शॉर्ट कट

कथा * आशा आर्या

अरे देवा! पुन्हा एक नवा ग्रुप…सगळं जग जणू व्हॉट्सएपमध्ये आवळून बांधलंय. ‘सितारे जमीं पर’ नाव असलेला हा ग्रुप नसरीनला आत्ताच दिसला होता. कॉलेजात जाण्यापूर्वी नित्याच्या सवयीप्रमाणे ती व्हॉट्सएप मेसेजेस चेक करत होती.

या व्हॉट्सएपचीही शेवटी सवयच लागते. सवय काय, खरंतर व्यसन म्हणायलाही हरकत नाही. बघितलं नाही, तर नेमकं काही तरी अति महत्त्वाचं आपल्याला कळत नाही. कुठल्याशा ग्रुपमधून तर एकाच दिवसात शेकडो मेसेजेस येतात…बिच्चारा मोबाइल हँग होतो. त्यातले निम्मे तर फुकटचं ज्ञान वाटणारे कॉपीपेस्टच असतात. उरलेले गुडमॉर्निंग, गुडइव्हिनिंग, गुडनाईटसारखे निरर्थक असतात. येऊनजाऊन एखादाच मेसेज दिवसभरात कामाचा सापडतो. पण येताजाता उगीचच मेसेज चेक करायचा, चाळाचा असतो मनाला. विचार करता करता नसरीन भराभर मेसेजेस चेक करत होती, डिलीटही करत होती.

बघूया तरी या नव्या ग्रुपमध्ये काय विशेष असेल? ओळखीच्यापैकी कुणी असेल का? अॅडमिन कोण असेल? तिनं नव्या ग्रुपच्या इन्फोवर टॅप केलं. आत्ता तरी या ग्रुपमध्ये १०७ लोक जॉइन झालेले आहेत. स्क्रोल करता करता तिची बोटं अचानक एका नावावर थांबली. राजन? ग्रुप अॅडमिनला ओळखताच ती आनंदानं चित्कारली.

हा राजन तर ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’चा आयोजक आहे. याचाच अर्थ तिचा प्रोफाइल पहिल्या पातळीवर निवडला गेला आहे. नसरीनला आनंद झाला.

नसरीन जयपूरला राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुबातली एक मुलगी. पण तिची महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. उंच, गोरी, शेलाटी, आकर्षक चेहरा अन् धीटपणा असणारी ही मुलगी. तिच्या उड्या मोठ्या आहेत अन् त्यासाठी हवं ते करायची तयारी आहे. रूढीवादी समाजानं लादलेली बंधनं तिला मान्य नाहीत. ती चक्क बंडखोरी करते. तिला मॉडेल बनायचं आहे. पण तिच्या जुनाट विचारांच्या कुटुंबात भाऊ व आई तिला सतत बंधनात ठेवतात. वडिलांची ती लाडकी आहे. ते तिला काहीच म्हणत नाहीत. आई तिच्यासाठी मुलगा शोधतेय. नसरीनला लग्न मुलं बाळं काहीही नकोय. तिच्या बरोबरीच्या मुलींना तिचं बिनधास्त वागणं, फॅशनेबल राहणं या गोष्टींचा मत्सर वाटतो. पण तसं स्वत:ला राहता आलं तर त्यांना आवडलंच असतं.

गावातली वयस्कर मंडळी आणि मौलानासाहेब तिच्या वडिलांना दटावून चुकली आहेत, ‘‘तुमच्या मुलीला आवरा. तिच्यामुळेच समाजातल्या इतर मुली बिघडतील.’’ त्यामुळेच नसरीनच्या अब्बांनी तिला सर्वांच्या नजरेपासून दूर जयपूरला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला पाठवलं आहे.

एक दिवस तिनं कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक सर्क्युलर बघितलं. राजनच्या कंपनीनं ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’ आयोजित केली होती. राजनच्या कंपनीतून निवडल्या गेलेल्या स्त्री-पुरूष मॉडेल्सना मार्केटमध्ये मागणी होती. ही स्पर्धा वेगवेगळ्या राऊंडमधून होती. शेवटची फेरी मुंबईत होती. निवडल्या गेलेल्या मॉडेलला दहा लाख रूपये बक्षिस होतं. शिवाय एक वर्षांचं मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टही नसरीननं ठरवलं या स्पर्धेत उतरायचं. कुणी गॉडफादर नसताना हे धाडस करणं तसं धोक्याचं होतं. पण नसरीननं आपली एंट्री पाठवली. बघूया योग असेल तर पुढला रस्ताही दिसेल.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात राजनचं नाव मोठं होतं. त्याच्याबद्दल बरेच प्रवादही होते. पण त्याच्यासाठी मॉडेलिंग करणं हे प्रत्येक नवोदित मॉडेलचं स्वप्नं होतं. आज राजनच्या या ग्रुपमध्ये स्वत:ला सम्मिलित करताना नसरीनला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. नीरस व्हॉटस्एप आता मजेदार वाटू लागला होता.

‘‘आता अगदी प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक अन् शिस्तबद्ध पद्धतीनं करायला हवी.’’ तिनं स्वत:लाच समज दिली. सर्वात आधी तिनं व्हॉटसएप प्रोफाइलच्या डीपीवरचा आपला जुना फोटो काढून तिथं एक नवा सेक्सी अन् हॉट फोटो टाकला. मग राजनला पर्सनल चॅट बॉक्समध्ये ‘थँक्स’चा मेसेज टाकला.

प्रत्युत्तरात राजननं दोन्ही हात जोडून केलेल्या नमस्काराचे स्माइलही टाकले. हा राजनशी तिचा पहिला चॅट होता.

दुसऱ्यादिवशी नसरीननं आपले काही फोटो राजनच्या इन बॉक्समध्ये टाकले अन् ताबडतोब ‘‘सॉरी, सॉरी चुकून पाठवले गेले, तुम्हाला पाठवायचे नव्हते.’ असंही लिहून पाठवलं.

राजनचा मेसेज आला, ‘‘इट्स ओके. बट यू आर लुकिंग व्हेरी सेक्सी.’’

‘‘सर, यावेळी मी जगातली सर्वात आनंदी मुलगी आहे, कारण तुमच्यासारख्या किंग मेकरशी संवाद साधते आहे.’’

‘‘मी तर एक साधासा सेवक आहे कलेचा.’’

‘‘हिऱ्याला स्वत:चं मोल कळत नाही म्हणतात.’’

‘‘तुम्ही विनाकारण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय.’’

‘‘खरं आहे तेच सांगतेय.’’

राजननं पुन्हा ती नमस्काराची धन्यवाद दर्शवणारी मुद्रा पाठवली.

‘‘ओके, बाय सर, उद्या भेटूयात,’’ दोन स्माइली पाठवून नसरीननं चॅटिंग थांबवलं.

दोन दिवसांनी स्पर्धेचा पहिला राऊंड होता. नसरीनने राजनला लिहिलं, ‘‘सर, ही माझी पहिली संधी आहे, आपली मदत असेल ना?’’

‘‘हे तर काळच सांगेल किंवा तू.’’ राजननं जणू तिला हिंट दिली.

नसरीनच्या लक्षात आलं ते. ‘‘ही कॉन्टेस्ट मला जिंकायचीच आहे…कोणत्याही किंमतीवर.’’ नसरीननं लिहिलं जणू तिच्याकडून तिनं हिरवा झेंडा दाखवला होता.

संपूर्ण देशातून आलेल्या साठ मॉडेल्सपैकी पहिल्या राउंडमधून वीस मुलींची निवड करण्यात आली. त्यात नसरीन होती. तिचं अभिनंदन करण्यासाठी राजननं तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. ही तिची राजनशी प्रत्यक्ष झालेली पहिली भेट होती. तो फोटोत दिसतो, त्यापेक्षाही प्रत्यक्षात अधिक सुंदर आणि आकर्षक आहे हे तिला जाणवलं. केबिनमध्ये तिचे गाल थोपटत त्यानं विचारलं, ‘‘बेबी, हाऊ आर यू फिलिंग नाऊ?’’

‘‘हा राऊंड क्वालिफाय केल्यावर की तुम्हाला भेटल्यावर?’’ खट्याळपणे नसरीननं विचारलं.

‘‘स्मार्ट गर्ल.’’

‘‘पुढे काय होणार?’’

‘‘सांगितलंय ना, ते तुझ्यावर अवलंबून आहे.’’ तिच्या उघड्या पाठीला हलकेच स्पर्श करत तो म्हणाला.

‘‘ते तर झालंच, पण आता कॉम्पिटिशन अधिकच तीव्र होईल.’’ त्याच्या स्पर्शाचा बाऊ न करता ती म्हणाली.

‘‘बेबी, तू एक काम कर.’’ तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत तो म्हणाला, ‘‘दुसऱ्या राउंडला अजून दहा दिवस आहेत. तू रोनित शेट्टीचा पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा क्लास करून घे. मी त्याला फोन करतो.’’

‘‘सो नाइस ऑफ यू…थँक्स,’’ म्हणत तिनं त्याच्याकडून रोनितचं कार्ड घेतलं.

दहा दिवसांनी दुसऱ्या राउंडमध्य निवडल्या गेलेल्या दहा मॉडेल्समध्ये नसरीनचा समावेश होता.

फायनल स्पर्धा मुंबईत होती. जजेसमध्ये राजनखेरीज एक प्रसिद्ध टीव्ही एक्ट्रेस अन् एक प्रसिद्ध पुरूष मॉडेल अशी मंडळी होती.

सर्व स्पर्धकांसोबत नसरीन मुंबईला आली. त्यांची खास व्यवस्था करण्यात आली होती. राजननं मेसेज करून तिला आपल्या खोलीत बोलावलं.

‘‘सो बेबी, तू काय ठरवलं आहेस?’’

‘‘त्यात ठरवायचं काय? हे एक डील आहे. तुम्ही मला खुश करा. मी तुम्हाला खुश करेन.’’ धीटपणे नसरीननं म्हटलं.

‘‘ठीकय तर मग, रात्रीच डीलवर शिक्कामोर्तब करू या.’’

‘‘आज नाही…उद्या…रिझल्टनंतर.’’

‘‘माझ्यावर विश्वास नाहीए?’’

‘‘विश्वास आहे. पण माझ्याकडेही सेलिब्रेट करायला काही कारण हवं ना?’’ त्याला हलकेच दूर सारत ती म्हणाली.

‘‘अॅज यू विश…ऑल द बेस्ट,’’ तिला निरोप देत राजननं म्हटलं.

दुसऱ्यादिवशी वेगवेगळ्या तिन्ही राउंडनंतर फायनल निर्णय डिक्लेर झाला अन् नसरीन ‘‘फेस ऑफ द ईयर’’ म्हणून निवडली गेली. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात गेल्या वर्षीच्या विनरनं नसरीनच्या डोक्यावर मुकुट घातला.

आनंदानं नसरीनचे डोळे भरून आले. तिनं कृतज्ञतेनं राजनकडे बघितलं. राजननं डोळा मारून तिला रात्रीच्या डीलची आठवण करून दिली. नसरीन प्रसन्न हसली.

त्या रात्री नसरीननं आपला देह राजनच्या हवाली करून यशाच्या मार्गावरचा एक शॉर्टकट निवडला. त्या वाटेवरचं पहिलं पाऊल टाकताना तिच्या डोळ्यांतून दोन गरम अश्रू ओघळले अन् उशीवर उतरून दिसेनासे झाले.

स्पर्धा जिंकल्यावर सगळ्याच माध्यमांनी तिचा उदोउदो केला. स्पर्धेनंतर प्रथमच ती जयपूरला आली, पण कट्टरपंथी समाजाच्या लोकांनी तिचा निषेध केला. काळे झेंडे दाखवले. मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तसे फलकही ते दाखवत होते. तिचा भाऊच त्यात अग्रभागी होता. ती स्टेशनवर उतरू शकली नाही. दूरवर उभे असलेले तिचे अब्बा असहायपणे बघत होते. त्यांचे डोळे डबडबले होते. त्यांनी हात हलवून तिला शुभेच्छा दिल्या. ट्रेन पुढे सरकली. त्यानंतर ती कधीच जयपूरला गेली नाही.

बघता बघता जाहिरातींच्या विश्वात नसरीनचं नाव झालं. पण अजूनही तिच्या मनातला मुक्काम ती गाठू शकली नव्हती. तिला आता इंटरनॅशनल स्पर्धेत उतरायचं होतं. राजनच्या आधरानं तेवढी मोठी झोप घेता येणार नव्हती. तिला आता अधिक भक्कम आधाराची गरज होती.

एक दिवस तिला समजलं की फॅशन जगतातले अनभिषिक्त सम्राट समीर खान यांना इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी एक नवा फ्रेश चेहरा हवा आहे. तिनं सरळ समीर खान यांची अपॉइंटमेंट घेतली अन् त्यांच्या ऑफिसात पोहोचली. थोड्या औपचारिक गप्पा झाल्यावर सरळ मुद्दयावर येत समीरनं म्हटलं, ‘‘बेबी, हा एक बीच सूट आहे. बीच सूट कसा असतो हे तुला माहीत असेल…आय होप!’’

‘‘यू डोंट वरी सर, जसं तुम्हाला हवंय, तसं होईल.’’ नसरीननं त्यांना आश्वस्त केलं.

‘‘ठीक आहे, पुढल्या आठवड्यात ऑडिशन आहे, पण त्यापूर्वी तुझं हे शरीर बीच सूटसाठी योग्य आहे की नाही हे मला बघावं लागेल,’’ समीरनं म्हटलं.

त्याच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ नसरीनला समजला. ती शांतपणे म्हणाली, ‘‘प्रथम ऑडिशन घेऊन ट्रेलर बघा. त्यावरून अंदाज आला की पूर्ण पिक्चर बघा…’’

‘‘वॉव! ब्यूटी विथ ब्रेन,’’ समीरनं तिच्या गालांवर थोपटत म्हटलं.

या प्रोजेक्टसाठी नसरीनची निवड झाली. या दरम्यान तिचा संपर्क राजनशी कमी होऊ लागला होता. एक महिन्यानंतर तिला समीरच्या टीमसोबत परदेशी जायचं होतं.

राजननं तिला डीनरसाठी बोलावलं होतं. नसरीन जाणून होती. ती रात्री त्याच्याकडे गेली की तो सकाळीच तिला सोडेल. पण तरीही या क्षेत्रात यायला तिला राजननं मदत केली होती. त्याच्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच.

‘‘तू समीर खानसोबत जाते आहेस?’’

‘‘हं!’’

‘‘मला विसरशील?’’

‘‘मी असं कधी म्हटलं?’’

‘‘तुला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीए…तो फार लबाड आहे. नित्य नवी मुलगी लागते त्याला.’’

‘‘मी तुम्हाला तरी कुठे ओळखत होते?’’

‘‘तुला उडायला आता आकाश कमी पडतंय…’’

‘‘तुम्ही माझ्यावर प्रेम तर करत नाही ना?’’ नसरीननं वातावरणातला ताण कमी करण्यासाठी हसत विचारलं.

तिच्या डोळ्यात बघत गंभीरपणे राजननं म्हटलं, ‘‘जर मी ‘हो’ असं उत्तर दिलं तर?’’

‘‘तुम्ही असं म्हणू नका.’’

‘‘का?’’

‘‘कारण फॅशनच्या क्षेत्रात प्रेम बीम नसतंच. तुमची कंपनी पुन्हा फेस ऑफ ईयर ऑर्गनाइज करते आहे. पुन्हा एक नवा चेहरा निवडला जाईल. ज्यामुळे तुमच्या कंपनीची अन् तुमच्या अंथरूणाची शोभा वाढेल. मग वर्षभर तुम्ही तिच्यातच बिझि राहाल. माझ्या माथ्यावर मुकुट घालताना मी त्या मॉडेलच्या डोळ्यांत जे दु:ख बघितलं, ते मला माझ्या डोळ्यात येऊ द्यायचं नाहीए.’’ अत्यंत शांतपणे पण स्पष्ट शब्दात नसरीननं आपलं म्हणणं मांडलं होतं.

राजन चकित नजरेनं तिच्याकडे बघत होता. इतका विचार करणारी मुलगी त्याला आजवर भेटली नव्हती.

नसरीन पुढे बोलली, ‘‘राजन, माझं ध्येय अजून बरंच लांब आहे. त्या वाटेवर तुमच्यासारखे अनेक लहान लहान थांबे येतील. मी तिथं थोडी विश्रांती घेईन, मात्र थांबून राहू शकत नाही.’’

रात्र सेलिब्रेट करण्याचा राजनचा उत्साह पार ढेपाळला. ‘‘चल, तुला गाडीपर्यंत सोडतो.’’

‘‘ओके. बाय बेबी, दोन दिवसांनी माझी फ्लाइट आहे. बघूया, पुढला मुक्काम कुठं असेल.’’ असं म्हणून नसरीननं आत्मविश्वासानं गाडी स्टार्ट केली.

तिची गाडी दिसेनाशी होई तो राजन तिकडे बघत उभा होता.

नवरे सासू

कथा * पौर्णिमा अत्रे

कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सहा वाजत आलेले बघून ती दचकली. कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.

आपली पर्स उचलून कविता म्हणाली, ‘‘मी निघते, सहा वाजून गेलेत.’’

डोळे वटारून नीलानं म्हटलं, ‘‘तुला कसली एवढी घाई झालीये? नवराबायको दोघंच तर आहात. घरी सासू, नणंद वगैरे कुणीही नाही…माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल…अन् मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे.’’

‘‘नाही तर काय? कविता तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो?’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘खरंय गं! पण कपिल येतच असतील.’’

‘‘तर काय झालं? नवरा आहे, सासू थोडीच आहे? जाऊयात ना थोड्या वेळानं.’’

कविता बसली खरी, पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं. आज     दुपारी नेमकी ती टीव्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आहेत अन् मग ही भिशी पार्टी…हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा…

भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणंपिणं…पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता.

तिला आता तिथं बसवेना. ताडकन् उठली. ‘‘मी निघतेच, मला घरी कामं आहेत,’’ ती म्हणाली.

‘‘अगं, घरी गेल्यावर कर ना? इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू, आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का?’’ वैतागून सीमानं म्हटलं, ‘‘अशी घाबरते आहे, जशी घरी सासवांची फौज आहे.’’

कवितानं फक्त हसून मान डोलावली अन् ती सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाहीए असा विचार करून ती भरभरा चालायला लागली. मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, ‘‘घरात सासू, आजेसासू, चुलतसासू, आत्तेसासू, मामेसासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला, पण नवरे सासू ऐकलीये कधी कुणी? तिला पुन्हा हसायला आलं. तिच्या घरात नवरेसासू आहे. तिचं लग्न झालं, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती.’’

‘‘कविता, भाग्यवान आहेस बाई, काय छान छान नवरा पटकावला आहेस,      एकटाच आहे, सासू नाही, सासरे नाहीत, दीर नाही, नणंदा नाहीत, मजेत जगशील सगळं आयुष्य.’’

स्वत: कवितालाही तसंच वाटलं होतं. खूपच आनंदात तिनं कपिलशी लग्न झाल्यावर मुंबईला संसार थाटला होता. कपिल एकटा होता. तिनं ठरवलं होतं की ती त्याच्यावर इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपण तो विसरेल. ती आणि कपिल… किती सुंदर आयुष्य असेल.

कपिल जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हाच त्याचे आईवडिल वारले होते. तो दिल्लीला मामामामींकडेच वाढला होता. शिक्षण संपलं, नोकरी लागली अन् तो मुंबईत आला. सप्तरंगी स्वप्नं घेऊन कवितानं संसाराला सुरूवात केली अन् तिच्या लक्षात आलं की कपिलला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते. स्वच्छ अन् व्यवस्थित लागते. स्वत:च सगळी कामं करणाऱ्या कपिलला गलथानपणा, गचाळपणा, अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही. तो लगेच चिडतो.

कवितावर तो खूप प्रेम करायचा. पण सतत तिला सूचनाही द्यायचा. सासूसासरे नसले तरी कपिल तिला सासूसारखाच धारेवर धरायचा. त्यामुळेच तिनं मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू.

कपिलला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं. त्यावेळी तिला एकटेपणा तर वाटायचा. पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा…चला, आता तीन चार दिवस तरी तिला कुणी काही म्हणणार नाही. सततच्या सूचनांचा भडिमार असणार नाही. तिच्या मैत्रिणींच्या सासुबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल असं तिच्या मनात यायचं. मग ती अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची. कोणंतही काम केव्हाही करायची. म्हणजे ती खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही, पण शेवटी घर आहे. म्यूझियम किंवा हॉटेल नाही. माणसाला तिथं आराम, दिलासा अन् निवांतपणा मिळायला हवा. अगदी प्रत्येक गोष्ट जिवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत? सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी, स्वच्छ आहे ना? तरीही कपिलला कुठं तरी धूळ दिसायची, कुठं तरी डाग दिसायचा, अन् मग तो त्यावरून बोलायचा. गप्प बसणं त्याला ठाऊकच नव्हतं.

तो स्वयंपाकघरात आला की कविताला वाटे साक्षात् सासूबाईच आल्या आहेत. ‘‘हा डबा इथं का ठेवला आहे? फ्रिज इतका गच्च भरलेला का आहे? पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का? गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही, ओट्याच्या भिंतीवरच्या टाइल्स किती अस्वच्छ दिसताहेत. मोलकरणीला नीट स्वच्छ करायला सांग.’’ असं त्याचं सतत चालायचं.

कधीकधी कविता कपिलला चिडवायला म्हणायची, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ना, ‘टू इन वन’ आहात म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’ तो विचारायचा.

‘‘तुम्ही स्वत: आहातच, तुमच्यात माझी सासूही वास करून आहे, ती फक्त मलाच दिसते.’’

यावर कपिल थोडासा ओशाळायचा अन् मग मोकळेपणानं हसून कविताला मिठीत घ्यायचा. तिही मग पुढे काय बोलणार? तिनं लग्नानंतर लगेच ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाही. शब्दांत शब्द वाढवयाचा नाही. भांडणं, वाद घालणं हा तिचा स्वभाव नव्हता. ठीक आहे. तो बोलतो, तर बोलू देत. ऐकून घ्यावं, जमेल तशी स्वत:त सुधारण करावी. नाही जमलं तर ‘सॉरी’ म्हणावं. आत तर लग्नाला २० वर्षं झालीत. एक मुलगी आहे. सुरभी तिचं नाव. मायलेकी मिळून बापाची फिरकी घेत असतात. दोनच पर्याय आहेत. एक तर या नवरे सासूबाई सोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. ती भांडत नाही. थोडं फार दुर्लक्ष करते, कधी स्वत:च पटकन् त्यानं दाखवलेली त्रुटी दुरूस्त करते किंवा सॉरी म्हणून हसून प्रसंग निभावून नेते.’’

विचारांच्या नादात ती आपल्या घरापर्यंत पोहोचली. त्याचवेळी कपिलही कारमधून उतरला. दोघं एकमेकांकडे बघून हसली. कवितानं मनातच आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला. ‘‘हा इतका पसारा का झालाय? सारा दिवस काय करतेस तू? सुरभीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय…वेळेवर तो जागच्या जागी का गेला नाही?’’ वगैरे वगैरे वगैरे.

ती अन् कपिल लिफ्टनं सोबतच वर आली. ती लॅचला किल्ली लावत होती, तेवढ्यात कपिलनं म्हटलं, ‘‘कविता, उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे बरं. केवढी धूळ साठलीय बघ.’’

‘‘बरं,’’ कवितानं हसून मान्य केलं. मनातल्या मनात ती स्वत:ला सावध करत म्हणाली, ‘‘कविता, तुझी नवरे सासू आली हं! सांभाळून राहा.’’

‘बेटेसे बाप सवाई’

कथा * रेखा नाबर

अनिरूद्धला स्काईपवर आलेलं पाहून नाना अंचबित झाले.

‘‘नानी, अनिरूद्ध आहे स्काईपवर, या लवकर.’’

‘‘नाना, आश्चर्य चकित झालात ना?’’

‘‘साहजिकच आहे. परवाच तर बोललो आपण.’’

‘‘सगळं ठिक आहे ना तिकडे?’’ नानींची मातृसुलभ चिंता.

‘‘हो, सगळं उत्तम आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना नविन तंत्रज्ञानाने जग लहान झालं. पण नाती दुरावली. संवाद आटला. म्हणूनच आज पुन्हा संपर्क साधला.’’

‘‘हे ‘दुधाची तहान ताकावर…’ असं झालं. सोबत राहीलात तर काहीतरी चांगलं चुगंलं करून घालेन. उतरत्या वयात तुमच्या मायेचा ओलावा सुखावेल. पण कसलं काय? तू अमेरिकेला आणि अनिता लंडनला. आम्ही भारतात असा त्रिकोण.’’ नानींची प्रेमळ व्यथा.

‘‘नानी, आता तुझ्या सर्व तक्रारींना पूर्णविराम मिळणार आहे. आम्ही लवकरच येतोय तिकडे. अन्यालासुद्धा कळवलंय. ती येणार आहे.’’

‘‘अगंबाई, सगळीच येणार. मुलेबाळे येता घरा तोची दिवाळी दसरा.’’

नानींनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. अनिरूद्ध व पत्नी अचला तर अनिता आपल्या अद्वैत, आराध्य या मुलांसहीत हजर झाली. अनिता तिच्या दिरांकडे दादासाहेबांकडे राहिली.

‘‘अनि, सहा महिन्यांपूर्वी तू आला होतास. लगेच रजा कशी मिळाली.’’ नानींनी विचारलं.

‘‘थोडीशी रजा आणि इथूनच काम करणार आहे. यावेळी मी एक प्रस्ताव घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्याचा.’’

‘‘गेल्यावर्षीच चांगले तीन महिने राहून आलो की.’’ नानांनी विचारलं.

‘‘तसं नाही नाना. आता तुम्ही दोघे कायमचेच चला. एकत्र राहू या. इकडे तुम्ही दोघांनीच राहणं सुरक्षित नाही. शिवाय तुमच्या तब्येतीची काळजी वाटते ना! नुकतंच मी मोठं घर घेतलंय. छान बाग आहे. भरपूर मोकळी जागा. अगदी हवेशीर आहे. अचला, फोटो दाखव.’’

घराचे, आतील सर्व खोल्यांचे फोटो पाहून नाना, नानी व अनिता हरखूनच गेले.

‘‘एकदम सही घर घेतलेयस रे दादीहल्या. नानानानींची रूम ढासूच.’’

‘‘हो ना? नाना नानी तुम्ही मस्त आरामात राहा. वीकेएन्डला आपण आऊटिंगला जात जाऊ.’’

‘‘नाही रे अनि. इकडची नाळ तोडून कायमचं तिकडे यावं असं नाही वाटत.   आमचं सोशल लाईफ, योग केंद्र, इथले नातेवाईक, सण, समारंभ सगळ्यानांच मुकावं लागणार.’’

‘‘नाना, तिकडेसुद्धा महाराष्ट्र मंडळ आहे. आपल्या घराजवळच आहे. त्यात विविध कार्यक्रम होतात. आम्ही जातो कधीकधी. तुम्ही जात जा नियमित.’’ अचलाने समजूत घातली.

‘‘बघतो विचार करून. आम्हाला वाटलं तूच कायमचा इथे येतोयस.’’

‘‘नाना, इथे यायचं म्हणजे सगळी सुरूवात इथली पहिल्यापासून. जीवघेणी स्पर्धा, प्रदूषण, महागाई, भ्रष्टाचार या सगळ्यांनी हैराण होणार आम्ही. तिकडे आमचं बस्तान बसलय. आव्हानं, स्पर्धा आहेत. पण इथल्यासारखे गैरप्रकार नाहीत. शिवाय इथली असुरक्षितता. सकाळी बाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल की नाही याची काय शाश्वती? सामाजिक विषमता तर पराकोटीची. या सगळ्यांना तोंड देता देता तोंडाला फेस येईल. म्हणून हा पर्याय.’’

नानानानींची ‘धरल चर चावतं’ आणि ‘सोडलं तर पळतं’ अशी परिस्थिती झाली. अनिताने समजूत घातली. तिचा कलही त्यांनी अमेरिकेला जाण्याकडे होता. नानानानी राजी झाले.

‘‘अनि, आम्ही तिकडे आलो तर या फ्लटचं काय करायचं? ठेवावा का? कधीतरी येऊ इकडे. नातेवाईक आहेत इथे.’’

‘‘नाना फ्लॅट ठेवून काय करायचंय? त्याची उत्सवारच होणार. प्रमिला मावशी, सरोज आत्या, दादासाहेब आहेतच…त्यांच्याकडे राहता येईल.’’ अचलाचा युक्तिवाद.

नानानानींना युक्तिवाद रूचला नाही. परंतु मुलाच्या कलानेच घ्यायचं म्हटल्यावर त्यांनी आपल्या विचारांना कलाटणी दिली.

‘‘नाना, फ्लॅट काढायचा असेल, तर आमच्या दादासाहेबांना विचारूया का? त्यांचा वन बी एच के कमी पडतोय.’’ अनिताचा प्रस्ताव.

‘‘जरूर जरूर. चांगला प्रस्ताव आहे हा. मी करेन फोन त्यांना.’’ नाना आनंदाने मनाले.

‘‘पण त्यांना परवडलं पाहिजे ना? दादासाहेब एकटे मिळवते. चार तोंड खाणारी, मुलांची शिक्षणं.’’ अक्याने मत मांडलं.

‘‘अचला, आम्ही आहोत ना! होईल काहीतरी व्यवस्था. पैशांची काळजी तुम्ही अजिबात करू नका.’’ अनिताचे समर्थन.

नानानानींनी कायमचे अमेरिकेला जायचे व फ्लॅट दादासाहेबांना सुपूर्द करायचा यावर शिक्कामोर्तब झाले. अनिताने आपल्या नवऱ्याशी व दादासाहेबांशी विचार विनिमय करून पैशांची व्यवस्था केली. नानानानींची मानसिक अवस्था काहीशी अस्थिर होती.

‘‘अनि बेटा, जाऊ या आपण. पण घाई नको करू. तुझी रजा किती दिवस आहे?’’

‘‘तसे एक महिन्यांपर्यंत आपण राहू शकतो. हो ना अच्चू?’’

‘‘माझं प्रमोशन ड्यू आहे. पण बघते काय जमतं ते.’’

‘‘इकडचे सर्व व्यवहार हाताळले पाहिजेत. बँका, पॉलिसीज, म्युचुअल फंड, शेअर्स, आमची पेंशन, सगळं व्हायला वेळ लागलेच,’’ नानांनी आपली अडचण बोलून दाखवली. ‘‘शिवाय दागिने आहेत लॉकरमध्ये. काही तर सासूबाईंच्या वेळचे आहेत. काय करायचे त्याचं अचला?’’ नानींचा प्रश्न.

‘‘ते दागिने तिकडे कुठे घालणार तुम्ही? अनिताकडे द्या.’’ नानांची सूचना.

‘‘तसं कशाला नानी? आपण ते दागिने घरी आणू. अनिताला हवे ते घेऊ दे. उरलेले आपण ठेवू. घालू या ना तिकडे महाराष्ट्र मंडळात समारंभाना जाताना किंवा पार्ट्यांना जाताना.’’ अचलाचा प्रस्ताव.

‘‘बरोबर घेणार म्हणजे कस्टमचा लोच्या.’’ अनिरूद्धची शंका.

‘‘अनि, मी असं छान पॅकिंग करतो ना, की काही प्रॉब्लमच येणार नाही.’’ नानांची ग्वाही.

‘‘चला. बेत तर अगदी उत्तम ठरला. मंडळी इस खुशी मे गोडाचा शिरा हो जाए. नो सॅकरीन.’’ नाना खुशीत म्हणाले.

‘‘वाटत बघत असतात खवय्येगिरीची,’’ नानींचा शेरा.

‘‘असू देत हो नानी. मी करते. अनितासुद्धा येणार आहे ना?’’

‘‘व्वा व्वा. ‘सोने पे सुहागा…’ चवीचं खाणार त्याला अचला देणार. ’’

खेळीमेळीच्या वातावरणात जाण्याची तयारी सुरू झाली. एका महिन्यांनंतरची तिकिटे काढली. दादासाहेबांशी फ्लॅटचा व्यवहार पूर्ण झाला.

‘‘आपण दादासाहेबांना फ्लॅट घरातल्या सामानासकट देऊ या.’’ नानींनी विचारलं.

‘‘हो. द्यावाच लागणार. त्या लहानशा घरातलं फर्निचर इथे चांगलं दिसणार आहे का? शिवाय खर्चसुद्धा परवडला पाहिजे ना?’’

‘‘तसं नाही अचला. आपण तरी या फर्निचरचं काय करणार आहोत?’’ नानींनी समजावलं.

नाना आर्थिक व्यवहार स्थिरस्थावर करण्याच्या मोहीमेवर रूजू झाले. द्विधा मनस्थितीत सर्व सोपस्कार केले जात होते. दागिने नानींच्या स्वाधिन केले.  ‘‘अचला, अनिता कोणी काय दागिने घ्यायचे ते ठरवा.’’ नानींनी विचारलं.

‘‘अनिता, तुला काय हवं ते ठेव. काही घाई नाहीए. तुझ्या दोन्ही सुनांची तरतूद करून ठेव.’’ अचला बोलली.

‘‘मला खास आवड नाहीए दागिन्यांची. आजीच्या हातचे आहेत ना, घेईन काही नग. अचला, आता तुम्हीसुद्धा तयारी करा. लहान बाळाचा आवाज ऐकायला कान आतूर झालेत.’’

‘‘तसं नाही गं अनिता. आता आम्हा दोघांचं प्रमोशन अपेक्षित आहे. नविन पोझिशेनवर सेटल होऊ दे ना!’’ अचलाने बाजू स्पष्ट करत म्हटलं.

‘आता तुला काळजी नको. नानानानी आहेत बेबी सिटिंगसाठी.’’ अनितानं म्हणणं पुढे रेटलं.

‘‘हो गं अचले. नाहीतरी दिवसभर आम्ही काय करणार? खरंच तुम्ही कराच विचार. मी बोलते अनिरूद्धशी.’’ नानींनी अनिताची री पुढे ओढली.

पॅकिंगसाठीचे दागिने नानांच्या स्वाधिन केले गेले.

‘‘नाना, तिकिटं पंधरा दिवसांनी हातात येतील. तुमची आणि नानीची औषधं आणायची असतील ना!’’

‘‘तरी बरं तब्येतीच्या फारशा तक्रारी नाही म्हणून. कृष्णा मेडिकलवाला सहा महिन्यांची औषधं पॅक करून पाठवणार आहे.’’

‘‘अनि, तुझ्या घरात देव्हारा, देव वगैरे आहेत का?’’

‘‘देव्हारा आहे. त्यात देवाच्या मूर्ती आहेत. आता दोनाची भर पडणार.’’

‘‘अगंबाई, कोणत्या मूर्ती घेतल्यास? दाखव तरी.’’

‘‘तुम्ही दोघं आमचे देवच आहात.’’

‘‘इतर मुलं म्हाताऱ्यांना टाळायला बघतात. आमचा मुलगा कवटाळतोय.’’

‘‘मंडळी, आमचे संस्कार तगडे आहेत.’’ असं बोलताना नानांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत होते.

जाण्याच्या तयारीबरोबर निरोप समारंभसुद्धा संपन्न होत होते. नानींचे महिला मंडळ, भिशी, नानांचा पेन्शनर कट्टा, हास्य क्लब सर्वांनी मोठ्या उत्साहात निरोप समारंभ साजरे केले. पेन्शनर कट्टयाचा समारंभ हॉल घेऊन दणक्यात साजरा झाला. कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटवस्तू दिल्या. नाना-नानींना प्रशंसापूर्वक भाषणे व कवितांचा नजराणाच पेश केला गेला. मन आनंदाने व पोट सुग्रास जेवणाने तृप्त झाले होते. परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असे काहीसे झाले. दुसऱ्यादिवशी सकाळी.

‘‘आज हास्यक्लबला गेला नाहीत. दमणूक झाली काय. पण कार्यक्रम मात्र छान झालाय. तुम्हाला सोन्याची अंगठी आणि मला पैठणी दिली. आज सकाळी चहा घ्यायला बाहेर नाही आलात. मी एकटीच बोलतेय. काय झालंय तुम्हाला? एकटेच बसून राहायलात. बरं वाटत नाहीए का? सगळं सोडून जाणं अवघड वाटतंय का?’’

‘‘बंद करा तुमची चर्पट पंजरी. जरा शांत बसू दे मला,’’ नानांनी चढ्या आवाजात फर्मावलं. त्याचवेळी अनिरूद्ध आत आला.

‘‘नाना, काय झालं? बरं वाटत नाही का?’’ त्याने पाठीवर ठेवलेला हात नानांनी झटकून टाकला. नानी व अनिरूद्धा बुचकळ्यात पडले.

‘‘तुम्ही बाहेर जा बघू. मी येतो जरा वेळाने नाश्त्याला.’’

थोड्यावेळाने ते नाश्त्यासाठी येऊन बसले.

‘‘नाना, आज गरमागरम डोसे आणि चटणी आहे.’’ अचला बोलली.

‘‘हां, ठीक आहे,’’ एक डोसा खाऊन ते उठले. नानींना चिंता वाटली.

‘‘असं काय? आज एकच डोसा?’’

‘‘पोट भरलंय. मित्राला भेटायला जातोय. जेवायला येईन.’’

विचारमग्न अवस्थेत ते बाहेर पडले. ते परत येईपर्यंत नानी चिंतातुरच होत्या. सर्वांची जेवणं यंत्रवतच झाली.

‘‘अनिरूद्धा. तिकिटं मिळाली का?’’

‘‘उद्या किंवा परवा देतो म्हणाला.’’

‘‘तुम्हा दोघांचीच आण.’’

‘‘म्हणजे तुम्ही दोघं…’’

‘‘येणार नाही.’’

दोनशेचाळीस व्होल्टचा धक्का लागल्यासारखे नानी, अनिरूद्ध, अचला थरथरले.

‘‘अजूनपर्यंत कोणताही निर्णय माझ्या सल्ल्याशिवाय घेतला नाही. आता इतका महत्त्वाचा निर्णय…’’

‘‘घ्यावा लागला. आताच कारण विचारू नका. अनिरूद्धला जाऊ दे. मग सांगेन स्वत:हून सगळं.’’

ते दोघं जाण्याची नानी वाटच पाहत होत्या.

‘‘सांगा आता. तुमच्या या विक्षिप्त निर्णयाचं कारण. ये ग बबडे.’’

‘‘ऐका. पेन्शनर कट्ट्याच्या निरोप संमारंभाचं जेवण खूपच जड झालं होतं. मन आणि पोट दोन्ही तृप्त होती. त्यामुळे लगेच झोप लागली. परंतु काही वेळातच  पोटात अस्वस्थ वाटायला लागलं. तुमची ब्रम्हानंदी टाळी लागली होती. चूर्ण     शोधायला गेलो. कपाट अनिच्या खोलीच्या बाहेरच आहे. त्यामुळे संभाषण स्पष्ट ऐकू येत होतं.’’

‘‘अनि, नानानानी आपल्या घराच्या प्रेमातच पडलेत.’’

‘‘बरं झालं. म्हणजे सगळी कामं ते खुशी खुशी करतील.’’

‘‘गार्डनिंग करणाऱ्या रॉबर्टला आणि कुक मेरीला काढून टाकू या.’’

‘‘हो. आता बचत करायलाच पाहिजे. नवीन धंद्याला भांडवल हवं ना!’’

‘‘शिवाय दोघांचा खर्च वाढणार.’’

‘‘तसं त्यांचं सेव्हिंग आहे. फ्लॅटचे पैसेही आहेत.’’

‘‘दादासाहेबांच्या पैशांबाबत मी जरा साशंकच होते.’’

‘‘दोघांचं पेन्शन इकडेच बँकेत जमा होणार. तो सर्व पैसा तिकडे ट्रान्सफर करण्याची तजविज केली पाहिजे.’’

‘‘तो तुझ्याच नावावर ठेव. धंद्याबाबत काही बोलला नाहीयेस ना?’’

‘‘छे ग. उगाच मध्येच खोडा घालणार. सगळं होऊ दे व्यवस्थित. मग पाहू. दागिन्यांचं काय झालं?’’

‘‘काय होणार? अनिताने तीन-चार बारीक नग घेतले. उरलेले दागिने नाना पॅक करून देणारेत.’’

‘‘गुड. म्हणजे धंद्यासाठी लोन काढावं लागणार नाही. भारतवारी लई भारी. चला. झोपू या. खूप उशीर झालाय.’’

नानींच्या डोळ्यांना अश्रूची धार लागली.

‘‘मंडळी, केवढ्या मोठ्या संकटातून वाचलो, आनंद माना.’’

‘‘आपल्याच लेकराने केलेली मानहानी. मनाला लागणार नाही का?’’

‘‘त्या हानीपासून वाचल्याचा मला आनंद आहे.’’

‘‘पण आता आपण राहायचं कुठे? हा फ्लॅट तर दादासाहेबांना…’’

‘‘दिला. पण आपण त्यांचा घेतला.’’

‘‘अगंबाई, हा व्यवहार इतक्या पटकन् एकट्यानेच केलात?’’

‘‘एकट्यानेच नाही काही. माझा मित्र होता ना बरोबर.’’

‘‘हा कोणता मित्र?’’

‘‘तुमची बबडी. सौ. अनिता देशपांडे.’’

‘‘ही कार्टी नेहमीच तुम्हाला धार्जिणी असते. म्हणजे त्या दिवशी सकाळी मित्राला भेटायला गेला होतात तो…’’

‘‘हाच मित्र.’’ नानी दिलखुलास हसल्या.

‘‘बबडे, हसली गं हसली नानी.’’

‘‘पण फसले ना!’’

‘‘फसलीस कुठे?’’

‘‘माझे दागिने गेले ना अमेरिकेला.’’

‘‘कोणी सांगितलं? कपाट उघडून बघ. समोरच आहे डबा इन टॅक्ट.’’

‘‘त्यादिवशी माझ्यासमोरच पॅक केलेला डबा अचलाला दिला.’’

‘‘करेक्ट. पॅक केलेला डबा दिला. पण त्यात प्लॉस्टिकचे तुकडे आवाज       करत होते. ती आयडियासुद्धा या कार्टीचीच बरं का!’’

‘‘चांगले छुपे रूस्तम निघालांत दोघे?’’

‘‘या आनंदा प्रित्यर्थ मी माझा मुक्काम एका आठवड्याने वाढवणार आहे आणि आता लगेच जाऊन समोरच्या रूस्तमजीकडून तुम्हा दोघांच्या आवडीचं बटरस्कॉच आईस्क्रिम आणणार आहे.’’

हास्यकल्लोळात अनिताने दोघांना मिठीत घेतले.

दिवाळी

कथा * आशा साबळे

‘‘हे बघ शालिनी, मी कितीदा तुला सांगितलं आहे की जर वर्षातून एकदा मी तुझ्याकडे पैशाची मागणी केली तर तू माझ्याशी भांडण करत जाऊ नको.’’

‘‘वर्षातून एकदा? तुम्ही तर एकदाच इतके जास्त हरता की मी वर्षभर ते फेडत राहते.’’

शालिनीचं उपहासात्मक बोलणं ऐकून राजीव थोडा संकोचत म्हणाला, ‘‘आता जाऊ दे, तुलाही माहीत आहे की माझा हाच एक वीक पॉइंट आहे आणि तुझाही हाच वीक पॉइंट आहे की अजूनही माझा हा वीक पॉइंट तू दूर करू शकली नाहीस.’’

राजीवचा तर्क ऐकून शालिनी हैराण झाली. राजीव निघून गेल्यावर शालिनी विचार करू लागली की तिच्या आयुष्याची सुरूवातच या वीक पॉइंटपासून सुरू झाली होती. एमएचे पहिले वर्षही ती पूर्ण करू शकली नव्हती की तिच्या वडिलांनी राजीवबरोबर तिचे लग्न ठरवले होते. राजीव शिकला सवरलेला व दिसायलाही स्मार्ट होता.

सर्वात महत्त्वाची बाब ही की त्याचे उत्पन्न महिना ४०,००० रुपये होते. शालिनीने तेव्हा विचार केला होता की आईवडिलांना सांगावं की मला एमए पूर्ण करू द्या. पण राजीवला पाहिल्यानंतर तिलाच असे वाटले होते की कदाचित असा वर नंतर मिळणार नाही. बस्स् तेव्हापासूनच बहुधा राजीवबद्दल तिच्या मनाने कच खाल्ली होती.

आज तिला असे वाटले की लग्नानंतरही ती राजीवच्या गोडी गुलाबीने बोलण्याला व हसण्याला अजूनही भूलत होती.

लग्नानंतर शालिनीची ती पहिली दिवाळी होती. सकाळीच राजीव जेव्हा तिला म्हणाला की १० हजार रूपये काढून आण, तेव्हाच शालिनीला आश्चर्य वाटले. कारण कधी १-२ हजारांपेक्षा जास्त न मागणाऱ्या राजीवने आज इतके पैसे का मगितले.

शालिनीने विचारले, ‘‘का?’’

‘‘आण गं,’’ राजीव हसून म्हणाला होता. ‘‘महत्त्वाचे काम आहे, संध्याकाळी सांगतो.’’

राजीवचं रहस्यपूर्ण हसणं पाहून शालिनीला वाटले होते की कदाचित तो तिच्यासाठी नवी साडी आणेल. शालिनी दिवसभर सुंदर कल्पनांमध्ये रमली होती. पण सायंकाळी ७-८ वाजले तरी राजीव घरी आला नाही तेव्हा विचारांनी मनात एकच कल्ला केला,  ‘‘काही दुर्घटना तर घडली नसेल, कोणीतरी राजीवच्या मोटारसायकलपुढे फटाके लावून त्याला जखमी तर केले नसेल.’’

८ वाजल्यानंतर तिने घराचा उंबरठा तसाच राहू नये म्हणून ४ दिवे लावले. पण तिचे मन मात्र भयानक कल्पनांमध्ये गुंतून राहिले. पूर्ण रात्र जागून गेली, पण राजीव आला नाही.

घाईगडबडीत सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा, उन्हं वर आली होती आणि तिने पाहिले की राजीव दुसऱ्या पलंगावर झोपला आहे. त्याच्याकडे गेली, पण लगेच मागे सरकली. राजीवच्या श्वासांना दारूचा वास येत होता. तितक्यात शालिनीला पैशांची आठवण झाली. तिने राजीवचे सर्व खिसे तपासले. पण ते रिकामे होते.

‘‘कोणी राजीवला दारू पाजून सर्व पैसे काढून तर नाही ना घेतले?’’ तिने विचार केला. पण न जाणो किती तरी वेळ ती तिथेच उभी राहून मनाती शंकांचं समाधान करून घेत राहिली. शेवटी जेव्हा तो उठेल, तेव्हा विचारते असे म्हणून ती आपल्या कामाला लागली.

दुपारनंतर जेव्हा त्याला जाग आली, तेव्हा तिने चहा देताना विचारले, ‘‘कुठे होतात रात्रभर? भीतिने माझा जीव जायची वेळ आली. तुम्ही आहात की काही सांगतच नाही. तुम्ही दारू प्यायलाही सुरूवात केली? ते पैसे कुठे आहेत, जे तुम्ही खास कामासाठी घेतले होते?’’

शालिनीला वाटले की राजीव रागवेल, ओरडेल, संकोचेल, पण तो तिचा गैरसमज होता. शालिनीचे बोलणे ऐकून राजीव हसत म्हणाला, ‘‘हळू हळू, एक एक प्रश्न विचार, अगं. मी काही साडी खरेदीला गेलो नव्हतो.’’

‘‘काय?’’? शालिनी आश्चर्याने म्हणाली.

‘‘त्यात काय आश्चर्य वाटायचं? दरवर्षी आपण फक्त दिवाळीलाच तर भांडतो.’’

‘‘म्हणजे तुम्ही जुगार खेळून आलात? १० हजार रुपये तुम्ही जुगारात हरलात?’’ ती दु:खी होत म्हणाली.

राजीवने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, ‘‘अगं, वर्षभरात एकदाच तर पैसे खर्च करतो. तू तर वर्षभरात ५-६ हजारांच्या ४-५ साड्या खरेदी करतेस.’’

शालिनीला वाटले की थोडं समजून घेऊनसुद्धा ती राजीवला सुधारू शकेल. पण हा तिचा गैरसमज ठरला.

आधी १० हजार रुपयांवर संपणारी बाब आता २० हजार रुपयांवर पोहोचली. ती रक्कम चुकवता चुकवता पुढची दिवाळी आली होती.

मागच्यावेळी तर तिने लपवून मुलांसाठी १० हजार रुपये ठेवले होते. पण राजीव तेही घेऊन गेला होता. राजीव पैसे घेऊन जात असताना शालिनीने त्याला अडवले होते, ‘कमीत कमी मुलांसाठी तरी हे पैसे सोडा.’ पण राजीवने काही ऐकले नाही.

त्याचदिवशी शालिनीने ठरवले की पुढच्या दिवाळीपर्यंत हे प्रकरण निकालात काढायचे.

संध्याकाळी ५ वाजता राजीव परतला. त्याला रिकाम्या हाताने परतलेले पाहून मुले निराश झाली. पण काही बोलली नाहीत. शालिनीने त्यांना सांगितलं होते की त्यांना दिवे लावण्याआधी फटाके नक्की मिळतील. राजीवने आधी इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या, मग शालिनीला विचारले, ‘‘आपल्या आईकडून आलेले फटाके तर होतेच ना घरात?’’

शालिनी म्हणाली, ‘‘होते आता नाहीत?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘मी मोलकरणीच्या मुलाला दिले?’’

‘‘पण का?’’

‘‘तिच्या नवऱ्याने तिचे पैसे हिसकावून घेतले म्हणून?’’

राजीवने थोडा विचार केला. मग म्हणाला, ‘‘वळून वळून माझ्यावरच बोट ठेवले जात आहे तर…’’

‘‘हे पाहा, राजीव, मी कधीही मोठ्या आवाजात तुम्हाला विरोध केलेला नाही. तुम्हालाच माहीत आहे की तुमच्या या सवयी काय घात करू शकतात.’’

शालिनीचे बोलणे ऐकून राजीव चिडून म्हणाला, ‘‘ठिक आहे, ठिक आहे. मला सर्व ठाऊक आहे. एवढं दु:ख का करतेस? तुला कोणापुढे हात तर पसरावा लागत नाही ना?’’

शालिनी म्हणाली, ‘‘हीच तर भीती आहे. उद्या न जाणो मला आपल्या मोलकरणीसारखे कोणापुढे हात पसरायला लागू नये,’’ असे म्हणून शालिनीने बहुधा राजीवच्या दुखऱ्या नसेवर हात ठेवला. तो म्हणाला, ‘‘बडबड बंद कर? काय बोलते आहेस कळतंय तरी का??थोड्याशा पैशांसाठी इतकं वाईट बोलतेस.’’

‘‘थोडेसे पैसे? तुम्हाला कळतंय तरी का कि वर्षातून एकदा दारू पिऊन तुम्ही हजारो गमावून येता. तुम्हाला तर मुलांचा आनंद हिरावून घेताना काही वाईट वाटत नाही. नेहमी म्हणता की वर्षातून एकदाच तुमच्यासाठी दिवाळी असते. कधी विचार केला की माझ्या आणि मुलांसाठी ही दिवाळी वर्षातून एकदाच येते? कधी साजरी केली कुठली दिवाळी तुम्ही आमच्यासोबत?’’

शालिनीच्या तोंडून कधीही अशा गोष्टी न ऐकलेला राजीव आधी तर गप्पच उभा राहिला. मग संतापून म्हणाला, ‘‘जर तू मला पैसे न देण्यावर ठाम असशील तर मीही माझ्या मनाने वागणार आता.’’

आणि शालिनी राजीवला काही म्हणणार, त्या आधीच तो मोटारसायकल काढून निघून गेला.

शालिनी विचार करू लागली की या ११ वर्षातसुद्धा तिला हे कळू शकलं नाही की नेहमी गोडीगुलाबीने वागणारा राजीव असा एका दिवसात कसा बदलू शकतो.

‘‘दिवाळीच्या दिवशी मित्रांसमोर अपमानित होण्याच्या भीतिने तर राजीव जुगार खेळत नसेल ना. असे वाटतेय आता वेगळाच काही पर्याय पाहावा लागेल.’’ शालिनीने ठरवले.

तिकडे मोटारसायकल बाहेर काढताना राजीव विचार करत होता, ‘त्याने काय करावं? फटाके आणून दिले तर त्याचं नाव कापलं जाईल. शालिनी पैसेही देणार नाही. हे त्याला कळून चुकले. अचानक त्याला त्याचा मित्र अक्षयची आठवण आली. त्याच्याकडून पैसे उधार घ्यावेत.’ त्याने मोटार सायकल बाहेर आणली.

तितक्यात ‘‘कुठे निघाला आहात का?’’ हा आवाज ऐकून राजीवने वळून पाहिले.

त्याने पाहिले, समोर अक्षयची पत्नी रमा आणि तिची दोन्ही मुले येत होती.

‘‘वहिनी तुम्ही? आज कसे बाहेर पडलात?’’ त्याने मनातल्या मनातच म्हटले.

‘‘आधी आत तर बोलवा, मग सगळं सांगते.’’ अक्षयची पत्नी म्हणाली.

‘‘हो, हो, आत या ना. अगं इंदू, प्रमोद, बघा बरं कोण आलं आहे,’’ मोटारसायकल उभी करत राजीव म्हणाला.

इंदू, प्रमोद धावत धावत बाहेर आले. शालिनीसुद्धा आवाज ऐकून बाहेर आली.

‘‘रमा वहिनी, तुम्ही, दादा कुठे आहेत?’’

‘‘सांगते. आधी हे सांगा की एक दिवसासाठी तुम्ही माझ्या मुलांना आपल्या घरात ठेवू शकता का?’’

शालिनी लगेच म्हणाली, ‘‘हो, का नाही, पण काय झाले?’’

रमा उदास स्वरात म्हणाली, ‘‘झाले असे की तुमचे दादा हॉस्पिटलमध्ये आहेत. परवा त्यांचे अॅक्सिडेंट झाले होते. दोन्ही पायांना इतकी दुखापत झालीय की दोन महिन्यांपर्यंत उभे राहू शकत नाहीत. आणि पाहा ना, आज दिवाळी आहे.’’

राजीव घाबरून म्हणाला, ‘‘इतकी मोठी दुर्घटना घडली आणि तुम्ही आम्हाला सांगितलेसुद्धा नाही?’’

रमा म्हणाली, ‘‘तुम्हाला तर माहीतच असेल की माझे जाऊ आणि दिर येथे आले आहेत. आता रूग्णालयात पडल्या पडल्या हे म्हणतात की आधी माहीत असतं तर त्यांना बोलावलंच नसतं. म्हणतात की तुम्ही जा घरात आणि दिवे लावा, माझीच काय कुणाचीही इच्छा नाही.’’

राजीव आणि शालिनी दोघेही जेव्हा गप्प उभे राहिले, तेव्हा रमा म्हणाली, ‘‘आता मी आणि त्यांच्या भावाने म्हटले की आमची इच्छा नाही’’. तेव्हा म्हणू लागले, ‘‘मी काय मेलोय का जे घरात दिवे लावायचे नाही म्हणता? थोडेच तर लागले आहे. मुलांसाठी तरी तुम्हाला करावेच लागेल.’’

‘‘मी विचार करत होते की काय करू? मग मनात विचार आला आणि मुलांना मी इथे घेऊन आले. तुमची काही हरकत तर नाही ना?’’

इंदू रमाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. ती राजीवला म्हणाली, ‘‘पप्पा, तुम्ही राकेश आणि पिंकीसाठीही फटाके आणाल ना?’’

राजीव पटकन म्हणाला, ‘‘हो, हो, नक्की आणेन.’’ राजीव म्हणाला तर खरं, पण त्याला कळत नव्हतं काय करावं. तो याच गेंधळात होता इतक्यात शालिनी आतून पैसे घेऊन आली व त्याच्या हातात पैसे देत म्हणाली, ‘‘लवकर या.’’

तितक्यात इंदू म्हणाली, ‘‘पप्पा, तुम्हाला तुमच्या मित्राच्या घरी जायचं आहे ना?’’

‘मित्राच्या घरी,’ राजीवने आश्चर्याने इंदूकडे पाहिलं. ‘‘हो पप्पा, मम्मी म्हणत होती की तुमच्या एका मित्राचे हात आणि पाय नाहीत, म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायला जाता.’’

त्याला कळत नव्हते की काय म्हणावं. त्याने शालिनीकडे पाहिले, तेव्हा शालिनी हसत होती.

मोटारसायकल चालवताना राजीवचे मन म्हणत होते की गुपचुप आपण आपल्या मित्रमंडळींकडे जावे. पण तितक्यात त्याला अक्षयचं बोलणं आठवलं. राजीव विचार करत होता की एक अक्षय आहे जो हॉस्पिटलमध्ये असूनही मुलांच्या आनंदाचा विचार करतो आणि एक मी आहे, जो मुलांना दिवाळी साजरी करण्यापासून थांबवतो आहे. शालिनी पण काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तिने मुलांपासून वडिलांची चूक लपवण्यासाठी किती छान कथा रचली आहे.

मोटारसायकलचा हॉर्न ऐकून सर्व मुलं धावत बाहेर आली तेव्हा फटाके आणि मिठाई घेऊन राजीव उभा होता.

प्रमोद म्हणाला, ‘‘इंदू, इतके फटाके कोण वाजवणार?’’

‘‘हे आपण सर्वांनी आणि तुझ्या आईने उडवायचे आहेत,’’ असे राजीव म्हणाला तेव्हा दारात आलेली शालिनी उत्तरादाखल हसत होती.

शालिनीने गंमतीने विचारले, ‘‘पैसे देऊ, अजून रात्र आहे शिल्लक.’’

राजीव म्हणाला, ‘‘खरंच देशील?’’ तेव्हा शालिनी घाबरली. इतक्यात राजीव शालिनीला जवळ ओढत म्हणाला, ‘‘मला म्हणायचे होते की पैसे दिले असतेस तर एका चांगल्या बँकेत तुझ्या नावे खाते उघडले असते.’’

ते उमळून येणं

कथा * पूनम अत्रे

गौरी हसते ना तेव्हा माझ्यया अवतीभवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन् निरागस आहे…तिच्या स्वच्छ, निष्कपट मनांचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं.’’ अनिरूद्ध सांगत होता अन् शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती अन् तिचा प्रियकर अनिरूद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार अन् संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरूद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरूद्धची बडबड ऐकून घेत होता.

‘‘चला निघूया…माझं काय? सध्या मी एकटा जीव सदाशिव…पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुंलंबाळं असतील ना? ती वाट बघतील…’’

‘‘का हो? आज गौरी भेटायला नाही येणार?’’

‘‘आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते अन् तिचा नवरा अन् मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे.’’

‘‘तरीही ती तुम्हाला भेटते? का?’’

‘‘तुम्हाला नाही समजणार.’’

‘‘सांगून तर बघा…’’

‘‘नंतर कधी तरी…बाय…’’ बोलून अनिरूद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशिलं दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्याव्या का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन् कशासाठी चाललंय? हा अनिरूद्ध मध्येच कुठून टपकला?

गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही अन् आनंदात दिसते. स्वत:विषयी बरीच जागरूक झालीय. सकाळी फिरायला जाते. ब्यूटीपार्लरला जाते. फेशिअल, हेअर स्टाइल काय अन् काय…पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते पण हल्ली स्वत:वरही लक्ष देतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते.

शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही, पण तरीही काहीतरी बदललंय. काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य…कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे का? हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या.

शेखरला गौरीचा मोबाइल चेक करायचा होता. पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता, कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय.

एकदा गौरी अंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाइल चेक केला. कुणा अनिरूद्धचे बरेच मेसेजेस होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याची अन् मुलांची खूप स्तुती केली होती. अनिरूद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरूद्ध? कोण आहे हा अनिरूद्ध? शेखरनं आठवून बघितलं अन् त्याला आठवलं.

गौरी एक दिवस म्हणाली होती, ‘‘शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथंच आहे. बनारसला.’’

‘‘असं?’’

‘‘हो ना? मी कधी तरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईन. कधी तरी घरी बोलावू का त्याला?’’

‘‘त्याची फॅमिली आहे इथं?’’

‘‘नाही. फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकताहेत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला.’’

‘‘ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी…’’ कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही. पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज, अगदी याक्षणीही ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी अन् घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं.

फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धिच्या, असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती अन् दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं.

एक दिवस गौरी म्हणाली, ‘‘शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाइलवरून आपण संपर्कात राहूच.’’

शेखर एकदम सावध झाला. ‘‘कुठं जायचं आहे?’’

‘‘एका फ्रेंडला भेटायला?’’

‘‘कोण? फ्रेंड?’’

‘‘रचना.’’

शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही. पण दुपारी तो ऑफिसातून निघाला अन् घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणंपिणं वगैरे आटोपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटूनथटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरूद्धचा विचार मनात येताच मनांत संताप दाटून आला.

गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्चा हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं… आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं अन् तिच्या पापाचं माप तिच्या पदरानं घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरूणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत…हे घर, सगळं हौशीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्नं…आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं.

नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषणं देत होता.

शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईवडिल गावी रहायचे. गौरीचेही आईवडिल आता हयात नव्हते. ती ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं काय घडलंय? त्यांचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट द्ब्राली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वत:चं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं अन् संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं.

तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षांची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं.

दोन तासातच गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत, त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, ‘‘मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना?’’

‘‘रचनाला सोडून?’’

‘‘तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाहीए माझ्या आयुष्यात.’’ गौरीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले.

शेखरनं तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, ‘‘खूप सुंदर दिसते आहेस…’’

‘‘खरं?’’

‘‘तुझी फ्रेंड कशी आहे?’’

‘‘बरी आहे.’’ एवढं बोलून गौरी उठली अन् म्हणाली, ‘‘चहा करून आणते. तुम्हाला खायला काही करू का?’’

‘‘नको…चहाच कर…’’

गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस्स, याच्यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती.

शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ अन् स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरूद्धशी ओळख करून घेतली…जाणूनबुजून मैत्री वाढवली. स्वत:चं नाव त्यानं विनय सांगितलं.

अनिरूद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या अन् गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरूद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा.

अनिरूद्धनंही सांगितलं, ‘‘सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करतेय. दोन मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही. कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय.’’

शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्याचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरूद्ध त्याच्या अन् गौरीच्या संबंधांबद्दल त्याच्याशी केव्हातरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंचहोमला न्यायचा. ‘‘आजही माझी बायको माहेरी गेली आहे. चल, आपण एकत्र जेऊयात.’’

अनिरूद्धशी जवळीक वाढवत होता तो अन् एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं. ‘‘इथं माझी एक मैत्रीण राहते. गौरी नाव आहे तिचं.’’

शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं.

‘‘गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली.’’ अनिरूद्ध सांगत होता.

‘‘असं? लग्न झालंय तिचं?’’

‘‘हो…लग्न झालंय, नवरा, दोन मुलं…त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठंही असू देत तिचा जीव नवरा अन् मुलांमध्येच गुंतलेला असतो.’’

‘‘मग ती तुमच्याबरोबर?’’

‘‘मैत्री आहे आमची.’’ अनिरूद्धनं विषय टाळला.

शेखरनंही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरूद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हे ही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती…त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं अन् आजही नाही.

अनिरूद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करंत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला.

शनिवार होता. सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, ‘‘कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन् असे खिन्न का दिसताय?’’

शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, ‘‘काही नाही, कामाचं टेन्शन आहे.’’

‘‘गारगार सरबत देऊ? की गरम चहा आवडेल?’’ गौरीनं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली अन् तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

हल्ली शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं, अनिरूद्धला समोर आणून उभं करावं अन् जाब विचारावा असं वाटायचं.

पण इतकी वर्षं निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं…मग अनिरूद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरूद्धकडून सगळंच जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरूद्धला फोन लावला.

‘‘काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात?’’

‘‘अरे, आज रविवार…तुझी फॅमिली…’’

‘‘आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावलंय. मी तिथं बोअर होईन म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवलाय.’’

‘‘बरंय, येतो मी.’’

ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, ‘‘तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून…?’’

‘‘हे असं सगळं सांगायचं नसतं, मित्रा.’’ हसून अनिरूद्ध बोलला.

‘‘म्हणजे? तुमच्या मैत्रीत शारीरिक/लैंगिक संबंधंही…’’

त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत अनिरूद्ध म्हणाला, ‘‘चल, आज तुला सांगतोच सगळं…गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशील, शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी अन् उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजूनदेखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती नि:संकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला. हात हातात घेतला अन् मला वाटलं…खरंच किती मृदु अन् उबदार आहे हा स्पर्श…सगळं जगच असं असतं तर? मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन् जाणीव होती. मला स्वत:लाही वाटलं की मी असा उमलून आलोय आत्ता, तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गौरीनंही मान्य केलं, जे घडलं त्या क्षणांची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा अन् समर्पण पती बरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे पण अशा एकांतात, भावनोत्कट क्षणांतही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे.

आमच्यात घडलेल्या…अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतंच सुख नाही, समाधान अन् ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन, मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमँटिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणांत माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्याक्षणी गौरीला असंच वाटलं.’’ अनिरूद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता.

शेखर श्वास रोखून अनिरूद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरूद्ध अजूनही बोलतच होता. ‘‘गौरी म्हणजे प्रेमासाठी आसूसलेलं वाळवंट आहे अन् मला वाटतं, तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढंगाप्रमाणे धोधो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवणं, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईंकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे पण प्रणयातली ऊब, ऊष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे, पण…हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणांहून प्रिय असलेल्या त्याला गौरीला प्रेम हवंय हे कळत नाही.’’

शेखर आत्तापर्यंत स्वत:ला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. याक्षणी मात्र त्याचा स्वत:विषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता.

‘‘मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय. पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का? पण काय        करू? ती तिच्या करियरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझं नसणं जाणवत नाही. अन् इथं गौरी आपल्यानवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृट क्षण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना? माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

शेखरनं दचकून विचारलं, ‘‘ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर?’’

‘‘हो ना, सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत अन् घर सांभाळणं ही एकट्या सीमाचीच जबाबदारी नाहीए ना? संसार दोघांचा असतो…’’

समोर बसलेला अनिरूद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार अन् मोठ्या मनाचा. बिल अनिरूद्धनंच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले.

शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. ‘‘मुलं कुठायेत?’’ त्यानं विचारलं.

‘‘मित्राकडे बर्थ डे पार्टीला गेलीत.’’

‘‘याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत?’’

‘‘हं!’’

खरं तर मघापासून त्याच्या मनांत गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच    त्याचा राग निवळला. त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली अन् मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतोय याचं स्वत: शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वत:लाच जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवल्याला किती तरी वर्षं उलटून गेली होती. गेली कित्येत वर्षं तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे. गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती अन् आनंद शेखरला किती काही समजावून गेला.

किती तरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, ‘‘आज काय झालंय तुम्हाला?’’

‘‘का? तुला आवडत नाहीए?’’

‘‘मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे…खरं तर असे क्षण शोधत असते…मला का नाही आवडणार?’’ शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं किती तरी वेळ खूप काहीबाही बोलत होती. किती तरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता.

थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गम्मतजम्मत ऐकण्यात घालवला.

पुढले दोन दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला, त्यामुळे अनिरूद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरूद्धची भेट झाली.

‘‘माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय.’’

शेखर दचकला, ‘‘अन् तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे?’’

‘‘अजून नाही. आता फोन करून सांगेन.’’

‘‘का? तुमची भेट नाही झाली?’’

‘‘नाही, तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही.’’

‘‘याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही?’’

‘‘असंच दिसतंय.’’

दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरूद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यानं ती दु:खी, उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, ‘‘मी  पप्पांसाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा.’’

ड्राइंगरूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, ‘‘तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय त्याचं तू सांगितलं होतंस?’’

‘‘तो अनिरूद्ध…चांगलाय. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे.’’

‘‘अरेच्चा? ट्रान्सफर झालीय?’’

‘‘चांगलं झालं ना, त्यांचं घर आहे तिथं, बायको, मुलं इथंच बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकांचं बघते अन् मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते,’’ गौरीनं म्हटलं.

अनिरूद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळ ओढून मिठीत घेतलं.

उपेक्षा

कथा * कुमुद भोरास्कर

आज प्रथमच अनुभाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं अन् अनिशा काकूचं वागणं काही तरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती.

आईनं वारंवार तिला विचारलं, तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, ‘‘माझा चुलतभाऊ सलील इथं टे्निंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे, पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल.’’

‘‘तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलावून घेऊ.’’ शीतलनं, अनुभाच्या आईने उत्साहात म्हटलं.

‘‘काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे, तुझ्या घरात तुझ्या तरूण पुतण्या आहेत, त्यांच्या मैत्रीणी घरी येतील जातील. अशावेळी सलीलसारख्या तरूण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही…’’

‘‘पण मग त्याला ‘येऊ नको’ हे सांगणं बरोबर आहे का?’’

‘‘तेच तर मला समजत नाहीए…म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्याच सांगेन की निक्की अन् गोलूचा जसा तू मामा आहेस, तसाच अनुभा अजयाचाही मामा आहेस…म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरूण मुलींकडे बघेल…’’ अनिशानं म्हटलं.

‘‘सांगून बघ. पण हल्लीची तरूण मुलं असं काही मानत नाहीत,’’ आता शीतलच्याही सुरात काळजी होती.

‘‘असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच!’’ अनिशानं तोडगा काढला.

‘‘बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये अन् त्याला आपलं वागणं गैर वाटू नये…शिवाय काही वावगंही घडू नये.’’ शीतल अजूनही काळजीतच होती.

अनुभानं हे सर्व ऐकलं अन् ठरवलं की ती स्वत:च सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल म्हणजे काकूला अन् आईला उगीचच टेन्शन नको.

अमितकाकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, ‘‘अनु, हा तुझाही मामाच आहे हं. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात, तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही.’’

हे ऐकून पार हबकलेल्या आई व काकूकडे बघून अनुभानं त्यावेळी त्याला फक्त हॅलो म्हटलं अन् ती आपल्या खोलीत निघून गेली. पण तेवढ्या वेळात त्याचं देखणं रूप अन् मोहक हास्य तिच्या मनात ठसलं.

पुढे सलील एकटाच यायचा. त्याच्या मोटर सायकलचा आवाज आला की अनुभा खोलीत निघून जायची. पण तिचं सगळं लक्ष काकूच्या खोलीतून येणाऱ्या मजेदार गप्पांकडे अन् सतत येणाऱ्या हसण्याच्या आवाजाकडे असायचं.

सलीलजवळ विनोदी चुटक्यांचा प्रचंड संग्रह होता. सांगायची पद्धतही छान होती.

मोहननं ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा माझा मित्र सलील आहे. अनु आणि सलील ही माझ्या बहिणीची, माधवीची खास मैत्रीण, अनुभा.’’

सलीलनं हसून म्हटलं, ‘‘मी ओळखतो हिला, मी मामा आहे हिचा.’’

‘‘खरंय? तर मग अनु, तू आता तुझ्या मामाला जरा सांभाळ. अगं आज प्रथमच तो माझ्या घरी आला आहे अन् मी फार कामात आहे. तेव्हा तूच त्याच्याकडे लक्ष दे. सर्वांशी त्याची ओळख करून दे. मला आई बोलावते आहे…मी जातो.’’ मोहन ‘‘आलो’’ म्हणत तिथून आत धावला.

सलीलनं खट्याळपणे हसत तिच्याकडे बघितलं अन् म्हणाला, ‘‘माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का प्लीज? मी दिसायला इतका कुरूप किंवा भितीदायक आहे का की माझी चाहूल लागताच तू तडक तुझ्या खोलीत निघून जातेस? मला किती त्रास होतो या गोष्टीचा?’’

अभावितपणे अनु बोलून गेली, ‘‘त्रास तर मलाही खूप होतो. लपावं लागतं म्हणून नाही तर तुला बघू शकत नाही, म्हणून.’’

‘‘तर मग बघत का नाहीस?’’

अनुभानं खरं कारण सांगितलं. आईचं व काकूचं टेंशन सांगितलं.

‘‘असं आहे का? खरं तर माझ्या घरीही हेच टेंशन होतं. मी इथं येतोय म्हणताना माझ्या आईला अन् काकुलाही हेच वाटत होतं…पण तुझ्या काकांनी तर आपल्यात मैत्री होऊ शकते असं सांगितलं. मग माझ्यासमोर येऊ नकोस हे कुणी सांगितलं?’’

‘‘तसं कुणीच सांगितलं नाही. पण काकांचं बोलणं ऐकून काकू आणि आई इतक्या हवालदिल झाल्यात की त्यांचं टेंशन वाढवण्यापेक्षा मी स्वत:ला तुझ्यापासून दूर ठेवणंच योग्य मानलं.’’

‘‘हं!’’ सलीलनं म्हटलं, ‘‘तर एकूण असं आहे म्हणायचं. तुझ्या घरून कुणी येणार आहेत का आज इथल्या कार्यक्रमाला?’’

‘‘आई, अनूकाकू येणार आहेत ना?’’

‘‘तर त्या यायच्या आत तू आपल्या सर्व मैत्रीणींशी माझा मामा म्हणूनच ओळख करून दे. त्यामुळे माझ्या ताईला म्हणजे तुझ्या काकूलाही जाणवेल की मी नाती मानतो.’’

माधवी अन् इतर मुलींनाही हा तरूण, सुंदर अन् हसरा, हसवणारा मामा खूपच आवडला. शीतल अन् अनिशा जेव्हा कार्यक्रमात पोहोचल्या, तेव्हा सलील धावून धावून खूप कामं करत होता अन् लहान मोठे सगळेच त्याला मामा म्हणून बोलावत होते.

‘‘हे सगळं काय चाललंय?’’ अनिशाने विचारलं.

‘‘बहिण्याच्या शहरात येण्याचा प्रसाद आहे हा.’’ सलील चेहरा पाडून म्हणाला.

‘‘मला वाटलं होतं या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल पण अनुभाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्यात. राहिली साहिली ती माधवी, माझ्या मित्राची बहिण, तीही मला मामाच म्हणतेय. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं? म्हणून काम करतोय, मामा झालोय अन् आशिर्वाद गोळा करतोय.’’

शीतल तर हे ऐकून एकदम गदगदली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आमंत्रित पाहुण्यांची जेवणं झाली. शीतलनं अनुभाला घरी चालण्याबद्दल विचारलं, तेव्हा माधवी म्हणाली, ‘‘अजून आमची जेवणं नाही झालेली. आम्ही सर्व व्यवस्था बघत होतो…एवढ्यात नाही मी जाऊ देणार अनुभाला.’’

‘‘एकटी कशी येणार?’’

माधवीची आई म्हणाली, ‘‘एकटी कशानं? मामा आहे ना? तो सोडेल.’’

शीतलनं विचारलं, ‘‘सलील, अनुभाला घरी सोडशील.’’

‘‘सोडेन ना ताई, पण आमची जेवणं आटोपल्यावर. यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे बराच उशीर होईल.’’

‘‘तुम्ही हवं तेवढा वेळ थांबा. मग भाचीचा कान धरून तिला घरी आणून सोड. मामा आहेस तू तिचा.’’ हसत हसत शीतलनं म्हटलं.

शीतलनं असा हिरवा कंदिल दाखवल्यावरदेखील अनुभा सलील यायचा, तेव्हा आपल्या खोलीतच दार लावून बसायची. त्याच्याबद्दल कधी काही ती विचारत नसे की बोलत नसे. पण सलीलला ज्या दिवशी सुट्टी असायची, त्यादिवशी ती मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असे सांगून बाहेरच्या बाहेर सलीलला भेटायची. माधवीलाही कधी संशय आला नाही. कॉलेजच्या परीक्षा संपता संपता घरात अनुभाच्या लग्नाची चर्चा झाली.

तिनं सलीलला सांगितलं.

सलील म्हणाला, ‘‘मलाही तुझ्या आई आणि काकूनं तुझ्यासाठी मुलगा बघायला सांगितलं आहे.’’

‘‘मग तू स्वत:चंच नाव सुचव ना?’’

‘‘वेडी आहेस का? मी इथं येण्यापूर्वी इतकं टेंशन दोन्ही घरांमध्ये होतं ते एवढ्यासाठीच की मी तुझ्या प्रेमात पडून लग्न करण्याचा हट्ट धरला तर केवढा अनर्थ होईल. ज्या घरात मुलगी दिली, त्या घरातली मुलगी करत नाहीत.’’

‘‘तू हे सर्व मानतोस?’’

‘‘मी मुळीच मानत नाही. पण आपल्या कुटुंबातल्या मान्यता अन् परंपरा मी मानतो. त्यांचा आदर करतो.’’

‘‘तुला माझ्या या प्रेमाची किंमत नाहीए?’’

‘‘आहे ना? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही मी.’’

‘‘तू पुरूष आहेस, तेव्हा लग्न न करण्याचा तुझा हट्ट किंवा जिद्द तुझे घरातले लोक चालवून घेतील. मला मात्र लग्न करावंच लागेल…’’

‘‘लग्न तर मी ही करेनच ना अनु?’’

अनुभा वैतागली. काय माणूस आहे हा? माझ्या खेरीज दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही असह्य होतेय याला अन् तरीही हा लग्न करणारच? तिनं संतापून त्याच्याकडे बघितलं.

तिच्या मनातले भाव जाणून सलील म्हणाला, ‘‘लग्न कुणाबरोबर का होईना, पण माझ्या अन् तुझ्या मनात आपणच दोघं असू ना? आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवताना आपण हाच विचार सतत मनात ठेवायचा की तू अन् मी एकत्र आहोत…एकमेकांचे आहोत…’’

अनुभानं स्वत:च्या मनाची समजूत काढली की आता जशी ती सलीलच्या आठवणीत जगते आहे, तशीच लग्न झावरही जगेल. उलट जेव्हा लग्नानंतर भेटण्याचा प्रसंग येईल, तेव्हा भेटी अधिक सहज सुलभ होतील. कारण विवाहितांकडे संशयानं बघितलं जात नाही.

तिनं हे जेव्हा सलीलला सांगितलं, तेव्हा तो एकदम उत्साहानं म्हणाला, ‘‘व्वा! हे तर फारच छान! मग तर चोरून कशाला? उघड उघड, राजरोस सगळ्यांच्या समोर गळाभेट घेईन, कुठं तरी फिरायला जाण्याच्या निमित्तानं हॉटेलात जेवायला नेईन.’’

लवकरच दुबईला स्थायिक झालेल्या डॉ. गिरीशबरोबर अनुभाचं लग्न ठरलं. दिसायला तो सलीलपेक्षाही देखणा होता. भरपूर कमवत होता. स्वभावानं आनंदी, प्रेमळ अन् अतिशय सज्जन होता. पण अनुभा मात्र त्यांच्यात सलीललाच बघत होती. लग्नाला अनिशाकाकूच्या माहेरची खूप मंडळी आली होती. संधी मिळताच एकांतात अनुभानं सलीलला भेटून म्हटलं, ‘‘आपल्या प्रेमाची खूण म्हणून, आठवण म्हणून मला काहीतरी भेटवस्तू दे ना.’’

‘‘अगं, देणार होतो, पण अनिशाताईनं म्हटलं, ‘‘घरून आईनं भक्कम आहेर पाठवला आहे, तू वेगळ्यानं काहीच द्यायची गरज नाही.’’

अनुभाला खरं तर राग आला. अरे आईनं काही आहेर पाठवणं अन् तू भेटवस्तू देणं यात काही फरक आहे की नाही? आईनं आहेर केला, तरी ती अजीजीनं म्हणाली, ‘‘तरीही, काही तरी दे ना. ज्यामुळे तू सतत जवळ असल्याची भावना मनात राहील.’’

सलीलनं खिशातून रूमाल काढला. त्याचं चुबंन घेतलं अन् तो अनुभाला दिला. अनुभानं तो डोळ्यांना लावला अन् म्हणाली, ‘‘माद्ब्रया आयुष्यातली ही सर्वात मौल्यवान वस्तू असेल.’’

सुरूवातीपासूनच अनुभा गिरीशला सलील समजून वागत होती. त्यामुळे तिला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचं नातं खूपच खेळीमेळीचं अन् प्रेमाचं झालं. ती गिरीशबरोबर सुखी होती. तिनं ठरवलं होतं की सलील भेटला की त्याला सांगायचं, ‘‘फॉम्युला सक्सेसफुल!’’ पण सांगायची संधीच मिळाली नाही. नैनीतालला हनीमून साजरा करून ती माहेरी आली तेव्हा गोलूला सलीलची मोटरसायकल चालवताना बघून तिनं विचारलं, ‘‘सलीलमामाची मोटरसायकल तुझ्याकडे कशी?’’

‘‘सलीलमामाकडून पप्पांनी विकत घेतलीय, माझ्यासाठी.’’

‘‘पण त्यानं विकली कशाला?’’

‘‘कारण तो कॅनडाला गेलाय.’’

अनुभा एकदम चमकलीच! ‘‘अचानक कसा गेला कॅनडाला?’’

‘‘ते मला काय ठाऊक?’’

कसंबसं अनुभानं स्वत:ला सावरलं. सायंकाळी ती माधवीकडे भेटायला गेली. तिला खरं तर मोहनकडून सलीलबद्दल जाणून घ्यायचं होतं.

तिनं मोहनला विचारलं, ‘‘माझ्या लग्नात आला होता तेव्हा सलीलमामा काहीच बोलला नव्हता. एकाएकी कसा काय कॅनडाला निघून गेला?’’

‘‘पहिल्यांदा जाताना कुणीच एकाएकी परदेशात जात नाही अनु, सलील इथं त्याच्या कंपनीच्या हेडऑफिसमध्ये कॅनडाला जाण्याआधी खास टे्निंग घ्यायलाच आला होता. टे्निंग संपलं आणि तो कॅनडाला गेला. सगळं ठरलेलं होतं.’’ मोहन म्हणाला.

‘‘तुझ्याकडे त्याचा फोननंबर असला तर मला दे ना.’’ अनुनं म्हटलं.

‘‘नाही गं, अजून तरी त्याचा मला फोन आलेला नाही…’’

खट्टू होऊन ती घरी परतली. दोनच दिवसात तिला दुबईला जायचं होतं. नव्या आयुष्यात ती सुखात होती. पण कायम सलीलच्याच आठवणीत राहून, त्यानं दिलेल्या रूमालाचे पुन्हा पुन्हा मुके घेत.

एकदा गिरीशनं तिच्या हातात तो रूमाल बघितला अन् तो म्हणाला, ‘‘इतका घाणेरडा रूमाल तुझ्या हातात शोभत नाही. एका डॉक्टरची बायको आहेत तू. फेक तो रूमाल. डझनभर नवे रूमाल मागवून घे.’’ गिरीश सहजपणे बोलला पण अनुभा दचकली, भांबावली.

रूमाल फेकणं तर दूर ती त्या रूमालाला धुवतही नव्हती. कारण सलीलनं त्या रूमालाचं चुंबन घेतलं होतं. तिनं तो रूमाल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून लपवून ठेवला, निदान गिरीशच्या नजरेला पडायला नको.

गिरीशचं कुटुंब अनेक वर्षांपासून दुबईत स्थायिक झालं होतं. जुमेरा बीचजवळ त्यांचा मोठा बंगला होता. शहरात क्लिनिक्स अन् त्यांच्याच जोडीला मेडिकल शॉप्स होती. एक क्लिनिक गिरीश बघत असे. कुटुंबातल्या सगळ्याच स्त्रिया घरच्या धंद्यात काही तरी मदत करत होत्या.

अनुभाही थोरली जाऊ वर्षाच्यासोबत काम करू लागली. इथल्या आयुष्यात ती आनंदी होती, पण तिला हल्ली सलीलची आठवण फारच बेचैन करत होती. वांरवार त्या रूमालाचे मुके घ्यावे लागत होते.

एक दिवस वर्षाच्या चुलत बहिणीचा फोन आला. तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याचंही दुबईला पोस्टिंग झालंय. अजून ऑफिसनं गाडी आणि घर दिलं नाहीए. पण त्यांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलात केली आहे. गाडी मिळाली की भेटायला येईल. पण वर्षाला तर तिला भेटायची घाई झाली होती. अनुभानं सुचवलं की ऑफिसातून येताना त्या दोघी गाडीनं लताच्या हॉटेलात जातील, तिथून तिला आपल्या घरी आणायचं. तिच्या नवऱ्याचं ऑफिस सुटेल  तेव्हा आपला ड्रायव्हर त्याला ऑफिसमधून पिकअप करून घरी येईल. रात्रीचं जेवण सगळे एकत्रच घेतील, मग ड्रायव्हर त्या दोघांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडेल. वर्षाला ही सूचना आवडली. दिवस ठरवून लताला फोन केला. तिनं अन् तिच्या नवऱ्यानं होकार दिला.

लताला वर्षानं विचारलं, ‘‘तू तर लग्नानंतर अमेरिकेला की कुठंतरी गेली होतीस, मग दुबईला कशी आलीस?’’

‘‘मला तिथली थंडी, तिथला बर्फ आवडत नव्हता म्हणून यांनी इथं बदली करून घेतली.’’ लतानं तोऱ्यात उत्तर दिलं.

‘‘अरे व्वा! खूपच दिलदार दिसतोए तुझा नवरा. बायकोसाठी डॉलर कमावायचे सोडून दिराम कमवायला लागला. ऐट आहे बुवा!’’ वर्षानं विचारलं.

‘‘माझ्यासाठी तर ते स्वत:चा जीवही देतील ताई.’’ लताच्या बोलण्यात दर्प होता.

वर्षा अन् अनुभाला हसायला आलं.

‘‘आणि या अशा जीव देणाऱ्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं कुणी? गोदाकाकींनी?’’ वर्षांनी विचारलं.

लता हसायला लागली, ‘‘नाही ताई, गोदाकाकी तर या सोयरिकीच्या विरोधातच होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मुलगा जरा भ्रमरवृत्तीचा आहे, खूप मुलींशी त्याची प्रेमप्रकरणं झालीत. असा मुलगा आपल्याला नकोच,’’ पण काका म्हणाले, ‘‘लग्नाआधी मुलं अशीच टाइमपास असतात. लग्नानंतर ती व्यवस्थित वागायला लागतात.’’

‘‘तुमचे ‘ते’ तुम्हाला त्यांच्या आधीच्या प्रेमिकेच्या नावानं नाही का बोलावत? काही खास नाव घेऊन बोलालतात?’’ अनुभानं विचारलं.

‘‘नाही बाई, ते मला लताच म्हणतात.’’

‘‘याचा अर्थ तुमचे ‘ते’ फक्त तुमचेच आहेत.’’

सायंकाळी गिरीशला क्लिनिकमध्ये फारसं काम नव्हतं. असिस्टंट डॉक्टरला   सूचना देऊन तो लवकर घरी परतला. वर्षानं म्हटलं, ‘‘गिरीश, मी लताला जुमेरा बीचवर फिरवून आणते. अनुभा बाकीची व्यवस्था बघतेय. लताचे मिस्टर आले की तुम्ही त्यांना रिसीव्ह करा. आम्ही थोड्या वेळात घरी येतोच आहोत.’’ त्या दोघी निघून गेल्या.

काही वेळातच गिरीशचा उल्हसित आवाज कानी आला, ‘‘अगं अनु, बघ लताचे मिस्टर आलेत. ते कोण आहेत माहीत आहे का? तुझे सलील मामा.’’

ते ऐकताच अनुभाचा उत्साह, उल्हास फसफसून आला. धावतच ती ड्रॉइंगरूममध्ये आली. खरंच, सलीलच होता. अंगानं थोडा भरला होता.

‘‘घ्या, तुमची भाची आली…’’ गिरीशनं म्हटलं.

सलीलनं अनुभाकडे दुर्लक्ष करत म्हटलं, ‘‘पण माझी बायको कुठाय?’’

‘‘ती तिच्या बहिणीबरोबर बीचवर गेली आहे. येईलच, तोवर तुमच्या भाचीशी गप्पा मारा.’’

‘‘गप्पा तर मारूच, मामा आधी गळाभेट तरी घे.’’ अनुभानं त्याच्याजवळ जात म्हटलं.

‘‘लहान बाळासारखी मामाच्या मांडीवर बसू नकोस हं!’’ गिरीश गमतीनं म्हणाला.

‘‘माझ्या बायकोला मांडीवर बसवून तिच्या डोळ्यात मला बघायचाय समुद्र.’’ सलील उतावळेपणानं म्हणाला, ‘‘गिरीश, आपण समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ. तुम्ही वर्षावहिनींना घरी घेऊन या. मी अन् लता थोडावेळ समुद्र किनाऱ्याजवळ एकांतात घालवू, चला ना गिरीश…लवकर…प्लीज’’

इतकी उपेक्षा, इतका अपमान! अनुभाला ते सहन होईना…संतापानं ती आपल्या खोलीकडे धावली. एकट्यानं रडावं म्हणून नाही तर सलीलनं दिलेल्या रूमालाच्या चिंध्या चिंध्या करून फेकण्यासाठी…तो तिच्यासाठी अनमोल, अमूल्य असणारा रूमाल आता तिला ओकारी आणत होत, नकोसा झाला होता.

एक धाडसी निर्णय

कथा * शकिला हुसेन

अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इमरानशी लग्न होऊन फक्त तीन वर्षच झाली होती. इमरानच्या बाइकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी एक लाख रूपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उध्वस्त झालं होतं. इमरान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत पाच सहा तास गेले.

इमरानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहिण कहकशा तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन् आत जुबेदाच्या आत्येसासूनं लोखंडी अडकित्त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरूवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, ‘‘का फोडताय तिच्या बांगड्या?’’

‘‘आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात.’’ आतेसासू म्हणाली.

जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, ‘‘तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा. मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते.’’

पण म्हातारी आत्येसासू हटूनच बसली. ‘‘बांगड्या फोडण्याची पद्धत असते.’’

शेवटी जरा कठोरपणे  कहकशां म्हणाली, ‘‘तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन् फोडल्या काय? काय फरक पडतो?’’ तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन् तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या.

यावरूनही आत्येसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली, ‘‘तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे, हे मान्य. पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत. त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात.’’

फुणफुणंत सासूबाई गप्प बसल्या.

जुबेदाला विधवेचा वेष म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. ‘‘आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही. कारण तू आता इद्दतमध्ये आहेस (इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडे चार महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरूषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही.)’’

जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरूणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती.

जुबेदाच्या अश्रुंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते.

इमरान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन् हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रूजू झाले.

इमरान सकाळी नऊला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले.

सायंकाळी दोघं घरी परतल्यालर जुबेदानं तिच्यासाठी व इमरानसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला. ‘‘सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी रूमा काय काय करेल? दोन लहान मुलं आहेत तिला. त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हाताराम्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा. समजलं का?’’

जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रूना भाभीनंही कामात मदत केली. पटकन् जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा. कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इमराननं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा अन् रूना दोघींनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डबा दोघी मिळून करायच्या. सकाळ सांयकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं.

प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेंशन तिच्या हातात असायची. स्वत:साठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची. इमरान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खूष असायची. तरीही जुबेदाला घालूनपाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.

जुबेदा नाजुकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इमरान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे.

जुबेदाला सर्व कळत होतं. पण इमरानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशीही प्रेमानं वागे, तिला यथायोग्य मान देई. रूना तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्शा असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा.

आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता. लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अजून मूळबाळ नाही झालेलं, यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची. अपमान करायची. ‘‘रूनाला पाच वर्षांत दोन मुलं झाली. ही एक दुल्हन बघा…वांझ आहे की काय. वाळलेल्या खोडासारखी…फळ नाही, फूल नाही…घरात मुलं खेळायला हवीत. त्याशिवाय घराला शोभा नाही.’’

सासूनं स्वत: कधी रूनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडं फार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखाद्या खास पदार्थ शिजवणं या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन् फुकटचे सल्ले देण्यातच जायचा.

अम्माचे टोमणे ऐकून इमरानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. ‘‘दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीए. मूल नक्की होईल, उगीच टेन्शन घेऊ नका.’’

दोन महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरूवात झाली. ‘करामत पीर’कडे जायचं. त्या पीराचा एक एंजट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबाचा ‘चढावा’ म्हणून घेऊन जायचा.

अम्मा सतत ‘करामती पीर’ची पिरपिर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे. दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अम्मानं हुकुम दिला, ‘‘चल, जुबेदा, पटकन आवर. आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करतेय तुला मूल नसणं. पीरबाबा एक ताईत देतील. त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल.’’

हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं, ‘‘अम्मा, माझा विश्वास नाहीए या सगळ्यावर. मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाहीए माझा.’’

हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली, ‘‘या शिकलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा पीरबाबावर विश्वास नाहीए. अगं, त्या शेजारच्या सकीनाला, पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं, तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत. बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल.’’

आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली, ‘‘अम्मा माझा जर विश्वासच नाहीए या गोष्टींवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिलीय की माझ्यात दोष नाहीए. मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून, सर्व तापसण्या करून आलो ना? शेवटचं सांगते, पीरबाबाकडे जाणार नाही.’’

अम्मानं रागानं इमरानकडे बघितलं. तो प्रेमानं अन् शांतपणे अम्मीला म्हणाला, ‘‘अम्मी, माझाही विश्वास नाहीए या सगळ्यांवर. जुबेदावर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस.’’

झालं! अम्माला तर अश्या मिरच्या झोंबल्या. इमरान-जुबेदा एकीकडे आणि अख्ख कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले. शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली अन् आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इमरनाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. दीड दोन महिन्यांत पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं…

कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाइस बळेबळे खायला लावल्या. दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता.

तिसऱ्या दिवशी सियूम होता (मृत्यूनंतरचा तिसरा दिवस). त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचित जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला.

सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इमरानचा एक्सिडेंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसण्याचे उल्लेख, तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती. सियूमच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा…या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली. थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं.

तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली, ‘‘अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला (सहानुभूती दाखवायला) येतील. तिनं इथंच बसायला हवं.’’

‘‘तिला घेरी येतेय. तिला बसवत नाहीए. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला.’’ कहकशांनं नम्रपणे म्हटलं.

त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली. फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वान्नांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही पन्नाससाठ लोक होतेच. खर्च भरमसाट होत होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती.

कहकशा त्यानंतर स्वत:च्या घरी गेली. सियमनतंर ती घरी गेली अन् फारोहाच्यावेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती.

इमरानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सूती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्येसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषणं देऊ लागल्या. ‘‘किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे…इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन् घराबाहेर पडते आहे.’’

सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, ‘‘तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीए. मी मौलाना साहेबांना बोलावतो. तेच तुला समजावून सांगतील.’’

मौलाना आले. जुबेदाला एका पदद्याआड बसवलं गेलं. कहकशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं, त्याचा मथितार्थ असा, ‘‘पति निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाही बाहेरच्या पुरूषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरूषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोलीबाहेर पडायचं नाही.’’

मौलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, ‘‘एक मिनिट! मला काही सांगायचंय, ते नीट ऐकून घ्या.’’

खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, ‘‘मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्धा अन् जाणत्या आलिमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यू ट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का? त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही ही ऐका. उत्तर असं आहे, ‘‘अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वत: कफील असेल (कमवती/नोकरी करणारी) तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते. त्या परिस्थितीत तिला साडे चार महिन्यांची इद्दत पूर्ण करणं गरजेचं नाहीए.

आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही.

पडद्याआडून अत्यंत मर्यादशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली. ‘‘तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाइलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिसिंपलपासून शिपाईदेखील महिलाच आहेत. तेव्हा पुरूषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते.’’

इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मौलवींनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरूवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिंसिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिंमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती.

एक दिवस जुबेदा शाळेतून परतली, तेव्हा रूना भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रूनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर रूनानं जुबेदाशी बोलणंच बंद केलं. काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला. ‘‘हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त सत्तावीस वर्षांचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरूषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील? आम्ही काय आज आहोत, उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरूण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन् दुसरं लग्न करून घे.’’

मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, ‘‘अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा, तुम्ही हीनाच्या (नणंदेच्या) लग्नाची काळजी करा. तिचं लग्नांचं वय होतंय.’’

सासू गोडीत म्हणाली, ‘‘जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना? सुभान आहे ना? इमरानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरूषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण.’’

जुबेदा एकदम संतापलीच. ‘‘अम्मा, किती वाईट बोलताय तुम्ही? मला हे अजिबात मान्य नाही. सुभानभाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे. रूना भाभीचा संसार उध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका.’’ काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन:पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते. ‘‘सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’’ त्याला काय? सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला?

रूनासारखी समर्पित बायको, दोन गोजिरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? रूना भाभी तिच्याशी का बोलत नव्हती, ते तिला आता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती. घाबरलीही होती. इमरान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार…त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल. त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो…तिनं त्या क्षणी निर्णय घेतला. ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती.

शाळेच्या प्रिंसिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अन् सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मियता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर रहावंस हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरूण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिंसिपल माझी कलीगच होती. तुला होस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग.’’

जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिसिंपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवालाही गेला.

कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, ‘‘जुबेदा, तुझी जॉइनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी अरशदबरोबर येईन अन् कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून, तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ.’’

जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सूटकेस, महत्त्वाची कागदपत्र अन् इतर काही सामान अशा दोन सूटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन् अरशद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासूसासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिंसिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉइन करायचंय हे पटवून दिलं.

ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, ‘‘ तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत.’’

सासूसासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका.’’

जुबेदाला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की दोन तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत. तिचा आत्मविश्वास अन् शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते.

रूना भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, ‘‘भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा.’’

‘‘मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं!’’

माझी काळजी करू नका भाभी. मी कामात स्वत:ला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन् मी लग्नच करणार नाही असंही नाही, पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल.

सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं.

अलिखित नियम

कथा * प्रा. रेखा नाबर

दादा अमेरिकेला जाणार हे समजल्यावर सर्वांपेक्षा म्हणजे अगदी त्याच्यापेक्षासुद्धा जास्त आनंद मला झाला. का माहिती आहे? मला आता त्याचे जुने कपडे, बुट वापरावे लागणार नाहीत या कल्पनेने. तोपर्यंत कायम मी त्याचे वापरून जुने झालेले कपडे, बूट आणि पुस्तकेसुद्धा वापरत होतो. फक्त दिवाळीला आई मला कपडे घेई. जुन्या वस्तू वापरणे मला नकोसे होई. त्याबद्दल मी तक्रारसुद्धा करत असे.

‘‘आई, कायम मी दादाच्या जुन्या वस्तू का वापरायच्या?’’

‘‘बाळा, तो तुझ्याहून दोनच वर्षांनी मोठा आहे. तुम्ही मुलं भराभर वाढता. एक वर्ष वापरले की कपडे मला घट्ट होतात, मग त्याला नवीन कपडे शिवून आधीचे कपडे मी स्वच्छ धुवून ठेवते. ते नव्यासारखेच असतात. मग वापरायला काय हरकत आहे. बूटांचंही तसंच आहे ना? पुस्तकं म्हणशील तर अभ्यासक्रम बदलला नाही तर तिच पुस्तकं तुला उपयोगी पडतात. बाईडिंग करून किंवा छान कव्हर घालून देते की नाही तुला? उगाच कशाला पैसे खर्च करायचे? शहाणा आहे ना माझ्या सोन्या? तुलासुद्धा घेऊ नवीन वस्तू.’’

असेच मधाचे बोट लावून आई मला नेहमी गप्प करीत असे. मला कधीच नवीन वस्तू वापरायला मिळाल्या नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवशी इतरांचे नवे कोरे युनिफॉर्म, नवी कोरी पुस्तके, त्यांचा निराळा गंध यांनी मी हरखून जाई. आतल्या आत हिरमुसला होई. मला त्यांचा हेवा वाटे. या आनंदापासून मी कायमचा वंचित राहणार ही बोच सलत राही. जुनी पुस्तके वापरण्याचा मला इतका वीट आला होता की एस.एस.सी. झाल्यावर मी सायन्सला अॅडमिशन घेतलं. कारण त्यावर्षी दादा बारावी कॉमर्सला होता. अकरावी सायन्सला मला प्रथमच नवी पुस्तके वापरण्यास मिळाली. परंतु तिथेही माझे नशीब आडवे आले. केमिस्ट्री प्रॅक्टिकलला मला चक्कर येऊ लागली. अंगावर पुरळ उठू लागली. घरगुती औषधांचे उपाय थकल्यावर बाबांनी मला डॉक्टरकडे नेले.

‘‘बाबासाहेब, याला केमिकल्सची अॅलर्जी आहे. केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स जमणार नाहीत त्याला.’’

‘‘म्हणजे हा सायन्सला शिकू शकत नाही.’’

‘‘बरोबर आहे तुमचं.’’

आर्ट्सला स्कोप नाही या सबबीवर बाबांनी मला कॉमर्सला पाठवलं. पुनश्च येरे माझ्या मागल्या. दादाची अकरावीची पुस्तके, गाईड्स यांच्या सहाय्याने अभ्यास केला. लहान केल्याबद्दल निसर्गाला मी मनोमन दोष देऊ लागलो. दादा बी. कॉम झाल्यावर एम.बी.ए.ला गेला. मी सीएची कास धरली. मला वाटले, ‘‘चला, जुन्याची यात्रा पुस्तकापुरती तरी संपली. कपडे आहेतच पाचवीला पुजलेले. एम.बी.ए. झाल्यावर दादाला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच एका विख्यात मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली. त्याच कंपनीने त्याला अमेरीकेला पाठवण्याचे ठरवले होते. त्याच्या जाण्याची मीसुद्धा उत्साहाने तयारी करत होतो. तो अमेरिकेला गेला. मी सीए यशस्वीरित्या पास झालो. मला नोकरीचे वेध लागले. इंटव्ह्यूसाठी बोलावणीसुद्धा येऊ लागली.’’

‘‘आई, मला आता इंटरव्ह्यूला जावं लागणार. नवीन कपडे शिवायचे म्हणतोय.’’

आईने मला दादाचे कपाट उघडून दाखवले. कपड्यांची चळतच होती. ‘‘हे बघ, तुझ्या दादाचे केवढे कपडे आहेत ते. बहुतेक तुझ्याचसाठी ठेवले असणार. एक दोनदाच वापरले असावेत. सूटसुद्धा आहेत. कोरे करकरीत असल्यासारखेच वाटतायत. तरीपण तुला पाहिजे असले तर लाँड्रीत देऊन आण.’’

आईच्या बोलण्याचा मतितार्थ मला कळला. मनातल्या मनात मी कपाळावर हात मारला. दादा अमेरिकेला गेला तरी जुन्याचे लेणे माझ्यासाठी ठेवून गेला होता. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी यशस्वी झालो. मला नोकरी मिळाली. आईने आनंद व्यक्त केला. ‘‘बघितलंस? दादाच्या कपड्यांचा पायगुण? पहिल्या फटक्यात नोकरी मिळाली, आनंद होईल त्याला.’’

एकतर जुन्या वस्तू वापराव्या लागतात. त्याचे दु:ख आणि वर आईचे असे ताशेरे. म्हणजे माझ्या गुणवत्तेला मोलच नाही. आईचा दादाकडे असलेला कल माझ्या मनात सल धरू लागला होता. या जुन्याच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा जोरकस प्रयत्न मी पहिल्या पगारातच केला. चांगले चार कपड्याचे जोड शिवून घेतले.

अमेरिकेत स्थिरस्थावर झाल्यावर दादाला मुली सांगून येऊ लागल्या. थोडक्यात वधूपित्यांच्या उड्याच पडत होत्या. महिन्याभराने तो भारतात हजर झाला. त्याला लग्न करूनच जायचे होते. आम्ही निवडलेल्या चार मुलींमध्ये तसूभरही कमतरता नव्हती. तो स्वत: सर्वांना भेटला. त्यांच्याशी संवाद साधला आणि आपली वाग्दत्त वधू मुक्रर केली. शर्मिला देशमुख. बी. कॉम झालेली शर्मिला आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. श्री. देशमुखांचा स्पेअरपार्ट्सचा कारखाना होता. दिसायला अतिशय मोहक वागण्यात शालीन अशी शर्मिला कोणाच्याही मनात भरण्यासारखीच होती.

‘‘काय पक्या, तुला वहिनी पसंत आहे का?’’

‘‘म्हणजे काय दादा? शर्मिला टागोरलासुद्धा मागे टाकील एवढी सुंदर आहे. सालस आणि गुणीसुद्धा आहे. अशी वहिनी कुणाला आवडणार नाही? तुमचा जोडा तर छान शोभून दिसतोय.’’

लगेचच साखरपुडा उरकला. लग्न तीन आठवड्यांनी करण्याचे ठरले. त्यानंतर एका महिन्याने ती दोघं अमेरिकेला जाणार होती. हा प्लॅन दादानेच ठरवला होता. तो शर्मिलाच्या सहवासाचा एकही क्षण वाया घालवत नव्हता. दोघेही आपल्या प्रणयाच्या विश्वात मशगुल होते. सर्वत्र आनंदी आनंद भरून राहिला होता. खरेदीची रणधुमाळी दोन्ही घरी चालू झाली.

त्याने मला जबरदस्तीने खरेदीला नेले आणि आश्चर्य म्हणजे स्वत:सारखा सूटसुद्धा माझ्यासाठी खरेदी केला. लग्नाच्या दिवशी सकाळी घालण्यासाठी शेरवानीच्या सेटसुद्धा दोघांसाठी सारखाच खरेदी केला.

‘‘दादा, लग्न तुझं आहे. माझ्यासाठी एवढा साज कशासाठी?’’

‘‘तुसुद्धा लवकरच बोहोल्यावर चढशीलच की, त्यावेळी घाई नको.’’

‘‘साहेबांचा खिसा चांगलाच गरम दिसतोय.’’

‘‘पूर्ण तयारीनिशी आलोय. शर्मिलाला अमेरिकन डायमंडचा सेट तिकडूनच आणलाय. उद्या आईबाबांनासुद्धा खरेदीसाठी घेऊन जाणार आहे. माझे जुने कपडे वापरावे लागतात म्हणून कुरकुर करायचास ना? चल, तुला खुश करून टाकतो.’’

लग्नाच्या दिवशीचा धुमधडाका तर अवर्णनीयच होता. शर्मिला सजून मांडवात आली आणि सर्व नजरा तिच्यावरच खिळल्या. उर्वशीच अवनीतलावर उतरल्याचा भास होत होता. तिच्या पप्पांनी म्हणजे आबासाहेब देशमुखांनी कार्य दृष्ट लागेल इतक्या उत्कृष्टपणे साजरे केले. रोषणाई, मानपान, खाणेपिणे, कुठेही कमी पडू दिले नाही. सगळीकडे आनंदाची लाटच लहरत होती. शर्मिलावर तर सगळेच खुश होते. आत्याने आईला सल्ला दिला, ‘‘वहिनी, प्रसाद आणि प्रकाश अगदी रामलक्ष्मणच, प्रसादसाठी शर्मिला आणलीस तशी प्रकाशसाठी उर्मिला आण बरं का.’’

मी तर मनोमन ठरवून टाकले की आपल्या पत्नीचं नाव उर्मिलाच ठेवायचे. शर्मिलाला मॅचिंग. लग्नातील विधी चालू असताना दादा शर्मिलाच्या कानात कुजबुजत होता व ती सलज्ज प्रतिसाद देत होती. चेहऱ्यावरचे मधाळ स्मितहास्य तिच्या मोहकतेत भर घालीत होते. दोघेजण अगदी ‘मेड (मॅड) फॉर इच अदर’ वाटत होते. वरात आली आणि तिच्या आगमनाने घर अनोख्या सुगंधाने भरून गेले. सर्व सोपस्कार व्यवस्थित पार पाडल्यावर नवदाम्पत्य बंगळुरूला मधुचंद्रासाठी रवाना झालं. एका आठवड्याने ते परत येणार होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी दोघेही अमेरिकेला जाणार होते. दादाने सगळा कार्यक्रम आधीच ठरवला होता. शर्मिलाच्या आगमनाने आईला मुलगी मिळाल्याचा अपार आनंद झाला होता.

‘‘पोरीने, किती पकटन जीव लावला. आठ दिवसांसाठी गेली तर इतकं सुनं सुनं वाटतंय. कायमची गेली तर काय अवस्था होईल हो?’’

‘‘फार लाघवी पोर आहे. पण आपण तिला नाही ठेवून घेऊ शकत.’’

पोहोचल्याबरोबर लगेच दादाचा फोन आला. नंतरचे दोन दिवससुद्धा दोघेही फोनवर भरभरून बोलले. नंतर तो काळाकुट्ट दिवस उगवला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी घरीच होतो. दुपारी तीनच्या सुमाराला माझा मोबाइल वाजला.

‘‘हॅलो.’’

‘‘मी…मी…शर्मिला. प्रकाश, एक भयंकर घटना घडलीय.’’

ती रडत रडत तुटक बोलत होती. घाबरल्यासारखी वाटत होती.

माझाही थरकाप उडाला.

‘‘शर्मिला, शांत हो. रडू नकोस. काय झालंय ते सांग. दादा कसा आहे? तू कुठून बोलतेस?’’

‘‘प्रसाद नाही आहे.’’

ती जोरजोरात हुंदके देऊ लागली. तणाव आणि भीती यांनी माझा समतोल ढळला. मी अक्षरश: ओरडूनच विचारलं.

‘‘नाही आहे? म्हणजे नक्की झालंय तरी काय? प्लीज लवकर सांग गं. माझं टेन्शन वाढतंय. तू आधी रडणं थांबव.’’

काहीतरी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे आईबाबांच्या लक्षात आले. ते कावरेबावरे झाले.

‘‘अरे, प्रसाद अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काहीतरीच काय बोलतेस? तुला सोडून कसा गेला? तू जाऊ कसा दिलास? हे बघ. शांत हो, सगळं सविस्तर सांग. आपण मार्ग काढू. आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर? काळजी करू नकोस पण आम्हाला कळू दे काय झालंय ते. मी येईन तिकडे. सावर स्वत:ला आणि सांग सगळं.’’

तिला जरासा धीर आला.

‘‘प्रसाद कोडईकॅनालला जाण्याची तिकिटं काढण्यासाठी सकाळी दहा वाजता बाहेर पडला. दोन दिवस तिकडे राहून मुंबईला परतण्याचा प्रस्ताव त्यानेच मांडला. उशीर झाला तर जेवून घ्यायलाही सांगून गेला. दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. मोबाईल स्विच ऑफ येतोय. आता जेवावं असा विचार करत असताच रूम बॉय एक लिफाफा घेऊन आला. मला वाटलं आत बिल असेल. उघडून पाहिलं तर ‘मी अमेरिकेला परत जात आहे,’ असं लिहून प्रसादने सही केली होती. माझ्यावर आभाळ कोसळलं. डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी बेशुद्ध पडणार होते. कसंबसं बळ एकवटलं. नंतर माझ्या लक्षात आलं की माझे दागिनेसुद्धा नाहीसे झाले आहेत. रात्री कपाटात ठेवले होते. माझ्याकडे पर्समध्ये थोडेसे पैसे आहेत. अगदी असहाय्य केलीय मला. काय करू मी आता? आबांनासुद्धा काही कळवलं नाही.’’

ती परत रडू लागली. मीसुद्धा परुता हादरून गेलो होतो. स्वत:ला सावरून तिला धीर देणे आवश्यक होते.

‘‘आबासाहेबांना कळवलं नाहीस ते योग्य केलंस. शर्मिला, तू धीर धर. रडू नकोस, तू एकटी नाही आहेस, आबासाहेबांना कसं कळवायचं ते मी बघतो. प्रसंग फारच कठीण आहे. आपण त्यातूनही मार्ग काढू.’’

‘‘तू हॉटेलमध्येच थांब. उपाशी राहू नकोस. मी सर्वांशी बोलतो आणि तिकडे येतो. बहुतेक रात्रीपर्यंत येऊ शकेन. नाहीतर उद्या सकाळी नक्कीच. काळजी घे हां. ठेवतो फोन.’’

आईबाबांना सगळा वृत्तांत सांगितल्यावर बाबा तर शरमेने काळे ठिक्कर पडले. आई अक्षरश: धाय मोकलून रडू लागली.

‘कुसंतानपेक्षा नि:संतान बरं’ असं म्हणायची वेळ आणली नालायकाने. असे म्हणतच ती बेशुद्ध झाली. तिला आम्ही दोघांनी कसेबसे सावरले. मी त्यांना दागिन्यांविषयी काहीच सांगितले नव्हते. मलाच लाजिरवाणे वाटत होते.

‘‘आईबाबा, आबासाहेबांना काहीच माहीत नाही. आपणच त्यांना कळवलं पाहिजे. मी समक्षच जाऊन सांगतो.’’

‘‘आम्ही येऊ का?’’

‘‘नको बाबा. आईची येण्याची परिस्थिती नाहीए आणि एकटं राहण्याचीसुद्धा. तेव्हा मी एकटाच जातो. अवघड वाटतंय. पण हा दुर्धर प्रसंग मलाच निभावून न्यावा लागणार असं दिसतंय.’’

मी दबकतच त्यांच्या घरात प्रवेश केला.

‘‘या प्रकाशराव, शमू आणि प्रसाद केव्हा येतायत?’’

‘‘नाही…नाही…मी…मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो.’’

‘‘बोला ना काही प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘हो…हो…कठीण प्रॉब्लेम. दादा अमेरिकेला निघून गेला.’’

‘‘काय? काल संध्याकाळीच शमूचा फोन आला होता. काही बोलली नाही आणि असं अचानक का ठरवलं.’’

‘‘नाही. तो एकटाच गेला.’’

‘‘आणि आमची शमू?’’

मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यांनी जमदाग्निचा अवतार धारण केला. ते रागाने थरथरत होते व मी भीतिने. त्यांनासुद्धा दागिन्यांविषयी काही सांगितले नाही.

‘‘हरामखोर साला. माझ्या एकुलत्या एका पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी केली. समोर असता तर गोळी घालून ठारच केला असता. पण मी त्याला सोडणार नाही.’’

त्यांना सावरण्यासाठी काकी पुढे आल्या.

‘‘तुम्ही जरा शांत व्हा. आधी पाणी प्या बघू. प्रसंग आला आहे खरा. त्याला तोंड तर दिलं पाहीजे ना? प्रथम आपण शमूला सावरलं पाहीजे. काय प्रसंग गुदरला आहे माझ्या बाळावर. कुठे आहे ती?’’

‘‘ती बंगळुरूलाच आहे हॉटेलमध्ये. मी तिला आणायला जातो आहे. तसं मी तिला फोनवर सांगितलं आहे.’’

‘‘नको, आम्ही दोघं जातो. तुम्ही आईबाबांजवळ थांबा. आपण शमूशी बोलू या का?’’

मी शर्मिलाच्या मोबाइलवर फोन लावला.

‘‘मी प्रकाश बोलतोय. आबासाहेबांच्या घरून. बरी आहेस ना तू? थांब बोल त्यांच्याशी.’’

‘‘शमू बेटा, रडू नकोस. धीर धर. त्याच्यावर धाय मोकलून रडायची वेळ आणतो की नाही बघ. आम्ही दोघं तुला आणायला तिकडे येतोय. शेवटच्या फ्लाईटने निघतो. काळजी घे.’’

आता क्रोधाची जागा करूणेने घेतली होती. त्यांचे डोळे पाझारू लागले. काकी व्याकूळ होऊन त्यांना वरवर धीर देत होत्या. आई तर अंथरूणालाच खिळळी होती. डोळ्यांतील पाण्याला खिळ नव्हता. इतक्या जणांना दु:खाच्या खाईत लोटणाऱ्या उलट्या काळजाच्या माझ्या भावाची मला मनस्वी किळस आली. शर्मिलाला घेऊन आल्याचे आबासाहेबांनी आम्हाला कळवले आणि ती तिघेही आमच्या घरी आली.

‘‘शर्मिला, काय झालं हे बाळा?’’ असे ओरडून आई पुन्हा बेशुद्ध झाली. बाबा केविलवाणे होऊन हात जोडू लागले.

‘‘आबासाहेब, आम्ही तुमचे अनंत अपराधी आहोत. असला अवलक्षणी कार्टा जन्माला घातल्याची शरम वाटते मला.’’

आबासाहेब एव्हाना शांत झाले होते. काकी आणि शर्मिला आईची समजूत घालत होत्या.

‘‘बाबासाहेब आपल्या सर्वांचंच हे दुर्भाग्य आहे. पण तुम्ही नका अपराधी वाटून घेऊ. मी त्याला पातळातून धुंडून काढीन आणि शिक्षा देईन. प्रकाश, त्याला अमेरिकेत कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्ग आहे का?’’

‘‘ऑफिसचा नाही, पण तो राहत असलेल्या अपार्टमेंटचा नंबर आहे माझ्याकडे.’’

‘‘जरा बघतोस प्रयत्न करून?’’

फोन लावला तर दादाने ते अपार्टमेंट तीन महिन्यांपूर्वीच सोडल्याचे कळले.

‘‘म्हणजे हरामखोराने पूर्वीपासूनच हा कट रचला होता. यात आमच्या मुलीचा मात्र बळी गेला. नवीन बिझनेस चालू करण्यासाठी माझ्याकडून पाच लाख रूपये घेऊन गेला.’’

‘‘माझ्याकडे याच कारणास्तव पैसे मागितले. पी.एफमधले दोन लाख रुपये होते, ते मी दिले त्याला.’’

मी गौफ्यस्फोट केला.

‘‘शर्मिलाचे बंगळुरूला नेलेले दागिनेसुद्धा नाहीसे झालेत.’’ आबासाहेबांना राग अनावर झाला.

‘‘नीच, अमानुष. तुमची दोन मुलं म्हणजे दोन विरूद्ध ध्रुव आहेत. आता मीसुद्धा हकिकत पेपरात प्रसिद्ध करणार. अमेरिकेत माझे काही हितसंबंधी आहेत. त्यांनाही कळवणार. त्यांची चांगली नाचक्की करतो सगळीकडे. आम्हाला फसवतो काय?’’

आता समाजात छी थू होणार या कल्पनेने की काय बाबा धास्तावल्यासारखे झाले.

‘‘आबासाहेब, आमच्या मुलाच्या हातून अक्षम्य गुन्हा झाला आहे. पण कृपा करून आपण सबुरीनं घ्या. या परिस्थितीतही मागचा पुढचा विचार करायला हवा. मेंदूला अगदी झिणक्षिण्या आल्यात. तुम्ही पाहताच. हिची परिस्थिती किती नाजूक झालीए ते. शिवाय शर्मिलाच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करायला हवा ना? एक आठवड्याचा अवधी द्या आम्हाला. काही तोडगा निघतो का बघतो. नाहीतरी अवहेलना आणि मानहानी सहन करावी लागतेच आहे. ती जगजाहीर होईल.’’

आबासाहेबांनी एक आठवडा थांबण्याचे कबूल करून खरोखरच कृपा केली होती.

‘‘कार्ट्याने तोंडाला काळं फासलं हो. पोरीच्या आयुष्याची होळी केली.’’

‘‘बरोबर आहे तुझं. आपण तिचे शतश: अपराधी आहोत. कधी न भरून येणारी जखम आहे ही. आबासाहेब भले माणूस आहेत म्हणून एक आठवडा तरी थांबायला तयार झाले. आपणच सावरून, समतोल विचार करून तिच्या कल्याणाचा मार्ग शोधला पाहिजे. तेव्हा तू जरा धीराने घे आणि काय सुचतंय ते बघ.’’

आईला बाबांचे म्हणणे पटले. तिचा जीव शर्मिलासाठी तीळतीळ तुटत होता. तिने विचाराला चालना दिली असावी. कारण ती बाबांच्या बरोबर चर्चा करू लागली. तपशील कळला नाही. तरी दुसरा कोणता मुद्दा यावेळी विचारांत घेणे शक्यच नव्हते. हे मी जाणून होतो. आई पूर्ववत झाली आणि मला जरा हायसे वाटले, शर्मिलासुद्धा येऊन आईला भेटून गेली. आश्चर्य म्हणजे दोघींनीही मनावर कौतुकास्पद संयम ठेवला होता. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून आलो तर आईबाबा नुकतेच देशमुखांकडे जाऊन आल्याचे कळले.

‘‘बाबा, आबासाहेबांनी बोलावलं होतं का?’’

‘‘नाही रे, सहज भेटून आलो. ही फार दिवस त्या दोघांना भेटली नव्हती आणि शर्मिलालासुद्धा पहाविशी वाटत होती.’’

‘‘ठिक आहे ना सर्व?’’

‘‘आहे ते ठिकच म्हणायचं. पण पुढचा विचार करणं आवश्यक आहे,’’ आईने त्यांना थांबवलं.

‘‘प्रकाश, आताच आलास ना? हातपाय धुवून घे. चहा टाकते. खाऊन घे.’’ आईचे अचानक थांबवणे मला खटकले. चहापाणी झाले. आम्ही तिथे बोलत बसलो. मला जाणवत होते की आईला काहीतरी सांगायचे आहे. पण तिला अवघड वाटते आहे. फार अस्वस्थ वाटत होती.

‘‘आई, काय झालं? काही सांगायचं आहे का? गोंधळलीस का?’’

‘‘अगं, सांग आता. का उगाच टेन्शन वाढवतेस?’’

‘‘प्रकाश, म्हणजे बघ…म्हणजे मला…आम्हाला वाटतंय म्हणून मी सुचवते. पण तू विचार कर हं!’’

‘‘कसला विचार करू आणि सुचवतेस काय? माझ्याशी बोलताना अशी चाचरेतस कशाला?’’

शेवटी धीर करून बाबांनीच गौप्यस्फोट केला.

‘‘प्रकाश, आम्हाला वाटतं, तू शर्मिलाचा पत्नी म्हणून स्विकार करावास,’’ सर्वांगातून विजेचा प्रवाह जात असल्याचा भास मला झाला आणि मी जवळजवळ किंचाळलोच.

‘‘कसं शक्य आहे, बहिनीप्रमाणे असणारी वहिनी आणि पत्नी? छे, मी कल्पनाच करू शकत नाही. तुम्ही असं सुचवता तरी कसं?’’

‘‘प्रकाश बाळा, हे सुचवताना अगदी जिवावर येतंय. माहिती आहे की तुझ्या स्वत:च्या वैवाहिक जीवनाबद्दल काही कल्पना असतील. उच्चशिक्षित आणि पगारदार असल्यामुळे तुला सर्वगुणसंपन्न वधू मिळेलही. परंतु आपण शर्मिलेचा विचार करू या. काहीही अपराध नसताना तिच्या आयुष्याची परवड होणार आणि आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी पहावी लागणार, अर्थाअर्थी आपणच त्याला कारणीभूत आहोत ना? असलं अवलक्षणी कार्ट जन्माला येणं हे दुर्दैवच.’’

परत ती हुंदके देऊन रडू लागली.

‘‘आई, मला विचार करायला वेळ हवा. हेच बोलायला तम्ही देशमुखांकडे गेला होता वाटतं? काय म्हणाले ते?’’

‘‘आम्ही बोललो त्यांना. लगेच त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यांनाही विचार करायला वेळ लागेल ना? करतील ते फोन. तुझा विचार घ्यायला सांगितलाय त्यांनी.’’

माझ्या पायाखालची जमिनच सरकली. वज्राघात होत असल्याची जाणीव झाली. मेंदू अगदी सुन्न झाला होता.

‘‘आई, मी जरा मोकळ्या हववेर फिरून येतो.’’

‘‘अरे, यावेळी कशाला जातोस?’’

लांबवरच्या बागेत फिरून आल्यावर किंचित हलके वाटले. मी येईपर्यंत आईबाबा चिंतातुर होते. जेवणावर वासना नव्हतीच. चार शिते चिवडल्यासारखे केले व बिछान्यावर पडलो. विचाराला चालना देणे आवश्यक होते. झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या वैवाहिक आयुष्याला सुरूवात होण्याआधीच चूड लागू पाहत होती. दादाचे जुने कपडे आणि पुस्तके वापरणारा मी आता त्याने त्यागलेली पत्नी…छे छे, शक्यच नाही ते. फेटाळूनच लावला पाहिजे हा प्रस्ताव. मेंदूला मुंग्या डसल्यासारखे वाटू लागले. परंतु मन:चक्षुसमोर सतत डोळे गाळून अंथरूणाला खिळलेली आई, नामुष्कीच्या शरमेने अगतिक झालेले बाबा, जमदाग्निचा अवतार धारण करणारे आबासाहेब, त्यांना सावरण्याचा प्रयत्न करणारी ती दु:खी माऊली काकी आणि आपल्या आयुष्याच्या वैराण वाळवंटातील वाळूप्रमाणे शुष्क झालेली शर्मिला दिसू लागली. दहा डोळे आशाळभूत नजरेने माझा मागोवा घेत असल्याचा भास झाला. आपण उष्ट्या ताटाचा धनी होणार या कल्पनेने अंत:करण पिळवटून निघाले.

दादाचे ड्रॉईंग छान होते. शाळेत असताना तो उत्तम चित्रे काढीत असे, अगदी हुबेहुब. चित्र पुरे झाले की ते मित्रांना दाखवायला तो घेऊन जाई, सगळे सामान तसेच ठेवून. घर नीटनेटके ठेवण्यावर बाबांचा कटाक्ष. आई मला विनवणी करी. ‘‘प्रकाश, राजा आवरून ठेव रे ते सामान. हे आले आणि पसारा बघितला तर उगाच चिडचिड करतील. बेसनाचे लाडू केलेत. देते तुला लगेच.’’

‘‘आई, त्याला सामान जागेवर ठेवून जायला काय होतं? बेसनाच्या लाडवाची लालूच दाखवून तू मला काम करायला लावतेस. त्याने बिघडवायचं आणि मी निस्तरायचं असा अलिखित नियम केलायस का तू?’’

आईचा तो अलिखित नियम माझा पाठपुरावा करीत होता. जीवनाच्या या टप्प्यावर त्याने केलेली अक्षम्य चूक मलाच निस्तरावी लागणार होती. निव्वळ तो माझा भाऊ होता म्हणून अभावितपणे माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले.

‘‘बालपण नको रे बाबा.’’

करमणूक

मिश्किली * मधु गोयल

‘‘तुम्ही प्रेसच्या कपडयांमध्ये अंडरवेअरदेखील दिली होती काय?’’ शिखाने तिचा पती शेखरला विचारले.

‘‘बहुधा… चुकून कपडयांसोबत गेली असावी,’’ शेखर म्हणाला.

‘‘प्रेसवाल्याने तिचेदेखील रुपये ५ लावले आहेत. आता असे करा की उद्या अंडरवेअर घालाल तेव्हा त्यावर पँट घालू नका. रुपये ५ जे लागले आहेत,’’ शिखा म्हणाली.

‘‘तू पण ना… नेहमी विनोदाच्या मूडमध्येच असते. कधीकधी तू सिरीयसही होत जा.’’

‘‘अहो, मी तर आहेच अशी… म्हणूनच आजही वयाच्या ५० व्या वर्षीही कुणीही माझ्याशी लग्न करेन.’’

मुलगी नेहा म्हणाली, ‘‘बाबा, तू माझ्यासाठी व्यर्थ मुलगा शोधत आहेस… आईचे लग्न लावून द्या. तसेही मला लग्न करायचे नाहीए.’’

शेखरने विचारले, ‘‘का मुली?’’

‘‘पपा, मी आतापर्यंत जे आयुष्य जगले आहे त्यात असेच जाणवले आहे… लग्न करून मी माझे स्वातंत्र्य गमावणार आहे… लग्न एक बंधन आहे आणि मी बंधनात बांधली जाऊ शकत नाही. मी याबद्दल माझ्या आईशी सर्व काही सामायिक करेन,’’ नेहाने स्पष्ट उत्तर दिले.

तेवढयात शेखरची नजर दारावर पडली. एक कुत्रा घुसला होता. शेखर शिखाला म्हणाला, ‘‘तू बाहेरचा दरवाजाही नीट बंद केला नाहीस. बघ कुत्रा आत आला.’’

‘‘अहो, जरा व्यवस्थित तर बघत जा, हा कुत्रा नाही, कुत्री आहे. बहुधा तुम्हांला भेटायला आली असेल. भेटून घ्या. मग तिला बाहेरचा मार्ग दाखवा,’’ शिखा म्हणाली.

‘‘तू तर सदैव माझ्या पाठीच लागून राहतेस,’’ शेखर रागाने फणफणत म्हणाला.

शिखा त्वरित उत्तरली, ‘‘तुमच्या पाठी नाही लागणार तर मग काय शेजाऱ्याच्या पाठी लागणार? तेही तुला आवडणार नाही आणि असे तर होतच आले आहे की पती पुढे-पुढे आणि पत्नी मागे-मागे,’’ शिखाने पटकन् उत्तर दिले.

‘‘बरं, सोड मी तुझ्याशी जिंकू शकत नाही.’’

‘‘लग्न हीदेखील एक लढाई आहे. तुम्ही त्यात मला जिंकूनच तर आणले आहे. हाच सर्वात मोठा विजय आहे… अशी पत्नी शोधूनही मिळणार नाही,’’ असे शिखा म्हणाली.

‘‘बरं सोड, आपले गुण खूप गाऊन झालेत तुझे. आता माझे ऐक,’’ शेखर म्हणाला.

‘‘मी आतापर्यंत तुमचेच तर ऐकत आहे.’’

‘‘आपल्या नेहासाठी संबंध जुळवून येत आहेत… नेहाने मला सांगितले होते की तिला लग्न करायचे नाही. तू जरा तिच्याशीच बोल.’’

‘‘ठीक आहे श्रीमानजी, जशी आपली आज्ञा… लग्नाच्या या लढाईत तुम्ही पत्नीला जिंकून आणले होते. तेव्हापासून आतापर्यंत तुमच्याच इशाऱ्यावर मी नाचत आहे,’’ शिखा म्हणाली.

‘‘ठीक आहे. मला खूप जोराची भूक लागली आहे. आता काहीतरी खायला-प्यायला दे,’’ शेखर म्हणाला.

‘‘बघा, मी खायला घालण्याची-भरवण्याची नोकरी नाही बजावली. आता तुम्ही लहान मूल तर नाही आहात… आपल्या मुलीसाठी मुलगा शोधत आहात. ते वय तर तुमचे संपून गेले.’’

‘‘बरं, माझ्या आई, तू एकदा देशील तर खरं.’’

‘‘बघा, आई हा शब्द वापरू नका. घाटयात राहाल. विचार करा, मग काहीही मिळणार नाही. फक्त आईच्या प्रेमावरच अवलंबून राहाल.’’

‘‘अरे यार, तुझ्या पालकांनी काय खाऊन तुला जन्माला घातले होते?’’ शेखरच्या तोंडातून बाहेर आले.

‘‘मी जाऊन त्यांना विचारेल की तुमच्या जावयाला तुमचे रहस्य जाणून घ्यायचे आहे… इतक्या वर्षांनंतर ते आज खरवडून पाहत आहेत.’’

‘‘ठीक आहे, ठीक आहे, आता पुरे,’’ शेखर म्हणाला.

‘‘अरे नेहा, मुली माझा चष्मा कुठे आहे?’’ शेखरने मुलीला आवाज दिला.

‘‘अरे पप्पा, चष्मा तुझ्याच डोक्यावर टेकला आहे. तू इकडे-तिकडे का शोधत आहेस?’’ नेहा हसत म्हणाली.

शिखा म्हणाली, ‘‘काखेत कळसा अन गावाला वळसा हा यांचा हिशोब आहे.’’

‘‘विचारेल बच्चू …’’ शेखर तोंड वाकडे करत म्हणाला.

‘‘व्वा व्वा, कधी बच्चू, कधी माई, कधी आई. अहो, जे नाते आहे, त्यातच रहा ना?’’

‘‘तुला समजणार नाही… तसेही दिव्याखाली अंधार… संपूर्ण जगात शोध घेतला असता तरी असा नवरा मिळाला नसता. कालचीच गोष्ट घे ना. साखरेचा डबा फ्रीजमध्ये ठेवला आणि जगभर शोधत त्रासून जात होती… मी तरुण आहे अशी वार्ता करतेस… ही वृद्धावस्थाची चिन्हे नाहीत तर अजून काय आहे?’’

‘‘चल, सोड आता. पुरे झाले. एक कप चहा मिळेल का?’’

‘‘एक कप नाही तर एक बादलीभर घ्या,’’ शिखा म्हणाली.

‘‘बस्स खूप झाले. जेव्हा एखादा सिंह जखमी होतो ना, तेव्हा तो अधिक क्रुर होतो, माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नकोस. भाषेत गोडवाच नाही.’’

‘‘हो-हो, माझ्या जीभेत तर विष विरघळले आहे. विहिरीतल्या बेडकासारखे डराव-डराव करत जाल,’’ शिखा म्हणाली.

‘‘तुला कधीच समजणार नाही… हे शब्दच आयुष्यात गोंधळ निर्माण करतात. स्मितहास्य आयुष्य सुरळीत करते, समजले?’’

‘‘अगं मुली नेहा, एक कप चहा बनवून दे. एक कप चहा मागणे गुन्हा झालाय.’’

‘‘हो-हो, चहा तर नेहाच बनवेल… आयुष्यभर छातीवर बसवून ठेवा तिला… माझ्या हाताला तर विष आहे,’’ शिखा हात नाचवत म्हणाली.

‘‘नाही नाही… तुझ्या हाताला नाही, तुझ्या जिभेत विष आहे,’’ शेखर म्हणाला.

‘‘माझ्यासाठी, तर प्रेमाचे दोन शब्दही नाहीत… आता काय मी इतके वाईट झाले?’’

‘‘मी कधी बोललो? अगं वेडे, तुझ्यापेक्षा जगात कुणीही चांगले असूच शकत नाही… फक्त थोडेसे जास्त नाही शांत राहणे शिकून घे, प्रत्येक गोष्टीवर उलटून हल्ला करत जाऊ नकोस… वेडे, आता या वयात मी कुठे जाणार?’’ शेखर म्हणाला.

‘‘तुम्ही चहा घेणार?’’ शिखाने खालच्या स्वरात विचारले.

‘‘अगं, मी तर कधीपासून चहासाठी तळमळत आहे.’’

‘‘अगं मुली नेहा, जरा बटाटे सोल बरे… मी विचार करते चहासोबतच वडे पण बनवून घेऊ. काय हो?’’ शिखाने विचारले.

‘‘उशीरा का होईना शहाणपण सुचले,’’ शेखर हसत म्हणाला.

वैभवातलं दु:ख

कथा * रवी चांदेकर

ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. साक्षी आपलं सामान आवरत होती. तिनं स्वत:चे केस व्यवस्थित केले. चेहरा स्वच्छ पुसला. नवऱ्यालाही आवरून घ्यायला सांगितलं. तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या शर्टकडे गेलं. ‘‘हे काय? कसला डाग पडलाय शर्टवर?’’ तिनं विचारलं.

‘‘अगं, काल रात्री जेवताना सांडलंय काहीतरी,’’ तो खजील होऊन म्हणाला.

साक्षी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. सावळी पण अत्यंत आकर्षक. नवरा सौरभ सरकारी नोकरीत साधा क्लार्क होता. लग्नाला पंधरा वर्षं झाली होती. एक मुलगा होता तेरा वर्षांचा.

साक्षीच्या गावात एकच सरकारी कॉलेज होतं. गावातील अन् आसपासच्या कसब्यातील गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय अशा सर्वच थरातील मुली तिथंच शिकायच्या. गावातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी कामिनीही साक्षीच्याच वर्गात होती. खरंतर आर्थिक दृष्टीनं कामिनी मोठ्या शहरातल्या कॉलेजात शिकू शकली असती. पण घरातून तिला बाहेर गावी पाठवण्याची परवानगी नसल्यानं तिनं इथंच शिकायचं ठरवलं.

एकाच वर्गात, एकाच कॉलेजात असल्यानं साक्षी व कामिनीची खूपच छान मैत्री होती. कॉलेजव्यतिरिक्त वेळ मिळेल तेव्हा दोघी एकत्र असायच्या. त्यांच्या मैत्रीचं घरच्यांना अन् गावातील लोकांनाही कौतुक होतं.

ग्रॅज्यूएट झाल्या झाल्या कामिनीला एक चांगलं स्थळ सांगून आलं अन् ती लग्न करून सासरी दिल्लीला निघून गेली.

साक्षीचं लग्न ठरण्यात सर्वात मोठी अडचण त्यांची आर्थिक परिस्थिती होती. सोनं, हुंडा, मानपान त्यांना गरीबीमुळे शक्य नव्हतं अन् पैशाशिवाय चांगलं स्थळ मिळत नव्हतं. शेवटी एकदाचं साक्षीचंही लग्न ठरलं. गावातलंच सासर मिळालं. लग्नानंतर दोघां मैत्रिणींची ताटातूट झाली. कामिनी दिल्लीला असेल एवढंच साक्षीला माहीत होतं. पण पत्ता वगैरे काहीच ठाऊक नव्हता. कामिनीच्या वडिलांनीही इथला व्यापार व्यवसाय आवरून दिल्लीलाच मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. आता माहेरच या गावात नाही म्हटल्यावर कामिनी तरी मुद्दाम वाकडी वाट करून इकडे कशाला येणार? त्यामुळेच दुरावा जास्त जाणवत होता.

साक्षीचा नवरा सरकारी नोकरीत होता, पण साधा कारकून होता. बेताच्या उत्पन्नात ती कसाबसा संसार रेटत होती. सकाळ व्हायची, दुपार व्हायची, रात्र व्हायची, दिवसामागून दिवस असेच कंटाळवाणे जात होते. साक्षीला या नीरस आयुष्याचा कंटाळा आला होता. काहीतरी बदल, कुठला तरी प्रवास असं तिला हवं होतं. अशावेळी तर तिला कामिनीची खूपच आठवण यायची. मनात यायचं, कामिनी श्रीमंतीत, दिल्लीसारख्या ठिकाणी किती मजेत राहत असेल. लग्नाला चौदा वर्षं झाली. एवढ्या अवधीत साक्षीला कामिनीची काहीही माहिती मिळाली नव्हती. कॉलेजमधल्या सोबत शिकणाऱ्या मुलींपैकी कधी कुणी गावी माहेरी आल्या तर भेटायच्या.

याच सुमारास दिल्लीहून कुठल्यातरी कामासाठी कामिनीचे वडील आपल्या जुन्या गावी आले होते. ते आवर्जून साक्षीला भेटले. त्यांनी साक्षीला कामिनीचा पत्ता व फोन नंबर दिला. साक्षीला खूप आनंद झाला. आता दोघी मैत्रीणी फोनवर बोलायच्या. दोघींजवळ सांगायला इतक्या वर्षांतल्या कितीतरी घडामोडी होत्या.

कामिनी तिला म्हणायची, ‘‘दिल्लीला ये. तुला दिल्ली दाखवेन.’’ साक्षीला ठाऊक होतं, आपला नवरा तयार होणार नाही. त्याला आपलं काम बरं, आपण बरे असं वाटायचं. त्यामुळे साक्षी तिच्या आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हती.

शेवटी एकदा साक्षीचा नवरा दिल्लीला यायला राजी झाला. साक्षीला खूप आनंद झाला. तिनं कामिनीला ती नवऱ्यासह येत असल्याचं कळवलं. कामिनीनंही ती स्वत: रेल्वे स्टेशनवर रिसीव्ह करायला येईल हे कळवलं. कितीतरी दिवसांनी साक्षी प्रवासाला निघाली होती. त्यातून दिल्लीला, लाडक्या मैत्रीणीकडे…साक्षी खूपच आनंदात होती. तिनं ऐकलं होतं साक्षीच्या सासरी खूप वैभव आहे. गाडी, बंगला, नोकरचाकर, नवराही दिसायला चांगला अन् वागायला समजूतदार आहे. कामिनीचा संसार बघायची, तिला कडकडून भेटायची साक्षीला घाई झाली होती.

गाडी स्टेशनवर आली. सामानासह साक्षी उतरली. कामिनी तिला घ्यायला आली होती. दोघींनी एकमेकांना बघितलं अन् त्यांचे चेहरे आनंदानं फुलले. कामिनी तर आता अधिकच सुंदर दिसत होती. तिचं वय जणू तिथंच थांबलं होतं. जीन्स आणि टॉपमध्ये ती अजूनच स्मार्ट दिसत होती. कॉलेजला जाणारी मुलगीच वाटत होती.

कामिनी स्वत:च कार ड्राइव्ह करत होती. दिल्लीच्या रूंद गुळगुळीत डांबरी रस्त्यांवरून तिची गाडी चालली होती. साक्षी तिच्या शेजारी बसली होती. सौरभ मागे बसला होता.

‘‘तू एकटीच का आलीस? भावोजी का नाही आले?’’ साक्षीनं बाळबोध प्रश्न विचारला.

‘‘अगं बाई, ही दिल्ली आहे. इथे, जो तो आपापल्या वाट्याचं आयुष्य जगत असतो,’’ कामिनीनं तिला महानगरातल्या आयुष्याची कल्पना दिली.

‘‘तुझ्या भावजींशी पटत नाही का?’’ साक्षीनं पुन्हा भाबडेपणानं विचारलं.

‘‘तसं नाही गं! म्हणजे काय आहे, वैभव रात्री उशीरा घरी येतात, आल्यावरही बराच वेळ कॉम्प्युटरवरच काम करत असतात, त्यामुळे सकाळी लवकर उठणं त्यांना जमत नाही,’’ कामिनीनं खुलासा केला.

‘‘अस्सं होय! पण हे तर अवघडंच आहे गं बाई!’’

‘‘अवघड कसलं आलंय? आता तर हेच रूटीन आयुष्य झालंय,’’ कामिनी म्हणाली.

बोलताबोलता कितीतरी अंतर कापून कार घरी पोहोचलीसुद्धा. कामिनीचं घर म्हणजे राजमहालच होता. कितीतरी लक्झरी कार्स उभ्या होत्या. घरासमोर गार्ड होता. बागेत दोन तीन माळी काम करत होते. गार्डनं अत्यंत शोभिवंत अन् भक्कम असा लोखंडी दरवाजा म्हणजे कंपाउंड गेट उघडलं. कामिनीनं गाडी सरळ आत घेतली. लगेच दोन नोकर धावत आले. हे सगळं बघून साक्षीला कामिनीचा हेवा वाटला…काय थाट आहे हिचा…व्वा!

‘‘गाडीतलं सामान काढा आणि गेस्ट हाउसमध्ये ठेवा,’’ कामिनीनं मालकिणीच्या रूबाबत म्हटलं.

मग साक्षी अन् सौरभकडे बघून तिनं प्रेमानं म्हटलं, ‘‘ये साक्षी, भाओजी, या ना…प्लीज.’’

साक्षी अन् सौरभ चकित होऊन बघत होते. सगळीकडे श्रीमंती अन् उत्तम व्यवस्था जाणवत होती. सौरभनं कोपरानं साक्षीला डिवचून खुणेनंच म्हटलं, ‘‘काय मस्त आहे ना?’’ त्यांनी तर फक्त सिनेमात असे महाल बघितले होते. एखाद्या फिल्मच्या सेटवरच आलोय असं त्यांना वाटलं.

त्यांना दिलेल्या गेस्टरूमच्या किंगसाईज बेडवर पडून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. मग त्यांच्या स्वत:च्या घरातल्या हॉलएवढ्या मोठ्या बाथरूममध्ये स्नान उरकून घेतलं. स्वच्छ, शुभ्र संगमरवरी बाथरूममध्ये उत्तम प्रतीच्या पोर्सेलिनची सॅनिटरी वेयर्स होती. गरम थंड पाण्याच्या स्टीलच्या चकचकीत तोट्या, उंची साबण व शांपू, पावडर, सेंट शॉवर खाली अंघोळ केल्यावर खूपच प्रसन्न वाटलं. एवढ्यात नोकरानं दारावर टकटक करून सांगितलं की बाईसाहेब नाश्त्यासाठी वाट बघताहेत.

सकाळचे अकरा वाजत आलेले. ब्रेकफास्ट टेबलाशी कामिनी व वैभव बसले होते. साक्षी व सौरभ तिथं पोहोचले. साक्षीनं टेबलकडे एक नजर टाकली…अनेक पदार्थ तिथं मांडलेले होते.

‘‘ये साक्षी, या भाओजी, हे वैभव, माझे पती.’’ कामिनीनं ओळख करून दिली. वैभवनं साक्षीकडे बघितलं तर तिच्या आकर्षक चेहऱ्यावर त्याची दृष्टीच खिळून राहिली. देखण्या कामिनीपेक्षाही साक्षीचं रूप त्याला अधिक आकर्षक वाटलं. सौरभच्या लक्षात आलं, वैभव टक लावून साक्षीकडे बघतोय. त्यानं पटकन् पुढे होत हॅलो म्हणत वैभवशी शेकहॅन्ड केला, ‘‘मी सौरभ,’’ त्यानं म्हटलं.

‘‘हो, ही माझी मैत्रीण साक्षी आणि हे माझे भाओजी आपण जिजू म्हणतो ना? तेच हे,’’ कामिनी म्हणाली.

नाश्ता करताना कामिनीला वैभवनं विचारलं, ‘‘आज तुमचा काय कार्यक्रम असेल?’’

‘‘माझा सगळाच वेळ आता साक्षी अन् जिजूबरोबर असणार आहे. जोपर्यंत हे दिल्लीत आहेत, तोवर मी ह्यांच्याच बरोबर राहीन,’’ साक्षीच्या हातावर आपला हात ठेवत कामिनी म्हणाली.

‘‘ठीक आहे. यांची नीट काळजी घे. त्यांना भरपूर फिरवून आण. सगळी दिल्ली दाखव. मला आता निघायचं आहे. रात्री माझी वाट बघू नकोस. मी कदाचित घरी येईन, कदाचित बाहेरच रात्री राहावं लागेल,’’ वैभव म्हणाला.

‘‘प्लीज वैभव, निदान एक दोन दिवस तरी…’’ पुढे कामिनीला बोलायचं होतं,

पण जरा कडक आवाजातच. वैभव म्हणाला, ‘‘जरा समजून घेत जा. माझी महत्त्वाची डील्स एवढ्यातच व्हायची आहेत…मी सध्या बिझीच असेन.’’

‘‘ओ. के.’’ कामिनीनं म्हटलं. ज्या पद्धतीनं वैभव तिला बोलला होता ते नक्कीच अपमानास्पद होतं. तिनं डोळ्यांतलं पाणी लपवत साक्षीची नजर टाळली.

साक्षीला जाणवलं की कामिनी आणि वैभवचे संबंध चांगले म्हणजे निकोप नाहीत. ती काहीच बोलली नाही, पण वैभव सतत तिच्याकडे बघतोय याची जाणीव झाल्यामुळे थोडी कावरीबावरी झाली होती.

कामिनीनं संपूर्ण दुपार साक्षी व सौरभला खूप फिरवलं. इंडिया गेट, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसदभवन, लोधी गार्डन… किती तरी गोष्टी दाखवल्या. त्यांना खूप खायला प्यायला घातलं. त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. दिवसभर तिघं गप्पा मारत होते. सायंकाळी घरी परतले.

रात्रीची जेवणं आटोपल्यावर कामिनीनं साक्षीला म्हटलं, ‘‘आजच्या रात्री तू भाओजींना सोड अन् माझ्याजवळ झोप. खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येतील.’’

‘‘तू रोज माझ्याजवळ राहशील तर तुझ्या भाओजींना मी नेहमीकरता सोडू शकते,’’ गमतीनं हसत साक्षी म्हणाली.

‘‘नको गं, इतका अन्याय होऊ देणार नाही. फक्त इथं तुम्ही आहात, तेवढे दिवस तू माझ्याजवळ झोप,’’ कामिनीनं म्हटलं.

कामिनीनं साक्षीला तिच्या संसाराबद्दल विचारलं. ‘‘भाओजींबरोबर तू सुखात आहेस ना? संसार कसा चाललाय? मुलगा तुझ्याबरोबर आला असता तर छान झालं असतं. तो त्याच्या काकांकडे किती दिवस राहणार आहे? झी दिनचर्या काय असते? तुला काही प्रॉब्लेम तर नाहीए ना?’’

कामिनीचे प्रश्न संपत नव्हते. साक्षी म्हणाली, ‘‘आमचं काय घेऊन बसलीस गं? आमचं जगच मुळात छोटंसं आहे. आम्ही मध्यमवर्गीय माणसं. नवरा सकाळी नऊला ऑफिसात जातो. संध्याकाळी सहाला घरी परत येतो. तसं ऑफिस घरापासून फार लांब नाहीए. त्यामुळे कधी कधी जेवायला घरीच येतात. रात्री आठला जेवतात अन् दहापर्यंत झोपतोही आम्ही. सकाळी लवकर उठून आम्ही दोघं वॉकला जातो…बस्स! एवढंच आमचं आयुष्य…हीच आमची दिनचर्या.’’ साक्षी म्हणाली.

‘‘तुला काही त्रास तर नाहीए ना साक्षी? भाओजी नीट वागतात ना?’’

‘‘छेछे, तसा त्रास काहीच नाही. नवरा मला मान देतो. माझी काळजी घेतो, कामात मला मदतही करतो. तसा त्यांचा स्वभाव शांत आहे. एकूणात सगळं बरं चाललंय…पण तुझ्यासारखं  वैभव, तुझ्यासारखी श्रीमंती नाहीए ना माझ्याजवळ…’’ साक्षी खिन्नपणे म्हणाली.

‘‘नाहीए तेच चांगलं आहे गं! जे तुझ्याजवळ आहे ते सगळंच माझ्यापेक्षा चांगलं आहे. तू सुखी आहेस साक्षी…’’

‘‘काय’’ चेष्टा करतेस गं कामिनी? कुठं तू, कुठं मी? या वयातही तू स्वत:ला किती छान मेंटेन केलं आहेस अन् नाहीतर मी, तुझ्याजवळ खूप काही आहे गं कामिनी…’’ साक्षीनं म्हटलं.

कामिनीचे डोळे भरून आले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

साक्षी हतप्रभ झाली, ‘‘काय झालं कामिनी? का गं रडतेस?’’ तिनं प्रेमानं विचारलं.

‘‘काही नाही गं! आपले ते गावातले जुने दिवस आठवले.’’ कामिनी दाटून आलेल्या कंठानं म्हणाली.

‘‘कामिनी, खरं सांग, काय झालं? तू इतकी इमोशनल का झालीस?’’ तिचे अश्रू पुसत साक्षीनं विचारलं.

अन् मग कामिनी बोलायला लागली…

‘‘साक्षी, तू हा जो सगळा थाटमाट, वैभव, पैसा बघते आहेस ना, हे काही खरं नाही. दिसायला दिसंतय ते पण त्यात मनाला सुख नाही, समाधान नाही. हे आयुष्य जगताना किती देखावा, किती खोटेपणा करावा लागतो ते तुला ठाऊक नाहीए. फक्त पैसा असला म्हणजेच सुख असतं असं नाही. हा फक्त वरवरचा झगमगाट आहे. यात सुख नाही, मानसिक शांतता नाही. नवरा रात्री उशीरा घरी कधी येतो, मला कळत नाही. आल्यावर माझ्याजवळ येऊन कधी झोपतो तेही मला कळत नाही. कित्येक दिवस आमच्यात संवादही घडत नाही. म्हणायला मी मॉडर्न आहे. अजूनही तरूण दिसते, पण हे सगळं कुणासाठी? माझ्या रात्री मी एकटीच तळमळत काढते अन् दिवस जातो मैत्रीणींच्या किटी पार्टीत. खरं सांगते, माझं स्वत:चं असं काहीच नाहीए. माझ्या मर्जीनं मला जगता येत नाही. मी काय खावं, काय घ्यावं, काय घालावं हे दुसरंच कुणी ठरवतं. मला तर असं वाटतं साक्षी की स्त्री कितीही शिकली, कितीही उच्च पदावर असली, स्वत:चा व्यवसाय करत असली तरी एकदा तिनं घरात पाऊल टाकलं की ती नवऱ्याच्या ताब्यात असते.. स्त्रीला अपूर्ण अन्न पुरतं, साधे कपडे चालतात, शारीरिक व्यंग असलेला नवराही चालून घेते. पण मानसिकदृष्ट्या अपंग असलेला, अजिबात समजूतदारपणा नसलेला काहीसा विकृत किंवा कामांध नवरा कसा खपवून घ्यायचा? कसं त्याला सांभाळायचं?’’

कामिनी बोलत होती. मनातलं सगळं सांगत होती आणि साक्षी चकित होऊन ऐकत होती. तिची व्यथा, वेदना, पीडा साक्षीला नवी होती.

‘‘साक्षी, मला सांग, ज्या पुरुषाची स्वत:चीच काही ओळख नाही, स्वत:चीच काही आयडेंटिटी नाही, त्याच्या पत्नीला काय महत्त्व असणार गं? वैभव तीन भावात सर्वात मोठे आहेत, पण आमचा सगळा व्यवसाय, सगळा पैसा धाकट्या दोघांच्या हातात आहे. त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी दिलेला आदेश वैभवला ऐकून घ्यावा लागतो. त्यामुळेच मी किंवा माझी मुलंही आश्रिताचं जीणं जगतोय. धाकटे भाऊ जे काम सांगतात, तेच वैभव करतो, ते जिथं पाठवतात, तिथं जातो. आपल्या भावांना तो काही म्हणूच शकत नाही. भावांनी त्यांना चांगलं म्हणावं म्हणून ते त्यांच्याशी लाळघोटेपणा करतात अन् माझ्याकडे, मुलांकडे साफ दुर्लक्ष करतात. मला शंभर रुपये जरी हवे असले तरी धाकट्या दिरांकडे हात पसरावा लागतो,’’ कामिनी म्हणाली.

‘‘पण कामिनी, एकत्र कुटुंबात असं…’’ तिला मध्येच थांबवत कामिनीनं म्हटलं,

‘‘होय साक्षी, एकत्र कुटुंबात तडजोड करावीच लागते. पण कुणाच्या दडपणाखाली दुसऱ्याचा ‘स्व’च चिरडला जात असेल तर? पत्नीला स्वत:च्या नवऱ्याबरोबर जगण्याचा हक्क आहे ना? तो तिला मिळू नये? आपल्या बायकोचा बळी एवढ्यासाठी द्यायचा की भावांनी आपल्याला वाईट म्हणू नये. मला तर नवऱ्याला काही म्हणायचाही हक्क नाही. तू खरोखर सुखी आहेस साक्षी. तुला माहीत आहे तुझा नवरा कधी घरी येईल…आल्यावर तुम्ही दोघं एकत्र जेवाल…गप्पा माराल, एकत्र  झोपाल. तुला, त्यांना किती पगार मिळतो ते माहीत आहे. मला तर वैभवबद्दल काहीच माहीत नसतं. कधी तो येईल, कधी तो येणार नाही, बरोबर जेवेल, रात्री झोपेल काहीच नाही,’’ कामिनी म्हणाली.

कामिनीनं स्वत:चं आयुष्यच उलगडून ठेवलं साक्षीसमोर. ‘‘चल, कामिनी आता झोपूयात, रात्रीचा एक वाजून गेला आहे,’’ साक्षीनं म्हटलं.

‘‘खरंच गं! झोपायला हवं. तुलाही प्रवास करून आल्यावर विश्रांती मिळाली नाहीए,’’ कामिनी म्हणाली.

‘‘मी जरा सौरभला बघून येते. तो झोपला नसेल तर मी तिथंच झोपते, नाहीतर तुझ्याकडे येते.’’

‘‘ठीक आहे. बघून ये,’’ कामिनी बेडवर आडवी होत म्हणाली.

साक्षीच्या मनात खळबळ माजली होती. वैभव कामिनीशी असा का वागतो? इतकी सुंदर, तारूण्यानं रसरसलेली, हुषार, प्रेमळ बायको असताना तो तिच्याकडे दुर्लक्ष कसा करू शकतो? अन् आज सकाळी ब्रेकफास्टच्यावेळी तो ज्या पद्धतीने साक्षीकडे बघत होता ती नजर कामुक होती. त्या नजरेत एक आकर्षण होतं आणि आमंत्रणही.

विचारांच्या नादात ती आपल्या गेस्टरूमकडे जात असताना तिला एका खोलीत उजेड दिसला. यावेळी कोण असेल या खोलीत? तिच्या मनात उत्सुकता दाटली. तिनं सहज खोलीत डोकावून बघितलं तर वैभव नाइट सूट घालून एका खुर्चीवर बसलेला दिसला. समोर टेबल होतं अन् शेजारीच एका काचेच्या कपाटात विलायती दारूच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या. टेबलावरही दोन तीन बाटल्या अन् एक अर्धवट भरलेला ग्लास होता.

‘‘भाओजी तुम्ही? कधी आलात तुम्ही?’’ आश्चर्यानं साक्षीनं विचारलं अन् ती सरळ खोलीत शिरली.

‘‘अरे? साली साहेबा. या, आत या,’’ तिला येताना बघून वैभवनं म्हटलं.

‘‘तुम्ही आलात कधी? आल्याचं सांगितलं का नाही? मी अन् कामिनी खोलीत बोलत बसलो होतो,’’ साक्षी उत्साहानं बोलत होती.

‘‘मी थोड्या वेळापूर्वीच आलो, तुम्ही दोघी गप्पा मारत होतात, मग म्हटलं तुमच्या गप्पांमध्ये डिस्टर्ब नको,’’ वैभवनं म्हटलं. तो अधूनमधून दारूचे घोट घेत होता. डोळ्यात दारूची धुंदी स्पष्ट दिसत होती. तरीही सक्षीला त्याच्याशी बोलायची इच्छा होती. तिनं विचारलं ‘‘जिजू, तुम्ही दारू का पीता?’’

‘‘दारू कुणी आनंदानं पित नाही, सालीसाहेबा, माणसाच्या मनात खोलवर रूतून बसलेलं दु:ख असतं. ते विसरण्यासाठी माणूस दारू पितो,’’ त्याचे डोळे भरून आले होते. तो भावनाविवश झाला होता.

त्याचं नाटक भाबड्या मनाच्या साक्षीच्या लक्षात आलं नाही. ती ही भावनाविवश झाली. त्याच्याजवळ येत त्याचे अश्रू पुसत म्हणाली, ‘‘प्लीज जिजू तुम्ही रडू नका…मला सांगा, तुम्हाला काय दु:ख आहे ते.’’

तिला जवळ आलेली बघून वैभवनं तिच्या कंबरेला मिठी मारली. तो खुर्चीवर बसून होता.

इकडे कामिनी साक्षीची वाट बघत होती, ती येते आहे की नाही हे तिला कळेना. म्हणाली होती सौरभ झोपला असेल तर परत येते. तिची वाट बघत असल्यामुळे तिला झोप  येत नव्हती. बघून येऊ साक्षीच्या खोलीपर्यंत जाऊन असा विचार करून ती साक्षीच्या खोलीकडे निघाली. वैभवच्या खोलीत दिवा जळत होता        आणि बोलण्याचा आवाजही येत होता. ती एकदम सावध झाली अन् झटकन् खोलीत शिरली.

समोरचं दृश्य बघून ती हादरलीच. वैभवनं खुर्चीवर बसूनच उभ्या असलेल्या साक्षीच्या कमरेला मिठी मारली होती. वैभवला कामिनी खोलीत आलेली दिसताच त्यानं साक्षी भोवतीचे हात काढून घेतले.

‘‘वैभव काय करतो आहेस? अरे निदान माझ्या मैत्रीणीला तरी वासनेपासून लांब राहू दे, लाज नाही वाटली तुला?’’ कामिनी आरेडलीच.

साक्षी पाठमोरी असल्यानं तिला कामिनी दिसलीच नव्हती. साक्षी त्या आवाजानं एकदम दचकली.

‘‘ओरडतेस कशाला? काय केलंय मी?’’ वैभवही ओरडला.

‘‘बघ साक्षी…हे या वैभवचं मायावी रूप आहे. रडून भेकून सहानुभूती मिळवायची. रोज नवी स्त्री लागते यांना…मी कसं सहन करायचं हे?’’ साक्षीला गदागदा हलवत कामिनीनं म्हटलं.

‘‘मला क्षमा कर कामिनी…अजाणता…,’’ कामिनीनं साक्षीला पुरतं बोलूच दिलं नाही. ती म्हणाली, ‘‘तू ही त्यातलीच एक व्हायची होतीस…थोडक्यात बचावलीस…’’

हा आरडाओरडा रात्रीच्या वेळी शांत वातावरणात सौरभच्याही गेस्टरूमपर्यंत पोहोचला. काय प्रकार आहे बघायला तो खोलीच्या दिव्याच्या अन् आवाजाच्या अनुरोधानं निघाला.

चतुर अन् सावध कामिनीनं सौरभला येताना बघितलं…क्षणभर ती घाबरली…जर सौरभला वैभवच्या या कृत्याबद्दल कळलं तर? छेछे, अनर्थ होईल. तिने पटकन निर्णय घेतला.

‘‘काय झालं कामिनी? काय झालंय साक्षी?’’ खोलीत येत सौरभनं विचारलं.

अगदी शांतपणे, सौम्य हसत कामिनीनं म्हटलं, ‘‘काहीच नाही, भाओजी, वैभव आत्ताच आलेत अन् न जेवता झोपायचं म्हणताहेत तर मी त्यांना रागावत होते.’’

एवढा वेळ दगडासारखी निश्चल झालेली साक्षी आता भानावर आली.

‘‘एवढंच ना? मला काही तरी वेगळंच वाटलं. आरडा ओरडा ऐकण्यासारखं वाटलं…भास झाला असेल,’’ सौरभनं म्हटलं.

कामिनीनं वेळ मारून नेली. प्रसंग सांभाळून घेतला हे बघून साक्षीच्या जिवात जीव आला. तिनं केवढी मोठी चूक केली होती? रात्रीच्या वेळी, दारू पीत असलेल्या अनोळखी पुरूषाच्या खोलीत जायची गरजच काय होती? काही भलतंच घडलं असतं म्हणजे? का तिनं वैभवला आपल्याजवळ येऊ दिलं?

‘‘साक्षी, तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये जाऊन शांतपणे झोपा. रात्र खूपच झाली आहे,’’ कामिनीनं म्हटलं. साक्षीनं कृतज्ञतेनं  कामिनीकडे बघितलं अन् काही न        बोलता ती सौरभबरोबर आपल्या खोलीकडे निघाली.

वैभवला तिथंच सोडून कामिनीही आपल्या खोलीत आली. खोलीत येताच तिनं आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिनं आपलं दु:ख विसरण्यासाठी मैत्रीणीला आपल्याकडे बोलावलं होतं. पण तिचा नालायक नवरा मैत्रीणीच्याच अब्रूवर उठला होता.

दुसऱ्यादिवशी कामिनीनं परतीच्या प्रवासाची दोन तिकिटं साक्षी व सौरभला दिली. तिला व वैभवला अचानक कुणा नातलगाच्या मृत्यूमुळे अहमदाबादला जावं लागणार होतं. तिनं सौरभची पुन्ह:पुन्हा क्षमा मागितली. सौरभला रात्रीच्या प्रसंगाची कल्पना नव्हती  अन् घरची मालकमालकीणच घरात नसतील तर त्या घरी राहण्यात अर्थ काय होता? साक्षीला मात्र आपल्या मैत्रीणीचं दु:ख कळलं होतं. स्वत:चा साधा संसार अन् नवऱ्याकडून मिळत असलेला मान याची किंमत कळली होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें