कथा * ऋता गुप्ते
रमा भराभर कामं आटोपत होती. नजर मात्र स्वयंपाकघरातल्या घड्याळाकडे होती, त्याचवेळी कान बाहेरच्या फाटकाच्या आवाजाकडे लागलेले होते. चहाचा घोट घेत तिनं सँडविच टोस्टरमध्ये ब्रेडचे स्लाइस लावले.
तिनं मुलाला हाक मारली, ‘‘श्रेयांश, अंघोळ लवकर आटोप...शाळेला उशीर होईल.’’
‘‘मम्मा, माझे मोजे दिसत नाहीत.’’
मोजे शोधण्याच्या गडबडीत चहा पार गार झाला. रमानं मोजे दिले. त्याची स्कूल बॅग चेक केली. पाण्याची बाटली भरली.
‘‘चल बाळा, दूध कॉर्नफ्लेक्स घे. केळंही खा.’’
‘‘मम्मा, आज डब्यात काय दिलं?’’
श्रेयांशच्या या प्रश्नालाच ती घाबरत होती. त्याची नजर टाळत तिनं म्हटलं, ‘‘सँडविच.’’
‘‘काय...मम्मा, अगं काल पण तू तेच दिलं होतंस...मला नको डबा...इतर मुलांच्या आया काय काय, नवंनवं देतात डब्यात...’’ रडवेला होऊन श्रेयांश म्हणाला.
‘‘बाळा, आपली मालतीबाई दोन दिवस झाले येत नाहीए. ती आली की तुला रोज छान छान पदार्थ मिळतील डब्यात....प्लीज हट्ट करू नकोस, नाहीतर पैसे देते. स्कूल कॅण्टीनमधून काहीतरी घे आजच्या दिवस.’’
इतर मुलांच्या आया तिच्यासारख्या वर्किंग नव्हत्या. पण ऑफिसमधून येतानाच इतका उशीर झाला की शेवटी येतानाच तिनं रात्रीसाठी डिनर पॅक करून आणला.
घड्याळात सात वाजले. स्कूलबस येणारच होती. मालती अजूनही आलेली नव्हती. श्रेयांशचा लाडाने गालगुच्चा घेत ती त्याच्यासकट पायऱ्या उतरू लागली.
या कामासाठी ठेवलेल्या बायकांनाही स्वत:चं महत्त्व बरोबर ठाऊक असतं. त्यामुळेच त्या कधी उशीरा येतात, कधी दांड्या मारतात. मालती गेली तीन वर्षं तिच्याकडे काम करतेय. सकाळी बरोबर सहाला ती कामावर हजर होते आणि रमा कामावर जाण्याआधी नऊ वाजेपर्यंत तिची कामं आटोपलेली असायची. ती स्वयंपाक फार छान करायची, त्यामुळे लंचबॉक्समध्ये नेहमीच चविष्ट पदार्थ असायचे. सायंकाळी रमा सहापर्यंत घरी यायची, त्यावेळी मालती पुन्हा यायची. सायंकाळच्या चहासोबत काहीतरी खायलाही द्यायची अन् रात्रीचा स्वयंपाक करून निघून जायची.
मालतीचा रमाला खूप आधार होता. तिच्यामुळेच ती ऑफिसच्या कामात पूर्णपणे लक्ष देऊ शकत होती. घराची काळजी नव्हती. त्यामुळेच तीन वर्षांत रमानं दोन प्रमोशन्स मिळवली होती. आता तर तिचा पगार रोहनपेक्षा दुप्पट झाला होता. पण मालती नसली तर मात्र तिच्या हालांना सीमा नसायची. वाढलेला पगार अगणित नव्या जबाबदाऱ्या घेऊनच आला होता. अर्थात वाढलेल्या पगारामुळे घरातली सुबत्ता अन् सुखसुविधाही वाढल्या होत्या. इतक्या पॉश लोकॅलीटीत असा आलिशान फ्लॅट घेणं त्यामुळेच शक्य झालं होतं.