* कमल कांबळे
अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये साक्षी दिसली अन् बघता क्षणीच संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन् दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी अन् सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण अन् विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन् साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली.
पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दु:ख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर पाच महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपाएवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन् सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता.
साक्षीला मुलगी झाली. तिच्याचसारखी सुंदर, साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल... पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोनसाखळी गं ती.’’ म्हणून तिचे पटापट मुके घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं.
हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळित चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी चार वर्षांची होती. दिवस गेले अन् मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली.
‘‘पूर्वावहिनी, मी सोनोग्राफी करवून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करवून घेईन.’’