शॉर्ट कट

कथा * आशा आर्या

अरे देवा! पुन्हा एक नवा ग्रुप…सगळं जग जणू व्हॉट्सएपमध्ये आवळून बांधलंय. ‘सितारे जमीं पर’ नाव असलेला हा ग्रुप नसरीनला आत्ताच दिसला होता. कॉलेजात जाण्यापूर्वी नित्याच्या सवयीप्रमाणे ती व्हॉट्सएप मेसेजेस चेक करत होती.

या व्हॉट्सएपचीही शेवटी सवयच लागते. सवय काय, खरंतर व्यसन म्हणायलाही हरकत नाही. बघितलं नाही, तर नेमकं काही तरी अति महत्त्वाचं आपल्याला कळत नाही. कुठल्याशा ग्रुपमधून तर एकाच दिवसात शेकडो मेसेजेस येतात…बिच्चारा मोबाइल हँग होतो. त्यातले निम्मे तर फुकटचं ज्ञान वाटणारे कॉपीपेस्टच असतात. उरलेले गुडमॉर्निंग, गुडइव्हिनिंग, गुडनाईटसारखे निरर्थक असतात. येऊनजाऊन एखादाच मेसेज दिवसभरात कामाचा सापडतो. पण येताजाता उगीचच मेसेज चेक करायचा, चाळाचा असतो मनाला. विचार करता करता नसरीन भराभर मेसेजेस चेक करत होती, डिलीटही करत होती.

बघूया तरी या नव्या ग्रुपमध्ये काय विशेष असेल? ओळखीच्यापैकी कुणी असेल का? अॅडमिन कोण असेल? तिनं नव्या ग्रुपच्या इन्फोवर टॅप केलं. आत्ता तरी या ग्रुपमध्ये १०७ लोक जॉइन झालेले आहेत. स्क्रोल करता करता तिची बोटं अचानक एका नावावर थांबली. राजन? ग्रुप अॅडमिनला ओळखताच ती आनंदानं चित्कारली.

हा राजन तर ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’चा आयोजक आहे. याचाच अर्थ तिचा प्रोफाइल पहिल्या पातळीवर निवडला गेला आहे. नसरीनला आनंद झाला.

नसरीन जयपूरला राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुबातली एक मुलगी. पण तिची महत्त्वाकांक्षा जबरदस्त होती. उंच, गोरी, शेलाटी, आकर्षक चेहरा अन् धीटपणा असणारी ही मुलगी. तिच्या उड्या मोठ्या आहेत अन् त्यासाठी हवं ते करायची तयारी आहे. रूढीवादी समाजानं लादलेली बंधनं तिला मान्य नाहीत. ती चक्क बंडखोरी करते. तिला मॉडेल बनायचं आहे. पण तिच्या जुनाट विचारांच्या कुटुंबात भाऊ व आई तिला सतत बंधनात ठेवतात. वडिलांची ती लाडकी आहे. ते तिला काहीच म्हणत नाहीत. आई तिच्यासाठी मुलगा शोधतेय. नसरीनला लग्न मुलं बाळं काहीही नकोय. तिच्या बरोबरीच्या मुलींना तिचं बिनधास्त वागणं, फॅशनेबल राहणं या गोष्टींचा मत्सर वाटतो. पण तसं स्वत:ला राहता आलं तर त्यांना आवडलंच असतं.

गावातली वयस्कर मंडळी आणि मौलानासाहेब तिच्या वडिलांना दटावून चुकली आहेत, ‘‘तुमच्या मुलीला आवरा. तिच्यामुळेच समाजातल्या इतर मुली बिघडतील.’’ त्यामुळेच नसरीनच्या अब्बांनी तिला सर्वांच्या नजरेपासून दूर जयपूरला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायला पाठवलं आहे.

एक दिवस तिनं कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक सर्क्युलर बघितलं. राजनच्या कंपनीनं ‘फेस ऑफ द ईयर कॉन्टेस्ट’ आयोजित केली होती. राजनच्या कंपनीतून निवडल्या गेलेल्या स्त्री-पुरूष मॉडेल्सना मार्केटमध्ये मागणी होती. ही स्पर्धा वेगवेगळ्या राऊंडमधून होती. शेवटची फेरी मुंबईत होती. निवडल्या गेलेल्या मॉडेलला दहा लाख रूपये बक्षिस होतं. शिवाय एक वर्षांचं मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टही नसरीननं ठरवलं या स्पर्धेत उतरायचं. कुणी गॉडफादर नसताना हे धाडस करणं तसं धोक्याचं होतं. पण नसरीननं आपली एंट्री पाठवली. बघूया योग असेल तर पुढला रस्ताही दिसेल.

फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात राजनचं नाव मोठं होतं. त्याच्याबद्दल बरेच प्रवादही होते. पण त्याच्यासाठी मॉडेलिंग करणं हे प्रत्येक नवोदित मॉडेलचं स्वप्नं होतं. आज राजनच्या या ग्रुपमध्ये स्वत:ला सम्मिलित करताना नसरीनला लॉटरी लागल्याचा आनंद झाला होता. नीरस व्हॉटस्एप आता मजेदार वाटू लागला होता.

‘‘आता अगदी प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक अन् शिस्तबद्ध पद्धतीनं करायला हवी.’’ तिनं स्वत:लाच समज दिली. सर्वात आधी तिनं व्हॉटसएप प्रोफाइलच्या डीपीवरचा आपला जुना फोटो काढून तिथं एक नवा सेक्सी अन् हॉट फोटो टाकला. मग राजनला पर्सनल चॅट बॉक्समध्ये ‘थँक्स’चा मेसेज टाकला.

प्रत्युत्तरात राजननं दोन्ही हात जोडून केलेल्या नमस्काराचे स्माइलही टाकले. हा राजनशी तिचा पहिला चॅट होता.

दुसऱ्यादिवशी नसरीननं आपले काही फोटो राजनच्या इन बॉक्समध्ये टाकले अन् ताबडतोब ‘‘सॉरी, सॉरी चुकून पाठवले गेले, तुम्हाला पाठवायचे नव्हते.’ असंही लिहून पाठवलं.

राजनचा मेसेज आला, ‘‘इट्स ओके. बट यू आर लुकिंग व्हेरी सेक्सी.’’

‘‘सर, यावेळी मी जगातली सर्वात आनंदी मुलगी आहे, कारण तुमच्यासारख्या किंग मेकरशी संवाद साधते आहे.’’

‘‘मी तर एक साधासा सेवक आहे कलेचा.’’

‘‘हिऱ्याला स्वत:चं मोल कळत नाही म्हणतात.’’

‘‘तुम्ही विनाकारण मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय.’’

‘‘खरं आहे तेच सांगतेय.’’

राजननं पुन्हा ती नमस्काराची धन्यवाद दर्शवणारी मुद्रा पाठवली.

‘‘ओके, बाय सर, उद्या भेटूयात,’’ दोन स्माइली पाठवून नसरीननं चॅटिंग थांबवलं.

दोन दिवसांनी स्पर्धेचा पहिला राऊंड होता. नसरीनने राजनला लिहिलं, ‘‘सर, ही माझी पहिली संधी आहे, आपली मदत असेल ना?’’

‘‘हे तर काळच सांगेल किंवा तू.’’ राजननं जणू तिला हिंट दिली.

नसरीनच्या लक्षात आलं ते. ‘‘ही कॉन्टेस्ट मला जिंकायचीच आहे…कोणत्याही किंमतीवर.’’ नसरीननं लिहिलं जणू तिच्याकडून तिनं हिरवा झेंडा दाखवला होता.

संपूर्ण देशातून आलेल्या साठ मॉडेल्सपैकी पहिल्या राउंडमधून वीस मुलींची निवड करण्यात आली. त्यात नसरीन होती. तिचं अभिनंदन करण्यासाठी राजननं तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. ही तिची राजनशी प्रत्यक्ष झालेली पहिली भेट होती. तो फोटोत दिसतो, त्यापेक्षाही प्रत्यक्षात अधिक सुंदर आणि आकर्षक आहे हे तिला जाणवलं. केबिनमध्ये तिचे गाल थोपटत त्यानं विचारलं, ‘‘बेबी, हाऊ आर यू फिलिंग नाऊ?’’

‘‘हा राऊंड क्वालिफाय केल्यावर की तुम्हाला भेटल्यावर?’’ खट्याळपणे नसरीननं विचारलं.

‘‘स्मार्ट गर्ल.’’

‘‘पुढे काय होणार?’’

‘‘सांगितलंय ना, ते तुझ्यावर अवलंबून आहे.’’ तिच्या उघड्या पाठीला हलकेच स्पर्श करत तो म्हणाला.

‘‘ते तर झालंच, पण आता कॉम्पिटिशन अधिकच तीव्र होईल.’’ त्याच्या स्पर्शाचा बाऊ न करता ती म्हणाली.

‘‘बेबी, तू एक काम कर.’’ तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे सारत तो म्हणाला, ‘‘दुसऱ्या राउंडला अजून दहा दिवस आहेत. तू रोनित शेट्टीचा पर्सनॅलिटी ग्रूमिंगचा क्लास करून घे. मी त्याला फोन करतो.’’

‘‘सो नाइस ऑफ यू…थँक्स,’’ म्हणत तिनं त्याच्याकडून रोनितचं कार्ड घेतलं.

दहा दिवसांनी दुसऱ्या राउंडमध्य निवडल्या गेलेल्या दहा मॉडेल्समध्ये नसरीनचा समावेश होता.

फायनल स्पर्धा मुंबईत होती. जजेसमध्ये राजनखेरीज एक प्रसिद्ध टीव्ही एक्ट्रेस अन् एक प्रसिद्ध पुरूष मॉडेल अशी मंडळी होती.

सर्व स्पर्धकांसोबत नसरीन मुंबईला आली. त्यांची खास व्यवस्था करण्यात आली होती. राजननं मेसेज करून तिला आपल्या खोलीत बोलावलं.

‘‘सो बेबी, तू काय ठरवलं आहेस?’’

‘‘त्यात ठरवायचं काय? हे एक डील आहे. तुम्ही मला खुश करा. मी तुम्हाला खुश करेन.’’ धीटपणे नसरीननं म्हटलं.

‘‘ठीकय तर मग, रात्रीच डीलवर शिक्कामोर्तब करू या.’’

‘‘आज नाही…उद्या…रिझल्टनंतर.’’

‘‘माझ्यावर विश्वास नाहीए?’’

‘‘विश्वास आहे. पण माझ्याकडेही सेलिब्रेट करायला काही कारण हवं ना?’’ त्याला हलकेच दूर सारत ती म्हणाली.

‘‘अॅज यू विश…ऑल द बेस्ट,’’ तिला निरोप देत राजननं म्हटलं.

दुसऱ्यादिवशी वेगवेगळ्या तिन्ही राउंडनंतर फायनल निर्णय डिक्लेर झाला अन् नसरीन ‘‘फेस ऑफ द ईयर’’ म्हणून निवडली गेली. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात गेल्या वर्षीच्या विनरनं नसरीनच्या डोक्यावर मुकुट घातला.

आनंदानं नसरीनचे डोळे भरून आले. तिनं कृतज्ञतेनं राजनकडे बघितलं. राजननं डोळा मारून तिला रात्रीच्या डीलची आठवण करून दिली. नसरीन प्रसन्न हसली.

त्या रात्री नसरीननं आपला देह राजनच्या हवाली करून यशाच्या मार्गावरचा एक शॉर्टकट निवडला. त्या वाटेवरचं पहिलं पाऊल टाकताना तिच्या डोळ्यांतून दोन गरम अश्रू ओघळले अन् उशीवर उतरून दिसेनासे झाले.

स्पर्धा जिंकल्यावर सगळ्याच माध्यमांनी तिचा उदोउदो केला. स्पर्धेनंतर प्रथमच ती जयपूरला आली, पण कट्टरपंथी समाजाच्या लोकांनी तिचा निषेध केला. काळे झेंडे दाखवले. मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तसे फलकही ते दाखवत होते. तिचा भाऊच त्यात अग्रभागी होता. ती स्टेशनवर उतरू शकली नाही. दूरवर उभे असलेले तिचे अब्बा असहायपणे बघत होते. त्यांचे डोळे डबडबले होते. त्यांनी हात हलवून तिला शुभेच्छा दिल्या. ट्रेन पुढे सरकली. त्यानंतर ती कधीच जयपूरला गेली नाही.

बघता बघता जाहिरातींच्या विश्वात नसरीनचं नाव झालं. पण अजूनही तिच्या मनातला मुक्काम ती गाठू शकली नव्हती. तिला आता इंटरनॅशनल स्पर्धेत उतरायचं होतं. राजनच्या आधरानं तेवढी मोठी झोप घेता येणार नव्हती. तिला आता अधिक भक्कम आधाराची गरज होती.

एक दिवस तिला समजलं की फॅशन जगतातले अनभिषिक्त सम्राट समीर खान यांना इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी एक नवा फ्रेश चेहरा हवा आहे. तिनं सरळ समीर खान यांची अपॉइंटमेंट घेतली अन् त्यांच्या ऑफिसात पोहोचली. थोड्या औपचारिक गप्पा झाल्यावर सरळ मुद्दयावर येत समीरनं म्हटलं, ‘‘बेबी, हा एक बीच सूट आहे. बीच सूट कसा असतो हे तुला माहीत असेल…आय होप!’’

‘‘यू डोंट वरी सर, जसं तुम्हाला हवंय, तसं होईल.’’ नसरीननं त्यांना आश्वस्त केलं.

‘‘ठीक आहे, पुढल्या आठवड्यात ऑडिशन आहे, पण त्यापूर्वी तुझं हे शरीर बीच सूटसाठी योग्य आहे की नाही हे मला बघावं लागेल,’’ समीरनं म्हटलं.

त्याच्या म्हणण्याचा गर्भित अर्थ नसरीनला समजला. ती शांतपणे म्हणाली, ‘‘प्रथम ऑडिशन घेऊन ट्रेलर बघा. त्यावरून अंदाज आला की पूर्ण पिक्चर बघा…’’

‘‘वॉव! ब्यूटी विथ ब्रेन,’’ समीरनं तिच्या गालांवर थोपटत म्हटलं.

या प्रोजेक्टसाठी नसरीनची निवड झाली. या दरम्यान तिचा संपर्क राजनशी कमी होऊ लागला होता. एक महिन्यानंतर तिला समीरच्या टीमसोबत परदेशी जायचं होतं.

राजननं तिला डीनरसाठी बोलावलं होतं. नसरीन जाणून होती. ती रात्री त्याच्याकडे गेली की तो सकाळीच तिला सोडेल. पण तरीही या क्षेत्रात यायला तिला राजननं मदत केली होती. त्याच्याविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच.

‘‘तू समीर खानसोबत जाते आहेस?’’

‘‘हं!’’

‘‘मला विसरशील?’’

‘‘मी असं कधी म्हटलं?’’

‘‘तुला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाहीए…तो फार लबाड आहे. नित्य नवी मुलगी लागते त्याला.’’

‘‘मी तुम्हाला तरी कुठे ओळखत होते?’’

‘‘तुला उडायला आता आकाश कमी पडतंय…’’

‘‘तुम्ही माझ्यावर प्रेम तर करत नाही ना?’’ नसरीननं वातावरणातला ताण कमी करण्यासाठी हसत विचारलं.

तिच्या डोळ्यात बघत गंभीरपणे राजननं म्हटलं, ‘‘जर मी ‘हो’ असं उत्तर दिलं तर?’’

‘‘तुम्ही असं म्हणू नका.’’

‘‘का?’’

‘‘कारण फॅशनच्या क्षेत्रात प्रेम बीम नसतंच. तुमची कंपनी पुन्हा फेस ऑफ ईयर ऑर्गनाइज करते आहे. पुन्हा एक नवा चेहरा निवडला जाईल. ज्यामुळे तुमच्या कंपनीची अन् तुमच्या अंथरूणाची शोभा वाढेल. मग वर्षभर तुम्ही तिच्यातच बिझि राहाल. माझ्या माथ्यावर मुकुट घालताना मी त्या मॉडेलच्या डोळ्यांत जे दु:ख बघितलं, ते मला माझ्या डोळ्यात येऊ द्यायचं नाहीए.’’ अत्यंत शांतपणे पण स्पष्ट शब्दात नसरीननं आपलं म्हणणं मांडलं होतं.

राजन चकित नजरेनं तिच्याकडे बघत होता. इतका विचार करणारी मुलगी त्याला आजवर भेटली नव्हती.

नसरीन पुढे बोलली, ‘‘राजन, माझं ध्येय अजून बरंच लांब आहे. त्या वाटेवर तुमच्यासारखे अनेक लहान लहान थांबे येतील. मी तिथं थोडी विश्रांती घेईन, मात्र थांबून राहू शकत नाही.’’

रात्र सेलिब्रेट करण्याचा राजनचा उत्साह पार ढेपाळला. ‘‘चल, तुला गाडीपर्यंत सोडतो.’’

‘‘ओके. बाय बेबी, दोन दिवसांनी माझी फ्लाइट आहे. बघूया, पुढला मुक्काम कुठं असेल.’’ असं म्हणून नसरीननं आत्मविश्वासानं गाडी स्टार्ट केली.

तिची गाडी दिसेनाशी होई तो राजन तिकडे बघत उभा होता.

उपेक्षा

कथा * कुमुद भोरास्कर

आज प्रथमच अनुभाला जाणवलं की नेहमी मैत्रिणीमध्ये किंवा बहिणीप्रमाणे वागणाऱ्या तिच्या आईचं अन् अनिशा काकूचं वागणं काही तरी वेगळं वाटतंय. अनिशा काकू जरा टेन्शनमध्ये दिसत होती.

आईनं वारंवार तिला विचारलं, तेव्हा तिनं जरा बिचकतच सांगितलं, ‘‘माझा चुलतभाऊ सलील इथं टे्निंगसाठी येतो आहे. तशी त्याची राहण्याची व्यवस्था त्यांच्या कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये केलेली आहे, पण सुट्टीच्या दिवशी सणावाराला तो इथं येईल.’’

‘‘तर मग इतकी काळजीत का आहेस तू? नाही आला तर आपण त्याला गाडी पाठवून बोलावून घेऊ.’’ शीतलनं, अनुभाच्या आईने उत्साहात म्हटलं.

‘‘काळजीचीच बाब आहे शीतल वहिनी. माझ्या आईनं मला फोनवर समजावून सांगितलं आहे, तुझ्या घरात तुझ्या तरूण पुतण्या आहेत, त्यांच्या मैत्रीणी घरी येतील जातील. अशावेळी सलीलसारख्या तरूण मुलाचं तुझ्या घरी येणं बरोबर नाही…’’

‘‘पण मग त्याला ‘येऊ नको’ हे सांगणं बरोबर आहे का?’’

‘‘तेच तर मला समजत नाहीए…म्हणूनच मी काळजीत आहे. मी असं करते, सलीलला आल्या आल्याच सांगेन की निक्की अन् गोलूचा जसा तू मामा आहेस, तसाच अनुभा अजयाचाही मामा आहेस…म्हणजे अगदी प्रथमपासून तो या नात्यानं या तरूण मुलींकडे बघेल…’’ अनिशानं म्हटलं.

‘‘सांगून बघ. पण हल्लीची तरूण मुलं असं काही मानत नाहीत,’’ आता शीतलच्याही सुरात काळजी होती.

‘‘असं करूयात का? सलील येईल तेव्हा मी त्याला माझ्या खोलीतच घेऊन जाईन. म्हणजे घरात इतरत्र त्याचा वावर नकोच!’’ अनिशानं तोडगा काढला.

‘‘बघ बाई, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, एवढंच बघ की सलीलचा अपमान होऊ नये अन् त्याला आपलं वागणं गैर वाटू नये…शिवाय काही वावगंही घडू नये.’’ शीतल अजूनही काळजीतच होती.

अनुभानं हे सर्व ऐकलं अन् ठरवलं की ती स्वत:च सलीलपासून दूर राहील. सलील आला की ती सरळ आपल्या खोलीत जाऊन बसेल म्हणजे काकूला अन् आईला उगीचच टेन्शन नको.

अमितकाकाच प्रथम सलीलला घरी घेऊन आला होता. सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली. मग अनुभाशी ओळख करून देताना त्यानं म्हटलं, ‘‘अनु, हा तुझाही मामाच आहे हं. पण तुम्ही जवळपास एकाच वयाचे आहात, तेव्हा तुमच्यात मैत्री व्हायला हरकत नाही.’’

हे ऐकून पार हबकलेल्या आई व काकूकडे बघून अनुभानं त्यावेळी त्याला फक्त हॅलो म्हटलं अन् ती आपल्या खोलीत निघून गेली. पण तेवढ्या वेळात त्याचं देखणं रूप अन् मोहक हास्य तिच्या मनात ठसलं.

