कथा * सुधा काळेले
मुलगा अन् त्याच्या घरचे लोक पारुलताईंना बघायला येऊन गेले. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ताई त्यांना पसंत नसाव्यात असं जाणवलं होतं. खरं तर ताईंना नाकारावं असं त्यांच्यात काहीच नव्हतं. उंच सडसडीत बांधा, उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, आकर्षक नाक डोळे, फक्त रंग सावळा होता. ताई, स्वभावानेही नम्र, आनंदी अन् कुणाच्याही मदतीला धावून जाणाऱ्या होत्या. पण लग्न मात्र ठरत नव्हतं. ‘‘ठीक आहे. योग आला की पटकन् ठरेलच लग्न.’’ असं म्हणून जवळचे नातलग आईबाबांना धीर द्यायचे. पण ताई मात्र मिटून जायच्या. मनातल्या मनात खंतावत राहायच्या. त्यांचं वयही वाढत होतं.
या मे महिन्यात पारुल तीस वर्षांची होईल. वय वाढतं तसं स्थळ मिळणं अधिकच अवघड होईल. हाच एक विचार सतत आईबाबांची झोप उडवत होता.
आमची कुचंबणा बघून काही दुष्ट, विघ्नसंतोषी नातलगांनी, परिचितांनी जी काही स्थळं सुचवली ते बघून त्यांच्या वृत्तीची अन् बुद्धीची कीव करावीशी वाटली. कुणी तरी फीट्स येणाऱ्या मुलाचं तर कुणी तरी पैसे खाण्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेल्या मुलाचंही स्थळ सुचवलं होतं. सावळा रंग आहे म्हणून काय वाट्टेल त्याला आम्ही आमच्या पारुलताई थोडीच देणार होतो?
माझे पती रवी पारुलताईंहून दोनच वर्षं लहान. ताईंचं लग्न लवकर ठरेना म्हणताना मग सासूसाऱ्यांनी म्हणजे आईबाबांनी रवीच्या लग्नाचा निर्णय घेतला. आमचा प्रेमविवाह होता. लग्न लवकर व्हावं ही माझ्या आईबाबांची घाई होती. ठरवून तरी किती दिवस ठेवायचं ना? शेवटी आमचं लग्न झालं.
रवी अन् पारुलताईंचं एकमेकांवर खूप माया होती. रवीने मला आधीच बजावलं होतं की पारुलताईला या घरात ती बिनलग्नाची मुलगी म्हणून ओझं वाटतेय असं कधी जाणवून द्यायचं नाही. कोणताही निर्णय प्रथम तिचं मत विचारायचं. मोठी बहीण, थोरली नणंद म्हणून तिचा योग्य तो मान राखला गेलाच पाहिजे. पारुलताई मला पहिल्या भेटीतच आवडल्या. मी माझ्या घरात आईवडिलांची एकटीच मुलगी होते. त्यामुळेच मला तर पारुलताईंच्या रूपात मोठी बहीणच मिळाली जणू. तीही माझ्यावर खूप माया करायची. माझं कोडकौतुक पुरवायची.