- सुधा गुप्ते
बरेच दिवसात निमाशी माझ्या फोनवर संभाषण झालं नव्हतं. अनेकदा फोन करायचं ठरवलं अन् दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतल्यानं फोन करणं राहून गेलं. निमा माझी लाडकी धाकटी बहीण आहे.
‘‘मावशीची काळजी करू नकोस, अगं ती चांगलीच असेल ना? म्हणून तर तिचं रडगाणं गाणारा फोन आला नाहीए...काही प्रॉब्लेम असता तर तिचा नक्कीच फोन आला असता. रडत भेकत तिनं तुला आपली अडचण सांगितलीच असती.’’ मानवनं माझ्या मुलानं हसत हसत मला टोमणा दिला. धाकट्या मानसीनं हसून त्याला अनुमोदन दिलं. तिनं त्याला हसत हसत दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘बकअप’ केल्याचं मी बघितलं.
हल्लीची मुलं खरोखरंच हुषार अन् जागरूक आहेत. त्यांच्या वयात आम्हाला एवढी समजूत नव्हती हे मान्य करावंच लागेल. नातलगांविषयी एवढं ज्ञान आम्हाला नव्हतं. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला ते खरं वाटायचं, पटायचं. शिवाय एकत्र कुटुंबात मुलांचा संबंध फक्त मुलांशीच यायचा. घरातल्या मोठ्या माणसांचे आपापसातले हेवेदावे, रागलोभ किंवा प्रेम, आदर, त्याग वगैरे आमच्यापर्यंत पोहोचत नसे. आता चार माणसांच्या कुटुंबात कुणी कपाळावर किती आठ्या घातल्या, कुणी कुणावर डोळे वटारले हे सगळ्यांच्या लक्षात येतंच.
‘‘अगं आई, काल मी मावशीला मॉलमध्ये बघितलं. कदाचित बँकेतून लवकर बाहेर पडली असेल. केवढी ढीगभर खरेदी केलेली होती? दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या. तिच्या दोन कलिग्जपण होत्या सोबत.’’
‘‘तुझ्याशी बोलली का?’’
‘‘नाही गं! मी थर्डफ्लोअरला होतो अन् मावशी सेकंड फ्लोअरला होती.’’
‘‘पण ती मावशीच होती कशावरून? दुसरी कुणी असू शकते. तू वरून खाली कसं बघितलंस?’’
‘‘म्हणजे काय? मी काय आंधळा आहे का? अन् वरून खालचं व्यवस्थित दिसतं. चांगली हसत खिदळत होती. तुला फोन करते तेव्हा मात्र सतत रडत असते. मला असं होतंय, माझे पैसे संपले. मला पैशांची अडचण आहे. आनंदाचे क्षण शेयर करताना तिला तुझी आठवण येत नाही अन् थोडाही प्रॉब्लेम आला की रडत तुझ्याकडे येते. अशा माणसांची काळजी कशाला करायची, सोड तिची काळजी करणं. तिचा फोन नाही आला याचाच अर्थ सगळं काही ठीकठाक चाललंय...’’