जुळून आलेलं समीकरण

कथा * सुमन बाजपेयी

‘‘पुरे गं तुझं…सत्यवचन अन् प्रामाणिकपणा हे अगदी पोकळ शब्द आहेत. प्रिंसिपल्स म्हणे…काय देतात ती प्रिन्सिपल्स ज्यांना आयुष्यात धाडस जमत नाही ना, तेच असे बुळबुळीत शब्द वापरून जगत राहतात. तत्त्व, खरेपणा, परिश्रम, घाम गाळणं हे सगळं करून तू तरी काय मोठं मिळवलंय आयुष्यात?’’ सुकांत जोरजोरात ओरडत होता. नीलाला त्या क्षणी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत असं वाटत होतं. तिच्या आयुष्याची, तिच्या व्यक्तिमत्त्वाची, तिच्या जीवन मूल्यांची लक्तरं करून वेशीवर टांगण्यात सुकांतला असूरी आनंद मिळत होता. तिचं वागणं कसं चूक आहे हे सिद्ध करण्याचं काम त्याला फार आवडत होतं.

‘‘तू ज्या कमिटमेंटबद्दल बोलतेस ती कमिटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? आजच्या काळात असे शब्द म्हणजे पोकळ बुडबुडे ठरतात. कोण चिकटून बसतंय आपल्या शब्दांना? अगं सख्खे, अगदी आपलेही वेळ येते, तेव्हा शब्द फिरवतात अन् तू आपली कमिटमेंटला धरून बसतेस.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की फक्त खोटेपणानं वागणारी, भ्रष्टाचारी, लबाड माणसंच आयुष्यात यशस्वी होतात?’’ सुकांतच्या एवढ्या भडिमारानंतरही नीला माघार घ्यायला तयार नव्हती. बालपणापासून झालेले संस्कार सहजी का आयुष्यातून नाहीसे होतात? अन् त्याला काय हक्क होता तिच्या विचारसरणीला धुडकावून लावण्याचा? या माणसाशी गेली २५ वर्षं ती संसार करतेय. सगळं काही तिनं त्याला समर्पित केलंय अन् तो तिच्या प्रामाणिकपणाला, निष्ठेला, सत्यवचनी असण्यालाच दूषणं देतोय? तिनं आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं ठामपणे म्हणतोय? अर्थात् सुकांतच्या कनव्हिंसिंग कॅपॅसिटीबद्दल अन् गोष्टी मॅन्युपुलेट करण्याच्या क्षमतेबद्दल कुणाचंच दुमत होणार नाही…तर मग त्या क्षणी नीलालाही आपण हरलो, फेल्युअर ठरलो असं वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं.

‘‘तू हा पोकळ आदर्शवाद न जपता सरळ थोडी आडमार्गानं गेली असतीस, वरिष्ठांचं लांगुलचालन केलं असतं तर आज करिअरमध्ये कुठल्या कुठं पोहोचली असतीस. तूच विचार कर, आज तू कुठं आहेस अन् तुझे ज्यूनिअर कुठच्या कुठं पोहोचलेत ते. तुझ्या योग्यतेचं काय लोणचं घालायचं का? तुझी योग्यता कुणाला समजलीय?’’ सुकांतचा चेहरा अगदी बिभत्स दिसू लागला होता. आज जणू नीलाचा अपमान करण्याचंच त्यानं ठरवलं होतं. स्वत:चा हलकटपणा जेव्हा लपवायचा असतो, तेव्हा दुसऱ्याच्या योग्यतेचे, सन्मानाचे वाभाडे काढणं हा अगदी सोपा मार्ग असतो.

‘‘तर मग मी तुझ्याशी एकनिष्ठ राहिले, समर्पित राहिले, नातं प्रामाणिकपणे निभावलं तेही माझं चुकलंच म्हणायचं? मला अशी निष्ठा ठेवायला नको होती…’’ तिनं थोडं तिखटपणे म्हटलं.

‘‘मी नात्याबद्दल बोलत नाहीए. उगीच कुठली तरी गोष्ट कुठं तरी नेऊन ठेवू नकोस. मी तुझ्या करिअरबद्दल बोलतोय,’’ सुकांतनं म्हटलं.

‘‘का बरं? हा नियम तर प्रत्येक बाबतीत लागू व्हायला हवा. तू आपल्या मर्जीनं हवं तेव्हा, हवं तसे नियम बदलू शकत नाहीस अन् माझ्या करिअरबद्दल बोलायचं तर मी आपल्या कामात संतुष्ट आहे. माझ्या वागणुकीमुळे मला ऑफिसात आणि बाहेर इतर ठिकाणीही मान मिळतो. तू कधीच मला मानानं वागवलं नाहीस. कारण तुझ्यात ती समजूतच नाहीए. कुणाला चांगलं म्हणतोस तू? कुणाशी तरी पटतं का तुझं?’’ नीलाच्या मनातला इतकी वर्षं दाबून ठेवलेला संताप आता उफाळून आला होता. खरं तर तिला स्वत:लाच आज आश्चर्य वाटत होतं की इतकं स्पष्ट बोलण्याचं धाडस तिच्यात आलं कुठून?

‘‘उगाच मूर्खासारखं बोलू नकोस, माझा ताबा सुटला तर…’’ सुकांत आता गडबडला होता. इतक्या वर्षांत नीलानं असं काही त्याला ऐकवलं नव्हतं.

‘‘तुझा ताबा नेहमीच सुटतो…काय करशील? शिव्या देशील? मारशील? घराबाहेर काढशील? याशिवाय काय करू शकतोस तू? मला वाटतं आपण हा विषय इथंच संपवूयात.’’ नीला शांतपणे म्हणाली. तिला विषय वाढवायचा नव्हता. वाढवूनही निष्पन्न काहीच होणार नव्हतं. गेल्या पंचवीस वर्षांत सुकांत बदलला नव्हता, तो आता काय बदलणार होता? जो स्वत:च्या बायकोला मान अन् आदर देऊ शकत नव्हता त्याच्याशी वाद तरी कशाला घालायचा? नीलाला वाईटफक्त एकाच गोष्टीचं वाटायचं की तिच्या एकुलत्या एका मुलाला, नीरवला, ती वडिलांच्या इन्फुलएन्सपासून वाचवू शकली नव्हती. नीरव केवळ वडिलांचंच ऐकत होता. त्यांचंच म्हणणं त्याला योग्य वाटत होतं. लहानपणी तिनं जे संस्कार त्याला दिले होते, ते त्यानं कधीच गाठोडं बांधून गच्चीवर भिरकावले होते. त्यानंतर त्यांने कधी तिकडे ढुंकुनही बघितलं नव्हतं. ती त्याला खूप समजवायची. ‘‘नीरव, अरे, स्वत:च्या डोळ्यांनी जगाकडे बघ, बाबांचा चष्मा लावून बघू नकोस. पण तोही तिचा अपमान करायचा. तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. ती अपमानाचा घोट गिळून गप्प बसायची. शाळाकॉलेज संपून नोकरीला लागला तरीही बाबाच त्याचं दैवत होते. त्यांच्याच मार्गावरून तो चालत होता.

मुलगा चुकीच्या मार्गानं जातो आहे, हे कळत असूनही तिला काहीही करता येत नव्हतं. हे दु:ख तिला दिवसरात्र छळत होतं. नीरवच्या काळजीमुळेच ती सुकांतशी भांडली होती. पण सुकांतनं आपली चूक कबूल करून नीरवला चांगल्या मार्गाला लावण्याऐवजी नीलालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. ही गोष्ट खरी होती की लांगूलचालन, लांडीलबाडी, खोट्यानाट्या चहाड्या यापासून ती कायम दूर राहिली होती. त्यामुळे ऑफिसात अन् समाजात तिच्याविषयी आदरयुक्त दबदबा होता. पण बॉसच्या मागण्या पूर्ण करून भराभर प्रमोशन्स घेणाऱ्या तिच्या ज्यूनियर्ससारखं ती वागू शकली नव्हती. स्वत:ची जीवनमूल्य, स्वत:चे संस्कार याविषयी ती अतिशय दक्ष होती अन् त्याबद्दल तिला समाधान अन् अभिमानही होता.’’

कित्येकदा सुकांतची वागणूक बघून तिला भीती वाटायची. कधीतरी आपलं खरंच चुकतंय का अशी शंकाही यायची. पण निर्मळ मन, निर्मळ चारित्र्य यामुळे ती कधीच वेडंवाकडं वागू शकली नव्हती.

सुकांत तिला ऐकवायचा, ‘‘बघ तू, मला अन् नीरवला टोमणे देतेस ना? एक दिवस तो कुठल्या कुठं पोहोचेल…किती भराभर प्रोग्रेस करतो आहे. आजच्या काळाला योग्य असंच वागतोय तो. तुम्ही लोकांना धक्का दिला नाही तर ते तुम्हाला धक्का देऊन पुढे निघून जातील. गरज पडली तर दुसऱ्याची संधीही हिसकावून घेण्याची धमक हवी माणसात.’’

नीलाच्या मनात आलं, ‘‘तू, त्या निरागस मुलाला माझ्याविरूद्ध प्यादं म्हणून का वापरतो आहेस? भांडण माझ्यातुझ्यात, आपल्या विचारात आहे. त्याला कशाला मध्ये आणतोस?’’ पण ती बोलू शकली नाही. सुकांत तिच्याकडे बघून उपहासानं हसत होता.

त्या रात्री बराच उशीर झाला तरी नीरव घरी आला नव्हता. नीलाला काळजी वाटत होती. ती व्हरांड्यात फेऱ्या मारत त्याची वाट बघत होती. मोबाइलही लागत नव्हता. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. तो सुखरूप असेल ना? त्याला काही झालं नाही ना? ऑफिसात कुणी फोन उचलत नव्हतं. साडे अकरा वाजून गेलेले. सुकांत दारू पिऊन जेवण करून ढराढूर झोपला होता.

अचानक तिचा मोबाइल वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. थरथरत्या हातानं तिनं फोन घेतला.

‘‘नीरवच्या घरून बोलताय?’’

नीलानं घाबरून विचारलं, ‘‘काय झालंय त्याला? तो बरा आहे ना? कुठं आहे? तुम्ही कोण बोलताय?’’

‘‘तुही शांत व्हा…नीरव बरा आहे. फक्त तो पोलीसांच्या ताब्यात आहे…कैदेत आहे…अरेस्ट केलं त्याला. कंपनीत घोटाळा केल्याची तक्रार कंपनीच्या मालकांनी केलीय. म्हणून त्याला अटक झाली आहे.’’

तेवढ्यात फोन समरनं घेतला. समर नीरवचा पक्का मित्र होता. ‘‘काकू, मी नीरवसोबत आहे…तुम्ही फक्त काकांना पाठवा. त्याला जामिन मिळाली की सुटका होईल.’’

तिनं गाढ झोपलेल्या सुकांतला उठवलं. सगळी रात्र त्यांची तुरुंगात गेली. गजाआड उभ्या असलेल्या आपल्या मुलाला बघून नीलाचे डोळे भरून आले. आई म्हणून ती किती कमी पडली होती…सुकांत मात्र अगदी गप्प होतात. त्यानं तिला किंवा नीरवला काहीही म्हटलं नाही. तो मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. नीलानं तिच्या काही हितचिंतक परिचितांना फोन केले. शेवटी एकदाची जामिनावर सुटका द्ब्राली. नीरवच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप दिसत होता. लाजेनं तो अर्धमेला झाला होता. मनातल्या मनात तो स्वत:ला दूषणं देत होता. आईची क्षमा मागत होता. आईचीच शिकवण योग्य होती हे त्याला कळलं होतं.

घरी पोचेतो सायंकाळ झाली होती. आपल्याच विचारात गुंग होती तिघंही. संपूर्ण रात्र अन् सगळा दिवस धावपळीत गेला होता. प्रचंड दमणूक झाली होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्याक्षणी ती शांतताच फार गरजेची होती.

‘‘आई मला क्षमा कर,’’ म्हणंत नीरवनं तिला मिठी मारली. तो हमसून हमसून रडत होता. नीला त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.

‘‘तू का क्षमा मागतो आहेस? सगळी चूक खरं तर माझीच आहे. मीच तुझ्यावर असे वाईट संस्कार केले. खोटेपणा, प्रमोशनसाठी नको त्या गोष्टी करणं मी तुला शिकवलं होतं. आज जे काही घडलं त्याला मीच जबाबदार आहे. नीला, मला क्षमा कर. मी तुझा अपराधी आहे. सतत मी तुझा उपहास केला, अपमान केला, सगळीच समीकरणं चुकत होती माझी. पण मला आज कळलं, जीवनमूल्य खरीच महत्त्वाची असतात. तिच माणसाला उत्तम आयुष्य जगायला मदत करतात. ती पोकळ नसतात, उलट आपल्याला ठाम राहायला मदत करतात. प्रामाणिकपणा, खरेपणा, श्रमप्रतिष्ठा या पुस्तकी गोष्टी नाहीत…तोच जीवनाचा आधार आहे…’’ सुकांत बोलत होता. नीलाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या.

तिनं नीरवचे अश्रू पुसले. त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आज तिच्यातली आई विजेती ठरली होती. तिच्यापासून दुरावलेला तिचा मुलगा तिला परत भेटला होता. आता तिच्या आयुष्याची सगळी समीकरणं बरोबर जुळून आली होती.

पतीपत्नीतील प्रेमळ संवाद

 * नरेश साने

मथळा वाचून वाचकांनी दचकू नये हे संभाषण शृंगार रसातील नसून थोडं वेगळं आहे. भारतीय पतीपत्नीत दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमँटिक संभाषणाची बातमी यातून मिळेल. जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही. हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असतं अन् जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फुकटची ट्यूशन किंवा धडा आहे. पटलं तर शिका, मानसिकदृष्ट्या स्वत:ची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा. जे करायचं ते करा, तुमची मर्जी! आम्हाला काहीच टेन्शन नाहीए.

किस्सा ट्रेनमधला आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागता लागता आम्ही चपळाईनं जनरल बोगीत जागा पटकावली. पण या चपळाईला काही अर्थच नव्हता कारण डब्यात अजिबात गर्दीच नव्हती. माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयौवना बसली होती. तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली आहे. माझ्या शेजारीही एक कॉलेज युवती येऊन बसली आहे. ट्रेन हळूहळू सरकायला लागली आहे.

तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवनेकडे वेधलं जातं. कानाला मोबाइल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली. तिचं बोलणं मजेशीर आहे. इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येतंय. सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे आहे. ती मात्र बिनधास्त आहे. तुम्हीही ऐका ते संभाषण :

‘‘तुम्ही कुठं आहात? मी ही मागच्या जनरल बोगीतच आहे.’’

‘‘अहो सांगतेय ना, मागच्या डब्यात.’’

‘‘कोणत्या जगात वावरता हो?’’ युवती हसत हसत म्हणते, ‘‘मी गेटवरच उभी आहे. नीट बघाल तर दिसेन ना?’’ आम्ही सगळेच दचकलो. कारण ती जागेवर बसूनच बोलतेय. डब्याच्या दारात ती उभी नाहीए.

आता ट्रेननं वेग धरला. बोलणं सूरुच आहे. ‘‘आधी मला सांगा, तुम्ही आहात कुठं? स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही? कुणाच्यातरी सोबत असाल…ती कोण तुमची क्लोज फ्रेण्ड नक्कीच ती सोबत असणार… म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाहीए तुम्ही…’’

‘‘अस्स?…म्हणजे रेल्वेनं तुमच्यासाठी स्पेशल डबा लावला अन् त्यात तुम्ही चढलात.’’

‘‘अहो किती वेळ सांगतेए… मी डब्याच्या दारातच उभी आहे. बाई गं…पाय निसटला माझा…थोडक्यात वाचले हो…’’

‘‘तर-तर? तुम्हाला कशाला काळजी वाटेल माझी?…तुम्हाला तर वाटेल, बरं झालं, ब्याद गेली…तुम्हाला तेच हवंय ना? पुरे हो…मला काही सांगू नका…मला सगळं माहित आहे…’’

‘‘आता हे शब्द तर तुम्ही उच्चारूच नका…तिलाच सांगा… जिच्याबरोबर तुम्ही दिवसरात्र चॅटिंग करत असता…खरंच…किती किती दुष्ट आहात हो तुम्ही…मला जर कल्पना असती की तुम्ही मला ट्रेनमध्ये एकटी सोडणार आहात तर मी ट्रेनमध्ये बसलेच नसते…खरं सांगते…’’

‘‘हो, माहिती आहे, किती काळजी घेता माझी…लोक आपल्या बायकोवर किती प्रेम करतात, किती जपतात अन् तुम्ही, तुम्हाला तर मी मेलेय का जिवंत आहे यानं काहीच फरक पडणार नाहीए…’’

एकीकडे युवती आपल्या बॅगेतून खाण्याचे पदार्थ काढतेए. सॅण्डविच, ब्रेड रोल खाता खाता पुन्हा संभाषण सुरूच आहे. डब्यातल्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच आहे. माझ्या शेजारी बसलेली कॉलेजकन्यका हसली. मी शांतपणे सर्व घटनाक्रम समजून घेतोय.

एवढ्यात एक स्टेशन निघून गेलं. पतीपत्नी अजूनही भेटलेले नाहीत. संभाषण मात्र आता अधिक तीव्र होतंय.

‘‘मला वेडी समजता का हो तुम्ही? मी मागचे पुढचे सगळे डबे फिरून बघितलेत…कुठं लपून बसला आहात?’’

‘‘मला उगीचच चिडायला लावू नका. मागच्या डब्यात असता तुम्ही, तर मला दिसला असता ना?…सगळं समजतं मला…तुम्ही मुद्दाम माझ्यापासून दूर राहताय.’’

‘‘छे हो, चूक माझीच आहे. मी अशी वेड्यासारखी प्रेम करते तुमच्यावर…अन् तुम्ही मला मूर्ख बनवता…’’

‘‘एन्जॉय करा…मला काहीही टेंशन नाहीए. माझं काय…राहीन अशीच…तुम्ही तुमच्या नवीन मैत्रीणीसोबत आयुष्य घालवा…’’

‘‘नाही…खरं सांगतेय…आता तर सरळ घटस्फोट घेणार मी…’’

‘‘आता काय सगळं ट्रेनमध्येच सांगू का मी? मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या तोंडात जीभ नाही किंवा मी मुकी आहे असा नाही…’’

‘‘फॉर गॉड्स सेक…इट इज टू मच यार…आता भेटा तर खरं, मग दाखवते तुम्हाला…’’

तरुणीच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य अन् फिरकी घेण्याचं समाधान आहे. अन् बोलण्यातून मात्र राग झळकतो आहे. आम्ही त्यामुळे कन्फ्यूस्ड आहोत…(बावळटासारखे घटनेचा अन्वयार्थ लावण्यात गुंतलो आहोत).

अचानक त्या नवयौवनेच्या दुसऱ्या मोबाइलची रिंग वाजते. ती तो मोबाइल उचलून बोलू लागते. या मोबाइलवरचं संभाषण तसंच राहातं.

युवती आता हसत हसत तिच्या आईशी वार्तालाप करते आहे. ती मघापासूनचा सगळा किस्सा आईला अगदी रंगवून सांगते आहे. वर म्हणते, ‘‘अगं आई, मी त्याला असा ताणला नाही तर तो अगदी अलगद माझ्या हातातून निसटून जाईल. खरोखर फारच केअरलेस आहे तो. असं ठेवते म्हणून लायनीवर असतो, नाहीतर…’’

या बोलण्यात व्यत्यय येतो तो पहिला फोन पुन्हा वाजायला लागतो म्हणून. युवती आईला, ‘‘नंतर बोलते’’ म्हणून फोन बंद करते अन् पहिला फोन उचलते.

‘‘अरेच्चा? मी कुठं जाणार? सगळा डबा शोधतेय मी…तुम्हाला शोधण्यासाठी…मी बरी हरवेन?…’’

‘‘खरंय…खरंय…तुमच्यासारखी मी नाहीए…यू आर मोस्ट केअरलेस पर्सन…’’

‘‘बरं…बरं…काही हरकत नाही…घरी पोहोचा. बघतेच मी तुम्हाला?’’

एव्हाना पुन्हा स्टेशन आलं होतं. हे माझं उतरण्याचं ठिकाण होतं. आता त्या संभाषणातून नाइलाजानं मला बाहेर पडावं लागत होतं. पुढे नेमकं काय घडलं कळणार नव्हतं. पण या चाळीस मिनिटांच्या प्रवासात क्षणभरही बोअर झालं नव्हतं. मनोमन मी याचं समाधान मानलं की माझी सौ. यावेळी माझ्यासोबत नव्हती. नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या अशा टिप्स फुकटात मिळाल्या तर कोणती बायको असली सुवर्ण संधी सोडेल? तिनं हे ऐकलं असतं तर माझी काही खैर नव्हती.

एक गोष्ट मात्र कळली, पतीपत्नीतील भांडणं समोरच्याला विचित्र वाटली तरी त्याच्या मुळाशी त्यांचं प्रेम असतं अन् खरंय ना? ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो ना? पतीपत्नी प्रियकर प्रेयसीही असतात आणि मित्रही. त्यामुळेच त्यांना एकमेकांवर अधिकार गाजवावा असं वाटतं. भारतीय संसाराचं हेच वैशिष्ट्य आहे की रोजरोज भांडत नवरा बायको एकत्र राहातात, पाश्चिमात्त्य लोकांना यांचं कोतुक वाटतं अन् नवलही!

शिकवला चांगलाच धडा

कथा * विनिता राहुरीकर

स्वयंपाक घरातून येणारे जोरजोरात हसण्या-बोलण्याचे आवाज ऐकून ड्रॉइंगरूममध्ये आवराआवर करणाऱ्या अंजलीच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या उमटल्या. तिची थोरली जाऊ लता तिच्याकडे आली की नेहमीच असं घडतं. सकाळचा चहा, न्याहारीचे पदार्थ, त्यानंतर भाज्या, कोशिंबीर, आमटी, ताक सगळं अंजली करते अन् पोळ्या करायची वेळ आली की नेमकी लता स्वयंपाकघरात येते, ‘‘अंजली, चल, थोडा वेळ बाहेर बैस. विश्रांती घे. मी पोळ्या करते.’’

अंजलीनं नाही म्हटलं तरीसुद्धा ती बळजबरीनं तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढते. लताच्या मदतीसाठी विनीत, अंजलीचा नवरा लगेच स्वयंपाक घरात येतो. आता अंजलीनं तिथं नुसतं उभं राहून काय करायचं? लता अन् विनीतमध्ये चालणारी बाष्कळ बडबड अन् चिल्लर विनोद तिला संताप आणतात. लताचा तिला तिटकारा वाटतो. विनीत तिचा दिर असला तरी आता तो अंजलीचा नवरा आहे. दुसऱ्या स्त्रीच्या नवऱ्यासोबत इतक्या मोकळेपणाने वागणं शोभतं का?

पण विनीतशी या विषयावर बोललं तर तो उलटा अंजलीवरच रागावतो. तिचे विचार किती कोते आहेत. ती किती क्षुद्र अन् संकुचित विचार करते. विनाकारणच नवऱ्यावर किंवा जावेवर संशय घेते, वगैरे वाट्टेल ते तिला ऐकवतो. अंजलीच्या लग्नाला तीन वर्षं होताहेत, एवढ्या काळात लतावरून त्यांची अनेकवेळा भांडणं झाली आहेत.

लताचा नवरा म्हणजे विनीतचा मोठा भाऊ बंगळुरूला राहतो. त्याची नोकरी तिथं आहे. मुलांच्या शिक्षणात अडचण नको म्हणून लता बंगळुरूला गेली नाही. ती मुलांना घेऊन शेजारच्याच शहरात स्वत:च्या आईवडिलांकडे राहतेय. आईच्या घरात असल्यामुळे तिला मुलांची काळजी नाहीए. मनात येईल तेव्हा ती सरळ विनीतच्या घरी येऊन थडकते. ती आली की अंजलीचे ते दिवस फार वाईट जातात. कारण विनीत सगळा वेळ वहिनीच्या सोबत असतो. ती गेली की अंजली कशीबशी स्वत:ला थोडी सावरते. तिचे अन् विनीतचे ताणलेले संबंध जरा सुरळीत होतात तोवर लता पुन्हा येऊन पोहोचते.

एकदा तर कहरच झाला. अंजली आपल्या खोलीत होती. लता दुसऱ्या खोलातल्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली होती. अंजली खोलीतून बाहेर आली तेवढ्यात तिला विनीत लताच्या खोलीतून बाहेर येताना दिसला.

‘‘काय झालं विनीत? वहिनींची अंघोळ झाली का?’’

‘‘नाही, अजून नाही झाली?’’

‘‘मग? तू त्या खोलीत काय करत होतास?’’

‘‘ट…टॉवेल विसरली होती वहिनी, तो द्यायला गेलो होतो.’’

‘‘पण त्यांनी मला हाक मारायची. टॉवेल द्यायला तू का गेलास?’’ अंजलीने चिडूनच विचारलं.

‘‘झालं का तुझं सुरू? मी टॉवेल द्यायला गेलो होतो. वहिनीबरोबर अंघोळ करत नव्हतो. तू इतका घाणेरडा विचार कसा करू शकतेस? सतत संशय घेतेस…किती कोत्या मनाची आहेस गं? जरा स्वच्छ अन् मोकळ्या मनानं विचार करत जा,’’ विनीतनं संतापून म्हटलं अन् तो आपल्या खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी लता वहिनी परत जाणार होती. विनीत ऑफिसला जाताना तिला बसमध्ये बसवून देणार होता. अंजलीला ‘हुश्श’ झालं. गेले चार दिवस लतामुळे तो ऑफिसलाच गेला नव्हता.

लता अन् विनीत गेले तसा एक मोठा नि:श्वास सोडून अंजलीनं स्वत:साठी छानसा कपभर चहा करून घेतला अन् ती सोफ्यावर येऊन बसली. लता आली की अंजलीचं डोकं दुखायला लागतं. विनीत अन् लताची जवळीक खटकणारी असते. जेवताना, टीव्ही बघताना, सिनेमाला गेलं, तरी ती दोघं सतत जवळजवळ असतात. लतानं आपले पाश असे आवळले आहेत की विनीत पूर्णपणे तिच्या आहारी गेला आहे. लता घरात असताना अंजलीला न घर स्वत:चं वाटतं, ना नवरा आपला वाटतो. स्वत:च्या घरात, स्वत:च्या संसारात तिला फार परक्यासारखं, उपऱ्यासारखं अन् उपेक्षित वाटत राहतं.

विचार करता करता तिचा बसल्याजागी डोळा लागला. मोबाइलच्या घंटीने ती दचकून जागी झाली.

‘‘हॅलो,’’

‘‘हॅलो, नमस्कार, वहिनी. मी आनंद बोलतोय. आज विनीत ऑफिसला का आला नाही? एक महत्त्वाची मीटिंग होती. फोनवर रिंग जातेय पण उचलला जात नाहीए. काही गडबड नाहीए ना?’’ आनंदनं काळजीने विचारलं. दोघंही एकाच ऑफिसात, एकाच विभागात होते अन् त्यांची चांगली मैत्रीही होती.

‘‘विनीत ऑफिसला पोहोचलेच नाहीत?’’ अंजलीनं दचकून विचारलं, ‘‘पण ते तर सकाळी नऊलाच बाहेर पडले होते.’’

‘‘नाही वहिनी, तो इथं आलेला नाही अन् फोनही उचलत नाहीए,’’ एवढं बोलून आनंदनं फोन बंद केला.

अंजली काळजीत पडली. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते. तिनं विनीतला फोन केला. फोन उचलला गेला नाही. अंजली घाबरली…काही अपघात वगैरे…तिला एकदम भीती वाटली.

तिनं लताला फोन केला. लतानंही फोन उचलला नाही. लताच्या वडिलांकडे लॅण्ड लाईनवर फोन केला. तिची आई म्हणाली, ‘‘अजून ती घरी आलेली नाही,’’ अगदी साडे दहा वाजता बसमध्ये बसली तरी दिडपर्यंत घरी पोहोचायला हवं. एव्हाना अडीच वाजून गेलेत. अंजली आत बाहेर करत लता, विनीत अन् लताच्या माहेरी फोन लावत होती.

शेवटी एकदाचा साडेचारला विनीतचा फोन आला. घाबरलेल्या अंजलीनं त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पण विनीतचं स्पष्टीकरण ऐकून अंजलीच्या रागाला पारावार उरला नाही. लताला बसमध्ये बसवून विनीत ऑफिसला जाणार होता. पण वाटेत एका मॉलमध्ये नवीन रिलीज झालेल्या पिक्चरचं पोस्टर बघून लतानं तो सिनेमा बघण्याचा हट्ट केला. शो बाराचा होता म्हणून ती दोघं तिथंच मॉलमध्येच भटकत होती. फ्क्चिर बघितला. तिथं त्याला फ्क्चिरच्या आवाजात मोबाइलची रिंग ऐकूच आली नाही. आता लताला बसमध्ये बसवल्यानंतर त्यानं मिस्ड कॉल्स बघितले.

त्याचं बोलणं पुरतं ऐकून न घेताच अंजलीनं फोन बंद केला. स्विच ऑफच करून ठेवला.

आज आनंदचा फोन आला म्हणून विनीत ऑफिसमध्ये गेला नाही हे तिला कळलं…पण असं अनेकदा घडलं असेल. तो सायंकाळी घरी आल्यावर ऑफिसमधून आल्यासारखंच दाखवतो. किती वेळा खोटं बोलला असेल अन् सिनेमाच बघितला की दहा ते चार आणखी कुठं…

एकदा माणसावरचा विश्वास उडाला की त्याच्या प्रत्येक वाक्यात खोटेपणाचा वास येतो.

विनीतलाही जाणवलं की त्याची चूक झाली आहे. आता अंजली खूपच दिवस रागात असणार. त्यामुळे तो तिच्याशी खूपच सौम्यपणे वागत होता. घरात मदत करत होता. भाजी, वाणसामान आणून टाकत होता पण अंजली मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. घरातली कामं ती मनापासून करत होती. अगदी जेवढ्यास तेवढंच विनीतशी बोलत होती अन् त्याच्या वागण्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नव्हती.

विनीत फार अस्वस्थ होता. अंजलीनं नेहमीप्रमाणे भांडण केलं असतं तर त्यानं नेहमीप्रमाणे तिला खोट्या विचारांची ठरवून तिलाच खोटं पाडून आपली चूक लपवली असती. पण अंजली भांडत नव्हती, बोलतच नव्हती. आपल्या अपराधाची जाणीव, आपलं खोटं पकडलं जाणं यामुळे तो खूपच बेचैन झाला होता.

दहा-बारा दिवसांनंतर समोरच्या फ्लॅटमध्ये मजूर सामान आणून ठेवताना दिसले. विनीत ऑफिसला जायला निघाला होता. त्याच्या मनात आलं, एखादी फॅमिली इथं राहायला आली तर अंजलीला त्यांची सोबत होईल.

सायंकाळी तो घरी पोहोचला तेव्हा अंजलीनं त्याची ओळख करून देत म्हटलं, ‘‘हा रोहित, समोरचा फ्लॅट यानं भाड्यांनं घेतलाय. आमचा चहा झालाय. तुझ्यासाठी चहा करते.’’

‘‘मलाही एक कप चहा चालेल,’’ रोहितनं म्हटलं. अंजलीनं हसून मान डोलावली व ती आत गेली.

चहा घेताना विनीतनं त्याचं निरीक्षण केलं. चांगला देखणा, उंच, शालीन अन् सज्जन वाटत होता.

चार पाच दिवसात त्याचं घर मांडून झालं. अंजलीनंही त्याला मदत केली. कामासाठी बाई हवीय म्हणून, प्यायचं पाणी हवंय म्हणून असं काही ना काही कारणानं दोन तीन वेळा तरी रोहितच्या फेऱ्या घरात होत होत्या.

एकदा विनीत सायंकाळी घरी पोहोचला, तेव्हा अंजली घराला कुलूप लावून कुठं तरी गेली होती. रोहितचं घरही बंद होतं. स्वत:जवळच्या किल्लीनं घर उघडावं असा विचार विनीत करत असतानाच अंजली आली. सोबत रोहितही होता. रोहितच्या स्वयंपाकघरासाठी स्वयंपाकीण बाईंनी सांगितलेलं काही सामान आणायला दोघं बाजारात गेली होती. घरात आल्यावर अंजलीनं चहा केला. अर्थातच रोहितही चहाला होताच.

मग तर नेहमीच रोहित अन् अंजली बाजारात जाऊ लागले. कधी चादरी, अभ्रे हवेत, कधी पडदे हवेत, कधी नॉनस्टिक तवा हवाय तर कधी पोळ्यांचा डबा. रात्रीचं जेवण तर रोहित विनीतच्याच घरी घ्यायचा. कधीकधी विनीत चिडचिडायचा पण अंजलीनं त्याची समजूत घातली की रोहितची आई सध्या इथं येऊ शकत नाहीए कारण घरी त्याची आजी आजारी आहे अन् त्याच्या दोन्ही बहिणींच्या परीक्षा आहेत, म्हणून त्याही येऊ शकत नाही. मग त्याला मदत लागते तर शेजारी म्हणून आपणच केली पाहिजे ना?

एवढ्यात लता पुन्हा येऊन थडकली. विनीत तिच्या मागेपुढे फिरत होता. पण यावेळी अंजलीनं लताकडे साफ दुर्लक्ष केलं. ती सगळा वेळ रोहितला देऊ लागली. रोहितला ओळीनं चार दिवस सुट्टी होती. त्यामुळे तर अंजली फारच खुशीत होती. स्वयंपाक आटोपून ती सोफ्यावर येऊन बसली. लता पोळ्या करण्यासाठी किचनमध्ये गेली पण विनीतचं लक्ष लताकडे नव्हतं.

सायंकाळी टीव्ही बघताना सोफ्यावर लता विनीतशेजारी बसल्याबरोबर अंजलीनं रोहितच्या शेजारच्या खुर्चीवर बैठक मारली. लता मधूनमधून कमेंट करत विनीतच्या हातावर टाळी देत होती, नाही तर त्याच्या मांडीवर थाप मारत होती. अंजलीनं दोनदा रोहितला टाळी दिली. विनीतचा संताप संताप झाला.

पंधरा मिनिटात उठून तो आपल्या खोलीत चालता झाला. तो गेला म्हणताना लताही उठून तिच्या खोलीत निघून गेली. रोहित अन् अंजली मात्र बराच वेळ टीव्ही बघत बसली होती. मोठ्यानं गप्पा मारत हसत होती. बऱ्याच उशिरा रोहितला निरोप देऊन जेव्हा अंजली झोपायला आपल्या खोलीत आली, तेव्हा तोंडावरून पांघरूण घेऊन विनीत झोपायचं नाटक करत पडून असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्याच्याकडे पाठ करून ती मात्र आरामात झोपली.

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. लतानं पिक्चरला जाऊयात अशी भुणभुण लावली. विनीतनं अंजलीला पिक्चरला चल म्हटलं तशी तिनं, ‘‘रोहितला नेत असाल तर मी येते. नाही तर तुम्ही दोघंच जा,’’ असं स्पष्टच सांगितलं. चौघंही पिक्चरला गेली अन् अंजली रोहितजवळच्या सीटवरच बसली. विनीतचं लक्ष सिनेमात नव्हतं, लताकडेही नव्हतं. तो फक्त अंजलीवर लक्ष ठेवून होता. त्यामुळे लता नाराज झाली.

विनीतचं लतावरचं लक्ष उडालं होतं. तो आता अंजलीच्याभोवती होता. रोहितनं मधे येऊ नये म्हणून तो अंजलीला मोकळी सोडत नव्हता. लता कंटाळली अन् जाते म्हणाली पण अंजलीनंच तिला आग्रहानं थांबवून घेतलं. विनीत वैतागला. त्याला लता कधी जातेय असं झालं होतं. पण करणार काय? लतालाही विनीतमधला बदल जाणवत होता. तो अंजलीवरच लक्ष ठेवून राहत होता. तिची काळजी घेत होता. हे सर्व तो रोहितकडून आपल्याला दूर ठेवण्यासाठी करतोय हे अंजली समजून होती. लताचं महत्त्व कमी झालं होतं, त्यामुळे तीही नाराज होती.

अंजली मात्र मोकळेपणानं रोहितला भेटत होती, बोलत होती. एक दिवस विनीतनं म्हटलंच, ‘‘रोहितबरोबर तुझं काय चाललंय? तू त्याच्यात फारच इनवॉल्व्ह होते आहेस, हे कळतंय का तुला?’’

‘‘काय झालं?’’ अंजलीनं भाबडेपणानं विचारलं, ‘‘कुणी आक्षेप घ्यावा असं मी काय करतेय?’’

‘‘तुम्ही सतत सोबत असता. जवळजवळ बसता, जेवताना, टीव्ही बघताना…’’

‘‘तू ही लता वहिनीबरोबर असायचास, चिकटून शेजारी बसत होतास…मनाचा कोतेपणा नसावा माणसात, विचारसरणी स्वच्छ हवी. संशय कशाला घ्यायचा?’’

विनीत संतापला, ‘‘माझेच डायलॉग मला ऐकवतेस? माझी गोष्ट वेगळी आहे.’’

‘‘का वेगळी आहे? तू पुरुष आहेस म्हणून? मी स्त्री असले तरी आपली मर्यादा ओळखते अन् माझं चांगलंवाईट मला कळतं.’’ अंजली परखडपणे म्हणाली.

‘‘मी वचन देतो अंजली, मी फ्लर्टिंगची सवय सोडून देतो. तू रोहितशी मैत्री तोड,’’ जुगारात ठरलेल्या माणसासारखा विनीतचा चेहरा उतरला होता.

‘‘आमच्या मैत्रीत काहीच वाईट नाहीए…दुसरं म्हणजे तू पुन्हा पहिल्यासारखाच वागणार नाहीस कशावरून? तुला भीती वाटतेय की मी रोहितमध्ये गुंतते आहे. त्यामुळे तू चांगलं वागतो आहेस. माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही, हे काय मला कळत नाही? विनीत तीन महिन्यांची माझी अन् रोहितची ओळख आहे अन् तू  एवढ्यात घाबरलास…चिडचिडलास, संशयी झालास… माझ्या मनाचा कधी विचार केलास? गेली तीन वर्षं तुझी अन् लता वहिनींची नको तेवढी जवळीक सहन करतेय मी…’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘मला क्षमा कर अंजू, माझं चुकलं. पण तू रोहितशी मैत्री ठेवू नकोस. मी खरोखर चांगलं वागेन,’’ विनीतचे डोळे भरून आले होते. बोलण्यात प्रामाणिकपणा होता. पण अंजली बधली नाही. याक्षणी तरी ती त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हती. विनीत लताच्या ताब्यात असल्यामुळे तिच्या जीवनात निर्माण झालेली पोकळी रोहितमुळे भरून निघाली होती. त्यामुळे ती खुशीत होती.

विनीतनं लताशी संबंध संपवल्यात जमा होते. संसार असा उधळेल असं त्याला वाटलंच नव्हतं. लतालाही कळलं होतं दीर, दीरच असतो, नवरा, नवरा असतो. तिनं मुलांच्या परीक्षा आटोपताच आपलं चंबूगबाळं आवरून बंगळुरूचा रस्ता धरला.

रोहितचे आईवडिल मधल्या काळात येऊन गेले. त्यांनी रोहितसाठी एक छानशी मुलगी पसंत केली होती. रोहितलाही वाटत होतं हक्काचं माणूस घरात असावं. अंजलीशी असलेली मैत्री त्याला आवडत होती. पण शेवटी ती विवाहित होती, विनीतची बायको होती. तिला तिचा नवरा, घरसंसार होताच ना?

विनीत खूपच बदलला होता. जबाबदारीची जाणीव झाली होती. नातं दोघांकडून जपलं जायला हवं हे कळलं होतं. अंजलीलाही त्याच्यातला बदल जाणवला होता. आपला संसार वेळेवरच सावरला याचा तिला आनंद वाटत होता.

रोहितला त्याच्या गावीच पोस्टिंग मिळालं. घर आवरायला दोघी बहिणी आल्या होत्या. अंजलीनं त्यांना फेयरवेल पार्टी दिली. रोहितंनही विनीत व अंजलीला हॉटेलात डिनरला नेलं.

सकाळी अंजलीनं घराच्या खिडक्या उघडल्या. ताजी हवा अन् कोवळा सूर्यप्रकाश घरात आला. आज तिला हे घर, हा संसार अन् विनीत फक्त तिचा असल्याची जाणीव झाली.

या वळणावर, अशा अवेळी

कथा * नीता दाणी

मोबाइलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर अन् नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. दहा मिनिटातच तिच्या लॅण्डलाइन फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता…क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं…पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं.

मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डबा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर अन् एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा करून घ्यायची. टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे. काही मेंदूपर्यंत पोहोचायचे अन् काही कळायचेही नाहीत. झोप येईपर्यंत टीव्ही सुरू असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळीभाजी गरम करून ती जेवायची अन् मग झोप!

पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. दचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, ‘‘कोण आहे?’’ काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कुणीच दिसलं नाही.

कंपाउंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली, तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुणा वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं. अन् ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिने घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती.

संध्याच्या नवऱ्याच्या मृत्युला बरीच वर्षं झालीत. दोन्ही मुलींची लग्नं झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच पण बरीच लांब राहाते. संध्याची नोकरी चांगली आहे. भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा अन् एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर, स्काइपवर बोलणं होतं. पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधी तरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो.

एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं. तिने पत्र घेतलं, कुलूप उघडून ती घरात आली. सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं.

‘‘संध्या, फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणं गरजेचं आहे.

आमच्या चार वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यांनेच वाढवलंय. मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही. पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं. माझा मुलगा वारंवार मला म्हणतो, आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वत:ची सहचरी म्हणून निवडावी. एकटं राहू नये. म्हणूनच या वयात मी असा विचार करू धजलो आहे. दोन वर्षांत मी रिटायर होतोय. भरपूर पेन्शन मिळेल. त्याखेरीज जंगम स्थावर प्रॉपर्टी आहे. देवदयेने आरोग्य उत्तम आहे. नियमित आहार, विहार, विश्राम, व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करताहेत.

सध्या फक्त तुमचाच विचार सतत मनात असतो. लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तिला आनंदी राहाण्याचा, प्रेम मिळवण्याचा अन् आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. उणेअधिक लिहिले असल्यास क्षमस्व!’’

पत्र वाचताना तिचं हृदय धडधडत होतं. हात कापत होते. पत्र वाचून तिने बाजूला सारलं. लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट अन् प्रामाणिक होत्या. त्यामुळे ती भारावली होती.

रात्री जेवण झाल्यावर तिने टीव्ही लावला तेवढ्यात मोबाइल वाजला. तिने म्हटलं, ‘‘क्षमा करा, तुम्हाला वाटतंय तसं घडू शकणार नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी अन् संतुष्ट आहे. मी एकटी नाही, माझं कुटुंब आहे.’’ तिने एवढं बोलून फोन स्विच ऑफ केला. टीव्ही बंद करून अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा झोप लागली.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं आवरून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकली. ती दचकली.

‘‘तुम्ही?’’

‘‘होय मीच! यावंच लागलं मला. तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात? आधी ‘हो,’ आता ‘नाही’ बोलत नाही. फोन उचलंत नाही, आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना?’’

संध्या त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. कशीबशी बोलली, ‘‘माझं चुकलंच, या वयात हे मला शोभणार नाही. मला घरी लवकर जायचंय.’’ पुढे तिला बोलवेना.

‘‘लोक काय म्हणतील या काळजीनेच तुम्ही स्वत:ला असं कोंडून घेताय…मला माहीत आहे.’’

‘‘प्लीज, मला एकटं सोडा. मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाहीए.’’ संध्या चिडचिडून म्हणाली.

घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली. चहाची नितांत गरज होती. पण उठून चहा करून घेण्याचीही शक्ती वाटत नव्हती. त्याक्षणी तिला रडू कोसळलं. ती शेखरशी खोटं बोलली होती. ‘मी एकाकी नाही, माझं कुटुंब आहे.’ खरं तर ती अगदी एकाकीच होती.

एकदा एका पार्टीला संध्या मोकळे केस सोडून, थोडा मेकअप करून गेली होती. तिच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी तिला म्हटलं होतं, ‘‘संध्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. वयाच्या मानाने दहा वर्षांनी तरुण दिसतेस. तब्येतही निरोगी आहे. तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर.’’

संध्या त्यावेळी घाबरली होती. स्वत:च्या प्रशंसेने संकोचली होती. पण दोन चार दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला अन् लग्नाचं प्रपोजल तिच्यापुढे मांडलं.

शेखरने स्वत:ची सर्व माहिती तिला व्यवस्थित दिली. तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो. पत्नीला जाऊन खूप वर्षं झालीत. एकच मुलगा आहे तो डॉक्टर आहे. त्याचं लग्न झालंय. तो दोन मुलांचा बाप आहे. मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे. त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वत:साठी एक जीवनसंगिनी शोधावी.

त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली. शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले. कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची. कधी फोन उचलायचीच नाही. कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे.

मौनातला होकार शेखरला कळत होता, पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता.

संध्याला सासरचे कुणीच नातलग नव्हते. माहेरी वडील अन् दोघे विवाहित भाऊ होते. तिने वहिनीशी शेखरसंदर्भात चर्चा केली. तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळली. कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता. वडील तर संतापून म्हणाले, ‘‘अगं, तुझं वय मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचं आहे. लग्न अन् संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू? रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर. या वयात नव्या बंधनात अडकण्याची अवदसा कशी आठवली तुला?’’

घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या अन् म्हणाली, ‘‘तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचरी निवडा…मी अशीच एकटी बरी आहे.’’

त्यानंतरही शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याचे फोन येणं बंद झालं होतं. दिवस उलटत होते. आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या रूक्ष, कोरड्या वागण्याने शेखर दुखावले गेले का? की शेखरचंच मन बदललं? तेच बरं म्हणायचं…आता या वयात कुठली नाती नकोतच.

पण दुसरं मत म्हणे, स्वत:हून तू फोन कर. फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले अन् एक दिवस शेवटी तिने एक मिस कॉल दिलाच. त्यावेळीही तिचं हृदय जोरात धडधडत होतं.

तिच्या मोबाइलवर ताबडतोब मेसेज आला, ‘‘मी फार काळजीत आहे, सध्या फोन करू शकत नाही.’’

तिने उलट मेसेज पाठवला, ‘‘काय झालं? कसली काळजी?’’ पण उत्तर आलं नाही.

दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्याप्रमाणे कामाला लागली. उगीचच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं. अचानक एकदा मोबाइलची घंटी वाजली. फोन शेखरचा होता. त्याने सांगितलं की त्याचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदतकार्यासाठी गेला असताना स्वत:च गंभीर आजारी झाला. उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलाय. आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. मधल्या काळात फार काळजी वाटत होती. धावपळ फार झाली. वेळ मिळत नव्हता. तुम्ही कशा आहात? स्वत:ची काळजी घ्या. बाय, फोन ठेवतो. हॉस्पिटलला जायचंय. त्यानंतर संध्याला फोन आला नाही. तिनेही केला नाही.

एकदा सायंकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली. डोळ्यांपुढे अंधारी आली अन् एक किंकाळी फोडून ती वाहनासहित जमिनीवर आदळली. पुढे काय झालं ते तिला कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा ती इस्पितळात होती.

तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला. दोघीतिघी लगेच आल्या. तिच्यावरचे उपचार जाणून घेतले. औषधं आणली अन् तिला घरी घेऊन आल्या. तिला खायला घातलं, गोळ्या दिल्या. रात्री व सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळच्या टेबलवर मांडून ठेवल्या अन् मग त्या परत गेल्या. ‘‘आठ दिवस रजा घे. आम्ही सर्व सांभाळू,’’ असं बजावून त्या गेल्या.

संध्याच्या सर्वांगाला भरपूर मुका मार लागला होता. वेदनाशामक गोळी व झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली. सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं. सर्वांग ठणकत होतं. सणसणून ताप भरला होता. अंथरुणातून उठवत नव्हतं. पण फोन वाजत होता. तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला.

‘‘हॅलो संध्या, कशा आहात तुम्ही?’’ त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली. तिला एकदम भरून आलं. ‘‘ताप आलाय, झोपून आहे, अपघात झाला.’’ दाटल्या कंठाने तिने म्हटलं अन् फोन तिच्या हातातून गळून पडला.

तिने कसाबसा चहा करून घेतला. दोन बिस्किटं अन् चहा संपवून तापाची अन् अंगदुखीवरची गोळी घेऊन ती पडून राहिली. गोळी अन् तापाची गुंगी यामुळे किती वेळ गेला ते तिला कळलं नाही पण दारावरच्या घंटीच्या आवाजाने तिला जाग आली.

दरवाजा उघडला अन् दारातल्या व्यक्तिला बघून ती एकदम दचकली, बावरली अन् लाजलीही. झोपेतून उठून आल्यामुळे साडी अन् केस अस्ताव्यस्त होते.

कशीबशी म्हणाली, ‘‘तुम्ही…?’’

‘‘आता तरी येऊ द्या,’’ शेखरने म्हटलं.

ती पटकन् दारातून बाजूला झाली. तिच्या हातापायावरच्या मुक्या माराच्या खुणांकडे बघत तो म्हणाला, ‘‘जबरदस्त अॅक्सिडेंट झालाय…अरे? तुम्हाला भरपूर तापही आहे?’’ तिच्या कपाळाला अन् मनगटाला हात लावून त्याने म्हटलं.

‘‘तुम्ही अशाच गाडीत बसा. डॉक्टरकडे जाऊन येऊ.’’ त्याच्या शब्दाला संध्याला नाही म्हणवेना.

शेखरचे डॉक्टर छान होते. त्यांनी संध्याला अधिक परिणामकारक औषधं दिली. कशी अन् केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं.

शेखरने  तिला घरी आणून सोडली. तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वत: सांजा तयार केला. तिला दुधाबरोबर खायला घातला. गोळ्या दिल्या. संध्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं.

‘‘आता शांतपणे पडून राहा, झोप लागेल तुम्हाला. झोपून उठल्यावर खाण्यासाठी काही तरी करून ठेवतो अन् लॅचचं दार ओढून घेऊन मी जातो. काहीही गरज भासली तर ताबडतोब फोन करा. संकोच करू नका.’’ एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला. बायकोविना इतकी वर्षं काढली होती. त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता.

शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं, तिची काळजी घेणं, त्याचा तो ओझारता स्पर्श पुन:पुन्हा आठवत होता. तिच्या एकाकी, नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता.

संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली. एक दिवस तिच्या मुलीचा स्वप्नाचा फोन आला. तिच्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उधाण आलं. नातवाच्या, लेकीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली.

त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं. ‘‘आई, हा शेखर कोण आहे?’’ स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम दचकली.

‘‘कलीग आहेत.’’ संध्याने तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

‘‘तुझ्या मोबाइलवर त्यांचे कॉल्स बघितले.’’

संध्याने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिचं बावरलेपण, हातांची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोखून बघत राहिली.

एकदा रात्री अकरा वाजता संध्याच्या मोबाइलची रिंग वाजली. तिने पटकन् मोबाइल उचलला अन् ‘‘सध्या नातू, मुलगी आलेली आहेत,’’ असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधीच शेखर बोलला,

‘‘फारच छान! मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वत: येऊन तिच्याशी बोलतो.’’

‘‘नको…नको.’’ संध्या घाबरली. तिने फोन स्विच ऑफ केला.

आईचा चेहरा अन् थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारलं, ‘‘एवढ्या रात्री कुणाचा फोन होता, ममा?’’

उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली.

‘‘काय झालं, ममा? तू अशी बावरलेली, अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?’’ संध्याने मानेनेच नकार दिला.

संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला. स्वप्नाला सांगावं का? तिची प्रतिक्रिया काय असेल? आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का? सगळं ऐकून घेतल्यावर ती अन् स्वप्ना सहज मोकळेपणाने आपसांत बोलू शकतील का? संध्याची फार तडफड होत होती. आपल्या भावना, आपली नवी मैत्री, त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कुणाशी तरी शेयर करायची इच्छा होती पण समाजाची भीती, मुलींचा तुटकपणा यामुळे ती फार तणावात होती.

स्वप्नाने पुन:पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं. पण तिचा कठोर चेहरा अन् एकूणच आविर्भाव बघून ती घाबरी झाली.

‘‘ममा, तुला कुणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करतंय. तुला कळत नाहीए, तू फार साधी, सरळ आहेस. तुझी नोकरी, घर, पैसा बघून तुला कुणी तरी जाळ्यात ओढायला बघतंय. आता त्याचा फोन आला तर मला दे. चांगली फायर करते त्याला.’’

‘‘अगं पण बाळा, आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत. माझ्या नोकरी, प्रॉपर्टीशी त्यांना काहीच देणंघेणं नाहीए…’’

‘‘पण ममा, आता या वयात तुला हे नवं खूळ काय सुचतंय? अगं, किती तरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहताहेत पण म्हातारपणी कुणी लग्न करत नाहीत. ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील? किती चेष्टा करतील ते…अन् शिवाय, आम्ही आहोत ना तुला? काही दु:ख, त्रास असेल तर आम्हाला सांग ना…कुणातरी बाहेरच्याला काही तरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची?’’ स्वप्ना संतापून बोलत होती. अधिकच रागाने बोलली, ‘‘अन् हे जर राहुलला, तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटतेय तर त्याला काय वाटेल?’’

संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यांत पाणीच आलं.

स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली, ‘‘आई, मी लवकरच पुन्हा येईन, रिटायरमेंटनंतर तू माझ्याकडेच राहायचंस…ठरलं…’’

संध्या फक्त उदास हसली.

‘‘मी कोमललाही सांगितलंय. तीही इथे येणार आहे.’’

‘‘बरं!’’

स्वप्ना गेली अन् घर एकदम रिकामंरिकामं, उदास झालं. स्वत:ला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली. शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती.

कोमल, तिचा नवरा नीरज अन् मुलगी रेखा घरी आले अन् संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाउन निघालं. अधूनमधून संध्या रजा टाकायची, मग सिनेमा, बाहेर भटकणं, शॉपिंग, हॉटेलिंग असा भरगच्च कार्यक्रम असायचा. संध्या आनंदात होती.

‘‘आई, हे शेखर कोण आहेत?’’ कोमलने खट्याळपणे हसत विचारलं.

संध्या एकदम स्तब्ध झाली, कोमेजली. आता कोमलही कठोरपणे बोलेल.

‘‘मला स्वप्नाताईने सांगितलं होतं.’’

संध्या कासावीस झाली. बोलणं सुधरेना.

‘‘ममा, अगं, ही तर फारच छान गोष्ट आहे. आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब असतो. पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही. अशावेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल. स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल. ते माझ्याकडे लागलं. तू शेखर अंकलना अन् त्यांच्या मुलाला घरी बोलावून घे. नीरजनाही त्यांना भेटायचं आहे.’’

संध्या लेकीकडे डोळे विस्फारून बघतंच राहिली. कोमलनेच शेखरला फोन करून सायंकाळी घरी येण्याचं आमंत्रण दिलं.

सुर्दैवाने शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता. त्या संध्याकाळी संध्या, नीरज, कोमल, शेखर व डॉ. अमोल अशी सर्व एकत्र जमली. मोकळेपणाने गप्पा झाल्या. चहा, फराळ आटोपला.

डॉ. अमोल म्हणाला, ‘‘माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलंय. आता त्यांनाही सुख मिळावं, प्रेमाचं, हक्काचं माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी इथे आलोय..’’

संध्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोमल अन् नीरजला शेखर अंकल अन् डॉ. अमोल एकदम पसंत पडले होते. त्यांच्याकडून या नात्याला होकार होताच.

डॉ. अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘मावशी, आता मनात कुठलाही किंतू बाळगू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आयुष्याच्या या वळणावर माझे बाबा तुझी वाट बघताहेत. त्यांना सोबत कर. मी अन् माझ्या दोघी बहिणी कोमल अन् स्वप्ना…सतत तुमच्या मदतीला असू.’’

‘‘खरंय आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हसा बरं? आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यातच सामावला आहे.’’ नीरजने म्हटलं. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली. शेखरही सुखावला. सगळेच आनंदात होते.

पाठराखीण

कथा * सुधा काळेले

मुलगा अन् त्याच्या घरचे लोक पारुलताईंना बघायला येऊन गेले. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ताई त्यांना पसंत नसाव्यात असं जाणवलं होतं. खरं तर ताईंना नाकारावं असं त्यांच्यात काहीच नव्हतं. उंच सडसडीत बांधा, उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, आकर्षक नाक डोळे, फक्त रंग सावळा होता. ताई, स्वभावानेही नम्र, आनंदी अन् कुणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. पण लग्न मात्र ठरत नव्हतं. ‘‘ठीक आहे. योग आला की पटकन् ठरेलच लग्न.’’ असं म्हणून जवळचे नातलग आईबाबांना धीर द्यायचे. पण ताई मात्र मिटून जायच्या. मनातल्या मनात खंतावत राहायच्या. त्यांचं वयही वाढत होतं.

या मे महिन्यात पारुल तीस वर्षांची होईल. वय वाढतं तसं स्थळ मिळणं अधिकच अवघड होईल. हाच एक विचार सतत आईबाबांची झोप उडवत होता.

आमची कुचंबणा बघून काही दुष्ट, विघ्नसंतोषी नातलगांनी, परिचितांनी जी काही स्थळं सुचवली ते बघून त्यांच्या वृत्तीची अन् बुद्धीची कीव करावीशी वाटली. कुणी तरी फीट्स येणाऱ्या मुलाचं तर कुणी तरी पैसे खाण्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेल्या मुलाचंही स्थळ सुचवलं होतं. सावळा रंग आहे म्हणून काय वाट्टेल त्याला आम्ही आमच्या पारुलताई थोडीच देणार होतो?

माझे पती रवी पारुलताईंहून दोनच वर्षं लहान. ताईंचं लग्न लवकर ठरेना म्हणताना मग सासूसाऱ्यांनी म्हणजे आईबाबांनी रवीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आमचा प्रेमविवाह होता. लग्न लवकर व्हावं ही माझ्या आईबाबांची घाई होती. ठरवून तरी किती दिवस ठेवायचं ना? शेवटी आमचं लग्न झालं.

रवी अन् पारुलताईंचं एकमेकांवर खूप माया होती. रवीने मला आधीच बजावलं होतं की पारुलताईला या घरात ती बिनलग्नाची मुलगी म्हणून ओझं वाटतेय असं कधी जाणवून द्यायचं नाही. कोणताही निर्णय प्रथम तिचं मत विचारायचं. मोठी बहीण, थोरली नणंद म्हणून तिचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे. पारुलताई मला पहिल्या भेटीतच आवडल्या. मी माझ्या घरात आईवडिलांची एकटीच मुलगी होते. त्यामुळेच मला तर पारुलताईंच्या रूपात मोठी बहीणच मिळाली जणू. तीही माझ्यावर खूप माया करायची. माझं कोडकौतुक पुरवायची.

एकदा ऑफिसच्या टूरवर रवी गेले होते. रात्र बरीच झाली तरी पारुलताई आल्या नव्हत्या. मी आईबाबांना वेळेवर जेवायला घालून झोपायला पाठवलं होतं. मी मात्र अजून जागीच होते. मला काळजीही वाटत होती. तेवढ्यात कार फाटकाशी थांबल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बघितलं, ताईच एका कारमधून उतरत होत्या. ड्रायव्हरसीटवर कुणी पुरुष होता. मला थोडं नवल वाटलं. एरवी ताईंना ऑफिसची कॅब सोडते घरी. आज कार कशी?

मला जागत असलेली बघून तिने विचारलं, ‘‘तू अजून जागीच आहेस?’’

‘‘तुमचीच वाट बघत होते. तुम्ही घरी परत येत नाही तोवर मला झोप येत नाही.’’

मी उत्तरले अन् शोधक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे बघत विचारलं, ‘‘जेवण गरम करू? जेवायचंय ना?’’

‘‘नको, आज ऑफिसात जेवण झालंय.’’ त्या म्हणाल्या. ‘‘दमलेय मी, झोपते आता. तूही झोप.’’

‘‘ताई गुड नाईट,’’ मी म्हटलं अन् माझ्या खोलीत आले.

पण झोप लागेना. काही तरी गडबड आहे. गेले काही दिवस ताई बैचेन वाटत होत्या. काही तरी मानसिक ताण किंवा दडपण आल्यासारखं जाणवत होतं. एरवी ऑफिसच्या अनेक गोष्टी त्या रवीसोबत, माझ्यासोबत शेअर करायच्या. पण असं ऑफिसातून इतक्या उशिरा येणं, कुणा पुरुषाबरोबर कारमधून येणं मला जरा खटकलं. त्यांना त्याच्याबरोबर लग्न करायचं असेल तर सगळं घर आनंदाने होकार देईल. त्यांच्या आनंदासाठी, त्यांनी निवडलेल्या, त्यांना आवडलेल्या कोणत्याही पुरुषाला आम्ही आपला म्हणू. पण त्या तसं काही सांगत नाहीएत. नाही का सांगेनात, मी शोधून काढल्याशिवाय राहाणार नाही. एकदा हे ठरवलं अन् मग मात्र मी गाढ झोपले.

सकाळी सहाला जाग आली तेव्हा पारुलताई ऑफिसला जायला आवरून तयार होत्या. मी आश्चर्याने विचारलं, ‘‘आज काय आहे, ताई? इतक्या लवकर?’’

‘‘अगं, एक मीटिंग आहे…महत्त्वाची आहे. आमचा ब्रेकफास्टही ऑफिसमध्येच होईल…चल मी निघते, मला उशीर होतोए..बाय…’’

मी काही म्हणणार त्याआधीच झपाट्याने ताई निघून गेल्या. मी त्यांच्या मागे जातोए तोवर त्या, त्या कालच्याच गाडीने फुर्रकन गेल्यासुद्धा!

मला आजही त्या ड्रायव्हरचा चेहरा दिसला नाही. मला शंका आली, ताई कुणा लफंग्याच्या जाळ्यात अडकल्या आहेत. शिवाय तो पुरुष विवाहितही असावा. मला शोध घ्यायलाच हवा. पण ताईंच्या अन् घरच्यांच्याही नकळत. ताईंचा अपमान व्हायला नको.

रात्री पुन्हा तीच गाडी ताईंना सोडायला आली. यावेळी मात्र मला ड्रायव्हरचा चेहरा थोडासा दिसला. कारण मी अगदी टपून अन् लपून बसले होते. आईबाबा आज हॉलमध्येच बसलेले होते. त्यांनी जेव्हा उशिरा येण्याचं कारण विचारलं तेव्हा थकलेल्या आवाजात त्या म्हणाल्या, ‘‘मीटिंग होती ऑफिसात, सकाळपासूनच कामं होती. दमलेय मी. झोपते आता.’’ ताई खोलीत निघून गेल्या.

‘‘काय झालंय या पोरीला कुणास ठाऊक? उशिरा येते, जेवत नाही, सोड म्हणावं ही अशी नोकरी. आम्हाला नकोय तिचा पैसा. धड झोप नाही, धड जेवण नाही, कशाला हवी असली नोकरी?’’ आई चिडून बडबड करायला लागल्या. मी त्यांना गोड बोलून शांत केलं. ‘‘मी ताईंना जेवायला लावते,’’ असं सांगून झोपायला पाठवलं.

मी जेवणाचं ताट घेऊन ताईंच्या खोलीत गेले. त्या फोनवर कुणाशी तरी बोलत होत्या. थोड्या त्रासलेल्या अन् चिडचिडलेल्या आवाजात बोलत होत्या. मला बघताच त्यांनी पटकन् फोन बंद केला. मी आग्रह केल्यावर हात धुऊन त्या जेवायला लागल्या. पण त्यांच्या आवडीचा स्वयंपाक असूनही त्या जेमतेम खात होत्या. धड माझ्याकडे बघितलंही नाही. मी त्यावेळी काहीच बोलले नाही. त्यांनी हात धुताच मी ताट उचलून खोलीबाहेर पडले.

दोन दिवसांनी रवी परत येणार होते. मी आईंना म्हटलं, ‘‘जरा एका मैत्रिणीला भेटून येते.’’ अन् मी घराबाहेर पडले. मी सरळ ताईंच्या ऑफिसात जाऊन थडकले. त्या जरा घाबरल्याच, घरी काही विपरीत घडलंय का? मला ऑफिसमध्ये का यावं लागलं?

मी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होते. हसून म्हटलं, ‘‘विशेष काहीच नाही. या भागात एका मैत्रिणीकडे आले होते, म्हटलं डोकावून जावं तुमच्याकडे. हल्ली तर तुम्ही ऑफिसच्या मीटिंग्जमुळे आमच्या वाट्यालाच येत नाही म्हटलं, इथेच तुमच्याशी थोडं भेटून बोलून घरी जावं.’’

‘‘इथे?’’ त्या घाबरून बोलल्या.

‘‘नाही तर असं करा ना, आज ऑफिसमधून रजाच घ्या ना,?थोडं भटकून घरीच जाऊ.’’

‘‘नाही ग! बॉस रजा देणार नाहीत. कामं फार आहेत.’’

‘‘विचारून तर बघा, कदाचित हो म्हणतीलही.’’

‘‘बघते विचारून…’’ नाइलाजाने त्या उठून बॉसच्या केबिनकडे गेल्या.

ताई केबिनमधून बाहेर आल्या तेव्हा तो बॉसदेखील त्यांच्यासोबत बाहेर आला. ‘‘अरेच्चा? हा तर तोच माणूस आहे जो ताईंना सोडायला अन् घ्यायला येतो.’’

माझ्या मेंदूने नोंद घेतली. ताईंना सुट्टी मिळाली होती. पण बॉसने त्यांना बाहेरपर्यंत सोडायला येणं मला काही रूचलं नाही. मी मुद्दाम बॉस समोर म्हटलं, ‘‘ऐट आहे ताई तुमची…दस्तुरखुद्द बॉस तुम्हाला सोडायला येतात… ऑफिसच्या इतर मुली जळत असतील तुमच्यावर…खरं ना?’’

ताई काही बोलल्या नाहीत. फक्त उदास हसल्या. आम्ही थोडं भटकलो. काही बारीकसारीक खरेदी करून घरी पोहोचलो. ताई लवकर आल्याने आईबाबांनाही खूप आनंद झाला.

