सुंदर नातं मैत्रीचं

कथा * सुधा काटे

वडिलांच्या आकस्मिक मृत्युची बातमी कळताच सीमाला ताबडतोब जावं लागलं. त्यांचं तेरावं आटोपून ती परत स्वत:च्या घरी परतल्यावर तिने लॅपटॉप उघडून फेसबुकवर लॉग इन केलं. फ्रेण्ड रिक्वेस्टवर क्लिक केलं अन् जे नाव समोर आलं, ते बघताच ती दचकली.

‘‘अगंबाई, हा तर शैलेश!’’ ती उद्गारली. इतकी वर्षं मध्ये गेल्यामुळे शैलेश तसा विस्मरणात गेला होता. पण ते नाव समोर आलं आणि तिला शैलेशबरोबर घालवलेले दिवस पुन्हा जसेच्या तसे आठवले.

दोघंही एकाच कौलेजचे विद्यार्थी होते. शैलेश अभ्यासात फार हुशार होता. शिवाय तो उत्तम गायक आणि वादक होता. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सीमा अन् तो नेहमीच गात असत. त्या दोघांमुळेच यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कॉलेजला नेहमीच बक्षीसं मिळायची. गाण्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने दोघं वरचेवर भेटायची.

एकदा सीमा आजारी पडली. आठ दिवस ती कॉलेजला जाऊ शकली नाही तेव्हा काळजी वाटून शैलेश तिचा पत्ता शोधत थेट घरीच येऊन धडकला.

अशक्तपणामुळे अजून पुढले आठ दिवस सीमा कॉलेजला जाऊ शकत नव्हती म्हणून त्याने स्वत:च्या नोट्स तिला दिल्या. अभ्यासही करवून घेतला. त्यामुळे सीमाला पेपर सोपे गेले अन् फर्स्टक्लास मिळाला. हा हुशार, कलाकार मुलगा अत्यंत कनवाळू अन् सज्जन आहे हे सीमाला जाणवलं.

हळूहळू त्यांची ओळख मैत्रीत बदलली. कॉलेजात ती दोघं आता सतत बरोबर असायची, त्यांच्याबद्दल कॉलेजात चर्चा चालायची. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ती आपल्यातच दंग असायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण प्रेमाला अजून अभिव्यक्ती नव्हती. फक्त ते त्यांना एकमेकांच्या डोळ्यांत दिसायचं. प्रेमाचा उच्चार झाला नव्हता.

तरीही प्रेमाची धुंदी होतीच. एकमेकांच्या आवडीनावडीचा विचार प्रामुख्याने केला जायचा. टळटळीत उन्हाच्या दुपारीही एकमेकांच्या संगतीत चांदणं पसरल्याचा भास व्हायचा. लोकांची पर्वा तर करण्याचा प्रश्नच नव्हता.

मनातल्या मनात भविष्यकाळाची स्वप्नं रंगवताना ती पूर्ण होतील की नाही हा विचारच त्या वेड्या वयात मनात येत नाही. प्रेमाची साद मनात, शरीरात भिनत असते. बाहेरच्या जगात शिशिर ऋतू असो की कुठलाही ऋतू असो, प्रेमिकांच्या मनात कायम वसंत फुललेला असतो. श्रावणसरीत चिंब भिजायला मन आसुसलेलं असतं. प्रेमाचे सप्तरंग सर्वत्र दिसत असतात.

शिक्षण पूर्ण झालं अन् शैलेश आपल्या घरी निघून गेला. तो दूर उत्तर प्रदेशात, बनारसला राहात असे. एकमेकांना पत्र पाठवायची असं दोघांचं ठरलं होतं. वर्षभर पत्रांची आवकजावक होतीही. पण त्यानंतर त्याची पत्रं येणं बंद झालं. सीमाने किती तरी पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर आलं नाही. त्या काळात मोबाइल किंवा इंटरनेट नव्हतंच. साधे लॅण्ड लाइन फोनही सर्रास नसायचे. हळूहळू सीमानेही पत्रं पाठवणं बंद केलं. आता  शैलेशला विसरणं भाग आहे हे सत्य स्वीकारावंच लागलं.

सीमा सुशिक्षित होती. चांगल्या घराण्यातली होती. तिची विचारसरणी स्वच्छ होती. नातं नेहमी दोन्ही बाजूंनी जोपासलं जातं हे तिला कळत होतं. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपण त्याच्या गळी पडायचं नाही हेही तिला कळत होतं. त्यामुळेच तिने शैलेशला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. हळूहळू तो विस्मरणात गेला. कधी तरी ते नाव ऐकलं तर एक चेहरा अंधुकपणे डोळ्यासमोर तरळून जायचा बस्स! याहून अधिक काहीच नाही.

काळ सतत पुढे सरकत असतो. सीमाचं लग्न झालं. दोन मुलंही झाली. सुनील शिकलेला, मनाचा सज्जन अन् भरपूर कमावणारा होता. पण धंद्यात इतका गुंतलेला की बायकोसाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. सीमाला पैशाला तोटा नव्हता. सुनीलचा जाचही नव्हता. पण ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. बरंच काही असूनही ‘काहीतरी’ मिसिंग आहे असं तिला वाटायचं.

१५ वर्षांनंतर फेसबुकवर शैलेशशी संपर्क झाला अन् सीमाच्या मनात प्रचंड घालमेल झाली. आता पुन्हा नव्याने संबंध कशाला सुरू करायचा या विचाराने तिने रिक्वेस्ट न करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी चार पाच दिवस गेले अन् त्याचा मेसेज आला. भेटण्याची खरोखर इच्छा असली तर नियतीही ती भेट घडवून आणण्यात हातभार लावते. यावेळी तिने मेसेजचं उत्तर दिलं. चार दोन मेसेज झाले तेव्हा तिला कळलं शैलेश पुण्यात स्थायिक झालाय. बायकोमुलांसह राहातोय. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.

मग संवाद सुरू झाला. पहिल्यांदा शैलेशचा आवाज ऐकून ती रोमांचित झाली. तिचा कंठ दाटून आला. त्याच्या ‘तू कशी आहेस?’ या प्रश्नाला तिला उत्तर देणं जमेना.

कशीबशी बोलली, ‘‘मी बरी आहे. तुला अजून आठवण आहे माझी?’’

‘‘म्हणजे काय? मी तुला विसरलोच नव्हतो तर आठवण आहे का या प्रश्नाला काय अर्थ आहे?’’ तिच्या हृदयाची धडधड वाढली. कानशिलं गरम झाली.

‘‘असं जर होतं, तर पत्रं पाठवणं का बंद केलंस?’’

‘‘अगं. तुझं एक पत्र आईच्या हातात पडलं. तिने त्यावरून आकाशपाताळ एक केलं. यापुढे तुला पत्र पाठवणार नाही असं माझ्याकडून वचन घेतलं. मला  स्वत:ची शपथ घातली. मी तिचा एकुलता एक मुलगा ना? मला ऐकावंच लागलं. काय करणार?’’

सीमाला तक्रारीला जागा नव्हती. कारण त्याने ‘तुझ्याशी लग्न करेन, आपण एकत्र राहू’ असं तिला कधीच म्हटलं नव्हतं. तिनेही आपलं प्रेम या शब्दात व्यक्त केलं नव्हतं. तरीही दोघांमध्ये एक अतूट नातं होतं.

चला, बोलण्यामुळे निदान परिस्थिती काय होती ते तर कळलं. बोलली नसती तर अढी मनात राहून गेली असती.

काळानुरूप सगळी सृष्टीच बदलत असते. शरीरात बदल होतात. बुद्धी परिपक्व होते पण मन मात्र तसंच राहातं. प्रत्येक माणसाच्या आत एक लहान मूल दडलेलं असतं. संधी मिळाली की ते कोणत्याही वयात आपलं अस्तित्त्व दाखवायला लागतं.

त्यांच्या गप्पा फोनवर चालायच्या. मर्यादा सांभाळून दोघंही बोलायची. मधल्या इतक्या वर्षांच्या गॅपनंतरही दोघांना जुने दिवस, जुने प्रसंग आठवत होते. गप्पा मारताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळत होता. काही गोष्टी सीमा विसरली होती त्याची आठवण शैलेशने करून दिली. काही गोष्टी शैलेशच्या लक्षात नव्हत्या, त्याची सीमाने त्याला आठवण करून दिली. जुने दिवस आठवताना खूप मजा वाटायची.

मध्येच सीमाला वाटायचं आता आपण विवाहित आहोत. दोन मुलं आहेत. जुन्या, कॉलेजमधल्या मित्राशी असे संबंध ठेवणं गैर तर नाही ना? अजून तिने याबद्दल नवऱ्यालाही सांगितलं नव्हतं. हे असं पुढे किती काळ सुरू राहील?

मनाच्या अशा दोलायमान अवस्थेतच पाचसहा महिने निघून गेले. हे नव्याने निर्माण झालेलं नातं असंच जपलं जावं, ते ओझं ठरू नये असं दोघांनाही वाटत होतं. सुरुवातीला रोमांचक, थ्रीलर वाटणारं संभाषण आता दिलासा देणारं, आधार देणारं ठरलं होतं. ऐकलेली एखादी बातमी एखादा चांगलासा विनोद शेयर केल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटायचं.

एकदा शैलेशने सांगितलं की ऑफिसच्या कामासाठी त्याला लवकरच दिल्लीला जावं लागणार आहे. त्यावेळी तो सीमाला नक्कीच भेटेल. तिच्या नवऱ्याला व मुलांना भेटायलाही त्याला आवडेल.

हे ऐकून सीमा एकदम आनंदली. पण लगेच तिला वाटलं, फोनवर भेटणं, बोलणं इथवर ठीक आहे. पण प्रत्यक्ष भेटणं? भेटावं की न भेटावं? ती थोडी भांबावली. दुसरं मन म्हणालं, भेटायला काय हरकत आहे? आता तुम्ही दोघंही विवाहित आहात. नवथर वय कधीच ओलांडलं आहे. जबाबदारीने वागणं सहज जमायला हवं. चांगले मित्र म्हणून भेटायला काय हरकत आहे?

‘‘सुनीलना काय वाटेल?’’ पहिल्या मनाने शंका काढली.

दुसरं मन म्हणालं, ‘‘काय वाटायचंय? विवाहित स्त्रीला मित्र असू नयेत असं त्यांनी कधीच म्हटलं नाहीए. त्यांना तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर तू स्वत:च्या मानसिक गरजेसाठी शैलेशचा आधार घेतला म्हणून ते रागावणार नाहीत. एकदा शैलेशला भेटून बघ. मग मुलांशी अन् सुनीलशीही त्याची ओळख करून दे.’’

ही गोष्ट सीमाला पटली. ती उत्सुकतेने शैलेशच्या येण्याची वाट बघू लागली.

त्या दिवशी सकाळीच सुनील बिझनेस मीटिंगसाठी कोलकात्याला गेला होता. मुलं शाळेत गेली होती अन् शैलेशचा फोन आला. शैलेशने तिला कनॉट प्लेसच्या एका कॉफी हाउसमध्ये भेटायला बोलावलं होतं. ती घरी एकटी असताना त्याने घरी यावं हे तिलाही जरा विचित्र वाटत होतं. त्यामुळे बाहेर सार्वजनिक ठिकाणी भेटणं एकंदरीतच सोयीचं होतं.

शैलेशला इतक्या वर्षांनंतर भेटताना आपल्याला भावना अनावर होतील का? तो कसा रिअॅक्ट होईल वगैरे मनातल्या शंकांचं प्रत्यक्ष भेटीत निरसन झालं. खूप प्रेमाने त्याने सीमाला रिसीव्ह केलं. एवढ्या वर्षांत तो फारसा बदलला नव्हता. केसांमध्ये थोडी रुपेरी झणक जाणवत होती. पूर्वीसारखाच मोकळेपणाने वागतबोलत होता. तीही मनमोकळी झाली.

कॉलेज सोडल्यापासूनची सर्व माहिती त्याने दिली. त्याची नोकरी, पत्नी, मुलंबाळं…संसारात अन् नोकरीत तो सर्वार्थाने सुखी होता पण तरीही सीमाची त्याच्या मनातली जागा कुणीच घेऊ शकणार नव्हतं.

हे ऐकून सीमाला मनातून खूप बरं वाटलं. स्वत:विषयीच्या गर्वाने मन भरून आलं.

शैलेशने विचारलं, ‘‘तुझं गाणं म्हणणं अजून चालू आहे?’’ दुखऱ्या जखमेला धक्का लागावा तशी मनातल्या मनात सीमा कळवळली. पण वरकरणी सहज बोलावं तसं बोलली, ‘‘छे: रे, मला वेळच मिळत नाहीए. सुनील त्यांच्या धंद्यात बिझी असतात अन् त्यांना गाण्याची फारशी आवडही नाहीए.’’

‘‘त्यांना वेळ नसेल, आवडही नसेल, पण तुला तुझी आवड पूर्ण करू नकोस असं कधी म्हणाले का ते? तुझ्याजवळ पैसा आहे. गाडी, ड्रायव्हर आहे, मुलं अगदी लहान नाहीत, तू तेवढा वेळ सहज काढू शकतेस…’’ शैलेश म्हणाला.

हे शब्द, हे प्रोत्साहन खरं तर सीमाला सुनीलकडून अपेक्षित होतं. त्याने तिच्या गाण्याबद्दल, आवाजाबद्दल कधीच प्रशंसोद्गार काढले नव्हते. पण तिने तरी कधी मोकळेपणाने आपल्या या गुणाविषयी, आवडीनिवडीविषयी त्यांना सांगितलं होतं?

तिने एक नि:श्वास सोडला. मनातच ठरवलं यापुढे आपण गायचं, क्लासला जाऊन अधिक चांगलं शिक्षण घ्यायचं. लोकांपुढे आपली कला मांडायची.

तिला विचारात हरवलेली बघून शैलेश म्हणाला, ‘‘आपला दोघांचा एक अल्बम काढूया. आपल्या मॅच्यूरिटीला साजेशी गाणी निवडू. मित्र म्हणून, सहकारी म्हणून आपण भेटत जाऊ. पुढल्यावेळी मी माझी पत्नी व मुलांनाही आणेल. तुझा नवरा व मुलंही असतील, कौटुंबिक पातळीवरची मैत्री या वयाला अधिक भावते. आपण फोनवर बोलतो तेव्हा या बाबतीत अधिक चर्चा करू.’’

सीमाला शैलेशच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं, आत्तापर्यंत तिच्या मनात रिक्त असलेली ‘चांगल्या मित्राची’ जागा शैलेशने घेतली होती. जगण्याला एक चांगला उद्देश, एक नवी दिशा मिळाली होती.

निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा सीमाने मोकळ्या मनाने शेकहॅण्ड केला. ‘गाणं सुरू करते’ म्हणून खात्री दिली. शैलेशच्या मनात तिची खास जागा आहे ही भावना सुखावणारी होतीच. त्यामुळे आता तो दूर असला तरी त्यांच्यात दुरावा नव्हता.

अल्लड वयातली प्रेमभावना आता नव्हती. त्यावेळी ते प्रेम अव्यक्त होतं. पण आज व्यक्त झालेली मित्रत्त्वाची भावना अधिक बोलकी आणि अर्थपूर्ण होती. हे नातं अभिमानाने मिरवण्याचं होतं. आपुलकीने जपायचं होतं. हे नातं मित्रत्त्वाचं होतं. मैत्रीचं होतं.

प्रिय दादा

कथा * कुसुम आठले

श्रावणाचा महिना. दुपारचे तीन वाजलेले. पाऊस पडत असल्यामुळे हवेत सुखद गारवा होता, पण बाजारात वर्दळ नव्हती. सायबर कॅफेत काम करणारे तीन तरूण चहाचे घुटके घेत गप्पा मारत होते. आतल्या एक दोन केबिनमध्ये मुलं व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होती. दोन किशोरवयीन मुलं दुपारच्या निवांतपणाचा फायदा घेत मनाजोगत्या साईट उघडून बसली होती.

तेवढ्यात एका स्त्रीनं तिथं प्रवेश केला. तरूण तिला बघून दचकले, कारण खूपच दिवसांनी दुपारच्या वेळात कुणी स्त्री त्यांच्या कॅफेत आली होती. त्यांनी घाईघाईनं चहा संपवून आपापल्या विभागाकडे धाव घेतली.

स्त्री चांगल्या घराण्यातली दिसत होती. राहणी अन् चालण्यातून सुसंस्कृतपणा जाणवत होता. शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास हालचालींमधून कळत होता. तिनं छत्री मिटून तिथल्याच एका बादलीत पाणी निथळण्यासाठी ठेवली. केस नीट केले, मग काउंटरवर बसलेल्या मुलाला म्हणाली, ‘‘मला एक पत्र टाइप करून घ्यायचं आहे…मी केलं असतं, पण मला मराठी टायपिंग येत नाही…’’

‘‘तुम्ही मजकूर सांगाल की…’’

‘‘होय, मी बोलते, तू टाइप कर. शुद्धलेखन चांगलं आहे ना? करू शकशील नं?’’

मुलगा किंचित बावरला, पण म्हणाला, ‘‘करतो की!’’

ती बोलायला लागली, ‘‘प्रिय दादा, माझ्याकडून ही शेवटची राखी तुला पाठवते आहे, कारण यापुढे तुला राखी पाठवणं मला जमणार नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीए, कारण तो हक्क तू फार पूर्वीच गमावला आहेस.’’

ती काही क्षण थांबली. तिचा चेहरा लाल झाला होता. ‘‘पाणी मिळेल का प्यायला?’’ तिनं विचारलं.

‘‘हो, देतो,’’ म्हणत त्या तरूणानं तिला पाण्याची बाटली दिली. बाई पुढे काय सांगते आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याला यात काही तरी गुढ आहे असं वाटू लागलं होतं.

ती पाणी प्यायली, चेहऱ्यावरून रूमाल फिरवला अन् ती मजकूर सांगू लागली, ‘‘किती सुखी कुटुंब होतं आपलं. आपण पाच बहीणभाऊ, तू सर्वात मोठा अन् सुरूवातीपासून आईचा फारच लाडका. बाबांची साधीशी नोकरी होती, पण तुला शिकायला शहरात पाठवलं. बाबांची अजिबात इच्छा नव्हती. पण बाबांच्या इच्छेविरूद्ध जाऊन आईनं तुझी इच्छा पूर्ण केली. त्यासाठी तिनं दोन दिवस उपोषण केलं होतं हे तू ही विसरला नसशील. तुला मेडिकल कॉलेजात अॅडमिशन मिळाली, तेव्हा मी ओरडून ओरडून मैत्रिणींना बातमी दिली होती. त्यांना माझा हेवा वाटला होता. एकीनं तर मुद्दाम म्हटलं होतं, ‘‘तुलाच मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखी नाचते आहेस.’’ मी ही आढ्यतेनं म्हटलं होतं, ‘‘दादा असो की मी, काय फरक पडतोय? आम्ही एकाच आईची मुलं आहोत. आमच्या शरीरात रक्त तेच वाहतंय…’’ दादा मी चुकीचं बोलले होते का?

‘‘तू होस्टेलला राहत होतास, जेव्हा घरी यायचास, मी अन् आई सोनेरी स्वप्नांत दंग होत असू. आई स्वप्नं बघायची, तुझं छानसं क्लिनिक आहे. प्रसन्न चेहऱ्यानं, प्रेमळ हसू चेहऱ्यावर घेऊन तू पेशंट तपासतो आहेस, पेशंटची रांग संपता संपत नाहीए. जाताना प्रत्येक पेशंट आदरानं नमस्कार करतो. पैसे देतो व तुझा ड्रॉवर पैशानं ओसंडून वाहतो…ते सगळे पैसे आणून तू आईच्या पदरात ओततोस…आईचा चेहरा आनंदानं, कृतार्थतेनं डवरून येतो…तू आईशी असंच बोलायचा म्हणून ती स्वप्नं बघायची.

‘‘मी स्वप्नं बघायची की मी नववधूच्या वेषात उभी आहे. देखणा, संपन्न घरातला, भरपूर पगाराची नोकरी असणारा माझा नवरा शेजारी उभा आहे. माझ्या पाठवणीसाठी आणलेल्या कारला तू फुलांनी सजवतो आहेस. मला कारमध्ये बसवताना आपण एकमेकांना मिठी मारून रडतो आहेत…

‘‘बाबा व्यवहारी होते. ते आम्हाला अशा स्वप्नातून जागं करायला बघायचे पण आम्हा मायलेकींची झोपेतून जागं व्हायची इच्छाच नसायची. तुझ्या गोड गोड बोलण्यानं तू आम्हाला झुलवत, भुलवत होतास.

‘‘इतर दोघी बहिणी अन् एक भाऊ अजून शिकत होते. पण आईला तुझ्या लग्नाची स्वप्नं पडू लागली होती. सुंदर, शालीन, नम्र सून तिला घरात वावरताना दिसायची. सासू म्हणून मिरवताना तिचा चेहरा अभिमानांनं फुलून यायचा. सुनेच्या माहेराहून मिळालेल्या भेटवस्तूंनी आमचं कायम अभावानं ग्रस्त घर भरून गेलेलं दिसायचं.

‘‘तू होस्टेलहून घरी यायचास, आई किती किती पदार्थ बनवून तुला खायला घालायची. बरोबर डबेही भरून द्यायची. हे सगळं करताना तिला कुठून, कशी शक्ती मिळायची मला कळत नसे. एरवी ती सदैव डोकेदुखीनं वैतागलेली असायची.

‘‘आमची स्वप्नं पूर्ण होऊ घातली होती. तुला डिग्री मिळाली होती. होस्टेलचं सामान आवरून तू घरी यायला निघाला असतानाच तुला लग्नाचा एक प्रस्ताव आला. तुझी वर्गमैत्रीण…तिच्या वडिलांनी तुला बरोबर हेरला होता. तू आईला ही बातमी सांगितलीस अन् आईला खूप आनंद झाला. डॉक्टर सून घरी येणार म्हणजे घरात दुप्पट पैसा येणार हा तिचा भाबडा समज. आई स्वत:च्या भाग्यावर बेहद्द खुष होती. सगळ्या आळीत घरोघरी जाऊन सांगून आली, ‘‘येणारी सूनही डॉक्टर आहे.’’ मी मात्र उगीचच शंकित होते.

‘‘तुझं लग्नं झालं अन् घरात उरले मी…माझ्या लग्नाची काळजी आईला होती.

आईनं तुला विश्वासात घेऊन सांगितलं, ‘‘हे बघ, छोटीसाठी मी थोडे फार दागिने केले आहेत…काही पैसेही साठवून ठेवले आहेत. तू छोटीसाठी छानसा नवरा शोध…तू इथंच राहतो आहेस म्हटल्यावर बाकीची सोय तू बघशीलच!! भाऊ भावजय डॉक्टर आहेत म्हटल्यावर चांगलं स्थळ मिळेलच.’’

‘‘सगळं बरं चाललंय म्हणतोय तोवर एक दिवस वहिनीनं घरात फर्मान काढलं.

‘‘या गावात क्लिनिक काढून फायदा नाही. क्लिनिकसाठी अद्ययावत यंत्रं लागतात. ती घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही. त्यापेक्षा नोकरी चांगली. माझ्या वडिलांनी आमच्या दोघांसाठी चांगली नोकरी बघितली आहे…आम्ही तिकडेच जातो.’’

‘‘अन् तुम्ही दोघं निघून गेलात. त्यानंतर जेव्हा जेव्हा तू यायचास तेव्हा तुझ्याबरोबर वहिनीनं केलेल्या मागण्यांची अन् आपल्या घराबद्दलच्या असंख्य तक्रारींची यादी असायची. बाबांकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं बळ नव्हतं. इतर तीन भावंडांची काळजी होती. त्यांची शिक्षणं, त्यांची लग्नं…वहिनीचा तोरा, तुझा मिंधेपणा, आईची झालेली निराशा हे सगळं बघून त्यांनी आपापली शिक्षणं पटापट आटोपती घेतली. दोघी ताईंनी सामान्य परिस्थितीतल्या बऱ्यापैकी मुलांशी लग्न करून गरीबीचेच संसार थाटले. रमेश भाऊनं एक छोटीशी नोकरी शोधून घरखर्चाला हातभार लावायचा प्रयत्न केला…दादा, त्या काळात तुझ्या चेहऱ्यावर असहायता अन् काळजीचा संगम मी बघत होते. तुझा हसरा आनंदी स्वभाव पार बदलला होता. तू कायम चिडचिडा अन् तणांवात असायचास.

वहिनीच्या मते तिची सासू गावंढळ, बावळट होती, सासरे हुकुमशहा होते अन् धाकटी नणंद म्हणजे मी त्यांच्यावरचं एक ओझं होते. तुला वाटायचं आईनं वहिनीला समजून घ्यावं. आईत तेवढं बळंच नव्हतं. ती पार कोलमडली होती. समजून घेण्याची जबाबदारी खरं तर वहिनीची होती, पण तिच्यात तो गुणच नव्हता. तू ही आम्हाला वहिनीच्या दृष्टीनंच बघायला लागला होतास…काही अंशी तुझा नाइलाज होता, काही अंशी स्वार्थ…एक दिवस तू ही सांगून टाकलंस की मला एकच काहीतरी निवडायला लागेल.

‘‘आईनं इथंही तिचं प्रेम उधळून दिलं. तू तुझ्या संसारात सुखी रहावंस म्हणून तुला आमच्यापासून कायमचं मुक्त केलं.

‘‘त्यानंतर क्वचितच तू घरी यायचास, एखाद्या परक्या माणसासारखा पण हक्कानं पाहुणचार वसूल करून निघून जायचास. बाबांनी माझ्याकरता स्थळ शोधलं, लग्नही करून दिलं. पण मनांतून मला वाटायचं, तू असतास तर नक्कीच माझ्यासाठी याहून चांगलं स्थळ शोधलं असतंस. मी तुझी किती वाट बघत होते. पण तू अगदी शेवटच्या क्षणी आलास. बाबांनी अन् गरीबीत संसार करणाऱ्या माझ्या बहीण भावानं जमलं तसं माझं लग्न करून दिलं.

‘‘मी सासरी गेल्यावर आई अजूनच एकटी झाली. मी कधी माहेरी गेले तर तिच्या भकास डोळ्यात फक्त तूच दिसायचा. ती म्हणायची, ‘‘दादाला फोन कर गं! कसा आहे, ते विचार, घरी का येत नाही ते विचार, एकदा तरी घरी येऊन जा. घरी येणं बंदच केलंय…’’ ती रडायला लागे. बाबा पुरूष होते. त्यांना रडता येत नव्हतं. पण दु:ख त्यांच्याही चेहऱ्यावर दिसायचं. आईकडे सगळं असूनही काहीच नव्हतं, कारण तिचा लाडका मुलगा रागावून निघून गेला होता. ती मलाच विचारायची, ‘‘माझं काय चुकलं गं? दादाला शिकायला बाहेर पाठवलं हे चुकलं की डॉक्टर सून केली, हे चुकलं?’’ खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं.

‘‘वडिलांनी दादाची आशा सोडली होती. पण आईची माया चिवट होती. बाबांना चोरून, लपवून ती दादाला पत्र लिहित असे. शेजारपाजारच्या मुलांकरवी ते पोस्टात पडेल असं बघायची. पाच सात पत्रानंतर वहिनीचं खडसावल्यासारखं पत्र यायचं, ‘‘बंद करा हे सगळं. आम्हाला सुखानं जगू द्या. किती छळणार आहात?’’

‘‘आई शेवटच्या घटका मोजत होती. पण दादा, तू आला नाहीस. तुला भेटायची आस मनी बाळगून, तुझं नाव घेत आईनं प्राण सोडला. तुला कळवल्यावर तू आलास पण तिचं क्रियाकर्म झाल्यावर…कदाचित आईचं क्रियाकर्म करण्याचा हक्क आपण गमावला आहे, हे तुला समजलं होतं.

‘‘आई तुझं नाव जपत मरून गेली. तुझी वाट बघत होती. पण मरतानाही तुझा वाटा माझ्याजवळ देऊन गेली. कारण ती आई होती. मी ही ते नाकारलं नाही, ठेवून घेतलं तुझ्यासाठी, कारण मी बहीण होते. पण दादा, तू मुलगा म्हणून कमी पडलास.

‘‘दादा, स्वार्थ माणसाला इतकं आंधळं करतो की सगळी नातीच विसरून जावीत? तू असा कधीच नव्हतास. सगळा दोष वहिनीला देऊ नकोस, प्रत्येक गोष्ट तिच्या इच्छेनं करताना एखादी तर गोष्ट स्वत:च्या इच्छेनं करण्याचं धाडस तू का दाखवू शकला नाहीस? तुला जर नात्याची किंमतच नाहीए तर माझी राखी न मिळाल्यामुळे तू विचलित का होतोस? मला कुणी तरी तुझा निरोप पोहोचवतो की यंदा तुला राखी मिळाली नाही…

‘‘दादा, राखी पाठवणं अन् ती मिळणं, एवढ्यातच राखीचा सण समावला आहे का? त्यासाठी जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते. आज पंचवीस वर्षांत तुझी माझी गाठभेट नाही, तू माझ्याकडे आला नाहीस, मला कधी बोलावलं नाहीस, एवढ्या वर्षांत फक्त माझ्याकडून पाठवली जाणारी राखीच एखाद्या नाजूक तंतूसारखी जीव तगवून होती. पण आता तो धागाही तुटणार आहे. कारण राखी पाठवण्याची माझी इच्छाशक्ती आणि राखीवरचा माझा विश्वासही मोडीत निघाला आहे.

‘‘दादा, मला एकच सांग, घरात आम्ही तिघी बहिणी नसतो तर तू आईबाबांना टाकून गेला असतास? बहिणींची जबाबदारी हेच तुझ्या निघून जाण्याचं कारण होतं ना? अरे, पण आमच्या तुझ्याकडून खरोखरंच काही अपेक्षा नव्हत्या रे! तू एकदाच, फक्त एकदाच आमच्याशी बोलून तुझा प्रॉब्लेम, तुझी चिंता, तुझं दु:ख सांगायचं होतंस…काही तरी उपाय शोधता आला असता. ठीक आहे. आता जर तुला जमलंच तर माझी ही राखी माझी शेवटची आठवण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव. तुझ्या हृदयात नसली तरी तुझ्या भल्या मोठ्या बंगल्यात तिच्यापुरेशी जागा नक्कीच असेल.’’

मजकूर सांगता सांगता ती स्त्री दु:खी आणि भावनाविवश होऊन थरथरंत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र आले नाहीत. कदाचित तिचे अश्रू आटले असतील, मजकूर लिहून घेणाऱ्याचे डोळे मात्र पाणावले होते.

काम पूर्ण झालं होतं. त्या स्त्रीनं तरूणाला म्हटलं, ‘‘याची एक कॉपी काढून मला दे, ती मी माझ्या दादाला पाठवेन, तुला सांगते, पंचवीस वर्षांनंतर प्रथमच मी हे सर्व लिहिण्याचं धाडस केलंय. इतकी वर्ष मी फक्त सर्वात धाकटी बहीण म्हणूनच जगले.

‘‘एक काम तू आणखी कर. हे माझं पत्र, माझा संदेश, इंटरनेटवरून अशा ब्लॉगवर जाऊ देत ज्यामुळे जास्तीत जास्त लोक तो वाचतील. जगात माझ्या दादासारखे अजूनही काही भाऊ असतील, ज्यांच्याकडून अशी चूक घडली असेल, निदान त्यांना ती चूक सुधारण्याची संधी मिळेल. हा संदेश माझ्या आईला अंतिम श्रद्धांजली म्हणून देते आहे. ती बिचारी मुलाच्या भेटीची आस अन् तो न येण्याचं दु:ख उराशी कवटाळून मरून गेली. तिच्या आत्म्याला निदान यामुळे शांती लाभेल.’’

स्वल्पविराम

 * डॉ. विलास जोशी

लग्नाला दहा वर्षं होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का? पतिपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं? अर्थात् हे सर्वच विवाहित स्त्रीपुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे? या क्षणी तरी स्वराला असंच वाटतंय.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं होऊ घातलीत. आठ वर्षांचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे. आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही. घरात आधुनिकपणा अन् संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात. शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची. नंतर तिने जॉब सोडला. आता शिव बऱ्यापैकी मोठा झालाय अन् स्वराचा वेळ शॉपिंग, गॉसिप्स असल्या गोष्टीत जातोय.

आजही बराच वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळाकडे बघितलं. शिवला यायला अजून वेळ होता. आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच. बसूनबसून कंटाळली तेव्हा स्वयंपाक्याला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन गाडी घेऊन ती घराबाहेर पडली.

मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकांकडे होतं. किती तरी जोडपी एकत्र फिरत होती. खरेदी करत होती. आलोक आणि ती अशी एकत्र फिरून किती तरी वर्षं उलटली होती. हल्ली तर आलोकला रोमँटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो. अन् फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो. प्रेमही त्याचं यांत्रिकपणे उरकतो. त्याचा दिवस, म्हणजे रात्रही ठरलेली असते सॅटरडे नाइट. आता तर तिला आलोक रात्री जवळ आला तरी मळमळायला लागतं. ती टाळायलाच बघते. कधी जमतं, कधी आलोकची सरशी होते. तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का? प्रेम तर उन्माद असतो. वादळासारखं ते घोंघावतं, शरीर, मनाचा ताबा घेतं, सुखाची लयलूट करून शांत होतं…पण हे आलोकला कुणी समजवायचं? तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे करतो. पूर्वी असं नव्हतं. पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का?

‘‘एक्सक्यूज मी, मॅडम, एक फॉर्म भरून द्याल का?’’ एक तरुण तिच्या जवळ येऊन अदबीने म्हणाला, तशी ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.

‘‘काय आहे? कसला फॉर्म?’’

‘‘ही आमच्या कंपनीची स्पेशल स्कीम आहे. या फॉर्ममधून दोन फॉर्म्सची निवड होईल अन् लकी विजेत्यांना गोव्याची तीन रात्री चार दिवसांची सहल फुकट मिळेल.’’

‘‘आता नको, मला वेळ नाही,’’ स्वरा त्याला टाळायला बघत होती.

‘‘पण मला वेळ आहे. भरपूर वेळ आहे.’’ कुणीतरी मध्येच बोललं. स्वरा अन् तो मुलगा दोघंही दचकली.

‘अरेच्चा? हा तर किशोर…’ तिच्याबरोबर कॉलेजात होता. त्यावेळी बावळा वाटणारा हा किशोर आता कसला स्मार्ट अन् डॅशिंग वाटतोय. तिला एकदम हसू आलं. तिने त्या मुलाचा नंबर घेऊन त्याला वाटेला लावलं अन् ती किशोरशी बोलत मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. गप्पांमध्ये वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. तेवढ्या वेळात तिला शिवचीही आठवण आली नाही. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

घरी आली तरी डोक्यातून किशोरचा विचार जाईना. किती जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या. किशोर सतत तिच्या गुणांचं, तिच्या रूपाचं कौतुक करत होता. फार दिवसांनी असं स्वत:चं कौतुक ऐकून तीही मोहरली होती.

रात्री जेवण आटोपून झोपायला जात होती तेवढ्यात फोन वाजला. फोन किशोरचा होता. एक क्षण मनात आलं की त्याला दटावून म्हणावं अवेळी फोन करत जाऊ नकोस म्हणून, पण तसं म्हणू शकली नाही अन् मग त्यांच्या गप्पा रात्री एकपर्यंत चालू होत्या.

अन् मग हे रोजचंच झालं. ती दोघं भेटायची किंवा तासन्तास फोनवर गप्पा मारायची. स्वरा हल्ली खुषीत होती. आयुष्यातला हरवलेला आनंद तिला पुन्हा गवसला होता. त्यांच्या गप्पांमध्ये विविध विषय असायचे. कॉलेजच्या जुन्या आठवणींपासून, हल्लीची राजकीय परिस्थिती ते शिक्षणाचा झालेला बाजार. किशोर हिरिरीने मतं मांडायचा. तिला ते आवडायचं. आलोकशी हल्ली असा संवादच घडत नव्हता. तिच्या मनात यायचं, आलोकपेक्षा हा किती वेगळा आहे. आलोकच्या संवेदनाच हल्ली बोथट झाल्या आहेत. किशोर किती संवेदनशील आहे? तिच्या नकळत ती किशोरकडे ओढली गेली होती.

एक दिवस अचानक किशोरने फोन करून स्वराला मॉलमध्ये बोलावून घेतलं. ती तिथे पोहोचली तेव्हा तो म्हणाला, ‘‘स्वरा, मी एक महिन्यासाठी कंपनीच्या कामाने न्यू जर्सीला जातोय…उद्याच निघायचंय…’’

‘‘इतके दिवस?’’

‘‘हो, एवढे दिवस लागणारच! खरं तर जायची अजिबात इच्छा नाहीए पण बिझनेस म्हटला की जबाबदाऱ्याही आल्याच.’’

‘‘नाही रे, तसं नाही, तुला जायलाच हवंय, तू जा. आपण फोनवर बोलूयात.’’

‘‘स्वरा-’’

‘‘बोल ना,’’

‘‘माझ्या मनात एक गोष्ट आहे.’’

‘‘काय?’’

‘‘जाण्यापूर्वी तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचाय.’’

‘‘तेच तर करतोय आपण…’’

‘‘असं नाही. मला तुला एकांतात भेटायचंय…मी काय म्हणतोय, लक्षात आलंय तुझ्या?’’

थोडा विचार करून स्वराने म्हटलं, ‘‘कुठे जाऊयात?’’

‘‘कोणताही प्रश्न विचारू नकोस, फक्त माझ्याबरोबर चल…माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘चल, जाऊयात.’’

किशोरने गाडी एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली.

स्वराला काहीतरी खटकत होतं…‘‘आपण कुठे आलोय?’’?शंकित सुरात तिने विचारलं.

‘‘स्वरा, मला जे काही बोलायचंय ते शांतपणे, एकांतातच बोलायचंय…’’

स्वरा मुकाट्याने गाडीतून उतरली अन् किशोरबरोबर चालू लागली. आलोकला लग्नाआधी ती भेटायची त्यावेळी जशी रोमांचित व्हायची तसं काहीसं तिला वाटत होतं. पण ती ऊर्मी नैसर्गिक होती. त्यात चोरटेपणाची भावना नसायची. आज काही तरी चुकतंय असं वाटत होतं.

रूम उघडून आत जात किशोरने म्हटलं, ‘‘स्वरा, ये ना, आत ये…तू अशी अस्वस्थ का? माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘आहे रे बाबा, पुन:पुन्हा का विचारतो आहेस? विश्वास नसता तर इथवर आले असते का?’’

स्वराच्या हाताला धरून किशोरने तिला सोफ्यावर बसवलं. स्वत: तिच्या पायाशी बसला.

‘‘हे काय? खाली का बसलास?’’

‘‘मला जे सांगायचंय ते इथेच बसून, तुझ्या डोळ्यांत डोळे घालून सांगायचं आहे.’’

‘‘असं काय सांगायचंय?’’

‘‘स्वरा, तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य फार नीरस होतं. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस…बायको सतत भिशी, किटी पार्टी, शॉपिंग यातच मग्न…फक्त दोन मुलांसाठी जगत होतो. पण अचानक तू भेटलीस अन् आयुष्यच बदललं…जग सुंदर वाटायला लागलं. माझ्या लक्षात आलं की आपण दोघंही समदु:खी आहोत. नीरस आयुष्याच्या तुरुंगातले कैदी म्हणून जगतो आहोत. आपण एकमेकांचे होऊयात…सुंदर आयुष्य जगूयात…माझी होशील तू?’’ तो तिच्या एकदम जवळ आला. तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते.

कधी तरी हा क्षण येईल असं स्वरालाही कुठे तरी जाणवलं होतं. त्या क्षणाच्या वेळी ती मोहरेल, रोमांचित होईल असंही तिला वाटलं होतं. वैवाहिक आयुष्यातला कंटाळवाणेपणा, नीरसपणा, मरगळ निघून जाईल असं वाटलं होतं…पण प्रत्यक्षात मात्र तिला किशोरचं जवळ येणं अजिबात आवडलं नाही. त्या क्षणी तिला जाणवलं की मनातून ती कायम आलोकच्याच जवळ आहे. तेवढी जवळीक दुसऱ्या कुणाला शक्यच नाही. फक्त तिला या क्षणी झालेली जाणीव किंवा साक्षात्कार आलोकलाही करून द्यायला हवाय. किशोर मित्रच राहू दे. आलोकची जागा तो कधीच घेऊ शकणार नाही. ती जागा दुसऱ्या कुणाची असूच शकत नाही…ती झटक्यात उठून उभी राहिली.

‘‘काय झालं, स्वरा? काही चुकलं का?’’

‘‘नाही किशोर, चूक नाही…तुझ्यामुळे मला कळलं की आलोकवर माझं किती प्रेम आहे. आम्ही एकमेकांचेच आहोत. आमच्या वैवाहिक आयुष्यात एक स्वल्पविराम आला होता, मी वेडी त्याला पूर्णविराम समजले होते. पण आता गैरसमज दूर झालाय. तो स्वल्पविराम मी प्रयत्नपूर्वक दूर करेन आणि माझा गैरसमज दूर करण्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! प्रिय मित्रा, लेट अस बी फ्रेण्ड्स अॅण्ड फ्रेण्ड्स ओन्ली…’’

स्तंभित झालेल्या किशोरला तिथेच सोडून स्वरा हॉटेलबाहेर आली. पहिला फोन तिने टूर बुकिंग ऑफिसला करून गोव्याची टूर बुक केली. आईला फोन करून शिवला तिच्याकडे ठेवणार असल्याचं सांगितलं अन् तिसरा फोन आलोकला करून ती दोघं गोव्याला जाणार आहेत, रजा टाक असं सांगितलं.

एक होती इवा

कथा * पूनम साने

फ्रांसचा बीच टाऊन नीस फ्रेंच रिवेरियाची राजधानी आहे. तिथं उत्तम संग्रहालयं आहेत, सुंदर चर्चेस आहेत, रशियन ऑर्थोडॉक्स कैथिड्रल आहे, तिथूनच जवळ असलेल्या हॉटेल नीग्रेस्कोच्या कॅफेटेरियात बसून इवा आणि जावेद कॉफी पित होते. इवाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आलेली होती, ‘‘जावेद,’’ ती कातर आवाजात म्हणाली, ‘‘मला वचन दे, तू कोणतंही वाईट काम करणार नाहीस.’’

‘‘इवा मी फार त्रस्त आहे गं! माझ्या हृदयात एक आग भडकलेली असते. इथं मी फार अपमान सहन केलाय. मी जणू तुच्छ वस्तू आहे असं मला इथले लोक वागवतात. छे, मी कंटाळलोय या छळाला. आता मी फार पुढे गेलो आहे या वाटेवर…मला परत फिरता येणार नाही.’’

‘‘नाही जावेद, मी तुझ्याखेरीज राहू शकत नाही हे तुला ठाऊक आहे, तू पकडला गेलास तर काय होईल, कल्पना तरी आहे का? गोळ्या घालून ठार मारतील तुला…’’

‘‘चालेल मला. पण हे लोक माझा अपमान करतात ते मला सहन होत नाही.’’

इवानं त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहण्याची सोनेरी भविष्याची स्वप्नं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, किती किती गोष्टी ती सांगत होती, पण जावेद अतिरेकी मित्रांच्या सहवासात कट्टर अतिरेकी झालेला होता.

घड्याळ बघत जावेदनं म्हटलं, ‘‘इवा, मला एक महत्त्वाची मिटिंग आहे. प्रथमच मला काही काम देताहेत ते लोक, त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरायला हवं. सायंकाळी वेळ मिळाला तर भेटतो. औरवोर (बाय) बोलून जावेदनं तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले अन् तो निघून गेला.’’

एक नि:श्वास सोडून इवा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंमुळे तिचे सुंदर डोळे झाकोळून गेले.

हॉटेल नीग्रेस्कोमध्ये इवा हॉस्पिटलिटी इंचार्ज होती. खरं तर तिने ड्यूटीवर जायला हवं होतं. पण जावेदच्या बोलण्यामुळे ती फार दु:खी झाली होती. तिनं मैत्रिणीला थोडा वेळ चार्ज घ्यायला सांगितला अन् ती थोडा वेळ बाहेर आली. आत तिचा जीव गुदमरत होता. फॉर्मुला वनचा एक खूपच छान सर्किट नीस आहे. हॉटेलच्या अगदी मागेच, त्या वाटेनं ती बीचवर पोहोचली. क्वेदे एतादयूनीस     बीचवर एका कोपऱ्यात बसून ती तिथं खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली. मुलं आपल्याच नादात मजेत खेळत होती. कुणी वाळूत किल्ले बनवत होती, कुणी फुग्यांमागे धावत होती.

इवा जावेदचाच विचार करत होती. तिला तिची व जावेदची पहिली भेट आठवली.

दोन वर्षांपूर्वी ती एलियांज रिवेरिया स्टेडिअममध्ये फुटबॉलची मॅच बघायला गेली असताना जावेद भेटला. दोघं जवळ जवळ बसली होती. दोघंही लिव्हरपूल टीमचे फॅन होते. दोघंही त्याच टिमला चिअर करत होती. टीमनं केलेल्या प्रत्येक गोलवर दोघंही जल्लोष करत होती. दोघांची नजरानजर झाली की दोघंही हसत होती अन् जेव्हा त्यांचा संघ जिंकला तेव्हा आनंदातिरेकानं त्यांनी एकमेकांना मिठीच मारली. आपण उत्साहाच्या भरात हे काय केलं या विचारानं दोघांना नंतर खूपच हसायलाही आलं. मग त्यांची मैत्रीच झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही वाटलं की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत.

जावेद बांगलादेशातून एमबीए करण्यासाठी आला होता. फुटबॉल म्हणजे त्याला जीव की प्राण. बरेचदा तो इवाला म्हणायचासुद्धा. ‘‘मी खरं तर इथं अभ्यासासाठी नाहीच आलो…मला फुटबॉल मॅच बघायला इथं पाठवलंय.’’

तो आपल्या शाळेत आणि कॉलेजातही फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. अभ्यासात हुशार, वागायला सज्जन, सभ्य अन् व्यक्तिमत्त्व आकर्षक. त्यामुळे इवाला तो मनापासून आवडला होता. जावेदच्या एमबीएनंतर त्याला नोकरी मिळाली की दोघं लग्न करणार होती.

जावेदनं तिला सांगितलं होतं की त्याचे कुंटुंबीय अत्यंत कट्टर मुसलमान आहेत. फ्रेंच मुलगी त्यांच्या घरातली सून होऊ शकणार नाही. पण इवाच्या प्रेमाखातर तो कुटुंबियांना सोडायलाही तयार होता.

हे ऐकून इवानं त्याला मिठीच मारली. ती दोघं आता मनानं जवळ आलीच होती, पण त्यांच्यात शारीरिक जवळीकही निर्माण झाली होती. फ्रेंचच्या क्लासला जाऊन जावेद उत्तम फ्रेंच बोलायला लागला होता. इवाही त्याच्याकडून हिंदीचे धडे घेत होती. प्रेम खरं कोणतीच भाषा, देश, धर्म, रंग मानत नाही. प्रेम होतं तेव्हा फक्त प्रेमच होतं. नाहीतर काहीच होत नाही. एकमेकांची भाषा, संस्कार शिकून घेत त्यांचं प्रेम उंच उंच जात होतं. पण जावेदमध्ये होणारा बदल इवाला खुपत होता. तिला वाटणारी काळजी ती कुणाजवळ बोलूनही दाखवू शकत नव्हती. तशीही एकटी अनाथ होती. मैत्रिणीजवळ तिला हे बोलता येत नव्हतं.

कॉलेजात बरेचदा रेसिझमचा वाईट अनुभव घेतल्यानंतर जावेदच्या मनात सूडाची भावना मूळ धरू लागली होती. इवा त्याची समजूत घालायची पण जावेदला तिचं बोलणं मानवत नव्हतं. खरं तर तो एक साधारण मुलगा होता. काहीतरी बनून दाखवण्यासाठी तो इथं आला होता. आपल्या उज्ज्वळ भविष्याची स्वप्नं आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी होत्या. मग जातीवादाच्या एक दोन घटनांमुळे तो खूपच दुखावला गेला होता. कॉलेजचे कोच मिस्टर मार्टिन नेहमीच जावेदच्या खेळाचं खूप कौतुक करायचे पण कॉलेजच्या टीमची घोषणा झाली तेव्हा जावेदचं नाव कुठेच नव्हतं. त्यानं याचं कारण विचारलं तेव्हा मुलांनी    उत्तर दिलं, ‘‘तू आमच्याबरोबर, आमच्या टीममध्ये खेळण्याचं स्वप्न बघू कसा शकतोस?’’

यावर इतर मुलं फिस्सकन हसली होती अन् जावेद खूप दुखावला गेला होता. त्यानंतरही खूप वेळा कॉलेजच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यानं त्याचं मत सांगितलं तर विद्यार्थी त्याची चेष्टा करायचे. ‘‘आता बांगलादेशी स्टूडंट आम्हाला शिकवणार, त्यांची मतं आम्ही ऐकून घ्यायची.’’

हळूहळू तो रेसिझमचा बळी ठरला होता. आता तो फेसबुकवर सिरियस स्टेटस टाकायचा. ‘लाइफ इज नॉट ईझी’ किंवा ‘तुमची ओळख इथं गुणांवरून नाही तर जातीवरून ठरते’ ‘आय एम टायर्ड’ या आणि अशाच तऱ्हेच्या स्टेटसवरून अगदी स्पष्ट कळत होतं की त्याच्या हृदयात दु:खाचा लाव्हा असून तो बंडखोरी करायला बघतो आहे.

त्याचे हे स्टेटस वाचूनच काही लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता. हळूहळू तो अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकला. दहशतीच्या त्या जगात तो खोल खोल जात होता. आता परतीचा मार्ग बंद झाला होता.

इवाला हे सगळं जाणवत होतं, कळत होतं तिला. हल्ली भीती वाटायला लागली होती. तिनं एक दिवस जावेदला म्हटलं, ‘‘जावेद, मला फक्त तू हवा आहेस. तुझ्या सोबतीनं आयुष्य काढायचं आहे. तू इथं कफर्टे्रबल नसशील तर आपण तुझ्या देशात, तुझ्या गावी जाऊन राहू. मी करीन तुझ्या कुटुंबाशी एडजस्ट. पण तू मला सोडून जाऊ नकोस.’’

‘‘नाही इवा, माझे कुटुंबीय तुला स्वीकारणार नाहीत. तू दु:खी होशील, मी तुला दु:खी बघू शकत नाही. मला आता इथंच आवडतंय.’’

‘‘पण जावेद, इथं तू भरकटला आहेस. तू चुकीचा मार्ग धरला आहेस, त्यामुळे मी दु:खीच आहे.’’

‘‘हा मार्ग चुकीचा नाहीए. हे लोक माझ्या जातीचा उल्लेख करून माझा अपमान करत नाहीत. त्यांच्यासाठी काही केलं तर तो माझा बहुमान ठरेल.’’

‘‘नाही रे जावेद, या वाटेनं गेल्यास तुला काहीही मिळणार नाही. आपण संपून जाऊ. अरे, अजून आपलं आयुष्य सुरू होतंय. अजून आपल्याला संसार करायचाय, घर मांडायचं आहे. अजून किती तरी मॅचेस एकत्र बघायच्या आहेत. आयुष्य जगलोच कुठंय अजून? खूप काही करायचंय…’’

पण जावेदचा ब्रेनवॉश झाल्यामुळे इवाचं कोणतंच बोलणं त्याला त्याच्या मार्गावरून माघारी घेऊन येऊ शकत नव्हतं. आता त्याला एकच गोष्ट कळत होती, दहशतवाद अन् सगळं संपवणं. या गोष्टींनी कधीच कुणाचं भलं केलं नाही. पण तो आता अशाच जगात जगत होता जिथं फक्त आक्रोश होता, अश्रू होते, प्रेत अन् रक्तपात होता.

सायंकाळी तो इवाला भेटायला आला तेव्हा घाबरलेली इवा त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिच्या मनात वाईट शंकांनी थैमान घातलं होतं.

‘‘इवा, मला गुडलक म्हण. आज पहिल्याच मोठ्या मोहिमेवर निघालोय.’’

‘‘कुठं? कुठली मोहीम?’’

‘‘उद्या बेस्टिल डेच्या परेडमध्ये एक ट्रक घेऊन जायचंय.’’

‘‘का? ट्रकचं काय करणार?’’

‘‘काही नाही, त्या गर्दीत ट्रक घुसवायचा.’’

इवा पुन्हा रडू लागली, ‘‘जावेद, वेडा झालाय का तू? अरे कुणाचा जीव गेला म्हणजे? नाही, तू असं काही करायचं नाही.’’

जावेद असं अघोरी काही करेल यावर इवाचा विश्वास नव्हता. एकदोनदा त्यानं मरण्याची धमकी दिली होती. कधी म्हणायचा तो आत्मघातकी होणार आहे. अंगावर बॉम्ब बांधून घेणार आहे, कधी म्हणायचा गननं स्वत:लाच गोळी मारणार आहे. पण इवानं समजूत घातली म्हणजे पुन्हा तो नॉर्मल  व्हायचा.

‘‘सॉरी इवा, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू.’’

‘‘नाही जावेद, जायचं नाही. ही नाटकं बंद कर.’’

जावेदनं तिला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं. त्या एका क्षणात दोघांनाही त्यांनी एकत्र घालवलेले सुखद क्षण आठवले. पटकन् इवाला दूर ढकलत जावेद लांब लांब टांगा टाकत बाहेर निघून गेला.

‘‘जावेद थांब, जाऊ नकोस…’’ इवा हाका मारत होती.

जावेद निघून गेला होता. इवा रडत होती. पण रडून काहीच होणार नव्हतं. ‘जावेदला अडवायला हवं’ तिनं विचार केला, तिचं प्रेम त्याला रोखेल, त्यानं कुणाचा जीव घ्यायला नको. मी त्याला अशी विनाशाच्या वाटेवर जाऊ देऊ शकत नाही. माझ्या प्रेमाच्या बळावर मी त्याला माघारी वळवेन. मी स्वत:च ट्रकसमोर उभी राहीन. तो सांगत होता की त्याला गर्दीत ट्रक घुसवायचा होता.

दुसऱ्या दिवशी १४ जुलैला बेस्टिल डे, फ्रेंच नॅशनल डे साजरा व्हायचा होता. या दिवशी इथे युरोपातली सर्वात मोठी मिलिटरी परेड होते. रस्त्यावर अतोनात गर्दी असते. म्हातारी कोतारी माणसं, तरुण मुलं, मुली सगळेच आतषबाजी बघायला उत्सुक असतात.

इवाला एकदा वाटलं होतं पोलिसांना सांगावं. त्यांची मदत घ्यावी. पण काय नेम, ते तिलाच तुरुंगात डांबतील. जावेद कदाचित बोलतोय, पण असं काही करणारही नाही. तरीही इवा जावेदनं सांगितलेल्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. जावेदचा फोन बंद होता. इवा त्याला गर्दीत शोधत होती.

तेवढ्यात गर्दीकडे येणाऱ्या एका ट्रकला एका बाइकवाल्या पोलिसानं अडवण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबला नाही. इवाला दिसलं ट्रक जावेद चालवत होता. ती स्वत:च ट्रकसमोर जाऊन उभी राहिली.

क्षणभर जावेदचे हात थरथरले. ट्रकसमोर इवा हात पसरून उभी होती. इवा रडत होती. थरथरत होती. पण जावेद आता थांबणार नव्हता. त्यानं ट्रकचा स्पीड कमी केला नाही की ट्रक थांबवला नाही. ट्रक इवाला अन् तिच्याबरोबर इतर अनेकांना चिरडत पुढे निघाला. क्षणात पोलिसांनी गोळ्यांचा पाऊस पाडला. जावेद तिथंच गतप्राण झाला. सगळीकडे आक्रोश, रडारड, रक्ताच्या चिळकांड्या, रक्तमांसाचा चिखल, रक्तात पडलेली प्रेतं, पोरांना घेऊन धावणारे आईबाप, घाबरून रडणारी माणसं…विदारक दृश्य होतं.

इवा अन् जावेद दोघंही मरण पावले होते. प्रेमाचा पराजय झाला होता. दहशतवादाच्या रक्तरंजित खेळात, प्रेतांचा खच, कण्हण्याचे आवाज, घाबरून गेलेल्या लोकांचे चित्कार, तडफडणारी माणसं, भीती, भय, दु:ख अश्रू हेच उरले होते. प्रेमावरचा विश्वास उडालेली इवा मरण पावली होती अन् अतिरेक्यांच्या संगतीत काय घडतं हे जावेदचं प्रेत सांगत होतं.

ती एक घटना

कथा * मीरा शिंदे

माझे पती आशिष, त्यांचा मित्र गगन अन् त्याची पत्नी गायत्री. आम्हा चौघांत असलेलं सामंजस्य, परस्परांवर असलेला विश्वास अन् आदर अन् एकमेकांवरची माया हे इतकं अद्भूत होतं की सर्वांना आमचा हेवा वाटायचा. आम्हाला दोन मुलं होती. एक मुलगा, एक मुलगी. गगन, गायत्रीला मात्र मूलबाळ नव्हतं.

बऱ्याच प्रयत्नांनी गायत्रीला दिवस गेले. आम्ही सर्वच आनंदात होतो. पण तिला झालेलं मूल जन्मत: अनेक विकृती घेऊन आलं होतं. अन् जन्मानंतर काही वेळातच ते मूल मरण पावलं. गायत्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूत होती. आशिष ऑफिसच्या दौऱ्यावर होते. पूर्णपणे कोसळलेल्या गगनला मी सांभाळत होते अन् आमच्याही नकळत ती घटना घडून गेली. निसर्गाने आपलं काम बजावलं अन् संकर्षणचा जन्म झाला. मला दिवस गेल्याचं लक्षात येताच मी आशिषना म्हटलं, ‘‘आपल्या अनवधनामुळे जन्माला येणारं हे बाळ आपण गायत्री, गगनला देऊया का आपली दोन मुलं आहेतच!’’ आशिषना माझ्या कल्पनेचं कौतुक वाटलं. आई असून मी मैत्रीसाठी त्याग करते आहे असं त्यांना वाटलं. तर आपलं मूल मी गायत्रीला देते आहे यामुळे तीही भारावून गेली. खरं काय ते मी अन् गगन जाणत होतो…तेवढी एक घटना सोडली तर आमच्यात त्यानंतरही अगदी पूर्वीप्रमाणे निखळ निर्मळ मैत्रीचं नातं होतं

कधी तरी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून यायची. नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला दूर लोटल्याची भावना अन् आशीषसारख्या सज्जन पतीपासून घडलेली घटना लपवण्याची भावना. पण यातच सर्वांचं भलं होतं. गगन गायत्री संकर्षण मिळाल्यामुळे खूप समाधानी अन् आनंदात होते. सगळं कसं छान चाललेंल अन् एक अपघात घडला.

संकर्षण दहा वर्षांचा होता. गगन गायत्री अन् संकर्षण केरळच्या प्रवासाला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. गायत्री जागेवरच मरण पावली. गगनला खूप जखमा अन् फ्रॅक्चर्स होती. गंभीर परिस्थितीत होता तो अन् चमत्कारिकरित्या संकर्षण बचावला होता. त्याला एक ओरखडाही उमटला नव्हता.

संकर्षण आमच्याजवळच राहात होता. बरेच महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यावर गगन बरा झाला पण त्याला एकदम विरक्ती आली. एक दिवस त्याने आम्हा दोघांना बोलावून घेतलं. त्याचा सॉलिसिटरही तिथे होता. गगन म्हणाला, ‘‘माझी सर्व संपत्ती, प्रॉपर्टी मी संकर्षणच्या नावे केली आहे. मी आता संन्यास घेतोय. यापुढे तुम्हीच संकर्षणचे आईबाप. माझा शोध घेऊ नका. काही प्रॉब्लेम आलाच तर हा माझा सॉलिसिटर तुम्हाला मदत करेल.’’

आमच्या समजवण्याला, विनवण्यांना दाद न देता रात्रीतून गगन कुठे निघून गेला ते आम्हाला पुढे कधीच कळलं नाही. गगन व गायत्री गेल्याचं आम्हाला दु:ख होतंच पण आता आपला मुलगा आपल्याजवळ राहील या भावनेने आशीष सुखावले होते. त्यालाही आता दहा वर्षं उलटली होती.

कुठून कसं संकर्षणला कळलं की गगन गायत्री त्याचे सख्खे आईवडील नव्हते. तो आमचाच मुलगा आहे तेव्हापासून तो आमच्याशी फटकून वागू लागला. चिडून बरेचदा म्हणालाही, ‘‘मी जर तुम्हाला नको होतो, तर मला जन्माला का घातलंत? तुमच्यासारखे क्रूर आईबाप मी बघितले नाहीत. खुशाल मला दुसऱ्याला देऊन टाकलंत?’’

आमच्या मोठ्या दोन्ही मुलांशीही संकर्षणचं जुळत नव्हतं. त्याचं सर्वच बाबतीत या दोघांपेक्षा वेगळं असायचंय. त्याचा चेहराही बराचसा गगनसारखा होता. बरेचदा आपल्या दोन्ही मुलांपेक्षा त्याचं वेगळं असणं आश्चर्य वाटायचं. ते बोलूनही दाखवायचे, ‘‘नवल आहे, याचं सगळंच गगनसारखं कसं?’’

मी म्हणायची, ‘‘जन्मल्याबरोबर त्यांच्याबरोबर, त्यांच्याच घरात वाढलाय. त्याचा परिणाम असतोच ना?’’

आशीषना आश्चर्य वाटे, पण त्यांना संशय आला नाही. मी किंवा गगनवर त्यांनी कधीच संशय घेतला नाही. त्यामुळेच मला फार फार अपराधी वाटायचं. अनेकदा वाटलं खरं काय ते त्यांना सांगावं. पण आशीष ते ऐकू शकतील? शक्यच नाही.

संकर्षण आशीषसारखाच बुद्धिमान होता अन् तेवढ्याने आशीषचं पितृत्त्व समाधान पावत होतं. पण संकर्षण मात्र आमच्यापासून तुटला होता. अलिप्त झाला होता. एकटा एकटा राहात होता.

त्यातच तो आजारी पडला. अस्थमाचे अटॅक त्याला वारंवार यायचे.

एव्हाना आम्ही कोचिनमध्ये सेटल झालो होतो. आम्ही कोचिनमध्ये उत्तम डॉक्टर शोधले. बाहेरच्याही अनेक डॉक्टरांना दाखवलं. त्याला बरं वाटत नव्हतं. आता तर त्याला कित्येक तास ऑक्सिजनवर ठेवावं लागायचं. आम्ही दोघंही नवरा बायको फार काळजीत होतो.

शेवटी दिल्लीहून आलेल्या एक्सपर्ट डॉक्टरांच्या टीमने असा निष्कर्ष काढला की ही अल्फा, एण्टिटाइप्सीन डिसीज आहे. हा आजार जेनेटिक असतो. खरं तर वयाच्या तिशीनंतरच तो होतो, पण दुर्दैवाने ऐन विशीतच त्याने गाठलं, अस्थमाशी त्याची लक्षणं जुळतात. वडिलांची डी.एन.ए. टेस्ट करून घेतल्यास योग्य उपचार करता येतील.

आशीषने संकर्षणसाठी पटकन् डीएनए टेस्ट करवून घेतली. पण त्यांचे डीएनए एकमेकांशी विसंगत निघाले. कारण तो आशीषचा मुलगा नव्हताच ना?

रिपोर्ट कळताक्षणीच आशीष माझ्याकडे न बघता, संकर्षणचा विचार न करता कार घेऊन घरी निघून गेले. संकर्षणच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा तिरस्कार ओसंडून वाहात होता.

‘‘आजपर्यंत मला वाटायचं मी ‘अनवाँटेड चाइल्ड’ आहे. तुम्हाला नको असताना झालो म्हणून मला एखाद्या निर्जीव वस्तूसारखं दुसऱ्याला देऊन टाकलंत, आज तर कळतंय की मी पापातून जन्माला आलेला दुर्देवी मुलगा आहे. तू इतकी नीच असशील असं नव्हतं वाटलं मला. काकांचा विश्वासघात केलास…किती प्रेम आहे तुझ्यावर त्यांचं.’’

त्याच्या त्या अशक्त देहात त्याचा तिरस्कार, त्याचा संताप मावत नव्हता. तो खूप खूप बोलत होता. मला त्याला सांगायचं होतं की मी किंवा गगन आपापल्या पार्टनरशी प्रामाणिक होतो. तेवढी एक घटना सोडली तर आम्ही कायम मित्रच होतो. पण हे संकर्षण काय किंवा आशीष काय…समजून घेणार का?

‘‘संकर्षण गगनचाच मुलगा ना?’’ आशीषने मी घरी आल्यावर विचारलं.

‘‘हो.’’

आशीषही संकर्षणप्रमाणेच संतापले. मला टाकून बोलले. त्यांचा रागही वाजवी होता. मी त्यांचा विश्वासघात केला होता यावर ते ठाम होते. माझं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते. संकर्षणने सर्व औषधं फेकून दिली होती. जेवणही घेत नव्हता. त्याची तब्येत आणखी खालावली होती.

त्या वीकएण्डला माझी मोठी दोन्ही मुलं संकर्षणला भेटायला आली. एरवी फोनवरून आमचं संभाषण चालूच होतं. पण संकर्षणची तब्येत खालावली असल्याचं ऐकून त्यांनी प्रत्यक्ष येण्याचा निर्णय घेतला होता.

आल्यावर चहा झाला. दोघंही फ्रेश झाले अन् दोघांनी एकदमच विचारलं,

‘‘आईबाबा, काय झालंय? तुम्ही दोघं फारच टेन्स दिसताहात…?’’

आशीष उठून तिथून दुसरीकडे निघून गेले.

‘‘यांना काय झालं, आई?’’ अंजनने विचारलं.

‘‘काही नाही रे, संकर्षणच्या आजाराने आम्ही काळजीत आहोत.’’

‘‘आई, ही काळजी त्याच्या आजारपणाची नाही. काहीतरी वेगळं कारण आहे. अगं, आम्ही आता लहान नाही आहोत. बरंच काही कळतं, समजतं आम्हाला. खरं सांग ना? कदाचित काही मार्ग काढता येईल,’’ अमिताने माझ्या गळ्यात हात घालत म्हटलं.

मुलांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात आशेचा अंधुक किरण चमकला. पण पुन्हा शंकेची पाल चुकचुकली. आशीष काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीएत तर मुलं काय समजून घेतील? तरीही मी सर्व काही त्यांना सांगितलंच.

आजची पिढी खरोखर आमच्यापेक्षाही अधिक सहजपणे अन् मोकळेपणाने परिस्थिती समजून घेते. परिस्थितीचं विश्लेषण करते अन् त्याप्रमाणे निर्णयही घेते.

काही वेळ दोघंही गंभीरपणे बसून होती. मग अमिता म्हणाली, ‘‘तरीच आम्हाला वाटायचं की संकर्षण आमच्यापेक्षा इतका कसा वेगळा आहे…आता सर्व लक्षात आलं…’’

‘‘अंजन म्हणाला, ‘‘काही हरकत नाही. सर्व परिस्थिती बघता तुला अन् गगनकाकांनाही दोष नाही देता येणार. पण आई, तरीही तुझी चूक एवढीच की इतके दिवस तू ही गोष्ट बाबांपासून लपवून ठेवलीस त्यामुळे त्यांना त्यांचा विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. कारण गगनकाका अन् तू त्यांच्या फारच विश्वासातले होता. त्याचवेळी ही गोष्ट तू बाबांना सांगायला हवी होतीस.’’

‘‘दादा, काही तरीच काय बोलतोस? आजही जी गोष्ट बाबा ऐकून घ्यायला, समजून घ्यायला तयार नाहीत, ती गोष्ट त्यांनी त्यावेळी सहजपणे स्वीकारली असती?’’ अमिता म्हणाली.

‘‘नक्कीच! आता त्यांना धक्का बसलाय. या गोष्टीचा की ही गोष्ट आईने इतकी वर्षं लपवून ठेवली!’’

‘‘नाही. अजिबात नाही, त्यावेळी आईने ही गोष्ट लपवली नसती तर आपलं अन् गगन काकांचंही कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. गायत्रीकाकी काय किंवा आपले बाबा काय, कुणीच ही गोष्ट इतक्या सहजपणे स्वीकारली नसती,’’ अमिता ठामपणे म्हणाली.

‘‘तू म्हणतेस ते खरं आहे. आई त्यावेळी योग् वागली. चल…आपण बाबांना समजावू…अन् संकर्षणशीही बोलू,’’ अंजन म्हणाला.

‘‘ममा, तू संकर्षणपाशी हॉस्पिटलमध्येच थांब, आम्ही थोड्या वेळात तिथे येतोच.’’

मी माझं आवरून घरून निघाले. मी घराबाहेर पडल्यावर अंजन बाबांकडे गेला. त्यांच्या पुढ्यात शांतपणे बसला अन् म्हणाला, ‘‘बाबा, आईने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे. आता मला तुम्ही असं सांगा की तुम्हाला मुळात राग कशाचा आला आहे. जे गगनकाका व आईमध्ये घडलं त्याचा की ही गोष्ट तुमच्यापासून लपवली, याचा?’’

‘‘दोन्ही गोष्टींचा.’’

‘‘तरीही, अधिक राग कशाचा?’’

‘‘लपवण्याचा…’’

‘‘त्यावेळी तिने ते सांगितलं असतं तर तुम्ही त्या दोघांना क्षमा केली असती?’’

‘‘नाही…’’

‘‘तर मग किती आयुष्य उद्ध्वस्त झाली असती याचा विचार केलाय? ही गोष्ट आज कळतेय तरी तुम्ही, आई अन् संकर्षण इतके त्रस्त आहात. मानसिक ताण सोसता आहात…तुम्हाला आई किंवा गगनकाकावर कधीच संशय नव्हता अन् ही गोष्टही तेवढीच खरी की एकमेकांच्या प्रेमात पडून, आकर्षणापोटी ते एकत्र आले नव्हते. ती घटना म्हणजे एक अघात होता, क्षणिक चूक म्हणा…तर त्यासाठी तुम्ही स्वत:ला अन् आईला इतकी शिक्षा कशी देऊ शकता?’’

लेकाचं मुद्देसूद बोलणं आशिष लक्षपूर्वक ऐकत होते, ‘‘तुझं म्हणणं खरंय. मेंदूला तुझं म्हणणं पटतंय, पण मन ऐकत नाही,’’ ते म्हणाले.

‘‘मनाला समजवा, पपा…आईलाही खूप त्रास होतोए.’’

हॉस्पिटलमध्ये मी संकर्षणजवळ बसून होते. तो माझ्याशी बोलत नव्हता. माझ्याकडे बघतही नव्हता. तेवढ्यात अंजन व अमिता येताना दिसली.

‘‘काय झालं?’’ मी अधीरपणे विचारलं.

‘‘थोडा धीर धर. हळूहळू सर्व नीट होईल,’’ अंजन म्हणाला.

अमिताने संकर्षणच्या जवळ बसत विचारलं, ‘‘कसा आहेस?’’

‘‘बराय,’’ तुटकपणे तो म्हणाला.

‘‘आई तू घरी जा. आम्ही आहोत संकर्षणपाशी,’’ अमिताने म्हटलं.

‘‘आणि आम्ही जेवणही त्याच्याबरोबर घेणार आहोत,’’ अंजनने सांगितलं.

मी निघाल्यावर दोन्ही मुलांनी संकर्षणबरोबर खूप मोकळेपणाने गप्पा मारल्या. त्याच्या जन्माची कथा त्याला नीट सांगितली. आधी मूल होत नसल्यामुळे अन् नंतर विकृत मूल जन्माला येऊन मरण पावल्यामुळे गगन व गायत्रीवर कोसळलेल्या दु:खातून केवळ संकर्षणमुळे ते बाहेर पडले, सावरले अन् आनंदाचं आयुष्य जगू शकले. केवळ संकर्षणमुळे गायत्रीला आईपणाचं सुख मिळालं ही गोष्ट कशी विसरता येईल? त्याच्या मनातला ‘अनवॉन्टेड’ हा शब्द त्याने काढून टाकायला हवा. तो आजही सर्वांचा लाडका आहेच. एरवी त्याच्या आजारपणाने सगळेच असे हवालदिल झाले असते का? इतका खर्च, इतकी जागरणं, इतकी काळजी फक्त प्रेमापोटी करता येते. एक ना दोन, हर तऱ्हेने त्या दोघांनी संकर्षणला समाजावलं. त्यामुळे तो पुष्कळच निवांत झाला. त्याचा धुमसणारा संताप अन् माझ्याविषयीचा तिरस्कार निवला.

मधल्या काळात डॉक्टरांनीही त्याच्या आजारावर बरंच संशोधन केलं होतं. त्याचा आजार जेनेटिक नसून एलर्जीचा एक प्रकार असल्याचं सिद्ध झालं. त्या अनुषंगाने उपचार सुरू झाले अन् शारीरिकदृष्ट्याही संकर्षण सुधारू लागला.

काही दिवसांतच आम्ही त्याला घरी घेऊन आलो. संपूर्ण वर्षं त्याच्या आजारपणात गेलं होतं. पण आता तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या अगदी निरोगी व फिट होता. आता त्याचं इंजिनीयरिंगचं शेवटचं वर्षं होतं. त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाला आम्ही जंगी पार्टी दिली. आता आम्ही एक परिपूर्ण अशी हॅप्पी फॅमिली होतो.

मला क्षमा कर

कथा * रेणू श्रीवास्तव

न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आईवडिलांना मिठी मारली. किती तरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला ‘वेलकम स्माइल’ दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सराच समोर बसली आहे.

मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. दीड दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंटसमोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होताहेत तोवर जुईने चहा करून आणला.

दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली अन् त्यांना गाढ झोप लागली.

‘‘आई, ऊठ ना, तुमच्या जागं होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली.’’ आकाशने तिला बळेच उठवलं.

अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. ‘‘काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला?’’

राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, ‘‘तिच्या घरी तिची आजी अन् वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घरजावई व्हावं पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात.’’

राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशारच होता. शाळेपासून इंजिनीयर होईपर्यंत त्याने नेहमीच टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली अन् जुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं.

‘‘आई का हसतेस?’’ आकाशने विचारलं.

‘‘काही नाही रे, सियाटलला पण आपण जायचंय ना? आनंद अन् नीताशीही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी.’’ राधाने म्हटलं.

आकाशाने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे.

दुसऱ्यादिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते.

‘‘मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेला ना?’’ जुईने विचारलं.

‘‘चालेल ना? तू आकाशहून वेगळी नाहीए अन् आता आमचीच होणार आहेस.’’

थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची.’’

‘‘बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात,’’ राधाने म्हटलं.

‘‘नाही हं! असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा.’’ जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं.

दुसऱ्यादिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती. हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली.

राधा अन् अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणा आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात.

त्या तासाभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण अन् झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या.

गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एका कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्राँइंगरूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही पण अविनाशला ते सगळं जाणवलं, लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बैचेनी शरीराच्या माध्यमातून, देहबोलीतून डोकावू लागली.

जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

जुईने अन् आजीने जेवण्यासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते. पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश अन् जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं.

शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, ‘‘राधा, काय झालंय? मी किंवा आशीष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीए का? एकाएकी का अशा गप्प झालात? ते जाऊ देत, आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला?’’

हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, ‘‘नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलंय.’’

‘‘तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलंय, तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतचं घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुणसंपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते?’’ अविनाश म्हणाला.

राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं. पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, ‘‘तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेण्ट…अन् लग्न?’’

अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, ‘‘आम्ही नंतर कळवतो तुम्हाला…आम्हाला आता निघायला हवं…आकाश चल, टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊन मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामामामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण.’’

राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले.

‘‘यात त्रास होण्यासारखं काही नाहीए. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खूश असते.’’ आशीषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला दोन मिनिटं राधा मॅडमशी एकांतात बोलायचं. जुई सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वत:लाच एका चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला. पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूणपणे ‘हो’ असा सिग्नल मिळत नाही तोवर माझा जीव शांत होणार नाही.’’

अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली अन् आशीष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली.

आशीष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, ‘‘राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा, मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ती दूषणं दे. हवी ती शिक्षा दे. पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाहीए. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो, जुई अन् आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे गं, आकाशशी लग्नं झालं नाही तर ती जीव देईल…प्लीज राधा, मला भीक घाल एवढी.’’

आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला अन् तो बाहेर लॉनवर आला. ‘‘जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड अन् त्यांची सर्वतोपरी काळजी घे हं!’’ वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले.

राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली.

अविनाश टीव्ही बघत बसला.

राधाच्या डोळ्यांपुढे ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला.

आशीष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली अन् मग आशीषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाइल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलीफोन उचलून स्वत:च्या खोलीत न्यायची अन् मग तासन्तास राधा व आशीषच्या गप्पा चालायच्या. चार महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.

त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं. पण आशीषच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष एमएससीच्या परीक्षेवर केंद्रित केलं. पण सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशीष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्त्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं अन् तिथेच नोकरी शोधायची. आशीषने कंपनीची नोकरीही सोडली अन् भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहात होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्त्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली. पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्नं झालं. अविनाश खूप प्रेमळ अन् समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दु:ख विसरली. संसारात रमली. दोन मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलंही सद्गुणी होती. हुशार होती. रूपाने देखणी होती. मुलीने बी.टेक. केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटललाच सुखाचं आयुष्य जगते आहे. जावई मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत.

आकाश सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टूर्नामेंट्समध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत अन् पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही, तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं अन् असा या वळणावर आशीष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं? मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसूनहमसून रडायला लागली.

अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊ बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘‘राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं किती क्षुल्लक गोष्टींसाठी स्वत:ला त्रास करून घेते आहेस? काही कानावर होतं…काही अंदाजाने जाणलं…अगं, आशीषने जे तुझ्याबाबतीत केलं, ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्त्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं अन् त्यांचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. अन् तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशीषला मिळणारच नव्हतीस…मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुद्ब्रझ्यावर, हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतोय, आईला एकाएकी काय झालंय? मी काय उत्तर देऊ त्याला.’’

अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, ‘‘माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमतेय की वडिलांचेच जीन्स जुईत असतील तर? तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल…आशीष किती क्रूरपणे वागला. आईवडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्यासरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर? मुलाला बघायला आपण तडफडत राहाणार का?’’

राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली.

आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, ‘‘हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं मी कधीच घरजावई होणार नाही अन् मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोए. इथे राहिलात तर नीताताई अन् भावजींनाही खूप आनंद होईल.’’

राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरीणित वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लण्डला गेली. लेक अन् जावई नात, नातवासह आपल्या गावी परत गेले.

अविनाशने राधाला म्हटलं, ‘‘आता या भल्यामोठ्या सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढीगभर पाहुणे होते. एकमेकांची नजरभेटही दुर्मीळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती. पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिलीय, तर आपणही आपला हनीमून आटोपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत. खरं ना?’’

राधाने हसून मान डोलावली अन् प्रेमाने अविनाशला मिठी मारली.

विरंगुळा

कथा * लता सोनावणे

सकाळचे नऊ वाजले होते. नंदिनीनं नवऱ्याला अन् सोनी, राहुल या मुलांना हाक मारली, ‘‘ब्रेकफास्ट तयार आहे. लवकर या.’’

टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले. दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघं सकाळी घराबाहेर पडायची. ती सरळ सायंकाळी परत यायची. बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्याखालून घालत होते. सोनी अन् राहुल आपापल्या मोबाइलमध्ये गर्क होते. या तिघांचं आटोपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वत: ब्रेकफास्ट घेते.

मुलांना मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं अन् नंदिनीचा पारा चढला, ‘‘जरा हसतबोलत नाश्ता करता येत नाही का? सगळा वेळ घराबाहेर असता, थोडा वेळ तरी तो मोबाइल बाजूला ठेवा ना?’’

बिपिनला तिचा उंच स्वर खटकला. कपाळाला आठ्या घालून म्हणाले, ‘‘का सकाळी सकाळी आरडा ओरडा करतेस? करत असतील काही त्यांच्या कामाचं.’’

नंदिनी पुन्हा करवादली, ‘‘आता तुम्ही तिघंही एकदम सांयकाळी याल. जरा मोबाइल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे?’’

बिपिन हसून म्हणाले, ‘‘खरं तर आम्ही शांतपणे खातोय अन् आरडाओरडा तू करते आहेस.’’

मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं, ‘‘बाबा, काय छान बोललात.’’ मुलांनी एकदम म्हटलं.

नंदिनीनं तिघांचे डबे अन् पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या अन् ती उदास मनानं तिथून बाजूला झाली. आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती. सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात, त्यात नंदिनीशी थोडं बोलावं, तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही? सायंकाळी थकून येतील, मग टीव्हीसमोर पाय पसरून बसतील. फार तर फोन, लॅपटॉप…जेवतील की झोपले. आपसातला संवादच संपलाय. मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असे. पण ती मोठी झाली, मोबाइल, आयफोन वगैरे आले अन् घर अगदी भकास झालं. घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं, काही शाब्दिक देवाण घेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये?

मुलांना अन् नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं, शेजारीपाजारी ओळखी वाढवाव्यात, व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करावेत. पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही, त्याला ती तरी काय करणार? नवऱ्याला अन् मुलांना फेसबुक मित्रांची सगळी बित्तंबातमी असते. पण घरात आईशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो.

नंदिनीला फारच उदास वाटलं. तिघंही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेले. तिनं स्वत:चा ब्रेकफास्ट उरकला. मोलकरीण येऊन कामं करून गेली. नंदिनीनं अंघोळ आटोपून रोजची जुजबी कामं उरकली.

पूर्वीही ती फार सोशल नव्हती. पण घरातच किती आनंद होता…तीही सतत हसायची. गाणी गुणगुणायची. आता दिवस कंटाळवाणा वाटतो. संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटते. उगीचच टीव्हीसमोर बसून वेळ काढायचा.

तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती. लखनौहून मुंबईला येऊन तिला एक वर्षच झालं होतं. दादरसारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता. मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं.

बाल्कनीत तिनं लावलेली रातराणी आता सुरेख वाढली होती. इतरही काही झाडं छान फोफावली होती. हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखावायचा. इथं तिचं एकटीचं राज्य होतं. इतर कुणी इकडे फिरकत नसे.

तेवढ्यात तिला आठवलं, बरेच दिवसात स्टोअररूममध्ये ती फिरकली नव्हती. ती स्टोअररूममध्ये गेली. थोडी आवराआवरी करताना तिला मुलांच्या खेळण्यांचा कागदी डबा हाती लागला. त्यात एक दुर्बिण किंवा बायनॉक्युलरसारखं खेळणं होतं. नैनीतालला गेले असताना मुलांनी हट्ट करून ते विकत घ्यायला लावलं होतं. आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानात होतंच.

तिनं ती दुर्बिण हातात घेतली अन् गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली…लगेच ती बाल्कनीत आली. झाडांच्या आडोशात स्टुलावर बसून तिनं दुर्बिण फोकस केली अन् डोळ्याला लावून बघायला लागली. थोड्याच अंतरावर एका बिल्डिगचं बांधकाम सुरू होतं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये लोक राहायला आलेले होते. तिनं दुर्बिण थोडी फिरवली. समोरच्या घरातली बाल्कनी अन् त्याला लागून असलेली ड्रॉइंगरूम छान दिसत होती. ड्रॉइंगरूममध्ये एक मध्यमवयीन स्त्री डान्सच्या स्टेप करत कामं उरकत होती. बहुधा गाणं सुरू असावं.

तेवढ्यात तिची तरूण मुलगीही तिथं आली. आता मायलेकी दोघीही डान्स करू लागल्या. नंतर दोघीही खळखळून हसल्या अन् आतल्या खोलीत निघून गेल्या.

त्यांचं ते बिनधास्त नाचणं, खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूड एकदम छान झाला. तिच्या नकळत ती काही तरी गुणगुणु लागली. मग तिनं दुर्बिण इकडे तिकडे फिरवून पाहिली, पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते.

अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली. ती दचकली. दुर्बिण हातातून पडता पडता वाचली.

एक बळकट, घोटील देहाचा तरूण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता. दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता. तेवढ्यात त्याची तरूण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली. वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् कंबरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंगरूमच्या सोफ्यावर रेळून बसला. दोघंही एकमेकांची चुंबनं घेत होती. ती बेभान होती. बघताना नंदिनीचीही कानशिलं गरम झाली. हृदयाची धडधड वाढली. अंगावर गोड रोमांच उभे राहिले. किती तरी दिवसांनी शरीर अन् मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं. काही क्षणांतच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं. बहुधा बेडरूममध्ये गेले असावेत, नंदिनीला हसायला आलं.

नंदिनी उठून घरात आली. एक वाजून गेला होता. वेळ इतका भर्रकन गेला होता. छान वाटत होतं. नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती. तिला आपला लग्नातला शालू आठवला, हिरवा चुडा आठवला. छान नटून थटून बिपिनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं.

जेवण आटोपून ती थोडा वेळ आडवी झाली. छानपैकी डुलकी झाली.

बारीकसारीक कामं आटोपून तिनं चहा केला. चहाचा कप अन् दुर्बिण घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली. मायलेकींच्या घरात तर शांतता होती पण नवविवाहित जोडप्याची मात्र लगबग सुरू होती. खूप हौसेनं अन् उत्साहानं ती दोघं घर लावत होती. नवं लग्न, नवा संसार, नवं घर मांडताना त्यांचा प्रणयही रंगत होता. जोडी फारच छान होती.

नंदिनीनं हसून तिच्या बायनाक्युलरचा मुका घेतला. आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता. सगळा दिवस किती आनंदात गेला होता. गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही. कुठल्या जुन्या दुखवणाऱ्या घटना आठवल्या नाहीत. एकदम प्रसन्न होतं मन.

पाच वाजले. रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते. तिनं कुठलंसं गाणं गुणगुणत स्वत:चं आवरलं अन् ती फिरायला निघाली. आज तिची चालही झपाझप होती. आपली ही दुर्बिणीची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं.

खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही, पण आजचा दिवस किती छान गेला. जाऊ दे, उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही. ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला. घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं.

सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटोपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती. फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं, तसा एकदम तो खेकसला, ‘‘किती प्रश्न करतेस गं आई?’’

नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही की वाईटही वाटलं नाही. तिला स्वत:लाच या गोष्टींचं नवल वाटलं. ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती.

जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली अन् बिपिन न्यूज बघू लागले. नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बिण घेऊन बाल्कनीत बसावं का? पण नकोच. घरात कुणाला काहीच कळायला नकोय. मग तिनं अत्यंत रोमँटिक पद्धतीनं बिपिनच्या गळ्यात हात घातले अन् विचारलं, ‘‘बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का?’’

बिपिन एकदम दचकलाच! तिच्याकडे लक्षपूर्वक बघत त्यानं विचारलं, ‘‘तुला काय झालंय?’’

हसून नंदिनीनं म्हटलं, ‘‘फक्त एवढंच नेहमी विचारता…दुसरं काही तरी बोला ना?’’

बिपिनलाही हसायला आलं. त्यांनी टीव्ही बंद केला. दोघं फिरून आली. नंदिनीचा मूड फारच छान होता. त्या नवविवाहित जोडप्याच्या प्रणयलीला आठवून ती ही उत्तेजित झाली होती. त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला.

सकाळी घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी ‘खेळणं’ घेऊन स्टुलावर येऊन बसली. मायलेकींच्या फ्लॅटमधली आई बहुधा नोकरी करत असावी. ती साडी नेसून तयार होती. मुलगी कॉलेजमधली असावी. दोघीही आपापलं आवरून एकत्रच बाहेर पडल्या. घरात इतर कुणी नसावं. काल बहुधा त्यांनी रजा घेतली असावी, तरीच नाचगाणं करू शकल्या. आत्ताही दोघी एकदम आनंदात अन् टवटवीत दिसत होत्या.

मग नंदिनीनं दुर्बिण दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली, बघूयात राघूमैना काय करताहेत? तिला स्वत:च्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली. राघू ऑफिससाठी तयार झाला होता. मैना त्याला स्वत:च्या हातानं सँडविच भरवत होती. व्वा! काय छान रोमांस चाललाय…खरंय, हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे. नव्या नवलाईचे हे नऊ दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं. तिला पुन्हा हसायला आलं. तेवढ्यात मोलकरीण आली. चपळाईनं नंदिनीनं दुर्बिण लपवली.

कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपिनला मेसेज केला. ‘आय लव्ह यू’ बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं, ‘आय लव्ह यू, डियर.’ नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती. दुपारी ती ब्यूटीपार्लरला गेली. फेशियल, मेनिक्योर, पॅडीक्योर, छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वत:चं रूप बघून एकदम खुष झाली. तिथून ती मॉलमध्ये गेली. स्वत:साठी सुंदर कुर्ता विकत घेतला.

घरी परत येताच दुर्बिण उचलून बाल्कनी गाठली. मायलेकी बहुधा एकदम सायंकाळीच परतत असाव्यात. नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली अन् मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. नंदिनीही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली.

सायंकाळी सोनी, राहुल घरी परतले अन् नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं, ‘‘व्वा, आई, किती छान दिसते आहेस. हा नवा हेअरकट खूप शोभून दिसतो आहे तुला.’’

राहुलनंही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं, ‘‘अशीच राहत जा आई, लुकिंग गुड!’’

बिपिन घरी आले. ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते. वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले, ‘‘व्वा! फारच छान! काय, काही खास बेत आहे का?’’

नंदिनीनं हसून म्हटलं, ‘‘वाटलं तर तसं समजा.’’

‘‘चला तर, आजच्या या मेकओव्हर प्रित्यर्थ आपण आईस्क्रिम खाऊयात. रात्रीच्या जेवणानंतर ‘कूल कॅम्प’ला जाऊ.’’ बिपिननं म्हटलं, तशी दोघं ही मुलं आनंदानं चित्कारली.

‘‘व्वा! बाबा, किती मज्जा.’’

चौघंही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले. नंदिनीला स्वत:चंच आश्चर्य वाटत होतं. गेले दोन दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता. सगळंच छान वाटत होतं. ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं…म्हणजे, तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं? स्वत:च्या आयुष्यात आलेल्या नीरसपणाला ती स्वत:च जबाबदार होती का?

रिकामपण तिच्याजवळ होतं. इतरांना त्यांचे व्याप होते. त्या रिकामपणामुळे ती चिडचिडी बनली होती, आपला वेळ अन् एनर्जी तिघांबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती. खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं?

आता नंदिनीचं हेच रूटीन झालं. आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली. रातराणी, मोगऱ्याच्या सुवासात, फांद्या अन् पानांच्या आडोशाच्या आधारानं स्टुलावर बसून दुर्बिण डोळ्याला लावायची अन् समोरच्या घरातली मजा बघायची. त्या हिरोहिरोइनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती. त्यांच्यामुळेच तिला स्वत:चे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले. ती अन् बिपिन तेव्हा याच वयाचे होते.marathi-storyत्या दिवसांचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता. बिपिन टूरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती. कधी मुलीबरोबर सिनेमा बघून यायची, कधी दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची. स्वत:च्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती. दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायमावरही लक्ष देत होती.

मायलेंकीच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाई गडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या. त्यांचा आनंद तिला सुखावत होता. ती मनातल्या मनात अंदाज बांधायची. या दोघीच का राहतात? यांच्या घरात अजून कुणी का नाही? आई विधवा असेल की घटस्फोटिता? मुलगी विवाहित आहे की अविवाहित? नंदिनीचा दिवस लवकर संपायचा. शिवाय, दुर्बिण लपवून ठेवणं आपलं गुपित आपल्यापुरंतच ठेवणं हीसुद्धा एक मज्जाच होती.

समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते. तिथली वस्ती वाढत होती. दुर्बिणीचा खेळ सुरू होऊन आता जवळपास सहा महिने लोटले होते. हिरोहिरोइनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नवं चैतन्य निर्माण केलं होतं. ती किती बदलली होती.

नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून, बाल्कनीत बसून दुर्बिण डोळ्याला लावली अन् तिला धक्काच बसला. तिच्या हाताला कंप सुटला. स्वप्नांच्या जगातून वास्तवाच्या जमिनीवर दाणकन् आदळावं असं झालं. तिचे हिरोहिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते. खाली रस्त्यावर ट्रकही उभा दिसला. हिरोनं पॅकर्स बोलावले होते. त्यांची लगबग दिसत होती.

हे काय झालं? नंदिनीला खूपच वाईट वाटलं. स्वत:च्या नकळत की किती गुंतली होती त्यांच्यात? त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता. त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती…आता पुन्हा तेच उदासपण…बोअर रूटीन…दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती. बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती.

सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला. हिरोहिरोइन त्यांच्या कारमधून निघून गेली. मांडीवर दुर्बिण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टेकवलं. कितीतरी वेळ ती तशीच बसून होती.

संध्याकाळी तिचा उतरलेला, मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला.

पण, ‘‘जरा बरं वाटत नाहीए,’’ म्हणून तिनं पटकन् खोली गाठली अन् ती अंथरूणावर पडली. त्यानंतरचे चार पाच दिवस खूपच उदास वाटत होतं. नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकींनी दोन दिवस रजा घेतली असावी. त्यांच्या घरात थोडा उत्साह होता. पण नंदिनीची कळी फारशी खुलली नाही.

मात्र एक दिवस स्टुलावर बसून नंदिनी दुर्बिणीतून उगीचच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली. तीन चार तरूण मुलांनी तो फ्लॅट बहुधा भाड्यानं घेतला होता.

ती तरूण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती. एक जण पडदे लावत होता. दुसरा बहुधा डस्टिंग करत होता, पांढरा टी शर्ट आणि काळी शॉर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाळायला घालत होता. त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरूण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती. पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा:पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरूणाकडे जात होतं.

नंदिनीला हसू फुटलं. ती लक्षपूर्वक पाहत होती. तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला अन् ती मुलगी लाजली. अरेच्चा! इथं तर लव्हस्टोरी सुरू झालीय की! दोघं एकमेकांकडे बघून हसताहेत…मजा येईल आता. शिफ्टिंग झाल्या झाल्याच रोमांसही सुरू झाला.

तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली. ती बहुधा त्या तरूणीची आजी असावी. मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली. मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला. आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं. मग तीही आत गेली. किती तरी दिवसांनी गाणं गुणगुणत नंदिनी बाल्कनीतून उठली अन् तिनं दुर्बिण कपाटात लपवून ठेवली. आज तिला पुन्हा उत्साही वाटत

वेलीच सुचलेलं शहाणपण

– सुधा गुप्ते

बरेच दिवसात निमाशी माझ्या फोनवर संभाषण झालं नव्हतं. अनेकदा फोन करायचं ठरवलं अन् दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतल्यानं फोन करणं राहून गेलं. निमा माझी लाडकी धाकटी बहीण आहे.

‘‘मावशीची काळजी करू नकोस, अगं ती चांगलीच असेल ना? म्हणून तर तिचं रडगाणं गाणारा फोन आला नाहीए…काही प्रॉब्लेम असता तर तिचा नक्कीच फोन आला असता. रडत भेकत तिनं तुला आपली अडचण सांगितलीच असती.’’ मानवनं माझ्या मुलानं हसत हसत मला टोमणा दिला. धाकट्या मानसीनं हसून त्याला अनुमोदन दिलं. तिनं त्याला हसत हसत दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘बकअप’ केल्याचं मी बघितलं.

हल्लीची मुलं खरोखरंच हुषार अन् जागरूक आहेत. त्यांच्या वयात आम्हाला एवढी समजूत नव्हती हे मान्य करावंच लागेल. नातलगांविषयी एवढं ज्ञान आम्हाला नव्हतं. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला ते खरं वाटायचं, पटायचं. शिवाय एकत्र कुटुंबात मुलांचा संबंध फक्त मुलांशीच यायचा. घरातल्या मोठ्या माणसांचे आपापसातले हेवेदावे, रागलोभ किंवा प्रेम, आदर, त्याग वगैरे आमच्यापर्यंत पोहोचत नसे. आता चार माणसांच्या कुटुंबात कुणी कपाळावर किती आठ्या घातल्या, कुणी कुणावर डोळे वटारले हे सगळ्यांच्या लक्षात येतंच.

‘‘अगं आई, काल मी मावशीला मॉलमध्ये बघितलं. कदाचित बँकेतून लवकर बाहेर पडली असेल. केवढी ढीगभर खरेदी केलेली होती? दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या. तिच्या दोन कलिग्जपण होत्या सोबत.’’

‘‘तुझ्याशी बोलली का?’’

‘‘नाही गं! मी थर्डफ्लोअरला होतो अन् मावशी सेकंड फ्लोअरला होती.’’

‘‘पण ती मावशीच होती कशावरून? दुसरी कुणी असू शकते. तू वरून खाली कसं बघितलंस?’’

‘‘म्हणजे काय? मी काय आंधळा आहे का? अन् वरून खालचं व्यवस्थित दिसतं. चांगली हसत खिदळत होती. तुला फोन करते तेव्हा मात्र सतत रडत असते. मला असं होतंय, माझे पैसे संपले. मला पैशांची अडचण आहे. आनंदाचे क्षण शेयर करताना तिला तुझी आठवण येत नाही अन् थोडाही प्रॉब्लेम आला की रडत तुझ्याकडे येते. अशा माणसांची काळजी कशाला करायची, सोड तिची काळजी करणं. तिचा फोन नाही आला याचाच अर्थ सगळं काही ठीकठाक चाललंय…’’

मुलाचं सडेतोड पण, खरं बोलणं मला आवडलं नाही. मी त्याला रागावून पिटाळून लावलं. विषय तिथंच संपला. पण त्यानं त्याच्या मावशीचं किती सूक्ष्म निरीक्षण केलंय याचं मला कौतुकही वाटलं. तो बोलला ते खरंच होतं. अगदी फुसक्या गोष्टींसाठी रडून भेकून गहजब करणं अन् समोरच्याला पेचात आणणं तिला छान जमतं. पण मोठ्यातला मोठा आनंद ती कधीही बोलून दाखवत नाही. म्हणते, आनंद कधी दाखवू नये. दृष्ट लागते. कुणाची दृष्ट लागते, आमची? माझी? मी तिची मोठी बहीण, आईसारखी तिची काळजी घेते. सतत तिच्या अडचणी सोडवते. आमची कशी दृष्ट लागेल? काहीतरी अंधश्रद्धा. असा कसा स्वभाव हिचा?

आता मागच्या आठवड्यातच तर सांगत होती, पैशांची फारच अडचण आहे. मार्च एंडिंग म्हटलं की पैशांची ओढाताण असतेच. थोडे पैसे देशील का? मी काटकसरीनं राहून काही पैसा शिल्लक ठेवत असते. त्यामुळे मला अशी अडचण कधी जाणवत नाही. हे पैसे मी कुणाच्याही नकळत साठवत असते. ऐनवेळी काही अडचण आलीच तर कामी यावेत हाच माझा उद्देश्य असतो. त्यातून काही पैसे तिला द्यावेत असं मी मनोमन ठरवलंही होतं. तिला दिलेले पैसे परत कधीच मिळत नाहीत हे मलाही ठाऊक आहे. चुकून माकून आलेच तर थोडे थोडे करत अन् तिच्या सोयीनं येतील. आईबाबांनी मरताना मला सांगितलं होतं की धाकट्या बहिणीला आईच्या मायेनं सांभाळ. तिला कधी अंतर देऊ नकोस. निमा माझ्याहून दहा वर्षांनी धाकटी आहे. मी तिची मोठी बहिण आहे, तरीही तिच्या अनंत चुका, मी आईच्या मायेनं पोटात घालते. तिचे अपराध माझ्या नवऱ्यापासून, मुलांपासून, जगापासून लपवून ठेवते. अनेकदा माझा नवरा मला समजावतो, ‘‘शुभा, तू फार भाबडी आहेस. बहिणीवर प्रेम कर. पण तिला स्वार्थी होऊ देऊ नकोस. ती फार आत्मकेंद्रिय आहे. तुझा विचार ती करत नाही. आईवडिलांनीच मुलांना शिकवायला हवं. चुका केल्या तर त्या दाखवून द्यायला हव्यात. गरज पडली तर कान उपटायला हवेत. तू तिला प्रत्येक वेळी पाठीशी का घालतेस? तिला समजव…रागव…’’

‘‘मी काय रागावणार? ती स्वत: शिकलेली आहे, नोकरी करतेय. लहान मुलगी थोडीच आहे ती रागवायला? प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो…’’

‘‘प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो तर तिला राहू दे आपल्या स्वभावासोबत. चूक झाली तर जबाबदारीही घेऊ दे स्वत:वर. तू तिला प्रोत्साहन देतेस, जबाबदारी घेऊ देत नाहीस हे मला खटकतं.’’

उमेश म्हणाले ते अगदी बरोबरच होतं. पण काय करू? मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याकरता वेगळाच जिव्हाळा आहे. मी म्हणते ती लहान नाहीए, पण मी तिला लहान समजून तिच्या चुकांवर पांघरूण घालत असते. मी खरं तर तिला १०-२० हजार रुपये द्यायचे असं ठरवलं होतं. ती म्हणाली होती की या महिन्याचा सगळा पगार इन्कम टॅक्स भरण्यात संपला म्हणून. आता घरखर्च कसा चालणार? पण खरं तर मार्च महिन्यात इन्कम टॅक्स भरायचा असतो हे का तिला माहीत नाही. लोक आधीपासून त्यासाठी तयारी करतात. अरे, पावसाळ्याची बेगमी तर पशूपक्षीही करूनच ठेवतात ना? पावसाळ्यासाठी आपली छत्री आपणच घ्यावी लागते. लोक थोडीच तुमच्यासाठी छत्री घेऊन ठेवतील? आपलं डोकं, आपलं शरीर जर ओलं होऊ द्यायचं नाही तर आपणच प्रयत्न केला पाहिजे. उपाय शोधला पाहिजे. मला नवल वाटलं. निमाकडे पैसे नसताना तिनं मॉलमधून पिशव्या भरभरून खरेदी कशी काय केली? शॉपिंगसाठी पैसे कुठून आले?

उमेशचं म्हणणं योग्यच आहे. मीच तिला बिघडवते आहे. खरं तर मी तिचे कान उपटून तिला योग्य मार्गावर आणायला हवं. काही नाती अशी असतात की ती तोडता येत नाहीत. पण त्यांचा उपद्रव मात्र फारच होतो. आपण नातं निभवायला बघतो, पण त्याचं रूप अक्राळ विक्राळ होतं, आपल्यालाच गिळू बघतं. आता चाळीशीला आलीय निमा. कधी तिच्या सवयी बदलणार? कदाचित कधीच ती तिच्या या चुकीच्या सवयी बदलणार नाही. तिच्यामुळे अनेकदा माझ्या संसारात कुरबुरी होतात, माझी घडी विस्कटते. कुणा दुसऱ्याच्या पाय पसरण्यामुळे माझी चादर, माझं अंथरूण मला पुरत नसेल तर त्यात माझाच दोष आहे. आपल्या अंथरूणात किंवा पांघरूणात मी कुणाला कशाला शिरू द्यावं? आईवडिलांना मुलांचा कान धरून समजावण्याचा, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार असतोच. अर्थात् एका ठराविक वयानंतर मुलं आईबाबांना जुमानत नाहीत अन् आईवडीलही त्यांना काही सांगू धजत नाहीत हा भाग वेगळा. तरीही चूक होत असेल तर सावध करण्याचा हक्क आईबापाला असतोच.

दुपार माझा विचार करण्यात गेली अन् सायंकाळी मी सरळ निमाच्या घराच्या दिशेनं चालू लागले. मानव कोचिंगक्लासला निघाला होता. त्याला त्याच वाटेनं जायचं होतं. मी त्याला वाटेत मला निमाकडे सोडायला सांगितलं. मुद्दामच मी तिला आधी फोन केला नाही. मला दारात बघून निमा एकदम स्तब्ध झाली.

‘‘ताई…तू?’’

निमानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘ताई, अगं फोन न करता कशी आलीस?’’

‘‘म्हटलं तुला आश्चर्याचा धक्का द्यावा. आत तरी येऊ देशील की नाही? दार अडवूनच उभी आहेस?’’

तिला हातानं बाजूला सारत मी आत शिरलेच. समोर कुणीतरी पुरूष बसलेला होता. बहुधा तिच्या ऑफिसमधला सहकारी असावा. टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल दिसत होती. हॉटेलातून मागवलेलं असावं. ज्या डब्यांमधून आलेलं होतं, त्यातूनच खाणंही सुरू असावं. ही निमाची फार जुनी अन् घाणेरडी सवय आहे. अन्न व्यवस्थित भांड्यांमधून काढून ठेवत नाही. सामोसे, वडे, भजी वगैरे तर सरळ बांधून आणलेल्या कागदी पाकिटातूनच खायला लागते. आम्हालाही तसंच देते. वर म्हणते, ‘‘शेवटी जाणार तर पोटातच ना? मग उगीच भांड्याचा पसारा कशाला? धुवायचं काम वाढतं.’’

मला बघून तो पुरूषही दचकला. भांबावला. त्याला नक्कीच वाटलं असेल की निमाची बहीण अगदीच गावंढळ आहे. बेधडक घरात शिरलीय.

मी ही पक्केपणानं म्हटलं, ‘‘अगं, हे हक्काचं घर आहे माझं. फोन करून येण्याची फॉर्मेलिटी कशाला हवी होती? एकदम मनात आलं, तुला भेटावं म्हणून, तर आले झालं…का गं, तुला कुठं बाहेर वगैरे जायचं नव्हतं ना?’’

मी मानभावीपणे म्हटलं, ‘‘मध्यंतरी तू म्हणाली होतीस, तुला बरं नाहीए…म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी वाटून मी आले.’’

‘‘हो…हो ना, हे माझे सहकारी विजय हेदेखील माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले आहेत.’’

माझ्या प्रश्नानं तिलाही दिलासा दिला. मी तब्येतीचा विषय काढताच तिला विजयच्या तिथं उपस्थित असण्याचं कारण सांगता आलं. एरवी ती दोघंही गोंधळली होती.

माझी बहीण आहे निमा. तिचे सगळे रंगढंग, तिच्या सवयी, तिचे रागलोभ मी चांगले ओळखते. लहानपणापासूनच तिचा चेहरा बघून ती काय करणार आहे, तिच्या मनात काय आहे, तिनं काय केलंय, हे सगळं मी ओळखतेय. माझ्याहून ती दहा वर्षांनी लहान आहे अन् माझी फार फार लाडकी आहे. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत मी घरातली एकुलती एक लेक होते. आईवडिल एका मुलीवरच संतुष्ट होते. पण मला मात्र एकटेपणा सहन होत नव्हता. नातलगांना, अवतीभोवती सर्वांना दोन दोन मुलं होती. प्रत्येकाला एक भावंड होतं. मीच एकटी होते. मोठ्यांमध्ये जाऊन बसलं की ते हाकलायचे, ‘‘जा आत. इथं कशाला बसतेस? आत खेळत बैस.’’ आता एकटी मी काय खेळू? कुणाशी खेळू? निर्जीव खेळणी अन् निर्जीव पुस्तक…मला कुणी तरी सजीव खेळणं हवं होतं. शेवटी मला भावंड आणायचा निर्णय आईबाबांना घ्यावा लागला.

भावंड येणार म्हटल्यावर आईबाबांनी मला समजवायला सुरूवात केली की येणाऱ्या बाळाची सर्व जबाबदारी माझ्यावर असणार आहे. मी स्वत:ला विसरून निमाचं सगळं बघायला लागले. तिच्यापुढे मला आपली सुखदु:ख, आपल्या इच्छा, अपेक्षा कशाचीही तमा वाटत नव्हती. दहाव्या वर्षीच मी एकदम जबाबदार, गंभीर अन् मोठी मुलगी झाले.

निमा केवळ माझ्यासाठी या जगात आली आहे किंबहुना माझ्यासाठीच तिला आणण्यात आलंय ही गोष्ट माझ्या मनावर इतकी खोल कोरली गेली होती की मी तिची आई होऊनच तिला सांभाळू लागले. आम्ही जेवत असताना तिनं कपडे ओले केले तर मी जेवण सोडून आधी तिचे कपडे बदलत असे. त्यावेळी आई उठत नसे. आता वाटतं, आईनं तरी माझ्यावर इतकी जबाबदारी का टाकली? तिचंही ते कर्तव्यच होतं ना की त्यांनी एक बहीण मला देऊन माझ्यावर उपकार केले होते? इतकं मोठं कर्ज माझ्यावर झालं की चाळीस वर्षं मी फेडतेय, फेडता, फेडता मी दमलेय तरी ते कर्ज फिटत नाहीए.

‘‘ताई ये, बैस ना,’’ अगदी अनिच्छेनंच निमा म्हणाली.

माझं लक्ष सोफ्यावर विखुरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांकडे गेलं. त्यावर त्याच मॉलचं नाव होतं, ज्याचा उल्लेख मानवनं केला होता. काही घालून काढून टाकलेले नवे डेसेसही तिथंच सोफ्यावर होते. बहुतेक त्यांची ट्रायल निमानं घेतली असावी किंवा ते घालून त्या तिच्या सहकाऱ्याला दाखवले असावेत.

माझ्या मेंदूनं दखल घेतली…हा माणूस कोण आहे? त्याचे अन् निमाचे संबंध कसे, कुठल्या प्रकारचे आहेत? त्यालाच हे कपडे घालून ती दाखवत होती का?

‘‘तुला ताप आला होता का? सध्या वायरलचीच साथ आहे. हवा बदलाचा परिणाम होतोच,’’ मी सगळे कपडे अन् पिशव्या बाजूला ढकलून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेत विचारलं.

तेवढ्यात तो पुरुष उठला, ‘‘बराय, मी निघतो,’’ त्यानं म्हटलं.

‘‘अहो बसा ना, निदान तुमचं खाणं तरी पूर्ण करा. निमा तूही बैस ना,’’ मी म्हटलं. तसं दचकून दोघांनी माझ्याकडे बघितलं.

‘‘तब्येतीची काळजी घ्या. येतो मी,’’ म्हणत तो निघून गेला. निमाही अस्वस्थपणे बसली होती.

‘‘अगं, आजारी होतीस तर हे असलं हॉटेलचं खाणं, त्यातूनही नूडल्स अन् मंचूरियन कशाला खातेस?’’ मी टेबलवरच्या डब्यांकडे बघत म्हटलं. डब्यात एकच चमचा होता म्हणजे दोघं एकाच चमच्यानं खात होती का?

‘‘हे बघ निमा, थोडं काम होतं तुझ्याकडे. म्हणून मी आलेय. फोनवर बोलणं मला प्रशस्त वाटेना. मला पैसे हवेत. मानसीच्या कोचिंगक्लाससाठी. तुझ्याकडून माझे एकूण चाळीस हजार रुपये येणं आहे. तू निदान पंधरा वीस हजार दिलेस तर माझी सध्याची गरज भागेल…’’

निमानं माझ्याकडे विचित्र नजरेनं बघितलं. जणू ती प्रथमच मला बघत होती…इतके दिवस मी पैसे कधीच परत मागितले नव्हते, त्यामुळेच ते परत करणं तिलाही गरजेचं वाटलं नव्हतं. मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. एक तर तिची छानशी संध्याकाळ बिघडवून टाकली होती अन् शिवाय ती विवाहबाह्य संबंधात अडकल्याचंही माझ्या लक्षात आलं होतं.

फार फार वाईट वाटतंय मला. आम्ही दोघी एकाच आईबापाच्या पोरी जन्माला येऊनही आम्हा दोघींमध्ये इतका फरक असावा? एकाच घरात वाढलो, एकच अन्न आम्ही खाल्लं, तरीही आमच्या अंगात वाहणाऱ्या रक्तानं असे वेगवेगळे परिणाम दाखवावेत?

‘‘अगं पण ताई, माझ्याकडे पैसे कुठाय?’’ निमा चाचरत म्हणाली.

‘‘का गं? इथं एकटीच राहतेस, घरभाडं बँक भरतेय. नवरा अन् मुलगा तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहतात. त्यांचा काडीचा खर्च नाही तुझ्यावर, तर मग सगळा पैसा जातो कुठे?’’

निमा अवाक् होती, सतत तिची बाजू घेणारी, तिला सतत चुचकारून घेणारी तिची ताई आज अशी कशी वागतेय? इतकं कसं बोलतेय? खरं तर निमाच्या वागणुकीमुळे तिचं कुटुंब अन् माझंही कुटुंब नाराजच असायचं. मीच तिच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी होते, कारण मनातून मला उगीचच आशा होती की अजूनही वेळ गेली नाहीए, निमा सावरेल, स्वत:ला बदलेल.

‘‘निमा, मला तुझ्यासारखी नोकरी नाही. नवरा देतो त्या पैशातून घर चालवून मी पैसे शिल्लक टाकते म्हणून पैसा जमतो. अक्षरश: एक एक रूपया करत पैसे जमवले आहेत मी. दोन्ही मुलांचे कोचिंग क्लास गरजेचे आहेत. तिथं भरपूर पैसे भरावे लागतात. तुझे पैसे नको देऊस, फक्त माझे पैसे परत केलेस तरी माझी गरज भागेल,’’ एवढं बोलून मी उठून उभी राहिले.

निमा पुतळ्यासारखी बसून होती. मी कधी अशी वागेन असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या आजच्या रंगीत सोनेरी संध्याकाळचा शेवट असा होईल अशी तर तिला कल्पनाही नसेल.

काय बोलणार होती ती? तिच्यासाठी मी भक्कम आधार होते. माझ्या आडोशाला येऊन ती अजयलाही गप्प बसवायची.

बिचारा अजय खरं तर पत्नीपीडित नवऱ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष शोभला असता. मला ते कळत होतं, पण बहिणीवरचं प्रेम मला ते वळू देत नव्हतं. मीच कमी पडले. निमाला आधीच ऐकवलं असतं तर बरं झालं असतं. ती चुकतेय हे मी का सांगू शकले नाही? मला वाईट वाटतंय, स्वत:चाच राग येतोय.

मला त्या घरात बसवेना. जीव गुदमरत होता. नकारात्मक लहरी सतत अंगावर आदळताहेत असं वाटत होतं. आज प्रथमच मला तिच्यापासून लांब लांब जावं असं वाटू लागलं. तिच्यात एरवी मला आईबाबाच दिसायचे…पण आज नाही दिसले.

‘‘निमा, येते मी…एवढंच काम होतं.’’

मी ताडकन् बोलून चालू लागले. रिक्षावाला समोरच भेटला. त्याला घराचा पत्ता सांगितला. गळा दाटून आला होता. डोकं गरगरत होतं. डोळेही भरून आले होते. डोळे पुसून मी मागे वळून बघितलं…निमा बाहेर आली नव्हती. मला बरंच वाटलं. आता ती पैसे परत करेल न करेल, पुन्हा मागणार नाही. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. मी दोन तीनदा दीर्घ श्वास घेतला. हलकं वाटलं. मनातून एक सकारात्मक विचार उमटला…आता नक्कीच निमा बदलेल. ती माझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें