तू बदलली आहेस

कथा * सुमन बेहरे

‘‘अहो, चला ना, आपण कुठंतरी बाहेर आठदहा दिवस फिरून येऊयात. राघवही त्याच्या मित्रांसोबत सिंगापूरला ट्रिपवर गेलाय. आपण किती दिवसात कुठंच गेलो नाही.’’ सुनयनानं नवऱ्याला, जयला खूपच गळ घातली.

‘‘मला कुठंही जायचं नाहीए. माझा अगदी संताप होतो कुठंही जायचं नाव काढलं म्हणजे, काय मिळतं बाहेर जाऊन? यायचं तर पुन्हा घरीच ना? मग जायचं कशाला? ट्रेनचा प्रवास करा, थका, हॉटेलात राहा अन मूर्खासारखे इथे तिथे फिरा. विनाकारण इतकाले पैसे खर्च करायचे अन् प्रवास करून आल्यावर दमलो म्हणून पुन्हा घरी आल्यावर दोन दिवस विश्रांती घ्यायची. सगळी दिनचर्या विस्कळीत होते. मला कळतच नाही, तुला सतत ‘फिरायला जायचं’ एवढंच का सुचतं? मला नाही आवडत कुठं जायला हे ठाऊक असूनही आपलं, फिरायला जाऊचं तुणतुणं’’ जय संतापून ओरडला.

‘‘तुम्हाला नाही आवडत हे मला ठाऊक आहे, पण कधीतरी दुसऱ्याला आवडतं म्हणूनही काही करावं ना? बावीस वर्षं झाली लग्नाला, तुम्ही कधीतरी कुठं घेऊन गेलात का? राघवही बिचारा किती वाट बघायचा. बरं झालं तो तुमच्यासारखा संतापी अन् खडूस नाहीए ते! त्याला आवडतं प्रवास करायला. प्रत्येक मुलीला इच्छा असते लग्नानंतर नवऱ्याबरोबर प्रवासाला जावं. रोजच्या रूटीन आयुष्यातून वेळ काढून थोडं वेगळं आयुष्य जगावं. त्यामुळे पुन्हा कामं करायला, आपलं आयुष्य जगायला नवा उत्साह मिळतो. नव्या जागी, नवे लोक भेटतात, नवं काही खायला, बघायला, ऐकायला मिळतं. लोक काय वेडे आहेत का? उगीच ते   प्रवासाला जातात? तुम्हीच आहात जगावेगळे आणि अत्यंत चिक्कू, कंजूष. पैसा खर्च करायचा म्हटला की पोटात गोळा येतो तुमच्या. कधी तरी बायकोच्या, मुलाच्या भावनांना किंमत द्या, समजून घ्या. छोट्या छोट्या आनंदालाही का मुकायला लावता आम्हाला?’’ सुनयनाच्या मनातला सगळा संताप, सगळी खदखद आता बाहेर पडली.

‘‘उगीच मूर्खासारखी बडबडू नकोस अन् राघवचं काय सांगतेस? अजून लग्न नाही झालंय त्याचं. संसारासाठी पैसा खर्चावा लागेल, तेव्हा हे प्रवासाचं भूत पार उतरेल. सध्या तरी बापाच्या जिवावर चंगळ चाललीये त्याची.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नका, तुम्ही थोडीच दिलेत त्याला पैसे. त्याच्या ट्रिपचा सगळा पैसा मी दिलाय.’’ सुनयना संतापून म्हणाली.

‘‘मग त्यात काय मोठेपणा? उपकार केलेस का माझायावर? कमवते आहेस म्हटल्यावर खर्चही करायलाच हवा. सगळा पैसा काय तू स्वत:वरच खर्च करणार का?’’

दोघांमधला वाद वाढतच चालला. ही काही आजची नवी बाब नव्हती. नेहमीच त्यांच्यात खूप वाद व्हायचे. थोडेफार मतभेद असू शकतात. पण जयचा स्वभावच फार विचित्र होता. तो स्वत: कधीच खळखळून हसतही नसे. इतरांना आनंदात बघायलाही त्याला आवडत नसे. सुनयनाच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढणं, तिच्या कुठल्याही म्हणण्याला नकार देणं यात त्याला विकृत आनंद मिळायचा.

‘‘मी ही ठरवलंय…कुठं तरी फिरून येईनच!’’ सुनयनानं जयला जणू आव्हानच दिलं. तिला माहीत होतं की हल्ली बऱ्याच टूरिस्ट कंपन्या लेडिज स्पेशल, ओन्ली लेडीज अशा ट्रिपा काढतात. सगळी व्यवस्था अगदी उत्तम असते. स्त्रिया अगदी सुरक्षित व बिनधास्त प्रवास करू शकतात.

तिनं गूगलवर अशा प्रवासी कंपन्यांची माहिती काढली. एका कंपनीचं नाव वाचून क्लिक केलं, तेव्हा व्यवस्थापक स्त्रीचं नाव ओळखीचं वाटलं. तिचं प्रोफाइल बघताच सुनयनाचे डोळे आनंदानं चमकले. मानसी तिची कॉलेजातली मैत्रीण होती. लग्नानंतर सुनयनाचा तिच्याशी संपर्क नव्हता. जयला सुनयनाचे माहेरचे, इतर नातलग किंवा मित्रमैत्रीणी कुणाशीच संबंध नको होते. त्यामुळे सुनयनानं सर्वांशी फारकत घेतली होती.

तिनं मानसीचा फोन नंबर मिळवला अन् फोन केला. मानसीला खूप आनंद द्ब्राला. ‘‘सुनयना, अगं किती दिवसात तुझा आवाज ऐकतेय…कुठं आहेस? काय करते आहेस?’’

दोघींच्या गप्पा इतक्या रंगल्या की सांगता येत नाही. गप्पांमधूनच सुनयनाला कळलं की त्यांच्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या अजून दोघीजणीही त्या लेडीज स्पेशल टूरवर जाताहेत.

‘‘आता पुढली ट्रिप कधी आहे तुझी? अन् कुठं जाणार आहात? मलाही यायचंय.’’

‘‘अगं तर मग आताच चल ना? चार दिवसांनी आमची लद्दाखची टूर आहे. दहा दिवसांची टूर आहे. सगळी तयारी झालीय. तुला ही घेते मी त्यात. खूप मज्जा येईल. येच तू. खूप जुन्या आठवणी आहेत. त्यांची उजळणी करू. हो, अन् तुला स्पेशल डिस्काउंटही देईन.’’

‘‘मी नक्की येते. फक्त काय तयारी करावी लागेल तेवढं सांग. अशी संधी पुन्हा मिळणार नाही.’’

जयला जेव्हा तिनं हे सांगितलं, तेव्हा तो प्रचंड संतापला. ‘‘काय डोकंबिकं फिरलंय का तुझं? इतका पैसा विनाकारण खर्च कशाला करायचा? ज्यांच्याबरोबर तू जाते आहेस ना? त्या सगळ्या बायका फ्रस्टेटेड असतात. एकतर त्यांची लग्नं झालेली नसतात किंवा त्यांना नवऱ्यानं टाकलेलं तरी असतं. म्हणूनच असे ग्रुप करतात त्या. नाही तर नवऱ्यासोबत गेल्या नसत्या? कुणास ठाऊक प्रवासात या काय काय करतात? प्रवासाच्या नावावर कसले धिंगाणे घालतात? काही गरज नाहीए तू त्यांच्याबरोबर जाण्याची. अशा सिंगल बायकांच्या आयुष्यात पुरूष नसतात म्हणून त्या आपसातच संबंध ठेवत असतात. नाही पुरूष तर स्त्रीबरोबर संबंध…या सगळ्या बेकार बायका असतात. एक्सपेरिमेंट म्हणून काहीही करतात. स्वत:ला मारे इंटेलेक्चुअल म्हणवतात, समाज सेवेच्या मोठमोठ्या गोष्टी करतात, पण खरं तर सेक्सुअल प्लेजर हवा असतो त्यांना. तो मिळतच नाही म्हणून मग असले धंदे…तुला तर माझ्याकडून काही कमी पडत नाहीए ना?’’

‘‘शी:! किती घाणेरडा विचार करता हो तुम्ही? मला खरंच कीव येते तुमची. एकटी स्त्री काही करते ती फ्रस्टेट असते म्हणून करते हे कुणी सांगितलं तुम्हाला? फक्त आपला आनंद मिळवला तर त्याला इतकं विकृत रूप द्यायचं? आणि हे सेक्सुअल प्लेजरबद्दल कुठून कळलं तुम्हाला? उगीच काही तरी बोलायचं…मी जात नाही पण तुम्हाला मला फिरायला न्यावं लागेल, आहे कबूल?’’ जय सुनयनाच्या बोलण्यानं ओशाळला तर होता. न बोलता खोलीत निघून गेला.

मानसी आणि दोन जुन्या मैत्रिणी अचला, निर्मला यांना भेटून सुनयना खूपच आनंदली. किती छान वातावरण होतं. एकत्र भटकणं, हास्य विनोद, एकत्र चहा, जेवण खरोखरच तिला इतकं मोकळं मोकळं अन्  छान वाटत होतं. कुणाची काळजी नव्हती, घराची चिंता नव्हती…अगदी मुक्तपणे जगत होती ती. लदाखच्या त्या भूमीत तिला जणू स्वर्गसुखाचा साक्षात्कार झाला. आजही तिथं आधुनिकतेला वाव नाही. परंपरा जपल्या जातात. तिथली स्वच्छ हवा, निळंशार पाणी. हातात घेता येतील इतक्या उंचीवरचे ढग, सगळंच अद्भूत होतं. आजही तिथं बुद्धधर्माचा बराच प्रभाव आहे. तिथले लोक, त्यांचं आयुष्य, त्यांची संस्कृती हे सगळं खूप वेगळं आहे. अन् तरीही आपलं आहे. डोंगरात बसलेल्या छोट्या छोट्या वस्त्या, उंच स्तूप, मठ सगळंच कसं अद्भूत.

सुनयनाला वाटलं, गेल्या बावीस वर्षांत ती प्रथमच आपल्या मर्जीनुसार जगतेय. जयची कटकट नाही, त्याचे टोमणेही नाही, किती बरं वाटतंय. तिनं ठरवलं यपुढे मानसीबरोबरच इतरही अनेक प्रवास करायचे. तिची सगळी  मरगळ, सगळा थकवा पार नाहीसा झाला होता.

दहा दिवस कसे संपले कळलंच नाही. पूर्ण रिलॅक्स मूडमध्ये ती परतली. तेव्हा प्रवास संपवून राघवही परत आला होता. दोघंही उत्साहानं प्रवासातले आपापले अनुभव एकमेकांना सांगत होते, तेवढ्यात जय भडकून ओरडला, ‘‘असा काय मोठा दिग्विजय करून आला आहात? इतका आनंद कशासाठी? अन् तू गं सुनयना? इतकी फ्रेश अन् सुंदर दिसते आहेस, काय आहे विशेष? त्या  फ्रस्टेटेड बायकांची कंपनी खूपच आवडलेली दिसतेय. त्यांच्याचसारखी झालीस की काय तू?’’

कित्ती विकृत आहे हा माणूस? काहीच चांगलं मनात येत नाही का त्याच्या? जयच्या या घाणेरड्या अन् विकृत विचारसरणीला कंटाळलेली सुनयना आता तर त्याचा तिरस्कारच करू लागली. ती त्याला टाळायलाच बघायची. त्याच्या घाणेरड्या बोलण्यामुळे ती फार दुखावली जायची. आता तर त्यांच्या नात्यातला ताण खूपच वाढला होता. तो इतके घाणेरडे आरोप करायचा की तिच्या मनात त्याच्याविषयी चीड अन् चीडच उत्पन्न व्हायची. तो सेक्ससाठी जवळ आला तर ती त्याला झटकून टाकायची. मन असं दुखावलेलं असताना शरीर साथ देत नाही. तिला ते सांगता येत नव्हतं. समजून घेणं जयला येतंच नव्हतं.

सुनयनाच्या वागण्यानं तो अधिकच संतापत होता. एका रात्री तो तिच्यावर बळजबरी करणार तेवढ्यात तिनं त्याला धक्का देऊन दूर लोटलं. संतापलेला जय ओरडायला लागला, ‘‘मला कळंतय तुझं वागणं. त्या बायकांची कंपनी हवीय तुला…मग नवऱ्याची सोबत कशी आवडेल? तुला आता तिच चव चाखायची आहे…मानसीबरोबर मैत्री खूपच वाढली आहे तुझी.’’

‘‘काय बोलताय तुम्ही? काय ते स्पष्ट सांगा ना?’’ सुनयनानं म्हटलं.

‘‘स्पष्ट काय सांगायचं? स्वत:च समजून घे.’’

‘‘नाही जय, मला तुमच्याच तोंडून ऐकायचंय. प्रवासातून परत आल्यापासून बघतेय, सतत तुम्ही टोमणे मारताय, काहीही बोलताय…असं काय बदललंय माझ्यात? का असे वागता?’’ संतापानं लाललाल झाली होती सुनयना.

‘‘तू तर पूर्णपणे बदलली आहेस, मला तर वाटतंय की तू ‘लेस्बियन’ झाली आहेस. म्हणूनच तुला मी, माझा स्पर्शही नको वाटतो.’’

सुनयना अवाक् झाली. जयनं त्यांच्या नात्याच्या पावित्र्याच्याच चिंधड्या उडवल्या होत्या. अगदी निर्लज्जपणे तो आपल्या बायकोला लेस्बियन म्हणतोय? व्वा रे, पुरूष! धन्य तो पुरूष प्रधान समाज, जिथं महिला मैत्रिणींसोबत फिरल्या तर त्यांना लेस्बियन म्हणतात अन् पुरूषांबरोबर बाहेर गेल्या तर त्यांना चारित्र्यहीन ठरवलं जातं. हे असं का? तिचं डोकं भणभणायला लागलं.

हल्ली जय रोजच रात्री उशीरापर्यंत घराबाहेर असायचा. तिनं विचारलं तर म्हणायचा, ‘‘मी माझ्या मित्रांसोबत असतो. पण मी ‘गे’ नाही.’’ अधूनमधून कुणी तरी सांगायचं की त्याचे इतरत्र अनेक स्त्रियाशी संबंध आहेत. त्यांच्याबरोबर तो फिरतो, हॉटेलात अन् सिनेमालाही जातो…अन् इतरही सगळंच! सुनयनाला या गोष्टींवर विश्वास ठेवावा असं वाटत नव्हतं पण एकदा त्याच्या शर्टावर लिपस्टिकचे डाग बघितले अन् तिची खात्रीच पटली. खरं तर जयच्या मित्रांनी हे तिला सांगितलं होतं, पण तिनं त्याकडे दुर्लक्षच केलं होतं.

रात्री दारू पिऊनच जय घरी आला होता. दार उघडताच दारूचा भपकारा आला. सुनयनानं त्याला काही विचारण्यापूर्वीच तो ओरडू लागला, ‘‘माझ्यावर पाळत ठेवतेस? हेर लावलेत का माझ्या मागे? स्वत: तर लदाखला जाऊन मजा मारून आलीस अन् मलाच दोष देतेस? स्वत: बदलली आहेस, मला सेक्स सुख देत नाहीस तर मी ते दुसरीकडून मिळवेनच ना? माझे संबंध आहेत स्त्रियांशी…पुरूषांशी नाहीत, तू लेस्बियन झाली आहेस…पण मी ‘गे’ नाही…’’

‘‘जय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही माझा अपमान करता. जिव्हारी लागेल असं बोलता अन् माझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षाही करता? मी नाही त्यावेळी तुम्हाला साथ देऊ शकत. याचा अर्थ मी लेस्बियन आहे असा नाही होत.’’

जय तर एव्हाना अंथरूणात कोसळला होता. घोरायलाही लागला होता. सुनयनाला कळतच नव्हतं की तो तिला एकटीनं प्रवास करून आल्याची शिक्षा का देतोय की इतर स्त्रियांशी संबंध ठेवायचे म्हणून तिला त्यानं लेस्बियन ठरवली आहे.

इंद्रधनुष्याचा आठवा रंग

कथा * आशा शहाणे

वसुधा अजूनही दाराकडे बघत होती. नुकतीच त्या दारातून रावी आपल्या पतीसोबत बाहेर पडली होती. अंगावर प्रसन्न पिवळ्या रंगाची साडी, मॅचिंग ब्लाउज, हातात बांगड्या, कपाळावर छानशी टिकली, केसांचा सुरेखसा अंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कानांत कर्ण फुलं अगदी सोज्वळ सात्त्विक भारतीय सौंदर्याची मूर्ती दिसत होती. हातातल्या तान्हुल्यानं तिच्या मातृत्त्वाचं तेज अधिकच वाढवलं होतं.

वसुधाच्या नजरेपुढे काही वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमातल्यासारखा दिसू लागला. रावीचे आईबाबा तिला समुदेशनासाठी वसुधाकडे घेऊन आले होते.

वसुधा हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्याच्याच जोडीनं ती पेशंटना समुपदेशही देते. या दोन्ही कामांमुळे तिच्याकडे वेळ कमी असतो. पण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम ती अत्यंत निष्ठेनं करते. मानसिक दृष्टीनं खचलेल्या, निराशेनं ग्रासलेल्या पेशंटना त्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद देणं, त्यांचं आयुष्य मार्गी लावणं हेच तिच्या आयुष्याचं उद्दीष्ट होतं.

रावीला वसुधाच्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं होतं. तिनं पंख्याला ओढणी बांधून गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता. वेळेवर आईनं बघितलं, आरडाओरडा केला. रावीला गळफासातून सोडवून हॉस्पिटलमध्ये आणलं. योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळाले आणि रावी वाचली. डॉ. वसुधाला त्या क्षणीच लक्षात आलं, तिच्या शरीरापेक्षाही तिचं मन घायाळ झालेलं आहे. गरज मनावरच्या उपचारांची आहे.

वसुधानं खरं काय ते जाणून घेण्यासाठी रावीच्या आईशी, शांताशी संवाद साधला. आधी तर ती काही बोलायलाच तयार नव्हती. पण वसुधानं हळूहळू तिला विश्वासात घेतलं. रावीच्या उपचारांसाठी सगळी माहिती गरजेची आहे. ही सगळी माहिती अगदी गुप्त ठेवली जाते. असं सगळं पटवून दिलं, तेव्हा त्यांनी कसंबसं एकदाचं काय ते सांगितलं. ते ऐकून वसुधेच्या मनात निरागस रावीबद्दल ममता दाटून आली.

शांतानं सांगितलं, ‘‘रावीवर बलात्कार झाला आहे आणि तो ही तिच्या वडिलांच्या खास मित्राकडून. वडिलांचे मित्रच असल्यामुळे त्या घरी ती केव्हाही जात होती. त्यांची मुलगी रावीची मैत्रिणच होती. दोघी एकाच वर्गात होत्या. एक दिवस रावी एक प्रोजक्ट फाईल घ्यायला त्यांच्या घरी गेली. तेव्हा मैत्रीण व तिची आई बाहेर गेलेल्या होत्या. ‘तिची बॅग आत आहे, तू हवं तर त्यातून फाईल काढून घे’ तिचे बाबा म्हणाले. त्यानंतर रावी घरी आली. ती सरळ खोलीत जाऊन झोपली. रात्री तिला तापच भरला. असेल वायरल म्हणून आम्ही डॉक्टरांचं औषध दिलं. तार उतरल्यानंतरही रावी कॉलेजला जात नव्हती. आम्हाला वाटलं, अॅन्युअल गॅदरिंग, स्पोर्ट्स वगैरे चालू असेल म्हणून क्लासेस लागत नसतील. म्हणजे फारसं गंभीरपणे आम्ही ते घेतलंच नाही.

मग एक दिवस यांचे मित्र घरी आले. हॉलमध्ये वाचत बसलेली रावी घाबरून तिथून उठली आणि खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. एरवी काकांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन ती स्वत:च जायची. मला ते खूप खटकलं. मग मी हळूवारपणे रावीला विश्वासात घेतलं. तिनं रडत रडत त्या किळसवाण्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा माझा संताप संताप झाला. असं वाटलं, ताबडतोब पोलिसात तक्रार द्यावी. पण रावीचे बाबा म्हणाले, ‘‘संयम ठेवायला हवा, पोलिसांत तक्रार दिली तरी पुढले सोपस्कार अवघड असतात. कोर्टात केस गेली तर अजूनच अब्रूचे वाभाडे निघतील. कोर्ट पुरावा मागतं. आपला पुरावा कुठून देणार? वकील अत्यंच वाईट भाषेत प्रश्न विचारतात. आपली भाबडी पोर तिथं कशी टिकून राहील? तिला पुन्हा त्या सगळ्या घटनाक्रमातून गेल्यासारखं वाटेल. आता ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे, उद्या सर्वतोमुखी झाली तर पोर पार कोलमडेल. सगळं आयुष्य काढायचंय तिला…कुणी तिच्याकडे निर्दोष म्हणून बघणार नाही…आपण शांत रहायचं, रावीचं आयुष्य मार्गी लावायचं…तिला या धक्क्यातून सावरायला मदत करायची.’’

शांतानं हे सगळं सांगितलं तेव्हा संतापानं, भावना अनावर झाल्यानं ती थरथरत होती. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं म्हटलं, ‘‘लेकीची अवस्था बघून आतडं तुटायचं. वाटायचं त्या नराधमाला भर बाजारात फोडून काढावं. पण पुन्हा विचार यायचा तिचा आज तर उध्वस्त झालाच आहे, निदान उद्या तरी नीट सावरायला हवा. आम्ही तिला खूप समजावलं. ती कॉलेजात जाऊ लागली. भाऊ सतत तिच्यासोबत असायचे. मीही सतत तिच्याभोवती असायची. तिचं हसणंबोलणं बंद झालं होतं. पण असं वाटलं होतं ती हळूहळू सावरते आहे, आज मी थोडा वेळ शेजारी गेले होते तेवढ्यात तिनं हा आत्मघातकी प्रयत्न केला.’’ शांताला रडू अनावर झालं.

वसुधानं सर्व काही शांतपणे अन् मनापासून ऐकून घेतलं. तिनं शांताला सांगितलं, ‘‘रावीला माझ्या घरी घेऊन या. तिला समुपदशनाची गरज आहे. ती नक्की यातून बरी होईल. तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याबद्दल तुम्ही निश्चत असा..’’

पहिल्या भेटीत वसुधाशी रावी एक चकार शब्दही बोलली नाही. वसुधा बोलत होती अन् रावी खाली मान घालून नुसती बसून होती. दुसऱ्या मिटिंगमध्येही तसंच घडलं. तिसऱ्या भेटीत रावीनं फक्त नजर उचलून वसुधाकडे बघितलं. याप्रमाणे अजून एक दोन मिटिंग्ज झाल्या. वसुधा तिला परोपरीनं समजावत होती अन् रावी निर्विकार मुद्रेनं फक्त भिंतीकडे बघत बसायची.

एका मिटिंगमध्ये मात्र रावी कठोरपणे म्हणाली, ‘‘सगळं काही विसरून जगणं सुरू करा हे सांगणं खूप सोपं आहे. पण जे माझ्या बाबतीत घडलंय ते वाळूवर लिहिलेल्या अक्षरासारखं नाही. एक लाट आली अन् सगळं धुवून घेऊन गेली…मी काय भोगलयं हे तुम्ही समजू शकणार नाही अन् हे करणारा कुणी आपलाच असतो तेव्हा मनाला होणाऱ्या यातना कुणाला कशा कळणार?’’ बोलता बोलता ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली.

वसुधानं तिला जवळ घेतलं. काही वेळ ती रावीला थोपटत होती. रावीच्या मनातली खळबळ अश्रूंच्या रूपानं वाळळून जात होती. काही वेळानं वसुधानं तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेतला अन् ती कोमल शब्दात म्हणाली, ‘‘या यातना माझ्याखेरीज कोण जाणून घेईल…माझ्या पोरी, शांत हो…’’

रावीनं दचकून तिच्याकडे बघितलं…वसुधाच्या चेहऱ्यावरची वेदना अन् डोळ्यातले अश्रू बघून ती आपले हुंदके विसरली. वसुधानं तिला स्वत:च्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला…वीस वर्षांपूर्वीचा.

‘‘शाळेचं ते शेवटचं वर्ष होते. शाळेनं जंगी फेयरवेल पार्टी दिली होती. भाषणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, जेवण वगैरे आटोपेपर्यंत बराच अंधार पडला होता. मी अन् माझी मत्रिण रागिणी शाळेपासून थोडया अंतरावर उभ्या होतो. तिथं रिक्षा नेहमीच मिळायच्या. पण त्यादिवशी एकही रिक्षा नव्हती. आम्ही थोड्या घाबरलो होतो. काळजीत होतो. कारण रस्त्यावर दिवेही नव्हते. तेवढ्यात एक कार आमच्यापाशी येऊन थांबली. काही कळायच्या आत दोन धटिंगणांनी मला कारमध्ये ओढून घेतलं. अंधाराचा फायदा घेऊन रागिणी कशीबशी निसटली. तिनं माझ्या घरी जाऊन ही बातमी दिली. पोलिसांच्या मदतीनं घरचे लोक माझ्यापर्यंत पोचेतो त्या गुंडांनी माझ्या अब्रूची लक्तरं करून मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकलं होतं. कोण, कुठले काही कळायला मार्ग नव्हता.’’

मला घरी आणलं, तेव्हा मी अर्धमेल्या अवस्थेत होते. आईबाबा सुन्न झाले होते. डॉक्टरांनी मला औषध दिलं. सलाइन लावलं…शुद्धीवर आले अन् त्या प्रसंगाच्या आठवणीनं धाय मोकलून रडायला लागले. आई बाबा समजूत घालत होते. धीर देत होते. पण मला काहीच समजत नव्हतं. तो ओंगळ स्पर्श दूर व्हावा म्हणून घासून घासून अंघोळ करायचे. तरीही वाटायचं अनेक झारळं अंगावरून फिरताहेत…कशीबशी परीक्षेला बसले. मुळात हुशार होते. अभ्यास छानच झालेला होता म्हणून पेपर लिहिता आले…

तेवढ्यात माझ्या लक्षात आलं माझी मासिकपाळी चुकली आहे. आता जगण्यात काय अर्थ होता. मी जीव द्यायचा प्रयत्न केला पण आईनं मला वाचवलं. तिनं अन् बांबानी पुन्हा पुन्हा मला समजावलं. मी स्वत:ला हकनाक अपराधी मानते आहे. विनाकारण त्रास करून घेते आहे. अपराधी तर ते गुंड आहेत. लाज त्यांना वाटायला हवी.

आईनं ओळखीच्या लेडी डॉक्टरला सगळं सांगितलं. तिनं मला त्या संकटातून मोकळं केलं. तिनंही तेच सांगितलं, ‘‘मी स्वच्छ आहे. पवित्र आहे. ताठ मानेनं मी जगायचं आहे. त्याक्षणी मी ठरवलं…यापुढे आयुष्य माझ्यासारख्या मुलींसाठी वेचीन. निष्पाप, निरपराध मुलींना स्वाभिमानानं जगायला शिकवेल. तू जर पुन्हा ठामपणे उभी राहिलीस, तर मला आनंद होईल…’’ वसुधानं आपली कहाणी संपवली अन् एक दीर्घ श्वास घेतला.

‘‘पण…पण तुम्हाला समाजाची भीती नाही वाटली?’’ रावीनं विचारलं.

‘‘कुणाची भीती? कुठला समाज? आता मला कुणाचीच भीती वाटत नव्हती. जे घडायचं ते घडून गेलं होतं. आता फक्त मला मिळवायचं होतं.’’

‘‘मग काय झालं? म्हणजे…तुम्ही आजच्या या मुक्कामावर कशा पोहोचलात?’’ अजूनही रावीचा विश्वास बसत नव्हता वसुधाच्या बोलण्यावर.

‘‘तो प्रसंग आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी ते शहर सोडलं. पुढचं सगळं शिक्षण मी विद्यापीठाच्या वसतीगृहात राहून पूर्ण केलं. तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच ध्येय होतं मानस शास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवायची. माणसाच्या मनांत अगदी आतवर जाऊन शोध घ्यायचा. मनाच्या तळाशी जिथं माणूस आपले विकार, निराशा, विचार अन् अनेक रहस्य लपवून ठेवतो, तिथपर्यंत पोहोचायचं. माझ्या वीकनेसलाच मी माझी शक्ती बनवली. ती लढाई माझी एकटीची होती अन् मी जिंकले.’’

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग रावीच्या खांद्यावर हात ठेवून वसुधा म्हणाली, ‘‘हे बघ रावी, आपलं आयुष्य फार फार मौल्यवान आहे. ते भरभरून जगण्यासाठी मिळालं आहे. दुसऱ्या कुणाच्या पापाची शिक्षा स्वत:ला का म्हणून द्यायची? तुलाही आता तुझी लढाई एकट्यानंच लढायची आहे. धीर खचू द्यायचा नाही, निराश व्हायचं नाही. तुझं वयच असं कितीसं आहे गं? तू आपलं शिक्षण पूर्ण कर. छानसा जोडिदार शोधून लग्न कर. मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस.’’

रावीनं लगेच प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही लग्न का नाही केलंत?’’

एक नि:श्वास सोडत वसुधानं म्हटलं, ‘‘त्यावेळी मी एक चूक केली…माझ्याबरोबर शिकणाऱ्या डॉ. नमननं मला मागणी घातली होती. मलाही तो आवडत होता. पण आयुष्याच्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवून ठेवण्यापेक्षा त्याला सगळं स्वच्छ सांगावं असा विचार करून मी माझ्या आयुष्यातली ती घटना त्याला सांगितली. त्यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला नाही पण त्याची वागणूक बदलली. त्याच्या प्रेमात आता दयेची, उपकाराची झाक होती. ती मला सहन होईना. या मुक्कामावर पोहोचल्यानंतर मला कुणाचीची दया नको होती. मीच मग पाऊल मागे घेतलं. कारण पुढल्या आयुष्यात मला नमनच्या पुरूषी अंहकाराचा नक्कीच त्रास झाला असता. ते मला नको होतं.’’

‘‘मग तुम्ही मला लग्न करायला का सांगताय? ही परिस्थिती माझ्याही बाबतीत उद्भवू शकते ना?’’

‘‘तेच मी तुला सांगते आहे. जी चूक मी केली ती तू करू नकोस. स्वत:ला अनेक गर्लफ्रेंडस् असणाऱ्या पुरूषाला पत्नीचा बायफ्रेंड चालत नाही. बायको व्हर्जिनच हवी असते. हे कटूसत्य आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीए. तू सांगितलं नाहीस तर कुणालाही यातलं काहीही कळणार नाहीए…’’

‘‘पण…मग ही फसवणूक नाही का ठरणार?’’ रावी अजूनही गोंधळलेलीच होती.

‘‘फसवणूक तुझ्या बाबांची झालीय…त्यांच्या मित्रानं केलीय. फसवणूक त्या मित्राच्या कुटुंबीयांची झालीय. फसवणूक माणुसकीची अन् एका निरागस आयुष्याची झालीय. तू या एका गोष्टीचं काय घेऊन बसली आहेस? आता मुलींनी, स्त्रियांनी थोडं चतुर आणि स्वार्थी व्हायला हवंय. आयुष्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आता एक आणखी म्हणजे आठवा रंग जोडावा लागणार आहे. झगमगत्या आत्मविश्वासाचा, झळाळत्या मन:शक्तीचा, थोड्याशा बेदरकारपणाचा.’’ रावीच्या डोळ्यात रोखून बघत वसुधा अगदी शांत पण ठाम स्वरात बोलत होती.

ते शब्द रावीच्या मनांत खोलपर्यंत झिरपत होते. वसुधा पुन्हा म्हणाली, ‘‘असं बघ, तुझे ते तथाकथित अंकल तर आजही समाजात उजळ माथ्यानं वावरताहेत. खरं ना? मग तू का खाली मान घालून भीत भीत जगायचं? अगं शुद्ध सोन्यावर चिखल उडाला तरी सोनं ते सोनंच असतं. तू स्वत: शंभर नंबरी सोनं आहेस. फक्त त्यावरचा त्या घटनेचा डाग आत्मविश्वासाच्या फडक्यानं पुसून टाक. समाजात वावरताना बेदरकारपणे वावर.’’

रावी विचार करत होती. मग तिनं म्हटलं, ‘‘पण जर त्यांनी मला कधी ब्लॅकमेल केलं तर?’’

‘‘तसं होणार नाही. माझ्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला चांगलाच दमात घेतलाय. यापुढे तो या गावातही दिसणार नाही. स्वत:च्या बायको अन् मुलांसमोर आपलं पाप उघड व्हावं हे कुणाही पुरूषाला सहन होणार नाही. त्या बाबतीत तू नि:शंक राहा.’’

त्यानंतर एकदोन मिटिंग्ज अजून झाल्या. रावी आता पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरी जाणार होती. तिनं शिक्षण पूर्ण केलं. चांगली नोकरीही मिळाली. चांगलं स्थळ सांगून आलं. लग्नही झालं.

मधल्या काळात वसुधा रावीला भेटली नाही. पण ती शांताच्या सतत संपर्कात होती. वेळोवेळी मार्गदर्शन करत होती. रावीची प्रगती ऐकून तिला समाधान वाटत होतं. लग्न होऊन रावी सासरच्या गावी निघून गेली होती. ती आज आपल्या तान्हुल्याला घेऊन त्याच्या बारशाचं आमंत्रण द्यायला वसुधाकडे आली होती.

एक कळी कोमेजता कोमेजता पुन्हा उमलली होती. वसुधाला अगदी कृतकृत्य वाटत होतं. ती समाधानानं उठली. रावीच्या बाळासाठी अन् रावीसाठी काहीतरी आहेर करायचा होता. पर्स घेऊन घराबाहेर पडताना प्रसन्न हास्य तिच्या मुखावर होतं.

पुनर्विवाह

कथा * कुसुम आगरकर

पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं. सुमारे ३०-३५ वर्षांचा एक पुरूष सतत आतबाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. ५-६ वर्षांचा एक गोजिरवाणा मुलगाही दिसायचा.

त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरूण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतुहुल आणखी वाढलं.

शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच, ‘‘भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथं?’’

हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ‘‘ताई, गेली वीस वर्षं मी त्यांच्याकडे रतीब घालतोय. पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे.’’ बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, ‘‘कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये.’’

‘‘भाऊ शांत व्हा…मी सहजच बोलले…’’

पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली.

दूधवाल्यालाही कुठं तरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं. तो स्वत:ला सावरून बोलायला लागला, ‘‘काय सांगू ताई. लहानशी, भाहुलीसारखी होती सलोनी, तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार अन् सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं.

‘‘एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वत:ची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हांला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे अन् आम्हाला लग्न करायचं आहे.

‘‘आकाशसाहेब स्वत: दिसायला चांगले, उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा…अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, ‘‘आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का?’’

‘‘हे ऐकून आकाशसाहेब उदास मनाने मग बोलले की त्यांचे आईवडिल कार अपघातात दोन वर्षांपूर्वी वारले. काका, काकू, मामामामी, मावशी आत्या वगैरे सर्व नातलग आहेत. त्यांना हे लग्न पसंत आहे.’’

‘‘आमच्याकडून लग्नाला होकार आहेच पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथं वरचेवर यावं. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही. शिवाय तुमच्या रूपानं आम्हाला मुलगा मिळेल.’’

आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती. थाटामाटात लग्न झालं. वर्ष दीड वर्षात बाळही झालं.

‘‘मग हे तर सर्व फारच छान आहे…तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय?’’ पूजानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘सांगतो ना,’’ दूधवाल्यानं म्हटलं. एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाशसाहेब, सलोनी अन् शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले. सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटलं, ‘‘कशी आहेस सलोबेबी? किती दिवसांनी दिसते आहेस? येत जा गं लवकर…आम्हालाही फार आठवण येते तुझी.’’ पण मला नवल वाटलं, काका,काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमानं आदरानं बोलणारी माझी सलोबेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली. मला वाटलं, लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, दुरावतात, कधीकधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो. मी मुकाट्यानं तिथून निघालो. पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजारानं थकलेला, उदास चेहरा मला दाखवायचा नव्हता. एरवी सतत आनंदी असणारी, उत्सहानं सळसळणारी…तिला ब्लड कॅन्सर झाला होता.

यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती. तिचा ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजमध्ये होता. औषधा पाणी, प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती पण गुण येत नव्हता.

सगळ्यात नामवंत हुषार डॉक्टरांनाही दाखवलं. सलोबेबीची तब्येत दिवसेदिवस खालावते आहे. वारंवार किमो थेरेपीमुळे लांबसडक केस गळून टक्कल पडलंय, म्हणूनच तिला सतत स्कार्फ बांधावा लागतो. कितीवेळा रक्त बदललं…कुठं काही कमी नाहीए उपचारांत. आकाशासाहेब तर सर्व कामं सोडून तिच्या उशाशी बसून राहतात. खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर.

दूधवाला निघून गेला. सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली. ‘‘या दुखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे. सलोनीची इतकी सेवा करतोय. लग्न संसार पूर्णपणे भिनलेत त्याच्या वृत्तीत. नाही तर हल्लीची ही तरूण मुलं, लिव्ह इन रिलेशनशिप काय अन् सतत भांडणं, सेपरेशन आणि घटस्फोट काय…’’

एकदम तिच्याच लक्षात आलं, ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा. आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं. ती स्वयंपाकघराकडे वळली. तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं.

आज तिथं बरीच गडबड सुरू होती. घरात माणसांची संख्याही वाढली होती. काही तरी बोलणं वगैरे सुरू होतं. तेवढ्यात एम्बुलन्सचाही आवाज आला…पूजा एकदम स्तब्ध झाली…सलोनीला काही…?

पूजाची शंका खरी ठरली. सालोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं. त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा अन् विवेक दुसऱ्यादिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले…आकाशची तडफड बघवत नव्हती. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली.

त्यानंतर सुमारे दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. आकाशची तडफड आठवायची. ‘‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे पटायचं अन् कर्तव्यदक्ष, प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं.

त्यादिवशी दुपारी दोनचा सुमार असेल. सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार, तेवढ्यात दाराची घंटी वाजली. दारात एक स्त्री उभी होती. तिला हल्लीच समोरच्या घरात पूजानं बघितलं होतं.

‘‘आमंत्रण द्यायला आलेय. मोठ्या मालकीणबाईंनं पाठवलंय मला.’’

‘‘काय आहे?’’

‘‘उद्या लग्न आहे. नक्की या.’’

पूजा काही बोलेल, विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली. बहुधा ती फार घाईत असावी.

ती निघून गेली…जाता जाता पूजाची झोप उडवून गेली. पूजा विचार करत होती. कुणाचं लग्न असावं? कारण लग्नाच्या वयाचा कुणीच तरूण किंवा तरूणी त्या घरात नव्हते.

सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली. तिला वाटत होतं की तिच्याप्रमाणेच विवेकही चकित होईल, विचार करेल, कुणाचं लग्न? पण तसं काहीच झालं नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता. सहज म्हणाला, ‘‘शेजारी आहेत आपले. जायला हवं.’’

‘‘पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कुणाचं आहे ते? कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत?’’ पूजानं जरा नाराजीनंच विचारलं. तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

‘‘अगं, लग्न आकाशचंच आहे, शौर्यचं तर लग्न करता येणार नाही ना? किती लहान आहे तो? सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं. कारण आकाशला याच महिन्यांत ऑफिसच्या कामानं परदेशी जायचं आहे. गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता. सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्याचं लग्न होतंय.’’

हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला. ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं. तो आकाश बायकोच्या मृत्युला दोन महिने होताहेत तोवरच पुन्हा बोहल्यावर चढतोय? मग ते प्रेम, ती सेवा, ती तडफड सगळा देखावाच होता का?

नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का? बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून?…मला काही झालं तर विवेकही असंच करेल का? पूजा या विचारांनी इतकी दु:खी झाली, भांबावली की पटकन सोफ्यावर बसली. दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं. सगळं घर फिरतंय असं तिला वाटलं.

विवेकनं तिला आधार दिला. ‘‘काय झालं पूजा? काय होतंय?’’ त्यांने तिला प्रेमळ शब्दात विचारलं.

पूजानं उत्तर दिलं नाही…‘‘तुला धक्का बसलाय का? शांत हो बरं! अगं, तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार?’’ त्यांनी तिला जवळ घेत, समजूत घालत म्हटलं.

एरवी विवेकच्या या शब्दांनी सुखावणारी पूजा एकदम तडकून ओरडली, ‘‘तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या. सगळे पुरूष मेले असेच दुटप्पी अन् स्वार्थी असतात.’’

तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमानं विवेकनं म्हटलं, ‘‘तू उगीच डोक्यात राख घालून स्वत:चं बी.पी. वाढवू नकोस. आकाशला सलोनीच्या आईवडिलांनीच आग्रह केला आहे, कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना? त्याचं एकटेपणाचं दु:ख बघवत नाहीए त्यांना. शिवाय लहानग्या शौर्यलाही आईची माया हवीय ना? त्यांनीच समजावून सांगितलं की तू लग्न कर. तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुतणीशी त्याचं लग्न जुळवलं आहे.’’

एव्हाना पूजा थोडी सावरली होती. विवेकनं तिला पाणी प्यायला दिलं. पुन्हा त्याच स्निग्ध, शांत आवाजात तो बोलू लागला, ‘‘पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते. वास्तवाला सामोरं जावं लागतं. दु:ख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला ‘जीवन ऐसे नाव.’’’

‘‘पण त्याचं सलोनीवर…’’

‘‘प्रेम होतंच. अजूनही आहेच. ते कायमच असेल. दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीए. पण सलोनी आता परत येणार नाही, पण या पत्नीत तो आता सलोनीला बघेल. ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे.’’

‘‘हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरूष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे. संसार रथासाठी दोन्ही चाकं लागतात. आकाशच्या संसाराचा रथ जेवढ्या लवकर मार्गावर येईल तेवढं चांगलं ना?’’

आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटली. विवेकनं किती  शांतपणे अन् डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न करतोय यात अयोग्य, अनुचित काय आहे? त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कुणी दिला?

पूजानं विवेकचा चहा आटोपला…रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती म्हणाली, ‘‘उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात. म्हणजे सकाळी घाई होणार नाही. लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं ना?’’

विवेकनं हसून मान डोलावली.

अपूर्ण

कथा * अर्चना पाटील

धारीणी आज प्रथमच नोकरीसाठी बाहेर पडली होती. रूद्र गेल्यापासून ती खूपच एकटी पडली होती. समीराची जबाबदारी पार पाडताना तिची दमछाक होत होती. समीराच्या आयुष्यातील वडील म्हणून रूद्रची रिकामी झालेली जागा धारीणीलाच भरून काढावी लागत होती. नोकरीमुळे तर धारीणीचे प्रश्न अजुनच वाढले. पण घरात बसुन किती दिवस निघतील? त्यामुळे धारीणीसाठी नोकरी ही गरज बनली होती. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून तिला जॉब मिळाला. पण रोजच रेल्वेने अपडाऊन हा सर्वात मोठा प्रश्न होता तिच्यासाठी, कारण सवय नव्हती त्या गोष्टींची. पहिल्या दिवशी धारीणी तिचा भाऊ सारंगसोबत आली. सारंगने त्याच्या मित्रांशी तिची ओळख करून दिली.

‘‘ताई, हे सर्वजण तुला मदत करतील. कोणालाही हाक मार.’’

‘‘नक्कीच, टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्ही.’’ घोळक्यातून एक आश्वासक आवाज आला.

‘‘ताई, हा मंदार शेटे. हा आणि तू सोबतच उतरणार आहात. संध्याकाळीही हा तिकडून तुझ्यासोबत असेल. तर मग मी निघू आता.’’

‘‘हो, निघ,’’ धारीणी नाराज होऊनच म्हणाली.

दोनच मिनिटात ट्रेन आली. धारीणी लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती. सारंगचे सर्व मित्रही त्याच डब्यात चढले.

‘‘अहो, हा लेडीज डबा आहे ना. मग तुम्ही सगळे याच डब्यात कसे?’’

‘‘अहो मॅडम, आम्ही रोज इथेच असतो. आपल्या गावाकडच्या ट्रेनमध्ये सगळं चालतं. ही काय मुंबई थोडीच आहे.’’ मंदारच परत बोलला.

धारीणी आता गप्पच बसली. मनातल्या मनात तिचा दिवस चांगला जावा असा विचार करू लागली. सावरगाव येताच धारीणी आणि मंदार ट्रेनमधून उतरले.

‘‘चला मॅडम, मी सोडतो तुम्हाला हॉटेलला.’’

‘‘नाही, नको उगाच तुम्हाला कशाला त्रास…’’

‘‘अहो, त्यात कसला त्रास. तुम्ही सारंगच्या बहीण…. सारंग माझा चांगला मित्र…सोडतो मी तुम्हाला…’’

धारीणीचाही पहिलाच दिवस होता. तीसुद्धा घाबरलेली होती. मंदारमुळे थोडसं हलकं वाटत होतं…म्हणून तीसुद्धा मंदारच्या गाडीवर बसून गेली. दिवस चांगलाच गेला. संध्याकाळी रेल्वेत पुन्हा ती मंदारला भेटली.

‘‘काय मग, कसा गेला आजचा दिवस धारीणी….सॉरी हं, मी जरा पटकनच एकेरीवर आलो.’’

‘‘नाही, नाही. इट्स ओके. तुम्ही बोला. काहीही बोला. बिनधास्त बोला. मला राग येणार नाही.’’

दोघेही घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी परत तोच किस्सा. हळूहळू मंदार आणि धारीणी चांगले मित्र बनले. सकाळ संध्याकाळ मंदार आणि धारीणी रेल्वेत भेटत होते. अधून मधून मंदार धारीणीला हॉटेलमध्ये सोडतही असे. कधीतरी घ्यायलाही येत असे. रात्री अपरात्री व्हॉट्सअॅप चँटींगही होत असे. धारीणी तिचे सगळेच प्रश्न मंदारशी शेअर करत असे.

‘‘जाउ दे गं, काही होत नाही…’’ या शब्दात मंदार धारीणीला समजावून सांगत असे.

धारीणीसाठी मंदार म्हणजे तिचं स्ट्रेस रीलीफ औषध होतं. समीरा, आईबाबा, सारंग हे सर्वजण रूद्रची कमतरता भरून काढू शकत नव्हते, पण मंदार रूद्रसारखा मानसिक आधार देत होता. मंदारमुळे धारीणी पुन्हा नटायला शिकली, हसायला शिकली. चांगले कपडे घालून मिरवायला शिकली. तिच्यासाठी तो नक्कीच तिचा एक चांगला मित्र होता. बाईकवर ती कधीतरी पटकन त्याच्या खांद्यावरही हात ठेवत असे. बोलताना पट्कन त्याच्या पाठीवर एखादी चापटही मारत असे. पण या हालचाली तिच्याकडून केवळ एक चांगला मित्र म्हणूनच होत असत. एके दिवशी सकाळी नऊला सावरगावला उतरताच दोघांनी चहा घेतला.

‘‘तू खुपच बोलतेस माझ्याशी, का गं?’’

‘‘तू आवडतोस खुप मला. तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं मला. तुझी पर्सनॅलिटीही खूप छान आहे. रेल्वेत बोलता येत नाहीत या गोष्टी सगळयांसमोर. आता आपण दोघंच आहोत म्हणून बोलते आहे.’’

‘‘ओ बापरे, काय खाऊन आलीस आज घरून?’’

‘‘काही नाही, खरं तेच सांगते आहे. तुझ्याशी जी मुलगी लग्न करेल ती खुपच लकी असेल.’’

‘‘हो का, इथून पुढे पस्तीस किलोमीटरवर लेण्या आहेत. येतेस का पहायला?’’

‘‘वेडा आहेस का तू, मी घरी काहीच सांगितले नाहीए. उशीर झाला तर आईबाबा चिंता करतील.’’

‘‘उशीर होणार नाही, ट्रेनने तू रात्री नऊला पोहोचतेस घरी. मीसुद्धा तुला शार्प नऊ वाजताच तुझ्या घरासमोर उभं करेन.’’

‘‘काहीही सांगतोस तू, आईबाबा काय म्हणतील?’’

‘‘तू माझ्यासोबत लेण्या पहायला येते आहेस हे सांगूच नकोस ना त्यांना. एक दिवस खोटं बोललीस तर काय फरक पडणार आहे तुला. सहा महिन्यात कधी काही मागितलं का मी तुझ्याजवळ? फिरून येऊ ना. तेवढाच तुलाही चेंज मिळेल. तुझ्याचसाठी सांगतो आहे. मी तर हजारवेळा जाऊन आलोय लेण्यांमध्ये.’’

‘‘नाही, मी जाते कामावर.’’

‘‘निघ, आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलत होतीस की म्हणे मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडतं. प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली तर घाबरते आहेस.’’

‘‘अरे, मला आवडतं. म्हणून काय मी तुझ्यासोबत गावभर कुठेही फिरायचं का?’’

‘‘बरं, इथे माझा आणि सारंगचा मित्र आहे. संध्याकाळी त्याच्या बाळाला पहायला येशील का?’’

‘‘ट्रेन निघून जाईल ना मग?’’

‘‘मी सोडेन तुला घरी, माझे आई. त्याचा विचार मी अगोदरच केलेला आहे.’’

‘‘ठीक आहे, जाऊ सोबत.’’

धारीणीने केवळ मंदार नाराज होऊ नये म्हणून होकार दिला.

‘‘जरा एक तास लवकर निघ आज, म्हणजे घरी जायला उशीर होणार नाही तुला,’’

‘‘हो रे बाबा, प्रयत्न करेन. मालकाने सोडायला हवं ना.’’

‘‘एक दिवसही माझ्यासाठी लवकर येऊ शकत नाहीस का तू?’’

‘‘संध्याकाळी येते ना मी तुझ्यासोबत. अजून काय पाहिजे. निघते मी. उशीर होतोय.’’

संध्याकाळी धारीणी तिच्या रोजच्याच वेळेल म्हणजे साडेपाचला हॉटेलबाहेर येऊन उभी राहिली. मंदार पाचपासुनच तिची वाट पाहत होता. धारीणी बाइकवर बसताच बाईक निघाली.

‘‘कुठे राहतो तुझा मित्र?’’

‘‘नेतो आहे ना मी तुला. कशाला हव्यात चौकश्या.’’

टुव्हीलर गावाच्या बाहेरच जात होती. धारीणीला समजत होते, पण मंदार बोलूही देत नव्हता. शेवटी गावाबाहेर एका घराजवळ गाडी थांबली. घराला कुलूप होते. आजुबाजुला शेत होते. त्याठिकाणी लोकांची वस्ती नव्हती आणि फारशी वर्दळही नव्हती.

‘‘या घराला कुलूप का आहे मंदार?’’

‘‘चावी माझ्याकडे आहे, चल आत जाऊ.’’

‘‘पण का? तू मला घरी सोड.’’

‘‘बावळट आहेस का तू? कधी नव्हे तो निवांत वेळ मिळाला आहे आपल्याला. अर्धा तास बसू आणि लगेच निघू.’’

‘‘मी नाही येणार आत.’’

‘‘हे बघ, तू फक्त डोळे बंद करून उभी रहा. मी फक्त एक मनसोक्त कीस करणार आहे आणि आपण लगेच निघू. तुझा माझ्यावर विश्वास नाही का?’’

‘‘हे बघ मंदार, तू मला मित्र म्हणून आवडतोस. पण या गोष्टींसाठी माझी लॉयल्टी रूद्रशी होती आणि मरेपर्यंत त्याच्याशीच राहील.’’

‘‘पण मलाही तू आवडतेस आणि मला जर तुला स्पर्श करावासा वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे.’’

‘‘कदाचित माझं चुकलं असेल. मी तुझ्यापासुन दूर रहायला हवं होतं.’’

‘‘अगं ऐक ना, अर्धाच तास आहे आपल्याकडे. कशाला वेळ वाया घालवते आहे? मी कोणती तुझ्याकडे एवढी धनदौलत मागतो आहे.’’

‘‘मला फसवलंस मंदार तू. पुरूषांना मोहाचा शाप असतो हेच खरं. मी माफी मागते तुझी. मी मर्यादेत राहिले असते तर तुझा गैरसमज झाला नसता आपल्या रीलेशनशीपबाबत. आता माझी ट्रेनही गेली असेल. सारंगची बहीण म्हणून तरी मला सुखरुप घरी सोड.‘‘

‘‘अगं ए बये, तू टेन्शन नको घेऊस. तु?झ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही.’’

मंदारने पटकन बाईकला किक मारली आणि साडेआठलाच गाडी धारीणीच्या घरासमोर आणून सोडली. बाईकचा वेग आणि मंदारचा राग हे दोन्ही सोबतीला होतेच, पण रस्त्यात दोघंही एकमेकांशी एक चकार शब्दही बोलले नाहीत. घर येताच धारीणी पटपट चालू लागली.

‘‘अहो मॅडम, तुम्हाला सुखरूप कोठेही हात न लावता तुमच्या घरी सोडलंय बरं का मी? तुम्ही जिंकलात, माझी एक इच्छा पुर्ण केली असती तर काय बिघडलं असतं तुमचं? मी काही झोपायला सांगत नव्हतो तुम्हाला माझ्यासोबत. मलाही माझ्या मर्यादा समजतात, मॅडम.’’

‘‘हे बघ मंदार,प्लीज तू या अॅटीट्युडने माझ्याशी बोलु नकोस. संस्कार नावाचीही काही गोष्ट असते की नाही? या गोष्टींसाठी माझं  मन कधीच तयार होणार नाही. तुझ्यामुळे मी रूद्र गेल्यानंतर पुन्हा जगायला शिकले, पण तुला जर माझा स्पर्शच हवा असेल तर मला कधीच भेटू नको.’’

‘‘एकीकडे म्हणतेस तू मला आवडतोस. अगं वेडे, स्पर्शातूनही प्रेमच व्यक्त होतं ना.‘‘

‘‘मंदार, एकमेकांबद्दल फील करणं वेगळं आणि स्पर्श करणं वेगळं. माझ्या शरीरावर रूद्र्चाच हक्क होता आणि राहणार. तू जे सांगतोस, ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही. माझी विचारसरणी अशीच आहे.’’

‘‘पुन्हा विचार कर माझ्या बोलण्यावर. मी वाट पाहेन तुझी.’’

‘‘मंदार, अरे यावर्षी तुझं लग्न होणार आहे. तुझ्या बायकोला कोणत्या तोंडाने   भेटणार आहे मी? तू माझा मित्र आहेस आणि कदाचित मित्रापेक्षाही जास्त आहेस. पण प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे असं नसतं मित्रा, त्यामुळे आजपासुन मी तुला कधीच त्रास देणार नाही. आपण यापुढे कधीच भेटायचं नाही. माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं म्हणून मला माफ कर.’’

उपाय आहेच

कथा * डॉ. नीरजा श्रीपाल

दीप्तीनं फोन उचलला अन् पलीकडून प्रसन्न, मनमोकळा, आनंदानं ओथंबलेला आवाज ऐकू आला. ‘‘हाय दीप्ती, माझी लाडकी मैत्रीण, सॉरी गं, दीड वर्षांनंतर तुला फोन करतेय.’’

‘‘शुची? कशी आहेस? इतके दिवस होतीस कुठं?’’ प्रश्न तर अनेक होते, पण दीप्तीला विचारण्याचा उत्साहच नव्हता.

शुचीच्या ते लक्षात आलं. तिनं विचारलं, ‘‘काय झालं? दीप्ती, इतकी थंड का? सॉरी म्हटलं ना मी? मान्य करते, चूक माझीच आहे, इतके दिवस तुला फोन करू शकले नाही पण काय सांगू तुला, अगं सगळाच गोंधळ होता. पण प्रत्येक क्षणी मी तुझी आठवण काढत होते. तुझ्यामुळेच मला माझा प्रियकर पती म्हणून मिळाला. तुझ्यामुळेच माझं मलयशी लग्न झालं. तू माझ्या आईबाबांना त्याचं नाव मलय म्हणून सांगितलंस. मोहसीन ही त्याची खरी ओळख लपवलीस. अगं, लग्नानंतर लगेचच मलयला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्या बरोबरच मीही गेले पण पासपोर्ट, व्हिझा, अमुक तमुक करत वेळेत विमान गाठण्यासाठी खूप पळापळ झाली. त्यातच माझा मोबाइल हरवला.

प्रत्यक्ष तुला येऊन भेटायला तेव्हा वेळच नव्हता गं! कालच आलेय इथं, आधी तुझा नंबर हुडकला. सॉरी गं! आता तरी क्षमा केली म्हण ना? आता आम्ही इथंच राहणार आहोत. कधीही येऊन उभी राहीन. बरं आता सांग घरी सगळे कसे आहेत? काका, काकू, नवलदादा अन् उज्ज्वल?’’ एका श्वासात शुची इतकं बोलली पण दीप्तीची काहीच प्रतिक्रिया नव्हती. ‘‘अगं, मीच मघापासून एकटी बडबडतेय, तू काहीच बोलत नाहीएस…बरी आहेस ना? घरी सगळी बरी आहेत ना?’’ शुचीच्या आवाजातला उत्साह ओसरून त्याची जागा आता काळजीनं घेतली होती.

‘‘खूप काही बदललंय शुची, खूपच बदललंय या दिड वर्षांत. बाबा वारले. आई अर्धांगवायुनं अंथरूणाला खिळली आहे. नवलदादाला दारूचं व्यसन लागलंय. सतत दारू पितो. त्यामुळे कंटाळून वहिनीही लहान बाळासकट माहेरी निघून गेली आहे….’’

‘‘आणि उज्ज्वल?’’

‘‘तोच एक बरा आहे. आठवीत आहे. पण पुढे किती अन् कसा शिकू शकेल कुणास ठाऊक?’’ बोलता बोलता दीप्तीला रडू कोसळलं.

‘‘अगं, अगं तू रडू नको दीप्ती…बी ब्रेव्ह. अगं कॉलेजमध्ये तू सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवायची, प्रत्येकाच्या समस्येवर तुझ्याकडे उत्तर असायचं. तुझ्या हुशारीमुळे तुला सगळे लेडी बिरबल म्हणत होते. आठवतंय ना? कम ऑन दीप्ती, मी पुढल्या आठवड्यात येतेय. आपण ही समस्या सोडवू. अजिबात काळजी करू नको.’’ फोन बंद झाला.

दीप्तीनं डोळे पुसले. तेवढ्यात डोअर बेल वाजली. तिनं दार उघडलं. रोजच्याप्रमाणे दारूचा भपकारा अन् सेंटचा एकत्रित वास आला. दारू प्यायलेल्या नवलला त्याचे चार मित्र उचलून घेऊन आले होते. प्यायले तर तेही होते, पण थोडेफार शुद्धीवर होते. नवल तर शुद्ध हरपून बसला होता. ते मित्र विचित्र नजरेनं दीप्तीकडे बघत होते. नवलला सांभाळण्यासाठी ती त्याच्याजवळ गेली, तेव्हा ते तिच्या अंगचटीला आले. कुणी हात कुरवाळला, कुणी गालावरून हात फिरवला, कसंबसं तिनं नवलला सोफ्यावर झोपवलं अन् त्यांना सगळ्यांना घराबाहेर काढून दार लावून घेतलं.

वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांचा सगळा बिझनेस, पैसा नवलच्या हातात आला. बँकेची नोकरी सोडून त्यानं बिझनेसमध्ये लक्ष घातलं. बिझनेस वाढत गेला, पैसा भरपूर मिळत होता. नवलला त्यातूनच दारू, महागड्या गाड्या, पैसे उडवणं अशा सवयी लागल्या. वडिलांच्या आकस्मिक मृत्युनं आई खचली होती. जणू बधीर झाली होती. नवलचं ठरलेलं लग्न आई जरा सावरली की करू म्हणून लांबवलं होतं. मुलीकडच्या लोकांना हा विलंब खटकत होता. शेवटी त्यांनी आईची समजूत काढली. नवलचं लग्न झाल्यावर तो उधळेपणा, दारू वगैरे थांबवेल. लग्न किती थांबवयाचं? ते लवकरात लवकर उरकून घ्यायला हवं, वगैरे वगैरे.

शेवटी एकदाचा लग्नाचा मुहूर्त निघाला. त्या दिवशी नवलनं खूप गोंधळ घातला. अवचित पाऊस आल्यामुळे मुलीवाल्यांची बरीच धांदल झाली. त्यांनी केलेली व्यवस्था पार कोलमडली. त्यांनी पुन्हा नव्यानं, घाईघाईनं व्यवस्था केली तेवढ्यात नवल व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन धुमाकुळ घातला. नवलनं तर कमालच केली. घाणेरड्या शिव्या देत तो ओरडू लागला. ‘‘दाखवतोच साल्यांना, लग्नाची अशी व्यवस्था ठेवतात…! माझ्या वडिलांनी वचन दिलं होतं म्हणून हे लग्न करतोय मी. नाही तर या लोकांचं स्टॅन्डर्ड आहे का आमच्या घरात मुलगी देण्याचं? हरामखोर लेकाचे…समजतात काय स्वत:ला?’’

जयंती म्हणजे नवलची आई एकीकडे मुलाला आवरत होती, दुसरीकडे व्याह्यांची क्षमा मागत होती. तिला मुलाच्या वागण्यानं खूपच त्रास होत होता.

वधुवेषातही लतिका तिच्यासमोर येऊन उभी राहिली. हात जोडून म्हणाली, ‘‘आई, हे काय करताय तुम्ही? तुमची चूक नसताना का क्षमा मागताय? मला वाटतं, नवलचं ‘स्टन्डर्ड’ जरा जास्त हाय झालंय. त्यामुळे मीच हे लग्न मोडते. लग्नाला नकार देते…’’

कशीबशी समजूत घालून एकदाचं लग्न लागलं. लतिका सून म्हणून घरात आली. पण नवलचं व्यसन सोडवणं तिला जमलं नाही. एक सुंदर मुलगीही झाली. पण नवलचं वागणं अधिकच बिघडत गेलं. शेवटी मुलीला घेऊन लतिका माहेरी निघून गेली. जयंतीला अर्धांगवायूचा झटका आला आणि लोळागोळा होऊन ती अंथरूणाला खिळली.

शुद्धीवर असायच्या तेव्हा नवलला आपली चूक कळायची. तो बहिणीची, धाकट्या भावाची, आईची क्षमा मागायचा. पण पुन्हा संध्यकाळ होता होता तो मित्रांच्या गराड्यात जायचा अन् पिऊनच घरी परतायचा.

‘‘नवल अरे थोरला भाऊ आहेस, लग्नाला आलेली तुझी धाकटी बहिण आहे घरात. शिकणारा धाकटा भाऊ आहे, त्यांची काळजी नाहीए का तुला? कसले घाणेरडे मित्र आहेत तुझे? का त्यांच्याशी मैत्री ठेवतोस? सोड त्यांना…स्वत:कडे बघ,’’ जयंती कशीबशी बोलायची.

‘‘आई, हजारदा सांगितलंय, माझ्या मित्रांना नावं ठेवू नकोस. बाबा गेल्यावर त्यांचा धंदा व्यवसाय सांभाळायला त्यांनीच मदत केलीय मला. मला कुठं काय धंद्यातलं कळत होतं. त्यांच्यामुळेच हा इतका पैसा घरात आलाय.’’

अशी तशी नाहीत ती मुलं. चांगल्या कुटुंबातली आहेत. थोडं फार पिणं तर चालतंच गं! ती कंट्रोलमध्ये असतात, मलाच जरा भान राहत नाही…पण आता नाही पिणार आणि ती मुलंही दीप्तीला धाकटी बहीणच मानतात. तू त्यांच्याविषयी वाटेल तसं बोलू नकोस.

दीप्ती सांगायचा प्रयत्न करायची की त्याचे मित्र तिचा कसा अपमान करतात, कसे तिच्या अंगटीरीला येतात, पण ते तिलाही बोलू द्यायचा नाही. उज्ज्वलला ओरडायचा. घरातला सगळा खर्च नवलच्याच हातात होता. त्याचा त्यामुळेच सगळ्यांवर वचक होता. दीप्ती बी.एड.चा अभ्यास करत होती. उज्ज्वल आठवीला होता.

दीप्तीला नवलचे मित्र आवडत नव्हते. कारण तिलाच त्यांचा सर्वात जास्त त्रास व्हायचा. पण नवलला ते कसं पटवून द्यावं ते तिला समजत नव्हतं. मनावरचा ताण असह्य झाला की ती बाथरूममध्ये जाऊन रडून घ्यायची. आजारी, असह्य आईसमोर मात्र ती शांत व हसतमुख राहण्याचा प्रयत्न करायची.

चार दिवसातच शुची घरी येऊन थडकली. तिला बघताच दीप्तीचा संयमाचा बांध फुटला. शुचीच्या गळ्यात पडून तिनं पोटभर रडून घेतलं. आपली व्यथाकथा तिला ऐकवली.

लाडक्या मैत्रिणीच्या दुर्दैवाची कहाणी ऐकून शुचीचे डोळेही पाणावले. तिनं प्रथम थोपटून दीप्तीला शांत केलं. मग ती म्हणाली, ‘‘मी आले आहे ना, आपण आता नवलला एकदम वठणीवर आणू. तू अजिबात काळजी करू नकोस. अगं प्रत्येक समस्येवर उपाय असतो, असं तूच आम्हाला सांगायचीस ना? आता मी सांगते तुला. नवलला ताळ्यावर आणायचाही उपाय आहे. तू आता मी सांगते तसं करायचं. धीर सोडायचा नाही.’’

दीप्ती आता खूपच सावरली. शुची मग आईला भेटली. त्यांनाही तिनं धीर दिला. जेवण झाल्यावर शुची म्हणाली, ‘‘तुला आठवतंय का? मी जेव्हा तुला सांगितलं होतं की मलयला मावा, गुटका खायची सवय आहे, तेव्हा तू एक उपाय सुचवला होतास…एकदा एका लग्नाला गेलो होतो आम्ही, तेव्हा तू सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या पॅन्टच्या खिशातली मावा गुटक्याची पाकिटांची माळ बदलून त्या जागी कंडोमची पाकिटं ठेवली. अगं कसले हसले आहेत सगळे अन् मलया मात्र खूपच ओशाळला. त्या दिवसापासून त्यानं खिशात गुटका ठेवणं बंद केलं. मग त्याला व्यसन मुक्ती केंद्रात नेऊ लागले. त्याचाही खूप फायदा झाला. मलय आता पूर्वीप्रमाणे गुटका किंवा इतर कुठल्याही व्यसनापासून मुक्त आहे. आपण नवलचंही व्यसन सोडवू शकतो.’’

मग शुचीनं आपण आणलेला हॅडी व्हिडिओ कॅमेरा तिला दाखवला. ‘‘ही माझी तुझ्यासाठी आणलेली अमेरिकेची भेट.’’ तिला म्हटलं.

‘‘बापरे! अगं, इतकी महागडी वस्तू कशासाठी आणलीस.’’

‘‘सगळं सांगते. आधी हा कसा वापरायचा ते समजून शिकून घे.’’

तेवढ्यात उज्ज्वल शाळेतून आला. ‘‘शुचीताई, कधी आलीस?’’ त्यानं आल्या आल्या तिला मिठी मारली.

‘‘अरे, उज्ज्वल किती उंच झालास रे?’’ शुचीनं कौतुकानं म्हटलं.

उज्ज्वलला तर तो कॅमेरा खूपच आवडला. ‘‘ताई, मी कपडे बदलून येतो, मग तू माझा ब्रेकडान्स शूट कर हं!’’ तो म्हणाला. शुचीनं हसून संमती दिली.

‘‘हे बघ दीप्ती आता आज आपण एक प्रयोग करू हं! रात्री नवल जेव्हा मित्रांबरोबर घरी येईल तेव्हा मी अन् उज्जू पडद्याआड लपून सर्व प्रसंगाचं चित्रण करू. त्यांना कुणालाही काही कळायचं नाही. सकाळी नवलला आपण टीव्ही कॅमेरा अॅटॅच करून ते सगळं शटिंग दाखवू. शुद्धीवर असताना त्याला आपल्या मित्राचं गलिच्छ वागणं लक्षात येईल मित्रांचा खरा चेहरा समोर आला की पुन्हा तो त्यांच्या नादाला लागणार नाही. तू आता अगदी शांत राहा.’’

शुचीमुळे आज दीप्तीला खूपच धीर वाटत होता. रात्रीचे दहा वाजले, शुची आणि उज्जू सीक्रेट एजंटप्रमाणे आपापल्या पोझिशन घेऊन पडद्याआड उभे होते.

शुचीच्या हातात कॅमेरा होता. दाराची बेल वाजली. दीप्तीनं दार उघडलं. शुचीनं कॅमेरा चालू केला.

‘‘घ्या…आपल्या बंधूराजांना सांभाळा. घरापर्यंत सुखरूप आणून सोडलंय.’’

‘‘आम्हालाही जरा आधार द्या ना हो,’’ एकजण बोलला.

‘‘आम्हाला घाबरतेस कशाला? तुझी ओढणी फक्त नीट करतोय…’’ दुसऱ्यानं तिची ओढणी ओढायचा प्रयत्न केला.

तिसरा तर नवलला आधार देण्याच्या निमित्तानं दीप्तीच्या कंबरेलाच विळखा घालू बघत होता.

‘‘जानेमन, तुझ्या गालाला काय लागलंय?’’ गालावरून हात फिरवून घेत अजून एकानं म्हटलं. रागानं त्याचा हात हिसडत दीप्तीनं नवलला सोफ्यावर झोपवलं. आपल्या बहिणीवर काय संकट आलंय याची त्याला जाणीवच नव्हती.

उज्ज्वलनं पाण्याचा ग्लास आणला. दीप्ती नवलला लिंबू पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होती.

‘‘थोडं लिंबू पाणी मलाही दे गं दीपू. तुला बघूनच मला दारू चढते.’’ तिला चिकटून बसत एकानं म्हटलं. दीप्ती त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करत होती.

‘‘भिऊ नकोस गं! मी काही खात नाहीए तुला.’’ असं म्हणत त्यानं दीप्तीच्या केसांमधून हात फिरवला.

‘‘दूर सरका…ताईपासून दूर राहा.’’ उज्ज्वल ओरडला. तसा एकानं त्याला धक्का दिला. उज्ज्वल कोलमडून पडला.

हे सगळं रेकॉर्ड करणाऱ्या शुचीच्या मनात आलं दीप्ती कसं हे सगळं सहन करत असेल. पोलीसाना बोलवावं का? नको, त्यामुळे नवलही तुरुंगात जाईल. तिनं ताबडतोब शूटिंग थांबवलं. कॅमेरा बाजूला ठेवला अन् ती एकदम पडद्याआडून बाहेर आली. संतापून ओरडली, ‘‘हे काय चालवलंय तुम्ही? लाज नाही वाटत? धाकट्या बहिणीशी असं वागताय? नवलचे मित्र आहात की कोण? त्याला शुद्ध नाहीए अन् दीप्ती असह्य आहे म्हणून जोर आलाय तुम्हाला? ताबडतोब चालते व्हा. मी पोलीसांना बोलावते. तिनं मोबाइलवर खरंच १०० नंबर फिरवला.’’

तिचं ते रणचंडीचं रूप, तो कर्कश्श आवाज, मोबाइलवर पोलिसांना बोलावणं यामुळे सगळी मंडळी पटपट घराबाहेर पडली.

उज्ज्वलनं दार बंद केलं. तिघांनी मिळून नवलला त्याच्या खोलीत अंथरूणावर नेऊन झोपवलं. आईला औषध देऊन, तिला काय हवं नको बघून शुची आणि दीप्तीही आतल्या खोलीत अंथरूणावर येऊन झोपल्या.

सकाळी आठ वाजता नवलला जाग आली. डोळे अजून जड होते. त्यानं केसांतून खसाखसा बोटं फिरवली. काल रात्री पुन्हा जरा जास्तच झाली वाटतं. थँक्स मित्रांनो, राजन, विक्की, राघव, सौरभ तुम्हा सर्वांना धन्यवाद. मला सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल. मित्रांना फोन करावा म्हणून त्यानं मोबाइल हातात घेतला, तेवढ्यात शुची खोलीत आली.

‘‘अरेच्चा? शुची कधी आलीस? अन् इतके दिवस आम्हाला सोडून कुठं गेली होतीस? मोहसीन काय भेटला, तू तर आम्हाला विसरलीस!’’ बोलताना जीभ जडच होती त्याची. पण बोलला.

‘‘हॅलो दादा, मी मोहसीन नाही. मलयबरोबर लग्न केलं अन् अमेरिकेत गेले होतो. पण तू तर इथं असून आपल्या माणसात नसतोस. तूच सर्वांना विसरलास…’’ शुची बोलली.

‘‘म्हणजे काय?’’

‘‘किती वाईट घडलंय इथं…सगळंच बदललं. काका गेले, काकी अंथरूणाला खिळल्या. वहिनी परीला घेऊन माहेरी गेली अन् तू…’’

‘‘हो गं! बदल होतो…तू थांब, मी आलोच ब्रश करून. बस ना, उभी का?’’

तो वॉशरूममध्ये होता तेवढ्या वेळात शुचीनं कालचा शूटिंग केलेला कॅमेरा टीव्हीला जोडून ठेवला दीप्तीही सर्वांसाठी चहा घेऊन त्याच खोलीत आली. नवल आल्यावर रिमोट त्याच्या हातात देत शुचीनं म्हटलं, ‘‘दादा, हा व्हिडिओ बघ जरा. या कॅमेऱ्यानं शूट केलाय. हा कॅमेरा मी दीप्तीला अमेरिकेतून आणलाय.’’

‘‘व्हेरी गुड,’’ चहाचा कप घेऊन नवल उशीला टेकून बसला. रिमोटनं त्यानं टीव्ही सुरू केला. नवल बघत होता. अरे, हा मी…माझे मित्र, आमची ड्राइंग रूम..माझ्या अंगावरचे तेच कपडे…म्हणजे कालच. ते सर्व बघता बघता संताप अन् लाजेनं तो लालेलाल झाला. हे माझे मित्र असे बोलतात, असे वागतात. माझी बहिण दीप्ती किती काळवंडली आहे लाजेनं…शी. हे कसले मित्र त्याला स्वत:चाच खूप राग आला होता. त्यानं दोन्ही हातांच्या ओजळीनं आपला चेहरा झाकून घेतला.

व्हिडिओ संपला होता. शुची समोर आली. ‘‘दादा, म्हणत तिनं त्याचे हात चेहऱ्यावरून बाजूला केले.’’

‘‘दादा, तू दीप्ती आणि काकीचं सांगणं ऐकून घेत नव्हतास, म्हणून मला हे करावं लागलं. आता तरी तुला तुझ्या मित्रांचं खरं स्वरूप समजलं ना? सॉरी दादा.’’

‘‘तू कशाला सॉरी म्हणते आहेस? चूक माझी आहे. तिही अशी घोडचूक. तू चांगलं केलंस, माझे डोळे उघडले. मी फार फार अन्याय केलाय आई, दीप्ती आणि उज्जवलवर. दारूच्या इतका आहारी गेलो की आपलं कोण परकं कोण तेही मला समजेना. माझ्या या व्यसनामुळेच लतिका मला सोडून गेली. माझी लहानशी परी मला दुरावली.’’ नवलला रडू आवरेना.

‘‘रोज सकाळी ठरवतो, दारू पिणार नाही अन् रोज सायंकाळी पुन्हा दारू पितो.’’ चेहरा झाकून घेऊन तो पुन्हा रडू लागला.

दोघींनी त्याला मुक्तपणे रडू दिलं. मग दीप्ती म्हणाली, ‘‘दादा तुझं व्यसन नक्की सुटेल…चलशील?’’

‘‘कुठं?’’

‘‘जिथं मी माझ्या नवऱ्याचं गुटक्याचं व्यसन सोडवलं, तिथंच. व्यसन मुक्ती केंद्रात. तिथला मुख्य. माणूस माझ्या ओळखीचा आहे, येशील ना?’’

नवलनं होकारार्थी मान हलवली, तशी दीप्तीनं दादाला मिठी मारली. दोघं बहीणभाऊ रडत होते. दोघांमधला दुरावा संपला होता.

शुची, दीप्ती, अमन आणि खुद्द नवलच्या प्रयत्नांनी नवल खरोखर बदलला. व्यसनमुक्त झाला. लतिकाही परीला घेऊन घरी आली. आईचीही प्रकृत्ती सुधारत होती.

शुचीनं दीप्तीला म्हटलं, ‘‘व्यसन मुक्ती केंद्राचा प्रमुख अमन तुझी नेहमी आठवण काढतो.’’

प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघत दीप्तीनं म्हटलं, ‘‘का बरं?’’

‘‘कारण तू त्याला आवडतेस. तुझ्या प्रेमात पडलाय.’’

दीप्ती लाजेनं लाल झाली. ‘‘अमन खूप चांगला मुलगा आहे. नवलदादालाही तो पसंत आहे. तू हो म्हण मग मी त्याला काकींना भेटायला घेऊन येते.’’

दीप्तीनं फक्त लाजून मान डोलावली. कारण अमन तिलाही आवडला होता. त्याचं काम, व्यसन मुक्ती केंद्रातल्या पेशंटशी त्याची वागणूक, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या दादाचं आयुष्य सुधारण्यासाठी त्याची झालेली मदत. खरं तर ती त्याच्या ऋणातच होती, त्यातून होऊन त्यानं तिला जीवनसाथी होणार का म्हणून विचारून तिचा सन्मानच केला होता.

दीप्तीनं शुचीला मिठी मारली, तिच्यामुळेच हे सगळं घडून आलं होतं ना?

मूठभर जमीन ओंजळभर आकाश

कथा * ऋतु गुप्ते

फरहा पाच वर्षांनंतर आपल्या गावी परतून आली होती. विमानातून उतरताना तिने एक दीर्घ श्वास घेतला. जणू गेल्या पाच वर्षांतलं सगळं आयुष्य ती एकाच श्वासात जगून घेणार होती. पाच वर्षांत विमानतळाचा पूर्णपणे कायाकल्प झाला होता. बाहेर येताच तिने टॅक्सी केली अन् ड्रायव्हरला घराचा पत्ता सांगितला. तिच्या वडिलांचं घर हिंदपीढी भागात होतं.

पाच वर्षांत शहरात बराच बदल झाला होता. ते बघून फरहाला बरं वाटलं. वाटेत मल्टिफ्लेक्स अन् मॉलही दिसले. रस्ते पूर्वीपेक्षा रुंद अन् स्वच्छ वाटत होते. जीन्स टीशर्ट, स्कर्ट अन् टॉप घातलेल्या मुली बघून तिला सुखद आश्चर्य वाटलं. किती बदललंय हे शहर?

तिचा मुलगा रेहान टॅक्सीत बसताच झोपी गेला होता. फरहाने पण पाय थोडे पसरून सीटवरच स्वत:ला थोडं आरामशीर केलं. ऑस्ट्रेलियातून विमानं बदलत दिल्ली अन् आता तिथून टॅक्सीने आपल्या घरी. एवढ्या लांबलचक विमानप्रवासाने अंग आंबून गेलं होतं. आठवड्यापूर्वीच तिचे अब्बू रिटायर झाले होते. आता परत मूळ शहरात येऊन त्यांना इथे सेटल व्हायचं होतं. त्याच्या मदतीसाठीच फरहा काही दिवस त्यांच्याजवळ राहाणार होती. नव्या ठिकाणी, मग ते आपलं मूळ गाव का असेना, स्थायी होताना अनेक गोष्टींना सामोरं जावंच लागतं.

अचानक टॅक्सीवाल्याने ब्रेक दाबला. दचकून फरहा भानावर आली. तिची टॅक्सी हिंदपीढी भागात प्रवेश करत होती. रस्ते अत्यंत दयनीय परिस्थितीत होते. टॅक्सी डोलबाईडोल करत होती. सहज तिने खिडकीची काच खाली केली अन् भस्सकन् घाणीचा झोत अंगावर आला. पटकन् तिने काच बंद केली. शहराची प्रगती अजून या भागात पोहोचलीच नव्हती. रस्ते अजूनच अरुंद अन् गलिच्छ वाटत होते. अधूनमधून तयार झालेली घरं कुत्र्याच्या छत्र्या उगाव्यात तशी दिसत होती. तिच्या अब्बांचं दोन मजली घर मात्र तसंच दिमाखात उभं होतं.

अम्मी अन् अब्बू घराच्या बाहेरच तिची वाट बघत उभे होते.

‘‘अगं, अजूनही तुझा फोन बंद आहे…राकेश कधीचा काळजी करतोए, तू पोहोचलीस की नाहीस म्हणून?’’ अब्बूंनी तिला म्हटलं. त्यांना त्यांच्या जावयाचा प्रचंड अभिमान होता.

फरहाला जाणवलं बंद दारंखिडक्यांच्या फटीतून किती तरी डोळे तिच्याकडे बघाताहेत.

फ्रेश होऊन आरामत बसत फरहाने चहाचा कप हातात घेतला अन् ती अब्बूचं घर, त्यांची आळी व इतर गोष्टींचं निरीक्षण करू लागली.

सलमा नावाची विशीतली एक मुलगी भराभर घरकाम आवरत होती.

‘‘अब्बू कसं वाटतंय आपल्या घरात आल्यावर? अम्मी मात्र मला खूपच थकल्यासारखं वाटतेय. मागच्या वर्षी आमच्याकडे सिडनीला आली होती तेव्हा छान दिसत होती.’’

एक दीर्घ श्वास घेऊन अब्बू विषण्णपणे म्हणाले, ‘‘इथलं काहीही बदललेलं नाही. फक्त प्रत्येक घरात मुलं खूप वाढलीत. गल्लीत टवाळ पोरं जास्त दिसतात, मुली अजूनही जुन्या विचारांच्या बेड्यांमध्ये जखडलेल्या आहेत. मात्र तुझ्या लग्नाची गोष्ट आता लोक विसरले आहेत.’’

फरहाने आतल्या खोलीत डोकावून बघितलं. तिची अम्मी अन् अम्मीचा नातू मजेत खेळत होते.

‘‘अब्बू, मला ना, फार भीती वाटत होती मोहल्ल्यातली, जवळपासची माणसं तुमच्याशी नीट वागतील ना? त्रास देऊन, अपमान करून छळणार तर नाहीत ना? त्या काळजीपोटीच मी आत्ता आलेय. आठ-दहा दिवसांत राकेशही येणार आहेत.’’

काही क्षण शांततेत गेले. मग ती अब्बूंजवळ येऊन बसली. ‘‘फूफी (आत्या) कशी आहे?’’

‘‘सोड गं, जे झालं ते झालं. तू आता विश्रांती घे. प्रवासाने दमली असशील.’’ अब्बू तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.

आतल्या खोलीत अम्मी रेहानला जवळ घेऊन पडली होती. तीही अम्मी शेजारी जाऊन आडवी झाली. दमली होती ती पण झोप लागेना. खोलीत चारी बाजूंनी जणू आठवणीचं पेव फुटलं होतं. चांगल्या आठवणी मनाला दिलासा देत होत्या, तर वाईट आठवणींनी मन रक्तबंबाळ होत होतं.

अब्बा सरकारी नोकरीत उच्च पदावर होते. काही वर्षांत त्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली व्हायची. फरहाला त्यामुळे लहान वयातच हॉस्टेलला राहावं लागलं. अब्बू तिच्या शिक्षणाच्या बाबतीत फार दक्ष होते. अम्मी मुळातच नाजूक प्रवृत्तीची होती. तिला फार श्रम झेपत नव्हते. पण अम्मी अब्बूंचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. अब्बा जेव्हा पाटण्याला होते तेव्हा फूफी त्यांच्याकडे राहायला आली होती. तो प्रशस्त बंगला, सुंदर बाग, दिमतीला असणारी खानसामा, माळी, धोबी व इतर गडी माणसं, सरकारी गाड्या, अब्बांचा आदरयुक्त दरारा हे सगळं बघून ती भारावली. तिनं अब्बांचा दुसरा निकाह करण्याचा घाट घातला. ‘‘तुला मुलगा नाही. ही आजारी बायको तुला मुलगा देऊ शकणार नाही. तू दुसरं लग्न कर.’’ तिने अम्मीच्या समोरच अब्बांना सांगितलं तिच्या नात्यातली कोणी नणंद होती. इतर नातलगही फूफीच्याच बाजूचे होते. फार हिमतीनं अब्बूंनी हा प्रसंग निभावून नेला होता. फरहा मोठी झाल्यानंतर केव्हा तरी अम्मीनं हे सगळं तिला सांगितलं होतं. शिकलेल्या अब्बांना जुन्या रूढी आवडत नव्हत्या.

त्यामुळेच फरहाच्या घरातलं वातावरण इतर नातलगांच्या घरापेक्षा वेगळं होतं. अब्बू प्रगतिशील विचारांचे होते. ती एकटीच मुलगी होती तरी त्यांनी तिला उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था केली होती. तिच्या चुलत, मामे, आते, मावस बहिणीची लग्नं खूपच लवकर झाली. तिच्यापेक्षा धाकट्या बहिणींची लग्न झाली तरी फरहा शिकत होती. ती इंजिनीअर झाल्यावर तिला अब्बूंनी मॅनेजमेंटच्या पदवीला घातलं होतं.

ती इंजिनीअरिंगच्या फायनलला असतानाच एकदा फूफी घरी आली होती. आल्या आल्या तिने अम्मीला फैलावर घेतलं. लेकीचं वय वाढतंय अन् अजून तुम्ही तिच्या लग्नाचं बघत नाहीए. ‘‘भाभीजान मी सांगते तुम्हाला, फरहाला इतकं वय वाढेतो कुवार ठेवलीत, आता तिला मुलगा मिळणारच नाही. आता ओळखीत, नात्यात कुणी मुलगा लग्नाचा उरला नाहीए. भाईजाननाही काही कळत नाही. मुलींना एवढं शिकवायची गरजच काय मी म्हणते? मुलींची लग्न करायला हवीत. माझाच मुलगा आहे लग्नाचा. तुम्ही बघितलात ना? कसा गोरापान आहे. दुबईत पैसा मिळवतोए. फरहानची अन् त्याची जोडी चांगली दिसेल.’’

अम्मी बिचारी नातलगांच्या गराड्यात तशीच भरडून निघायची अन् फूफीच्या ओरडण्यामुळे तिचं बी.पी. अजूनच वाढलं. पण अब्बूंनी हे सगळं ऐकलं आणि फूफीला चांगलंच झापलं.

‘‘रझिया, तू काय विवाह मंडळ चालवतेस की काय? आधी माझ्या लग्नासाठी. आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी सतत स्थळं आणतेस ती? अगं आपल्या लाडक्या पोरांची काळजी घेतली असतीस तर तुझ्या पोराला दुबईत पेट्रोलपंपावर नोकरी नसती करावी लागली. फरहाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तिचं लग्न होणार नाही.’’

बरेच दिवस मुक्काम?ठोकण्याच्या बेताने आलेली फूफी त्याच दिवशी गाशा गुंडाळून निघून गेली.

अशीच विचारात असताना फरहाला केव्हातरी झोप लागली. सकाळी जाग आली. सकाळी सलमाने विचारलं, ‘‘फरहा बाजी. झोप झाली का? चहा आणू?’’ सलमाने चहा आणला अन् तिच्याजवळच बसली. ती खूप लक्षपूर्वक फरहाकडे बघत होती.

‘‘बाजी, तुम्ही आता कुंकू लावता? रोजे ठेवता की नाही? तुमचं नावंही बदललंय का?’’ निरागसपणे सलमाने विचारलं.

‘‘नाही…काल मी काम करून जात होते ना तेव्हा आपल्या मोहोल्ल्यातली माणसं मला विचारत होती. तुम्ही काफिरशी लग्नं केलंत ना?’’

अब्बूने फूफीला परत पाठवलं तरी प्रश्न सुटला नव्हताच. रोजच तिचं शिक्षण आणि वाढतं वय यावर चर्चा व्हायच्या. अब्बूंनी तर हल्ली या घरी येणंही कमीच केलं होतं. भारतातल्या बेस्ट कॉलेजमध्ये ती मॅनेजमेण्टचा अभ्यास करत होती. मुळात या अभ्यासक्रमाला मुली कमीच होत्या. मुस्लिम मुलगी तर ती एकटीच होती. कॉलेजच्या सगळ्याच कार्यक्रमात ती भाग घ्यायची. बक्षिसं मिळवायची. अभ्यासातही ती चांगली असल्याने शिक्षकांचीही लाडकी होती. याच काळात राकेश भेटला. अनेक प्रोजक्ट दोघांनी मिळून पूर्ण केले. त्याची हुशारी, समजूतदारपणा अन् मदत करण्याची वृत्ती यामुळे फरहाला तो आवडू लागला.

इंटर्नशिपनंतर आठ दिवसांनी फरहा घरी आली होती. त्यावेळी अब्बूंचं पोस्टिंग दिल्लीला होतं. अब्बू अम्मी दोघंही आनंदात होती.

‘‘फरहा, आता काही दिवसांत तुझी इंटर्नशिप संपेल. माझे मित्र रहमान यांनी त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. आम्हाला तो मुलगा व सगळं कुटुंब पसंत आहे. अर्थात्च निर्णय तू घेणार आहेस.’’

त्या एका क्षणात जणू वादळ घोंघावलं. पण स्वत:ला कसंबसं सावरून ती म्हणाली, ‘‘तुमचा निर्णय मला मान्य असेल, अब्बू.’’

‘‘शाब्बास पोरी, माझी लाज राखली. लोक म्हणतात मुली आईबाबांचं ऐकत नाही, पण तू माझं ऐकशील याची मला खात्री होती. मी उद्याच रहमान अन् त्याच्या कुटुंबाला जेवायला बोलावलंय.’’

स्वप्न पडायला सुरुवात झाली नाही तोच झोप मोडली. फरहा रात्रभर रडत होती. तिला जाणवलं की ती अन् राकेश एकत्र येऊ शकणार नाही. दोन समांतर रेषा आहेत. त्या तशाच राहाणार. अब्बूंनी सगळ्या समाजाशी भांडून तिला एवढी शिकवली. आता जर तिने हिंदू मुलाशी लग्न केलं तर लोक कधीच मुलींना शिकू देणार नाहीत. तिला फक्त तिच्यापुरता विचार करून भागणार नाही. हे तिला राकेशला समजावून सांगावं लागेल.

दुसऱ्याच दिवशी रहमान आणि त्यांचे कुटुंबीय घरी आले. फक्त बघण्याचा औपचारिक कार्यक्रम होता तो. बाकी सर्व गोष्टी आधीच ठरवून झाल्या होत्या बहुतेक.

अब्बू अम्मीला सांगत होते. ‘‘समीना, आज मी फरहाच्या बाबतीतलं शेवटचं कर्तव्य पूर्ण केल्याचं समाधान अनुभवतो आहे. खूप आनंद झालाय मला. फरहाची इंटर्नशिप पूर्ण झाल्यावरच आपण तिचा निकाह लावू. त्याचवेळी सगळ्या नातेवाईक व परिचितांनाही सांगू. सध्या कुणाला काहीच सांगायला नकोय.’’

दोन दिवसांनी फरहा आपल्या कॉलेजात आली. तिला राकेशला भेटून खूप रडून घ्यायचं होतं. पण राकेश समोर आला तोच त्रस्त, उदास अन् खूप थकलेला असा दिसला. आपलं दु:ख विसरून फरहा त्याच्या दु:खाबद्दल विचारू लागली.

‘‘फरहा, मी घरी तुझ्याबद्दल बोललो. पण तुझं नाव ऐकताच माझ्या घरात वादळ उठलं. मुस्लिम मुलगी घरात सून म्हणून येणार ही कल्पनाच त्यांच्या पचनी पडत नाहीए. मी सगळ्यांशी खूप भांडून आलोय. फरहाशिवाय मी इतर कोणत्याच मुलीशी लग्न करणार नाही असं सांगून आलोय.’’ राकेशने आपल्या मनातला संताप व्यक्त केल्यावर फरहानेदेखील तिच्या मनातली खळबळ त्याला सांगितलं.

दिवस उलटत होते. राकेश व फरहाला नोकरी दिल्लीतच मिळाली. एक हिंदू मुलगा व एक मुस्लिम मुलगी यांचं लग्न होऊ शकत नाही हे दोघांनीही मान्य केलं होतं.

फरहाच्या निकाहची तारीख नक्की करून गुडगावहून दिल्लीला येत असताना फरहाच्या गाडीला समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. फरहा, अब्बा, अम्मी तिघेही जखमी झाले. बेशुद्ध पडण्यापूर्वी फरहाने राकेशला फोन केला.

अम्मी अब्बूच्या जखमा बेतात होत्या. पण फरहाच्या चेहऱ्यात काचा घुसल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती. नाकाचं अन् हनुवटीचं हाड मोडलं होतं. सुर्दैवाने डोळे शाबूत होते. पण सगळा चेहरा बँडेजने झाकला गेला होता.

अपघाताची बातमी कळताच रहमान अन् त्यांचा मुलगा व पत्नीही भेटायला आले. हात व पाय प्लास्टरमध्ये, चेहऱ्यावर भयानक दिसणारं बँडेज बघून रहमानच्या मुलाने डॉक्टरांना तिच्या समोरच विचारलं, ‘‘ही पूर्वीसारखी सुंदर दिसेल ना?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘हातपाय तर लवकरच पूर्वीसारखे होतील पण चेहऱ्याचं सांगता येतत नाही. प्लॅस्टिक सर्जरीचा पर्याय अर्थात्च आहे. पण त्याला वेळ लागेल.’’

तो दिवस की आजचा दिवस रहमानकडून कुणीही पुन्हा फिरकलंच नाही. फक्त निकाह होऊ शकत नाही एवढा निरोप फोनवर दिला.

ठरलेलं लग्न मोडलं याचा अम्मी अब्बूला खूपच धक्का बसला. त्यातल्या त्यात एवढंच समाधान होतं की लग्न ठरण्याची बातमी अजून कुणाला कळवली नव्हती. नाही तर लोकांना बोलायला आणखी एक विषय मिळाला असता. तरीही सध्या सगळ्यात महत्त्वाचं होतं फरहाचं पूर्णपणे बरं होणं. या सगळ्या कठीण परिस्थितीत राकेश मात्र पहाडासारखा त्यांच्या पाठीशी होता. हॉस्पिटलमध्ये तिघांना डबे नेऊन देणं, स्वत:चं ऑफिस, अम्मी अब्बूंना सतत धीर देणं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी चर्चा करणं, सगळ्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थितपणे पार पाडत होता. घरातलाच एक सदस्य झाला होता.

अम्मी अब्बू पूर्ण बरे झाले होते. खोलीत राकेश अन् फरहा दोघंच होती. सलमा रडत होती. राकेश तिला समजवत होते. ‘‘प्लीज फरहा रडू नकोस…उद्या तुझं बँडेज काढतील. तू धीराने या गोष्टीला सामोरी जा. मी आहे ना तुझ्याबरोबर, तुझ्यासाठी काय वाट्टेल ते करीन मी. ऑफिसातही सगळे तुझी वाट बघताहेत.’’

‘‘पण आता माझ्याशी लग्न कोण करणार? अम्मी अब्बूंना माझ्या लग्नाची काळजी लागलीए.’’ सलमा म्हणाली.

‘‘मी तर कधीचा वाट बघतोय तुझ्याकडून होकाराची. अगं माझ्या आईनेही संमती दिलीए, कुणीशीही कर पण लग्न कर. तुझं बँडेज एकदा निघू दे. मी आईला तुझ्या अम्मीला अब्बूंना भेटायला घेऊन येतो.’’

हळूहळू परिस्थिती निवळत गेली. मोडलेलं नाकाचं हाड व हनुवटीचं हाड शस्त्रक्रियेने पूर्ववत् जुळून आलं. खोल जखमांचे व्रणही हळूहळू जातील, असं डॉक्टर म्हणाले. पण मुख्य म्हणजे फरहा शारीरिक व मानसिकदृष्ट्या सावरली होती. राकेशच्या घरच्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं. निकाहची जी तारीख ठरवून फरहा गुडगावहून आली होती त्याच दिवशी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये नोंदणी पद्धतीने राकेश व फरहाचं लग्न झालं. सुरेख रिसेप्शन झालं. दोन्हीकडची फारच कमी माणसं आली पण मित्र, कलीज अशी खूप मंडळी अभिनंदनासाठी आली होती. लग्नांनतर काही दिवसातच राकेशला कंपनीने सिडनीला पाठवलं. फरहाही गेली. तिथे त्यांचं छान बस्तान झालं.

फरहाच्या लग्नानंतर अब्बू अम्मी एकदा आपल्या घरी गेले होते. त्यावेळी लोकांनी त्यांना खूपच टोचून बोलून घेतलं. मोहल्ल्यातल्या वयस्कर माणसांनी भरपूर दम दिला. रात्री तर घरावर दगडफेकही झाली. पोलीस बोलावून त्यांच्या संरक्षणात अम्मी अब्बू स्टेशनवर पोहोचले.

अब्बूंची फोनवर कुणाशी तरी बातचीत सुरू होती. त्यांनी फोन ठेवल्यावर फरहाने विचारलं, ‘‘अब्बू, कुणाशी बोलत होता?’’

‘‘अगं, तुझी फूफी होती. बिचारी मदत मागायला येते माझ्याकडे. मुलं तर नालायक निघाली. कुणी तुरुंगात तर कुणी बेपत्ता आहे. बिच्चारी! उपासमारीने मरायची पाळी आलीय तिच्यावर’’ अब्बा म्हणाले.

‘‘फरहा, त्या रात्री हिनेच हिच्या त्या दिवट्या मुलांकरवी अन् त्यांच्या भाडोत्री गुंडाकरवी आपल्या घरावर दगडफेक केली होती. तिच्या मुलाशी आम्ही तुझं लग्न करून दिलं नाही ना? त्या रागाने तिने सगळ्या गावातल्या लोकांनाही आमच्याविरूद्ध भडकवलं होतं. तू राकेशशी लग्न केलं. एका हिंदू मुलाशी लग्न केलं याचाही खूप अपप्रचार केला होता तिने.’’ अम्मा म्हणाली, मग तिने हसत म्हटलं, ‘‘बर का, ही सलमा यंदा दहावीची परीक्षा देतेय. तिची इच्छा आहे तुझ्यासारखी इंजिनीअर अन् एम.बी.ए करण्याची.’’

फरहाने सलमाकडे बघितलं. सलमा म्हणाली, ‘‘मीच फक्त नाही हं फरहाबाजी, आता तर या शहरातल्या सगळ्याच मुलींना तुमच्यासारखं व्हायचंय.’’

‘‘खरंच?’’

‘‘हो ना, पण सगळ्यांचे अब्बू तुमच्या अब्बूसारखे अन् अम्मी तुमच्या अम्मीसारख्या असायला हव्या ना? मला तर आहे आधार या अम्मी अब्बूंचा,’’ म्हणत सलमाने फरहाला मिठी मारली.

नास्तिक बायको

कथा * माधव गवाणकर

श्वेता सासरी गेल्यावर तिच्या मम्मी आणि पप्पांना घर खायला उठलं होतं. बडबडी, बोलकी, मनमोकळी अशी ती मुलगी. मम्मीला फक्त एकच गोष्ट खटकायची की श्वेता देवधर्म, कर्मकांड वगैरे मानत नव्हती. कर्मकांडाला तिचा नकार असायचा. ‘गोडधोड कधीही करावं, सण उत्सव कशाला हवा? दिवाळीचा फराळ तर आता वर्षभर मिळतो. आपली ऐपत आहे. मग काय प्रॉब्लेम आहे.’ अशी श्वेताची वेगळी विचारसरणी होती. तिला त्यात काही प्रॉब्लेम नसला तरी सासरच्या लोकांना तिचा प्रॉब्लेम होऊ लागला. श्वेताचा नवरा आकाश बराचसा सुपरस्टारसारखा दिसायचा. ‘सेम रोशन वाटतो गं’ अनेक बायका त्याच्याकडे वळून वळून बघत. श्वेताचा मैत्रिणी हेवा करत. जिमला जाणारा असा देखणा पती मिळाल्यामुळे श्वेताचं वैवाहिक जीवन छान बहरू लागलं होतं. प्रणयाला एक वेगळीच धुंदी चढायची, पण एके दिवशी आकाश तिला म्हणाला, ‘‘केवळ माझ्या आईबाबांसाठी तू रोज पूजा करत जा…प्लीज. प्रसाद म्हणून खोबरं वाटायला तुला काय प्रॉब्लेम आहे. फक्त आठवड्यातून एकदा उपवास कर. आईला समाधान मिळेल की सून सुधारली.’’

श्वेता थोडी रागावून म्हणाली, ‘‘सुधारली म्हणजे? नास्तिक बाई बिघडलेली, उनाड असते का? भक्ती ही सक्ती असता कामा नये. मला नाही पटत तर जबरी कशाला? मी कधीच माहेरी उपवास केलेले नाहीत. मला पित्ताचा त्रास आहे. तो वाढेल. शिवाय मी मुळात कमी जेवते. दोन फुलके आणि जरासा भात. मग उपवास कशाला?’’ श्वेता सत्यच बोलत होती. पण आकाश नाराज झाला. त्याने हळूहळू श्वेताशी अबोला धरला. लैंगिक असहकार करून पाहिला. श्वेताला मूड यायचा तेव्हा ‘आज दमलोय, नको’ म्हणत आकाश प्रणयाला नकार द्यायचा. असं वारंवार होऊ लागलं.

‘‘तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कसा काय संपला? व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ असं श्वेताने आकाशला एके दिवशी विचारलं. त्याचं उघडं, पीळदार शरीर रात्री बेडरूममध्ये पाहिल्यावर तिच्या मनात स्वाभाविकच शरीरसुखाची इच्छा प्रबळ झाली. आकाश स्पष्टपणे म्हणाला, ‘‘तू देव मानायला लाग. आईला खूश कर. नंतरच आपण आपल्या सुखाचं बघू…

‘‘माझा देवावर विश्वास नाही, हे लग्नाआधी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. गोरेगावच्या बागेत आपण फिरायला गेलो होतो. आठवतंय का तुला?’’

‘‘मला वाटलं तू बदलशील…’’

‘‘अशी कशी बदलेन? मी काही रागाने, भावनेच्या भरात नास्तिक झालेले नाही. अभ्यास आहे माझा…’’ हे बोलताना श्वेता वालावलकर सरांचं ‘श्रद्धा विसर्जन’ नावाचं पुस्तक चाळत होती.

हळूहळू श्वेताचे आणि सासूचे वादही वाढू लागले. खटके उडायचे. श्वेता सासूच्या सोबतीला देवळापर्यंत जायची खरी, पण बाहेरच थांबायची. त्यावरुन भांडण झालं. सासू म्हणाली, ‘‘बाहेर चपला सांभाळायला थांबतेस का? आत आलीस तर काय झिजशील?’’ श्वेता पटकन बोलून गेली, ‘‘मला शहाणपणा शिकवू नका. तुमचं काय ते तुमच्यापुरतं ठेवा.’’ सासू घरी आल्यावर रडू लागली. ‘‘मला उभ्या जन्मात असं कुणी बोललं नव्हतं. देव बघून घेईल तुला,’’ असं बोलत सासूने सुशिक्षित सुनेला जणू शत्रूच ठरवलं.

संध्याकाळी आकाश आल्यावर श्वेता म्हणाली, ‘‘मी माहेरी जातेय. मला बोलवायला येऊ नका. मला वाटलं तर मी येईन. पण नक्की नाही. माहेरीच जातेय मी विरारला. कुठे पळून जात नाही, नाहीतर उठवाल काहीतरी खोटी आवई.’’

आकाश तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या या करारीपणाची त्याला थोडी भीतिच वाटली. श्वेता आपल्या श्रीमंत वडिलांकडे जाऊन राहिली. तिच्या मम्मीला ते खटकलं. पण श्वेता म्हणाली, ‘‘थांब गं तू. आकाशला माझ्याशिवाय करमायचं नाही.’’ तसंच झालं. पंधरावीस दिवस उलटल्यावर त्याचा फोन येऊ लागला.

श्वेता नवऱ्याचा फोन कट करायची. मग त्याने एसएमएस केला, ‘तुझ्याशी बोलायचं आहे. विरारला येऊ का?’ श्वेताच्या मनातही तेच होतं. तिने होकार दिला.

आकाशनं नमतं घेतलं. श्वेता म्हणाली. ‘‘तुम्हाला देव मानण्यापासून मी कधी रोखलं का? तुम्ही जरूर पूजा, प्रार्थना काय ते करा. पण माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणू नका. तुमच्या आईला समजावणं तुमचं काम आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी येतेय. पण परत  अपमान झाला तर कायमची सोडेन सासर…’’ नास्तिकतेचं स्वातंत्र्य श्वेताने असं मिळवलं.

आता घरातली बाकीची मंडळी रुढी, कर्मकांड सारं सांभाळतात. पण श्वेता मात्र, ‘निरीश्वरवाद’ जपते. त्यांना झालेलं बाळ मोठेपणी श्वेताच्या वळणावर जाणार की आकाशच्या ते आता कशाला बोला, हे तर येणारा काळ ठरवेल…हो ना?

संकर्षण

कथा * मीरा सिन्हा

गगन यांचा बालपणापासूनचा मित्र. आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडल्यापासून माझा नवरा आशीष पुन्ह:पुन्हा म्हणत होता, ‘‘मला समजंतच नाहीए, संकर्षण किती गगनसारखा दिसतो, बोलतो, वागतोसुद्धा. जणू तो त्याचाच मुलगा असावा…नाक आहे तुझ्यासारखं, पण माझं तर त्याच्यात अगदीच काही जाणवंत नाही.’’

मी म्हटलं, ‘‘नाही कसं? तो तुमच्यासारखाच कुशाग्र बुद्धीचा आहे अन् थोडा संतापीसुद्धा…गगनभाऊ अगदीच शांत वृत्तीचे आहेत.’’

‘‘हो पण, आपला मुलगा म्हटल्यावर तो थोडा तरी माझ्यासारखा दिसायला हवा ना?’’

‘‘तुम्हाला सांगू का? माणसाचं व्यक्तिमत्त्व घडतं ते घरातल्या वातावरणामधून, घरातल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून. जन्मल्याबरोबर मी त्याला श्रुतीच्या ओटीत घातला. त्या क्षणापासून तो त्यांच्या घरात, त्यांच्या संगतीत वाढतोय…त्याच्यावर त्याच घरातले, त्याच वातावरणातले संस्कार झालेत. दुसरं म्हणजे अपघातानं तो आपल्या कुटुंबात येऊ घातला होता. पण माझ्या मनांत आलं, श्रुतीला बाळ होऊ शकत नाही, तेव्हा हे बाळ मी माझ्या पोटात वाढवून श्रुतीच्या ओटीत टाकेन. तिलाही आई होण्याचं सुख मिळेल. माझ्या मनांत सतत श्रुती अन् गगन भाऊंचेच विचार असल्यामुळेही कदाचित तो आपल्यापेक्षा वेगळा झाला असेल…’’ मी म्हटलं.

‘‘हो…तेही खरंच, पण सीमा तू खरोखरंच महान आहेस हं! आपलं बाळ असं निर्लेज मनानं दुसऱ्याला देणं सोपं नाही.’’

‘‘खरंच, पण तुम्हाला सांगू का? श्रुती वहिनी अन् गगनभाऊंचं दु:ख मला बघवंत नव्हतं. तुम्ही त्यावेळी इथं नव्हता. पण श्रुतीला झालेलं ते भयंकर बाळ त्याचा मृत्यू…ते सगळं फारच भयंकर होतं. मी ते बघितलंय, अनुभवलंय श्रुतीची परिस्थिती बघून तर जीव इतका कळवळायचा…अन् त्या दोघांनी आपल्यासाठी खूप केलंय…त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो याचं फार समाधान आहे.’’

‘‘हो, हे मात्र खरं, गगन अन् वहिनी कधी परके वाटलेच नाहीत. पण तरीही आपलं बाळ दुसऱ्याला देणं इतकं सोपं नसतं. मला तर वाटत होतं की ते बाळ आपण परत आपल्याकडे आणूयात.’’

‘‘छे: छे:, भलतंच काय बोलता? श्रुती अन् गगनभाऊंचा मनांचा विचार करा. त्यांचं तर सर्व आयुष्य त्या बाळाभोवती फिरतंय. एक क्षण त्याच्या वाचून ती दोघं राहू शकत नाहीत.’’

‘‘होय, तेही खरंच अन् संकर्षणला आपण त्याचे आईबाप आहोत हे कुठं ठाऊक आहे. तो त्यांनाच आपले आईबाबा मानतोय.’’ आशीषनं म्हटलं.

देवाची कृपा म्हणायची की माझ्या नवऱ्याला काही संशय आला नाही. मी तर मनांतून खूपच घाबरले होते की आशीषला कळंतय की काय की संकर्षणचे वडील तो नाही, गगनच आहे म्हणून. आमच्या सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात मी ही एकमेव गोष्ट नवऱ्यापासून लपवली होती अन् आहे. हे रहस्य लपवून मी इतकी वर्षं आशीषबरोबर संसार करतेय. आम्ही व्यभिचार केला नाही. माझ्यावर बळजबरी झाली नाही…परिस्थितीच अशी होती की मी व गगन एकत्र आलो व संकर्षणचा गर्भ माझ्या पोटात रूजला. मात्र हे रहस्य आम्ही दोघांनी प्राणपणानं जपलं म्हणूनच दोन आनंदी संसार आजही सुखानं आयुष्य जगताहेत.

गगन यांचा लहानपणापासूनचा मित्र. गगन हडकुला, शांत, अभ्यासात बेतासबात तर आशीष अंगपिडानं सुदृढ, थोडा संतापी अन् विलक्षण हुषार. दोघांच्या घरची परिस्थितीही खूपच भिन्न. गगन अगदी गरीब कुटुंबातला तर आशीष उच्च मध्यम वर्गीय. पण इतका फरक असूनही या दोघांची मैत्री कुणीही हेवा करावा अशी होती. गगनला कुणी काही वेडंवाकडं बोलून गेला तर आशीष त्याला असा धडा शिकवायचा की दुसरा कुणी गगनला त्रास देण्याचा विचारही मनांत आणणार नाही. आशीषचं प्रत्येक वाक्य गगनसाठी वेद वाक्य होतं. त्याच्या शब्दाबाहेर तो कधी जात नसे.

कालचक्र फिरत होतं. आशीषची निवड आयएएसाठी झाली. गगननं छोटासा व्यवसाय सुरू केला. त्याला त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी आर्थिक पाठबळ दिलं. आशीष शिकत असतानांच सासूबाईचं निधन झालं होतं. त्यावेळी गगनच्या आईनं आशीषला आईची उणीव भासू दिली नव्हती. माझे सासरे तर म्हणायची त्यांना दोन मुलगे आहेत. आशीष आणि गगन.

सुर्दैवानं दोघांची लग्नंही मागेपुढे झाली अन् मी आणि श्रुती या कुटुंबात दाखल झालो. दुधात साखर विरघळावी तशा आम्ही दोघी या दोन पण एकत्र कुटुंबात रमलो. श्रुतीचं अन् माझं छान पटायचं. आम्हा चौघांची ती निखळ, निर्मळ मैत्री अन् परस्परांवरील विश्वास आणि माया बघून सगळ्यांना नवल वाटायचं.

माझ्या आणि श्रुतीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीत खूप फरक होता. तरीही आम्ही चौघं अभिन्न मित्र होतो. आशीषच्या अनेक ठिकाणी बदल्या व्हायच्या. मला त्यांच्यासोबत जावं लागायचं. माझे सासरे त्यांचं गाव, त्यांचं घर सोडून रहायला नाखूष असायचे. थोडे दिवस ते आमच्याकडे येऊन राहत असत. पण एरवी ते घरीच रहायला बघत. अशावेळी श्रुती आणि गगन त्यांची काळजी घेत होते. आम्ही दोघं नाही अशी जाणीवही ते माझ्या सासऱ्यांना होऊ देत नव्हते.

आम्हाला दोन मुलं झाली पण श्रुतीला अजून मूल झालं नव्हतं. तिला दिवस रहायचे पण गर्भपात व्हायचा. डॉक्टरांच्या मते तिचं गर्भाशय गर्भ वाढवून, पोसून पूर्ण वाढीचं मूल जन्माला घालण्याएवढं सक्षम नव्हतं. दर गर्भापातानंतर दोघंही इतके हिरमुसून जात की आम्हालाही वाईट वाटायचं. गर्भपात अन् मानसिक धक्का, डिप्रेशन यामुळे श्रुतीची तर तब्येत खूपच खालावली होती. डॉक्टर म्हणाले, ‘‘स्वत:च्या मुलाचा नाद सोडा, मूल दत्तक घ्या किंवा सरोगेशनचा मार्ग निवडा.’’ पण दोन्ही उपाय दोघा नवरा बायकोला मान्य नव्हते.

गगन म्हणायचा, ‘‘मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय, तर श्रुतीला बाळ का होणार नाही. इथल्या डॉक्टरांना कदाचित तेवढं ज्ञान नसेल. मी देशातल्या सर्वात मोठ्या गायनॅकोलजिस्टला दाखवेन. त्यांच्या उपचारानं श्रुतीला नक्कीच बाळ होईल.’’

खरंच गगननं दिल्लीतल्या नामंकित डॉक्टकडे श्रुतीला दाखवलं. त्यांनी म्हटलं, ‘‘थोडा वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करू. नेमकं याच वेळी आशीषला डेप्युटेशनवर तीन वर्षांसाठी लंडनला जावं लागलं, सासरे बरेच आजारी होते. मुलांना एकदम शाळेतून काढता येत नव्हतं. त्यामुळे मी घरीच होते. आशीष एकटेच लंडनला गेले. श्रुती मला आग्रह करत होती की ती सासऱ्यांची काळजी घेईल, मीही लंडनला जावं, पण मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होताच.’’

आशीष लंडनला गेल्यावर काही दिवसांतच सासरे वारले. आशीष जेमतेम अत्यंसंस्कारां पुरता येऊन गेला. त्याचवेळी श्रुतीला पुन्हा दिवस गेले. डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलं होतं. संपूर्ण बेड रेस्ट घ्यायची होती. गगन, त्याची आई अन् मी सर्वत्तोपरी श्रुतीची काळजी घेत होतो.

गर्भातल्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड वगैरे टेस्टही करू नका म्हणून सांगितलं होते. श्रुतीच्या पोटात बाळ वाढत होतं. नऊ महिने पूर्ण झाले. आम्ही सगळेच खूप उत्सुकतेनं बाळाच्या आगमनाची वाट बघत होतो.

श्रुतीला कळा सुरू झाल्या. सगळं नॉर्मल आहे असंच वाटत होतं. मीही माझ्या मुलांना एका नातलगांकडे पोहोचवून श्रुतीजवळच थांबले होते. पण श्रुती कळा देऊन थकली तरी बाळ बाहेर येईना. पाच दिवस डॉक्टरांनी वाट बघून शेवटी सिझेरियनचा निर्णय घेतला. ऑपरेशन करून जे बाळ जन्मला आलं ते अगदी भयानक होतं. त्याला दोन  डोकी, तीन हात होते. त्यानं इतक्या मोठ्यानं टाहो फोडला की तिथल्या नर्सेस घाबरून पळून गेल्या.

डॉक्टरही चकित झाले, गांगरले…आम्ही तर सुन्न झालो होतो. सुर्दैवानं ते मूल अर्ध्या तासातच गेलं. श्रुती बेशुद्ध होती. गगनच्या आईला मी धरून बसले होते. त्या एकदम खचल्या होत्या.

गगन बाळाचा दफनविधी आटोपून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तो इतका थकलेला, असहाय आणि दयनीय दिसत होता की त्याला बघून माझ्या डोळ्यात अश्रूच आले.

गगनची अवस्था पाहून त्याची आई एकदम सावरली. गगनला तिनं पोटाशी धरलं…धीर दिला. मला म्हणाली, ‘‘सीमा, तू गगनला घेऊन घरी जा. त्याला या क्षणी निवांतपणा अन् विश्रांती हवीय. मी इथं श्रुतीजवळ थांबते. इतका त्रास सहन केला पोरीनं पण देवानं तिला सुख दिलं नाही…’’ त्यांनी डोळ्याला पदर लावला.

मी त्यांनी थोपटून शांत केलं. तोवर गगन बाहेर व्हरांड्यात जाऊन उभा राहिला होता. मी लगेच त्याच्याकडे गेले. हॉस्पिटलच्या बाहेरच रिक्शा उभ्या होत्या. आम्ही रिक्शानं घरी पोहोचलो.

घरात गेल्यावर मी गगनच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी गगनच्या भावनांचा बांध फुटला अन् तो धो धो रडू लागला. त्याची मन:स्थिती मला समजत होती. नऊ महिने श्रुतीची काळजी घेतली. कुठेही हयगय केली नाही…किती ताण असेल मनांवर अन् ती शुद्धीवर आल्यावर आता तिला काय सांगायचं हा पण ताण…

‘‘श्रुतीला हा धक्का सहन होईल का? मी काय करू? कसा तिला सामोरा जाऊ? मीच अभागी आहे…’’ त्याचं रडणं, त्याची विकलता, त्याचं ते मोडून पडणं मलाही बघवत नव्हतं. त्याला कसं शांत करू तेच समजत नव्हतं. शब्द नव्हते बोलायला…मी त्याला जवळ घेऊन थोपटंत होते. रडण्याच्या आवेगात गगननं मला गच्च मिठी मारली. एकमेकांच्या बाहुपाषानं आम्ही झोपी गेलो. मी ही मनानं आणि शरीरानं गेल्या काही दिवसात खूप दमले होते. त्या क्षणांत अगदी नकळत पुरूष अन् प्रकृती, नर आणि मादीचं मिलन झालं. ते वासनांचं तांडव नव्हतं, तो व्यभिचार नव्हता. ती जोडीदाराची फसवणूकही नव्हती. जे घडलं ते जरी समर्थनीय नव्हतं तरी दुर्दैवाच्या रट्यानं खचलेल्या, भंगलेल्या देहमनाला आधार देताना घडलेली एक नैसर्गिक घटना होती. भानावर आल्यावर आम्ही दोघंही ओशाळलो…पण तो विषय तिथंच संपला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गगन श्रुतीला घेऊन कुठल्याशा रम्य ठिकाणी काही दिवस राहणार होता. त्याची आई तिच्या भावाकडे हवापालट म्हणून गेली होती अन् अचानक आशीष लंडनहून परत आले. त्यांना तिथं खूप छान नोकरी मिळाली होती. सरकारी नोकरीचा राजिनामा सहजच मंजूर झाला होता. मुलांच्या शाळांचाही प्रश्न सुटला होता. आता आम्हाला न्यायलाच ते आले होते. मला खरं तर परदेशात जायची इच्छा नव्हती पण आशीषला तिथलं वातावरण, मिळणारा भरपूर पैसा, श्रीमंती या सगळ्याची भुरळ पडली होती. आशीष आल्यावर इतक्या दिवसांच्या विरहाचं उट्टं त्यांनी काढलंच. खूप दिवसांनी त्यांचा सहवास मलाही सुखवंत होता अन् माझ्या लक्षात आलं…माझी मासिक पाळी चुकली आहे…

आशीषला कळलं तर तो आश्चर्यानं म्हणाला, ‘‘अगं, पण इतकी काळजी घेत होतो आपण…तरीही…?’’

त्याच्या डोळ्यात बघत मी म्हटलं, ‘‘उपासाचं उट्टं काढत होता तुम्ही…तेव्हा कदाचित…’’

त्यांनी भुवया अन् खांदे उचकले.

मला मनांतून खात्री होती हे बाळ गगनचं आहे. पण मी म्हटलं, ‘‘आता काय करायचं?’’

किंचित विचार करून आशीषनं म्हटलं, ‘‘अॅबोरशन करून घ्यावं. नव्या ठिकाणी मुलांना, स्वत:ला सेटल करताना तुला खूप अडचण येईल…आता आपल्याला बाळ तसंही नकोय…’’

मीही विचार करत होते. काही वेळानंतर मी म्हटलं, ‘‘श्रुतीला यापुढे मूल होणार नाही. ती खूप डिप्रेशनमध्ये आहे. बाळाचं आगमन तिचं डिप्रेशन दूर करेल असं मानसोपचारवाले डॉक्टर सांगातहेत. आपण हे बाळ तिला दिलं तर?’’

‘‘तुला वेड लागलंय का? आपलं मूल दुसऱ्याला कसं देता येईल?’’

‘‘काय हरकत आहे? श्रुती अन् गगन आपल्याला परके नाहीत…तसंही हे मूल आपल्याला नकोय, तुम्हीच म्हणालात अॅबॉरशन करून घे म्हणून…मग जर हे बाळ जन्माला घालून त्या दोघांच्या ओटीत घातलं तर बालहत्त्येचं पातक नको शिवाय श्रुती, गगन, त्याची आई…सगळ्यांनाच किती आनंद होईल विचार करा. मला नऊ महिने गर्भभार वहावा लागेल…प्रसुती वेदना सोसाव्या लागतील पण श्रुतीसाठी, काकींसाठी आणि गगनभाऊंसाठी मी ते करायला तयार आहे.’’

‘‘पण गगन अन् श्रुतीला ते मान्य होईल का?’’

‘‘विचारून बघू, मग निर्णय घेऊ…’’

आम्ही जेव्हा श्रुतीला व गगनला, काकींना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांचा विश्वास बसेना.

‘‘असं कसं होईल?’’ गगननं म्हटलं.

‘‘तू तुझं बाळ मला देशील?’’ श्रुतीचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

‘‘असं समज की तुझंच बाळ आहे फक्त माझ्या गर्भात वाढतयं. देवकीचा बलराम जसा रोहिणीच्या गर्भात वाढला तसा. पुराणात या विधीला संकर्षण नाव दिलंय. हे बाळ जर मुलगा झाला तर त्याचं नांव संकर्षण ठेवा. तुमच्या मायेत तो मोठा होईल. तुम्हाला आईबाबा म्हणेल…तो तुमचाच मुलगा ठरेल.’’ मी श्रुतीच्या पाठीवर हात ठेवून तिला समजावलं.

आपल्या घरात बाळ येणार या कल्पनेनंच श्रुतीचे डोळे आनंदानं चमकले.

‘‘खरंच? वहिनी. खरंच तुमचं बाळ तुम्ही मला द्याल?’’

‘‘अगदी खरं, तुम्ही आम्हाला परके आहात का? असं समज, तुझं बाळ मी फक्त माझ्या पोटात सांभाळते आहे, वाढवते आहे…जन्माला आलं की तुझं बाळ तुझ्या ओटीत टाकून मी लंडनला निघून जाईन…’’ मी श्रुतीला खात्री दिली. तिनं आनंदानं मला मिठीच मारली. ते दृष्य बघून आशीषही गहिवरले.

लहानपणापासूनची गगनची मैत्री, त्यानं, त्याच्या आईनं आशीषसाठी व त्याच्या बाबांसाठी केलेली मदत, घेतलेले कष्ट हे सगळं आशीषनाही कळंत होतं. त्यामुळे आपण जर त्याच्या उपयोगी पडू शकतोय तर हे एक महान कार्य उरकल्यानंतरच मी लडंनला यावं हे त्यानं मान्य केलं. आमच्या मुलांचंही हे शैक्षणिक वर्ष इथंच पार पडेल याचा मलाही आनंद झाला.

दिवस भराभर उलटत असतात. बघता बघता माझे गरोदरपणाचे नऊ महिने पूर्ण झाले. नॉर्मल बाळंतपण झालं. मुलगा झाला. मी हॉस्पिटलमधून घरी जाताना बाळ श्रुतीच्या ओटीत घातलं. आशीष आम्हाला घ्यायला आले होते.

इथलं घर बंद करून मुलांना घेऊन मी लंडनला गेले. हळूहळू तिथल्या वातावरणात मुलं अन् मीही रूळले. अधूनमधून फोनवर भारतात गगन श्रुतीशी बोलणं व्हायचं. बाळाचं नाव त्यांनी संकर्षण ठेवलं होतं. श्रुतीची तब्येत एकदम ठणठणीत झाली होती. बाळाच्या येण्यानं ती मानसिक व शारीरिक दृष्टीनंही एकदम छान झाली होती. सासूच्या मदतीनं बाळाचं संगोपन उत्तम रितीनं करत होती. घरात आनंदीआनंद होता.

त्यानंतर अनेकदा काही दिवसांसाठी भारतात येणं व्हायचं पण गावी जाणं होत नसे. आई वडिलांना भेटून मी पुन्हा लंडनला यायची. मनांतून भीती वाटायची त्या बाळाला बघून माझ्यातली आई, आईची माया उचंबळून येईल का? कधी कधी वाटायचं नऊ महिने पोटात सांभाळलं ते बाळ आपण का देऊन टाकलं? पुन्हा वाटायचं, बरंच झालं गगनचं मूल गगनकडे वाढतंय…माझ्या डोळ्यासमोर सतत असतं तर कदाचित अपराधीपणाची भावना मन कुरतडंत राहिली असती.

आशीषला यातलं काहीच माहित नव्हतं. ते त्या मुलाचे वडील नाहीत हे ठाऊक नसल्यामुळे, म्हणजेच ते मूल आपलं आहे तेव्हा आपण त्याला भेटूयात असं त्याला सतत वाटयचं. म्हणूनच आम्ही यावेळी आवर्जून गगनकडे भेटायला आलो होतो. संकर्षणला बघितल्यावर मला तर भीतीच वाटली होती की आशीषला काही शंका तर येणार नाही? तसं जर झालं तर श्रुतीचं काय होईल? श्रुतीचं काय होईल? श्रुतीचा संसार उद्ध्वस्त होईलच माझा ही संसार उद्ध्वस्त होईल.

पण आशीषचा माझ्यावर आणि गगनवरही अतूट विश्वास असल्यानंच तो विषय तिथेच थांबला. आजतागायत मी आशीषशी काय, कुणाशीच कधी खोटं बोलले नाही…यापुढेही बोलणार नाही. खरंच सांगते मी आणि गगन निर्दोष आहोत. आम्ही विश्वासघात केला नाही किंवा व्यभिचार केला नाही…तो बलात्कारदेखील नव्हता. उद्ध्वस्त मन अन् थकलेल्या देहाला त्याक्षणी फक्त आधार हवा होता. भावनिक, मानसिक आधार नकळंत दैहिक झाला…तेवढीच चूक…पण त्यामुळे श्रुतीला केवढा मोठा दिलासा मिळाला. तिची मातृत्त्वाची आस पूर्ण झाली. त्यांचं आयुष्य उजळून निघालं अन् आता हे रहस्य कधीच कुणाला कळणार नाहीए.

कोण माझा सोबती

कथा * अर्चना पाटील

मेजर प्रभास आपल्या मोठा भाऊ वीरच्या लग्नासाठी घरी आलेला होता. घरात आनंदी वातावरण होते. वीर बँगलोरला एका कंपनीत इंजिनिअर होता. कुलकर्णी कुटुंबातील तीनही मुलींमध्ये दिया मोठी मुलगी. कुलकर्णी लवकरात लवकर दियाचा विवाह आटपून एका जबाबदारीतून मोकळया होण्याच्या मार्गावर होते. दियासुद्धा काही दिवसांपासून पुण्यात जॉब करत होती. पण आता सर्वकाही मागे सुटून जाणार होते. त्या मैत्रिणी, त्या पार्ट्या, ते होस्टेल…

प्रभास आर्मीत असल्याने सर्वचजणांना त्याचे खूप कौतुक होते. लग्नाच्या गडबडीतही त्याचे चहापाणी, जेवण यांची सर्वजण आवर्जून चौकशी करत. हळदीच्या रात्री सर्वजण खूप नाचले. लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे प्रभासला त्याच्या सवयीप्रमाणे चार वाजता जाग आली. प्रभासने शेजारी पाहीले तर वीरचा पत्ता नव्हता. प्रभासने पूर्ण घरात चक्कर टाकली. फिरून परत पलंगावर बसला तर वीरची चिठ्ठीच सापडली. चिठ्ठीत लिहिले होते ,‘‘प्रभास, मला माफ कर. पण माझे अनन्या नावाच्या मुलीशी अगोदरच रजिस्टर मॅरेज झाले आहे. ती दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आईबाबा अनन्याला कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणूनच मी कायमचे घर सोडून जातो आहे.’’

चिठ्ठी वाचताच प्रभास बाबांकडे गेला. घरातील सर्वजण चिंतेत पडले. मुलीकडच्यांना काय सांगायचे हा प्रश्न त्यांना पडला. शेवटी घरातील सर्व वडीलधाऱ्या लोकांनी प्रभासलाच नवरदेव म्हणून उभे केले. परिस्थिती पाहून प्रभासचाही नाईलाज झाला. मुलीकडच्यांच्या संमतीने दिया व प्रभासचा विवाह थाटामाटात पार पडला. पण प्रभास या लग्नाने आनंदी नव्हता. त्याची सुट्टी संपण्यापूर्वीच तो ड्युटीवर हजर होण्याच्या हालचाली करु लागला. दियाच्या सासुनेही दोघांमधील दुरावा कमी व्हावा यासाठी दियाला सोबतच घेऊन जा म्हणून हट्टच धरला. आईबाबांची कटकट नको म्हणून प्रभास दियाला घेऊन श्रीनगरला निघाला. तेथे एका मित्राची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याने घर रिकामे होते. तेथेच दियासोबत काही दिवस राहण्याचे ठरले. रेल्वेच्या पूर्ण प्रवासात प्रभास एक मिनीटही दियाजवळ बसला नाही. प्रभास पूर्ण वेळ रेल्वेच्या दरवाज्यातच उभा होता. प्रभासचे हे वागणे पाहून दियाच्या डोळयात नकळतपणे पाणी येऊ लागले.

दियाला हे लग्न नकोसे झाले होते. पण माहेरी जाण्याचे दरवाजे बंद होते कारण अजून दोन बहिणींची लग्ने बाकी होती. पुण्याला पळून जावे असेही तिच्या मनात येत होते. दिया आपल्या आयुष्याबदल चिंता करत असतानाच प्रभास आला.

‘‘चल, श्रीनगर आले. बॅग घे.’’

दिया बॅग घेऊन प्रभासच्यामागे अवघडल्यासारखी थोडे अंतर ठेऊनच चालत होती. दोघांनी टॅक्सी पकडली. रात्रीचे बारा वाजले होते. काही अंतर दूर गेल्यावर लगेचच एक दहशतवादी टॅक्सीसमोर येऊन उभा राहिला.

‘‘चला, चला खाली उतरा. नाही तर गोळी घालेन डोक्यात. उतर रे. बघतोस काय?’’

‘‘निघा, पटकन बाहेर निघा.’’ ड्रायव्हर घाबरून ओरडायला लागला.

‘‘तिकडे व्हा. गाडीपासून दूर जा,’’ दहशतवादी ओरडू लागला.

तेवढयात आर्मीवाले बंदूका घेऊन तेथे पोहोचले. दिया आणि प्रभास एकमेकांपासून दूरदूरच उभे होते. त्या दहशतवादीने तिच संधी साधून दियाला आपल्या मिठीत ओढले आणि तिच्या डोक्याला बंदूक लावून ओरडू लागला.

‘‘खबरदार, जर कोणी पुढे आले तर. या मुलीचा जीव प्यारा असेल तर मला इथून जाऊ द्या.’’

‘‘मेजर शर्मा, बंदूका खाली करा. त्याला जाऊ द्या. बादल तू इथून जा, पण त्या मुलीला सोड.’’ कॅप्टन बोस म्हणाले

‘‘अधी बाजूला हो.’’

काही क्षणात बादल नावाचा तो दहशतवादी दियाला घेऊन फरार झाला. प्रभास आता पश्चाताप करू लागला. ‘दियाला काही झाले तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. मी विनाकारण दियाशी इतका वाईट वागलो. खरी चुक तर माझ्या भावाचीच होती आणि मी माझा राग मात्र निष्पाप दियावर काढत होतो,’ प्रभास खूपच निराश झाला होता.

‘‘मेजर प्रभास, मी तुमची परीस्थिती समझू शकतो. आपण प्रत्येक रस्त्यावर चेकिंग करत आहोत. दिया लवकरच सापडेल.’’

बादल दियाला घेऊन जंगलात पोहोचला. त्याच्या पायातून रक्त निघत होते. त्याने दियाला गाडीतून बाहेर काढले. दोघेही एका झाडाखाली बसले.

‘‘हे बघा, मला जाऊ द्या, प्लीज.’’

‘‘सोडेन तुला. काही वेळ चूप बस. मी पळूनपळून थकलो आहे. बसू दे मला आता थोडावेळ.’’

दिया शांतपणे बसून राहिली. प्रभासकडे परत जाऊन तरी ती काय करणार होती? त्यापेक्षा हा दहशतवादी मला इथेच मारून टाकेल तर बरे होईल असे विचार तिच्या मनात येत होते. बादल एक तास बसून राहिला. मधूनमधून तो दियाकडेही बघत होता. दियाचे हवेने उडणारे कुरळे केस, घारे डोळे, सुंदर चेहरा बादलचे मन आकर्षून घेत होता. बादल एकेक पाऊल हळूहळू दियाकडे टाकू लागला. दिया तिच्या विचारांमध्येच गुंग होती.

थोडयावेळाने बादल अचानक दियाजवळ आला. तिचे दोन्ही हात आणि तोंड बांधून तिला जंगलाच्या बाहेर असणाऱ्या हायवेकडे घेऊन गेला. हायवेच्या जवळ येताच बादलने दियाला आपल्या मिठीत घेऊन ‘‘ही भेट मला नेहमी आठवेल,’’ असे म्हटले. हायवेवर एक फोरव्हीलर येताच बादलने दियाला गाडीसमोर ढकलले आणि क्षणात तो गायब झाला. फोरव्हीलरमधील लोकांनी दियाला आर्मीवाल्यांकडे सोपवले.

‘‘कशी आहेस तू?’’ प्रभास प्रेमाने विचारत होता.

‘‘मेजर प्रभास, आधी आर्मीवाले दियाची चौकशी करतील. नंतरच तुम्ही नवराबायको एकमेकांना भेटा.’’

आर्मीवाले दियाला चौकशी करण्यासाठी आत घेऊन गेले. खोलीच्या खिडकीतच प्रभास उभा होता. आता प्रभास दियाला एक मिनीटही सोडायला तयार नव्हता.

‘‘बादल, तुम्हाला कोठे घेऊन गेला?’’

‘‘गाडी एका जंगलात जाऊन थांबली.’’

‘‘त्याने तुम्हाला काही त्रास दिला का?’’

‘‘नाही.’’

‘‘तुम्ही त्याच्यासोबत कमीत कमी एक तास होत्या. तो काय बोलत होता?’’

‘‘काहीच नाही. मी पळूनपळून खूप थकलो आहे असे सांगत होता.’’

‘‘अजून काही आठवतंय का?’’

दियाने मान खाली घालून, थोडावेळ विचार करून ‘नाही’ म्हटले. पण दियाचे हे उत्तर मेजर शर्मांना खोटे वाटले. प्रभास दियाला घेऊन घरी आला. प्रथम प्रभासने दियाची माफी मागितली आणि यापुढे त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची ग्वाही दिली. संध्याकाळी प्रभास मित्रांसोबत फिरायला बाहेर गेला. दिया घरी एकटीच होती. अखेरीस दियाला आज बऱ्याच दिवसांनी तणावमुक्त वाटत होते. ती निश्चिंत होऊन बेडवर लोळत होती. तेवढयात डोअरबेल वाजली. दियाने दरवाजा उघडला. एक बुके आणि चिठ्ठी पडलेली होती. दियाने पटकन चिठ्ठी उघडली तर त्यात ‘ही भेट माझ्या नेहमी लक्षात राहील’ असे लिहिलेले होते. ते वाक्य वाचून दियाने लगेच तो बुके आणि चिठ्ठी रस्त्यावर फेकले. दिया पळत पळतच घरात आली. घराचा दरवाजा बंद करून ती रडायला लागली. आता कुठे प्रभास आणि ती जवळ आले तर पुन्हा वेगळेच संकट समोर येऊन उभे राहिले. प्रभास रात्री आठला घरी आला. पण दियाला प्रभासजवळ बादलचा विषय काढण्याची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघे शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेले. दिया जेव्हा चेंजिंग रूममध्ये गेली तर बादलने पटकन तिचे तोंड आपल्या हाताने दाबले. दिया शांत झाल्यावर त्याने आपला हात उचलला.

‘‘हे बघ, माझा पाठलाग करू नको. तू का म्हणून मला त्रास देतो आहे?’’

‘‘तुझा आवाज तर तुझ्यापेक्षाही सुंदर आहे.’’

‘‘काय बोलतोस, तुझे काहीच नाही होऊ शकत,’’ दियाने जोरात दरवाजा आपटला आणि बाहेर पडली.

‘‘अगं ये, आपण फक्त रोज असेच भेटत राहू. तुझ्या नवऱ्याला काहीच समजणार नाही.’’

‘‘का भेटू? मुळीच नाही.’’ दिया पटकन पळाली आणि प्रभासजवळ जाऊन उभी राहिली.

थोडयाच वेळात आर्मीवाल्यांकडे बातमी पोहोचली की बादल मॉलमध्ये आला होता. मॉलमधील सीसीटीव्हीत तो दियासोबत दिसत होता. प्रभास हे प्रकरण ऐकून हैराण झाला. प्रभास आर्मीवाल्यांसोबत घरी पोहोचला.

‘‘तू बादलला कशी ओळखते?’’

‘‘मी नाही ओळखत त्याला. तोच माझा पाठलाग करतो आहे.’’

‘‘कदाचित त्याला प्रेमरोग झाला असेल. हे बघ दिया, आजपासून तू आम्हाला बादलला पकडण्यात मदत करणार आहेस.’’ कॅप्टन बोस म्हणाले.

‘‘ठीक आहे. मी प्रयत्न करेन.’’

प्लननुसार प्रभास आणि दिया काही दिवस एका हिलस्टेशनवर गेले. एक आठवडा राहिले. पण बादल आला नाही. शेवटी ते घरी परतले. प्रभास नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरायला गेला. दियाच्या डोक्यात बादलचेच विचार चालू होते. तेवढयात बादलने खिडकीतून उडी मारली.

‘‘माझा विचार करते आहेस ना.’’

‘‘हो, पण तू कुठे गायब होतास एवढे दिवस?’’ बादलला घरात थांबवून ठेवण्यासाठी दिया गोडगोड बोलू लागली.

‘‘हे बघ, आता तूसुद्धा पण मला भेटल्याशिवाय राहू शकत नाहीस. यालाच प्रेम म्हणतात.’’

‘‘हो ना. आपण उद्या परत भेटू’’

‘‘शिवमंदिरात ये उद्या सकाळी.’’ आता निघतो मी नाहीतर तुझा नवरा येऊन जाईल.

बादल गेला आणि पाचच मिनीटात प्रभास आला.

‘‘तो आला होता.’’ दिया म्हणाली.

‘‘कोण? बादल.’’

‘‘हो. उद्या शिवमंदीरात बोलवले आहे त्याने.’’

‘‘वेरी गुड. उद्या तू एकटीच जाशील मंदीरात.’’

‘‘का?’’

‘‘घाबरू नकोस. आर्मीवाले साध्या वेशात तुझ्या आजुबाजुला राहतील. मी जर तुझ्यासोबत राहिलो तर उद्याही तो आपल्याला सापडणार नाही.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी दिया शिवमंदिरात जायला निघाली. काही अंतर पार केल्यावर बादलही तिच्या मागेमागे चालू लागला. दिया मंदिरात पोहोचली. तिने घंटा वाजवण्यासाठी घंटेवर हात ठेवताच बादलनेही तिच्या हातावर आपला हात ठेवला. त्याने हात ठेवताच आर्मीवाले बंदूका घेऊन त्याच्या चारही बाजूने वर्तूळात उभे राहीले. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही. आर्मीवाल्यांकडे पाहताच बादल ओरडू लागला.

‘‘धोका. दीया तू हे बरोबर केले नाहीस. तुला हे खुप महागात पडेल.’’

‘‘अरे तू, माझ्या भारतमातेला धोका देतो आहेस. त्यामुळे तुझा विश्वासघात करण्याचे मला कोणतेच दु:ख नाही.’’

थोडयाच वेळात प्रभास तेथे पोहोचला. त्याला पाहताच दिया रडायला लागली.

‘‘बस, बस. आता रडायचे दिवस संपले. आपण काही दिवस आता गावी जाऊन येऊ.’’

प्रभासच्या शब्दांनी दियाला धीर मिळाला आणि तिचे आयुष्य सुरळीत झाले. पण आजही कधीकधी बादलचे डोळे आणि आवाज तिला घाबरवून सोडतात.

परिणाम

कथा * भावना प्रराते

गोष्ट खरी आहे. शंभर टक्के सत्य आहे याचे पुरावे मिळाल्यानंतर सोनी प्रथम स्तब्ध झाली. बधिर होऊन बसून राहिली. काळ जणू थबकला होता. वाराही वाहायचा थांबला होता. पण थोड्याच वेळाने ती भानावर आली. एकदा आधी रोहनलाच विचारायला हवं. तिला मनांत वाटलं. तो म्हणेल हे सगळं खोटं आहे. कदाचित सोनीनं त्याच्यावर संशय घेतला म्हणून तो संतापेल, रागवेल, अबोला धरेल. मग त्याला कसं समजवायचं, क्षमा मागायची, त्याचा रागरूसवा कसा घालवायचा याचीही उजळणी तिच्या वेड्या मनात करून टाकली. पण तसं घडलंच नाही. रोहननं सत्य स्वीकारलंच. अगदी नि:संकोचपणे, खरंतर निर्लज्जपणे. सोनीला वाटलं आत्तापर्यंत ज्या घराला, संसाराला आपलं सर्वस्व समजत होती तो फक्त काचेचा शोपीस होता. वाऱ्याचा झोत आला अन् तो फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले. ते विखुरलेले काचेचे तुकडे अन् कण वेचताना मन रक्तबंबाळ झालं.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं झाली होती. अन् हे पहिलं भांडण त्यांच्यात झालं. नको असलेलं एखादं पृष्ठ अवचित उघडावं अन् कॉम्प्यूटर हँग व्हावा असं काहीसं झालं. रोहनची वाक्य तिच्या मनावर खोलवर आघात करून गेली. रडता रडता ती त्याला दुषणं देत होती. त्याला नको नको ते बोलत होती. रोहन अगदी शांतपणे ऐकून घेत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण सोनी आता ऐकणार नव्हती. तशी ती काही गरीब गाय किंवा बिच्चारी वगैरे नव्हती. चांगल्या सुधारक घरातली, सुबत्तेत वाढलेली, भरपूर शिकलेली मुलगी होती. कमवत नाही तर काय झालं? कमवू शकेल इतकं शिक्षण, इतकी योग्यता आहे तिच्याकडे. अशी कशी सवत उरावर नांदवून घेईल? एक महिना दोघांमधलं शीतयुद्ध चालू होतं. शेवटी ही कोंडी फोडायलाच हवी म्हणून निर्धारानं तिनं सांगितलं, ‘‘तुम्हाला त्यांना सोडावंच लागेल.’’

‘‘अन् ते शक्य नसेल तर?’’ रोहननं शांतपणे विचारलं.

‘‘तर मला वेगळं व्हावं लागेल. सोडू शकत नसाल तर मला…’’ अनेक दिवसांपासून सोनीनं हा संवाद पाठ करून ठेवला होता. वेळ आली की ऐकवायचाच म्हणून. आत्ता मात्र हे बोलताना तिचे डोळे भरून आले.

रोहनला तेवढ्यात तिला भावनिक बनवून गुंडाल्ल्याची संधी मिळाली. ‘‘असं कसं सोडेन तुला? तुझ्यावर प्रेम आहेच माझं. अन् एकाच वेळी अनेकांवर प्रेम करणं शक्य आहे माणसाला. आईबाप नाही का दोन मुलांवर सारखंच प्रेम करतात?’’

‘‘दोघींपैकी एक हीच तर अडचण होती ना? तुला ऐकायचं असेल तर नीट बैस. मी कॉफी करून आणतो. त्याबरोबर तुला आवडणाऱ्या कुकीजही आणतो.’’

सोनीचा संताप आता अनावर झाला. तिनं रोहनकडे एकदा आग ओकणाऱ्या डोळ्यांनी बघितलं अन् सरळ तोंड फिरवलं. ‘‘एखाद्या मनोरंजक सिनेमाची गोष्ट ऐकल्याप्रमाणे मी हे सगळं ऐकून घेईन असं वाटलंच कसं तुम्हाला?’’ तिनं तिरस्कारानं विचारलं.

पण रोहननं तरीही कॉफी करून आणलीच! तो सांगू लागला, ‘‘आम्ही तिघं कॉलेजात एकत्र होतो. एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. जेव्हा त्यांना दोघींना समजलं की त्या दोघीही माझ्यावर प्रेम करताहेत तेव्हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. मी स्वत:च्या मनाचा कौल घेतला तेव्हा मलाही एकूण परिस्थिती बरीच अवघड असल्याचं जाणवलं. मला दोघीही सारख्याच आवडत होत्या. मी त्यांना तसं सांगितलं. शेवटी निर्णय असा झाला की आता सगळं परिस्थितीवरच सोपवावं. मी माद्ब्रया वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यांचा एवढा छान बिद्ब्रानेस. मला घर सोडून जायचं नव्हतं. मी इथंच धंदा सांभाळणार होतो. आता योगायोग असा की रीता मुंबईला अन् सारा बंगलोरला स्थायिक द्ब्राली. या दोन्ही ठिकाणी?धंद्याच्या निमित्तानं मला बरेचदा जावं लागतं. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या शहरात जातो तेव्हा आम्ही मित्रत्त्वाच्या नात्यानं भेटतोच. मग गप्प्पा, भटकणं, विचारांची देवाणघेवाण, वादविवाद, खाणंपिणं…सगळंच होतं. त्यात एक दिवस…’’

रोहननं कॉफीचा कप सोनीपुढे धरला. विचारलं, ‘‘पुढे सांगू?’’ कॉफीचा कप दूर सारत सोनीनं होकारार्थी मान डोलावली.

‘‘एकदा माझ्या नेहमीच्या हॉटेलमध्ये रिनोव्हेशन चालू असल्यानं माझी राहण्याची पंचाईत झाली. रीताला हे कळलं तेव्हा ती मला तिच्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेली. वाटेत जोराचा पाऊस लागला. आम्ही दोघंही चिंब भिजलो होतो. गारठलो होतो. कारण रीताची गाडी वाटेत बंद पडली होती अन् टॅक्सी मिळत नव्हती. शेवटी एकदाचे तिच्या घरी पोहोचलो. गरमागरम कॉफी घेत गप्पा मारता मारता आमची मैत्री दैहिक पातळीवर कशी अन् केव्हा पोहोचली ते आम्हाला कळलंच नाही. मैत्रीची मर्यादा ओलांडली गेली हे खरं.

आम्ही तिघंही कोणतीही गोष्ट एकमेकांपासून कधीच लपवत नाही. साराला जेव्हा हे समजलं, तेव्हा तिला वाटलं की मी आता रीताशी लग्न करून तिच्याशी कायमचे संबंध तोडीन. ती त्यादिवशी फारच उदास होती. सारखी रडत होती. मी तिला समजवत होतो. ‘‘तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना तर मलाही असह्य होती. तिची समजूत घालता घालता मग केव्हा आम्ही एकमेकांच्या…’’

‘‘पुरे करा! ऐकवत नाहीए मला,’’ सोनीचा संताप उफाळून आला. हे सगळं होतं तर माझ्याशी लग्न करून तुम्ही माझ्या आयुष्याचं का वाटोळं केलंत?

‘‘मला खरं तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण आई बाबांच्या हट्टापुढे मला नमावं लागलं. मी तुला बघायला गेलो नाही तर ‘विष खाऊन जीव देईन’ अशी धमकी दिली होती आईनं मला. असंही वर म्हणाली होती की मुलगी आवडली नाही तर नकार दे म्हणून. पण तुला बघितल्यावर नकार देणं शक्य तरी होतं का? तू आयुष्यात येणं हे तर कोणत्याही पुरुषाचं भाग्यच ठरलं असतं.’’

हीच गोष्ट अत्यंत रोमँटिक पद्धतीनं रोहननं तिला आधीही सांगितली होती अन् प्रत्येक वेळी सोनी आनंदानं अन् अभिमानानं फुलून आली होती. आज मात्र कुत्सितपणे तो बोलली, ‘‘मला बघून तुम्हाला वाटलं असेल, बरी आहे घरगुती मुलगी. दिसायला तरुण अन् सुंदर आहे. आईवडिलांची सेवा करेल, घर सांभाळेल, नातलगांचं आदरातिथ्य करेल, पोरांना जन्माला घालेल, त्यांना सुसंस्कृत बनवेल. तुम्ही तृप्त, तुमचं कुटुंब, घरदार संतुष्ट! असं प्रकरण समजा तिला कळलंच तर ती जास्तीत जास्त काय करेल? रडेल, भेकेल अन् गप्प बसेल.’’ डोळ्यातले अश्रू पुसून सोनीनं निश्चयी सुरात रोहनना ऐकवलं. ‘‘पण मी इतकी गरीब बिच्चारीही नाहीए. मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित होते अन् आहे. प्रेम मी फक्त तुमच्यावर अन् तुमच्यावरच केलंय. त्यामुळेच तुम्ही पूर्णपणे माझे असाल नाही तर…’’ आवाज पुन्हा घशात अडकला…पुढे बोलवेना.

रोहनच्या अनुभवी वक्तृत्वानं पुन्हा सूत्रं हातात घेतली. ‘‘ठीक आहे. तुझी इच्छा असेल तर तसंच होईल. चूक माझी आहे, तेव्हा सहनही मीच करायला हवं. तुला जे हवं ते तुला मिळेल. पोटगी, मुलांची कस्टडी…पण…’’ रोहननं वाक्य अपूर्ण ठेवलं. काही क्षण तो गप्प राहिला मग एक उसासा सोडून म्हणाला, ‘‘तू अजून घराबाहेर पडली नाहीस, त्यामुळे एकट्या स्त्रीला काय सोसावं, भोगावं लागतं याची कल्पना नाहीए तुला. उपाशी लांडगे लचके तोडतात बाहेरच्या जगात. रीता अन् सारासारख्या स्वावलंबी, हुशार, कर्तबगार स्त्रियांनासुद्धा भावनिक आधाराची गरज पडते. लाखो रुपये कमावतात त्या. पण त्या घरकाम स्वत:च करतात. कारण एकट्या स्त्रीला घरात नोकर ठेवणंही धोक्याचं वाटतं. शिवाय प्रश्न आपल्या मुलांचा आहे. त्यांना आपल्या दोघांची सवय आहे. दोघांपैकी एकाचबरोबर ती राहू शकतील का? त्यांच्यावर किती परिणाम होईल याचा विचार केला आहेस का?’’

मुलांचा मुद्दा निघताच सोनी एकदम दचकली. जणू झेपेतून खडबडून जागी झाली. आत्तापर्यंत तिनं फक्त कस्टडीचा विचार केला होता. दोघांपैकी एकाशिवाय राहणं मुलांना मानसिक, भावनिकदृष्ट्या पेलवेल का? याचा तर तिनं विचारच केला नव्हता. क्षणभर ती बावरली, पण लगेच सावरून म्हणाली, ‘‘तुम्ही मला धमकी देताय?’’

‘‘नाही, जे आयुष्य तू जगू बघते आहेस, त्याचे परिणाम सांगतोय. का उगीच मोडते आहेस इतका चांगला मांडलेला संसार?’’ रोहननं काळजाला हात घालत विचारलं.

एकटीनं बसून तिनं काल घडलेल्या गोष्टींचा विचार केला. एकूण परिणाम काय झाला? तिच्या लक्षात आलं की रोहनच्या आवाजात नम्रता होती, सहानुभूती होती, प्रेमही होतं. पण घडलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप नव्हता. स्वत:ची चूक घडलीय हे त्याला मान्य नव्हतं. त्यानं एकदाही क्षमा मागितली नाही. तो जे करतोय, ते केवळ अनैतिकच नाही तर पाप आणि गुन्हा आहे हे त्याला सोनी समजावू शकली नव्हती. बायको असाध्य रोगानं अंथरूणाला खिळली असेल किंवा शरीरसुख द्यायला असमर्थ असेल तर दुसऱ्या स्त्रीशी संबंध एकवेळ समजू शकतो. पण तसं काहीच नव्हतं. खरं तर तिनं ठरवलं होतं की रोहनला स्पष्टच विचारेल ‘इतकी साधी सोपी गोष्ट होती तर लग्नाच्या आधीच का सांगितलं नाहीस?’ पण हे ती बोलूच शकली नाही उलट रोहननंच चतुराईने तिला सांगून टाकलं की तो तिलाही सोडणार नाहीए. संसार मोडला तर जबाबदार सोनी असणार आहे. तो तिला पैसा अडका देऊन स्वत:ला मोकळंच ठेवेल अन् संसार मोडला नाही तर जे चाललंय त्यासाठी सोनीची स्वीकृती आहे असंच मानलं जाईल.

म्हणजे आत्तापर्यंत जे लपूनछपून चाललं होतं ते आता राजरोस चालेल? तिचं डोकं भणभणू लागलं. रोहननं बॉल तिच्या कोर्टात टाकला होता. आता जे करायचं ते तिनेच करायला हवंय. तिनं एक दिर्घ श्वास घेतला. अजून प्रश्नाची तड नाही लागली हे खरं असलं तरी वस्तुस्थिती स्पष्ट आहे. बोलून रडून मनही मोकळं झालंय. आता ती शांतपणे आपली स्टे्रटेजी ठरवू शकते. काय केलं की काय होईल याचा एक ढोबळ आराखडा तिनं मनांत तयार केला. दुखणं अवघड जागेचं होतं त्यामुळे शस्त्रक्रिया फार काळजीपूर्वक व्हायला हवी. यशाची खात्री काही टक्केच असली तरी प्रयत्न करायलाच हवा. गाजराची पुंगी म्हणा…वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. पण प्रयत्न न करता, लढाई न लढताच पराजय स्वीकारण्यापेक्षा लढणं केव्हाही चांगलंच.

दुसऱ्या दिवशी सकाळी सोनी खूपच लवकर उठली. स्वत:चं सगळं आवरून मुलांच्या बरोबरच तीसुद्धा तयार होती. सकाळी सात वाजता टॅ्रकसूटमध्ये बघून आपापला पेपर उघडून खुर्च्यांवर वाचत बसलेल्या रोहननं अन् बाबांनी आश्चर्यानं अन् प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं.

‘‘त्याचं काय आहे बाबा,’’ अत्यंत नम्रपणे अन् आवाजात मध, खडीसाखर घोळवून सोनीनं म्हटलं, ‘‘मुलांच्या बसस्टॉप समोरच एक अतिशय प्रसिद्ध लेडीज जिम आहे. मला फार वाटायचं की आपणही तिथं जावं. आता तर तिथं ५० टक्के डिस्काऊंट आणि ब्यूटी ट्रीटमेंटचं संपूर्ण पॅकेज ऑफर करताहेत. त्यामुळे मला फारच मोह झाला. आज आळशीपणाला शह देत मी माझं आवरू शकले. आता मुलांना बसमध्ये बसवून मी जरा जिमला जाऊन येईन.’’

‘‘आणि आमचा चहा…नाश्ता?’’ रोहननं घाबरून विचारलं.

‘‘प्लीज, तेवढं तुम्ही बघाल ना? मला फार मदत होईल.’’ नम्रता अन् मध खडीसाखर ओसंडून चालली होती. मुलांना घेऊन सोनी निघून गेली. रोहननं वडिलांकडे बघितलं. दहा वर्षांत पहिल्यांदाच सोनी साडीऐवजी टीशर्ट टॅ्कपॅण्टमध्ये त्यांच्यासमोर आली होती आणि असं काही बोलली होती. त्यांना फारच आश्चर्य वाटलं होतं…ते नाराजही होते का? रोहननं काही न बोलता स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला.

रात्री दहा वाजता बेडरूममध्येच भेट झाली तेव्हा बोलायची संधी मिळाली. रोहन काही बोलणार त्यापूर्वीच सोनीनं कॉफीचा कप त्याच्यापुढे धरला, ‘‘जरा आरामात बसून बोलूयात?’’ तिनं विचारलं आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता म्हणाली, ‘‘मी आज सायंकाळी कुठं गेले होते हेच विचारायचं आहे ना तुम्हाला? हे अन् रोजच असं कसं चालेल? खरं ना?’’ मग प्रेमानं नवऱ्याचा हात हातात घेत ती म्हणाली, ‘‘लग्नाला दहा वर्षं झालीत. एवढ्या वर्षांत माझ्या समर्पणात काही उणीव जाणवली तुम्हाला? माझ्या मनावर जो आघात झाला आहे तो सहन करणं ही साधीसुधी गोष्ट नाही हे तर तुम्हीही मान्य कराल. कधीतरी तुमच्या मनांत आलं. तेव्हा मी बंगलोर आणि मुंबईला जाण्यासाठी तुमची बॅग भरेन तेव्हा माझ्या मनाला किती यातना होतील?

‘‘पण तेवढ्यानं भागणार नाही. मेंदू अन् मन शांत रहायला हवं म्हणूनच मी संध्याकाळी योगासन आणि प्राणायामचा क्लास सुरू केला आहे. दुपारी एक दोन कोर्सेस अन् रात्री सोसायटीच्या सोशल वर्क कमिटीसाठी वेळ ठरवला आहे. कारण स्वत:ला असं गुंतवून घेतलं नाही तर रिकामा वेळ मला सतत तुमच्या त्या…’’ वाक्य पूर्ण न करताच ती हुंदके देऊ लागली. मग थोडी सावरून पुढे म्हणाली, ‘‘मला तुमची मदत हवीए. थोडा मानसिक आधार आणि सहकार्य हवंय. मला स्वत:ला थोडं पक्कं व्हायचंय. सेल्फ डिपेंडंट व्हायचंय. म्हणजे मला…कसं सांगू तुम्हाला…म्हणजे मी गरीब बिच्चारी, असहाय्य आहे म्हणून प्रेमात वाटेकरी सहन करते आहे, ही भावना मला नकोय, तर माझं तुमच्यावर अलोट प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मी तुमच्या प्रेमात वाटेकरी सहन करतेय असं मला जाणवलं पाहिजे…तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय ते?’’

‘‘ठीक आहे.’’ तिच्या हातावर थोपटत रोहननं म्हटलं, ‘‘मी प्रयत्न करतो.’’ सोनीच्या प्लॅनिंगचं पहिलं पाऊल तर यशस्वी ठरलं होतं.

सोनीचा रोजचा दिनक्रम ठरला होता. सकाळी सातला मुलांबरोबर बाहेर पडायचं. दुपारी त्यांना घेऊन घरी जायचं. त्यांचं व स्वत:चं जेवण आटोपून मुलांचा अभ्यास, होमवर्क पूर्ण करून घ्यायचा. मग सायंकाळी योगासनच्या वर्गाला जाताना त्यांना खेळायच्या मैदानावर सोडायचं. खेळून, पोहून मुलं दमून आल्यावर त्यांना खायला घालायचं. मग थोडा वेळ मुलं टीव्ही बघत बसायची तेवढ्या वेळात सोनीकडे गरीब मुलं शिकायला, ट्यूशनला यायची.

सोनीची नणंद अनन्या गावातच दिलेली होती. सोनीचे आणि तिचे संबंध खूपच प्रेमाचे अन् मैत्रीचे होते. ती नोकरी करायची. त्यामुळे तिच्या मुलांना ती आजोळी म्हणजे सोनीकडेच सोडायची. आजी आजोबा मुलांना थोडा वेळ द्यायचे पण दिवसभर त्यांचं खाणंपिणं, कपडे बदलणे, खेळायला नेणं वगैरे सर्व सोनी करायची. घरात कामासाठी मोलकरीण होती. स्वयंपाकघर मात्र पूर्णपणे सोनी बघायची. मुलांना नेणं, आणणं वगैरे सोनीच सांभाळायची कारण ती उत्तम गाडी चालवायची.

पूर्णवेळ घरात राहून संपूर्ण घर व्यवस्थितपणे सांभाळणारी सोनी जेव्हा दिवसभर घराबाहेर राहू लागली तेव्हा घरात गडबड, गोंधळ, अव्यवस्था हे सर्व होणारच होतं. स्वयंपाकाला आता बाई ठेवली गेली होती. तिच्या हातचा बेचव स्वयंपाक आणि स्वत:चं चहापाणी, ब्रेकफास्ट वगैरे बघावं लागत असल्यानं आईबाबाही चिडचिडे झाले होते. सोनीचं वागणं, तिचं घराकडे दुर्लक्ष करणं यामुळे घरातला ताणतणाव वाढला होता. रोहनच्या संतापावर सोनीनं अश्रूरूपी पाणी ओतून आपली बाजू बळकट केली होती.

आज रविवार होता. सोनी अन् मुलं सकाळीच आवरून कुठंतरी निघून गेली होती. अनन्या व जावईबापू जेवायला येणार होती अन् स्वयंपाकघरात चार चांगले पदार्थ करताना आईची दमछाक झाली होती. त्यातच सोनीनं अनन्याच्या मुलांना दुपारी पाळणाघरात ठेवण्याचा विषय काढून आगीत तेल ओतलं होतं.

रात्री दहा वाजता सोनी घरी आली, तेव्हा बॉम्बस्फोट होणार हे नक्की होतं. मुलांना सोनीनं खोलीत जायला सांगितलं. रोहन श्वास रोखून वाट बघत होता. सासू-सुनेच्या भांडणात कुणाला न्याय देता येतो याचा विचार करत होता.

सोनीनं सरळ खुर्चीवर बसलेल्या सासूच्या पायाशी बसकण मारली अन् त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. ‘‘आई, तुम्हाला काय सांगू? हल्ली हे माझ्याशी फार वाईट वागतात. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या स्मार्ट स्त्री सहकाऱ्यांशी माझी तुलना करतात. म्हणतात त्या एकट्यानं सगळं मॅनेज करतात आणि तुला काहीही करता येत नाही. त्यांची सारा नावाची मैत्रीण व सहकारी कमालीची फिगर कॉन्शस आहे तर रीतू सुंदर आणि स्मार्ट आहे. हे म्हणतात, त्यांच्याकडून शिक काहीतरी. मी तर एक घरगुती स्त्री. फक्त गृहिणी, सून, आई, मामी, भावजय, पण ठरले शेवटी गांवढळच! मला सांगा आई, मला या सगळ्या गोष्टींचं किती दु:ख झालं असेल?’’ रडून रडून सोनीनं सासूचा पदर ओला करून टाकला. सासू बिचारी तिच्या हुंदक्यांनी, डोळ्यातल्या पाण्यांनं आणि बोलण्यानं विरघळली होती. ‘‘म्हणून मी स्वत:ला त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करतेय. आई, माझ्या मनांत एक कल्पना आली आहे.’’

सोनीनं आईच्या वर्मावरच बोट ठेवलं. आईची कधीपासून इच्छा होती असं काही तरी करायची पण सोनीनं फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणताना त्यांनीही नाद सोडला होता. बाबा पक्के व्यापारी होते. काही चांगलं काम करून पैसा घरात येणार असेल तर त्यांची हरकत नव्हतीच. सोनीनं सासूशी भांडणही केलं नाही. रोहनची गैरवर्तणूक लपवून त्याच्यावर उपकारच केले होते. दुसरी स्टेपही यशस्वी झाली होती.

ऑक्टोबर महिन्यात भरपूर गरम झालं होतं. हवेतला असा बदल रोहनला नेहमीच त्रासदायक ठरायचा. त्याचा दमा अन् खोकला उफाळून यायचा. बिघडलेली तब्येत रूळावर यायला फार वेळ लागयचा.

सोनीनं शोधाशोध करून, गल्ल्याबोळ फिरून एका आयुर्वेदिक डॉक्टरकडून औषध मिळवलं होतं. त्या औषधामुळे गेली कित्येक वर्षं रोहनला खोकल्याचा, दम्याचा त्रास झाला नव्हता. वैद्यांनी दिलेली पाल्याची, मुळ्यांची औषधं सोनी स्वत: पाट्यावर वाटून मधातून सकाळसंध्याकाळ रोहनला देत असे. वेडीवाकडी तोंडं करत रोहन ती औषधं घ्यायचा. यावेळी सोनीनं वैद्यांकडून औषधं आणली नाहीत. वाटून, पूड करून रोहनला खाऊ घातली नाहीत. व्हायचं तेच झालं.

रोहनचा खोकला आटोक्यातच येईना. आठ दिवस खोकून खोकून तो थकून गेला. त्यात तीन दिवस तापही येत होता. डॉक्टरांची औषधं लागू पडत नव्हती. तोंडाची चव गेलेली…त्यात स्वयंपाकवाल्या बाईंच्या हातचा बेचव स्वयंपाक. रोहन वैतागला होता. संतापला होता. कारण सोनी त्याच्याकडे फिरकतच नव्हती. एकेकाळी त्याचं साधं डोकं दुखलं तर ती त्याच्याजवळून हलायची नाही आणि आता तापात होता तरी कपाळावर पाण्याच्या पट्टया आईच ठेवत होती. सोनीची दिनचर्या अजिबात बदलली नव्हती. त्याचा ताप उतरला आणि दोन दिवसातच बाबांना ताप आला. सोनी शांतपणे नव्या दिनक्रमात व्यग्र होती. आता मात्र रोहनचा संयम संपला. आता बोलायलाच हवं.

‘‘आता अधिक स्वातंत्र्य मिळणार नाही. बंद कर हा सगळा तमाशा.’’ रोहनच्या आवाजात हुकूमत आणि संतापही होता.

‘‘अन् ते नाही झालं तर?’’ नम्र सुरात, अत्यंत थंडपणे सोनीनं विचारलं.

‘‘नाही झालं तरचा अर्थ काय? नवरा आहे मी. कळतंय का तुला? नवरा म्हणून कर्तव्यात मी कसूर केली नाही. घर आहे की धर्मशाळा? तू जे करत आलीस ती तुझी जबाबदारीच होती ना?’’ अनावर संतापानं तो बोलत होता पण प्रश्न विचारला गेला आणि सोनीला बोलायची संधी मिळाली.

‘‘नाही, नाही…म्हणजे मला तसं काहीच म्हणायचं नाहीए…पण…’’ सोनी प्रेमानं बोलत होती पण वाक्य मुद्दामच अर्धवट सोडलं तिनं. मग काही क्षणानंतर म्हणाली, ‘‘ऐकायचंय मला काय म्हणायचं ते? असं करा, आरामात बसूनच बोलूयात. मी कॉफी करून आणते आणि तुमची आवडती बिस्किटंही आणते त्याच्या सोबत.’’ ती हसत उठली अन् कॉफी करायला गेली.

कॉफीचा कप त्याच्या हातात देत ती म्हणाली, ‘‘हा मनुष्य स्वभावच आहे…माणूस जे देतो त्याची आठवण तो नेहमीच ठेवतो, पण त्याला जे मिळतं त्याची त्याला आठवणही राहात नाही. तुम्ही मला एक चांगलं कुटुंब दिलंत. पुन्हा पुन्हा तुम्ही ते बोलून दाखवलंत, पण ते कुटुंब तृप्त, सुखी, संतुष्ट, निरोगी, आनंदी रहावं म्हणून मी किती कष्ट घेतले ते तुम्ही सोयीस्करपणे विसरलात…’’

‘‘पण मी असं कधी म्हणालो की तू घराच्या सुखासाठी कष्ट घेतले नाहीस म्हणून? तुझा स्वाभिमान मी कधी दुखावला?’’ रोहन अजूनही रागातच होता.

त्याच्या डोळ्यांत बघत, त्याचे हात हातात घेत सोनी म्हणाली, ‘‘मी घटस्फोट घेतला तर मला हवं ते तुम्ही द्याल हे किती सहजपणे बोललात तुम्ही रोहन? काय देणार होतात तुम्ही मला? आयुष्याची ही दहा वर्षं जी केवळ मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठीच जगले. कुटुंबाचा कणा होताना स्वत:चं अस्तित्त्वच उरलं नाही. ती दहा वर्षं आता फक्त माझ्या स्वत:च्या जगण्यासाठी तुम्ही मला परत करू शकाल? मी तुमच्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करते रोहन. लग्न झाल्यादिवसापासून माझे आयुष्य फक्त तुमच्याभोवती फिरतंय. दिवस तुमच्यापासून सुरू होतो, तुमच्यापाशी संपतो. मुलांची कस्टडी आणि काही रुपये माझ्या दहा वर्षांच्या तपश्चर्येचं कॉम्पेनसेशन असू शकतं,?’’ सोनीनं रडत रोहनला मिठी मारली.

पण रोहन इतकं भावनाविवश झाला नाही. सोनीची मिठी सोडवून घेत तो म्हणाला, ‘‘एक मिनिट, तू इथं बैस. तू गोष्टी उलट्यापालट्या करून ओव्हर रिएक्ट होते आहेस. तुला सारा आणि रीता नकोशा का वाटतात? तू त्यांना एक्सेप्ट का करू शकत नाहीस? मी काय प्रॉपटी दिलीय त्यांना? माझ्या कोणत्याही संपत्तीवर त्यांचा कुठलाही लीगल राइट नाहीए. आता त्यांच्या घराच्या आसपासचे, सोसायटीतले लोक मला त्यांचा नवरा म्हणून ओळखतात ते सोड. पण त्यांनीही कधी लिमिट क्रॉस केली नाही आणि घटस्फोट देण्याची गोष्ट मी बोललो नव्हतो. मी तर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण करणारच होतो. मी तुम्हा तिघींपैकी कुणालाच सोडू इच्छित नाही. मला तुम्ही तिघी हव्या आहात.’’

सोनी तुच्छतेनं हसली आणि बोलली, ‘‘तिघींपैकी कुणालाही? फॉर युअर काइंड इनफरमेशन…, तुम्ही जेव्हा त्यांच्या शहरात जाता तेव्हा तुमची कपड्यांची बॅग मी भरते. जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा मळके, चुरगळलेले कपड्यांचे बोळे निघतात बॅगेतून. त्या तुमचे कपडे धुवत नाहीत. कारण त्या तुम्हाला त्यांची जबाबदारी किंवा बांधीलकी मानत नाहीत. एकदा मुंबईची फ्लाइट कॅन्सल केली तुम्ही कारण तुम्हाला ताप आला होता. कारण आजारपण निस्तरणं, सेवा करणं त्यांना जमणार नव्हतं. तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नो ड्यूटीज, नो राइट्सच्या व्यवहारी प्रेमात माझ्या एकनिष्ठ प्रेमाला, कर्तव्यनिष्ठेला एकाच तागडीत तोलताय तुम्ही? त्यांच्यापासून काही लपवलं नाही, त्यांना सोडणार नाही इतकं कोरडेपणाने सांगून टाकलंत? आणि जिच्यापासून आयुष्यातली घोडचूक लपवलीत तिला सोडायला तयार झालात? त्या दोघी तुमचं प्रेम वाटून घेत असतील कारण तेवढं प्रेमही त्या तुमच्यावर करत नाहीत. जो बंधन स्वीकारतो तोच बांधू शकतो. त्यांना बंधन नकोय म्हणूनच त्या जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत.’’

प्रेम ‘मी’ केलंय तुमच्यावर. यावेळी औषध दिलं नाही तुम्हाला. तुमचा दमा, खोकला, ताप, सगळं बघत ऐकत होते. किती रडले मी त्या काळात. तुमच्या खोकल्यानं माझा श्वास कोंडत होता.

बोलता बोलता सोनीचा कंठ दाटून आला. ‘‘मग मीही विचार केला की उगीचच घटस्फोट घेण्यात अर्थ नाही. मांडलेला संसार फुकाफुकी मोडायचा कशाला? चूक तुमची आहे, मी का म्हणून शिक्षा भोगू? सारा अन् रिता स्वत:च्या आयुष्याच्या स्वत: निर्मात्या आहेत. माझे आयुष्य तुमच्याभोवतीच फिरतंय. तुमची आवड, तुमचा आनंद, तुमचं कुटुंब, तुमचं समाधान म्हणजे तुम्ही अन् फक्त तुम्हीच! स्वत:चं असं काहीच माझ्या आयुष्यात उरलं नाहीए. इतकी मी तुमच्यात विरघळून गेले आहे. पण जेव्हा लक्षात आलं की तिघी तुमच्या दृष्टीनं सारख्याच आहेत. तेव्हा मी विचार केला आपणही तुमच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बघूयात. नो ड्यूटीज, नो राइट्स! काही दिवसांसाठी मीही स्वत:चं आयुष्य स्वत:च्या कर्तबगारीवर, स्वत:च्या मर्जीनं जगून बघतेय. माझी आवड, माझी तृप्ती म्हणजे फक्त मी अन् मीच! फेसबुकवर शाळा कॉलेजातल्या मित्रमैत्रीणींचे ग्रुप मला मोहात पाडत होते. मी त्यांना जॉइन झाले आहे. उद्या त्यांच्यापैकी कुणाबरोबर माझे संबंध अधिक निकटचे झाले अन् ते तुम्हाला कळलं तर तुम्ही ओव्हररिएक्ट कराल की नाही ते मी ही बघेन!’’

रोहनचा चेहरा रागानं लाल झाला, ‘‘म्हणजे, तू मला…’’

‘‘माझं बोलणं अजून संपलं नाहीए.’’ रोहनला पूर्ण बोलू न देता तिनं म्हटलं, ‘‘आणि कुठे? दोघांपैकी केवळ एकासोबत राहणं त्यांना त्रासदायक होईल हे तुम्हीच ठरवून टाकलंत. पण खरी गोष्ट त्यांना समजली, तर त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार नाही केलात? आईवडिल मुलांचे रोल मॉडेल असतात. त्यांच्या त्या कल्पनेला धक्का लागला तर दोन गोष्टी घडतात. एक तर मुलं फ्रस्टे्रट होतात, डिप्रेस होतात नाही तर त्यांच्याच प्रमाणे वागू लागतात. तुमची करिअर माइंडेड मुलगी उद्या तुम्हाला म्हणाली की आईच्या आयुष्यापेक्षा मला स्वतंत्र, स्वावलंबी अन् मुक्त असं सारा किंवा रिताचं आयुष्यच आवडतं…मी नोकरी करेन पण लग्न न करता अमक्यातमक्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहीन तर तुम्हाला ते झेपेल का? किंवा तुमचा मुलगा सून न आणता…’’

रोहन खरोखर हादरला. हा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता. फक्त आपलं निरपराधित्त्व सिद्ध करण्याच्या नादात तो हा पैलू विसरलाच होता. तरी त्याने संतापून विचारलं, ‘‘मला धमकी देते आहेस?’’

‘‘नाही. अजिबात नाही. फक्त जे आयुष्य तुम्ही जगताय त्याचे परिणाम सांगतेय. मी तुम्हाला विनवते आहे, आपला सुखाचा संसार उगाच अट्टहासापायी मोडू नका. जे घडलं ते तिथंच सोडायची तयारी असेल तर मी ही सर्व विसरायला तयार आहे. कारण माझं मन, माझं शरीर, माझा आत्मा…सगळ्यात तुम्हीच आहात. मी तुमच्याहून वेगळी नाहीए. पण…जर त्यांना सोडणं तुम्हाला जमणार नसेल तर संसार मीही मोडणार नाही, पण उगीचच त्याला ठिगळं लावत बसायला मलाही जमणार नाही. स्वतंत्रपणे जगणं मला आवडतंय, जमंतही आहे. काय?’’

रोहनच्या हातावर थोपटून सोनीनं आपलं बोलणं पूर्ण झाल्याचं सूचित केलं आणि दिवा मालवून ती शांतपणे झोपून गेली. आता बॉल रोहनच्या कोर्टात होता. निर्णय त्याला घ्यायचा होता. नेहमीची वाक्पटुता आज कामी आली नव्हती…परिणामांचं गांभीर्य लक्षात आलं होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें