कथा * सुधा काटे
वडिलांच्या आकस्मिक मृत्युची बातमी कळताच सीमाला ताबडतोब जावं लागलं. त्यांचं तेरावं आटोपून ती परत स्वत:च्या घरी परतल्यावर तिने लॅपटॉप उघडून फेसबुकवर लॉग इन केलं. फ्रेण्ड रिक्वेस्टवर क्लिक केलं अन् जे नाव समोर आलं, ते बघताच ती दचकली.
‘‘अगंबाई, हा तर शैलेश!’’ ती उद्गारली. इतकी वर्षं मध्ये गेल्यामुळे शैलेश तसा विस्मरणात गेला होता. पण ते नाव समोर आलं आणि तिला शैलेशबरोबर घालवलेले दिवस पुन्हा जसेच्या तसे आठवले.
दोघंही एकाच कौलेजचे विद्यार्थी होते. शैलेश अभ्यासात फार हुशार होता. शिवाय तो उत्तम गायक आणि वादक होता. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सीमा अन् तो नेहमीच गात असत. त्या दोघांमुळेच यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कॉलेजला नेहमीच बक्षीसं मिळायची. गाण्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने दोघं वरचेवर भेटायची.
एकदा सीमा आजारी पडली. आठ दिवस ती कॉलेजला जाऊ शकली नाही तेव्हा काळजी वाटून शैलेश तिचा पत्ता शोधत थेट घरीच येऊन धडकला.
अशक्तपणामुळे अजून पुढले आठ दिवस सीमा कॉलेजला जाऊ शकत नव्हती म्हणून त्याने स्वत:च्या नोट्स तिला दिल्या. अभ्यासही करवून घेतला. त्यामुळे सीमाला पेपर सोपे गेले अन् फर्स्टक्लास मिळाला. हा हुशार, कलाकार मुलगा अत्यंत कनवाळू अन् सज्जन आहे हे सीमाला जाणवलं.
हळूहळू त्यांची ओळख मैत्रीत बदलली. कॉलेजात ती दोघं आता सतत बरोबर असायची, त्यांच्याबद्दल कॉलेजात चर्चा चालायची. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ती आपल्यातच दंग असायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण प्रेमाला अजून अभिव्यक्ती नव्हती. फक्त ते त्यांना एकमेकांच्या डोळ्यांत दिसायचं. प्रेमाचा उच्चार झाला नव्हता.
तरीही प्रेमाची धुंदी होतीच. एकमेकांच्या आवडीनावडीचा विचार प्रामुख्याने केला जायचा. टळटळीत उन्हाच्या दुपारीही एकमेकांच्या संगतीत चांदणं पसरल्याचा भास व्हायचा. लोकांची पर्वा तर करण्याचा प्रश्नच नव्हता.
मनातल्या मनात भविष्यकाळाची स्वप्नं रंगवताना ती पूर्ण होतील की नाही हा विचारच त्या वेड्या वयात मनात येत नाही. प्रेमाची साद मनात, शरीरात भिनत असते. बाहेरच्या जगात शिशिर ऋतू असो की कुठलाही ऋतू असो, प्रेमिकांच्या मनात कायम वसंत फुललेला असतो. श्रावणसरीत चिंब भिजायला मन आसुसलेलं असतं. प्रेमाचे सप्तरंग सर्वत्र दिसत असतात.