कथा * डॉ. नीहारिका
‘‘तू जेव्हा किंचाळतेस ना त्यावेळी अगदी जंगली मांजरीसारखी दिसतेस. केस थोडे अजून पिंजारून घे.’’ सौम्य दातओठ खात ओरडला.
‘‘अन् तू? थोबाड बघितलंस कधी आरशात? ओरडून ओरडून बोलतोस तेव्हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोस.’’
मी आणि सौम्य अगदी खालच्या पातळीवर येऊन भांडतो तेव्हा आपण सभ्य आहोत, चांगल्या वस्तीत राहातो वगैरे गोष्टींना अर्थ उरत नाही. फक्त आमचा मुलगा क्रिकेट खेळायला किंवा अभ्यासाला केव्हा बाहेर पडतो याचीच आम्ही वाट बघत असतो. पूर्वी आमच्यापैकी कुणी एक रेडिओ किंवा टीव्ही किंवा रेकॉर्डप्लेअर ऑन करत असे. हेतू हा की भांडणाचा आवाज आसपासच्या घरात ऐकू जाऊ नये. पण आता तर आम्ही त्या आवाजाच्या वरचढ आवाजात भांडतो. लोकांना पूर्वी आम्ही आदर्श नवराबायको वाटत असू पण आता मात्र त्यांच्या नजरेत उपहास दिसतो.
आमचा प्रेमविवाह. मी अठरा वर्षांची होते अन् सौम्य छत्तीसचा. त्यांची बायको एका अपघातात निवर्तली होती. त्यांची दोन्ही मुलं आजोळी होती अन् सौम्य अगदी उमदेपणाने, मजेत आयुष्य जगत होता. त्यांच्यात काय नव्हतं? हसरा, देखणा चेहरा, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, शायरी, नाटक, कविता, सिनेमाची आवड, बेभानपणे मोटरसायकल चालवणं...माझं अल्लड वय, स्वप्नाळूवृत्ती अन् सिनेमाची आवड, सिनेमातलं जग खरं मानून चालण्याचा भाबडेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या प्रेमात पाडायला पुरेशा होत्या. मी पूर्णपणे सौम्यमय झाले होते. त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नव्हतं. त्याचं वागणं, बोलणं नाटकी, बेगडी आहे हे मला कबूलच नव्हतं. त्याच्यासारखा दुसरा कुणी असूच शकत नाही अन् तो प्रेम करतोय माझ्यावर हा माझा फार मोठा सन्मान आहे हेच मला खरं वाटत होतं.
आईबाबांना सौम्य अजिबात आवडला नव्हता. ‘‘छत्तीस वर्षांचं वय आहे. या वयाला चांगली नोकरी, जबाबदार वागणूक, समाजात आदरसन्मान मिळवतो माणूस. हा तर इतका थिल्लर वागतो. नातेवाईकही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तो तुला काय सांभाळणार आहे? सगळं आयुष्य कसं काढशील त्याच्याबरोबर?’’ आई वेगवेगळ्या पद्धतीने मला समजावत होती.