कथा * आशा आर्या
अरे देवा! पुन्हा एक नवा ग्रुप...सगळं जग जणू व्हॉट्सएपमध्ये आवळून बांधलंय. ‘सितारे जमीं पर’ नाव असलेला हा ग्रुप नसरीनला आत्ताच दिसला होता. कॉलेजात जाण्यापूर्वी नित्याच्या सवयीप्रमाणे ती व्हॉट्सएप मेसेजेस चेक करत होती.
या व्हॉट्सएपचीही शेवटी सवयच लागते. सवय काय, खरंतर व्यसन म्हणायलाही हरकत नाही. बघितलं नाही, तर नेमकं काही तरी अति महत्त्वाचं आपल्याला कळत नाही. कुठल्याशा ग्रुपमधून तर एकाच दिवसात शेकडो मेसेजेस येतात...बिच्चारा मोबाइल हँग होतो. त्यातले निम्मे तर फुकटचं ज्ञान वाटणारे कॉपीपेस्टच असतात. उरलेले गुडमॉर्निंग, गुडइव्हिनिंग, गुडनाईटसारखे निरर्थक असतात. येऊनजाऊन एखादाच मेसेज दिवसभरात कामाचा सापडतो. पण येताजाता उगीचच मेसेज चेक करायचा, चाळाचा असतो मनाला. विचार करता करता नसरीन भराभर मेसेजेस चेक करत होती, डिलीटही करत होती.
बघूया तरी या नव्या ग्रुपमध्ये काय विशेष असेल? ओळखीच्यापैकी कुणी असेल का? अॅडमिन कोण असेल? तिनं नव्या ग्रुपच्या इन्फोवर टॅप केलं. आत्ता तरी या ग्रुपमध्ये १०७ लोक जॉइन झालेले आहेत. स्क्रोल करता करता तिची बोटं अचानक एका नावावर थांबली. राजन? ग्रुप अॅडमिनला ओळखताच ती आनंदानं चित्कारली.
हा राजन तर ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’चा आयोजक आहे. याचाच अर्थ तिचा प्रोफाइल पहिल्या पातळीवर निवडला गेला आहे. नसरीनला आनंद झाला.
नसरीन जयपूरला राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुबातली एक मुलगी. पण तिची महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. उंच, गोरी, शेलाटी, आकर्षक चेहरा अन् धीटपणा असणारी ही मुलगी. तिच्या उड्या मोठ्या आहेत अन् त्यासाठी हवं ते करायची तयारी आहे. रूढीवादी समाजानं लादलेली बंधनं तिला मान्य नाहीत. ती चक्क बंडखोरी करते. तिला मॉडेल बनायचं आहे. पण तिच्या जुनाट विचारांच्या कुटुंबात भाऊ व आई तिला सतत बंधनात ठेवतात. वडिलांची ती लाडकी आहे. ते तिला काहीच म्हणत नाहीत. आई तिच्यासाठी मुलगा शोधतेय. नसरीनला लग्न मुलं बाळं काहीही नकोय. तिच्या बरोबरीच्या मुलींना तिचं बिनधास्त वागणं, फॅशनेबल राहणं या गोष्टींचा मत्सर वाटतो. पण तसं स्वत:ला राहता आलं तर त्यांना आवडलंच असतं.