कथा * पूनम अत्रे
गौरी हसते ना तेव्हा माझ्यया अवतीभवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन् निरागस आहे...तिच्या स्वच्छ, निष्कपट मनांचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं.’’ अनिरूद्ध सांगत होता अन् शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती अन् तिचा प्रियकर अनिरूद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार अन् संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरूद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरूद्धची बडबड ऐकून घेत होता.
‘‘चला निघूया...माझं काय? सध्या मी एकटा जीव सदाशिव...पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुंलंबाळं असतील ना? ती वाट बघतील...’’
‘‘का हो? आज गौरी भेटायला नाही येणार?’’
‘‘आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते अन् तिचा नवरा अन् मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे.’’
‘‘तरीही ती तुम्हाला भेटते? का?’’
‘‘तुम्हाला नाही समजणार.’’
‘‘सांगून तर बघा...’’
‘‘नंतर कधी तरी...बाय...’’ बोलून अनिरूद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशिलं दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्याव्या का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन् कशासाठी चाललंय? हा अनिरूद्ध मध्येच कुठून टपकला?
गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही अन् आनंदात दिसते. स्वत:विषयी बरीच जागरूक झालीय. सकाळी फिरायला जाते. ब्यूटीपार्लरला जाते. फेशिअल, हेअर स्टाइल काय अन् काय...पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते पण हल्ली स्वत:वरही लक्ष देतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते.