डेबिट कार्ड

कथा * रितु वर्मा

सौम्याच्या मोबाईलवर एकामागून एक २ मेसेज आले. तिने पाहिले की, विवेकने तिच्या खात्यातून रुपये १५ हजार काढले होते. हे आजचेच नव्हे तर रोजचेच झाले होते. सौम्याच्या पैशांवर आपला अधिकार आहे, असे विवेकला वाटायचे.

सौम्या आजही त्या दिवसाला नावं ठेवते जेव्हा तिने प्रेमात आंधळे होऊन लग्नाच्या पहिल्याच रात्री विवेकला तिचे तन, मन आणि धन अर्पण केले होते.

विवेक आणि सौम्या लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत होते. दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरच्यांचाही लग्नाला विरोध नव्हता.

प्रेमात आकंठ बुडालेल्या सौम्याने पत्नीचे कर्तव्य पार पाडत विवेकच्या हातात तिच्या आर्थिक स्वावलंबनाची सूत्रे सोपवली होती. ही तीच सौम्या होती जी लग्नाआधी स्त्रीमुक्तीबद्दल बोलत होती आणि न जाणो अशा कितीतरी मोठया गोष्टी करायची.

सुरुवातीचे काही महिने सौम्याला काहीच फरक वाटला नाही, पण लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी काही दिवस राहायला जाताना ती विवेकला म्हणाली, ‘‘विवेक, मला पैशांची गरज आहे, मला माझ्या माहेरच्यांसाठी भेटवस्तू घ्यायच्या आहेत.’’

विवेक हसत म्हणाला, ‘‘तू तुझ्या घरच्यांवर उपकाराचे ओझे का ठेवतेस? मुलीकडून कोणी काही घेत नाही. आता पैशांचे म्हणशील तर, प्रिये तू तुझ्या घरी जाणार आहेस. तू तिथली राजकुमारी आहेस. तुला पैशांची गरज काय?’’

‘‘अरे, पण माझेही काही खर्च आहेत,’’ सौम्या म्हणाली. ‘‘लग्नाच्या आधी मी कधीच माझ्या आई-वडिलांकडे पैशांसाठी हात पुढे केला नाही, मग आता त्यांच्याकडे पैसे मागणे बरं दिसेल का?’’

विवेकने सौम्याला उपकार केल्याप्रमाणे रुपये ५ हजार रुपये दिले. त्यावेळी पहिल्यांदाच सौम्याला वाटले की, कदाचित विवेकला डेबिट कार्ड देऊन तिने चूक केली आहे.

माहेरी गेल्यावर सौम्या मौजमजेत सर्व विसरून गेली. तिच्या वडिलांची ती लाडकी होती, त्यामुळे ती सासरी परत आली तेव्हा तिची पर्स नोटांनी भरलेली होती. काही दिवस सौम्याची पर्स नोटांनी भरलेलीच होती. त्यानंतर पैसे संपले. पुढच्या महिन्यात सौम्याला पार्लरमध्ये जायचे होते तेव्हा तिने विवेककडे पैसे मागितले. विवेकने रुपये एक हजार रुपये दिले.

सौम्या म्हणाली, ‘‘अरे, एवढयाशा पैशांत काही होणार नाही.’’

‘‘कोणतेही फेशियल रुपये १,२०० रुपयांहून कमी किमतीत येत नाही. मला तर वॅक्सिंग, भुवया, ब्लीचही करायचे आहे, याशिवाय केसांना हायलाइट करायचाही माझा विचार आहे.’’

विवेक काही बोलण्याआधीच सौम्याची सासू कल्पना म्हणाल्या, ‘‘अगं माझी सौम्या मुळातच इतकी सुंदर आहे… उगाच पार्लरमध्ये जाऊन तुझे नैसर्गिक सौंदर्य खराब करू नकोस.’’

सौम्याने विवेककडे पाहिले. तो म्हणाला, ‘‘फक्त भुवया आणि थोडे केस ट्रिम कर, उरलेले पैसे तुझ्याकडेच ठेव.’’

सौम्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजले नाही. ती शांतपणे पार्लरमध्ये गेली आणि त्यानंतर बाजारात गेली. तिथे अतिशय सुंदर कुर्ते होते. त्यातील एकावर तिची नजर स्थिरावली. राखाडी कुर्ता आणि प्लाझावर लाल फुले, त्यावर लाल आणि राखाडी रंगाचे मिश्रण असलेला दुपट्टा होता. सौम्याने त्यावरील किंमतीचा रुपये १,५०० रुपयांचा टॅग बघितला आणि दीर्घ श्वास टाकला.

घरी आल्यानंतर सौम्याने विवेकला त्या कुर्त्याबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुझी ही उधळपट्टी थांबवण्यासाठीच मी तुझे डेबिट कार्ड माझ्याकडे ठेवले आहे.’’

एके दिवशी सौम्या तिच्या डेबिट कार्डबद्दल तिच्या आईशी बोलली तेव्हा आई म्हणाली, ‘‘त्यात काय एवढे? तुला तो कोणत्या गोष्टीची उणीव तर भासू देत नाही ना?’’

सौम्या म्हणाली, ‘‘आई, हा माझ्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे…ते माझे पैसे आहेत आणि मी माझे पैसे वाटेल तसे खर्च करू शकते.’’

आई म्हणाली, ‘‘तू उधळपट्टी करत असल्यामुळेच विवेक असा वागत असेल.’’

सौम्याला वाटू लागले होते की, कदाचित ती चुकीची आणि विवेक बरोबर आहे. तरीही रोज विवेक समोर हात पसरणे तिला आवडत नव्हते. जेव्हा कधी ती विवेकला तिचे डेबिट कार्ड परत करायला सांगायची तेव्हा तो नेहमी म्हणायचा, ‘‘मी चुकीचा असतो तर तुझे आईवडील गप्प बसले असते का?’’

तो शुक्रवारचा दिवस होता. सौम्याच्या कामावरील सर्वांनी शॉपिंग आणि बाहेर फिरायला जायचे ठरवले होते. जयंतीने सौम्याला विचारले, ‘‘तूही येणार ना?’’

‘‘हो, मी येईन, पण आज मी माझे पाकिट घरीच विसरले आहे,’’ सौम्या म्हणाली.

जयंती हसून म्हणाली, ‘‘त्यात काय एवढे? माझे कार्ड स्वाइप कर.’’

त्या दिवशी सौम्याने खूप मजा केली. सर्व खर्च विभागून घेण्यात आला. सौम्याच्या वाटयाला खाण्यासाठीचा रुपये 2 हजार खर्च आला. सौम्याने रुपये २ हजार रुपयांचा ड्रेसही खरेदी केला.

रात्री ११ वाजता सौम्या घरी परतली तेव्हा सर्व झोपले होते. विवेकने सौम्याकडे बघत विचारले, ‘‘तू दारू प्यायली आहेस का?’’

सौम्या हसत म्हणाली, ‘‘याआधीही मी दर शुक्रवारी रात्री अशीच दारू प्यायचे, हे विसरलास का?’’

‘‘हो, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती,’’ विवेक म्हणाला.

‘‘आता आपले लग्न झाले आहे… आपल्यावर घरच्या जबाबदाऱ्या आहेत. तुझ्या अशा उधळपट्टीमुळेच मी तुझे डेबिट कार्ड तुला देत नाही.

सौम्या म्हणाली, ‘‘मी आज जयंतीकडून रुपये ४ हजार घेऊन ते खर्च केले.’’

विवेक रागाने म्हणाला, ‘‘काय गरज होती? जयंतीसारख्या मुलींच्या मागे-पुढे कोणी नाही. त्यांना फुलपाखरासारखे स्वछंद जगायला आवडते, जेणेकरून नवीन बकरा कापता येईल.’’

विवेकचे जयंतीबद्दलचे असे बोलणे सौम्याला आवडले नाही.

सोमवारी दिवसभर सौम्या जयंतीपासून नजर चोरत होती. सौम्याला पै पै साठी असे नजर खाली घालून जगणे मान्य नव्हते.

सौम्याने याबद्दल जयंतीला सांगितले. जयंती म्हणाली, ‘‘तू हे सर्व का सहन करतेस? आजच माझ्यासोबत बँकेत चल आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज कर.’’

सौम्या म्हणाली, ‘‘पण असे वागणे योग्य ठरेल का?’’

‘‘काय बरोबर आणि काय चूक हा प्रश्नच येत नाही, मुळात प्रश्न तुझ्या मूलभूत अधिकाराचा आहे,’’ जयंती म्हणाली.

सौम्या तिच्यासोबत बँकेत गेली आणि नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज दिला.

दुसऱ्या दिवशी सौम्या कार्यालयातून आली तेव्हा विवेकने रागाने विचारले, ‘‘तुझे डेबिट कार्ड ब्लॉक झाले आहे का?’’

सौम्या न घाबरता म्हणाली, ‘‘हो, कारण मला माझी कमाई माझ्या पद्धतीने खर्च करायची आहे.’’

विवेकची आई कल्पना म्हणाल्या, ‘‘तुला काय कमी आहे, सौम्या? विवेक, म्हणूनच मी अशा आगाऊ मुलीशी तुझे लग्न लावून देण्याच्या विरोधात होती.’’

‘‘सौम्या, मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना मोठया कष्टाने आपल्या लग्नासाठी तयार केले होते,’’ विवेक म्हणाला, ‘‘तुझा माझ्यावर विश्वासच नाही का?’’

सौम्या म्हणाली, ‘‘जर डेबिट कार्ड देऊन विश्वास जिंकता येत असेन तर तू तुझे डेबिट कार्ड दे, मी तुला माझे देईन.’’

विवेक पाय आपटत आत निघून गेला. त्यानंतर घरातल्या सर्वांनी सौम्याशी बोलणे बंद केले. सौम्याच्या महेरच्यांनाही यात सौम्याची चूक आहे, असे वाटत होते.

जेव्हा हे सर्व सौम्याच्या सहनशक्ती पलीकडे गेले तेव्हा ती जयंतीकडे राहायला गेली. जयंती ही ३५ वर्षीय घटस्फोटित महिला होती, जी स्वत:च्या मर्जीनुसार आयुष्य जगत होती.

सौम्याला तिचे नवीन डेबिट कार्ड मिळाले होते. सर्वप्रथम तिने जयंतीचे पैसे परत केले आणि नंतर जयंतीला जेवायला नेले.

विवेक आधीच त्याच्या क्लायंटसोबत तिथे बसला होता. सौम्याला जयंतीसोबत बघून त्याचा राग अनावर झाला. तो सौम्याच्या जवळ जात म्हणाला, ‘‘तुला अशा मौजमस्तीसाठी कार्ड हवे होते का? अजूनही वेळ गेलेली नाही, वेळीच डोळे उघड, नाहीतर तुझीही अवस्था जयंतीसारखीच होईल.’’

सौम्या शांतपणे ऐकत होती. विवेक निघून गेल्यावर ती रडू लागली.

जयंती तिला समजावत म्हणाली, ‘‘तुला असे वाटते का, की तू पुन्हा तेच गुलामीचे आयुष्य जगू शकतेस? जर तुझे उत्तर ‘हो’ असेन तर नक्कीच परत जा.’’

जयंती म्हणाली, ‘‘स्वत:ला गमावून तुला विवेकला मिळवायचे असेल तर तू आजच परत जा, पण स्वत:साठी आनंदी जीवन जगायचे असेल तर थोडा त्रास नक्कीच होईल, पण अखेर त्याचा परिणाम आनंददायी असेल.’’

विवेकने सुरुवातीला सौम्याला धमकावले, पण जेव्हा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही तेव्हा त्याने पुन्हा तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण सौम्या मागे हटली नाही त्यामुळे विवेक घाबरला.

डेबिट कार्डमुळे विवेकलाही आपले लग्न पणाला लावायचे नव्हते. एका सामान्य पतीप्रमाणे त्याला सौम्याच्या प्रत्येक गोष्टीवर स्वत:चा हक्क वाटत होता, पण त्यामुळे सौम्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत आहे, हे तो विसरला.

विवेकने शुक्रवारी रात्री सौम्याला फोन करून जेवायला बोलावले. सौम्या गेली तेव्हा विवेक तिची वाट बघत बसला होता.

विवेक सौम्याला म्हणाला, ‘‘सौम्या मला माफ कर, लग्नानंतर मी माझ्या सीमा विसरलो होतो. खरं सांगायचे तर, जेव्हा तू स्वत: मला तुझे डेबिट कार्ड दिलेस तेव्हा मला वाटले की, कदाचित मी तुझे संपूर्ण आयुष्य माझ्या स्वत:च्या मर्जीनुसार तुला जगायला लावू शकतो. मेहनत न करता तुझ्या डेबिट कार्डमधून पैसे काढताना मला आनंद व्हायचा, पण आता माझ्या लक्षात आले आहे की, ती माझी चूक होती.’’

सौम्या म्हणाली, ‘‘यासाठी आपण जयंतीचे आभार मानले पाहिजेत जिने मला माझ्या अधिकारांसाठी लढायला शिकवले, अन्यथा मी तुझ्याकडे माझा हक्क मागून काहीतरी चुकीचे करत आहे असे मला वाटत होते.’’

वेटरने बिल आणल्यावर विवेक म्हणाला, ‘‘बाईसाहेब, आज हे बिल भरायला आवडेल का?’’

सौम्याने हसून तिचे डेबिट कार्ड स्वाइप केले.

अखेरची भेट

 * गरिमा पंकज

‘‘माझी एक इच्छा आहे, मला वचन दे तू ती पूर्ण करशील,’’ जान्हवीची नजर माझ्या चेहऱ्यावर स्थिरावली होती.

‘‘मला सांग, काहीही झाले तरी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. तू फक्त सांगून तर बघ,’’ मी भावनाविवश होत म्हटले.

‘‘बरं मग मी सांगते,’’ असे म्हणत ती माझ्या जवळ आली. तिच्या डोळयांत माझ्यासाठी जणू प्रेमाचा सागर होता. मला हे जाणवत होते की, तिच्या शांत, आनंदी, निळया डोळयांत माझ्यासाठीचे प्रेम ओसंडून वाहात होते… माझ्या मिठीत गुरफटून तिने माझ्या ओठांना हळूवार स्पर्श केला.

तो क्षण अद्वितीय होता. आयुष्यातला सर्वात सुंदर आणि अनमोल क्षण जो काही काळ असाच आम्हा दोघांच्या मिठीत स्थिरावला होता… आणि मग ती हसत हळूवारपणे बाजूला झाली आणि म्हणाली, ‘‘फक्त हा जो क्षण होता तोच मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी अनुभवायचा आहे. मला वचन दे की, मी तुला सोडून जाणार असेन त्या क्षणी तू माझ्या जवळ असशील. तुझ्या प्रेमळ मिठीतच मी माझा शेवटचा श्वास घेईन.’’

तिचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. मी भावनाविवश होत म्हणालो, ‘‘मी वचन देतो, पण अशी वेळ मी येऊच देणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. मी एकटा राहून काय करणार?’’ असे म्हणत मी तिला माझ्या मिठीत घेतले.

तिच्या जाण्याच्या नुसत्या कल्पनेने माझे हृदय वेगाने धडधडू लागले. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. माझे जीवन माझी जान्हवी होती.

महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मी ज्या मुलीच्या प्रेमात पडलो ती जान्हवी होती. तिला पहिल्यांदा पाहिले आणि बघतच राहिलो. असे म्हणतात की, हे पहिल्या नजरेतील प्रेम असते जे मी आतापर्यंत फक्त चित्रपटांमध्ये पाहिले होते. मी मात्र ही गोष्ट नेहमी चेष्टेने घ्यायचो, पण जेव्हा माझ्यासोबत असे घडले तेव्हा आपण कायमचे कोणाचे तरी कसे होऊन जातो, हे मी प्रत्यक्ष अनुभवले. जान्हवी आणि माझी मैत्री संपूर्ण महाविद्यालयात प्रसिद्ध होती. माझ्या कुटुंबीयांनीही आमच्या प्रेमाला तत्परतेने मान्यता दिली. मी वैद्यकीय शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेलो आणि जान्हवी दिल्लीत राहिली. काही वर्षे आम्ही एकमेकांपासून दूर होतो, पण मनाने एकमेकांशी जोडलेले होतो.

शिक्षण पूर्ण करून मी परत आलो तेव्हा लगेचच एका चांगल्या रुग्णालयात रुजू झालो. जान्हवीही एका कंपनीत काम करत होती. आणखी उशीर न करता आम्ही लग्न केले. आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो.

एके दिवशी सकाळीच जान्हवी माझ्या मिठीत शिरली आणि हळूच म्हणाली, ‘‘नवरोबा आता तयारीला लागा. लवकरच तुला घोडा व्हावे लागेल.’’

तिचे असे विचित्र बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘‘असे काय बोलतेस? घोडा आणि मी? का, कशासाठी?’’

‘‘तू तुझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणार नाहीस का?’’ असे मला विचारताना जान्हवी लाजली. तिला काय सांगायचंय ते माझ्या लक्षात आले. मी आनंदाने उडी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. तिचा हात धरून म्हणालो, ‘‘आज तू मला जगातला सर्वात मोठा आनंद दिला आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’’

आम्ही दोघे एका वेगळयाच जगात पोहोचलो होतो. आमच्यात एकमेकांबद्दलचे बोलणे कमी आणि बाळाबद्दल जास्त गप्पा होऊ लागल्या. बाळासाठी काय विकत घ्यायचे, ते कसे ठेवायचे, तो काय आणि कसा बोलेल, काय करेल, यावर आम्ही तासनतास गप्पा मारत असू. डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे फारसा वेळ नव्हता, तरीही वेळ मिळताच मी होणाऱ्या बाळासाठी काहीतरी विकत घ्यायचो. एक संपूर्ण खोली मी बाळाच्या सामानाने भरली होती. जान्हवीची पूर्ण काळजी घेणे, तिला योग्य आहार आणि औषधे देणे, तिच्या जवळ बसून भविष्याची स्वप्ने पाहणे, हे सर्व करताना मला आनंद मिळत होता.

काळ पंख लावल्याप्रमाणे वेगाने उडू लागला. जान्हवीच्या गरोदरपणाला ५ महिने उलटून गेले होते. त्या आनंदाच्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो, पण आमच्या सुखाला गालबोट लागेल, हे आम्हाला कुठे माहीत होते?

तो मार्च २०२० चा महिना होता. संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानामुळे त्रासले होते. भारतातही कोरोना संसर्ग झपाटयाने पसरू लागला होता. मी जान्हवीला घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. डॉक्टर असल्याने मला बराच वेळ रुग्णालयात घालवावा लागत होता. त्यामुळे मी तिच्या आईला आमच्या घरी बोलावले, जेणेकरून माझ्या गैरहजेरीत ती जान्हवीची काळजी घेईल.

दरम्यान, एके दुपारी जान्हवीची बालपणीची मैत्रीण प्रिया तिला भेटायला आली. तिला भेटून जान्हवीला खूप आनंद झाला. जेव्हा जान्हवीने सांगितले की, प्रिया दोन दिवसांपूर्वी वॉशिंग्टनहून परतली आहे तेव्हा मी काळजीत पडलो आणि म्हणालो, ‘‘जान्हवी हे बरोबर नाही. तुला माहिती आहे का? परदेशातून परतणारे लोक या आजाराचे सर्वात मोठे वाहक असतात. जान्हवी, तू तिच्या जवळ जायला नको होतेस.’’

‘‘म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की, माझे लग्न आणि मला बाळ होणार म्हणून माझे अभिनंदन करायला आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी दारातच थांबवून सांगायला हवे होते की, तू आत येऊ शकत नाहीस. मला भेटू शकत नाहीस. असे वागणे बरोबर आहे का अमन?’’

‘‘हो, बरोबरच आहे जान्हवी. तू डॉक्टरची पत्नी आहेस. तुला माहिती आहे का? आपल्या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत आणि भारतात हा आजार बाहेरून पसरत आहे.’’

‘‘हो, पण ती वुहानहून नाही तर वॉशिंग्टनहून आली होती. तरीही मी तिला हात धुवायला लावले होते.’’

‘‘असेलही, पण जान्हवी माझे मन सांगतेय की, तू योग्य केले नाहीस. तू गरोदर आहेस. तुला जास्त धोका आहे. कोरोनाचा विषाणू फक्त हातावरच नाही तर कपडयांमध्येही असतात. ती एकदा तरी खोकली असेल तरीही त्यातून तुला संसर्ग होण्याचा धोका आहे. कृपा कर पण, माझ्यासाठी चुकूनही भविष्यात अशी चूक पुन्हा करू नकोस,’’ मी तिला समजावले.

‘‘ठीक आहे, पुन्हा कधीच नाही.’’

तो विषय आम्ही तिथेच थांबवला. दरम्यान, रुग्णालयात रुग्ण वाढत असल्याने मला वेळेवर घरी परतणे कठीण होत होते.

त्यानंतर अचानक देशात लॉकडाऊन लागला. मी ६-७ दिवस घरी जाऊ शकलो नाही. मी जान्हवीच्या प्रकृतीची फोनवरच चौकशी करत असे. कोरोना रुग्णांसोबत राहावे लागत असल्याने मी स्वत:हून घरी जाणे टाळत होतो, कारण हा विषाणू माझ्याकडून जान्हवीपर्यंत पोहोचू नये असे मला वाटत होते.

दरम्यान, एके दिवशी फोनवरून मला जान्हवीची प्रकृती बरी नसल्याचे समजले. मी विचारले असता २-३ दिवसांपासून कोरडा खोकला आणि ताप येत असल्याचे तिने सांगितले. तापाची साधी औषधे घेऊन ती बरे होण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता.

मी खूप घाबरलो. ही सर्व लक्षणे कोरोनाची होती. मी सुन्न झालो. एकीकडे जान्हवी गरोदर होती आणि दुसरीकडे हा भयंकर आजार. मी तिला तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. तपासणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. २४ तास मी तिच्यावर लक्ष ठेवून होतो. तिच्या काळजीने अस्वस्थ झालो होतो. तिची प्रकृती बिघडतच चालली होती. तिच्यावर कुठल्याच औषधाचा परिणाम होत नव्हता. त्यानंतर एके दिवशी आमच्या वैद्यकीय पथकाने जाहीर केले की जान्हवीला वाचवणे आता शक्य नाही.

तो क्षण माझ्यासाठी इतका धक्कादायक होता की, मला अश्रू अनावर झाले. माझा जीव असलेली जान्हवी मला सोडून कशी जाईल? पाणावलेल्या डोळयांनी कितीतरी वेळ मी तसाच बसून होतो.

मला सुरुवातीपासून आजपर्यंतची जान्हवीची प्रत्येक गोष्ट आठवत होती आणि मग अचानक मला जान्हवीने माझ्याकडून घेतलेले वचन आठवले. शेवटी जवळ असण्याचे वचन. मिठीत घेऊन शेवटचा निरोप देण्याचे वचन.

मला माहीत होते की, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास रुग्णाचा मृतदेहही कुटुंबीयांना दिला जात नाही. मृत्यूपूर्वी रुग्णाला प्लास्टिकचे आवरण घातले जाते. जान्हवी पुन्हा कधीच दिसणार नाही, तिला स्पर्श करता येणार नाही, अशी वेळ जवळ आली आहे हेही मला समजत होते. मी माझे वचन नक्की पूर्ण करेन, असे मी मनोमन ठरवले होते.

मी इतर डॉक्टर आणि परिचरिकांसह जान्हवीच्या खाटेपासून थोडया अंतरावर उभा होतो. सर्वांनाच काळजी वाटत होती. तेव्हाच मी माझा गाऊन काढला, हातमोजे काढले आणि त्यानंतर मास्क काढू लागलो. प्रत्येकजण मला असे करण्यापासून रोखत होता. एका डॉक्टरने तर मला पकडून राहण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही.

मला माहीत होते की, आता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. मी पुढे गेलो. जान्हवीजवळ जाऊन तिच्या बाजूला बसलो. तिचा हात माझ्या हातात घेतला. माझा स्पर्श होताच मोठया कष्टाने तिने तिचे बंद डोळे उघडले. काही क्षण मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे बघत राहिली. मग मी तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिला माझ्या हातांनी आधार दिला. आमच्या दोघांच्या डोळयांतून अश्रू वाहत होते.

तेवढयात जान्हवी माझ्यापासून दूर झाली आणि कसेबसे स्वत:च्या ओठांवर बोट ठेवून मला हातवारे करू लागली, ‘‘नाही अमन नाही. कृपया जा, अमन, जा… माझे तु?यावर खूप प्रेम आहे.’’

‘‘माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे…’’ असे म्हणत मी तिला पुन्हा एकदा स्पर्श केला, पण तिच्या हट्टामुळे मला तिथून उठून लांब जाऊन उभे राहावे लागले.

माझ्या सहकारी डॉक्टरांनी मला लगेच सॅनिटायझर दिले. माझ्या हातांसोबत माझे ओठही सॅनिटाइज केले. मला लगेच अंघोळीसाठी पाठवण्यात आले.

अंघोळ करताना मी ढसाढसा रडत होतो, कारण जान्हवीसोबतची ती माझी अखेरची भेट होती हे मला माहीत होते.

दीपस्तंभ

कथा * डॉ. विनिता राहुरीकर

सविता एक पुस्तक घेऊन दिवाणखान्याच्या बाहेर आल्या आणि सोफ्यावर बसल्या. पुस्तके वाचल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. रमाने येऊन टेबलावर चहा ठेवला. रमाला न बोलताही सविता यांना काय हवे, हे सर्व समजत असे. कामावर ठेवले तेव्हा तिला फक्त दोन दिवसच काम समजावून सांगावे लागले होते. तिसऱ्या दिवसापासून ती न सांगताही सर्व व्यवस्थित करू लागली.

‘‘आज बेबीसाठी काय बनवायचे?’’ रमाने विचारले.

‘‘आता ती फक्त जेवेल. संध्याकाळी आल्यावर तिलाच विचार,’’ सविताने उत्तर दिले.

रमा तिचा कप घेऊन तिथेच बसली, मग चहा संपवला आणि स्वयंपाकघरात काम करायला निघून गेली.

सविताचा मुलगा आणि सून दोघेही शहरातील नामांकित डॉक्टर होते. मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन तर सून स्त्रीरोग सर्जन होती. त्यांचे शहरात स्वत:चे मोठे रुग्णालय असल्यामुळे दोघांकडे जराही वेळ नव्हता. कधी मुलगा, कधी सून तर कधी दोघेही घरी येऊ शकत नव्हते. रुग्णालयात इतके रुग्ण होते की, घरी आल्यावरही त्यांना जेवायला वेळ मिळत नसे. म्हणूनच रूपल पाच वर्षांची झाल्यावर आणि दुसरे अपत्य होण्याची शक्यता नसताना सविता यांनीही त्यांच्याकडे हट्ट केला नाही. जेव्हा आई-वडिलांकडे वेळ नसतो, तेव्हा मुलं एक असो किंवा चार असोत, काय फरक पडतो? सविता यांच्या पतीचे निधन मुलाच्या लग्नापूर्वीच झाले होते. मुलगा आणि सून दोघेही आपल्या कामात व्यस्त होते.

रूपलच्या जन्मानंतरच त्यांचा एकटेपणा खऱ्या अर्थाने दूर झाला. वयाच्या तीन महिन्यांपासून त्या रूपलला सांभाळत होत्या. त्यामुळे सूनही निश्चिंत होती. घरातील प्रत्येक कामासाठी बाई होती. त्यांचे काम फक्त रूपलला सांभाळणे आणि तिचे संगोपन करणे, एवढेच होते. आपल्या एकाकी जीवनात रूपलच्या रूपात त्यांना जे छोटेसे खेळणे मिळाले होते, ते पूर्ण वेळ त्यांचे मन रमवत होते. तेव्हाच तर रूपलने पहिला शब्द आई नव्हे तर आजी असा उच्चारला होता. कितीतरी काळ ती आई-वडिलांना अनोळखी समजून त्यांच्याकडे जाताच रडायची.

पाच-सहा वर्षांची झाल्यावर तिला समजू लागले की, ते तिचे आई-वडील आहेत. रूपल तिच्या आजीच्या म्हणजेच सविता यांच्या खूप जवळ होती.

लहानपणापासून आजपर्यंत अभ्यासातली अडचण असो किंवा वैयक्तिक काही गरज असो, ती फक्त आजीकडेच धाव घ्यायची. तब्येत बिघडली असेल तरी आजी आणि मैत्रिणीशी भांडण झाले असले तरी ते सोडवण्यासाठीही तिला आजीच लागायची. म्हणूनच तर रूपल त्यांना दीपस्तंभ म्हणायची.

‘‘तू माझी दीपस्तंभ आहेस, आजी.’’

‘‘दीपस्तंभ? तो कसा काय?’’ सविता यांनी हसत विचारले.

‘‘जसे समुद्रकिनारी किंवा बेटांवर अंधारात जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी दीपस्तंभ असतात, जे त्यांना मार्गदर्शन करतात आणि अपघात होण्यापासून वाचवतात, त्याचप्रमाणे तू माझा दीपस्तंभ, माझा मार्गदर्शक, माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, जो प्रत्येकवेळी मला अंधारात मार्गदर्शन करतो,’’ असे म्हणत रूपल त्यांच्या गळयात हात घालून हलत असे.

तीच रुपल हळूहळू मोठी झाली. एमबीबीएस करून इंटर्नशिपही करू लागली. वेळ जणू पंख लावून उडून गेली, पण आजी आणि नातीमधील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. ते जसेच्या तसे राहिले.

रुपलने डॉक्टर व्हावे असे सविता यांना वाटत नव्हते. मुलगा आणि सुनेच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरची झालेली अवस्था त्यांनी पाहिली होती. आजही घर फक्त सविता यांच्या खांद्यावर उभे होते. घर कसे चालवायचे, हे सुनेला कधी समजलेच नाही. ती बिचारी कधीच मातृत्व, आपल्या मुलीचे बालपण अनुभवू शकली नाही. तिच्या हाताने हजारो मुले जन्माला घातली, ती सुखरूप या जगात आली, पण ती स्वत: तिच्या एकुलत्या एका मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करू शकली नाही. हजारो मातांची कुस आनंदाने भरणाऱ्या तिच्या आयुष्यातला एकमेव आनंदही तिला अनुभवता आला नाही. सविता यांच्या मुलाची अवस्थाही त्यांच्या सुनेसारखीच झाली होती. ज्याने हजारो दुखत असलेल्या नसा सांभाळल्या, हजारो तुटलेल्या हाडांना जोडले तोच वेळेअभावी आपल्याच मुलीशी प्रेमाची तार जोडू शकला नाही.

सविता यांनी रूपलला आई-वडील दोघांचेही खूप प्रेम दिले. तिच्या मनात त्यांच्या विषयी कधीच तक्रारीला जागा निर्माण होऊ दिली नाही. म्हणूनच ती त्यांच्या व्यवसायाचा आणि त्या दोघांचाही खूप आदर करायची आणि तिने स्वत: डॉक्टर व्हायचे ठरवले. सविता यांना मात्र भीती होती की, रूपलला असे कुटुंब मिळाले की जिथे मुलांची काळजी घेणारे कोणीच नसले तर…

पुढे रुपलही डॉक्टर झाली.

‘‘आजी…’’ अशी लांबलचक हाक ऐकून सविता विचारातून बाहेर आल्या, रमाने दार उघडताच रूपल धावत आजीकडे गेली आणि सविता यांच्या गळयात हात घालून झुलू लागली.

‘‘एवढी मोठी झालीस, पण अजून तुझा बालिशपणा कमी झालेला नाही,’’ सविता तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

‘‘आणि हा बालिशपणा कधीच कमी होणार नाही,’’ रूपल आजीच्या गालाचे चुंबन घेत म्हणाली.

‘‘वेडे, तू कधी मोठी होशील की नाही,’’ सविता यांनी तिच्या गालावर हलकेच थोपटले.

‘‘मी मोठी कशी होऊ शकते? मी कालही तुझ्यापेक्षा लहान होती, आजही लहान आहे आणि नेहमी लहानच राहाणार,’’ रूपल तिच्या गालावर आपला गाल घासत म्हणाली.

सविता हसल्या, ‘‘चल, हात-तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढायला सांगते.’’

‘‘ठीक आहे आजी, श्रेयही काही वेळात येणार आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘तो तुझ्यासोबत का नाही आला?’’ सविता यांनी विचारले.

‘‘त्याचा एक रुग्ण तपासणे बाकी होते, म्हणून तो म्हणाला की नंतर येतो. तो थोडयाच वेळात येईल,’’ असे म्हणत रूपल खोलीत गेली.

सविता यांनी रमाला जेवण बनवायला सांगितले. जेवण टेबलावर येईपर्यंत रूपलही हात-तोंड धुवून आली. तितक्यात श्रेयही आला. तो येताच सविता यांच्या पाया पडला. तिघेही जेवायला बसले. रुग्णालय जवळच होते, त्यामुळे रूपल दुपारी जेवायला घरी यायची. श्रेयचे घर दूर होते, त्यामुळे तो अनेकदा रूपलकडे जेवायला यायचा.

रूपल आणि श्रेयने एकत्रच एमबीबीएस केले होते आणि आता ते एकत्र इंटर्नशिप करत होते. एकत्र शिकताना ते एकमेकांना आवडू लागले.

श्रेय स्वत: चांगला, सभ्य, सुसंस्कृत मुलगा होता. त्याचे कुटुंबही चांगले होते. त्याला नकार देण्याचे कुठलेच कारण नव्हते. सविता यांना मात्र थोडीशी भीती वाटत होती की, रूपल तिच्या आई-वडिलांचाच कित्ता गिरवणार नाही ना? मग त्यांनी विचार केला की, आतार्पंयत त्यांचे हात-पाय नीट चालत आहेत, रूपलच्या मुलालाही त्या आरामात सांभाळू शकतील. थेट रूपलच्या मुलाचा विचार केल्यामुळे सविता यांना स्वत:वरच हसू आले.

काळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. रूपल आणि श्रेयची इंटर्नशिप संपली. श्रेयने ऑन्कोलॉजीमध्ये तर रूपलने गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये एमडी केले. अजूनही रूपलचा सविता यांच्यासोबत दुपारचे जेवण जेवण्याचा दिनक्रम सुरू होता. बऱ्याचदा श्रेयही त्यांच्यासोबत असायचा. आता सविता यांना रूपलप्रमाणेच श्रेयही आपलासा वाटू लागला होता.

त्यांच्यासाठी दोघेही सारखेच होते. एमडी होताच दोघांचे लग्न होणार होते. हळूहळू सविता याही रमाला सोबत घेऊन छोटी-छोटी तयारी करत होत्या. हॉटेल बुकिंग, केटरर्स, डेकोरेटर यासारखी मोठी कामे मुलगा आणि सून करणार होते, पण छोटी तयारीच जास्त असते. त्यामुळे त्या रमाला सोबत घेऊन रोज जमेल तितकी तयारी करत होत्या. सविता यांचे लग्नाच्या तयारीचे काम दिवसेंदिवस वाढत होते.

आधीच घरचा सगळा भार त्यांच्यावर होता, त्यात आता लग्नाच्या तयारीचे अतिरिक्त कामही होते, पण इतक्या व्यस्त दिनक्रमातही त्यांच्या लक्षात आले की, रूपल काहीशी उदास राहू लागली होती. नवीन घरात जाण्याची भीती किंवा आपल्या जिवलग माणसांना सोडून जाण्याचे दु:ख यामुळे ती उदास आहे का…? ती अचानक असे उदास होण्यामागचे कारण काय? श्रेयही आजकाल पूर्वीसारखा आनंदी दिसत नव्हता. त्याचे घरी येणेही कमी झाले होते, आल्यावर तो पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नव्हता. श्रेयला काही विचारणे त्यांना योग्य वाटले नाही, पण रूपलचे मन जाणून घेण्याचे त्यांनी ठरवले. जिच्या हसण्याने घराच्या भिंती आयुष्यभर हसत राहिल्या, तीच अचानक उदास झाली होती… ती या घरातून कायमची निघून जाणार, हा विचारही त्यांना सहन होत नव्हता.

एके दिवशी श्रेय जेवायला आला नाही, तेव्हा सविताने रूपलला खोलीत बोलावले आणि तिच्या उदास होण्यामागचे कारण विचारले. लग्नाला अवघे बारा दिवस उरले होते. समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, आता यावर उपाय शोधणे आवश्यक होते. रूपलला जणू वाटतच होते की, आजीने तिला विचारावे आणि तिने मनात साचलेले सर्व आजीला सांगून टाकावे.

‘‘उदास होऊ नको तर आणखी काय करू आजी? श्रेयच्या आईची इच्छा आहे की, लग्नात मी त्यांच्या घरचा पारंपरिक ड्रेस आणि जाडसर बांगडया, जुनाट दागिने घालावेत, जे त्यांना त्यांच्या सासूने आणि त्यांच्या सासूला त्यांच्या सासूने दिले होते,’’ रूपलने सांगितले.

‘‘मग त्यात काय अडचण आहे?’’ सविता यांनी विचारले.

‘‘अडचण काहीच नाही आजी, तुला माहीत आहे, त्या लेहेंग्यावर सोन्या-चांदीची नक्षी आहे… खूप वजनदार आहे तो… त्यावर चार किलोचे दागिने आणि तेही दीडशे वर्ष जुने आहेत, आजकाल कोण घालते? मी इतका सुंदर लेहेंगा आणि नाजूक हलक्या वजनाचे दागिने आणले आहेत, पण त्यांच्याकडचे वधूचे कपडे आणि दागिने बघून मी नाराज झाले. मला खरंच लग्न करावेसे वाटत नाही,

आजकाल हे सर्व कालबाह्य झाले आहे हे त्यांना समजत नाही, रूपल पुटपुटली.

सविता यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, निदान प्रकरण गंभीर नाहीए.

‘‘श्रेयचे काय म्हणणे आहे?’’ त्यांनी विचारले.

‘‘काय बोलणार तो, आईला समजावणे त्याला जमत नाही आणि…’’ रूपलने उदास होत बोलणे अर्धवट सोडले.

सविता यांना श्रेयची अडचण समजली. त्याला आईचे मन मोडायचे नव्हते आणि रूपललाही नाराज करायचे नव्हते. बिचारा, दोघींमध्ये अडकला होता. रूपलचीही काहीच चूक नव्हती. ती पहिल्यापासून अभ्यासात व्यस्त होती. आता डॉक्टर झाली होती. साजशृंगारासाठी तिच्याकडे वेळ नव्हता आणि त्याची तिला तितकीशी आवडही नव्हती. ती खूप साधी, पण नीटनेटकी राहायची, आता एवढे वजनदार कपडे आणि दागिने पाहून ती घाबरून जाणे स्वाभाविक होते.

सविता यांनी क्षणभर विचार केला आणि मग म्हणाल्या, ‘‘तू श्रेयच्या आई मीरा यांच्याशी बोललीस का, त्यांना तू आणलेला लेहेंगा आणि दागिने दाखवून तुला हे घालायचे आहेत असे सांगितलेस का?’’

‘‘सांगितले, त्यांनाही ते आवडले, पण त्या म्हणाल्या की, लग्नातील इतर कुठल्याही विधीत इतके हलके दागिने घाल, पण लग्नात मात्र त्यांनी दिलेलेच घालावे लागेल. तूच सांग, त्या दीडशे वर्ष जुन्या पोशाखात मी कशी दिसेन…? मला नाही जमणार,’’ रूपल पुन्हा उदास झाली.

श्रेयच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवले आहे, त्यांच्याही काही इच्छा असतील ना? त्या पारंपरिक सनातनी कुटुंबातील सून आहेत, त्यांनाही त्यांच्या नात्यांचा आदर ठेवावाच लागेल ना? पण तरीही या समस्येवर उपाय असू शकतो, सविता म्हणाल्या.

‘‘कोणता उपाय?’’ रुपलने त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहिले.

‘‘आजकाल एक नवीन ट्रेंड आहे, ज्याला लग्नापूर्वीचे फोटोशूट म्हणतात. आपणही तुमचे असे फोटोशूट करून घेऊया, त्याच दागिने आणि कपडयांमध्ये जे तू घालावेस, असे श्रेयच्या आईला वाटतेय. जर ते तुला चांगले किंवा आरामदायक वाटत नसतील, तर मी श्रेयच्या आईला समजावेन, तुला ते लग्नात घालावे लागणार नाहीत, असे मी तुला वचन देते. जर ते तुझ्यावर चांगले दिसत असतील तर मात्र तू ते लग्नात आनंदाने घालू शकशील. रूपल बघ, नात्याला दोन्ही बाजूंनी समजून घ्यावे लागते. श्रेयच्या आईने तुमच्या भावना जपायला हव्यात, त्याचप्रमाणे तुलाही पुढाकार घेऊन त्यांच्या भावना आणि इच्छांचा आदर करायला हवा, तरच श्रेयलाही आनंद होईल,’’ सविता यांनी समजावत सांगितले.

‘‘ठीक आहे आजी, जसे तू सांगशील. मी तुझे सर्व ऐकेन,’’ रूपल हसत म्हणाली. तिला आता मन मोकळे झाल्यासारखे वाटत होते.

सविता या श्रेय आणि त्याच्या आईशी बोलल्या. त्या दोघांनीही आनंदाने त्यांचे म्हणणे मान्य केले. दोन दिवसांनी त्या रूपलला घेऊन श्रेयच्या घरी गेल्या. त्यांनी श्रेयच्या आईसोबत रूपलची तयारी केली. जेव्हा रूपलने स्वत:ला पारंपरिक पोशाखात आरशात पाहिले तेव्हा ती स्वत:च तिच्या रूपाने मोहित झाली. ती खूप सुंदर दिसत होती.

रूपलचे सौंदर्य पाहून श्रेयचेही डोळे चमकले. रूपल इतकी सुंदर दिसेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. श्रेयची आई आणि सविता दोघीही तिच्या सौंदर्याकडे पाहातच राहिल्या. सविता यांनी घाईघाईने रूपलला काळा तीट लावला. मुलगी कितीही सुशिक्षित किंवा आधुनिक असली तरी ती वधू बनते तेव्हा भारतीय पारंपरिक पोशाख आणि साजशृंगारात सुंदर दिसते. श्रेयची आई मीरा या रूपलच्या दिसण्याचे कौतुक करू लागल्या. भारतीय वधू या जगातील सर्वात सुंदर वधू दिसतात.

छायाचित्रकार बराच वेळ रूपलचे फोटो काढत राहिला. त्यानंतर त्याने श्रेय आणि मीरा तसेच सविता यांच्यासोबत तिचे फोटो काढले. शूट पूर्ण झाल्यानंतर मीरा यांच्या लक्षात आले की, जड नथीमुळे रूपलचे नाक लाल झाले आहे आणि कंबरपट्ट्याच्या वजनामुळे तिचा लेहेंगा पुन्हा पुन्हा खाली येत आहे.

‘‘तू ही नथ घालू नकोस. लग्नाच्या दिवशी तुला काही त्रास व्हावा, असे मला वाटत नाही. लग्नासाठी आपण अमेरिकन डायमंडची छोटी नथ घेऊ. तसेही लग्नानंतर कोणीच नथ घालत नाही आणि हा जड कंबरपट्टाही राहू दे, तो आजच्या काळात शोभून दिसत नाही,’’ मीरा यांनी रूपलची नथ काढली आणि कंबरपट्टा तसेच केसांमध्ये लावलेले दोन-चार जुन्या पद्धतीचे दागिने वेगळे केले, जे शोभून दिसत नव्हते.

‘‘जर ही पैंजण खूप वजनदार वाटत असेल तर नवीन आणलेली हलक्या वजनाची घाल,’’ मीरा म्हणाल्या.

‘‘नाही आई, मी हीच घालेन, ती खूप सुंदर आहे,’’ रूपल म्हणाली.

‘‘ठीक आहे माझ्या बाळा, आजच्या आधुनिक काळातली असूनही तू आपल्या परंपरांचा इतका आदर करतेस, हे पाहून मला खूप आनंद झाला,’’ मीरा यांनी आनंदाने रूपलला मिठी मारली.

मीरा दागिने आणि कपडे ठेवायला आत गेल्यावर रूपल पटकन सविता यांच्या गळयाला बिलगली. ‘‘आभारी आहे आजी, तू फक्त माझ्या लग्नाचा दिवस आनंदी केला नाहीस, पण जीवनातील सर्वात महत्त्वाचे तत्त्वज्ञानही सांगितलेस की, जर आपण इतरांच्या भावनांचा आदर केला तर त्या बदल्यात नात्यातील गोडवा वाढतो. खूप प्रेमही मिळते. तू खरंच माझा दीपस्तंभ आहेस. मी खूप भाग्यवान आहे की, तू माझा आजी आहेस.’’

‘‘फक्त रूपलच्याच नाही तर तुम्ही माझ्याही दीपस्तंभ आहात, आजी. तुम्ही एका फोटोशूटच्या बहाण्याने सगळयांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्यात आणि त्यांना एकमेकांशी जोडलेत, नाहीतर लग्नाच्या एका दिवसातील अनावश्यक राग-रुसव्यामुळे आयुष्यभर नात्यात कटुता निर्माण झाली असती. खूप खूप आभार, आजी,’’ श्रेय म्हणाला. सविता यांनी हसून दोघांनाही आपल्या मिठीत घेतले.

पडद्याआड उभ्या असलेल्या मीरा त्या तिघांकडे पाहून प्रेमाने हसून जणू म्हणत होत्या की, ‘‘आमच्या सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभा, धन्यवाद.’’

माझा किनारा

कथा * सीमा गर्ग मंजरी

‘‘आई, मी तुला सतत सांगतेय की, मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला पुढे शिकायचे आहे,’’ आईजवळ जात सुदीपाने प्रेमाने तिला समजावून सांगितले.

‘‘सुदीपा बाळा, नाव ठेवण्यासारखे मुलात काय आहे? तो चांगला अभियंता आहे, मोठया घरातला आहे… तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. चांगले कमावतो. त्याच्या घरात एक आवाज दिला की, नोकर सेवेला हात जोडून हजर राहातात. इतक्या सुयोग्य मुलाचे स्थळ तुझ्यासाठी स्वत:हून आले आहे,’’ नाराजीच्या सुरात सुदीपाच्या गालावर हाताने हलकेसे थोपटत आईने सांगितले.

आईच्या गळयाला बिलगून सुदीपा म्हणाली, ‘‘माझ्या लाडक्या आई, मला मोठे होण्यासाठी अजून पुढे शिकायचे आहे… मला चांगली शिक्षिका व्हायचे आहे,’’ सुदीपा आईचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती, कारण आईने नकार दिला तरच हे लग्न टाळता आले असते.

‘‘सुदीपा, तू एकदा त्या मुलाला भेटून तर बघ,’’ सुदीपाला विचामग्न झालेले पाहून आई म्हणाली.

सुदीपा गोरीपान, उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेली देखणी तरुणी होती. संगीत विशारदमध्ये तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचे शेजारी, ओळखीचे, नातेवाईक इत्यादी सर्व तिच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाचे आणि हसतमुख स्वभावाचे सतत कौतुक करत.

आईचे ऐकून सुदीपा एके दिवशी समीर नावाच्या मुलाला भेटली. तो तिला सुंदर वाटला. तो रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा तरुण होता. दोन-चार भेटीनंतर सुदीपाला समीर आवडला.

याच दरम्यान योगायोगाने सुदीपाला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. सर्वांना हा समीरचा पायगुण वाटला.

साखरपुडा करूनच सुदीपाने नोकरीची सुरुवात करावी, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे होते. अखेर त्यांचे मन राखण्यासाठी तिने साखरपुडयाला होकार दिला.

सुदीपा नोकरीत रुजू होण्यापूर्वीच तिचा थाटामाटात साखरपुडा झाला. सुंदर आयुष्याची अनेक रंगीबेरंगी स्वप्ने मनात घेऊन सुदीपाने नोकरीसाठी महाविद्यालय गाठले.

नोकरीत रुजू झाल्यावर ती दिल्लीत एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहात होती. साखरपुडा झाल्यामुळे समीर कामानिमित्त दिल्लीला आल्यावर सुदीपाला भेटायचा.

आता सुदीपा आणि समीरमध्ये जवळचे नाते निर्माण होऊ लागले होते. सुदीपाच्या लक्षात आले होते की, समीरमध्ये शिष्टाचार आणि नम्रता असे संस्कारक्षम गुण फारच कमी आहेत. तिने अनेकदा समीरला फोनवर त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ओरडताना ऐकले होते.

सुदीपासोबत असतानाही समीर कसलीही तमा न बाळगता फोनवर शिवीगाळ करायचा.

सुदीपा आधुनिक आणि प्रगल्भ विचारांना मानणारी सुसंस्कृत आणि मृदुभाषी मुलगी होती. परंपरा, रितीरिवाज जपण्यास ती आपली भारतीय संस्कृती, सभ्यतेचे रूप मानायची.

एके दिवशी सुदीपा खरेदी करून सोसायटीत शिरली. तिच्या दोन्ही हातात सामान होते. उंच टाचांच्या चपलांमुळे अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली.

अचानक एका हाताने आधार देत तिला उचलले, ‘‘अगं तुला खूप लागले आहे. मी तुझ्या सर्व वस्तू उचलतो.’’

समोर गोऱ्यापान, उंच, देखण्या मुलाचा आवाज ऐकून ती गोंधळली.

तिच्या कोपरांना लागले होते. पाय मुरगळला होता.

त्या मुलाने आपल्या खांद्यावर तिचा हात ठेवून तिला आधार दिला.  ‘‘चल, मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडतो.’’

ती गुपचूप लंगडत त्याच्यासोबत गेली.

टेबलावर सर्व वस्तू ठेवत मुलगा म्हणाला, ‘‘मी प्रथमोपचार पेटी आणून तुला पट्टी बांधतो.’’

आता तो मुलगा पट्टी बांधत होता. तिने आतापर्यंत स्वत:ला खूप सांभाळले होते.

खोलीत एका अनोळखी मुलाच्या हातात आपला हात बघून सुदीपाच्या मनात भारतीय संस्कार आणि परंपरा जागृत झाल्या. तो मुलगा मात्र अगदी सहजतेने तिच्या हाताला मलम लावून पट्टी बांधत होता. त्याच्या स्पर्शामुळे ती अस्वस्थ झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

‘‘आता तू आराम कर, मी चहा बनवतो.’’

थोडयाच वेळात त्याने ट्रेमध्ये चहा आणि बिस्किटे आणली.

दोघेही काही वेळ एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलत राहिले. निघताना सुदीपाकडे रोखून पाहात त्याने आपला फ्लॅट नंबर तिला दिला आणि म्हणाला, ‘‘काही गरज असेल तर मला कळव. अजिबात संकोच करू नकोस.’’

तिचा मुरगळलेला पाय बरा होईपर्यंत तो रोज तिच्यासाठी चहा बनवायचा, कधी सँडविच आणायचा. बाहेरून जेवण मागवायचा आणि मग दोघे एकत्र जेवायचे.

सुदीपाच्या मनाला प्रेम साद घालू लागले होते. एक अनोळखी हळूवार स्पर्श हृदयात घुमू लागला होता.

तिला तिचे घर, समाजाने आखून दिलेल्या मर्यादा माहीत होत्या. संस्कारांच्या बंधनात स्वत:ला बांधून घेतलेले असतानाही अनोळखी प्रेमाचा स्पर्श तिला खुणावत होता.

समीरसोबत असताना तिला कधीच असा स्पर्श, आपलेपणा जाणवला नव्हता. सुदीपाच्या हृदयात शेखरसाठी प्रेम भावना निर्माण झाली होती. शेखर तिची खूप आपलेपणाने काळजी घेत होता.

शेखरसोबत असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. आता तर ती बरी होऊन महाविद्यालयातही जाऊ लागली होती.

रात्रीचे ८ वाजले होते. गुलाबी रंगाच्या कॅप्रीसोबत मॅचिंग टॉप घातलेली सुदीपा काळयाभोर ढगांमधील पांढऱ्या शुभ्र चंद्रासारखी सुंदर दिसत होती. तिने मॅचिंग कानातल्यांसोबत गळयात बारीक मोत्यांची माळ घातली होती. आज ती खूपच आनंदी होती.

ती स्वयंपाकघरात जाणार तितक्यात दरवाजावरची घंटा वाजली. तिने दार उघडले. समोर समीर होता. ‘‘अरे तू?’’ समीरला असे अचानक आलेले पाहून तिला आश्चर्य वाटले.

‘‘हो माझ्या प्रिये, तुझा समीर,’’ असे म्हणत समीरने तिला हातात उचलून ३-४ गिरक्या घेतल्या.

‘‘आज तू खूपच सुंदर दिसतेस. कोणाला घायाळ करणार आहेस,’’ समीरने प्रेमाने विचारत तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.

मद्याच्या वासाने सुदीपाला कसेतरीच झाले. ती लगेच त्याच्यापासून दूर झाली. समीरने पुढे जात तिचा हात पकडला. तिने तो सोडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण समीरच्या पकडीतून तो सुटू शकला नाही. समीर तिच्यावर जबरदस्ती करू लागला.

अचानक अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सुदीपाचे तन आणि मन सुन्न झाले. समीरच्या मिठीतून कसेबसे स्वत:ला सोडवत तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली, ‘‘समीर, तू शुद्धीत नाहीस. जा, आता निघ आणि उद्या ये.’’

‘‘का, उद्या का? जे काही व्हायचे आहे, ते आजच होऊ दे. लवकरच आपले लग्न होणार आहे. तू माझीच आहेस.’’

