कथा * सुमन बारटक्के
साऱ्या घरात तो वास, खरं तर दुर्गंध भरून होता. घरात वाळवी लागली होती. ती संपवण्यासाठी अॅण्टीटर्माइट औषधांची फवारणी सुरू होती. त्या वासाने तिचा जीव गुदमरू लागला होता. वाळवी, म्हटलं तर इवलासा जीव, पण माणसाचं जिणं दुरापास्त करून टाकते.
सगळं घर अस्ताव्यस्त पसरलं होतं. स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, बाल्कनी, एकही जागा अशी नव्हती जिथे वाळवीने बस्तान बसवलं नव्हतं. त्यामुळे सगळं सामान बाहेर काढून औषधफवारणी करावी लागत होती.
दर दोन महिन्यांनी ही सगळी सर्कस करावी लागायची. दिल्लीहून फरीदाबादला आल्यावर इतका त्रास होईल असं तिला वाटलंच नव्हतं, स्वत:चा बंगला बांधून घेणं जसं जिकिरीचं, कष्टाचं काम आहे, तसंच तयार बंगला घेणंही एकूणात त्रासाचंच काम आहे. राहायला लागल्यावर त्यातल्या उणिवा, दोष वगैरे लक्षात यायला लागतात. पण सध्याच्या काळात दिल्लीला बंगला घेणं ही फारच अवघड बाब होती. त्यांच्या बजेटमध्ये दिल्लीला बंगला बसत नव्हता. शेवटी फरीदाबादलाच बंगला घ्यायचं ठरलं. तसं म्हटलं तर फरीदाबादहून दिल्लीचं अंतर होतंच किती? दिल्ली सोडण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण नवरा दीपंकरच्या हट्टामुळे ती फरीदाबादला आली होती. त्यांच्या स्टेट्सला साजेसाच होता हा बंगला. अन् काय कमी होतं दीपंकरला? पैसा, प्रतिष्ठा, स्टेट्स, दाराशी शोफर, ड्रायव्हरसहित दोनतीन गाड्या. अशावेळी दिल्ली दूर वाटण्याचं काही कारण नव्हतं. अन् दीपंकरला वाद घालायचा नव्हताच! निर्णय झालाच होता.
‘‘मॅडम, आमचं स्प्रे मारण्याचं काम आत्तापुरतं संपलंय. पण दोन महिन्यांतच पुन्हा फवारणी व्हायला हवी. आत्ताच वाळवीला कंट्रोल केलं नाही तर फार नुकसान होईल. अन् वाळवीची मजा अशी असते की बाहेरून आपल्याला कल्पनाच येत नाही अन् आतल्या आत वाळवी सगळं पोखरून टाकते. मी तर तुम्हाला असं सुचवतो की तुम्ही आमच्या कंपनीबरोबर वर्षभराचं कॉण्टॅ्रक्ट करा. आमची माणसं ठराविक दिवशी येतील अन् काम करून जातील. तुम्ही फोन करण्याचीही गरज नाहीए.’’ स्मार्ट एक्झिक्युटिव्ह, आपल्या कंपनीचा बिझनेस वाढवू बघत होता.