कथा * राजलक्ष्मी भोसले
‘‘अहो, आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का?’’ घराला कुलूप घालता घालता संगीतानं म्हटलं.
राहुलनं रागानं तिच्याकडे बघितलं, ‘‘का? तुला काय झालंय? रोज तूच आणतेस ना?’’
‘‘हो...पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय. तिची तब्येत बरी नाहीए.’’
हे ऐकताच राहुलचं डोकं तापलं, ‘‘तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाही, कधी बाबांचा मूड ठीक नाही,’’ चिडक्या आवाजात राहुल बडबडला.
राहुलचं बोलणं ऐकून संगीता रडवेली झाली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्न ठरवतानाच तिनं राहुलला व सासूसासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी तिला घ्यावी लागेल. त्यावेळी तर राहुलनं अगदी आनंदानं संमती दिली होती. पण आता जेव्हा ती आईकडे जायचं म्हणते राहुल असाच रिएक्ट होतो. एरवी ती शांतपणे ऐकून घेते. समंजसपणे दुर्लक्षही करते, पण आज मात्र ती खूपच दुखावली गेली. थोडी चिडूनच म्हणाली, ‘‘ठीक आहे. मीही आता परत येणार नाही. तिथंच राहीन.’’
राहुलनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तिला तिच्या बसस्टॉपवर सोडून तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.
संगीताचा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावर ती त्याच मन:स्थितीत बसमध्ये चढली. ऑफिसमध्ये गेली. कशाबशा काही फायली तिनं हातावेगळ्या केल्या. पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरली होती. ती ऑफिसातून निघाली अन् थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली.
दारात संगीताला बघताच आनंदानं रितूनं तिला मिठीच मारली. नंतर तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघत तिनं विचारलं, ‘‘काय झालं गं?’’ राहुलशी भांडलीस का?
‘‘छे छे, तसं काही नाहीए,’’ संगीता म्हणाली.
‘‘अस्स? म्हणजे आता तुला माझ्याशी खोटं बोलावं लागतंय तर?’’ रितूनं नाराज होत म्हटलं.
‘‘नाही गं! तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळं ठाऊकच आहे,’’ संगीता म्हणाली.
‘‘बरं तू बस, मी आले,’’ रितूनं तिला सोफ्यावर बसवलं अन् प्यायला पाणी दिलं. मग पटकन् आत जाऊन तिनं जेवणाची दोन ताटं तयार केली अन् संगीताला स्वत:बरोबर जेवायला लावलं.