दीपस्तंभ

कथा * डॉ. विनिता राहुरीकर

सविता एक पुस्तक घेऊन दिवाणखान्याच्या बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसल्या. पुस्तके वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. रमाने येऊन टेबलावर चहा ठेवला. रमाला न बोलताही सविता यांना काय हवे, हे सर्व समजत असे. कामावर ठेवले तेव्हा तिला फक्त दोन दिवसच काम समजावून सांगावे लागले होते. तिसऱ्या दिवसापासून ती न सांगताही सर्व व्यवस्थित करू लागली.

‘‘आज बेबीसाठी काय बनवायचे?’’ रमाने विचारले.

‘‘आता ती फक्त जेवेल. संध्याकाळी आल्यावर तिलाच विचार,’’ सविताने उत्तर दिले.

रमा तिचा कप घेऊन तिथेच बसली, मग चहा संपवला आणि स्वयंपाकघरात काम करायला निघून गेली.

सविताचा मुलगा आणि सून दोघेही शहरातील नामांकित डॉक्टर होते. मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन तर सून स्त्रीरोग सर्जन होती. त्यांचे शहरात स्वत:चे मोठे रुग्णालय असल्यामुळे दोघांकडे जराही वेळ नव्हता. कधी मुलगा, कधी सून तर कधी दोघेही घरी येऊ शकत नव्हते. रुग्णालयात इतके रुग्ण होते की, घरी आल्यावरही त्यांना जेवायला वेळ मिळत नसे. म्हणूनच रूपल पाच वर्षांची झाल्यावर आणि दुसरे अपत्य होण्याची शक्यता नसताना सविता यांनीही त्यांच्याकडे हट्ट केला नाही. जेव्हा आई-वडिलांकडे वेळ नसतो, तेव्हा मुलं एक असो किंवा चार असोत, काय फरक पडतो? सविता यांच्या पतीचे निधन मुलाच्या लग्नापूर्वीच झाले होते. मुलगा आणि सून दोघेही आपल्या कामात व्यस्त होते.

रूपलच्या जन्मानंतरच त्यांचा एकटेपणा खऱ्या अर्थाने दूर झाला. वयाच्या तीन महिन्यांपासून त्या रूपलला सांभाळत होत्या. त्यामुळे सूनही निश्चिंत होती. घरातील प्रत्येक कामासाठी बाई होती. त्यांचे काम फक्त रूपलला सांभाळणे आणि तिचे संगोपन करणे, एवढेच होते. आपल्या एकाकी जीवनात रूपलच्या रूपात त्यांना जे छोटेसे खेळणे मिळाले होते, ते पूर्ण वेळ त्यांचे मन रमवत होते. तेव्हाच तर रूपलने पहिला शब्द आई नव्हे तर आजी असा उच्चारला होता. कितीतरी काळ ती आई-वडिलांना अनोळखी समजून त्यांच्याकडे जाताच रडायची.

पाच-सहा वर्षांची झाल्यावर तिला समजू लागले की, ते तिचे आई-वडील आहेत. रूपल तिच्या आजीच्या म्हणजेच सविता यांच्या खूप जवळ होती.

लहानपणापासून आजपर्यंत अभ्यासातली अडचण असो किंवा वैयक्तिक काही गरज असो, ती फक्त आजीकडेच धाव घ्यायची. तब्येत बिघडली असेल तरी आजी आणि मैत्रिणीशी भांडण झाले असले तरी ते सोडवण्यासाठीही तिला आजीच लागायची. म्हणूनच तर रूपल त्यांना दीपस्तंभ म्हणायची.

‘‘तू माझी दीपस्तंभ आहेस, आजी.’’

‘‘दीपस्तंभ? तो कसा काय?’’ सविता यांनी हसत विचारले.

‘‘जसे समुद्रकिनारी किंवा बेटांवर अंधारात जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपस्तंभ असतात, जे त्यांना मार्गदर्शन करतात आणि अपघात होण्यापासून वाचवतात, त्याचप्रमाणे तू माझा दीपस्तंभ, माझा मार्गदर्शक, माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, जो प्रत्येकवेळी मला अंधारात मार्गदर्शन करतो,’’ असे म्हणत रूपल त्यांच्या गळयात हात घालून हलत असे.

तीच रुपल हळूहळू मोठी झाली. एमबीबीएस करून इंटर्नशिपही करू लागली. वेळ जणू पंख लावून उडून गेली, पण आजी आणि नातीमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ते जसेच्या तसे राहिले.

रुपलने डॉक्टर व्हावे असे सविता यांना वाटत नव्हते. मुलगा आणि सुनेच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरची झालेली अवस्था त्यांनी पाहिली होती. आजही घर फक्त सविता यांच्या खांद्यावर उभे होते. घर कसे चालवायचे, हे सुनेला कधी समजलेच नाही. ती बिचारी कधीच मातृत्व, आपल्या मुलीचे बालपण अनुभवू शकली नाही. तिच्या हाताने हजारो मुले जन्माला घातली, ती सुखरूप या जगात आली, पण ती स्वत: तिच्या एकुलत्या एका मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करू शकली नाही. हजारो मातांची कुस आनंदाने भरणाऱ्या तिच्या आयुष्यातला एकमेव आनंदही तिला अनुभवता आला नाही. सविता यांच्या मुलाची अवस्थाही त्यांच्या सुनेसारखीच झाली होती. ज्याने हजारो दुखत असलेल्या नसा सांभाळल्या, हजारो तुटलेल्या हाडांना जोडले तोच वेळेअभावी आपल्याच मुलीशी प्रेमाची तार जोडू शकला नाही.

सविता यांनी रूपलला आई-वडील दोघांचेही खूप प्रेम दिले. तिच्या मनात त्यांच्या विषयी कधीच तक्रारीला जागा निर्माण होऊ दिली नाही. म्हणूनच ती त्यांच्या व्यवसायाचा आणि त्या दोघांचाही खूप आदर करायची आणि तिने स्वत: डॉक्टर व्हायचे ठरवले. सविता यांना मात्र भीती होती की, रूपलला असे कुटुंब मिळाले की जिथे मुलांची काळजी घेणारे कोणीच नसले तर…

पुढे रुपलही डॉक्टर झाली.

‘‘आजी…’’ अशी लांबलचक हाक ऐकून सविता विचारातून बाहेर आल्या, रमाने दार उघडताच रूपल धावत आजीकडे गेली आणि सविता यांच्या गळयात हात घालून झुलू लागली.

‘‘एवढी मोठी झालीस, पण अजून तुझा बालिशपणा कमी झालेला नाही,’’ सविता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

‘‘आणि हा बालिशपणा कधीच कमी होणार नाही,’’ रूपल आजीच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली.

‘‘वेडे, तू कधी मोठी होशील की नाही,’’ सविता यांनी तिच्या गालावर हलकेच थोपटले.

‘‘मी मोठी कशी होऊ शकते? मी कालही तुझ्यापेक्षा लहान होती, आजही लहान आहे आणि नेहमी लहानच राहाणार,’’ रूपल तिच्या गालावर आपला गाल घासत म्हणाली.

सविता हसल्या, ‘‘चल, हात-तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढायला सांगते.’’

‘‘ठीक आहे आजी, श्रेयही काही वेळात येणार आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘तो तुझ्यासोबत का नाही आला?’’ सविता यांनी विचारले.

‘‘त्याचा एक रुग्ण तपासणे बाकी होते, म्हणून तो म्हणाला की नंतर येतो. तो थोडयाच वेळात येईल,’’ असे म्हणत रूपल खोलीत गेली.

सविता यांनी रमाला जेवण बनवायला सांगितले. जेवण टेबलावर येईपर्यंत रूपलही हात-तोंड धुवून आली. तितक्यात श्रेयही आला. तो येताच सविता यांच्या पाया पडला. तिघेही जेवायला बसले. रुग्णालय जवळच होते, त्यामुळे रूपल दुपारी जेवायला घरी यायची. श्रेयचे घर दूर होते, त्यामुळे तो अनेकदा रूपलकडे जेवायला यायचा.

रूपल आणि श्रेयने एकत्रच एमबीबीएस केले होते आणि आता ते एकत्र इंटर्नशिप करत होते. एकत्र शिकताना ते एकमेकांना आवडू लागले.

श्रेय स्वत: चांगला, सभ्य, सुसंस्कृत मुलगा होता. त्याचे कुटुंबही चांगले होते. त्याला नकार देण्याचे कुठलेच कारण नव्हते. सविता यांना मात्र थोडीशी भीती वाटत होती की, रूपल तिच्या आई-वडिलांचाच कित्ता गिरवणार नाही ना? मग त्यांनी विचार केला की, आतार्पंयत त्यांचे हात-पाय नीट चालत आहेत, रूपलच्या मुलालाही त्या आरामात सांभाळू शकतील. थेट रूपलच्या मुलाचा विचार केल्यामुळे सविता यांना स्वत:वरच हसू आले.

काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. रूपल आणि श्रेयची इंटर्नशिप संपली. श्रेयने ऑन्कोलॉजीमध्ये तर रूपलने गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये एमडी केले. अजूनही रूपलचा सविता यांच्यासोबत दुपारचे जेवण जेवण्याचा दिनक्रम सुरू होता. बऱ्याचदा श्रेयही त्यांच्यासोबत असायचा. आता सविता यांना रूपलप्रमाणेच श्रेयही आपलासा वाटू लागला होता.

त्यांच्यासाठी दोघेही सारखेच होते. एमडी होताच दोघांचे लग्न होणार होते. हळूहळू सविता याही रमाला सोबत घेऊन छोटी-छोटी तयारी करत होत्या. हॉटेल बुकिंग, केटरर्स, डेकोरेटर यासारखी मोठी कामे मुलगा आणि सून करणार होते, पण छोटी तयारीच जास्त असते. त्यामुळे त्या रमाला सोबत घेऊन रोज जमेल तितकी तयारी करत होत्या. सविता यांचे लग्नाच्या तयारीचे काम दिवसेंदिवस वाढत होते.

आधीच घरचा सगळा भार त्यांच्यावर होता, त्यात आता लग्नाच्या तयारीचे अतिरिक्त कामही होते, पण इतक्या व्यस्त दिनक्रमातही त्यांच्या लक्षात आले की, रूपल काहीशी उदास राहू लागली होती. नवीन घरात जाण्याची भीती किंवा आपल्या जिवलग माणसांना सोडून जाण्याचे दु:ख यामुळे ती उदास आहे का…? ती अचानक असे उदास होण्यामागचे कारण काय? श्रेयही आजकाल पूर्वीसारखा आनंदी दिसत नव्हता. त्याचे घरी येणेही कमी झाले होते, आल्यावर तो पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नव्हता. श्रेयला काही विचारणे त्यांना योग्य वाटले नाही, पण रूपलचे मन जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. जिच्या हसण्याने घराच्या भिंती आयुष्यभर हसत राहिल्या, तीच अचानक उदास झाली होती… ती या घरातून कायमची निघून जाणार, हा विचारही त्यांना सहन होत नव्हता.

एके दिवशी श्रेय जेवायला आला नाही, तेव्हा सविताने रूपलला खोलीत बोलावले आणि तिच्या उदास होण्यामागचे कारण विचारले. लग्नाला अवघे बारा दिवस उरले होते. समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, आता यावर उपाय शोधणे आवश्यक होते. रूपलला जणू वाटतच होते की, आजीने तिला विचारावे आणि तिने मनात साचलेले सर्व आजीला सांगून टाकावे.

‘‘उदास होऊ नको तर आणखी काय करू आजी? श्रेयच्या आईची इच्छा आहे की, लग्नात मी त्यांच्या घरचा पारंपरिक ड्रेस आणि जाडसर बांगडया, जुनाट दागिने घालावेत, जे त्यांना त्यांच्या सासूने आणि त्यांच्या सासूला त्यांच्या सासूने दिले होते,’’ रूपलने सांगितले.

‘‘मग त्यात काय अडचण आहे?’’ सविता यांनी विचारले.

‘‘अडचण काहीच नाही आजी, तुला माहीत आहे, त्या लेहेंग्यावर सोन्या-चांदीची नक्षी आहे… खूप वजनदार आहे तो… त्यावर चार किलोचे दागिने आणि तेही दीडशे वर्ष जुने आहेत, आजकाल कोण घालते? मी इतका सुंदर लेहेंगा आणि नाजूक हलक्या वजनाचे दागिने आणले आहेत, पण त्यांच्याकडचे वधूचे कपडे आणि दागिने बघून मी नाराज झाले. मला खरंच लग्न करावेसे वाटत नाही,

आजकाल हे सर्व कालबाह्य झाले आहे हे त्यांना समजत नाही, रूपल पुटपुटली.

सविता यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, निदान प्रकरण गंभीर नाहीए.

‘‘श्रेयचे काय म्हणणे आहे?’’ त्यांनी विचारले.

‘‘काय बोलणार तो, आईला समजावणे त्याला जमत नाही आणि…’’ रूपलने उदास होत बोलणे अर्धवट सोडले.

सविता यांना श्रेयची अडचण समजली. त्याला आईचे मन मोडायचे नव्हते आणि रूपललाही नाराज करायचे नव्हते. बिचारा, दोघींमध्ये अडकला होता. रूपलचीही काहीच चूक नव्हती. ती पहिल्यापासून अभ्यासात व्यस्त होती. आता डॉक्टर झाली होती. साजशृंगारासाठी तिच्याकडे वेळ नव्हता आणि त्याची तिला तितकीशी आवडही नव्हती. ती खूप साधी, पण नीटनेटकी राहायची, आता एवढे वजनदार कपडे आणि दागिने पाहून ती घाबरून जाणे स्वाभाविक होते.

सविता यांनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या, ‘‘तू श्रेयच्या आई मीरा यांच्याशी बोललीस का, त्यांना तू आणलेला लेहेंगा आणि दागिने दाखवून तुला हे घालायचे आहेत असे सांगितलेस का?’’

‘‘सांगितले, त्यांनाही ते आवडले, पण त्या म्हणाल्या की, लग्नातील इतर कुठल्याही विधीत इतके हलके दागिने घाल, पण लग्नात मात्र त्यांनी दिलेलेच घालावे लागेल. तूच सांग, त्या दीडशे वर्ष जुन्या पोशाखात मी कशी दिसेन…? मला नाही जमणार,’’ रूपल पुन्हा उदास झाली.

श्रेयच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवले आहे, त्यांच्याही काही इच्छा असतील ना? त्या पारंपरिक सनातनी कुटुंबातील सून आहेत, त्यांनाही त्यांच्या नात्यांचा आदर ठेवावाच लागेल ना? पण तरीही या समस्येवर उपाय असू शकतो, सविता म्हणाल्या.

‘‘कोणता उपाय?’’ रुपलने त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिले.

‘‘आजकाल एक नवीन ट्रेंड आहे, ज्याला लग्नापूर्वीचे फोटोशूट म्हणतात. आपणही तुमचे असे फोटोशूट करून घेऊया, त्याच दागिने आणि कपडयांमध्ये जे तू घालावेस, असे श्रेयच्या आईला वाटतेय. जर ते तुला चांगले किंवा आरामदायक वाटत नसतील, तर मी श्रेयच्या आईला समजावेन, तुला ते लग्नात घालावे लागणार नाहीत, असे मी तुला वचन देते. जर ते तुझ्यावर चांगले दिसत असतील तर मात्र तू ते लग्नात आनंदाने घालू शकशील. रूपल बघ, नात्याला दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागते. श्रेयच्या आईने तुमच्या भावना जपायला हव्यात, त्याचप्रमाणे तुलाही पुढाकार घेऊन त्यांच्या भावना आणि इच्छांचा आदर करायला हवा, तरच श्रेयलाही आनंद होईल,’’ सविता यांनी समजावत सांगितले.

‘‘ठीक आहे आजी, जसे तू सांगशील. मी तुझे सर्व ऐकेन,’’ रूपल हसत म्हणाली. तिला आता मन मोकळे झाल्यासारखे वाटत होते.

सविता या श्रेय आणि त्याच्या आईशी बोलल्या. त्या दोघांनीही आनंदाने त्यांचे म्हणणे मान्य केले. दोन दिवसांनी त्या रूपलला घेऊन श्रेयच्या घरी गेल्या. त्यांनी श्रेयच्या आईसोबत रूपलची तयारी केली. जेव्हा रूपलने स्वत:ला पारंपरिक पोशाखात आरशात पाहिले तेव्हा ती स्वत:च तिच्या रूपाने मोहित झाली. ती खूप सुंदर दिसत होती.

रूपलचे सौंदर्य पाहून श्रेयचेही डोळे चमकले. रूपल इतकी सुंदर दिसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. श्रेयची आई आणि सविता दोघीही तिच्या सौंदर्याकडे पाहातच राहिल्या. सविता यांनी घाईघाईने रूपलला काळा तीट लावला. मुलगी कितीही सुशिक्षित किंवा आधुनिक असली तरी ती वधू बनते तेव्हा भारतीय पारंपरिक पोशाख आणि साजशृंगारात सुंदर दिसते. श्रेयची आई मीरा या रूपलच्या दिसण्याचे कौतुक करू लागल्या. भारतीय वधू या जगातील सर्वात सुंदर वधू दिसतात.

छायाचित्रकार बराच वेळ रूपलचे फोटो काढत राहिला. त्यानंतर त्याने श्रेय आणि मीरा तसेच सविता यांच्यासोबत तिचे फोटो काढले. शूट पूर्ण झाल्यानंतर मीरा यांच्या लक्षात आले की, जड नथीमुळे रूपलचे नाक लाल झाले आहे आणि कंबरपट्ट्याच्या वजनामुळे तिचा लेहेंगा पुन्हा पुन्हा खाली येत आहे.

‘‘तू ही नथ घालू नकोस. लग्नाच्या दिवशी तुला काही त्रास व्हावा, असे मला वाटत नाही. लग्नासाठी आपण अमेरिकन डायमंडची छोटी नथ घेऊ. तसेही लग्नानंतर कोणीच नथ घालत नाही आणि हा जड कंबरपट्टाही राहू दे, तो आजच्या काळात शोभून दिसत नाही,’’ मीरा यांनी रूपलची नथ काढली आणि कंबरपट्टा तसेच केसांमध्ये लावलेले दोन-चार जुन्या पद्धतीचे दागिने वेगळे केले, जे शोभून दिसत नव्हते.

‘‘जर ही पैंजण खूप वजनदार वाटत असेल तर नवीन आणलेली हलक्या वजनाची घाल,’’ मीरा म्हणाल्या.

‘‘नाही आई, मी हीच घालेन, ती खूप सुंदर आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘ठीक आहे माझ्या बाळा, आजच्या आधुनिक काळातली असूनही तू आपल्या परंपरांचा इतका आदर करतेस, हे पाहून मला खूप आनंद झाला,’’ मीरा यांनी आनंदाने रूपलला मिठी मारली.

मीरा दागिने आणि कपडे ठेवायला आत गेल्यावर रूपल पटकन सविता यांच्या गळयाला बिलगली. ‘‘आभारी आहे आजी, तू फक्त माझ्या लग्नाचा दिवस आनंदी केला नाहीस, पण जीवनातील सर्वात महत्त्वाचे तत्त्वज्ञानही सांगितलेस की, जर आपण इतरांच्या भावनांचा आदर केला तर त्या बदल्यात नात्यातील गोडवा वाढतो. खूप प्रेमही मिळते. तू खरंच माझा दीपस्तंभ आहेस. मी खूप भाग्यवान आहे की, तू माझा आजी आहेस.’’

‘‘फक्त रूपलच्याच नाही तर तुम्ही माझ्याही दीपस्तंभ आहात, आजी. तुम्ही एका फोटोशूटच्या बहाण्याने सगळयांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्यात आणि त्यांना एकमेकांशी जोडलेत, नाहीतर लग्नाच्या एका दिवसातील अनावश्यक राग-रुसव्यामुळे आयुष्यभर नात्यात कटुता निर्माण झाली असती. खूप खूप आभार, आजी,’’ श्रेय म्हणाला. सविता यांनी हसून दोघांनाही आपल्या मिठीत घेतले.

पडद्याआड उभ्या असलेल्या मीरा त्या तिघांकडे पाहून प्रेमाने हसून जणू म्हणत होत्या की, ‘‘आमच्या सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभा, धन्यवाद.’’

चूक झाली

कथा * अर्चना पाटील

पीएसआय देवांश पाटील पुण्यात नवीनच जॉइनींग झाला होता. मागच्याच आठवड्यात एका रेव पार्टीत त्याने २६९ तरुणतरूणींना पकडले होते. गणेशोत्सवात डीजे वाजवणे बंद केले होते. अनेक स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये तो मार्गदर्शन करत असे. पीएसआय देवांशचे व्हिडिओ अनेक तरूण युट्यूबवर पाहत असत. त्याच्या सेमिनारमध्ये तरूणांच्या गर्दीचा लोट उसळत असे. पण करीअरसोबतच पाटील कुटुंबीय त्याच्य विवाहाची तयारी करत होते.

पुढच्याच आठवड्यात एका ठिकाणी मुलगी पाहायला देवांश त्याच्या कुटुंबीयांसोबत गावाकडे जाणार होता. देवांशने हो म्हणताच साखरपुडा होणार होता. पटवर्धनांची ज्येष्ठ कन्या जिज्ञासा पाटील कुटुंबाने पसंत केलेली होती. जिज्ञासा एमबीए झालेली होती. चार वर्षांपासून पुण्यातच होस्टेलला राहून शिकत होती. पटवर्धन गावाकडे सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक होते. त्यामुळे पाटील कुटुंबाला बक्कळ हुंडा मिळणार होता. दोन्हीही प्रतिष्ठित घराणी होती. वधुवर उच्चशिक्षित, देखणे एकमेकांना साजेसे होते. केवळ देवांशची पसंती बाकी होती.

‘‘एवढी सुंदर, उच्चशिक्षित शिवाय परिचित कुटुंबातील मुलगी अजून कुठे भेटणार आहे? मनासारखे स्थळ आहे,’’ मामा बोलत होता.

आता कधी जिज्ञासाला पाहतो असं झालं होतं देवांशला. थोड्याच वेळात पाटील कुटुंब पटवर्धनांच्या अंगणात पोहोचले. पटवर्धनांनी यथोचित पाहुणेमंडळींचे स्वागत केले. चहा-पोह्यांचा कार्यक्रम झाला. नंतर वधूकन्या जिज्ञासा चहाच्या कपाचा ट्रे हातात घेऊन डोक्यावर पदर घेऊन हॉलमध्ये दाखल झाली. पण नियोजित वधूचा चेहरा पाहताच देवांशचा चेहरा खाडकन् उतरला. देवांशला कप देताना जिज्ञासा आणि देवांशची नजरानजर झाली आणि जिज्ञासालाही आता मी माझा चेहरा कोठे लपवू असे झाले. पुण्यात धाड टाकलेल्या रेव पार्टीत देवांशने जिज्ञासाला पकडले होते. कोणत्यातरी प्रतिष्ठित व्यक्तिच्या फोनमुळे तिला आणि तिच्या मैत्रिणीला पकडूनही सोडून देण्यात आले होते.

‘‘जावईबापू, आमची जिज्ञासा सर्वगुणसंपन्न आहे. तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता?’’

‘‘अहो पटवर्धन, आपल्यासमोर ते काय बोलणार? आतल्या खोलीत जाऊ द्या त्यांना,’’ देवांशचा मामा बोलला.

‘‘हो हो, नक्कीच. जिज्ञासा जावईबापूंना आतल्या खोलीत घेऊन जा.’’

देवांश जिज्ञासाच्या मागे खोलीत शिरला. जिज्ञासा खूप घाबरलेली होती आणि तिला स्वत:चीच लाजदेखील वाटत होती. देवांश पलंगावर बसला. जिज्ञासाने पटकन् खोलीचा दरवाजा बंद केला आणि दरवाज्याजवळच उभी राहिली.

‘‘मला असं वाटतं, बोलण्यासारखं काहीच नाहीए मिस जिज्ञासा. विनाकारण एकमेकांचा वेळ वाय घालवण्यात काहीही अर्थ नाही.’’

जिज्ञासा काहीही न बोलता गुपचूप उभी होती. देवांश दरवाजा उघडून हॉलमध्ये गेला. हॉलमध्ये शिरताच देवांशच्या होकारासाठी सर्वजण आतुर झाले होते.

‘‘पुढे काय करायचं देवांश?’’ पाटलीण बाई म्हणाल्या.

‘‘आई, घरी जाऊन पाहू, आता आपण निघूया.’’

‘‘ठिक आहे, काही घाई नाही.? शांततेत विचार करून निर्णय घ्या. आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू.’’

देवांशच्या उत्तराने सगळ्यांचीच निराशा झाली. पटवर्धन तर एवढे चांगले स्थळ हातातून गेले म्हणून खचूनच गेले. ‘आपण पार्टीत जाऊन एक चूक केली. पण जर आता मी माझी बाजू देवांशसमोर मांडली नाही तर मी आयुष्यात दुसरी चूक करेन.’ जिज्ञासा मनोमन विचार करत होती. शेवटी जिज्ञासानेच स्वत:हून देवांशला भेटायचे ठरवले. एक दिवस त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ती जाऊन पोहोचली. देवांश त्यांच्या खुर्चीवर फाईल चाळत होता. जिज्ञासा घाबरतच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली.

‘‘मला बोलायचं होतं तुमच्याशी.’’

‘‘बोला.’’

जिज्ञासाला पोलीस स्टेशनमध्ये इतक्या माणसांमध्ये कसं बोलावं हे समजत नव्हतं. ती दोन मिनिटं शांतच उभी राहिली. देवांशही फाईलमध्येच डोके घालून बसला.

‘‘आपण बाहेर बोलूया का, प्लीज.’’

‘‘ठिक आहे.’’

दोघेही एका झाडाखाली आले.

‘‘मी चार वर्षांपासून पुण्यात शिकते आहे. माझी रूममेट सतत रेवपार्टीत जात असे. उत्सुकता म्हणून मलाही केवळ पाहायचं होतं, रेवपार्टी काय असते. त्यादिवशी मी माझ्या रूममेटसोबत पार्टीत गेले होते. पण आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचे ड्रिंक घेतलेले नाही. तुम्ही हवं तर माझी ब्लडटेस्ट करू शकता. तुम्ही तर पोलीस खात्यात आहात. माझ्याबद्दल सर्वत्र तुम्ही चौकशी करू शकता. आयुष्यात प्रथमच माझा तोल गेला. माझ्याकडून चूक झाली. मी मान्य करते. मुळात मी वाईट मुलगी नाहीए, एवढंच मला सांगायचं होतं. त्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबीयांना माझ्याबाबत काहीही सांगितलं नाही, त्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे होते. बस्स एवढंच. येते मी.’’

जिज्ञासाला अपेक्षा होती की देवांश तिला थांबवेल. पण तंस काहीही घडलं नाही. देवांशचे कुटुंबीय सतत त्याला नकाराचे कारण विचारत होते, पण त्याला एकही कारण सापडत नव्हते. जिज्ञासा एवढं चांगलं स्थळ आपल्या मुर्खपणाने गेलं म्हणून हमसून हमसून हॉस्टेलच्या खोलीत रडत बसे. तिची ती अवस्था पाहून एके दिवशी तिची दुसरी रूममेट तनया थेट देवांशच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भिडली.

‘‘नमस्कार सर, मी जिज्ञासाची मैत्रीण. तुम्ही लग्नाला नकार का देत आहात यांचं मला कारण जाणून घ्यायचंय. माझं बोलणं उद्धटपणाचं आहे, पण गरजेचं आहे. कारण तुमचा निर्णय चुकतो आहे. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी संबंध जोडले. याचा अर्थ वधुवर एकमेकांना साजेसे होते म्हणूनच ना. राहिला जिज्ञासाच्या पार्टीचा प्रश्न. तर ती त्यातली मुलगी नाहीए. आमची एक रूममेट रोज पार्ट्यांना बाहेर जाते. जिज्ञासा एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी. तिला सहजच वाटलं की एक रात्र आपणही जाऊन पाहावं की तेथे नेमकं काय होतं. त्याबाबत तिला आजही प्रश्चात्ताप होतो आहे. आपल्या चुकीमुळे तुमच्यासारखा वर गमावून बसली म्हणून निराश झाली आहे. तिच्या डोळ्यांतले पाणी थांबत नाहीए. एक सुन म्हणून तिच तुमच्या कुटुंबाला शोभून दिसेल. पुन्हा एकदा शांत डोक्याने नीट विचार करा. येते मी.’’

हे संभाषण पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण ऐकत होते. एक सिनिअर येऊन बसला.

‘‘काय भानगड आहे?’’

‘‘काही नाही सर, एक मुलगी आहे.’’

‘‘मला ओझरतं माहिती आहे. तुझ्या वडिलांशी मी बोललो आहे. आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात. शिवाय तुझ्या कुटुंबीयांनी त्या मुलीबद्दल सर्व माहिती काढलेली आहे. तू विनाकारण जास्त ताणतो आहेस, असं मला वाटतं.’’

आता मात्र देवांशने पुन्हा एकदा जिज्ञासाचा विचार करायला सुरूवात केली. सर्व लोकांकडून माहिती काढली आणि त्याचाही विश्वास बसला की जिज्ञासा एक सुसंस्कारित मुलगी आहे. दुसऱ्याच दिवशी तो जिज्ञासाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला. जिज्ञासा टेबलवर डोके टेकवून खाली मान घालून बसली होती.

‘‘नको ना यार, काही वेळ फक्त एकटीलाच बसू दे ना.’’

देवांशला पाहाताच तनयाने तिथून काढता पाय घेतला.

‘‘भैय्या, दोन चहा,’’ देवांश टेबलवर जाऊन बसला.

देवांशचा आवाज ऐकताच जिज्ञासाने वर मान केली.

‘‘पहिली गोष्ट मी पोलीस आहे. त्यामुळे रडणारी बायको तर मला मुळीच नको. दुसरी गोष्ट मला दोन्ही वेळ घरचेच जेवण लागते. त्यामुळे कधीही माझ्यासाठी डबा बनवावा लागेल. तिसरी गोष्ट मला माझी बायको साडीतच पाहायला आवडते. चौथी गोष्ट माझ्या आईबाबांचं कधीही मन दुखवायचं नाही. पाचवी गोष्ट माझ्या आयुष्यात देशसेवेला पहिलं स्थान आहे नंतर कुटुंब, मान्य आहेत का या गोष्टी तुला?’’

जिज्ञासाला आनंदाश्रुंच्या गदारोळात काय बोलावं तेच सुचत नव्हतं. जिज्ञासा लाजतही होती आणि गालातल्या गालात स्मितहास्य पण करीत होती.

‘‘येतो मग, रविवारी साखरपुड्याला,’’ चहा पिऊन देवांश पतरला.

अपूर्ण

कथा * अर्चना पाटील

धारीणी आज प्रथमच नोकरीसाठी बाहेर पडली होती. रूद्र गेल्यापासून ती खूपच एकटी पडली होती. समीराची जबाबदारी पार पाडताना तिची दमछाक होत होती. समीराच्या आयुष्यातील वडील म्हणून रूद्रची रिकामी झालेली जागा धारीणीलाच भरून काढावी लागत होती. नोकरीमुळे तर धारीणीचे प्रश्न अजुनच वाढले. पण घरात बसुन किती दिवस निघतील? त्यामुळे धारीणीसाठी नोकरी ही गरज बनली होती. एका हॉटेलमध्ये रिसेप्शनीस्ट म्हणून तिला जॉब मिळाला. पण रोजच रेल्वेने अपडाऊन हा सर्वात मोठा प्रश्न होता तिच्यासाठी, कारण सवय नव्हती त्या गोष्टींची. पहिल्या दिवशी धारीणी तिचा भाऊ सारंगसोबत आली. सारंगने त्याच्या मित्रांशी तिची ओळख करून दिली.

‘‘ताई, हे सर्वजण तुला मदत करतील. कोणालाही हाक मार.’’

‘‘नक्कीच, टेन्शन नका घेऊ मॅडम तुम्ही.’’ घोळक्यातून एक आश्वासक आवाज आला.

‘‘ताई, हा मंदार शेटे. हा आणि तू सोबतच उतरणार आहात. संध्याकाळीही हा तिकडून तुझ्यासोबत असेल. तर मग मी निघू आता.’’

‘‘हो, निघ,’’ धारीणी नाराज होऊनच म्हणाली.

दोनच मिनिटात ट्रेन आली. धारीणी लेडीज डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होती. सारंगचे सर्व मित्रही त्याच डब्यात चढले.

‘‘अहो, हा लेडीज डबा आहे ना. मग तुम्ही सगळे याच डब्यात कसे?’’

‘‘अहो मॅडम, आम्ही रोज इथेच असतो. आपल्या गावाकडच्या ट्रेनमध्ये सगळं चालतं. ही काय मुंबई थोडीच आहे.’’ मंदारच परत बोलला.

धारीणी आता गप्पच बसली. मनातल्या मनात तिचा दिवस चांगला जावा असा विचार करू लागली. सावरगाव येताच धारीणी आणि मंदार ट्रेनमधून उतरले.

‘‘चला मॅडम, मी सोडतो तुम्हाला हॉटेलला.’’

‘‘नाही, नको उगाच तुम्हाला कशाला त्रास…’’

‘‘अहो, त्यात कसला त्रास. तुम्ही सारंगच्या बहीण…. सारंग माझा चांगला मित्र…सोडतो मी तुम्हाला…’’

धारीणीचाही पहिलाच दिवस होता. तीसुद्धा घाबरलेली होती. मंदारमुळे थोडसं हलकं वाटत होतं…म्हणून तीसुद्धा मंदारच्या गाडीवर बसून गेली. दिवस चांगलाच गेला. संध्याकाळी रेल्वेत पुन्हा ती मंदारला भेटली.

‘‘काय मग, कसा गेला आजचा दिवस धारीणी….सॉरी हं, मी जरा पटकनच एकेरीवर आलो.’’

‘‘नाही, नाही. इट्स ओके. तुम्ही बोला. काहीही बोला. बिनधास्त बोला. मला राग येणार नाही.’’

दोघेही घरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी परत तोच किस्सा. हळूहळू मंदार आणि धारीणी चांगले मित्र बनले. सकाळ संध्याकाळ मंदार आणि धारीणी रेल्वेत भेटत होते. अधून मधून मंदार धारीणीला हॉटेलमध्ये सोडतही असे. कधीतरी घ्यायलाही येत असे. रात्री अपरात्री व्हॉट्सअॅप चँटींगही होत असे. धारीणी तिचे सगळेच प्रश्न मंदारशी शेअर करत असे.

‘‘जाउ दे गं, काही होत नाही…’’ या शब्दात मंदार धारीणीला समजावून सांगत असे.

धारीणीसाठी मंदार म्हणजे तिचं स्ट्रेस रीलीफ औषध होतं. समीरा, आईबाबा, सारंग हे सर्वजण रूद्रची कमतरता भरून काढू शकत नव्हते, पण मंदार रूद्रसारखा मानसिक आधार देत होता. मंदारमुळे धारीणी पुन्हा नटायला शिकली, हसायला शिकली. चांगले कपडे घालून मिरवायला शिकली. तिच्यासाठी तो नक्कीच तिचा एक चांगला मित्र होता. बाईकवर ती कधीतरी पटकन त्याच्या खांद्यावरही हात ठेवत असे. बोलताना पट्कन त्याच्या पाठीवर एखादी चापटही मारत असे. पण या हालचाली तिच्याकडून केवळ एक चांगला मित्र म्हणूनच होत असत. एके दिवशी सकाळी नऊला सावरगावला उतरताच दोघांनी चहा घेतला.

‘‘तू खुपच बोलतेस माझ्याशी, का गं?’’

‘‘तू आवडतोस खुप मला. तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं मला. तुझी पर्सनॅलिटीही खूप छान आहे. रेल्वेत बोलता येत नाहीत या गोष्टी सगळयांसमोर. आता आपण दोघंच आहोत म्हणून बोलते आहे.’’

‘‘ओ बापरे, काय खाऊन आलीस आज घरून?’’

‘‘काही नाही, खरं तेच सांगते आहे. तुझ्याशी जी मुलगी लग्न करेल ती खुपच लकी असेल.’’

‘‘हो का, इथून पुढे पस्तीस किलोमीटरवर लेण्या आहेत. येतेस का पहायला?’’

‘‘वेडा आहेस का तू, मी घरी काहीच सांगितले नाहीए. उशीर झाला तर आईबाबा चिंता करतील.’’

‘‘उशीर होणार नाही, ट्रेनने तू रात्री नऊला पोहोचतेस घरी. मीसुद्धा तुला शार्प नऊ वाजताच तुझ्या घरासमोर उभं करेन.’’

‘‘काहीही सांगतोस तू, आईबाबा काय म्हणतील?’’

‘‘तू माझ्यासोबत लेण्या पहायला येते आहेस हे सांगूच नकोस ना त्यांना. एक दिवस खोटं बोललीस तर काय फरक पडणार आहे तुला. सहा महिन्यात कधी काही मागितलं का मी तुझ्याजवळ? फिरून येऊ ना. तेवढाच तुलाही चेंज मिळेल. तुझ्याचसाठी सांगतो आहे. मी तर हजारवेळा जाऊन आलोय लेण्यांमध्ये.’’

‘‘नाही, मी जाते कामावर.’’

‘‘निघ, आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलत होतीस की म्हणे मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडतं. प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली तर घाबरते आहेस.’’

‘‘अरे, मला आवडतं. म्हणून काय मी तुझ्यासोबत गावभर कुठेही फिरायचं का?’’

‘‘बरं, इथे माझा आणि सारंगचा मित्र आहे. संध्याकाळी त्याच्या बाळाला पहायला येशील का?’’

‘‘ट्रेन निघून जाईल ना मग?’’

‘‘मी सोडेन तुला घरी, माझे आई. त्याचा विचार मी अगोदरच केलेला आहे.’’

‘‘ठीक आहे, जाऊ सोबत.’’

धारीणीने केवळ मंदार नाराज होऊ नये म्हणून होकार दिला.

‘‘जरा एक तास लवकर निघ आज, म्हणजे घरी जायला उशीर होणार नाही तुला,’’

‘‘हो रे बाबा, प्रयत्न करेन. मालकाने सोडायला हवं ना.’’

‘‘एक दिवसही माझ्यासाठी लवकर येऊ शकत नाहीस का तू?’’

‘‘संध्याकाळी येते ना मी तुझ्यासोबत. अजून काय पाहिजे. निघते मी. उशीर होतोय.’’

संध्याकाळी धारीणी तिच्या रोजच्याच वेळेल म्हणजे साडेपाचला हॉटेलबाहेर येऊन उभी राहिली. मंदार पाचपासुनच तिची वाट पाहत होता. धारीणी बाइकवर बसताच बाईक निघाली.

‘‘कुठे राहतो तुझा मित्र?’’

‘‘नेतो आहे ना मी तुला. कशाला हव्यात चौकश्या.’’

टुव्हीलर गावाच्या बाहेरच जात होती. धारीणीला समजत होते, पण मंदार बोलूही देत नव्हता. शेवटी गावाबाहेर एका घराजवळ गाडी थांबली. घराला कुलूप होते. आजुबाजुला शेत होते. त्याठिकाणी लोकांची वस्ती नव्हती आणि फारशी वर्दळही नव्हती.

‘‘या घराला कुलूप का आहे मंदार?’’

‘‘चावी माझ्याकडे आहे, चल आत जाऊ.’’

‘‘पण का? तू मला घरी सोड.’’

‘‘बावळट आहेस का तू? कधी नव्हे तो निवांत वेळ मिळाला आहे आपल्याला. अर्धा तास बसू आणि लगेच निघू.’’

‘‘मी नाही येणार आत.’’

‘‘हे बघ, तू फक्त डोळे बंद करून उभी रहा. मी फक्त एक मनसोक्त कीस करणार आहे आणि आपण लगेच निघू. तुझा माझ्यावर विश्वास नाही का?’’

‘‘हे बघ मंदार, तू मला मित्र म्हणून आवडतोस. पण या गोष्टींसाठी माझी लॉयल्टी रूद्रशी होती आणि मरेपर्यंत त्याच्याशीच राहील.’’

‘‘पण मलाही तू आवडतेस आणि मला जर तुला स्पर्श करावासा वाटत असेल तर त्यात काय चुकीचं आहे.’’

‘‘कदाचित माझं चुकलं असेल. मी तुझ्यापासुन दूर रहायला हवं होतं.’’

‘‘अगं ऐक ना, अर्धाच तास आहे आपल्याकडे. कशाला वेळ वाया घालवते आहे? मी कोणती तुझ्याकडे एवढी धनदौलत मागतो आहे.’’

‘‘मला फसवलंस मंदार तू. पुरूषांना मोहाचा शाप असतो हेच खरं. मी माफी मागते तुझी. मी मर्यादेत राहिले असते तर तुझा गैरसमज झाला नसता आपल्या रीलेशनशीपबाबत. आता माझी ट्रेनही गेली असेल. सारंगची बहीण म्हणून तरी मला सुखरुप घरी सोड.‘‘

‘‘अगं ए बये, तू टेन्शन नको घेऊस. तु?झ्या संमतीशिवाय मी काहीही करणार नाही.’’

मंदारने पटकन बाईकला किक मारली आणि साडेआठलाच गाडी धारीणीच्या घरासमोर आणून सोडली. बाईकचा वेग आणि मंदारचा राग हे दोन्ही सोबतीला होतेच, पण रस्त्यात दोघंही एकमेकांशी एक चकार शब्दही बोलले नाहीत. घर येताच धारीणी पटपट चालू लागली.

‘‘अहो मॅडम, तुम्हाला सुखरूप कोठेही हात न लावता तुमच्या घरी सोडलंय बरं का मी? तुम्ही जिंकलात, माझी एक इच्छा पुर्ण केली असती तर काय बिघडलं असतं तुमचं? मी काही झोपायला सांगत नव्हतो तुम्हाला माझ्यासोबत. मलाही माझ्या मर्यादा समजतात, मॅडम.’’

‘‘हे बघ मंदार,प्लीज तू या अॅटीट्युडने माझ्याशी बोलु नकोस. संस्कार नावाचीही काही गोष्ट असते की नाही? या गोष्टींसाठी माझं  मन कधीच तयार होणार नाही. तुझ्यामुळे मी रूद्र गेल्यानंतर पुन्हा जगायला शिकले, पण तुला जर माझा स्पर्शच हवा असेल तर मला कधीच भेटू नको.’’

‘‘एकीकडे म्हणतेस तू मला आवडतोस. अगं वेडे, स्पर्शातूनही प्रेमच व्यक्त होतं ना.‘‘

‘‘मंदार, एकमेकांबद्दल फील करणं वेगळं आणि स्पर्श करणं वेगळं. माझ्या शरीरावर रूद्र्चाच हक्क होता आणि राहणार. तू जे सांगतोस, ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही. माझी विचारसरणी अशीच आहे.’’

‘‘पुन्हा विचार कर माझ्या बोलण्यावर. मी वाट पाहेन तुझी.’’

‘‘मंदार, अरे यावर्षी तुझं लग्न होणार आहे. तुझ्या बायकोला कोणत्या तोंडाने   भेटणार आहे मी? तू माझा मित्र आहेस आणि कदाचित मित्रापेक्षाही जास्त आहेस. पण प्रत्येक गोष्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे असं नसतं मित्रा, त्यामुळे आजपासुन मी तुला कधीच त्रास देणार नाही. आपण यापुढे कधीच भेटायचं नाही. माझ्यामुळे तुझं मन दुखावलं गेलं म्हणून मला माफ कर.’’

नास्तिक बायको

कथा * माधव गवाणकर

श्वेता सासरी गेल्यावर तिच्या मम्मी आणि पप्पांना घर खायला उठलं होतं. बडबडी, बोलकी, मनमोकळी अशी ती मुलगी. मम्मीला फक्त एकच गोष्ट खटकायची की श्वेता देवधर्म, कर्मकांड वगैरे मानत नव्हती. कर्मकांडाला तिचा नकार असायचा. ‘गोडधोड कधीही करावं, सण उत्सव कशाला हवा? दिवाळीचा फराळ तर आता वर्षभर मिळतो. आपली ऐपत आहे. मग काय प्रॉब्लेम आहे.’ अशी श्वेताची वेगळी विचारसरणी होती. तिला त्यात काही प्रॉब्लेम नसला तरी सासरच्या लोकांना तिचा प्रॉब्लेम होऊ लागला. श्वेताचा नवरा आकाश बराचसा सुपरस्टारसारखा दिसायचा. ‘सेम रोशन वाटतो गं’ अनेक बायका त्याच्याकडे वळून वळून बघत. श्वेताचा मैत्रिणी हेवा करत. जिमला जाणारा असा देखणा पती मिळाल्यामुळे श्वेताचं वैवाहिक जीवन छान बहरू लागलं होतं. प्रणयाला एक वेगळीच धुंदी चढायची, पण एके दिवशी आकाश तिला म्हणाला, ‘‘केवळ माझ्या आईबाबांसाठी तू रोज पूजा करत जा…प्लीज. प्रसाद म्हणून खोबरं वाटायला तुला काय प्रॉब्लेम आहे. फक्त आठवड्यातून एकदा उपवास कर. आईला समाधान मिळेल की सून सुधारली.’’

श्वेता थोडी रागावून म्हणाली, ‘‘सुधारली म्हणजे? नास्तिक बाई बिघडलेली, उनाड असते का? भक्ती ही सक्ती असता कामा नये. मला नाही पटत तर जबरी कशाला? मी कधीच माहेरी उपवास केलेले नाहीत. मला पित्ताचा त्रास आहे. तो वाढेल. शिवाय मी मुळात कमी जेवते. दोन फुलके आणि जरासा भात. मग उपवास कशाला?’’ श्वेता सत्यच बोलत होती. पण आकाश नाराज झाला. त्याने हळूहळू श्वेताशी अबोला धरला. लैंगिक असहकार करून पाहिला. श्वेताला मूड यायचा तेव्हा ‘आज दमलोय, नको’ म्हणत आकाश प्रणयाला नकार द्यायचा. असं वारंवार होऊ लागलं.

‘‘तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कसा काय संपला? व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ असं श्वेताने आकाशला एके दिवशी विचारलं. त्याचं उघडं, पीळदार शरीर रात्री बेडरूममध्ये पाहिल्यावर तिच्या मनात स्वाभाविकच शरीरसुखाची इच्छा प्रबळ झाली. आकाश स्पष्टपणे म्हणाला, ‘‘तू देव मानायला लाग. आईला खूश कर. नंतरच आपण आपल्या सुखाचं बघू…

‘‘माझा देवावर विश्वास नाही, हे लग्नाआधी मी तुला स्पष्ट सांगितलं होतं. गोरेगावच्या बागेत आपण फिरायला गेलो होतो. आठवतंय का तुला?’’

‘‘मला वाटलं तू बदलशील…’’

‘‘अशी कशी बदलेन? मी काही रागाने, भावनेच्या भरात नास्तिक झालेले नाही. अभ्यास आहे माझा…’’ हे बोलताना श्वेता वालावलकर सरांचं ‘श्रद्धा विसर्जन’ नावाचं पुस्तक चाळत होती.

हळूहळू श्वेताचे आणि सासूचे वादही वाढू लागले. खटके उडायचे. श्वेता सासूच्या सोबतीला देवळापर्यंत जायची खरी, पण बाहेरच थांबायची. त्यावरुन भांडण झालं. सासू म्हणाली, ‘‘बाहेर चपला सांभाळायला थांबतेस का? आत आलीस तर काय झिजशील?’’ श्वेता पटकन बोलून गेली, ‘‘मला शहाणपणा शिकवू नका. तुमचं काय ते तुमच्यापुरतं ठेवा.’’ सासू घरी आल्यावर रडू लागली. ‘‘मला उभ्या जन्मात असं कुणी बोललं नव्हतं. देव बघून घेईल तुला,’’ असं बोलत सासूने सुशिक्षित सुनेला जणू शत्रूच ठरवलं.

संध्याकाळी आकाश आल्यावर श्वेता म्हणाली, ‘‘मी माहेरी जातेय. मला बोलवायला येऊ नका. मला वाटलं तर मी येईन. पण नक्की नाही. माहेरीच जातेय मी विरारला. कुठे पळून जात नाही, नाहीतर उठवाल काहीतरी खोटी आवई.’’

आकाश तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या या करारीपणाची त्याला थोडी भीतिच वाटली. श्वेता आपल्या श्रीमंत वडिलांकडे जाऊन राहिली. तिच्या मम्मीला ते खटकलं. पण श्वेता म्हणाली, ‘‘थांब गं तू. आकाशला माझ्याशिवाय करमायचं नाही.’’ तसंच झालं. पंधरावीस दिवस उलटल्यावर त्याचा फोन येऊ लागला.

श्वेता नवऱ्याचा फोन कट करायची. मग त्याने एसएमएस केला, ‘तुझ्याशी बोलायचं आहे. विरारला येऊ का?’ श्वेताच्या मनातही तेच होतं. तिने होकार दिला.

आकाशनं नमतं घेतलं. श्वेता म्हणाली. ‘‘तुम्हाला देव मानण्यापासून मी कधी रोखलं का? तुम्ही जरूर पूजा, प्रार्थना काय ते करा. पण माझ्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणू नका. तुमच्या आईला समजावणं तुमचं काम आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी येतेय. पण परत  अपमान झाला तर कायमची सोडेन सासर…’’ नास्तिकतेचं स्वातंत्र्य श्वेताने असं मिळवलं.

आता घरातली बाकीची मंडळी रुढी, कर्मकांड सारं सांभाळतात. पण श्वेता मात्र, ‘निरीश्वरवाद’ जपते. त्यांना झालेलं बाळ मोठेपणी श्वेताच्या वळणावर जाणार की आकाशच्या ते आता कशाला बोला, हे तर येणारा काळ ठरवेल…हो ना?

कोण माझा सोबती

कथा * अर्चना पाटील

मेजर प्रभास आपल्या मोठा भाऊ वीरच्या लग्नासाठी घरी आलेला होता. घरात आनंदी वातावरण होते. वीर बँगलोरला एका कंपनीत इंजिनिअर होता. कुलकर्णी कुटुंबातील तीनही मुलींमध्ये दिया मोठी मुलगी. कुलकर्णी लवकरात लवकर दियाचा विवाह आटपून एका जबाबदारीतून मोकळया होण्याच्या मार्गावर होते. दियासुद्धा काही दिवसांपासून पुण्यात जॉब करत होती. पण आता सर्वकाही मागे सुटून जाणार होते. त्या मैत्रिणी, त्या पार्ट्या, ते होस्टेल…

प्रभास आर्मीत असल्याने सर्वचजणांना त्याचे खूप कौतुक होते. लग्नाच्या गडबडीतही त्याचे चहापाणी, जेवण यांची सर्वजण आवर्जून चौकशी करत. हळदीच्या रात्री सर्वजण खूप नाचले. लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे प्रभासला त्याच्या सवयीप्रमाणे चार वाजता जाग आली. प्रभासने शेजारी पाहीले तर वीरचा पत्ता नव्हता. प्रभासने पूर्ण घरात चक्कर टाकली. फिरून परत पलंगावर बसला तर वीरची चिठ्ठीच सापडली. चिठ्ठीत लिहिले होते ,‘‘प्रभास, मला माफ कर. पण माझे अनन्या नावाच्या मुलीशी अगोदरच रजिस्टर मॅरेज झाले आहे. ती दुसऱ्या जातीची आहे. त्यामुळे आईबाबा अनन्याला कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणूनच मी कायमचे घर सोडून जातो आहे.’’

चिठ्ठी वाचताच प्रभास बाबांकडे गेला. घरातील सर्वजण चिंतेत पडले. मुलीकडच्यांना काय सांगायचे हा प्रश्न त्यांना पडला. शेवटी घरातील सर्व वडीलधाऱ्या लोकांनी प्रभासलाच नवरदेव म्हणून उभे केले. परिस्थिती पाहून प्रभासचाही नाईलाज झाला. मुलीकडच्यांच्या संमतीने दिया व प्रभासचा विवाह थाटामाटात पार पडला. पण प्रभास या लग्नाने आनंदी नव्हता. त्याची सुट्टी संपण्यापूर्वीच तो ड्युटीवर हजर होण्याच्या हालचाली करु लागला. दियाच्या सासुनेही दोघांमधील दुरावा कमी व्हावा यासाठी दियाला सोबतच घेऊन जा म्हणून हट्टच धरला. आईबाबांची कटकट नको म्हणून प्रभास दियाला घेऊन श्रीनगरला निघाला. तेथे एका मित्राची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याने घर रिकामे होते. तेथेच दियासोबत काही दिवस राहण्याचे ठरले. रेल्वेच्या पूर्ण प्रवासात प्रभास एक मिनीटही दियाजवळ बसला नाही. प्रभास पूर्ण वेळ रेल्वेच्या दरवाज्यातच उभा होता. प्रभासचे हे वागणे पाहून दियाच्या डोळयात नकळतपणे पाणी येऊ लागले.

दियाला हे लग्न नकोसे झाले होते. पण माहेरी जाण्याचे दरवाजे बंद होते कारण अजून दोन बहिणींची लग्ने बाकी होती. पुण्याला पळून जावे असेही तिच्या मनात येत होते. दिया आपल्या आयुष्याबदल चिंता करत असतानाच प्रभास आला.

‘‘चल, श्रीनगर आले. बॅग घे.’’

दिया बॅग घेऊन प्रभासच्यामागे अवघडल्यासारखी थोडे अंतर ठेऊनच चालत होती. दोघांनी टॅक्सी पकडली. रात्रीचे बारा वाजले होते. काही अंतर दूर गेल्यावर लगेचच एक दहशतवादी टॅक्सीसमोर येऊन उभा राहिला.

‘‘चला, चला खाली उतरा. नाही तर गोळी घालेन डोक्यात. उतर रे. बघतोस काय?’’

‘‘निघा, पटकन बाहेर निघा.’’ ड्रायव्हर घाबरून ओरडायला लागला.

‘‘तिकडे व्हा. गाडीपासून दूर जा,’’ दहशतवादी ओरडू लागला.

तेवढयात आर्मीवाले बंदूका घेऊन तेथे पोहोचले. दिया आणि प्रभास एकमेकांपासून दूरदूरच उभे होते. त्या दहशतवादीने तिच संधी साधून दियाला आपल्या मिठीत ओढले आणि तिच्या डोक्याला बंदूक लावून ओरडू लागला.

‘‘खबरदार, जर कोणी पुढे आले तर. या मुलीचा जीव प्यारा असेल तर मला इथून जाऊ द्या.’’

‘‘मेजर शर्मा, बंदूका खाली करा. त्याला जाऊ द्या. बादल तू इथून जा, पण त्या मुलीला सोड.’’ कॅप्टन बोस म्हणाले

‘‘अधी बाजूला हो.’’

काही क्षणात बादल नावाचा तो दहशतवादी दियाला घेऊन फरार झाला. प्रभास आता पश्चाताप करू लागला. ‘दियाला काही झाले तर मी स्वत:ला माफ नाही करू शकणार. मी विनाकारण दियाशी इतका वाईट वागलो. खरी चुक तर माझ्या भावाचीच होती आणि मी माझा राग मात्र निष्पाप दियावर काढत होतो,’ प्रभास खूपच निराश झाला होता.

‘‘मेजर प्रभास, मी तुमची परीस्थिती समझू शकतो. आपण प्रत्येक रस्त्यावर चेकिंग करत आहोत. दिया लवकरच सापडेल.’’

बादल दियाला घेऊन जंगलात पोहोचला. त्याच्या पायातून रक्त निघत होते. त्याने दियाला गाडीतून बाहेर काढले. दोघेही एका झाडाखाली बसले.

‘‘हे बघा, मला जाऊ द्या, प्लीज.’’

‘‘सोडेन तुला. काही वेळ चूप बस. मी पळूनपळून थकलो आहे. बसू दे मला आता थोडावेळ.’’

दिया शांतपणे बसून राहिली. प्रभासकडे परत जाऊन तरी ती काय करणार होती? त्यापेक्षा हा दहशतवादी मला इथेच मारून टाकेल तर बरे होईल असे विचार तिच्या मनात येत होते. बादल एक तास बसून राहिला. मधूनमधून तो दियाकडेही बघत होता. दियाचे हवेने उडणारे कुरळे केस, घारे डोळे, सुंदर चेहरा बादलचे मन आकर्षून घेत होता. बादल एकेक पाऊल हळूहळू दियाकडे टाकू लागला. दिया तिच्या विचारांमध्येच गुंग होती.

थोडयावेळाने बादल अचानक दियाजवळ आला. तिचे दोन्ही हात आणि तोंड बांधून तिला जंगलाच्या बाहेर असणाऱ्या हायवेकडे घेऊन गेला. हायवेच्या जवळ येताच बादलने दियाला आपल्या मिठीत घेऊन ‘‘ही भेट मला नेहमी आठवेल,’’ असे म्हटले. हायवेवर एक फोरव्हीलर येताच बादलने दियाला गाडीसमोर ढकलले आणि क्षणात तो गायब झाला. फोरव्हीलरमधील लोकांनी दियाला आर्मीवाल्यांकडे सोपवले.

‘‘कशी आहेस तू?’’ प्रभास प्रेमाने विचारत होता.

‘‘मेजर प्रभास, आधी आर्मीवाले दियाची चौकशी करतील. नंतरच तुम्ही नवराबायको एकमेकांना भेटा.’’

आर्मीवाले दियाला चौकशी करण्यासाठी आत घेऊन गेले. खोलीच्या खिडकीतच प्रभास उभा होता. आता प्रभास दियाला एक मिनीटही सोडायला तयार नव्हता.

‘‘बादल, तुम्हाला कोठे घेऊन गेला?’’

‘‘गाडी एका जंगलात जाऊन थांबली.’’

‘‘त्याने तुम्हाला काही त्रास दिला का?’’

‘‘नाही.’’

‘‘तुम्ही त्याच्यासोबत कमीत कमी एक तास होत्या. तो काय बोलत होता?’’

‘‘काहीच नाही. मी पळूनपळून खूप थकलो आहे असे सांगत होता.’’

‘‘अजून काही आठवतंय का?’’

दियाने मान खाली घालून, थोडावेळ विचार करून ‘नाही’ म्हटले. पण दियाचे हे उत्तर मेजर शर्मांना खोटे वाटले. प्रभास दियाला घेऊन घरी आला. प्रथम प्रभासने दियाची माफी मागितली आणि यापुढे त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची ग्वाही दिली. संध्याकाळी प्रभास मित्रांसोबत फिरायला बाहेर गेला. दिया घरी एकटीच होती. अखेरीस दियाला आज बऱ्याच दिवसांनी तणावमुक्त वाटत होते. ती निश्चिंत होऊन बेडवर लोळत होती. तेवढयात डोअरबेल वाजली. दियाने दरवाजा उघडला. एक बुके आणि चिठ्ठी पडलेली होती. दियाने पटकन चिठ्ठी उघडली तर त्यात ‘ही भेट माझ्या नेहमी लक्षात राहील’ असे लिहिलेले होते. ते वाक्य वाचून दियाने लगेच तो बुके आणि चिठ्ठी रस्त्यावर फेकले. दिया पळत पळतच घरात आली. घराचा दरवाजा बंद करून ती रडायला लागली. आता कुठे प्रभास आणि ती जवळ आले तर पुन्हा वेगळेच संकट समोर येऊन उभे राहिले. प्रभास रात्री आठला घरी आला. पण दियाला प्रभासजवळ बादलचा विषय काढण्याची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते दोघे शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेले. दिया जेव्हा चेंजिंग रूममध्ये गेली तर बादलने पटकन तिचे तोंड आपल्या हाताने दाबले. दिया शांत झाल्यावर त्याने आपला हात उचलला.

‘‘हे बघ, माझा पाठलाग करू नको. तू का म्हणून मला त्रास देतो आहे?’’

‘‘तुझा आवाज तर तुझ्यापेक्षाही सुंदर आहे.’’

‘‘काय बोलतोस, तुझे काहीच नाही होऊ शकत,’’ दियाने जोरात दरवाजा आपटला आणि बाहेर पडली.

‘‘अगं ये, आपण फक्त रोज असेच भेटत राहू. तुझ्या नवऱ्याला काहीच समजणार नाही.’’

‘‘का भेटू? मुळीच नाही.’’ दिया पटकन पळाली आणि प्रभासजवळ जाऊन उभी राहिली.

थोडयाच वेळात आर्मीवाल्यांकडे बातमी पोहोचली की बादल मॉलमध्ये आला होता. मॉलमधील सीसीटीव्हीत तो दियासोबत दिसत होता. प्रभास हे प्रकरण ऐकून हैराण झाला. प्रभास आर्मीवाल्यांसोबत घरी पोहोचला.

‘‘तू बादलला कशी ओळखते?’’

‘‘मी नाही ओळखत त्याला. तोच माझा पाठलाग करतो आहे.’’

‘‘कदाचित त्याला प्रेमरोग झाला असेल. हे बघ दिया, आजपासून तू आम्हाला बादलला पकडण्यात मदत करणार आहेस.’’ कॅप्टन बोस म्हणाले.

‘‘ठीक आहे. मी प्रयत्न करेन.’’

प्लननुसार प्रभास आणि दिया काही दिवस एका हिलस्टेशनवर गेले. एक आठवडा राहिले. पण बादल आला नाही. शेवटी ते घरी परतले. प्रभास नेहमीप्रमाणे संध्याकाळी फिरायला गेला. दियाच्या डोक्यात बादलचेच विचार चालू होते. तेवढयात बादलने खिडकीतून उडी मारली.

‘‘माझा विचार करते आहेस ना.’’

‘‘हो, पण तू कुठे गायब होतास एवढे दिवस?’’ बादलला घरात थांबवून ठेवण्यासाठी दिया गोडगोड बोलू लागली.

‘‘हे बघ, आता तूसुद्धा पण मला भेटल्याशिवाय राहू शकत नाहीस. यालाच प्रेम म्हणतात.’’

‘‘हो ना. आपण उद्या परत भेटू’’

‘‘शिवमंदिरात ये उद्या सकाळी.’’ आता निघतो मी नाहीतर तुझा नवरा येऊन जाईल.

बादल गेला आणि पाचच मिनीटात प्रभास आला.

‘‘तो आला होता.’’ दिया म्हणाली.

‘‘कोण? बादल.’’

‘‘हो. उद्या शिवमंदीरात बोलवले आहे त्याने.’’

‘‘वेरी गुड. उद्या तू एकटीच जाशील मंदीरात.’’

‘‘का?’’

‘‘घाबरू नकोस. आर्मीवाले साध्या वेशात तुझ्या आजुबाजुला राहतील. मी जर तुझ्यासोबत राहिलो तर उद्याही तो आपल्याला सापडणार नाही.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी दिया शिवमंदिरात जायला निघाली. काही अंतर पार केल्यावर बादलही तिच्या मागेमागे चालू लागला. दिया मंदिरात पोहोचली. तिने घंटा वाजवण्यासाठी घंटेवर हात ठेवताच बादलनेही तिच्या हातावर आपला हात ठेवला. त्याने हात ठेवताच आर्मीवाले बंदूका घेऊन त्याच्या चारही बाजूने वर्तूळात उभे राहीले. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही. आर्मीवाल्यांकडे पाहताच बादल ओरडू लागला.

‘‘धोका. दीया तू हे बरोबर केले नाहीस. तुला हे खुप महागात पडेल.’’

‘‘अरे तू, माझ्या भारतमातेला धोका देतो आहेस. त्यामुळे तुझा विश्वासघात करण्याचे मला कोणतेच दु:ख नाही.’’

थोडयाच वेळात प्रभास तेथे पोहोचला. त्याला पाहताच दिया रडायला लागली.

‘‘बस, बस. आता रडायचे दिवस संपले. आपण काही दिवस आता गावी जाऊन येऊ.’’

प्रभासच्या शब्दांनी दियाला धीर मिळाला आणि तिचे आयुष्य सुरळीत झाले. पण आजही कधीकधी बादलचे डोळे आणि आवाज तिला घाबरवून सोडतात.

लाच

कथा * अर्चना पाटील

‘‘बाबा, मिठाई वाटा.’’

‘‘का, काय झालं?’’

‘‘मला शिक्षिकेचा जॉब मिळालाय जवळच्याच गावात.’’

‘‘ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. शेवटी माझी मुलगी जीवनात काहीतरी बनलीच.’’

आज शाळेचा पहिला दिवस होता. मी खूप खूश आहे. माझे बाबाही माझ्यासोबत शाळेत आले आहेत. पहिला दिवस तर बरा होता. दुसऱ्या दिवशी आम्ही प्रार्थनेसाठी उभे होतो. इतक्यात हेडमास्तर जवळ आले आणि सांगू लागले, ‘‘मॅडम, नोकरी मिळालीय, तर चहा तरी पाजा स्टाफला.’’

‘‘अं.. अजून मला पहिला पगारही मिळाला नाही. नंतर सर्वांना चहा पाजेन.’’

‘‘अहो मॅडम, एक कप चहासाठी महिनाभर वाट पाहायला लावणार का?’’

‘‘सर, मी सांगितलं ना, पहिला पगार झाल्यावर देणार. मला माफ करा.’’

अजित सर बाजूलाच उभे होते. हेडमास्तर निघून गेले.

‘‘मी काही बोलू का?’’ अजित सर हळू आवाजात म्हणाले.

‘‘बोला…’’

‘‘चहा पाजा, जर पैसे नसतील, तर मी देतो. पगार झाल्यावर परत करा.’’

‘‘मला उधार घ्यायला आवडत नाही.’’

सर्वजण वर्गात गेले. माझ्या वर्गात २० विद्यार्थी होते. १० मुले व्यवस्थित शिकत होती. १० मुलांना वेगळं शिकवावं लागत होतं. मी जशी ऑफिसमध्ये जायचे, तसे स्टाफचे लोक कोणत्या ना कोणत्या बहाण्याने चहावरच येऊन थांबत असत आणि माझी मस्करी करत असत. एके दिवशी माझं डोकं गरम झालं व मी बोलून गेले, ‘‘एक कप चहासाठी एवढे का मरत आहात, आता तर पहिल्या पगाराचा चहाही पाजणार नाही मी तुम्हाला.’’

शाळेचे मिश्रा, गुप्ता, शर्मा आणि हेडमास्तर माझं उत्तर ऐकून क्रोधित झाले, पण कोणी काही बोलले नाही. पण माझ्या रोखठोक उत्तराने शाळेत माझ्या विरोधात राजकारण सुरू झाले.

एके दिवशी मोठे साहेब अग्रवाल सर शाळेत आले. साहेबांसाठी मिश्राजी पटकन नाश्ता घेऊन आले. मलाही ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. मीही सर्वांसोबत एक समोसा खाल्ला. अग्रवाल सर जाताच हेडमास्तर २० रुपये मागू लागले.

‘‘एका समोशाचे २० रुपये?’’

‘‘मॅडम, गाडीला पेट्रोल नाही लागले का?’’ गुप्ताजी म्हणाले. मी पटकन वीस रुपये काढून त्यांच्या तोंडावर फेकले आणि माझ्या वर्गात गेले. माझ्यामागून अजित सरही माझ्या वर्गात आले.

‘‘तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम आहे का?’’

‘‘नाही, का बरं?’’

‘‘तर मग वीस रुपयांसाठी एवढा राग का?’’

‘‘पाच रुपयांच्या समोशासाठी वीस रुपये का?’’

‘‘कारण मिश्रा, गुप्ता आणि शर्मा पैसे देणार नाहीत, ते आपल्याकडून वसूल करण्यात आले. हेडमास्तर व अग्रवाल सरांचे पैसे मी दिले.’’

‘‘हा तर अन्याय आहे ना…’’

‘‘इथे असंच चालतं. कोणत्याही सरकारी शाळेत असंच होतं. सीनिअर लोक जसं सांगतात, तसं करावं लागतं. तुम्ही अजून नवीन आहात.’’

एका आठवड्यानंतर ऑफिसमधून ट्रेनिंगसाठी पत्र आलं. मला माहीत होतं, मलाच पाठवलं जाणार. दुसऱ्या आठवड्यात पुन्हा ट्रेनिंगसाठी पत्र आलं. पुन्हा मलाच पाठवण्यात आलं. कधी एखादी मिटिंग असली की मलाच जावं लागायचं. वर्गात वीस मुले होती, परंतु केवळ १२ विद्यार्थीच शाळेत येत होते. मी खूप वेळा त्यांच्या घरी जाऊन आले, परंतु जोपर्यंत त्यांना बोलावण्यासाठी कोणी जात नसे, तोपर्यंत ते शाळेत येत नसत. ही रोजचीच गोष्ट होती. दर दिवशी त्या विद्यार्थ्यांना बोलवावं लागत असे.

एके दिवशी माझ्या बाजूला राहणाऱ्या राजूची जुनी स्कूल बॅग मी एका विद्यार्थिनीला दिली. पहिली आणि दुसरीच्या वर्गात ती शाळेत बसतच नव्हती. आपली पुस्तकांची पिशवी वर्गात ठेवून पळून जात असे. परंतु जुनी का होईना, स्कूल बॅग मिळाल्यानंतर ती रोज शाळेत येऊ लागली. एका स्कूल बॅगमुळे ती रोज शाळेत येऊ लागली, तेव्हा मला जरा बरं वाटू लागलं. आता या शाळेत मला ३ वर्षे झाली होती. गुप्ता, मिश्रा, शर्मा आणि हेडमास्तर रोज एखादी गोष्ट तर वाकडी बोलतच असत.  परंतु अजित सर आपल्या शांत आणि विनोदी स्वभावाने मला शांत करत असत. अजित सरांचे माझ्याशी प्रेमळ वागणे स्टाफला आवडत नसे. एके दिवशी अजित सर आणि ते चार सैतान ऑफिसमध्ये एकत्र बसले होते.

‘‘काय मग लग्न करायचा विचार आहे का मॅडमशी?’’

‘‘नाही तर?’’

‘‘करूही नका. मॅडम आपल्या समाजाच्या नाहीत आणि शिवाय शाळेत लव्ह मॅरेजच्या नादात सस्पेंड व्हाल. टीचर लोकांना लव्ह मॅरेज करणे अलाऊड नसते, माहीत आहे ना…’’

अजित सर काहीच बोलले नाहीत. कारण मनातल्या मनात ते माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहात होते. एके दिवशी अग्रवाल सर वर्गात आले. वर्गात मुले कमी होती.

‘‘वीसमधील फक्त १५ विद्यार्थी?’’

‘‘अं.. रोज तर येतात.’’

‘‘आज मी आलोय, म्हणून आली नाहीत का?’’

‘‘हो…’’ काय उत्तर द्यावे मला कळत नव्हते.

‘‘उठ बाळा, तुझं नाव काय आहे?’’

‘‘निखिल.’’

‘‘फळ्यावर आपल्या मित्राचं नाव लिही.’’

निखिलने फळ्यावर आपल्या मित्राचं नाव पियूषच्या ऐवजी पिउष लिहिलं.

‘‘मॅडम, काय शिकवता तुम्ही मुलांना. तू उठ, तुझं नाव काय आहे?’’

‘‘स्नेहल.’’

‘‘सूर्योदय आणि सूर्यास्त कोणत्या दिशेला होतो?’’

‘‘सूर्योदय पूर्वेला होतो आणि सूर्यास्त…’’

स्नेहलने उत्तर दिलं नाही. अग्रवाल सर ओरडू लागले, ‘‘तुम्हाला नोटीस देऊ का, देऊ का नोटीस?’’

मी नजर झाकवून उभी होते. हेडमास्तर हसत होते. अग्रवाल सर वर्गातून निघून गेले. मी स्वत: अजित सरांच्या वर्गात गेले.

‘‘मला माहीत आहे, हेडमास्तर जाणीवपूर्वक अग्रवाल सरांना माझ्या वर्गात घेऊन आले. सर मला ओरडले, तेव्हा त्यांचा जीव शांत झाला असेल.’’

‘‘जर तुम्ही एक चहा दिला असता तर…’’

‘‘माझ्यापेक्षा जास्त पगार तर हे लोक घेतात आणि सर्व कामे माझ्याकडूनच करून घेतात. मिश्रा, गुप्ता आणि शर्माजींना का नाही ट्रेनिंगला पाठवत? कारण ते अग्रवाल सर आणि त्यांच्या बायको-मुलांना मोठमोठी गिफ्टस् देतात.’’

‘‘जर तुम्ही कधीतरी काही गिफ्ट दिलं असतं तर…’’

मला माहीत होतं, अजितसरांकडे माझं मन शांत होणार नाही. मी पुन्हा माझ्या वर्गात गेले. संध्याकाळी घरात भांड्यांचा जोरजोरात आवाज येत होता. बाबांनी हाक मारली.

‘‘एवढा आवाज का करतेस?’’

‘‘मोठे साहेब आले होते शाळेत. सांगत होते नोटीस देणार.’’

‘‘मग देऊ दे ना, सरकारी नोकरीत तर ही नेहमीची गोष्ट आहे.’’

‘‘सांगत होता, जर मी शिकवत नाही, तर पगार का घेते? मी तर रोज शिकवते, मुले शिकत नाही, तर मी काय करू? मिश्रा, गुप्ता आणि शर्माच्या वर्गात गेले नाहीत. माझ्याच वर्गात तोंड वर करून येतात. रोज येणारी मुले आज घरी राहिली होती. मी काय करणार?’’

‘‘अगं बेटा, एवढी उदास होऊ नकोस. एके दिवशी सर्व नीट होईल.’’

पण तरीही मुलांनी अग्रवाल सरांच्या समोर उत्तर का नाही दिले? नोटीस देईन, हे शब्द कानाला टोचत होते आणि मिश्रा, गुप्ता, शर्माचे हसणारे चेहरे डोळ्यांसमोरून जात नव्हते. जे होते, ते चांगल्यासाठी होते, असा विचार करून नवीन सुरुवात केली. बहुतेक माझ्या शिकवण्यातच काहीतरी कमतरता आहे, असा विचार करून नवीन उत्साहाने शिकवायला सुरुवात केली आणि एके दिवशी ट्रान्सफरची ऑर्डर आली. अग्रवाल सरांनी ऑफिसमधून ऑर्डर पाठवली होती.

आज या शाळेतील शेवटचा दिवस होता.

हेडमास्तर बोलू लागले, ‘‘तुमच्या ट्रान्सफरमध्ये माझा काही हात नाहीए. मी अग्रवाल सरांना सांगितलं होतं, मुलगी आहे, जाऊ द्या. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही.’’

‘‘५०० रुपये हातावर ठेवले असतेस, तर ही पाळी आली नसती,’’ मिश्राजी म्हणाले.

‘‘अग्रवाल एवढा स्वस्त आहे मला माहीत नव्हतं.’’

‘‘जा आता जंगलात, प्राण्यांमध्ये. रोज एक तास बसने जावे लागेल. त्याच्यापुढे ५ किलोमीटर चालत जावे लागेल. रात्री घरी यायला ८ वाजतील. माझ्या मुलीसारखी आहेस, म्हणून सांगतोय, दुनियादारी शिक. लाच देणे सामान्य गोष्ट आहे,’’ शर्माजी म्हणाले.

‘‘तुमच्यासारख्या माणसांमध्ये राहण्यापेक्षा उत्तम आहे, मी प्राण्यांसोबत राहीन. जर तुम्ही पहिल्या दिवशीच मुलगी म्हणाला असता, तर आज ही पाळी आली नसती, शर्माजी.’’

ऑफिसच्या बाहेर अजित सर माझी वाट पाहात होते.

‘‘कधी काही समस्या असेल, तर मला फोन जरूर करा.’’

‘‘हो नक्कीच. या शाळेत फक्त तुम्हीच माझी आठवण काढाल असं वाटतंय.’’

तू माझ्यासाठी काय केलंस

कथा * पद्मा आगाशे

रात्रीचे दोन वाजून गेलेले. अजून प्रसून घरी आला नव्हता. गेले काही दिवस तो रोजच रात्रीपर्यंत घराबाहेर असायचा. उमाही त्याची वाट बघत जागी होती.

गेटच्या आवाजानं ती उठून बाहेर आली. ड्रायव्हरनं दारुच्या नशेत असलेल्या प्रसूनला आधार देत घरात आणलं.

उमा संतापून ओरडली, ‘‘अरे काय दुर्दशा करून घेतली आहेस स्वत:ची? किती अधोगती अजून करून घेशील? स्वत:ची अजिबात काळजी नाहीए तुला?’’

प्रसूनही तसाच ओरडला. शब्द जड येत होते पण आवाज मोठाच होता, ‘‘तू आधी उपदेश देणं बंद कर. काय केलं आहेस गं तू माझ्यासाठी? मला लग्न करायचंय हजारदा सांगतोए, पण तुला तुझ्या आरामातून वेळ मिळेल तेव्हा ना? स्वत:चा मुलगा असता तर दहा ठिकाणी जाऊन मुलगी शोधली असती.

‘‘तुला माझ्या पैशांवर मजा मारायला मिळतेय, साड्या, दागिने, आलिशान गाडीतून फिरायला मिळंतय, तुला काय कमी आहे? पण मला तर माझ्या शरीराची भूक भागवायला काहीतरी करायलाच हवं ना? आधीच मी त्रस्त असतो त्यात तुझ्या बडबडीने डोकं उठतं.’’ तो लटपटत्या पायांनी त्याच्या खोलीत निघून गेला. धाडकन् दार लावून घेतलं.

प्रसूनच्या बोलण्यानं उमाच्या हृदयाला भोकं पडली. ती उरलेली सगळी रात्र तिनं रडून काढली. प्रसून तिच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यासाठी तिनं आपलं सगळं आयुष्य वेचलं. वडिलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. लग्न केलं नाही. सगळं लक्ष केवळ प्रसूनवर केंद्रित केलं होतं.

मीराताईचे यजमान सुरुवातीला प्रसूनला भेटायला यायचे. पण उमाच्या लक्षात आलं त्यांचा तिच्यावरच डोळा आहे. एकदा त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं सरळ त्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर ते कधीच इकडे फिरकले नाहीत. उमानंही त्यानंतर कुठल्याही पुरुषाला आपल्या आयुष्यात जागा दिली नाही.

प्रसूनच तिचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ होता. त्याच्या आनंदातच तिचाही आनंद होता. तिच्या अती लाडानंच खरं तर तो बिघडला होता. अभ्यासात बरा होता. पण त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्नं मात्र पैसेवाला, बडा आदमी बनण्याची होती.

तो बी. कॉम झाल्यावर उमानं एमबीएला एडमिशन मिळवण्यासाठी खूप पैसे खर्च केले. एकदा त्याला नोकरी लागली की छान मुलगी बघून लग्न करून द्यायचं अन् आपण आपलं म्हातारपण आनंदात घालवायचं असा उमाचा बेत होता.

प्रसून दिसायला वडिलांसारखाच देखणा होता अन् त्यांच्यासारखाच लंपट अन् बेजबाबदारही. जेव्हा तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता तेव्हाच जया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. खरं तर त्यानं तिच्या करोडपती वडिलांचा पैसा बरोबर हेरला होता. त्याच्या देखण्या रूपावर अन् गोड गोड बोलण्यावर भाळलेल्या जयानं एक दिवस घरातून खूपसे दागिने घेऊन पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी उमाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला बिचारीला काहीच कल्पना नव्हती. ती पोलिसांना काय सांगणार? दोन दिवस पोलीस कोठडीत काढल्यावर तिची सुटका झाली.

दोन महिने लपतछपत काढल्यावर शेवटी पोलिसांनी जया व प्रसूनला शोधून काढलंच. जयाच्या वडिलांनी आपला पैसा व प्रतिष्ठेच्या जोरावर लेकीला तर सोडवली पण प्रसून मात्र दोन वर्षं तुरुंगात होता.

उमासाठी हा फार मोठा धक्का होता. पैसा गेला, समाजात नाचक्की झाली. पण प्रसूनचं प्रेम ती विसरू शकली नाही. तो तुरूंगातून सुटून आला तेव्हा ती त्याच्यासाठी तुरुंगाबाहेर उभी होती. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रसून लहान मुलासारखा रडला. मग त्यांनी ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला.

थोडंफार सामान घेऊन दोघंही पुण्याला आली. बऱ्याशा वस्तीत छोटं घर घेतलं. प्रसून नोकरी शोधू लागला. उमानं काही ट्यूशनस मिळवल्या. प्रसूनला एका प्लेसमेंट एजन्सीत नोकरी मिळाली. अंगभूत हुशारी व तीक्ष्ण नजर या जोरावर प्रसूननं तिथली कामाची पद्धत पटकन शिकून घेतली. त्या धंद्यातले बारकावे जाणून घेतले. वर्षभरातच त्यानं स्वत:ची कंपनी सुरू केली.

पाच-सहा वर्षं चांगली गेली. आता पॉश कॉलनीत बंगला, आलिशान गाडी, शोफर, पैसा अडका सगळं होतं, पण प्रसूनचं लग्न होत नव्हतं. एक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सहा महिने राहिली पण मग तीही सोडून गेली.

प्रसून अत्यंत तापट अन् अहंकारी होता. पत्नीला गुलाम म्हणून वागवण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच मुली लग्नाला नकार द्यायच्या.

प्लेसमेण्टसाठी येणारी मुलं कमिशन देऊन निघून जायची. पण श्रेयाला त्यानं चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंधही ठेवले. वर त्याची फोटोग्राफी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. ती घाबरून त्याला भरपूर पैसे देऊ लागली. मग तर त्यानं अनेक मुलींना या पद्धतीनं फसवलं. श्रेयानं व इतर दोघींनी पोलिसात तक्रार केल्यावर ऑफिसवर पोलिसांनी धाड घातली. कसाबसा तो त्या प्रकरणातून सुटला. या सर्व गोष्टींचा उमाला अजिबात पत्ता नव्हता.

दुसऱ्यादिवशी सकाळी चहाचा ट्रे घेऊन उमा जेव्हा प्रसूनच्या खोलीत गेली, तेव्हा तो चांगल्या मूडमध्ये होता. रात्रीच्या रागाचा कुठे मागमूसही नव्हता.

‘‘प्रसून तू इंटरनेटवर तुझा प्रोफाइल रजिस्टर करून घे. एखादी चांगली मुलगी भेटेलही.’’ तिनं प्रेमानं म्हटलं.

‘‘होय, मावशी, मी केलंय.’’ तो ही उत्तरला.

‘‘मी ही प्रयत्न करतेय.’’ मावशी म्हणाली.

‘‘मावशी, कुणी घटस्फोटितही चालेल. मीही आता चाळीशीला आलोच की!’’ प्रसून म्हणाला.

मावशीनं मॅरेज ब्यूरोमध्ये नांव नोंदवलं. प्रोफाइल बनवून नेटवर टाकलं. चांगले फोटो त्यावर टाकले.

इकडे प्रसूनला ऑनलाइन चॅटिंग करताना मान्यताची फ्रेण्डरिक्वेस्ट दिसली. त्यानं होकार दिला. दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मान्यता स्वच्छ मनाची मुलगी होती. तिनं  स्वत:विषयी सगळं खरं खरं प्रसूनला सांगितलं. प्रसूननंही तिला खूप गोड गोड बोलून भुलवलं. त्यानं अधिक खोलात जाऊन माहिती मिळवली की मान्यताच्या वडिलांचा व्यवसाय आहे. कनॉट प्लेसमध्ये तीन मजली घर आहे. खाली दुकानं आहेत. त्यांचं भाडंच लाखात येतं अन् मान्यताच त्या सगळ्याची एकमेव वारस आहे.

त्यानं उमाला म्हटलं, ‘‘मावशी माझ्यासाठी हे स्थळ खूपच योग्य आहे. मान्यताचा घटस्फोट झालाय. तिला एक लहान मुलगा आहे. आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पुन्हा लग्न करणार नाही म्हणतेय. पण तिला लग्नासाठी राजी करावं लागेल. त्यानं प्रोफाइल उघडून मान्यताचे फोटो मावशीला दाखवले.’’

अशाबाबतीत हुशार प्रसूननं एजंटच्या मध्यस्तीने मान्यताच्या घराच्या जवळच एक फ्लॅट भाड्यानं मिळवला. उमा तिथं शिफ्ट झाली. तिनं सोसायटीत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. तिथल्या किटी पार्टीची ती सभासद झाली.

एक दोनदा प्रसून येऊन गेला. ‘माझा मुलगा’ अशी तिनं ओळख करून दिली. सोसायटीत तर बस्तान चांगलं बसवलं.

मग एका किटी पार्टीत मान्यताच्या आईशीही ओळख झाली. ती ओळख उमानं जाणीवपूर्वक वाढवली. मुद्दाम त्यांच्याकडे येणंजाणं वाढवलं.

‘‘माझा मुलगा आहे. शिक्षण, रूप, पैसा, व्यवसाय सगळं आहे पण लग्न करायचं नाही म्हणतो. तरूण वयात कुणा मुलीच्या प्रेमात होता. तिनं विश्वासघात केला. प्रेमभंगांचं दु:ख अजून पचवता आलेलं नाहीए. मध्यंतरी यावरूनच आमचा वाद झाला. त्याच्या रागावर मी इथं येऊन राहिलेए.’’ असं उमानं त्यांना सांगितलं.

उमानं एकदा मुद्दामच विचारलं, ‘‘माफ करा, पण तुम्ही अन् मान्यता, तिचे बाबा असे उदास अन् दु:खी का दिसता?’’

मान्यताच्या आईला, निशाला एकदम रडू फुटलं, ‘‘काय सांगू ताई तुम्हाला? अहो, इतक्या थाटामाटात आम्ही मान्यताचं लग्न करून दिलं होतं. श्रीमंत कुटुंबातला एकुलता एक मुलगा. पण वर्षभरही आमची पोरगी राहू शकली नाही. त्या मुलाचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध होते. हे असं कोणती पत्नी सहन करेल?’’

मान्यतानं नवऱ्याला प्रेमानं खूप समजावलं, पण तो ऐकत नव्हता. आम्ही दोघांनीही जावयाची समजूत घातली. मुलीचा संसार उधळू नये असंच आम्हालाही वाटत होतं. पण त्यानं जणू न सुधारण्याची शपथच घेतली होती.

त्यात एक दिवस त्यानं मान्यताला मारहाण केली. त्यानंतर ती जी इथं आली ती परत गेलीच नाही. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्या सासूसाऱ्यांना मुलाचं प्रकरण माहित होतं पण चांगली सून घरात आली की तो बदलेल या आशेवर त्यांनी लेकाचं लग्न केलं होतं.

त्यांनी हात जोडून क्षमा मागितली. आम्ही दिलेलं सर्व सामान, दागिने, कपडे सगळं परत केलं. एक कोटी रुपयांची एफडी मान्याताच्या नावे केली, पण त्या पैशानं सुखसमाधान कसं मिळणार?

आमचं तर आयुष्यच अंधकारमय झालंय. तिच्या लहानग्या आयुष्यामुळेच आमच्या आयुष्यात थोडा फार आनंद आहे. मान्यता तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीए. लग्न करायला नाहीच म्हणते. तिच्या बाबांनी तिला विरंगुळा म्हणून शाळेत नोकरी लावून दिली आहे.

आता उमानं लहानग्या आयुषवर लक्ष केंद्रित केलं. ती त्याला कधी बागेत न्यायची, कधी होमवर्क करवून घ्यायची, कधी गाणी गोष्टी सांगायची. प्रसून दिल्लीला आलेला असताना मुद्दाम उमानं निशा अन् मदनला, मान्यताच्या बाबांना घरी चहाला बोलावलं. त्याचं देखणं रूप, त्याची मर्यादेशील वागणूक व हसरा, आनंदी स्वभाव बघून दोघांनाही तो खूप आवडला. पण आपली मुलगी घटस्फोटित आहे, या प्रथमवराला कसं विचारावं या विचारानं ते गप्प बसले.

प्रसून अन् उमानं ठरवलेल्या योजनेप्रमाणेच सगळं चाललेलं होतं. आता त्यांनी मान्यतावर लक्ष केंद्रित केलं. आता प्रसून पुन्हा पुन्हा दिल्लीला येत होता. उमानं निशा व मदनला सांगितलं की प्रसूनला मान्यता आवडली आहे. तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आयुषलाही तो आपला मुलगा मानायला तयार आहे.

निशा व मदनला तर फारच आनंद झला. प्रसूनही बराच वेळ आयुषबरोबर घालवायचा. येताना त्याच्यासाठी खाऊ व खेळणी आणायचा. त्याच्याबरोबर व्हिडिओ गेम्स खेळायचा.

एक दिवस आयुषनं मान्यताला म्हटलं, ‘‘मम्मा, प्रसून काका किती छान आहेत. मला आवडतात ते.’’

मान्यतालाही प्रसूनविषयी आर्कषण वाटत होतं. त्याचं देखणं रूप अन् मोठमोठ्या गोष्टी यामुळे तीही त्याच्यात गुंतत चालली होती. हळूहळू तो आयुष व मान्यताला आइसक्रीम खायला नेऊ लागला. कधी तरी उमा,   मान्यता अन् प्रसून सिनेमालाही गेले. आता तर उमानं उघडच बोलून दाखवलं की मान्यता व प्रसूनचं लग्न झालं तर किती छान होईल म्हणून निशा व मदननं विचार केला की एकदा प्रसूनच्या एजन्सीविषयी माहिती काढावी. मदनलाही मुलगा आवडला होता. त्यांनी पुण्याला जाऊन यायचं ठरवलं. पण ही गोष्ट उमा अन् प्रसूनला कशी समजली कोण जाणे. प्रसून तर सरळ त्यांना एअरपोर्टला रिसीव्ह करायला पोहोचला. त्यांना आपलं ऑफिस दाखवलं. मोठा बंगला दाखवला. गाडीतून सगळीकडे फिरवलं. पंचतारांकित हॉटेलात त्यांना लंचला नेलं.

इतर कुणाला त्यांच्याजवळ येऊ दिलं नाही. कुणाला त्यांना भेटू दिलं नाही. साध्या सरळ मदनला प्रसूनचं वैभवी आयुष्य खरंच वाटलं. आता त्यांना मान्यता व प्रसूनचं एकत्र असणं यात गैर वाटेना. दोघांच्या लग्नाचा बेत त्यांच्या मनात पक्का होता.

लबाड प्रसूननं मान्यताच्या वाढदिवसाला एका पार्टीचा कार्यक्रम ठरवला. मान्यतासाठी हे सरप्राइजच होतं. त्या दिवशी उमानं तिला एक डिझायनर साडी भेट म्हणून दिली. मान्यताही मनापासून नटली. त्या साडीत ती खूपच छान दिसत होती. आई, वडिल, आयुष यांच्याबरोबर जेव्हा ती हॉटेलात पोहोचली तेव्हा तिथं खूपच मोठी पार्टी बघून ती चकित झाली. प्रसूननं केवढा मोठा केक ऑर्डर केला होता. मान्यताला प्रसूनबद्दल आदर वाटला. त्यातच भर म्हणून तिच्या आईवडिलांनी या वेळीच मान्यता व प्रसूनच्या साखरपुड्याची अनाउंसमेट केली. मदननं दोन हिऱ्यांच्या आंगठ्या प्रसून व मान्यताच्या हातात देऊन त्या एकमेकांना घालायला लावल्या. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला. मान्यताही खूप आनंदात होती. तिनं प्रसूनसोबत डान्सही केला.

आता तर तिला सतत प्रसूनजवळ असावं असं वाटायचं. त्यांचं गोड गोड बोलणं, तिचं कौतुक करणं तिला फार आवडायचं. आयुषनं तर एक दिवस तिला म्हटलं, ‘‘आता प्रसून काकांना बाबा म्हणणार आहे. शाळेत सगळ्या मुलांचे बाबा येतात. माझेच बाबा येत नाहीत. आता मी माझ्या मित्रांना दाखवेन की हे बघा माझे बाबा.’’

लग्नाची खरेदी जोरात सुरू होती. आमंत्रण पत्रिकाही छापून झाल्या. अजून मान्यतानं तिच्या?शाळेत तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तिच्या बोटातली हिऱ्याची अंगठी बघून तिच्या सहकारी टीचर्सनं तिला छेडलं तरी तिनं त्यांना दाद दिली नव्हती.

पण प्रिन्सिपल मॅडमनं एकदा तिला ऑफिसात बोलावून विचारलंच, ‘‘मान्यता, लग्न ठरलंय म्हणे तुझं? मनापासून अभिनंदन. नवं आयुष्य सुरू करते आहेस…सुखात राहा. कुठं जाणार आहेस आता?’’

‘‘पुणे,’’ मान्यातानं सांगितलं.

‘‘मला खरंच खूप आनंद झाला ऐकून. अगं तरुण वयात मी ही फसवुकीला सामोरी गेले आहे. विश्वासघाताचं दु:ख मी ही पचवलं आहे. पण अक्षयसारखा नवरा भेटला अन् त्याच्या प्रेमामुळे जीवनातील कटू विषारी अनुभव पचवून आता सुखाचा संसार करते आहे.’’

‘‘होय मॅडम, प्रसूनही फार चांगले आहेत. आयुषवरही ते फार प्रेम करतात. त्यामुळेच मी लग्नाला तयार झालेय.’’

‘‘नाव काय सांगितलंस तू? पुन्हा सांग बरं.’’

‘‘प्रसून! प्रसून नाव आहे त्यांचं. पुण्यात प्लेसमेंट एजेंसी चालवतात. खूप छान व्यवसाय आहे.’’

मॅडम जरा विचारात पडल्या. मग म्हणाल्या, ‘‘साखरपुड्याचे फोटो असतील ना? मला बघायचाय तुझा नवरा.’’

‘‘आता माझ्याकडे नाहीएत फोटो, पण मी तुमच्या ईमेलवर पाठवते. खूपच देखणे आहेत ते.’’

मॅडम जया त्या स्कूलच्या ओनर होत्या. साखरपुड्याचे फोटो बघताच त्या दचकल्या. हो तोच प्रसून ज्याच्या म्हणण्यावरून तरुण अल्लड जया घरातले  दागिने घेऊन पळाली होती. मान्यताला सांगावं का? पण नको, कदाचित इतक्या वर्षांत प्रसून बदलला असेल, सुधारला असेल. तरीही शोध घ्यायला हवा. शहानिशा करावीच लागेल. त्यांनी आपल्या एका वकील मित्राला फोन करून प्रसून व त्याची एजन्सी याची चौकशी करायला सांगितली. तो पुण्यातच राहात होता.

दुसऱ्याच दिवशी त्या मित्रानं बातमी दिली. प्लेसमेट एजन्सीच्या आड सेक्स रॅकेट चालवलं जातं. एजन्सीवर पोलिसांनी बरेचदा धाड घातली आहे. प्रसून अत्यंत नीच व बदनाम माणूस आहे. पोलिसही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करताहेत.

आता जयाचा संशय खात्रीत बदलला. हा तोच नराधम आहे. तिनं मान्यताला फोन करून ताबडतोब घरी बोलावून घेतलं. ‘‘मान्यता, आय अॅम सॉरी, बातमी वाईट आहे पण तुझ्या भल्यासाठीच सांगते. हा तोच प्रसून आहे ज्यानं मला दगा दिला होता. माझे दागिने लांबवून त्यानं मला भिकेला लावलं होतं. सध्या तो प्लेसमेंट एजेन्सीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो. अनेक मुलींना त्यानं असंच फसवलं आहे. माझ्या मते तुझ्याशी लग्नही केवळ तुझ्या प्रॉपर्टीसाठी करतोय तो. भयंकर लोभी माणूस आहे.’’

ऐकताच मान्यता रडायला लागली. ‘‘मॅडम, माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येणारच नाहीत का? असं काय घडतंय माझ्या आयुष्यात…’’

‘‘मान्यता, धीर धर, आधी या नीच माणसाला पोलिसात देऊयात. त्याला कळणार नाही इतक्या पद्धतशीरपणे आपण प्लॅन करूया.’’

मान्यतानं डोळे पुसले. ‘‘होय मॅडम, याला अद्दल घडवलीच पाहिजे. उद्याच याला पोलिसांच्या हवाली करते. तुम्ही उद्या सायंकाळी माझ्या घरी याल का? पाच वाजता?’’

‘‘नक्की येते. पाच वाजता.’’

घरी येऊन मान्यतानं प्रसूनला फोन केला. ‘‘प्रसून जरा येऊन जा. आईबाबा त्यांचं विल करताहेत. तुझी गरज लागेल.’’

‘‘विल करताहेत हे फारच छान आहे. मी उद्या येतो.’’ प्रसून म्हणाला.

प्रसून घरी आला. निशा व मदन त्याचं अतिथ्य करू लागले. त्यांना आदल्या दिवशी घडलेलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रसूननं मान्यताला म्हटलं, ‘‘आईबाबा तुला जे काही दागिने व कॅश लग्नात देताहेत ते सगळं तू घे. ‘नको नको’ म्हणू नकोस. अन् त्यांनी विल केलं म्हणालीस, ते कुठंय? त्यांच्यानंतर तर सगळं आपल्यालाच मिळणार आहे ना?’’

‘विल’, ‘दागिने’, ‘कॅश’, ‘त्याच्यानंतर सगळं आपलं’ ही भाषा निशा व मदन दोघांनाही खटकली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. प्रसून खिडकीपाशी उभं राहून मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी निशानं म्हटलं, ‘‘मला तर हा लोभी वाटतोय. कॅश अन् विलच्या गोष्टी आत्ता का बोलतोए? आधीच आपल्याकडून धंदा वाढवायचा म्हणून वीस लाखांचा चेक घेतलाए. मान्यतालाही हे कळलं तर ती लग्नाला नकार देईल.’’

‘‘मलाही आज त्यांचं वागणं संशयास्पद वाटतंय. पैशासाठी आमचा खूनही करेल हा.’’ मदन म्हणाले.

तेवढ्यात जया आल्याचा निरोप वॉचमननं दिला. तो जयाला मान्यताच्या दाराशी सोडून गेला. प्रसूननं जयाला प्रथम ओळखलं नाही. मान्यतानं मुद्दाम ओळख करून दिली. ‘‘मॅडम जया, हे माझे होणारे पती प्रसून.’’

जयानं दरडावून म्हटलं, ‘‘अजून किती जणींना फसवून पैसा गोळा करणार  आहेस प्रसून? तुझ्या पापाचा घडा भरलाय. पुण्याहून तुझ्याबद्दलची सगळी माहिती मला मिळाली आहे. ती मी दिल्ली पोलिसांना दिली आहे.’’

हे ऐकून बाबांना तर घेरीच आली. आईही धाय मोकलून रडू लागली. ‘‘मावशी रडू नका. तुमची मुलगी एका नरपिशाच्चाच्या तावडीतून सुटली म्हणून आनंद माना,’’ जयानं त्यांना समजावलं.

प्रसून पळून जायला बघत होता. तेवढ्यात सिक्युरिटीवाल्यांनी त्याला घेरलं. उमा पण तिथं आलेली होती. ती म्हणाली, ‘‘याला क्षमा करा. आम्ही इथून निघून जातो. मी हात जोडते…’’

प्रसून तिच्यावर ओरडला, ‘‘गप्प बैस, तू माझ्यासाठी काय केलं आहे. फक्त सतत म्हणायची लग्न कर, लग्न कर…झालं माझं लग्न…’’

आता उमाचाही संयम संपला, ‘‘माझं सगळं आयुष्य मी याच्यासाठी झिजवलं. तरी याचं म्हणणं मी याच्यासाठी काहीच केलं नाही…आता तर मीच पोलिसांना सांगेन याचे सगळे प्रताप. कोर्टात याच्याविरूद्ध मी साक्ष देईन.’’ ती म्हणाली.

पोलीस प्रसूनला घेऊन गेले.

प्रेमाचे धागे

कथा * अर्चना पाटील

सौम्य अफिसमधून रात्री आठ वाजता घरी परतला. शुज काढून हॉलमध्येच बसला.

‘‘जेवण वाढू का तुम्हाला,’’ काव्याने विचारलं.

‘‘जेवण नको आहे मला. तू इथे बस. माझ्यासमोर.’’

‘‘मी बसते, पण तुम्ही जेवून तर घ्या आधी.’’

‘‘भुक नाहीए मला. तुला इथे बसायला सांगतो आहे. तेवढं कर.’’

‘‘काय झालंय?’’

‘‘हेच मला तुला विचारायचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? हनीमुनची टुर कँन्सल का केलीस तू आईबाबांसमोर? आठ दिवस गेलो असतो घराबाहेर फिरायला. तेवढाच एकांत मिळाला असता आपल्याला.’’

‘‘मला नको आहे एकांत. मी या घरात केवळ कस्तुरीची आई म्हणून आले आहे. तुम्ही माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका.’’

‘‘याचा अर्थ काय? नुसती नाटके नकोत मला. तुला जर एक बायको म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नव्हते तर लग्न का केलं माझ्याशी? जगात मुलींची काही कमी होती का? कस्तुरीसाठी आया तर भाडयानेही घेऊन आलो असतो मी. अनन्याच्या अपघाती निधनानंतर मला पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरूवात करायची होती आणि कस्तुरीची मावशी असल्याने तू परक्या बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेशील एवढेच या विवाहामागचे कारण आहे.’’

काव्या निरुत्तर झाली होती. आठ दिवस झाले होते लग्नाला. ती सतत सौम्यला टाळत होती. पण आज सासुसासरे गावी निघून गेले. त्यामुळे सकाळपासूनच तिला रात्रीची भीती वाटत होती. कारण आज सौम्यला टाळणे शक्य नव्हते.

‘‘तुम्ही जेवून घ्या आधी. आपण शांततेत बोलू नंतर.’’

‘‘कस्तुरी ?झोपली का?’’

‘‘हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना. मी ताट वाढते.’’

काव्या किचनमध्ये ताट वाढायला गेली. सौम्यसुद्धा तिच्या मागेमागे गेला. ताट हातात घेऊन काव्या उभी होती.

‘‘जेवण नको आहे मला, तू फक्त कस्तुरीची आई आहेस ना मग माझ्या पोटाची चिंता कशाला करते आहेस? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवीत.’’

‘‘आपण आईबाबांच्या खोलीत जाऊ. बेडरूममध्ये कस्तुरी झेपली आहे.’’

सौम्य काव्याचा हात हातात पकडूनच तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. काव्या एका भिंतीला चिटकून काहीशी घाबरतच उभी होती. सौम्य आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हते. लग्नानंतर प्रथमच ते दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ उभे होते.

‘‘आज मला एक मुलगी आहे. पण माझं नाव चालवायला मला आणखीन एक मुल हवंय. त्यासाठीच मी पुन्हा लग्न केले आहे. हे वाक्य कायम लक्षात असू दे आणि तुझ्यासोबत बोलताना आणि वागताना चुकलो तर तुमचं हे चुकत आहे असं बोलायलाही विसरू नको. बाकी तुझं नाटकं चालू देत.’’ सौम्य संतापात बोलून निघून गेला.

एक आठवडा ताणतणावातच गेला आणि आईबाबा गावाहून परत आले. सौम्यसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सगळे एकत्रच बसले. सौम्य एकटक काव्याकडे बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे पाहतच नव्हती. आईबाबा घरात असले की काव्या बिनधास्त असे, कारण सौम्यला टाळणे सहज जमत असे. जेवत असताना सौम्यला फोन आला. तेवढया वेळात सर्वजण जेवण करून निघून गेले. किचनमध्ये केवळ सौम्य आणि काव्या उरले. काव्याचे जेवणही झाले होते. पण सौम्यला जेवण वाढण्यासाठी तिला तिथेच त्याच्याशेजारी मांडी घालून बसावे लागले. सौम्य जेवत होता, पण काव्याला सतत भीती वाटत होती.

‘‘गुळाचा काला कर मस्त. कधीपासून खाल्ला नाही आहे.’’

‘‘काय?’’

‘‘येत नाही का तुला?आईला बोलव मग.’’

काव्याने कटरने गुळ चिरायला सुरूवात केली. सौम्य काव्याच्या घाबरट हालचालींचा आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. काव्याने पोळी आणि गुळाचा काला करताच कस्तुरीसुद्धा तेथे पोहोचली.

‘‘अय्या मम्मीपण असाच काला बनवायची ना पप्पा.’’

कस्तुरीच्या त्या वाक्याने नीरव शांतता पसरली. सौम्यसुद्धा काला न खाताच उठून गेला. काव्यालाही वाईट वाटले. दिवसभर सौम्य बेडरूममध्येच होता. पण काव्या चुकुनसुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबा गावातच लग्नाला जाणार होते.

‘‘सौम्य, कस्तुरी आमच्यासोबत लग्नाला येते आहे. तुम्ही दोघंही कुठेतरी फिरून या. बरं मग निघू आम्ही.’’ बाबा बोलून निघून गेले.

काव्या हॉलमध्ये टीव्ही पाहत होती. सौम्यने आईबाबा जाताच घराचा दरवाजा आतून बंद केला आणि काव्याजवळ येऊन बसला. सौम्य जवळ येताच काव्या सावरून बसली.

‘‘किती दिवस एकांत टाळशील? लग्नाची बायको आहेस तू माझी. तू कितीही ठरवलं तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबतच घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तुझेही आईबाबा नातू हवा म्हणून तुला त्रास देतील.’’ सौम्य नेहमीप्रमाणे बोलून निघून  गेला. काव्यासुद्धा नजर खाली करून बसुन राहिली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सौम्य कस्तुरीला शाळेत सोडण्यासाठी काव्यालाही घेऊन गेला. कस्तुरीला शाळेत सोडल्यानंतर टुव्हीलर घराच्या रस्त्याने न येता वेगळयाच दिशेने धावत होती. काव्या बेचैन झाली.

‘‘तुम्ही कुठे नेत आहात मला. तुम्ही गावाच्या बाहेर का जात आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला कस्तुरीची शपथ आहे.’’

सौम्यने गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. काव्या पटकन खाली उतरली. सौम्यसुद्धा खाली उतरला.

‘‘मी काही चुकीचं वागतोय का?’’

‘‘या प्रश्नाचे उत्तर नाहीए माझ्याकडे. मला घरी सोडा.’’

‘‘नाही सोडणार घरी. मला जिथे जायचं असेल, तिथेच जाईन. तुझ्या बापाला फोन करतो तू अशी नाटकं करते आहेस रस्त्यावर हे सांगायला,’’ सौम्य संतापात बोलत होता.

‘‘मी बसतेय गाडीवर,’’ काव्याच्या डोळयात पाणी आलं. बोलताना…मधूनमधून दोघांचा एकमेकांना हलकासा स्पर्श होत होता. टुव्हीलर एका कॉलेजसमोर थांबली. एक तासाचा प्रवास केला दोघांनी. पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज पाहताच काव्या गोंधळली. सौम्यने काव्याचं लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतलं. अॅडमिशन फॉर्म भरताच टुव्हीलर सपसप घराच्या दिशेने निघाली. तोपर्यंत कडक ऊन पडलं होतं.

‘‘तुम्ही रूमाल बांधाना डोक्याला,’’ काव्या बोलायचा प्रयत्न करत होती.

‘‘आयुष्याने इतके चटके दिले आहेत की आता या उन्हाचं काही वाटत नाही. तू व्यवस्थित बस.’’

काव्याला खुपच शरमल्यासारखे होत होते. सौम्य किती चांगल्या मनाने मला आणत होता आणि मी विनाकारणच त्याच्याशी भांडत होते. आजही सौम्यने अॅडमिशनसाठी रजा टाकली होती. दुपारच्यावेळी काव्या बेडरूममध्ये पाठ टेकायला आली. सौम्यने  रोमँटिक गाणी लावली लॅपटॉपवर. अभी ना जाओ छोडकर…ये हँसी वादीयाँ…तुम मिले, दिल खिले…प्रत्येक गाणं काव्याला आवडत होतं. ती सौम्यकडे पाठ करून बेडवर झेपली होती, पण गालातल्या गालात हसत होती. तेवढयात काव्याच्या आईचा फोन आला.

‘‘कशी आहेस बेटा. बरं ते जाऊ दे. जावईबापूंना म्हणा पन्नास हजार मिळाले. तात्यांना अॅडमिट केलं होतं दवाखान्यात. आम्ही पगारावर फेडू म्हणा त्यांना. तू काळजी करशील म्हणून बोलले नाहीत तुला. आभार मानायला फोन केला गं मी. जावईबापूंना नाराज करू नकोस. खूपच हळव्या मनाचे आहेत ते. आपली अनन्या त्यांच्या आयुष्यातुन अचानक निघून गेली, त्यामुळे खुप खचले गं ते. पण मन मोकळं करत नाहीत ते. आता तुच अनन्याची जागा भरून काढ.’’

संध्याकाळी स्वत:हून काव्याने सौम्यसाठी शिरा बनवला. रात्री जेवण झाल्यावर स्वत:हून गुळपोळीचा काला केला.

‘‘बापरे, कस्तुरी तुझी नवी मम्मी खुपच खुष दिसते आहे आज’’

‘‘हो, कारण मम्मा आता वकील होणार आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार.’’

‘‘कस्तुरी, असं बोलू नये बाळा. तू जा आजीजवळ आणि झोप.’’

‘‘मी चुकीचे ऐकतोय का, कस्तुरीची मम्मी. तू तिला आजीजवळ पाठवते आहेस झोपायला.’’

काव्या लाजली आणि पटापट किचनमधील पसारा आवरून बेडरूममध्ये आली.

‘‘आईचा फोन होता संध्याकाळी. कौतुक करत होती तुमचं.’’

‘‘मी तर सगळयांनाच आवडतो तू सोडून.’’

‘‘मी कुठे म्हटले की तुम्ही मला आवडत नाहीत.’’

‘‘म्हणजे मी तुला आवडतो. मग इतके दिवस माझ्यापासून दुरदुर का पळत होती?’’

‘‘थोडा वेळ हवा होता मला. अनन्या गेली आणि लगेच तिच्या अर्धवट संसारात गुंतवलं मला आईबाबांनी. मला ग्रॅजुएशननंतर लॉ करायचे होते. या लग्नामुळे माझे शिक्षणसुद्धा थांबले. याशिवाय तुम्ही मला अनन्याची जागा कधीच देणार नाही असं वाटत होतं मला.’’

‘‘बावळट आहेस तू, अनन्या माझा भुतकाळ होती. मी तुला आधीच सांगितलं होतं की मला आयुष्याची नवीन सुरूवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं आहे.’’

‘‘मला माझी चुक समजली. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझे मन जिंकलेच. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या.’’

‘‘एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव.’’

ब्रेकअप

कथा * शकुंतला सोवनी

ब्रेकअप,’’ अमेरिकेतून आलेल्या फोनवर रागिणीचे हे शब्द ऐकताच मदनला कानांत कुणीतरी उकळतं तेल ओतल्याचा भास झाला. अभावितपणे त्याच्या डोळ्यांत अश्रू आले.

‘‘काय झालं रे मुन्नु? डोळ्यांत पाणी का आलं?’’ उमा वहिनीच्या या प्रश्नावर तो पार उन्मळून पडला. ‘‘सगळं, सगळं संपलंय गं वहिनी…पाच वर्षं माझ्यावर प्रेम केल्यावर रागिणीनं आयुष्याचा जोडीदार म्हणून दुसऱ्यालाच निवडलंय.’’ त्याला रडू अनावर झालं.

‘‘मुन्नु, खरं सांगू का? तू तिला विसर. खरं सांगते, ती तुझ्यासाठी योग्य मुलगी नव्हतीच,’’ उमावहिनीनं म्हटलं.

उमावहिनी मदनची एकुलती एक वहिनी. वयानं त्याच्याहून जवळजवळ १२ वर्षं मोठी. मदनला ती प्रेमानं मुन्नु म्हणते. मदन महाराष्ट्रातला. मुंबईतल्या एका उपनगरात त्याचे वडील सरकारी नोकरीत होते. स्वत:चं छोटसं घर होतं. आई साधीशी, व्यवस्थित घर सांभाळणारी गृहिणी होती. मदनचा मोठा भाऊ त्याच्याहून जवळजवळ १५ वर्षं मोठा होता. मदनचा भाऊ आईवडिलांना घेऊन एक दिवस व्हीटी स्टेशनला गेला होता. २६ नोव्हेंबरचा दिवस. त्याच दिवशी झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात ती तिघं मृत्यूमुखी पडली होती. मदन तेव्हा ११वीत होता. हुशार मदनला इंजिनियर व्हायचं होतं. पण एका झटक्यात घरातील तीन माणसं गेल्यानं तो अगदीच पोरका झाला होता.

आता घरात फक्त उमावहिनी अन् तिचा लहानसा मुलगा एवढीच माणसं होती. मात्र उमावहिनी आपल्या मुलाएवढंच मदनवरही प्रेम करत होती. तिनं जणू त्याच्या आईची जागा घेतली होती. उमाला राज्य सरकारनं नोकरी दिली, शिवाय तीन माणसांच्या मृत्यूची नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळाली. तिनं मदनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. त्याला इंजिनियर करायचा उमानं चंग बांधला होता.

मेरिट बेसिसवर मदनला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश घेता आला. इथं बिहारमधून डोनेशन देऊन प्रवेश मिळवलेले अनेक विद्यार्थी होते. रागिणी त्यापैकीच एक होती. मदनच्याच बॅचला होती. अभ्यासात यथातथाच होती. म्हणूनच वडिलांनी एवढं मोठं डोनेशन देऊन तिचं एडमिशन करून घेतलं होतं. वडिल केंद्र सरकारच्या नोकरीत होते. पगाराव्यतिरिक्त भरपूर पैसा हातात येत होता. वडिल तिलाही चिकार पैसे पाठवायचे. तिचं स्वत:चं एटीएम कार्ड होतं. ती भरपूर पैसे खर्च करायची. मित्रांना हॉटेलात जेवू घालायची. कधी पिक्चरला न्यायची. त्यामुळे तिच्याभोवती पिंगा घालणारे चमचे भरपूर होते. सेकंड इयर संपल्यावर तिची मदनशी मैत्री झाली. मदन मुळात हुशार होता. आपला अभ्यास पूर्ण करून तो रागिणीलाही अभ्यासात मदत करत होता. त्याच्या हुशारीमुळे अन् सज्जन स्वभावामुळे रागिणीला तो आवडायचा. शिवाय तो तिला निरक्षपणे मदत करत होता. त्यामुळे हळूहळू ती त्याच्याकडे आकर्षित झाली. थर्ड इयर संपता संपता दोघांची मैत्री वाढली.

पुढे शनिवार, रविवार दोघं कधी कॉफीहाउसमध्ये तर कधी हॉटेलात लंचला भेटू लागली. अर्थात पुढाकार रागिणीचा असायचा. कारण भरपूर पैसे तीच खर्च करू शकत होती. दोघांनी अमेरिकेतून एमएस करायचं ठरवलं होतं. त्यासाठी जरूरी असलेल्या परीक्षांचीही त्यांची तयारी सुरू होती. मदन त्याच्या उमावहिनीपासून कोणतीही गोष्ट लपवत नसे. त्यानं रागिणीबद्दल वहिनीला सांगितलं होतं. स्कॉलरशिप मिळाली तर फारच छान होईल असं दोघांना वाटत होतं.

अमेरिकेतल्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च होता. रागिणीसाठी ते सहज शक्य होतं. कारण वडील करोडपती होते. प्रश्न मदनचा होता. स्कॉलरशिप त्यालाही मिळाली नाही.

स्टुंडट व्हिसा एफ१ साठी अभ्यास व राहाणं, जेवणखाणं एवढा खर्च करण्याची ऐपत असावी लागते. त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढा पैसा दाखवावा लागतो. रागिणीच्या अकांउटला तिच्या वडिलांनी तेवढा पैसा भरला होता. मदनला मात्र फारच काळजी लागली होती.

उमावहिनीचं त्याच्याकडे लक्ष होतं. तिनं त्याला दिलासा दिला, ‘‘मुन्नु, तू जायची तयारी कर. मी आहे ना? तुझं स्वप्नं नक्की पूर्ण होईल.’’ उमानं गावाकडची काही शेतजमीन विकून, काही दागिने गहाण ठेवून अन् काही शिल्लक पैसा काढून त्याच्या अकाउंटला पैसे भरले. रागिणी अन् मदन दोघांनाही व्हिसा मिळाला. दोघांच्या एडमिशन्स मात्र वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीत झाल्या. पण दोघंही अमेरिकेला पोहोचले एकदाचे.

दोघांच्या कॉलेजमध्ये केवळ एक तासाचं कार ड्राइव्हचं अंतर होतं. रागिणीला कॅलिफोर्नियातल्या सांता क्लारा युर्निव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती तर मदनला जागतिक कीर्तीच्या वर्कले युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. श्रीमंत बापाची पोरगी रागिणीला वडिलांनी तिथं कारही उपलब्ध करून दिली. दोघं वीकेंडला भेटायची. भेटणं, एकत्र राहाणं, जेवणखाणं, अभ्यासाची चर्चा सगळंच त्यामुळे शक्य व्हायचं. बहुतेक वेळा रागिणीच कारनं मदनकडे यायची. क्वचित कधी मदन बसनं तिच्याकडे जायचा. तीच त्याला कारनं माघारी आणून सोडायची. एकमेकांच्या वाढदिवसाला, व्हॅलेंटाइन डेला दोघं एकमेकांना गिफ्ट द्यायची. अर्थात्च रागिणीच्या भेटवस्तू महागड्या असायच्या.

उमावहिनीला मदन सगळं सांगत होता. तिच्या फक्त एवढंच मनांत आलं होतं की इतक्या श्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्या निम्न मध्यमवर्गीय घरात रूळेल का? पण उघड ती काहीच बोलली नव्हती. तिची पूर्ण संमती होती. फक्त चुकीचं पाऊल उचलू नकोस अन् कुणा मुलीचा विश्वासघात करू नकोस एवढं तिनं मदनला बजावलं होतं.

रागिणीनंही घरी आईवडिलांना आपलं प्रेमप्रकरण सांगितलं होतं. त्यांचा मदनच्या मराठी असण्यावर आक्षेप नव्हता. पण त्याची आर्थिक परिस्थिती मात्र खूपच खटकत होती. मदनपेक्षा चांगल्या, श्रीमंत मुलाशी लग्न करण्याबद्दल त्यांनी रागिणीला सुचवलंही होतं. पण रागिणीनं त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मदन रागिणीचं प्रेम अबाधित होतं. लग्न करून आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणाभाका घेऊन झाल्या होत्या.

दोन वर्षांत मास्टर डिग्री घेऊन मदन भारतात परतला होता. येताना रागिणीही त्याच्यासोबत मुंबईला आली होती.

दोन दिवस ती त्याच्या घरीच राहिली. उमावहिनीनं विचारलं, ‘‘आता तुमचा दोघांचा काय बेत आहे?’’

रागिणी म्हणाली, ‘‘वहिनी, मास्टर्स केल्यावर एक वर्ष आम्हा दोघांना पी.टी म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग पूर्ण करावं लागेल. यात आम्ही कुठल्याही कंपनीत एक वर्षं काम करतो. आम्हाला दोघांना नोकरीही मिळाली आहे. या वर्षभराच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगनंतर आम्ही लग्न करणार आहोत. मदननं तुम्हाला सांगितलंच असेल ना?’’

‘‘होय, मदननं सांगितलंय, पण मला असं विचारायचं आहे की लग्नानंतर तुम्ही, म्हणजे तू नोकरी अमेरिकेत करणार की भारतात?’’ उमानं विचारलं.

रागिणी म्हणाली, ‘‘ते सगळं मी मदनवर सोपवलंय. त्याला योग्य वाटेल ते तो करेल. वहिनी, तुम्ही अगदी निश्चिंत असा.’’

दोन दिवस मुंबईत राहून रागिणी बिहारला आपल्या घरी गेली.

रागिणीच्या बोलण्यानं उमालाही दिलासा मिळाला. घरी गेल्यावर रागिणीचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघ मुली, तुझ्या आनंदातच आमचाही आनंद आहे. पण तू विचारपूर्वक निर्णय घे. मदन मुलगा चांगलाच आहे…तरीही त्याच्या कुटुंबात तू व्यवस्थित ऍडजस्ट होशील याची तुला खात्री आहे का?’’

रागिणी म्हणाली, ‘‘मदनच्या कुटुंबात सध्या तरी मला काहीच प्रॉब्लेम वाटत नाहीए.’’

‘‘तरीही मला एकदा त्याला भेटायचं आहे.’’ वडिल म्हणाले.

‘‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा त्याला बोलावून घेईन.’’

‘‘नको, आत्ता नको, मी स्वत:च जाऊन भेटेन त्याला.’’ वडिलांनी सांगितलं.

सुमारे दोन आठवड्यांनी मदन व रागिणी अमेरिकेला परत आले अन् त्यांची नोकरी सुरू झाली. पण आता दोघांची नोकरी दोन टोकांना होती. एक ईस्ट कोस्टला तर दुसरा वेस्ट कोस्टला. विमान प्रवासातच सहा-सात तास लागणार. आता भेटी फारच क्वचित व्हायच्या. इंटरनेटवर, स्काईपवर भेट व्हायची तेवढीच.

रागिणीच्या कंपनीत कुंदन नावाचा एक नवा भारतीय मुलगा आला. त्याचे वडिल मुंबईतले प्रसिद्ध ज्वेलर होते. तो दोन बेडरूमच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहात होता. स्वत:ची एसयूव्ही होती. रागिणीचीही छोटी गाडी होती. रागिणी त्याच्या श्रीमंत राहणीमुळे भारावली होती. एका वीकेंडला कुंदननं रागिणीला गाडीतून ऑरलॅन्डोला नेलं. तिथं एका हॉटेलात दोघं थांबली होती. नंतरच्या पंधरवड्यात कुंदननं तिला डिस्ने लॅन्डला फिरवून आणलं. मदनशी हल्ली रागिणीचा संपर्क कमी द्ब्रा झाला होता. तिनं कुंदनबद्दल मदनला सांगितलं होतं. पण त्याच्याशी     इतकी जवळीक झाली आहे हे मदनला ठाऊक नव्हतं.

मदन कॅलिफोर्नियामध्ये एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहात होता.  स्वत:च स्वयंपाक करून जेवत होता. एक छोटी टूसीटर कार होती. एक दिवस अवचित रागिणीचा फोन आला. ती वडिलांना घेऊन शनिवारी त्याला भेटायला येतेय. रविवारी राहून सोमवारच्या फ्लाइटनं परत जाईल.

गडबडीनं मदननं तीन दिवसांसाठी भाड्यानं एक कार घेतली. त्यांच्या वास्तव्यासाठी बाहेर गेलेल्या मित्राच्या फ्लॅलटची किल्ली मागून घेतली. शनिवारी एयरपोर्टवरून त्यांना तो घेऊन आला. त्यादिवशी मदननं केलेला स्वयंपाकच सगळे जेवले. नंतर मात्र हॉटेलातच जेवायला पसंती दिली. हॉटलचं बिल मदनलाच द्यायचं होतं.

रागिणीच्या वडिलांनी मदनला त्याचा पुढचा कार्यक्रम विचारला, ‘‘अंकल, मला हे वर्ष पूर्ण झाल्यावर भारतात परत जावं लागेल, वहिनीला माझी गरज आहे. शिवाय इथली माझी कंपनी त्यांच्या भारतातल्या मुंबई ऑफिसात मला पोस्ट करायला तयार आहे.’’
रागिणीचे बाबा फक्त ‘‘हूं,’’ म्हणाले. रागिणी वडिलांबरोबर परत गेली.

आता तिचे वीकेंड कुंदनबरोबरच जायचे. मदनसोबत व्हिडिओचॅटिंगही बंद झालं होतं. आठवड्यात कधी तरी चॅट करायची तेवढंच. याच अवधीत रागिणीचा वाढदिवस आला.

मदननं एक लेडीज पर्स तिला भेट म्हणून दिली. तर कुंदन सोन्याचे सुंदर इयररिंग्ज घेऊन आला. न्यू जर्सीत त्याचे नातलग होते. त्यांच्या दुकानातून त्यानं ते घेतले, रागिणीचे वडील अजून तिथेच होते. त्यांनी कुंदनबद्दल विचारलं, तेव्हा तिला जे काही त्याच्याबद्दल ठाऊक होतं ते तिनं सांगितलं.

योगायोग असा की त्याच शनिवारी कुंदन स्वत:ची गाडी घेऊन तिथं पोहोचला. रागिणीनं त्याची वडिलांशी ओळख करून दिली. तो उत्साहाने म्हणाला, ‘‘अंकल, आपण फ्लोरिडाला जाऊया का? उद्या तिथून रॉकेट लाँच होतंयं. आपण रॉकेट लाँचिंग बघू अन् तिथं मजेत राहू.’’

तिघं फ्लोरिडाला निघाले. कुंदन गाडी चावलत होता. वडील त्याच्या शेजारी बसले होते. बोलता बोलता त्यांनी कुंदनला त्याच्या पुढच्या प्लॅन्सबद्दल विचारलं. तो म्हणाला, ‘‘मी तर इथंच सेटल व्हायचं ठरवलंय. माझी नोकरी आहेच. अजून एक चांगली ऑफर आलीए. अन् मला इथं ज्वेलरीचा बिझनेसही सुरू करायचा आहे.’’

कुंदननं एका फोर स्टॉर हॉटेलात रूम बुक केली होती. तिघंही एकाच खोलीत होती. रॉकेट लाँचिंग बघून, फ्लोरिडा फिरून मंडळी परत आली. जोवर बाबा होते, मदन रोज हॉटेलमधून जेवण पॅक करून घरी आणायचा.

एकदा बाबा म्हणाले, ‘‘मला तर कुंदन अधिक योग्य मुलगा वाटतोय. तुझं काय मत आहे?’’

ती म्हणाली, ‘‘तो चांगला आहे, पण सध्या तरी आम्ही फक्त मित्र आहोत. त्याच्या मनांत काय आहे ते मला कळलेलं नाही.’’

वडील म्हणाले, ‘‘थोडा पुढाकार घेऊन तूच त्याचं मन जाणून घे. इतकी काळजी घेतोय तुझा, इतका खर्च करतो, त्याच्या मनांत लग्न करण्याचा विचार असेलच! असं बघ रागिणी, तुम्हा दोघी बहिणींवर मी इतका खर्च करतोय, तो एवढ्यासाठीच की तुम्हाला काही कमी पडायला नको. मदन मुळात गरीब, त्यातून तो वहिनी व तिच्या मुलासाठी भारतातच रहायचं म्हणतोय…’’

रागिणी त्यावेळी काहीच बोलली नाही.

बाबा परत जायला निघाले तेव्हा कुंदनने त्यांना विमानतळावर पोहोचवलं, शिवाय त्यांच्यासाठी व रागिणीच्या आईसाठी भेटवस्तूही दिली.

मदनशी आता रागिणीचा संपर्क नव्हता. कधीतरी फोन, कधीतरी चॅटिंग…वडील निघून गेल्यावर रागिणीला कळेना, मदन अन् कुंदनमधून नवरा म्हणून कुणाची निवड करावी? बाबा तर सतत कुंदनचीच वाहवाही करत होते. कुंदनशी तिची मैत्री वाढत होती तर मदनशी दुरावा वाढत होता.

त्याचवेळी एक दिवस कुंदननं तिला प्रपोज केलं. ‘‘रागिणी, तू माझ्याशी लग्न करशील? नीट विचार करून उत्तर दे, कारण मी अमेरिकेतच स्थायिक होणार आहे.’’

रागिणीला अमेरिका अन् इथली जीवनशैली आवडत होती. तरीही तिनं कुंदनकडून थोडावेळ मागून घेतला.

भारतात उमावहिनीला हार्ट अॅटक आला होता. तिला चारपाच दिवस इस्पितळात रहावं लागलं होतं. पण तिच्या भाऊ, भावजयीनं सगळं व्यवस्थित सांभाळलं.

मदनला फोन आला. उमा स्वत:च फोनवर बोलली, ‘‘आता मी बरी आहे मुन्नु, माझी काळजी करू नकोस. इथं माझे दादा वहिनी माझी काळजी घेताहेत.’’

त्यानंतर महिन्याभरातच मदन भारतात परतला. मुंबईतच त्याला पोस्टिंग मिळालं होतं. येण्यापूर्वी तो रागिणीला भेटला. तिच्याशी सविस्तर बोलला, ‘‘मी तर आता भारतात परत जातोय. मी तिथंच राहाणार आहे. तुझं पी.टी.ही आता संपतंय, तेव्हा तू भारतात कधी परत येणार? की अजून काही दिवस इथंच नोकरी करायचा विचार आहे?’’

रागिणीला नेमकं काय करावं ते कळत नव्हतं. मनाची दोलायमान अवस्था होती. ती म्हणाली, ‘‘अजून लगेचच मी इंडियात येत नाहीए. कारण मला एच वर्क व्हिसा मिळालेला आहे. अजून काही दिवस मी इथं नोकरी करून बघणार आहे. मला नोकरी मिळते आहे. मी तुला कुंदनबद्दल बोललो होते ना? त्यालाही वर्क व्हिसा मिळाला आहे. तोही सध्या इथंच राहातोय.’’

मदन भारतातल्या नोकरीवर रूजु झाला. उमा वहिनीला सध्या विश्रांती हवी होती. तिचा मुलगा अन् मुन्नु दोघं मिळून तिची काळजी घेत होते. घरकाम, स्वयंपाक करायला छान बाई मिळाली होती.

रागिणीचे आईवडिल तिला कुंदनशीच लग्न करण्यासाठी आग्रह करत होते. रागिणीलाही त्याच्याविषयी ओढ वाटत होती. कुंदननं तर अमेरिकेत एक मोठंसं घरही लीजवर घेतलं होतं.

सहा आठ महिने गेले. मदनने रागिणीला फोन केला. ‘‘रागिणी, तू भारतात येण्याबद्दल काय ठरवलं आहेस? तू इथं आल्यावर आपण लग्न करूयात. निर्णय लवकर घे. मी भारतातच राहाणार आहे.’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी भारतात येणार नाही. तू जर अमेरिकेला येत असलास तरच लग्नाबद्दल विचार करता येईल. आता निर्णय तू घ्यायचा आहेस…’’

मदननं म्हटलं, ‘‘आईसारख्या उमावहिनीला मी सोडू शकत नाही. मी अमेरिकेत येणार नाही. तू सांग, काय म्हणतेस?’’

‘‘तर मग वाद कशाला वाढवायचा?’’ रागिणी पटकन् म्हणाली, ‘‘समज ब्रेअप झाला.’’ तिनं फोन बंद केला.

मदनला धक्का बसला…ती कुंदनच्या प्रेमात पडली आहे. त्याच्या वैभवाला भाळली आहे हे ही त्याच्या लक्षात आलं. त्यानं वहिनीला रडतंच सगळं सांगितलं.

मदननं फोन लावून दिला. उमानं रागिणीला विचारलं, ‘‘तू खरंच मदनशी लग्न करणार नाहीस?’’’

रागिणी म्हणाली, ‘‘मी तिथं येऊ शकत नाही अन् मदन इथं येऊ शकत नाही. तेव्हा मी इथंच माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधलाय. मदनला म्हणावं, तू ही तसंच कर.’’

उमावहिनी मायेनं बोलली, ‘‘रागिणी, अगं मदन इथं रडतोय. पाच वर्षं तुम्ही प्रेमात होता. मैत्रीचं, प्रेमाचं, विश्वासाचं नातं तू असं तडकाफडकी कसं तोडू शकतेस? एकदा पुन्हा विचार कर.’’

रागिणी म्हणाली, ‘‘आता उगीचच वेळ घालवणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. मदनला म्हणावं रडणं सोड, नवा जोडीदार शोध.’’

थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग उमा म्हणाली, ‘‘मग मी मदनला काय सांगू? तू कुंदन…’’

तिला पुढे बोलू न देता संतापून रागिणी ओरडली.

‘‘ब्रेकअप…ब्रेकअप…ब्रेकअप…फुल अॅण्ड फायनल.’’ फोन कट झाला.

उमा मदनच्या जवळ बसली. प्रेमानं त्याला थोपटत म्हणाली, ‘‘शांत हो. रडू तर अजिबात नकोस. रागिणीला कुंदन हवाय…सोनंनाणं, पैसा अडका, मोठं घर, आधुनिक राहणी अन् सुखासीन आयुष्य…तू दुसरी मुलगी बघ. तुझ्या परिस्थितीशी जुळवून घेईल अशी. खरं सांगते रागिणी कधीच तुझ्यासाठी योग्य जोडीदार नव्हती. तिला जाऊ दे. तिला विसर. नव्यानं आयुष्य सुरु कर.’’

झुला भावनांचा

कथा * अर्चना पाटील

मोक्षदा आणि मानस रोजच्याप्रमाणे बाईकवरून खाली उतरले. मोक्षदाने कौस्तुभला आवाज दिला.

‘‘चल रे कॅन्टीनला…मजा करू’’

‘‘तुम्ही व्हा पुढे, आलो मी.’’

थोडयाच वेळात दोघेही कॅन्टीनला पोहोचले. मोक्षदाने तिघांसाठी ऑर्डर दिली. कौस्तुभही येऊन बसला.

‘‘काय धावपळ चालू आहे तुझी इतकी.’’

‘‘काही नाही, आपल्या कॉलेजची एकांकिका आहे. मला नायकाची प्रमुख भुमिका करायची आहे त्यात. म्हणून सकाळी लवकर आलो होतो जरा. कुलकर्णी सरांना मस्का लावत होतो.’’

‘‘अरे काय, एकांकिका…मॅच खेळायला चल, त्यापेक्षा कॉलेजच्या टीमकडून.’’

‘‘तुला काय करायचं आहे? कौस्तुभ तुला अभिनयाची आवड आहे, तू तेच कर.’’ मोक्षदा जरा जोर देऊनच बोलली.

तिघांनी बटाटे वडे आणि चहा घेतला. लेक्चर केले. चार वाजताच कौस्तुभला गावाहून फोन आला. आईची तब्येत बरी नसल्याने तो ताबडतोब गावाकडे गेला. चार पाच दिवस झाले. कौस्तुभचा फोनही लागत नव्हता. नाटकाची तारीख जवळ येत होती.

‘‘कोणी नाटकातली नायकाची भूमिका करायला तयार आहे का?’’ कुलकर्णी सर वर्गात विचारत होते.

वर्गातल्या अजिंक्यने मानसचे नाव सुचवले.

‘‘मानसला घ्या सर, भारी नकला करतो तो सगळयांच्या.’’

‘‘बरं, मानस आजपासून तालमीला हजर रहायचं.’’

‘‘हो सर,’’ मानसही सहजच बोलून गेला.

‘‘तू का हो म्हटलं? ती भूमिका कौस्तुभला करायची होती ना. हे चुकीचे आहे.’’

‘‘अरे, नाटक पंधरा दिवसात सादर करायचे आहे. तो कधी परत येईल हे कोणाला माहिती नाही. मी जर नाही म्हटलो असतो तर दुसरा कोणीतरी नक्कीच उभा राहीला असता? तू पण ना कुठेही वाद घालतेस?’’

त्याच दिवशी रात्री मानस तालमीला गेला. कुलकर्णी सरांना त्याचा अभिनय खुपच आवडला. मोक्षदाही मानससोबतच होती. मोक्षदालाही मानसचे हे रूप खुपच आवडले. रात्रीचे साडेआठ वाजल्याने मोक्षदाचे हॉस्टेलचे गेट बंद झाले होते. तालीम संपल्यावर दोघेही मानसच्या फ्लॅटवर आले.

‘‘भीती नाही वाटत, माझ्यासोबत एकटं फिरण्याची.’’

‘‘नाही, अं…तुझ्यासोबत असलं की खूप आनंद होतो मला.’’

‘‘बसं इतकंच, अजून काहीच नाही. अशी रेडीओसारखी अटकत अटकत नको बोलत जाऊस. स्पष्ट बोलत जा. मी कसं स्पष्ट सांगतो की तू मला आवडते आणि माझं तु?यावर खूप प्रेम आहे.’’

मोक्षदा काहीही न बोलता गालातल्या गालात हसतच राहीली. ‘दो दिल मिल रहें है…’ मंद आवाजात मोबाईलवर गाणे चालू होते. मोक्षदा मानस लावत असलेल्या रोमँटिक गाण्यांचा आनंद घेत होती. रात्रभर छान गप्पा झाल्या. पहाटे पहाटे दोघांचा डोळा लागला. सकाळी दहाला दोघेही नेहमीप्रमाणे बाईकवर कॉलेजला गेले. मानस बाईकवरून खाली उतरताच कौस्तुभ त्याच्यासमोर येऊन उभा राहीला.

‘‘नाटकातली नायकाची भूमिका तुला मिळाली, असं ऐकलं.’’

‘‘हो, खुपच छान वाटतंय यार.’’

‘‘अभिनंदन तुझं.’’ कौस्तुभ थोडं रागानेच बोलून कॅन्टीनमध्ये निघून गेला.

आज कौस्तुभ दुसऱ्याच एका मित्रासोबत एका टेबलवर बसला होता. त्या टेबलवर दोन कप गरमागरम कॉफीचे आले. कौस्तुभ कप उचलणारच तेवढयात मानसने तो कप उचलून मोक्षदाला दिला. पुढच्याच क्षणी कौस्तुभ बिल भरून कॅन्टीनमधून निघून गेला.

‘‘काय तू मानस, मला असा चिल्लरपणा मुळीच पटत नाही. आपण आपल्या पैशाने कॉफी पिऊ शकत नाही का?’’

‘‘चुप गं, माणसाने थोडं रांगडं असावं. इतकंपण साधंभोळं असू नये. वाईट वाटत आहे त्याला नालायकाला. नाटक मिळालं नाही म्हणून. सगळं समजतंय मला. बघू किती दिवस दूर राहतो?’’

संध्याकाळी चार वाजता कौस्तुभ मोक्षदाला लायब्ररीत सापडला. मोक्षदाने हटकूनच मानसचा विषय काढला.

‘‘मानसने काही मुद्दाम नाटक हिसकावले नाही आहे तुझ्यापासून. का बरं एवढा राग करत आहेस त्याचा?’’

‘‘हे बघ मोक्षा, तो जर खरंच माझा मित्र असेल तर त्याने स्वत:हून नाटक सोडले पाहिजे ही माझी माफक अपेक्षा आहे. यापेक्षा जास्त मला बोलायचे नाही.’’

मोक्षदाने पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मानस आणि कौस्तुभ पुन्हा एकत्र होण्यास तयार नव्हते. मानसला नाटकात उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले आणि कॉलेजकडून त्याचा सत्कारही करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे कौस्तुभ खूपच चिडला होता आणि या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने मोक्षदाचा वापर सुरू केला. मानस आणि मोक्षदा सोबत असताना कौस्तुभ मुद्दाम मोक्षदाशी बोलू लागला. तिच्याकडून नोट्स मागणे, तिला बळजबरी कॉफी पाजणे, सतत तिची विचारपूस करणे, कोणत्याही कारणाने फोन करणे असे प्रकार सुरू झाले. मानस कॉलेजची मॅच खेळायला दोन दिवस मुंबईला गेला होता. त्याची बस इथून येणार त्याचवेळी कौस्तुभ हटकूनच मोक्षदाला लेडीज होस्टेलला सोडायला घेऊन गेला. साहजिकच मानसने दोघांना सोबत बाईकवर पाहिले आणि त्याचा संताप अनावर झाला. मानस बसमधून उतरताच लेडीज होस्टेलला गेला. मानसला तिथे पाहताच मोक्षदा एक्सायटेड झाली.

‘‘वॉव, तू मला भेटायला लगेच आलास! कशी झाली तुझी मॅच?’’

‘‘लोकं बदलतात पण मी बदलत नाही, मोक्षा मी तुला शेवटचं सांगतोय कौस्तुभचं सतत तुझ्या अवतीभवती असणं मला मुळीच आवडत नाही. तो केवळ मला हरवण्यासाठी तुझा वापर करतो आहे. आतापर्यंत त्याने कधीच तुझ्याशी संबंध ठेवले नाही तर आताच तो तुझ्याशी एवढी जवळीक का करतो आहे? तुला जर त्याच्याशी संबंध संपवायचे नाहीत तर माझ्यासमोरही यायचं नाही. उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस आहे मी.’’ मानस ताडताड बोलून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पुर्ण दिवस मोक्षदा मानसची वाट पाहत होती. पण मानस कॉलेजला आलाच नाही. मोक्षदाचे उतरलेले तोंड पाहून कौस्तुभ वारंवार विचारपूस करत होता. पण मोक्षदा त्याला सहजच हाकलून लावत होती. शेवटी न राहवून मोक्षदा रात्री होस्टेलला परत न जाता मानसच्या फ्लॅटवर जाऊन बसली.

मानसने दरवाजा उघडून तिला आत तर घेतले पण तो अबोला सोडण्यास तयार नव्हता. आज मोक्षदाने ‘ओजी हमसे रुठकर कहाँ जाईएगा…जहाँ जाईएगा…’ हे गाणं खोलीतील शांतता भरण्यासाठी मंद आवाजात लावले होतं. नंतर दोघांसाठी कॉफी बनवली आणि कप घेऊन त्याच्यासमोर आली.

‘‘राग आला आहे एका माणसाला’’

तरीही मानस शांतच होता. कॉफीचा कपपण त्याने खाली ठेऊन दिला होता.

‘‘बरं, मी लग्न न करता रात्रभर इथे तुझ्यासोबत राहते त्याचं तुला काही नाही. एखाद्या मुलीच्या मागेपुढे कितीही मुलं फिरली तरी जो एक तिला भावतो, ती केवळ त्याचीच होते हे तुम्हा मुलांना कधी समझणार? तू जर खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर सन्मानाने मला लग्न करून तुझ्या घरी घेऊन जा आणि विषय संपव. काय संबंध आहे रे त्याचा नि माझा? मग तू ओळखलस काय मला? फार पुर्वीपासून स्त्री ही एक वस्तू समजली जाते आणि तू पण तेच केलं. जिंकलं मला. खुस! नाही बोलणार मी आजपासून कौस्तुभशी.’’

‘‘तसं नाही आहे. माफ कर मला. मला तुझ्या स्वातंत्र्यावर गदा आणायची नाही आहे. मी जरा जास्तच बोलून गेलो. मी जर तुझ्यावर प्रेम करतो तर तुझ्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वासपण ठेवायला हवा. मी लवकरच तुला सन्मानाने माझ्या घरीपण घेऊन जाईन. तुझ्या वडिलांच्या अंगणातले फूल मी माझ्या संसाराची बाग फुलवायला घेऊन जाणार आहे आणि तुझ्या वडिलांनी तुला आतापर्यंत जसं सांभाळले आहे तसंच मीही तुला आयुष्यभर सांभाळणार आहे. आता मी कॉफी बनवतो माझ्या राणीसाठी.’’

दोघांनी पुन्हा कॉफी घेऊन गैरसमजांची होळी केली आणि प्रेमाच्या सरींनी नवी सुरुवात केली.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें