कथा * सीमा गर्ग मंजरी
‘‘आई, मी तुला सतत सांगतेय की, मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला पुढे शिकायचे आहे,’’ आईजवळ जात सुदीपाने प्रेमाने तिला समजावून सांगितले.
‘‘सुदीपा बाळा, नाव ठेवण्यासारखे मुलात काय आहे? तो चांगला अभियंता आहे, मोठया घरातला आहे... तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. चांगले कमावतो. त्याच्या घरात एक आवाज दिला की, नोकर सेवेला हात जोडून हजर राहातात. इतक्या सुयोग्य मुलाचे स्थळ तुझ्यासाठी स्वत:हून आले आहे,’’ नाराजीच्या सुरात सुदीपाच्या गालावर हाताने हलकेसे थोपटत आईने सांगितले.
आईच्या गळयाला बिलगून सुदीपा म्हणाली, ‘‘माझ्या लाडक्या आई, मला मोठे होण्यासाठी अजून पुढे शिकायचे आहे... मला चांगली शिक्षिका व्हायचे आहे,’’ सुदीपा आईचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती, कारण आईने नकार दिला तरच हे लग्न टाळता आले असते.
‘‘सुदीपा, तू एकदा त्या मुलाला भेटून तर बघ,’’ सुदीपाला विचामग्न झालेले पाहून आई म्हणाली.
सुदीपा गोरीपान, उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेली देखणी तरुणी होती. संगीत विशारदमध्ये तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचे शेजारी, ओळखीचे, नातेवाईक इत्यादी सर्व तिच्या सुंदर व्यक्तिमत्त्वाचे आणि हसतमुख स्वभावाचे सतत कौतुक करत.
आईचे ऐकून सुदीपा एके दिवशी समीर नावाच्या मुलाला भेटली. तो तिला सुंदर वाटला. तो रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचा तरुण होता. दोन-चार भेटीनंतर सुदीपाला समीर आवडला.
याच दरम्यान योगायोगाने सुदीपाला महाविद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. सर्वांना हा समीरचा पायगुण वाटला.
साखरपुडा करूनच सुदीपाने नोकरीची सुरुवात करावी, असे तिच्या आई-वडिलांचे म्हणणे होते. अखेर त्यांचे मन राखण्यासाठी तिने साखरपुडयाला होकार दिला.
सुदीपा नोकरीत रुजू होण्यापूर्वीच तिचा थाटामाटात साखरपुडा झाला. सुंदर आयुष्याची अनेक रंगीबेरंगी स्वप्ने मनात घेऊन सुदीपाने नोकरीसाठी महाविद्यालय गाठले.
नोकरीत रुजू झाल्यावर ती दिल्लीत एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहात होती. साखरपुडा झाल्यामुळे समीर कामानिमित्त दिल्लीला आल्यावर सुदीपाला भेटायचा.
आता सुदीपा आणि समीरमध्ये जवळचे नाते निर्माण होऊ लागले होते. सुदीपाच्या लक्षात आले होते की, समीरमध्ये शिष्टाचार आणि नम्रता असे संस्कारक्षम गुण फारच कमी आहेत. तिने अनेकदा समीरला फोनवर त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ओरडताना ऐकले होते.