* डॉ. विलास जोशी
लग्नाला दहा वर्षं होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का? पतिपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं? अर्थात् हे सर्वच विवाहित स्त्रीपुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे? या क्षणी तरी स्वराला असंच वाटतंय.
त्यांच्या लग्नाला दहा वर्षं होऊ घातलीत. आठ वर्षांचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे. आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही. घरात आधुनिकपणा अन् संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात. शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची. नंतर तिने जॉब सोडला. आता शिव बऱ्यापैकी मोठा झालाय अन् स्वराचा वेळ शॉपिंग, गॉसिप्स असल्या गोष्टीत जातोय.
आजही बराच वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळाकडे बघितलं. शिवला यायला अजून वेळ होता. आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच. बसूनबसून कंटाळली तेव्हा स्वयंपाक्याला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन गाडी घेऊन ती घराबाहेर पडली.
मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकांकडे होतं. किती तरी जोडपी एकत्र फिरत होती. खरेदी करत होती. आलोक आणि ती अशी एकत्र फिरून किती तरी वर्षं उलटली होती. हल्ली तर आलोकला रोमँटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो. अन् फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो. प्रेमही त्याचं यांत्रिकपणे उरकतो. त्याचा दिवस, म्हणजे रात्रही ठरलेली असते सॅटरडे नाइट. आता तर तिला आलोक रात्री जवळ आला तरी मळमळायला लागतं. ती टाळायलाच बघते. कधी जमतं, कधी आलोकची सरशी होते. तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का? प्रेम तर उन्माद असतो. वादळासारखं ते घोंघावतं, शरीर, मनाचा ताबा घेतं, सुखाची लयलूट करून शांत होतं...पण हे आलोकला कुणी समजवायचं? तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे करतो. पूर्वी असं नव्हतं. पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का?
‘‘एक्सक्यूज मी, मॅडम, एक फॉर्म भरून द्याल का?’’ एक तरुण तिच्या जवळ येऊन अदबीने म्हणाला, तशी ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.