कथा * मीरा सिन्हा
गगन यांचा बालपणापासूनचा मित्र. आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडल्यापासून माझा नवरा आशीष पुन्ह:पुन्हा म्हणत होता, ‘‘मला समजंतच नाहीए, संकर्षण किती गगनसारखा दिसतो, बोलतो, वागतोसुद्धा. जणू तो त्याचाच मुलगा असावा...नाक आहे तुझ्यासारखं, पण माझं तर त्याच्यात अगदीच काही जाणवंत नाही.’’
मी म्हटलं, ‘‘नाही कसं? तो तुमच्यासारखाच कुशाग्र बुद्धीचा आहे अन् थोडा संतापीसुद्धा...गगनभाऊ अगदीच शांत वृत्तीचे आहेत.’’
‘‘हो पण, आपला मुलगा म्हटल्यावर तो थोडा तरी माझ्यासारखा दिसायला हवा ना?’’
‘‘तुम्हाला सांगू का? माणसाचं व्यक्तिमत्त्व घडतं ते घरातल्या वातावरणामधून, घरातल्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून. जन्मल्याबरोबर मी त्याला श्रुतीच्या ओटीत घातला. त्या क्षणापासून तो त्यांच्या घरात, त्यांच्या संगतीत वाढतोय...त्याच्यावर त्याच घरातले, त्याच वातावरणातले संस्कार झालेत. दुसरं म्हणजे अपघातानं तो आपल्या कुटुंबात येऊ घातला होता. पण माझ्या मनांत आलं, श्रुतीला बाळ होऊ शकत नाही, तेव्हा हे बाळ मी माझ्या पोटात वाढवून श्रुतीच्या ओटीत टाकेन. तिलाही आई होण्याचं सुख मिळेल. माझ्या मनांत सतत श्रुती अन् गगन भाऊंचेच विचार असल्यामुळेही कदाचित तो आपल्यापेक्षा वेगळा झाला असेल...’’ मी म्हटलं.
‘‘हो...तेही खरंच, पण सीमा तू खरोखरंच महान आहेस हं! आपलं बाळ असं निर्लेज मनानं दुसऱ्याला देणं सोपं नाही.’’
‘‘खरंच, पण तुम्हाला सांगू का? श्रुती वहिनी अन् गगनभाऊंचं दु:ख मला बघवंत नव्हतं. तुम्ही त्यावेळी इथं नव्हता. पण श्रुतीला झालेलं ते भयंकर बाळ त्याचा मृत्यू...ते सगळं फारच भयंकर होतं. मी ते बघितलंय, अनुभवलंय श्रुतीची परिस्थिती बघून तर जीव इतका कळवळायचा...अन् त्या दोघांनी आपल्यासाठी खूप केलंय...त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो याचं फार समाधान आहे.’’
‘‘हो, हे मात्र खरं, गगन अन् वहिनी कधी परके वाटलेच नाहीत. पण तरीही आपलं बाळ दुसऱ्याला देणं इतकं सोपं नसतं. मला तर वाटत होतं की ते बाळ आपण परत आपल्याकडे आणूयात.’’
‘‘छे: छे:, भलतंच काय बोलता? श्रुती अन् गगनभाऊंचा मनांचा विचार करा. त्यांचं तर सर्व आयुष्य त्या बाळाभोवती फिरतंय. एक क्षण त्याच्या वाचून ती दोघं राहू शकत नाहीत.’’