लग्न होणार आहे, झाले तर नाही ना… या क्षणी मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. कृपा करून इथून निघून जा,’’ सुदीपाने शांत स्वरात त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

पण समीरने तिचे ऐकले नाही. पुरुषत्व जागे झालेला आणि मद्याच्या नशेत धुंद असलेल्या समीरच्या आतील जनावर हिंसक झाले होते. आपली इच्छा पूर्ण होत नसल्याचे पाहून समीर बेभान झाला होता. त्याच्या हाताला सुदीपाचा टॉप लागला. समीर बळजबरीने तो खेचू लागल्यामुळे तो फाटत गेला.

‘‘मुर्ख मुली, तुझी इतकी हिंमत झालीच कशी? तू मला नाही म्हणतेस… अगं तुझ्यासारख्या पन्नास मुली माझ्या मागे फिरतात. तू स्वत:ला काय समजतेस… मी ज्या वस्तूवर हात ठेवतो ती माझी होते.’’

नशेत धुंद असलेल्या समीरची जीभ घसरली होती. तो सुदीपाला पकडण्यासाठी गेला, मात्र मद्यधुंद असल्याने पडला.

आपल्या चारित्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहून सुदीपा जणू रणचंडी झाली. न जाणो तिच्यात एवढी ताकद कुठून आली की, पटकन टेबलावर ठेवलेला चाकू हातात घेऊन लटपटणाऱ्या समीरला तिने पूर्ण ताकदीननिशी बाहेर ढकलले आणि लगेच दरवाजा बंद केला.

समीर बराच वेळ दाराबाहेरून आवाज देत राहिला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे अश्रू थांबत नव्हते. स्वत:ला सावरत ती हताशपणे पलंगावर पडली. तिला वाटले समीरचे हात तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचवेळी शेखरचा चेहरा तिच्या डोळयासमोर तरळला. त्या दोघांमध्ये जमीन-आसमंताचा फरक तिला दिसत होता. मोबाईलची रिंग वाजली, बघायची इच्छा नसतानाही तिने बघितले तर आईचा फोन होता.

आई आनंदाने म्हणाली, ‘‘बाळा, सकाळी तुझ्या वडिलांना समीरच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांना याच महिन्यात तुमचे लग्न लावून द्यायचे आहे. पुढच्या महिन्यात समीर परदेशात जाणार आहे. त्यामुळे त्यांना लग्नाची घाई आहे.’’

‘‘नाही, नाही आई… मी समीरशी लग्न करणार नाही… मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. समीरसोबत लग्नाच्या बेडीत मला अडकवू नकोस. मी जगू शकणार नाही,’’ असे सांगत ती रडू लागली.

आईने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘आई… इकडे खूप काही घडून गेलेय,’’ असे म्हणत तिने आईला रात्रीचा संपूर्ण प्रसंग सांगितला, ‘‘आई, पत्नीचे मन जिंकण्यासाठी पती तिच्या भावनांना महत्त्व देतो, पण समीरमध्ये मला फक्त वासना दिसली. त्याला फक्त माझे शरीर हवे होते, जे त्याला बळजबरीने मिळवून त्याच्या पुरुषत्वावर शिक्कामोर्तब करायचे होते. त्याला माझ्या भावनांशी काही देणेघेणे नाही…’’ समीर माझ्या जीवनरुपी नौकेचा किनारा, माझे सर्वस्व कधीच होऊ शकत नाही,’’ असे म्हणत ती लहान मुलासारखी रडू लागली.

सत्य ऐकल्यानंतर आईच्या डोळयावरील समीर सदगुणी आणि सुयोग्य जावई असल्याचा खोटा पडदा फाटला होता. ती म्हणाली, ‘‘सुदीपा बाळा, तू रडणे थांबव आणि अजिबात काळजी करू नकोस. त्याचा खरा चेहरा लग्नाआधीच आपल्याला दिसला, हे बरे झाले,’’ आईने सुदीपाला धीर दिला. ‘‘आजच मी आणि तुझे वडील तुझ्याकडे येतो. आम्ही सर्व सांभाळून घेऊ.’’

सुदीपाने सुटकेचा नि:श्वास टाकत फोन ठेवला.

छोटा पाहुणा

कथा * दीपा पांडेय

‘‘आई, आई,’’ असे ओरडत १० वर्षांचा ऋषभ घाईघाईने घराच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. त्याच्या मागे ८ वर्षांची धाकटी बहीण मान्याही तिचा स्कर्ट सांभाळत आनंदाने आली.

अल्मोडा शहरातील उंच, वळणदार रस्त्यांवरून मुले त्यांच्या मित्रांसह दररोज सुमारे २ किलोमीटर चालत कॉन्व्हेंट शाळेत ये-जा करतात. पाठीवर दप्तराचे भलेमोठे ओझे असतानाही सर्व मुले हसत-खेळत घरातून शाळेत आणि शाळेतून घरी कधी जातात, हे त्यांचे त्यांना कळतही नाही. मुले घरी येण्याआधी दुपारपर्यंत रितिकाही तिची सगळी कामे उरकून घेत असे. मुलांना खायला देऊन ती त्यांना गृहपाठ करायला बसवत असे. दरम्यानचे दोन तास ती झोप काढत असे.

आज ऋषभचा आवाज ऐकून ती खोलीतून व्हरांडयात आली. एवढया कमी वेळात मनाला अनेक शंका-कुशंकांनी घेरले होते. रस्ता अपघात, दुर्घटना असे अनेक विचार तिच्या मनात डोकावले.

‘‘हे बघ, मी काय आणले?’’ खोडकर ऋषभने त्याच्या हातातील जवळपास दोन महिन्यांच्या पिल्लाला झोका देत सांगितले.

मान्या आईच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्याचा प्रयत्न करत होती. तिला आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला असता तर तिनेही आपण यात सहभागी आहोत, असे सांगितले असते, नाहीतर सर्व दोष ऋषभच्या माथी मारायला ती तयारच होती.

‘‘तुम्ही पिल्लाला रस्त्यावरून उचलून का आणले? आता त्याची आई येईल. तिने तुमचा चावा घेतल्यावरच तुम्ही सुधाराल,’’ रितिका रागाने म्हणाली.

‘‘पिल्लू रस्त्यावरचे नाही आई. याचा जन्म शाळेत झाला. आमच्या आयाबाईंनी सांगितले की, ज्यांना हवे असेल त्यांनी घेऊन जा. शाळेत आधीच ४ डॉगी आहेत,’’ असे सांगत ऋषभने पिल्लाला जमिनीवर ठेवले. पिल्लू घाबरून कोपऱ्यात बसले आणि आपल्या भविष्याचा निर्णय काय होणार, याची वाट पाहू लागले.

‘‘चल, हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. याला उद्या शाळेत परत घेऊन जा. आपण त्याला ठेवून घेऊ शकत नाही. तुमच्या वडिलांना कुत्री-मांजरे अजिबात आवडत नाही.’’

‘‘पण त्यांच्या घरात गाय आहे ना? आजीने गाय पाळली आहे,’’ मान्या म्हणाली.

‘‘गाय दूध देते,’’ रितिकाने तर्क लावत सांगितले.

‘‘कुत्रा भुंकून घरासाठी पहारा देतो,’’ मान्याचा हा तर्क ऐकून ऋषभच्या डोळयांमध्ये चमक दिसू लागली.

‘‘मला पिल्लाचा त्रास नाही, पण तुमचे वडील ओरडले तर माझ्याजवळ येऊ नका.’’

आईचे बोलणे ऐकून दोघांचे चेहरे पडले.

जुन्या प्लास्टिकच्या वाडग्यात दूध भरून आणि त्यात ब्रेडचे तुकडे टाकून रितिका ते पिल्लासाठी घेऊन आली. वाडगा पाहाताच पिल्लू धावत आले. ते ऋषभ आणि मान्याकडे असे काही बघू लागले की, जणू त्यांच्याकडे खाण्याची परवानगी मागत आहे. पुढच्याच क्षणी त्याने खाण्यावर ताव मारला. वाडग्यातील सर्व चाटून खाऊन शेपटी हलवू लागले.

‘‘काकी, काकी…’’ अंगणातून मोठयाने कोणीतरी आवाज देत होते. रितिकाने वरून खाली डोकावून पाहिले. तिथे ऋषभच्या वयाच्या २ मुली शाळेच्या गणवेशात उभ्या होत्या.

‘‘काय झाले बाळांनो?’’ रितिकाने याआधी त्यांना कधीच पाहिले नव्हते.

‘‘काकू, ऋषभ आमचे पिल्लू घेऊन पळून आला,’’ त्या दोघींपैकी एकीने सांगितले.

‘‘साफ खोटे… आयाबाईंनी मला पिल्लू दिले आहे,’’ ऋषभने आरोप फेटाळत सांगितले.

‘‘आई, हे पिल्लू आम्ही शाळेतूनच आणले आहे. रस्त्यात आम्ही चौघांनी त्याला एकामागून एक उचलून घेतले होते. घर जवळ येताच तृप्ती त्याला तिच्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे दादा त्याला घेऊन पळतच आपल्या घरी आला,’’ मान्याने सांगितले.

‘‘काकू, ऋषभने सुरुवातीला सांगितले होते की, वाटल्यास तू पिल्लाला तुझ्या घरी घेऊन जा. त्यानंतर मात्र तो पळून गेला,’’ त्या मुलीने सांगितले.

कोणाला आणि काय समजवायचे हेच रितिकाला समजत नव्हते.

‘‘मी याला आता कोणालाच देणार नाही. मी याच्यासाठी खूप खर्च केला आहे,’’ ऋषभने ठामपणे त्याचा निर्णय ऐकवला.

‘‘काय खर्च केलास?’’ तिने खालून विचारले.

‘‘मी त्याला एक वाडगा दूध आणि ब्रेड खायला दिले. आता तो माझा आहे,’’ ऋषभ हट्टाला पेटला होता.

‘‘हे बघ बाळा, आज तू याला इथेच राहू दे. घरी जाऊन तुझ्या आईला विचार की, ती पिल्लाला घरात ठेवायला तयार आहे का? ती हो म्हणाली तर पिल्लाला घेऊन जा. ऋषभचे वडील त्याला इथे ठेवून घेणार नाहीत. तू घेऊन जाणार असशील तर उद्या तसे सांग, नाहीतर त्याला पुन्हा शाळेत सोडून यावे लागेल,’’ रितिकाने समजावून सांगताच दोन्ही मुलींनी होकारार्थी मान हलवली आणि त्या निघून गेल्या.

‘‘काहीही झाले तरी हे पिल्लू घरात येता कामा नये. त्याला इथेच अंगणात गादी घालून ठेवा. तुम्ही दोघे आत या.’’

रितिकाच्या बोलण्यानुसार ऋषभने पातळ दोरीने पिल्लाला दरवाजाला बांधून ठेवले. त्याच्या जवळ गादी घातली. तिथेच पाण्याने भरलेला वाडगा ठेवला. जेवल्यावर दोघेही गृहपाठ करू लागले. बाहेर पिल्लू सतत ओरडत होते. कदाचित दया येऊन त्याला आत येण्याची आई परवानगी देईल, या आशेने दोघेही आईकडे पाहात होते. रितिकाने मात्र त्यांना अभ्यासाला बसवले. काही वेळानंतर पिल्लाने भुंकणे बंद केले.

गृहपाठ पूर्ण होताच दोघेही धावतच अंगणात आले. ‘‘आई…’’ यावेळी मान्या आणि ऋषभने एकाच वेळी आवाज दिला.

रितिकाला डुलकी लागली होती. आवाज ऐकताच ती लगेचच उठून बाहेर आली.

‘‘आई, आमचे पिल्लू हरवले,’’ दोघांनी एकत्र रडवेल्या स्वरात सांगितले.

पिल्लाच्या गळयात बांधलेली दोरीची गाठ सुटून पडली होती. ती सैल बांधल्यामुळेच पिल्लाला ती सोडवता आली होती.

‘‘इथेच कुठेतरी असेल. टेबल, खुर्चीखाली बघ.’’

‘‘पायऱ्यांवरून खाली तर गेले नाही ना?’’ ऋषभने संशय व्यक्त केला.

रितिकाने पायऱ्यांकडे पाहिले. पायऱ्या थेट रस्त्यावर जाणाऱ्या होत्या.

‘‘आई, ते पिल्लू एखाद्या गाडीखाली तर येणार नाही ना?’’ मान्याला चिंता वाटू लागली.

‘‘तो पायऱ्या उतरू शकेल असे मला वाटत नाही. इकडे नसेल तर खाली अंगणात बघा. अक्रोड आणि मोसंबीच्या झाडाखाली जी झुडपे आहेत त्यात कदाचित लपून बसले असेल.’’

रितिकाने असे सांगताच ते दोघे धावतच पायऱ्या उतरून खाली गेले. त्यांच्यामागून रितिकाही खाली उतरली.

पिल्लाला खोलीत नजरेसमोर ठेवायला हवे होते, असे आता रितिकाला वाटू लागले होते.

खालच्या माळयावरच्या भाडेकरूची मुलेही ‘पिल्लू शोधा’ अभियानात सहभागी झाली. जवळपास २ तास उलटले. सूर्य अस्ताला जाऊ लागताच काळोख गडद होऊ लागला. त्यामुळे रितिका मुलांना घेऊन वर आली. मुलांचे उदास चेहरे पाहून तिलाही वाईट वाटले. मुलांची समजूत काढत ती म्हणाली, ‘‘तुमच्या वडिलांची यायची वेळ झाली आहे. पिल्लाबद्दल काहीच सांगू नका. बरे झाले तो स्वत:हूनच गेला.’’

दोन्ही मुले टीव्हीसमोर बसून कार्टून बघू लागली. मनातून मात्र दोघांना प्रचंड दु:ख झाले होते.

घरी आल्यानंतर काही वेळाने वडिलांनी विचारले, ‘‘गृहपाठ पूर्ण झाला का?’’

‘‘हो बाबा,’’ मान्याने चटकन उत्तर दिले.

‘‘आज गृहपाठ कोणता होता?’’ प्रकाशने विचारले.

‘‘बाबा, आज फक्त गणित आणि इंग्रजीसाठी लेखी गृहपाठ होता. तोंडी करायचा अभ्यासही व्यवस्थित तोंडपाठ आहे,’’ मान्या आपली वही काढून वडिलांना दाखवू लागली.

‘‘बाबा, इंग्रजीत निबंध लिहायचा होता – माझा आवडता पाळीव प्राणी,’’ मान्या उदास स्वरात म्हणाली.

‘‘म्हणजे? अजूनपर्यंत लिहिला नाही का?’’ प्रकाशने विचारले.

‘‘लिहिला. माझा आवडता प्राणी कुत्रा.’’ मान्याला रडू आवरता आले नाही. तिला पिल्लाची आठवण झाली.

‘‘बाबा, माझाही गृहपाठ तपासा,’’ ऋषभ स्वत:ची वही घेऊन आला. त्याने इशारा करून मान्याला तिथून निघून जायला सांगितले. मान्या तिची वही घेऊन स्वयंपाकघरात आईजवळ गेली.

आई रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. मान्याला बघून म्हणाली, ‘‘भूक लागली आहे का मान्या? फक्त ५ मिनिटे थांब.’’

‘‘नाही, मला काहीही खाण्याची इच्छा नाही. ते पिल्लू काळोखाला घाबरून गेले असेल ना? आई, आज तू डॉगीवर निबंध लिहून घेतलास. पिल्लामुळे माझ्या तो चांगला लक्षात राहिला. त्याचे पाय, त्याची शेपटी, त्याचे डोळे.’’

रितिकाने मागे वळून पाहात मान्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही मुले रितिकाजवळ आली.

‘‘तुम्ही दोघेही आपापल्या खोलीत जा,’’ रितिकाने सांगितले.

आज दोन्ही मुलांना झोप येत नव्हती. त्यांना उदास पाहून रितिका म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे.’’

‘‘कोणाची गोष्ट आहे?’’ ऋषभने विचारले.

‘‘कुत्रा आणि मांजराची,’’ रितिकाने सांगितले.

‘‘हो, मला समजले. तू तुझ्या मांजराची आणि मामाच्या कुत्र्याची गोष्ट सांगणार आहेस ना? मी त्या दोघांचा एकत्र बसलेला फोटो पाहिला आहे,’’ ऋषभने सांगितले.

‘‘हो, मीदेखील पाहिला आहे. दोघे एकाच गादीवर बाजूबाजूला बसले होते.’’ मान्या म्हणाली.

‘‘कुत्रा आणि मांजर आमच्या घरी कसे आले ते आता मी तुम्हाला सांगते,’’ रितिका म्हणाली.

जुलैचा महिना होता. बाहेर पाऊस पडत होता. रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरून वाहात होते. तितक्यात आम्हाला म्याव म्याव असा आवाज ऐकू आला. चिंब भिजलेल्या मांजराच्या पिल्लाला पाहून मी स्वत:ला रोखू शकले नाही. त्याला कपडयात गुंडाळून आत घेऊन आले. सर्वांनी विचार केला की, पाऊस थांबल्यावर ते पिल्लू स्वत:हून निघून जाईल, पण तसे झाले नाही. आमच्याच घरात राहू लागले. कधीकधी तासोनतास घराबाहेर कुठेतरी असायचे, पण काहीही झाले तरी संध्याकाळी घरी परत यायचे.’’

‘‘आई, त्याचे आपल्या मामाचा डॉगी शेरूशी कधी भांडण झाले नाही का?’’ मान्याने विचारले.

‘‘नाही, जेव्हा आमची पुसी वर्षाची झाली तेव्हा आम्ही शेरूला रस्त्यावरून उचलून घरी आणले होते. तो पुसीला घाबरायचा. पुसी त्याच्यावर घर मालक असल्यासारखा अधिकार गाजवायची. म्याव म्याव करत त्याच्या अंगावर धावून जायची. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकत्र खेळू लागले. काही दिवसांतच शेरू पुसीपेक्षा आकाराने मोठा दिसू लागला तरीही तो पुसीला घाबरायचा. तो कुत्रा आहे आणि मांजराने त्याला घाबरायला हवे, हे त्या बिचाऱ्याला कुठे माहीत होते? तो आपले संपूर्ण आयुष्य पुसीला घाबरून राहिला,’’ रितिकाने सांगितले.

हे ऐकून दोन्ही मुले हसू लागली. ‘‘चला मुलांनो, उशीर झालाय, आता जाऊन झोपा,’’ वडिलांनी त्यांचा लॅपटॉप बंद करत सांगितले.

मुले लगेचच उठून निघून गेली. मध्यरात्री कसलातरी आवाज झाल्याने प्रकाशला जाग आली. त्याने खोलीतला दिवा लावला आणि इकडेतिकडे पाहू लागला.

‘‘काय झाले?’’ रितिकाने विचारले.

‘‘कधीपासून मला कसलातरी आवाज ऐकू येतोय.’’

‘‘कसला आवाज? चोर तर आला नसेल ना? असा विचार करून रितिका घाबरली आणि उठून बसली.’’

तितक्यात खाटेखालून पिल्लू बाहेर आले आणि भू भू करू लागले. प्रकाश घाबरून त्याला बघतच राहिला.

‘‘हे पिल्लू घरात कसे आणि कुठून आले?’’ तो आश्चर्याने ओरडत म्हणाला.

वडिलांचा आवाज ऐकून मुले धावत आली. त्यांना बघून पिल्लू शेपूट हलवू लागले.

‘‘बाबा, आम्ही याला शाळेतून घरी आणले होते. संध्याकाळपासून ते सापडत नव्हते. आम्हाला वाटले पिल्लू हरवले,’’ ऋषभने सांगितले.

‘‘बाबा, असे वाटते की, हा बदमाश गुपचूप आत आला असेल आणि तुमच्या  पलंगाखाली झोपला असेल,’’ मान्या म्हणाली.

‘‘हो, बिचारा ओरडून थकला असेल,’’ ऋषभने सांगितले.

‘‘मुले, उद्या याला शाळेत सोडून येतील,’’ रितिकाने स्पष्टीकरण देत सांगितले.

‘‘बाबा, आपण याला आपल्याकडे ठेवू शकत नाही का?’’ मान्याने विचारले.

प्रकाशने मुलांचे उदास, प्रश्नांकित चेहरे पाहिले आणि होकार दिला.

‘‘बाबा, तुम्ही खूप चांगले आहात. आम्ही याचे नाव ब्रुनो ठेवतो,’’ मान्याने सांगितले.

‘‘नाही, याचे नाव शेरू असेल,’’ ऋषभ ठामपणे म्हणाला.

जो पिल्लाला फिरायला नेईल, त्याची शी-शू काढेल त्यालाच पिल्लाचे नाव ठेवायचा हक्क असेल,’’ रितिकाचे बोलणे ऐकून ऋषभ आणि मान्या एकमेकांचे तोंड बघत राहिले.

युक्ती

कथा * गरिमा पंकज

आई, तुला एक गोड बातमी सांगायची आहे.’’

‘‘हो का बाळा? सांग ना, कोणती गोड बातमी आहे? मी आजी होणार आहे का?’’ सरला देवींनी उत्सुकतेने विचारले.

नेहा लाजली आणि म्हणाली, ‘‘हो आई, असेच घडणार आहे.’’

आज सकाळीच नेहाला ही गोड बातमी समजली होती. तिने दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेतली होती. पती अभिनवनंतर तिने सर्वप्रथम तिच्या आईला ही आनंदाची बातमी सांगितली होती.

ही बातमी ऐकून आईने आनंदाने उडी मारली, ‘‘माझ्या बाळा, तू तुझ्यासारख्याच गोड मुलीची आई होशील. तुझी मुलगी माझ्यासारखी हुशार आणि तुझ्यासारखी सुंदर असेल.’’

‘‘आई,, मला मुलगी होईल हे तू आताच कसे काय सांगू शकतेस?’’

कारण माझ्या मनाला असे वाटतेय आणि मलाही हेच हवे आहे. माझ्या बाळा, तुला मुलगीच होईल. मी आताच ही बातमी तुझ्या वडिलांना सांगते.

नेहाने हसून फोन ठेवला आणि सासूबाईंना हाक मारली, ‘‘सासूबाई, तुम्ही आजी होणार आहात.‘‘

‘‘बाळा, काय सांगतेस काय? खरंच मला नातू होणार आहे? तू खूप छान बातमी दिलीस. मी कधीपासून याच दिवसाची वाट पाहात होते. सुखी राहा मुली,’’ सासू तिला आशीर्वाद देऊ लागली.

नेहा हसली आणि म्हणाली, ‘‘सासूबाई, कशावरून नातू होईल? मुलगीही होऊ शकते ना?’’

‘‘बाळा, मला नातू हवा आहे आणि बघत राहा, नातूच होईल. आता तू स्वत:ची खूप काळजी घ्यायला हवीस. जास्त वजन उचलू नकोस आणि लीला येणार आहे की नाही काम करायला?’’

‘‘हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, ती नियमितपणे घरकाम करायला येते. आजकाल फार सुट्टया घेत नाही.’’

‘‘तिला अजिबात सुट्टी देऊ नकोस. अशा अवस्थेत विश्रांती घेणे खूप गरजेचे असते. विशेषत: सुरुवातीचे आणि शेवटचे ३ महिने खूप महत्त्वाचे असतात.

‘‘हो सासूबाई, मला माहीत आहे. तुम्ही निश्चिंत रहा. मी स्वत:ची पूर्ण काळजी घेईन,’’ असे बोलून नेहाने फोन ठेवला.

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या महिन्यांत नेहाला खूप मळमळ व्हायची. अभिनव तिची काळजी घेत होता. कामवालीही तिला जमेल तशी मदत करत होती. सर्व व्यवस्थित सुरू होते. नेहाला पाच महिने झाले होते. त्या दिवशी सकाळी ती बाल्कनीत उभी असताना तिला तिची आई गाडीतून उतरताना दिसली. तिच्या हातात एक मोठी बॅग होती. आई राहायला आली होती. आनंदाने नेहा खाली गेली. अभिनवही मागोमाग गेला.

आईच्या हातातून सुटकेस घेऊन पायऱ्या चढत त्याने विचारले, ‘‘आई, तुमच्या शिकवणी वर्गाचे काय होणार? इथे आलात तर मुलांना कसे शिकवणार?’’

‘‘बेटा, हल्ली ऑनलाइन क्लासेस होतात. त्यामुळे मला वाटले की, अशा अवस्थेत मी माझ्या मुलीसोबत असावे.’’

‘‘तुम्ही खूप छान केलेत आई. नेहालाही बरे वाटेल आणि तिची काळजीही घेतली जाईल.’’

‘‘हो बाळा, हाच विचार करून आले.’’

‘‘पण आई… तुझ्याशिवाय तिथे बाबा सर्व सांभाळू शकतील ना?’’ नेहाने शंका व्यक्त केली.

‘‘बाळा, तुझ्या वडिलांना सांभाळायला त्यांची सुनबाई आहे. आता ती त्यांची सर्व कामे करते. मी घरी फक्त आराम करते.’’

‘‘हो का? आई तू आल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे,’’ नेहा आज खूप खुश होती. आज कितीतरी दिवसांनी तिला आईच्या हातचे खायला मिळणार होते.

नेहाची आई येऊन १० दिवस झाले होते. आई गरोदरपणात आवश्यक असलेले खायचे पदार्थ नेहाला वेळच्यावेळी करून स्वत:च्या इच्छेनुसार खायला घालायची. तिने नेहाला काय करावे, कसे बसायचे, हे शिकवले. तिच्या गरोदरपणावेळच्या गोष्टी ती नेहाला सांगायची. एकंदरीत, नेहा खूप छान वेळ घालवत होती. तिची आई खूप शिकलेली होती. ती महाविद्यालयात प्राध्यापिका होती. त्यामुळे जरा जास्तच शिस्तप्रिय होती. नेहाचा स्वभाव मात्र आईपेक्षा खूपच वेगळा होता. तरीही आई आणि मुलीचे नाते खूप गोड होते आणि या क्षणी नेहा तिच्या आईची जवळीक, तिचे प्रेम अनुभवत होती.

वेळ आनंदात जात होता, दरम्यान एके दिवशी अभिनवच्या आईचा फोन आला, ‘‘बाळा, मी तुमच्याकडे येतेय. नातवाला पाहण्याची खूप इच्छा आहे.’’

‘‘पण आई, तुझा नातू अजून कुठे आला आहे?’’ अभिनवने विचारले.

‘‘अरे वेडया, आला नसला तरी लवकरच येणार आहे. नेहाच्या पोटातील माझ्या नातवाची सेवा केली नाही तर मी कसली आजी? चल फोन ठेव, मला सामान भरायचे आहे.’’

‘‘पण आई, तुझा सत्संग आणि तू रोज ज्या चर्चासत्राला जातेस त्याचे काय? शिवाय तू खानावळही चालवतेस ना? ते सर्व सोडून तू इथे कशी काय राहू शकतेस?’’

‘‘अरे बाळा, खानावळ चालवायला मी दोघांना पगारावर ठेवले आहे. माधुरी आणि निलय अशी त्यांची नावे आहेत. दोघेही चांगल्या प्रकारे खानावळ सांभाळतात. ही वेळ परत येणार नाही. चर्चासत्रात तर मी नंतरही सहभागी होऊ शकते.

‘‘ठीक आहे आई, तू ये. नेहाची आईही आली आहे. तुला त्यांचीही सोबत होईल.’’

‘‘त्या कधी आल्या?’’

‘‘१५ दिवसांपूर्वी.’’

‘‘तू ये, आता मी फोन ठेवतो.’’

अभिनवची आई दोन दिवसांनी आली. नेहाच्या आईने त्यांचे मनमोकळेपणे स्वागत केले. अभिनवच्या आईनेही त्यांना मिठी मारली आणि सांगितले की, फार छान झाले, या निमित्ताने आपल्यालाही एकत्र राहता येईल. मनातून मात्र दोघींनाही एकमेकींबद्दल राग होता. लवकरच हा राग उघडपणे दिसू लागला.

नेहाची आई सकाळी ५ वाजता उठून नेहाला फिरायला घेऊन जायची. हे लक्षात येताच अभिनवची आई ५ वाजण्यापूर्वीच उठू लागली आणि नेहाला योगा शिकवू लागली. फेरफटका मारण्याऐवजी नेहाने गर्भधारणेदरम्यान उपयोगी पडणारी काही आसने शिकावीत यासाठी त्या तिच्या मागे लागल्या. इकडे नेहाच्या आईला तिला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायचे असायचे. कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, असा संभ्रम नेहाला पडायचा.

नेहाची आई नाराज झाली होती, ‘‘ताई, ही माझी मुलगी आहे आणि मी तिला यावेळी फिरायला घेऊन जाणार आहे.’’

‘‘ताई, पण ही व्यायामाची वेळ आहे. तुम्ही का समजून घेत नाही? मी माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंच्या सांगण्यावरून योगा केला, मग बघा कसा निरोगी मुलगा झाला,’’ अभिनवची आई म्हणाली.

अभिनवने लगेच यावर तोडगा शोधला आणि आईला समजावून सांगितले की, ‘‘आई नेहा सकाळी व्यायाम करेल आणि संध्याकाळी योगा करेल. शिवाय संध्याकाळी योगा करणे खूप चांगले असते, कारण त्या वेळी वातावरणात भरपूर ऊर्जा असते.’’

त्यानंतर रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून दोघींमध्ये खटके उडू लागले. नेहाची आई नेहाला जे काही करायला सांगायची ते अभिनवची आई काहीतरी निमित्त काढून तिला करू देत नसे. दोघीही नेहाच्या आवडीबद्दल बोलत असत, पण कुठेतरी त्यांचा हेतू एकमेकींना अपमानित करून स्वत:ला वरचढ दाखवायचा असायचा. अभिनव आणि नेहा असा विचार करत होते की, हळूहळू सर्वकाही ठीक होईल, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, दोघींपैकी कुणीही कमीपणा घ्यायला तयार नव्हते.

त्या दिवशीही उठल्यावर नेहाच्या आईने आपल्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिला रस प्यायला दिला आणि म्हणाली, ‘‘बेटा, अशा अवस्थेत गाजर आणि बिटाचा रस पिणे फायदेशीर असते.’’

तेवढयात अभिनवची आई तिथे आली. ‘‘अरे बेटा, असा रस पिऊन काही होणार नाही. डाळिंब, सफरचंद अशी कच्ची फळे सकाळी खावीत. त्यामुळे शरीराला फायबरसोबतच ताकदही मिळते. एवढेच नाही तर डाळिंब रक्ताची कमतरताही भरून काढते.’’

हे ऐकून नेहा दोघांकडे बघतच राहिली. त्यानंतर दोघांकडील वस्तू घेऊन म्हणाली, ‘‘या दोन्ही गोष्टी मला आवडतात. मी रसही पिईन आणि फळेही खाईन. तुम्ही दोघी बाहेर फिरून या. तोपर्यंत मी जरा आराम करते.’’

दोघी बाहेर गेल्यावर नेहाने सुटकेचा निश्वास टाकला आणि अभिनवला हाक मारली. अभिनव बाजूच्या खोलीतून आला आणि म्हणाला, ‘‘हे काय सुरू आहे? दोघीही ऐकायला तयार नाहीत. रात्री १२ वाजेपर्यंत तुझ्यासोबत असतात, आपल्याला स्वत:साठी अजिबात वेळ मिळत नाही.’’

‘‘हो अभिनव, मीही तोच विचार करत आहे. दोघीही छोटया-छोटया गोष्टींवरून भांडतात. माझ्या आईला वाटते की, ती प्राध्यापिका आहे, त्यामुळे तिला जास्त समजते, तर तुझ्या आईला अभिमान आहे की, तिने तुला स्वत:च्या बळावर वाढवले आहे. त्यामुळे मी तिच्या सल्ल्यानुसार वागायला हवे.’’

‘‘अगं, मला तुझ्याशी प्रेमाच्या चार गोष्टी बोलायची इच्छा होते. पण काय करणार? या दोघींच्या शीतयुद्धात आपण आपला एकांत, आपली शांतता गमावून बसलो आहोत.’’

तितक्यात दोघीही फेरफटका मारून आल्या. नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. ‘‘सरला ताई, नेहाला जास्त गोड खायला देऊ नका. तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही.’’

‘‘पण नयना ताई, मी स्वत:च्या हाताने बनवलेले हे डिंक आणि सुक्यामेव्याचे लाडू आहेत. गरोदरपणात माझ्या सासूबाई मला हे सर्व खायला द्यायच्या. त्यामुळेच मला अभिनवच्या जन्मावेळी कोणतीही अडचण आली नाही. अभिनव जन्माला आला तेव्हा ४ किलो वजनाचा होता. तो इतका सुदृढ आणि सुंदर होता की, नर्ससुद्धा त्याला मांडीवर घ्यायच्या.

अभिनवने नेहाकडे पाहिले आणि दोघेही हसले. नेहाची आई कुठे माघार घेणार होती? ती लगेचच म्हणाली, ‘‘ताई, माझ्या सासूबाईंनी मला गरोदरपणात विविध प्रकारचे आयुर्वेदिक काढे आणि फळांचे सूप दिले होते. त्यामुळेच नेहा लहानपणापासून कधी आजारी पडली नाही आणि तिचा रंग किती गोरा आहे. माझ्या वहिनीच्या मुलाला लहानपणी कधी खोकला तर कधी ताप यायचा, पण नेहा खेळत-उडया मारत मोठी झाली.’’

हे ऐकून अभिनवची आई लगेच म्हणाली, ‘‘अहो ताई, बाळ गर्भात असताना असा कोणता काढा तुम्ही प्यायला दिला होता जो प्यायल्यामुळे तुमची मुलगी अजूनपर्यंत निरोगी राहिली? असे कधी काही घडत नसते. तुम्ही कोणत्या भ्रमात जगत आहात?’’

‘‘ताई, मी भ्रमात जगत नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच मी हे सर्व सांगत आहे. माझ्या परिसरात कोणाची सून गरोदर राहिली तर तिच्या सासूबाई आधी तिच्या सुनेच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घ्यायची, याचा सल्ला घ्यायला माझ्याकडे येतात. भ्रमात तर तुम्ही जगत आहात.’’

नेहमीप्रमाणे दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. नेहा आणि अभिनव नेहमीप्रमाणे भांडण मिटवू लागले. आता हे रोजचेच झाले होते. कधी होणारे बाळ हे मुलगा असेल की मुलगी, यावरून दोघी भांडायच्या. त्यामुळे नेहा आणि अभिनव या दोघांचाही दिवस दोघींचे भांडण सोडवण्यात जायचा. एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळत नव्हती.

एके दिवशी अभिनव म्हणाला, ‘‘नेहा, आता आपल्या या समस्येवर उपाय शोधायलाच हवा.’’

‘‘आपण एक गंमत करूया,’’ असे म्हणत नेहाने अभिनवच्या कानात काहीतरी सांगितले आणि दोघेही हसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाच्या वडिलांचा फोन आला. त्यांना त्यांच्या पत्नीशी बोलायचे होते.

नेहाच्या आईने फोन उचलला, ‘‘कसे आहात?’’

‘‘फक्त तुझी खूप आठवण येत आहे, राणी साहेब.’’

‘‘माझी आठवण का येत आहे? मी तर नुकतीच इकडे आले आहे.’’

‘‘अगं, तू २ महिन्यांपूर्वी तिकडे गेली आहेस आणि तुला माहीत आहे का, मी गेल्या रविवारपासून खूप आजारी आहे.’’

‘‘का? काय झाले तुम्हाला? मला कळवलेत का नाही?’’ नेहाच्या आईने काळजीच्या स्वरात विचारले.

‘‘अचानक रक्तदाब वाढला आणि मला चक्कर आली. मी बाथरूममध्ये पडलो. उजव्या पायाचा गुडघा दुखावला. मला चालता येत नाही. सुनेकडून सर्व सेवा करून घ्यायला बरे वाटत नाही. आपल्या मुलाने काठी आणून दिली आहे. पण असे वाटते की, तुझ्या खांद्याचा आधार मिळाला असता तर खूप बरे झाले असते.’’

‘‘अहो, इतके सगळे घडले आणि तुम्ही मला आता सांगताय? तुम्ही आधी फोन केला असता तर मी लवकर आलो असतो.’’

‘‘काही हरकत नाही, आता ये. मी अभिनवला तुझे तिकीट काढून द्यायला सांगितले आहे. फक्त तू ये.’’

‘‘येते, लवकर येते. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त नेहाची काळजी वाटत होती, म्हणून मी इथेच थांबले होते,’’ त्यांनी नेहाकडे बघत सांगितले.

‘‘नेहाच्या सासूबाई आहेत ना तिकडे? त्या घेतील तिची काळजी. तू माझा विचार कर,’’ नेहाचे वडील खट्याळपणे हसत म्हणाले.

नेहाची आई हसली, ‘‘तूम्ही कधीच बदलणार नाहीस. चला, येते मी लवकर.’’

अभिनवने तिकीट काढून दिले. दुसऱ्याच दिवशी नेहाला हजार सूचना देऊन नेहाची आई तिच्या घरी गेली. नेहा आणि अभिनवने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता नेहाच्या सासूबाईही तिला आवश्यक तेवढयाच सूचना करू लागल्या. नेहा आणि अभिनवला एकमेकांसाठी वेळ मिळू लागला.

अशातच दीड महिना निघून गेला. नेहाला आठवा महिना लागला होता. आता ती कोणतेही काम करू शकत नव्हती. घरातली सर्व कामे मोलकरीण करायची आणि सासू नेहाला सांभाळायची.

सर्व काही ठीक चालले होते, मात्र एके दिवशी अचानक नेहाच्या आईचा पुन्हा फोन आला, ‘‘बाळा, आता तुझे वडील बरे आहेत. मी उद्या-परवा तुझ्याकडे राहायला येते.’’

‘‘पण आई, आता तुला घाई करून यायची गरज नाही.’’

‘‘गरज कशी नाही, बेटा? हे तुमचे पहिले बाळ आहे. मी तुझ्याजवळ असायला हवे. मलाही काही डझनभर मुले नाहीत. तू आणि तुझा भाऊ. मला तुझी काळजी घ्यावीच लागेल. तुझ्या सासूबाईंच्या हातून काही होणार नाही. चल, फोन ठेव, मला तयारी करू दे.’’

फोन ठेवत नेहा घाबरलेल्या स्वरात म्हणाली, ‘‘अभिनव आता काय करायचे? पुन्हा तेच महाभारत सुरू होणार आहे.’’

‘‘काय झाले नेहा?’’ अभिनवने विचारले.

‘‘आई पुन्हा राहायला येणार आहे. किती दिवस वडील पाय दुखत असल्याचा बहाणा करणार?’’ नेहा उदासपणे म्हणाली.

‘‘निराश होण्यासारखे काही नाही. आता तीच युक्ती माझ्या आईसाठी वापरायची. तू थांब, मी काहीतरी विचार करतो.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिनव त्याच्या आईकडे गेला. ‘‘आई, तुला आठवते का? गेल्या वर्षी तू शिमलाला होणाऱ्या महिला उद्योजकांच्या चर्चासत्रात सहभागी होणार होतीस. तुला तिथे होणाऱ्या कार्यशाळेत भाग घ्यायचा होता. पण शेवटच्या क्षणी लतिका काकूंची तब्येत बिघडली आणि तुम्ही दोघीही जाऊ शकला नाहीत.’’

‘‘हो बेटा, तुझ्या लतिका काकूंची तब्येत बिघडली होती आणि मला तिच्याशिवाय एकटीला जायचे नव्हते. त्यामुळे मी जाऊ शकले नाही.’’

‘‘यावेळेस लतिका काकूंनी पूर्ण तयारी केली आहे. तू जाशील ना त्यांच्यासोबत?’’

‘‘नाही बाळा, यावेळेस मी जाऊ शकणार नाही. माझा नातू येणार आहे. पुढच्या वर्षी जाईन.’’

‘‘पण आई, कदाचित तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कारण पुढच्या वर्षी लतिका काकू त्यांच्या सूनेसोबत हैद्रराबादला असेल. तुझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि तू नातवाची काळजी का करतेस? तू जोपर्यंत शिमल्यात असशील तोपर्यंत नेहाची आई त्याची काळजी घेईल. दोन-तीन दिवसांत ती येणार आहे.’’

‘‘पण बेटा…’’

‘‘काही पण वगैरे नाही. तू जास्त विचार करू नकोस, आताच तयारी कर. तुला ही संधी पुन्हा मिळणार नाही, कारण तू पुन्हा एकटी जाऊ शकणार नाहीस.’’

‘‘ठीक आहे बेटा. सांग लतिका काकूंना की, माझेही तिकीट काढ.’’ अभिनवची आई सामान भरू लागली.

‘‘आई शिमल्याहून परत येईपर्यंत आपले बाळ या जगात आलेले असेल आणि त्यामुळेच पुन्हा दोन आईंच्या सल्ल्यांमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,’’ असे म्हणत नेहा आणि अभिनवने पुन्हा एकदा सुटकेचा नि:श्वास सोडला.’’

प्रतिक्षा फक्त तुझ्या होकाराची

कथा * मिनी सिंह

आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, हे समजल्यावर दिव्याला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आयुष्य उद्धवस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा… कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा,’’ असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली.

पाणावलेल्या डोळयांनी काहीही न बोलता नूतन खोलीबाहेर आल्या.

शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतनच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली, याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. दिव्याच्या मनात कुणी दुसरे तर नाही… हेही जाणून घेतले नाही. दिव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की, तिचं अक्षतवर प्रेम आहे… पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अक्षत आणि दिव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत दिव्यासोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की, बिचारा घाबरून जायचा. दिव्यावर प्रेम आहे, हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो दिव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्नं पाहायची.

‘‘निलेश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात?’’

दिव्याचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र दिव्या मनापासून लग्नासाठी तयार आहे का? हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून दिव्याने जड अंत:करणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवातेवढा हुंडा मिळाला.

‘आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले, तरी काय फरक पडणार?’ असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे, हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढया मोठया घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे लोक कौतुकाने म्हणत.

काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून दिव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की, अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वत:चेच डोळे पुसत होता.

सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहात होती. तो येताच दिव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वत:ला सावरले, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की, तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल?

क्षणभर दिव्या सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले, हे ऐकून दिव्याच्या मनावर मोठा आघात झाला.

जाणूनबुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला? असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. दिव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली.

सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठयांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला, याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे, हेच तिला सूचत नव्हते, कारण रिसेप्शनवेळी निलेश असा काही वागत होता जसे की, त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. दिव्याला असे वाटले की, कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल.

पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल.

एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू-सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की, तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि नूतन यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे, हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त दिव्यालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती.

सासरी येऊन दिव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसांत एकदाही निलेश दिव्याच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे दोन शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतेय आणि ती इतकी शांत का आहे, हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय, हे ती सर्वंना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? असा विचार करून ती गप्प होती.

एकदा झोपेतच दिव्याला असे वाटले की, कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला, पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपडयांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होते.

‘‘तू… तुम्ही, इथे माझ्या खोलीत… का… काय करताय इथे बाबा?’’ असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वत:जवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दिव्याला तिच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता की, तिचा सासराच तिच्यासोबत…

‘‘मी, मी तुमची सून आहे. मग तुम्ही माझ्यासोबत असे…’’ प्रचंड घाबरलेली दिव्या अडखळत बोलत होती.

‘‘सून…’’ मोठयाने हसत तो म्हणाला, ‘‘तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे.’’

हे ऐकून दिव्याला वाटले की, जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, ‘‘वेडयासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीय का?’’

तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो दिव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत दिव्याने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा.

‘‘खूप झाला हा उंदिर, मांजराचा खेळ… नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतेय ते होऊ दे.’’

सासूच्या तोंडून हे ऐकून दिव्याला काहीच सूचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल, असे तिला वाटले. कसेबसे स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुम्हाला माहीत आहे की, तुमचा मुलगा…’’

‘‘हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती.’’

‘‘पण मीच का… हो गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी… का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना?’’ रागाने दिव्या म्हणाली, ‘‘तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे, हे सर्वांना सांगेन.’’

‘‘काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे… विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की, तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस.’’

दिव्याचे केस ओढत निलेश म्हणाला, ‘‘तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर…’’ बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले.

संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, ‘‘हे बघ सूनबाई, जे घडतेय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे.’’

हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल दिव्याला तिरस्कार वाटू लागला होता. दिव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही दिव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते, हे आता तिच्या लक्षात आले होते.

लग्नाला ३ महिने झाले होते. या ३ महिन्यांत असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वत:ला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा दिव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा दिव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत, असे ते दिव्याच्या वडिलांना भासवायचे.

आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे, असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव दिव्याला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चूकवून दिव्या पळून गेली.

आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेडया मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर दिव्याच्या आईवडिलांनी केला आहे.

‘‘हो का, असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही, याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का, याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालिनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की, मी काय करू शकतो. मोठयात मोठया न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही… तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही,’’ असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली.

‘‘काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही.’’ घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले.

त्यांना वाटू लागले की, हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रु जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या, जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका.

‘पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये’, असा विचार करून मनोहर शांत झाले, मात्र निलेशने लवकरात लवकर दिव्याला घटस्फोट द्यावा, अशी अट त्यांनी घातली.

दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच दिव्याला घटस्फोट मिळाला.

आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून रहायची. नीट खात नव्हती. कुणाशी बोलत नव्हती. ‘मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरेवाईट तर करून घेणार नाही ना?’ असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वत:लाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे, हेच त्यांना समजत नव्हते.

‘‘दिव्या बाळा, बघ कोण आले आहे,’’ तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. ‘‘अक्षत,’’ तिच्या तोंडून शब्द फुटले.

एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत, हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वत:च दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. ‘आता मात्र अक्षतच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता,’ असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली.

थोडासे संकोचत अक्षतने विचारले, ‘‘कशी आहेस दिव्या?’’ तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. ‘‘मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत…

आठवतेय का?’’ तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही दिव्या गप्प होती.

अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चूकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे? कँटिनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे…? तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहात होती.

तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘‘दिव्या तू स्वत:ला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वत:ला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दु:ख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना?’’

‘‘तर मग, मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले?’’ डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या.

दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत म्हणाला, ‘‘कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की, आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वत:चे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की, आपण आपली वाट स्वत: शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे, सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे.

‘‘दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे… तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल, याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना? त्यांच्यासाठी, स्वत:साठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल दिव्या…’’

अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, ‘‘आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत?’’

‘‘कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ… तुझ्या समोर तुझे सुंदर जग आहे,’’ अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की, दिव्या अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकटयाला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे दिव्या. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन.

अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्सबोक्शी रडू लागली, जणू कधीचे साचून राहिलेले दु:ख घळाघळा डोळयांतून ओघळत होते. मनातले दु:ख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले.

बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळयांतूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.

विस्मरणात जाणारा भूतकाळ

कथा * उषा साने

बऱ्याच वर्षांनंतर मी माझे फेसबूक अकाउंट उघडले, तितक्यात चॅटिंग विंडोमध्ये ‘हाय’ असे ब्लिंक झाले. सुरुवातीला मी लक्ष दिले नाही, मात्र सतत ब्लिंक होतच राहिल्यामुळे मनात विचार आला की, कोणीतरी बोलण्यासाठी आतूर झाले आहे. नक्कीच ती व्यक्ती माझ्या फेसबूकवरील मित्रपरिवारापैकी होती. बोलण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याचे नाव कौशल होते. मी बोलणे टाळले. कारण मला चॅटिंगची आवड नव्हती. पण समोरची व्यक्ती धीट होती. थोडया वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मेसेज पाठवला. ‘तुम्ही कशा आहात मॅडम…?’ या प्रश्नाचे उत्तर न देणे शिष्टाचाराला धरून नव्हते. त्यामुळे मनात नसतानाही ‘बरी आहे,’ असे मी लिहिले. त्याला पुढे बोलू न देण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्याकडे वेळ नाही, असे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा मेसेज आला, ‘कामात आहात का मॅडम…?’ माझ्या ‘हो’ अशा त्रोटक उत्तरानंतर त्याने परत मेसेज पाठवला, ‘बरं… पुन्हा केव्हा तरी बोलूयात मॅडम’ मीही ‘हो’ म्हणून सुटकेचा श्वास टाकला. तेवढयात दारावरची घंटी वाजली. घडयाळात पाहिले तर संध्याकाळचे ६ वाजले होते. वाटले की, राजीव कामावरून आला असेल.

जसा मी दरवाजा उघडला तसे, ‘‘काय सुरू आहे मॅडम…?’’ राजीवने विचारले. मला चिडवायची इच्छा झाल्यास तो मला मॅडम म्हणतो. त्याला माहीत आहे की, मॅडम म्हटलेले मला अजिबात आवडत नाही.

‘‘काही विशेष नाही. फक्त नेटवर सर्फिंग करत होते…’’ मी थोडेसे चिडूनच उत्तर दिले. राजीव हसला. तो हसला की मी राग विसरून जायचे. माझा राग कसा घालवायचा, हे राजीवला बरोबर माहीत होते. म्हणूनच मला चिडवल्यानंतर तो अनेकदा असाच मिस्किल हसायचा.

‘‘बरं, आले घातलेली गरमागरम चहा आणि चहासोबत गरमागरम भजी मिळाली तर आपला दिवस, म्हणजे संध्याकाळ मस्त होईल…’’ त्याच्या अशा बोलण्यावर मला हसू आले. बाहेर खरोखरंच पाऊस पडत होता. घरात असल्यामुळे माझ्या ते लक्षात आले नव्हते. मी चहा, भजीची तयारी करू लागले आणि राजीव हात-पाय धुवायला गेला. आपल्या दोघांची आवडीची जागा असलेल्या बाल्कनीत चहा पिऊया, असे तो म्हणाला. तो खूपच आनंदी दिसत होता.

मला रहावले नाही. ‘‘काय झालेय…? खूपच आनंदात दिसतोस…’’ मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘अरे… तुला कसे समजले…? त्याने आश्चर्याने विचारले.’’

‘‘तुझी अर्धांगिनी आहे. १५ वर्षांत मला इतकेही समजणार नाही का…?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘हो, तू बरोबर बोलतेस.’’ तो थोडेसे गंभीर होत म्हणाला.

काही वेळ आम्ही शांतपणे चहा, भजी खात होतो. काही वेळानंतर राजीव माझ्याकडे खोडकर नजरेने पाहून हसला आणि मी त्याच्या मनातले बरोबर ओळखले.

‘‘खोडकरपणा अजिबात चालणार नाही…’’ मी लाजतच सांगितले. त्यानंतर आम्ही घराच्या अंतर्गत सजावटीबाबत गपा मारू लागलो. घरात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. आम्ही अलीकडेच येथे राहायला आलो होतो. घराची अंतर्गत सजावट बाकी होती. कोणत्या खोलीत कोणता रंग लावावा, यावरून राजीव आणि मुलांमध्ये मतभेद होते. आमचे बोलणे सुरू असतानाच मुलगा शुभांग आणि मुलगी शिवानी दोघेही आले. त्यांच्या हट्टामुळे राजीव त्यांना बाजारात घेऊन गेला. पाऊस पडतोय, जाऊ नका, असे म्हणत मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. राजीवने गाडी काढली. मलाही सोबत येण्याचा आग्रह केला, पण घर नीट करूया, असा विचार करून मी जाणे टाळले.

काम आटोपल्यानंतर थोडी उसंत मिळाली. सहज लॅपटॉपकडे नजर गेली. थोडा वेळ सर्फिंग करूया, असा मी विचार केला. इंटरनेट सुरू केला. फेसबूक सुरू करण्याचा मोह झाला. फेसबूक उघडताच कैलाशने लगेच ‘नमस्कार’ असा मेसेज पाठवला. मला विशेष काही काम नव्हते. राजीव आणि मुले लवकर येणार नव्हती. त्यामुळे विचार केला की, कौशलसोबत गप्पा मारून वेळ घालवू.

‘नमस्कार’ असे मी लिहिले. त्याने लगेच प्रश्न विचारला, ‘तुम्ही फुलपाखरू आहात का?’ मी गोंधळले. हा काय प्रश्न आहे? तितक्यात त्याने मी प्रोफाईवर ठेवलेले चित्र दाखवले. याबाबत मी कधी विचार केला नव्हता. ते चित्र आवडले म्हणून मी प्रोफाईलला ठेवले होते. हाच प्रश्न त्याने पुन्हा विचारताच मी चिडले. काहीतरी कारण देऊन फेसबूक बंद केले. त्याचे नाव डिलिट करावे, असे मला वाटत होते. पुढच्या वेळेस हेच करायला हवे, असा विचार करून मी उठले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले.

पुढचे काही दिवस घराच्या अंतर्गत सजवटीतच निघून गेले. आता ते काम पूर्ण झाले होते. घर सुंदर दिसू लागले होते. त्यामुळे एक खूप मोठे ओझे हलके झाले, असेच काहीसे वाटत होते. त्या दिवशी मुले आणि राजीव यापैकी कोणीच घरी नव्हते. विरंगुळा म्हणून नेट सुरू केला. मेल उघडून पाहिले, पण त्यात एरमाच्या मेलशिवाय विशेष काही नव्हते. तिने लिहिले होते की, तिला नवीन नोकरी मिळाली आहे. त्यासाठी ती लॉस इंजेलिसला जाणार होती. तिची कंपनी लवकरच तिला भारतातही पाठवणार होती. मी मेल करून तिचे अभिनंदन केले आणि भारतात आल्यावर माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. ती माझी फेसबूक मैत्रीणही होती. त्यामुळे मी फेसबूक सुरू केले. कितीतरी मेसेज आले होते. मला आजपर्यंत इतके मेसेज कधीच आले नव्हते. बघितले तर ७-८ मेसेज कौशलचे होते. ‘कशा आहात तुम्ही…?’, ‘नाराज आहात का…?’, ‘तुम्ही फेसबूक बंद करून का ठेवता…?’ इत्यादी. ते मेसेज वाचून मला राग आला.

मी त्याचे नाव डिलिट करणारच होते की, तितक्यात दारावरची घंटा वाजली. मी दरवाजा उघडायला जाणार तोच बाहेरून शिवांगचा आवाज ऐकू आला. ‘‘आई, लवकर दरवाजा उघड, आईस्क्रिम वितळून जाईल.’’

मला माहीत होते की, मी लवकर दरवाजा न उघडल्यास त्याच्या मोठया आवाजामुळे आजूबाजूचे बाहेर येतील. घाईगडबडीत मी नेट बंद करायला विसरले.

राजीव बाहेरून भरपूर जेवण घेऊन आला होता, म्हणजे रात्री जेवण करायची गरज नव्हती. राजीवने चहा मागितला. मी आमच्या दोघांसाठी चहा घेऊन आले. चहा पिताना माझ्या लक्षात आले की, मी नेट बंद करायला विसरलेय. माझे फेसबूक खाते उघडेच होते. नवीन दोन मेसेज माझी वाट पाहात होते. मला ते उघडून बघण्याचा मोह आवरता आला नाही. एक मेसेज कवी प्रदीप यांचा कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण देणारा होता. दुसरा कौशलचा होता. तो वाचून माझा राग अनावर झाला. त्याची गाडी एकाच ठिकाणी अडकली होती. ‘तुम्ही नाराज आहात का…?’ ‘तुम्ही उत्तर का देत नाही…?’ ‘तुम्ही तुमचा फोटो अपलोड का केला नाही…?’ त्याचे नाव कायमचे डिलिट करायचे, असे मी ठरवले आणि तसेच केले. त्यानंतर मात्र मी माझा फोटो अपलोड का केला नाही? असा प्रश्न मला सतत सतावू लागला. फोटो असणे खरंच गरजेचे आहे का…?

हा प्रश्न भूतकाळातील माझ्या कटू आठवणींना उकरून काढण्यासाठी पुरेसा होता, ज्या गाडून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागला होता. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. माझ्या घरच्यांना जो सामाजिक आणि मानसिक त्रास झाला होता, तो मला वेडे करण्यासाठी पुरेसा होता. त्या त्रासदायक भूतकाळाची आठवण होताच मी अस्वस्थ झाले. शांतपणे बाल्कनीत जाऊन बसले.

थोडया वेळानंतर राजीव मला शोधत बाल्कनीत आला. त्याने बाल्कनीतला दिवा लावला. मी त्याला तो बंद करायला सांगितला. तो माझ्या जवळ आला.

हळूवारपणे माझ्या केसांवरून हात फिरवत त्याने विचारले, ‘काय झाले…?’ मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्व विसरायचा प्रयत्न कर, त्याने प्रेमाने मला सांगितले. मला काही वेळ एकटीला राहायाचे होते. त्याच्या ते लक्षात आले. काहीही न बोलता तो निघून गेला. मला मात्र त्या अंधारात माझा भूतकाळ लख्ख दिसत होता…

त्या काळोखात माझ्या डोळयांसमोर ती संध्याकाळ जशीच्या तशी जिवंत उभी राहिली. महाविद्यालयात निरोप समारंभ होता. मी बीएससीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. महाविद्यालयातील माझा तो शेवटचा दिवस होता.

ठरल्याप्रमाणे मुलांनी सदरा घातला आणि मुली साडी नेसल्या होत्या. ती खूपच संस्मरणीय संध्याकाळ होती, पण ती माझ्या जीवनात अंधार घेऊन येणार होती, हे मला कुठे माहीत होते…? फोटो काढले जात होते. आमचा एक वर्गमित्र राहुल कॅमेरा घेऊन आला होता. तो आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता. त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटायचे, हे मला माहीत होते, पण माझ्यासाठी मात्र तो इतर वर्गमित्रांसारखाच होता. मी नकार देऊनही तो सतत माझे एकटीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी त्याच्यावर ओरडले. मी सर्वांसमोर ओरडल्यामुळे तो शांतपणे तेथून निघून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण मला कुठे माहीत होते की, येणारा काळ माझे आयुष्य उद्धवस्त करणार होता.

काही दिवसांनंतर एके दिवशी पोस्टमन माझ्या नावाचा एक लिफाफा घेऊन आला. आईने तो मला आणून दिला. मी उलटसुलट करून पाहिले, पण त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते. उघडल्यावर त्यातील काही फोटो जमिनीवर पडले. ते उचलायला मी खाली वाकले आणि ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोंमध्ये मी आणि राहुल विचित्र अवस्थेत होतो. प्रत्यक्षात सत्य असे होते की, मी जवळच काय, पण लांब उभी राहूनही कधी त्याच्यासोबत फोटो काढला नव्हता.

मला रडायला येत होते. जसजसे मी फोटो बघत होते माझे रडणे रागात बदलत होते. मी रागाने ओरडले. तो आवाज ऐकून आई आली. फोटो बघून गोंधळली. तिने माझ्याकडे रागाने बघितले, पण त्यानंतर माझी झालेली दयनीय अवस्था पाहून तिचा राग शांत झाला.

घरात सर्वांना या फोटोंबद्दल समजले तेव्हा आजी प्रचंड संतापली. ‘‘आणखी शिकवा मुलींना आणि तेही मुलांसोबत, मग असे घडणारच.’’

वडील आणि भाऊ मला काहीच बोलले नाहीत, पण ते खूप रागात होते. माझा राहुलवर संशय होता. कारण मी त्याला फोटो काढताना सर्वांसमोर ओरडले होते. त्याचाच तो बदला घेत होता. मी मनातल्या संशयाबद्दल वडिलांना सांगितले. त्यांनी राहुलला जाब विचारला, पण त्याने आरोप फेटाळून लावला. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे माझे वडील भावाला घेऊन राहुलच्या वडिलांना भेटायला गेले. पण तेथे त्यांचा अपमान झाला.

हळूहळू लोकांना याबद्दल समजले. त्यामुळे लाजेने माझे घराबाहेर जाणे बंद झाले. माझ्या संपूर्ण कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मी जे आयएएस बनायचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होणे तर दूरच, पण माझ्यासाठी पुढचे शिक्षण घेणेही अवघड झाले होते. माझे स्वप्न भंगले होते. वडिलांना माझ्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यांना लवकरात लवकर माझे लग्न करून द्यायचे होते. मात्र कुठलेही स्थळ आले तरी त्यांना त्या फोटोंबद्दल कुठून तरी समजायचे आणि लग्न मोडायचे. त्यामुळे माझे लग्न होणे कठीण झाले होते.

एके दिवशी राजीवचे वडील आमच्या घरी आले. १०-१२ वर्षांनंतर ते त्यांच्या मित्राला म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला आले होते. २-३ दिवस ते आमच्याच घरी राहिले. आमच्या घरात काहीतरी बिनसले आहे, हे त्यांनी ओळखले, पण त्याबद्दल विचारणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांच्या येण्याने मला काहीसा आधार मिळाला, कारण त्यांच्याशिवाय माझ्याशी घरात कोणीच नीट बोलत नव्हते. मी जास्त करून त्यांच्यासोबतच राहायचे. ते परत जायला निघाले, असे समजल्यावर मी खूपच उदास झाले. मी सतत उदास का असते, याबद्दल त्यांनी मला अनेकदा विचारले, पण मी उत्तर द्यायचे टाळले. नक्कीच काहीतरी झालेय आणि तेही खूपच गंभीर आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र इतक्या वर्षांनी मित्राच्या घरी आल्यावर त्याला त्याच्या घरातील तणावाचे कारण विचारणे त्यांना योग्य वाटले नाही.

त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, त्यांना काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा ते त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणाले की, ‘मला काहीतरी सांगायचे आहे.’ बिनधास्त बोल, असे वडिलांनी सांगताच त्यांनी राजीवसाठी मला मागणी घातली. त्यांनी सांगितले की, राजीव एका मल्टिनॅशनल कंपनीत सीईओ पदावर कार्यरत आहे. हे ऐकून वडील काहीसे गोंधळले. त्यांना माझे लग्न दुसऱ्या जातीच्या मुलाशी लावून द्यायचे नव्हते. त्यांना हेही माहीत होते की, जातीतला मुलगा शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्या फोटो प्रकरणामुळे कुणीच होकार द्यायला तयार नव्हते. हे स्थळ घरबसल्या आले होते. वडिलांनी घरातल्यांना विचारले. सर्वांचे मत असेच होते की, राजीवच्या स्थळासाठी होकार द्यावा, पण वडिलांनी होकार देण्यापूर्वी त्यांना फोटो प्रकरणाबद्दल सर्व सत्य सांगायचे ठरवले.

त्या प्रकरणाबद्दल ऐकल्यानंतर राजीवचे वडील हसले आणि म्हणाले, ‘‘अरे मित्रा, आजकाल असे घडतच असते. मी तुझ्या मुलीचा हात यासाठी मागितला, कारण ती खूपच चांगली आहे. मला असे वाटले होते की, मी परजातीचा असल्यामुळे तू लग्नाला तयार नाहीस.’’

त्यानंतर त्यांनी राजीवला बोलावून घेतले. त्याच्या होकारानंतर काही दिवसांतच राजीवची अर्धांगिनी बनून मी त्याच्या घरी आले… राजीवने येऊन बाल्कनीतला दिवा लावला नसता तर कदाचित मी भूतकाळातील त्या काळोखातच स्वत:ला हरवून बसले असते.

त्याने माझा हात त्याच्या हातात घेऊन विचारले, ‘‘आता कसे वाटतेय?’’

‘‘पूर्वीपेक्षा खूप छान,’’ मी उत्तर दिले.

‘‘चल, कुठेतरी मस्त फिरून येऊया,’’ त्याने प्रेमाने सांगितले.

‘‘नको, अजिबात इच्छा नाही, पुन्हा कधीतरी जाऊ.’’

‘‘चल, मग एक काम कर…’’ त्यांच्या अशा मिश्किल बोलण्यामुळे मी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर खोडकरपणाचे भाव होते. मी समजून गेले की, आता तो खोडकरपणे काहीतरी बोलणारच.

‘‘तुझा फोटो फेसबूकवर अपलोड कर. लोकांना कळू दे की, माझी बायको खूपच सुंदर आहे.’’ तो खटयाळपणे म्हणाला.

‘‘तुला ही सर्व गंमत वाटतेय?’’ मी रागाने विचारले.

‘‘विभा, मनातल्या भीतीला पळवून लावायचे असेल तर तुझा फोटो नक्की अपलोड कर.’’ त्याने अतिशय गंभीरपणे सांगितले.

त्याने जे सांगितले ते खरे झाले. मी पूर्ण विचार करून माझा फोटो अपलोड केला. तो पाहून अनेकांनी माझे कौतुक केले आणि तेच कौतुक मला भूतकाळातील भीतीच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी मदतीचे ठरले. प्रत्यक्षात मी त्या अपराधाचे ओझे वाहत होती, जो मी केलाच नव्हता. खरंतर ही समाजाने आखलेली रेषा आहे जिथे पुरुष अपराध करूनही सुटतात आणि त्याची शिक्षा अनेकदा मुलींनाच भोगावी लागते. तिला लहानपणापासून अशीच शिकवण दिली जाते की, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक रूपात तिने न केलेल्या अपराधासाठीही ती स्वत:लाच दोषी मानते.

माझ्यासोबत निदान राजीव होता, त्याने मला या नकोशा भूतकाळातून बाहेर पडायला मदत केली. पण माझ्यासारख्या न जाणो अशा कितीतरी असतील…?  मी स्वत:ला विचारचक्रातून बाहेर काढले.

मी राजीवला कवी संमेलनासाठी मिळालेल्या अमंत्रणाबद्दल सांगितले. तो खुश झाला. फेसबूकवरील माझे कौतुक साजरे करण्यासाठी शहरात नव्यानेच उघडलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे, असे आम्ही ठरवले. बाहेर जाण्यासाठी मी जेव्हा राजीवच्या आवडीची साडी नेसून आले तेव्हा त्याने हळूच शिट्टी वाजवली आणि म्हणाला, ‘‘आज खूपच सुंदर दिसतेस… काय मग आजची रात्र…’’ मी लाजले.

हॉटेल खूपच सुंदर होते. राजीव कार पार्क करायला गेला. मी मुलांना घेऊन आत जाणारच होते, पण तितक्यात हॉटेलच्या दरवाजावर गणवेशात सर्वांना सलाम ठोकणाऱ्या द्वारपालाला पाहून मी तेथेच थबकले. तो राहुल होता. माझ्या डोळयात आश्चर्य होते तर मला पाहिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मागून येणाऱ्या राजीवने मला प्रवेशद्वाराजवळ असे थांबलेले पाहून प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी काहीही न बोलता आत गेले.

आत गेल्यावर मी त्याला सर्व सांगितले. तसा तो लगेच बाहेर गेला. मी धावतच त्याच्या मागे गेले. तोपर्यंत तो राहुलपर्यंत पोहोचला होता. त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘तुझे खूप आभार. तू तसा वागला नसतास तर (माझ्याकडे पाहत) विभा माझ्या आयुष्यात आली नसती…’’ असे बोलून राहुलला आश्चर्याचा मोठा धक्का देऊन तो आत गेला आणि मी अरे… ऐक… असे म्हणत त्याच्या मागे गेले. शांतपणे खुर्चीवर बसले. थोडया वेळानंतर दरवाजाकडे पाहिले. राहुल तिथे नव्हता. जेवून घरी निघालो तेव्हा राहुलच्या जागी नवा द्वारपाल होता. न राहवून राजीवने त्याला राहुलबद्दल विचारले. तेव्हा समजले की, तो नोकरी सोडून गेला होता.

अपराधीपणाची सहल नको

* पूनम अहमद

नेहा कार्यालयातून बाहेर पडली. कपिल बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता. ती तोऱ्यात त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली. त्यानंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधला.

कपिलने स्मितहास्य करीत बाईक सुरू केली. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यानंतर जेव्हा बाईक कमी गर्दीच्या रस्त्यावर आली तेव्हा नेहाने कपिलच्या गळयाचे चुंबन घेतले. त्यानंतर कपिलने निर्जन रस्ता पाहून बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. नेहा हसतच बाईकवरून उतरली. कपिलने हेल्मेट काढताच नेहाने तिचे हात कपिलच्या गळयाभोवती नेले. कपिलनेही तिच्या कमरेभोवती हात नेत तिला आपल्या जवळ ओढले. दोघेही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतून गेले होते.

वाढणाऱ्या तर कधी मंदावणाऱ्या श्वासांवर नियंत्रण ठेवत नेहा म्हणाली, ‘‘ऐक ना, आता लगेचच माझ्या घरी यायला तुला आवडेल का?’’

‘‘काय?’’ कपिलला आश्चर्य वाटले.

‘‘होय, घरी कोणीच नाही. चल ना.’’

‘‘तुझे आईवडील कुठे गेले आहेत?’’

‘‘कुठले तरी नातेवाईक वारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेले आहेत. रात्री उशिरा येतील.’’

‘‘तर मग चल, आपण वेळ का वाया घालवतोय? अगं, मी खूपच अधीर झालो आहे, कारण आपण आता तेच करायला चाललोय जे मागील १५ दिवसांपासून करू शकलो नव्हतो. काय करणार? रुडकीत जागाच मिळत नाही. मागच्या वेळेस माझ्या घरी कोणी नव्हते तेव्हा आपल्याला संधी मिळाली होती.’’

‘‘चल, आता गप्पा मारायची नाही तर काही वेगळेच करायची इच्छा आहे.’’

कपिलने मोठया उत्साहात बाईक नेहाच्या घराकडे वळविली. संपूर्ण रस्ता नेहा चेहरा स्कार्फने झाकून कपिलच्या कमरेभोवती हातांची मिठी घालून त्याला चिकटून बसली होती. दोघे तरुण प्रेमी वेगळयाच धुंदीत होते.

दोघांचे अफेअर २ वर्षांपासून सुरू होते. दोघांची कार्यालये एकाच इमारतीत होती. याच इमारतीत कधी कॅफेटेरिया तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. पाहताक्षणीच एकमेकांना ते आवडले होते. नेहाचा धाडसी स्वभाव कपिलला आवडला होता, तर कपिलच्या शांत, सौम्य स्वभावावर नेहा भाळली होती. या २ वर्षांत दोघे अनेकदा शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते.

नेहाला मोकळेपणाने आयुष्य जगायचे होते. कधी कधी तर कपिलला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटायचे. नेहाच्या घरी तिचे आईवडील होते. दोघेही कामाला जायचे. छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता. कपिल त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गृहिणी होती. वडील बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. कपिलने नेहाबाबत घरी सांगितले होते. नेहाला सून करून घेण्यास दोघेही तयार होते. नेहा कपिलच्या घरी जात असे, पण नेहाच्या घरच्यांना कपिलबाबत काहीच माहीत नव्हते.

नेहमीप्रमाणे कपिलने नेहाच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली. आधी नेहा तिच्या घरी गेली. त्यानंतर थोडया वेळाने कपिल गेला. याआधीही घरी कोणी नसताना दोघांनी अनेकदा अशा संधीचा चांगलाच फायदा घेतला होता. घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून कपिलने नेहाला मिठीत घेतले. तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. नेहाने त्या वर्षावात स्वत:ला चिंब भिजू दिले. नेहाच्या पलंगावरील हा प्रेमाचा पाऊस काही वेळानंतर थांबला. कपिलने सांगितले, ‘‘प्रिये आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. चल ना, लग्न करूया. उशीर कशासाठी करत आहेस?’’

नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत म्हटले, ‘‘लग्नासाठी इतका अस्वस्थ का होत आहेस? जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना?’’

‘‘अगं, तसं नाही. आता लपूनछपून नाही तर जगजाहिरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात रहायचे आहे.’’

‘‘पण, सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही, कपिल.’’

‘‘आणखी किती वाट बघायला लावणार आहेस?’’

‘‘पण, मी असे कधीच सांगितले नाही की, मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन.’’

‘‘मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. नेहा, मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले.’’

‘‘अरे कपिल,’’ असे म्हणत नेहाने पुन्हा आपले हात कपिलच्या गळयाभोवती गुंफले. त्यानंतर म्हणाली, ‘‘चल, तुझ्यासाठी पुन्हा कॉफी आणते. दोघांनी रोमान्स करतच कॉफीचे घोट घेतले. त्यानंतर थोडया वेळाने कपिल निघून गेला. प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप होताच.

हा दोघांमधील नियमच होता की, कपिलच नेहाला तिच्या घरी सोडायला जात असे. घरी गेल्यानंतर कपिलने स्पष्टपणे सांगितले की, तो नेहासोबत होता. त्याची आई सुधाने सांगितले, ‘‘बाळा, तुम्ही दोघे लग्न का करीत नाही? दोघेही चांगले कमावते आहात, मग उशीर कशासाठी करत आहात?’’

‘‘आई, इतक्या लवकर नेहाला लग्न करायचे नाही.’’

‘‘तर मग कधी करायचे आहे. तिच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे?’’

‘‘काही नाही आई, अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितले नाही.’’

‘‘अरे, असं कसं?’’

‘‘जाऊ दे आई, जसे नेहाला योग्य वाटेल. कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेळ द्यायचा असेल.’’

‘‘बाळा, माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे. तुझे खरेच तिच्याशी पटेल का? ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस.’’

‘‘अगं आई, ती आजच्या जमान्यातील मुलगी आहे ना? आजकालच्या मुली या तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोडया वेगळया आहेत. नेहा बोल्ड आहे, पण चुकीची नाही. तू काळजी करू नकोस. कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल.’’

‘‘पण, मला असे वाटते की, आता तू लग्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा.‘‘

‘‘बरं, ठीक आहे आई. तिच्याशी बोलतो.’’

२ दिवसांनंतरच नेहाने कपिलला सांगितले की, ‘‘अरे मित्रा, आपली लॉटरी लागली आहे. माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही. त्यामुळे माझे आईवडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत. चल, आता तूही तुझ्या घरी सांग की, तू सहलीला जात आहेस. दोघांनीही सुट्टी घेऊया आणि घरात खूप मजा करूया.

‘‘खरंच?’’

‘‘जीवनाचा मस्त आंनद घेऊया. लवकर ये. जेवण बाहेरून मागवू. भरपूर मजा करू.’’

कपिल नेहावर मनापासून प्रेम करत होता. जसे नेहाने सांगितले होते तसेच त्याने केले. सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन नेहाच्या घरी आला. दोघांनी मनसोक्त रोमान्स केला. जेव्हा मनाला वाटत होते तेव्हा ते जवळ येत होते. एकमेकांमध्ये हरवून गेले होते.

कपिलने सांगितले, ‘‘प्रिये, तूझ्यासोबतचे हे क्षण म्हणजेच माझे जीवन आहे. तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमची ये. आता मी अजून थांबू शकत नाही. सांग, तुझ्या आईवडिलांशी माझी भेट कधी घडवून आणणार आहेस?’’

नेहाने प्रेमाने त्याला धक्का दिला. ‘‘तू सतत लग्नाचा विषय का काढतोस? एवढी काय घाई आहे? आणि मी किती वेळा सांगितले आहे की, सध्या माझी लग्न करण्याची इच्छा नाही.’’

आता कपिल गंभीर झाला होता. ‘‘नेहा, असे काय बोलतेस? माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे. शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत?’’

नेहाने शांतपणे, पण गंभीर स्वरात सांगितले, ‘‘हे बघ, मला आणखी काही वर्षे लग्नाच्या फंदात पडायचे नाही. मी फक्त २६ वर्षांची आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे.’’

‘‘पण, मी ३० वर्षांचा होईन. आज नाही तर उद्या, आपल्याला लग्न करावेच लागेल. एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत तर मग असे लपूनछपून का आणि कधीपर्यंत भेटत रहायचे?’’

‘‘असे मी कधी म्हटले की, आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘हे बघ कपिल, आतापर्यंत मी तुझ्या माझ्या आईवडिलांशी भेट घडवून आणली नाही, कारण आपले ठरवून लग्न होऊच शकत नाही. आपण वेगवेगळया जातीचे आहोत. या वयात जातीवरून मला कुठलाच त्रास करून घ्यायचा नाही. आपण प्रेम, रोमान्स, सेक्स अशी सर्व मजा तर घेतच आहोत. तू लग्नासाठी मागे का लागला आहेस? लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे.’’

‘‘तुझे माझ्यावर प्रेम नाही का?’’

‘‘आहे ना?’’

‘‘मग तुझ्या मनाला असे वाटत नाही का की, एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे?’’

‘‘नाही, माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही.‘‘

‘‘बरं सांग, कधीपर्यंत थांबायचे आहे तुला? मी वाट पाहीन.’’

‘‘मला नाही माहीत,’’ कपिलला खूपच गंभीर झालेले पाहून लडिवाळपणे त्याची छेड काढत नेहा म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा सांगते. लग्नाचा विचार सोडून दे, जीवनाची मजा घे.’’

‘‘म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस?’’

‘‘नाही.’’

‘‘नेहा, मला काहीच समजत नाहीए. हे सर्व काय आहे?’’ तू २ वर्षांपासून माझ्यासोबत आहेस. हे माहितीही नाही की, आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत. तरीही तुझे म्हणणे आहे की, तुला माझ्याशी लग्न करायचे नाही.’’

‘‘आपले शारीरिक संबंध आहेत तर त्यात आपण कोणता गुन्हा केला? आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो. यात लग्नाचा काय संबंध?’’

‘‘तर मग लग्न कधी आणि कोणाशी करणार आहेस?’’

‘‘सध्या तरी मला काहीच माहीत नाही. तुझ्याशी लग्न करेन, असा विचार करून मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कपिल, आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत. निदान मी तरी असा विचार करत नाही. मला फक्त जीवनाचा आंनद उपभोगायचा आहे. घर, संसारात सध्या तरी मला अडकायचे नाही. तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आंनद घे.’’

‘‘नाही नेहा, मला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे.’’

आता नेहा रागावली होती. ‘‘अरे, मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आताच्या आता लग्न करेल.’’

कपिलने भावूक होऊन तिचा हात धरला. ‘‘नेहा, असे कधीच म्हणू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’’

‘‘अरे, या सर्व गोष्टी बोलण्यापुरत्या असतात. रोज हजारो मन जुळतात आणि तूटतातही. हे सुरूच राहते.’’

कपिलचे डोळे पाणावले. नकळतच अश्रू गालांवर ओघळले. हे पाहून नेहा हसली. ‘‘हे काय कपिल? इतका भावनिक का होतोस? शांत हो.’’

‘‘माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस नेहा. खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत तिला मिठीत घेऊन कपिलने तिचे चुंबन घेतले. नेहाही त्याच्या मिठीत विसावली. थोडा वेळ रोमान्स सुरू राहिला. बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला. दुसऱ्या दिवशी कपिल घरी जायला निघाला तेव्हा नेहा म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल रहायला शिक.‘‘

कपिलने तिच्याकडे रोखून पाहताच ती हसली आणि म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल राहण्यातच शहाणपण आहे. भावनिक होऊन मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस.’’

त्यानंतर काही दिवस नेहमी प्रमाणेच गेले, पण नंतर कपिलच्या लक्षात आले की, नेहा त्याला टाळत आहे. कधी फोनवर सांगायची, ‘‘तू जा, माझी मीटिंग आहे. उशीर होईल. कधी भेटलीच तरी घाईत असायची. बाईकवरून आलीच तरी शांतपणे बसायची. पूर्वीसारखा बाईकवरील रोमान्स संपला होता. अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे. कपिलने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे, असे सांगायची. कपिलच्या हे लक्षात आले होते की, ती त्याच्यापासून दूर जात आहे. फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे. काहीतरी कारण सांगत असे.’’

एके दिवशी कपिलने बाईक रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली. विचारले, ‘‘नेहा मला स्पष्टपणे सांग, तू माझ्यापासून दूर का जात आहेस? तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला आता सहन होत नाही.’’

नेहानेही आपले मन मोकळे केले. ‘‘कपिल, तू खूपच भावनाप्रधान आहेस. आपल्या आतापर्यंतच्या संबंधांना तुला लग्नात बांधायचे आहे. पण, माझा लग्नाचा विचार नाही. मला माझ्या करियरवर लक्ष द्यायचे आहे. सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे. शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही. म्हणून असे समज की, मी आपले   संबंध तोडत आहे. मला तुला हेच सांगायचे होते.’’

कपिलचा कंठ दाटून आला. ‘‘असे म्हणू नकोस. नेहा, मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही.’’

‘‘अरे, हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहेत. कुणावाचून कोणी मरत नाही. चल, आज मला शेवटचे घरी सोड. आता संपले आपले संबंध. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. एक चांगली मुलगी बघून लग्न कर आणि हो, मलाही लग्नाला बोलाव. मी येईन. माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही. शिवाय मी त्या मुलींसारखी नाही ज्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाहीत,’’ असे म्हणून नेहा जोरात हसली. कपिलने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडले.

‘‘बाय कपिल, असे म्हणत तोऱ्यातच नेहा तिच्या घराच्या दिशेने निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. कपिल मात्र ती नजरेआड होईपर्यंत तेथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता. त्यानंतर पाणावलेल्या डोळयांनीच तो बाईकवरून माघारी परतला. त्याचे नेहावर खरे प्रेम होते. तिच्याशिवाय तो जगण्याचा विचार करू शकत नव्हता. कसाबसा तो घरी गेला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आईवडील घाबरले. तब्येत बरी नाही असे सांगून तो २ दिवस घरातच झोपून होता. त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटू लागली. तो काहीच खात नव्हता. काही बोलतही नव्हता.

आईने त्याचा जीवलग मित्र सुदीपला बोलावले. सुदीपला कपिल आणि नेहाबाबत माहीत होते. तो खूप वेळ कपिलसोबत बसला होता. पण, कपिल काहीच बोलत नव्हता. एखाद्या दगडासारखा बसला होता. खूप वेळानंतर सुदीपच्या काही प्रश्नांची उत्तरे त्याने रडत दिली आणि सांगितले की, नेहाने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे. सुदीप बराच वेळ त्याची समजूत काढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊन आली. कपिलने रात्रीच हाताची नस कापून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी एका कागदावर लिहून ठेवले होते की, आई मला माफ कर. नेहा मला सोडून गेली आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बाबा, मला माफ करा.’’ आईवडिलांनी हंबरडा फोडला. सुदीपही  माहिती मिळताच हताशपणे धावत आला. जोरजोरात रडू लागला. प्रसंग बाका होता. कपिलची आई जोरजोरात रडत सतत हेच बोलत होती की, ‘‘एका मुलीच्या प्रेमापायी तू आम्हाला कसा विसरलास? आता आमचे कोण आहे?’’

शेजारी, नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले. कपिलच्या आईवडिलांना सावरणे सर्वांसाठी अवघड झाले होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.

सुदीपला नेहाचा खूपच राग आला होता. एके दिवशी तो तिच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला. ती येताच त्याने स्वत:ची ओळख करून दिली आणि कपिलच्या आत्महत्येबाबत सांगितले. नेहा एक दीर्घ श्वास टाकत म्हणाली, ‘‘ऐकून वाईट वाटले, पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तोच कमकुवत मनाचा होता. माझे खरे बोलणे आणि इतर अनेक गोष्टी सहन करू शकला नाही. यात माझी काहीही चूक नाही. त्याच्या आत्महत्येसाठी मी  स्वत:ला अजिबातच दोषी मानणार नाही. नो गिल्ट ट्रिप. मला अपराधीपणाच्यासहलीसाठी पाठवू नकोस, समजले?’’ असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली.  सुदीप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला.

अक्कल दाढ

 * लीना खत्री

मी लहानपणापासून हे ऐकून कंटाळले होते की, मला जराही अक्कल नाही. एके दिवशी जेव्हा मी हे ऐकून चिडून रडू लागले तेव्हा माझ्या आत्येने मला प्रेमाने समजावले की, ‘‘बाळा, अजून तू लहान आहेस, पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला अक्कल दाढ येईल आणि तेव्हा कोणीही असे म्हणणार नाही की, तुला अक्कल नाही.’’

आत्येचे बोलणे ऐकून माझ्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि मी रडणे बंद करून खेळायला गेले. माझी अशी पक्की खात्री झाली होती की, कधीतरी मलाही नक्कीच अक्कल येईल. हळूहळू मी मोठी होऊ लागले आणि याची वाट पाहू लागले की, आता लवकरच मलाही अक्कल देणारी दाढ येईल. या दरम्यान माझे लग्न झाले.

आता सासरीही मला हेच टोमणे ऐकायला मिळू लागले की, तुला तर जराही अक्कल नाही. आईने तुला काहीच शिकवले नाही. हे सर्व टोमणे सहन करत वेळ पुढे निघून चालली होती, पण अक्कल दाढ काही केल्या यायला तयार नव्हती. आता जेव्हा मी वयाची चाळीशी ओलांडली तेव्हा मला अक्कल दाढ येईल, ही आशाच सोडून दिली. एके दिवशी अचानक माझी चावून खायची दाढ प्रचंड दुखू लागली. वेदना असह्य झाल्यामुळे गालावर हात ठेवून मी ओरडत घरात फिरू लागले.

माझी दाढ दुखतेय हे ज्या कोणाला समजले त्या प्रत्येकाने मला हेच सांगितले की, ‘‘अगं, तुला अक्कल दाढ येत असेल. म्हणूच तुला इतकं दुखतंय.’’

मला अत्यानंद झाला. वाटले, उशिराने का होईना, पण आता मला अक्कल येईल. मात्र जेव्हा प्रचंड वेदनेने मी कळवळू लागले तेव्हा वाटले की, यापेक्षा मला अक्कल नव्हती तेच बरे होते. दातांच्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, तुमची कोपऱ्यातली दाढ कीड लागून सडली आहे. ती काढून टाकावी लागेल.

तेव्हा मी कुतूहलाने विचारले, ‘‘ही माझी अक्कल दाढ होती का?’’

माझ्या या प्रश्नावर दातांचे डॉक्टर हसत म्हणाले, ‘‘होय, ही तुमची अक्कल दाढच होती.’’

आता सांगा? मी तरी काय बोलणार होते? एक तर आधीच उशिरा आली आणि कधी सडून गेली ते मला समजलेदेखील नाही. असह्य वेदना सहन करण्यापेक्षा ती काढून टाकणेच मला जास्त योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी ३ दिवसांनंतर दाढ काढायला गेले. तिथे दातदुखीमुळे त्रासलेली आणखीही काही माणसे बसली होती. त्यांच्यामध्ये एक छोटीशी ५ वर्षांची मुलगीही होती. तिच्या समोरच्या दुधाच्या दाताला कीड लागली होती. तो दात काढायला ती आली होती. मी तिला तिचे नाव विचारले, मात्र तिने उत्तर दिले नाही. ती रागाने गाल फुगवून बसली होती.

तिच्या आईने सांगितले की, ३ दिवसांपासून ती दातदुखीमुळे त्रासून गेली आहे. सुरुवातीला दात काढून घ्यायला तयार नव्हती, पण आता सहन होत नसल्यामुळे दात काढायला तयार झाली आहे.

माझा नंबर त्या मुलीच्या नंतर होता. तिला डॉक्टरांनी बोलावले आणि गाल सुन्न होण्यासाठी इंजेक्शन दिले. त्यामुळे तिचा गाल सुजला. आता माझा नंबर आला. तशी तर मी दिसायला सुदृढ आहे, पण माझे मन भित्र्या सशासारखे आहे. काय करणार? इंजेक्शन घ्यावेच लागले. त्यांनतर १० मिनिटांनी डॉक्टर माझी दाढ काढणार होते. मी गाल पकडून तिथेच सोफ्यावर बसले.

घाबरून बसलेल्या मला १० मिनिटांनी आत बोलावण्यात आले आणि माझी अक्कल देणारी दाढ काढून टाकण्यात आली. दाढ काढताना मला विशेष दुखले नाही, पण त्यानंतर त्या जागेवर डॉक्टरांनी औषधाचा कापूस लावला आणि त्या औषधाच्या घाणेरडया वासाने मला तिथेच उलटी झाली. तेव्हा नर्सने माझ्याकडे खाऊ की गिळू, अशाच काहीशा नजरेने बघितले. ते पाहून मी चटकन गाल पकडून बाहेर आले. माझा छोटा मुलगा माझ्यासोबत होता. एक तासभर कापूस काढायचा नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याने मला डॉक्टरांचा निरोप दिला. तो एक तास कसाबसा गेला आणि मला आइस्क्रीम खायला मिळाले.

सुजलेले तोंड घेऊन आईस्क्रीम खाताना मी विचित्र दिसत होते. माझे वेडेवाकडे होणारे तोंड पाहून मुलांना हसू येत होते. मला दाढदुखीमुळे आणि ती काढताना जो त्रास झाला तो झाला, पण हे माझ्यासोबत चुकीचे घडले होते की, ज्या अक्कलदाढेची मी कित्येक वर्षे वाट पाहिली ती अशा प्रकारे आली आणि निघूनही गेली. शेवटी मी मात्र तशीच राहिले. हो, आधी होते तशीच…बेअक्कल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें