेली लेक होती. तिचं वेगळं विश्व होतं. ती नेहमी श्रीमंत मुलांच्याच मागे असायची.

मानवीभोवती मुलामुलींचा चमचेगिरी करणाराही गोतावाळा असायचा. त्यांना फुकटात सिनेमा बघायला मिळायचा. हॉटेलात ट्रीट मिळायची. कधी आलीशान मोटार गाडीतून लिफ्ट मिळायची. ती सर्व तिला त्यावेळी खूप नावाजत असत. आपली प्रशंसा ऐकून मानवीला धन्य धन्य वाटायचं.

शेवटी कॉलेजचे दिवसही संपले अन् सगळ्याच मैत्रीणी इकडे तिकडे पांगल्या. तरीही मानवीची बातमी म्हणजे एखादं नवं प्रेमप्रकरण कधी तरी कानावर यायचंच.

मग तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तरी ती थोडं स्थिर आणि चांगलं आयुष्य जगेल असं मला वाटलं. इतकी वर्षं तिचं ते अस्थिर आयुष्य, नवी नवी प्रेमप्रकरणं हे सगळं सभ्य सुसंस्कृत कुटुंबातल्या आम्हा मुलींना विचित्रच वाटायचं.

सगळ्यांचीच लग्न झाली. सासरचं घर. तिथल्या चालीरिती समजून घेणं, माणसांची ओळख होणं, मुलंबाळं वगैरे सर्व रहाटगाडग्यातून फिरताना मी मानवीला साफ विसरले होते.

आज तिला बघून मला वाटलं तिच्यामुळे अजूनही काही जुन्या मैत्रीणींची खबरबात कळू शकते. मी तर इतकी घरगुती गृहिणी झाले होते की जुन्या मैत्रीणींपैकी कुणाचाही संपर्क उरला नव्हता. मानवीच्या मदतीनं मला माझ्या काही जुन्या मैत्रीणींचा ग्रुप पुन्हा तयार करता येईल.

तेवढ्यात मला तो माणूस उठून निघून जाताना दिसला. मानवीही उठून उभी राहिली. मी तिला हाक मारण्याआधीच ती सरळ माझ्याकडे आली, ‘‘अगं, सुमी, तू इथं कशी?’’ तिनं विचारलं.

मी जवळची खुर्ची तिच्याकडे सरकवत म्हटलं, ‘‘थोडी खरेदी करायची होती. ती झाली, आता कॉफी घेतेय.’’

‘‘बाप रे! केवढी लठ्ठ झाली आहेत तू?’’ ती हसत हसत म्हणाली, तेव्हा मलाही जरा ओशाळल्यासारखं झालं. कारण मानवी अजूनही तशीच सुंदर दिसत होती.

‘‘अगं, आता दोन मुलांची आई झालेय…फरक तर पडणारच ना? अन् तुझं कसं चाललंय?’’

‘‘अगं, माझं तर अजून आयुष्यच सेट नाही झालेलं…मुलंबाळं तर फार दूरचा पल्ला आहे.’’

‘‘अगं, तुझं तर लग्न झालं होतं…’’

‘‘छे छे, त्या लग्नाचं नावही काढू नकोस. ते लग्न नाही, एक भूंकप होता माझ्या आयुष्यातला.’’ मानवीनं म्हटलं.

‘‘म्हणजे? नेमकं काय घडलं? नीट सांग तरी.,’’ मी म्हटलं.

‘‘लग्नापूर्वी माझा नवरा विरेंद्र फार मोठमोठ्या बाता मारायचा. मला वाटलं चांगला पैसेवाला आहे म्हणून मी लग्नाला हो म्हटलं. मी आधीपासूनच स्वतंत्र निर्णय घेणारी, मनात येईल ते करणारी, बिनधास्त मुलगी होते, हे तुला ठाऊकच आहे. पण विरेंद्र माझ्यावर खूपच बंधनं घालू लागला. पैसे कमी खर्च कर, क्लबमध्ये जाऊ नकोस…आता क्लबमध्ये रमी खेळताना कधी तरी हरणं, कधी तरी जिंकणं असतंच ना? त्याला म्हणे बिझनेसमध्ये एकदम खूप लॉस आला होता. पण त्याचा माझ्या खर्चाशी काय संबंध? मला त्यानं ठराविक रक्कम द्यायलाच हवी ना? माझ्या पार्लरचाच खर्च महिन्याला २५ हजार असायचा. तोही सासूला खटकायचा,’’ बोलताना ती खूपच उत्तेजित झाली होती.

मी पाण्याचा ग्लास तिच्यापुढे केला. तिनं घटाघटा पाणी पिऊन ग्लास रिकामा केला.

पाणी प्यायलावर ती थोडी शांत झाली. पुन्हा आपली रामकहाणी ऐकवू लागली, ‘‘माझ्या खर्चावरून रोजच कटकट व्हायची. मला ते सहन होईना, शेवटी मी सरळ एका वकील मित्राची मदत घेतली अन् त्याच्यावर सरळ ५० लाख रूपयांचा हुंड्यासाठी छळ करतात म्हणून दावा ठोकला.

‘‘आता त्याला कळेल मानवी म्हणजे काय चीज आहे ते. मी कोर्टात केस करताना त्याच्यावर जी कलमं लावली आहेत ना की बिचारा वर्षांनुवर्षं कोर्टात खेटे घालत राहिल. कर म्हणावं आता खर्च कोर्टाचा,’’ बोलता बोलता मानवीच्या चेहऱ्यावर विकृत हास्य उमटलं.

मानवीच्या स्वभावाचा हा पैलू मला अगदीच नवा होता. मी चकित झाले होते. पण ती मात्र मजेत होती. एखादी शौर्यकथा सांगावी तशी ती आपली कहाणी सांगत होती.

‘‘मानवी, क्लबला जाणं वाईट आहे मी म्हणत नाही, पण नवऱ्याची आर्थिक परिस्थिती जर तेवढीशी चांगली नसेल, तर बायकोनं ते समजून घ्यायला नको का?’’ मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला.

‘‘झालीस का तू ही सुरू? जो उठतो तो मलाच सगळं सांगायला बघतो. हे बघ, हे माझं आयुष्य आहे अन् ते कसं जगायचं हे मीच ठरवणार. त्यात कुणाची लुडबुड नकोय,’’ मानवी एकदम आक्रमक झाली, ‘‘खरं तर माझी आईच मला समजून घेऊ शकली नाही…इतरांचं काय म्हणायचं? मला एक सांग, इकडे एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतोय अन् इथं मी माझ्या अधिकारासाठी लढा देतेय तर माझेच पाय मागे ओढताहेत माझीच माणसं,’’ तावातावानं मानवी बोलत होती अन् मी मुकाट ऐकून घेत होते.

मला एवढंच कळलं होतं की मानवी चुकीचं वागतेय. ती तिच्या आईचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार? मी पटकन् तिच्यासाठी एक कप कॉफी मागवली.

कॉफी पिऊन जरा ताजीतवानी झाली ती अन् मग म्हणाली, ‘‘मघा माझ्यासोबत होता ना, त्याचं नाव निकुंज. तो एक अत्यंत प्रसिद्ध वकील आहे,’’ अन् मग डोळा मारून पुढे बोलली, अन् तो बावळा माझ्या एका शब्दावर लाखो रूपये उधळायला तयार आहे.’’

एकदा बोलण्याच्या ओघात त्याला समजलं की माझा नवरा पैशासाठी माझी अडवणूक करतोय तर पटक्न म्हणाला, ‘‘मानवी डियर, नवऱ्याची ही हुकूमशाही कशाला खपवून घेतेस? अगं, तू तर उधाण आलेली नदी आहेस, तुला कोण अडवू शकेल? तुझ्या नवऱ्याची तर तेवढी ऐपतच नाहीए…तो लागतो कोण?’’

‘‘खरं तर मला घटस्फोट हवा होता म्हणून मी या निकुंजला भेटले होते, पण माझं दु:ख ऐकून तो व्यथित झाला. स्वत:हून म्हणाला, ‘‘तुझ्या नवऱ्याला असा स्वस्तात सोडू नकोस. त्याला चांगला कायद्याच्या कचाट्यात अडकवतो. मग बघ, कसा वठणीवर येईल.’’

त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी नवऱ्यावर व सासू सासऱ्यांवर केस केलीए, ‘‘माझी सासू आता गयावया करतेय. पूर्वी तिला माझं पार्लर अन् रमी खेळणं खटकायचं. आता गरीब बापुडवाणी झाली आहे. मला फार मजा येतेय त्यांना छळायला.’’

मानवीचं बोलणं ऐकून मी खरोखर हतबुद्ध झाले. मला तिच्या न बघितलेल्या नवऱ्याची अन् सासूसासऱ्यांची दया आली. त्या निकुंजचा रागही आला.

‘‘बराय, मी निघते, मला उशीर झालाय…’’ मी म्हटलं. सामान घेऊन मी उठले.

‘‘चल, निघूयात, मला आता ब्यूटी पार्लरला जायचंय. रात्री निकुंजबरोबर डिनर ठरलाय,’’ पुन्हा मला डोळा मारत ती म्हणाली, ‘‘आज निकुंजनं फाइव्ह स्टार हॉटेलात रूम बुक केली आहे. तो मला इतकं मिळवून देतोय तर मीही त्याला काही द्यायला हवं ना? पण हो, मी तुझ्याकडे परवा येते. तुझ्या मुलांना भेटते. मी त्यांची मावशी आहे ना?’’ तिनं आपला मोबाइल काढला.

मी चक्क खोटं बोलले, ‘‘माझा मोबाइल हरवलाय. तो नंबरही आम्ही ब्लॉक केलाय. नवा फोन आला की भेटूयात,’’ मी घाई घाईनं तिथून बाहेर पडले.

छे गं बाई यापुढे कधीच मी मानवीला भेटणार नाहीए. अशी विकृत स्वार्थी अन् नीतिहीन माणसं काहीही करू शकतात. ती चार हात लांबच असलेली बरी…

समोरून आलेल्या पहिल्याच रिक्षाला हात करून मी आत बसले. मानवीपासून लवकरात लवकर मला दूर जायचं होतं.

ती एक घटना

कथा * मीरा शिंदे

माझे पती आशिष, त्यांचा मित्र गगन अन् त्याची पत्नी गायत्री. आम्हा चौघांत असलेलं सामंजस्य, परस्परांवर असलेला विश्वास अन् आदर अन् एकमेकांवरची माया हे इतकं अद्भूत होतं की सर्वांना आमचा हेवा वाटायचा. आम्हाला दोन मुलं होती. एक मुलगा, एक मुलगी. गगन, गायत्रीला मात्र मूलबाळ नव्हतं.

