कथा * अर्चना पाटील
धारीणी आज प्रथमच नोकरीसाठी बाहेर पडली होती. रूद्र गेल्यापासून ती खूपच एकटी पडली होती. समीराची जबाबदारी पार पाडताना तिची दमछाक होत होती. समीराच्या आयुष्यातील वडील म्हणून रूद्रची रिकामी झालेली जागा धारीणीलाच भरून काढावी लागत होती. नोकरीमुळे तर धारीणीचे प्रश्न अजुनच वाढले. पण घरात बसुन किती दिवस निघतील? त्यामुळे धारीणीसाठी नोकरी ही गरज बनली होती. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून तिला जॉब मिळाला. पण रोजच रेल्वेने अपडाऊन हा सर्वात मोठा प्रश्न होता तिच्यासाठी, कारण सवय नव्हती त्या गोष्टींची. पहिल्या दिवशी धारीणी तिचा भाऊ सारंगसोबत आली. सारंगने त्याच्या मित्रांशी तिची ओळख करून दिली.
‘‘ताई, हे सर्वजण तुला मदत करतील. कोणालाही हाक मार.’’
‘‘नक्कीच, टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्ही.’’ घोळक्यातून एक आश्वासक आवाज आला.
‘‘ताई, हा मंदार शेटे. हा आणि तू सोबतच उतरणार आहात. संध्याकाळीही हा तिकडून तुझ्यासोबत असेल. तर मग मी निघू आता.’’
‘‘हो, निघ,’’ धारीणी नाराज होऊनच म्हणाली.
दोनच मिनिटात ट्रेन आली. धारीणी लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती. सारंगचे सर्व मित्रही त्याच डब्यात चढले.
‘‘अहो, हा लेडीज डबा आहे ना. मग तुम्ही सगळे याच डब्यात कसे?’’
‘‘अहो मॅडम, आम्ही रोज इथेच असतो. आपल्या गावाकडच्या ट्रेनमध्ये सगळं चालतं. ही काय मुंबई थोडीच आहे.’’ मंदारच परत बोलला.
धारीणी आता गप्पच बसली. मनातल्या मनात तिचा दिवस चांगला जावा असा विचार करू लागली. सावरगाव येताच धारीणी आणि मंदार ट्रेनमधून उतरले.
‘‘चला मॅडम, मी सोडतो तुम्हाला हॉटेलला.’’
‘‘नाही, नको उगाच तुम्हाला कशाला त्रास...’’
‘‘अहो, त्यात कसला त्रास. तुम्ही सारंगच्या बहीण.... सारंग माझा चांगला मित्र...सोडतो मी तुम्हाला...’’
धारीणीचाही पहिलाच दिवस होता. तीसुद्धा घाबरलेली होती. मंदारमुळे थोडसं हलकं वाटत होतं...म्हणून तीसुद्धा मंदारच्या गाडीवर बसून गेली. दिवस चांगलाच गेला. संध्याकाळी रेल्वेत पुन्हा ती मंदारला भेटली.
‘‘काय मग, कसा गेला आजचा दिवस धारीणी....सॉरी हं, मी जरा पटकनच एकेरीवर आलो.’’