पुढे सलील एकटाच यायचा. त्याच्या मोटर सायकलचा आवाज आला की अनुभा खोलीत निघून जायची. पण तिचं सगळं लक्ष काकूच्या खोलीतून येणाऱ्या मजेदार गप्पांकडे अन् सतत येणाऱ्या हसण्याच्या आवाजाकडे असायचं.

सलीलजवळ विनोदी चुटक्यांचा प्रचंड संग्रह होता. सांगायची पद्धतही छान होती.

मोहननं ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा माझा मित्र सलील आहे. अनु आणि सलील ही माझ्या बहिणीची, माधवीची खास मैत्रीण, अनुभा.’’

सलीलनं हसून म्हटलं, ‘‘मी ओळखतो हिला, मी मामा आहे हिचा.’’

‘‘खरंय? तर मग अनु, तू आता तुझ्या मामाला जरा सांभाळ. अगं आज प्रथमच तो माझ्या घरी आला आहे अन् मी फार कामात आहे. तेव्हा तूच त्याच्याकडे लक्ष दे. सर्वांशी त्याची ओळख करून दे. मला आई बोलावते आहे…मी जातो.’’ मोहन ‘‘आलो’’ म्हणत तिथून आत धावला.

सलीलनं खट्याळपणे हसत तिच्याकडे बघितलं अन् म्हणाला, ‘‘माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का प्लीज? मी दिसायला इतका कुरूप किंवा भितीदायक आहे का की माझी चाहूल लागताच तू तडक तुझ्या खोलीत निघून जातेस? मला किती त्रास होतो या गोष्टीचा?’’

अभावितपणे अनु बोलून गेली, ‘‘त्रास तर मलाही खूप होतो. लपावं लागतं म्हणून नाही तर तुला बघू शकत नाही, म्हणून.’’

‘‘तर मग बघत का नाहीस?’’

अनुभानं खरं कारण सांगितलं. आईचं व काकूचं टेंशन सांगितलं.

‘‘असं आहे का? खरं तर माझ्या घरीही हेच टेंशन होतं. मी इथं येतोय म्हणताना माझ्या आईला अन् काकुलाही हेच वाटत होतं…पण तुझ्या काकांनी तर आपल्यात मैत्री होऊ शकते असं सांगितलं. मग माझ्यासमोर येऊ नकोस हे कुणी सांगितलं?’’

‘‘तसं कुणीच सांगितलं नाही. पण काकांचं बोलणं ऐकून काकू आणि आई इतक्या हवालदिल झाल्यात की त्यांचं टेंशन वाढवण्यापेक्षा मी स्वत:ला तुझ्यापासून दूर ठेवणंच योग्य मानलं.’’

‘‘हं!’’ सलीलनं म्हटलं, ‘‘तर एकूण असं आहे म्हणायचं. तुझ्या घरून कुणी येणार आहेत का आज इथल्या कार्यक्रमाला?’’

‘‘आई, अनूकाकू येणार आहेत ना?’’

‘‘तर त्या यायच्या आत तू आपल्या सर्व मैत्रीणींशी माझा मामा म्हणूनच ओळख करून दे. त्यामुळे माझ्या ताईला म्हणजे तुझ्या काकूलाही जाणवेल की मी नाती मानतो.’’

माधवी अन् इतर मुलींनाही हा तरूण, सुंदर अन् हसरा, हसवणारा मामा खूपच आवडला. शीतल अन् अनिशा जेव्हा कार्यक्रमात पोहोचल्या, तेव्हा सलील धावून धावून खूप कामं करत होता अन् लहान मोठे सगळेच त्याला मामा म्हणून बोलावत होते.

‘‘हे सगळं काय चाललंय?’’ अनिशाने विचारलं.

‘‘बहिण्याच्या शहरात येण्याचा प्रसाद आहे हा.’’ सलील चेहरा पाडून म्हणाला.

‘‘मला वाटलं होतं या शहरात चांगल्या पोरी भेटतील, गर्लफ्रेंड मिळेल पण अनुभाच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या भाच्याच झाल्यात. राहिली साहिली ती माधवी, माझ्या मित्राची बहिण, तीही मला मामाच म्हणतेय. आता भाचीला गर्लफ्रेंड कसं म्हणायचं? म्हणून काम करतोय, मामा झालोय अन् आशिर्वाद गोळा करतोय.’’

शीतल तर हे ऐकून एकदम गदगदली. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यावर आमंत्रित पाहुण्यांची जेवणं झाली. शीतलनं अनुभाला घरी चालण्याबद्दल विचारलं, तेव्हा माधवी म्हणाली, ‘‘अजून आमची जेवणं नाही झालेली. आम्ही सर्व व्यवस्था बघत होतो…एवढ्यात नाही मी जाऊ देणार अनुभाला.’’

‘‘एकटी कशी येणार?’’

माधवीची आई म्हणाली, ‘‘एकटी कशानं? मामा आहे ना? तो सोडेल.’’

शीतलनं विचारलं, ‘‘सलील, अनुभाला घरी सोडशील.’’

‘‘सोडेन ना ताई, पण आमची जेवणं आटोपल्यावर. यांचा नाचगाण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे बराच उशीर होईल.’’

‘‘तुम्ही हवं तेवढा वेळ थांबा. मग भाचीचा कान धरून तिला घरी आणून सोड. मामा आहेस तू तिचा.’’ हसत हसत शीतलनं म्हटलं.

शीतलनं असा हिरवा कंदिल दाखवल्यावरदेखील अनुभा सलील यायचा, तेव्हा आपल्या खोलीतच दार लावून बसायची. त्याच्याबद्दल कधी काही ती विचारत नसे की बोलत नसे. पण सलीलला ज्या दिवशी सुट्टी असायची, त्यादिवशी ती मैत्रिणीकडे अभ्यासाला जाते असे सांगून बाहेरच्या बाहेर सलीलला भेटायची. माधवीलाही कधी संशय आला नाही. कॉलेजच्या परीक्षा संपता संपता घरात अनुभाच्या लग्नाची चर्चा झाली.

तिनं सलीलला सांगितलं.

सलील म्हणाला, ‘‘मलाही तुझ्या आई आणि काकूनं तुझ्यासाठी मुलगा बघायला सांगितलं आहे.’’

‘‘मग तू स्वत:चंच नाव सुचव ना?’’

‘‘वेडी आहेस का? मी इथं येण्यापूर्वी इतकं टेंशन दोन्ही घरांमध्ये होतं ते एवढ्यासाठीच की मी तुझ्या प्रेमात पडून लग्न करण्याचा हट्ट धरला तर केवढा अनर्थ होईल. ज्या घरात मुलगी दिली, त्या घरातली मुलगी करत नाहीत.’’

‘‘तू हे सर्व मानतोस?’’

‘‘मी मुळीच मानत नाही. पण आपल्या कुटुंबातल्या मान्यता अन् परंपरा मी मानतो. त्यांचा आदर करतो.’’

‘‘तुला माझ्या या प्रेमाची किंमत नाहीए?’’

‘‘आहे ना? तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही मी.’’

‘‘तू पुरूष आहेस, तेव्हा लग्न न करण्याचा तुझा हट्ट किंवा जिद्द तुझे घरातले लोक चालवून घेतील. मला मात्र लग्न करावंच लागेल…’’

‘‘लग्न तर मी ही करेनच ना अनु?’’

अनुभा वैतागली. काय माणूस आहे हा? माझ्या खेरीज दुसऱ्या कुणाबरोबर आयुष्य घालवण्याची कल्पनाही असह्य होतेय याला अन् तरीही हा लग्न करणारच? तिनं संतापून त्याच्याकडे बघितलं.

तिच्या मनातले भाव जाणून सलील म्हणाला, ‘‘लग्न कुणाबरोबर का होईना, पण माझ्या अन् तुझ्या मनात आपणच दोघं असू ना? आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवताना आपण हाच विचार सतत मनात ठेवायचा की तू अन् मी एकत्र आहोत…एकमेकांचे आहोत…’’

अनुभानं स्वत:च्या मनाची समजूत काढली की आता जशी ती सलीलच्या आठवणीत जगते आहे, तशीच लग्न झावरही जगेल. उलट जेव्हा लग्नानंतर भेटण्याचा प्रसंग येईल, तेव्हा भेटी अधिक सहज सुलभ होतील. कारण विवाहितांकडे संशयानं बघितलं जात नाही.

तिनं हे जेव्हा सलीलला सांगितलं, तेव्हा तो एकदम उत्साहानं म्हणाला, ‘‘व्वा! हे तर फारच छान! मग तर चोरून कशाला? उघड उघड, राजरोस सगळ्यांच्या समोर गळाभेट घेईन, कुठं तरी फिरायला जाण्याच्या निमित्तानं हॉटेलात जेवायला नेईन.’’

लवकरच दुबईला स्थायिक झालेल्या डॉ. गिरीशबरोबर अनुभाचं लग्न ठरलं. दिसायला तो सलीलपेक्षाही देखणा होता. भरपूर कमवत होता. स्वभावानं आनंदी, प्रेमळ अन् अतिशय सज्जन होता. पण अनुभा मात्र त्यांच्यात सलीललाच बघत होती. लग्नाला अनिशाकाकूच्या माहेरची खूप मंडळी आली होती. संधी मिळताच एकांतात अनुभानं सलीलला भेटून म्हटलं, ‘‘आपल्या प्रेमाची खूण म्हणून, आठवण म्हणून मला काहीतरी भेटवस्तू दे ना.’’

‘‘अगं, देणार होतो, पण अनिशाताईनं म्हटलं, ‘‘घरून आईनं भक्कम आहेर पाठवला आहे, तू वेगळ्यानं काहीच द्यायची गरज नाही.’’

अनुभाला खरं तर राग आला. अरे आईनं काही आहेर पाठवणं अन् तू भेटवस्तू देणं यात काही फरक आहे की नाही? आईनं आहेर केला, तरी ती अजीजीनं म्हणाली, ‘‘तरीही, काही तरी दे ना. ज्यामुळे तू सतत जवळ असल्याची भावना मनात राहील.’’

सलीलनं खिशातून रूमाल काढला. त्याचं चुबंन घेतलं अन् तो अनुभाला दिला. अनुभानं तो डोळ्यांना लावला अन् म्हणाली, ‘‘माद्ब्रया आयुष्यातली ही सर्वात मौल्यवान वस्तू असेल.’’

सुरूवातीपासूनच अनुभा गिरीशला सलील समजून वागत होती. त्यामुळे तिला काहीच त्रास झाला नाही. उलट त्यांचं नातं खूपच खेळीमेळीचं अन् प्रेमाचं झालं. ती गिरीशबरोबर सुखी होती. तिनं ठरवलं होतं की सलील भेटला की त्याला सांगायचं, ‘‘फॉम्युला सक्सेसफुल!’’ पण सांगायची संधीच मिळाली नाही. नैनीतालला हनीमून साजरा करून ती माहेरी आली तेव्हा गोलूला सलीलची मोटरसायकल चालवताना बघून तिनं विचारलं, ‘‘सलीलमामाची मोटरसायकल तुझ्याकडे कशी?’’

‘‘सलीलमामाकडून पप्पांनी विकत घेतलीय, माझ्यासाठी.’’

‘‘पण त्यानं विकली कशाला?’’

‘‘कारण तो कॅनडाला गेलाय.’’

अनुभा एकदम चमकलीच! ‘‘अचानक कसा गेला कॅनडाला?’’

‘‘ते मला काय ठाऊक?’’

कसंबसं अनुभानं स्वत:ला सावरलं. सायंकाळी ती माधवीकडे भेटायला गेली. तिला खरं तर मोहनकडून सलीलबद्दल जाणून घ्यायचं होतं.

तिनं मोहनला विचारलं, ‘‘माझ्या लग्नात आला होता तेव्हा सलीलमामा काहीच बोलला नव्हता. एकाएकी कसा काय कॅनडाला निघून गेला?’’

‘‘पहिल्यांदा जाताना कुणीच एकाएकी परदेशात जात नाही अनु, सलील इथं त्याच्या कंपनीच्या हेडऑफिसमध्ये कॅनडाला जाण्याआधी खास टे्निंग घ्यायलाच आला होता. टे्निंग संपलं आणि तो कॅनडाला गेला. सगळं ठरलेलं होतं.’’ मोहन म्हणाला.

‘‘तुझ्याकडे त्याचा फोननंबर असला तर मला दे ना.’’ अनुनं म्हटलं.

‘‘नाही गं, अजून तरी त्याचा मला फोन आलेला नाही…’’

खट्टू होऊन ती घरी परतली. दोनच दिवसात तिला दुबईला जायचं होतं. नव्या आयुष्यात ती सुखात होती. पण कायम सलीलच्याच आठवणीत राहून, त्यानं दिलेल्या रूमालाचे पुन्हा पुन्हा मुके घेत.

एकदा गिरीशनं तिच्या हातात तो रूमाल बघितला अन् तो म्हणाला, ‘‘इतका घाणेरडा रूमाल तुझ्या हातात शोभत नाही. एका डॉक्टरची बायको आहेत तू. फेक तो रूमाल. डझनभर नवे रूमाल मागवून घे.’’ गिरीश सहजपणे बोलला पण अनुभा दचकली, भांबावली.

रूमाल फेकणं तर दूर ती त्या रूमालाला धुवतही नव्हती. कारण सलीलनं त्या रूमालाचं चुंबन घेतलं होतं. तिनं तो रूमाल टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून लपवून ठेवला, निदान गिरीशच्या नजरेला पडायला नको.

गिरीशचं कुटुंब अनेक वर्षांपासून दुबईत स्थायिक झालं होतं. जुमेरा बीचजवळ त्यांचा मोठा बंगला होता. शहरात क्लिनिक्स अन् त्यांच्याच जोडीला मेडिकल शॉप्स होती. एक क्लिनिक गिरीश बघत असे. कुटुंबातल्या सगळ्याच स्त्रिया घरच्या धंद्यात काही तरी मदत करत होत्या.

अनुभाही थोरली जाऊ वर्षाच्यासोबत काम करू लागली. इथल्या आयुष्यात ती आनंदी होती, पण तिला हल्ली सलीलची आठवण फारच बेचैन करत होती. वांरवार त्या रूमालाचे मुके घ्यावे लागत होते.

एक दिवस वर्षाच्या चुलत बहिणीचा फोन आला. तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याचंही दुबईला पोस्टिंग झालंय. अजून ऑफिसनं गाडी आणि घर दिलं नाहीए. पण त्यांच्या राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलात केली आहे. गाडी मिळाली की भेटायला येईल. पण वर्षाला तर तिला भेटायची घाई झाली होती. अनुभानं सुचवलं की ऑफिसातून येताना त्या दोघी गाडीनं लताच्या हॉटेलात जातील, तिथून तिला आपल्या घरी आणायचं. तिच्या नवऱ्याचं ऑफिस सुटेल  तेव्हा आपला ड्रायव्हर त्याला ऑफिसमधून पिकअप करून घरी येईल. रात्रीचं जेवण सगळे एकत्रच घेतील, मग ड्रायव्हर त्या दोघांना पुन्हा त्यांच्या हॉटेलवर सोडेल. वर्षाला ही सूचना आवडली. दिवस ठरवून लताला फोन केला. तिनं अन् तिच्या नवऱ्यानं होकार दिला.

लताला वर्षानं विचारलं, ‘‘तू तर लग्नानंतर अमेरिकेला की कुठंतरी गेली होतीस, मग दुबईला कशी आलीस?’’

‘‘मला तिथली थंडी, तिथला बर्फ आवडत नव्हता म्हणून यांनी इथं बदली करून घेतली.’’ लतानं तोऱ्यात उत्तर दिलं.

‘‘अरे व्वा! खूपच दिलदार दिसतोए तुझा नवरा. बायकोसाठी डॉलर कमावायचे सोडून दिराम कमवायला लागला. ऐट आहे बुवा!’’ वर्षानं विचारलं.

‘‘माझ्यासाठी तर ते स्वत:चा जीवही देतील ताई.’’ लताच्या बोलण्यात दर्प होता.

वर्षा अन् अनुभाला हसायला आलं.

‘‘आणि या अशा जीव देणाऱ्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं कुणी? गोदाकाकींनी?’’ वर्षांनी विचारलं.

लता हसायला लागली, ‘‘नाही ताई, गोदाकाकी तर या सोयरिकीच्या विरोधातच होत्या. त्यांचं म्हणणं होतं की मुलगा जरा भ्रमरवृत्तीचा आहे, खूप मुलींशी त्याची प्रेमप्रकरणं झालीत. असा मुलगा आपल्याला नकोच,’’ पण काका म्हणाले, ‘‘लग्नाआधी मुलं अशीच टाइमपास असतात. लग्नानंतर ती व्यवस्थित वागायला लागतात.’’

‘‘तुमचे ‘ते’ तुम्हाला त्यांच्या आधीच्या प्रेमिकेच्या नावानं नाही का बोलावत? काही खास नाव घेऊन बोलालतात?’’ अनुभानं विचारलं.

‘‘नाही बाई, ते मला लताच म्हणतात.’’

‘‘याचा अर्थ तुमचे ‘ते’ फक्त तुमचेच आहेत.’’

सायंकाळी गिरीशला क्लिनिकमध्ये फारसं काम नव्हतं. असिस्टंट डॉक्टरला   सूचना देऊन तो लवकर घरी परतला. वर्षानं म्हटलं, ‘‘गिरीश, मी लताला जुमेरा बीचवर फिरवून आणते. अनुभा बाकीची व्यवस्था बघतेय. लताचे मिस्टर आले की तुम्ही त्यांना रिसीव्ह करा. आम्ही थोड्या वेळात घरी येतोच आहोत.’’ त्या दोघी निघून गेल्या.

काही वेळातच गिरीशचा उल्हसित आवाज कानी आला, ‘‘अगं अनु, बघ लताचे मिस्टर आलेत. ते कोण आहेत माहीत आहे का? तुझे सलील मामा.’’

ते ऐकताच अनुभाचा उत्साह, उल्हास फसफसून आला. धावतच ती ड्रॉइंगरूममध्ये आली. खरंच, सलीलच होता. अंगानं थोडा भरला होता.

‘‘घ्या, तुमची भाची आली…’’ गिरीशनं म्हटलं.

सलीलनं अनुभाकडे दुर्लक्ष करत म्हटलं, ‘‘पण माझी बायको कुठाय?’’

‘‘ती तिच्या बहिणीबरोबर बीचवर गेली आहे. येईलच, तोवर तुमच्या भाचीशी गप्पा मारा.’’

‘‘गप्पा तर मारूच, मामा आधी गळाभेट तरी घे.’’ अनुभानं त्याच्याजवळ जात म्हटलं.

‘‘लहान बाळासारखी मामाच्या मांडीवर बसू नकोस हं!’’ गिरीश गमतीनं म्हणाला.

‘‘माझ्या बायकोला मांडीवर बसवून तिच्या डोळ्यात मला बघायचाय समुद्र.’’ सलील उतावळेपणानं म्हणाला, ‘‘गिरीश, आपण समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ. तुम्ही वर्षावहिनींना घरी घेऊन या. मी अन् लता थोडावेळ समुद्र किनाऱ्याजवळ एकांतात घालवू, चला ना गिरीश…लवकर…प्लीज’’

इतकी उपेक्षा, इतका अपमान! अनुभाला ते सहन होईना…संतापानं ती आपल्या खोलीकडे धावली. एकट्यानं रडावं म्हणून नाही तर सलीलनं दिलेल्या रूमालाच्या चिंध्या चिंध्या करून फेकण्यासाठी…तो तिच्यासाठी अनमोल, अमूल्य असणारा रूमाल आता तिला ओकारी आणत होत, नकोसा झाला होता.

वॉर्निंग साइन बोर्ड

कथा * सुधा ओढेकर

आपलं ऑफिस संपवून निशा निधीला घ्यायला शाळेच्या पाळणाघरात पोहोचली तेव्हा नेहमी धावत येऊन तिला बिलगणारी निधी नीट चालूही शकत नसल्याचं तिला जाणवलं.

निशाला बघताच तिथली अटेंडंट म्हणाली, ‘‘मॅडम, निधी आज दुखतंय म्हणत होती. डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी हे औषध दिलंय. या गोळ्या दिवसातून दोनदा अन् या तीनदा द्यायच्या आहेत.’’

‘‘तुम्ही मला फोन का केला नाही?’’

‘‘केला होता मॅडम, पण लागला नाही. डॉक्टरांकडे नेलं होतं.’’

‘‘बरं, डॉक्टरांची चिठ्ठी?’’

‘‘मला फक्त हे एवढंच दिलं गेलंय. चिठ्ठी नाहीए.’’

कदाचित तिच्याकडून प्रिस्क्रिप्शन हरवलं असेल म्हणून खोटं बोलतेय. निशाने तरीही शाळेला धन्यवाद दिले. शाळा खरंच चांगली आहे. तिने निधीला उचलून आणून कारमध्ये बसवले. निधी लगेच झोपली. खरं तर शाळा दुपारी अडीचला सुटते. पण घरी कुणी बघणारं, सांभाळणारं नाही म्हणून नाइलाजाने निशा निधीला शाळेच्या पाळणाघरात ठेवते. आपल्या अत्यंत व्यस्त अन् धावपळीच्या आयुष्यात आपण पोरीवर अन्याय करतोय असंही तिच्या मनात येई. मुलीकडे लक्ष द्यायचं तर नोकरी सोडावी लागेल. पण पुन्हा अशी चांगली नोकरी मिळणार नाही ही गोष्टही तेवढीच खरी.

घरी गेल्यावरही निधी झोपलेलीच होती. तिला उचलून निशाने बेडवर झोपवली. कदाचित आता तिचं दुखणं थांबल्यामुळे किंवा डॉक्टरांच्या गोळीमुळे तिला गाढ झोप लागली आहे तेव्हा झोपू दे असा विचार करून निशाने रात्री निधी जेवली नाही तरी तिला तशीच झोपू दिली. रात्री केव्हा तरी झोपेत निधी बडबडत होती. निशाची झोप उघडली. तिने निधीला थोपटलं तेव्हा लक्षात आलं की निधीला ताप आहे. ती झोपेतच बडबडत होती. ‘‘मी घाणेरडी मुलगी नाही. मला पनिश करू नका.’’

निधी असं का बोलतेय ते निशाला कळेना. तिला शाळेत कुणी शिक्षा केली का? कुणी पनिश केलं का? पण का? तिला जे दुखतंय ते कशामुळे? तिने दुसऱ्या दिवशी ऑफिसची रजा टाकली.

निधी सकाळी दहाच्या सुमारास जागी झाली. निशा तिच्या जवळच होती. निशाला मिठी मारून ती रडायला लागली. रडता रडताच बोलली, ‘‘ममा, मी शाळेत जाणार नाही.’’

‘‘का गं, बेटा? शाळेत कुणी तुला काही म्हटलं का?’’ निशाने आश्चर्याने विचारलं.

‘‘मी शाळेत जाणार नाही,’’ पुन्हा ती तेच म्हणाली.

‘‘पण बाळा, शाळेत तर सर्वंच मुलांना जावं लागतं?’’

‘‘नाही, नाही…मी जाणार नाही…’’ ती हुंदके देत रडत म्हणाली.

‘‘बरं बरं…रडू नकोस. तू म्हणशील तेव्हाच तुला शाळेत पाठवेन.’’ निशाने तिला थोपटून शांत करत म्हटलं.

तिने मनात ठरवलं, उद्या सकाळी आधी शाळेत जाऊन टीचरला भेटलं पाहिजे. अत्यंत उत्साहाने शाळेला जाणाऱ्या या पोरीला एकाएकी शाळेचा तिटकारा का वाटू लागला? शिवाय झोपेत ती सारखी पनिश…पनिश म्हणत होती. त्याबद्दलही विचारायचं हे ठरवल्यावर तिचं मन शांत झालं.

निशाने निधीला दूध दिलं, ब्रेकफास्ट दिला. निधी पुन्हा झोपली होती. बेचैन होती. नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चिवचिवत नव्हती. निशाने तिला स्पंज करून कपडे बदलले तेव्हा निधीच्या पॅण्टीवर रक्ताचे डाग दिसले. निशा दचकली. सातव्या वर्षीच पाळी सुरू झाली की काय? अन् सारखं दुखतंय…दुखतंय का म्हणतेय? किती कोमेजलली आहे…निशाने सरळ डॉ. संगीताला फोन केला अन् ती निधीला घेऊन तिच्या क्लीनिकमध्ये गेली.

डॉ. संगीताने निधीला तपासलं अन् अभावितपणे ती बोलून गेली, ‘‘ओह…नो…’’

‘‘काय झालं, डॉक्टर?’’

तिला बाजूला घेऊन खाजगी आवाजात डॉ. संगीता म्हणाली, ‘‘निशा, अगं या पोरीवर रेप झालाय…’’

‘‘रेप?’’ निशा केवढी दचकली.

‘‘पण केव्हा? कुठे? काल तर ती शाळेतच होती. इतर कुठे गेलीच नव्हती,’’ आश्चर्य अन् भीती, काळजी यामुळे निशाला बोलणं सुधरेना.

‘‘पण हे सत्य आहे निशा, केवळ अंदाज नाही.’’

‘‘देवा रे!’’ डोकं धरून निशा तिथल्या खुर्चीवर बसली. काय चाललंय या जगात? इतक्या कोवळ्या, अजाण, निष्पाप पोरीवर बलात्कार? माणुसकीचे वाभाडे काढणारे हे राक्षस…कोण असेल हा सैतान?

‘‘निशा, तू आधी स्वत:ला सांभाळ. शांत हो, आपल्याला या अजाण पोरीला सावरायचं आहे. नेमकं काय, केव्हा, कुठे घडलं याचा छडा लावावा लागेल,’’   डॉ. संगीताने निशाला समजावलं.

निशाने निधीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना होती. ती मुकाट बसून होती. डॉ. संगीताने तिला प्रेमाने विचारलं, ‘‘बाळा, तुला हा त्रास कसा झाला?’’

निधीने उत्तर दिलं नाही. ती गप्प बसली होती. तिला प्रेमाने जवळ घेत निशाने म्हटलं, ‘‘डॉक्टर आण्टी विचारताहेत त्या प्रश्नाचं उत्तर दे ना, तुला कसं दुखलं, त्रास कशामुळे झाला?’’

‘‘नाही मम्मा, मी सांगणार नाही. टीचर मला मारतील.’’

‘‘का?’’

‘‘टीचर म्हणाल्या, तू घरात कुणाला काही सांगितलंस तर मी तुला मारीन. घरी तुझे आईबाबाही तुला रागावतील. तू चूक केली आहेस. तू वाईट, घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट मिळाली आहे. पण ममा, मी काहीच केलं नाहीए गं…खरंच…’’ ती लहानगी पुन्हा रडायला लागली. डॉक्टरही गडबडून गेली.

‘‘बाळा, तू आम्हाला सांग, आम्ही तुला रागावणार नाही, उलट त्या टीचरलाच रागावू. तू न घाबरता सांग. टीचर इथे येणार नाही. मीच तिला रागावणार आहे. सांग, रडू नकोस. मी तर तुला औषध देऊन बरं करणार आहे.’’

डॉ. संगीताने अन् निशाने वारंवार समजावल्यावर निधीने जे सांगितलं ते ऐकून दोघी अवाक् झाल्या. एका स्वीमिंग इन्स्ट्रक्टरचं हे काम होतं.

‘‘निशा, त्या नराधमाच्या विरुद्ध केस कर. निधीचं सगळं बोलणं मी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलंय. तिच्या तपासणीचे रिपोर्ट मी व्यवस्थित तयार करते. मी साक्ष देईन कोर्टात.’’ संतापाने डॉ. संगीता लालेलाल झाली होती.

निशाने रात्री निधी झोपल्यावर दीपकला सगळं सांगितलं. दीपक संतापला. ‘‘मी त्या हरामखोराला असा सोडणार नाही. त्याला तुरुंगातच पाठवतो.’’

‘‘मलाही तुमच्यासारखाच संताप आला होता दीपक, पण मला भीती वाटली. या सर्व प्रकारात आपल्या मुलीची अन् आपलीही बेअब्रू होईल. पोरीला समाजात वावरता येणार नाही. तिच्या बालमनावर विपरीत परिणाम होईल.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय, पण अशाने त्या गुन्हेगाराला बळ मिळतं. आज आपल्या मुलीच्या बाबतीत जे घडलं, ते उद्या आणखीही कुणाच्या बाबतीत घडेल.’’

शेवटी त्यांनी एफआरआय नोंदवली. एका अल्पवयीन मुलीवरील रेपच्या संदर्भात डॉ. संगीता अन् तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

निधीने आरोपीला ओळखल्यावरही शाळा हा आरोप मान्य करत नव्हती. पण मीडिया अन् अनेक पालकांनी मुद्दा लावून धरला. शेवटी त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

दुसऱ्यादिवशी सगळ्या वर्तमानपत्रातून ठळकपणे ही बातमी प्रसिद्ध झाली. यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलच्या सात वर्षांच्या मुलीवर रेप. स्वीमिंगच्या क्लासनंतर मुलगी कपडे बदलायला वॉशरूमकडे केली तेव्हा इन्स्ट्रक्टरही तिच्या मागे मागे तिथे गेला. तिच्या तोंडात बोळा कोंबून त्याने तिला जीवे मारण्याची भीती दाखवून बलात्कार केला. वर पुन्हा कुणाजवळ बोललीस तर खबरदार म्हणून धमकीही दिली. क्लास टीचरने तिला घाबरलेली व रडताना बघितली तेव्हा तिने काय झालं म्हणून विचारलं. ती लहान पोरं फक्त दुखतंय म्हणत होती, रडत होती. क्लास टीचरने प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपलने डॉक्टरांना बोलावून चेकअप करवून घ्या म्हणून सांगितलं.

डॉक्टरने जुजबी काही तरी औषधं देऊन वेळ भागवली. टीचरने मुलीला धमकावलं की याबद्दल घरी काही सांगू नकोस, तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट दिली आहे. घरी बोललीस तर तुझे आईबाबाही तुला रागावतील.

निशा म्हणाली, ‘‘वाचा बातमी, सगळीकडे आपली बेअब्रू होतेय.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. निधीचं किंवा आपलं नाव कुठेही आलेलं नाहीए.? खरं तर त्या क्लास टीचरला, प्रिन्सिपलला अन् त्या नालायक डॉक्टरलाही कोर्टात खेचायला हवंय.’’

‘‘पण आज नाही तर उद्या आपलं नाव बाहेर कळेलच ना?’’

‘‘नाही कळणार. अन् त्या हरामखोर गुन्हेगाराला मी असा सोडणारही नाहीए. मी चांगला वकील मिळवला आहे.’’

‘‘पण यात खूप वेळ जाईल. निधी आता त्या शाळेत जायचं नाही म्हणतेय. तिच्या मनातली भीती कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या शहरात जाऊ.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुम्ही बदली करून घ्या.’’

‘‘ते इतकं सोपं नाहीए.’’

‘‘निधीसाठी काहीही करावं लागलं तरी ते करायला हवं. मी माझ्या ऑफिसमध्ये बोलले आहे. मला दिल्लीला बदली मिळतेय.’’

‘‘ठीक आहे, मीही प्रयत्न करतो.’’

निधीला घेऊन निशा दिल्लीला आली. तिच्या एका मैत्रिणीकडे उतरली. ऑफिसमध्ये जॉइन केलं अन् मग निधीच्या अॅडमिशनसाठी एका प्रसिद्ध शाळेत एकटीच गेली. टी.सी. बघून प्रिसिपॉलने म्हटलं, ‘‘यलो लाइन इंटरनॅशनल स्कूल याच शाळेतल्या स्वीमिंग इन्स्ट्रक्टरने एका लहान मुलीवर रेप केला होता ना? पेपरला वाचलं होतं.’’

‘‘होय मॅडम, आम्हीही वाचलं होतं. माझी इथे बदली झाली आहे म्हणून मी मुलीला घेऊन इथे तिच्या अॅडमिशनसाठी आले आहे.’’

‘‘तुम्ही भाग्यवान आहात. आठवड्यापूर्वीच एक मुलगी वडिलांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या गावी गेली आहे. त्या जागी तुमच्या मुलीला अॅडमिशन देता येईल.’’

‘‘थँक्यू मॅडम,’’ निशाने कृतज्ञतेने हात जोडून नमस्कार करत त्यांचा निरोप घेतला.

‘‘मोस्ट वेलकम!’’

निशा ज्या मैत्रिणीकडे उतरली होती तिचीही मुलगी त्याच शाळेत शिकत होती. तिनेच ही ‘डीपीएस’ शाळा सुचवली होती.

घरी येऊन निशाने निधीला शाळेविषयी सांगितलं तर ती म्हणाली, ‘‘मला शाळेत जायचं नाही.’’

‘‘अगं, पण ही शाळा वेगळी आहे. छान आहे. तुला आवडेल.’’

‘‘मला नाही जायचं…’’

‘‘अगं. शुची पण तुझ्याच शाळेत शिकते.’’

‘‘ती माझ्या वर्गात बसेल?’’

‘‘नाही बाळा, ती थोडी मोठी आहे ना, तिचा वर्ग वेगळा असेल पण तुझ्याबरोबर शाळेत जाईल, तुझ्याबरोबर परत येईल.’’

शुचीने निधीकडे बघून हसत संमतीदर्शक मान हलवली.

निशाने शनिवार, रविवार निधीला मानसिक दृष्टीने तयार करण्यात घालवला. दोन दिवस तिने निधीला अन् शुचीलादेखील आपल्या कारने शाळेत सोडलं. त्यानंतर शाळेच्या बसचे पैसे भरून झाल्यावर शुची व निधी स्कूल बसने जाऊयेऊ लागल्या.

नव्या वातावरणात शाळेच्या एकूणच सेटअपमध्ये निधी लवकरच रमली. शुचीच्या संगतीत हसू, खेळू, बोलू लागली. पण अजूनही ती रात्री मध्येच दचकून जागी व्हायची किंवा ‘मला पनिश करू नका,’ असं म्हणत झोपेतच रडायची. तिला एखाद्या सायकॉलॉजिस्टची गरज होती.

शुचीच्या घरी तरी किती दिवस राहाणार. सुर्देवाने शुचीच्या आईने अलकाने बातमी आणली की त्यांच्याच अपार्टमेण्टमध्ये एक फ्लॅट रिकामा झालाय. घरमालक तिच्या माहितीतले असल्याने निशासाठी तो भाड्याने मिळवण्यात अडचण आली नाही. शनिवार, रविवारच्या सुट्टीत अलकाच्या मदतीने निशाने आपलं बिऱ्हाड बाजलं नव्या फ्लॅटमध्ये नेलं. दीपकने गरजेच्या काही वस्तू टे्रनच्या ब्रेकव्हॅनमधून पाठवून दिल्यामुळे घर आता बऱ्यापैकी सोयिस्कर झालं.

त्यातच समाधानाची गोष्ट म्हणजे दीपकचा फोन आला. ‘‘निशा, शाळेने त्या इन्स्ट्रक्टरला काढून टाकलंय. शिवाय वकिलाला घेऊनच प्रिन्सिपल, क्लासटीचर अन् त्या डॉक्टरलाही भेटलो. जो हलगर्जीपणा प्रिन्सिपल अन् डॉक्टरने केला अन् ‘तू घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली. घरी सांगू नकोस,’ असं धमकावणाऱ्या टीचरलाही कोर्टाचा हिसका देतो म्हटल्यावर डॉक्टर अन् प्रिन्सिपलने स्पेशल शरणागती पत्करून माफीनामा लिहून दिलाय. त्या टीचरलाही नोकरीवरून काढून टाकली  आहे शिवाय ट्रीटमेण्टचा खर्च शाळा देणार आहे.’’

दुसरी चांगली बातमी म्हणजे वकिलाने कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे की मुलगी लहान आहे शिवाय तिला सायकिक ट्रीटमेण्ट व जागा बदलण्यासाठी दिल्लीला पाठवली आहे तेव्हा तिला कोर्टात हजर राहाण्याची सक्ती करू नये किंबहुना तिला कोर्टात गैरहजर राहाण्याची परवानगी द्यावी. डॉ. संगीता साक्ष द्यायला येणार आहेत अन् त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केलेलं निधीचं स्टेटमेण्ट कोर्टात चालणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ऑफिसने दिल्लीला पाठवण्याचं कबूल केलंय. दीड दोन महिन्यांत मी तिथे पोहोचेन.

निशाने दीपकचं अभिनंदन केलं. तो सतत केसच्या मागावर असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अन् एक नि:श्वास सोडला. मनावरचा ताण थोडा कमी झाला होता.

अलका हाउसवाइफ असल्याने शुची अन् निधी तिच्या घरातच शाळा सुटल्यावर राहायच्या. निशा आली की मग त्या आपल्या घरी यायच्या.

निशाने इंटरनेटवरून सायकियाट्रिस्ट डॉक्टर सुभाषचा पत्ता मिळवला व भेटीची वेळ ठरवून घेतली. आधी ती एकटीच डॉक्टरांना भेटायला गेली. निधीची केस त्यांना समजावून सांगितली अन् त्यांच्याकडून मदत हवीय असं म्हटलं.

डॉक्टर चांगले होते. ते म्हणाले, ‘‘उद्या याचवेळी तुम्ही पेशंटला घेऊन या. मुलगी लहान वयात वाईट अनुभवाला सामोरी गेली आहे. आपण हळुवारपणे तिच्या मनातली भीती काढून टाकू. तुमची मुलगी लवकरच पुन्हा अगदी नॉर्मल, आनंदी अन् निर्भर आयुष्य जगू लागेल. मी खात्री देतो. तुम्ही अगदी नि:शंक राहा.’’

‘‘मीही तेवढ्याच आशेने आलेय तुमच्याकडे.’’

दुसऱ्यादिवशी निशा निधीला घेऊन डॉक्टर सुभाषना भेटली. डॉक्टरांनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. निधीला नाव विचारलं. शाळा, वर्ग, मैत्रिणींबद्दल विचारून थोडं बोलतं केलं. मग म्हणाले, ‘‘निधी, अगं तुझी ममा सांगत होती, कधी कधी रात्री झोपेत तू ‘मला पनिश करू नका, पनिश करू नका, मी वाईट मुलगी नाहीए’ असं  म्हणतेस, दचकून उठतेस. तुला कोण पनिश करतं, बेटा?’’

निधीने आईकडे बघितलं.

‘‘सांग बाळा, न घाबरता सांग.’’

‘‘पण तू तर म्हणाली होतीस की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून?’’

‘‘इतर कुणालाच नाही सांगायचं, पण हे तर डॉक्टरकाका आहेत ना? ते आपल्याला बरं करतात. त्यांना सांगितलं तर ते तुझ्या मनातली भीती दूर करतील, भीतीला हाकलून लावतील.’’ निशाने तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं.

‘‘बरं, गुड गर्ल. आता मला सांग की तुला त्या पोहणाऱ्या काकांनी त्रास दिला होता? तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली असं म्हटलं होतं?’’

निधी एकदम रडवेली झाली. ‘‘पण मी घाणेरडी मुलगी नाहीए. मी काहीच केलं नाहीए…मी…’’

‘‘हो ना बाळा, मी तेच तुला सांगतोय, तू घाणेरडी नाहीस, वाईट नाहीस, तू छानच आहेस. चांगली मुलगी आहेस. घाणेरडे अन् वाईट तर ते काका आहेत, ज्यांनी तुला त्रास दिला.’’

‘‘पण मग सुजाता मॅम पण म्हणाली की मी वाईट आहे म्हणून मला पनिश केलं,’’ निधी म्हणाली.

‘‘तुला माहीत आहे का? तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने सुजाता मॅमला शाळेतून काढून टाकलंय. कारण तिने तुला ‘घाणेरडी मुलगी आहेस म्हणून पनिश केलं’ असं दटावलं अन् ‘घरी सांगू नकोस, तुझे आईवडील तुलाच रागावतील असं म्हटलं होतं. म्हणजे सुजाता मॅमलाच शिक्षा झाली. ना? आता ती शाळेत कुणाला त्रास देऊ शकणार नाही.’’

निधीला काय बोलावं ते कळेना.

‘‘बरं मला असं सांग, तू समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला मारलंस, तिला रक्त आलं तर चूक कोणाची?’’

‘‘माझी…’’

‘‘तर मग वाईट कोण?’’

‘‘मी…’’

‘‘बरोबर. पण जेव्हा त्या काकांनी तुला त्रास दिला तेव्हा तुझी चूक नव्हती. म्हणजे तू वाईट नाहीस, तर ते काका वाईट. खरं ना?’’

‘‘पण ममाने मला कुणाला काही सांगू नकोस असं का म्हटलं?’’

‘‘आई बरोबर म्हणाली, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात ना, त्या पुन:पुन्हा बोलायच्या नाहीत. छान, छान नवं काही तरी करायचं, नवं काही तरी बोलायचं, कळलं?’’

‘‘हं!’’

‘‘तर आता निधी एक खूपच छान शहाणी मुलगी आहे. तिला कुणीही पनिश करणार नाही. ठीक आहे?’’

‘‘ओ. के.’’

‘‘निशा मॅडम, पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा या. मला खात्री आहे. आपण यशस्वी होऊ. लवकरच सगळं छान होणार आहे.’’

डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघी घरी परतल्या. त्याच रात्री दीपकचा फोन आला,  यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. इतरही अनेक शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येत आहेत. निशाच्या मनात आलं, आता काहीही केलं तरी निधीच्या बाबतीत घडलेली घटना बदलली जाणार नाही. खरं तर, ‘‘तुम्ही सीसी कॅमेऱ्याच्या नजरेत आहात,’’ या वाक्याला अर्थच नसतो.  ती एक तऱ्हेची जाहिरात होते. कॅमेरा आहे याची जाणीव लोकांना नको, पण कॅमेऱ्याने आपलं काम बजावायला हवं.

निधीची केस कोर्टात शेवटच्या टप्प्यात होती. वकील फार चांगला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून दीपकही दिल्लीला ऑफिसमध्ये जॉइन झाला होता. डॉ. सुभाषच्या ट्रीटमेण्टमुळे निधी आता त्या घटनेच्या प्रभावातून बाहेर पडली होती. शाळेत तिचा परफॉर्मन्स छान होता. टीचर तिच्यावर खूष होत्या. आपापल्या ऑफिसच्या कामात निशा अन् दीपकनेही प्रमोशन्स मिळवली होती. एकूण सगळं छान चाललं होतं. पण मध्येच एक बलात्काराची बातमी पेपरला आली अन् निशाचं भावविश्व पुन्हा ढवळून निघालं.

बातमीत म्हटलं होतं की सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासताना त्यात काही माणसं दिसताहेत. पण त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने तपासावर मर्यादा येताहेत.

अशा कॅमेऱ्यांचा उपयोगच काय? निशाने तिरमिरीत वृत्तपत्रांसाठी पत्र लिहायला घेतलं :

महोदय,

आपल्याकडे सिनेमात दाखवतात तसं किंवा एरवीही पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येतात. तो आवाज गुन्हेगारांना पळून जाण्याचाच इशारा असतो. अपराधी तेवढ्यात निसटतो. तसेच जागोजागी असलेले सी.सी. कॅमेरे लावले आहेत, तिथे आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात असेही फलक लावले आहेत. ही सूचना गुन्हेगाराला सावध करते. त्या भागात वावरताना तो शिताफीने कॅमेऱ्याची नजर चुकवतो किंवा चेहरा अन् शरीर झाकून घेतो. मग गुन्हे घडतील अन् गुन्हेगार तावडीत न येता मोकाट फिरतील.

खटकणारी आणखी एक बाब म्हणजे, ‘आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात’ असे फलक जागोजागी दिसतात. कुठे कॅमेरे चालू असतात तर कुठे महिनोंमहिने बंद पडलेले असतात. ते नीट करायला हवेत एवढीही जाणीव प्रशासनाला नसते. असे अर्धवट उपाय काय कामाचे? शासनाला गंभीरपणे या बाबतीत विचार करायला हवा.

पत्र लिहून तिने दिल्लीतल्या सर्वच प्रमुख व दुय्यम वर्तमानपत्रांना पाठवली. काही छापूनही आली, पण सहा महिने होऊनही बलात्काराच्या केसमध्ये आरोपी सापडले नाही. निधीच्या केसमध्येही अपराध्याला अजून शिक्षा झालेली नाही ही खंत होतीच. केसचा निकाल कधी लागेल कुणास ठाऊक.

निधी अन् शुचीने ज्युडो कराटेचा क्लास सुरू केला होता. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या संस्था आता अधिकच सक्रिय होत्या. शाळेतर्फेही मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न केले गेले होते. काळोख्या ढगाला रुपेरी किनार दिसू लागली होती.

एक धाडसी निर्णय

कथा * शकिला हुसेन

अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इमरानशी लग्न होऊन फक्त तीन वर्षच झाली होती. इमरानच्या बाइकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी एक लाख रूपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उध्वस्त झालं होतं. इमरान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत पाच सहा तास गेले.

इमरानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहिण कहकशा तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन् आत जुबेदाच्या आत्येसासूनं लोखंडी अडकित्त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरूवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, ‘‘का फोडताय तिच्या बांगड्या?’’

‘‘आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात.’’ आतेसासू म्हणाली.

जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, ‘‘तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा. मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते.’’

पण म्हातारी आत्येसासू हटूनच बसली. ‘‘बांगड्या फोडण्याची पद्धत असते.’’

शेवटी जरा कठोरपणे  कहकशां म्हणाली, ‘‘तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन् फोडल्या काय? काय फरक पडतो?’’ तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन् तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या.

यावरूनही आत्येसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली, ‘‘तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे, हे मान्य. पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत. त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात.’’

फुणफुणंत सासूबाई गप्प बसल्या.

जुबेदाला विधवेचा वेष म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. ‘‘आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही. कारण तू आता इद्दतमध्ये आहेस (इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडे चार महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरूषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही.)’’

जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरूणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती.

जुबेदाच्या अश्रुंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते.

इमरान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन् हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रूजू झाले.

इमरान सकाळी नऊला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले.

सायंकाळी दोघं घरी परतल्यालर जुबेदानं तिच्यासाठी व इमरानसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला. ‘‘सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी रूमा काय काय करेल? दोन लहान मुलं आहेत तिला. त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हाताराम्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा. समजलं का?’’

जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रूना भाभीनंही कामात मदत केली. पटकन् जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा. कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इमराननं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा अन् रूना दोघींनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डबा दोघी मिळून करायच्या. सकाळ सांयकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं.

प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेंशन तिच्या हातात असायची. स्वत:साठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची. इमरान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खूष असायची. तरीही जुबेदाला घालूनपाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.

जुबेदा नाजुकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इमरान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे.

जुबेदाला सर्व कळत होतं. पण इमरानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशीही प्रेमानं वागे, तिला यथायोग्य मान देई. रूना तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्शा असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा.

आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता. लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अजून मूळबाळ नाही झालेलं, यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची. अपमान करायची. ‘‘रूनाला पाच वर्षांत दोन मुलं झाली. ही एक दुल्हन बघा…वांझ आहे की काय. वाळलेल्या खोडासारखी…फळ नाही, फूल नाही…घरात मुलं खेळायला हवीत. त्याशिवाय घराला शोभा नाही.’’

सासूनं स्वत: कधी रूनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडं फार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखाद्या खास पदार्थ शिजवणं या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन् फुकटचे सल्ले देण्यातच जायचा.

अम्माचे टोमणे ऐकून इमरानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. ‘‘दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीए. मूल नक्की होईल, उगीच टेन्शन घेऊ नका.’’

दोन महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरूवात झाली. ‘करामत पीर’कडे जायचं. त्या पीराचा एक एंजट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबाचा ‘चढावा’ म्हणून घेऊन जायचा.

अम्मा सतत ‘करामती पीर’ची पिरपिर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे. दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अम्मानं हुकुम दिला, ‘‘चल, जुबेदा, पटकन आवर. आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करतेय तुला मूल नसणं. पीरबाबा एक ताईत देतील. त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल.’’

हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं, ‘‘अम्मा, माझा विश्वास नाहीए या सगळ्यावर. मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाहीए माझा.’’

हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली, ‘‘या शिकलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा पीरबाबावर विश्वास नाहीए. अगं, त्या शेजारच्या सकीनाला, पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं, तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत. बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल.’’

आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली, ‘‘अम्मा माझा जर विश्वासच नाहीए या गोष्टींवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिलीय की माझ्यात दोष नाहीए. मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून, सर्व तापसण्या करून आलो ना? शेवटचं सांगते, पीरबाबाकडे जाणार नाही.’’

अम्मानं रागानं इमरानकडे बघितलं. तो प्रेमानं अन् शांतपणे अम्मीला म्हणाला, ‘‘अम्मी, माझाही विश्वास नाहीए या सगळ्यांवर. जुबेदावर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस.’’

झालं! अम्माला तर अश्या मिरच्या झोंबल्या. इमरान-जुबेदा एकीकडे आणि अख्ख कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले. शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली अन् आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इमरनाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. दीड दोन महिन्यांत पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं…

कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाइस बळेबळे खायला लावल्या. दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता.

तिसऱ्या दिवशी सियूम होता (मृत्यूनंतरचा तिसरा दिवस). त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचित जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला.

सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इमरानचा एक्सिडेंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसण्याचे उल्लेख, तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती. सियूमच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा…या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली. थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं.

तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली, ‘‘अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला (सहानुभूती दाखवायला) येतील. तिनं इथंच बसायला हवं.’’

‘‘तिला घेरी येतेय. तिला बसवत नाहीए. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला.’’ कहकशांनं नम्रपणे म्हटलं.

त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली. फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वान्नांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही पन्नाससाठ लोक होतेच. खर्च भरमसाट होत होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती.

कहकशा त्यानंतर स्वत:च्या घरी गेली. सियमनतंर ती घरी गेली अन् फारोहाच्यावेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती.

इमरानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सूती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्येसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषणं देऊ लागल्या. ‘‘किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे…इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन् घराबाहेर पडते आहे.’’

सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, ‘‘तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीए. मी मौलाना साहेबांना बोलावतो. तेच तुला समजावून सांगतील.’’

मौलाना आले. जुबेदाला एका पदद्याआड बसवलं गेलं. कहकशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं, त्याचा मथितार्थ असा, ‘‘पति निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाही बाहेरच्या पुरूषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरूषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोलीबाहेर पडायचं नाही.’’

मौलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, ‘‘एक मिनिट! मला काही सांगायचंय, ते नीट ऐकून घ्या.’’

खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, ‘‘मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्धा अन् जाणत्या आलिमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यू ट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का? त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही ही ऐका. उत्तर असं आहे, ‘‘अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वत: कफील असेल (कमवती/नोकरी करणारी) तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते. त्या परिस्थितीत तिला साडे चार महिन्यांची इद्दत पूर्ण करणं गरजेचं नाहीए.

आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही.

पडद्याआडून अत्यंत मर्यादशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली. ‘‘तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाइलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिसिंपलपासून शिपाईदेखील महिलाच आहेत. तेव्हा पुरूषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते.’’

इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मौलवींनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरूवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिंसिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिंमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती.

एक दिवस जुबेदा शाळेतून परतली, तेव्हा रूना भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रूनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर रूनानं जुबेदाशी बोलणंच बंद केलं. काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला. ‘‘हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त सत्तावीस वर्षांचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरूषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील? आम्ही काय आज आहोत, उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरूण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन् दुसरं लग्न करून घे.’’

मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, ‘‘अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा, तुम्ही हीनाच्या (नणंदेच्या) लग्नाची काळजी करा. तिचं लग्नांचं वय होतंय.’’

सासू गोडीत म्हणाली, ‘‘जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना? सुभान आहे ना? इमरानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरूषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण.’’

जुबेदा एकदम संतापलीच. ‘‘अम्मा, किती वाईट बोलताय तुम्ही? मला हे अजिबात मान्य नाही. सुभानभाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे. रूना भाभीचा संसार उध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका.’’ काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन:पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते. ‘‘सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’’ त्याला काय? सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला?

रूनासारखी समर्पित बायको, दोन गोजिरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? रूना भाभी तिच्याशी का बोलत नव्हती, ते तिला आता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती. घाबरलीही होती. इमरान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार…त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल. त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो…तिनं त्या क्षणी निर्णय घेतला. ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती.

शाळेच्या प्रिंसिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अन् सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मियता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर रहावंस हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरूण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिंसिपल माझी कलीगच होती. तुला होस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग.’’

जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिसिंपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवालाही गेला.

कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, ‘‘जुबेदा, तुझी जॉइनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी अरशदबरोबर येईन अन् कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून, तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ.’’

जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सूटकेस, महत्त्वाची कागदपत्र अन् इतर काही सामान अशा दोन सूटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन् अरशद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासूसासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिंसिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉइन करायचंय हे पटवून दिलं.

ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, ‘‘ तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत.’’

सासूसासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका.’’

जुबेदाला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की दोन तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत. तिचा आत्मविश्वास अन् शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते.

रूना भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, ‘‘भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा.’’

‘‘मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं!’’

माझी काळजी करू नका भाभी. मी कामात स्वत:ला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन् मी लग्नच करणार नाही असंही नाही, पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल.

सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं.

भरला पापाचा घडा

कथा * संजीव जामकर

हॅलो पप्पा, माझं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे.’’ ऐश्वर्या जवळजवळ ओरडतच फोनवर बोलत होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘‘अरे व्वा! अभिनंदन पोरी…कोणत्या कंपनीत झालंय?’’ पप्पांचाही आवाज आनंदानं ओथंबला होता.

‘‘रिव्होल्यूशन टेक्नोलॉजीमध्ये. खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बऱ्याच देशात शाखा आहेत या कंपनीच्या.’’ ऐश्वर्या आनंदानं सांगत होती. ‘‘कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज मलाच मिळालंय. बहुतेकांना तीन ते साडे तीन लाखांचं पॅकेज मिळालं आहे, मला मात्र साडे चार लाखांचं पॅकेज दिलंय…पण?’’

‘‘पण…पण काय?’’

‘‘पप्पा, कंपनी दोन वर्षांचा बॉन्ड करून घेते आहे…मला समजत नाहीए…मी हो म्हणू की नको?’’

‘‘अगं, इतर कंपन्याही एक वर्षाचा बॉन्ड तर मागवतातच ना? चांगली सुरूवात होतेय तर दोन वर्षांचा बॉन्ड भरायला काहीच हरकत नाहीए. कारण दोन वर्षांनंतर कंपनी बदलावीशी वाटली तर तुला यापेक्षा वरचा जॉब मिळेल ना? उलट तुझ्या बरोबरीच्या मुलांना त्यावेळी जेमतेम तेवढा पगार मिळेल ज्यावर तू आज सुरूवात करते आहेस.’’ पप्पांनी समजावलं.

‘‘थँक्यू पप्पा, तुम्ही माझी काळजी दूर केलीत.’’

ऐश्वर्या लखनौच्या इंजिनियअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. प्रत्येक सेमिस्टरला टॉप करायची. सगळ्यांनाच तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. तिलाच सर्वात जास्त पॅकेज मिळणार हेही सर्व जाणून होते.

दोन दिवसांनी घरी पोहोचली, तेव्हा आईनं औक्षण करून तिचं स्वागत केलं. बाबांनी तिला जवळ घेऊन आशिर्वाद दिला. ‘‘तुला पोस्टिंग कुठं मिळेल?’’ आईनं विचारलं.

‘‘बंगळुरूला.’’

घरात एखाद्या सणा उत्सवाचं वातावरण होतं. त्या आनंदात सुट्या कधी संपल्या समजलंही नाही. ऐश्वर्या जेव्हा कंपनीत जॉईन झाली तेव्हा तिथली भव्यता बघून चकित झाली. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये एका मल्टी स्टोरीड बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर कंपनीचं आलिशान ऑफिस होतं.

सकाळी दहा वाजता कंपनीतले सर्व कर्मचारी मिनी ऑडिटोरियममध्ये पंधरा मिनिटं मेडिटेशन करायचे. त्यानंतर सर्व आपापल्या डिपार्टमेंटला निघून जायचे. ज्यूनिअर कर्मचाऱ्यांसाठी हॉलमध्ये लहान लहान क्यूबिकल्स होती. मॅनेजर आणि इतर वरच्या ऑफिसर्ससाठी केबिन्स होती. सर्व क्यूबिकल्स अन् केबिनची सजावट एकारखीच होती. त्यावरून कंपनीच्या ऐश्वर्याचा अंदाज करता येत होता.

ऐश्वर्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर सुशांतच्या टीममध्ये होतं. सुशांतची गणना कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये व्हायची. आपल्या योग्यतेमुळेच त्यानं फार लवकर इतकी वरची जागा मिळवली होती.

पहिल्याच दिवशी त्यानं ऐश्वर्याचं स्वागत करत म्हटलं होतं, ‘‘ऐश्वर्या, आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. माझी टीम कंपनीची लीड टीम आहे. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे प्रोजेक्ट या टीमला मिळतात. मला खात्री आहे, तुझ्या येण्यामुळे आमची टीम अधिक बळकट होईल.’’

‘‘सर, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.’’ ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर शालीन आत्मविश्वास झळकत होता.

सुशांत खरंच बोलला होता. कंपनीचे महत्त्वाचे प्रोजेक्ट त्यांच्याच टीमला मिळत होते. अर्थातच इतरांच्या मानानं या टीमच्या लोकांना मेहनतही अधिक करावी लागत होती. बघता बघता नोकरीचा एक महिना संपलासुद्धा. या काळात ऐश्वर्याला फार काम दिलं गेलं नाही पण तिला कामाचं स्वरूप, कामाची पद्धत समजून घेता आली. खूप काही शिकायला मिळालं.

पहिला पगार मिळताच तिनं पंचवीस हजार रूपयांची खरेदी केली आणि विमानाचं तिकिट काढून ती घरी लखनौला पोहोचली.

‘‘मम्मा, ही बघ बंगलोर सिल्कची साडी अन् पश्मिता शाल…तुझ्यासाठी.’’

आईच्या खांद्यावर साडी ठेवत ती म्हणाली, ‘‘बघ किती छान दिसतेय तुला.’’

मम्मा खूप खुश झाली. खरंच साडी अन् शाल सुंदरच होती.

‘‘पप्पा, हा तुमच्यासाठी सूट आणि हे घडयाळ…’’ दोन पाकिटं बाबांना देत तिनं म्हटलं.

सूट पप्पांच्या आवडीच्या रंगाचा होता. घड्याळही एकदम भारी होतं. त्यांचाही चेहरा खुलला.

‘‘केवढ्याला गं पडलं हे सगळं?’’ शालवरून हात फिरवत आईनं विचारलं.

‘‘फार नाही गं! पंचवीस हजार रूपये खर्च झाले.’’ हसून ऐश्वर्याने म्हटलं.

ऐकून आईचे डोळे विस्फारले…‘‘अन् आता सगळा महिना कसा काढशील?’’

‘‘जसा आधी काढत होते…पप्पा झिंदाबाद,’’ खळखळून हसंत ऐश्वर्यानं म्हटलं.

‘‘बरोबर आहे. अजून माझ्या रिटायरमेंटला अवकाश आहे. मी माझ्या लेकीला सहज पोसू शकतो.’’ बाबाही हसत म्हणाले.

दोन दिवस राहून ऐश्वर्या परत कामावर रूजू झाली. दुसऱ्याच दिवशी तिच्या सिनिअरनं लंच नंतर तिला एक टास्क करायला दिला. ऐश्वर्या मन लावून काम करत होती पण टास्क पूर्ण झाला नव्हता. सात वाजून गेले होते. बरेचसे एम्प्लॉई घरी निघून गेले होते. ती काम करत बसली होती.

‘‘ऐश्वर्या मॅडम, अजून घरी गेला नाहीत तुम्ही?’’ आपल्या चेंबरमधून बाहेर पडलेल्या सुशांतची नजर ऐश्वर्यावर पडली.

‘‘सर, एक टास्क होता. अजून पूर्ण झाला नाहीए. पण मी करेन…’’

‘‘मला बघू देत. काय आहे ते कळेल.’’ सुशांतनं म्हटलं.

ऐश्वर्या कॉम्प्युटर समोरून बाजूला झाली. सुशांतनं काही क्षण स्क्रीनवर ओपन असलेल्या प्रोग्रॅमकडे बघितलं अन् मग त्याची बोटं सराईतपणे की बोर्डवर काम करू लागली.

पाच सात मिनिटातच सुशांत हसत बाजूला झाला. ‘‘हा घ्या तुमचा टास्क पूर्ण झाला.’’

किती वेळ ऐश्वर्या जे काम करत बसली होती ते सुशांतनं इतक्या कमी वेळात पूर्ण केलं होतं. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तिच्या मनात आदर व कौतुक दाटून आलं.

‘‘थँक्यू सर,’’ अत्यंत कृतज्ञतेनं तिनं म्हटलं.

‘‘त्याची गरज नाहीए,’’ मंद स्मित करत त्यानं म्हटलं, ‘‘त्यापेक्षा माझ्याबरोबर एक कप कॉफी घेणार का?’’

ऐश्वर्याही दमलीच होती. तिलाही गरम चहा किंवा कॉफीची गरज होती. तिनं लगेच होकार दिला.

सुशांतनं तिला एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. हॉलमध्ये बरीच गर्दी होती. पण वर टेरेसवरही बसायची सोय होती. तिथं गर्दीही बेताची होती. वातावरण शांत होतं. टेरेसवरून बाहेरचं दृश्यही दिसत होतं. शहरातले दिवे बघून तारे जणू पृथ्वीवर उतरले आहेत असं वाटत होतं.

‘‘ऐश्वर्या, कंपनीतर्फे दोन इंजिनिअर्सना अमेरिकेला पाठवायचं आहे. तू त्यासाठी अप्लाय का केलं नाहीस?’’ कॉफीचा घोट घेत सुशांतनं विचारलं.

‘‘सर, मी अजून अगदीच नवी आहे ना, म्हणून मी अप्लाय केलं नाही.’’

‘‘प्रश्न नवं किंवा जुनं असण्याचा नाहीए, प्रश्न हुशारीचा, टॅलेंटचा आहे. आणि प्रामाणिकपणा अन् हुशारी तुझ्यात आहेच. तू अप्लाय करायला हवंस. तीन लाख रूपये दर महिन्याला, शिवाय कंपनीतर्फे बोनस…एक वर्षांनंतर परत आल्यावर तुझी मार्केटव्हॅल्यू केवढी वाढलेली असेल विचार कर.’’ सुशांत शांतपणे तिला समजावून सांगत होता.

‘‘पण सर, तरीही मी खूप ज्यूनिअर आहे, माझ्याहून सीनियर्सही आहेत. तरी माझी निवड होईल?’’

‘‘त्याची काळजी करू नकोस. हा प्रोजेक्ट माझा आहे. कोणाला अमेरिकेला पाठवायचं, कोणाला नाही, हा निर्णय माझा असेल.’’

ऐश्वर्याला लगेच निर्णय घेता येईना. ती विचार करत होती.

कॉफी संपवून सुशांतनं म्हटलं, ‘‘घाई नाहीए. नीट विचार करून सांग. उद्या सायंकाळी आपण इथंच भेटूयात. त्यावेळी तुझा निर्णय सांग.’’

ऐश्वर्या घरी आली. शांतपणे विचार केला तेव्हा तिला जाणवलं की ही संधी चांगली आहे. सहा महिन्यात पप्पा आता रिटायर होतील. तिचं पॅकेज जरी वर्षांला साडेचार लाखाचं होतं तरी हातात सध्या फक्त तीस हजार रूपये येत होते. एवढ्यात तिचं जेमतेम भागत होतं, घरी पाठवायला पैसेच उरत नव्हते. तिनं ठरवलं अमेरिकेची संधी घ्यायचीच.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती जेव्हा रेस्टॉरंटच्या गच्चीवर पोहोचली, तेव्हा सुशांत तिची वाट बघत उभा होता. मंद आवाजात वाद्यसंगीत वाजत होतं. फारच प्रसन्न सायंकाळ होती.

ऐश्वर्यानं जेव्हा अमेरिकेला जायला तयार असल्याचं सांगितलं, तेव्हा सुशांत म्हणाला, ‘‘योग्य निर्णय घेतला आहेस तू. तिथून परतल्यावर तुझ्या करिअरला अधिकच झळाली मिळेल. मी प्रयत्न करेन…आपली सहयोगी कंपनी तुझ्या राहण्याचीही सोय करेल.’’

हे ऐकल्यावर तर ऐश्वर्याचा चेहरा एकदम खुलला. अमेरिकेत राहण्याचा खर्च फार येतो हे ती ऐकून होती. मग तर एका वर्षांत ती बराच पैसा वाचवू शकली असती. तिनं कृतज्ञतेनं म्हटलं, ‘‘सर, तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय, त्याची परतफेड मी कशी करेन तेच मला कळत नाहीए.’’

‘‘मनात आणलंस तर तू आजही करू शकतेस.’’ सुशांतने म्हटलं.

‘‘कशी?’’ नवल वाटून ऐश्वर्याचे टपोरे डोळे अधिकच विस्फारले.

‘‘असं बघ, हे जग ‘गिव्ह अॅन्ड टेक’च्या फॉर्मुल्यावर चालतं. टीचर विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा तो फी घेतो. डॉक्टर रोग्यावर उपचार करतो तेव्हा तो पैसे घेतो, अगदी आईवडिलही मुलाला वाढवतात, तेव्हा म्हातारपणी त्यानं आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असतेच. सरकार जनतेसाठी ज्या सोयी, सुविधा, सेवा पुरवते त्याचा मोबदला टॅक्सरूपात घेतेच. एकूणात या जगात फुकटात काहीही मिळंत नसतं.’’ सुशांत एखाद्या तत्त्वत्याप्रमाणे बोलत होता. ऐश्वर्या फार गोंधळली होती…तिला समजेना काय नेमकं सांगताहेत सुशांत सर. तिनं चाचरत विचारलं, ‘‘म्हणजे मला काय करावं लागेल?’’

‘‘फक्त काही दिवसांसाठी माझी हो. मी तुला करिअरच्या अशा उंचीवर पोहोचवेन की लोकांना तुझा हेवा वाटावा,’’ सुशांतनं थेट तिच्या डोळ्यात बघत म्हटलं.

सगळी गच्ची आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं ऐश्वर्याला. कॉलेजात कायम तिनं टॉप केलं होतं. पण इथं तिच्या बुद्धिचं अन् योग्यतेचं महत्त्वच नव्हतं. ती फक्त एक यादी होती. तारूण्याचा सौदा करत होता सुशांत. फक्त देह व्यापाराचा एक सुसंस्कृत प्रस्ताव समोर ठेवून अपमान जिव्हारी लागला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

‘‘ऐश्वर्या, मी बळजबरी करत नाहीए. ही एक ऑफर आहे. तुला कबूल असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. कंपनीतल्या तुझ्या पोझिशनला काहीही धक्का लागणार नाही. तू नेहमीप्रमाणेच आपलं काम करत राहशील.’’ अत्यंत मृदू अन् गोड शब्दात सुशांतनं म्हटलं.

‘‘क्षमा करा सर, तुम्ही मला समजण्यात चूक केलीत. मी विकाऊ नाही.’’ अश्रू कसेबसे थोपवत ऐश्वर्या उठून उभी राहिली.

‘‘अरे? उठलीस का? निदान कॉफी तर घे,’’ एक शब्दही न बोलता ऐश्वर्या तिथून निघाली ती सरळ आपल्या फ्लॅटवर पोहोचली. घरी येऊन मात्र तिचा बांध फुटला. तिला रडू आवरेना, नोकरीतल्या यशासाठी शॉटकट घेणाऱ्या अनेक मुलींबद्दल तिनं ऐकलं होतं. पण तिलाही त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता पुढे काय? इथं काम करणं जमेल का? सुशांत या गोष्टीचा वचपा म्हणून तिच्यासाठी अडचणींचा डोंगर उभा करेल…तर मग नोकरी सोडायची का?…पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड करून दिलाय…

त्या रात्री ती जेवली नाही. झोपही लागली नाही. काय करावं ते कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती घाबरतच ऑफिसला पोहोचली. तिला वाटलं होतं सुशांत तिला फैलावर घेईल. पण त्याची वागणूक अगदी नॉर्मल होती. जणू काही घडलंच नव्हतं.

आठवडाभर ऐश्वर्या भेदरलेलीच होती. पण मग नॉर्मल झाली. तिला वाटलं, सुशांतला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असावा. नंतर एक दिड महिना गेला. सगळंच आलबेल होतं.

एक दिवस सुशांतने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून म्हटलं, ‘‘ऐवर्श्या, अमेरिकेतले हे आपले खास क्लाएंट आहे. त्यांचा हा जरूरी प्रोजक्ट आहे. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करायचा आहे. करू शकशील?’’

‘‘मी पूर्ण प्रयत्न करते सर.’’

‘‘गुड! हे कंपनीचे खास क्लाएंट आहेत, त्यामुळे कुठंही काहीही चूक व्हायला नको हे लक्षात ठेवायचं.’’ सुशांतनं सांगितलं.

‘‘ओके सर,’’ म्हणत ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. तिनं आधी तो प्रोजेक्ट पूर्ण वाचला तेव्हा तिला वाटलं, हे तर सोपं आहे. ती सहजच पूर्ण करू शकेल.

ऐश्वर्यानं काम सुरू केलं, पण तिचा अंदाज चुकला. जसजशी ती प्रोजेक्टवर पुढे जात होती तसतसा तो अधिकच क्लिष्ट होत होता. दुपारपर्यंत ती फारसं काही करू शकली नाही. अठ्ठेचाळीस तासात हे काम पूर्ण होणार नाही याची तिला जाणीव झाली.

लंचनंतर ती सुशांतला या संदर्भात विचारायला गेली, पण तो कुठल्या तरी मिटिंगसाठी बाहेरगावी गेला होता. तो दुसऱ्याच दिवशी येणार होता म्हणून कळलं. तिनं इतर सिनियर्सशीही बोलून बघितलं, पण या क्लाएंटचा असा प्रोजेक्ट कुणीच केलेला नसल्यानं कुणीच तिला मदत करू शकलं नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्या आल्या सुशांतनं तिचं काम बघितलं, अन् तो भडकलाच, ‘‘काय हे? तू काहीच काम केलं नाहीए? मी नव्हतो ऑफिसात तर हातावर हात ठेवून बसून राहिलीस?’’

‘‘तसं नाही सर, यात काही प्रॉब्लेम आले. मी इतर सिनियर्सना विचारलं, पण कुणीच सांगू शकलं नाही. शेवटी मी क्लांयटलाही दुपारी फोन लावले, पण त्यांनी उचलला नाही.’’ ऐश्वर्यानं तिची अडचण सांगितली.

‘‘ऐश्वर्या, शुद्धीवर आहेस का तू?’’ सुशांत केवढ्यांदा ओरडला. ‘‘अगं, शिकलेली, आयटी कंपनीत नोकरी करणारी तू. तुला एवढंही कळू नये? तू जेव्हा फोन करत होतीस तेव्हा अमेरिकेत रात्र होती अन् त्यावेळी लोक झोपलेले असतात. नशीब म्हणायचं की त्याची झोपमोड झाली नाही, नाही तर तुझी नोकरीच गेली असती.’’

‘‘पण सर, मी काय करायचं?’’ ऐश्वर्याला आपल्या हतबलतेमुळे रडूच फुटलं.

‘‘आपलं डोकं वापरायचं आणि काम पूर्ण करायचं.’’ सुशांत संतापून म्हणाला. मग त्यानं प्रोजेक्टबद्दल तिला काही सूचना केल्या अन् तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

ऐश्वर्यानं शर्थ केली पण प्रोजेक्ट त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही. सुशांतनं तिला मेमो दिला.

हळूहळू सुशांतचा खरा रंग दिसायला लागला. तो मुद्दामच सर्वात कठिण टास्क ऐश्वर्याला द्यायचा. कमी वेळात तो पूर्ण व्हायला हवा म्हणायचा. अन् काम पूर्ण      झालं नाही तर सरळ मेमो हातात द्यायचा. शिवाय अत्यंत अपमानास्पद भाषा वापरून रागवायचा.

एक दिवस ऑफिसात गेल्या गेल्याच ऐश्वर्याला त्यान बोलावून घेतलं, ‘‘तीन महिन्यात अकरा मेमो मिळालेत तुला. कामात सुधारणा झाली नाही तर कंपनी तुम्हाला डिसमिस करू शकते. ही शेवटची संधी आहे.’’

अपमानित ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. जर बोलल्याप्रमाणे तिला खरोखर डिसमिस केलं गेलं तर तिला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणं अशक्य होऊन बसेल. त्यापेक्षा आपणच राजिनामा दिला तर? पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड भरून दिलाय. नोकरी सोडली तर तिला कंपनीला पाच लाख रूपये द्यावे लागतील. तीन महिन्यांनी पप्पा रिटायर होतील. इतकं असहाय्य वाटलं ऐश्वार्याला…डोळयांत पाणीच आलं तिच्या.

‘‘काय झालं गं ऐश्वर्या? इतकी उदास का आहेस? कसली काळजी वाटतेय?’’ स्नेहानं तिच्या खांद्यावर हात ठेवत आपलेपणानं विचारलं. हल्ली त्यांची चांगली मैत्री झाली होती.

ऐश्वर्याला बोलावसं वाटलं…पण काय सांगणार? तिच्या डोळयातून टपटप अश्रू वहायला लागले.

‘‘इथं नको, कॅन्टीनमध्ये बसूयात.’’ स्नेहानं हात धरून तिला सीटवरून उठवलीच.

स्नेहानं तिला त्यांच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये न नेता दुसऱ्या मजल्यावरच्या एका कॅन्टीनमध्ये नेलं. सकाळची वेळ असल्यामुळे तिथं गर्दी नव्हती. स्नेहानं खोदून खोदून विचारल्यावर ऐश्वार्या हुंदके देत सगळी हकिकत सांगितली. स्नेहाचा चेहरा संतापानं लाल झाला.

‘‘याचा अर्थ हा चांडाळ, हा घृणित खेळ तुझ्याबरोबरही खेळतोय.’’ दात ओठ खात तिनं म्हटलं.

‘‘ ‘तुझ्या बरोबरही’चा काय अर्थ?’’ दचकून ऐश्वार्यनं विचारलं.

‘‘अगं, त्यानं मलादेखील अमेरिकेला जाण्याची लालूच दिली होती. मी नकार दिल्यानंतर गेले दोन महिने मलाही छळतोय.’’ स्नेहानं सांगितलं.

विचार करत ऐश्वर्या बोलली, ‘‘याचा अर्थ ज्या दोघी मुली अमेरिकेला गेल्या आहेत, त्यांनी याची अट मान्य…’’ ऐश्वर्यानं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्वेषानं स्नेहा बोलली, ‘‘त्यांचं खरं खोटं त्या जाणोत. पण या माणसाचं सत्य आपल्याला ठाऊक आहे. याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर हा नेहमीच नव्या मुलींना खेळणं समजून त्यांच्या चारित्र्याशी खेळत राहील.’’

‘‘पण…पण आपण काय करू शकतो?’’

स्नेहानं कॉफी घेता घेता तिच्या डोक्यातली योजना ऐश्वर्याला समजावून सांगितली. सगळा बारीक सारीक तपशील नीट समजून घेतला गेला. त्यानंतर दोघी पुन्हा आपल्या ऑफिसात आल्या.

त्यानंतर लंचच्या थोड्या आधी ऐश्वर्या सुशांतच्या चेंबरमध्ये गेली. ‘‘सर, थोडं बोलायचं आहे.’’

‘‘अं?’’

‘‘सर, मला या ऑफिसात काम करणं जमत नाहीए.’’

‘‘तर?’’

‘जर अजूनही शक्य असेल तर मी अमेरिकेला जायला तयार आहे, तुम्ही मदत केलीत तर मोठीच कृपा होईल.’’

‘‘शक्य, अशक्य सगळं माझ्याच हातात आहे, पण तिथं जाण्याची अट तुला माहीत आहे…ती मान्य असेल तर बघ…’’ सुशांतनं तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हटलं.

‘‘सर, इतक्या घाईत मी सांगू शकणार नाही…पण आज सायंकाळी तुम्ही माझ्या फ्लॅटवर याल का? तोपर्यंत मी अजून नीट विचार करून तुम्हाला निर्णय सांगेन.’’

‘‘ओ के बेबी, बरोबर आठ वाजता मी पोहोचतो.’’ आपला आनंद लपवत सुशांतनं म्हटलं.

कसाबसा तो दिवस ऐश्वर्यानं रेटला. सायंकाळी घरी आली. स्नान करून सुंदर साडी नेसली. मेकअप केला. तिचं हृदय धडधडत होतं पण निर्णय पक्का होता.

बरोबर आठ वाजता दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. दारात सुशांत उभा होता. त्यानं आत येऊन दार लावून घेतलं अन् ऐश्वर्याकडे बघून म्हणाला,

‘‘साडीत सुंदर दिसते आहेस तू?’’

ऐश्वर्यानं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्याजवळ जात सुशांतनं म्हटलं, ‘‘आजची रात्र एकदम स्पेशल, संस्मरणीय कर. मी तुला नक्की अमेरिकेला पाठवतो.’’

ऐश्वर्यानं अंग चोरून घेतलं. तिचं गप्प राहणं म्हणजे तिची स्वीकृती समजून सुशांतची हिम्मत वाढली. त्यानं तिला पटकन मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं.

कसंबसं स्वत:ला सोडवून घेत तिनं म्हटलं, ‘‘सर, हे काय करताय तुम्ही?’’

‘‘तुझं करीयर घडवाचंय ना? त्याची तयारी.’’

पुन्हा तिला मिठीत घेत त्यानं तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला.

‘‘करियर घडवताय की आयुष्य नासवताय?’’ संतापून ऐश्वर्यानं विचारलं.

‘‘ऐशू, इतक्या जवळ आल्यावर आता मागे फिरता येणार नाही. तुझ्या प्रोबेशन पिरियड संपता संपता मी तुला प्रमोशन पण देतो…फक्त जे घडतंय ते घडू दे.’’ सुशांत आता चांगलाच पेटला होता.

‘‘घडूही दिलं असतं…पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘जर या लॅपटॉपचा वेब कॅमेरा ऑन नसता तर,’’ ऐश्वर्यानं टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवलं.

लॅपटॉप बघताच सुशांतनं दचकून उडीच मारली. जणू समोर मोठ्ठा साप बघितला असावा. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘कॅमेरा ऑन आहे?’’

‘‘फक्त ऑनच नाहीए. तर या कॅमेऱ्यातील सर्व गोष्टी दूर कुठं तरी रेकॉर्डही होत आहेत.’’ ऐश्वर्या शांतपणे म्हणाली.

सुशांत प्रचंड घाबरला, ‘‘रेकॉर्डिंग होतंय?’’

‘‘होय सर, तुम्हा सारख्यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसतं. तिची बुद्धी, तिची श्रम करण्याची तयारी, तिची योग्यता यांची काहीच किंमत नसते का? तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, तेवढाच आम्हीही केलाय. तुम्ही नोकरीत पुढे जाता पण आम्ही जाऊ म्हटलं तर आम्हाला अब्रूची किंमत द्यावी लागते. पण आता तसं होणार नाही. तू आता आमचं शोषण करू शकणार नाहीस. तुला तुझ्या दृष्टकृत्याची किंमत मोजावीच लागेल.’’ ऐश्वार्यानं म्हटलं.

सुशांतचा चेहरा पांढराफटक झालेला. त्यानं घाईनं लॅपटॉप बंद केला.

‘‘एवढ्यानं काही होणार नाही. अजून एक छुपा कॅमेरा सगळं चित्रण करतोय. तुझ्या पापाचा घडा भरलाय सुशांत.’’

‘‘अजून एक कॅमेरा?’’ सुशांत प्रचंड घाबरला होता.

‘‘तुझ्यासारख्या विषारी सापांपासून सावध राहायला त्याची गरज होतीच ना?’’ तिरस्कारानं हसत ऐश्वयानं म्हटलं, ‘‘तुझी नोकरी आता संपली आजच हे रेकॉर्डिंग कंपनीच्या चेयरमेनकडे पोहोचवलं जाईल.’’

‘‘असं करू नकोस, अगं, माझी लहान लहान मुलं आहेत. त्यांचं आयुष्य मातीमोल होईल. माझी पत्नी रस्त्यावर येईल.’’ हात जोडून सुशांत गयावया करत होता.

‘‘कंपनीतला स्टाफही खरं मुलांसारखाच असतो. आमची नाही दया आली?’’

‘‘प्लीज, प्लीज मला क्षमा कर. माझ्या पत्नीला हे कळलं तर ती आत्महत्त्या करेल…’’ सुशांतनं अक्षरश: ऐश्वर्याचे पाय धरले.

ज्या सर्वशक्तीमान सुशांतसमोर कंपनीचा स्टाफ घाबरून असायचा तोच आज ऐश्वर्याच्या पायावर लोळण घेत होता.

तिरस्कारानं त्याच्याकडे बघत ऐश्वर्यानं म्हटलं, ‘‘मला किंवा कुणालाच यापुढे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं धाडस करू नका, पण जे केलंय त्याची शिक्षा भोगावीच लागेल.’’

‘‘माझी नोकरी गेली तर त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला भोगावी लागेल. त्यांच्यासाठी मला क्षमा कर. मी वचन देतो यापुढे मी अजिबात अशी वागणूक ठेवणार नाही. म्हणंत असशील तर कंपनी सोडून जातो.’’

ऐश्वर्यानं काही उत्तर देण्याआधीच तिचा मोबाइल वाजला. फोन नेहाचा होता. तिनं मोबाइल ऑन करून स्पीकरवर टाकला. नेहाचा आवाज ऐकू आला. ‘‘ऐश्वर्या, तो बरोबर बोलला. त्याच्या दृष्कृत्याची शिक्षा त्याच्या बायकोमुलांनी का भोगावी? त्यांचा काय दोष आहे? मी सर्व रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवलंय. गरज पडल्यास त्याची वापरही करू. पण सध्या त्याला एक संधी द्यायला हवी.’’

‘‘ठीक आहे.’’ ऐश्वर्यानं मोबाइल बंद केला. त्याच्याकडे बघत तिनं म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुझ्या पापाची फळं तुझ्या कुटुंबाला भोगावी लागू नयेत म्हणून आम्ही सध्या पुढली अॅक्शन घेत नाहीए. मात्र यापुढे सावध राहा.’’

‘‘धन्यवाद! खूप खूप धन्यवाद…मी उद्याच या कंपनीचा राजिनामा देतो.’’

‘‘त्याची गरज नाही. उलट तू इथं आमच्या डोळ्यांपुढेच असायला हवा. आमची नजर असेल तुझ्यावर…आणि मी आता तुझ्या बरोबर काम करणार नाही. तू आपली टीम बदल. काय कारण द्यायचं ते मॅनेजमेंटला दे,’’ ऐश्वर्यानं कडक आवाजात तंबी दिली.

सुशांतला बदलत्या काळातल्या स्त्री शक्तीचा अंदाज आला होता. आता तो स्त्री शक्तीला कमी लेखणार नव्हता. थकलेल्या पावलांनी त्यांने आपल्या घराचा रस्ता धरला.

तुझ्या विना

कथा द्य डा. नीरजा सदाशीव

माहेरी जाऊन परत आलेली हर्षा अचानकच खूप बदलली होती. उल्हास ऑफिसला जायला निघाला की पूर्वी हर्षा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे. ब्रेकफास्ट, टिफिन, टाय, मोबाइल, वॉलेट, पेन, रूमाल, सगळं सगळं जागेवर मिळायचं. अंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं. घालायचे कपडे, टॉवेल बाथरूममध्येच ठेवलेले असायचे. ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूममध्ये पलंगावर तयार असायचे. बुटांना पॉलिश, संध्याकाळी चविष्ट जेवण, रविवारची खास फीस्ट, व्यवस्थित, स्वच्छ घर अन् हसरी, प्रसन्न, सदैव चैतन्यानं रसरसलेली मालकीण हर्षा…सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी हर्षा आता अशी का वागते आहे हे उल्हासला कळत नव्हतं.

सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर अन् जागेवर मिळत नव्हती. विचारलं तर उलट उत्तर मिळायचं, ‘‘स्वत: करायला काय हरकत आहे? मी एकटीनं किती अन् काय काय करायचं?’’ उल्हासच्या मनात हल्ली वेडेवाकडे विचार यायला लागले होते.

मध्यंतरी उल्हासला जरा बरं नव्हतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती. हर्षाला तिचं येणं आवडलं नाही का? तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का? त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागलीय? की हर्षाची ती नवी पारूल वहिनी? तिनं काही मनात भरवून दिलंय का? तशी ती जरा आगाऊच वाटते…की एकत्र कुटुंबात, भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती. इथं फार एकटी पडते…सध्या ऑफिसचं काम फार वाढलंय, बराच वेळ ऑफिसात जातो, घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होते का? एखादं मूल असतं, तरी जीव रमला असता पण सध्या नको, दोन वर्षांनी बाळ येऊ दे, हे? प्लॅनिंगही तिचंच होतं…काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते? उल्हासचे विचार सुरू होते.

‘‘उल्हास स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेव. मला यायला उशिर होईल. मी मैत्रिणीकडे भिशीला जातेय,’’ रूक्षपणे हर्षानं सांगितलं.

‘‘कमाल आहे? रविवारी कशी भिशी पार्टी ठेवलीए? एकच दिवस नवरे मंडळी घरात असतात.’’

‘‘अन् आम्ही रोज रोज घरात असतो त्याचं काय? अन् हे बघ, कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत ते जरा आवर. सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस तू? मला समजतोस तरी काय?’’ धडाम् आवाजानं दार बंद झालं.

उल्हास विचार करतोय, पूर्वीही तो असेच कपडे टाकून जायचा. तेव्हा तर हर्षा कटकट न करता सगळं आवरायची. आत्ताच काय घडलंय ज्यामुळे ती नाराज असते, चिडचिड करते…ठीक आहे, आता तो स्वत:ची कामं स्वत:च करेल. तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार.

कसं बसं उल्हासनं जेवण आटोपलं. हर्षाच्या हातचा स्वयंपाक नेहमीच चविष्ट असायचा. अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची. तिच्या हातचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवायची सवय सुटली होती. पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो, कधी तिखट असतो. पोळ्या कच्च्या तरी, जळक्या किंवा वातड, काय झालंय तिला? असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती. विचार करून दमला होता उल्हास.

मग स्वत:चीच समजूत घालत पुटपुटला. ‘‘चल राजा, होस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. आज हर्षाला खुश करायला काही तरी छानसा, पदार्थ तयार कर. नाही तरी तिला परत यायला उशीर होणार आहे.’’

झकास डिनर तयार ठेवला तर तिला आनंद होईल. तेवढ्यात त्याला आठवलं की हर्षाला आमीरखानचे सिनेमे आवडतात. त्यानं आधी ‘दंगल’ सिनेमाची तिकिट बुक केली. हल्ली ही ऑनलाइनची सोय फारच छान झाली आहे. मग दोघांना आवडणारा स्वयंपाकपण केला.

हर्षा आली अन् उल्हासनं केलेले काम बघून मनातून खूपच आनंदली. पण वरकरणी काही दाखवलं नाही. कारण हर्षाला हेच हवं होतं. उल्हासनं स्वावलंबी व्हावं. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचं तिच्यावाचून अडायला नको. उल्हासनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं. पण जेवताना हर्षा चकार शब्दही बोलली नाही. सिनेमा बघतानाही ती अगदी गप्प होती.

‘‘हर्षा, नेमकं काय झालंय, अगं मला काही तरी कळू देत, माझं काही चुकलंय का? चुकतंय का? की हल्ली मीच तुला आवडेनासा झालोय?’’

त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता हर्षा म्हणाली, ‘‘अरे, तुला हिंदी सिनेमे आवडत नाहीत तर माझायासाठी तू तिकिटं काढायला नको होतीस. खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचास. उगीच माझ्यासाठी बळजबरी हिंदी सिनेमा बघितलास…’’

उल्हास चकित झाला. जी हर्षा, त्याच्या मित्रांसोबत इंग्लिश मूव्ही बघण्यामुळे करवादायची तीच आज असं बोलतेय? का ती अशी त्याच्यापासून दूर जातेय? तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का? छे छे, त्यानं मान हलवून मनातला तो घाणेरडा संशय झटकून टाकला. असा विचार त्याच्या मनात आलाच कसा? हर्षाचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो. ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. ठीक आहे तिला वाटतंय ना की उल्हासनं स्वत:ची कामं स्वत:च करावीत? तर, तो ते करेल. मग हर्षा आनंदेल अन् त्याची हर्षा त्याला परत मिळेल.

या दोन तीन महिन्यात उल्हासनं स्वत:त खूप बदल घडवून आणला. स्वत:चे रोजचे कपडे तो रोज धुवायचा, वाळत घालायचा. बाकी कपडे तो रविवारी धुवायचा. काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा, काहींना स्वत:च घरी इस्त्री करायचा. घड्याळ, वॉलेट, रूमाल, फोन चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपर्वक ठेवायचा. हर्षाला आता इकडे बघावंच लागत नव्हतं. ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल अन् बेडरूमही आवरून ठेवायचा. स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती.

‘‘हर्षाराणी, आता तर खूष आहेस ना?’’ त्यानं विचारलं की हर्षा हळूच हसायची. पण आतून तिचं मन रडत असायचं. त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा.

‘‘उल्हास, नवा इंग्लिश सिनेमा आलाय, मित्रांबरोबर बघून ये ना.’’ हर्षानं म्हटलं.

‘‘हर्षा, तू मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस. मला कळंतच नाहीए गं, सांग ना तुझा आनंद कशात आहे? काय करू मी? मी तुझ्या लायकीचा नाहीए असं तुला वाटतं का?’’

‘‘नाही रे उल्हास, तू तर खूपच लायक अन् योग्य मुलगा आहेस. खरं तर तुझ्या लिलामावशीनं तिच्या नणंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती. तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती. तिचं अजून लग्न झालं नाहीए. माझ्याशी तू लग्न केल्यामुळे लिला मावशी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे. तू तिचा राग घालव बाबा.’’

‘‘काही तरी जुनं उकरून काढू नकोस. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. आपण एकमेकांना पसंत केलं…लग्न केलं…मजेत चाललंय आपलं तर लिला मावशी मध्येच कुठून आली? बरं, निघतो मी ऑफिसला, उशीर होतोय. सायंकाळी बोलूयात…रिलॅक्स!’’ अन् मग निघता निघता तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला, ‘‘तू हवं ते कर, मी तर तुझ्यावर प्रेम करतो, करत राहीन. सी यू हनी…’’

‘‘तेच तर मला नकोय उल्हास, मला तुला काही सांगताही येत नाहीए रे,’’ हर्षा किती तरी वेळ रडत होती, तिला उद्याच मुंबईला जायचंय. पुन्हा परत न येण्यासाठी. कसंबसं स्वत:ला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली. सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडस झालं नाही. रात्री हर्षा बेचैन होती. कूस बदलत होती.

‘‘तुला बरं वाटत नाहीए का हर्षा?’’ उल्हासनं तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळानं चहा करून दिला. तिचं डोकं चेपून दिलं.

‘‘डॉक्टरांना बोलावू का?’’

‘‘नको रे, डोकं दुखतंय जरा, बरं वाटेल. झोप तू.’’

उल्हासनं तेलाची बाटली आणली. ‘‘डोक्यावर तेल थापतो. मसाज केल्यावर बरं वाटेल.’’ तो म्हणाला.

बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं, वाकून काढलं तेव्हा खाली सूटकेस दिसली.

‘‘ही बॅग कोणाची? कोण जातंय?’’

‘‘अरे हो, उल्हास, मला उद्या मुंबईला जायचंय. माझा भाऊ येतोय मला घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना रूचीरा…तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे. कुणी नाहीए मदतीला. खूप घाबरली आहे ती. खूप नर्व्हस झालीय. तिच्या मदतीला जातेय मी. तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली, मीच म्हटलं काही गरज नाहीए. उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही. महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी. उल्हास तर आता इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्यावाचून सहज राहू शकतो. खरंच ना उल्हास?’’ ती हसली पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं.

‘‘अरे, एकटं राहण्याची सवय हवीय. एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे. रडत बसून कसं भागेल?’’ ती पुन्हा हसली.

‘‘गप्प रहा. मूर्खासारखं काही तरी बोलू नकोस. तू जातेस तर जा. अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग. लग्नाला जातेस, दहा दिवस खूप झाले…बरं पंधरा दिवस…पण रोज फोन करायचा. चल झोप…फार उशीर झालाय.’’

सकाळी आठ वाजता अभी आला. ‘‘ताई कुठाय?’’

‘‘अरे,काल तिला बरं वाटत नव्हतं. उशीरा झोपली. म्हणून उठवलं नाही.’’

‘‘पण भावजी, उशीर नको व्हायला, फ्लाइट चुकायची नाही तर.’’

‘‘तू उठव, मी चहा ठेवलाय. कालच मला कळलं हे मुंबईचं. मी चहाचा ट्रे घेऊन आलोच.’’

हर्षा तेवढ्यात उठून बसली. ‘‘व्हायचा तो उशीर झालाच आहे,’’ ती म्हणाली.

‘‘तू तिथं अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायचे होते. जीजूंनाही सांगायला हवं होतं.’’ अभीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

‘‘अरे वेळ कमी होता. उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता. त्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी करायला मी इथं आले. माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला. तू शांत हो…’’

अभीनं डोळे पुसले. उल्हास चहा घेऊन आला. चहा घेऊन दोघं निघालीच निघता निघताही हर्षा उल्हासला ढीगभर सूचना देत होती. शेवटी बजावलं, ‘‘मला सारखा फोन करू नकोस. मैत्रीणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘आता तू माझी काळजी करू नकोस. अजिबात टेंशन घेऊ नकोस. मैत्रिणीकडे लग्नाला, मदतीला जाते आहेस, आनंदात जा. मी सगळं मॅनेज करतो. अगदी राजासारखा राहतो बघ.’’

एयरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता. आत जाताना त्याचा हात सोडला अन् तिला वाटलं, तिचं सर्वस्व हातातून निसटलं. डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं, हळूच बाय म्हटलं अन् भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला. रडू कसंबसं आवरलं.

हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते. ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मीटिंग आहे. त्याला खूप आनंद झाला. त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राइज देऊयात.

हर्षाच्या घरी पोहोचला उल्हास, ‘‘अरे अभी, मला रूचीचा फोन दे. हर्षाला सरप्राइज देणार आहे. माझी उद्या मीटिंग आहे सकाळी, म्हणून मी आलोय.’’

‘‘चला, मी तिकडेच निघालोय.’’ तो म्हणाला.

‘‘थांब, आईंना भेटून घेतो.’’ उल्हासनं म्हटलं.

‘‘सगळे तिथंच आहेत, चला.’’

टॅक्सी भराभर मार्ग कापत जात होती. ‘‘अरे इकडं कुठं? टाटा मेमोरियलमध्ये लग्न?’’ उल्हासला काहीच सुधरेना…‘‘हर्षाला काय झालंय?’’

त्याचा हात धरून अभी त्याला हर्षापाशी घेऊन आला. ‘‘सॉरी ताई, जीजू अवचित आले म्हणून मग…’’ मग त्याला पुढे बोलवेना.

हर्षाच्या डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती. त्याला बघून तिला समाधान वाटलं, ‘‘आता मी सुखानं मरते.’’ तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले.

‘‘हर्षा, हर्षा…मी तुला मरू देणार नाही. तुला काहीही होणार नाही…तू मला सांगितलं का नाहीस? डॉक्टर डॉक्टर धावा…’’

‘‘तुम्ही जरा बाहेर निघा. धीरानं घ्या. मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं, मुळात यायला फार उशीर केला त्यांनी. आता काही नाही होणार…’’

‘‘असं म्हणू नका डॉक्टर, तुम्हाला जमत नसेल, तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो. ती बरी होणार. तुम्ही ताबडतोब डिसचार्ज द्या. हर्षा, मी तुला काही होऊ देणार नाही…आलोच मी…’’ उल्हास बाहेर धावला.

पूर्ण प्रयत्नांनी त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली. दोनच दिवसांनी तो हर्षासह लुफ्तहंसाच्या विमानात होता. त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती.

‘‘हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाहीए.’’ त्यानं हळूवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं अन् नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं. मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आले होते.

विश्वास आहे तुझ्यावर

कथा * अंजू साखरे

‘‘दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा…’’ गाण्याची रिंग टोन ऐकून मृदुला आपला फोन उचलायला स्वयंपाकघरातून ड्रॉइंगरूममध्ये धावली. नाव येत नव्हतं. पण जो नंबर दिसत होता, तो बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली. हा नंबर तिला झोपेतून उठवून कुणी विचारला तरी ती तोंडपाठ म्हणून दाखवू शकली असती.

आपल्या खोलीतून रोहन ओरडला, ‘‘आई, तुझा फोन वाजतोय…’’

मृदुलानं झटकन् फोन उचलला. पटकन् टीव्ही बघत असलेल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. दुसऱ्याच क्षणी खोलीत अभ्यास करत असलेल्या लेकाकडे एक दृष्टीक्षेप टाकून तिनं फोन कानाला लावत बाल्कनी गाठली.

‘‘हॅलो…हाय…काय चाललंय?’’

‘‘आता बरं वाटतंय,’’ पलीकडून आवाज आला.

‘‘का? काय झालं होतं?’’ तिनं विचारलं.

‘‘बस्स, तुझा आवाज ऐकला…माझा दिवस सत्कारणी लागला.’’

‘‘असं होय? बरं पण एक सांग, आज शनिवारी माझा नवरा ऋषी अन् मुलगा रोहन दोघंही घरी असतात हे ठाऊक आहे ना? मला मोकळेपणानं बोलता येत नाही,’’ घाईघाईनं मृदुला म्हणाली.

‘‘मी तर फक्त एवढं सांगायला फोन केला होता की आता मला अधिक संयम ठेवता येणार नाही. मी पुढल्या आठवड्यात दिल्लीला येतोय…तुला भेटायला. प्लीज एखाद्या हॉटेलात माझं बुकिंग करून ठेव ना? तिथल्या रूममध्ये फक्त तू, मी अन् एकांत असेल,’’ सिद्धार्थ म्हणाला.

‘‘हॉटेल? छे रे बाबा…मी नाही हॉटेलात येणार भेटायला.’’

‘‘तर मग आपण भेटायचं कुठं? मी एवढा १५०० किलोमीटर मुंबई ते दिल्ली अंतर ओलांडून तुला भेटायला येतोय अन् तुला हॉटेलपर्यंत यायला जमणार नाही?’’

मृदुला बोलण्यात गुंतली होती. मागे रोहन कधी येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही.

रोहनकडे दृष्टी जाताच ती घाईनं म्हणाली, ‘‘मी नंतर फोन करते,’’ फोन बंद करून ती आत वळली.

‘‘कुणाचा फोन होता आई?’’ रोहननं विचारलं.

‘‘तो…तो माझ्या मैत्रीणीचा होता,’’ तिनं फोन उचलला अन् ती स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरू लागली.

तिचे हात तिथं काम करत होते पण मन मात्र मुंबईला पोहोचलं होतं…सिद्धार्थपाशी. गेली तीन चार वर्षं ती त्याच्याशी ऑनलाइन चॅटिंग अन् फोनवर संभाषण करत होती. तिलाही त्याला भेटायची खूप उत्सुकता होती. आता तो भेटायला यायचं म्हणतोय तर कुठं भेटायचं?

आयुष्यात कोण, केव्हा, कुठं, कुठल्या वळणावर भेटेल सांगता येत नाही. त्यातून कुणीतरी अनोळखी इतका जवळचा वाटायला लागतो की आपले सगळेच परके वाटायला लागतात.

तशी मृदुला खरं तर सुखी होती. प्रेम करणारा नवरा, हुशार, गुणी मुलगा अन् संपन्न आयुष्य…मजेत सुरू होतं. पण एकदा सिद्धार्थ ऑनलाइन फ्रेंड म्हणून तिच्या आयुष्यात आला अन् सगळंच उलटंपालटं झालं.

ती नवरा अन् मुलगा दोघांपासून चोरून कॉम्प्युटरवरून बरेच मेल अन् चॅट करायची. फोनही खूप करायची. जोपर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट ती सिद्धार्थबरोबर शेयर करत नाही तोपर्यंत तिला चैन पडत नसे. न बघितलेल्या सिद्धार्थनं तिचं आयुष्य व्यापून टाकलं होतं. मैत्री आता अशा स्थितीत होती की एक दिवस जरी सिद्धार्थबरोबर बोलली नाही तरी ती वेडीपिशी व्हायची. रोजचा फोन हे आयुष्यातलं परम कर्तव्य झालं होतं. तिच्याचसारखी अवस्था मुंबईत सिद्धार्थचीही झाली होती.

घरकाम आटोपून, नवरा ऑफिसला अन् मुलगा शाळेला गेल्यावरच ती फोन करायची किंवा चॅट करायची. पण कधी तरी रोहन गूगलच्या हिस्ट्रीत जाऊन अनेकदा प्रश्न विचारायचा की, ‘‘मम्मी हा सिद्धार्थ कोण आहे?’’ त्यावेळी ती अगदी बेधडक म्हणायची, ‘‘ठाऊक नाही.’’

तरीही हल्ली रोहनला थोडी शंका येत होती की आई त्याच्यापासून काहीतरी लपवते आहे. काही वेळा तो चिडून किंवा कधी सहजपणेही आपला आक्रोश व्यक्त करायचा. पण फार जास्त काही विचारू किंवा बोलू शकत नव्हता.

आता सिद्धार्थ येऊ घातलाय. त्याला भेटायची इच्छा मनातून काढून टाकायची की त्याला भेटायला हॉटेलात जायचं? काय करावं या विचारानं तिच्या डोक्याचं भुसकट झालं होतं.

मग अचानक तिनं एक निर्णय घेतला अन् सिद्धार्थला फोन लावला, ‘‘सिद्धार्थ, आधीच मी तुला खूप सावधगिरीनं, खरं तर घरातल्यांना चोरून, त्यांना घाबरून अगदी भीतभीत फोन लावत होते. पण आता मला या भीतिचा, या चोरटेपणाचा वीट आलाय. मला असं चोरून मारून, घाबरून जगायचं नाहीए. असं बघ, आपले संबंध मैत्रीचे आहेत. माझ्या मनात कुठलीही वाईट भावना नाही, तुझ्याही मनात नाही…तर मग आपण का घाबरायचं? तू सरळ माझ्या घरी ये. मी तुला हॉटेलात भेटायला येणार नाही अन् तुला भेटायचीही संधी मला सोडायची नाहीए.’’

मृदुलाचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थ चांगलाच गडबडला. ‘‘वेड लागलंय का तुला? तुझा नवरा अन् तुझा रोहन…त्यांना काय वाटेल? छे छे हे बरोबर नाही.’’ ‘‘काय बरोबर नाही? हे घर माझंही आहे. इथं मी माझ्या मर्जीनं माझ्या माणसांना बोलावू शकते. माझ्या मनात कुठलंही पाप नाही, मी तुझ्याशी मैत्री केलीय, यात वाईट किंवा कुणी आक्षेप घ्यावा असं काय आहे? अजून मी रोहन किंवा ऋषीशी याबाबतीत बोलले नाहीए, पण जर त्यांना हे मान्य नसेल तर आपण हे संबंध कायमचे संपवून टाकू…पण…त्यापूर्वी मला तुला एकदा भेटायचं आहे. फार इच्छा आहे तुला बघण्याची, प्रत्यक्ष बसून गप्पा मारण्याची…येशील ना माझ्या घरी? एकदाच?’’ मृदुलानं मनातलं सर्व बोलून टाकलं.

‘‘मला विचार करायला थोडा वेळ दे…’’ तो गंभीरपणे म्हणाला.

‘‘का? घाबरलास? मारे म्हणायचास, तुझ्या एका बोलावण्यावर धावत येईन…आता काय झालं? कळलं मला तुझं मन स्वच्छ नाही. तुझ्या मनात पाप आहे. मला हॉटेलमध्ये बोलावून तुला माझा गैरफायदा घ्यायचाय,’’ मृदुलाचा आवाज नकळत चढला होता.

‘‘पुरे…कळलं मला,’’ सिद्धार्थ म्हणाला, ‘‘तर मी २० तारखेला बाराच्या फ्लाइटनं दिल्लीला पोहोचेन. ती सायंकाळ तुझ्यासाठी अन् तुझ्या कुटुंबासाठी दिली…पण एक सांग, ऋषी मला मारणार नाही ना?’’

‘‘ठिक आहे, मी वाट बघते,’’ एवढं बोलून मृदुलानं फोन कट केला.

मृदुलानं त्याला बोलावलं खरं, पण मात्र तिला कळेना की ऋषी अन् रोहनशी सिद्धार्थची ओळख काय म्हणून अन् कशी करून द्यायची?

ऋषी एकवेळ समजून घेईल पण अडनिड्या वयाच्या रोहनला आईचा अवचित झालेला मित्र मान्य होईल का? तो कसा रिएक्ट होईल? तिची काय इभ्रत राहील?

वाट बघण्याचा तो आठवडा एखाद्या परीक्षेच्या काळासारखा कठीण होता. त्या सर्व काळात ती दरक्षणी, अगदी क्षणोक्षणी, पश्चात्ताप करत होती. स्वत:लाच दोष देत होती.

मृदुलाच्या मनांतल्या त्या प्रचंड वादळाची घरात कुणालाही कल्पना नव्हती. या सात दिवसात सिद्धार्थला प्रत्यक्ष भेटण्याची प्रबळ इच्छा, मनातल्या सतत धाकासाठी, आता काय होईल या काळजीच्या ओझ्याखाली गतप्राय होण्याच्या मार्गावर होती. प्रत्यक्ष भेटण्याची आतुरता किंवा ओढ यापेक्षाही २० तारखेला सगळं कसं ठीकठाक पार पडतंय याचंच टेन्शन फार होतं.

रोज सकाळी उठताना मनांत पहिला विचार असायचा की ऋषी अन् रोहननं तिला सांगावं की वीस तारखेला त्यांचा काहीतरी कार्यक्रम बाहेर ठरलाय अन् ते दोघं त्यादिवशी घरी असणार नाहीएत, म्हणजे ती निर्धास्तपणे सिद्धार्थला घरातच भेटू शकेल.

पण तसं त्या आठवडाभरात काहीच घडलं नाही. शेवटी वीस तारीख उजाडली. या काळात तिचं सिद्धार्थशी बोलणंच झालं नव्हतं. एकोणीस तारखेची संपूर्ण रात्र ‘उद्या काय घडेल’ या काळजीतच कूस बदलत संपली.

मनात आलं त्याला कळवावं, येऊच नकोस…पण आता ते शक्य नव्हतं. बाण धनुष्यातून सुटला होता.

आपण कुठल्या विश्वासाच्या बळावर हे धाडस केलं ते मृदुलाला कळत नव्हतं. मुंबईहून दिल्लीला त्याला भेटायला बोलावलं…घरात सगळं शांत होतं. जो तो आपापल्या खोलीत, आपापल्या कामात होता.

बरोबर तीन वाजता सिद्धार्थचा फोन आला, ‘‘मी दिल्ली एअरपोर्टला पोहोचलोय.’’

मृदुलाचे डोळे आनंदांने चमकले. हृदय धडधडू लागलं अन् उत्तेजित झाल्यामुळे चेहरा आसक्त झाला.

‘‘एकदा पुन्हा विचार कर…कुठं तरी बाहेरच भेटूयात?’’ सिद्धार्थनं विचारलं.

‘‘नाही. आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते बघून घेईन,’’ मृदुलानं म्हटलं. मग त्याला मेट्रोचा मार्ग समजावून घरी कसं पोहोचायचं ते सांगितलं. लगेच फोन बंद केला.

अन् मनातली धाकधूक वाढल्यामुळे तिचे हातपाय गार पडले. ऋषी अन् रोहन आपापल्या रूममध्ये होते. डोअर बेल वाजली. धडधडत्या हृदयानं, थरथरत्या हातानं तिनं दार उघडलं. दारात एक उंच, सावळा, देखणा, साधारण चाळीशीच्या आतला तरूण उभा होता. त्याला बघून ती चकित झाली, भांबावली.

‘‘हाय.’’

तो परिचित हाय ऐकून सुखावली अन् कोरड पडलेल्या घशानं बोलली, ‘‘हाय..ये ना, आत ये.’’

जरा बिचकतच सिद्धार्थ दारातून आत आला. तेवढ्यात रोहन झटकन् आपल्या खोलीतून बाहेर आला.

‘‘हा रोहन…आणि रोहन, हे सिद्धार्थ अंकल.’’

कशीबशी तिनं ओळख करून दिली. रोहनही थोडा भांबावला. पटकन् नमस्कार करून आपल्या खोलीत निघून गेला.

आपल्या मनांतील भीती अन् अस्वस्थता चेहऱ्यावर दिसू न देता हसून तिनं सिद्धार्थकडे बघितलं अन् त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं.

ऋषीच्या खोलीत टीव्ही चालू होता. बाकी सगळं शांत होतं. ऋषी टीव्हीपुढे बसला होता. ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, ‘‘जरा बाहेर येता का? कुणी आलंय?’’

‘‘कोण आलंय?’’

‘‘सिद्धार्थ.’’

दचकून ऋषीनं विचारलं, ‘‘कोण सिद्धार्थ?’’

‘‘माझा मित्र.’’ तिनं सांगून टाकलं. आता ती कोणत्याही परिणामाला सामोरी जायला तयार होती. ऋषीनं तिला घराबाहेर काढलं तरी तिची तयारी होती पण अर्थात्च ती सिद्धार्थबरोबर जाणार नव्हती. तो तिचा मित्र होता. आयुष्याचा जोडीदार थोडीच होता?

ऋषी दहा मिनिटं तसाच बसून राहिला. मृदुला स्वयंपाकघरात जाऊन कॉफी करायला लागली. त्या आधी तिनं सिद्धार्थला पाणी आणून दिलं. अधूनमधून ती त्याच्याशी बोलतही होती.

रोहन स्वयंपाकघरात आला आणि ‘‘मी बाहेर जातोय,’’ म्हणून झटकन् सांगून निघूनही गेला.

कॉफी बनवून मृदुला ट्रे घेऊन बाहेर आली, तेव्हा ऋषी खोलीतून बाहेर आला अन् सिद्धार्थशी शेकहॅन्ड करून त्याच्या शेजारी सोफ्यावर बसला. मृदुलाला मनातून खूप भीती वाटली. पण एक दिलासाही होता. त्यांच्यातले थोडेफार मतभेद कधी झाले तरी ते बेडरूमबाहेर आले नाहीत. तेवढा सुसंस्कृतपणा त्याच्याकडे होता. मुख्य म्हणजे त्यांचा परस्परांवरचा विश्वास अन् आपसातलं सामंजस्यही खरं तर वाखणण्यासारखंच होतं. ऋषी अगदी मोकळेपणानं बोलत असल्यामुळे शांत झाला. अवांतर गप्पा, थोडीफार एकमेकांची चौकशी, जुजबी ओळख यादरम्यान ऋषीनं मृदुलाला म्हटलं, ‘‘ही कॉफी वेलकम ड्रिंक म्हणून घेतोय आम्ही. फ्रीजमध्ये रसमलाई अन् ढोकळा आहे हे ठाऊक आहे ना?’’ मृदुला दचकली. तिला हे अपेक्षित नव्हतं.

थोडा वेळ बसून ऋषी आत निघून गेला. मृदुला व सिद्धार्थ आता चांगलेच सावरले होते. शांतपणे गप्पा मारत होते. मृदुलाही आत्मविश्वासानं वावरत होती. थोड्याच वेळात रोहन आला आणि सरळ स्वयंपाकघात गेला. जाताना आईला, ‘‘आत ये.’’ म्हणून गेला.

रोहन गरमागरम सामासे अन् जिलेबी घेऊन आला होता. आश्चर्यानं मृदुला त्याच्याकडे बघतच राहिली.

‘‘आई, तुझ्या फ्रेंडसाठी. माझे मित्र येतात तेव्हा तूही किती काय काय करतेस ना? म्हणून तुझ्या आवडत्या दोन्ही गोष्टी मी तुझ्या मित्रासाठी आणल्या आहेत. तुलाही हक्क आहेच गं मित्र असण्याचा, मैत्री करण्याचा.’’

त्यानं तिला बशा भरायलाही मदत केली. रसमलाई, ढोकळा, जिलेबी, सामोसे अन् त्यानंतर पुन्हा कॉफी…

सुमारे तीन तास थांबून सिद्धार्थ आठच्या फ्लाईटनं परत मुंबईला निघून गेला.

तो निघून गेला अन् मृदुलाला एकदम भीती वाटली. ऋषी आता काय रिअॅक्शन देणार? भीतीमुळे ती त्याच्यासमोर जाणंही टाळत होती.

रात्रीची जेवणं आटोपली. ती झोपण्याठी खोलीत आली, तेव्हा ऋषीनं विचारलं, ‘‘सिद्धार्थ गेला?’’

‘‘हो, गेला.’’

‘‘तुझा खरा मित्र दिसतोय…इतक्या लांबून फक्त तुला भेटायला आला.’’

‘‘मी एका पुरुषाशी मैत्री केली याचा तुम्हाला राग आला का? मला माझा संसार, माझं घर, नवरा, मुलगा मित्रापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. आज तो आला, आता तुम्ही मला जी शिक्षा सांगाल ती भोगायला मी तयार आहे.’’

‘‘शिक्षा? कसली शिक्षा? तू काही चूक किंवा गुन्हा थोडीच केलाय? मला तर आठवड्यापूर्वीच माहीत होतं की तुझा मित्र येणार आहे.’’

मृदुला दचकली. तिनं विचारलं, ‘‘तर मग तुम्ही काही बोलला का नाहीत?’’

‘‘हे बघ मृदुला, गेली इतकी वर्ष आपण संसार करतोय. मी तुला ओळखतो. त्यानं म्हटल्याप्रमाणे तू त्याला बाहेरही भेटू शकली असतीस. पण तू त्याला घरी बोलावलंस, आमची ओळख करून दिलीस.’’

कारण मनातून तुला आपल्या नात्याविषयी खात्री होती. माझ्यावर विश्वास होता की मी इतर नवऱ्यासारखा नाही. बायकोला समजून घेतो अन् मैत्री तर कुणाची कुणाशीही होऊ शकते. आठवड्यापूर्वी तू त्याला घरी यायचं आमंत्रण दिलं. तेव्हाच मी तुमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. चोरून नाही हं…एक तर तुझा आवाजच मोठा होता, चढा होता अन् दुसरं म्हणजे तुझ्या मोबाइलचा स्पीकरही ऑन होता. तू माझ्यावर ठेवलेला विश्वास मलाही जपायलाच हवा होता ना? तुझी घालमेल मला समजत होती…म्हणूनच तुझ्या नकळत मी तुझ्या मित्राच्या स्वागतासाठी रसमलाई अन् ढोकळे आणून ठेवले होते.’’

मृदुलाच्या डोळ्यांतून घळघळ अश्रू वाहत होते. ‘‘हो, अजून एक गोष्ट…एक    स्त्री अन् एक पुरूष मित्र असू शकत नाही असे नाही…मी तुझा चांगला मित्र आहे की नाही? अन् दुसरी गोष्ट तू माझी मैत्रीण आहेस, पण मलाही एखादी आणखी मैत्रीण असायला तुझी हरकत नसावी…खरं ना?’’ ऋषीचं हे बोलणं ऐकून मृदुलानं त्याला मिठीच मारली.

दोन्ही हातात लाडू

कथा * सुनीता भटनागर

ऑफिसमधले सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते. खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता. तिने मोहितला फोन केला, ‘‘ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग अॅनव्हरसरीची पार्टी मागताहेत. मी त्यांना काय सांगू?’’

‘‘आईबाबांना विचारल्याशिवाय कुणालाही घरी बोलावणं बरोबर नाही.’’ मोहितच्या आवाजात काळजी होती.

‘‘पण मग यांच्या पार्टीचं काय?’’

‘‘रात्री विचार करुन ठरवूयात.’’

‘‘ओ. के.’’

रंजनाने फोन बंद केला. त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं तसे सगळे तिला ताणायला लागले. ‘‘आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ. फुकट पार्टी खाणार नाही.’’

‘‘अगं, सासूला इतकी घाबरून राहाशील तर सगळं आयुष्य रडतंच काढावं लागेल.’’

थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, ‘‘हे बघा, माझं डोकं खाणं बंद करा. मी काय सांगतेय ते नीट लक्षपूर्वक ऐका. उद्या, म्हणजे रविवारी, रात्री आठ वाजता तुम्ही सर्व जेवायला ‘सागररत्न’ रेस्टॉरण्टमध्ये येता आहात. गिफ्ट आणणं कम्पल्सरी आहे अन् गिफ्ट चांगली आणा. आणायचं म्हणून आणू नका. गिफ्ट घरी विसरून येऊ नका.’’

तिच्या या घोषणेचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं, ‘‘रंजना, तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वत:वर संकट तर नाही ना ओढवून घेतलंस?’’

‘‘आता जे होईल ते बघूयात, मॅडम,’’ रंजनाने हसून म्हटलं.

‘‘बघ बाई, घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर. मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन. फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस, उदास अन् दु:खी होऊ नकोस..प्लीज…’’

‘‘नाही मॅडम, जे काही रडायचं होतं ते मी गेल्यावर्षी पहिल्या मॅरेज अॅनव्हरसरीलाच आटोपून घेतलंय. तुम्हाला माहीतंच आहे सगळं.’’

‘‘हो गं! तेच सगळं आठवतंय मला.’’

‘‘माझी काळजी करू नका मॅडम; कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे.’’

‘‘हे मात्र खरंय. तू खूप बदलली आहेस. सासूचा संताप, सासऱ्याचं रागावणं, नणंदेचं टोचून, जिव्हारी लागेल असं बोलणं याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाहीए. तू बिनधास्त आहेस. हे खरंच कौतुकास्पद आहे.’’

‘‘हो ना मॅडम, आता मी टेन्शन घेत नाही. उगाचच भिऊनही राहात नाही. उद्या रात्री पार्टी नक्की होणार. तुम्ही सरांना अन् मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा.’’ रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं.

रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवलंय हे ऐकून तिची सासू एकदम भडकली. ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही.

‘‘आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला, सूनबाई? इथल्या शिस्तीप्रमाणे, नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा.’’

‘‘आई, ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू? पण तुम्हाला जर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते,’’ अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथूच काढता पाय घेतला. ती सरळ स्वयंपाकघात जाऊन कामाला लागली.

सासू अजूनही संतापून बडबडत होती. तेवढ्यात रंजनाची नणंद म्हणाली, ‘‘आई, वहिनीला जर स्वत:च्याच मर्जीने वागायचं आहे तर तू उगीचच आरडाओरडा करून स्वत:चं अन् आमचंही डोकं का फिरवते आहेस? तू इथे तिच्या नावाने शंख करते आहेस अन् ती मजेत आत गाणं गुणगुणते आहे. स्वत:चाच पाणउतारा करून काय मिळतंय तुला?’’

संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली. खूप वेळ तिची बडबड सुरूच होती.

रंजना मात्र शांतपणे कामं आवरत होती. सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला अन् मोठ्यांदा म्हणाली, ‘‘जेवायला चला, जेवण तयार आहे.’’

सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली. नणंद, सासू अन् नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता. सासरे मात्र हल्ली निवळले होते. सुनेशी चांगलं वागायचे. पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची. आत्ताही ते काही तरी हलकंफुलकं संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते पण सासूने एक जळजळीत दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं.

रंजना अगदी शांत होती. प्रेमाने सर्वांना वाढत होती. नणंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती. सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही.

आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच. ‘‘इतर कुणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस. मला तुझा निर्णय मान्य नाही. मी उद्या पार्टीला असणार नाही.’’

खट्याळपणे हसत, खांदे उडवून रंजनाने म्हटलं, ‘‘तुमची मर्जी.’’ अन् त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली.

रात्री बारा वाजता रंजनाच्या मोबाइलचा अलार्म वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली. ‘‘हा अलार्म का वाजतोए?’’ मोहितने तिरसटून विचारलं.

‘‘हॅप्पी मॅरेज अॅनव्हसरी स्वीट हार्ट.’’ त्याच्या कानाशी ओठ नेऊन अत्यंत प्रेमासक्त स्वरात रंजनाने म्हटलं.

रंजनाचा लाडिक स्वर, तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध अन् डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला, सुखावला अन् त्याने रंजनाला मिठीत घेतलं.

त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्य पणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केलं. नकळत तो बोलून गेला. ‘‘इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’’

तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत, रंजनाने विचारलं, ‘‘उद्या माझ्याबरोबर चलाल ना?’’

‘‘पार्टीला?’’ मघाचं सर्व प्रेमबीम विसरून मोहितने कपाळावर आठ्या घालत विचारलं.

‘‘इश्श! मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते.’’

‘‘असं होय? जाऊयात की!’’

‘‘खरंच? किती छान आहात हो तुम्ही.’’ त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले.

सकाळी सहालाच उठून रंजनाने आपलं आवरलं. छानपैकी तयार झाली. जागा झालेल्या मोहितने तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘यू आर ब्यूटीफूल.’’ रंजनाला हे कौतुक सुखावून गेलं.

मोहित तिला जवळ घेणार तेवढ्यात त्याला चुकवून हसत हसत ती खोलीबाहेर पडली.

स्वयंपाकघरात जाऊन तिने सर्वांसाठी चहा केला. सासूसासऱ्यांच्या खोलीत चहाचा ट्रे नेऊन ठेवला अन् त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

चहाचा कप हातात घेत सासूशी रागाने तिच्याकडे बघत विचारलं, ‘‘सकाळी सकाळीच माहेरी जाते आहेस का?’’

‘‘आम्ही पार्कात फिरायला जातोए, आई,’’ अगदी नम्रपणे रंजनाने म्हटलं.

सासूबाईंनी काही म्हणण्याआधीच सासरे चहा पिता पिता म्हणाले, ‘‘जा, जा, सकाळी फिरणं आरोग्याला हितकारक असतं. तुम्ही अवश्य जा.’’

‘‘जाऊ ना, आई?’’

‘‘कुठलंही काम करण्यापूर्वी माझी परवानगी घेणं कधी सुरू केलंस, सूनबाई?’’

आपला राग व्यक्त करण्याची संधी सासूबाईंनी सोडली नाही.

‘‘आई, तुम्ही माझ्यावर अशा रागावत जाऊ नका ना? आम्ही लवकरच येतो,’’ म्हणत लाडक्या लेकीने आईच्या गळ्यात पडावं तशी ती सासूच्या गळ्यात पडली अन् त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गालाचा हलकेच मुका घेऊन प्रसन्न वदनाने खोलीबाहेर पडली.

बावचळलेल्या सासूला बोलणं सुधरेना. सासरे मात्र खळखळून हसले.

मोहित आणि ती पार्कात पोहोचली तेव्हा तिथे त्यांच्या परिचयाचे अनेक लोक वॉकसाठी आले होते. वॉक घेऊन ती दोघं तिथल्या प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात गेली. दोघांनी फेमस आलू कचोरी अन् जिलेबी खाल्ली. घरच्या लोकांसाठी बांधून बरोबर घेतली.

आठ वाजता ती घरी पोहोचली अन् बरोबर आणलेल्या वस्तू ब्रेकफास्ट टेबलवर मांडून सर्वांना खायला बोलावलं. इतका चविष्ट अन् रोजच्यापेक्षा वेगळा नाश्ता बघूनही सासू व नणंदेची कळी खुलली नाही.

दोघीही रंजनाशी बोलतंच नव्हत्या. सासरेबुवांना आता काळजी पडली. बायको अन् मुलगी दोघींचीही सुनेच्या बाबतीतली वागणूक त्यांना अजिबात आवडत नव्हती. पण ते बोलू शकत नव्हते. एक शब्द जरी ते सुनेची कड घेऊन बोलले असते तर मायलेकींनी त्यांना फाडून खाल्लं असतं.

ब्रेकफास्ट अन् दुसरा चहा आटोपून रंजना आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने ती खूप छान नटूनथटून आली अन् स्वयंपाकाला लागली. नणंदेने तिला इतकी सुंदर साडी स्वयंपाक करताना नको नेसू असं सुचवलं, त्यावर ती हसून म्हणाली, ‘‘त्याचं काय आहे वन्स, तुमच्या भावाने आज या साडीत मी फार छान दिसतेय असं म्हटलं आहे. त्यामुळे आता ही साडी अन् हा सगळा साजशृंगार मी रात्रीच उतरवणार आहे.’’

‘‘अगं, पण इतक्या महाग साडीवर डाग पडतील, ती भिजेल, चुरगळेल याची भीती किंवा काळजी नाही वाटत तुला?’’

‘‘भीती अन् काळजीला तर मी कधीच ‘बाय बाय’ केलंय, वन्स.’’

‘‘माझ्या मते एखादा मूर्खच आपल्या वस्तुच्या नुकसानीची काळजी करत असेल.’’ संतापून मेधा म्हणाली.

‘‘मला वाटतं, मी मूर्ख नाहीए, पण तुमच्या भावाच्या प्रेमात मात्र पार वेडी झाले आहे. कारण तो फार चांगला आहे, तुमच्यासारखाच!’’ हसत हसत रंजनाने लाडाने मेधाचा गालगुच्चा घेतला अन् तिची गळाभेट घेतली. अकस्मात घडलेल्या या प्रसंगाने मेधा बावचळली, गोंधळली अन् मग स्वत:ही हसायला लागली.

रंजनाने फक्त एक भाजी बाहेरून मागवली होती. बाकी सर्व स्वयंपाक तिने घरीच केला होता. ‘पनीर पसंदा’ ही भाजी मोहितला अन् मेधाला फार आवडते त्यासाठी तिने मुद्दाम ती बाहेरून मागवली होती.

जेवायला सर्व मंडळी टेबलापाशी आली तेव्हा आवडता मेन्यू बघून मेधाची कळी खुलली मात्र सासूबाईंनी राग बोलून दाखवलाच.

‘‘हल्लीच्या मुलींना ना, उठसूठ पैसे खर्च करायचा सोस आहे. पुढे येणारा काळ कसा असेल सांगता येत नाही, त्यासाठीच आधीपासून बचत करून पैसा शिल्लक टाकावा लागतो. जे लोक पैसा वाचवत नाहीत त्यांना पुढे पश्चात्ताप करावा लागतो.’’

रंजनाने वाढता वाढता हसून म्हटलं, ‘‘खरंच आई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.’’ त्यानंतर जेवणं मजेत झाली. सासूच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला रंजना हसून प्रतिसाद देत होती.

त्या दिवशी गिफ्ट म्हणून मोहितला शर्ट अन् रंजनाला साडी मिळाली. त्यांनीही मेधाला तिचा आवडता सेंट, आईंना साडी अन् बाबांना स्वेटर दिला. गिफ्टच्या देवाण-घेवाणीमुळे घरातलं वातावरण जरा आनंदी अन् चैतन्यमय झालं.

सगळ्यांनाच ठाऊक होतं रात्री आठ वाजता ‘सागररत्न’मध्ये पार्टी आहे. पण सहाच्या सुमारास जेव्हा मोहित हॉलमध्ये आला तेव्हा एकूणच वातावरण भयंकर टेन्स असल्याचं त्याला जाणवलं.

‘‘तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या परवानगीविना जा,’’ त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं.

‘‘आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं,’’ मेधाने फुणफुण केली.

‘‘रंजना पार्टीला जायचं नाही, म्हणतेय,’’ मोहितच्या या बोलण्यावर ती तिघंही दचकली.

‘‘सूनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणतेय?’’ काळजीच्या सुरात बाबांनी विचारलं.

‘‘तिचं म्हणणं आहे, तुम्ही तिघं पार्टीला आला नाहीत, तर तीही पार्टीला जाणार नाही.’’

‘‘अरे व्वा? नाटक करायला छान येतंय सुनेला,’’ वाईट तोंड करत सासूबाई वदल्या.

मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता. त्या तिघांचेच वाद सुरू होते.

शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं. ‘‘आपल्या सूनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाहीए. तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा. अन् शेवटचं सांगतोय, तुम्ही दोघी पटापट आवरा अन् आपण निघूयात. तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही.’’ बाबांची धमकी मात्र लागू पडली.

सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत ‘सागर रत्न’ला पोहोचलं. रंजनाच्या सहकाऱ्यांचं स्वागत सर्वांनी मिळून, प्रेमाने, आपलेपणाने केलं. संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित अन् हर्षिंत झाले होते.

पार्टी छानच झाली. भरपूर गिफ्ट्स मिळाल्या. हास्यविनोदात वेळ इतका छान गेला. त्यासोबत चविष्ट जेवण. होस्ट अन् गेस्ट सगळेच खूष होते.

संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे गाठून विचारलं, ‘‘कसं काय राजी केलंस तू सर्वांना?’’

रंजनाचे डोळे चमकले. हसून ती म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते.’’

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले. दु:खी झाले. रात्री पलंगावर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं. पण मला उदास, दु:खी बघून माझ्या सासूच्या व नणंदेच्या डोळ्यांत आसूरी आनंद दिसत होता. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापत काढून, समारंभाचा विचका करून, दुसऱ्याला दु:खी करूनच काही लोकांना आनंद मिळतो. हा साक्षात्कार झाला अन् मी ठरवलं यापुढे या लोकांना तशी संधीच द्यायची नाही. आपला आनंद आपण जपायचा. विनाकारण वाद घालायचा नाही. चेहरा पाडायचा नाही, गप्प बसायचं, प्रसन्न राहायचं.

लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकलंय. काही लोक माझ्या आनंदाने सुखावतात, आनंदी होतात. काहींना माझा आनंद सहन होत नाही. मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू देत, आपण शांतच राहायचं. प्रेमाने वागायचं.

आता वन्स काय, सासूबाई काय कुणीच मला चिडवू शकत नाहीत, रडवूही शकत नाहीत. मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते. त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत अन् तोही माझं ऐकतो.

पूर्वी मी रडायची. आता हसत असते. आपला आनंद, आपल्या मनाची शांतता का म्हणून कुणाला हिरावून घेऊ द्यायची?

ज्यांना मला दु:खी करायचं असतं, ते मला प्रसन्न बघून स्वत:च चिडचिडतात, त्रासतात. मला काहीच करावं लागत नाही अन् त्यांना धडा मिळतो. माझ्या शुभचिंतकांना तर माझा आनंद हवाच असतो. मीही प्रसन्न तेही प्रसन्न!

आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. मी मजेत जगते आहे. एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहातो तेव्हा आपला राग करणारी माणसंही हळूहळू निवळतात. माझी सासू अन् नणंद त्यामुळेच इथे आल्या आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे.

संगीता मॅडमनने प्रेमाने तिला आलिंगन देत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ‘‘तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो गं पोरी…अगदी मलासुद्धा!’’ त्या कौतुकाने बोलल्या.

‘‘व्वा! मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिलीत. थँक्यू व्हेरी मच.’’ त्यांच्याशी हस्तांदोलन करताना रंजनाच्या डोळ्यांत अश्रू आले पण ते आनंदाचे अन् समाधानाचे होते.

वस्तुस्थिती

 * कमल कांबळे

अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये साक्षी दिसली अन् बघता क्षणीच संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन् दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी अन् सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण अन् विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन् साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली.

पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दु:ख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर पाच महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपाएवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन् सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता.

साक्षीला मुलगी झाली. तिच्याचसारखी सुंदर, साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल… पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोनसाखळी गं ती.’’ म्हणून तिचे पटापट मुके घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं.

हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळित चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी चार वर्षांची होती. दिवस गेले अन् मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली.

‘‘पूर्वावहिनी, मी सोनोग्राफी करवून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करवून घेईन.’’

‘‘भलतंच काय बोलतेस, साक्षी? अगं, मुलगी झाली तर बिघडलं कुठे? भलतासलता विचारही मनात आणू नकोस.’’ पूर्वाने तिला प्रेमाने दटावलं.

‘‘नाही वहिनी, तुम्हाला कल्पना नाहीए मुलीला काय काय सहन करावं लागतं, तुम्हाला बहीण नाही, शिवाय मुलगीही नाही. म्हणून असं म्हणताय,’’ उदास चेहऱ्याने साक्षी बोलली.

‘‘अगं, इतक्यातच अशी उदास होऊ नकोस. सकाळीच साक्षी आली. चेहरा पांढराफटक पडलेला. ‘‘पूर्वावहिनी, सोनोग्राफीचा निकाल आलाय. मुलगीच आहे दुसरी मला, अॅबॉर्शन करवून घ्यावं लागेल.

‘‘अगं पण का? संदीपभावोजी काही म्हणाले का?’’

‘‘नाही वहिनी, ते खूप चांगले आहेत. ते काहीच म्हणाले नाहीत, म्हणणारही नाहीत. पण मी खूप सोसलंय मुलगी म्हणून… माझ्या आईने, माझ्या धाकट्या बहिणीनेही. वडील गेले तेव्हा मी दहा वर्षांची, स्वाती सहा वर्षांची अन् धाकटी मीना सवा वर्षांची होती. वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की, तिला नर्व्हस ब्रेकडाउन झाला. मीनाकडे दुर्लक्ष ?ाझाल्याने तिला डायरिया झाला. उपचारांसाठी पैसे नव्हते. ती शेवटी मेली. तरुण, सुंदर विधवा, पदरात दोन देखण्या पोरी, हातात पैसा नाही, नातलग नाहीत कसे जगलो आमचं आम्हाला ठाऊक. मी त्या नरकातून बाहेर पडले, पण आई व स्वाती तिथेच आहेत. संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही.’’

‘‘हेच शेवटचे शब्द ऐकले पूर्वाने, तिच्या लाडक्या साक्षीचे. पूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली. अन् आल्या आल्या तिला साक्षीच्या मृत्युचीच बातमी समजली. अरुण व पूर्वा ताबडतोब तिकडे धावले. साक्षीचा मृतदेह चटईवर होता. साक्षीची सासू धाय मोकलून रडत होती. साक्षीची आई भकास चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती. एका कोपऱ्यात सोनाला जवळ घेऊन स्वाती अश्रू गाळत होती. पूर्वाच्या मनात आलं, आता रडतेय ही सासू, पण हिच्याचमुळे साक्षीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हिचीच सतत कुणकुण होती, ‘मुलगा हवा, मुलगा हवा.’ आता नक्राश्रू ढाळून काय फायदा? तेव्हाच तिला अडवलं असतं, तर मुलीसकट साक्षी आज जिवंत असती.

साक्षीचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला. कितीतरी दिवस पूर्वा व अरुण रोज संदीपकडे जात होती. स्वाती व स्वातीची आई तिथेच राहात होत्या. तेरावं चौदावं झालं अन् पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं.

सोना स्वातीबरोबर रूळली होती. एवढ्याशा जिवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं. पण आई नाही तर मावशीचा आधार होता. बहिणीच्या मृत्युचं दु:ख गिळून स्वाती तिच्या मुलीला जिवापाड सांभाळत होती. स्वातीच्या आठवणी काढत दु:ख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. संदीप या दु:खातून सावरणार नाही असं अरुण व पूर्वाला वाटत होतं. पण काळासारखं औषध नसतं हेच खरं… सगळ्यात मोठी काळजी होती सोनाची, तिला सांभाळणार कोण? आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन् राहाण्याची जागा या कोवळ्या जिवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच.

स्वातीची व तिच्या आईची तुटपुंज्या पगाराची नोकरी, त्या दोघींची गुजराण कशीबशी होईल इतकाच पैसा येत होता. पूर्वा व अरुणही काळजीतच होते.

तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला. खरं तर रविवार होता. पूर्वा व अरुणला रजा होती. थोडं उशिरापर्यंत झोपावं असा पूर्वाचा बेत होता. पण शेजारच्या कमलवहिनींचा फोन आला. ‘‘अग पूर्वा, तुझे संदीपभावोजी भलतेच स्मार्ट निघाले की! अगं, त्यांनी चक्क दुसरं लग्नं केलं.’’

‘‘काही तरीच काय बोलताय, वहिनी?’’

‘‘खरं तेच सांगतेय, काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतंस. तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात हिरवा चुडा होता. मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही, पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी.’’

‘‘तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.’’

‘‘नाही गं! संदीपला मी ओळखते ना? चूक होणार नाही माझ्याकडून…’’

पूर्वाने फोन ठेवला. संदीप कालपरवापर्यंत साक्षीच्या आठवणीने हळवा व्हायचा. आज लग्नही केलं? साक्षीला विसरले ते  सहा महिनेच तर झालेत साक्षीला जाऊन?’’

पूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय. रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती. थकवा अन् झोप अनावर झाली होती. आल्याआल्या अंथरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाढ झोपले. सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली. फोन संदीपचा होता.

‘‘पूर्वावहिनी, मी संदीप…’’

‘‘अरे? इतक्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना, संदीपभावोजी?’’ तिने आश्चर्याने विचारलं होतं.

‘‘काहीच ठीक नाही, वहिनी, साक्षी गेली…’’ तो गहिवरून बोलत होता.

‘‘गेली? कुठे गेली? तुमचं भांडण झालं होतं का? तुम्ही तिला अडवली का नाहीत?’’ पूर्वा बोलत सुटली.

‘‘वहिनी… ती गेली… नेहमीसाठी… सोडून गेली.’’

‘‘काय बोलताय, भावोजी? कुठे आहे साक्षी?’’ पूर्वा किंचाळली…

‘‘पूर्वा, आम्ही इस्पितळात आहोत. साक्षी मरण पावली… अॅबॉर्शन करवून घेताना ती व तिचं बाळ दोघंही गेली…’’ संदीपच्या बहिणीने फोनवर सांगितलं.

‘‘बॉडी मिळायला थोडा वेळ आहे. दोन तासांत घरी पोहचतोय आम्ही, त्यानंतर लगेचच नेऊ… पूर्वा, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? तुझ्या मैत्रिणीला अखेरचं बघून घे.’’ सुनंदाताईने फोन बंद केला.

कमलवहिनींच्या फोनमुळे जागी झालेली पूर्वा चहा करायला स्वयंपाकघरात आली. चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली तर अरुणही जागा झाला होता.

‘‘ज्यांच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं, त्यांना लोक किती पटकन विसरतात?’’ पूर्वाने चहाचा कप अरुणच्या हातात देत म्हटलं.

प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघितलं अरुणने, मग चहाचा घोट घेत विचारलं, ‘‘कुणाबद्दल, कशाबद्दल बोलते आहेस?’’

‘‘कमलवहिनींचा फोन होता. तुमच्या संदीपने दुसरं लग्नं केलंय.’’

हे ऐकून अरुण दचकला नाही, चकित झाला नाही. फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला.

चकित झाली पूर्वा… ‘‘अरुण, तुम्ही काहीच बोलत नाहीए? तुम्हाला नवल वाटलं नाही? राग आला नाही? बरोबरच आहे म्हणा, तुम्ही पुरुष, म्हणून मित्राचीच बाजू घ्याल. पण जर हेच संदीपच्या बाबतीत घडलं असतं, तर साक्षीने असं एवढ्यात दुसरं लग्नं केलं असतं?’’

‘‘नाही, नसतं केलं… नक्कीच केलं नसतं. मला ठाऊक आहे. स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शतांशही आम्हा पुरुषात नसतो. म्हणूनच मी स्त्रीला मान देतो. तिचा आदर करतो. कमलवहिनी अन् त्यांच्यासारख्या इतर बायकांनी तुला उलटसुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो. काल मी संदीपबरोबर होतो. ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो नव्हतो, तर संदीपच्या कामात गुंतलो होतो.’’

‘‘तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत? ती मुलगी कोण आहे?’’ दुखावलेल्या स्वरात पूर्वाने विचारलं.

‘‘स्वाती… साक्षीची बहीण.’’

‘‘स्वाती? साक्षीची बहीण?’’ आश्चर्यच वाटलं पूर्वाला.

‘‘संदीपभावोजी असं कसं करू शकले? अन् ती साक्षीची आई? किती दुटप्पी वागणारी, माणसं आहेत ही? त्यावेळी तर स्वातीला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती. मला म्हणाली, ‘‘आम्ही खूप गरीब आहोत, पण चारित्र्य अन् नीतीला फार महत्त्व देतो आम्ही. या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतलाय, आता दुसरीला मी खूप जपणार आहे. अन् ती स्वाती? भावोजी, भावोजी म्हणायची संदीपला, आता त्याच्याशीच लग्न केलंय? अन् संदीप साक्षीवर एवढं प्रेम करणारा… साक्षी मेली अन् लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला? दुसरी कोणी नव्हती का या जगात? लग्न करायला ती स्वातीच भेटली त्याला?’’ पूर्वाला संताप अनावर झाला होता. खरं तर ती शांत स्वभावाची अन् समंजस होती, पण आज मात्र एकदम खवळली होती. तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं; पण संदीपने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला अन् तो शांतपणे म्हणाला, ‘‘पूर्वा, शांत हो…ऐकून घे मी काय म्हणतोय ते… अगं, हे सगळं स्वाती काय किंवा संदीप काय, कुणासाठीच सोपं नव्हतं. राहिला प्रश्न साक्षीच्या आईचा. तर हा निर्णय तिचा नव्हता… स्वातीचा होता. स्वातीचं म्हणणं होतं की, आता फक्त सोनाच साक्षीची एकमेव खूण उरली आहे. तिच्याखेरीज रक्ताचं नातंच नाहीए. मी सोनाशिवाय अन् सोना माझ्याशिवाय राहू शकणार नाही. सोनाला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सोनाला भेटूही देणार नाही… शिवाय ती सोनाशी कशी वागेल याचीही खात्री नाही. लग्न मला आज ना उद्या करायचंच आहे तर मग संदीपशीच केलं तर काय हरकत आहे? सगळेच प्रश्न मिटतील.’’

साक्षीच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं अन् म्हटलं. ‘‘अरुण, मी जे बोलले होते, त्याच्या विपरीत आज घडतंय… मीच खूप ओशाळले आहे. पण काय करू? संदीपशी स्वातीचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता; अन् आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय. माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाहीए. असता तर कधीच तिला उजवली असती.’’

‘‘पूर्वा, तू तिथे नव्हतीस, त्या खूप काही बोलून गेल्या, तोंडातून अक्षरही न बोलता… त्यांची गरिबी तू बघितली नाहीएस, पण मी बघितली आहे. सोनाला घेऊन तिथे राहाणं अशक्य आहे.

‘‘राहिला प्रश्न संदीपचा. तो म्हणाला, अरुण, आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही. एकुलता एक मुलगा आहे मी. शिवाय सोनाला बघायला कुणी तरी हवंच ना? मग स्वातीच काय वाईट आहे? शिवाय तिचं माझं दु:ख एक आहे. ती जेवढं माझं दु:ख समजून घेईल तेवढं दुसरी कुणी समजून घेणार नाही. सोनाला दुसरी कुणी एवढी माया देऊ शकणार नाही. सगळंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का?’’

पूर्वा गप्प बसून होती. अरुणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं, ‘‘पूर्वा, अशी गप्प राहू नकोस, काही तरी बोल गं!’’

पूर्वाने मान वर करून अरुणकडे बघितलं. एक स्निग्ध हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं. ती म्हणाली, ‘‘मी पुन्हा एकदा चहा करते. मग अंघोळी वगैरे करून आपण संदीपला भेटून येऊ. स्वातीला काहीतरी लग्नभेट द्यायला हवीय. तिलाही बरं वाटेल. आता मला स्वातीतच साक्षी शोधायला हवी. खरं ना?’’

पूर्वाचा निवळलेला चेहरा बघून अरुणही समाधानाने हसला. वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें