या वळणावर, अशा अवेळी

कथा * नीता दाणी

मोबाइलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर अन् नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. दहा मिनिटातच तिच्या लॅण्डलाइन फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता…क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं…पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं.

मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डबा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर अन् एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा करून घ्यायची. टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे. काही मेंदूपर्यंत पोहोचायचे अन् काही कळायचेही नाहीत. झोप येईपर्यंत टीव्ही सुरू असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळीभाजी गरम करून ती जेवायची अन् मग झोप!

पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. दचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, ‘‘कोण आहे?’’ काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कुणीच दिसलं नाही.

कंपाउंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली, तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुणा वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं. अन् ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिने घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती.

संध्याच्या नवऱ्याच्या मृत्युला बरीच वर्षं झालीत. दोन्ही मुलींची लग्नं झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच पण बरीच लांब राहाते. संध्याची नोकरी चांगली आहे. भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा अन् एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर, स्काइपवर बोलणं होतं. पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधी तरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो.

एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं. तिने पत्र घेतलं, कुलूप उघडून ती घरात आली. सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं.

‘‘संध्या, फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणं गरजेचं आहे.

आमच्या चार वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यांनेच वाढवलंय. मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही. पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं. माझा मुलगा वारंवार मला म्हणतो, आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वत:ची सहचरी म्हणून निवडावी. एकटं राहू नये. म्हणूनच या वयात मी असा विचार करू धजलो आहे. दोन वर्षांत मी रिटायर होतोय. भरपूर पेन्शन मिळेल. त्याखेरीज जंगम स्थावर प्रॉपर्टी आहे. देवदयेने आरोग्य उत्तम आहे. नियमित आहार, विहार, विश्राम, व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करताहेत.

सध्या फक्त तुमचाच विचार सतत मनात असतो. लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तिला आनंदी राहाण्याचा, प्रेम मिळवण्याचा अन् आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. उणेअधिक लिहिले असल्यास क्षमस्व!’’

पत्र वाचताना तिचं हृदय धडधडत होतं. हात कापत होते. पत्र वाचून तिने बाजूला सारलं. लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट अन् प्रामाणिक होत्या. त्यामुळे ती भारावली होती.

रात्री जेवण झाल्यावर तिने टीव्ही लावला तेवढ्यात मोबाइल वाजला. तिने म्हटलं, ‘‘क्षमा करा, तुम्हाला वाटतंय तसं घडू शकणार नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी अन् संतुष्ट आहे. मी एकटी नाही, माझं कुटुंब आहे.’’ तिने एवढं बोलून फोन स्विच ऑफ केला. टीव्ही बंद करून अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा झोप लागली.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं आवरून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकली. ती दचकली.

‘‘तुम्ही?’’

‘‘होय मीच! यावंच लागलं मला. तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात? आधी ‘हो,’ आता ‘नाही’ बोलत नाही. फोन उचलंत नाही, आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना?’’

संध्या त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. कशीबशी बोलली, ‘‘माझं चुकलंच, या वयात हे मला शोभणार नाही. मला घरी लवकर जायचंय.’’ पुढे तिला बोलवेना.

‘‘लोक काय म्हणतील या काळजीनेच तुम्ही स्वत:ला असं कोंडून घेताय…मला माहीत आहे.’’

‘‘प्लीज, मला एकटं सोडा. मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाहीए.’’ संध्या चिडचिडून म्हणाली.

घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली. चहाची नितांत गरज होती. पण उठून चहा करून घेण्याचीही शक्ती वाटत नव्हती. त्याक्षणी तिला रडू कोसळलं. ती शेखरशी खोटं बोलली होती. ‘मी एकाकी नाही, माझं कुटुंब आहे.’ खरं तर ती अगदी एकाकीच होती.

एकदा एका पार्टीला संध्या मोकळे केस सोडून, थोडा मेकअप करून गेली होती. तिच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी तिला म्हटलं होतं, ‘‘संध्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. वयाच्या मानाने दहा वर्षांनी तरुण दिसतेस. तब्येतही निरोगी आहे. तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर.’’

संध्या त्यावेळी घाबरली होती. स्वत:च्या प्रशंसेने संकोचली होती. पण दोन चार दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला अन् लग्नाचं प्रपोजल तिच्यापुढे मांडलं.

शेखरने स्वत:ची सर्व माहिती तिला व्यवस्थित दिली. तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो. पत्नीला जाऊन खूप वर्षं झालीत. एकच मुलगा आहे तो डॉक्टर आहे. त्याचं लग्न झालंय. तो दोन मुलांचा बाप आहे. मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे. त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वत:साठी एक जीवनसंगिनी शोधावी.

त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली. शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले. कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची. कधी फोन उचलायचीच नाही. कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे.

मौनातला होकार शेखरला कळत होता, पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता.

संध्याला सासरचे कुणीच नातलग नव्हते. माहेरी वडील अन् दोघे विवाहित भाऊ होते. तिने वहिनीशी शेखरसंदर्भात चर्चा केली. तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळली. कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता. वडील तर संतापून म्हणाले, ‘‘अगं, तुझं वय मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचं आहे. लग्न अन् संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू? रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर. या वयात नव्या बंधनात अडकण्याची अवदसा कशी आठवली तुला?’’

घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या अन् म्हणाली, ‘‘तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचरी निवडा…मी अशीच एकटी बरी आहे.’’

त्यानंतरही शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याचे फोन येणं बंद झालं होतं. दिवस उलटत होते. आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या रूक्ष, कोरड्या वागण्याने शेखर दुखावले गेले का? की शेखरचंच मन बदललं? तेच बरं म्हणायचं…आता या वयात कुठली नाती नकोतच.

पण दुसरं मत म्हणे, स्वत:हून तू फोन कर. फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले अन् एक दिवस शेवटी तिने एक मिस कॉल दिलाच. त्यावेळीही तिचं हृदय जोरात धडधडत होतं.

तिच्या मोबाइलवर ताबडतोब मेसेज आला, ‘‘मी फार काळजीत आहे, सध्या फोन करू शकत नाही.’’

तिने उलट मेसेज पाठवला, ‘‘काय झालं? कसली काळजी?’’ पण उत्तर आलं नाही.

दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्याप्रमाणे कामाला लागली. उगीचच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं. अचानक एकदा मोबाइलची घंटी वाजली. फोन शेखरचा होता. त्याने सांगितलं की त्याचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदतकार्यासाठी गेला असताना स्वत:च गंभीर आजारी झाला. उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलाय. आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. मधल्या काळात फार काळजी वाटत होती. धावपळ फार झाली. वेळ मिळत नव्हता. तुम्ही कशा आहात? स्वत:ची काळजी घ्या. बाय, फोन ठेवतो. हॉस्पिटलला जायचंय. त्यानंतर संध्याला फोन आला नाही. तिनेही केला नाही.

एकदा सायंकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली. डोळ्यांपुढे अंधारी आली अन् एक किंकाळी फोडून ती वाहनासहित जमिनीवर आदळली. पुढे काय झालं ते तिला कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा ती इस्पितळात होती.

तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला. दोघीतिघी लगेच आल्या. तिच्यावरचे उपचार जाणून घेतले. औषधं आणली अन् तिला घरी घेऊन आल्या. तिला खायला घातलं, गोळ्या दिल्या. रात्री व सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळच्या टेबलवर मांडून ठेवल्या अन् मग त्या परत गेल्या. ‘‘आठ दिवस रजा घे. आम्ही सर्व सांभाळू,’’ असं बजावून त्या गेल्या.

संध्याच्या सर्वांगाला भरपूर मुका मार लागला होता. वेदनाशामक गोळी व झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली. सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं. सर्वांग ठणकत होतं. सणसणून ताप भरला होता. अंथरुणातून उठवत नव्हतं. पण फोन वाजत होता. तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला.

‘‘हॅलो संध्या, कशा आहात तुम्ही?’’ त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली. तिला एकदम भरून आलं. ‘‘ताप आलाय, झोपून आहे, अपघात झाला.’’ दाटल्या कंठाने तिने म्हटलं अन् फोन तिच्या हातातून गळून पडला.

तिने कसाबसा चहा करून घेतला. दोन बिस्किटं अन् चहा संपवून तापाची अन् अंगदुखीवरची गोळी घेऊन ती पडून राहिली. गोळी अन् तापाची गुंगी यामुळे किती वेळ गेला ते तिला कळलं नाही पण दारावरच्या घंटीच्या आवाजाने तिला जाग आली.

दरवाजा उघडला अन् दारातल्या व्यक्तिला बघून ती एकदम दचकली, बावरली अन् लाजलीही. झोपेतून उठून आल्यामुळे साडी अन् केस अस्ताव्यस्त होते.

कशीबशी म्हणाली, ‘‘तुम्ही…?’’

‘‘आता तरी येऊ द्या,’’ शेखरने म्हटलं.

ती पटकन् दारातून बाजूला झाली. तिच्या हातापायावरच्या मुक्या माराच्या खुणांकडे बघत तो म्हणाला, ‘‘जबरदस्त अॅक्सिडेंट झालाय…अरे? तुम्हाला भरपूर तापही आहे?’’ तिच्या कपाळाला अन् मनगटाला हात लावून त्याने म्हटलं.

‘‘तुम्ही अशाच गाडीत बसा. डॉक्टरकडे जाऊन येऊ.’’ त्याच्या शब्दाला संध्याला नाही म्हणवेना.

शेखरचे डॉक्टर छान होते. त्यांनी संध्याला अधिक परिणामकारक औषधं दिली. कशी अन् केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं.

शेखरने  तिला घरी आणून सोडली. तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वत: सांजा तयार केला. तिला दुधाबरोबर खायला घातला. गोळ्या दिल्या. संध्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं.

‘‘आता शांतपणे पडून राहा, झोप लागेल तुम्हाला. झोपून उठल्यावर खाण्यासाठी काही तरी करून ठेवतो अन् लॅचचं दार ओढून घेऊन मी जातो. काहीही गरज भासली तर ताबडतोब फोन करा. संकोच करू नका.’’ एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला. बायकोविना इतकी वर्षं काढली होती. त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता.

शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं, तिची काळजी घेणं, त्याचा तो ओझारता स्पर्श पुन:पुन्हा आठवत होता. तिच्या एकाकी, नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता.

संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली. एक दिवस तिच्या मुलीचा स्वप्नाचा फोन आला. तिच्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उधाण आलं. नातवाच्या, लेकीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली.

त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं. ‘‘आई, हा शेखर कोण आहे?’’ स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम दचकली.

‘‘कलीग आहेत.’’ संध्याने तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

‘‘तुझ्या मोबाइलवर त्यांचे कॉल्स बघितले.’’

संध्याने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिचं बावरलेपण, हातांची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोखून बघत राहिली.

एकदा रात्री अकरा वाजता संध्याच्या मोबाइलची रिंग वाजली. तिने पटकन् मोबाइल उचलला अन् ‘‘सध्या नातू, मुलगी आलेली आहेत,’’ असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधीच शेखर बोलला,

‘‘फारच छान! मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वत: येऊन तिच्याशी बोलतो.’’

‘‘नको…नको.’’ संध्या घाबरली. तिने फोन स्विच ऑफ केला.

आईचा चेहरा अन् थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारलं, ‘‘एवढ्या रात्री कुणाचा फोन होता, ममा?’’

उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली.

‘‘काय झालं, ममा? तू अशी बावरलेली, अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?’’ संध्याने मानेनेच नकार दिला.

संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला. स्वप्नाला सांगावं का? तिची प्रतिक्रिया काय असेल? आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का? सगळं ऐकून घेतल्यावर ती अन् स्वप्ना सहज मोकळेपणाने आपसांत बोलू शकतील का? संध्याची फार तडफड होत होती. आपल्या भावना, आपली नवी मैत्री, त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कुणाशी तरी शेयर करायची इच्छा होती पण समाजाची भीती, मुलींचा तुटकपणा यामुळे ती फार तणावात होती.

स्वप्नाने पुन:पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं. पण तिचा कठोर चेहरा अन् एकूणच आविर्भाव बघून ती घाबरी झाली.

‘‘ममा, तुला कुणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करतंय. तुला कळत नाहीए, तू फार साधी, सरळ आहेस. तुझी नोकरी, घर, पैसा बघून तुला कुणी तरी जाळ्यात ओढायला बघतंय. आता त्याचा फोन आला तर मला दे. चांगली फायर करते त्याला.’’

‘‘अगं पण बाळा, आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत. माझ्या नोकरी, प्रॉपर्टीशी त्यांना काहीच देणंघेणं नाहीए…’’

‘‘पण ममा, आता या वयात तुला हे नवं खूळ काय सुचतंय? अगं, किती तरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहताहेत पण म्हातारपणी कुणी लग्न करत नाहीत. ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील? किती चेष्टा करतील ते…अन् शिवाय, आम्ही आहोत ना तुला? काही दु:ख, त्रास असेल तर आम्हाला सांग ना…कुणातरी बाहेरच्याला काही तरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची?’’ स्वप्ना संतापून बोलत होती. अधिकच रागाने बोलली, ‘‘अन् हे जर राहुलला, तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटतेय तर त्याला काय वाटेल?’’

संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यांत पाणीच आलं.

स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली, ‘‘आई, मी लवकरच पुन्हा येईन, रिटायरमेंटनंतर तू माझ्याकडेच राहायचंस…ठरलं…’’

संध्या फक्त उदास हसली.

‘‘मी कोमललाही सांगितलंय. तीही इथे येणार आहे.’’

‘‘बरं!’’

स्वप्ना गेली अन् घर एकदम रिकामंरिकामं, उदास झालं. स्वत:ला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली. शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती.

कोमल, तिचा नवरा नीरज अन् मुलगी रेखा घरी आले अन् संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाउन निघालं. अधूनमधून संध्या रजा टाकायची, मग सिनेमा, बाहेर भटकणं, शॉपिंग, हॉटेलिंग असा भरगच्च कार्यक्रम असायचा. संध्या आनंदात होती.

‘‘आई, हे शेखर कोण आहेत?’’ कोमलने खट्याळपणे हसत विचारलं.

संध्या एकदम स्तब्ध झाली, कोमेजली. आता कोमलही कठोरपणे बोलेल.

‘‘मला स्वप्नाताईने सांगितलं होतं.’’

संध्या कासावीस झाली. बोलणं सुधरेना.

‘‘ममा, अगं, ही तर फारच छान गोष्ट आहे. आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब असतो. पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही. अशावेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल. स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल. ते माझ्याकडे लागलं. तू शेखर अंकलना अन् त्यांच्या मुलाला घरी बोलावून घे. नीरजनाही त्यांना भेटायचं आहे.’’

संध्या लेकीकडे डोळे विस्फारून बघतंच राहिली. कोमलनेच शेखरला फोन करून सायंकाळी घरी येण्याचं आमंत्रण दिलं.

सुर्दैवाने शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता. त्या संध्याकाळी संध्या, नीरज, कोमल, शेखर व डॉ. अमोल अशी सर्व एकत्र जमली. मोकळेपणाने गप्पा झाल्या. चहा, फराळ आटोपला.

डॉ. अमोल म्हणाला, ‘‘माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलंय. आता त्यांनाही सुख मिळावं, प्रेमाचं, हक्काचं माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी इथे आलोय..’’

संध्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोमल अन् नीरजला शेखर अंकल अन् डॉ. अमोल एकदम पसंत पडले होते. त्यांच्याकडून या नात्याला होकार होताच.

डॉ. अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘मावशी, आता मनात कुठलाही किंतू बाळगू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आयुष्याच्या या वळणावर माझे बाबा तुझी वाट बघताहेत. त्यांना सोबत कर. मी अन् माझ्या दोघी बहिणी कोमल अन् स्वप्ना…सतत तुमच्या मदतीला असू.’’

‘‘खरंय आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हसा बरं? आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यातच सामावला आहे.’’ नीरजने म्हटलं. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली. शेखरही सुखावला. सगळेच आनंदात होते.

चल, आपण कॉफी घेऊयात

कथा * मीना वाखले

वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ई मेल वाचून, तोही दहा वर्षांनी प्रथमच आलेला ई मेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं… का? का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, ‘‘मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी…पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना?’’ हसून वैदेही म्हणायची, ‘‘खोटारडा कुठला…अन् भित्रासुद्धा’’ आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाललाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता… तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन् गेलाच होता तर आज ई मेल कशाला केला?

वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या सौरवने, ‘‘आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो, प्लीज कम अॅण्ड सी मी. विल अपडेट यू द टाइम प्लीज गिव्ह मी योअर नंबर. विल कॉल यू.’’

वैदेहीला कळेना, त्याला नंबर द्यावा की न द्यावा? इतक्या वर्षांनंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य? आज मारे ईमेल करतोए पण दहा वर्षांत भेटायची एकदाही इच्छा झाली नाही? मी जिवंत आहे की मेलेय याची चौकशी करावीशी वाटली नाही? आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन् प्रश्न…पण उत्तर एकाचंही नाही.

पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला? खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

दहा वर्षांपूर्वी ‘फोम द शॉपिंग मॉल’च्या समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्याने ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही ‘हेल्प..हेल्प..’ म्हणून ओरडत होती. पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणी तरी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला.

वैदेहीच्या पायाला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहात होतं. वेदनेने ती तळमळत होती. टफिक जाम झाला होता. त्याच जाममध्ये सौरभही अडकलेला. एक भारतीय मुलगी बघून तो मात्र पटकन् गाडीतून उतरला. वैदेहीला उचलून आपल्या ब्रॅण्ड न्यू स्पोर्ट्स कारमध्ये ठेवली अन् तडक हॉस्पिटल गाठलं.

एव्हाना वैदेहीची शुद्ध हरपत आलेली. कुणीतरी उचललंय, त्याच्या अंगात लेमन यलो रंगाचा टीशर्ट आहे एवढंच तिला अंधुकसं कळलं अन् ती बेशुद्ध झाली.

परदेशात तर नियम आणखी वेगवेगळे असतात. पोलिसांनी सौरभला भरपूर पिडलं. एक भारतीय मुलगी या पलीकडे त्याला वैदेहीची काहीही माहिती नव्हती. त्यानेही केवळ भारतीय असण्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. चारपाच तासांनी जेव्हा वैदेही शुद्धीवर आली तेव्हा तो तिथेच तिच्या बेडजवळ बसलेला तिला दिसला. वैदेहीच्या एका पायाला जखम झाली होती. दुसरा पाय फ्रॅक्चर झाला होता. मोबाइलही तुटला होता. सौरभ ती शुद्धीवर कधी येतेय याचीच वाट बघत होता. तिच्या घरी या अपघाताची बातमी पोहोचवायला हवी होती.

डोळे उघडल्यावर एकूण परिस्थितीचं आकलन व्हायला थोडा वेळ लागला. त्यावेळी तिने त्याच्याकडे नीट बघितलं. दिसायला साधासाच होता. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. कदाचित त्याचं निर्मळ हृदय अन् माणुसकीची जाण त्यामुळेच त्याने वैदेहीला इस्पितळात आणलं होतं.

ती शुद्धीवर आल्याचं लक्षात येताच तो म्हणाला, ‘‘बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात…मी काळजीत होतो, अजून किती वेळ इथे बसून राहावं लागेल म्हणून…मी सौरभ…’’

वैदेही काहीच बोलली नाही.

त्याने तिच्या घरच्यांपैकी कुणाचा तरी नंबर मागितला. तिने आईचा फोन नंबर दिला. त्याने ताबडतोब त्या नंबरवर वैदेहीच्या अपघाताची व तिला कुठे अॅडमिट केलंय त्या इस्पितळाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना ‘बाय पण केलं नाही,’ वैदेहीने त्याचं नाव ‘खडूस’ ठेवलं.

वैदेहीचे आईबाबा इस्पितळात आले. वैदेहीने त्यांना सगळी हकिगत सांगितली. तो कोण, कुठला काहीच तिला ठाऊक नव्हतं. त्याने स्वत:चा मोबाइल नंबर तिला दिला नव्हता की तिच्याकडून तिचा नंबर घेतला नव्हता. त्यामुळे आता भेटण्याची शक्यता नव्हतीच.

तीन-चार दिवस इस्पितळामध्ये काढल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं. अजून पंधरा दिवस बाहेर जाता येणार नव्हतं. तिने मैत्रिणीला (ऑफिसमधून रजा घ्यायची म्हणून) फोन करायचा म्हटलं, तर मोबाइल होता कुठे? तिला आठवलं तो सौरभच्या हातात बघितला होता. तो जाताना तिला द्यायला विसरला की मुद्दामच दिला नाही? झालं…आता सगळे कॉण्टॅक्ट नंबर्स गेले. तिला एकदम आठवलं त्याने स्वत:च्या मोबाइलवरून आईला फोन केला होता. आईच्या मोबाइलमध्ये कॉल्स चेक केले अन् त्याचा नंबर सापडला.

तिने ताबडतोब फोन लावला अन् आपली ओळख देत तिचा मोबाइल परत करण्याची विनंती केली. तो म्हणाला, ‘‘मोबाइल मी परत करणारच आहे पण असा फुकटाफाकटी नाही. मला जेवण पाहिजे. उद्या संध्याकाळी येतो…पत्ता सांगा.’’

बाप रे…घरी येणार? हक्काने जेवायला? काय माणूस आहे? पण मोबाइल तर हवाच होता. मुकाट पत्ता सांगितला.

दुसऱ्यादिवशी दस्तूरखुद्द सौरभ महाशय दारात हजर होते. आल्या आल्या सर्वांना आपली ओळख करून दिली. सर्वांशी ओळख करून घेतली. आल्या आल्या मोकळपणाने वागून घरात असा काही रमला जणू फार पूर्वीपासूनची ओळख असावी. वैदेहीला हे सगळं विचित्रही वाटत होतं आणि आवडतही होतं. आई, बाबा, धाकटी भावंडं सर्वांनाच तो आवडला. मुख्य म्हणजे त्याने वेळेवर केलेल्या मदतीमुळेच वैदेही सुखरूप हाती लागली होती. त्याच्या व्यतिमत्त्वात एक गोडवा होता. त्याचं बोलघेवडेपण हे त्याच्या निर्मळ मनाचं प्रतीक होतं.

सिंगापूरमध्ये तो एकटाच राहात होता. एका कार डिस्ट्रीब्यूशन कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच त्याला रोज नवी कार टेस्ट ड्राइव्हसाठी मिळत होती. ज्या दिवशी त्याने वैदेहीला मदत केली होती त्यावेळीही तो नवीन स्पोर्ट्स कारच्या टेस्ट ड्राइव्हरच होता. त्याचे आईवडील भारतात असतात. हळूहळू तो घरच्यासारखाच झाला. थोडा हट्टी होता, पण भाबडाही होता. हवं तेच करायचा. पण ते करण्यामागची भूमिका खूप छान समजावून सांगत असे. स्वत:च्या नकळत वैदेही त्यात गुंतत चालली. तिला कळलं होत, सौरभच्या मनातही तिच्यासाठी खास स्थान होतं.

सौरभच्या ऑफिसच्या जवळपास ऑर्चर्ड रोडला वैदेहीचंही ऑफिस होतं. पंधरा दिवसांनी वैदेही ऑफिसला जाऊ लागली. तिची नेण्याआणण्याची जबाबदारी सौरभने स्वत:हून स्वीकारली. कारण अजून पायाचं फ्रॅक्चर दुरुस्त झालेलं नव्हतं. आईबाबांना त्याच्या या मदतीचं कौतुक वाटलं, कृतज्ञताही वाटली.

सौरभची ओळख होऊन सहा महिने झाले होते. तिचा बाविसावा वाढदिवस होता. त्याच दिवशी सौरभने तिला प्रपोज केलं होतं. त्याची प्रपोज करण्याची पद्धतही आगळीवेगळी होती. बहुतेक लोक आपल्या प्रेयसीला पुष्पगुच्छ, अंगठी, नेकलेस किंवा घड्याळ अथवा चॉकलेट देत प्रपोज करतात. सौरभने कारचं एक नवीन अगदी सुबक असं मॉडेल तिच्या हातात ठेवत विचारलं होतं, ‘‘पुढल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास तू माझ्याबरोबर करशील?’’ त्यांच्या डोळ्यांतून, त्याच्या देहबोलीतून तिच्याविषयीचं प्रेम तिला दिसत होतं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले अन् तिच्या डोळ्यांत बघत परत तोच प्रश्न केला. वैदेहीचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. त्या क्षणी तिला काहीच बोलणं सुधरेना. त्याच्यापासून दूर होत तिने म्हटलं, ‘‘मलाही तुला काही सांगायचंय, उद्या तू बरोबर पाच वाजता ‘गार्डन बाय द वे’मध्ये भेट.’’

ती संपूर्ण रात्र वैदेहीला झोप लागली नाही. सौरभ, त्याने प्रपोज करणं, अजून तिला पुढलं शिक्षणही घ्यायचं आहे. नोकरी, करिअर खूप काही करायचंय. अजून वयही फक्त बावीस वर्षांचं आहे. सौरभ अजून तसा लहान म्हणजे पंचवीस वर्षांचाच आहे, पण ती त्याच्या आकंठ प्रेमात आहे. तिला त्याच्याबरोबरच पुढचं सर्व आयुष्य घालवायचं आहे. पण अजून थोडा वेळ हवाय तिला. खरं तर कधीपासून हे सगळं तिला सौरभला सांगायचं होतं. पण तेच नेमकं सांगता आलं नव्हतं.

बरोबर सायंकाळी पाच वाजता ती ‘गार्डन बाय द वे’ला पोहोचली. सौरभ आलेला नव्हता. तिने त्याचा फोन लावला तो स्विच ऑफ आला. ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. अर्ध्या तासाने फोन केला तरीही ऑफ…वैदेहीला काय करावं कळेना. प्रथम तिला राग आला. सौरभ असा बेजबाबदारपणे कसा वागू शकतो? आठ वाजायला आले अन् फोन लागेना तेव्हा मात्र तिच्या मनात शंकाकुशंकांनी थैमान मांडलं. काय झालं असावं? ती रडकुंडीला आली. फोन लागलाच नाही अन् त्यानंतर कधीच सौरभचा फोन आला नाही.

दोन वर्षं वैदेही त्याच्या फोनची, त्याची वाट बघत होती. शेवटीआईबाबांनी तिच्यासाठी पसंत केलेल्या मुलाशी आदित्यशी ती विवाहबद्ध झाली. त्याची स्वत:ची ऑडिटिंग फर्म होती. आईवडिलांसह तो सिंगापूरमध्येच राहात होता.

लग्नानंतरही सौरभला विसरायला तिला फार वेळ लागला. कधी ना कधी, कशावरून तरी त्याची आठवण यायचीच. आता कुठे जरा ती सावरली होती तोवर तो असा अचानक आलाय…आता काय हवंय त्याला?

विचारांच्या गुंत्यात हरवलेली वैदेही फोनच्या घंटीने दचकून भानावर आली. नंबर माहितीचा नव्हता. हृदय जोरात धडधडू लागलं…सौरभचाच असावा. भावना अनावर झाल्या. फोन उचलून हॅलो म्हटलं, पलीकडे सौरभच होता. त्याने विचारलं, ‘‘इज दॅट वैदेही?’’ त्याच्या आवाजाने ती मोहरली. अंगभर झणझिण्या उठल्या.

स्वत:ला संयमित करून तिने म्हटलं, ‘‘या..दिस इज वैदेही,’’ मुद्दामच न ओळखल्याचं नाटक करत म्हणाली, ‘‘मे आय नो हूज स्पीकिंग?’’

‘‘कमाल करतेस? मला ओळखलं नाहीस, अगं मी सौरभ…’’ तो नेहमीच्याच स्टाइलने बोलला.

‘‘ओह!’’

‘‘उद्या सायंकाळी पाच वाजता ‘मरीना वे सॅण्डस होटेल’च्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये भेटायला येशील, प्लीज?’’

काही क्षण विचार करून वैदेही उत्तरली, ‘‘हो, तुला भेटायचंय मला. उद्या पाच वाजता येते मी.’’ तिने फोन कट केला.

या क्षणी जर संभाषण वाढलं असतं तर तिचा सगळा राग, सगळा संताप सौरभवर कोसळला असता. तिच्या मनात उठलेल्या वादळाची कल्पनाच कुणी करू शकणार नाही. तिच्या मनात सौरभविषयी प्रेम होतं की राग? त्याला भेटायला ती उत्सुक होती की भेट तिला टाळायची होती? कदाचित दोन्ही असेल…तिचं तिलाच काही कळत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी ती बाहेर जाण्यासाठी आवरत असताना आदित्यने, तिच्या नवऱ्याने विचारलं, ‘‘कुठे निघालीस?’’

‘‘सौरभ आलाय सिंगापूरला…त्याची इच्छा आहे मला भेटायची,’’ वैदेहीने सांगितलं.

‘‘जाऊ की नको जाऊ?’’ तिने आदित्यालाच प्रश्न केला.

‘‘जा ना, जाऊन ये. रात्रीचं जेवण आपण घरीच एकत्र घेऊयात,’’ आदित्यने म्हटलं.

आदित्य सौरभविषयी ऐकून होता. वैदेहीला त्याने संकटात केलेली मदत, त्याचा आनंदी स्वभाव, आर्जवी बोलणं, वैदेहीच्या माहेरी तो सर्वांच्या लाडका होता हेही आदित्यला ठाऊक होतं. त्यामुळेच सौरभला भेटणं यात त्याला काहीच वावगं वाटलं नाही.

फिकट जांभळ्या रंगाच्या सलवार सुटमध्ये वैदेही सुरेख दिसत होती. तिचे लांबसडक केस तिने मोकळे सोडले होते. सौरभला आवडणाराच मेकअप तिने केला होता. हे सगळं तिने मुद्दाम केलं नव्हतं, अभावितपणेच घडलं होतं. अन् मग तिला स्वत:चाच राग आला…की ती सगळं सौरभला आवडणारंच करतेय? सौरभ तिच्या आयुष्यात इतका खोलवर रूतला होता हे तिला आता जाणवलं. त्याच्यात असं गुंतून चालणार नाही हे तिला कळत होतं पण वेडं मन तिच्या ताब्यातच नव्हतं.

बरोबर पाच वाजता ती मरीना बाय सॅण्ड्सच्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये पोहोचली. सौरभ तिच्या आधीच येऊन बसला होता. तिला बघताच तो खुर्चीतून उठला अन् त्याने वैदेहीची गळाभेट घेतली. ‘‘सो नाइस टू सी यू आफ्टर अ डिकेड…यू आर लुकिंग गॉर्जियस.’’

वैदेही अजूनही विचारातच होती. पण हसून म्हणाली, ‘‘थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट…आय एम सरप्राइज टू सी यू अॅक्चुअली.’’

सौरभला कळलं तिला काय म्हणायचंय ते. त्याने म्हटलं, ‘‘तू मला क्षमा केली नाहीस…कारण मी त्या दिवशी कबूल करूनही तुला भेटलो नाही. पण नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतल्यावर तुझा राग अन् गैरसमजही दूर होईल.’’

‘‘दहा वर्षं म्हणजे अगदी लहानसा काळ नाही. काय घडलं होतं तेव्हा?’’

एक दीर्घ श्वास घेत सौरभने सांगायला सुरूवात केली. ‘‘ज्या दिवशी मी तुला भेटायला येणार होतो त्याच दिवशी आमच्या कंपनीच्या बॉसला पोलिसांनी पकडून नेलं. स्मगलिंग करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. टॉप लेव्हल मॅनेजरलाही रिमांडवर ठेवलं होतं. आमचे फोन, आमचे अकाउंट सगळं सगळं सील करून टाकलं होतं. तीन दिवस सतत विचारपूस चालली होती अन् नंतर कित्येक महिने आम्ही तुरुंगात होतो. दोन वर्षं केस चालली. आम्ही खरं तर अगदी निरपराध होतो, पण तुरुंगात खितपत पडावं लागलं. शेवटी एकदाचे आम्ही निरपराध आहोत हे सिद्ध झालं पण आम्हाला इथून लगेच डिपॉर्ट केलं गेलं. ते दिवस कसे काढले, आमचं आम्हाला ठाऊक!

‘‘आजही आठवण आली की घशाला कोरड पडते. जेव्हा मी भारतात, मुंबईला पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मोबाइल नव्हता. कुणाचेही कॉण्टॅक्ट नंबर्स नव्हते. घरी गेलो तेव्हा आई फार सीरियस असल्याचं कळलं. माझा फोन बंद असल्यामुळे घरचे लोक मला कळवूच शकले नव्हते. तिथली परिस्थिती अशी काही विचित्र होती की मी काहीच बोललो नाही. आईने माझ्यासाठी मुलगी बघून ठेवली होती. मरण्यापूर्वी आईला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. घरीच भटजी बोलावून लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी आई देवाघरी गेली.

‘‘माझी पत्नी फार चांगली निघाली. तिने मला समजून घेतलं. माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माझं पोलीस रेकॉर्ड खराब झालं होतं. तिच्या वडिलांनी स्वत:चे सोर्सेस वापरून मला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ दिलं. खरं सांगतो वैदेही, गेल्या दहा वर्षांत मी सतत तुझी आठवण काढत होतो. पण तुला भेटायला मला जमत नव्हतं. तुझ्या मनातला राग, माझ्याविषयीचा गैरसमज, किल्मिष दूर व्हायला हवं असं फार फार वाटायचं म्हणूनच आज तुझ्याशी सगळं बोललो. तू भेटायला आलीस यात सगळं भरून पावलो. मी तुझा विश्वासघात केला नाही. फक्त दैवाने आपल्याला एकमेकांपासून दूर केलं. एवढंच समजून घे.’’ सौरभने दिलगिरीच्या आवाजात म्हटलं.

वैदेहीने नुसतीच मान डोलावली.

‘‘तू त्या दिवशी मला काय सांगणार होतीस?’’ सौरभने विचारलं…‘‘आज सांगून टाक?’’

‘‘त्या गोष्टीचं आता काहीच महत्त्व नाहीए…चल, आपण कॉफी घेऊयात…’’ मोकळेपणाने हसून वैदेहीने म्हटलं.

किल्मिष

कथा * इंजी. आशा शर्मा

सुमनला ट्यूशनक्लासला जायला उशीर होत होता अन् तिची मैत्रीण नेहा अजून आलेली नव्हती. वैतागलेल्या सुमननं नेहाला फोन लावला तर फोन लागेना. तिनं रागानं स्वत:चा फोन बेडवर आपटला आणि आईचा फोन उचलून त्यावरून फोन करूया असा विचार केला. आईच्या फोनवर एक अनरीड मेसेज दिसला. सहजच पण उत्सुकतेनं तिनं तो मेसेज बघितला. नंबर अननोन होता पण एक शायरी पाठवलेली होती. शायरी म्हटली की ती रोमँटिक असणारच! चुकून काही तरी आलं असेल कुणाकडून असा विचार करून तिनं नेहाला फोन लावला, तेव्हा कळलं की नेहाला आज बरं नाहीए. ती क्लासला येणार नाहीय एवढं सगळं होई तो ट्यूशक्लासची वेळ टळून गेली होती. शेवटी धुसफुसत सुमननं घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिनं वह्या, पुस्तकं घेऊन स्टडी टेबल गाठलं खरं पण तिचं मन पुन:पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या रोमँटिक शायरीकडेच वळत होतं.

अभ्यासात मन रमेना. खरोखरंच कुणी पुरूष आईला असे मेसेज पाठवंत असले का? या विचारासरशी तिनं उठून पुन्हा आईचा फोन हातात घेतला. मेसेजेस चेक करताना तिच्या लक्षात आलं की या नंबरवरून आईला एकच नाही तर अनेक मेसेजेस आलेले आहेत.

तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. घाबरून सुमननं आईचा मोबाइल जागच्याजागी ठेवला अन् ती पुस्तक उघडून अभ्यासाचं नाटक करू लागली.

आई जशी स्वयंपाकघरात गेली तशी सुमननं पटकन् तो नंबर आपल्या वहीत लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी तिनं नेहाच्या मोबाइलवर तो नंबर टाकून बघितला. तर तो कुणा डॉक्टर राकेशचा नंबर होता. कोण आहे हा डॉक्टर राकेश? आईशी याचा काय संबंध? तिनं बराच विचार केला पण हाती काहीच लागलं नाही.

१५ वर्षांची सुमन आईबरोबर राहते. तिचे वडील अत्यंत तडफदार पोलीस ऑफिसर होते. अत्यंत प्रामाणिक आणि कडक. त्यामुळेच त्यांना अपराधी जगतातले शत्रूही भरपूर होते. एकदा एका कारवाई दरम्यान ड्रग माफियांनी त्यांच्या जीपवर ट्रक घातला. त्यात ते मरण पावले. बायको सुशिक्षित असल्यामुळे सरकारी नियमानुसार तिला पोलीस?खात्यात क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. मायलेकींची आर्थिक अडचण दूर झाली. पण सुधा ऑफिसला गेल्यावर सुमन फारच एकटी पडू लागली. सुधाला तिची काळजी वाटायची. काही वर्षं सुमनची आजी येऊन तिच्या जवळ राहिली पण वयपरत्वे ती मृत्यू पावल्यावर पुन्हा तीच अडचण निर्माण झाली.

मायलेकी पुन्हा एकट्या पडल्या. खूप विचार करून सुधानं आपल्या राहत्या घरावर एक मजला अजून चढवला. वन बेडरूम, हॉल, किचन असा छोटासा ब्लॉक तयार करून तो भाड्यानं दिला. डॉ. राणू नावाची एक तरूणी त्यांना भाडेकरू म्हणून मिळाली. ती रात्रपाळी करायची. त्यामुळे दिवसा सुमनला तिची सोबत असे. राणूला या मायलेकींचा अन् या दोघींना तिचा फार आधार होता. सुधाची नोकरी चांगली चालली होती. तिला पदोन्नती अन् पगारवाढही मिळाली होती. सुमन अभ्यासात हुषार होती. तिच्या वडिलांची इच्छा लेकीनं इंजिनियर व्हावं ही होती. सुमननं त्यासाठीच प्री इंजिनियरिंग क्लासेस पण लावले होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती शाळेनंतर या ट्यूशनला जात होती. घराजवळच राहणारी तिची मैत्रीण नेहा नेहमी तिच्या सोबत असायची.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन शाळेत जायला निघाली तेवढ्यात आईच्या मोबाइलवर मेसेज आल्याचा आवाज आला. अभावितपणे सुमनचं लक्ष आधी मोबाइलकडे अन् नंतर आईच्या चेहऱ्याकडे गेलं. आई चक्क हसंत होती…ते बघून तिचा चेहरा कसनुसा झाला. ती तिथंच थबकून उभी राहिली.

‘‘सुमन, अगं बस निघून जाईल,’’ आईनं हाकारलं. तशी ती भानावर आली आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे मेनगेटाकडे निघाली.

सायंकाळी घरी येताच सुमननं सर्वात आधी आईचा मोबाइल मागून घेतला. आज पुन्हा तीन रोमँटिक शायरीतले संदेश होते. अरे बापरे! एक व्हॉट्सएप मिस्ड कॉलही होता…पण व्हॉट्सएपवर मेसेज नव्हता… ‘नक्कीच आईनं डिलिट केला असेल.’ सुमननं मनांत म्हटलं अन् तिरस्कारानं मोबाइल पलंगावर फेकला.

सुधा आज ऑफिसातून थोडी लवकर आली होती. तिनं येताना तिच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून सुमनला आवडणारे समोसे आणले होते. चहा बरोबर ते सामासे तिनं सुमनच्या पुढ्यात ठेवले. तेव्हा, ‘‘भूक नाहीए’’ म्हणंत तिनं बशी बाजूला सारली. सुधाला जरा विचित्र वाटलं पण ‘टीनएज मूड’ समजून तिनं त्याची फारशी दखल घेतली नाही.

हल्ली सुधाला जाणवंत होतं की सुमन तिच्याशी मोकळेपणानं बोलत नाहीए. स्वत:ला तिनं आक्रसून घेतलं आहे. एरवी सतत काही ना काही भुणभुण तिच्या मागे लावणारी सुमन अगदी काहीही मागत नाहीए. काही विचारावं तर धड उत्तर देत नाही. झालंय काय या मुलीला? कदाचित अभ्यास आणि या प्रीइंजिनियरिंग टेस्टचं दडपण आलं असावं…सुधा स्वत:चीच समजूत घालायची. जितकी ती सुमनच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करायची तेवढी सुमन तिला झिडकारंत होती.

सुधाला जेव्हा सुमनच्या शाळेतल्या पेरेटंस् टीचर मीटिंगमध्ये सुमनच्या टीचरनं वेगळ्यानं बोलावून विचारलं की सुमनचा काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा प्रचंड धक्का बसला. सुमनचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीए. ती कुणा मुलाच्या प्रेमात तर पडली नाहीए ना? वर्गातही कुठल्या तरी तंद्रीत बसून असते. काही म्हटलं तर रडायला लागते. तिला काही शारीरिक मानसिक त्रास नाहीए ना? अन् शेवटी तर तिनं सुधाला उपदेशच केला. ‘‘असं बघा सुधा मॅडम, सुमनची आई आणि वडील तुम्हीच आहात. तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. तिला जास्त वेळ द्या. तिचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून सांगतेय, वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही.’’

सुधाला खूपच लाजल्यासारखं द्ब्रालं. सुमनशी आज बोलायला हवं असं ठरवून ती शाळेतून सरळ स्वत:च्या ऑफिसमध्ये पोहोचली. दुपारी अचानक तीनच्या सुमारास राणूचा फोन आला, ‘‘ताई, ताबडतोब घरी या.’’

‘‘काय झालं?’’

‘‘तुम्ही या, नंतर सांगते?’’ इतकं बोलून तिनं फोन ठेवला.

साहेबांकडून परवानगी घेऊन सुधा ताबडतोब घरी पोहोचली. पलंगावर सुमन अर्धवट शुद्धीत, अर्धवट ग्लानीत पडून होती. डॉ. राणू तिच्याजवळ बसून होती.

‘‘काय झालंय हिला?’’ सुधानं घाबरून विचारलं.

‘‘हिनं झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज घेतला…मी फ्रीजमधून भाजी घेण्यासाठी इथं खाली आले तेव्हा हिची अवस्था माझ्या लक्षात आली. ताबडतोब मी माझ्या हॉस्टिलमध्ये नेऊन स्टमक वॉश करून घेतला. आता ती अगदी बरी आहे. धोका टळला आहे. थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल.’’ डॉ. राणूनं समजावून सांगितलं.

‘‘पण हिनं असं  का केलं?’’ सुधा व राणू दोघींनाही कळंत नव्हतं.

त्याचवेळी अर्धवट शुद्धीत सुमन बडबडली, ‘‘वाईट चारित्र्य?’’ राणू अन् सुधा विंचू डसल्यासारख्या एकदम किंचाळल्या.

‘‘हो, हो, वाईट चारित्र्य…आई, कोण आहे हा डॉक्टर राकेश जो तुला अश्लील मेसेज अन् रोमँटिक?शायऱ्या पाठवतो.’’ सुमनचा चेहरा रागानं लाल झाला होता.

‘‘डॉक्टर राकेश?’’ सुधा व राणूनं एकमेकींकडे बघितलं.

सुधानं काहीच उत्तर दिलं नाही. ती गप्प बसून राहिली.

‘‘बघितलं? आईकडे काही उत्तर नाहीए ना?’’ अत्यंत तिरस्कारानं सुमननं म्हटलं.

‘‘ताई, तुम्ही आत जा. आपल्या तिघींसाठी छान स्ट्राँग कॉफी करून आणा. तोवर मी या माझ्या लाडक्या मैत्रिणीशी बोलते.’’ राणूच्या शब्दात अधिकार होता.

सुधा तिथून गेल्यावर राणूनं आपला मोर्चा सुमनकडे वळवला.

सुमनचा हात आपल्या हातात घेत राणूनं म्हटलं, ‘‘सुमन, अगं किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस? तुझ्या आईवर असा घाणेरडा आरोप करण्यापूर्वी निदान तिच्याशी किंवा माझ्याशी बोलायचं तरी? सुधा ताई निष्कलंक आहे. हलकट आहे तो डॉक्टर राकेश अन् आईचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. माझा साखरपुडा त्याच्याबरोबर झाला होता. पण नंतर त्याच्या विषयी बरंच काही लोकांकडून कळलं तेव्हा सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी सुधाताईची मदत घेतली. तिच्या मोबाइलवरून मी त्याला काही मेसेजेस दिले अन् मला जसं वाटलं हातं तसंच घडलं. तो मेसेजेस पाठवू लागला. मीच हे प्रकरण थोडं अधिक ताणलं ज्यामुळे आमच्याकडे पुरावा तयार झाला. तो अत्यंत हलकट आणि लंपट आहे याची खात्री पटल्यावर मी तो साखरपुडा मोडला.

यानंतर त्यानं माझा नाद सोडला पण आईच्या मोबाइलवर तो अश्लील मेसेज पाठवू लागला. आम्ही एकदोन दिवसातच आईचा मोबाइल बदलणार होतो म्हणजे त्याचा पिच्छा कायमचा सुटला असता अन् त्याला पोलिसातही देणार होतो तेवढ्यात तू हा असा घोळ घातलास, विचार कर अंग, मी वेळेवर पोहोचले नसते, डॉक्टर नसते, माझे हॉस्पिलमध्ये संबंध नसते, तर काय झालं असतं? वेडा बाई, आईशी नाही पण निदान माझ्याजवळ तरी मन मोकळं करायचंस ना?’’

‘‘उगीच काही तरी बोलून मला फसवू नकोस राणू मावशी. मला ठाऊक आहे, तू आईचा कलंक आपल्यावर घेते आहेस. आईचा त्याच्याशी संबंध नव्हता तर ती त्याचे मेसेज बघून हसायची का?’’

‘‘अगं वेडा बाई, तुझ्या आईला दाखवून मी रोमँटिक मेसेज, माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्याला पाठवत होते, तेच तो आईला पाठवंत होता. म्हणून तिला हसायला यायचं.’’

सुधा कॉफी अन् बिस्किटं घेऊन आली. सुमनला उठायची शक्ती नव्हती. तिनं झोपल्या झेपल्याच हात पसरले. सुधानं तिला मिठीत घेतलं. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राणूचेही डोळे भरून आले. त्या अश्रूत मनांतलं सगळं किल्मिष वाहून गेलं.

पेरले तेच उगवले

कथा * डॉ. नीहारिका

‘‘तू जेव्हा किंचाळतेस ना त्यावेळी अगदी जंगली मांजरीसारखी दिसतेस. केस थोडे अजून पिंजारून घे.’’ सौम्य दातओठ खात ओरडला.

‘‘अन् तू? थोबाड बघितलंस कधी आरशात? ओरडून ओरडून बोलतोस तेव्हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोस.’’

मी आणि सौम्य अगदी खालच्या पातळीवर येऊन भांडतो तेव्हा आपण सभ्य आहोत, चांगल्या वस्तीत राहातो वगैरे गोष्टींना अर्थ उरत नाही. फक्त आमचा मुलगा क्रिकेट खेळायला किंवा अभ्यासाला केव्हा बाहेर पडतो याचीच आम्ही वाट बघत असतो. पूर्वी आमच्यापैकी कुणी एक रेडिओ किंवा टीव्ही किंवा रेकॉर्डप्लेअर ऑन करत असे. हेतू हा की भांडणाचा आवाज आसपासच्या घरात ऐकू जाऊ नये. पण आता तर आम्ही त्या आवाजाच्या वरचढ आवाजात भांडतो. लोकांना पूर्वी आम्ही आदर्श नवराबायको वाटत असू पण आता मात्र त्यांच्या नजरेत उपहास दिसतो.

आमचा प्रेमविवाह. मी अठरा वर्षांची होते अन् सौम्य छत्तीसचा. त्यांची बायको एका अपघातात निवर्तली होती. त्यांची दोन्ही मुलं आजोळी होती अन् सौम्य अगदी उमदेपणाने, मजेत आयुष्य जगत होता. त्यांच्यात काय नव्हतं? हसरा, देखणा चेहरा, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, शायरी, नाटक, कविता, सिनेमाची आवड, बेभानपणे मोटरसायकल चालवणं…माझं अल्लड वय, स्वप्नाळूवृत्ती अन् सिनेमाची आवड, सिनेमातलं जग खरं मानून चालण्याचा भाबडेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या प्रेमात पाडायला पुरेशा होत्या. मी पूर्णपणे सौम्यमय झाले होते. त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं. त्याचं वागणं, बोलणं नाटकी, बेगडी आहे हे मला कबूलच नव्हतं. त्याच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही अन् तो प्रेम करतोय माझ्यावर हा माझा फार मोठा सन्मान आहे हेच मला खरं वाटत होतं.

आईबाबांना सौम्य अजिबात आवडला नव्हता. ‘‘छत्तीस वर्षांचं वय आहे. या वयाला चांगली नोकरी, जबाबदार वागणूक, समाजात आदरसन्मान मिळवतो माणूस. हा तर इतका थिल्लर वागतो. नातेवाईकही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तो तुला काय सांभाळणार आहे? सगळं आयुष्य कसं काढशील त्याच्याबरोबर?’’ आई वेगवेगळ्या पद्धतीने मला समजावत होती.

मीच उलट म्हणायची, ‘‘तो चांगला हसतो, हसवतो यात वाईट काय आहे? उलट कौतुक केलं पाहिजे. किती बेदरकारपणे आयुष्य जगतोए तो…’’

वडील फार अपसेट होते. दिवसदिवस वाचलेल्या पेपरमध्ये काय बघत बसायचे कुणास ठाऊक.

मी, आई, दोघं धाकटे भाऊ गप्प होतो. बाबांना प्रचंड टेन्शन आलं होतं.

‘‘शालिनी…’’ बाबांनी हाक मारली.

नेहमीची शालू हाक नव्हती. याचा अर्थ त्यांना खूपच हाय टेन्शन आलेलं आहे.

‘‘शालिनी इथे बैस. माझं बोलणं नीट ऐकून घे. मी काय म्हणतो ते समजून घे. मी चौकशी केली आहे. सौम्य चांगला मुलगा नाहीए. त्याच्या पहिल्या बायकोने याच्या बेताल वागण्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली. दोन्ही मुलं आजोळी पोहोचवून हा इथे उनाडतोय. त्यांची काळजी घेत नाही, पैसे पाठवत नाही. गुंड मित्रांकरवी सासूसासऱ्यांना धमकी दिलीय, तोंड उघडलं, पोलिसात गेलात तर घरात चौघांचे मुडदे पडतील म्हणून. घाबरून आपली नातवंडं अन् स्वत:च्या जिवाच्या भीतीने ते लोक गप्प बसलेत.

‘‘असा निष्ठूर अन् बेजबाबदार पुरुष तुला कसा अन् काय सुख देणार? कमवत नाही, मुजोर आहे. पुन्हा तुझ्या अन् त्याच्या वयात अंतर किती जास्त आहे. जोडीदार इतका मोठा नसावा. शांतपणे विचार कर. प्रेम करणं चांगलं, पण ते डोळसपणे करावं. आंधळं प्रेम काय कामाचं? तुला चांगल्या शाळेत घातलं. चांगले संस्कार दिले अन् तू अशी विवेक सोडून का वागते आहेस? नीट विचार कर, एकदा नाही दहादा विचार कर अन् मग निर्णय घे.’’

खरं तर बाबा अत्यंत धीराचे. ठामपणे बोलणारे, दृढपणे वागणारे. पण मला समजावताना भावनाविवश झाले होते. त्यांची हतबलता बघून मी अधिकच उद्धट अन् उद्दाम झाले होते. मी क्षणाचाही विचार न करता ओरडून बोलले.

‘‘माझा निर्णय झालाय, बाबा. एकदा, दहादा, शंभरदा विचार केला तरी मी लग्न सौम्यबरोबरच करणार आहे. तुम्ही होकार दिलात तरीही अन् नकार दिला तरीही…’’ मी खरं तर मर्यादेच्या बाहेर गेले होते, पण विवेकच नव्हता तर काय करणार?

‘‘ठीक आहे. तर मग माझाही निर्णय ऐकून घे. आजपासून तुझा अन् आमचाही काही संबंध नाही. मी, आई, दोघं भाऊ तुझे कुणीही नाही. मी मरेन तेव्हा संपत्तीतला तुझा वाटा घ्यायला फक्त ये. नाऊ गेट लॉस्ट!’’ बाबा नेहमीसारखेच खंबीर झाले होते.

मी तरी कुठे घाबरले होते? मीही म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुमची संपत्ती नकोय मला, मी कधीही इकडे फिरकणार नाही. बाय…’’ धाडकन् दरवाजा आपटून मी घराबाहेर पडले.

त्याच रात्री एका देवळात आम्ही लग्न केलं. सौम्यचे चार मित्र फक्त होते. माझं नाव सौम्यने शालिनीऐवजी सौम्या केलं. मिसेस सौम्या सांगताना मला स्वत:चाच अभिमान वाटत होता.

लग्नानंतरचे काही दिवस खूपच छान होते. अगदी सिनेमांत दाखवतात तसे किंवा कथाकादंबरीत वर्णन असतं तसे…प्रेमाचे, सुखाचे, लवकरच बाळाच्या येण्याची चाहूल लागली. माझ्यासाठी ती एक अद्भूत घटना होती. आई होण्याच्या कल्पनेनेच मी मोहरले, पण सौम्याला दोन मुलं आधीची होती. त्याला या प्रसंगाची अपूर्वाईच नव्हती. अजिबात उत्साह नव्हता. मीही या गोष्टीकडे समजुतीनेच बघत होते. मुळात मी समजूतदारच होते. पुरुषाचं, त्यातून दोन मुलं असलेल्या बापाचं मानसशास्त्र वेगळं…माझ्यासारख्या अल्लड तरुणीचं मानसशास्त्र वेगळं. त्यामुळे मी आई होण्याच्या माझ्या आनंदात कुठेही कमतरता केली नाही. पूर्ण उत्साहाने मी माझं गरोदरपण एन्जॉय केलं.

दिवस भरल्यावर बाळ जन्माला आलं. कळा सोसताना ब्रह्मांड आठवलं. आईशी संबंध तुटला होता पण त्या क्षणी सौम्यने आपल्याजवळ असावं असं फार वाटत होतं. माझी काळजी न करता तो इस्पितळातल्या लेडी स्टाफशी हास्यविनोद करण्यात गुंतला होता. त्याच्या या दिलखुलास वागण्यावरच तर मी भाळले होते. तक्रार कुणाजवळ अन् काय करणार?

आईपणाच्या जबाबदारीत मी पूर्णपणे गुरफटले होते अन् सौम्य मात्र मोलकरीण, मला अन् बाळाला तेलपाणी करणारी बाई, मला भेटायला येणाऱ्या शेजारणी किंवा माझ्या मैत्रिणींना हास्यविनोदात चिंब भिजवण्यात गर्क होता. त्याचा हा जिव्हाळा माझ्या बाळापर्यंत मात्र पोहोचत नव्हता. माझं बाळ म्हणायचं एवढ्यासाठी की सौम्यने आधीच सांगितलं होतं, हे बाळ फक्त तुझं अन् तुझंच आहे. माझी आधीची दोन मुलं आहेत. बिचारी आजोळीच आयुष्य कंठताहेत.

सौम्यचं हे सरड्याप्रमाणे रंग बदलणं बघून मी चकित झाले. आमच्या प्रेमात असण्याच्या दिवसांत त्याने चुकूनही कधी बायकोमुलांचा उल्लेख केला नव्हता. आताच त्याला त्या बिचाऱ्या, आईवेगळ्या पोरांची आठवण येत होती. इथूनच माझ्या प्रेमाच्या आरशाला तडा गेला होता.. दिवसेंदिवस नवेनवे तडे वाढतच होते. ज्या दिवशी मी त्याला त्याच्या मित्राशी बोलताना ऐकलं, ‘‘ही मूर्ख बाई आपल्या बापाची सगळी इस्टेट सोडून रिकाम्या हाताने माझ्या पैशांवर मजा मारायला आली आहे,’’ त्या दिवशीच प्रेमाच्या दर्पणाचा चक्काचूर झाला. सौम्य सांगत होता, ‘‘हिचं रूप अन् तारुण्य याचा मोह पडला मला. अन् मी लग्न करण्याचा मूर्खपणा करून बसलो, एरवी अशा अनेक पोरींना फिरवून, वापरून सोडून दिलंय मी.’’

त्यानंतर आमच्यात फक्त भांडणं अन् भांडणंच होती. घर सोडलं नाही मी पण माझ्यासाठी अन् माझ्या बाळासाठी एक साधीशी नोकरी करून आमच्यापुरतं कमवत होते. लग्नाला आठ वर्षं झाली होती.

गर्भाशयाला कॅन्सरचा धोका असल्याचं निदान झालं अन् ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला. गर्भाशय काढण्याचं मेजर ऑपरेशन…जवळ कोणीही नाही जो आधार देईल, धीर देईल. माझा सात वर्षांचा मुलगा माझा हात घट्ट धरून बसला आहे. माझे अन् त्याचेही हात घामेजले आहेत. त्याच्या गोड, कोवळ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली आहे. आईला काय झालंय? त्याला कळत नाहीए. वडील कधीच त्याचे नव्हते. माझ्या मनात येतंय, माझं बरंवाईट झालं तर माझ्या बाळाला कोण बघणार? सौम्यच्या आधीच्या बायकोला निदान माहेर होतं. ती मुलं आपल्या आजोळी आहेत. माझ्या बाळाला तर तेही नाही. कुठे जाईल तो? काय करेल?

नर्स, वॉर्डबॉय सगळ्यांची धावपळ सुरू आहे. ऑपरेशनच्या आधीची ही सगळी लगबग बघून मीही खूप घाबरले आहे. सौम्यने यावेळी येऊन धीर द्यावा असं फार वाटतंय. पण तो बाहेर नर्सेसबरोबर थट्टा, विनोद करतोय. त्याचा आवाज इथपर्यंत येतोय.

‘‘मॅडम, मला हे सगळं बघवत नाही. मी तर ऑपरेशनच्या नावानेच घाबरतो. पण तुम्ही सगळ्या हुशार अन् देखण्या पऱ्या इथे आहात म्हणून बरंय, नाही तर या नरकात माझा जीवच गेला असता.’’

मी खोलीच्या दाराकडे बघत होते. स्टे्रचर घेऊन नर्स व वॉर्डबॉय आले. पण सौम्य नाही. बाळाने माझा हात सोडला अन् मला मिठी मारली. तो गदगदून रडू लागला.

‘‘बाळा, रडू नकोस. तू तर शूरवीर आहेस. शूर शिपाई आहेस. मला काही झालं नाहीए. बघ, मी पटकन् बरी होऊन येतेय…’’ मी त्याला थोपटत धीर दिला.

‘‘चला, चला, घाई करा मॅडम, उशीर होतोय. डॉक्टर आम्हाला ओरडतील,’’ सिस्टर म्हणाली.

मी स्ट्रेचरवर आडवी झाली. ‘‘चला,’’ मी म्हटलं. ‘‘का हो, माझे मिस्टर कुठे आहेत?’’ माझ्या प्रश्नाला उत्तर वॉर्डबॉयने दिलं.

‘‘ते आम्हा सगळ्या स्टाफसाठी मिठाई घ्यायला गेलेत. म्हणत होते, आज त्यांचा मुक्ती दिवस आहे. येतील एवढ्यात.’’

स्टे्रचर ढकलत त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं. तिथे आले अन् माझं अवसानच संपलं. एका अनामिक भीतीने मनात ठाण मांडलं. भीतीची शिरशिरी थेट मनात शिरली. पांढऱ्या टोप्या अन् अॅप्रन…हातात रबरी मोजे. चेहरे कुणाचेच दिसत नाहीएत. ते डोळे फक्त बघताहेत माझ्याकडे. काय बघतात? माझी असहायता? माझा मूर्खपणा? माझा आजार?  ते माझा आजार दूर करतील की माझं अस्तित्वच मिटवून टाकतील? मला एकाएकी आई, बाबा, दोघां भावांची फार फार आठवण आली.

तेवढ्यात मला अंधुकसा चेहरा दिसला, सौम्यचा. एका नर्सच्या खांद्यावर हात ठेवलेला होता. त्याचा आवाज मात्र माझ्या कानात शिरला. ‘‘अरे, युटरस काढायचंय…युटरस नाही म्हटल्यावर बाईचं बाईपणच संपलं ना? बायको काय कामाची मग? म्हणजे मी मुक्त झालो…स्वतंत्र झालो…तसा मी बंधमुक्त…मला बंधनं आवडत नाही. मी आज या झाडावर तर उद्या दुसऱ्या झाडावर…मी स्वतंत्र…मी मुक्त हा:हा:हा:’’

आई, बाबा, मला क्षमा करा. तुम्ही मला शिकवलंत, संस्कार दिलेत पण मीच कमी पडले. मी बाभळीचं रोप लावलं, त्याला फळं कशी येणार? मी जे पेरलं तेच उगवलंय…मला क्षमा करा…

दुरून कुठून तरी अस्पष्ट ऐकलं मी. ‘‘डॉक्टर, डॉक्टर बघा, पेशंट बेशुद्ध होतेय…अजून क्लोरोफॉर्म दिलाच नाही…बी.पी. लो, खूपच लो झालंय…डॉक्टर हरी अप.’’

अन् पलीकडे अंधार…दाट अंधार पसरला.

तूच माझा जीवनसाथी

कथा * मिनू शहाणे

मला वाटत होतं की नीरज समोरच्या खिडकीतल्या त्याच्या त्या ठराविक जागी उभा आहे. आता तो हात हलवून माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेईल. तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला तशी मी दचकले.

‘‘वन्स, तुम्ही इथं काय करताय? सगळे लोक ब्रेकफास्टसाठी तुमची वाट बघताहेत…आणि जावईबापूंची नजर तर तुम्हालाच शोधते आहे,’’ वहिनीनं माझी चेष्टा करत म्हटलं.

सगळेच आनंदात हसत बोलत ब्रेकफास्ट घेत होते. पण मला मात्र काहीच आवडत नव्हतं. मी उगीच काही तरी चिवडत बसले होते.

‘‘मेघा, अगं तू काहीच खात नाहीएस? सूनबाई अगं, मेघाला गरम पुरी वाढ बरं?’’ आईनं वहिनीला हुकूमच दिला.

‘‘नको, मला काहीच नकोय. झालंय माझं.’’ मी ताडकन् उठले.

प्रदीप दादा माझ्याकडे रोखून बघत होता. मलाही त्याचा खूप राग आला होता. माझा आनंद हिरावून घेण्याचा त्याला काय अधिकार होता? पण यावेळी गप्प बसणंच श्रेयस्कर होतं. आईबाबांनाही बहुधा माझ्या मन:स्थितीची कल्पना आली होती. माझं नीरजवर खूप खूप प्रेम होतं. त्याच्याशी लग्न करून संसार थाटायची स्वप्नं मी बघत होते. पण या सगळ्यांशी मिळून माझं लग्न अशा माणसाशी लावून दिलं, ज्याला मी कधी पूर्वी बघितलंही नव्हतं अन् ओळखतही नव्हते.

‘‘आई, मी माझ्या खोलीत पडतेय थोडा वेळ.’’ मी आईला म्हटलं अन् जाण्यासाठी वळले, तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘मेघा, ज्यूस घेतेस का? काहीच खाल्लं नाहीएस तू…’’

‘‘नको, मला भूक नाहीए…’’ मी रागानं म्हणाले.

‘‘मेघा, सासरची माणसं कशी आहेत? तुला आवडतंय ना तिथं? आणि सार्थक, आमचे जावई? प्रेम करतात ना तुझ्यावर?’’

‘‘सगळं ठीकच आहे…’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मनात तर इतका राग होता की म्हणावसं वाटलं, ‘तुमच्यापेक्षा खूपच चांगली माणसं आहेत ती.’

पुन्हा आईनं म्हटलं, ‘‘पोरी आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांची मनं जिंकून घे, मिळून मिसळून रहा.’’

‘‘मायलेकींचं काय गूज चाललंय?’’ अचानक सार्थकनं तिथं येऊन विचारलं.

‘‘काही नाही. मी हिला सांगत होते की आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांना समजून घे. प्रेमानं राहा.’’

‘‘आई, तुमची मुलगी खूप गुणी आहे. इतक्या थोडक्या काळातच तिनं सर्वांना जिंकून घेतलंय.’’ सार्थक माझ्याकडे बघत आईला म्हणाले.

माझ्या लग्नाला अजून तीन महिनेच होताहेत. लग्नानंतर प्रथमच मी आईकडे माहेरी आले होते. आम्ही दोघंही आल्यामुळे घरात सर्वांना खूप आनंद झाला होता. पण माझी दृष्टी मात्र माझं प्रेम शोधण्यातच गुंतली.

रात्री खोलीत आम्ही दोघंच असताना सार्थकनं म्हटलं, ‘‘मेघा, काय झालंय? खूप बेचैन वाटते आहेस? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. इथं आल्यापासून अगदी उदास आणि गप्प का आहेस?’’

‘‘नाही, तसं काहीच नाहीए.’’ मी कोरडेपणानं म्हटलं. सार्थक मला अजिबात आवडत नाहीत. माझ्यासाठी हे अगदी लादलेलं नातं आहे. अगदी नाइलाजानं मला स्वीकारावं लागलेलं. मला ते तोडता येत नाही म्हणूनच ते टिकवावं लागलंय.

‘‘बरं, तर मग प्रॉब्लेम नाहीए असं समजू?’’ सार्थक सौम्य स्वरात अन् प्रेमानं बोलतात.

‘‘डोकं दुखतंय माझं, मी झोपते,’’ मी कूस वळवून डोळ्यांवर हात आडवा घेतला.

मला झोप लागली अन् रात्री तीनच्या सुमारास अवचित जागी झाले. मग मात्र झोप येईना. जुन्या आठवणी मात्र उफाळून आल्या…

आमच्या घरात मी अन् माझे बाबाच सर्वात आधी उठायचो. बाबांना सकाळी सहालाच घर सोडावं लागायचं. मीच त्यांचा चहा, टिफिन अन् नाश्ता बनवत असे. बाकी मंडळी उशीरा उठायची.

बाबा रेल्वेत असल्यामुळे आम्हाला रेल्वेचं क्वार्टर होतं. घरं लहान पण चांगली असायची. मागेपुढे प्रशस्त अंगण असायचं. आम्ही बाहेर छानसं लॉन अन् थोडी बागही केली होती. सायंकाळी खुर्च्या टाकून तिथं बसायला फार छान वाटायचं.

समोरच माझ्या मैत्रिणीचं, नम्रताचं घर होतं. तिचेही वडिल रेल्वेतच होते, पण माझ्या बाबांसारखी त्यांची पोस्ट मोठी नव्हती. मी अन् नम्रता चांगल्या मैत्रिणी होतो. एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होतो. एकमेकींच्या घरी बिनदिक्कत जात येत होतो. एकदा बाहेर उभ्या राहून आम्ही दोघी बोलत असताना माझी नजर सहज तिच्या घराच्या खिडकीकडे गेली. तिथं नम्रताचा मोठा भाऊ नीरज उभा होता अन् अगदी टक लावून माझ्याकडेच बघत होता. मला खूपच विचित्र वाटलं. नीरजही गडबडला. मी आपल्या घरात आले पण पुन्हा:पुन्हा मला एकच प्रश्न छळत होता की नीरज माझ्याकडे असा का बघत होता.

नंतर माझ्या लक्षात आलं की तो नेहमीच माझ्याकडे बघत असतो. त्याला बघितलं की माझ्या छातीत धडधड वाढायची. बहुधा तो माझ्या प्रेमात पडला होता…आणि मी ही त्याच्या…आम्ही एकमेकांकडे बघायचो. आमचे डोळे सांगायचे आम्ही प्रेमात पडलोय. आता नकळत मी त्या खिडकीशी जाऊन उभी रहायचे. नीरजचा गोरा रंग अन् घारे डोळे मला फार आवडायचे. आता आम्ही चोरून भेटायलाही लागलो होतो.

सकाळी पुन्हा मी त्याच खिडकीशी जाऊन बसले होते. खांद्यावर कुणीतरी हात ठेवला अन् मी दचकले. वळून बघितलं तर आई होती.

‘‘मेघा, इथं कधीपासून बसली आहेस? चल, चहा करूयात.’’ आईनं म्हटलं.

‘‘मी इथंच बसते गं, तू जा…मी येते थोड्या वेळानं,’’ मी म्हणाले.

आईनं माझ्याकडे रोखून बघितलं. ‘‘तू अजूनही त्या लफंग्याला विसरली नाहीएस? अगं एक दु:स्वप्न म्हणून विसरून जा ना? त्यातच सगळ्यांचं भलं आहे. अगं, आता लग्न झालंय तुझं. आपला संसार सांभाळ, नवऱ्यावर प्रेम कर, इतकं चांगलं सासर अन् असा छान नवरा मिळायलाही भाग्य लागतं. सर्वच मुलींना ते मिळत नाही.’’ आई अगदी रागानं पण कळकळून बोलत होती.

मला रडायलाच आलं. माझी चूक काय होती तर मी प्रेम केलं होतं. प्रेम करणं हा काही गुन्हा नाहीए आणि ज्या माणसावर माझं प्रेम नाहीए तो माणूस फक्त माझा नवरा झाला म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं? कसं शक्य आहे?

‘‘आता आणि रडतेस कशाला? तुझ्या प्रेमप्रकरणाबद्दल जावई बापूंना समजलं तर केवढा अनर्थ होईल, कळतंय का? मूर्ख मुलगी, का आपलं आयुष्य असं नासवायला निघाली आहेस?’’ आईला आता संताप अनावर झाला होता.

‘‘कोण काय नासवतंय आई?’’ सार्थकनं अचानक आत येऊन विचारलं. आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं की काय कुणास ठाऊक.

आई एकदम दचकली…गडबडलीच! ‘‘काही नाही हो, मी मेघाला समजावते आहे की लग्नानंतर नव्या संसारात जास्त रमावं. जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काढून रडत बसते…ते बरोबर नाही ना?’’ आईनं सारवासारव केली.

‘‘पण आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना विसरायची गरजच नाहीए. मलाही माझ्या कॉलेजातले मित्र अजून आठवतात. कधी तरी भेटतोही आम्ही.’’ सार्थक अगदी सहज बोलत होते. ‘‘मेघा, अगं जग हल्ली खूप जवळ आलंय. इंटरनेटच्या माध्यमातून तू कुणालाही भेटू शकशील.’’

आईच्या घरी आम्ही तीनचार दिवस राहून परत आपल्या घरी रांचीला निघालो. पटना ते रांची सुमार एक दिवसाचा प्रवास आहे. रात्रीची गाडी होती. सार्थकला झोप लागली होती. मी मात्र झोपू शकत नव्हते. माझ्या कुंटुबीयांनी आमचं प्रेम कसं चिरडून टाकलं तेच मला आठवत होतं…पुन्हा पुन्हा…

प्रदीपदादानंच आमच्या प्रेमात बिब्बा घातला होता. माझ्या समोरच त्यानं नीरजला केवढं मारलं होतं. नीरजची आई धावत आली. तिनं हात जोडले, प्रदीपदादाच्या पाया पडून विनवलं. म्हणून त्यांनी नीरजला सोडलं. नाहीतर त्या दिवशी त्यानं नीरजचा जीवच घेतला असता. त्या दिवसानंतर मी व नीरज कधी भेटलोही नाही.

प्रदीपदादानं तर त्याच्या घरच्यांना ताकीद दिली होती की पुन्हा हा इथं दिसला तर मारून अशा ठिकाणी फेकेन की प्रेतही सापडणार नाही. छोट्या पोस्टवर नोकरी करणारे त्याचे वडिल घाबरले. ते कुटुंब आमचं गाव सोडून कुठं तरी निघून गेले. मला काही कळलंच नाही.

नम्रताला आमच्या प्रेमाची कल्पना होती. मी अभ्यासाच्या निमित्तानं रोजच तिच्या घरी जायचे. रोजच नीरजलाही भेटत होते.

एकदा मी त्यांच्या घरी गेलेली असताना नीरज एकटाच घरी होता. नम्रता आणि आई कुठंतरी बाहेर गेलेल्या होत्या. मी परतणार तेवढ्यात नीरजनं माझा हात धरला…मला जवळ ओढलं.

‘‘नीरज, सोड मला…कुणी बघेल…’’ मी घाबरून म्हणाले.

‘‘कोणी बघणार नाही, घरात कुणीच नाहीए.’’ तो म्हणाला. माझ्या छातीत खूप धडधडू लागलं. त्यानं मला जवळ खेचलं. मी सुटायचा प्रयत्न करत होते. पण मला त्याचा स्पर्श आवडत होता…मी डोळे मिटून घेतले…अन् नीरजनं माद्ब्रया ओठांवर ओठ टेकवले.

‘‘अरे हे काय केलंस? हे बरोबर नाही,’’ मी घाबरले होते.

‘‘काय चूक आहे? आपण प्रेम करतोय ना एकमेकांवर?’’ त्यानं माझ्या दोन्ही गालांचं चुंबन घेतलं.

आमचं प्रेम कुणालाच ठाऊक नव्हतं. फक्त नम्रताला ठाऊक होतं. सोनेरी स्वप्नासारखे दिवस होते ते. अशी तीन वर्षं गेली. नीरजला नोकरी लागली. मी ग्रॅज्युएट झाले. आता आम्ही लग्नाची स्वप्नं बघत होतो.

एक दिवस मी नीरजला म्हटलं, ‘‘मला भीती वाटते, माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत.’’

‘‘तर मग आपण पळून जाऊन लग्न करूयात. तेही नाही जमलं तर एकत्र जीव देऊ. देशील ना मला साथ?’’

‘‘होय नीरज, तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही.’’ त्याच्या खांद्यांवर डोकं टेकवून मी म्हणाले.

प्रदीपदादानं आम्हाला एकत्र कधी बघितलं ते आम्हाला समजलंच नाही.

आमच्या प्रेमप्रकरण्यामुळे घरात वादळच उठलं. दादानं मलाही बडवलं. आईबाबा मला वाचवायला ही आले नाहीत. वहिनीमध्ये पडली नसती तर दादानं माझा जीवच घेतला असता.

घाईघाईनं माझं लग्न ठरवलं. घाईनंच उरकून घेतलंय. या लोकांमुळे माझं प्रेम अपूर्ण राहिलं, कधी क्षमा करणार नाही मी या लोकांना.

‘‘ओ मॅडम…जरा जागा द्या आम्हाला बसायचंय.’’ कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं.

मी दचकून भानावर आले. ‘‘ही रिझर्व्हड बर्थ आहे.’’ त्याचा हात झटकत मी म्हणाले. तेवढ्यात अजून दोन तरूण आले अन् आचरटपणा करायला लागले. मी जोरानं ओरडले, ‘‘सार्थक…’’

झोपलेले सार्थक दचकून उठले. तीन तरूण मला त्रास देताहेत बघून ते त्यांच्यावर धावून गेले. रात्रीची वेळ…प्रवासी झोपलेले होते, पण मी मोठमोठ्यानं रडू लागले. त्यानं जवळचे प्रवासी जागे झाले. ते सार्थकच्या मदतीला धावले. कुणी तरी रेल्वे पोलीसांना बोलावून घेतलं. सगळा डबा एव्हाना जागा झाला होता.

मी खूपच घाबरले होते…‘‘मेघा, बरी आहेस ना? कुठं लागलंय का तुला?’’ सार्थक प्रेमानं अन् काळजीनं विचारत होते. त्यांनी मला जवळ घेतलं. मिठीत घेऊन ते मला शांत करू पाहत होते. त्यांच्या मिठीत मला एकदम सुरक्षित वाटलं. एकदम शांत वाटलं. खरं तर त्यांच्या हाताला लागलं होतं. रक्त येत होतं, पण ते माझीच काळजी करत होते.

तेवढ्यात कुणी प्रवासी म्हणाला, ‘‘सर, त्या बऱ्या आहेत. फक्त घाबरल्या आहेत..तुमच्या हातातून रक्त येतंय, ते बघा आधी…’’

तेवढ्यात कुणी तरी त्यांच्या हाताची जखम पुसून पट्टीही बांधून दिली. सगळे आपापल्या जागी गेले. मला चूक लक्षात आली. सार्थकसारख्या सज्जन, प्रेमळ माणसाशी मी तुसडेपणानं वागत होते. किती स्वार्थी होते मी.

सार्थकच माझे पती आहेत. माझं सर्वस्व, माझे जीवनसाथी आहेत. यापुढे माझा प्रत्येक क्षण त्यांच्या सुखासाठी असेल…

विवाहाची रेशीमगाठ

कथा * अर्चना पाटील

रिया आणि आशिषचा विवाह खूपच थाटामाटात पार पडला होता. आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला, पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला. रिया खिडकीतून बाहेर पाहात होती, पण तिचे पाणावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत. आशिषने विचारले, ‘‘तू या लग्नामुळे खूश नाहीस का? पाठवणी करून चार तास उलटले, तरीही तू रडतेस.’’ रियाने मान झुकवली. ‘‘असं काही नाहीए, सहजच डोळ्यात पाणी आले,’’ रियाने उत्तर दिले.

आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवून तिला आश्वासित केले, ‘‘तू आजपासून अग्निहोत्री घराण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस. तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. जस्ट रिलॅक्स बेबी. आता शांतपणे झोप. उद्या बोलू.’’

दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती. सर्वजण रियाच्या मागे-पुढे करत होते, पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होतं. पूजेच्या वेळी तिला पुन्हा-पुन्हा हटकले जात होते. संपूर्ण दिवस ती अबोलच होती. आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता. रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला. रिया आरशासमोर बसली होती. आशिष तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. आशिष रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण रियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. ‘‘काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करतेस.’’ आशिष वरच्या आवाजात ओरडू लागला. रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली. आशिष रात्री बारा वाजता पायीच बंगल्याबाहेर निघून गेला.

तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरहून एक नोकर संतोष रियाला भेटायला आले. संतोषने गुपचूप रियाला एक पाकीट बेडरूममध्ये जाऊन दिले. रियाने भाऊ सासरहून निघून जाताच पाकीट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सारंगच्या चिठ्ठ्या वाचू लागली. रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती. इतक्यात आशिष खोलीत आला. आशिषने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागला. आशिषच्या सर्व हकिकत लक्षात आली. आशिष केव्हा खोलीत आला, हे रियाला कळलेच नाही, पण आशिषला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली. आशिषने रागाने चार गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जायला सांगितले. रियाजवळ काहीही उत्तर नव्हते. रियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. रियाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. आता पुढे काय होणार, या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली. आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही ही गोष्ट रियाला माहीत होती.

रात्रीचे ९ वाजले होते. रिया आतुरतेने आशिषची वाट पाहात होती. तिला त्याची माफी मागायची इच्छा होती. खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते. इतक्यात, एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते. आशिषच्या एका हाताला फ्रॅक्चर होते आणि तो उभाही राहू शकत नव्हता. आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. कुटुंबातील सर्व लोक खोलीत जमा झाले.

‘‘काय झालं माझ्या मुलाला? कोणीतरी सांगा, मला भीती वाटतेय,’’ रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होती.

‘‘काही नाही आई, बस्स एक छोटेसं अॅक्सिडंट झालंय. आपल्या मुलाचं नवीननवीन लग्न झालंय, होतं असं कधी-कधी बायकोच्या आठवणीने. आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल. जे होतं ते चांगल्यासाठी होतं आई.’’

‘‘काय चांगल्यासाठी होतं, माझ्या मुलाचा हात मोडलाय. त्याच्या पायाला जखमा झाल्यात. रिया दुसरा शर्ट आण. किती रक्ताने माखलेय याचे शर्ट.’’

‘‘हो आई.’’

आशिषला तर रियाकडे पाहायचीही इच्छा नव्हती आणि रिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसली होती.

‘‘चला चला, आता सर्व खाली चला. थोडेसे काम वहिनीलाही करू द्या.’’

सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले. रिया शर्ट घेऊन आली, पण आशिषने रागाने तोंड फिरवले.

‘‘अहो, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माहीत आहे, मी माफी मागण्याच्या लायकीची नाहीए, पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. मला माफ करा, आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाहीए.’’

‘‘तू लग्नापूर्वीच सर्व गोष्टी सांगितल्या असत्यास, तर माझं आयुष्य बरबाद झालं नसतं ना.’’

‘‘काय बोलताय तुम्ही लोक? रिया, तू काही कामाची नाहीस. आण शर्ट इकडे. मलाच बदलावे लागेल. एक कप आले घातलेली चहा घेऊन ये माझ्या मुलासाठी.’’

दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशिषच्या समोर उभी राहिली.

‘‘तुला माझ्या मागे-पुढे करण्याची काही गरज नाहीए.’’

‘‘लवकर शर्ट बदल, तुला पाहायला शेजारी आलेत,’’ आई आवाज देत होती.

‘‘घाला ना प्लीज.’’

रिया आशिषच्या जवळ जायला कचरत होती, पण आता तिला आपली चूक सुधारायची होती. एक पत्नी आणि सुनेचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते. शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले. रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली.

‘‘किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोत्री सर.’’

‘‘ते तर आहेच, रिया आमची सून नाही, मुलगी आहे.’’

रिया आता सर्वांसोबत छान मिळूनमिसळून राहायची. परंतु तरीही आशिष आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. घरातील सर्व लोक झोपले होते. आशिषला झोप येत नव्हती. रियाही बेडवर पहुडली होती. पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. रिया आता आशिषचे शर्ट बदलणे, त्याला जेवण भरवणे, स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती. परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती. काही दिवसांतच आशिष बरा झाला. आशिषचा एक मित्र कोलकात्यात राहात होता. आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले. सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहात होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस दिल्लीला आला होता. पण रिया पुन्हा-पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंगसोबत फिरायला जात असत. सारंगही काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे. सर्वकाही नीट चालले होते. एके दिवशी सारंगने रियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती. सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून. सारंग दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो, तर मग जावई का नाही? ही गोष्ट रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही. सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्याच शहरात तिची वाट पाहात राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली.

आशिषचे आईवडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणीही नव्हते. तरीही आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि ना ही तिच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आशिषला रिया आवडत होती. परंतु रियाचा आनंद सारंगमध्ये होता.

‘‘तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईंसारखं काही बनवू शकत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही, अशी अपेक्षा आहे.’’

‘‘जरूर.’’

‘‘रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन,’’ रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली, पण आशिषने नेहमी रियाला स्वत:पासून दूर ठेवले. रियाने लग्न करून एक चूक केली होती, पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती. एका आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला. कोलकात्याचे नाव ऐकताच रिया गोंधळात पडली.  दोघंही एका हॉटेलमध्ये उतरले. आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली.

रात्रीचे दोन वाजले होते. रियाला काही कळत नव्हते. रिया आशिषशी बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती. रात्रीचे दोन वाजले होते. रियाला झोप येत नव्हती. तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला.

‘‘तू एवढ्या रात्री, झोपली नाहीस का अजून?’’

‘‘मी आत येऊ शकते का?’’

‘‘आपण कोलकात्याला का आलोय?’’

‘‘सारंगला भेटायला. तू सारंगसोबत जास्त खूश राहशील.’’

‘‘मला काय हवंय, याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात?’’

‘‘कारण स्त्री स्वत: आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही. तू सारंगसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं, पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे, हे मला मान्य नाही. माहेरी तुला जायचे नाहीए. त्यामुळे मी तुला सारंगकडे पाठवत आहे.’’

‘‘मी तुम्हाला घाबरत नाहीए. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्यामुळे मला स्वत:ची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तिसोबत राहणे किती कठीण असते, जेव्हा त्याला ती आवडत नाही, हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उनाड मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाहीए, पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सारंगवर माझे प्रेम होते, पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल, हेही मला माहीत नाही, पण अग्निहोत्री कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही.’’

‘‘तू पूर्ण शुध्दीत आहेस का?’’

‘‘हो,मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलतेय. जर मी तुमच्यासोबत राहिले, तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील. नेहमी आपल्या इच्छेनुसारच सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाहीत, या गोष्टीवर माझा विश्वास आहे. सारंग केवळ माझ्या घरासमोर राहात होता, त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही. मला  नाही ठाऊक की, मी त्याच्यामागे एवढी वेडी का झाले होते? लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे, उत्पन्नाची साधने या गोष्टीही  महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे, त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात.’’

‘‘याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिल्लीला जावे लागेल.’’

‘‘हो नक्कीच, मला मिसेस अग्निहोत्री बनल्याचा पूर्ण अभिमान आहे.’’

आई होण्याचं सुख

कथा * आशा सोमलवार

शाळेतून आलेल्या तारेशनं संतापानं आपलं दफ्तर फेकून आईकडे धाव घेतली, ‘‘आई, कसलं घाणेरडं नाव ठेवलं आहेस गं माझं. तारेश…वर आणखी आडनाव तारकर. मुलं मला चिडवतात. सर्व हसतात…’’ बोलता बोलता तो रडकुंडीला आला.

आईनं त्याला जवळ घेत विचारलं, ‘‘काय म्हणतात?’’

‘‘तारू तारकर कुत्र्यावर वारकर…’’

‘‘वेडी आहेत ती मुलं…अरे, तुझ्या आजीनं ठेवलंय हे नाव, तू झालास त्या दिवशी पौर्णिमा होती. तारेश म्हणजे ताऱ्यांचा राजा म्हणजे चंद्र. इतकं सुंदर नाव आहे. तुझ्या रूपाला ते शोभतंही आहे…’’

‘‘पण माझं नाव आजीनं का ठेवलं? शाळेत मला जायचंय, आजीला नव्हतं जायचं…मला नाही आवडत हे नाव…बदलून टाकूयात.’’ तारेशचा थटथयाट संपत नव्हता.

‘‘अरे, तू तारेश आहेस म्हणूनच तुला चंद्रिका भेटेल…सुंदर सून आम्हाला मिळेल,’’ आईनं समजूत घालत म्हटलं.

‘‘नकोय मला चंद्रिका…मला तर सूर्य आवडतो. झगझगीत प्रकाश अन् ऊब देणारा.’’ तारेश म्हणाला. तेव्हा त्याला कुठं समजत होतं की त्याला चंद्रिका का नको होती अन् सूर्यच का आवंडत होता?

‘‘अभिनंदन सर! मुलगी झाली आहे,’’ नर्सनं येऊन सांगितलं तसा तारेश भानावर आला.

‘‘मी तिला बघू शकतो? हात लावू शकतो?’’ त्यानं अधीरपणे विचारलं.

‘‘हो…हो…या, आत या.’’ नर्सनं हसून म्हटलं. नर्सनं हळूवारपणे ते बाळ तारेशच्या हातात दिलं. किती नाजूक, केवढीशी…गोरीपान, मिटलेले डोळे…काळं भोर जावळ…तारेशनं हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन् पुन्हा नर्सच्या हातात तिला सोपवलं. नर्सनं तिला तिच्या सरोगेट आईजवळ झोपवलं. तारेश मनात म्हणाला, ‘‘सोमल, तुझी आठवण आली या बाळाला बघून…अगदी तुझंच रूप आहे रे…’’

शाळकरी वयातच तारेश इतर मुलांपेक्षा वेगळा होता. अभ्यासात तो भलताच हुशार होता. पण त्याच्या मनात मुलींविषयी अजिबात आकर्षण नव्हतं. मात्र त्याला त्याचे स्पोर्ट्स सर अशोक फार आवडायचे. त्यांचा सहवास मिळावा म्हणून तो गेम्स पीरियड कधी टाळत नसे. जिमनास्टिक शिकवताना सरांचा हात अंगाला लागला की तो मोहरून जायचा. त्या स्पर्शानं तो सुखावत असे. अशोक सर फक्त तो एक मेहनती विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. यापलीकडे त्यांना तारेशविषयी फार काही वाटलं नव्हतं.

कॉलेजच्या वयाला जेव्हा इतर मित्र मुलींवर इंप्रेशन मारण्यात दंग असायचे. तेव्हा तारेश स्वत:तच दंग असे. पण सोमलला बघितलं अन् तो जणू त्याच्या प्रेमातच पडला. सोमललाही तारक आवडला. त्यांची चांगलीच मैत्री झाली. ज्या दिवशी कॉलेज नसे, त्या दिवशी तारकच्या जिवाची घालमेल व्हायची. सोमल कधी एकदा दिसतो असं त्याला व्हायचं.

कॉलेजचं शिक्षण संपलं अन् बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घ्यायची असं दोघांनी ठरवलं. दोघं एकत्र राहतील, एकमेकांची सोबत, मदत होईल या उद्देशाने दोघांच्या घरच्यांनीही आनंदानं परवानगी दिली. दिल्लीच्या उत्तम कॉलेजात दोघांना एडनिशन मिळालं. एका जवळच्याच कॉलनीत वन रूम किचन फ्लॅट दोघांनी मिळून भाड्यानं घेतला.

कॉलेज व्यवस्थित सुरू होतं. कधी ते दोघं घरीच स्वयंपाक करायचे, कधी बाहेर जेवण घ्यायचे. दोघांची जोडी कॉलेजात ‘रामलक्ष्मण’ म्हणून ओळखली जायची. अभ्यासात दोघंही हुशार होते. प्रोफेसर्स त्यांच्यावर खुश होते.

बघता बघता शेवटचं सेमिस्टर सुरू झालं. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले होते. अनेक मुलं चांगल्या चांगल्या कंपन्यांनी निवडून घेतली. सोमलला हैदराबादच्या कंपनीत नोकरी मिळाली तर तारेशला बंगलोरच्या कंपनीत. दोघांनाही उत्तम कंपनीत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे त्यांना आनंद तर झाला होता. पण एकमेकांपासून दूर राहावं लागेल हा विचार मात्र अस्वस्थ करत होता. दोघंही निर्णय घेताना हवालदिल झाले होते. नोकरी घ्यायची म्हटलं तर मित्र सोडावा लागणार. मित्राजवळ रहायचं तर नोकरी सोडावी लागणार…कठिण अवस्था होती.

त्या रात्री एकमेकांना मिठी मारून दोघंही खूप रडले. जेवणही करायला सुचलं नाही. त्या रात्री त्यांना कळलं की ते एकमेकांसाठीच आहेत. का त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही, का ते एकमेकांशिवय राहू शकत नाही याचा उलगडा त्यांना त्या रात्री झाला. जगाच्या दृष्टीनं त्यांचं नातं, धर्माविरूद्ध किंवा अनैसर्गिक होतं. कारण दोघंही ‘गे’ होते. पण त्यांना त्याची खंत नव्हती.

दोघांनीही आपल्या प्लेसमेंट रद्द केल्या. त्यांनी दिल्लीत राहूनच काम मिळवण्याचा प्रयत्न केला अन् योगायोग असा की दोघांनाही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी मिळाली. दोघांचंही आयुष्य रूळावर आलं.

शिक्षण झालं. उत्तम नोकरी मिळाली म्हणताना दोघांच्याही घरी आता त्यांच्या लग्नाचा विषय ऐरणीवर आला. दोघांच्या घरी मुली बघायला सुरूवात झाली. पण हे दोघं आपल्यातच दंग! त्यांचं जगच वेगळं होतं. बाहेर केवढं वादळ घोंगावतंय याची त्यांना कल्पनाही नव्हती.

वारंवार जेव्हा मुली नाकारल्या जायला लागल्या, तेव्हा तारेशच्या आईच्या मनात शंका आली. त्याचं कुठं प्रेमप्रकरण तर नाहीए? कुणी मुलगी त्यानं पसंत करून ठेवली आहे का?

सोमलच्याही घरी हीच परिस्थिती होती. नेमकं काय कारण आहे, सोमल न बघताच मुली का नाकारतो आहे हे जाणून घेण्यासाठी सोमलची आई दिल्लीला त्यांच्या फ्लॅटवर पोहोचली. येण्याबद्दल तिनं काहीच कळवलं नव्हतं. त्यांचे दोघांचे हावभाव बघून तिला काही तरी संशय आला. तिने फोन करून तारेशच्या आईवडिलांना व सोमलच्या घरच्यांनाही बोलावून घेतलं.

सगळेच एकत्र समोर बसलेले…दोन्ही मुलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांसोबतच आयुष्य घालवू इच्छितात. त्यांच्यासाठी मुली बघणं बंद करा. प्रथम तर दोघांच्याही घरच्यांनी समाजात केवढी ब्रेअब्रू होईल, लोक काय म्हणतील वगैरे सांगून बघितलं. सोमलच्या आईनं तर ‘‘तुझ्या बहिणीचं लग्न अशामुळे होणार नाही,’’ असा धाक घातला. पण दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. मुलं ऐकत नाहीत म्हणताना चिडलेल्या अन् दुखावल्या गेलेल्या दोघांच्याही घरच्यांनी एकमेकांच्या कुटुंबांना भरपूर दोष दिला. खूप भांडाभांडी झाली. बातमी सर्व अपार्टमेंटमध्ये पसरली. घरमालकांन जागा सोडा म्हणून फर्मान काढलं.

एवढ्यावरही थांबलं नाही. बातमी त्यांच्या ऑफिसमध्येही पोहोचली. प्रत्येक जण त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. जणू ते परग्रहावरून आलेले लोक आहेत. कालपर्यंत जे सहकारी एकत्र काम करत होते, एकत्र जेवत होते, पार्ट्या, पिकनिक करत होते ते आता चक्क टाळू लागले. बघताच तोंड फिरवू लागले. दोघांना अस्पृश्य असल्यासारखे वागवू लागले. त्यांना ऑफिसात काम करणं अशक्य झालं.

सोमलच्या बॉसनं तर त्याला एकट्याला बोलावून घेऊन समजावलं, ‘‘हे बघ सोमल, तुमच्यामुळे ऑफिसातलं वातावरण बिघडतंय. ऑफिसमध्ये लोक कामं कमी करताहेत, तुमच्याबद्दलच्या चर्चेत वेळ जास्त घालवताहेत. मला वाटतं, तुम्ही दोघांनी राजीनामा द्यावा. आम्ही तुम्हाला काढलं तर तुम्हाला इतरत्र नोकरी मिळवताना अडचण येईल. तुम्ही राजीनामा दिला तर तुमच्या चांगल्या सीपीमुळे तुम्ही दुसरीकडे कुठं पुन्हा जॉब मिळवू शकाल.’’

काळ तर कठिणच होता. शेवटी दोघांनी दिल्ली सोडायचा निर्णय घेतला. त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. तेवढ्यात सोमलच्या एकुलत्या एका बहिणीचं राखीचं लग्नही झालं, पण घरच्यांनी त्याला कळवलंही नाही.

घरच्यांनी नाव टाकलं होतं. दिल्लीतल्या मित्रांशी संपर्क तुटला होता. ऑफिसचे सहकारीही दुरावले होते. मुंबईत त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांचं जग त्या दोघांपुरतंच मर्यादित होतं. पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू झालं होतं.

सोमलच्या एका चुलत वहिनीनं लीनानं मात्र एवढं सगळं झाल्यावरही सोमलशी संपर्क ठेवला होता.

एकदा अवचितच लीना वहिनीचा फोन आला की राखीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ऐकून सोमलला फारच दु:ख झालं. बहिणीवर फार माया होती त्याची.

यावेळी तिला आधाराची गरज असेल असा विचार करून तो तडक तिकिट काढून गाडीत बसला.

राखीच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला मिठी मारून राखी रडू लागली. तेवढ्यात तिची सासू आली अन् तिला ओढत आत घेऊन गेली. सोमलला ऐकवलं, की त्यान पुन्हा या घरात पाय ठेवू नये. तिच त्याची व राखीची शेवटची भेट होती.

एका सुट्टीच्या दिवशी दोघं एक सिनेमा बघत होते. त्यात तीन पुरूष एका बाळाला वाढवतात. त्या बाळाला आई नसते.

सोमलनं विचारलं, ‘‘तारेश, आपल्याला बाळ होऊ शकतं?’’

‘‘कुणास ठाऊक! पण बाळ तर आईच्या गर्भाशयातच वाढतं ना? मग कसं होणार?’’ तारेशनं म्हटलं.

‘‘काही तरी मार्ग असेलच ना? विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे…आपण सरोगसीची मदत घेतली तर?’’

‘‘तसं करता येईल. पण त्यात काही कायदेशीर अडचणी असू शकतात. कायद्यानं आपल्यासारख्यांना सरोगसीची परवानगी आहे का हे बघावं लागेल. आपल्यात सरोगेट मदर कोण देणार? आपले दोघांचेही नातलग आपल्याला दुरावले आहेत, तरीही आपण या विषयातल्या एखाद्या तज्ञाला भेटूयात. त्याच्याकडून खात्रीची माहिती मिळेल. आता हा विषय नकोच!’’ तारेशनं त्या दिवशी तो विषय तिथंच थांबवला.

एकदा काही कारणानं तारेश एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथं आयव्हीएफ सेंटर बघून त्याचे पाय तिथंच थबकले. त्याला एकदम सोमलचं स्वप्नं ‘आपलं बाळ असावं’ आठवलं. त्यानं आत जाऊन तिथल्या प्रमुख डॉक्टर सरोज यांची अपॉइंटमेंट मिळवली अन् ठरलेल्या दिवशी सोमलला बरोबर घेऊन तो तिथं पोहोचला.

डॉ. सरोजनं त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं अन् सांगितलं की सोमलचं पिता बनण्याचं स्वप्नं आयव्हीएफ अन् सरोगसीच्या माध्यमातून वास्तवात येऊ शकतं.

दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून डॉ. पुढे म्हणाल्या, ‘‘तुम्ही ऐकलंच असेल की अभिनेता तुषार कपूर या सरोगसीच्या टेक्निकचा वापर करून सिंगल पिता झाला आहे. सरोगसी टेक्निकच्याच माध्यमातून कुणा फिल्म इंडस्ट्रीवाल्याला जुळी मुलं आहेत. आमच्याकडे बऱ्याच सिंगल पुरूषांनी आई, वडिल होण्याची इच्छा दर्शवली आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशनही केलं आहे. तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकता.’’

‘‘पण भाड्यानं गर्भाशय कसं मिळेल?’’

‘‘त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुणा जवळच्या नातलग किंवा मित्रांची मदत घ्यावी लागेल.’’

‘‘आता कुणाची मदत घ्यायची ते तुम्हीच बघा. ठरवा त्या बाबतीत. मी मदत करू शकत नाही,’’ एवढं बोलून डॉक्टरांनी पुढल्या व्हिजिटरसाठी बेल वाजवली.

दोघं घरी परतले. सोमलला एकदम लीना वहिनीची आठवण झाली. त्यानं तिला फोन लावला. ‘‘हॅलो वहिनी, कशी आहेस?’’

‘‘सोमल भाऊजी, आज कशी काय आठवण आली?’’ तिनं प्रेमानं विचारलं. मग सोमलनं तिला सर्व परिस्थिती सांगितली अन् तिची मदत मागितली.

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हणाली, ‘‘मला क्षमा करा, सोमल भाऊजी, पण मी तुमची मदत करू शकणार नाही. मुळात तुमचे भाऊ तयार होणार नाहीत आणि माझ्यासाठी माझा नवरा आणि कुटुंब महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय ना? मला क्षमा करा.’’

सोमलच्या मनातली अंधुकशी आशाही संपली. पण तारेशनं ठरवलं, इंटरनेटची मदत घ्यायची. इंटरनेटवर हवी ती माहिती मिळवता येते. दोघंही आता उत्साहानं इंटरनेटवर शोध घेऊ लागले. त्यातच एका प्रेस रिपोर्टरची कव्हर स्टोरी त्यांच्या वाचण्यात आली. तिनं लिहिलं होतं की गुजरातमध्ये आणंद या गावी ‘सरोगेट मदर’ सहज उपलब्ध होतात. इथं सरोगसीच्या माध्यमातून किमान १०० बाळं जन्माला आली आहेत. हे वाचताच दोघांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी सरळ आणंद गाठलं. कारण इथंच त्यांचं स्वप्नं प्रत्यक्षात येणार होतं. तिथं एका टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकच्या बाहेरच त्यांना एक दलाल भेटला. त्यांचं नवखेपण आणि बाळाबद्दलची अतोनात ओढ अन् असोशी बघून त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतले. हा दलाल सरोगसीसाठी भाड्यानं गर्भाशय मिळवून देण्याचा व्यवसाय करत होता. त्यानं आपल्या गर्भाशयात मूल वाढवण्यासाठी तयार असलेल्या स्त्रीशी त्यांची भेट घडवून आणली. दोनच दिवसात सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता करून दोघं मुंबईला परत आले

तेवढ्यात एक दुदैर्वी घटना घडली आणि तारेशच्या आयुष्यात अंधारच पसरला. दोघं मित्र पिता होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी खंडाळ्याला जायला निघाले होते. तेवढ्यात हायवेवर भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल केलं, पण सोमल हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूनही घरून कोणी आलं नाही.

एका महिन्याने त्या दलालाचा फोन आला. तारेशनं त्याला घडलेली घटना सांगितली आणि मृत सोमलची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचेच गोठवलेले शुक्राणू वापरून बाळ जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी दलालानं अजून काही रकमेची मागणी केली. तारेशनं साठवलेला सर्व पैसा खर्च केला.

सगळ्या औपचारिक बाबींची पूर्तता झाली आणि तारेशचे स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवलेले शुक्राणू अन् आईचं स्त्रीबीज यांचा संयोग घडवून सरोगेट आईच्या गर्भाशयात भ्रूण वाढेल अशी व्यवस्था केली गेली. नऊ महिने पूर्ण झाले अन् बाळाचा जन्म झाला. ती मुलगी होती…सोमलची मुलगी.

एकट्यानं तान्हं बाळ वाढवणं सोपं नाही हे तारेश जाणून होता. पण सोमलचं स्वप्नं पूर्ण करणं हाच त्याच्या आयुष्याचा एकमेव उद्देश उरला होता. त्यासाठी तो मानसिक दृष्ट्याही स्वत:ला सक्षम करत होता.

कॉन्टॅ्रक्टप्रमाणे सरोगेट आईनं दोन महिने मुलीला आपलं दूध पाजलं आणि नंतर तारेशच्या हातात ते बाळ ठेवून ती निघून गेली.

त्या एवढ्याशा मुलीला घेऊन तारेश सोमलच्या घरी गेला. ही मुलगी सोमलची आहे. त्याची इच्छा होती म्हणूनच या मुलीचा जन्म झाला आहे, हे सांगितलं. सोमलची विधवा बहिण राखी पटकन् पुढे आली. तेवढ्यात त्याच्या आईवडिलांनी तिला अडवलं.

तारेश म्हणाला, ‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही माझा तिरस्कार करता. तुमचा माझ्यावर राग आहे. पण या बाळात तुमच्या मुलाचा अंश आहे. सोमल जिवंत असता तर त्यालाही बाळासाठी आजीआजोबा व आत्याचे आर्शिवाद व प्रेम मिळायला हवं हेच वाटलं असतं. मी हर प्रयत्नानं या बाळाला वाढवीन. मोठं करीन. कारण ही मुलगी सोमलची आहे. तुम्ही तिला नाकारलीत तरी मी तिला वाढवीनच.’’ तो मुलीला घेऊन माघारी वळला.

दाराबाहेर त्याचं पाऊल पडण्याआधीच मागून सोमलच्या आईची हाक ऐकू आली, ‘‘थांब…’’

तारेशनं वळून बघितलं. बाळाचे आजीआजोबा आपले अश्रू पुसत पुढे येत होते.

आजोबा म्हणाले, ‘‘आमचा मुलगा गेला तरी त्याची ही मुलगी आम्ही आमच्यापासून दूर होऊ देणार नाही. आम्ही हिला वाढवू.  उत्तम सांभाळू. आमची दुधावरची साय आहे ती. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही…’’

तो म्हणाला, ‘‘पण, ही मुलगी हे आम्हा दोघांचं स्वप्नं होतं?’’

‘‘होय…तूच या मुलीचा बाप असशील पण आता तिला आईची जास्त गरज आहे…कळतंय ना तुला? तुझी हरकत नसेल तर राखी या बाळाची आई होईल.’’ सोमलची आई म्हणाली.

‘‘पण…पण तुम्हाला खरं काय ते ठाऊक आहे. राखीला मी पत्नीसुख देऊ शकत नाही.’’ गोंधळलेल्या तारेशनं म्हटलं.

‘‘मला पत्नीचं नाही, आईचं सुख हवंय, मी आई होण्याचं सुख अनुभवू इच्छिते.’’

राखीनं पुढं होऊन बाळाला आपल्याकडे घेत म्हटलं.

राकेशला वाटलं, ‘बाळाच्या त्या निरागस चेहऱ्यात जणू सोमलचाच तृप्त, समाधानानं उजळलेला चेहरा तो बघतोय…’

मी आहे राणी

मिश्किली * डॉ. अरुणा शास्त्री

अहो मॅडम, हो, तुम्हालाच म्हणतेय मी… हल्ली आम्ही बाईसाहेब, माईसाहेब वगैरे न म्हणता सरळ मॅडमच म्हणतो. काही जणी म्याडम म्हणतात. तर मॅडम, तुमची हिम्मत कशी झाली मला मोलकरीण, कामवालीबाई, भांडी घासणारी, धुणंभांडी करणारी वगैरे म्हणायची? मला हाक मारताना माझ्या नावाने अन् प्रेमाने हाक मारायची नाही तर सरळ मेड सर्व्हंट किंवा मेड म्हणायचं. नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. मी मोलकरीण किंवा कामवाली नाही. जिथे काम करायला जाते तिथे राणीच्या रूबाबात राहाते. मोलकरीण तर कुणी मला म्हणूच शकत नाही. कुठल्याही नोकरीची पत्रास मी बाळगत नाही. मनात येईल तेव्हा तुमची टुकार नोकरी मी सोडू शकते. गरज तुम्हाला आहे माझी…मला नाही. वाट्टेल तेवढी कामं मिळतात मला. एक घर सुटलं तर दहा घरं असतात जी मला हातोहात उचलतात. ठेवायचं तर ठेवा, नाही तर मी चालले…मै चली, मै चली…ला ला ला. लाला ला…

कामं मी माझ्या मर्जींने आणि माझ्या अटींवर करते हे तुम्ही विसरायच नाही हं, मॅडम. मला कामावर ठेवाल तेव्हा वेळेचं बंधन मला घालायचं नाही. मी काही तुमच्यासारखी किंवा साहेबांसारखी ऑफिसात काम करत नाही जिथे वेळेत पोहोचणं कंपलसरी असतं. मी आरामात माझ्या घरातली कामं करून, मग नटूनथटून कामावर येते. म्हणून ‘उशीर केला, वेळेवर आली नाहीस’ वगैरे कटकट करायची नाही…कळलं?

एक गोष्ट अजून ऐकून घ्या. माझ्याकडे माझा मोबाइल आहे. त्यावरून मी कुणाशीही, कितीही वेळ, केव्हाही अन् कधीही बोलेन. तुम्ही त्यावर आक्षेप घ्यायचा नाही, की कामं खोळंबली आहेत, ही गप्पा मारते, असं बडबडायचं नाही.

त्याशिवाय मला जेव्हा वाटेल तेव्हा, जितक्या वेळा वाटेल तितक्या वेळा हवा तेवढा म्हणजे दीड दोन कप चहा लागतो. त्याशिवाय माझं हातपाय चालत नाहीत. कडक अन् गोडगट्ट चहा घेताना मला कुणी हटकलेलं खपत नाही.

आणि हो मॅडम, अजून एक…दुपारी मला माझ्या आवडत्या सीरियल्स बघायच्या असतात. जर मी फुल स्पीडवर पंखा लावून मूव्ही किंवा सीरियल बघितली तर तुम्ही उगीचच घर डोक्यावर घेऊ नका. कारण टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींमुळे माझं सामान्य ज्ञान खूपच वाढतं. कुठल्या डिटर्जण्टमध्ये शंभर लिंबाची शक्ती आहे अन् कुठली पावडर दहा हातांनी मळ काढते हे सगळं त्यातूनच तर कळतं. आमचे हात मऊ राहायला हवेत. आम्हाला कंबरदुखीचा त्रास नको म्हणून तर या सगळ्या जाहिराती असतात. तुम्ही त्या सर्व वस्तू आधीच घरात आणून ठेवा.

मॅडम, आधीच क्लीयर करा हं. तुमचे सासूसासरे तुमच्या सोबत राहातात का? जिथे म्हातारी खोडं राहातात त्या घरात मी काम करत नाही. कारण जेवढा वेळ आम्ही काम करतो, तेवढा वेळ खडूस म्हातारी डोक्यावर उभी राहाते, ‘इथून केर काढला नाही,’ ‘तिथून पुसून घेतलं नाही,’ असं नाही अन् तसं नाही…खरं कारण असं असतं मॅडम की सुनांवर त्यांची सत्ता नसते म्हणून त्या आम्हाला वेठीला धरतात.

आणि हो, तुमच्या घरात लहान मुलं असली अन् कधी प्रेमाने मी त्यांना एखादी थप्पड मारली तर लगेच पोलिसात कम्पलेंट करायला जाऊ नका. कळलं ना? माझी स्वत:चीही पोरंबाळं आहेतच ना? त्रास देतात तेव्हा त्यांनाही बदडून काढतेच ना मी? तुमच्या मुलांना माझी मुलंच समजेन. कधी तरी दिले दोन धपाटे तर तारांगण घालायची गरज नाही. घरात सी.सी. कॅमेरे लावल्याची धमकी कोणाला देताय? त्या सी.सी. कॅमेऱ्याला अन् तुम्हालाही कसं गुंडाळायचं ते मला बरोबर येतंय.

अजून एक गोष्ट क्लीयर व्हायला हवीय. माझं स्वत:चे रूल्स अन् रेग्युलेशन्स आहेत. मी कामावर जॉइन होण्याआधीच एका महत्त्वाच्या मुद्दयावर डिस्कस करून घेते. मला आठवड्याला एक याप्रमाणे महिन्याला चार सुट्टया लागतात.? खरं तर मला ‘सिक्स डेज वीक’ ही कामाची पद्धत आवडते. त्याखेरीज सणावाराला सुट्टी मला घ्यावीच लागेल. घरी आम्हीही सणवार करतो ना?

त्याखेरीज कधी मी आजारी पडले, कधी नवरा, कधी मुलं आजारी झाली आणि कधी नात्यात एखादी मयत झाली, अजून काही घडलं तर मी रजा घेणारच! तुमच्या घरी पाहुणे येणार तेव्हाही मी रजेवर जाणारच!

सुट्टयांसाठी वाट्टेल तेवढी कारणं आहेत माझ्यापाशी. खरं तर रजेची १०१ कारणं असं पुस्तकही मी लिहू शकते. पण काय करू, मला लिहायला, वाचायला येत नाही ना? पण मी शिकलेल्या भल्याभल्यांचा नक्षा उतरवते.

मॅडम, आता थोडं अॅडव्हान्सविषयी बोलून घेऊयात? अॅडव्हान्स घेण्यासाठीही माझ्याकडे १०१ कारणं आहेत. गरज तुम्हाला माझी आहे त्यामुळे थोडी कटकट करून का होईना तुम्ही मला अॅडव्हान्स द्यालच. चारपाच हजार मला अॅडव्हान्स लागतील. कापताना मात्र फक्त मी महिन्याला दोनशेच कापून देईन. कटकट केलीत तर अॅडव्हान्स परत न करताच तुमचं काम सोडून पळून जाईन.

मी अत्यंत प्रामाणिक आहे. चोरीमारी करत नाही. अगदी बारीकशी सुईसुद्धा कधी चोरली नाहीए. पण बाकी अनेक गोष्टी अगदी बेमालूम नाहीशा होऊ शकतात. पुन्हा माझा संशय कुणी घेणार नाहीच. कारण मी स्वत: काहीच करत नाही पण दुसऱ्यांना बातमी तर देऊ शकते ना? घरातल्या सर्वांची दिनचर्या मला ठाऊक असते. कोण केव्हा जातं, कोण केव्हा येतं, सोनंनाणं कुठे ठेवलेलं असतं. समुद्राकाठी सुट्टी घालवायला कधी जाणार हे सगळं मलाच ठाऊक असतं. माझ्याकडून माहिती घेऊन हातसफाई दाखवणारा कुणी वेगळाच असतो. त्यामुळे मला मुद्देमालासकट कधीच कुणी पकडू शकणार नाही.

बरं, तर मॅडम, आता थोडं पर्सनलही बोलून घेऊयात? म्हणजे हा मुद्दा तसा रोमॅण्टिक आहे. म्हणजे कसं की तुमचे फारसे म्हातारे न झालेले साहेब किंवा वयात आलेला मुलगा यांना नादी लावण्याचेही १०१ प्रकार मला येतात. आता बघा, केरफरशी करताना माझी साडी पोटऱ्यांपर्यंत वर खोचलेली असते तिकडे त्यांचं लक्ष गेलं किंवा तुम्हीच दिलेल्या ‘लो कट’ ब्लाउजकडे ते टक लावून बघत बसले अन् त्यांना ‘कुछ कुछ’ व्हायला लागलं तर मला दोष द्यायचा नाही. कारण तुम्ही दिलेलेच ‘लो कट’ ब्लाउज मी वापरणार. तुमच्या नकळत त्यांनी मला बक्षीस, चिरीमिरी दिली तर तुम्ही रागवायचं नाही. अर्थात् मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही म्हणा…

आणि बरं का म्याडम, एक मजेदार गोष्ट अजूनही तुम्हाला सांगितलेली नाहीए. तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की तुमच्या घरात काम करणाऱ्या आमच्यासारख्या मेडसर्व्हंट्स जेव्हा आपसांत भेटतात तेव्हा त्या काय काय बोलतात. त्यांच्या गप्पांमध्ये फक्त तुम्ही लोकच ‘टारगेट’ असता.

प्रत्येकीने आपापल्या मालकिणींना त्यांचं रंगरूप अन् स्वभावावरून मजेदार नावं दिली आहेत. कुणी ‘काळीढुस्स म्हैस’ आहे कुणी सुस्तावलेला अजगर आहे. कुणी मांजरीसारखी चोरून खाणारी, तर कुणी फॅशनेबल बेडकी. मॅडम, आम्ही तुमच्या नकलादेखील करतो. आम्ही सुट्टी घेतली की तुमची कशी चिडचिड होते, किती फजिती होते याची नक्कल करून तर आमची खूपच करमणूक होते.

आम्ही अनेक तऱ्हेने स्वत:ला रमवून घेतो. कॉलनीत कुणाकडे काय चाललंय, कुणाचं कुणाशी लफडं आहे. कुणाच्या घरात दोघांमध्ये तिसरा ‘तो’ किंवा ‘ती’ आहे याची बितंबातमी आमच्याकडे असते. त्यातून पुन्हा त्या सर्व बातम्यांना तिखटमीठ मसाला लावून आम्ही त्या सगळीकडे पसरवण्याचं महत्त्वकार्य करतो. या बातम्या व्यवस्थित ब्रॉडकास्ट होतात, आमचं हे न्यूज चॅनल खूपच लोकप्रिय आहे.

आपल्या मालकिणीला ब्लॅकमेल करायला मला आवडतं. सणासुदीला बक्षिसी अन् दिवाळीचा बोनस तर घेतेच, पण दरवर्षी पगारवाढही घेते. याखेरीज कुणी आपल्या मेडला काय दिलं हे पण वाढवून सांगते. म्हणजे आपण कमी पडू नये या भीतीने मालकीण मलाही भरभरून देते.

आता जाता जाता शेवटचं सांगते. वाटलं तर धमकी समजा. आमच्या घरकाम करणाऱ्या मेड सर्व्हंट्सची एक युनियन आहे. मीच त्याची अध्यक्ष आहे. आमच्या मंथली मीटिंग्ज असतात. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही चक्क संपावर जातो. तक्रार करायला पोलिसात जायलाही मागेपुढे बघत नाही. कारण शेवटी जिंकणार आम्हीच आहोत. कारण कायदा आमचीच बाजू घेणार ही आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्वव्यापी आहोत. सर्वशक्तिमान आहोत. तुम्हाला कामावर ठेवायचं असेल तर ठेवा…नाही तर ही मी निघाले…

सुंदर नातं मैत्रीचं

कथा * सुधा काटे

वडिलांच्या आकस्मिक मृत्युची बातमी कळताच सीमाला ताबडतोब जावं लागलं. त्यांचं तेरावं आटोपून ती परत स्वत:च्या घरी परतल्यावर तिने लॅपटॉप उघडून फेसबुकवर लॉग इन केलं. फ्रेण्ड रिक्वेस्टवर क्लिक केलं अन् जे नाव समोर आलं, ते बघताच ती दचकली.

‘‘अगंबाई, हा तर शैलेश!’’ ती उद्गारली. इतकी वर्षं मध्ये गेल्यामुळे शैलेश तसा विस्मरणात गेला होता. पण ते नाव समोर आलं आणि तिला शैलेशबरोबर घालवलेले दिवस पुन्हा जसेच्या तसे आठवले.

दोघंही एकाच कौलेजचे विद्यार्थी होते. शैलेश अभ्यासात फार हुशार होता. शिवाय तो उत्तम गायक आणि वादक होता. कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत सीमा अन् तो नेहमीच गात असत. त्या दोघांमुळेच यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या कॉलेजला नेहमीच बक्षीसं मिळायची. गाण्याच्या प्रॅक्टिसच्या निमित्ताने दोघं वरचेवर भेटायची.

एकदा सीमा आजारी पडली. आठ दिवस ती कॉलेजला जाऊ शकली नाही तेव्हा काळजी वाटून शैलेश तिचा पत्ता शोधत थेट घरीच येऊन धडकला.

अशक्तपणामुळे अजून पुढले आठ दिवस सीमा कॉलेजला जाऊ शकत नव्हती म्हणून त्याने स्वत:च्या नोट्स तिला दिल्या. अभ्यासही करवून घेतला. त्यामुळे सीमाला पेपर सोपे गेले अन् फर्स्टक्लास मिळाला. हा हुशार, कलाकार मुलगा अत्यंत कनवाळू अन् सज्जन आहे हे सीमाला जाणवलं.

हळूहळू त्यांची ओळख मैत्रीत बदलली. कॉलेजात ती दोघं आता सतत बरोबर असायची, त्यांच्याबद्दल कॉलेजात चर्चा चालायची. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ती आपल्यातच दंग असायची. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण प्रेमाला अजून अभिव्यक्ती नव्हती. फक्त ते त्यांना एकमेकांच्या डोळ्यांत दिसायचं. प्रेमाचा उच्चार झाला नव्हता.

तरीही प्रेमाची धुंदी होतीच. एकमेकांच्या आवडीनावडीचा विचार प्रामुख्याने केला जायचा. टळटळीत उन्हाच्या दुपारीही एकमेकांच्या संगतीत चांदणं पसरल्याचा भास व्हायचा. लोकांची पर्वा तर करण्याचा प्रश्नच नव्हता.

मनातल्या मनात भविष्यकाळाची स्वप्नं रंगवताना ती पूर्ण होतील की नाही हा विचारच त्या वेड्या वयात मनात येत नाही. प्रेमाची साद मनात, शरीरात भिनत असते. बाहेरच्या जगात शिशिर ऋतू असो की कुठलाही ऋतू असो, प्रेमिकांच्या मनात कायम वसंत फुललेला असतो. श्रावणसरीत चिंब भिजायला मन आसुसलेलं असतं. प्रेमाचे सप्तरंग सर्वत्र दिसत असतात.

शिक्षण पूर्ण झालं अन् शैलेश आपल्या घरी निघून गेला. तो दूर उत्तर प्रदेशात, बनारसला राहात असे. एकमेकांना पत्र पाठवायची असं दोघांचं ठरलं होतं. वर्षभर पत्रांची आवकजावक होतीही. पण त्यानंतर त्याची पत्रं येणं बंद झालं. सीमाने किती तरी पत्रं पाठवली पण एकाचंही उत्तर आलं नाही. त्या काळात मोबाइल किंवा इंटरनेट नव्हतंच. साधे लॅण्ड लाइन फोनही सर्रास नसायचे. हळूहळू सीमानेही पत्रं पाठवणं बंद केलं. आता  शैलेशला विसरणं भाग आहे हे सत्य स्वीकारावंच लागलं.

सीमा सुशिक्षित होती. चांगल्या घराण्यातली होती. तिची विचारसरणी स्वच्छ होती. नातं नेहमी दोन्ही बाजूंनी जोपासलं जातं हे तिला कळत होतं. त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर आपण त्याच्या गळी पडायचं नाही हेही तिला कळत होतं. त्यामुळेच तिने शैलेशला आपल्या आयुष्यातून काढून टाकलं. हळूहळू तो विस्मरणात गेला. कधी तरी ते नाव ऐकलं तर एक चेहरा अंधुकपणे डोळ्यासमोर तरळून जायचा बस्स! याहून अधिक काहीच नाही.

काळ सतत पुढे सरकत असतो. सीमाचं लग्न झालं. दोन मुलंही झाली. सुनील शिकलेला, मनाचा सज्जन अन् भरपूर कमावणारा होता. पण धंद्यात इतका गुंतलेला की बायकोसाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. सीमाला पैशाला तोटा नव्हता. सुनीलचा जाचही नव्हता. पण ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. बरंच काही असूनही ‘काहीतरी’ मिसिंग आहे असं तिला वाटायचं.

१५ वर्षांनंतर फेसबुकवर शैलेशशी संपर्क झाला अन् सीमाच्या मनात प्रचंड घालमेल झाली. आता पुन्हा नव्याने संबंध कशाला सुरू करायचा या विचाराने तिने रिक्वेस्ट न करण्याचा निर्णय घेतला.

मध्यंतरी चार पाच दिवस गेले अन् त्याचा मेसेज आला. भेटण्याची खरोखर इच्छा असली तर नियतीही ती भेट घडवून आणण्यात हातभार लावते. यावेळी तिने मेसेजचं उत्तर दिलं. चार दोन मेसेज झाले तेव्हा तिला कळलं शैलेश पुण्यात स्थायिक झालाय. बायकोमुलांसह राहातोय. मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली.

मग संवाद सुरू झाला. पहिल्यांदा शैलेशचा आवाज ऐकून ती रोमांचित झाली. तिचा कंठ दाटून आला. त्याच्या ‘तू कशी आहेस?’ या प्रश्नाला तिला उत्तर देणं जमेना.

कशीबशी बोलली, ‘‘मी बरी आहे. तुला अजून आठवण आहे माझी?’’

‘‘म्हणजे काय? मी तुला विसरलोच नव्हतो तर आठवण आहे का या प्रश्नाला काय अर्थ आहे?’’ तिच्या हृदयाची धडधड वाढली. कानशिलं गरम झाली.

‘‘असं जर होतं, तर पत्रं पाठवणं का बंद केलंस?’’

‘‘अगं. तुझं एक पत्र आईच्या हातात पडलं. तिने त्यावरून आकाशपाताळ एक केलं. यापुढे तुला पत्र पाठवणार नाही असं माझ्याकडून वचन घेतलं. मला  स्वत:ची शपथ घातली. मी तिचा एकुलता एक मुलगा ना? मला ऐकावंच लागलं. काय करणार?’’

सीमाला तक्रारीला जागा नव्हती. कारण त्याने ‘तुझ्याशी लग्न करेन, आपण एकत्र राहू’ असं तिला कधीच म्हटलं नव्हतं. तिनेही आपलं प्रेम या शब्दात व्यक्त केलं नव्हतं. तरीही दोघांमध्ये एक अतूट नातं होतं.

चला, बोलण्यामुळे निदान परिस्थिती काय होती ते तर कळलं. बोलली नसती तर अढी मनात राहून गेली असती.

काळानुरूप सगळी सृष्टीच बदलत असते. शरीरात बदल होतात. बुद्धी परिपक्व होते पण मन मात्र तसंच राहातं. प्रत्येक माणसाच्या आत एक लहान मूल दडलेलं असतं. संधी मिळाली की ते कोणत्याही वयात आपलं अस्तित्त्व दाखवायला लागतं.

त्यांच्या गप्पा फोनवर चालायच्या. मर्यादा सांभाळून दोघंही बोलायची. मधल्या इतक्या वर्षांच्या गॅपनंतरही दोघांना जुने दिवस, जुने प्रसंग आठवत होते. गप्पा मारताना पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळत होता. काही गोष्टी सीमा विसरली होती त्याची आठवण शैलेशने करून दिली. काही गोष्टी शैलेशच्या लक्षात नव्हत्या, त्याची सीमाने त्याला आठवण करून दिली. जुने दिवस आठवताना खूप मजा वाटायची.

मध्येच सीमाला वाटायचं आता आपण विवाहित आहोत. दोन मुलं आहेत. जुन्या, कॉलेजमधल्या मित्राशी असे संबंध ठेवणं गैर तर नाही ना? अजून तिने याबद्दल नवऱ्यालाही सांगितलं नव्हतं. हे असं पुढे किती काळ सुरू राहील?

मनाच्या अशा दोलायमान अवस्थेतच पाचसहा महिने निघून गेले. हे नव्याने निर्माण झालेलं नातं असंच जपलं जावं, ते ओझं ठरू नये असं दोघांनाही वाटत होतं. सुरुवातीला रोमांचक, थ्रीलर वाटणारं संभाषण आता दिलासा देणारं, आधार देणारं ठरलं होतं. ऐकलेली एखादी बातमी एखादा चांगलासा विनोद शेयर केल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटायचं.

एकदा शैलेशने सांगितलं की ऑफिसच्या कामासाठी त्याला लवकरच दिल्लीला जावं लागणार आहे. त्यावेळी तो सीमाला नक्कीच भेटेल. तिच्या नवऱ्याला व मुलांना भेटायलाही त्याला आवडेल.

हे ऐकून सीमा एकदम आनंदली. पण लगेच तिला वाटलं, फोनवर भेटणं, बोलणं इथवर ठीक आहे. पण प्रत्यक्ष भेटणं? भेटावं की न भेटावं? ती थोडी भांबावली. दुसरं मन म्हणालं, भेटायला काय हरकत आहे? आता तुम्ही दोघंही विवाहित आहात. नवथर वय कधीच ओलांडलं आहे. जबाबदारीने वागणं सहज जमायला हवं. चांगले मित्र म्हणून भेटायला काय हरकत आहे?

‘‘सुनीलना काय वाटेल?’’ पहिल्या मनाने शंका काढली.

दुसरं मन म्हणालं, ‘‘काय वाटायचंय? विवाहित स्त्रीला मित्र असू नयेत असं त्यांनी कधीच म्हटलं नाहीए. त्यांना तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही तर तू स्वत:च्या मानसिक गरजेसाठी शैलेशचा आधार घेतला म्हणून ते रागावणार नाहीत. एकदा शैलेशला भेटून बघ. मग मुलांशी अन् सुनीलशीही त्याची ओळख करून दे.’’

ही गोष्ट सीमाला पटली. ती उत्सुकतेने शैलेशच्या येण्याची वाट बघू लागली.

त्या दिवशी सकाळीच सुनील बिझनेस मीटिंगसाठी कोलकात्याला गेला होता. मुलं शाळेत गेली होती अन् शैलेशचा फोन आला. शैलेशने तिला कनॉट प्लेसच्या एका कॉफी हाउसमध्ये भेटायला बोलावलं होतं. ती घरी एकटी असताना त्याने घरी यावं हे तिलाही जरा विचित्र वाटत होतं. त्यामुळे बाहेर सार्वजनिक ठिकाणी भेटणं एकंदरीतच सोयीचं होतं.

शैलेशला इतक्या वर्षांनंतर भेटताना आपल्याला भावना अनावर होतील का? तो कसा रिअॅक्ट होईल वगैरे मनातल्या शंकांचं प्रत्यक्ष भेटीत निरसन झालं. खूप प्रेमाने त्याने सीमाला रिसीव्ह केलं. एवढ्या वर्षांत तो फारसा बदलला नव्हता. केसांमध्ये थोडी रुपेरी झणक जाणवत होती. पूर्वीसारखाच मोकळेपणाने वागतबोलत होता. तीही मनमोकळी झाली.

कॉलेज सोडल्यापासूनची सर्व माहिती त्याने दिली. त्याची नोकरी, पत्नी, मुलंबाळं…संसारात अन् नोकरीत तो सर्वार्थाने सुखी होता पण तरीही सीमाची त्याच्या मनातली जागा कुणीच घेऊ शकणार नव्हतं.

हे ऐकून सीमाला मनातून खूप बरं वाटलं. स्वत:विषयीच्या गर्वाने मन भरून आलं.

शैलेशने विचारलं, ‘‘तुझं गाणं म्हणणं अजून चालू आहे?’’ दुखऱ्या जखमेला धक्का लागावा तशी मनातल्या मनात सीमा कळवळली. पण वरकरणी सहज बोलावं तसं बोलली, ‘‘छे: रे, मला वेळच मिळत नाहीए. सुनील त्यांच्या धंद्यात बिझी असतात अन् त्यांना गाण्याची फारशी आवडही नाहीए.’’

‘‘त्यांना वेळ नसेल, आवडही नसेल, पण तुला तुझी आवड पूर्ण करू नकोस असं कधी म्हणाले का ते? तुझ्याजवळ पैसा आहे. गाडी, ड्रायव्हर आहे, मुलं अगदी लहान नाहीत, तू तेवढा वेळ सहज काढू शकतेस…’’ शैलेश म्हणाला.

हे शब्द, हे प्रोत्साहन खरं तर सीमाला सुनीलकडून अपेक्षित होतं. त्याने तिच्या गाण्याबद्दल, आवाजाबद्दल कधीच प्रशंसोद्गार काढले नव्हते. पण तिने तरी कधी मोकळेपणाने आपल्या या गुणाविषयी, आवडीनिवडीविषयी त्यांना सांगितलं होतं?

तिने एक नि:श्वास सोडला. मनातच ठरवलं यापुढे आपण गायचं, क्लासला जाऊन अधिक चांगलं शिक्षण घ्यायचं. लोकांपुढे आपली कला मांडायची.

तिला विचारात हरवलेली बघून शैलेश म्हणाला, ‘‘आपला दोघांचा एक अल्बम काढूया. आपल्या मॅच्यूरिटीला साजेशी गाणी निवडू. मित्र म्हणून, सहकारी म्हणून आपण भेटत जाऊ. पुढल्यावेळी मी माझी पत्नी व मुलांनाही आणेल. तुझा नवरा व मुलंही असतील, कौटुंबिक पातळीवरची मैत्री या वयाला अधिक भावते. आपण फोनवर बोलतो तेव्हा या बाबतीत अधिक चर्चा करू.’’

सीमाला शैलेशच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं, आत्तापर्यंत तिच्या मनात रिक्त असलेली ‘चांगल्या मित्राची’ जागा शैलेशने घेतली होती. जगण्याला एक चांगला उद्देश, एक नवी दिशा मिळाली होती.

निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा सीमाने मोकळ्या मनाने शेकहॅण्ड केला. ‘गाणं सुरू करते’ म्हणून खात्री दिली. शैलेशच्या मनात तिची खास जागा आहे ही भावना सुखावणारी होतीच. त्यामुळे आता तो दूर असला तरी त्यांच्यात दुरावा नव्हता.

अल्लड वयातली प्रेमभावना आता नव्हती. त्यावेळी ते प्रेम अव्यक्त होतं. पण आज व्यक्त झालेली मित्रत्त्वाची भावना अधिक बोलकी आणि अर्थपूर्ण होती. हे नातं अभिमानाने मिरवण्याचं होतं. आपुलकीने जपायचं होतं. हे नातं मित्रत्त्वाचं होतं. मैत्रीचं होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें