कथा * डॉ. नीरजा श्रीपाल
दीप्तीनं फोन उचलला अन् पलीकडून प्रसन्न, मनमोकळा, आनंदानं ओथंबलेला आवाज ऐकू आला. ‘‘हाय दीप्ती, माझी लाडकी मैत्रीण, सॉरी गं, दीड वर्षांनंतर तुला फोन करतेय.’’
‘‘शुची? कशी आहेस? इतके दिवस होतीस कुठं?’’ प्रश्न तर अनेक होते, पण दीप्तीला विचारण्याचा उत्साहच नव्हता.
शुचीच्या ते लक्षात आलं. तिनं विचारलं, ‘‘काय झालं? दीप्ती, इतकी थंड का? सॉरी म्हटलं ना मी? मान्य करते, चूक माझीच आहे, इतके दिवस तुला फोन करू शकले नाही पण काय सांगू तुला, अगं सगळाच गोंधळ होता. पण प्रत्येक क्षणी मी तुझी आठवण काढत होते. तुझ्यामुळेच मला माझा प्रियकर पती म्हणून मिळाला. तुझ्यामुळेच माझं मलयशी लग्न झालं. तू माझ्या आईबाबांना त्याचं नाव मलय म्हणून सांगितलंस. मोहसीन ही त्याची खरी ओळख लपवलीस. अगं, लग्नानंतर लगेचच मलयला अमेरिकेला जावं लागलं. त्याच्या बरोबरच मीही गेले पण पासपोर्ट, व्हिझा, अमुक तमुक करत वेळेत विमान गाठण्यासाठी खूप पळापळ झाली. त्यातच माझा मोबाइल हरवला.
प्रत्यक्ष तुला येऊन भेटायला तेव्हा वेळच नव्हता गं! कालच आलेय इथं, आधी तुझा नंबर हुडकला. सॉरी गं! आता तरी क्षमा केली म्हण ना? आता आम्ही इथंच राहणार आहोत. कधीही येऊन उभी राहीन. बरं आता सांग घरी सगळे कसे आहेत? काका, काकू, नवलदादा अन् उज्ज्वल?’’ एका श्वासात शुची इतकं बोलली पण दीप्तीची काहीच प्रतिक्रिया नव्हती. ‘‘अगं, मीच मघापासून एकटी बडबडतेय, तू काहीच बोलत नाहीएस...बरी आहेस ना? घरी सगळी बरी आहेत ना?’’ शुचीच्या आवाजातला उत्साह ओसरून त्याची जागा आता काळजीनं घेतली होती.
‘‘खूप काही बदललंय शुची, खूपच बदललंय या दिड वर्षांत. बाबा वारले. आई अर्धांगवायुनं अंथरूणाला खिळली आहे. नवलदादाला दारूचं व्यसन लागलंय. सतत दारू पितो. त्यामुळे कंटाळून वहिनीही लहान बाळासकट माहेरी निघून गेली आहे....’’
‘‘आणि उज्ज्वल?’’
‘‘तोच एक बरा आहे. आठवीत आहे. पण पुढे किती अन् कसा शिकू शकेल कुणास ठाऊक?’’ बोलता बोलता दीप्तीला रडू कोसळलं.