बऱ्याच प्रयत्नांनी गायत्रीला दिवस गेले. आम्ही सर्वच आनंदात होतो. पण तिला झालेलं मूल जन्मत: अनेक विकृती घेऊन आलं होतं. अन् जन्मानंतर काही वेळातच ते मूल मरण पावलं. गायत्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूत होती. आशिष ऑफिसच्या दौऱ्यावर होते. पूर्णपणे कोसळलेल्या गगनला मी सांभाळत होते अन् आमच्याही नकळत ती घटना घडून गेली. निसर्गाने आपलं काम बजावलं अन् संकर्षणचा जन्म झाला. मला दिवस गेल्याचं लक्षात येताच मी आशिषना म्हटलं, ‘‘आपल्या अनवधनामुळे जन्माला येणारं हे बाळ आपण गायत्री, गगनला देऊया का आपली दोन मुलं आहेतच!’’ आशिषना माझ्या कल्पनेचं कौतुक वाटलं. आई असून मी मैत्रीसाठी त्याग करते आहे असं त्यांना वाटलं. तर आपलं मूल मी गायत्रीला देते आहे यामुळे तीही भारावून गेली. खरं काय ते मी अन् गगन जाणत होतो…तेवढी एक घटना सोडली तर आमच्यात त्यानंतरही अगदी पूर्वीप्रमाणे निखळ निर्मळ मैत्रीचं नातं होतं

कधी तरी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून यायची. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला दूर लोटल्याची भावना अन् आशीषसारख्या सज्जन पतीपासून घडलेली घटना लपवण्याची भावना. पण यातच सर्वांचं भलं होतं. गगन गायत्री संकर्षण मिळाल्यामुळे खूप समाधानी अन् आनंदात होते. सगळं कसं छान चाललेंल अन् एक अपघात घडला.

संकर्षण दहा वर्षांचा होता. गगन गायत्री अन् संकर्षण केरळच्या प्रवासाला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. गायत्री जागेवरच मरण पावली. गगनला खूप जखमा अन् फ्रॅक्चर्स होती. गंभीर परिस्थितीत होता तो अन् चमत्कारिकरित्या संकर्षण बचावला होता. त्याला एक ओरखडाही उमटला नव्हता.

संकर्षण आमच्याजवळच राहात होता. बरेच महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यावर गगन बरा झाला पण त्याला एकदम विरक्ती आली. एक दिवस त्याने आम्हा दोघांना बोलावून घेतलं. त्याचा सॉलिसिटरही तिथे होता. गगन म्हणाला, ‘‘माझी सर्व संपत्ती, प्रॉपर्टी मी संकर्षणच्या नावे केली आहे. मी आता संन्यास घेतोय. यापुढे तुम्हीच संकर्षणचे आईबाप. माझा शोध घेऊ नका. काही प्रॉब्लेम आलाच तर हा माझा सॉलिसिटर तुम्हाला मदत करेल.’’

आमच्या समजवण्याला, विनवण्यांना दाद न देता रात्रीतून गगन कुठे निघून गेला ते आम्हाला पुढे कधीच कळलं नाही. गगन व गायत्री गेल्याचं आम्हाला दु:ख होतंच पण आता आपला मुलगा आपल्याजवळ राहील या भावनेने आशीष सुखावले होते. त्यालाही आता दहा वर्षं उलटली होती.

कुठून कसं संकर्षणला कळलं की गगन गायत्री त्याचे सख्खे आईवडील नव्हते. तो आमचाच मुलगा आहे तेव्हापासून तो आमच्याशी फटकून वागू लागला. चिडून बरेचदा म्हणालाही, ‘‘मी जर तुम्हाला नको होतो, तर मला जन्माला का घातलंत? तुमच्यासारखे क्रूर आईबाप मी बघितले नाहीत. खुशाल मला दुसऱ्याला देऊन टाकलंत?’’

आमच्या मोठ्या दोन्ही मुलांशीही संकर्षणचं जुळत नव्हतं. त्याचं सर्वच बाबतीत या दोघांपेक्षा वेगळं असायचंय. त्याचा चेहराही बराचसा गगनसारखा होता. बरेचदा आपल्या दोन्ही मुलांपेक्षा त्याचं वेगळं असणं आश्चर्य वाटायचं. ते बोलूनही दाखवायचे, ‘‘नवल आहे, याचं सगळंच गगनसारखं कसं?’’

मी म्हणायची, ‘‘जन्मल्याबरोबर त्यांच्याबरोबर, त्यांच्याच घरात वाढलाय. त्याचा परिणाम असतोच ना?’’

आशीषना आश्चर्य वाटे, पण त्यांना संशय आला नाही. मी किंवा गगनवर त्यांनी कधीच संशय घेतला नाही. त्यामुळेच मला फार फार अपराधी वाटायचं. अनेकदा वाटलं खरं काय ते त्यांना सांगावं. पण आशीष ते ऐकू शकतील? शक्यच नाही.

संकर्षण आशीषसारखाच बुद्धिमान होता अन् तेवढ्याने आशीषचं पितृत्त्व समाधान पावत होतं. पण संकर्षण मात्र आमच्यापासून तुटला होता. अलिप्त झाला होता. एकटा एकटा राहात होता.

त्यातच तो आजारी पडला. अस्थमाचे अटॅक त्याला वारंवार यायचे.

एव्हाना आम्ही कोचिनमध्ये सेटल झालो होतो. आम्ही कोचिनमध्ये उत्तम डॉक्टर शोधले. बाहेरच्याही अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्याला बरं वाटत नव्हतं. आता तर त्याला कित्येक तास ऑक्सिजनवर ठेवावं लागायचं. आम्ही दोघंही नवरा बायको फार काळजीत होतो.

शेवटी दिल्लीहून आलेल्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमने असा निष्कर्ष काढला की ही अल्फा, एण्टिटाइप्सीन डिसीज आहे. हा आजार जेनेटिक असतो. खरं तर वयाच्या तिशीनंतरच तो होतो, पण दुर्दैवाने ऐन विशीतच त्याने गाठलं, अस्थमाशी त्याची लक्षणं जुळतात. वडिलांची डी.एन.ए. टेस्ट करून घेतल्यास योग्य उपचार करता येतील.

आशीषने संकर्षणसाठी पटकन् डीएनए टेस्ट करवून घेतली. पण त्यांचे डीएनए एकमेकांशी विसंगत निघाले. कारण तो आशीषचा मुलगा नव्हताच ना?

रिपोर्ट कळताक्षणीच आशीष माझ्याकडे न बघता, संकर्षणचा विचार न करता कार घेऊन घरी निघून गेले. संकर्षणच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा तिरस्कार ओसंडून वाहात होता.

‘‘आजपर्यंत मला वाटायचं मी ‘अनवाँटेड चाइल्ड’ आहे. तुम्हाला नको असताना झालो म्हणून मला एखाद्या निर्जीव वस्तूसारखं दुसऱ्याला देऊन टाकलंत, आज तर कळतंय की मी पापातून जन्माला आलेला दुर्देवी मुलगा आहे. तू इतकी नीच असशील असं नव्हतं वाटलं मला. काकांचा विश्वासघात केलास…किती प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं.’’

त्याच्या त्या अशक्त देहात त्याचा तिरस्कार, त्याचा संताप मावत नव्हता. तो खूप खूप बोलत होता. मला त्याला सांगायचं होतं की मी किंवा गगन आपापल्या पार्टनरशी प्रामाणिक होतो. तेवढी एक घटना सोडली तर आम्ही कायम मित्रच होतो. पण हे संकर्षण काय किंवा आशीष काय…समजून घेणार का?

‘‘संकर्षण गगनचाच मुलगा ना?’’ आशीषने मी घरी आल्यावर विचारलं.

‘‘हो.’’

आशीषही संकर्षणप्रमाणेच संतापले. मला टाकून बोलले. त्यांचा रागही वाजवी होता. मी त्यांचा विश्वासघात केला होता यावर ते ठाम होते. माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. संकर्षणने सर्व औषधं फेकून दिली होती. जेवणही घेत नव्हता. त्याची तब्येत आणखी खालावली होती.

त्या वीकएण्डला माझी मोठी दोन्ही मुलं संकर्षणला भेटायला आली. एरवी फोनवरून आमचं संभाषण चालूच होतं. पण संकर्षणची तब्येत खालावली असल्याचं ऐकून त्यांनी प्रत्यक्ष येण्याचा निर्णय घेतला होता.

आल्यावर चहा झाला. दोघंही फ्रेश झाले अन् दोघांनी एकदमच विचारलं,

‘‘आईबाबा, काय झालंय? तुम्ही दोघं फारच टेन्स दिसताहात…?’’

आशीष उठून तिथून दुसरीकडे निघून गेले.

‘‘यांना काय झालं, आई?’’ अंजनने विचारलं.

‘‘काही नाही रे, संकर्षणच्या आजाराने आम्ही काळजीत आहोत.’’

‘‘आई, ही काळजी त्याच्या आजारपणाची नाही. काहीतरी वेगळं कारण आहे. अगं, आम्ही आता लहान नाही आहोत. बरंच काही कळतं, समजतं आम्हाला. खरं सांग ना? कदाचित काही मार्ग काढता येईल,’’ अमिताने माझ्या गळ्यात हात घालत म्हटलं.

मुलांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात आशेचा अंधुक किरण चमकला. पण पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. आशीष काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीएत तर मुलं काय समजून घेतील? तरीही मी सर्व काही त्यांना सांगितलंच.

आजची पिढी खरोखर आमच्यापेक्षाही अधिक सहजपणे अन् मोकळेपणाने परिस्थिती समजून घेते. परिस्थितीचं विश्लेषण करते अन् त्याप्रमाणे निर्णयही घेते.

काही वेळ दोघंही गंभीरपणे बसून होती. मग अमिता म्हणाली, ‘‘तरीच आम्हाला वाटायचं की संकर्षण आमच्यापेक्षा इतका कसा वेगळा आहे…आता सर्व लक्षात आलं…’’

‘‘अंजन म्हणाला, ‘‘काही हरकत नाही. सर्व परिस्थिती बघता तुला अन् गगनकाकांनाही दोष नाही देता येणार. पण आई, तरीही तुझी चूक एवढीच की इतके दिवस तू ही गोष्ट बाबांपासून लपवून ठेवलीस त्यामुळे त्यांना त्यांचा विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. कारण गगनकाका अन् तू त्यांच्या फारच विश्वासातले होता. त्याचवेळी ही गोष्ट तू बाबांना सांगायला हवी होतीस.’’

‘‘दादा, काही तरीच काय बोलतोस? आजही जी गोष्ट बाबा ऐकून घ्यायला, समजून घ्यायला तयार नाहीत, ती गोष्ट त्यांनी त्यावेळी सहजपणे स्वीकारली असती?’’ अमिता म्हणाली.

‘‘नक्कीच! आता त्यांना धक्का बसलाय. या गोष्टीचा की ही गोष्ट आईने इतकी वर्षं लपवून ठेवली!’’

‘‘नाही. अजिबात नाही, त्यावेळी आईने ही गोष्ट लपवली नसती तर आपलं अन् गगन काकांचंही कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. गायत्रीकाकी काय किंवा आपले बाबा काय, कुणीच ही गोष्ट इतक्या सहजपणे स्वीकारली नसती,’’ अमिता ठामपणे म्हणाली.

‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. आई त्यावेळी योग् वागली. चल…आपण बाबांना समजावू…अन् संकर्षणशीही बोलू,’’ अंजन म्हणाला.

‘‘ममा, तू संकर्षणपाशी हॉस्पिटलमध्येच थांब, आम्ही थोड्या वेळात तिथे येतोच.’’

मी माझं आवरून घरून निघाले. मी घराबाहेर पडल्यावर अंजन बाबांकडे गेला. त्यांच्या पुढ्यात शांतपणे बसला अन् म्हणाला, ‘‘बाबा, आईने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे. आता मला तुम्ही असं सांगा की तुम्हाला मुळात राग कशाचा आला आहे. जे गगनकाका व आईमध्ये घडलं त्याचा की ही गोष्ट तुमच्यापासून लपवली, याचा?’’

‘‘दोन्ही गोष्टींचा.’’

‘‘तरीही, अधिक राग कशाचा?’’

‘‘लपवण्याचा…’’

‘‘त्यावेळी तिने ते सांगितलं असतं तर तुम्ही त्या दोघांना क्षमा केली असती?’’

‘‘नाही…’’

‘‘तर मग किती आयुष्य उद्ध्वस्त झाली असती याचा विचार केलाय? ही गोष्ट आज कळतेय तरी तुम्ही, आई अन् संकर्षण इतके त्रस्त आहात. मानसिक ताण सोसता आहात…तुम्हाला आई किंवा गगनकाकावर कधीच संशय नव्हता अन् ही गोष्टही तेवढीच खरी की एकमेकांच्या प्रेमात पडून, आकर्षणापोटी ते एकत्र आले नव्हते. ती घटना म्हणजे एक अघात होता, क्षणिक चूक म्हणा…तर त्यासाठी तुम्ही स्वत:ला अन् आईला इतकी शिक्षा कशी देऊ शकता?’’

लेकाचं मुद्देसूद बोलणं आशिष लक्षपूर्वक ऐकत होते, ‘‘तुझं म्हणणं खरंय. मेंदूला तुझं म्हणणं पटतंय, पण मन ऐकत नाही,’’ ते म्हणाले.

‘‘मनाला समजवा, पपा…आईलाही खूप त्रास होतोए.’’

हॉस्पिटलमध्ये मी संकर्षणजवळ बसून होते. तो माझ्याशी बोलत नव्हता. माझ्याकडे बघतही नव्हता. तेवढ्यात अंजन व अमिता येताना दिसली.

‘‘काय झालं?’’ मी अधीरपणे विचारलं.

‘‘थोडा धीर धर. हळूहळू सर्व नीट होईल,’’ अंजन म्हणाला.

अमिताने संकर्षणच्या जवळ बसत विचारलं, ‘‘कसा आहेस?’’

‘‘बराय,’’ तुटकपणे तो म्हणाला.

‘‘आई तू घरी जा. आम्ही आहोत संकर्षणपाशी,’’ अमिताने म्हटलं.

‘‘आणि आम्ही जेवणही त्याच्याबरोबर घेणार आहोत,’’ अंजनने सांगितलं.

मी निघाल्यावर दोन्ही मुलांनी संकर्षणबरोबर खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याच्या जन्माची कथा त्याला नीट सांगितली. आधी मूल होत नसल्यामुळे अन् नंतर विकृत मूल जन्माला येऊन मरण पावल्यामुळे गगन व गायत्रीवर कोसळलेल्या दु:खातून केवळ संकर्षणमुळे ते बाहेर पडले, सावरले अन् आनंदाचं आयुष्य जगू शकले. केवळ संकर्षणमुळे गायत्रीला आईपणाचं सुख मिळालं ही गोष्ट कशी विसरता येईल? त्याच्या मनातला ‘अनवॉन्टेड’ हा शब्द त्याने काढून टाकायला हवा. तो आजही सर्वांचा लाडका आहेच. एरवी त्याच्या आजारपणाने सगळेच असे हवालदिल झाले असते का? इतका खर्च, इतकी जागरणं, इतकी काळजी फक्त प्रेमापोटी करता येते. एक ना दोन, हर तऱ्हेने त्या दोघांनी संकर्षणला समाजावलं. त्यामुळे तो पुष्कळच निवांत झाला. त्याचा धुमसणारा संताप अन् माझ्याविषयीचा तिरस्कार निवला.

मधल्या काळात डॉक्टरांनीही त्याच्या आजारावर बरंच संशोधन केलं होतं. त्याचा आजार जेनेटिक नसून एलर्जीचा एक प्रकार असल्याचं सिद्ध झालं. त्या अनुषंगाने उपचार सुरू झाले अन् शारीरिकदृष्ट्याही संकर्षण सुधारू लागला.

काही दिवसांतच आम्ही त्याला घरी घेऊन आलो. संपूर्ण वर्षं त्याच्या आजारपणात गेलं होतं. पण आता तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या अगदी निरोगी व फिट होता. आता त्याचं इंजिनीयरिंगचं शेवटचं वर्षं होतं. त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाला आम्ही जंगी पार्टी दिली. आता आम्ही एक परिपूर्ण अशी हॅप्पी फॅमिली होतो.

वाळवी

कथा * सुमन बारटक्के

साऱ्या घरात तो वास, खरं तर दुर्गंध भरून होता. घरात वाळवी लागली होती. ती संपवण्यासाठी अॅण्टीटर्माइट औषधांची फवारणी सुरू होती. त्या वासाने तिचा जीव गुदमरू लागला होता. वाळवी, म्हटलं तर इवलासा जीव, पण माणसाचं जिणं दुरापास्त करून टाकते.

सगळं घर अस्ताव्यस्त पसरलं होतं. स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, बाल्कनी, एकही जागा अशी नव्हती जिथे वाळवीने बस्तान बसवलं नव्हतं. त्यामुळे सगळं सामान बाहेर काढून औषधफवारणी करावी लागत होती.

दर दोन महिन्यांनी ही सगळी सर्कस करावी लागायची. दिल्लीहून फरीदाबादला आल्यावर इतका त्रास होईल असं तिला वाटलंच नव्हतं, स्वत:चा बंगला बांधून घेणं जसं जिकिरीचं, कष्टाचं काम आहे, तसंच तयार बंगला घेणंही एकूणात त्रासाचंच काम आहे. राहायला लागल्यावर त्यातल्या उणिवा, दोष वगैरे लक्षात यायला लागतात. पण सध्याच्या काळात दिल्लीला बंगला घेणं ही फारच अवघड बाब होती. त्यांच्या बजेटमध्ये दिल्लीला बंगला बसत नव्हता. शेवटी फरीदाबादलाच बंगला घ्यायचं ठरलं. तसं म्हटलं तर फरीदाबादहून दिल्लीचं अंतर होतंच किती? दिल्ली सोडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण नवरा दीपंकरच्या हट्टामुळे ती फरीदाबादला आली होती. त्यांच्या स्टेट्सला साजेसाच होता हा बंगला. अन् काय कमी होतं दीपंकरला? पैसा, प्रतिष्ठा, स्टेट्स, दाराशी शोफर, ड्रायव्हरसहित दोनतीन गाड्या. अशावेळी दिल्ली दूर वाटण्याचं काही कारण नव्हतं. अन् दीपंकरला वाद घालायचा नव्हताच! निर्णय झालाच होता.

‘‘मॅडम, आमचं स्प्रे मारण्याचं काम आत्तापुरतं संपलंय. पण दोन महिन्यांतच पुन्हा फवारणी व्हायला हवी. आत्ताच वाळवीला कंट्रोल केलं नाही तर फार नुकसान होईल. अन् वाळवीची मजा अशी असते की बाहेरून आपल्याला कल्पनाच येत नाही अन् आतल्या आत वाळवी सगळं पोखरून टाकते. मी तर तुम्हाला असं सुचवतो की तुम्ही आमच्या कंपनीबरोबर वर्षभराचं कॉण्टॅ्रक्ट करा. आमची माणसं ठराविक दिवशी येतील अन् काम करून जातील. तुम्ही फोन करण्याचीही गरज नाहीए.’’ स्मार्ट एक्झिक्युटिव्ह, आपल्या कंपनीचा बिझनेस वाढवू बघत होता.

इथे आल्यावरच तिला कळलं होतं की फरीदाबादमध्ये मेंदीची शेती होते. मेंदीचं फार मोठं मार्केट आहे फरीदाबाद. पण त्यामुळेच इथे वाळवीही खूप आहे. मेंदीचा वास तिला खूप आवडतो. पण आताचा हा स्प्रेचा वास मात्र तापदायक आहे. मळमळतंय, उल्टी होईल की काय असं वाटतंय.? खरं तर मेंदी अन् वाळवीचा नेमका संबंध तिच्या लक्षात येत नव्हता. पण एक बारका जीव सगळं घर पोखरून पोकळ करू शकतो याचं नवल वाटत होतं. पण संसारातल्या, नातेसंबंधांतल्या अगदी लहानसहान गोष्टींनी जसे नात्यांच्या भक्कम भिंतीना तडे जातात अन् शेवटी भिंती कोसळून संबंध तुटतात, तसंच हेदेखील!

‘‘ठीक आहे. तुम्ही पेपर्स तयार करून आणा, मी सही करते, आता मी बाहेर निघालेय,’’ तिने म्हटलं.

तिला सायंकाळी अविनाशला भेटायला जायचं होतं. त्या पसाऱ्यातून तिने आपल्या गरजेचं सामान शोधलं. मेडवर घराची जबाबदारी सोपवून ती नटूनथटून घराबाहेर पडली. ड्रायव्हर घेण्यापेक्षा स्वत:च ड्राइव्ह करणं सोपं होतं. जेव्हापासून अविनाश तिच्या आयुष्यात आला होता, तेव्हापासून तिचं आयुष्य इंद्रधनुषी झालं होतं. लग्नाला दोन वर्षं झालीत. पण दीपंकरशी ती अजून मोकळेपणाने बोलत नाही. त्याचा स्वभाव गंभीर आहे. रोमांस त्याला जमत नाही अन् नम्रता तर सुरूवातीपासूनच बिनधास्त होती. पार्ट्या, डिंक्स, शॉपिंग, हॉटेलिंग असं तिला आवडायचं. दीपंकरला त्याच्या बिझनेसमुळे फारसा वेळ मिळत नसे. बिझनेसच्या कामात तो गर्क असायचा. नम्रतावर त्याचं जिवापाड प्रेम होतं. पण व्यक्त करणं जमत नव्हतं.

इकडे अविनाश स्मार्ट, सुंदर अन् तिच्यासारखाच खुशालचेंडू वृत्तीचा होता. सतत हसायचा, हसवायचा. नम्रताच्या बारीकबारीक गोष्टी लक्षात ठेवायचा. कुठले इयररिंग घातले होते. कोणता ड्रेस सुंदर दिसत होता. कोणती लिपस्टिक तिला खूलून दिसते, कोणत्या हेअरस्टाइलमध्ये ती ब्यूटीफुल दिसते. अगदी तिच्या आवडीचा सेंटही त्याला माहीत होता. दीपंकर तिला भरपूर पैसे देत होता पण तिच्या आवडीचा सेंट त्याला माहीत नव्हता. ती कोणत्या ड्रेसमध्ये ब्यूटीफुल दिसते हे त्याने तिला कधीही सांगितलं नव्हतं.

‘‘हॅलो डार्लिंग, कसली खतरा दिसते आहेस? अन् केवढा उशीर केलास? बघ तुझी वाट बघता बघता कसला वाळलोय मी…’’ अविनाशची ही स्टाइल तिला त्याच्याकडे ओढून नेते.

‘‘आता आलेय ना? बोल, काय प्रोग्रॅम आहे?’’

‘‘संध्याकाळ सरत आलीय, तूच सांग, काय असावा कार्यक्रम?’’ डोळा मारत अविनाश बोलला अन् ती लाजली.

अविनाश एकटाच होता. लग्न केलं नव्हतं. मित्राबरोबर रूम शेयर करून राहात होता. दोघा मित्रांमध्ये ठरलेलं होतं की जेव्हा नम्रता येणार असेल तेव्हा तो मित्र बाहेर निघून जाईल. अविनाशच्या मिठीतून जेव्हा ती मोकळी झाली तेव्हा फारच आनंदात होती अन् अविनाश तर तिला सतत मिठीत घ्यायला आतुरलेलाच असायचा.

‘‘तू तर मला पार वेडा करून सोडला आहेस गं राणी!’’ अविनाशने तिला खूष करण्यासाठी म्हटलं, ‘‘बरं, अगं सध्या फार छान सेल लागले आहेत. तुला काही खरेदी करायची आहे का? मला घ्यायचंय काही सामान, मीं सेलची वाटच बघत असतो.’’

‘‘मी असताना तू काळजी का करतोस? उद्या भेटूयात.’’ नम्रता घाईने निघून गेली अन् तिने दिलेला स्प्रे अंगावर मारत अविनाश गर्वाने हसला.

परफ्यूमच्या सुगंधाने दरवळणाऱ्या खोलीत प्रवेश करत अविनाशच्या मित्राने म्हटलं, ‘‘छान पोरगी पटवली आहेस. खूपच चंगळ चाललीए तुझी.’’

‘‘तू का जळतो आहेस? माझ्या वस्तू तूही वापरतोस ना? तुझाही फायदा आहेच की!’’ निर्लज्ज हसत अविनाशने म्हटलं.

दुसऱ्या दिवशी नम्रताने अविनाशसाठी किती तरी गोष्टी खरेदी केल्या. तरीही अजून काही गोष्टी हव्या आहेत म्हणत त्याने तिचं क्रेडिट कार्ड मागून घेतलं. नम्रता नवऱ्यात तेवढीशी गुंतलेली नाहीए हे त्याने बरोबर हेरलं होतं. तिच्या भावनांचा तो गैरफायदा घेत होता.

नवऱ्याला समजून घ्यायला नम्रता कमी पडत होती. बडबड्या, खूषमस्कऱ्या अविनाश तिला आवडला होता. तो सटाफटिंग होता. स्त्रीला रिझवण्याचं कसब त्याच्याजवळ होतं. नम्रताला वाटायचं, त्याने लग्न केलं तर ती एकटी पडेल. तिला त्याची कंपनी हवीहवीशी वाटायची.

तिसऱ्या महिन्यात अॅण्टीटर्माइट फवारणीवाले पुन्हा आले. वाळवी ओल्या जागेत, दमट जागेत जोमाने फोफावते. लाकूड ओलं राहाता कामा नये. ओलं लाकूड वाळवीला पोखरायला अधिक सोपं असतं. वगैरे उपदेश करून सर्वत्र स्प्रे मारून ती माणसं निघून गेली. हे सर्व नम्रताने ऐकून, समजून घेतलं पण तिच्या आयुष्याला अविनाशरूपी वाळवी लागली आहे हे तिच्या लक्षात आलं नाही.

‘‘तुझ्या नवऱ्याच्या खूप ओळखी आहेत. त्याला सांगून माझ्या बॉसचं काम करून दे ना.’’ तिच्या गालाचं चुंबन घेत अविनाश म्हणाला, ‘‘तू बोललास म्हणजे काम झालं असं समज. दीपंकर माझं कोणतंही म्हणणं टाळत नाहीत,’’ नम्रताने म्हटलं, ‘‘चल तर मग, आज लंच एखाद्या आलीशान हॉटेलात करूयात,’’ अविनाशने म्हटलं.

नम्रताला वाटत होतं, तिच्या आयुष्यात अविनाशमुळेच आनंद निर्माण झाला आहे. ती फुलपाखराप्रमाणे त्याच्या अवतीभवती बागडायची. त्याच्या तोंडून स्वत:ची स्तुती ऐकून तिला ढगातून फिरतोए असं वाटायचं. दुसरीकडे अविनाशची मजाच मजा होती. नम्रताचा पैसा, नम्रताचं तरुण शरीर फुकट वापरायला मिळत होतं. तिच्या पैशावर तो ऐश्वर्य भोगत होता. एकदा नम्रताने म्हटलं की दीपंकर धंद्याच्या कामाने आठवडाभर सिंगापूरला जातोय. लगेच अविनाशने जवळच्याच एखाद्या हिलस्टेशनला जायचा बेत ठरवला. नम्रताला विचार करायलाही वेळ न देता त्याने विमानाची तिकिटं काढली. पंचतारांकित हॉटेलात रूम बुक केली. अर्थातच हे सर्व नम्रताच्या पैशाने. तिथे गेल्यावरही तो भरमसाठ पैसे खर्च करत होता. यावेळी प्रथमच नम्रताला त्याचं पैसे उधळणं खूप खूपच खटकलं.

तिच्या आणि दीपंकरच्या नात्यात ही अविनाशची वाळवी उपटली होती. वाळवी लाकूड पोखरतंच नाही, तर चक्क लाकूड खाऊन टाकते. कुठे स्वत:चा मागमूसही ठेवत नाही. त्यामुळेच वाळवीपासून सुटका करून घेणं सोपं नसतं. काही वेळा तर अॅण्टीटर्माइट स्प्रेलाही ती पुरून उरते. मग अधिक जहाल औषधांची मदत घ्यावी लागते.

गेले काही दिवस नम्रताला जाणवत होतं की अविनाशच्या मागण्या सतत वाढताहेत. केव्हाही तो तिचं क्रेडिट कार्ड मागून घ्यायचा. असा उधळेपणा तिला खटकत होता. दीपंकरने कधीही तिला खर्चाबद्दल अवाक्षराने विचारलं नव्हतं. तिच्यासाठी तो कितीही पैसे देत होता. पण त्याच्या परिश्रमाने मिळवलेल्या पैशावर अविनाश स्वत: काहीही न करता डल्ला मारत होता. दीपंकरचा तिच्यावरचा विश्वास अन् त्याची सौम्य वागणूक यामुळे तिला अपराधी वाटू लागलं होतं. अविनाश खूप रोमॅण्टिक आहे पण दीपंकरने कधीही तिला ती त्याला आवडत नाही असं तिला जाणवू दिलं नव्हतं. त्याने तिची काळजी घेणं, तिला हवं ते, हवं तेव्हा करण्याचं स्वातंत्र्य देणं म्हणजे प्रेमच नव्हतं का?

दुसरीकडे अविनाश सतत तिच्या शरीराचा उपभोग घेत होता अन् पैसे मागत होता. याला प्रेम म्हणतात का? छे: ही तर चक्क फसवणूक आहे. तो तिला लुटतोय. तिने अॅण्टीटर्माइट कंपनीतून आलेल्या बुकलेटमध्ये वाचलं होतं की दमट जमिनीत किंवा हिरवळीवर वाळवी वारुळ उभारते. दुरून ते फार छान दिसतं, पण चुकून हात लागला तरी हाताला झिणझिण्या येतात. जवळ जाऊन बघितलं तर आत असंख्य वाळवी वळवळत असतात. ते बघून फार ओंगळ वाटतं. मनात एक घाणेरडी भावना दाटून येते.

तिला आता कळत नव्हतं तिच्या मनावर अन् देहावर कब्जा करणाऱ्या अविनाशरूपी वाळवीवर कोणता स्प्रे मारावा. दीपंकरसारख्या सज्जन माणसाचा विश्वासघात केल्यामुळे मन पोखरलेल्या लाकडासारखं पोकळ झालं होतं. मनाची कवाडं कशी अन् किती काळ बंद राहातील? उघडी झाली तर तिचे अन् दीपंकरचे संबंध चांगले राहातील की सर्वच काही कोसळून पडेल? त्यातून हे नातं रेशीमबंधाचं, पतिपत्नीचं.

नम्रताला तिची चूक उमगली होती. तिने मोकळ्या मनाने दीपंकरचा स्वीकार केला नव्हता. त्याला समजून न घेता, त्याला दोष दिला होता. त्याचा फायदा घेत अविनाशने तिला जाळ्यात ओढलं होतं. तिची स्तुती करून तो तिला जाळ्यात घट्ट आवळत होता. ती वेडी त्याच्या स्वार्थाला प्रेम समजत होती.

त्याक्षणी तिला साक्षात्कार झाला की वाळवी तिच्या घरात नाही, तिच्या आयुष्याला लागली आहे. हळूहळू ती पसरते आहे. बाहेरून सगळं काही छान छान आहे. आतून मात्र पोकळ होतंय. याला आवर घातलाच पाहिजे. आयुष्याचा संपूर्ण नाश होण्याआधीच जालीम उपाय केला पाहिजे.

‘‘वाळवी पसरतेय. माणसं पाठवा. फवारणी करावी लागेल,’’ तिने कंपनीला फोन केला.

‘‘मॅडम, अजून अवकाश आहे. माणसं बरोबर त्यांच्या वेळेलाच येतील.निश्चिंत असा.’’ पलीकडून फोन बंद झाला.

‘‘आता मलाच पुढाकार घ्यायला हवा. या वाळवीचा नायनाट करायलाच हवा,’’ स्वत:शीच पुटपुटत नम्रता मनातल्या मनात योजना आखू लागली.

तिचा मोबाइल वाजला. अविनाशचा फोन होता. तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. फोन वाजतच राहिला. तिने शांतपणे फोन स्विच ऑफ केला अन् कपाटातून कपडे काढायला लागली. अविनाशबरोबर खरेदी केलेलं सर्व सामान वाळवीने खराब झालं होतं. मागच्या अंगणात नेऊन तिने त्यावर रॉकेल ओतलं अन् काडी लावली.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें