अखेरची भेट

 * गरिमा पंकज

‘‘माझी एक इच्छा आहे, मला वचन दे तू ती पूर्ण करशील,’’ जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.

‘‘मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ,’’ मी भावनाविवश होत म्हटले.

‘‘बरं मग मी सांगते,’’ असे म्हणत ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळयांत माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होते की, तिच्या शांत, आनंदी, निळया डोळयांत माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहात होते… माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला.

तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता… आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, ‘‘फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की, मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन.’’

तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, ‘‘मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. मी एकटा राहून काय करणार?’’ असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले.

तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन माझी जान्हवी होती.

महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती जान्हवी होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की, हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. जान्हवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबीयांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीत राहिली. काही वर्षे आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो.

शिक्षण पूर्ण करून मी परत आलो तेव्हा लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. जान्हवीही एका कंपनीत काम करत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो.

एके दिवशी सकाळीच जान्हवी माझ्या मिठीत शिरली आणि हळूच म्हणाली, ‘‘नवरोबा आता तयारीला लागा. लवकरच तुला घोडा व्हावे लागेल.’’

तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘‘असे काय बोलतेस? घोडा आणि मी? का, कशासाठी?’’

‘‘तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का?’’ असे मला विचारताना जान्हवी लाजली. तिला काय सांगायचंय ते माझ्या लक्षात आले. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचा हात धरून म्हणालो, ‘‘आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’’

आम्ही दोघे एका वेगळयाच जगात पोहोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दल जास्त गप्पा होऊ लागल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचे, ते कसे ठेवायचे, तो काय आणि कसा बोलेल, काय करेल, यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो. एक संपूर्ण खोली मी बाळाच्या सामानाने भरली होती. जान्हवीची पूर्ण काळजी घेणे, तिला योग्य आहार आणि औषधे देणे, तिच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे, हे सर्व करताना मला आनंद मिळत होता.

काळ पंख लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला. जान्हवीच्या गरोदरपणाला ५ महिने उलटून गेले होते. त्या आनंदाच्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, पण आमच्या सुखाला गालबोट लागेल, हे आम्हाला कुठे माहीत होते?

तो मार्च २०२० चा महिना होता. संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानामुळे त्रासले होते. भारतातही कोरोना संसर्ग झपाटयाने पसरू लागला होता. मी जान्हवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता. त्यामुळे मी तिच्या आईला आमच्या घरी बोलावले, जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती जान्हवीची काळजी घेईल.

दरम्यान, एके दुपारी जान्हवीची बालपणीची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली. तिला भेटून जान्हवीला खूप आनंद झाला. जेव्हा जान्हवीने सांगितले की, प्रिया दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टनहून परतली आहे तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, ‘‘जान्हवी हे बरोबर नाही. तुला माहिती आहे का? परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात. जान्हवी, तू तिच्या जवळ जायला नको होतेस.’’

‘‘म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की, माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवे होते की, तू आत येऊ शकत नाहीस. मला भेटू शकत नाहीस. असे वागणे बरोबर आहे का अमन?’’

‘‘हो, बरोबरच आहे जान्हवी. तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहिती आहे का? आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे.’’

‘‘हो, पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते.’’

‘‘असेलही, पण जान्हवी माझे मन सांगतेय की, तू योग्य केले नाहीस. तू गरोदर आहेस. तुला जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपडयांमध्येही असतात. ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपा कर पण, माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस,’’ मी तिला समजावले.

‘‘ठीक आहे, पुन्हा कधीच नाही.’’

तो विषय आम्ही तिथेच थांबवला. दरम्यान, रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते.

त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला. मी ६-७ दिवस घरी जाऊ शकलो नाही. मी जान्हवीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे. कोरोना रुग्णांसोबत राहावे लागत असल्याने मी स्वत:हून घरी जाणे टाळत होतो, कारण हा विषाणू माझ्याकडून जान्हवीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते.

दरम्यान, एके दिवशी फोनवरून मला जान्हवीची प्रकृती बरी नसल्याचे समजले. मी विचारले असता २-३ दिवसांपासून कोरडा खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले. तापाची साधी औषधे घेऊन ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.

मी खूप घाबरलो. ही सर्व लक्षणे कोरोनाची होती. मी सुन्न झालो. एकीकडे जान्हवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २४ तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो. तिची प्रकृती बिघडतच चालली होती. तिच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की जान्हवीला वाचवणे आता शक्य नाही.

तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की, मला अश्रू अनावर झाले. माझा जीव असलेली जान्हवी मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळयांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो.

मला सुरुवातीपासून आजपर्यंतची जान्हवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला जान्हवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. शेवटी जवळ असण्याचे वचन. मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन.

मला माहीत होते की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेहही कुटुंबीयांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकचे आवरण घातले जाते. जान्हवी पुन्हा कधीच दिसणार नाही, तिला स्पर्श करता येणार नाही, अशी वेळ जवळ आली आहे हेही मला समजत होते. मी माझे वचन नक्की पूर्ण करेन, असे मी मनोमन ठरवले होते.

मी इतर डॉक्टर आणि परिचरिकांसह जान्हवीच्या खाटेपासून थोडया अंतरावर उभा होतो. सर्वांनाच काळजी वाटत होती. तेव्हाच मी माझा गाऊन काढला, हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून राहण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही.

मला माहीत होते की, आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. जान्हवीजवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठया कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले. काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हातांनी आधार दिला. आमच्या दोघांच्या डोळयांतून अश्रू वाहत होते.

तेवढयात जान्हवी माझ्यापासून दूर झाली आणि कसेबसे स्वत:च्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करू लागली, ‘‘नाही अमन नाही. कृपया जा, अमन, जा… माझे तु?यावर खूप प्रेम आहे.’’

‘‘माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे…’’ असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला, पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभे राहावे लागले.

माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांसोबत माझे ओठही सॅनिटाइज केले. मला लगेच अंघोळीसाठी पाठवण्यात आले.

अंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण जान्हवीसोबतची ती माझी अखेरची भेट होती हे मला माहीत होते.

छोटा पाहुणा

कथा * दीपा पांडेय

‘‘आई, आई,’’ असे ओरडत १० वर्षांचा ऋषभ घाईघाईने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. त्याच्या मागे ८ वर्षांची धाकटी बहीण मान्याही तिचा स्कर्ट सांभाळत आनंदाने आली.

अल्मोडा शहरातील उंच, वळणदार रस्त्यांवरून मुले त्यांच्या मित्रांसह दररोज सुमारे २ किलोमीटर चालत कॉन्व्हेंट शाळेत ये-जा करतात. पाठीवर दप्तराचे भलेमोठे ओझे असतानाही सर्व मुले हसत-खेळत घरातून शाळेत आणि शाळेतून घरी कधी जातात, हे त्यांचे त्यांना कळतही नाही. मुले घरी येण्याआधी दुपारपर्यंत रितिकाही तिची सगळी कामे उरकून घेत असे. मुलांना खायला देऊन ती त्यांना गृहपाठ करायला बसवत असे. दरम्यानचे दोन तास ती झोप काढत असे.

आज ऋषभचा आवाज ऐकून ती खोलीतून व्हरांडयात आली. एवढया कमी वेळात मनाला अनेक शंका-कुशंकांनी घेरले होते. रस्ता अपघात, दुर्घटना असे अनेक विचार तिच्या मनात डोकावले.

‘‘हे बघ, मी काय आणले?’’ खोडकर ऋषभने त्याच्या हातातील जवळपास दोन महिन्यांच्या पिल्लाला झोका देत सांगितले.

मान्या आईच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. तिला आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला असता तर तिनेही आपण यात सहभागी आहोत, असे सांगितले असते, नाहीतर सर्व दोष ऋषभच्या माथी मारायला ती तयारच होती.

‘‘तुम्ही पिल्लाला रस्त्यावरून उचलून का आणले? आता त्याची आई येईल. तिने तुमचा चावा घेतल्यावरच तुम्ही सुधाराल,’’ रितिका रागाने म्हणाली.

‘‘पिल्लू रस्त्यावरचे नाही आई. याचा जन्म शाळेत झाला. आमच्या आयाबाईंनी सांगितले की, ज्यांना हवे असेल त्यांनी घेऊन जा. शाळेत आधीच ४ डॉगी आहेत,’’ असे सांगत ऋषभने पिल्लाला जमिनीवर ठेवले. पिल्लू घाबरून कोपऱ्यात बसले आणि आपल्या भविष्याचा निर्णय काय होणार, याची वाट पाहू लागले.

‘‘चल, हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. याला उद्या शाळेत परत घेऊन जा. आपण त्याला ठेवून घेऊ शकत नाही. तुमच्या वडिलांना कुत्री-मांजरे अजिबात आवडत नाही.’’

‘‘पण त्यांच्या घरात गाय आहे ना? आजीने गाय पाळली आहे,’’ मान्या म्हणाली.

‘‘गाय दूध देते,’’ रितिकाने तर्क लावत सांगितले.

‘‘कुत्रा भुंकून घरासाठी पहारा देतो,’’ मान्याचा हा तर्क ऐकून ऋषभच्या डोळयांमध्ये चमक दिसू लागली.

‘‘मला पिल्लाचा त्रास नाही, पण तुमचे वडील ओरडले तर माझ्याजवळ येऊ नका.’’

आईचे बोलणे ऐकून दोघांचे चेहरे पडले.

जुन्या प्लास्टिकच्या वाडग्यात दूध भरून आणि त्यात ब्रेडचे तुकडे टाकून रितिका ते पिल्लासाठी घेऊन आली. वाडगा पाहाताच पिल्लू धावत आले. ते ऋषभ आणि मान्याकडे असे काही बघू लागले की, जणू त्यांच्याकडे खाण्याची परवानगी मागत आहे. पुढच्याच क्षणी त्याने खाण्यावर ताव मारला. वाडग्यातील सर्व चाटून खाऊन शेपटी हलवू लागले.

‘‘काकी, काकी…’’ अंगणातून मोठयाने कोणीतरी आवाज देत होते. रितिकाने वरून खाली डोकावून पाहिले. तिथे ऋषभच्या वयाच्या २ मुली शाळेच्या गणवेशात उभ्या होत्या.

‘‘काय झाले बाळांनो?’’ रितिकाने याआधी त्यांना कधीच पाहिले नव्हते.

‘‘काकू, ऋषभ आमचे पिल्लू घेऊन पळून आला,’’ त्या दोघींपैकी एकीने सांगितले.

‘‘साफ खोटे… आयाबाईंनी मला पिल्लू दिले आहे,’’ ऋषभने आरोप फेटाळत सांगितले.

‘‘आई, हे पिल्लू आम्ही शाळेतूनच आणले आहे. रस्त्यात आम्ही चौघांनी त्याला एकामागून एक उचलून घेतले होते. घर जवळ येताच तृप्ती त्याला तिच्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे दादा त्याला घेऊन पळतच आपल्या घरी आला,’’ मान्याने सांगितले.

‘‘काकू, ऋषभने सुरुवातीला सांगितले होते की, वाटल्यास तू पिल्लाला तुझ्या घरी घेऊन जा. त्यानंतर मात्र तो पळून गेला,’’ त्या मुलीने सांगितले.

कोणाला आणि काय समजवायचे हेच रितिकाला समजत नव्हते.

‘‘मी याला आता कोणालाच देणार नाही. मी याच्यासाठी खूप खर्च केला आहे,’’ ऋषभने ठामपणे त्याचा निर्णय ऐकवला.

‘‘काय खर्च केलास?’’ तिने खालून विचारले.

‘‘मी त्याला एक वाडगा दूध आणि ब्रेड खायला दिले. आता तो माझा आहे,’’ ऋषभ हट्टाला पेटला होता.

‘‘हे बघ बाळा, आज तू याला इथेच राहू दे. घरी जाऊन तुझ्या आईला विचार की, ती पिल्लाला घरात ठेवायला तयार आहे का? ती हो म्हणाली तर पिल्लाला घेऊन जा. ऋषभचे वडील त्याला इथे ठेवून घेणार नाहीत. तू घेऊन जाणार असशील तर उद्या तसे सांग, नाहीतर त्याला पुन्हा शाळेत सोडून यावे लागेल,’’ रितिकाने समजावून सांगताच दोन्ही मुलींनी होकारार्थी मान हलवली आणि त्या निघून गेल्या.

‘‘काहीही झाले तरी हे पिल्लू घरात येता कामा नये. त्याला इथेच अंगणात गादी घालून ठेवा. तुम्ही दोघे आत या.’’

रितिकाच्या बोलण्यानुसार ऋषभने पातळ दोरीने पिल्लाला दरवाजाला बांधून ठेवले. त्याच्या जवळ गादी घातली. तिथेच पाण्याने भरलेला वाडगा ठेवला. जेवल्यावर दोघेही गृहपाठ करू लागले. बाहेर पिल्लू सतत ओरडत होते. कदाचित दया येऊन त्याला आत येण्याची आई परवानगी देईल, या आशेने दोघेही आईकडे पाहात होते. रितिकाने मात्र त्यांना अभ्यासाला बसवले. काही वेळानंतर पिल्लाने भुंकणे बंद केले.

गृहपाठ पूर्ण होताच दोघेही धावतच अंगणात आले. ‘‘आई…’’ यावेळी मान्या आणि ऋषभने एकाच वेळी आवाज दिला.

रितिकाला डुलकी लागली होती. आवाज ऐकताच ती लगेचच उठून बाहेर आली.

‘‘आई, आमचे पिल्लू हरवले,’’ दोघांनी एकत्र रडवेल्या स्वरात सांगितले.

पिल्लाच्या गळयात बांधलेली दोरीची गाठ सुटून पडली होती. ती सैल बांधल्यामुळेच पिल्लाला ती सोडवता आली होती.

‘‘इथेच कुठेतरी असेल. टेबल, खुर्चीखाली बघ.’’

‘‘पायऱ्यांवरून खाली तर गेले नाही ना?’’ ऋषभने संशय व्यक्त केला.

रितिकाने पायऱ्यांकडे पाहिले. पायऱ्या थेट रस्त्यावर जाणाऱ्या होत्या.

‘‘आई, ते पिल्लू एखाद्या गाडीखाली तर येणार नाही ना?’’ मान्याला चिंता वाटू लागली.

‘‘तो पायऱ्या उतरू शकेल असे मला वाटत नाही. इकडे नसेल तर खाली अंगणात बघा. अक्रोड आणि मोसंबीच्या झाडाखाली जी झुडपे आहेत त्यात कदाचित लपून बसले असेल.’’

रितिकाने असे सांगताच ते दोघे धावतच पायऱ्या उतरून खाली गेले. त्यांच्यामागून रितिकाही खाली उतरली.

पिल्लाला खोलीत नजरेसमोर ठेवायला हवे होते, असे आता रितिकाला वाटू लागले होते.

खालच्या माळयावरच्या भाडेकरूची मुलेही ‘पिल्लू शोधा’ अभियानात सहभागी झाली. जवळपास २ तास उलटले. सूर्य अस्ताला जाऊ लागताच काळोख गडद होऊ लागला. त्यामुळे रितिका मुलांना घेऊन वर आली. मुलांचे उदास चेहरे पाहून तिलाही वाईट वाटले. मुलांची समजूत काढत ती म्हणाली, ‘‘तुमच्या वडिलांची यायची वेळ झाली आहे. पिल्लाबद्दल काहीच सांगू नका. बरे झाले तो स्वत:हूनच गेला.’’

दोन्ही मुले टीव्हीसमोर बसून कार्टून बघू लागली. मनातून मात्र दोघांना प्रचंड दु:ख झाले होते.

घरी आल्यानंतर काही वेळाने वडिलांनी विचारले, ‘‘गृहपाठ पूर्ण झाला का?’’

‘‘हो बाबा,’’ मान्याने चटकन उत्तर दिले.

‘‘आज गृहपाठ कोणता होता?’’ प्रकाशने विचारले.

‘‘बाबा, आज फक्त गणित आणि इंग्रजीसाठी लेखी गृहपाठ होता. तोंडी करायचा अभ्यासही व्यवस्थित तोंडपाठ आहे,’’ मान्या आपली वही काढून वडिलांना दाखवू लागली.

‘‘बाबा, इंग्रजीत निबंध लिहायचा होता – माझा आवडता पाळीव प्राणी,’’ मान्या उदास स्वरात म्हणाली.

‘‘म्हणजे? अजूनपर्यंत लिहिला नाही का?’’ प्रकाशने विचारले.

‘‘लिहिला. माझा आवडता प्राणी कुत्रा.’’ मान्याला रडू आवरता आले नाही. तिला पिल्लाची आठवण झाली.

‘‘बाबा, माझाही गृहपाठ तपासा,’’ ऋषभ स्वत:ची वही घेऊन आला. त्याने इशारा करून मान्याला तिथून निघून जायला सांगितले. मान्या तिची वही घेऊन स्वयंपाकघरात आईजवळ गेली.

आई रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. मान्याला बघून म्हणाली, ‘‘भूक लागली आहे का मान्या? फक्त ५ मिनिटे थांब.’’

‘‘नाही, मला काहीही खाण्याची इच्छा नाही. ते पिल्लू काळोखाला घाबरून गेले असेल ना? आई, आज तू डॉगीवर निबंध लिहून घेतलास. पिल्लामुळे माझ्या तो चांगला लक्षात राहिला. त्याचे पाय, त्याची शेपटी, त्याचे डोळे.’’

रितिकाने मागे वळून पाहात मान्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही मुले रितिकाजवळ आली.

‘‘तुम्ही दोघेही आपापल्या खोलीत जा,’’ रितिकाने सांगितले.

आज दोन्ही मुलांना झोप येत नव्हती. त्यांना उदास पाहून रितिका म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे.’’

‘‘कोणाची गोष्ट आहे?’’ ऋषभने विचारले.

‘‘कुत्रा आणि मांजराची,’’ रितिकाने सांगितले.

‘‘हो, मला समजले. तू तुझ्या मांजराची आणि मामाच्या कुत्र्याची गोष्ट सांगणार आहेस ना? मी त्या दोघांचा एकत्र बसलेला फोटो पाहिला आहे,’’ ऋषभने सांगितले.

‘‘हो, मीदेखील पाहिला आहे. दोघे एकाच गादीवर बाजूबाजूला बसले होते.’’ मान्या म्हणाली.

‘‘कुत्रा आणि मांजर आमच्या घरी कसे आले ते आता मी तुम्हाला सांगते,’’ रितिका म्हणाली.

जुलैचा महिना होता. बाहेर पाऊस पडत होता. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरून वाहात होते. तितक्यात आम्हाला म्याव म्याव असा आवाज ऐकू आला. चिंब भिजलेल्या मांजराच्या पिल्लाला पाहून मी स्वत:ला रोखू शकले नाही. त्याला कपडयात गुंडाळून आत घेऊन आले. सर्वांनी विचार केला की, पाऊस थांबल्यावर ते पिल्लू स्वत:हून निघून जाईल, पण तसे झाले नाही. आमच्याच घरात राहू लागले. कधीकधी तासोनतास घराबाहेर कुठेतरी असायचे, पण काहीही झाले तरी संध्याकाळी घरी परत यायचे.’’

‘‘आई, त्याचे आपल्या मामाचा डॉगी शेरूशी कधी भांडण झाले नाही का?’’ मान्याने विचारले.

‘‘नाही, जेव्हा आमची पुसी वर्षाची झाली तेव्हा आम्ही शेरूला रस्त्यावरून उचलून घरी आणले होते. तो पुसीला घाबरायचा. पुसी त्याच्यावर घर मालक असल्यासारखा अधिकार गाजवायची. म्याव म्याव करत त्याच्या अंगावर धावून जायची. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकत्र खेळू लागले. काही दिवसांतच शेरू पुसीपेक्षा आकाराने मोठा दिसू लागला तरीही तो पुसीला घाबरायचा. तो कुत्रा आहे आणि मांजराने त्याला घाबरायला हवे, हे त्या बिचाऱ्याला कुठे माहीत होते? तो आपले संपूर्ण आयुष्य पुसीला घाबरून राहिला,’’ रितिकाने सांगितले.

हे ऐकून दोन्ही मुले हसू लागली. ‘‘चला मुलांनो, उशीर झालाय, आता जाऊन झोपा,’’ वडिलांनी त्यांचा लॅपटॉप बंद करत सांगितले.

मुले लगेचच उठून निघून गेली. मध्यरात्री कसलातरी आवाज झाल्याने प्रकाशला जाग आली. त्याने खोलीतला दिवा लावला आणि इकडेतिकडे पाहू लागला.

‘‘काय झाले?’’ रितिकाने विचारले.

‘‘कधीपासून मला कसलातरी आवाज ऐकू येतोय.’’

‘‘कसला आवाज? चोर तर आला नसेल ना? असा विचार करून रितिका घाबरली आणि उठून बसली.’’

तितक्यात खाटेखालून पिल्लू बाहेर आले आणि भू भू करू लागले. प्रकाश घाबरून त्याला बघतच राहिला.

‘‘हे पिल्लू घरात कसे आणि कुठून आले?’’ तो आश्चर्याने ओरडत म्हणाला.

वडिलांचा आवाज ऐकून मुले धावत आली. त्यांना बघून पिल्लू शेपूट हलवू लागले.

‘‘बाबा, आम्ही याला शाळेतून घरी आणले होते. संध्याकाळपासून ते सापडत नव्हते. आम्हाला वाटले पिल्लू हरवले,’’ ऋषभने सांगितले.

‘‘बाबा, असे वाटते की, हा बदमाश गुपचूप आत आला असेल आणि तुमच्या  पलंगाखाली झोपला असेल,’’ मान्या म्हणाली.

‘‘हो, बिचारा ओरडून थकला असेल,’’ ऋषभने सांगितले.

‘‘मुले, उद्या याला शाळेत सोडून येतील,’’ रितिकाने स्पष्टीकरण देत सांगितले.

‘‘बाबा, आपण याला आपल्याकडे ठेवू शकत नाही का?’’ मान्याने विचारले.

प्रकाशने मुलांचे उदास, प्रश्नांकित चेहरे पाहिले आणि होकार दिला.

‘‘बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. आम्ही याचे नाव ब्रुनो ठेवतो,’’ मान्याने सांगितले.

‘‘नाही, याचे नाव शेरू असेल,’’ ऋषभ ठामपणे म्हणाला.

जो पिल्लाला फिरायला नेईल, त्याची शी-शू काढेल त्यालाच पिल्लाचे नाव ठेवायचा हक्क असेल,’’ रितिकाचे बोलणे ऐकून ऋषभ आणि मान्या एकमेकांचे तोंड बघत राहिले.

युक्ती

कथा * गरिमा पंकज

आई, तुला एक गोड बातमी सांगायची आहे.’’

‘‘हो का बाळा? सांग ना, कोणती गोड बातमी आहे? मी आजी होणार आहे का?’’ सरला देवींनी उत्सुकतेने विचारले.

नेहा लाजली आणि म्हणाली, ‘‘हो आई, असेच घडणार आहे.’’

आज सकाळीच नेहाला ही गोड बातमी समजली होती. तिने दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली होती. पती अभिनवनंतर तिने सर्वप्रथम तिच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती.

ही बातमी ऐकून आईने आनंदाने उडी मारली, ‘‘माझ्या बाळा, तू तुझ्यासारख्याच गोड मुलीची आई होशील. तुझी मुलगी माझ्यासारखी हुशार आणि तुझ्यासारखी सुंदर असेल.’’

‘‘आई,, मला मुलगी होईल हे तू आताच कसे काय सांगू शकतेस?’’

कारण माझ्या मनाला असे वाटतेय आणि मलाही हेच हवे आहे. माझ्या बाळा, तुला मुलगीच होईल. मी आताच ही बातमी तुझ्या वडिलांना सांगते.

नेहाने हसून फोन ठेवला आणि सासूबाईंना हाक मारली, ‘‘सासूबाई, तुम्ही आजी होणार आहात.‘‘

‘‘बाळा, काय सांगतेस काय? खरंच मला नातू होणार आहे? तू खूप छान बातमी दिलीस. मी कधीपासून याच दिवसाची वाट पाहात होते. सुखी राहा मुली,’’ सासू तिला आशीर्वाद देऊ लागली.

नेहा हसली आणि म्हणाली, ‘‘सासूबाई, कशावरून नातू होईल? मुलगीही होऊ शकते ना?’’

‘‘बाळा, मला नातू हवा आहे आणि बघत राहा, नातूच होईल. आता तू स्वत:ची खूप काळजी घ्यायला हवीस. जास्त वजन उचलू नकोस आणि लीला येणार आहे की नाही काम करायला?’’

‘‘हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, ती नियमितपणे घरकाम करायला येते. आजकाल फार सुट्टया घेत नाही.’’

‘‘तिला अजिबात सुट्टी देऊ नकोस. अशा अवस्थेत विश्रांती घेणे खूप गरजेचे असते. विशेषत: सुरुवातीचे आणि शेवटचे ३ महिने खूप महत्त्वाचे असतात.

‘‘हो सासूबाई, मला माहीत आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी स्वत:ची पूर्ण काळजी घेईन,’’ असे बोलून नेहाने फोन ठेवला.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नेहाला खूप मळमळ व्हायची. अभिनव तिची काळजी घेत होता. कामवालीही तिला जमेल तशी मदत करत होती. सर्व व्यवस्थित सुरू होते. नेहाला पाच महिने झाले होते. त्या दिवशी सकाळी ती बाल्कनीत उभी असताना तिला तिची आई गाडीतून उतरताना दिसली. तिच्या हातात एक मोठी बॅग होती. आई राहायला आली होती. आनंदाने नेहा खाली गेली. अभिनवही मागोमाग गेला.

आईच्या हातातून सुटकेस घेऊन पायऱ्या चढत त्याने विचारले, ‘‘आई, तुमच्या शिकवणी वर्गाचे काय होणार? इथे आलात तर मुलांना कसे शिकवणार?’’

‘‘बेटा, हल्ली ऑनलाइन क्लासेस होतात. त्यामुळे मला वाटले की, अशा अवस्थेत मी माझ्या मुलीसोबत असावे.’’

‘‘तुम्ही खूप छान केलेत आई. नेहालाही बरे वाटेल आणि तिची काळजीही घेतली जाईल.’’

‘‘हो बाळा, हाच विचार करून आले.’’

‘‘पण आई… तुझ्याशिवाय तिथे बाबा सर्व सांभाळू शकतील ना?’’ नेहाने शंका व्यक्त केली.

‘‘बाळा, तुझ्या वडिलांना सांभाळायला त्यांची सुनबाई आहे. आता ती त्यांची सर्व कामे करते. मी घरी फक्त आराम करते.’’

‘‘हो का? आई तू आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे,’’ नेहा आज खूप खुश होती. आज कितीतरी दिवसांनी तिला आईच्या हातचे खायला मिळणार होते.

नेहाची आई येऊन १० दिवस झाले होते. आई गरोदरपणात आवश्यक असलेले खायचे पदार्थ नेहाला वेळच्यावेळी करून स्वत:च्या इच्छेनुसार खायला घालायची. तिने नेहाला काय करावे, कसे बसायचे, हे शिकवले. तिच्या गरोदरपणावेळच्या गोष्टी ती नेहाला सांगायची. एकंदरीत, नेहा खूप छान वेळ घालवत होती. तिची आई खूप शिकलेली होती. ती महाविद्यालयात प्राध्यापिका होती. त्यामुळे जरा जास्तच शिस्तप्रिय होती. नेहाचा स्वभाव मात्र आईपेक्षा खूपच वेगळा होता. तरीही आई आणि मुलीचे नाते खूप गोड होते आणि या क्षणी नेहा तिच्या आईची जवळीक, तिचे प्रेम अनुभवत होती.

वेळ आनंदात जात होता, दरम्यान एके दिवशी अभिनवच्या आईचा फोन आला, ‘‘बाळा, मी तुमच्याकडे येतेय. नातवाला पाहण्याची खूप इच्छा आहे.’’

‘‘पण आई, तुझा नातू अजून कुठे आला आहे?’’ अभिनवने विचारले.

‘‘अरे वेडया, आला नसला तरी लवकरच येणार आहे. नेहाच्या पोटातील माझ्या नातवाची सेवा केली नाही तर मी कसली आजी? चल फोन ठेव, मला सामान भरायचे आहे.’’

‘‘पण आई, तुझा सत्संग आणि तू रोज ज्या चर्चासत्राला जातेस त्याचे काय? शिवाय तू खानावळही चालवतेस ना? ते सर्व सोडून तू इथे कशी काय राहू शकतेस?’’

‘‘अरे बाळा, खानावळ चालवायला मी दोघांना पगारावर ठेवले आहे. माधुरी आणि निलय अशी त्यांची नावे आहेत. दोघेही चांगल्या प्रकारे खानावळ सांभाळतात. ही वेळ परत येणार नाही. चर्चासत्रात तर मी नंतरही सहभागी होऊ शकते.

‘‘ठीक आहे आई, तू ये. नेहाची आईही आली आहे. तुला त्यांचीही सोबत होईल.’’

‘‘त्या कधी आल्या?’’

‘‘१५ दिवसांपूर्वी.’’

‘‘तू ये, आता मी फोन ठेवतो.’’

अभिनवची आई दोन दिवसांनी आली. नेहाच्या आईने त्यांचे मनमोकळेपणे स्वागत केले. अभिनवच्या आईनेही त्यांना मिठी मारली आणि सांगितले की, फार छान झाले, या निमित्ताने आपल्यालाही एकत्र राहता येईल. मनातून मात्र दोघींनाही एकमेकींबद्दल राग होता. लवकरच हा राग उघडपणे दिसू लागला.

नेहाची आई सकाळी ५ वाजता उठून नेहाला फिरायला घेऊन जायची. हे लक्षात येताच अभिनवची आई ५ वाजण्यापूर्वीच उठू लागली आणि नेहाला योगा शिकवू लागली. फेरफटका मारण्याऐवजी नेहाने गर्भधारणेदरम्यान उपयोगी पडणारी काही आसने शिकावीत यासाठी त्या तिच्या मागे लागल्या. इकडे नेहाच्या आईला तिला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायचे असायचे. कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, असा संभ्रम नेहाला पडायचा.

नेहाची आई नाराज झाली होती, ‘‘ताई, ही माझी मुलगी आहे आणि मी तिला यावेळी फिरायला घेऊन जाणार आहे.’’

‘‘ताई, पण ही व्यायामाची वेळ आहे. तुम्ही का समजून घेत नाही? मी माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून योगा केला, मग बघा कसा निरोगी मुलगा झाला,’’ अभिनवची आई म्हणाली.

अभिनवने लगेच यावर तोडगा शोधला आणि आईला समजावून सांगितले की, ‘‘आई नेहा सकाळी व्यायाम करेल आणि संध्याकाळी योगा करेल. शिवाय संध्याकाळी योगा करणे खूप चांगले असते, कारण त्या वेळी वातावरणात भरपूर ऊर्जा असते.’’

त्यानंतर रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून दोघींमध्ये खटके उडू लागले. नेहाची आई नेहाला जे काही करायला सांगायची ते अभिनवची आई काहीतरी निमित्त काढून तिला करू देत नसे. दोघीही नेहाच्या आवडीबद्दल बोलत असत, पण कुठेतरी त्यांचा हेतू एकमेकींना अपमानित करून स्वत:ला वरचढ दाखवायचा असायचा. अभिनव आणि नेहा असा विचार करत होते की, हळूहळू सर्वकाही ठीक होईल, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, दोघींपैकी कुणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हते.

त्या दिवशीही उठल्यावर नेहाच्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिला रस प्यायला दिला आणि म्हणाली, ‘‘बेटा, अशा अवस्थेत गाजर आणि बिटाचा रस पिणे फायदेशीर असते.’’

तेवढयात अभिनवची आई तिथे आली. ‘‘अरे बेटा, असा रस पिऊन काही होणार नाही. डाळिंब, सफरचंद अशी कच्ची फळे सकाळी खावीत. त्यामुळे शरीराला फायबरसोबतच ताकदही मिळते. एवढेच नाही तर डाळिंब रक्ताची कमतरताही भरून काढते.’’

हे ऐकून नेहा दोघांकडे बघतच राहिली. त्यानंतर दोघांकडील वस्तू घेऊन म्हणाली, ‘‘या दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी रसही पिईन आणि फळेही खाईन. तुम्ही दोघी बाहेर फिरून या. तोपर्यंत मी जरा आराम करते.’’

दोघी बाहेर गेल्यावर नेहाने सुटकेचा निश्वास टाकला आणि अभिनवला हाक मारली. अभिनव बाजूच्या खोलीतून आला आणि म्हणाला, ‘‘हे काय सुरू आहे? दोघीही ऐकायला तयार नाहीत. रात्री १२ वाजेपर्यंत तुझ्यासोबत असतात, आपल्याला स्वत:साठी अजिबात वेळ मिळत नाही.’’

‘‘हो अभिनव, मीही तोच विचार करत आहे. दोघीही छोटया-छोटया गोष्टींवरून भांडतात. माझ्या आईला वाटते की, ती प्राध्यापिका आहे, त्यामुळे तिला जास्त समजते, तर तुझ्या आईला अभिमान आहे की, तिने तुला स्वत:च्या बळावर वाढवले आहे. त्यामुळे मी तिच्या सल्ल्यानुसार वागायला हवे.’’

‘‘अगं, मला तुझ्याशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायची इच्छा होते. पण काय करणार? या दोघींच्या शीतयुद्धात आपण आपला एकांत, आपली शांतता गमावून बसलो आहोत.’’

तितक्यात दोघीही फेरफटका मारून आल्या. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. ‘‘सरला ताई, नेहाला जास्त गोड खायला देऊ नका. तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.’’

‘‘पण नयना ताई, मी स्वत:च्या हाताने बनवलेले हे डिंक आणि सुक्यामेव्याचे लाडू आहेत. गरोदरपणात माझ्या सासूबाई मला हे सर्व खायला द्यायच्या. त्यामुळेच मला अभिनवच्या जन्मावेळी कोणतीही अडचण आली नाही. अभिनव जन्माला आला तेव्हा ४ किलो वजनाचा होता. तो इतका सुदृढ आणि सुंदर होता की, नर्ससुद्धा त्याला मांडीवर घ्यायच्या.

अभिनवने नेहाकडे पाहिले आणि दोघेही हसले. नेहाची आई कुठे माघार घेणार होती? ती लगेचच म्हणाली, ‘‘ताई, माझ्या सासूबाईंनी मला गरोदरपणात विविध प्रकारचे आयुर्वेदिक काढे आणि फळांचे सूप दिले होते. त्यामुळेच नेहा लहानपणापासून कधी आजारी पडली नाही आणि तिचा रंग किती गोरा आहे. माझ्या वहिनीच्या मुलाला लहानपणी कधी खोकला तर कधी ताप यायचा, पण नेहा खेळत-उडया मारत मोठी झाली.’’

हे ऐकून अभिनवची आई लगेच म्हणाली, ‘‘अहो ताई, बाळ गर्भात असताना असा कोणता काढा तुम्ही प्यायला दिला होता जो प्यायल्यामुळे तुमची मुलगी अजूनपर्यंत निरोगी राहिली? असे कधी काही घडत नसते. तुम्ही कोणत्या भ्रमात जगत आहात?’’

‘‘ताई, मी भ्रमात जगत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच मी हे सर्व सांगत आहे. माझ्या परिसरात कोणाची सून गरोदर राहिली तर तिच्या सासूबाई आधी तिच्या सुनेच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची, याचा सल्ला घ्यायला माझ्याकडे येतात. भ्रमात तर तुम्ही जगत आहात.’’

नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. नेहा आणि अभिनव नेहमीप्रमाणे भांडण मिटवू लागले. आता हे रोजचेच झाले होते. कधी होणारे बाळ हे मुलगा असेल की मुलगी, यावरून दोघी भांडायच्या. त्यामुळे नेहा आणि अभिनव या दोघांचाही दिवस दोघींचे भांडण सोडवण्यात जायचा. एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती.

एके दिवशी अभिनव म्हणाला, ‘‘नेहा, आता आपल्या या समस्येवर उपाय शोधायलाच हवा.’’

‘‘आपण एक गंमत करूया,’’ असे म्हणत नेहाने अभिनवच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघेही हसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाच्या वडिलांचा फोन आला. त्यांना त्यांच्या पत्नीशी बोलायचे होते.

नेहाच्या आईने फोन उचलला, ‘‘कसे आहात?’’

‘‘फक्त तुझी खूप आठवण येत आहे, राणी साहेब.’’

‘‘माझी आठवण का येत आहे? मी तर नुकतीच इकडे आले आहे.’’

‘‘अगं, तू २ महिन्यांपूर्वी तिकडे गेली आहेस आणि तुला माहीत आहे का, मी गेल्या रविवारपासून खूप आजारी आहे.’’

‘‘का? काय झाले तुम्हाला? मला कळवलेत का नाही?’’ नेहाच्या आईने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘अचानक रक्तदाब वाढला आणि मला चक्कर आली. मी बाथरूममध्ये पडलो. उजव्या पायाचा गुडघा दुखावला. मला चालता येत नाही. सुनेकडून सर्व सेवा करून घ्यायला बरे वाटत नाही. आपल्या मुलाने काठी आणून दिली आहे. पण असे वाटते की, तुझ्या खांद्याचा आधार मिळाला असता तर खूप बरे झाले असते.’’

‘‘अहो, इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आता सांगताय? तुम्ही आधी फोन केला असता तर मी लवकर आलो असतो.’’

‘‘काही हरकत नाही, आता ये. मी अभिनवला तुझे तिकीट काढून द्यायला सांगितले आहे. फक्त तू ये.’’

‘‘येते, लवकर येते. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त नेहाची काळजी वाटत होती, म्हणून मी इथेच थांबले होते,’’ त्यांनी नेहाकडे बघत सांगितले.

‘‘नेहाच्या सासूबाई आहेत ना तिकडे? त्या घेतील तिची काळजी. तू माझा विचार कर,’’ नेहाचे वडील खट्याळपणे हसत म्हणाले.

नेहाची आई हसली, ‘‘तूम्ही कधीच बदलणार नाहीस. चला, येते मी लवकर.’’

अभिनवने तिकीट काढून दिले. दुसऱ्याच दिवशी नेहाला हजार सूचना देऊन नेहाची आई तिच्या घरी गेली. नेहा आणि अभिनवने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता नेहाच्या सासूबाईही तिला आवश्यक तेवढयाच सूचना करू लागल्या. नेहा आणि अभिनवला एकमेकांसाठी वेळ मिळू लागला.

अशातच दीड महिना निघून गेला. नेहाला आठवा महिना लागला होता. आता ती कोणतेही काम करू शकत नव्हती. घरातली सर्व कामे मोलकरीण करायची आणि सासू नेहाला सांभाळायची.

सर्व काही ठीक चालले होते, मात्र एके दिवशी अचानक नेहाच्या आईचा पुन्हा फोन आला, ‘‘बाळा, आता तुझे वडील बरे आहेत. मी उद्या-परवा तुझ्याकडे राहायला येते.’’

‘‘पण आई, आता तुला घाई करून यायची गरज नाही.’’

‘‘गरज कशी नाही, बेटा? हे तुमचे पहिले बाळ आहे. मी तुझ्याजवळ असायला हवे. मलाही काही डझनभर मुले नाहीत. तू आणि तुझा भाऊ. मला तुझी काळजी घ्यावीच लागेल. तुझ्या सासूबाईंच्या हातून काही होणार नाही. चल, फोन ठेव, मला तयारी करू दे.’’

फोन ठेवत नेहा घाबरलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘अभिनव आता काय करायचे? पुन्हा तेच महाभारत सुरू होणार आहे.’’

‘‘काय झाले नेहा?’’ अभिनवने विचारले.

‘‘आई पुन्हा राहायला येणार आहे. किती दिवस वडील पाय दुखत असल्याचा बहाणा करणार?’’ नेहा उदासपणे म्हणाली.

‘‘निराश होण्यासारखे काही नाही. आता तीच युक्ती माझ्या आईसाठी वापरायची. तू थांब, मी काहीतरी विचार करतो.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनव त्याच्या आईकडे गेला. ‘‘आई, तुला आठवते का? गेल्या वर्षी तू शिमलाला होणाऱ्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात सहभागी होणार होतीस. तुला तिथे होणाऱ्या कार्यशाळेत भाग घ्यायचा होता. पण शेवटच्या क्षणी लतिका काकूंची तब्येत बिघडली आणि तुम्ही दोघीही जाऊ शकला नाहीत.’’

‘‘हो बेटा, तुझ्या लतिका काकूंची तब्येत बिघडली होती आणि मला तिच्याशिवाय एकटीला जायचे नव्हते. त्यामुळे मी जाऊ शकले नाही.’’

‘‘यावेळेस लतिका काकूंनी पूर्ण तयारी केली आहे. तू जाशील ना त्यांच्यासोबत?’’

‘‘नाही बाळा, यावेळेस मी जाऊ शकणार नाही. माझा नातू येणार आहे. पुढच्या वर्षी जाईन.’’

‘‘पण आई, कदाचित तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कारण पुढच्या वर्षी लतिका काकू त्यांच्या सूनेसोबत हैद्रराबादला असेल. तुझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि तू नातवाची काळजी का करतेस? तू जोपर्यंत शिमल्यात असशील तोपर्यंत नेहाची आई त्याची काळजी घेईल. दोन-तीन दिवसांत ती येणार आहे.’’

‘‘पण बेटा…’’

‘‘काही पण वगैरे नाही. तू जास्त विचार करू नकोस, आताच तयारी कर. तुला ही संधी पुन्हा मिळणार नाही, कारण तू पुन्हा एकटी जाऊ शकणार नाहीस.’’

‘‘ठीक आहे बेटा. सांग लतिका काकूंना की, माझेही तिकीट काढ.’’ अभिनवची आई सामान भरू लागली.

‘‘आई शिमल्याहून परत येईपर्यंत आपले बाळ या जगात आलेले असेल आणि त्यामुळेच पुन्हा दोन आईंच्या सल्ल्यांमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,’’ असे म्हणत नेहा आणि अभिनवने पुन्हा एकदा सुटकेचा नि:श्वास सोडला.’’

प्रतिक्षा फक्त तुझ्या होकाराची

कथा * मिनी सिंह

आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, हे समजल्यावर दिव्याला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आयुष्य उद्धवस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा… कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा,’’ असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली.

पाणावलेल्या डोळयांनी काहीही न बोलता नूतन खोलीबाहेर आल्या.

शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतनच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली, याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. दिव्याच्या मनात कुणी दुसरे तर नाही… हेही जाणून घेतले नाही. दिव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की, तिचं अक्षतवर प्रेम आहे… पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अक्षत आणि दिव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत दिव्यासोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की, बिचारा घाबरून जायचा. दिव्यावर प्रेम आहे, हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो दिव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्नं पाहायची.

‘‘निलेश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात?’’

दिव्याचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र दिव्या मनापासून लग्नासाठी तयार आहे का? हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून दिव्याने जड अंत:करणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवातेवढा हुंडा मिळाला.

‘आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले, तरी काय फरक पडणार?’ असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे, हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढया मोठया घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे लोक कौतुकाने म्हणत.

काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून दिव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की, अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वत:चेच डोळे पुसत होता.

सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहात होती. तो येताच दिव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वत:ला सावरले, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की, तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल?

क्षणभर दिव्या सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले, हे ऐकून दिव्याच्या मनावर मोठा आघात झाला.

जाणूनबुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला? असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. दिव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली.

सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठयांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला, याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे, हेच तिला सूचत नव्हते, कारण रिसेप्शनवेळी निलेश असा काही वागत होता जसे की, त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. दिव्याला असे वाटले की, कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल.

पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल.

एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू-सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की, तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि नूतन यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे, हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त दिव्यालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती.

सासरी येऊन दिव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसांत एकदाही निलेश दिव्याच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे दोन शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतेय आणि ती इतकी शांत का आहे, हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय, हे ती सर्वंना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? असा विचार करून ती गप्प होती.

एकदा झोपेतच दिव्याला असे वाटले की, कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला, पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपडयांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होते.

‘‘तू… तुम्ही, इथे माझ्या खोलीत… का… काय करताय इथे बाबा?’’ असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वत:जवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दिव्याला तिच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता की, तिचा सासराच तिच्यासोबत…

‘‘मी, मी तुमची सून आहे. मग तुम्ही माझ्यासोबत असे…’’ प्रचंड घाबरलेली दिव्या अडखळत बोलत होती.

‘‘सून…’’ मोठयाने हसत तो म्हणाला, ‘‘तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे.’’

हे ऐकून दिव्याला वाटले की, जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, ‘‘वेडयासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीय का?’’

तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो दिव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत दिव्याने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा.

‘‘खूप झाला हा उंदिर, मांजराचा खेळ… नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतेय ते होऊ दे.’’

सासूच्या तोंडून हे ऐकून दिव्याला काहीच सूचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल, असे तिला वाटले. कसेबसे स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुम्हाला माहीत आहे की, तुमचा मुलगा…’’

‘‘हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती.’’

‘‘पण मीच का… हो गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी… का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना?’’ रागाने दिव्या म्हणाली, ‘‘तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे, हे सर्वांना सांगेन.’’

‘‘काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे… विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की, तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस.’’

दिव्याचे केस ओढत निलेश म्हणाला, ‘‘तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर…’’ बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले.

संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, ‘‘हे बघ सूनबाई, जे घडतेय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे.’’

हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल दिव्याला तिरस्कार वाटू लागला होता. दिव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही दिव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते, हे आता तिच्या लक्षात आले होते.

लग्नाला ३ महिने झाले होते. या ३ महिन्यांत असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वत:ला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा दिव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा दिव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत, असे ते दिव्याच्या वडिलांना भासवायचे.

आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे, असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव दिव्याला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चूकवून दिव्या पळून गेली.

आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेडया मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर दिव्याच्या आईवडिलांनी केला आहे.

‘‘हो का, असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही, याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का, याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालिनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की, मी काय करू शकतो. मोठयात मोठया न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही… तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही,’’ असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली.

‘‘काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही.’’ घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले.

त्यांना वाटू लागले की, हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रु जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या, जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका.

‘पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये’, असा विचार करून मनोहर शांत झाले, मात्र निलेशने लवकरात लवकर दिव्याला घटस्फोट द्यावा, अशी अट त्यांनी घातली.

दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच दिव्याला घटस्फोट मिळाला.

आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून रहायची. नीट खात नव्हती. कुणाशी बोलत नव्हती. ‘मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरेवाईट तर करून घेणार नाही ना?’ असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वत:लाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे, हेच त्यांना समजत नव्हते.

‘‘दिव्या बाळा, बघ कोण आले आहे,’’ तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. ‘‘अक्षत,’’ तिच्या तोंडून शब्द फुटले.

एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत, हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वत:च दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. ‘आता मात्र अक्षतच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता,’ असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली.

थोडासे संकोचत अक्षतने विचारले, ‘‘कशी आहेस दिव्या?’’ तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. ‘‘मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत…

आठवतेय का?’’ तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही दिव्या गप्प होती.

अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चूकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे? कँटिनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे…? तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहात होती.

तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘‘दिव्या तू स्वत:ला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वत:ला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दु:ख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना?’’

‘‘तर मग, मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले?’’ डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या.

दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत म्हणाला, ‘‘कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की, आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वत:चे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की, आपण आपली वाट स्वत: शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे, सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे.

‘‘दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे… तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल, याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना? त्यांच्यासाठी, स्वत:साठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल दिव्या…’’

अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, ‘‘आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत?’’

‘‘कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ… तुझ्या समोर तुझे सुंदर जग आहे,’’ अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की, दिव्या अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकटयाला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे दिव्या. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन.

अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्सबोक्शी रडू लागली, जणू कधीचे साचून राहिलेले दु:ख घळाघळा डोळयांतून ओघळत होते. मनातले दु:ख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले.

बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळयांतूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.

विस्मरणात जाणारा भूतकाळ

कथा * उषा साने

बऱ्याच वर्षांनंतर मी माझे फेसबूक अकाउंट उघडले, तितक्यात चॅटिंग विंडोमध्ये ‘हाय’ असे ब्लिंक झाले. सुरुवातीला मी लक्ष दिले नाही, मात्र सतत ब्लिंक होतच राहिल्यामुळे मनात विचार आला की, कोणीतरी बोलण्यासाठी आतूर झाले आहे. नक्कीच ती व्यक्ती माझ्या फेसबूकवरील मित्रपरिवारापैकी होती. बोलण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याचे नाव कौशल होते. मी बोलणे टाळले. कारण मला चॅटिंगची आवड नव्हती. पण समोरची व्यक्ती धीट होती. थोडया वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मेसेज पाठवला. ‘तुम्ही कशा आहात मॅडम…?’ या प्रश्नाचे उत्तर न देणे शिष्टाचाराला धरून नव्हते. त्यामुळे मनात नसतानाही ‘बरी आहे,’ असे मी लिहिले. त्याला पुढे बोलू न देण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्याकडे वेळ नाही, असे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा मेसेज आला, ‘कामात आहात का मॅडम…?’ माझ्या ‘हो’ अशा त्रोटक उत्तरानंतर त्याने परत मेसेज पाठवला, ‘बरं… पुन्हा केव्हा तरी बोलूयात मॅडम’ मीही ‘हो’ म्हणून सुटकेचा श्वास टाकला. तेवढयात दारावरची घंटी वाजली. घडयाळात पाहिले तर संध्याकाळचे ६ वाजले होते. वाटले की, राजीव कामावरून आला असेल.

जसा मी दरवाजा उघडला तसे, ‘‘काय सुरू आहे मॅडम…?’’ राजीवने विचारले. मला चिडवायची इच्छा झाल्यास तो मला मॅडम म्हणतो. त्याला माहीत आहे की, मॅडम म्हटलेले मला अजिबात आवडत नाही.

‘‘काही विशेष नाही. फक्त नेटवर सर्फिंग करत होते…’’ मी थोडेसे चिडूनच उत्तर दिले. राजीव हसला. तो हसला की मी राग विसरून जायचे. माझा राग कसा घालवायचा, हे राजीवला बरोबर माहीत होते. म्हणूनच मला चिडवल्यानंतर तो अनेकदा असाच मिस्किल हसायचा.

‘‘बरं, आले घातलेली गरमागरम चहा आणि चहासोबत गरमागरम भजी मिळाली तर आपला दिवस, म्हणजे संध्याकाळ मस्त होईल…’’ त्याच्या अशा बोलण्यावर मला हसू आले. बाहेर खरोखरंच पाऊस पडत होता. घरात असल्यामुळे माझ्या ते लक्षात आले नव्हते. मी चहा, भजीची तयारी करू लागले आणि राजीव हात-पाय धुवायला गेला. आपल्या दोघांची आवडीची जागा असलेल्या बाल्कनीत चहा पिऊया, असे तो म्हणाला. तो खूपच आनंदी दिसत होता.

मला रहावले नाही. ‘‘काय झालेय…? खूपच आनंदात दिसतोस…’’ मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘अरे… तुला कसे समजले…? त्याने आश्चर्याने विचारले.’’

‘‘तुझी अर्धांगिनी आहे. १५ वर्षांत मला इतकेही समजणार नाही का…?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘हो, तू बरोबर बोलतेस.’’ तो थोडेसे गंभीर होत म्हणाला.

काही वेळ आम्ही शांतपणे चहा, भजी खात होतो. काही वेळानंतर राजीव माझ्याकडे खोडकर नजरेने पाहून हसला आणि मी त्याच्या मनातले बरोबर ओळखले.

‘‘खोडकरपणा अजिबात चालणार नाही…’’ मी लाजतच सांगितले. त्यानंतर आम्ही घराच्या अंतर्गत सजावटीबाबत गपा मारू लागलो. घरात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. आम्ही अलीकडेच येथे राहायला आलो होतो. घराची अंतर्गत सजावट बाकी होती. कोणत्या खोलीत कोणता रंग लावावा, यावरून राजीव आणि मुलांमध्ये मतभेद होते. आमचे बोलणे सुरू असतानाच मुलगा शुभांग आणि मुलगी शिवानी दोघेही आले. त्यांच्या हट्टामुळे राजीव त्यांना बाजारात घेऊन गेला. पाऊस पडतोय, जाऊ नका, असे म्हणत मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. राजीवने गाडी काढली. मलाही सोबत येण्याचा आग्रह केला, पण घर नीट करूया, असा विचार करून मी जाणे टाळले.

काम आटोपल्यानंतर थोडी उसंत मिळाली. सहज लॅपटॉपकडे नजर गेली. थोडा वेळ सर्फिंग करूया, असा मी विचार केला. इंटरनेट सुरू केला. फेसबूक सुरू करण्याचा मोह झाला. फेसबूक उघडताच कैलाशने लगेच ‘नमस्कार’ असा मेसेज पाठवला. मला विशेष काही काम नव्हते. राजीव आणि मुले लवकर येणार नव्हती. त्यामुळे विचार केला की, कौशलसोबत गप्पा मारून वेळ घालवू.

‘नमस्कार’ असे मी लिहिले. त्याने लगेच प्रश्न विचारला, ‘तुम्ही फुलपाखरू आहात का?’ मी गोंधळले. हा काय प्रश्न आहे? तितक्यात त्याने मी प्रोफाईवर ठेवलेले चित्र दाखवले. याबाबत मी कधी विचार केला नव्हता. ते चित्र आवडले म्हणून मी प्रोफाईलला ठेवले होते. हाच प्रश्न त्याने पुन्हा विचारताच मी चिडले. काहीतरी कारण देऊन फेसबूक बंद केले. त्याचे नाव डिलिट करावे, असे मला वाटत होते. पुढच्या वेळेस हेच करायला हवे, असा विचार करून मी उठले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले.

पुढचे काही दिवस घराच्या अंतर्गत सजवटीतच निघून गेले. आता ते काम पूर्ण झाले होते. घर सुंदर दिसू लागले होते. त्यामुळे एक खूप मोठे ओझे हलके झाले, असेच काहीसे वाटत होते. त्या दिवशी मुले आणि राजीव यापैकी कोणीच घरी नव्हते. विरंगुळा म्हणून नेट सुरू केला. मेल उघडून पाहिले, पण त्यात एरमाच्या मेलशिवाय विशेष काही नव्हते. तिने लिहिले होते की, तिला नवीन नोकरी मिळाली आहे. त्यासाठी ती लॉस इंजेलिसला जाणार होती. तिची कंपनी लवकरच तिला भारतातही पाठवणार होती. मी मेल करून तिचे अभिनंदन केले आणि भारतात आल्यावर माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. ती माझी फेसबूक मैत्रीणही होती. त्यामुळे मी फेसबूक सुरू केले. कितीतरी मेसेज आले होते. मला आजपर्यंत इतके मेसेज कधीच आले नव्हते. बघितले तर ७-८ मेसेज कौशलचे होते. ‘कशा आहात तुम्ही…?’, ‘नाराज आहात का…?’, ‘तुम्ही फेसबूक बंद करून का ठेवता…?’ इत्यादी. ते मेसेज वाचून मला राग आला.

मी त्याचे नाव डिलिट करणारच होते की, तितक्यात दारावरची घंटा वाजली. मी दरवाजा उघडायला जाणार तोच बाहेरून शिवांगचा आवाज ऐकू आला. ‘‘आई, लवकर दरवाजा उघड, आईस्क्रिम वितळून जाईल.’’

मला माहीत होते की, मी लवकर दरवाजा न उघडल्यास त्याच्या मोठया आवाजामुळे आजूबाजूचे बाहेर येतील. घाईगडबडीत मी नेट बंद करायला विसरले.

राजीव बाहेरून भरपूर जेवण घेऊन आला होता, म्हणजे रात्री जेवण करायची गरज नव्हती. राजीवने चहा मागितला. मी आमच्या दोघांसाठी चहा घेऊन आले. चहा पिताना माझ्या लक्षात आले की, मी नेट बंद करायला विसरलेय. माझे फेसबूक खाते उघडेच होते. नवीन दोन मेसेज माझी वाट पाहात होते. मला ते उघडून बघण्याचा मोह आवरता आला नाही. एक मेसेज कवी प्रदीप यांचा कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण देणारा होता. दुसरा कौशलचा होता. तो वाचून माझा राग अनावर झाला. त्याची गाडी एकाच ठिकाणी अडकली होती. ‘तुम्ही नाराज आहात का…?’ ‘तुम्ही उत्तर का देत नाही…?’ ‘तुम्ही तुमचा फोटो अपलोड का केला नाही…?’ त्याचे नाव कायमचे डिलिट करायचे, असे मी ठरवले आणि तसेच केले. त्यानंतर मात्र मी माझा फोटो अपलोड का केला नाही? असा प्रश्न मला सतत सतावू लागला. फोटो असणे खरंच गरजेचे आहे का…?

हा प्रश्न भूतकाळातील माझ्या कटू आठवणींना उकरून काढण्यासाठी पुरेसा होता, ज्या गाडून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागला होता. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. माझ्या घरच्यांना जो सामाजिक आणि मानसिक त्रास झाला होता, तो मला वेडे करण्यासाठी पुरेसा होता. त्या त्रासदायक भूतकाळाची आठवण होताच मी अस्वस्थ झाले. शांतपणे बाल्कनीत जाऊन बसले.

थोडया वेळानंतर राजीव मला शोधत बाल्कनीत आला. त्याने बाल्कनीतला दिवा लावला. मी त्याला तो बंद करायला सांगितला. तो माझ्या जवळ आला.

हळूवारपणे माझ्या केसांवरून हात फिरवत त्याने विचारले, ‘काय झाले…?’ मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्व विसरायचा प्रयत्न कर, त्याने प्रेमाने मला सांगितले. मला काही वेळ एकटीला राहायाचे होते. त्याच्या ते लक्षात आले. काहीही न बोलता तो निघून गेला. मला मात्र त्या अंधारात माझा भूतकाळ लख्ख दिसत होता…

त्या काळोखात माझ्या डोळयांसमोर ती संध्याकाळ जशीच्या तशी जिवंत उभी राहिली. महाविद्यालयात निरोप समारंभ होता. मी बीएससीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. महाविद्यालयातील माझा तो शेवटचा दिवस होता.

ठरल्याप्रमाणे मुलांनी सदरा घातला आणि मुली साडी नेसल्या होत्या. ती खूपच संस्मरणीय संध्याकाळ होती, पण ती माझ्या जीवनात अंधार घेऊन येणार होती, हे मला कुठे माहीत होते…? फोटो काढले जात होते. आमचा एक वर्गमित्र राहुल कॅमेरा घेऊन आला होता. तो आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता. त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटायचे, हे मला माहीत होते, पण माझ्यासाठी मात्र तो इतर वर्गमित्रांसारखाच होता. मी नकार देऊनही तो सतत माझे एकटीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी त्याच्यावर ओरडले. मी सर्वांसमोर ओरडल्यामुळे तो शांतपणे तेथून निघून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण मला कुठे माहीत होते की, येणारा काळ माझे आयुष्य उद्धवस्त करणार होता.

काही दिवसांनंतर एके दिवशी पोस्टमन माझ्या नावाचा एक लिफाफा घेऊन आला. आईने तो मला आणून दिला. मी उलटसुलट करून पाहिले, पण त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते. उघडल्यावर त्यातील काही फोटो जमिनीवर पडले. ते उचलायला मी खाली वाकले आणि ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोंमध्ये मी आणि राहुल विचित्र अवस्थेत होतो. प्रत्यक्षात सत्य असे होते की, मी जवळच काय, पण लांब उभी राहूनही कधी त्याच्यासोबत फोटो काढला नव्हता.

मला रडायला येत होते. जसजसे मी फोटो बघत होते माझे रडणे रागात बदलत होते. मी रागाने ओरडले. तो आवाज ऐकून आई आली. फोटो बघून गोंधळली. तिने माझ्याकडे रागाने बघितले, पण त्यानंतर माझी झालेली दयनीय अवस्था पाहून तिचा राग शांत झाला.

घरात सर्वांना या फोटोंबद्दल समजले तेव्हा आजी प्रचंड संतापली. ‘‘आणखी शिकवा मुलींना आणि तेही मुलांसोबत, मग असे घडणारच.’’

वडील आणि भाऊ मला काहीच बोलले नाहीत, पण ते खूप रागात होते. माझा राहुलवर संशय होता. कारण मी त्याला फोटो काढताना सर्वांसमोर ओरडले होते. त्याचाच तो बदला घेत होता. मी मनातल्या संशयाबद्दल वडिलांना सांगितले. त्यांनी राहुलला जाब विचारला, पण त्याने आरोप फेटाळून लावला. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे माझे वडील भावाला घेऊन राहुलच्या वडिलांना भेटायला गेले. पण तेथे त्यांचा अपमान झाला.

हळूहळू लोकांना याबद्दल समजले. त्यामुळे लाजेने माझे घराबाहेर जाणे बंद झाले. माझ्या संपूर्ण कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मी जे आयएएस बनायचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होणे तर दूरच, पण माझ्यासाठी पुढचे शिक्षण घेणेही अवघड झाले होते. माझे स्वप्न भंगले होते. वडिलांना माझ्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यांना लवकरात लवकर माझे लग्न करून द्यायचे होते. मात्र कुठलेही स्थळ आले तरी त्यांना त्या फोटोंबद्दल कुठून तरी समजायचे आणि लग्न मोडायचे. त्यामुळे माझे लग्न होणे कठीण झाले होते.

एके दिवशी राजीवचे वडील आमच्या घरी आले. १०-१२ वर्षांनंतर ते त्यांच्या मित्राला म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला आले होते. २-३ दिवस ते आमच्याच घरी राहिले. आमच्या घरात काहीतरी बिनसले आहे, हे त्यांनी ओळखले, पण त्याबद्दल विचारणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांच्या येण्याने मला काहीसा आधार मिळाला, कारण त्यांच्याशिवाय माझ्याशी घरात कोणीच नीट बोलत नव्हते. मी जास्त करून त्यांच्यासोबतच राहायचे. ते परत जायला निघाले, असे समजल्यावर मी खूपच उदास झाले. मी सतत उदास का असते, याबद्दल त्यांनी मला अनेकदा विचारले, पण मी उत्तर द्यायचे टाळले. नक्कीच काहीतरी झालेय आणि तेही खूपच गंभीर आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र इतक्या वर्षांनी मित्राच्या घरी आल्यावर त्याला त्याच्या घरातील तणावाचे कारण विचारणे त्यांना योग्य वाटले नाही.

त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, त्यांना काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा ते त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणाले की, ‘मला काहीतरी सांगायचे आहे.’ बिनधास्त बोल, असे वडिलांनी सांगताच त्यांनी राजीवसाठी मला मागणी घातली. त्यांनी सांगितले की, राजीव एका मल्टिनॅशनल कंपनीत सीईओ पदावर कार्यरत आहे. हे ऐकून वडील काहीसे गोंधळले. त्यांना माझे लग्न दुसऱ्या जातीच्या मुलाशी लावून द्यायचे नव्हते. त्यांना हेही माहीत होते की, जातीतला मुलगा शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्या फोटो प्रकरणामुळे कुणीच होकार द्यायला तयार नव्हते. हे स्थळ घरबसल्या आले होते. वडिलांनी घरातल्यांना विचारले. सर्वांचे मत असेच होते की, राजीवच्या स्थळासाठी होकार द्यावा, पण वडिलांनी होकार देण्यापूर्वी त्यांना फोटो प्रकरणाबद्दल सर्व सत्य सांगायचे ठरवले.

त्या प्रकरणाबद्दल ऐकल्यानंतर राजीवचे वडील हसले आणि म्हणाले, ‘‘अरे मित्रा, आजकाल असे घडतच असते. मी तुझ्या मुलीचा हात यासाठी मागितला, कारण ती खूपच चांगली आहे. मला असे वाटले होते की, मी परजातीचा असल्यामुळे तू लग्नाला तयार नाहीस.’’

त्यानंतर त्यांनी राजीवला बोलावून घेतले. त्याच्या होकारानंतर काही दिवसांतच राजीवची अर्धांगिनी बनून मी त्याच्या घरी आले… राजीवने येऊन बाल्कनीतला दिवा लावला नसता तर कदाचित मी भूतकाळातील त्या काळोखातच स्वत:ला हरवून बसले असते.

त्याने माझा हात त्याच्या हातात घेऊन विचारले, ‘‘आता कसे वाटतेय?’’

‘‘पूर्वीपेक्षा खूप छान,’’ मी उत्तर दिले.

‘‘चल, कुठेतरी मस्त फिरून येऊया,’’ त्याने प्रेमाने सांगितले.

‘‘नको, अजिबात इच्छा नाही, पुन्हा कधीतरी जाऊ.’’

‘‘चल, मग एक काम कर…’’ त्यांच्या अशा मिश्किल बोलण्यामुळे मी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर खोडकरपणाचे भाव होते. मी समजून गेले की, आता तो खोडकरपणे काहीतरी बोलणारच.

‘‘तुझा फोटो फेसबूकवर अपलोड कर. लोकांना कळू दे की, माझी बायको खूपच सुंदर आहे.’’ तो खटयाळपणे म्हणाला.

‘‘तुला ही सर्व गंमत वाटतेय?’’ मी रागाने विचारले.

‘‘विभा, मनातल्या भीतीला पळवून लावायचे असेल तर तुझा फोटो नक्की अपलोड कर.’’ त्याने अतिशय गंभीरपणे सांगितले.

त्याने जे सांगितले ते खरे झाले. मी पूर्ण विचार करून माझा फोटो अपलोड केला. तो पाहून अनेकांनी माझे कौतुक केले आणि तेच कौतुक मला भूतकाळातील भीतीच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी मदतीचे ठरले. प्रत्यक्षात मी त्या अपराधाचे ओझे वाहत होती, जो मी केलाच नव्हता. खरंतर ही समाजाने आखलेली रेषा आहे जिथे पुरुष अपराध करूनही सुटतात आणि त्याची शिक्षा अनेकदा मुलींनाच भोगावी लागते. तिला लहानपणापासून अशीच शिकवण दिली जाते की, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक रूपात तिने न केलेल्या अपराधासाठीही ती स्वत:लाच दोषी मानते.

माझ्यासोबत निदान राजीव होता, त्याने मला या नकोशा भूतकाळातून बाहेर पडायला मदत केली. पण माझ्यासारख्या न जाणो अशा कितीतरी असतील…?  मी स्वत:ला विचारचक्रातून बाहेर काढले.

मी राजीवला कवी संमेलनासाठी मिळालेल्या अमंत्रणाबद्दल सांगितले. तो खुश झाला. फेसबूकवरील माझे कौतुक साजरे करण्यासाठी शहरात नव्यानेच उघडलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे, असे आम्ही ठरवले. बाहेर जाण्यासाठी मी जेव्हा राजीवच्या आवडीची साडी नेसून आले तेव्हा त्याने हळूच शिट्टी वाजवली आणि म्हणाला, ‘‘आज खूपच सुंदर दिसतेस… काय मग आजची रात्र…’’ मी लाजले.

हॉटेल खूपच सुंदर होते. राजीव कार पार्क करायला गेला. मी मुलांना घेऊन आत जाणारच होते, पण तितक्यात हॉटेलच्या दरवाजावर गणवेशात सर्वांना सलाम ठोकणाऱ्या द्वारपालाला पाहून मी तेथेच थबकले. तो राहुल होता. माझ्या डोळयात आश्चर्य होते तर मला पाहिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मागून येणाऱ्या राजीवने मला प्रवेशद्वाराजवळ असे थांबलेले पाहून प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी काहीही न बोलता आत गेले.

आत गेल्यावर मी त्याला सर्व सांगितले. तसा तो लगेच बाहेर गेला. मी धावतच त्याच्या मागे गेले. तोपर्यंत तो राहुलपर्यंत पोहोचला होता. त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘तुझे खूप आभार. तू तसा वागला नसतास तर (माझ्याकडे पाहत) विभा माझ्या आयुष्यात आली नसती…’’ असे बोलून राहुलला आश्चर्याचा मोठा धक्का देऊन तो आत गेला आणि मी अरे… ऐक… असे म्हणत त्याच्या मागे गेले. शांतपणे खुर्चीवर बसले. थोडया वेळानंतर दरवाजाकडे पाहिले. राहुल तिथे नव्हता. जेवून घरी निघालो तेव्हा राहुलच्या जागी नवा द्वारपाल होता. न राहवून राजीवने त्याला राहुलबद्दल विचारले. तेव्हा समजले की, तो नोकरी सोडून गेला होता.

माझी वेळ

कथा * डॉ. शिल्पा जैन सुराणा

‘‘शिवानी, माझे शर्ट कुठेय?’’ पुनीतने मोठयाने हाक मारत विचारले.

‘‘अरे तू पण ना…? हे काय, इथेच तर आहे… पलंगावर.’’ शिवानी खोलीत येत म्हणाली.

‘‘शर्ट तर फक्त बहाणा होता. तू इकडे ये ना. संपूर्ण दिवस काम करत असतेस.’’

शिवानीला आपल्या मिठीत ओढत पुनीत खटयाळपणे म्हणाला.

‘‘सोड ना, काय करतोस…? खुप कामं आहेत मला.’’ लटक्या रागात शिवानी म्हणाली.

‘‘अगं वहिनी…  सॉरी… सॉरी… चालूदे तुमचे… मी जाते.’’ दरवाजा उघडा असल्यामुळे पावनी सरळ आत आली होती. तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले.

‘‘अगं नाही, असे काहीच नाही. काही काम होते का पावनी?’’ शिवानीने आपल्या नणंदेला विचारले.

‘‘वहिनी, नवी कामवाली आली आहे. आई बोलावतेय तुला.’’ पावनीने सांगितले.

शिवानी या घरची सून नाही तर या घराचा आत्मा आहे. ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत घराशी एकरूप झाली. शिवानी आणि पुनीतच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली. शिवानीच्या सासू-सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पावनीलाही ती नणंद न मानता छोटया बहिणीप्रमाणे वागवते.

लग्नानंतर काहीच दिवसांनी शिवानीच्या सासूबाईंना पॅरालिसेस म्हणजे पक्षघाताचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर अधू झाले. मात्र शिवानीने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली. ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती. सासूबाईही तिला आपली मुलगी मानायच्या. सासऱ्यांना मधुमेह होता. शिवानी त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली, असा एकही दिवस गेला नव्हता. शिवानी या घराशी एकरूप झाली होती.

‘‘आई, उद्या शाळेत विज्ञानाचा प्रकल्प द्यायचाय. शिक्षकांनी सांगितले की, उद्या सर्वांना प्रकल्प पूर्ण करून द्यावाच लागेल.’’ विभोरने सांगितले.

‘‘अरे बापरे… पुन्हा प्रकल्प…? शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना, हेच समजत नाही. कधी हा प्रकल्प तर कधी तो…’’ शिवानी वैतागली होती.

‘‘शिवानी, तुझा फोन आलाय,’’ सासूने आवाज दिला.

‘‘आले आई,’’ शिवानी म्हणाली.

‘‘बाळा, तू कपडे बदल, मी लगेच येते,’’ शिवानीने विभोरचा गाल थापटत सांगितले.

‘‘हॅलो शिवानी, मी ज्योती. पुढच्या आठवडयात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र भेटणार आहेत. तू येशील ना…? खूप मजा येईल. आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ. किती मजा केली होती आपण… तू यायला नकार देऊ नकोस,’’ ज्योतीने सांगितले.

‘‘एकत्र भेटायचे… माझ्यासाठी शक्य नाही ज्योती… घरात खूप काम आहे. वेळ असतोच कुठे?’’ शिवानी म्हणाली.

शिवानी, तू खरंच बदलली आहेस… तुझ्याकडे कधीच वेळ नसतो. कुठे गेली आमची ती रॉकस्टार? आम्ही ठरवले होते की, बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच गाणे पुन्हा ऐकायचे…

श्रेया अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही… चल, यायचा प्रयत्न कर,’’ असे म्हणत ज्योतीने फोन ठेवला.

‘‘सर्वांनी एकत्र भेटायचे?’’ ती स्वत:शीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली. रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वत:च्या खोलीत आली. कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले. अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बमकडे गेली.

‘‘आई, झोप येतेय, चल ना…’’ तिची ओढणी पकडत विभोर म्हणाला. शिवानीने अल्बम बाजूला ठेवला आणि विभोरला झोपवू लागली. तो झोपल्यावर ती अल्बम पाहू लागली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची. कितीतरी मुलांना ती आवडायची, पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही.

संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती.  त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिली आणि ती रॉकस्टार झाली. महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असो, ती नेहमीच प्रथम क्रमांक पटकवायची… ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली. शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती…

‘‘उद्या असू ना असू आपण,

क्षण आठवतील हे क्षणोक्षण,

क्षण हे आहेत प्रेमाचे क्षण,

चल ये माझ्यासोबत चल,

चल… कसला विचार… छोटेसे आहे जीवन.’’

त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण मनापासून जगत होती.

‘‘काय झाले? आज झोपायचे नाही का? घडयाळाकडे बघ. रात्रीचे ११ वाजलेत.’’ पुनीत म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणांमधून अचानक बाहेर आली.

‘‘हो,’’ शिवानीने सांगितले आणि कपडे बदलायला गेली.

दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला. विभोरला अंघोळ घालून शाळेत पाठवले. कामवाली यायची वेळ झाली होती. तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली. सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. घडयाळात बघितले तर १० वाजले होते. पुनीत ११ वाजता कामाला जाईल. त्याचा डबा बनवणे बाकी होते. सकाळच्या वेळेस शिवानी एखाद्या रोबोसारखीच असते… ११ वाजले. बहुतेक आजही कामवाली येणार नाही, असा विचार करत शिवानीने डबा तयार केला. काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली. काल रात्री तिने तो अल्बम टेबलावरच ठेवला होता. तिने तो उघडला. त्यानंतर स्वत:ला आरशात बघितले.

‘‘कुठे गेली ती शिवानी?’’ स्वत:ला आरशात बघत शिवानी विचार करू लागली. पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांनी शिवानीचे लग्न करायचे ठरवले. त्यातच पुनीतचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला. या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली, हे शिवानीला समजलेच नाही.

तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात. तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होती, हे तिला आता आठवतही नाही. या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की, तिने गुणगुणनेही सोडून दिले होते.

‘‘शिवानी,’’ पुनीतने आवाज दिला. ती धावतच खाली गेली.

‘‘शिवानी, कामावर जायची वेळ झालीय… माझा डबा कुठे आहे?’’ पुनीतने विचारले.

ती स्वयंपाकघरात गेली आणि डबा आणून पुनीतच्या हातात दिला.

‘‘वहिनी, आज मी सिनेमा बघायला जाणार आहे. कदाचित यायला उशीर होईल. तू सर्व बघून घेशील ना?’’ पावनीने शिवानीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले.

‘‘हो, पण खूप उशीर करू नकोस,’’ शिवानी म्हणाली.

‘‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, लाडक्या वहिनी,’’ असे म्हणत तिने शिवानीचे गाल प्रेमाने ओढले. शिवानीने स्मितहास्य केले

आणि ती पुन्हा कामाला लागली… पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते.

‘‘शिवानी, शिवानी, बाळा बघ… दूध उतू जातेय,’’ सासूबाईंनी सांगितले.

‘‘हो, आई,’’ शिवानी म्हणाली.

विभोर शाळेतून आला. तो नाराज होता. शिवानीने विचारताच रडू लागला.

‘‘आई, तू वाईट आहेस. काल मी तुला विज्ञानाचा प्रकल्प बनवून द्यायला सांगितले होते. तू बनवून दिला नाहीस. शिक्षक ओरडले.’’ शिवानीला आठवले की, विभोरने तिला सांगितले होते, पण तीच विसरून गेली. विभोर खूपच उदास झाला होता.

रात्रीचे ८ वाजले होते. पुनीत यायची वेळ झाली होती. शिवानीने जेवण वाढायला घेतले. तितक्यात पुनीत आला.

‘‘चला, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे,’’ शिवानीने पुनीतला सांगितले.

तितक्यात पावनीही आली.

‘‘इतका उशीर का झाला पावनी?’’ सासूबाईंनी विचारले.

‘‘ते… म्हणजे काम होते माझे. वहिनीला सांगून गेले होते.’’ पावनीने सांगितले.

‘‘शिवानी, तू सांगितले नाहीस,’’ सासूबाईंनी विचारले.

‘‘मी विसरले,’’ शिवानी म्हणाली.

‘‘शिवानी, तू जरा जास्तच विसरभोळी झाली आहेस. आज तू मला रिकामा डबा दिला होतास.’’ पुनीतने सांगितले.

‘‘बाबा, माझा प्रकल्प बनवून द्यायलाही आई विसरली… शिक्षक ओरडले मला.’’ विभोरने तोंड वेडेवाकडे करत सांगितले.

शिवानीच्या डोळयात अश्रू जमा झाले. ती रडू लागली. तिचे रडणे सर्वांसाठीच अनपेक्षित होते.

‘‘अरे पुनीत, चुकून झाले असेल… आणि विभोर, तू खेळात मग्न झाला असशील. पुम्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला?’’ शिवानीच्या सासूबाई म्हणाल्या.

‘‘नाही आई, कोणाचीच काही चूक नाही. चूक माझी आहे. कदाचित मीच एक चांगली सून नाही, चांगली आई नाही, मी प्रयत्न करतेय, पण मला जमत नाही… मला माफ करा…

माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही,’’ हुंदके देत शिवानी म्हणाली.

‘‘नाही बाळा, तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस,’’  सासूबाईंनी सांगितले, पण काही केल्या शिवानीचे रडणे थांबत नव्हते.

‘‘पुनीत, शिवानीला तुमच्या खोलीत घेऊन जा,’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

शिवानीला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले. कोणालाच शिवानीबद्दल काहीच तक्रार नव्हती. अचानक शिवानीला काय झालेय, हाच प्रश्न सर्वांना सतावत होता.

३ दिवसांनंतर शिवानीचा वाढदिवस होता. सर्वजण एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले की, शिवानीला नेमके काय झाले असावे? त्यानंतर सर्वांनी ठरवले की, तिचा हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील, असा साजरा करायचा.

‘‘पावनी काय करतेस तू?’’ शिवानीने विचारले.

‘‘वहिनी, तू फक्त डोळे उघडू नकोस,’’ पावनीने तिच्या हातांनी शिवानीचे डोळे बंद केले होते.

डोळे उघडताच शिवानीने पाहिले की, तिच्या आवडीच्या पिवळया गुलाबांनी घर सजले होते. समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता. सर्व शिवानीकडे बघत होते.

‘‘शिवानी बाळा, हे तुझ्यासाठी,’’ तिच्या सासऱ्यांनी पलंगाकडे बघत सांगितले.

तिथे एक मोठा खोका होता.

‘‘आई, बघ तर खरं, काय आहे त्या खोक्यात…’’ विभोर आनंदाने म्हणाला.

शिवानीने तो खोका उघडला आणि तिच्या डोळयातून अश्रू ओघळू लागले.

ती तिच्यासाठी नवीन गिटार होती.

‘‘शिवानी, जेव्हापासून तू या घरत आलीस, सर्व घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतलीस… पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो. तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस… पण त्या जुन्या शिवानीला विसरलीस. घर-संसार, जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा… पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, तू काही वेळ स्वत:साठीही राखून ठेवावा.

‘‘आजपासून आम्हाला आमची जुनी शिवानी परत हवीय. जिच्या गाण्यांनी या घराला नवी ऊर्जा मिळायची. तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’’ शिवानीच्या  सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले.

‘‘सूनबाई, आजपासून विभोरला बस स्थानकावर सोडून यायची जबाबदारी माझी. येताना मी किराणा सामान घेऊन येईन. याच निमित्ताने माझे थोडे चालणेही होईल.’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

‘‘वहिनी, आजपासून मी दररोज १ तास विभोरला शिकवित जाईन,’’ पावनी म्हणाली.

‘‘आणि हो, सूनबाई… स्वयंपाकघरातील छोटी-मोठी कामं मी करेन. तू मला नुसते बसवून ठेवलेस तर मी उगाचच आजारी पडेन,’’ शिवानीच्या सासूबाईंनी स्मितहास्य करत सांगितले.

‘‘आजपासून घरातल्या सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिल भरण्याचे काम माझे असेल. चल, आता रडणे बंद कर. २ दिवसांनंतर महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना…? तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का…? आणि हो, तिथे आमच्या रॉकस्टार शिवानीला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना…? तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा… आता आपल्यासमोर येत आहे आपली रॉकस्टार शिवानी,’’ पुनीत हळूच तिला डोळा मारत म्हणाला.

शिवानीच्या डोळयातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आता शिवानी गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एका सुरात गात होते.

‘‘एकमेकांवर खूप प्रेम करतो आम्ही…’’

आपले घर

कथा * रितु वर्मा

कार्यालयातील घडयाळात संध्याकाळचे ५ वाजताच जियाने घाईघाईत स्वत:ची बॅग उचलली आणि भराभर पावले टाकत मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघाली. आज तिचे मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत होते. कारण आज तिला पहिला पगार मिळाला होता. तिला घरातल्या सर्वांसाठी काही ना काही घ्यायचे होते. रोज संध्याकाळ होत आली की तिचे शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचे. पण आज मात्र तिचा उत्साह कायम होता. चला, आता जियाची ओळख करून घेऊया…

जिया आजच्या युगातली २३ वर्षीय नवतरुणी आहे. सावळा रंग, कैरीसारखे बटबटीत डोळे, छोटे नाक, मोठाले ओठ असल्यामुळे सौंदर्याच्या व्याख्येत तिचा कुठेच नंबर लागत नव्हता. मात्र तिचा चेहरा सोज्वळ होता. ती घरात सर्वांची लाडकी होती. आयुष्यात जे हवे ते सर्व आतापर्यंत तिला मिळाले होते. फार मोठी स्वप्ने नव्हती तिची. ती थोडक्यातच समाधान मानायची.

भराभर पावले टाकत ती दुकानाच्या दिशेने निघाली. आपल्या २ वर्षांच्या भाच्यासाठी तिने रिमोटवर चालणारी गाडी घेतली. वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे अत्तर, आई आणि वहिनीसाठी साडी आणि चुडीदार घेतला. भावासाठी टाय घेतला तेव्हा लक्षात आले की, तिच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्वत:साठी ती काहीच खरेदी करू शकली नाही. अजून संपूर्ण महिना बाकी होता. पण तिच्याकडे मात्र कमी पैसे शिल्लक होते. त्यातच तिला महिना काढायचा होता. आईवडिलांकडून तिला काहीच घ्यायचे नव्हते.

जशी ती कपडयांच्या दुकानातून बाहेर पडली तिला शेजारच्या पडद्यांच्या दुकानात आकाशी आणि मोरपिशी रंगाचे खूप सुंदर पडदे दिसले. अशा प्रकारचे पडदे आपल्या घरातही असावे असे फार पूर्वीपासून तिच्या मनात होते. दुकानदाराला किंमत विचारताच ती ऐकून मात्र जियाला घाम फुटला. दुकानदाराने स्मितहास्य करीत सांगितले की, हे चंदेरी सिल्कचे पडदे आहेत, म्हणूनच किंमत थोडी जास्त आहे. पण यामुळे तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल.

काही वेळ तेथेच उभी राहून ती विचार करू लागली. त्यांनतर तिने ते पडदे विकत घेतले. जेव्हा ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा खूपच आनंदी होती. लहानपणापासूनच आपल्या घरात असे पडदे लावायची तिची इच्छा होती. पण आईकडे जेव्हाही तिने ही इच्छा बोलून दाखविली त्या प्रत्येक वेळी घरच्या गरजांपुढे तिची इच्छा मागे पडली. आज तिला असे वाटले जणू ती खरेच स्वतंत्र झाली आहे.

ती घरी पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती. रात्रीच्या जेवणासाठी सर्व जण तिची वाट पाहात होते. भाच्याची पापी घेऊन तिने सर्व भेटवस्तू टेबलावर ठेवल्या. सर्वच कुतूहलाने तिची खरेदी पाहू लागले. अचानक आईने विचारले, ‘‘तू स्वत:साठी काय आणले आहेस?’’

जियाने हसतच पडद्यांची पिशवी तिच्या हातात दिली. पडदे पाहून आई म्हणाली, ‘‘हे काय आहे…? हे तू घालणार आहेस का?’’

जिया हसतच म्हणाली, ‘‘माझ्या लाडक्या आई, हे आपण घरात लावणार आहोत.’’

आईने पडदे पुन्हा पिशवीत ठेवले आणि म्हणाली, ‘‘हे तुझ्या घरी लाव.’’

जिया काहीच न समजल्यासारखे आईकडे बघतच राहिली. आई असे का बोलली, याचा विचार करू लागली. आईचे बोलणे ऐकून तिची भूक मरून गेली.

वहिनीने हसतच तिच्या गालावरून हात फिरवत सांगितले, ‘‘माझे स्वत:चे घर कोणते आहे, हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही. जिया, तू स्वत:चे घर स्वत: घे,’’ असे म्हणत वहिनीने प्रेमाने तिला घास भरवला.

आज संपूर्ण घरात पक्वान्नांचा घमघमाट सुटला होता. आईने जणू तिच्या पाककलेचा सर्व कस लावला होता. कचोऱ्या, रसगुल्ले, गाजराचा हलवा, ढोकळा, पनीरची भजी, हिरवी चटणी, समोसे असे कितीतरी पदार्थ होते. वहिनी लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती. वडील आणि भाऊ उभे राहून संपूर्ण घराचे निरीक्षण करत होते. कुठली कमतरता राहू नये याची काळजी घेत होते. आज जियाला बघायला येणार होते. प्रत्यक्षात जियाला जो आवडला होता त्याला घरातल्यांकडून आज होकार मिळणार होता. अभिषेक तिच्याच कार्यालयात काम करत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. या मैत्रीला आता त्यांना नात्यात गुंफायचे होते.

बरोबर ५ वाजता एक चारचाकी गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून ४ लोक उतरले. सर्व घरात आले. जिया पडद्याआडून हळूच पाहात होती. जिन्स आणि आकाशी रंगाच्या शर्टमध्ये अभिषेक फार छान दिसत होता. त्याची आई लीला ही आजच्या युगातील आधुनिक महिला वाटत होती. छोटी बहीण मासूमाही खूपच सुंदर होती. वडील अजय अत्यंत साधे दिसत होते.

अभिषेकच्या आई आणि बहिणीच्या सौंदर्यापुढे जिया खूपच फिकी वाटत होती. पण तिचा भोळाभाबडा स्वभाव, साधी तितकीच सरळ विचारसरणी किंबहुना तिच्यातील साधेपणा अभिषेकला आवडला होता. जियामध्ये कुठलाच नाटकीपणा नव्हता. एकीकडे आपल्या आईमध्ये अभिषेकला प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांचा आभास व्हायचा तर दुसरीकडे जियामध्ये नैसर्गिक फुलांचा सुगंध असल्यासारखे वाटायचे.

स्वत:च्या वडिलांना त्याने नेहमीच तडजोड करून जगताना पाहिले होते. त्याला स्वत: असे आयुष्य जगायचे नव्हते. म्हणूनच आईचा लाडका असलेला, तिची प्रत्येक गोष्ट ऐकणारा अभिषेक काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आईला देऊ इच्छित नव्हता.

जिया समोर येताच अभिषेक प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहू लागला. लीला आणि मासूमाच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य होते. त्यांना जिया जराही आवडली नव्हती. अजय यांना मात्र जिया चांगल्या विचारांची मुलगी वाटली, जी त्यांच्या कुटुंबाला प्रेमाने अगदी सहज सांभाळू शकेल. लीलाने अभिषेककडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. त्यामुळे त्या जियाला नकार देऊ शकल्या नाहीत.

जियाला त्यांनी स्वत:च्या हातांनी हिऱ्याचा सेट घातला. पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही आनंद नव्हता. जिया हे समजून गेली होती की, ती फक्त अभिषेकची आवड आहे. आपल्या घरात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

दोन महिन्यांनंतरची लग्नाची तारीख ठरली. नवरीच्या रूपात जिया खूप छान दिसत होती. अभिषेक आणि तिच्यावर लोकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. लीलाही अत्यंत सुंदर दिसत होत्या. कन्यादान करताना जियाच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. ती त्यांच्या घराचा श्वास होती. पाठवणीवेळी अजय यांनी हात जोडून सांगितले, ‘‘सून नाही तर मुलगी घेऊन जात आहोत.’’

काहीच दिवसांतच जियाच्या हे लक्षात आले होते की, या घरावर लीला यांचे राज्य आहे. ते त्यांचे घर आहे आणि लग्नापूर्वीचे घर हे जियाच्या आईवडिलांचे घर होते. पण मग तिचे घर कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या मिळत नव्हते.

कालचीच गोष्ट होती. जियाने दिवाणखान्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लीला यांनी हसत सांगितले की, ‘‘जिया, तू अभिषेकची पत्नी आहेस. या घराची सून आहेस. पण हे घर माझे आहे. म्हणूनच तुझे निर्णय आणि तुझे अधिकार तुझ्या खोलीपुरतेच मर्यादित ठेव.’’

जियाने सर्व निमूटपणे ऐकून घेतले. अभिषेकला जेव्हा तिने हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, थोडा वेळ जाऊ दे. त्यांनी हे सर्व आपल्यासाठी, आपल्या सुखासाठीच तर केले आहे ना?

जिया इच्छा असूनही स्वत:च्या मनाला समजावू शकत नव्हती. आनंदी राहणे ही तिची सवय होती, पण हार मानून गप्प बसणे तिचा स्वभाव नव्हता.

पाहता पाहता एक वर्ष लोटले. आज रियाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तिने अभिषेकसाठी घरातच पार्टी द्यायचे ठरविले. त्यासाठी सर्व मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिले. दुपार झाली आणि तितक्यात लीला यांच्या किटी पार्टीच्या मैत्रिणी आल्या.

जियाने लीला यांना सांगितले, ‘‘आई, आज मी माझ्या काही मित्र-मैत्रिणींना घरी बोलावले आहे.’’

लीला प्रत्युत्तर देत म्हणाल्या, ‘‘जिया तू आधी मला विचारायला हवे होतेस…’’ आता मी काहीच करू शकत नाही. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना दुसरीकडे कुठेतरी बोलाव.’’

जिया काहीच बोलली नाही. आपल्या अधिकारांची मर्यादा तिला माहीत होती. पण त्याच वेळी मनातल्या मनात तिने एक निर्णय घेतला.

जियाने संध्याकाळच्या पार्टीसाठी घराऐवजी हॉटेलचा पत्ता आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअप केला. अभिषेकलाही तेथेच बोलावले. अभिषेकने जियाला पिवळा व लाल रंग असलेली कांजीवरम साडी आणि खूपच सुंदर झुमके भेट म्हणून दिले. जियासारखी साध्या, सरळ विचारसरणीची जोडीदार मिळाल्यामुळे अभिषेक खूपच आनंदी होता.

जियाला आयुष्याबाबत काहीच तक्रार नव्हती. पण तरीही कधीकधी तिने पहिल्या पगारावेळी खरेदी केलेले ते चंदेरी सिल्कचे पडदे तिला चिडवत आहेत, असा भास तिला व्हायचा. अभिषेक जियाला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होता, पण जियाची स्वत:चे घर असावे, ही इच्छा तो समजून घेऊ शकत नव्हता. जियाला आपल्या घराला आपले म्हणण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच तिला ते आपले वाटत नव्हते. हा तिच्या जीवनातील असा रिकामा कोपरा होता जो तिचे आईवडील, अभिषेक किंवा तिचे सासूसासरे यापैकी कोणीच भरून काढू शकत नव्हते. जियाने हळूहळू या घरातील सर्वांच्याच मनात स्वत:ची जागा निर्माण केली. लीला आता तिच्याशी तुटकपणे वागत नव्हत्या. मासूमाच्या मासूम, खोडकर जीवनाचा ती एक भाग झाली होती.

आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. दिवाळीचा सण तसाही आपल्यासोबत आनंद, उत्साह आणि नवी उमेद जगवणारे अगणित रंग घेऊन येतो. घराचे रंगकाम सुरू होते. जेव्हा अभिषेक पडदे बदलू लागला तेव्हा जिया म्हणाली, थांब. त्यानंतर धावत जाऊन कपाटातून ते चंदेरी सिल्कचे पडदे घेऊन आली.

अभिषेक काही बोलण्याआधीच लीला म्हणाल्या, ‘‘जिया, असे पडदे माझ्या घरात लावले जाणार नाहीत.’’

जिया प्रश्नार्थक नजरेने अभिषेककडे पाहू लागली. तिला वाटले तो आईला समजावेल. आई, हे जियाचेही घर आहे. पण अभिषेक काहीच बोलला नाही. जिया नाराज झाली, हे पाहून तो म्हणाला, ‘‘इतके कशाला वाईट वाटून घेतेस? पडद्यांचे काय एवढे कौतुक?’’

सासरी आल्यानंतरची ही पहिलीच वेळ होती जेव्हा रियाचे डोळे पाणावले. ते पाहून अभिषेक चिडला.

आजकाल जियाचा बराच वेळ कार्यालयातच जात असे. अभिषेकच्या लक्षात आले होते की, ती सतत मोबाईलवरच बोलत असते आणि त्याला पाहातच घाबरून फोन ठेवते. अभिषेकचे जियावर मनापासून प्रेम होते. तिचे नेमके काय चालले आहे, हे तिला विचारावेसे त्याला वाटत होते, पण जियाच्या जीवनातील त्याची जागा दुसऱ्या कोणी घेतली तर नसेल ना, याची त्याला भीती वाटत होती.

एका संध्याकाळी अभिषेकने जियाला सांगितले, ‘‘जिया, तू शुक्रवारी सुट्टी घे. कुठेतरी जवळच फिरायला जाऊया.’’

जियाने उदास स्वरात सांगितले, ‘‘नको अभिषेक, कामावर खूप काम आहे.’’

जियाच्या वागणुकीत झालेला बदल अभिषेक मनात असूनही समजून घेऊ शकत नव्हता. ती रात्रीही उशिरापर्यंत लॅपटॉपवर काहीतरी करत बसायची. अभिषेकने आवाज देताच घाबरून लॅपटॉप बंद करायची. अभिषेक तिच्या जवळ जायचा जितका प्रयत्न करत होता तितकीच ती त्याच्यापासून दूर जात होती.

न जाणो ते काय होते, ज्याच्यासाठी ती वेडी झाली होती. जियाच्या भावानेही त्या दिवशी अभिषेकला फोन करून विचारले की, ‘‘आजकाल जिया घरी एकही फोन करत नाही. सर्वकाही ठीक आहे ना?’’

अभिषेकने सांगितले, ‘‘सर्व ठीक आहे, फक्त सध्या कामावर खूप काम करावे लागते.’’

पाहता पाहता २ वर्षे लोटली. आता अभिषेकच्या व जियाच्या आईवडिलांनाही वाटत होते की, त्यांनी बाळाचा विचार करावा.

आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. यावेळेस लीला यांनी पार्टी ठेवली होती. जियाने खूप सुंदर फिकट तांबडया रंगाचा स्कर्ट आणि कुरता घातला होता. अभिषेकची नजर तिच्यावरच खिळली होती. बाळाची गोड बातमी कधी देणार, असे विचारून सर्वजण त्यांना चिडवत होते.

रात्री एकांतात जेव्हा अभिषेकने जियाला सांगितले की, जिया मलाही बाळ हवे आहे. त्यावेळी जियाने नकार दिला. रात्री ती त्याच्या सोबत होती, मात्र ती मनाने नव्हे तर फक्त शरीराने त्याच्याजवळ आहे, याची त्याला जाणीव झाली. त्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही.

दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शहर तेजोमय झाले होते. आज बऱ्याच दिवसांनंतर अभिषेकला जियाचा चेहरा उजळलेला दिसला.

जियाने अभिषेकला सांगितले, ‘‘अभिषेक आज मला तुला काही सांगायचे आहे आणि काही दाखवायचेही आहे.’’

अभिषेक तिच्याकडे प्रेमाने पाहात म्हणाला, ‘‘जिया, काहीही सांग फक्त असे सांगू नकोस की, तुझे माझ्यावर प्रेम नाही.’’

जिया मोठ्याने हसली आणि म्हणाली, ‘‘तू वेडा आहेस का? तू असा विचार करूच कसा शकतोस?’’

अभिषेक स्मितहास्य करत म्हणाला, ‘‘तू गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. आपण एकत्र कुठेच गेलेलो नाही.’’

अभिषेकला जियाला काय सांगायचे आहे हे समजत नव्हते. जियाने गुलाबी आणि नारिंगी रंग असलेली चंदेरी सिल्कची साडी नेसली होती. सोबत खडयांचा सुंदर सेट घातला होता. हातात हिऱ्यांचे कडे आणि खूप साऱ्या बांगड्या होत्या. आज तिच्या चेहऱ्यावर अशी काही लाली पसरली होती की, अभिषेकला तिच्यासमोर सारे फिके वाटू लागले. रांगोळी काढून झाल्यानंतर जियाने अभिषेकला तिच्यासोबत येण्यास सांगितले. अभिषेकने लगेचच आपल्या चारचाकी गाडीची चावी घेतली.

जिया हसून म्हणाली, ‘‘आज मी तुला माझ्यासोबत माझ्या कारने नेणार आहे.’’

दोघेही निघाले. कार जणू हवेशी गप्पा मारत वेगाने पुढे जात होती. काही वेळानंतर ती एका नव्या वसाहतीच्या दिशेने निघाली. गाडी चालवत असताना जिया म्हणाली, ‘‘अभिषेक, आज मला तुला काही सांगायचे आहे. तू नेहमीच माझी अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस, पण लहानपणापासूनच माझे एक स्वप्न होते, जे माझ्या डोळयात कायमचे घर करून बसले होते.

आईवडिलांनी सांगितले की, तू लग्न होऊन जिथे जाशील ते तुझे घर असेल. तू भेटल्यावर वाटले की, माझे स्वप्न पूर्ण झाले. पण अभिषेक, काही दिवसांनंतर माझ्या लक्षात आले की, काही स्वप्ने अशी असतात जी वाटून घेता येत नाहीत. लग्नाचा अर्थ असा होत नाही की, तुमच्या स्वप्नांचे ओझे तुमच्या जोडीदाराने वाहावे. माझी तुझ्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही काहीच तक्रार नाही. पण अभिषेक आज माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे,’’ असे सांगत तिने एका नवीनच तयार झालेल्या सोसायटीसमोर गाडी थांबवली. अभिषेक काहीच न बोलता तिच्या मागून चालला होता. एका नव्या फ्लॅटच्या दरवाजावर तिची नेमप्लेट होती.

अभिषेक आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. छोटे पण खूपच सुंदर सजवलेले घर होते. तितक्यात हवेची झुळूक आली आणि जियाच्या त्या स्वत:च्या घरातले मोरपिशी रंगांचे चंदेरी सिल्कचे पडदे हलू लागले. जिथे तिचा अधिकार केवळ घरावरच नाही तर घरातील प्रत्येक गोष्टीवर होता.

तुझ्या सुखात माझे सुख

कथा * आशा सराफ

आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा. म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो.

संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडी फार ती भिजलीही, पण कुठं तरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. पाच वर्षं झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दु:खीही. आनंद राकेशबरोबर आहे म्हणून आणि दु:ख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून.

लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच. पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. पाच वर्षांत तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही.

लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्षं झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की दोन तरूण मुलं तिच्या पाठी आहेत. पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन अन् ही दोन उनाड मुलं…तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन् स्कूटी थांबवली.

‘‘काय प्रॉब्लेम आहे मॅडम?’’ एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला.

‘‘जरा बघा बरं, चालताना अडकतेय सारखी…काय झालंय कुणास ठाऊक,’’ प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती.

‘‘मॅडम, स्कूटीत काही दोष नाही,’’ स्कूटी चेक करून तो तरूण म्हणाला.

‘‘नीट बघा, चाकात काही दोष असेल…’’ ती वेळकाढूपणा करत होती. ती दोन मुलं जाण्याची वाट बघत होती.

तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरूण म्हणाला, ‘‘चाकंही व्यवस्थित आहेत.’’

‘‘तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना? माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?’’ ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा नि:श्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला.

‘‘किती पैसे द्यायचे?’’

‘‘काहीच नाही…पैसे नाहीच द्यायचे.’’ तो तरूण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला.

‘‘ठिकाय…’’ घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली अन् अवचित ती दोन्ही पोरं स्कूटरसमेत तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना…ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली.

‘‘मॅडम, तुमची पर्स…तुम्ही विसरला होता.’’ अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला.

ती मुलं पळाली अन् भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, ‘‘पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?’’

‘‘होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं म्हणूनच मी इथवर आलो.’’

‘‘धन्यवाद! तुम्ही वाचवलंत मला.’’

‘‘आता गप्पा नंतर. आधी लवकर चला. नाही तर पेपरला उशीर होईल.’’

‘‘तुम्हाला कसं कळलं, माझा पेपर आहे ते?’’

‘‘नंतर सगळं सांगतो. चला लवकर…’’ त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला.

परीक्षा संपेपर्यंत तो तरूण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता.

तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद! आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला, त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता.

‘‘धन्यवाद!’’ त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली.

‘‘तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?’’ त्यानं हसून प्रश्न केला.

‘‘तुम्हाला?’’ कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं.

‘‘धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावंही घेतलं नाहीए.’’ हसत हसत त्यानं म्हटलं.

त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं.

‘‘ओह सॉरी,’’ ओशाळून संजनानं म्हटलं, ‘‘तुमचं नावं काय आहे?’’

‘‘राकेश.’’

‘‘बरं तर, राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात?’’ संजना थोडी सावरून म्हणाली.

‘‘जवळच एक कॅफे आहे. तिथं कॉफी पिऊयात?’’ गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं.

संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रूबाबदार होता तो. स्वत:चं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला दोन धाकट्या बहिणीही होत्या.

पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्नं बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं.

वडील बिथरलेच. ‘‘ कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही, आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दळीद्री…काय बघितलंस तू?’’

‘‘बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे.’’ मान खाली घालून संजनानं सांगितलं.

‘‘स्वभावाचं काय लोणचं घालाचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस.’’ बाबांचा राग शांत होत नव्हता.

‘‘बाबा, मी राहू शकेन. मी राहीन.’’ हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली.

‘‘हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी…पैसा नसला की दोन दिवसांत प्रेमाचे बारा वाजतात.’’

‘‘नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे.’’ संजनानं नम्रपणेच सांगितलं.

आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘हे बघ संजना, संसार असा होत नाही. आत्ता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजुक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे, श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दु:खाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्नं करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील?’’

बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना अन् राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कंच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं अन् राकेश ते तिला भरभरून देत होता.

पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते.

‘‘राकेश, कधी आलास?’’ त्याच्याकडे वळून तिनं विचारलं.

तिला बाहूपाशात घेत त्यानं म्हटलं, ‘‘मी तर सकाळपासून इथंच आहे.’’

‘‘चल, खोटं बोलतोस…’’ त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं.

‘‘तुझ्या हृदयाला विचार ना? मी कशाला खोटं बोलू?’’

संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती. पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता.

एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली…‘‘अरे ही तर पूनम…तिची धाकटी बहिण.’’

पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं, ‘‘ताई…’’ तिनं संजनाला मिठीच मारली.

‘‘कशी आहेस पूनम?’’ संजनाला एकदम भरून आलं.

‘‘तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघतेय तुला.’’

‘‘घरी सगळे बरे आहेत ना?’’ थोड्याशा संकोचानंच संजनानं विचारलं.

‘‘थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात.’’ पूनमननं संजनाला ओढतच तिथं नेलं.

कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली.

‘‘घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते.’’

‘‘कशाला खोटं बोलतेस? आई बाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना?’’ संजनाला एकदम रडू अनावर झालं.

‘‘नाही ताई, तसं नाहीए. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीकाय, जे व्हायचं ते होऊन गेलंय, आता त्याचं काय? तू कशी आहेस? भावजी कसे आहेत?’’

राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली.

‘‘राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत.’’ तिनं अभिमानानं सांगितलं.

‘‘तुझ्यावर प्रेम करतात ना?’’ तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं.

‘‘प्रेम? अगं त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरंच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रूबाबात राहतेय. स्वत:चा छोटासा फ्लट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय अन् जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो…मला असा नवरा मिळाला हे माझं मोठंच भाग्य आहे पूनम.’’

‘‘खरंच ताई? खूप बरं वाटलं ऐकून.’’

‘‘माझ्या आयुष्यात दु:ख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे.’’ क्षणभर संजनाचा चेहरा दु:खानं झाकोळला, पण लगेच स्वत:ला सावरून तिनं म्हटलं, ‘‘ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत?’’

‘‘माझं सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आलेय. छोटी चंदीगडला असते…पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.’’

वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरंच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही.

पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं.

संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं.

‘‘राकेश, हे माझे आईबाबा आहेत.’’ संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला.

‘‘खुशाल रहा. सुखी रहा.’’ बाबांनी तोंड भरून आशिर्वाद दिला. ‘‘पूनमनं संजनाबद्दल सांगितलं, आम्हालाही पोरीचं सुखंच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही. पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नकोय आम्हाला.’’ बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंडभरून आशिर्वाद दिले.

संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले, तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा, संजनानं म्हटलं, ‘‘कुठं गेला होतास?’’

‘‘अगं तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का?’’ तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं.

काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला.

त्यादिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं ती अतीव आनंदानं डॉक्टकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राइज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लानिंग करून ठेवलंय. ती घरी पोहोचली, तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. किती तरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचं होतं. पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना.

‘‘प्रिय संजना,

हे पत्र वाचून तुला खूप दु:ख होईल ते मला ठाऊक आहे. खरंतर मी तुला सोडून जाऊच शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाहीए. केव्हा येईन सांगता येत नाही पण येईन हे त्रिवार सत्य! गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वत:ची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे.

तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…

तुझाच राकेश.’’

प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली.

काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, कुणालाच काही माहीत नव्हतं. नऊ महिने तिला कसेबसे काढले, तिलाच ठाऊक, नऊ महिने उलटले अन् तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. पाच वर्षं ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव.

सहा वर्षं उलटली. राकेश नाही, त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती.

एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा, तेव्हा असाच सुंदर वास दरवाळयचा. राकेश तिच्यासमोर खरोखरंच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळली अन् तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले.

‘‘कोण तू? मी तुला ओळखत नाही.’’

‘‘संजना…’’ चेहऱ्यावरचं तेच लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर.

‘‘मेली संजना…इथं नाही राहत ती…’’

संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन् मग स्वत:च त्याला मिठी मारली.

‘‘कुठं गेला होतास तू?’’

‘‘दुबईला?’’ तिचे अश्रू पुसून तो म्हणाला.

‘‘दुबईला? कशाला?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘पैसे मिळवायला.’’

‘‘न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?’’

‘‘मला तुला सुखात ठेवायचं होतं.’’

‘‘सुखासाठी पैसे लागतात? मी कधी मागितले पैसे? कधी तरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते.’’

‘‘नाही संजना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणंजाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरीबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस कारण तिथं सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. ‘मला वेळ नाही, जमणार नाही, म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं.’’

‘‘तुला आठवतंय, आईनं दिलेली निळी साडी…’’

‘‘ती ४०,००० ची?’’

‘‘हो. तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेय?’’ खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती…मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली…अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. अन् मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो?

‘‘एक दिवस एका मित्रानं म्हटलं तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना, आता तू तुझ्या नातालगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठ्ठा बंगला, झगमगीत गॅरेज…सगळं सगळं देईन मी तुला.

‘‘अरे, पण निदान मला सांगून जायचंस?’’

‘‘सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस? तू तर हेच म्हणाली असतील, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नकोय, पण मी तुला गेल्या काही वर्षांत फारच फार दुखवलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण…प्लीज…संजना.’’ त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते.

तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिटरवर ठेवलेल्या फोटोफ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं.

‘‘माझी मुलगी आहे.’’ संजनानं हात सोडवून घेत म्हटलं.

‘‘नाही, आपली मुलगी आहे.’’ त्यानं ठासून म्हटलं, ‘‘राशी नाव ठेवलं ना हिचं?’’ त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं.

‘‘तुला इतकी खात्री होती?’’ संजनानंच आता आश्चर्याने विचारले.

‘‘खरं तर माझ्यावर, स्वत:वर माझा जेवढा विश्वास नाहीए, तेवढा तुझ्यावर आहे संजना.’’ त्यानं मिठीत घेतलं.

खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन् आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो?

परदेश प्रवास

कथा * सुनीत भाटे

‘‘मॅडम, प्रिन्सिपल सरांनी तुमचं काम संपल्यावर त्यांना भेटून जा म्हणून सांगितलंय.’’

शाळेच्या शिपायानं हा निरोप सांगताच अवनीला काळजी लागली. का बरं बोलावलं असेल? मागची एक कडवट आठवण अजून तिच्या मनातूनच गेली नव्हती…त्यांनी अप्रत्यक्षपणे तिच्यावर तिच्या कामावर ताशेरे ओढले होते.

शेवटचा पिरियड संपवून अवनीनं घाईघाईनं आपलं सामान आवरलं अन् ती भराभर चालत सरांच्या ऑफिसकडे निघाली.

वाटेत नलिनी भेटली. ‘‘इतक्या घाईनं कुठं निघाली?’’ तिनं विचारलं.

‘‘प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलावलंय…’’

‘‘अरेच्चा? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे?’’

‘‘मला…भीती वाटते त्यांची…’’

‘‘अवनी, तू पण ना…जा. भेटून ये, मी निघते.’’

अवनीनं सरांच्या ऑफिसच्या दारात उभं राहून विचारलं, ‘‘मे आय कम इन सर?’’

‘‘या, या, अवनी…’’

‘‘बसा…कॉफी घेणार?’’

अवनी संकोचली, कशीबशी म्हणाली, ‘‘चालेल.’’

‘‘यावेळी तुमच्या वर्गातल्या सर्वच मुलांचे मार्क्स उत्तम आहेत…म्हटलं, तुमचं अभिनंदन करावं.’’

‘‘थँक्यू सर.’’

‘‘सध्या स्टाफरूमध्ये पगारवाढीसाठी कुणाचं नावं चर्चेत आहे?’’

‘‘सर, सगळेच एकमेकांचे नाव घेत असतात.’’

‘‘असं होय? बरं, ते जाऊ दे…तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट असेल ना?’’

‘‘नाही…नाहीए सर,’’ कशीबशी अवनी म्हणाली.

‘‘तर मग करून घ्या. यंदा टीचर्सचं जे डेलिगेशन जर्मनीला जाणार आहे, त्यासाठी तुमचं नाव पाठवायचं माझ्या मनात आहे म्हणून तुम्ही पासपोर्ट लवकर बनवून घ्या.’’

‘‘ओ. के. सर.’’

‘‘परदेश प्रवासाची तयारीही सुरू करा.’’

अवनीचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना. तिनं जरा निरखून सरांच्या चेहऱ्याकडे बघितलं.

६०-६५ वर्षांचे प्रिन्सिपल सर शर्ट पॅन्ट अन् कोट, टायमध्ये होते. सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला. अवनीला एकदम तिचे वडिल आठवले.

‘‘सर, कधी जावं लागेल?’’

‘‘अजून नक्की तारीख आलेली नाहीए…पण ही मिटिंग सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असते.’’

अवनीला आपला आनंद लपवता आला नाही.

‘‘अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो, ‘भारतीय स्त्रियांची सार्वत्रिक आगेकूच’ या विषयावर एक छानसं आर्टिकल तयार करा. त्या लोकांना भारतीय स्त्रीच्या प्रगतीविषयी, पर्यायानं देश किती पुढे गेलाय याविषयी कळायला हवं.’’

‘‘दोन तीन दिवसातच आर्टिकल तयार करून मी तुम्हाला आणून देते सर.’’

‘‘घाई नाहीए…आठवडाभरही वेळ घ्या. पण ठसठशीत उदाहरणं देऊन, व्यवस्थित आकडेवारी देऊन आर्टिकल लिहा. मी सुगंधालाही सांगतो. तिच्या आर्टिकलमध्ये  काही वेगळं अन् महत्त्वाचं वाटलं तर ते ही तुमच्या आर्टिकलमध्ये घालून एक उत्तम आर्टिकल तयार करू. तेच तुम्ही वाचून दाखवाल.’’

‘‘होय सर.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता. पण पासपोर्टचं मात्र लवकरात लवकर बघा.’’

‘‘थँक्यू सर.’’

आपलं परदेशी जाण्याचं स्वप्नं इतक्या लवकर पूर्ण होईल असं अवनीला कधी   वाटलं नव्हतं. तिचा आनंद मनात मावत नव्हता. प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसमधून बाहेर पडताच तिनं आपला आनंद शेयर करण्यासाठी हर्षदला, नवऱ्याला मेसेज टाकला की तिला घाईनं पासपोर्ट काढून घ्यायला हवाय. या वर्षी शाळेकडून जर्मनीला जाणाऱ्या डेलिगेशनमध्ये तिची निवड झाली असून तिला जर्मनीला जावं लागणार आहे.

हर्षदनं ताबडतोब उत्तर पाठवलं, ‘‘काळजी करू नकोस, पासपोर्टचं काम नक्की होईल.’’

आपल्या पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाची कल्पनाच अवनीला रोमांचित करत होती. आनंदानं तिचा चेहरा फुलला होता. आपल्याला पंख फुटले असून आपण पक्ष्याप्रमाणे ढगात उडतोय असं तिला वाटत होतं.

तीस वर्षांची अवनी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती. अभ्यासात प्रथमपासूनच हुषार होती. पहिला नंबर कधी सोडला नव्हता. इंग्रजी साहित्यात एम.ए. केल्यावर तिला एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजीची लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली होती. तिचं शिकवणं छान होतं. जीव तोडून ती आपलं काम करायची. त्यामुळे शाळेत तिचं नाव चांगलं होतं. स्टाफरूमच्या डर्टी पॉलिटिक्स अन् ग्रुपीझमपासून ती लांबच असायची.

इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे शाळेत परदेशी विद्यार्थी बरेच असायचे. त्या मुलांना बघून तिला आपलं परदेश प्रवासाचं स्वप्नं आठवायचं, पण ते असं अवचित अन् इतक्या तडकाफडकी पूर्ण होईल असं तर तिला वाटलंच नव्हतं.

ती मोबाईल पर्समध्ये ठेवत होती, तेवढ्यात पुन्हा नलिनीच समोर आली. तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत तिनं प्रश्न केला, ‘‘का बरं बोलावलं होतं सरांनी?’’

‘‘काही नाही…यंदा क्लासचा रिझल्ट फार छान आलाय…त्याप्रित्यर्थ अभिनंदन केलं त्यांनी.’’

‘‘ओ. के.’’

ती घाईघाईनं घरी पोहोचली. मनात तुडुंब आनंद भरलेला होता, त्यामुळे आज थकवा वगैरे काही वाटत नव्हता. तिनं हर्षदच्या आवडीचा स्वयंपाक करून ठेवला. मग छान फ्रेश होऊन सुंदर नवी साडी नेसली. थोडा मेकअप केला. लिपस्टिक लावून आरशात बघितल्यावर स्वत:वरच खुष झाली. तेवढ्याच डोअरबेल वाजली. तिनं दार उघडलं.

तिला अशी छान नटलेली बघून हर्षद दचकला…‘‘कुठं बाहेर जायचंय का? मी फार दमलोय. आधी एक कप गरम चहा पाज. मग बघूयात.’’

‘‘नाही हो, जायचं कुठंही नाहीए. मी तर अशीच आवरून बसलेय.’’ तिनं त्याला आश्वस्त केलं.

शाळेतून येतानाच अवनीनं हर्षदच्या आवडीचे समोसे आणले होते. ते तिनं मायक्रोव्हेवमध्ये गरम करून घेतले. गरम चहासोबत गरमागरम समोसे बघून हर्षद आनंदला.

हसून म्हणाला, ‘‘अच्छा, तर तुझ्या जर्मनी ट्रिपबद्दल मला ट्रीट दिली जातेय तर? बरं मला सांग, तुला पासपोर्ट कधीपर्यंत हवाय?’’

‘‘तसा बराच वेळ आहे. सर म्हणाले आहेत, मीट मार्च महिन्यांत असते.’’

‘‘ठीकाय, मी ऑनलाइन फॉर्म भरून देतो. जेव्हा त्यांच्याकडून सूचना येईल, तेव्हा तुला एक दिवस रजा घ्यावी लागेल. सगळी सर्टिफिकेट्स आणि पेपर्स घेऊन पासपोर्ट ऑफिसला जावं लागेल. तिथं बराच वेळ लागतो.’’

‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा सुट्टी घेईन.’’

‘‘किती दिवसांसाठी जायचंय?’’

‘‘अजून त्यांनी तेवढं सविस्तर सांगितलं नाही.’’

हर्षद थोडा उदास होऊन म्हणाला, ‘‘मी परदेश प्रवासाची स्वप्नंच बघत बसलोय अन् तू फुर्र..कन उडणार आहेस.’’

आपल्याच आनंदात मग्न असलेल्या अवनीनं त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही.

‘‘बरं का, आपल्याला एक स्ट्रोलर बॅग विकत घ्यावी लागेल…शिवाय एक मोठी नवी पर्स…’’

‘‘हो, हो…घेऊयात. तू एक यादी करायला घे. त्याप्रमाणे आपण हळूहळ सगळी खरेदी करूयात.’’

‘‘अजून काय लागेल?’’

‘‘बाई गं, मी तर अजून परदेशी गेलो नाहीए. तू तुझ्या शाळेतच चौकशी कर. चांगली माहिती मिळेल.’’

अवनी अजूनही मनानं जर्मनीतच होती. तिनं इंटरनेटवरून माहिती काढली,

‘‘हर्षद, त्यावेळी जर्मनीत तर कडाक्याची थंडी असेल, मला ओव्हरकोटही घ्यावा लागेल.’’

‘‘तो फार महाग पडेल गं! शिवाय नंतर तो इथं नुसताच पडून राहील.’’

‘‘ते ही खरंच आहे म्हणा.’’

‘‘माझा तर कोट ही लग्नातलाच आहे, खरं तर त्याच्याही आधीचाच…तोही पार कामातून गेलाय.’’

हर्षदला ओशाळल्यासारखं झालं. तो थोडा चिडचिडल्यासारखा झाला होता. थोडा नाराज होऊन म्हणाला, ‘‘आधी अकाउंटला किती पैसे आहेत ते बघायला हवं. त्यानंतर खरेदीचं बघावं लागेल. आजच गावाकडून आईचा फोन आला होता. बाबांनी अंथरूण धरलंय, म्हणून एकदा येऊन बघून भेटून जा. राधा दर महिन्याला येते. गरजेचं सामान देऊन जाते. जावईबापू फारच भले आहेत. तिला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत.’’

अवनीचा मूड एकदम बिघडला. तिनं नाराजीनं डोळे मिटून घेतले.

‘‘झोपलीस का गं?’’ त्यानं विचारलं.

हर्षदची झोप उडाली होती. आधी तयारीसाठी इतका खर्च अन् मग तिथं शॉपिंगसाठी पैसे…खर्चच खर्च…कसं जमवायचं सगळं?

अवनीनं डोळे मिटून घेतले होते. पण मनात विचार सुरूच होते. ओव्हरकोट कुणाकडून तात्पुरता मागून घेता येईल. इतर गोष्टींचा विचार करायला हवा…

हर्षदनं ऑनलाइन पासपोर्टसाठी फॉर्म भरला होता.

अवनीनं इंटरनेटवरून माहिती काढून आपलं आर्टिकल उत्तम लिहून काढलं होतं.    ते सरांच्या ऑफिसात ती देऊनही आली होती. आर्टिकल मनासारखं झाल्यामुळे अवनीच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं होतं.

फॉरेन ट्रिपच्या स्वप्नात दंगलेली अवनी शाळेतल्या आपल्या कामाची जबाबदारी अधिकच नेटानं अन् प्रामाणिकपणे पार पाडत होती. प्रिन्सिपलच्या ऑफिसमधल्या तिच्या फेऱ्या हल्ली वाढल्या होत्या. सरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाची प्रुफं तपासण्याचं काम तिच्यावर सोपवलं होतं. हल्ली त्यांनी अशी फालतू कामं तिच्याकडून करवून घेण्याचा सपाटा लावला होता. त्यामुळे तिचं त्यांच्याकडे जाणंयेणं जास्त होत होतं. खरं तर कामाचा ताणही जाणवत होता, पण परदेश प्रवासाच्या लोभापायी नाही म्हणता येत नव्हतं. त्यांना नाराज करून चालणार नव्हतं. सरांनी तिच्या आर्टिकलची खूप स्तुती केली होती. त्यामुळेही ती त्यांनी दिलेली कामं मुकाट्यानं करत होती.

एक दिवस ती स्टाफरूममध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत बसलेली असताना नलिनी आली. ‘‘अवनी, आज प्रिन्सिपल सरांनी त्याच टॉपिकवर मला आर्टिकल लिहायला सांगितलंय,’’ ती म्हणाली.

‘‘होय, ते अजून काही जणांकडून लिहून घेणार म्हणाले होते.’’

‘‘तुझं झालं लिहून?’’

‘‘हो…मी त्यांना देऊनही आलेय. त्यांनी अगदी मुक्त कंठानं स्तुती केली.’’

‘‘तू कोण कोणते पॉइंट्स कोट केलेत?’’

क्षणभर अवनी थबकली. हिला दाखवावं की नाही? पण मग तिनं फाईल दाखवली. खरं तर तिला नलिनीचं वागणं नेहमीच संशयास्पद अन् गूढ वाटायचं. दुसरं म्हणजे ती सतत अवनीवर ताशेरे झाडायची.

‘‘अवनी, अगं आता तरी थोडी बदल. जर्मनीला जायचंय…जरा पार्लरला वगैरे जाऊन ये. अगदीच काकूबाई दिसतेस.’’

अवनीला राग यायचा. पण ती वरकरणी हसून विषय टाळायची.

‘‘तुझा पासपोर्ट आला का?’’

‘‘अजून नाही आला.’’

‘‘माझा तर पुढल्या वर्षात एक्सपायर होतो. मला रिन्यू करायचा आहे.’’ नलिनी निघून गेली.

पस्तीस वर्षांची नलिनी सावळ्या रंगाची फॅशनेबल स्त्री आहे. अविवाहित आहे. स्कर्ट किंवा ट्राउझर, स्लीव्हलेस टॉप, कापलेले केस, भरपूर मेकअप, गडद लिपस्टिक, मॅचिंग इयरिंग, नेलपॉलिश अन् सॅन्डल्स ही तिची ओळख आहे.

वयानं तिच्याहून लहान असलेल्या अन् रूपानं अन् बुद्धीनं तिच्याहून उजव्या असलेल्या अवनीलासुद्धा अनेकदा वेस्टर्न कपडे वापरण्याची इच्छा व्हायची. पण तिच्यातली आदर्श भारतीय स्त्री तिला कधीच तसं करू देत नसे. खरं तर हर्षदनंही तिला वेस्टर्न ड्रेसेस घालण्याबद्दल सुचवलं होतं. त्याच्याकडून आडकाठी नव्हती, पण अवनीनंच कधी ते मनावर घेतलं नव्हतं.

नलिनीनं ठरवलं आज घरी जाण्यापूर्वी आपण पार्लरलाच जाऊन यावं. सुट्टी झाल्यावर ती वर्गाबाहेर पडली अन् तिचं लक्ष सहजच समोर गेलं तर नलिनी अन् प्रिन्सिपल सर अगदी हसून हसून काहीतरी बोलत होते. त्याक्षणी अवनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचा मूडच बिघडला. ती तडक घरी पोहोचली.

तिचा चेहरा बघून हर्षदनं विचारलं, ‘‘काय झालं? तू अशी का दिसतेस?’’

‘‘हर्षद, मला शंका येतेय, नलिनी काही तरी डाव खेळतेय…तिची लक्षणं बरी दिसत नाहीत.’’

‘‘उगाच काही तरी विचार मनात आणू नकोस. चल, चहा घेऊयात…तू  आवरून घे, आपण शॉपिंगला जाऊ.’’

‘‘नाही,…नको, मला इच्छा नाहीए.’’ अवनीचा पासपोर्ट तयार होऊन आला. ती सरांच्या केबिनमध्ये गेली. आज तिला सोक्षमोक्ष लावून घ्यायचा होता, खरंच तिचं नाव डेलिगेशनमध्ये आहे की सगळं हवेतच आहे.

सरांनी अत्यंत प्रेमानं तिला समजावलं की तिनं काळजी करू नये. तिच्या आर्टिकलची निवड झाली आहे. पण अजून कन्फरमेशनची मेल आली नाहीए…पण ती येईलच. प्रवासाची तयारी करून ठेवा. लवकरच व्हिसाच्या इंटरव्ह्यूसाठी जावं लागेल.

अवनीच्या मनावरचं ओझं उतरलं. पुन्हा ती हलकी होऊन आकाशात उडू लागली.

पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचा आगळावेगळा रोमांच ती कल्पनेतच अनुभवत होती. हर्षदनंही त्या आठवड्यातच तिच्या यादीतली प्रत्येक वस्तू तिला आणून दिली  होती.

स्टाफरूममध्ये टीचर्स तिचं अभिनंदन करत होते. सरांच्या बोलण्यामुळे तिला आता पूर्ण खात्री वाटत होती.

तिनं हर्षदला फोन केला. आज तिला पार्लरला जायचंय, घरी यायला उशीर होईल. पार्लरला प्रथमच जात असल्यामुळे मनात उत्सुकता होती. थोडी धास्तीही होती. तिनं फेशियल केलं, केसांचा मॉर्डन कट अन् नंतर दुकानातून स्वत:साठी ट्राझर अन् शर्टही खरेदी केला.

नव्या अवतारात ती घरी पोहोचली, तेव्हा हर्षदनं तिला ओळखलंच नाही…अन् मग आनंदून त्यानं तिला मिठीतच घेतली.

दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ट्राउझर शर्टमध्ये शाळेत गेली तेव्हा सगळेच तिच्याकडे बघत राहिले.

‘‘किती सुंदर अन् तरूण दिसते आहेस गं!’’ प्रियानं तिला मिठीच मारली.

‘‘अवनी, अगं फॉरेनला जाण्यासाठी टोटल चेंज केलंस स्वत:ला? मस्तच दिसतेस.’’ श्रेयानं म्हटलं.

ती स्टाफरूममधून निघाली अन् वर्गावर जाणार तेवढ्यात राऊंडवर निघालेले प्रिन्सिपॉल भेटले. ‘‘गुड मॉर्निंग सर,’’ तिनं अभिवादन केलं. ‘‘माझ्या ऑफिसात येऊन भेटा. महत्त्वाचं बोलायचं आहे.’’

अवनीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. सर नक्कीच व्हिसाच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलणार असतील. स्वत:ला सावरत ती वर्गावर गेली. आज प्रथमच शिकवताना ती बेचैन होती. शिकवण्यात लक्ष लागलं नाही.

पुढला तास रिकामा होता. ती सरांच्या ऑफिसमध्ये गेली.

‘‘या…प्लीज सिट डाऊन. या नव्या हेयर स्टाइलमध्ये फारच छान दिसताय तुम्ही.’’

‘‘थँक्यू सर.’’

‘‘कॉफी घेऊयात?’’

‘‘चालेल.’’

ती घामाघूम झाली होती.

‘‘तुम्ही इतक्या घाबरलेल्या का असता? जर्मनीत आपल्याला आठवडाभर एकत्र राहायचंय.’’

‘‘नाही सर, तसं काही नाही.’’

ती कॉफीचा कप त्यांना देत असताना त्यांनी जाणूनबुजून तिच्या हाताला स्पर्श केला.

‘‘फारच नाजूक आहेत तुमचे हात.’’

अवनी घाबरली. तिनं सरांकडे बघितलं, तेव्हा त्यांची कामुक दृष्टी तिच्या सर्वांगावरून फिरत होती. तिनं घाबरून मान खाली घातली.

‘‘तुम्ही फारच लाजाळू आहात बुवा. नुसत्या बोलण्यानं अशा घाबरून कोमेजता आहात?’’

ती कसंबसं ओशाळं हसली.

‘‘या बाबतीत नलिनी एकदम फ्रेंडली आहे.’’

अवनीचं डोकं तडकलं. कॉफीचा कप तसाच टाकून तिनं विचारलं, ‘‘सर, मी जाऊ?’’

‘‘हो हो, जा…’’

घाबरलेली, भांबावलेली ती तडक तिथून उठून आली. सरांचं वागणं आता बदललं होतं. पुन्हा ते तिच्यावर खेकसू लागले होते. नसलेल्या उणीवा दाखवू लागले होते.

नलिनी मात्र सतत सरांच्या भोवती असे. हल्ली तर ते रोज गाडीनं तिला घरीही सोडत होते.

अवनीला काही कळत नव्हतं. एक दिवस हर्षदनं विचारलं, ‘‘तुझ्या व्हिसा इंटरव्ह्यूची तारीख अजून आली नाही का?’’

हर्षदला मिठी मारून ती गदगदून रडू लागली. ‘‘हर्ष, परदेश प्रवासाच्या नावाखाली प्रिन्सिपल सर माझ्याकडून भलंतच काही एक्सपेक्ट करताहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं मला कधीच जमणार नाही. नलिनीचंच नाव ते पाठवतील असं वाटतंय.’’

तिला शांत करत, समजूत घालत हर्षदनं म्हटलं, ‘‘अगं, तू काळजी करू नकोस, आता परदेश प्रवास तेवढा अवघड राहिलेला नाही. मी जमवतो बघ, आपण दोघंही जाऊयात अन् फक्त जर्मनीच नाही तर संपूर्ण युरोपचा प्रवास करून येऊ. तू आता हस बघू…आपण नक्की नक्की परदेश प्रवास करू. तुझी तयारी आहेच. मलाच फक्त तयारी करावी लागेल.’’

दुसऱ्याच दिवशी नलिनी तिच्या व्हिसाच्या इंटरव्ह्यूबद्दल सांगत आली, वर अवनीला ऐकवलं, ‘‘अवनी, बी प्रॅक्टिकल. अगं, सरळ सरळ गिव्ह अॅन्ड टेक असं डील आहे. तुला ते जमलं नाही. सो सॉरी…येते मी…सर माझी वाट बघातहेत…’’

स्तंभित झालेली अवनी गिव्ह अॅन्ड टेकचं गणित सोडवण्याचा प्रयत्न करू   लागली.

परफेक्ट बॅलेंस

कथा * आशा ताटके

‘‘नेहा, खूप दमलोय गं! एक कप गरमागरम चहा अन् त्याच्यासोबत झणझणीत कांदा भजी देशील का? जरा लवकर…फास्ट!’’ राजननं येताच सोफ्यावर पाय पसरून जवळजवळ लोळणच घेतली.

कसंनुसं हसत नेहानं राजनला पाण्याचा ग्लास दिला अन् ती त्याच्या शेजारीच बसली. ‘‘चहा अन् भजी करते मी, पण थोडा वेळ लागेल. भराभर नाही होणार आज.’’

‘‘का? सगळं ठीक आहे ना?’’ जरा नाराज होत राजननं विचारलं.

‘‘गेले काही दिवस मला थकवा वाटतोय. थोडी विश्रांती घ्यावीशी वाटतेय.’’

नवऱ्याची नाराजी जाणवल्यामुळे नेहानं अगदी थोडक्यात आपली अडचण सांगितली. गेली इतकी वर्षं तेच तर करतेय ती…समस्या कोणतीही असो, कुणाचीही असो, ती सोडवणं हे नेहाचं काम होतं. सगळं सुरळीत झाल्यावरच ती राजनला सांगायची. त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेचा ताण येऊ नये हाच तिचा प्रयत्न असायचा. त्यातच तिचं सुख सामावलेलं असायचं.

‘‘ठीक आहे, माझी नाजूक राणी, भजी नाही तर नाही, चहासोबत निदान बिस्किटं तर देशील?’’ राजननं टोमणा दिला अन् नेहाकडे अजिबात लक्ष न देता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला.

नाजूक नेहाच्या मनाच्या आरशावर जणू काही दगड मारला असं वाटलं तिला. खळकन् मनाचा आरसा फुटला. पण नाजूक असली तरी गेली पंधरा वर्षं ती हा संसार एकटीनं सांभाळतेय. लहान मोठी कित्येक कामं परस्पर करते ती. त्यामुळे त्याची आच किंवा त्याचा त्रास राजनपर्यंत पोहोचत नाही. टपटपणारा बाथरूमचा नळ कधी नीट झाला, बंद पडलेला पंखा कधी फिरायला लागला, बाथरूममधलं छताचं लीकेज कसं थांबलं याचा राजनला पत्ताही लागत नसे. मुलांचं संगोपन, बँकेची, पोस्टाची, विम्याची कामं सगळं तिच तर बघते आहे. बाजारहाट, वाणसामान, विजेची, पाण्याची बिलं भरणं इतकं व्यवस्थित होतंय ते तिच्यामुळेच ना?

एवढंच नाही तर लहान मुलांच्या ट्यूशन्स करून ती घरबसल्या थोडा फार पैसाही मिळवत होती.

नवरा अन् मुलांच्या सुखासाठी तिनं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. स्वत:ला पार विसरली होती ती. राजन जेव्हा तिला झाशीची राणी किंवा राणी चेनम्मा म्हणायचा, तेव्हा तिला स्वत:चाच अभिमान वाटायचा. या संसाराची ती राणी होती, हेच तिचं सुख होतं. त्यासाठी स्वत:च्या इच्छांचा, आवडीचा त्याग करावा लागला याचंही तिला काही फार वाईट वाटत नव्हतं. त्याबद्दल तिनं कधी तक्रार केली नव्हती. पण आज तिला फार वाईट वाटलं. तिला थकवा वाटतोय. अशक्तपणा जाणवतोय त्याची थोडीसुद्धा काळजी राजनला वाटू नये? स्वत:ला कमी समजणं ही तिची चूकच होती.

नेहानं चहा केला. बिस्किटं प्लेटमध्ये ठेवली.

हात काम करत होते. मन अन् मेंदू मात्र भरकटलेले होते.

‘‘व्वा! काय चहा केलाय माझ्या राणीनं.’’ चहाचा घोट घेतल्याबरोबर राजननं म्हटलं.

‘‘राणी म्हणे! आता करताहेत उगीचच खोटी खोटी प्रशंसा. माझ्या अशक्तपणाबद्दल अजूनही काही काळजी नाहीए…कारण माझे त्रास, माझी दु:खं कधी मी सांगितलीच नाहीएत ना.’’ ती मनातल्या मनात तणतणंत होती.

‘‘नीरू अन् उमेश कुठं आहेत?’’ राजनचा प्रश्न तिच्या कानात शिरलाच नाही.

‘‘ट्यूशनच्या मुलांचं कसं चाललंय?’’ त्यानं पुन्हा विचारलं.

‘‘छान चाललंय, परीक्षा जवळ आलीय. त्यामुळे जरा जास्त वेळ द्यावा लागतोय.’’ नेहानं म्हटलं.

एखाद्या रोपट्याप्रमाणे माणसाच्या हृदयालादेखील वेळोवेळी प्रेमाच्या पाण्यानं शिंपावं लागतं. काळजी अन् सहानूभुती असं खत ही अधूनमधून घालावं लागतं. नाहीतर रोपटं सुकतं, कोमेजतं, विशेषत: स्त्रीचं संवेदनक्षम हृदय तर प्रेमाच्या हलक्याशा थोपट्यानं उसळून येतं अन् अवहेलनेच्या घावाने वाळून शुष्क वाळवंट होतं.

‘‘बरोबर आहे. परीक्षेमुळे वेळ द्यावाच लागेल, पण एक बरं आहे की तुला बाहेर नोकरीसाठी जावं लागत नाही. घरबसल्या पैसे मिळतात तुला. रोज नोकरीसाठी बाहेर जावं लागलं असतं तर किती थकायला झालं असतं?’’ राजननं पुन्हा घाव घातला.

नेहाला हे असह्य झालं. ती म्हणाली, ‘‘घरातच करायला शंभर कामं असतात अन् बाहेरचीही पुन्हा मला करावी लागतात, तीही तेवढीच असतात. तुम्हाला कधी ते करावंच लागलं नाही, म्हणून माहीत नाहीए. कारण तुमच्यावर कुठल्याही कामाचा ताण येऊ नये म्हणून मीच जिवाचा आटापिटा करून सगळं करत असते. त्यामुळेच माझं थकणं, माझा अशक्तपणा तुम्हाला जड जातोय. शेवटी माझंही वय वाढतंय. पूर्वीसारखी मी कशी राहीन? पण नाही, तुम्हाला तर मी कायम ताजी, टवटवीत, प्रफुल्लीत हवी असते ना?’’ संताप अन् अपमानानं तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

‘‘अगं, तू तर रागावलीस? मी असं काय बोललो? तू तर माझी झाशीची राणी आहेस ना?’’ राजननं तिला खुलावण्याचा प्रयत्न केला.

‘‘पुरे झालं? खोटं खोटं बोलणं. तुमचा चेक बँकेत भरला आहे अन् इन्शुरन्सवाल्यांना फोन करून झालाय.’’ नेहानं म्हटलं.

‘‘मॉडर्न स्त्री उगीचच कुणासाठी जीव जाळत नाही. स्वत:ला हवं तेच करते अन् स्वत:चं अस्तित्त्व समोरच्याला जाणवून देते.’’ नेहाचा स्वर जरा उंच लागला होता.

‘‘उगीच राईचा पर्वत करू नकोस नेहा. तूच काही एकटी स्त्री नाहीएस जी घरातली अन् बाहेरची कामं करतेस. या वाढत्या महागाईत प्रत्येक स्त्री काहीतरी करून पैसे मिळवतेच. घर, कुटुंब अन् बाहेरची कामं यांची योग्य सांगड घालणं मॉडर्न स्त्रीला सहजच जमतं. थोडं विचारपूर्वक नियोजन फक्त करायला हवं.’’ राजननं जणू आगीत तेल ओतलं.

‘‘तुम्हाला म्हणायचंय काय? माझी समजूत कमी पडते की मला जबाबदाऱ्या सांभाळता येत नाहीत? इतकी वर्षं सगळ्यांची सांगडच घालते आहे ना? तुम्हाला कधी कशाची झळ बसली की कुठं काही कमी पडलं? घरात बाहेर सगळीकडे बॅलेन्स करते आहे तरी…म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर…तसंच आहे हे.’’ नेहाला संताप आवरत नव्हता.

तेवढ्यात नीरू अन् उमेश आले. त्यामुळे विषय तिथंच थांबला. नेहानं त्यांना दूध दिलं. खायला घातलं अन् ती त्यांचा अभ्यास घेऊ लागली.

वातावरणात ताण होता. ‘‘मी जरा बाहेर फिरून येतो.’’ असं सांगून राजन बाहेर निघून गेला.

तसं बघितलं तर राजन अन् नेहाचा संसार तसा सुखाचा होता. थोडीफार वादावादी होते पण ती गरजेचीही असते. संसार त्याशिवाय अळणी वाटतो.

नेहाला राजनचा अभिमान होता. तो खूप कष्ट करत होता. महिन्यातून तीनवेळा तरी टूरवर असायचा. रात्री उशिरापर्यंत बसून प्रोजेक्टवर काम करायचा. नेहा त्याच्या सुखसोयींची जिवापाड काळजी घ्यायची. त्याच्या सुखात तिचं सुख होतं.

खरं तर राजनचंही तिच्यावर फार प्रेम होतं. पण प्रेम असणं अन् मनाच्या तळातून ते बाहेर येऊन समोरच्या व्यक्तिला जाणवणं यात फरक असतो. प्रेमाचे दोन शब्द, बरं वाटत नसताना सहानुभूती, केलेल्या कामाचं कौतुक आणि प्रशंसा एवढ्यानंही माणूस आनंदतो.

नेहा नेहमीच प्रसन्न, टवटवीत अन् हसतमुख असायची. त्यामुळे राजनला तिला तशीच बघायची सवय होती. तिनं कधीच कुठलीच समस्या, कुठलाच प्रॉब्लेम राजनला सांगितला नव्हता, त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट कशी कौशल्यानं हाताळते हे त्याला कळतच नव्हतं. आज प्रथमच तिनं तिची तब्येतीची तक्रार अगदी नकळत, अनवधावाने राजनसमोर बोलून दाखवली. तो सहानुभूतीनं प्रेमानं विचारपूस करेल अशी तिची अपेक्षा होती. चूक तिथंच झाली. भांडणाचं कारणही तेच होतं. रात्री जेवताना पतिपत्नी गप्पगप्प होते.

मुलं मात्र चिवचिवत होती, ‘‘बाबा, आईनं दमआलू किती यम्मी बनवलेत ना?’’ बोटं चाटत निरूनं म्हटलं.

‘‘हो ना, खरंच!’’ राजननं कबूली दिली.

उमेशही नेहाला शाळेतल्या सायन्स टीचरबद्दल अन् वर्गात करायच्या प्रोजेक्टबद्दल काही बाही सांगत होता. नेहा उसन्या उत्साहानं त्याला प्रतिसाद देत होती.

जेवणं झाली. डायनिंग टेबल आवरून, मुलांना ब्रश करायला लावून, त्यांना रात्रीचे कपडे घालायला देऊन नेहानं आपले कपडे बदलले. मुलांना त्यांच्या खोलीत झोपवून तिनं खोलीत येऊन राजनकडे पाठ केली अन् झोपली. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. राज पलंगावर पडून काही तरी वाचत होता. नेहा पलंगावर येताच त्यानं दिवा मालवला.

‘‘रागावली आहेस?’’ राजनच्या आवाजात लोण्याचा मऊपणा होता.

नेहा गप्प होती. काटा खोलवर रूतला होता. वेदना फार होती.

‘‘डॉर्लिंग, उद्या सायंकाळी मला टूरवर जायचंय. चार दिवस तरी लागतील परतून यायला. तू बोलली नाहीस तर कसं व्हायचं?’’

‘‘माझं डोकं दुखतंय. तुम्ही झोपा, मलाही झेपू द्या.’’ नेहानं म्हटलं.

‘‘मग मी तुझं डोकं चेपून देतो ना?’’ विनवणीच्या सुरात राजननं म्हटलं.

मघाच्या भांडणापासून आत्तापर्यंतच्या वेळात नेहानं मनोमन एक निर्णय घेतला होता. त्यामुळे तिनं वाद न वाढवता कूस बदलली अन् राजनकडे बघितलं. राजनला वाटलं चला, मौन सुटलंय, तो खरोखर हलक्या हातानं नेहाचं कपाळ चेपू लागला.

मनातल्या मनात नेहा हसली. ‘‘चांगलंय, करा सेवा.’’ तिनं डोळे मिटून घेतले. मनावरचं ओझं त्या निर्णयामुळे उतरलं होतं. तिला लगेच झोप लागली. राजनही शांत चित्तानं झोपला.

दुसरा दिवस नेहमीसारखाच होता. मुलं शाळेत गेली. राजन ऑफिसला गेला. नेहा रोजची कामं आटोपू लागली. पण काल जो निर्णय तिनं घेतला होता, तो मात्र ती विसरली नव्हती.

सायंकाळ झाली. मुलं अन् त्यांचे वडील घरी परतले. नेहानं सर्वांसाठी छान छान खाण्याचे पदार्थ तयार ठेवले होते. राजननं चहा फराळ आटोपला. नेहानं भरून ठेवलेली बॅग घेऊन तो टूरवर निघून गेला. निघण्यापूर्वी मुलांचे लाड केले. बायकोला मिठीत घेतलं. सगळं व्यवस्थित होतं नेहमीसारखं.

चार दिवसांनंतर राजन सकाळी नऊ वाजता घरी पोहोचला. मुलं शाळेत निघून गेली होती. नेहानं हसून स्वागत केलं. ‘‘तुम्ही स्नान करून घ्या. दोन बादल्या कडक पाणी बाथरूममध्ये तयार आहे. तुमचं आटोपेपर्यंत मी चहा अन् खायला तयार ठेवते.’’ तिनं म्हटलं.

राजनना वाटलं चला, सगळं सुरळीत आहे. तो सुखावला.

स्नान करून तो प्रसन्न चित्तानं डायनिंग टेबलवर आला, तेव्हा गरमागरम कांदा भजी, दुधी हलवा अन् वाफाळता चहा तयार होता. त्याला भजीबरोबर आवडणारी पुदिनाची चटणीही तयार होती.

राजन एकदम खुशीत आला. ‘‘मला ठाऊक होतं माझी राणी कधीच बदलणार नाही.’’ तो म्हणाला.

‘‘कशी झाली तुमची टूर?’’

‘‘चांगली झाली. कामं फार होती, पण मला समाधान आहे.’’

‘‘ऑफिसला किती वाजता जाल?’’

‘‘दुपारी तीनला जाईन. आत्ता घरीच थोडं काम करतो. जेवण झाल्यावर थोडी झोप घेईन, मग ऑफिसला जाईन. तू सांग, काय काय केलंस या चार दिवसांत?’’

‘‘केलं की! बरंच काही केलं.’’ नेहाच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं.

‘‘सांग तरी.’’

‘‘एका शाळेत इंटरव्ह्यू देऊन आलेय. पार्ट टाइम जॉब आहे. सहावी, सातवीच्या मुलांना इंग्रजी अन् सोशल स्टडीज शिकवायचं आहे. दोन्ही विषयात माझा चांगला हातखंडा आहे.’’

‘‘इंटरव्ह्यू? ही काय भानगड आहे?’’ राजन जरा बावचळलाच.

‘‘होय डार्लिंग, इंटरव्ह्यू…भानगड वगैरे काही नाही. नोकरी मिळाल्यात जमा आहे. येत्या पहिल्या तारखेपासून जॉईन करेन. माझ्या दोघी मैत्रिणी तिथं शिकवताहेत. पगारही चांगला आहे. माझ्या मैत्रिणींनीच माझी शिफारस केली होती…झालं! नोकरी मिळाली.’’ नेहानं सांगून टाकलं. तिला माहीत होतं की राजनला हे अजिबात आवडणार नाही. आता आवडो की न आवडो, पण त्याला आता नक्की कळेल परफेक्ट बॅलेन्स कसा ठेवला जातो.

‘‘पण अचानक हे नोकरीचं काय सुचलं?’’ राजन जरा खिन्न होता अन् चकितही.

‘‘घ्या! आता यात सुचायचं काय? जर प्रत्येक मॉडर्न स्त्री घराबाहेर पडून नोकरी करते तर मी का नको?’’ चटणीमध्ये भजी बुडवून खात नेहानं म्हटलं.

‘‘त्या दिवशीचं माझं बोलणं जिवाला लागलं का तुझ्या?’’

‘‘छे छे, उलट तुम्ही बरोबरच बोललात. बॅलेन्स करण्याची, सांगड घालण्याचीच तर बाब आहे…’’ नेहा शांतपणे दुधी हलवा खात म्हणाली.

‘‘पण तुझी तब्येत बघायला हवी. थकवा, अशक्तपणा…’’

‘‘इश्श! कमालच करता. तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी कशी काय वाटायला लागली? नवल आहे…पण तरीही ऐकून बरं वाटलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हे सगळं चालायचंच हो.’’

‘‘हो हो, जरा धीरानं घ्या…मी सांगतेय ना. मी डॉक्टरांना भेटून आले. त्यांनी तपासलं. त्या म्हणाल्या की दिसायला नाजूक दिसलीस तरी काटक आहेस तू. फक्त हिमोग्लोबिन थोडं कमी झालंय. सांगते तेवढ्या गोळ्या, टॉनिक घे. ठणठणीत होशील. आहारातही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्याही पाळते आहे.’’

‘‘अन् तुझ्या ट्यूशन्स?’’

‘‘होताहेत की! पार्ट टाइम नोकरी आहे. दुपारी साडेबाराला परत येतेय की. ट्यूशन तर दुपारी तीन वाजता सुरू होते. तीही आठवड्यातले चार दिवस. मुलं सायंकाळीच येतात. तुम्हीही सायंकाळीच येता. कामवाल्या बाईला सांगितलंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात थांबायला अन् सगळी कामं करायला. शाळेला शनिवार, रविवार सुट्टीच असते. म्हणजे सगळं बॅलेन्स होतंय की.’’ नेहा आघाडी भक्कमपणे लढवत होती.

‘‘अगं, पुढल्या महिन्यात दादा अन् वहिनी येताहेत आपल्याकडे…’’ पराभूत शिपायाच्या आवाजात राजन म्हणाला.

‘‘हो ना, ते तर फारच छान झालं. वहिनी किती सुगरण अन् हुशार आहेत. शिवाय दादा शिक्षक आहेत. पंधरा दिवस मुलांना फिजिक्स, मॅथ्स त्यांनाच शिकवायला सांगते.’’ नेहा हार मानायला तयार नव्हती.

‘‘म्हणजे तू नोकरी करण्याचं पक्कं ठरवलं आहेस?’’ राजननं शरणागती पत्करली.

‘‘अगदी पक्कं! तुम्ही बघा तर खरं, तुमची झाशीची राणी घरातल्या बाहेरच्या कामाची कशी सांगड घालते. कसं छान, योग्य नियोजन करते. तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे. मी परफेक्ट बॅलेन्स करणारच! बरं, ते सोडा, तुम्ही दमला असाल, मी तुमच्या डोक्याला छान तेलाचं मालिश करून देते. मग तुम्ही थोडी झोप काढा.’’ नेहा मधात साखर घोळवलेल्या आवाजात म्हणाली.

‘‘जेवायला काय आहे?’’

‘‘तुमचे आवडते दुधीचे कोफ्ते, वांग्याचं भरीत. शेवग्याच्या शेंगेची आमटी अन् शेवयाची खीर…तोंडाला पाणी सुटलं ना?’’

‘‘हं!’’ राजन निरूत्तर झाला होता.

परफेक्ट बॅलेंसचा फंडा नेहाला जमला होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें