कथा * रेखा नाबर
अनिरूद्धला स्काईपवर आलेलं पाहून नाना अंचबित झाले.
‘‘नानी, अनिरूद्ध आहे स्काईपवर, या लवकर.’’
‘‘नाना, आश्चर्य चकित झालात ना?’’
‘‘साहजिकच आहे. परवाच तर बोललो आपण.’’
‘‘सगळं ठिक आहे ना तिकडे?’’ नानींची मातृसुलभ चिंता.
‘‘हो, सगळं उत्तम आहे. तुम्ही नेहमी म्हणता ना नविन तंत्रज्ञानाने जग लहान झालं. पण नाती दुरावली. संवाद आटला. म्हणूनच आज पुन्हा संपर्क साधला.’’
‘‘हे ‘दुधाची तहान ताकावर...’ असं झालं. सोबत राहीलात तर काहीतरी चांगलं चुगंलं करून घालेन. उतरत्या वयात तुमच्या मायेचा ओलावा सुखावेल. पण कसलं काय? तू अमेरिकेला आणि अनिता लंडनला. आम्ही भारतात असा त्रिकोण.’’ नानींची प्रेमळ व्यथा.
‘‘नानी, आता तुझ्या सर्व तक्रारींना पूर्णविराम मिळणार आहे. आम्ही लवकरच येतोय तिकडे. अन्यालासुद्धा कळवलंय. ती येणार आहे.’’
‘‘अगंबाई, सगळीच येणार. मुलेबाळे येता घरा तोची दिवाळी दसरा.’’
नानींनी मुलांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. अनिरूद्ध व पत्नी अचला तर अनिता आपल्या अद्वैत, आराध्य या मुलांसहीत हजर झाली. अनिता तिच्या दिरांकडे दादासाहेबांकडे राहिली.
‘‘अनि, सहा महिन्यांपूर्वी तू आला होतास. लगेच रजा कशी मिळाली.’’ नानींनी विचारलं.
‘‘थोडीशी रजा आणि इथूनच काम करणार आहे. यावेळी मी एक प्रस्ताव घेऊन आलोय. म्हणजे तुम्हाला घेऊन जाण्याचा.’’
‘‘गेल्यावर्षीच चांगले तीन महिने राहून आलो की.’’ नानांनी विचारलं.
‘‘तसं नाही नाना. आता तुम्ही दोघे कायमचेच चला. एकत्र राहू या. इकडे तुम्ही दोघांनीच राहणं सुरक्षित नाही. शिवाय तुमच्या तब्येतीची काळजी वाटते ना! नुकतंच मी मोठं घर घेतलंय. छान बाग आहे. भरपूर मोकळी जागा. अगदी हवेशीर आहे. अचला, फोटो दाखव.’’
घराचे, आतील सर्व खोल्यांचे फोटो पाहून नाना, नानी व अनिता हरखूनच गेले.
‘‘एकदम सही घर घेतलेयस रे दादीहल्या. नानानानींची रूम ढासूच.’’
‘‘हो ना? नाना नानी तुम्ही मस्त आरामात राहा. वीकेएन्डला आपण आऊटिंगला जात जाऊ.’’
‘‘नाही रे अनि. इकडची नाळ तोडून कायमचं तिकडे यावं असं नाही वाटत. आमचं सोशल लाईफ, योग केंद्र, इथले नातेवाईक, सण, समारंभ सगळ्यानांच मुकावं लागणार.’’