रात्रीची जेवणं झाली. सगळे आपापल्या खोल्यांमधून झोपायला गेले. मी हॉलमध्येच एक नवी आणलेली कादंबरी वाचत बसले होते. मला ताईच्या खोलीतून काही आवाज ऐकू आला. मी धावत तिकडे गेले. खोलीचं दार आतून बंद नव्हतं. मी बघितलं, ताई खोलीतल्या बाथरूमच्या वॉशबेसिनवर ओणवलेल्या होत्या. त्यांना ओकारी झाली होती. मी पटकन् पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे धरला. चुळा भरून त्या पलंगावर येऊन बसल्या. मी वॉशबेसिनचा नळ सोडून वॉशबेसिन स्वच्छ केलं अन् त्यांच्याजवळ येऊन बसले.

‘‘काय झालं, ताई? अजीर्ण होण्यासारखं तर आपल्या घरात जेवण नसतं. तुम्हाला त्रास का झाला? अन् बोलता बोलता मला एकदम शंका आली.

‘‘ताई, तुमचा बॉस. खरं सांगा ताई, तुमची चिडचिड, तुमची काळजी, ताण त्या बॉसचंच हे काम आहे ना? मला खरं खरं सांगा. मी यातून मार्ग काढेन. कुणाला काहीही कळू देणार नाही, फक्त मला विश्वासात घेऊन खरं खरं सांगा.’’

माझा आधार देणारा प्रेमळ स्पर्श अन् माझं आश्वासन यामुळे त्या एकदम मला मिठी मारून हमसून हमसून रडू लागल्या. मी आधी तर त्यांना मनमोकळं होईतो रडू दिलं. ताईंना दिवस गेले होते…पण निदान अॅबॉर्शन करता येईल इतपत तरी परिस्थिती असायला हवी. मला माझी डॉक्टर मैत्रीण आठवली. तिची मदत घेता येईल.

ताई थोड्या सावरल्या. त्यांनी हळूहळू सांगायला सुरूवात केली. ‘‘हे बॉस नव्यानेच ट्रान्सफर होऊन आमच्या ऑफिसला आले. आल्या आल्याच त्यांनी माझ्यात इण्टरेस्ट घ्यायला सुरुवात केली. बोलताना म्हणाले, दोनतीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे. मूलबाळ नाही. घरातला एकांत, एकटेपणा खायला उठतो. मी त्यांच्या आयुष्यात सहचरीची भूमिका घेऊ शकेन का? माझ्या मनात आलं, आपणही तिशीच्या आहोत, लग्न करून घरसंसार थाटायचं आपल्याही मनात आहे, तेव्हा हा शिकलेला, कमावता, चांगला माणूस आहे, त्याला हो म्हणायला काय हरकत आहे? मी त्यांना होकार दिला व घरी येऊन त्यांनी माझ्या आईबाबांना भेटावं असंही सांगितलं. ते म्हणाले, ठीक आहे. मी लवकरच येऊन भेटतो. मला खूप आनंद झाला. दाखवण्याच्या वगैरे भानगडीशिवाय लग्न ठरत होतं. आईबाबा तुम्ही दोघं सगळ्यांनाच किती आनंद होईल. या स्वप्नांत मी दंग होते. त्यांनी एक दिवस मला म्हटलं, ‘‘तूही आधी माझं घर बघून घे. चहाला ये.’’ मी अगदी नि:शंकपणे त्यांच्या घरी गेले. तिथे त्यांचा सभ्यपणाचा मुखवटा गळून पडला. त्यांनी माझ्यावर चक्क बलात्कार केला. मी घाबरून बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यावर काय घडलंय ते मला कळलं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी या गोष्टीची वाच्यता कुठेही करू नये. कारण त्यांच्या कॅमेऱ्यात माझे अश्लील फोटो आहेत. कुठल्याही क्षणी ते त्यांचा वापर करून मला आयुष्यातून उठवू शकतात. मी मुकाट्याने घरी आले. त्यानंतर मला कळलं की त्यांचं लग्न झालेलं आहे. पत्नी हयात आहे व दोन मुलंही आहेत. पण त्या फोटोंच्या धमकीवर ते अजूनही मला ब्लॅकमेल करताहेत. मी काय करू? कशी मी फसले. त्यांच्या बोलण्यावर भाळले अन् एकटीच त्यांच्या घरी गेले. आता मी काय करू? आईबाबांना काय वाटेल?’’ ताई पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागल्या.

मी त्यांना मिठीत घेतलं. धीर देत म्हणाले, ‘‘ताई, तुम्ही शांत व्हा. अजिबात काळजी करू नका. प्रथम आपण माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे जाऊ. ती तुम्हाला या संकटातून मोकळं करेल. त्यानंतर तुमच्या बॉसला मी बघते. तुमची खरं तर काहीच चूक नाहीए. तुम्ही सज्जन, भीरू आहात म्हणूनच त्याने तुमचा गैरफायदा घेतला. पण मी त्याचे दात त्याच्याच घशात घातल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. ही गोष्ट फक्त तुमच्या माझ्यातच असेल. रवी, आई किंवा बाबा कुणालाही काहीही कळू द्यायचं नाही. आता तुम्ही शांतचित्ताने झोपा.’’

दिवा मालवून, त्यांना निजवून मीही झोपले. अगदी गाढ झोपले. सुदैवाने रवी टूरवरून परतले नव्हते. अन् आईबाबांची खोली अगदी शेवटी असल्याने त्यांना काहीच कळलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मी अन् ताई एकत्रच घराबाहेर पडलो. मैत्रिणीकडे गेलो. तिने तपासलं अन् म्हणाली, ‘‘फारच वेळेत आलात, अजून आठ दिवस गेले असते तर कठीण झालं असतं,’’ मी आनंदाने मैत्रिणीला मिठीच मारली.

ती म्हणाली, ‘‘अगं अशा अनेक मुली येतात माझ्याकडे, फसवल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या, मी त्यांना मोकळं करते. त्यांना समजावते, धीर देते. यामुळे जपून अन् सावधपणे राहायचं आणि पूर्ण आत्मविश्वासानेच वावरायचं. स्वत:ला अपराधी समजू नका. लोकांना घाबरू नका, समाजापासून तोंड लपवू नका अन् त्या अपराध्याला शासन करता आल्यास तसंही करा. नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी.’’

ताईंचं अॅबॉर्शन अगदी व्यवस्थित झालं. आम्ही दोघी रिक्षाने घरी आलो अन् मी आईंना सांगितलं, ताईंना ऑफिसातच घेरी आली. त्यांनी मला मैत्रिणीकडून बोलावून घेतलं. मी सरळ त्यांच्या ऑफिसमधून त्यांना घेऊन माझ्या डॉक्टर मैत्रिणीकडे गेले. तिने तपासून सांगितलं, अॅनिमिया आहे. औषधं, फळं अन् विश्रांती घेऊन बरं वाटेल. काळजीचं कारण नाहीए.

आई म्हणाल्या, ‘‘मी तर सतत सांगते, नीट जेवत जा, झोपता जा, सारखं आपलं काम, काम! बरं झालं आता आठ दिवस विश्रांती घ्यावी लागतेय, तेवढा तरी जिवाला आराम.’’

आठ दिवसांतच ताई खडखडीत बऱ्या झाल्या. मला मिठी मारून म्हणाल्या, ‘‘मोठ्या संकटातून तू मला सोडवलंस…कसे तुझे उपकार फेडू?’’

मी हसून म्हटलं, ‘‘उपकाराचा प्रश्नच नाही येत. अजून तर बघा, काय काय घडणार आहे…’’

मग आम्ही बॉसच्या बायकोला जाऊन भेटलो. त्यांना बॉस ताईला त्रास देतात, ब्लॅकमेल करायला बघतात वगैरे सांगितलं. अॅबॉर्शनचा विषय आम्ही पूर्णपणे टाळला. पण त्याने बायको हयात नाही, मूळबाळ नाही वगैरे सांगून लग्नाची मागणी घातल्याचंही सांगितलं. ती बिचारी अवाक् झाली. काही वेळाने म्हणाली, ‘‘या माणसाने इथेही हेच धंदे सुरू केलेत. कशीबशी आम्ही लखनौहून ट्रान्सफर घेतली होती. निदान नव्या ठिकाणी तरी हा चांगला वागेल अशी आशा होती. पण आता मी त्यांना क्षमा करणार नाही. चला, सरळ पोलिसात जाऊया. धडा शिकवायलाच हवाय त्यांना.’’

त्यांचे आभार मानून, त्यांच्या धाडसाचं कौतुक करून आम्ही त्यांच्यासह पोलीस चौकीत गेलो. तिथे रीतसर तक्रार नोंदवून पोलीस कुमुक घेऊन ऑफिसात पोहोचलो.

आम्हाला, पत्नीला अन् पोलिसांना बधून बॉसचा चेहरा पांढराफटक पडला. ऑफिसातही लोक चक्रावून गेले. तेवढ्यात ऑफिसातली अजून एक मुलगी म्हणाली की, त्याने तिलाही त्रास दिलाय. पोलिसांनी सरळ त्याला अरेस्ट केलं.

घरी आलो तोवर रवी आले होते. त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की ताईंना व इतर मुलींनाही बॉस त्रास देत होता म्हणून त्याला धडा शिकवलाय.

आईबाबांना सुनेचा फारच अभिमान वाटला. रवीही म्हणाले, ‘‘तुझ्यासारखी चतुर व धाडसी मुलगी मी बायको म्हणून निवडली याचा मलाच फार अभिमान वाटतोय.’’

आम्ही दोघी, मी अन् ताई एकमेकींकडे बघून फक्त हसलो.

चल, आपण कॉफी घेऊयात

कथा * मीना वाखले

वैदेही कमालीची बेचैन झाली होती. अचानक सौरभचा ई मेल वाचून, तोही दहा वर्षांनी प्रथमच आलेला ई मेल बघून ती अंतर्बाह्य ढवळून निघाली होती. तिला न जुमानता तिचं मन सौरभचाच विचार करत होतं… का? का तो तिला अचानक सोडून गेला होता? न कळवता, न सांगता पार नाहीसाच झाला होता. मारे म्हणायचा, ‘‘मी तुझ्यासाठी आकाशातले तारे तोडून आणू शकत नाही, पण जीव देईन तुझ्यासाठी…पण नाही, जीव तरी कसा देऊ? माझा जीव तर तुझ्यात वसलाय ना?’’ हसून वैदेही म्हणायची, ‘‘खोटारडा कुठला…अन् भित्रासुद्धा’’ आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवल्यावरही वैदेहीच्या चेहऱ्यावर हास्य उमललं होतं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने केलेल्या विश्वासघाताची आठवण येऊन तिचा चेहरा रागाने लाललाल झाला. पुन्हा प्रश्नांचा तोच गुंता… तो मुळात तिला सोडून गेलाच का? अन् गेलाच होता तर आज ई मेल कशाला केला?

वैदेहीने मेल पुन्हा वाचला. फक्त दोन ओळी लिहिल्या होत्या सौरवने, ‘‘आय एम कमिंग टू सिंगापूर टुमारो, प्लीज कम अॅण्ड सी मी. विल अपडेट यू द टाइम प्लीज गिव्ह मी योअर नंबर. विल कॉल यू.’’

वैदेहीला कळेना, त्याला नंबर द्यावा की न द्यावा? इतक्या वर्षांनंतर त्याला भेटणं योग्य ठरेल की अयोग्य? आज मारे ईमेल करतोए पण दहा वर्षांत भेटायची एकदाही इच्छा झाली नाही? मी जिवंत आहे की मेलेय याची चौकशी करावीशी वाटली नाही? आता परत यायचं काय कारण असेल? प्रश्न अन् प्रश्न…पण उत्तर एकाचंही नाही.

पण शेवटी तिने त्याला आपला नंबर पाठवून दिला? खुर्चीवर बसल्या बसल्या तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली.

दहा वर्षांपूर्वी ‘फोम द शॉपिंग मॉल’च्या समोर ऑर्चर्ड रोडवर वैदेहीला कुणा कारवाल्याने ठोकरलं होतं. तो बेधडक निघून गेला. रस्त्यावर पडलेली वैदेही ‘हेल्प..हेल्प..’ म्हणून ओरडत होती. पण त्या गर्दीतला एकही सिंगापुरी तिच्या मदतीला येत नव्हता. कुणी तरी पोलिसांच्या हेल्पलाइनला फोन केला.

वैदेहीच्या पायाला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहात होतं. वेदनेने ती तळमळत होती. टफिक जाम झाला होता. त्याच जाममध्ये सौरभही अडकलेला. एक भारतीय मुलगी बघून तो मात्र पटकन् गाडीतून उतरला. वैदेहीला उचलून आपल्या ब्रॅण्ड न्यू स्पोर्ट्स कारमध्ये ठेवली अन् तडक हॉस्पिटल गाठलं.

एव्हाना वैदेहीची शुद्ध हरपत आलेली. कुणीतरी उचललंय, त्याच्या अंगात लेमन यलो रंगाचा टीशर्ट आहे एवढंच तिला अंधुकसं कळलं अन् ती बेशुद्ध झाली.

परदेशात तर नियम आणखी वेगवेगळे असतात. पोलिसांनी सौरभला भरपूर पिडलं. एक भारतीय मुलगी या पलीकडे त्याला वैदेहीची काहीही माहिती नव्हती. त्यानेही केवळ भारतीय असण्याचं कर्तव्य पार पाडलं होतं. चारपाच तासांनी जेव्हा वैदेही शुद्धीवर आली तेव्हा तो तिथेच तिच्या बेडजवळ बसलेला तिला दिसला. वैदेहीच्या एका पायाला जखम झाली होती. दुसरा पाय फ्रॅक्चर झाला होता. मोबाइलही तुटला होता. सौरभ ती शुद्धीवर कधी येतेय याचीच वाट बघत होता. तिच्या घरी या अपघाताची बातमी पोहोचवायला हवी होती.

डोळे उघडल्यावर एकूण परिस्थितीचं आकलन व्हायला थोडा वेळ लागला. त्यावेळी तिने त्याच्याकडे नीट बघितलं. दिसायला साधासाच होता. पण त्याच्यात काहीतरी वेगळं होतं. कदाचित त्याचं निर्मळ हृदय अन् माणुसकीची जाण त्यामुळेच त्याने वैदेहीला इस्पितळात आणलं होतं.

ती शुद्धीवर आल्याचं लक्षात येताच तो म्हणाला, ‘‘बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात…मी काळजीत होतो, अजून किती वेळ इथे बसून राहावं लागेल म्हणून…मी सौरभ…’’

वैदेही काहीच बोलली नाही.

त्याने तिच्या घरच्यांपैकी कुणाचा तरी नंबर मागितला. तिने आईचा फोन नंबर दिला. त्याने ताबडतोब त्या नंबरवर वैदेहीच्या अपघाताची व तिला कुठे अॅडमिट केलंय त्या इस्पितळाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. जाताना ‘बाय पण केलं नाही,’ वैदेहीने त्याचं नाव ‘खडूस’ ठेवलं.

वैदेहीचे आईबाबा इस्पितळात आले. वैदेहीने त्यांना सगळी हकिगत सांगितली. तो कोण, कुठला काहीच तिला ठाऊक नव्हतं. त्याने स्वत:चा मोबाइल नंबर तिला दिला नव्हता की तिच्याकडून तिचा नंबर घेतला नव्हता. त्यामुळे आता भेटण्याची शक्यता नव्हतीच.

तीन-चार दिवस इस्पितळामध्ये काढल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं. अजून पंधरा दिवस बाहेर जाता येणार नव्हतं. तिने मैत्रिणीला (ऑफिसमधून रजा घ्यायची म्हणून) फोन करायचा म्हटलं, तर मोबाइल होता कुठे? तिला आठवलं तो सौरभच्या हातात बघितला होता. तो जाताना तिला द्यायला विसरला की मुद्दामच दिला नाही? झालं…आता सगळे कॉण्टॅक्ट नंबर्स गेले. तिला एकदम आठवलं त्याने स्वत:च्या मोबाइलवरून आईला फोन केला होता. आईच्या मोबाइलमध्ये कॉल्स चेक केले अन् त्याचा नंबर सापडला.

तिने ताबडतोब फोन लावला अन् आपली ओळख देत तिचा मोबाइल परत करण्याची विनंती केली. तो म्हणाला, ‘‘मोबाइल मी परत करणारच आहे पण असा फुकटाफाकटी नाही. मला जेवण पाहिजे. उद्या संध्याकाळी येतो…पत्ता सांगा.’’

बाप रे…घरी येणार? हक्काने जेवायला? काय माणूस आहे? पण मोबाइल तर हवाच होता. मुकाट पत्ता सांगितला.

दुसऱ्यादिवशी दस्तूरखुद्द सौरभ महाशय दारात हजर होते. आल्या आल्या सर्वांना आपली ओळख करून दिली. सर्वांशी ओळख करून घेतली. आल्या आल्या मोकळपणाने वागून घरात असा काही रमला जणू फार पूर्वीपासूनची ओळख असावी. वैदेहीला हे सगळं विचित्रही वाटत होतं आणि आवडतही होतं. आई, बाबा, धाकटी भावंडं सर्वांनाच तो आवडला. मुख्य म्हणजे त्याने वेळेवर केलेल्या मदतीमुळेच वैदेही सुखरूप हाती लागली होती. त्याच्या व्यतिमत्त्वात एक गोडवा होता. त्याचं बोलघेवडेपण हे त्याच्या निर्मळ मनाचं प्रतीक होतं.

सिंगापूरमध्ये तो एकटाच राहात होता. एका कार डिस्ट्रीब्यूशन कंपनीत नोकरी करत होता. त्यामुळेच त्याला रोज नवी कार टेस्ट ड्राइव्हसाठी मिळत होती. ज्या दिवशी त्याने वैदेहीला मदत केली होती त्यावेळीही तो नवीन स्पोर्ट्स कारच्या टेस्ट ड्राइव्हरच होता. त्याचे आईवडील भारतात असतात. हळूहळू तो घरच्यासारखाच झाला. थोडा हट्टी होता, पण भाबडाही होता. हवं तेच करायचा. पण ते करण्यामागची भूमिका खूप छान समजावून सांगत असे. स्वत:च्या नकळत वैदेही त्यात गुंतत चालली. तिला कळलं होत, सौरभच्या मनातही तिच्यासाठी खास स्थान होतं.

सौरभच्या ऑफिसच्या जवळपास ऑर्चर्ड रोडला वैदेहीचंही ऑफिस होतं. पंधरा दिवसांनी वैदेही ऑफिसला जाऊ लागली. तिची नेण्याआणण्याची जबाबदारी सौरभने स्वत:हून स्वीकारली. कारण अजून पायाचं फ्रॅक्चर दुरुस्त झालेलं नव्हतं. आईबाबांना त्याच्या या मदतीचं कौतुक वाटलं, कृतज्ञताही वाटली.

सौरभची ओळख होऊन सहा महिने झाले होते. तिचा बाविसावा वाढदिवस होता. त्याच दिवशी सौरभने तिला प्रपोज केलं होतं. त्याची प्रपोज करण्याची पद्धतही आगळीवेगळी होती. बहुतेक लोक आपल्या प्रेयसीला पुष्पगुच्छ, अंगठी, नेकलेस किंवा घड्याळ अथवा चॉकलेट देत प्रपोज करतात. सौरभने कारचं एक नवीन अगदी सुबक असं मॉडेल तिच्या हातात ठेवत विचारलं होतं, ‘‘पुढल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास तू माझ्याबरोबर करशील?’’ त्यांच्या डोळ्यांतून, त्याच्या देहबोलीतून तिच्याविषयीचं प्रेम तिला दिसत होतं. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले अन् तिच्या डोळ्यांत बघत परत तोच प्रश्न केला. वैदेहीचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. त्या क्षणी तिला काहीच बोलणं सुधरेना. त्याच्यापासून दूर होत तिने म्हटलं, ‘‘मलाही तुला काही सांगायचंय, उद्या तू बरोबर पाच वाजता ‘गार्डन बाय द वे’मध्ये भेट.’’

ती संपूर्ण रात्र वैदेहीला झोप लागली नाही. सौरभ, त्याने प्रपोज करणं, अजून तिला पुढलं शिक्षणही घ्यायचं आहे. नोकरी, करिअर खूप काही करायचंय. अजून वयही फक्त बावीस वर्षांचं आहे. सौरभ अजून तसा लहान म्हणजे पंचवीस वर्षांचाच आहे, पण ती त्याच्या आकंठ प्रेमात आहे. तिला त्याच्याबरोबरच पुढचं सर्व आयुष्य घालवायचं आहे. पण अजून थोडा वेळ हवाय तिला. खरं तर कधीपासून हे सगळं तिला सौरभला सांगायचं होतं. पण तेच नेमकं सांगता आलं नव्हतं.

बरोबर सायंकाळी पाच वाजता ती ‘गार्डन बाय द वे’ला पोहोचली. सौरभ आलेला नव्हता. तिने त्याचा फोन लावला तो स्विच ऑफ आला. ती त्याची वाट बघत तिथेच थांबली. अर्ध्या तासाने फोन केला तरीही ऑफ…वैदेहीला काय करावं कळेना. प्रथम तिला राग आला. सौरभ असा बेजबाबदारपणे कसा वागू शकतो? आठ वाजायला आले अन् फोन लागेना तेव्हा मात्र तिच्या मनात शंकाकुशंकांनी थैमान मांडलं. काय झालं असावं? ती रडकुंडीला आली. फोन लागलाच नाही अन् त्यानंतर कधीच सौरभचा फोन आला नाही.

दोन वर्षं वैदेही त्याच्या फोनची, त्याची वाट बघत होती. शेवटीआईबाबांनी तिच्यासाठी पसंत केलेल्या मुलाशी आदित्यशी ती विवाहबद्ध झाली. त्याची स्वत:ची ऑडिटिंग फर्म होती. आईवडिलांसह तो सिंगापूरमध्येच राहात होता.

लग्नानंतरही सौरभला विसरायला तिला फार वेळ लागला. कधी ना कधी, कशावरून तरी त्याची आठवण यायचीच. आता कुठे जरा ती सावरली होती तोवर तो असा अचानक आलाय…आता काय हवंय त्याला?

विचारांच्या गुंत्यात हरवलेली वैदेही फोनच्या घंटीने दचकून भानावर आली. नंबर माहितीचा नव्हता. हृदय जोरात धडधडू लागलं…सौरभचाच असावा. भावना अनावर झाल्या. फोन उचलून हॅलो म्हटलं, पलीकडे सौरभच होता. त्याने विचारलं, ‘‘इज दॅट वैदेही?’’ त्याच्या आवाजाने ती मोहरली. अंगभर झणझिण्या उठल्या.

स्वत:ला संयमित करून तिने म्हटलं, ‘‘या..दिस इज वैदेही,’’ मुद्दामच न ओळखल्याचं नाटक करत म्हणाली, ‘‘मे आय नो हूज स्पीकिंग?’’

‘‘कमाल करतेस? मला ओळखलं नाहीस, अगं मी सौरभ…’’ तो नेहमीच्याच स्टाइलने बोलला.

‘‘ओह!’’

‘‘उद्या सायंकाळी पाच वाजता ‘मरीना वे सॅण्डस होटेल’च्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये भेटायला येशील, प्लीज?’’

काही क्षण विचार करून वैदेही उत्तरली, ‘‘हो, तुला भेटायचंय मला. उद्या पाच वाजता येते मी.’’ तिने फोन कट केला.

या क्षणी जर संभाषण वाढलं असतं तर तिचा सगळा राग, सगळा संताप सौरभवर कोसळला असता. तिच्या मनात उठलेल्या वादळाची कल्पनाच कुणी करू शकणार नाही. तिच्या मनात सौरभविषयी प्रेम होतं की राग? त्याला भेटायला ती उत्सुक होती की भेट तिला टाळायची होती? कदाचित दोन्ही असेल…तिचं तिलाच काही कळत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी ती बाहेर जाण्यासाठी आवरत असताना आदित्यने, तिच्या नवऱ्याने विचारलं, ‘‘कुठे निघालीस?’’

‘‘सौरभ आलाय सिंगापूरला…त्याची इच्छा आहे मला भेटायची,’’ वैदेहीने सांगितलं.

‘‘जाऊ की नको जाऊ?’’ तिने आदित्यालाच प्रश्न केला.

‘‘जा ना, जाऊन ये. रात्रीचं जेवण आपण घरीच एकत्र घेऊयात,’’ आदित्यने म्हटलं.

आदित्य सौरभविषयी ऐकून होता. वैदेहीला त्याने संकटात केलेली मदत, त्याचा आनंदी स्वभाव, आर्जवी बोलणं, वैदेहीच्या माहेरी तो सर्वांच्या लाडका होता हेही आदित्यला ठाऊक होतं. त्यामुळेच सौरभला भेटणं यात त्याला काहीच वावगं वाटलं नाही.

फिकट जांभळ्या रंगाच्या सलवार सुटमध्ये वैदेही सुरेख दिसत होती. तिचे लांबसडक केस तिने मोकळे सोडले होते. सौरभला आवडणाराच मेकअप तिने केला होता. हे सगळं तिने मुद्दाम केलं नव्हतं, अभावितपणेच घडलं होतं. अन् मग तिला स्वत:चाच राग आला…की ती सगळं सौरभला आवडणारंच करतेय? सौरभ तिच्या आयुष्यात इतका खोलवर रूतला होता हे तिला आता जाणवलं. त्याच्यात असं गुंतून चालणार नाही हे तिला कळत होतं पण वेडं मन तिच्या ताब्यातच नव्हतं.

बरोबर पाच वाजता ती मरीना बाय सॅण्ड्सच्या रूफ टॉप रेस्टॉरण्टमध्ये पोहोचली. सौरभ तिच्या आधीच येऊन बसला होता. तिला बघताच तो खुर्चीतून उठला अन् त्याने वैदेहीची गळाभेट घेतली. ‘‘सो नाइस टू सी यू आफ्टर अ डिकेड…यू आर लुकिंग गॉर्जियस.’’

वैदेही अजूनही विचारातच होती. पण हसून म्हणाली, ‘‘थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट…आय एम सरप्राइज टू सी यू अॅक्चुअली.’’

सौरभला कळलं तिला काय म्हणायचंय ते. त्याने म्हटलं, ‘‘तू मला क्षमा केली नाहीस…कारण मी त्या दिवशी कबूल करूनही तुला भेटलो नाही. पण नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतल्यावर तुझा राग अन् गैरसमजही दूर होईल.’’

‘‘दहा वर्षं म्हणजे अगदी लहानसा काळ नाही. काय घडलं होतं तेव्हा?’’

एक दीर्घ श्वास घेत सौरभने सांगायला सुरूवात केली. ‘‘ज्या दिवशी मी तुला भेटायला येणार होतो त्याच दिवशी आमच्या कंपनीच्या बॉसला पोलिसांनी पकडून नेलं. स्मगलिंग करत असल्याचा त्याच्यावर आरोप होता. टॉप लेव्हल मॅनेजरलाही रिमांडवर ठेवलं होतं. आमचे फोन, आमचे अकाउंट सगळं सगळं सील करून टाकलं होतं. तीन दिवस सतत विचारपूस चालली होती अन् नंतर कित्येक महिने आम्ही तुरुंगात होतो. दोन वर्षं केस चालली. आम्ही खरं तर अगदी निरपराध होतो, पण तुरुंगात खितपत पडावं लागलं. शेवटी एकदाचे आम्ही निरपराध आहोत हे सिद्ध झालं पण आम्हाला इथून लगेच डिपॉर्ट केलं गेलं. ते दिवस कसे काढले, आमचं आम्हाला ठाऊक!

‘‘आजही आठवण आली की घशाला कोरड पडते. जेव्हा मी भारतात, मुंबईला पोहोचलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मोबाइल नव्हता. कुणाचेही कॉण्टॅक्ट नंबर्स नव्हते. घरी गेलो तेव्हा आई फार सीरियस असल्याचं कळलं. माझा फोन बंद असल्यामुळे घरचे लोक मला कळवूच शकले नव्हते. तिथली परिस्थिती अशी काही विचित्र होती की मी काहीच बोललो नाही. आईने माझ्यासाठी मुलगी बघून ठेवली होती. मरण्यापूर्वी आईला माझं लग्न झालेलं बघायचं होतं. घरीच भटजी बोलावून लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी आई देवाघरी गेली.

‘‘माझी पत्नी फार चांगली निघाली. तिने मला समजून घेतलं. माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगामुळे माझं पोलीस रेकॉर्ड खराब झालं होतं. तिच्या वडिलांनी स्वत:चे सोर्सेस वापरून मला पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ दिलं. खरं सांगतो वैदेही, गेल्या दहा वर्षांत मी सतत तुझी आठवण काढत होतो. पण तुला भेटायला मला जमत नव्हतं. तुझ्या मनातला राग, माझ्याविषयीचा गैरसमज, किल्मिष दूर व्हायला हवं असं फार फार वाटायचं म्हणूनच आज तुझ्याशी सगळं बोललो. तू भेटायला आलीस यात सगळं भरून पावलो. मी तुझा विश्वासघात केला नाही. फक्त दैवाने आपल्याला एकमेकांपासून दूर केलं. एवढंच समजून घे.’’ सौरभने दिलगिरीच्या आवाजात म्हटलं.

वैदेहीने नुसतीच मान डोलावली.

‘‘तू त्या दिवशी मला काय सांगणार होतीस?’’ सौरभने विचारलं…‘‘आज सांगून टाक?’’

‘‘त्या गोष्टीचं आता काहीच महत्त्व नाहीए…चल, आपण कॉफी घेऊयात…’’ मोकळेपणाने हसून वैदेहीने म्हटलं.

दु:ख हे सांगू कुणा मी

मिश्किली * अंजू साने

तुम्ही काय हवं ते करा. फेसबुकवर आपला वाईटातला वाईट फोटो टाका. आपलं स्टेटस कॉम्लिकेटेड ठेवा. चार सहा बॉयफ्रेण्ड्स असल्याचं सांगा किंवा यापेक्षाही अजून काही तरी भन्नाट करा पण, कॉमेडियनशी लग्न करू नका.

आजतागायत मी त्या दुर्देवी क्षणाला शिव्या घालते आहे जेव्हा एका लग्नसमारंभात मी या कॉमेडियनवर भाळले होते. चक्क त्याच्या प्रेमात पडले होते. तो एकामागोमाग एक विनोद, चुटके मजेशीर प्रसंग असे काही रंगवून सांगत होता की हास्यविनोदाचा अखंड धबधबा कोसळत होता. या माणसाशी लग्न केलं तर सौख्याच्या सागरातच डुंबता येईल हा विचार मनात आला, तसा तो आईबापालादेखील सांगितला.

त्यांनी खूप समजावलं. ‘‘तो हसवतो आहे पण अशी मुलं संसार करायला अपात्र असतात. शोरूममधल्या महागड्या काचेच्या वस्तूंसारख्या त्या तिथेच शोभतात. तो तुला रागावणारही नाही कधी, पण विनोदानेच तुझा तासेल…त्याच्याशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक.’’

पण मी त्यांचं म्हणणं साफ धुडकावून लावलं त्याचा आजही मला खूप म्हणजे खूपच पश्तात्ताप होतोय. आता वाटतं किती दुर्देवी, किती अभागी दिवस होता तो…आमचा साखरपुडा झाला होता अन् यांनी सगळ्या उपस्थितांना विनोद सांगून पोट दुखेपर्यंत हसायला लावून दमवलं होतं. मीही गर्वाने पुरीसारखी टम्म फुगले होते.

‘‘किती चांगला नवरा मिळालाय तुला…भाग्यवान आहेस हो…’’ अभिनंदन करताना प्रत्येकाने म्हटलं होतं.

पण लग्न झालं अन् टम्म फुगलेल्या माझ्या पुरीतली हवाच निघून गेली अन् त्याची चपटी पापडी झाली. आमच्या पहिल्या रात्रीलाही ते इतके बोलत होते, इतके विनोद सांगत होते की हसूनहसून माझे गाल अन् पोट दुखायला लागलं.

इथेच विषय थांबला असता तर ठीक होतं. पण त्यांनी माझा मेकअप, माझे दागिने, लग्नात अन् आलेल्या भेटवस्तू सगळ्यांवरच इतके काही विनोद केले की पुन्हा काही मी त्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.

मी दिसते चांगली. माझ्या हसण्यावर तर अख्खं कॉलेज फिदा होतं. त्या माझ्या हसण्यावर यांनी काय म्हणावं. ‘‘तू हसतेस ना, तेव्हा वाटतं की पॉपर्कानचं मशीन ऑन केलंय, मक्याच्या दाण्यांसारखे तुझे दात तडतडत बाहेर येऊन पडतील ही काय असं वाटतं.’’

खरं सांगते, त्या दिवसानंतर मी हसणंच बंद केलं. बंद कणसासारखं तोंड मिटून घेतलं.

माझ्या गोऱ्यापान रंगाचा मला अन् माझ्या आईवडिलांनाही केवढा अभिमान? पण कमेंट करत ते म्हणाले, ‘‘तू अशी झगमगणाऱ्या ट्यूबलाइटसारखी का फिरतेस? फेअर अॅण्ड लव्हलीतून रिचार्ज करून आली आहेस का?’’ संतापाने मी लालपिवळी झाले.

माझे सुंदर केस, माझी नाजूक पावलं कशाचंही त्यांना कौतुक नाही. काही ना काही जिवाला लागेल असंच ते त्याबद्दल बोलतात.

एकदा संतापून मी म्हटलं, ‘काही तरी काम करा ना? नुसतीच बडबड करताय ती?’

गदगदून हसत नवरा म्हणाला, ‘कामच करतोय. बोलणं हेच माझं काम नाही का?’

एकदा मला सोन्याच्या रिंगा घ्यायच्या होत्या. मी दुकानात त्यांना त्या दाखवल्या. मला म्हणतात,  ‘अगं, या काय रिंगा म्हणायच्या? दोन बाळं मजेत घालतील असे झोके आहेत हे. म्हणजे आता आधी आपल्याला जुळं व्हायला हवं. मग आपण हे झोके (झेपाळे) घेऊयात.’

माझा सगळाच उत्साह आता संपलाय. बरं, आता हे सांगू तरी कुणाला?

एकच सांगते, उपवर मुलींनो, कॉमेडियनशी लग्न करू नका…दु:ख हे माझे मला…मी सांगू कुणा अन् कशी…भाळले त्यांच्यावरी अन् चक्क की हो पडले फशी.

किल्मिष

कथा * इंजी. आशा शर्मा

सुमनला ट्यूशनक्लासला जायला उशीर होत होता अन् तिची मैत्रीण नेहा अजून आलेली नव्हती. वैतागलेल्या सुमननं नेहाला फोन लावला तर फोन लागेना. तिनं रागानं स्वत:चा फोन बेडवर आपटला आणि आईचा फोन उचलून त्यावरून फोन करूया असा विचार केला. आईच्या फोनवर एक अनरीड मेसेज दिसला. सहजच पण उत्सुकतेनं तिनं तो मेसेज बघितला. नंबर अननोन होता पण एक शायरी पाठवलेली होती. शायरी म्हटली की ती रोमँटिक असणारच! चुकून काही तरी आलं असेल कुणाकडून असा विचार करून तिनं नेहाला फोन लावला, तेव्हा कळलं की नेहाला आज बरं नाहीए. ती क्लासला येणार नाहीय एवढं सगळं होई तो ट्यूशक्लासची वेळ टळून गेली होती. शेवटी धुसफुसत सुमननं घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. तिनं वह्या, पुस्तकं घेऊन स्टडी टेबल गाठलं खरं पण तिचं मन पुन:पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या रोमँटिक शायरीकडेच वळत होतं.

अभ्यासात मन रमेना. खरोखरंच कुणी पुरूष आईला असे मेसेज पाठवंत असले का? या विचारासरशी तिनं उठून पुन्हा आईचा फोन हातात घेतला. मेसेजेस चेक करताना तिच्या लक्षात आलं की या नंबरवरून आईला एकच नाही तर अनेक मेसेजेस आलेले आहेत.

तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकू आला. घाबरून सुमननं आईचा मोबाइल जागच्याजागी ठेवला अन् ती पुस्तक उघडून अभ्यासाचं नाटक करू लागली.

आई जशी स्वयंपाकघरात गेली तशी सुमननं पटकन् तो नंबर आपल्या वहीत लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी तिनं नेहाच्या मोबाइलवर तो नंबर टाकून बघितला. तर तो कुणा डॉक्टर राकेशचा नंबर होता. कोण आहे हा डॉक्टर राकेश? आईशी याचा काय संबंध? तिनं बराच विचार केला पण हाती काहीच लागलं नाही.

१५ वर्षांची सुमन आईबरोबर राहते. तिचे वडील अत्यंत तडफदार पोलीस ऑफिसर होते. अत्यंत प्रामाणिक आणि कडक. त्यामुळेच त्यांना अपराधी जगतातले शत्रूही भरपूर होते. एकदा एका कारवाई दरम्यान ड्रग माफियांनी त्यांच्या जीपवर ट्रक घातला. त्यात ते मरण पावले. बायको सुशिक्षित असल्यामुळे सरकारी नियमानुसार तिला पोलीस?खात्यात क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. मायलेकींची आर्थिक अडचण दूर झाली. पण सुधा ऑफिसला गेल्यावर सुमन फारच एकटी पडू लागली. सुधाला तिची काळजी वाटायची. काही वर्षं सुमनची आजी येऊन तिच्या जवळ राहिली पण वयपरत्वे ती मृत्यू पावल्यावर पुन्हा तीच अडचण निर्माण झाली.

मायलेकी पुन्हा एकट्या पडल्या. खूप विचार करून सुधानं आपल्या राहत्या घरावर एक मजला अजून चढवला. वन बेडरूम, हॉल, किचन असा छोटासा ब्लॉक तयार करून तो भाड्यानं दिला. डॉ. राणू नावाची एक तरूणी त्यांना भाडेकरू म्हणून मिळाली. ती रात्रपाळी करायची. त्यामुळे दिवसा सुमनला तिची सोबत असे. राणूला या मायलेकींचा अन् या दोघींना तिचा फार आधार होता. सुधाची नोकरी चांगली चालली होती. तिला पदोन्नती अन् पगारवाढही मिळाली होती. सुमन अभ्यासात हुषार होती. तिच्या वडिलांची इच्छा लेकीनं इंजिनियर व्हावं ही होती. सुमननं त्यासाठीच प्री इंजिनियरिंग क्लासेस पण लावले होते. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती शाळेनंतर या ट्यूशनला जात होती. घराजवळच राहणारी तिची मैत्रीण नेहा नेहमी तिच्या सोबत असायची.

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन शाळेत जायला निघाली तेवढ्यात आईच्या मोबाइलवर मेसेज आल्याचा आवाज आला. अभावितपणे सुमनचं लक्ष आधी मोबाइलकडे अन् नंतर आईच्या चेहऱ्याकडे गेलं. आई चक्क हसंत होती…ते बघून तिचा चेहरा कसनुसा झाला. ती तिथंच थबकून उभी राहिली.

‘‘सुमन, अगं बस निघून जाईल,’’ आईनं हाकारलं. तशी ती भानावर आली आणि कळसूत्री बाहुलीप्रमाणे मेनगेटाकडे निघाली.

सायंकाळी घरी येताच सुमननं सर्वात आधी आईचा मोबाइल मागून घेतला. आज पुन्हा तीन रोमँटिक शायरीतले संदेश होते. अरे बापरे! एक व्हॉट्सएप मिस्ड कॉलही होता…पण व्हॉट्सएपवर मेसेज नव्हता… ‘नक्कीच आईनं डिलिट केला असेल.’ सुमननं मनांत म्हटलं अन् तिरस्कारानं मोबाइल पलंगावर फेकला.

सुधा आज ऑफिसातून थोडी लवकर आली होती. तिनं येताना तिच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून सुमनला आवडणारे समोसे आणले होते. चहा बरोबर ते सामासे तिनं सुमनच्या पुढ्यात ठेवले. तेव्हा, ‘‘भूक नाहीए’’ म्हणंत तिनं बशी बाजूला सारली. सुधाला जरा विचित्र वाटलं पण ‘टीनएज मूड’ समजून तिनं त्याची फारशी दखल घेतली नाही.

हल्ली सुधाला जाणवंत होतं की सुमन तिच्याशी मोकळेपणानं बोलत नाहीए. स्वत:ला तिनं आक्रसून घेतलं आहे. एरवी सतत काही ना काही भुणभुण तिच्या मागे लावणारी सुमन अगदी काहीही मागत नाहीए. काही विचारावं तर धड उत्तर देत नाही. झालंय काय या मुलीला? कदाचित अभ्यास आणि या प्रीइंजिनियरिंग टेस्टचं दडपण आलं असावं…सुधा स्वत:चीच समजूत घालायची. जितकी ती सुमनच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करायची तेवढी सुमन तिला झिडकारंत होती.

सुधाला जेव्हा सुमनच्या शाळेतल्या पेरेटंस् टीचर मीटिंगमध्ये सुमनच्या टीचरनं वेगळ्यानं बोलावून विचारलं की सुमनचा काय प्रॉब्लेम झालाय? तेव्हा प्रचंड धक्का बसला. सुमनचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीए. ती कुणा मुलाच्या प्रेमात तर पडली नाहीए ना? वर्गातही कुठल्या तरी तंद्रीत बसून असते. काही म्हटलं तर रडायला लागते. तिला काही शारीरिक मानसिक त्रास नाहीए ना? अन् शेवटी तर तिनं सुधाला उपदेशच केला. ‘‘असं बघा सुधा मॅडम, सुमनची आई आणि वडील तुम्हीच आहात. तिच्याकडे जरा जास्त लक्ष द्या. तिला जास्त वेळ द्या. तिचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून सांगतेय, वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही.’’

सुधाला खूपच लाजल्यासारखं द्ब्रालं. सुमनशी आज बोलायला हवं असं ठरवून ती शाळेतून सरळ स्वत:च्या ऑफिसमध्ये पोहोचली. दुपारी अचानक तीनच्या सुमारास राणूचा फोन आला, ‘‘ताई, ताबडतोब घरी या.’’

‘‘काय झालं?’’

‘‘तुम्ही या, नंतर सांगते?’’ इतकं बोलून तिनं फोन ठेवला.

साहेबांकडून परवानगी घेऊन सुधा ताबडतोब घरी पोहोचली. पलंगावर सुमन अर्धवट शुद्धीत, अर्धवट ग्लानीत पडून होती. डॉ. राणू तिच्याजवळ बसून होती.

‘‘काय झालंय हिला?’’ सुधानं घाबरून विचारलं.

‘‘हिनं झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोज घेतला…मी फ्रीजमधून भाजी घेण्यासाठी इथं खाली आले तेव्हा हिची अवस्था माझ्या लक्षात आली. ताबडतोब मी माझ्या हॉस्टिलमध्ये नेऊन स्टमक वॉश करून घेतला. आता ती अगदी बरी आहे. धोका टळला आहे. थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल.’’ डॉ. राणूनं समजावून सांगितलं.

‘‘पण हिनं असं  का केलं?’’ सुधा व राणू दोघींनाही कळंत नव्हतं.

त्याचवेळी अर्धवट शुद्धीत सुमन बडबडली, ‘‘वाईट चारित्र्य?’’ राणू अन् सुधा विंचू डसल्यासारख्या एकदम किंचाळल्या.

‘‘हो, हो, वाईट चारित्र्य…आई, कोण आहे हा डॉक्टर राकेश जो तुला अश्लील मेसेज अन् रोमँटिक?शायऱ्या पाठवतो.’’ सुमनचा चेहरा रागानं लाल झाला होता.

‘‘डॉक्टर राकेश?’’ सुधा व राणूनं एकमेकींकडे बघितलं.

सुधानं काहीच उत्तर दिलं नाही. ती गप्प बसून राहिली.

‘‘बघितलं? आईकडे काही उत्तर नाहीए ना?’’ अत्यंत तिरस्कारानं सुमननं म्हटलं.

‘‘ताई, तुम्ही आत जा. आपल्या तिघींसाठी छान स्ट्राँग कॉफी करून आणा. तोवर मी या माझ्या लाडक्या मैत्रिणीशी बोलते.’’ राणूच्या शब्दात अधिकार होता.

सुधा तिथून गेल्यावर राणूनं आपला मोर्चा सुमनकडे वळवला.

सुमनचा हात आपल्या हातात घेत राणूनं म्हटलं, ‘‘सुमन, अगं किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस? तुझ्या आईवर असा घाणेरडा आरोप करण्यापूर्वी निदान तिच्याशी किंवा माझ्याशी बोलायचं तरी? सुधा ताई निष्कलंक आहे. हलकट आहे तो डॉक्टर राकेश अन् आईचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. माझा साखरपुडा त्याच्याबरोबर झाला होता. पण नंतर त्याच्या विषयी बरंच काही लोकांकडून कळलं तेव्हा सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी सुधाताईची मदत घेतली. तिच्या मोबाइलवरून मी त्याला काही मेसेजेस दिले अन् मला जसं वाटलं हातं तसंच घडलं. तो मेसेजेस पाठवू लागला. मीच हे प्रकरण थोडं अधिक ताणलं ज्यामुळे आमच्याकडे पुरावा तयार झाला. तो अत्यंत हलकट आणि लंपट आहे याची खात्री पटल्यावर मी तो साखरपुडा मोडला.

यानंतर त्यानं माझा नाद सोडला पण आईच्या मोबाइलवर तो अश्लील मेसेज पाठवू लागला. आम्ही एकदोन दिवसातच आईचा मोबाइल बदलणार होतो म्हणजे त्याचा पिच्छा कायमचा सुटला असता अन् त्याला पोलिसातही देणार होतो तेवढ्यात तू हा असा घोळ घातलास, विचार कर अंग, मी वेळेवर पोहोचले नसते, डॉक्टर नसते, माझे हॉस्पिलमध्ये संबंध नसते, तर काय झालं असतं? वेडा बाई, आईशी नाही पण निदान माझ्याजवळ तरी मन मोकळं करायचंस ना?’’

‘‘उगीच काही तरी बोलून मला फसवू नकोस राणू मावशी. मला ठाऊक आहे, तू आईचा कलंक आपल्यावर घेते आहेस. आईचा त्याच्याशी संबंध नव्हता तर ती त्याचे मेसेज बघून हसायची का?’’

‘‘अगं वेडा बाई, तुझ्या आईला दाखवून मी रोमँटिक मेसेज, माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्याला पाठवत होते, तेच तो आईला पाठवंत होता. म्हणून तिला हसायला यायचं.’’

सुधा कॉफी अन् बिस्किटं घेऊन आली. सुमनला उठायची शक्ती नव्हती. तिनं झोपल्या झेपल्याच हात पसरले. सुधानं तिला मिठीत घेतलं. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राणूचेही डोळे भरून आले. त्या अश्रूत मनांतलं सगळं किल्मिष वाहून गेलं.

पत्नीपुराण

मिश्किली * अजय चौधरी

‘पत्नी’ हा शब्द ऐकताच एकदम हुडहुडी भरते. हातपाय गार पडतात. डोळ्यांपुढे अंधारी येते अन् वाचाही बंद पडते. जणू तिला कुणी कुलुप घातलंय.

लोक म्हणतात की पुरुषप्रधान समाजात स्त्री-स्वातंत्र्याबद्दल कितीही ढोल वाजवले तरीही पुरुषाला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं स्त्रीला नाहीच. पुरुष कोणतीही गोष्ट जेवढ्या सहजपणे अन् मुक्तपणे करतो तसं करणं स्त्रीला शक्यच नाही. पुरुषांना जणू मुक्त जगण्याचा अधिकारच मिळालेला आहे.

म्हणणारे असंही म्हणतात की पुरुषांनी स्त्रीसोबत नेहमीच भेदभाव केला आहे. तो तिला नेहमीच अबला आणि शक्तीहीन समजून कायम तिच्यावर अन्याय व अत्याचार करत आलाय.

तुम्ही जरी हे सगळं खरंय असं म्हटलं तरी माझं मत मात्र अगदी वेगळं आहे. अहो, आपल्या बायकोवर अन्याय किंवा अत्याचार करण्याची हिंमत कुठल्या नवऱ्यात आहे? उलट नवऱ्यावर अत्याचार करण्याचा अधिकार तर कर्मपत्नीकडेच सुरक्षित आहे. उगीचच बिचाऱ्या नवऱ्यांना बदनाम करण्यात काय अर्थ आहे?

खरं सांगायचं तर आजा जगातले ९० टक्के किंवा त्यातूनही अधिक नवरे आपल्या बायकोच्या जाचापायी त्रस्त आहेत. दिल्लीत तर म्हणे पत्नींपीडित पतींची संघटनाच आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केलीय की पतींना पत्नीच्या अत्याचारांपासून वाचवण्यासाठी घटनेत एक नवं कलम ४९८ बी चा समावेश करावा. भारतीय कायद्यात पती व सासूच्या अत्याचारांविरोधात स्त्रियांसाठी कलम ४९८ ए ची सोय आहे.

आमचे एक मित्र आहेत. मिस्टर निकम. अक्षरश: ‘बिच्चारा’ या सदरात ते मोडतात. मुळातच माणूस अत्यंत साधा, सज्जन अन् नम्र अन् त्यांची बायको? देवा देवा! अक्षरश: ज्वालामुखी. बाई महाआक्रस्तानी अन् संतापी. सतत नवऱ्याला धारेवर धरते. बिचाऱ्याचं नाव एव्हाना गिनीज बुकमध्ये यायला हरकत नव्हती. त्यांची करून कथा त्यांच्याच शब्दात ऐका :

‘‘काय सांगू हो तुम्हाला, लग्नाआधी केवळ नेत्रपल्लवी करणारी माझी बायको आता सतत बडबड करत असते. तिच्या जिभेला लगाम घालता येत नाही. कात्रीसारखी तिची जीभ तो लगामही कापून टाकते. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एखाद्या सावकारासारखी ती माझ्या मानगुटीवर बसते. माझा पूर्ण पगार तिच्या हातात पडल्यावरच तिचा आत्मा शांत होतो.’’

एकदा तिच्या तडाख्यातून पगार वाचवण्यासाठी मी एक युक्ती केली. पहिल्या तारखेला स्वत:च ब्लेडने स्वत:चा खिसा कापून घेतला अन् उदास चेहऱ्याने घरी पोहोचलो. मी माझ्या मते पत्नीसमोर उत्तम अभिनय करून खिसा कापला गेल्याचं सांगितलं. डोळ्यात अश्रू वगैरेही आणले. बायको संतापून ओरडली, ‘‘कसले बावळट आहात हो तुम्ही? पाकीटही सांभाळता येत नाही तुम्हाला? कुठल्या खिशात ठेवलं होतं?’’ मी म्हणालो, ‘‘डाव्या खिशात,’’ तर ती म्हणाली, ‘‘उजव्या खिशात ठेवायला काय झालं होतं?’’ आता मी जर म्हटलं असतं की मी उजव्या खिशात पाकीट ठेवलं होतं, तरी ती ओरडली असती की डाव्या खिशात ठेवायला काय झालं होतं? असो. तर शेवटी माझा विश्वास कापला गेला अन् पगार घरी आला नाही हे तिच्या गळी उतरवण्यात मी एकदाचा यशस्वी झालो.

आता आपण हा संपूर्ण महिना आपल्या मर्जीने पैसा खर्च करायचा. जिवाची चंगळ करायची अशी स्वप्नं मला पडायला लागली होती. अर्ध्या रात्री मी गुपचूप उठलो अन् माझ्या ऑफिस बॅगेच्या ज्या चोर कप्प्यात मी पैसे लपवून ठेवले होते तिथून काढायला गेलो. ते पैसे मला एखाद्या सुरक्षित जागी ठेवायचे होते. पण हे काय? मी चोरकप्प्यातून पैशांचं पाकीट काढलं तेव्हा त्यात मला एक चिट्ठी सापडली, ‘‘मला फसवणं किंवा मूर्ख बनवणं तुम्हाला या जन्मात जमणार नाहीए. तुम्हाला याची शिक्षा मिळायलाच हवी. आता हा पूर्ण महिना तुम्ही पायी पायी ऑफिसला जा. हा:हा:हा:…खरोखर तो संपूर्ण महिना मी पदयात्रा केली.’’

हे सगळं ऐकल्यावरही तुम्ही म्हणाल की स्त्रियांवर अत्याचार होतात? अजूनही तुम्ही बायकांचीच कड घ्याल? त्यांचीच तरफदारी कराल? मला तरी बिचाऱ्या नवरे मंडळींचीच दया येते. पत्नीपीडित पतींच्या यादीत फक्त निकमच आहेत असं नाही, तर जगप्रसिद्ध व्यक्तीही अनेक आहेत जे त्यांच्या बायकोमुळे सतत त्रस्त होते. बायकोने त्यांना जगणं नकोसं केलं होतं म्हणे.

‘वॉर एण्ड पीस’सारखं साहित्य निर्माण करणारे काउंट लियो टॉलस्टॉयही बायकोपायी त्रस्त होते. १९१० साली ऑक्टोबरच्या एका गोठवणाऱ्या थंडीत रात्री ते बायकोपासून पळून दुसऱ्या ठिकाणी गेले अन् ती थंडी बाधून न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना मृत्यू आला. मरणासन्न अवस्थेत असताना म्हणे त्यांनी त्यांच्या जवळ असणाऱ्या लोकांना विनंती केली होती की त्यांच्या पत्नीला त्यांच्या समोर येऊ देऊ नये

तुझ्या विना

कथा द्य डा. नीरजा सदाशीव

माहेरी जाऊन परत आलेली हर्षा अचानकच खूप बदलली होती. उल्हास ऑफिसला जायला निघाला की पूर्वी हर्षा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे. ब्रेकफास्ट, टिफिन, टाय, मोबाइल, वॉलेट, पेन, रूमाल, सगळं सगळं जागेवर मिळायचं. अंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं. घालायचे कपडे, टॉवेल बाथरूममध्येच ठेवलेले असायचे. ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूममध्ये पलंगावर तयार असायचे. बुटांना पॉलिश, संध्याकाळी चविष्ट जेवण, रविवारची खास फीस्ट, व्यवस्थित, स्वच्छ घर अन् हसरी, प्रसन्न, सदैव चैतन्यानं रसरसलेली मालकीण हर्षा…सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी हर्षा आता अशी का वागते आहे हे उल्हासला कळत नव्हतं.

सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर अन् जागेवर मिळत नव्हती. विचारलं तर उलट उत्तर मिळायचं, ‘‘स्वत: करायला काय हरकत आहे? मी एकटीनं किती अन् काय काय करायचं?’’ उल्हासच्या मनात हल्ली वेडेवाकडे विचार यायला लागले होते.

मध्यंतरी उल्हासला जरा बरं नव्हतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती. हर्षाला तिचं येणं आवडलं नाही का? तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का? त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागलीय? की हर्षाची ती नवी पारूल वहिनी? तिनं काही मनात भरवून दिलंय का? तशी ती जरा आगाऊच वाटते…की एकत्र कुटुंबात, भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती. इथं फार एकटी पडते…सध्या ऑफिसचं काम फार वाढलंय, बराच वेळ ऑफिसात जातो, घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होते का? एखादं मूल असतं, तरी जीव रमला असता पण सध्या नको, दोन वर्षांनी बाळ येऊ दे, हे? प्लॅनिंगही तिचंच होतं…काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते? उल्हासचे विचार सुरू होते.

‘‘उल्हास स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेव. मला यायला उशिर होईल. मी मैत्रिणीकडे भिशीला जातेय,’’ रूक्षपणे हर्षानं सांगितलं.

‘‘कमाल आहे? रविवारी कशी भिशी पार्टी ठेवलीए? एकच दिवस नवरे मंडळी घरात असतात.’’

‘‘अन् आम्ही रोज रोज घरात असतो त्याचं काय? अन् हे बघ, कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत ते जरा आवर. सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस तू? मला समजतोस तरी काय?’’ धडाम् आवाजानं दार बंद झालं.

उल्हास विचार करतोय, पूर्वीही तो असेच कपडे टाकून जायचा. तेव्हा तर हर्षा कटकट न करता सगळं आवरायची. आत्ताच काय घडलंय ज्यामुळे ती नाराज असते, चिडचिड करते…ठीक आहे, आता तो स्वत:ची कामं स्वत:च करेल. तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार.

कसं बसं उल्हासनं जेवण आटोपलं. हर्षाच्या हातचा स्वयंपाक नेहमीच चविष्ट असायचा. अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची. तिच्या हातचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवायची सवय सुटली होती. पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो, कधी तिखट असतो. पोळ्या कच्च्या तरी, जळक्या किंवा वातड, काय झालंय तिला? असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती. विचार करून दमला होता उल्हास.

मग स्वत:चीच समजूत घालत पुटपुटला. ‘‘चल राजा, होस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. आज हर्षाला खुश करायला काही तरी छानसा, पदार्थ तयार कर. नाही तरी तिला परत यायला उशीर होणार आहे.’’

झकास डिनर तयार ठेवला तर तिला आनंद होईल. तेवढ्यात त्याला आठवलं की हर्षाला आमीरखानचे सिनेमे आवडतात. त्यानं आधी ‘दंगल’ सिनेमाची तिकिट बुक केली. हल्ली ही ऑनलाइनची सोय फारच छान झाली आहे. मग दोघांना आवडणारा स्वयंपाकपण केला.

हर्षा आली अन् उल्हासनं केलेले काम बघून मनातून खूपच आनंदली. पण वरकरणी काही दाखवलं नाही. कारण हर्षाला हेच हवं होतं. उल्हासनं स्वावलंबी व्हावं. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचं तिच्यावाचून अडायला नको. उल्हासनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं. पण जेवताना हर्षा चकार शब्दही बोलली नाही. सिनेमा बघतानाही ती अगदी गप्प होती.

‘‘हर्षा, नेमकं काय झालंय, अगं मला काही तरी कळू देत, माझं काही चुकलंय का? चुकतंय का? की हल्ली मीच तुला आवडेनासा झालोय?’’

त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता हर्षा म्हणाली, ‘‘अरे, तुला हिंदी सिनेमे आवडत नाहीत तर माझायासाठी तू तिकिटं काढायला नको होतीस. खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचास. उगीच माझ्यासाठी बळजबरी हिंदी सिनेमा बघितलास…’’

उल्हास चकित झाला. जी हर्षा, त्याच्या मित्रांसोबत इंग्लिश मूव्ही बघण्यामुळे करवादायची तीच आज असं बोलतेय? का ती अशी त्याच्यापासून दूर जातेय? तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का? छे छे, त्यानं मान हलवून मनातला तो घाणेरडा संशय झटकून टाकला. असा विचार त्याच्या मनात आलाच कसा? हर्षाचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो. ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. ठीक आहे तिला वाटतंय ना की उल्हासनं स्वत:ची कामं स्वत:च करावीत? तर, तो ते करेल. मग हर्षा आनंदेल अन् त्याची हर्षा त्याला परत मिळेल.

या दोन तीन महिन्यात उल्हासनं स्वत:त खूप बदल घडवून आणला. स्वत:चे रोजचे कपडे तो रोज धुवायचा, वाळत घालायचा. बाकी कपडे तो रविवारी धुवायचा. काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा, काहींना स्वत:च घरी इस्त्री करायचा. घड्याळ, वॉलेट, रूमाल, फोन चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपर्वक ठेवायचा. हर्षाला आता इकडे बघावंच लागत नव्हतं. ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल अन् बेडरूमही आवरून ठेवायचा. स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती.

‘‘हर्षाराणी, आता तर खूष आहेस ना?’’ त्यानं विचारलं की हर्षा हळूच हसायची. पण आतून तिचं मन रडत असायचं. त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा.

‘‘उल्हास, नवा इंग्लिश सिनेमा आलाय, मित्रांबरोबर बघून ये ना.’’ हर्षानं म्हटलं.

‘‘हर्षा, तू मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस. मला कळंतच नाहीए गं, सांग ना तुझा आनंद कशात आहे? काय करू मी? मी तुझ्या लायकीचा नाहीए असं तुला वाटतं का?’’

‘‘नाही रे उल्हास, तू तर खूपच लायक अन् योग्य मुलगा आहेस. खरं तर तुझ्या लिलामावशीनं तिच्या नणंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती. तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती. तिचं अजून लग्न झालं नाहीए. माझ्याशी तू लग्न केल्यामुळे लिला मावशी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे. तू तिचा राग घालव बाबा.’’

‘‘काही तरी जुनं उकरून काढू नकोस. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. आपण एकमेकांना पसंत केलं…लग्न केलं…मजेत चाललंय आपलं तर लिला मावशी मध्येच कुठून आली? बरं, निघतो मी ऑफिसला, उशीर होतोय. सायंकाळी बोलूयात…रिलॅक्स!’’ अन् मग निघता निघता तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला, ‘‘तू हवं ते कर, मी तर तुझ्यावर प्रेम करतो, करत राहीन. सी यू हनी…’’

‘‘तेच तर मला नकोय उल्हास, मला तुला काही सांगताही येत नाहीए रे,’’ हर्षा किती तरी वेळ रडत होती, तिला उद्याच मुंबईला जायचंय. पुन्हा परत न येण्यासाठी. कसंबसं स्वत:ला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली. सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडस झालं नाही. रात्री हर्षा बेचैन होती. कूस बदलत होती.

‘‘तुला बरं वाटत नाहीए का हर्षा?’’ उल्हासनं तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळानं चहा करून दिला. तिचं डोकं चेपून दिलं.

‘‘डॉक्टरांना बोलावू का?’’

‘‘नको रे, डोकं दुखतंय जरा, बरं वाटेल. झोप तू.’’

उल्हासनं तेलाची बाटली आणली. ‘‘डोक्यावर तेल थापतो. मसाज केल्यावर बरं वाटेल.’’ तो म्हणाला.

बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं, वाकून काढलं तेव्हा खाली सूटकेस दिसली.

‘‘ही बॅग कोणाची? कोण जातंय?’’

‘‘अरे हो, उल्हास, मला उद्या मुंबईला जायचंय. माझा भाऊ येतोय मला घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना रूचीरा…तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे. कुणी नाहीए मदतीला. खूप घाबरली आहे ती. खूप नर्व्हस झालीय. तिच्या मदतीला जातेय मी. तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली, मीच म्हटलं काही गरज नाहीए. उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही. महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी. उल्हास तर आता इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्यावाचून सहज राहू शकतो. खरंच ना उल्हास?’’ ती हसली पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं.

‘‘अरे, एकटं राहण्याची सवय हवीय. एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे. रडत बसून कसं भागेल?’’ ती पुन्हा हसली.

‘‘गप्प रहा. मूर्खासारखं काही तरी बोलू नकोस. तू जातेस तर जा. अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग. लग्नाला जातेस, दहा दिवस खूप झाले…बरं पंधरा दिवस…पण रोज फोन करायचा. चल झोप…फार उशीर झालाय.’’

सकाळी आठ वाजता अभी आला. ‘‘ताई कुठाय?’’

‘‘अरे,काल तिला बरं वाटत नव्हतं. उशीरा झोपली. म्हणून उठवलं नाही.’’

‘‘पण भावजी, उशीर नको व्हायला, फ्लाइट चुकायची नाही तर.’’

‘‘तू उठव, मी चहा ठेवलाय. कालच मला कळलं हे मुंबईचं. मी चहाचा ट्रे घेऊन आलोच.’’

हर्षा तेवढ्यात उठून बसली. ‘‘व्हायचा तो उशीर झालाच आहे,’’ ती म्हणाली.

‘‘तू तिथं अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायचे होते. जीजूंनाही सांगायला हवं होतं.’’ अभीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

‘‘अरे वेळ कमी होता. उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता. त्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी करायला मी इथं आले. माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला. तू शांत हो…’’

अभीनं डोळे पुसले. उल्हास चहा घेऊन आला. चहा घेऊन दोघं निघालीच निघता निघताही हर्षा उल्हासला ढीगभर सूचना देत होती. शेवटी बजावलं, ‘‘मला सारखा फोन करू नकोस. मैत्रीणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘आता तू माझी काळजी करू नकोस. अजिबात टेंशन घेऊ नकोस. मैत्रिणीकडे लग्नाला, मदतीला जाते आहेस, आनंदात जा. मी सगळं मॅनेज करतो. अगदी राजासारखा राहतो बघ.’’

एयरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता. आत जाताना त्याचा हात सोडला अन् तिला वाटलं, तिचं सर्वस्व हातातून निसटलं. डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं, हळूच बाय म्हटलं अन् भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला. रडू कसंबसं आवरलं.

हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते. ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मीटिंग आहे. त्याला खूप आनंद झाला. त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राइज देऊयात.

हर्षाच्या घरी पोहोचला उल्हास, ‘‘अरे अभी, मला रूचीचा फोन दे. हर्षाला सरप्राइज देणार आहे. माझी उद्या मीटिंग आहे सकाळी, म्हणून मी आलोय.’’

‘‘चला, मी तिकडेच निघालोय.’’ तो म्हणाला.

‘‘थांब, आईंना भेटून घेतो.’’ उल्हासनं म्हटलं.

‘‘सगळे तिथंच आहेत, चला.’’

टॅक्सी भराभर मार्ग कापत जात होती. ‘‘अरे इकडं कुठं? टाटा मेमोरियलमध्ये लग्न?’’ उल्हासला काहीच सुधरेना…‘‘हर्षाला काय झालंय?’’

त्याचा हात धरून अभी त्याला हर्षापाशी घेऊन आला. ‘‘सॉरी ताई, जीजू अवचित आले म्हणून मग…’’ मग त्याला पुढे बोलवेना.

हर्षाच्या डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती. त्याला बघून तिला समाधान वाटलं, ‘‘आता मी सुखानं मरते.’’ तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले.

‘‘हर्षा, हर्षा…मी तुला मरू देणार नाही. तुला काहीही होणार नाही…तू मला सांगितलं का नाहीस? डॉक्टर डॉक्टर धावा…’’

‘‘तुम्ही जरा बाहेर निघा. धीरानं घ्या. मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं, मुळात यायला फार उशीर केला त्यांनी. आता काही नाही होणार…’’

‘‘असं म्हणू नका डॉक्टर, तुम्हाला जमत नसेल, तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो. ती बरी होणार. तुम्ही ताबडतोब डिसचार्ज द्या. हर्षा, मी तुला काही होऊ देणार नाही…आलोच मी…’’ उल्हास बाहेर धावला.

पूर्ण प्रयत्नांनी त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली. दोनच दिवसांनी तो हर्षासह लुफ्तहंसाच्या विमानात होता. त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती.

‘‘हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाहीए.’’ त्यानं हळूवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं अन् नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं. मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आले होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें