आधार

कथा * डॉ. सुधीर शर्मा

कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वंदना त्या शुक्रवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास पाळणाघरात गेली तेव्हा तिला समजले की, तिचा ५ वर्षांचा मुलगा राहुलला खूप ताप आला होता.

तिच्या फ्लॅटवर जाण्याऐवजी तिने त्याला थेट बालरोगतज्ञ डॉ. नमन यांच्या दवाखान्यात नेले. तिथली गर्दी पाहून ती तणावात आली. ८ वाजण्यापूर्वी घरी पोहोचता येणार नाही, हे ती समजून चुकली. कोरोनानंतर आता पुन्हा डॉक्टरांकडे गर्दी वाढू लागली होती.

काही वेळानंतर अस्वस्थ झालेला राहुल तिच्या कुशीत तिला मिठी मारून झोपी गेला. तिला वाटले की, आपल्या आईला फोन करून बोलावून घ्यावे, पण तिने तसे केले नाही. आई सतत तिला बडबडत असल्याने ती स्वत:चा त्रास वाढवून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

सात वाजण्याच्या सुमारास वंदनाची मोठी बहीण विनिताचा फोन आला. राहुल आजारी असल्याचे ऐकून ती काळजीत पडली. ती म्हणाली, ‘‘वंदना, जेवणाची काळजी करू नकोस. मी तुमच्या दोघांसाठी जेवण आणून देईन.’’

विनिताच्या बोलण्यामुळे वंदनाला हायसे वाटले.

डॉ. नमन यांनी मौसमी तापाचे निदान करत सल्ला दिला की, ‘‘ताप लवकर उतरण्यासाठी राहुलला पूर्ण विश्रांती द्या आणि प्रेमाने त्याला हलका आहार द्या. गरज पडल्यास मला फोन करा आणि हो, सावधगिरी म्हणून कोविड चाचणी करून घ्या म्हणजे संशयाला जागा राहाणार नाही.’’

केमिस्टच्या दुकानातून औषधे घेऊन फ्लॅटवर पोहोचेपर्यंत ८ वाजले होते. तिने सर्वात आधी राहुलला औषध दिले. त्यानंतर त्याला पलंगावर झोपवून ती स्वत:साठी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. डोके प्रचंड दुखत असल्यामुळे तिला चहासोबत डोकेदुखीची गोळी घ्यायची होती.

तिने चहा बनवला, पण तो तिला नीट पिता आला नाही. राहुलने उलटी केली होती. तिने त्याचे कपडे बदलून लादी साफ करेपर्यंत चहा पूर्ण थंड झाला होता.

आपण अचानक रडू असे तिला वाटले, पण डोळयांतून अश्रू ओघळू लागण्यापूर्वीच विनिता पती सौरभसह तेथे आली.

‘‘तू आता राहुलच्या शेजारी जाऊन बस. मी जेवण गरम करून आणते,’’ असे म्हणत विनिता आत गेली.

त्यानंतर १० मिनिटांनी वंदनाची आई कांता या मुलगा विकास आणि सून अंजलीसह तेथे आल्या.

कांता यांनी लगेचच राहुलला आपल्या मांडीवर घेत मिठी मारली. आजीला पाहून त्याला आनंद झाला.

‘‘रात्री तू माझ्यासोबतच राहा. मी तुझ्याच हातून जेवेन. तू मला एक छानशी गोष्ट सांग.’’

रस्सेदार भाजीसोबत एक चपाती खाऊन झाल्यावर राहुल आजीच्या शेजारी झोपला. वंदना आपल्या भाऊ, वहिनी, बहीण आणि भाओजींसोबत बाहेरच्या खोलीत येऊन बसली. नेहमीप्रमाणेच विकास आणि विनिताने वंदनाच्या सासर सोडून फ्लॅटमध्ये एकटे राहण्याचा निर्णयाबद्दल चर्चा केली आणि अवघ्या         १० मिनिटांत ते यावरून एकमेकांशी वाद घालू लागले. या वादात सौरभ आपल्या  पत्नीची आणि अंजली तिच्या पतीची साथ देत होते.

डोकेदुखीने त्रस्त झालेल्या वंदनाला वाटत होते की, चौघांनीही गप्प बसावे, पण ते सर्व तिच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना गप्प करण्याचे धाडस ती करू शकली नाही.

‘‘वंदना, कोणताही वाद वाढवणे चांगले नसते. तू तुझे घर सोडून राहुलसोबत या फ्लॅटमध्ये राहतेस त्याला जवळपास २ महिने झालेत. अरुण तुला घरी परत बोलावून थकला आहे. आता तू समजूतदारपणा दाखव आणि घरी परत जा.

विकासने वंदनाला दिलेला हा सल्ला ऐकून विनिता रागावली, ‘‘दादा, चुकीचे सल्ले देऊन तिचे आयुष्य पणाला लावू नकोस,’’ विनिताने उलट उत्तर दिले.

‘‘सासरच्या नरकात परत जाण्यासाठी वंदनाने वेगळे राहण्याचे पाऊल उचलले नव्हते. रात्रंदिवस तिला टोचून बोलले जायचे… नेहमी अपमान केला जायचा. असे मन मारून जगण्यात ७ वर्षे वाया घालवणे हा खूप मोठा कालावधी आहे. अरुणला पत्नी आणि मुलासोबत राहायचे असेल तर त्याला आता वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागेल. वंदना कोणत्याही किंमतीत परत जाण्याचा मूर्खपणा करणार नाही.

‘‘तू आगीत तेल ओतून तिचे डोके खराब केले नसतेस तर आज ती तिच्या नवऱ्यापासून अशी दूर राहिली नसती,’’ विकासच्या कडवट स्वरात कमालीचा राग होता.

दादा, विनितावर चुकीचा आरोप करू नका,  ‘‘सौरभने लगेच पत्नीची बाजू घेतली,’’ आम्ही दोघेही वंदनाला साथ देतोय. वेगळया फ्लॅटमध्ये राहणे हा तिचा स्वत:चा निर्णय आहे आणि तुम्ही बघाच, तिला जे हवेय ते ती लवकरच मिळवून दाखवेल.’’

‘‘अरुण दबावाखाली येऊन आपले घर सोडायला तयार होईल, असे तुला वाटतेय का?’’

‘‘नक्कीच. पत्नी आणि मुलापासून दूर राहणे सोपे नसते.’’

‘‘भाओजी, मला तुमचे म्हणणे पटत नाही,’’ अंजलीने तिचे मत व्यक्त केले.

‘‘अरुण भाओजींचे त्यांच्या कुटुंबाशी खूप घट्ट नाते आहे. त्यांच्या धाकटया बहिणीचे अजून लग्न झालेले नाही. तिचे लग्न होत नाही, तोपर्यंत ते विभक्त होण्याचा प्रश्नच येत नाही.

घरापासून दूर राहून ते स्वत:च्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाहीत का? वंदनाला सुखी ठेवण्याची त्यांची पहिली आणि मुख्य जबाबदारी नाही का?

विनिताच्या या प्रश्नावर उत्तर नसल्याने विकास आणि अंजलीला गप्प बसावे लागले.

अरुण आणि वंदनाच्या बिघडलेल्या नात्याबद्दल चौघांमध्ये चर्चा होत राहिली. वंदनाने कशीबशी एक चपाती खाल्ली. डोके प्रचंड दुखत असतानाही नाईलाजाने ती त्या चौघांसोबत बसून राहिली. अधूनमधून तिचे मन भूतकाळातल्या आठवणींमध्ये डोकावत होते. त्या चौघांमध्ये सुरू असलेल्या वादात तिला फारसा रस नव्हता, कारण तिने त्यांचे वाद यापूर्वी अनेकदा ऐकले होते.

चार तास उलटूनही कुणीच गप्प बसायला तयार नव्हते तेव्हा कंटाळून वंदना खालच्या आवाजात नम्रपणे म्हणाली, ‘‘सासर सोडून वेगळे राहण्याचा माझा निर्णय योग्य होता की अयोग्य, या विषयावर आता चर्चा करून काय उपयोग? कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. भविष्यात माझ्या या पावलामुळे जे काही होईल त्यासाठी मी स्वत:ला जबाबदार समजेन, इतर कोणालाही नाही.’’

‘‘तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्या सोबत आहोत,’’ विनिताने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी उभी राहिली.

‘‘अरुणला राहुलच्या आजारपणाबद्दल कळव,’’ असा सल्ला देऊन विकास निघायला उठला.

‘‘सकाळी आईला इथे पाठव. माझ्या कार्यालयात सध्या प्रचंड काम सुरू आहे. उद्या शनिवार असूनही मला जावे लागेल,’’ वंदनाचे हे बोलणे ऐकून विकासच्या कपाळावर आठया पडल्या.

‘‘उद्या अंजलीच्या आईवडिलांकडे आम्हाला जेवायला जायचे आहे. आईही आमच्यासोबत येणार आहे,’’ विकासने सांगितले.

‘‘तू राहूलला माझ्याकडे सोड,’’ विनिताने समस्येवर उपाय सांगितला.

‘‘नाही, ते योग्य होणार नाही. त्याला कोविड झाला असेल तर अमित आणि सुमितलाही ताप येईल. आईने अंजलीच्या घरी जाणे रद्द करून इथेच राहायला हवे,’’ सौरभ इतक्या कडक, कोरडया स्वरात बोलला की विनिता तिच्या पतीच्या बोलण्याचा विरोध करूच शकली नाही.

‘‘मी आज रात्रीही राहिले असते, पण मी माझी औषधे आणली नाहीत, शिवाय मला परक्या ठिकाणी नीट झोप येत नाही. राहुलचा ताप आता कमी झाला आहे. मला वाटते, तो सकाळीही झोपून राहील. मी सकाळी लवकर येईन,’’ कांता त्यांच्या सुनेसोबत घरी जायला निघाल्या. त्यानंतर वंदनाने आईला एकदाही थांबायला सांगितले नाही.

सर्व निघून गेल्यावर ती राहुलजवळ जाऊन त्याचा हात पकडून बसली. मुलाच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत असताना अचानक तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली.

कितीतरी वेळ ओघळणाऱ्या अश्रूंमुळे तिला आतून हलके वाटू लागले. खूप थकल्यासारखे आणि सुस्त वाटू लागल्याने ती राहुलच्या शेजारी पडली आणि त्यानंतर तिला कधी झोप लागली हे तिचे तिलाही समजले नाही.

सकाळी तिच्या मोबाईलवर राहुलला कोविड नसल्याचा अहवाल आल्यावर तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. ७ वाजण्याच्या सुमारास ती उठली तेव्हा तिला खूप बरे वाटत होते. त्यातच राहुलचा ताप कमी झालेला पाहून तिला अधिकच प्रसन्न वाटले.

वंदना नेहमी ८ वाजता कार्यालयात जायला निघायची, पण तिची आई या वेळेपर्यंत तिच्या घरी पोहोचली नव्हती. तिला २-३ वेळा फोन केल्यानंतर ती नऊच्या सुमारास विकाससोबत आली.

उशिरा आल्यामुळे वंदना तिच्या भावाशी आणि आईशी भांडली. नाराज होऊन आई निमूटपणे गप्प बसली, पण विकासने तिची खरडपट्टी काढली. ‘‘आज सुट्टीच्या दिवशी तू तासाभर कामाला उशिराने गेलीस तर तुझ्या कामावर एखादे मोठे संकट येणार नाही. नोकरदार महिलांचे डोके नेहमीच फिरलेले असते. तुम्ही काम करता म्हणजे सर्वांवर खूप मोठे उपकार करता, असा विचार तुम्ही का करता? आता प्रत्येक माणूस तुमच्या मागेपुढे तुमची सेवा करत फिरणार का?’’

विकासचे असे उत्तर ऐकून वंदनालाही राग आला आणि त्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला.

वंदना तासभर उशिराने कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला तिच्या साहेबांची बोलणी ऐकून घ्यावी लागली. बहुतेक जण घरून काम करत होते, पण काही महत्त्वाच्या कामासाठी तिला स्वत: कार्यालयात हजर राहावेच लागत असे. त्यामुळे कामाचा ताण वाढत असल्यामुळे तिला तिच्या समस्यांबद्दल कधी फारसा विचार करायला वेळ मिळाला नव्हता, पण मन सतत उदास असायचे.

दिवसभरात फक्त दोनदा आईशी बोलून तिला राहुलच्या तब्येतीबद्दल विचारता आले. औषधांमुळे त्याचा ताप फारसा वाढला नव्हता. राहुल दोन्ही वेळेला झोपला असल्याने ती त्याच्याशी बोलू शकली नाही.

दुपारच्या जेवणाच्या वेळी तिला अरुणचा फोन आला. ती वेगळी राहायला लागल्यापासून त्यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे बंद केले होते.

राहुल आजारी पडल्याचे ऐकून अरुण काळजीत होता.

‘‘त्याची काळजी करू नका. मी त्याची जितकी काळजी घेते त्यापेक्षाही माझी आई त्याची चांगली काळजी घेतेय,’’ वंदनाने रुक्षपणे उत्तर दिले आणि राहुलच्या आजाराचा विषय क्षणार्धात संपवला.

इच्छा असूनही ती कामावरून लवकर निघू शकत नव्हती. संध्याकाळी ६ वाजता ती घरी पोहोचली तेव्हा अरुण राहुलसोबत खेळताना पाहून तिला धक्का बसला.

अरुणने या फ्लॅटमध्ये कधीही पाऊल न ठेवण्याची शपथ घेतली होती, कारण तिच्या इथे येऊन वेगळे राहण्याच्या निर्णयाचा त्याला खूप राग आला होता.

वडिलांना पाहताच राहुलने त्यांना मिठी मारली. त्यानंतर अतिशय आनंदाने त्यांनी आणलेली रिमोट कंट्रोल गाडी तो आईला दाखवू लागला.

कांता यांनी ३ कप चहा आणला. सर्वजण आपापसात बोलण्याऐवजी राहुलशी बोलत होते. तिघांचेही केंद्रबिंदू असल्याने राहुल खूप आनंदी होता.

चहा पिऊन वंदना कपडे बदलण्यासाठी आत गेली. अंघोळ करून ताजेतवाने होऊन ती आली तेव्हा अरुण परत जायला निघाला होता.

‘‘बाबा, तुम्ही जाऊ नका,’’ राहुल वडिलांच्या गळयात हात घालून रडू लागला.

‘‘मी पुन्हा येईन, माझ्या बाळा. तू वेळेवर औषध घे. आई आणि आजीला त्रास देऊ नकोस. तू बरा झालास तर उद्या तुला बाहेर फिरायला घेऊन जाईन,’’

अरुणने राहुलच्या कपाळाचे चुंबन घेत त्याला प्रेमाने समजावले.

‘‘तुम्ही थोडया वेळाने जा. मी आत स्वयंपाकघरात जाऊन येते,’’ वंदनाने ठामपणे सांगितल्यामुळे अरुण काहीच बोलू शकला नाही आणि शांतपणे सोफ्यावर जाऊन बसला.

कांता त्यांच्या घरून जेवण बनवून आणायला तयार होत्या, पण वंदनाने त्यांना नकार दिला. मुलीचे वागणे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. वंदनाचा शांत, गंभीर चेहरा तिच्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता लागू देत नव्हता.

आज अरुणचा मूड चांगला दिसतोय. तू प्रेमाने आणि शांतपणे त्याला वेगळया घरात राहण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केलास तर तो नक्कीच ऐकेल,’’ असा सल्ला देऊन सातच्या सुमारास कांता त्यांच्या घरी गेल्या.

राहुल आणि अरुण एकमेकांशी खेळण्यात मग्न होते. वंदना स्वयंपाकघरात होती. तिने भाजी, रायता आणि चपात्या बनवून जेवण टेबलावर ठेवले.

त्या दिवशी ती अरुणशी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने बोलत होती. एकही तक्रार तिच्या ओठावर आली नाही.

अरुणही काही वेळाने मोकळेपणाने बोलू लागला. त्याने त्याची धाकटी बहीण अंजूच्या लग्नाबद्दल कुठे बोलणी सुरू आहेत त्याबद्दल सांगितले. दोघांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित माहिती एकमेकांना दिली. मित्र आणि नातेवाइकांबद्दल बोलणे झाले. एकंदरीत बऱ्याच दिवसांनी त्यांच्यात कोणताही वाद न होता दोन तास निघून गेले. जेवण झाल्यावर वंदना भांडी गोळा करून स्वयंपाकघरात गेली.

राहुल आणि अरुण पुन्हा गाडी घेऊन खेळू लागले. दोघे एकमेकांमध्ये इतके रमले होते की, दीड तास वंदना तेथे नव्हती, हेही त्यांना समजले नाही.

अरुणने मोठयाने हाक मारल्यानंतर वंदना बाहेर आली.

‘‘आता मी निघतो. ९ वाजलेत,’’   राहुलला मांडीवरून उतरवून अरुण उठून उभा राहिला.

वंदना काहीही उत्तर न देता आत गेलेली पाहून अरुणच्या डोळयात आश्चर्य आणि संभ्रमाचे मिश्र भाव उमटले.

चाकांची मोठी बॅग घेऊन वंदना लगेच परतली तेव्हा अरुणला धक्काच बसला.

‘‘चला,’’ वंदनाने बॅग मुख्य दरवाजाकडे ढकलली.

‘‘तुम्ही येताय का सोबत?’’

‘‘हो.’’

वंदनाचे उत्तर ऐकून राहुलने आनंदाने टाळया वाजवल्या आणि वडिलांना मिठी मारली.

‘‘असे अचानक येताय… मला खूप आश्चर्य वाटले आणि खूप आनंदही झाला,’’ अरुणने राहुलच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले.

अरुणचा हात हातात घेत वंदना भावूक स्वरात म्हणाली, ‘‘आपले घर सोडून गेल्यानंतर आता पुन्हा घरी परत जाताना तुम्ही दोघेच नाही तर आपण तिघेही खूश आहोत.’’

प्रेम आहे

कथा * पूनम अहमद

हाईड पार्क सोसायटी ही ठाण्यातील उच्चभ्रू परिसरात वसलेली आहे. तेथील लोक स्वत:ला सुसंस्कृत, सभ्य, आधुनिक आणि श्रीमंत समजतात, पण अपवाद सर्वत्र असतात आणि इथेही वरकरणी राहणीमान पाहून कधीकधी असे वाटते की कुटुंब खूप चांगली, सुसंस्कृत आहेत, पण जेव्हा वास्तव समोर येते तेव्हा आश्चर्यचकित व्हायला होते. अशाच प्रकारे जेव्हा दोन कुटुंबांचे विक्षिप्त रूप समोर आले तेव्हा येथील रहिवाशांना त्यांचे काय करायचे, हसायचे की त्यांना रोखायचे? हेच समजेनासे झाले. रोहित, त्याची पत्नी सुधा हे मुली सोनिका आणि मोनिकासह इमारत क्रमांक ९ मधील ८०४ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहात होते.

त्यांच्या समोरच्या ८०५ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये आलोक, त्याची पत्नी मीरा आणि मुलगा शिवीन राहात होते. एकेकाळी दोन्ही कुटुंबात चांगली मैत्री होती. दोघांची मुले एकाच शाळा-महाविद्यालयात शिकत होती.

दोन्ही जोडपी खूपच हट्टी, गर्विष्ठ आणि रागिष्ट होती. या कुटुंबांमध्ये जी काही मैत्री होती ती केवळ त्यांच्या लाडक्या, हुशार मुलांमुळे होती. वर्षभरापूर्वी शिवीन आणि सोनिका दोघेही पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. मोनिका मुंबईतच फॅशन डिझायनिंग करू लागली. सर्व काही ठीक चालले होते की, सोसायटीतील काही लोकांनी त्यांच्या समोरचे रिकामी फ्लॅट विकत घेतले. त्यामुळे त्यांचे घर अधिकच आलिशान झाले. या दोन्ही जोडप्यांनाही वाटले की, त्यांनाही समोरचा फ्लॅट मिळाला तर त्यांचे घरही खूप मोठे होईल.

एके दिवशी सोसायटीची मीटिंग सुरू असताना रोहितने आलोकला विचारले, ‘‘तुम्हाला तुमचा फ्लॅट विकायचा आहे का?’’

‘‘नाही भाऊ, मी का विकू…’’

‘‘तुम्हाला विकायचा असेल तर सांगा, आम्ही खरेदी करू.’’

‘‘तुम्हालाही कधी तुमचा फ्लॅट विकायचाच असेल तर आम्हाला सांगा, आम्ही खरेदी करू.’’

‘‘आम्ही कुठेही जाणार नाही, इथेच राहू.’’

‘‘तरीही, जाणार असाल तर आम्हालाच सांगा. आजकाल आजूबाजूला चांगल्या सोसायटया उभारल्या जात आहेत. तुम्ही तिथे मोठा फ्लॅट घेऊ शकता.

‘‘तुम्हाला तिथला मोठा फ्लॅट स्वत:साठी का दिसत नाही?’’

‘‘आम्हाला हीच सोसायटी आवडते.’’

त्या दोघांचे बोलणे एवढयावरच थांबले नाही. ऐकणाऱ्या लोकांना त्या दोघांच्या बोलण्यातला कडवटपणा जाणवला. घरी गेल्यावर रोहित सुधाला म्हणाला, ‘‘मी या आलोकला इथून हाकलून लावणारच, तो स्वत:ला काय समजतो?’’

दुसरीकडे आलोकही रागावत पत्नीला म्हणाला, ‘‘मीरा, तो मला पुरता ओळखत नाही. बघ मी त्याला इथून कसा बाहेर काढतो.’’

दुसऱ्या दिवशी दोघेही लिफ्टमध्ये भेटले, दोघांनी नुसतेच एकमेकांकडे पाहिले, नेहमीप्रमाणे बोलणे झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मोनिका सायकल चालवायला निघाली तेव्हा सायकलच्या नळया कापलेल्या पाहिल्यावर ती सुरक्षारक्षकाला ओरडू लागली, ‘‘हे कोणी केलेय?’’

‘‘ताई, बाहेरून कोणी आलेले नाही,’’ त्याने सांगितले.

‘‘मग माझ्या सायकलची ही अवस्था कोणी केली?’’

सुरक्षारक्षक ओरडा खात राहिला. तो पूर्ण वेळ तिथेच होता. सायकलचे जाणूनबुजून नुकसान केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. मोनिका घरी जाऊन कटकट करत राहिली, हे कोणी केले समजले नाही. दुसरीकडे, आलोक स्वत:वरच खुश होता की, रोहित बाबू, मी तुम्हा सर्वांचे काय हाल करतो ते बघाच.

जेव्हा २ धूर्त लोक समोरासमोर राहातात तेव्हा कुठलीही कृती एकमेकांपासून लपवता येत नाही, दोघेही एकमेकांची चलाखी लगेच पकडतात. येथेही रोहितला समजले की, बाहेरच्या कोणीही येऊन मोनिकाच्या सायकलचे नुकसान केले नाही, ती व्यक्ती त्याच इमारतीतील रहिवासी आहे. पूर्ण संशय आलोकवर होता आणि तो खराही होता. ते विचार करू लागले की, तो आता आपल्याला असाच त्रास देणार. मी त्याला बरोबरच करतो. रोहित सकाळी लवकर उठला आणि त्याने आलोकच्या फ्लॅटबाहेर कचऱ्याचा डबा अशा प्रकारे ठेवला की, दार उघडताच डबा उपडी होऊन कचरा सर्वत्र पसरेल.

आलोक आणि मीरा सकाळी फेरफटका मारायला जायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात होता. सकाळी आलोकने दरवाजा उघडला तेव्हा कचरा पसरला होता. ते कोणाचे काम आहे हे त्याला समजले. लगेचच त्याने रोहितच्या दारावरची घंटा एकदा नाही तर अनेकदा वाजवली. रोहितने रात्रीच दारावरची घंटा बंद करून ठेवली होती. रोहित रागाने ओरडत आलोकला पाहात होता. त्या मजल्यावरील आणखी दोन फ्लॅटमध्ये अविवाहित मुले राहायची. त्यांनी दरवाजा उघडला आणि आलोकला विचारले, ‘‘काय झाले काका?’’

हे बघा, किती बिनधास्त आहेत. कचऱ्याचा डबा कसा ठेवलाय?

त्या मुलांना या गोष्टींमध्ये अजिबात रस नव्हता, त्यांनी फक्त मान हलवली आणि ‘‘काका, तुम्हीच बघून घ्या, आम्ही भाडेकरू आहोत,’’ असे म्हणत दरवाजा बंद केला.

शिविन आणि सोनिका लंडनमधील साऊथ हॉलमध्ये हात हातात घालून बिनधास्त चालत होते. सोनिकाला महाविद्यालयात पारंपारिक दिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी सूट सलवार घालायचा होता. या भागात आल्यावर ट्रेनमधून उतरताच पंजाबमध्ये आल्यासारखे वाटायचे, कारण संपूर्ण परिसर पंजाबी होता. भारतीय वस्तूंची दुकाने वगैरे सर्व काही इथे होते.

सोनिका म्हणाली, ‘‘शिवू, आधी रोड कॅफेत बसून छोलेभटुरे खाऊया, मग कपडे घेऊ.’’

‘‘हो, नक्कीच, हा रोड कॅफे आपल्या प्रेमाची साक्ष आहे, येथेच आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना?’’

सोनिका हसून म्हणाली, ‘‘हो, खरंच.’’

दोघांनीही ऑर्डर दिली आणि एक कोपरा शोधून बसले. शिवीन म्हणाला, ‘‘फक्त चांगल्या ठिकाणी नोकरी लागली की मग लग्न करू.’’

‘‘हो तुझे बरोबर आहे, पण घरातल्यांचे काय? मला नाही वाटत की, तुझे घरचे परजातीच्या मुलीला स्वीकारतील.’’

‘‘नको, स्वीकारू दे. आपले लग्न होणारच. तू माझे बालपणीचे प्रेम आहेस, त्यांना माहीत नाही की, आपण इथे लिव्ह इन मध्ये राहतोय, वेळ आल्यावर मी त्यांच्याशी बोलेन.’’

शिवीन आणि सोनिकाचे एकमेकांवर खूप प्रेम होते तर दुसरीकडे लंडनमध्ये काय चालले आहे याची भारतात कोणालाच कल्पना नव्हती. सुरुवातीला दोघेही काही दिवस इतर मित्रांसोबत खोली भाडयाने घेऊन राहात होते. त्यानंतर एके दिवशी दोघे इथल्या रोड कॅफेमध्ये अचानक भेटले आणि तेव्हापासून एकत्र राहू लागले.

भारतात जे दोघेही एकमेकांना बोलू शकले नव्हते, ते त्यांनी इथे येऊन सांगितले की, दोघेही एकमेकांना नेहमीच पसंत करत होते. आता दोघेही या नात्यात खूप पुढे निघून गेले होते. दोघांच्याही आईवडिलांनी अभ्यासात व्यत्यय येऊ म्हणून आपापसातील भांडणाबद्दल परदेशात शिकणाऱ्या आपल्या मुलांना काहीही सांगितले नव्हते. तिकडे मुले त्यांच्यापेक्षा हुशार निघाली.

रोहित आणि आलोक दोघेही याच प्रयत्नात होते की, कंटाळून का होईना, समोरचे फ्लॅट सोडून जातील, पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होते. रोज नवनवीन योजना आखल्या जात होत्या. कधी दारावर टांगलेल्या दुधाच्या दोन पिशव्यांमधील एक पिशवी गायब व्हायची तर कधी दुधाच्या पाकिटाला छिद्र पाडून सर्व दूध वाया घालवले जायचे. पसरलेल्या दुधामधून वाट काढत पायऱ्या उतरून येणारे लोक दोन्ही कुटुंबांच्या नावाने तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून जायचे. काय चालले आहे, ते सगळयांना कळून चुकले होते.

दोघेही रोज समितीच्या कार्यालयात जाऊन एकमेकांच्या तक्रारी करत. दोघेही इतक्या सफाईने कुरापती करत की, कोणी काय केले, याचा पुरावा कोणालाच मिळत नव्हता.

रोज काहीतरी नवीन योजना आखली जायची. दोघेही अतिशय खालच्या पातळीवर उतरले होते. मीराला झुरळांची खूप भीती वाटते हे सुधाला माहीत होते, म्हणून सुधाने घराबाहेर फिरणाऱ्या झुरळाला कागदात पकडून मीराच्या दाराच्या आत सोडले. मीराचे दार उघडे होते, मोलकरीण काम करत होती, तिने ते पाहिले. यावेळी पुरावा समोर होता.

आलोकने थेट पोलीस ठाण्यात जाऊन सुधाची तक्रार केली. सोबत मोलकरणीला नेले. मोलकरीण घाबरली होती, पण मीराने विनवणी केल्यामुळे ती तिच्यासोबत गेली. थोडीफार कायदेशीर कारवाई झाली आणि रोहित तसेच सुधाला इशारा देऊन सोडून देण्यात आले.

सोसायटीत राहणारे लोक त्रासून आश्चर्याने सर्व पाहात होते. फ्लॅट मोठा करण्यासाठी दोघे एकमेकांना त्रास देत होते. दोन्ही कुटुंब इतकी हट्टाला पेटली होते की, ती बातमी लंडनपर्यंत पोहोचली. सोनिका आणि शिवीनने डोक्याला हात लावला. दोघेही फोनवरून आईवडिलांना समजावत होते, पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता.

सोनिका म्हणाली, ‘‘अरे, आता आपले काय होणार?’’

‘‘काळजी करू नकोस, आपले आईवडील खूप चुकीचे वागत आहेत, पण आपण त्यांच्यामध्ये पडायचे नाही. ते हा मूर्खपणा का करत आहेत तेच समजेनासे झाले आहे. आतापर्यंत स्वत:ची तब्येत आणि एकाकीपणाचे ते रडगाणे गायचे आणि आता अचानक वाद घालायला एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये कुठून आली?’’

मुंबईतल्या दोन्ही घरातले वातावरण तापले होते. दोन्ही कुटुंब आपापल्या परीने एकमेकांचे नुकसान करत होते. आता ते सोनिका आणि शिवीनला रात्री व्हिडिओ कॉलवर सर्व काही सांगू लागले. शिवीन एकुलता एक मुलगा होता. आलोक आणि मीरा त्याला सर्व सांगून मन हलके करत असत. सोनिका आणि शिवीन उदास झाले होते. खूप वाईट घडत होते. भविष्यात दोन्ही कुटुंब एकमेकांचा आधार बनतील.

शिवीन अतिशय गंभीर चेहरा करत म्हणाला, ‘‘सोनू, तिथे दोघांनी एकमेकांचे मोठे काही नुकसान करण्याआधी त्यांना थांबवायला हवे. मी विचार करतोय की, आपण त्यांना आपले नाते सांगू, कदाचित त्याचा त्यांच्यावर काहीतरी परिणाम होईल.’’

‘‘ठीक आहे, प्रयत्न करून बघूया, आता आपल्याबद्दल सांगूनच टाकूयात.’’

त्याच दिवशी दोघेही आपापल्या घरच्यांसोबत व्हिडीओ कॉल करत असताना दोघांनीही स्पष्टपणे सांगितले की, ‘‘तुम्ही तुमच्यातील भांडण इथेच थांबवा, कारण नोकरी मिळताच आम्ही लग्न करणार आहोत आणि आम्ही आताही एकत्रच राहात आहोत. खूप विचार करून आम्ही एकमेकांची जोडीदार म्हणून निवड केली आहे. आमचा निर्णय बदलणार नाही. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा. आमच्यात प्रेम आहे, ते कायम राहील.’’

दोन्ही कुटुंबात अचानक शांतता पसरली. सर्व गप्प बसून होते. कोणी कोणाशीही बोलत नव्हते. बरेच दिवस दोन्ही बाजूंनी शांतता होती. कोणी कोणाला त्रास दिला नाही. सोनिका आणि शिवीनने घरच्यांशी बोलणे बंद केले होते. आईवडिलांना त्यांनी विचार करायला पूर्ण वेळ दिला. मोनिका सतत सोनिकाच्या संपर्कात होती, दोन्ही कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती.

तीन दिवसांनी सोनिकाचे कुटुंबीय सोनिकाशी बोलत होते. रोहित म्हणाला, ‘‘माणूस स्वत:च्या मुलांपुढे हार पत्करतो, आम्ही आणखी काय करू शकतो? तू ती तिला पाहिजे तसे वागू शकते.’’

मोनिका हसली, ‘‘बाबा, यात कुठलाही जयपराजय नाही, हे प्रेम आहे.’’

दुसरीकडे मीरा हसत शिवीनला म्हणाली, ‘‘ठीक आहे जर प्रेम असेल तर आम्ही करूच काय शकतो? सर्व बोलणेच संपले.’’

फोन ठेवल्यानंतर शिवीन आणि सोनिका गप्पा मारत एकमेकांच्या मिठीत हरवून गेले.

दिवाळी धमाका

कथा * पूनम अहमद

एके दिवशी विनय मुंबईतल्या त्याच्या कार्यालयातून परतला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पत्नी रिनाने त्याला यामागचे कारण विचारले असता तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘मला सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे, मला तुमच्यासोबत फ्रान्समधील मुख्य कार्यालयात जाण्याची संधी मिळाली आहे. फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे राहुलला आपण आपल्यासोबत नेऊ शकत नाही.’’

रिनाला अत्यानंद झाला, पण अडचण ऐकून तिचा उत्साह मावळला, ‘‘आता काय करायचे, काहीही झाले तरी ही संधी मला सोडायची नाही.’’

‘‘राहुलला तुझ्या आईवडिलांकडे ठेवूया. तेही इथे मुंबईतच तर आहेत.’’

‘‘नाही विनय, आई आजारी आहे. ती राहुलला सांभाळू शकत नाही. भाऊ, वहिनी दोघेही कामाला आहेत. त्यामुळे त्याला तिथे सोडू शकत नाही, पण आणखी एक मार्ग आहे. दिवाळीसाठी लखनऊहून तुझ्या आईवडिलांना बोलावून घे, ते इथेच राहिले तर राहुलचा वेळ आजूबाजूच्या मुलांसोबत खेळण्यात चांगला जाईल. कंपनी मोफत पाठवत आहे, तर ही संधी सोडणे मूर्खपणाचे ठरेल. यावेळची दिवाळी फ्रान्समध्ये. मी तर कल्पनाच करू शकत नाही. किती छान ना? आताच आईवडिलांशी बोल. त्यांना यायला सांग.’’

विनयने फोनवर सर्व काही वडील गौतम यांना सांगितले. ‘‘बघू,’’ एवढेच ते म्हणाले.

विनय रागाने म्हणाला, ‘‘यात बघण्यासारखे काय आहे? राहुलला फक्त तुमच्यासोबत सोडून आम्ही जाऊ शकतो.’’

गौतम यांनी फोन ठेवला आणि सर्व पत्नी सुधाला सांगितले. दोघेही एकमेकांकडे बघून हसले.

विनयची सर्व तयारी जवळपास वाया गेली. आईवडील न सांगता कुठेतरी गेले होते, याची चिंता होतीच, पण त्याहून अधिक दु:ख म्हणजे परदेशात जाण्याची संधी हातची गेली होती. आईवडील आहेत तरी कुठे? हे समजू शकत नसल्याने मुंबईत राहणारी बहीणही काळजीत होती. विनय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या विचारात होता.

खरंतर विनयला दिवाळीच्या ३ दिवस आधी निघायचे होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच तयारीत मग्न होता. वडिलांना यायला सांगूनही त्यांनी पुन्हा फोन केला नव्हता. रिना म्हणाली, ‘‘ते कधी येणार, हे फोन करून विचारा, आपल्याला जायला फक्त २ दिवस बाकी आहेत.’’

विनयने वडिलांना फोन लावला. फोन बंद होता. त्याने आईला फोन लावला, तोही बंद होता. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिला, मात्र दोघांचे फोन बंदच होते.

तो अस्वस्थ झाला. रिनाही घाबरून म्हणाली, ‘‘लवकर शोध घ्या. आपली जायची वेळ झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे.’’

विनय म्हणाला, ‘‘मी ताईला विचारतो.’’

माया म्हणाली, ‘‘आठवडा होऊन गेला, त्यांच्याशी बोलणे झालेले नाही.’’

आता विनय आणि माया पुन्हा पुन्हा फोन लावत राहिले. आई-वडिलांच्या शेजारी राहणाऱ्या कोणाचाही नंबर दोघांकडेही नव्हता.

दिवाळी आली आणि गेली. विनय किंवा रिना दोघेही परदेशात जाऊ शकले नाहीत, पुरस्कार घेण्यासाठी आणखी ३ जण त्यांच्या पत्नीसोबत गेले. त्यामुळे रिना संतापली, तिच्या अशा वागण्यामुळे विनयचे जगणे कठीण झाले. विनयला गंभीर आजाराचे कारण सांगून सुट्टी घ्यावी लागली.

दुसरीकडे, काही दिवसांपासून विनयचा फोन येण्यापूर्वी लखनऊमध्ये विनयचे आईवडील सुधा आणि गौतम नाराज होते की, विनय नातवासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कधी यायचे, याबद्दल अजून काहीच कसे बोलला नाही.

‘‘विनयने अद्याप सांगितले नाही की, तो इथे लखनऊला येईल की आपल्याला मुंबईला बोलावेल, त्याला आपले तिकीटही काढावे लागेल ना?’’ विनयची आई सुधा म्हणाल्या.

गौतम एक दीर्घ उसासा टाकत म्हणाले, ‘‘त्याला येथे यायचे नाही आणि आपल्याला बोलवायचेही नाही. अजूनही तू तुझ्या मुलाला ओळखले नाहीस, की मग तुला सत्याला सामोरे जावेसे वाटत नाही? ५ वर्षांपासून तो त्याची सर्व कर्तव्ये विसरून स्वत:च्याच विश्वात मग्न आहे. तू तुझ्या मुलाचा विचार करणे सोडून दे. आता आपण दोघेच एकमेकांचा आधार आहोत, दुसरे कोणी नाही.’’

‘‘हो, तुमचे बरोबर आहे. मालाला विचारू का? ती दिवाळीला आली तर निदान घरात थोडासा तरी आनंद येईल.’’

‘‘स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी विचार, पण ती येणार नाही हे मला माहीत आहे. तिला स्वत:चा संसार आहे, ती नोकरी करते, तिला इथे यायला वेळ आहे कुठे? शिवाय मुंबईहून इथे लखनऊला आल्यानंतर तिच्या मुलांना कंटाळा येतो. मागच्या वेळी बघितले नाहीस का, त्यांना सांभाळताना तुझ्या नाकीनऊ आले होते.

‘‘सुधा, मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही आपापल्या जगात मग्न आहेत. कधीतरी तू त्यांच्याशी फोनवर जे काही बोलशील, त्यातच आनंदी राहा. मी आहे तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. कधीतरी त्या वृद्धांचाही विचार कर जे पूर्णपणे एकटे पडले आहेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी फक्त कष्टच केले. आता या विषयावर बोलून रक्त आटवावेसे वाटत नाही. कोणाकडून काहीही अपेक्षा न ठेवता आयुष्याचा हा शेवटचा टप्पा आनंदाने, शांततेने जगूया.’’

तेवढयात शेजारचे रजत दाम्पत्य, ज्यांच्याशी त्यांची जुनी ओळख होती, ते आले. रजत आणि गौतम एकाचवेळी निवृत्त झाले होते. आता रिकामा वेळ ते एकत्र घालवायचे, एकत्र हिंडायचे. त्यांची दोन्ही मुले परदेशात नोकरी करत होती. रजतची पत्नी मंजू यांनी विचारले, ‘‘तुम्ही नाश्ता केला का?’’

सुधा म्हणाल्या, ‘‘नाही, मी अजून काही बनवलेले नाही.’’

‘‘खूप छान, मलाही काही बनवावेसे वाटले नाही. चला बाहेर फिरायला जाऊ, येताना बाहेरच नाश्ता करू.’’

सुधा हसल्या, ‘‘सकाळी, सकाळी?’’

‘‘हो, नाश्ता सकाळीच केला जातो ना?’’ मंजू यांच्या या विनोदावर चौघेही हसले आणि फिरायला निघाले. सकाळचे ९ वाजले होते. चौघेही एका उद्यानात फिरत राहिले. येताना एका ठिकाणी थांबून त्यांनी नाश्ता केला. मौजमजा, सुखदु:खाच्या गप्पा मारून सुधा घरी आल्या, तोपर्यंत त्यांचे मन अगदी हलके झाले होते.

गौतम आणि सुधा पुन्हा त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त झाले. गौतम एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आपल्या पत्नीला भावनाविवश होऊन दु:खी झालेले पाहून त्यांचेही मन दु:खी होत असे, पण ही घरोघरींची व्यथा होती. त्यांना माहीत होते की, सणासुदीला सुधाला मुले सोबत हवी असतात. रोज संध्याकाळी दोघे १-२ तासांसाठी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जायचे. त्यांच्या वयाच्या १२-१३ लोकांचा ग्रुप होता. त्यांच्यासोबत वेळ चांगला जायचा. कोणाला काही गरज लागल्यास संपूर्ण ग्रुप धावून जायचा. सर्वांचीच परिस्थिती एकसारखी   होती.

जवळपास एकसारखाच दिनक्रम आणि एकसारखीच विचारसरणी होती. आता तर हा ग्रुप एखाद्या कुटुंबासारखा झाला होता. राजीव रंजन अनेकदा सांगायचे की, ‘‘कोण म्हणते आपण एकटे आहोत? बघा, आपले किती मोठे कुटुंब आहे.’’

गप्पांच्या ओघात त्या सर्वांनी बाहेर फिरायला जायची योजना आखली.    तिकिटांचे आरक्षण केले. बॅगा भरून झाल्या. व्हिजा काढण्यात आला. दिवाळीतील एकटेपणाचे शल्य आता पळून गेले होते.

दिवाळीच्या ७व्या दिवशी पुन्हा एकदा विनयने वडिलांना फोन लावून पाहिला. बेल वाजली. विनयला आश्चर्य वाटले. गौतम यांनी फोन उचलताच विनयने प्रश्न, टोमण्यांचा भडिमार सुरू केला, गौतम यांनी शांतपणे उत्तर दिले. आम्ही सर्व १० दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो.

विनयला हे ऐकून धक्का बसला. ‘‘काय? कसे? कोणासोबत?’’

‘‘आमच्या सोसायटीच्या ग्रुपसोबत.’’

‘‘पण तुम्ही मला सांगायला हवे होते ना? माझे बाहेर जायचे सर्व नियोजन फसले. तुम्हाला जायची काय गरज होती?’’

‘‘तुम्ही तुमच्या जगण्याची पद्धत बदलली पाहिजे, असे तूच सांगायचास ना? आपण आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, हो ना? शिवाय तू कुठे आमचा विचार करून आम्हाला बोलावत होतास? तो तुझा स्वार्थ होता.’’

विनयला मुस्कटात मारल्यासारखे झाले. तो फोन बंद करून डोकं धरून तसाच बसून राहिला. दिवाळीचा हा धमाका जबरदस्त होता.

चीअर गर्ल

कथा * रितु वर्मा

होय, त्याच्या आयुष्यातील मी एक चीअर गर्ल आहे आणि ही भूमिका मी गेली ३ वर्षे निभावत आहे. हे कोणते विचित्र नाव किंवा नाते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे नाते अजिबात नाही, तर सर्व माहीत असूनही मला लागलेले हे विचित्र वेड आहे आणि स्वत:ला काहीतरी खास वाटावे म्हणून मी ते अनुभवतेय.

आजही मला तो दिवस आठवतो, कदाचित १५ जानेवारी असेल. एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, काही ओळखीचे मित्रही होते, म्हणून मी ती स्वीकारली. त्यानंतर तिथून मेसेज येऊ लागले, मीही उत्तरे देऊ लागले.

‘‘तू खूप सुंदर आहेस,’’ असा मेसेज आला.

मी लिहिले, ‘‘हा… हा… हा…’’

मेसेज आला, ‘‘अगं, मी खरं सांगतोय, तुझा पती खूप नशिबवान आहे.’’

मी पुन्हा लिहिले, ‘‘हा… हा… हा… पण या हा… हा… च्या आतल्या वेदनांमुळे, डोळयात पाणी आले,’’ त्याने संपर्कासाठी नंबर मागितला.

मी लिहिले, ‘‘एवढया लवकर? अजून मी तुला ओळखतही नाही… मला फक्त एवढेच माहीत आहे की, आपण एकाच शाळेत शिकलो.’’

मेसेज आला, ‘‘म्हणूनच मी नंबर मागतोय, पण सुंदर मुली नखरे करतात, हरकत नाही, देऊ नकोस.’’

मनात विचार आला, मी किशोरवयीन नाही आणि तो माझा प्रियकरही नाही, त्यामुळे दोन सुसंस्कृत लोकांनी एकमेकांना नंबर द्यायला काय हरकत आहे?

त्याच्या बोलण्यात काय जादू होती माहीत नाही, पण मी आनंदाने नंबर दिला. एका मिनिटात मला फोन आला. थोडासा विचार करून मी फोन उचलला. तिथून एक अतिशय निरागस हास्य ऐकू आले, असे हसणे ज्यासाठी मी आसुसले होते.

तो म्हणाला, ‘‘फक्त यासाठी फोन केला की, मी कोणी गुंड नाही. एक साधा माणूस आहे आणि तू खरोखरंच सुंदर आहेस.’’

मी थोडीशी लाजले, पण मला आतून आनंदही झाला होता. मी फक्त ‘‘धन्यवाद’’ म्हटले आणि फोन ठेवला. त्यानंतर काही वेळाने व्हॉट्सअॅपवर त्याचा मेसेज आला, ‘‘बोलल्याबद्दल धन्यवाद. आई आणि मुलीचा फोटो खूपच सुंदर आहे.’’

मी एक ४० वर्षांची विवाहित स्त्री होती जी दुभंगत चाललेल्या लग्नातून कशीबशी मार्गक्रमण करत होती. माझा पती माझा असूनही माझा नव्हता, हे मला अनेक वर्षांपासून माहीत होते, पण समाज आणि मुलांसाठी मी हे नाते जपत होते. पती मला त्याचे नाव समाजात देत होता आणि मी त्याचे घर माझे घर मानून सांभाळत होते.

लग्नानंतरची पहिली २ वर्षे आमच्या नात्यात खूप प्रेम होते, नंतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली असे काही दबून गेलो की, फक्त लग्न राहिले आणि प्रेम कापराप्रमाणे उडून गेले.

आता पतीचे घरी उशिरा येणेही त्रासदायक वाटत नव्हते. मी बराच वेळ माझ्या नवीन फेसबुक मित्राचे प्रोफाईल तपासत राहिले.

दरम्यान, मी पाहिले की त्याला माझे जवळपास सर्वच फोटो आवडलेत. त्याने माझ्या प्रत्येक फोटोवर अनेक सुंदर कमेंट्स दिल्या होत्या. वयाच्या ४० व्या वर्षीही मला स्वत:ला १४ वर्षांची मुलगी झाल्यासारखे वाटू लागले.

मुले शिकवणीसाठी वगैरे बाहेर गेली की, आम्ही रोज फोनवर बोलू लागलो. त्याच्या शब्दांनी माझ्या निस्तेज आयुष्याला पंख दिले. मला मी स्वत:लाच कुणीतरी खास वाटू लागले. मी स्त्री असल्याची जाणीव मला नव्याने झाली. खूप दिवसांनी पार्लरला गेले. प्रत्येक काम उरकताना मला त्याचाच चेहरा दिसू लागला होता.

आम्ही दोघे जेव्हा कधी फोनवर बोलायचो तेव्हा तो हेच सांगायचा की, मी किती सुंदर आहे आणि या वयातही मी स्वत:ला किती व्यवस्थित ठेवले आहे. त्याच्या बोलण्याने माझ्या मनाला एक विचित्र भीतीही वाटू लागली होती, कारण आरसा त्याच्या बोलण्यात तथ्य नसल्याचे दाखवून देत होता.

दोन महिने उलटून गेले. तो सतत भेटण्याचा आग्रह करत होता. मलाही त्याला भेटायची उत्सुकता होती, पण भीतीही वाटत होती की, भेटल्यानंतर माझ्या फोटोंनी निर्माण केलेले आकर्षण संपणार तर नाही ना? तरीही मार्चमध्ये भेटायचे ठरवले. तो म्हणाला, त्याला साडी जास्त आवडते.

मुले गेल्यावर मी बराच वेळ कपाट उघडे ठेवून उभी राहिले, नंतर मोरपिशी रंगाची साडी आणि त्यावर शोभून दिसणारे कानातले काढले. मी बराच वेळ तयारी करत होते. गडद गुलाबी रंगाची लिपस्टिक लावताना स्वत:ला आरशात पाहून मला समाधान वाटले.

हृदय धडधडत होते, तरीही तिथे गेले. माझ्या शेजारी एक पांढरी कार थांबली. तो आत बसला होता. तो फोटोपेक्षा अधिक आकर्षक होता. मी बसताच त्याने मैत्रीचा हात पुढे केला. मीही हस्तांदोलन केले. तो पुन्हा मिश्किल हसला.

कुटुंबाच्या गप्पा सांगताना तो सतत मोठयाने हसत होता. खूप वर्षांनंतर मला हवेसारखे हलके वाटत होते. त्याने उपाहारगृहाबाहेर गाडी थांबवली. आत गेल्यावर म्हणाला, ‘‘काय मागवू?’’

मी म्हणाले, ‘‘काहीही.’’

काही स्टार्टर्स आले, तो अधूनमधून माझ्याकडे बघत होता. माझा चेहरा लाजून लाल झाला होता. माझी अवस्था ओळखून तो म्हणाला, ‘‘एवढी का लाजतेस? मी तुला बघायला आलो आहे का? आपण फक्त २ मित्रांप्रमाणे मजा करायला आलो आहोत.’’

मला माझ्या गावंढळपणाची लाज वाटली. लग्नाआधी घरचे वातावरण आणि माझ्या लाजाळू स्वभावामुळे मी कोणत्याही पुरुषाला मित्र बनवले नव्हते. आईवडिलांच्या इच्छेनुसार माझे लग्न झाले आणि मग आयुष्याच्या गिरणीत भरडले गेले.

जेवल्यानंतर, गाडीत बसून आम्ही उगाचच भटकत होतो. त्यानंतर अनोळखी, सामसूम रस्त्यावर जाताच तो माझ्या शरीराशी लगट करू लागला. मी थोडा विरोध केल्यावर तो हळूच म्हणाला, ‘‘लहान मुलांसारखी का वागतेस… मला उगाच नखरे दाखवू नकोस.’’

मी थोडीशी गोंधळले. मनात कुठेतरी असुरक्षिततेची भावना होती की, कदाचित तो मला सोडून तर जाणार नाही ना?

मी संकोचून म्हणाले, ‘‘मी यासाठी तयार नाही.’’

काहीही न बोलता तो स्वत:च्या मर्जीनुसार माझ्या अंगावरून हात फिरवत राहिला आणि तेच वाक्य वारंवार सांगत राहिला जे पुरुष अशा परिस्थितीत वारंवार सांगतात.

न जाणो का, पण खूप दिवसांनी असा प्रेमाचा वर्षाव होत होता. मनाला कळत होते की, जे घडतेय ते चुकीचे आहे, पण, शरीराचीही भूक असते, हे मला त्याच दिवशी समजले. इच्छा नसतानाही माझ्या शरीराने त्याला साथ दिली आणि अनेक महिन्यांनी किंबहुना वर्षांनंतर, शरीर कापसासारखे. हलके वाटू लागले.

स्वत:च्या मर्जीनुसार वागल्यानंतर तो खूप प्रेमाने म्हणाला, ‘‘आपण रोजच फोनवर बोलतो, त्यामुळेच आताचा वेळ मला बोलण्यात वाया घालवायचा नाही.’’

मला थोडे वाईट वाटत होते, तरीही मी त्याचे ऐकत होते. जाण्यापूर्वी त्याने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले, ‘‘तू माझ्यासाठी खूप खास आहेस.’’

हे ऐकून मी पुन्हा कुणासाठी तरी खास आहे, हे मला पटले.

घरी गेल्यावर त्याने मला माझा अनुभव विचारला, मीही विचार केला की, त्याची चीअर गर्ल व्हायला काय हरकत आहे? मी हसले आणि म्हणाले, ‘‘खूप वर्षांनंतर मला कापसासारखे हलके झाल्याप्रमाणे वाटतेय.’’

लहान मुलासारखा उत्तेजित होऊन तो म्हणाला, ‘‘खरंच?’’ आणि मग फोनवरच चुंबनाचा आवाज आला. मी फोन ठेवून दिला.

त्यानंतर रोज माझे मन त्याच्याशी बोलायला आतूर होऊ लागले. मी रोज मेसेज करून विचारायचे. कधी तो मेसेज वाचायचाच नाही तर कधी वाचूनही दुर्लक्ष करायचा. कधी कधी तो ‘नक्की प्रिये’ असा मेसेज पाठवत असे. तो मेसेज वाचल्यानंतर तो संपूर्ण दिवस किंवा रात्र माझ्यासाठी खास होत असे, मी वेडयासारखी खूश होत असे. तो त्याच्या सोयीनुसार बोलत असे, कधी त्याचे बोलणे त्याच्या आयुष्यातल्या जोडीदाराशी संबंधित तर कधी जीवनाच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित असायचे. कधीकधी ज्याला अश्लीलता म्हणता येईल इतके तो बेलगाम बोलायचा.

दरम्यान, आम्ही आणखी दोन वेळा भेटलो, दोन्ही वेळा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. माझी इच्छा नसतानाही मी त्याला जे आवडत होते तेच करत राहिले. कधी कधी मला हे सर्व थोडं विचित्र वाटायचे, पण मी तरी काय करणार होते? तो माझी गरज बनला होता.

कदाचित त्यालाही हे समजले असावे. दरम्यान, माझे दुभंगलेले वैवाहिक जीवन अधिकच दुभंगत गेले आणि मी पतीपासून विभक्त झाले. त्यानंतर तो अधिक सजग आणि सतर्क झाला. आता त्याला थोडे अंतर राखायचे होते. मीही त्याच्याशी सहमत झाले. काचेसारख्या पारदर्शक असलेल्या एका नव्या धाग्यात आम्ही बांधले जाणार होतो.

चार दिवसांपासून त्याच्यासोबत फोनवर बोलणे झाले नव्हते. मला प्रचंड अस्वस्थ वाटत होते. इच्छा नसतानाही मी फोन लावला. त्याने फोन उचलला नाही. मी पुन्हा फोन केला. त्याने तो कट केला. मला काय झाले होते माहीत नाही, मी पुन्हा फोन लावला.

त्याने फोन उचलला आणि चिडलेल्या आवाजात म्हणाला, ‘‘तुला समजत नाही, मी घरी मुलांसोबत व्यस्त आहे. वेळ मिळाला की स्वत:च फोन करेन.’’

माझे ऐकून घेण्यापूर्वीच त्याने फोन कट केला. माझे डोळे पाणावले, पण आता या नात्यातील नवीन समीकरणांची मला सवय करून घ्यावी लागणार होती.

तो मला कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचायला लावत होता आणि मीही सर्व माहीत असून त्याला हवे तसे वागत होते. कदाचित लग्नाच्या विहिरीतून घसरून मी खड्डयात पडले होते. मात्र या खड्डयाची खोली अद्याप मला समजली नव्हती.

आता मात्र मी स्वत:च्या अटींवर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. त्याची स्त्री मैत्रीण असले म्हणून बिघडले कुठे? या नात्यात वाहून जाण्यापेक्षा या नात्याला सहजीवनात रूपांतरित केले तर दोघांचाही फायदा होईल, असे मी ठरवले.

दोन दिवसांनी त्याचा फोन आला. मी पूर्वीसारखा फोन लगेच उचलला नाही. थोडावेळ घंटा वाजल्यानंतर फोन घेतला.

तो म्हणाला, ‘‘मला माफ कर प्रिये, मी थोडा उदास होतो. तुझ्याशिवाय मला कोण समजून घेणार?’’

सर्व समजत असून आणि इच्छा नसतानाही माझे मन पुन्हा विरघळले. त्याच्या कार्यालयातील सहकर्मचारी  त्याला कशाप्रकारे जाळयात अडकवू पाहात आहे, हे तो सांगत होता.

मी असुरक्षित झाल्याप्रमाणे म्हणाले, ‘‘तू दुसऱ्या कोणाकडे बघितलेले मला आवडणार नाही.’’

तो हसला आणि म्हणाला, ‘‘असं का?’’

मी म्हणाले, ‘‘तुला माहीत आहे ना?’’

तो गर्वाने म्हणाला, ‘‘मी एक शिकारी आहे आणि एका शिकारीवर समाधानी होऊ शकत नाही.’’

त्याचे असे वागणे आता नित्याचे झाले होते. कदाचित तो मला सांगू इच्छित होता की, त्याला फक्त एक मित्र म्हणून माझी गरज आहे, मी त्याच्या पुरुषी अहंकाराच्या समाधानासाठी आहे, कारण त्याचे पुरुषत्व त्याला कधीही हे मान्य करू देणार नव्हते की, त्याच्यासाठी मीही खूप गरजेची आहे, पण आता आयुष्याच्या या खेळात चीअर गर्लची भूमिका साकारताना मला मजा येत होती.

आता मीही थोडे बदलले होते. माझ्याशी चांगले बोलणाऱ्या पुरुषांबद्दल मी त्याला सांगू लागले. त्याच्या डोळयांतली असुरक्षितता पाहून मला मजा यायची.

एखाद्या दिवशी त्याने फोन केला नाही, त्याचा मेसेज आला नाही म्हणून माझा दिवस वाईट जाईल, एवढीही मी त्याच्या अधीन गेले नव्हते.

एके दिवशी गप्पा मारताना तो माझ्या मैत्रिणींची चौकशी करू लागला. फेसबुकमुळे माझे संपूर्ण आयुष्य उघडया पुस्तकासारखे झाले होते. त्याने एक अतिशय निर्लज्ज प्रस्ताव दिला आणि तरीही मी शांतपणे ऐकत होते. तो मला माझ्या जिवलग मैत्रिणीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन यायला सांगत होता.

अचानक मला राग आला, ‘‘संभोग करायचा असेल तर पैसे लागतील, सर्व फुकट मिळत नसते.’’

तो मोठयाने हसला आणि म्हणाला, ‘‘प्रिये, तू माझी आहेस. तुझ्या खूप सुंदर मैत्रिणी आहेत, माझ्या मित्रांचेही भले होईल.’’

मीही ठकास महाठक होत म्हणाले, ‘‘मला तुझा कंटाळा आला आहे, तू जसा शिकारी आहेस तशी मीही शिकारी झाले आहे.’’

हे ऐकून त्याचा चेहरा फिका पडला, पण तरीही तो म्हणाला, ‘‘हो, बरोबर आहे.’’

त्या दिवसानंतर त्याचे मित्र आणि माझ्या मैत्रिणीचा विषय आमच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला. तुम्ही विचार करत असाल की, मी एक मूर्ख स्त्री आहे. कदाचित तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य विचार करत असाल, पण माझ्या स्वाभिमानाशी तडजोड न करता, मला ज्यामुळे आनंद होईल तेच मी करत होते. त्याच्याशी बोलणे ही माझी गरज बनली होती, पण आता हळूहळू मीही त्याची गरज झाले होते.

आता आम्ही कधीकधी इकडे तिकडे एकत्र फिरायला जातो. पण या भेटींचा आमच्या कुटुंबावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतो. जेव्हा कधी आम्ही बाहेर जातो तेव्हा एकमेकांमध्ये हरवून जातो, रात्रंदिवस बसून फक्त त्या गोष्टींवरच गप्पा मारतो ज्या आम्ही सामाजिक वर्तुळामुळे कोणाशीही बोलू शकत नाही.

मी फक्त त्याची आहे, एवढे बोलणेही त्याला माझे वेड लावण्यासाठी पुरेसे आहे. आयुष्याच्या रहाटगाडग्यात फिरून कंटाळा आल्यावर जेव्हा कधी तो माझ्याकडे यायचा तेव्हा मी त्याला चिअर गर्लची भूमिका करून हसवायचे आणि मग उत्साहाने तो माझ्यासाठी ते सर्व काही करायचा ज्याची अपेक्षा स्त्रीला पुरुषाकडून असते.

असेच एकदा आम्ही दोघे २ दिवसांसाठी महाबळेश्वरला गेलो होतो. तिथे मला रुही भेटली. ती आणि मी महाविद्यालयतील मैत्रिणी होतो. एकेकाळी आम्ही जणू दोन शरीर आणि एक आत्मा होतो, पण लग्नानंतर हळूहळू एकमेकांपासून दूर गेलो.

मला टक लावून पाहात ती  म्हणाली, ‘‘तुझ्या त्वचेवरून तुझे वय अजिबात समजू शकत नाही.’’

मग अचानक त्याला पाहून आश्चर्यचकित होत म्हणाली, ‘‘हे कोण?’’

मी म्हणाले, ‘‘तो माझा खूप जवळचा मित्र आहे.’’

रुही आश्चर्यचकित होऊन बघत राहिली आणि काही न बोलता निघून गेली.

आम्ही रात्री फिरायला बाहेर पडलो तेव्हा रुहीही तिथे होती. मला समजले की, तीही त्याच उपाहारगृहात थांबली होती. मी आणि रुही कॉफी प्यायला गेलो. मला माहीत होते की, रुहीला मला काहीतरी विचारायचे होते.

वाफाळणारी कॉफी, गुलाबी थंडी आणि कधीही न संपणाऱ्या गप्पा… ती तिचा पती आणि मुलांबद्दल तर मी माझ्या मुलांबद्दल सांगत होते. रुहीला स्वत:ला आवरता आले नाही आणि शेवटी न राहावून तिने विचारले, ‘‘तुझा पती कुठे आहे?’’

मी तिला पडलेले कोडे सोडवत म्हणाले, ‘‘तो आहे आणि तो नाही. माझ्या मुलांचा पिता म्हणून मुलांच्या आयुष्यात आहे, पण माझ्या आयुष्यात नाही.’’

रुही आजीबाईसारखी म्हणाली, ‘‘तुम्ही जे करताय ते बरोबर नाही… लग्न कर.’’

मी शांत स्वरात म्हणाले, ‘‘रुही काय बरोबर आणि काय चूक हे आपल्या भावना ठरवतात. कोणाला न दुखावता मी आणि तो या नात्यात बांधले गेलो आहोत.’’

रुही म्हणाली, ‘‘तू त्याचे घर तोडत आहेस.’’

मी शांत स्वरात म्हणाले, ‘‘मी नव्हे तर लग्नानंतर त्याची होणारी घुसमट याला जबाबदार आहे. माझे त्याच्याशी असलेले नाते काचेसारखे पारदर्शक आहे. रुही, कुठल्याही तिसऱ्याची सावली पडू न देता जोपर्यंत आम्ही एकत्र आहोत तोपर्यंत तो बाहेरून संभोगकरून आला तरी मला समजेल आणि तसे झाले तरी मला फरक पडणार नाही.’’

‘‘मी आणि तो या बंधनात खूप मोकळेपणाने वावरत आहोत आणि हेच या नात्याचे सौंदर्य आहे.’’

रुही म्हणाली, ‘‘मग लग्न कर, तो वाईट नाही.’’

मी म्हणाले, ‘‘लग्नानंतर मी त्याची मालमत्ता होईन. मी त्याच्याबरोबर जशी आहे तशी खुश आहे.’’

रुहीला काहीच समजत नव्हते. ती उठली आणि म्हणाली, ‘‘तुला माहीत आहे का, तुझ्यासारख्या स्त्रियांना समाजात काय म्हणतात?’’

मी म्हणाले, ‘‘रुही, तुझ्या समाजात अशा पुरुषांना काय म्हणतात जे लग्न होऊनही माझ्यासारख्या स्त्रियांमध्ये सुख शोधतात?’’

त्यानंतर मी शांत स्वरात म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या महिलांना समाजात चीअर गर्ल्स म्हणतात, ज्या समाजाच्या विचाराने घाबरलेल्या आणि कंटाळलेल्या पुरुषांना चीअर करतात.’’

आता मुले शाळेत गेल्यावर तो महिन्यातून एकदा घरी येऊ लागला, पण आम्ही दोघंही एकमेकांना काही विचारायचो नाही, काहीही सांगायचो नाही. कधी कधी मी काही बोलायच्या आधीच तो अडवत म्हणायचा, ‘‘यासाठी एक पत्नी पुरेशी आहे, माझ्या आयुष्यात तिची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस.’’

त्याला जेव्हा कधी काही अडचण यायची किंवा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटायचे तेव्हा मी माझे घरातले काम सोडून तासनतास त्याच्याशी गप्पा मारायचे आणि तो माझ्यासाठी किती खास आहे हे त्याला पटवून द्यायचे. त्याचे मनोबल वाढवायचे. त्यानंतर काही दिवस तो माझ्याशी संपर्कही साधायचा नाही, पण आता मला काही फरक पडत नव्हता, कारण माझी ही भूमिका माझ्या आनंदासाठी आहे. मी त्याच्यावर कोणतेही उपकार करत नव्हते आणि तोही माझ्यासाठी जे काही करतो ते त्याच्या आनंदासाठी करतो.

एके दिवशी गप्पा मारताना मी त्याला म्हणाले, ‘‘तुझ्या पत्नीची जागा घेण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही, मग तू मला नेहमी ऐकवून का दाखवतोस?’’

तो म्हणाला, ‘‘तसा विचारही करू नकोस, आपण फक्त मित्र आहोत, माझे माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे.’’

मैत्री हा शब्द ऐकून मला हसू आले, कारण हे नाते मैत्रीच्या पलीकडचे होते.

असेच एकदा बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, ‘‘माझ्या आयुष्यात तू किती मौल्यवान आहेस हे तुला माहीत नाही, मी तुला कोणाशी वाटून घेण्याचा विचारही करू शकत नाही. मी तुला कसा वाटतो?’’

मी हसले आणि म्हणाले, ‘‘माझ्या हृदयात फक्त तूच आहेस, तुझ्याशिवाय मी कोणाचा विचारही करू शकत नाही. मला आयुष्यभर तुझीच राहायचे आहे.’’

तो अभिमानाने म्हणाला, ‘‘वाटून घ्यायला शिक, तुझे हेच वागणे मला आवडत नाही.’’

मीही खोडकरपणे म्हणाले, ‘‘विवाहित यशस्वी पुरुषांच्या जगात माझ्यासारख्या स्त्री मैत्रिणीला खूप मागणी आहे.’’

हे ऐकून तो गप्प बसला.

तो महिन्यातून एकदा माझी अशीच परीक्षा घ्यायचा, पण मी नेहमी त्याला उलट उत्तर द्यायचे. त्याला फक्त माझे शरीर हवे होते, त्याची स्तुती हवी होती. यात माझाही एक फायदा होता, एकटी स्त्री सर्वांवर विश्वास ठेवू शकत नाही. तो थोडा गर्विष्ठ होता, पण विश्वासार्ह होता.

आमच्या नात्यातील प्रत्येक गोष्ट तो ठरवतो, पण मीही माझ्या पद्धतीने त्याचा उपभोग घेते. आम्ही दोघे इच्छा असूनही यातून बाहेर पडू शकत नाही किंवा आम्हाला यातून बाहेर पडायचे नाही.

एके दिवशी मला त्याचा मेसेज आला की, तो कामानिमित्त येणार आहे आणि मला भेटून जाईल.

सकाळपासूनच मी वाट पाहात होते. मीटिंग संपल्यानंतर काही वेळाने निघणार असल्याचा त्याचा फोन आला. मी केशरी आणि जांभळया रंगाचा ड्रेस घालून तयार झाले. तेवढयात त्याचा मेसेज आला, त्याला उशीर होणार आहे.

मी मेसेज केला, ‘‘काही हरकत नाही, पण भेटल्याशिवाय जाऊ नकोस.’’

तेवढयात मेसेज आला, ‘‘मी कदाचित येऊ शकणार नाही.

आता संध्याकाळ झाली होती. मला अश्रू अनावर झाले. मी त्याला फोन करू लागले. तो कट करत राहिला, तेवढयात मेसेज आला ‘गाडी चालवत आहे.’ रात्री मेसेज आला, ‘‘बोलायचे असेल तर बोल.’’

काहीही विचार न करता फोन लावला. पलीकडून एक मोठा आवाज माझ्या कानावर आला, ‘‘का त्रास देतेस?’’ भेटता आले असते तर भेटून गेलो असतो. मला दुसरे काही काम नाही का? तू माझी प्राथमिकता नाहीस.’’

वितळलेले शिसे माझ्या कानावर आदळले, ‘‘तुला आधीच सांगितले होते, माझ्या पत्नीची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस.’’

मीही उलट उत्तर दिले, ‘‘तूझ्या पत्नीची जागा मी घ्यायची नाही, पण मग माझ्यासोबत मी तुझी पत्नी असल्यासारखे कोणत्या अधिकाराने वागतोस? वाईट संबंध असले तरी त्या लग्नात काही अधिकार असतात, पण इथे अनिश्चिततेशिवाय काहीही मिळत नाही. खरंच माझा मित्र असशील तर माझ्या भावनांचा आदर का करत नाहीस?’’

तो काहीच बोलला नाही. बराच वेळ शांतता होती.

त्या घटनेला ३ दिवस उलटून गेले होते, मला खूपच दु:ख झाले होते. चौथ्या दिवशी त्याचा संदेश आला. ‘‘प्रिये, मी उदास होतो. तुझ्याशिवाय मला कोण समजून घेणार?’’

मी पुन्हा आनंदी झाले की, मी त्याच्यासाठी खास आहे. त्या घटनेनंतर तो बोलण्याआधी विचार करू लागला आणि आता तर पत्नीचा विषयही आमच्या बोलण्यात येत नाही.

त्यानंतर एके दिवशी प्रणय करताना त्याने विचारले, ‘‘तुला माहीत आहे का, माझ्या आयुष्यात तू काय आहेस?’’

मी म्हणाले, ‘‘होय मी तुझ्या आयुष्याची चीअर गर्ल आहे, जी तुझ्या आयुष्यात विविध रंग भरते, जेणेकरून तुला आयुष्यातील एकसुरीपणाचा कंटाळा येऊ नये.’’

‘‘मला माझ्या व्यक्तिमत्त्वाची आहुती द्यावी लागत असली तरी तुझे मनोबल वाढवणारी मी एक चीअर गर्ल आहे. अशी चीअर गर्ल जिला भावनांपासून दूर राहावे लागते, जिने फक्त तुमच्या आयुष्याच्या बाहेरच्या ओळीवर राहून तुम्हाला आनंद द्यायचा असतो.

हे सांगण्याची ताकद माझ्यात कुठून आली माहीत नाही. तेव्हा बाहेर आणि आतही शांतता पसरली होती. मला वाटले, कदाचित माझ्या बोलण्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला आहे आणि तो परत कधीच येणार नाही. पण २ दिवसांच्या शांततेनंतर त्याचा मेसेज आला, ‘‘प्रिये, तुझा राग स्वाभाविक आहे, पण तुला माहीत नाही की, मला तुझी किती आठवण येते. आपण इतके चांगले मित्र आहोत, मग तू उगाच नको ते का बोलतेस?

मला त्याची एवढी सवय किंबहुना त्याचे एवढे व्यसन लागले होते की, स्वत:वर ताबा ठेवता येत नव्हता. मी मोबाईल उचलला आणि त्याला फोन केला.

तिथून त्याचा आवाज आला, ‘‘ऐक, तू जी कोणी आहेस आणि ज्या भूमिकेत तुला माझ्या आयुष्यात राहायचे आहे ते सर्व मला मान्य आहे. मला तुला गमावायचे नाही, तू खरोखरंच माझी चीअर गर्ल आहेस.’’

आणि पुन्हा एकदा आमच्या कधीही न संपणाऱ्या गप्पा सुरू झाल्या. आता तो माझ्याबद्दल अधिक गंभीर आणि उत्कट झाला आहे आणि मी त्याच्यासारखी, पण पूर्वीपेक्षाही थोडी जास्तच खोडकर झाले आहे.

तुझ्या विना

कथा द्य डा. नीरजा सदाशीव

माहेरी जाऊन परत आलेली हर्षा अचानकच खूप बदलली होती. उल्हास ऑफिसला जायला निघाला की पूर्वी हर्षा त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असे. ब्रेकफास्ट, टिफिन, टाय, मोबाइल, वॉलेट, पेन, रूमाल, सगळं सगळं जागेवर मिळायचं. अंघोळीला जायचा तेव्हा बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत काढून ठेवलेलं असायचं. घालायचे कपडे, टॉवेल बाथरूममध्येच ठेवलेले असायचे. ऑफिसला जाताना घालायचे कपडे बेडरूममध्ये पलंगावर तयार असायचे. बुटांना पॉलिश, संध्याकाळी चविष्ट जेवण, रविवारची खास फीस्ट, व्यवस्थित, स्वच्छ घर अन् हसरी, प्रसन्न, सदैव चैतन्यानं रसरसलेली मालकीण हर्षा…सतत त्याच्या अवतीभोवती राहण्यात धन्यता मानणारी हर्षा आता अशी का वागते आहे हे उल्हासला कळत नव्हतं.

सध्या त्याला कुठलीही गोष्ट वेळेवर अन् जागेवर मिळत नव्हती. विचारलं तर उलट उत्तर मिळायचं, ‘‘स्वत: करायला काय हरकत आहे? मी एकटीनं किती अन् काय काय करायचं?’’ उल्हासच्या मनात हल्ली वेडेवाकडे विचार यायला लागले होते.

मध्यंतरी उल्हासला जरा बरं नव्हतं तेव्हा त्याची ऑफिसमधली जुनी सेक्रेटरी त्याला भेटायला घरी आली होती. हर्षाला तिचं येणं आवडलं नाही का? तिच्या मनात काही संशय निर्माण झालाय का? त्यामुळे ती अशी तुसड्यासारखी वागू लागलीय? की हर्षाची ती नवी पारूल वहिनी? तिनं काही मनात भरवून दिलंय का? तशी ती जरा आगाऊच वाटते…की एकत्र कुटुंबात, भरल्या घरात राहण्याची तिला सवय होती. इथं फार एकटी पडते…सध्या ऑफिसचं काम फार वाढलंय, बराच वेळ ऑफिसात जातो, घरी वेळ कमी पडतो म्हणून तिची चिडचिड होते का? एखादं मूल असतं, तरी जीव रमला असता पण सध्या नको, दोन वर्षांनी बाळ येऊ दे, हे? प्लॅनिंगही तिचंच होतं…काही विचारू म्हटलं तर धड उत्तर तरी कुठं देते? उल्हासचे विचार सुरू होते.

‘‘उल्हास स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेव. मला यायला उशिर होईल. मी मैत्रिणीकडे भिशीला जातेय,’’ रूक्षपणे हर्षानं सांगितलं.

‘‘कमाल आहे? रविवारी कशी भिशी पार्टी ठेवलीए? एकच दिवस नवरे मंडळी घरात असतात.’’

‘‘अन् आम्ही रोज रोज घरात असतो त्याचं काय? अन् हे बघ, कालपासून तुझे कपडे पलंगावर पसरलेले आहेत ते जरा आवर. सगळी कामं माझ्यावरच का टाकतोस तू? मला समजतोस तरी काय?’’ धडाम् आवाजानं दार बंद झालं.

उल्हास विचार करतोय, पूर्वीही तो असेच कपडे टाकून जायचा. तेव्हा तर हर्षा कटकट न करता सगळं आवरायची. आत्ताच काय घडलंय ज्यामुळे ती नाराज असते, चिडचिड करते…ठीक आहे, आता तो स्वत:ची कामं स्वत:च करेल. तिच्यावर कामाचा ताण नाही पडू देणार.

कसं बसं उल्हासनं जेवण आटोपलं. हर्षाच्या हातचा स्वयंपाक नेहमीच चविष्ट असायचा. अगदी साधी खिचडी किंवा पिठलं केलं तरी त्याची चव अप्रतिम असायची. तिच्या हातचं इतकं छान जेवण जेवायला मिळत होतं त्यामुळे हल्ली त्याची बाहेर जेवायची सवय सुटली होती. पण हल्ली तर कधी स्वयंपाक खारट होतो, कधी तिखट असतो. पोळ्या कच्च्या तरी, जळक्या किंवा वातड, काय झालंय तिला? असा स्वयंपाक तर ती कधीच करत नव्हती. विचार करून दमला होता उल्हास.

मग स्वत:चीच समजूत घालत पुटपुटला. ‘‘चल राजा, होस्टेलचे दिवस आठव आणि लाग कामाला. आज हर्षाला खुश करायला काही तरी छानसा, पदार्थ तयार कर. नाही तरी तिला परत यायला उशीर होणार आहे.’’

झकास डिनर तयार ठेवला तर तिला आनंद होईल. तेवढ्यात त्याला आठवलं की हर्षाला आमीरखानचे सिनेमे आवडतात. त्यानं आधी ‘दंगल’ सिनेमाची तिकिट बुक केली. हल्ली ही ऑनलाइनची सोय फारच छान झाली आहे. मग दोघांना आवडणारा स्वयंपाकपण केला.

हर्षा आली अन् उल्हासनं केलेले काम बघून मनातून खूपच आनंदली. पण वरकरणी काही दाखवलं नाही. कारण हर्षाला हेच हवं होतं. उल्हासनं स्वावलंबी व्हावं. अगदी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचं तिच्यावाचून अडायला नको. उल्हासनं खूप मेहनत घेऊन जेवण बनवलं होतं. पण जेवताना हर्षा चकार शब्दही बोलली नाही. सिनेमा बघतानाही ती अगदी गप्प होती.

‘‘हर्षा, नेमकं काय झालंय, अगं मला काही तरी कळू देत, माझं काही चुकलंय का? चुकतंय का? की हल्ली मीच तुला आवडेनासा झालोय?’’

त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता हर्षा म्हणाली, ‘‘अरे, तुला हिंदी सिनेमे आवडत नाहीत तर माझायासाठी तू तिकिटं काढायला नको होतीस. खरं म्हणजे मित्रांबरोबर तुझ्या आवडीचा एखादा इंग्रजी सिनेमा बघायचास. उगीच माझ्यासाठी बळजबरी हिंदी सिनेमा बघितलास…’’

उल्हास चकित झाला. जी हर्षा, त्याच्या मित्रांसोबत इंग्लिश मूव्ही बघण्यामुळे करवादायची तीच आज असं बोलतेय? का ती अशी त्याच्यापासून दूर जातेय? तिचं अन्य कुणावर प्रेम बसलंय का? छे छे, त्यानं मान हलवून मनातला तो घाणेरडा संशय झटकून टाकला. असा विचार त्याच्या मनात आलाच कसा? हर्षाचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे तो जाणतो. ती इतर कुणाच्या प्रेमात पडणं शक्यच नाही. ठीक आहे तिला वाटतंय ना की उल्हासनं स्वत:ची कामं स्वत:च करावीत? तर, तो ते करेल. मग हर्षा आनंदेल अन् त्याची हर्षा त्याला परत मिळेल.

या दोन तीन महिन्यात उल्हासनं स्वत:त खूप बदल घडवून आणला. स्वत:चे रोजचे कपडे तो रोज धुवायचा, वाळत घालायचा. बाकी कपडे तो रविवारी धुवायचा. काही कपडे बाहेरून इस्त्री करून घ्यायचा, काहींना स्वत:च घरी इस्त्री करायचा. घड्याळ, वॉलेट, रूमाल, फोन चार्जर अगदी प्रत्येक गोष्ट जागेवर लक्षपर्वक ठेवायचा. हर्षाला आता इकडे बघावंच लागत नव्हतं. ऑफिसला जाण्यापूर्वी हॉल अन् बेडरूमही आवरून ठेवायचा. स्वयंपाकातही बरीच प्रगती केली होती.

‘‘हर्षाराणी, आता तर खूष आहेस ना?’’ त्यानं विचारलं की हर्षा हळूच हसायची. पण आतून तिचं मन रडत असायचं. त्याची धडपड बघून तिचा जीव तडफडायचा.

‘‘उल्हास, नवा इंग्लिश सिनेमा आलाय, मित्रांबरोबर बघून ये ना.’’ हर्षानं म्हटलं.

‘‘हर्षा, तू मला तुझ्यापासून अशी दूर दूर का लोटतेस. मला कळंतच नाहीए गं, सांग ना तुझा आनंद कशात आहे? काय करू मी? मी तुझ्या लायकीचा नाहीए असं तुला वाटतं का?’’

‘‘नाही रे उल्हास, तू तर खूपच लायक अन् योग्य मुलगा आहेस. खरं तर तुझ्या लिलामावशीनं तिच्या नणंदेची मुलगी तुझ्याकरता पसंत केली होती. तीच तुझ्यासाठी योग्य बायको होती. तिचं अजून लग्न झालं नाहीए. माझ्याशी तू लग्न केल्यामुळे लिला मावशी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे. तू तिचा राग घालव बाबा.’’

‘‘काही तरी जुनं उकरून काढू नकोस. आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. आपण एकमेकांना पसंत केलं…लग्न केलं…मजेत चाललंय आपलं तर लिला मावशी मध्येच कुठून आली? बरं, निघतो मी ऑफिसला, उशीर होतोय. सायंकाळी बोलूयात…रिलॅक्स!’’ अन् मग निघता निघता तिच्या कपाळावर ओठ टेकवून म्हणाला, ‘‘तू हवं ते कर, मी तर तुझ्यावर प्रेम करतो, करत राहीन. सी यू हनी…’’

‘‘तेच तर मला नकोय उल्हास, मला तुला काही सांगताही येत नाहीए रे,’’ हर्षा किती तरी वेळ रडत होती, तिला उद्याच मुंबईला जायचंय. पुन्हा परत न येण्यासाठी. कसंबसं स्वत:ला सावरून तिनं तिची छोटी बॅग भरून घेतली. सायंकाळी उल्हास आला तरी तिला तिच्या मुंबई प्रवासाबद्दल बोलायचं धाडस झालं नाही. रात्री हर्षा बेचैन होती. कूस बदलत होती.

‘‘तुला बरं वाटत नाहीए का हर्षा?’’ उल्हासनं तिला पाणी आणून दिलं. थोड्या वेळानं चहा करून दिला. तिचं डोकं चेपून दिलं.

‘‘डॉक्टरांना बोलावू का?’’

‘‘नको रे, डोकं दुखतंय जरा, बरं वाटेल. झोप तू.’’

उल्हासनं तेलाची बाटली आणली. ‘‘डोक्यावर तेल थापतो. मसाज केल्यावर बरं वाटेल.’’ तो म्हणाला.

बाटलीचं झाकण उघडताना ते हातातून निसटून पलंगाखाली गेलं, वाकून काढलं तेव्हा खाली सूटकेस दिसली.

‘‘ही बॅग कोणाची? कोण जातंय?’’

‘‘अरे हो, उल्हास, मला उद्या मुंबईला जायचंय. माझा भाऊ येतोय मला घ्यायला. माझी मैत्रीण आहे ना रूचीरा…तिच्या धाकट्या बहिणीचं लग्न आहे. कुणी नाहीए मदतीला. खूप घाबरली आहे ती. खूप नर्व्हस झालीय. तिच्या मदतीला जातेय मी. तिनं फोन केला तेव्हा तुलाही सांगते म्हणाली, मीच म्हटलं काही गरज नाहीए. उल्हास कधीच मला नाही म्हणत नाही. महिनाभर काय सहा महिने राहू शकते मी. उल्हास तर आता इतका स्वावलंबी झाला आहे की माझ्यावाचून सहज राहू शकतो. खरंच ना उल्हास?’’ ती हसली पण इतकं प्रेम करणाऱ्या नवऱ्याशी खोटं बोलावं लागतंय म्हणून काळीज आक्रंदत होतं.

‘‘अरे, एकटं राहण्याची सवय हवीय. एक गेला तर दुसऱ्याला त्याच्या वाचून जगता आलं पाहिजे. रडत बसून कसं भागेल?’’ ती पुन्हा हसली.

‘‘गप्प रहा. मूर्खासारखं काही तरी बोलू नकोस. तू जातेस तर जा. अडवत नाही मी तुला पण परत कधी येशील ते तरी सांग. लग्नाला जातेस, दहा दिवस खूप झाले…बरं पंधरा दिवस…पण रोज फोन करायचा. चल झोप…फार उशीर झालाय.’’

सकाळी आठ वाजता अभी आला. ‘‘ताई कुठाय?’’

‘‘अरे,काल तिला बरं वाटत नव्हतं. उशीरा झोपली. म्हणून उठवलं नाही.’’

‘‘पण भावजी, उशीर नको व्हायला, फ्लाइट चुकायची नाही तर.’’

‘‘तू उठव, मी चहा ठेवलाय. कालच मला कळलं हे मुंबईचं. मी चहाचा ट्रे घेऊन आलोच.’’

हर्षा तेवढ्यात उठून बसली. ‘‘व्हायचा तो उशीर झालाच आहे,’’ ती म्हणाली.

‘‘तू तिथं अजून थांबून पूर्ण उपचार करून घ्यायचे होते. जीजूंनाही सांगायला हवं होतं.’’ अभीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

‘‘अरे वेळ कमी होता. उल्हास तर माझ्यावर इतका अवलंबून होता. त्याला आत्मनिर्भर, स्वावलंबी करायला मी इथं आले. माझ्याशिवाय राहण्याची सवय व्हायला हवी त्याला. तू शांत हो…’’

अभीनं डोळे पुसले. उल्हास चहा घेऊन आला. चहा घेऊन दोघं निघालीच निघता निघताही हर्षा उल्हासला ढीगभर सूचना देत होती. शेवटी बजावलं, ‘‘मला सारखा फोन करू नकोस. मैत्रीणी चिडवतात मग की उल्हास तुझ्याशिवाय राहू शकत नाही.’’

‘‘आता तू माझी काळजी करू नकोस. अजिबात टेंशन घेऊ नकोस. मैत्रिणीकडे लग्नाला, मदतीला जाते आहेस, आनंदात जा. मी सगळं मॅनेज करतो. अगदी राजासारखा राहतो बघ.’’

एयरपोर्टवर पोहोचेपर्यंत हर्षानं उल्हासचा हात धरून ठेवला होता. आत जाताना त्याचा हात सोडला अन् तिला वाटलं, तिचं सर्वस्व हातातून निसटलं. डोळे भरून त्याच्याकडे बघून घेतलं, हळूच बाय म्हटलं अन् भरून आलेले डोळे लपवण्यासाठी चेहरा वळवला. रडू कसंबसं आवरलं.

हर्षाला जाऊन दोनच दिवस झाले होते. ऑफिसात उल्हासला सांगण्यात आलं शुक्रवारी मुंबईत मीटिंग आहे. त्याला खूप आनंद झाला. त्यानं ही बातमी सांगायला हर्षाला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. मग त्यानं विचार केला हर्षाला सरप्राइज देऊयात.

हर्षाच्या घरी पोहोचला उल्हास, ‘‘अरे अभी, मला रूचीचा फोन दे. हर्षाला सरप्राइज देणार आहे. माझी उद्या मीटिंग आहे सकाळी, म्हणून मी आलोय.’’

‘‘चला, मी तिकडेच निघालोय.’’ तो म्हणाला.

‘‘थांब, आईंना भेटून घेतो.’’ उल्हासनं म्हटलं.

‘‘सगळे तिथंच आहेत, चला.’’

टॅक्सी भराभर मार्ग कापत जात होती. ‘‘अरे इकडं कुठं? टाटा मेमोरियलमध्ये लग्न?’’ उल्हासला काहीच सुधरेना…‘‘हर्षाला काय झालंय?’’

त्याचा हात धरून अभी त्याला हर्षापाशी घेऊन आला. ‘‘सॉरी ताई, जीजू अवचित आले म्हणून मग…’’ मग त्याला पुढे बोलवेना.

हर्षाच्या डोळ्यात उल्हासला बघण्याचीच आस होती. त्याला बघून तिला समाधान वाटलं, ‘‘आता मी सुखानं मरते.’’ तिनं उल्हासचे हात घट्ट धरून ठेवले.

‘‘हर्षा, हर्षा…मी तुला मरू देणार नाही. तुला काहीही होणार नाही…तू मला सांगितलं का नाहीस? डॉक्टर डॉक्टर धावा…’’

‘‘तुम्ही जरा बाहेर निघा. धीरानं घ्या. मी त्यांना तीन महिने आधीच सांगितलं होतं, मुळात यायला फार उशीर केला त्यांनी. आता काही नाही होणार…’’

‘‘असं म्हणू नका डॉक्टर, तुम्हाला जमत नसेल, तर मी हर्षाला अमेरिकेला घेऊन जातो. ती बरी होणार. तुम्ही ताबडतोब डिसचार्ज द्या. हर्षा, मी तुला काही होऊ देणार नाही…आलोच मी…’’ उल्हास बाहेर धावला.

पूर्ण प्रयत्नांनी त्यानं अमेरिकेला जाण्याची व्यवस्था केली. दोनच दिवसांनी तो हर्षासह लुफ्तहंसाच्या विमानात होता. त्याची आशा विमानापेक्षाही उंच उडत होती.

‘‘हर्षा तुझ्याशिवाय मला जगायचं नाहीए.’’ त्यानं हळूवारपणे हर्षाच्या कानात म्हटलं अन् नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर चुंबन अंकित केलं. मात्र त्याचे डोळे यावेळी भरून आले होते.

आजी बदलली आहे

कथा * ऋतुजा सोनटक्के

गेली पंधरा वर्ष आम्ही अमेरिकेत राहतोय. इथल्या नोकरीमुळे आम्ही जणू इथलेच झालो आहोत. तीनचार वर्षांनी एकदा आम्ही आईबाबांना भेटायला भारतात जात असू. मुलंही आता इथंच रूळलीत. अनेकदा मी नवऱ्याला म्हटलं, ‘‘आपण आता कधीच भारतात जाऊन राहणार नाही का?’’ तो म्हणाला ‘‘अशी नोकरी तिथं मिळत नाही अन् तिथली नोकरी आपल्याला आवडत नाही, म्हणजे शेवटी आपल्याला इथंच राहणं आलं,’’ तर आम्ही दोघं आपापल्या नोकऱ्या करतोय.

मला आईवडिल नाहीत. नवऱ्याच्या म्हणजे आकाशच्या आईबाबांना मी आईबाबाच म्हणते. ती दोघं भारतात असतात. माझी एकुलती एक नणंद आशूही मुंबईत असते. तिचा नवरा मर्चंट नेव्हीत असतो. तिच्या दोघी मुलींसह ती आईबाबांच्या फ्लॅटच्या शेजारीच असते. ती त्यांची काळजी घेते. यामुळे आम्हीही निर्धास्त असतो. पण आम्हाला असं वाटतं की आता आईबाबांनी तिथं एकटं राहण्यापेक्षा आमच्याकडे येऊन राहावं.

पण त्यांचं एकच म्हणणं आहे की इथल्या घराचे बंध तुटत नाहीत. अन् अमेरिकेत आम्हाला आवडणार नाही. तिथं फारसे भारतीय नाहीत, भाषेचा एक मोठा अडसर आहेच. पण आशूताईनं त्यांना समजावलं की अमेरिकेत आता खूप भारतीय राहतात. शिवाय थोडे दिवस राहिलात तर भाषाही समजते, बोलता येते. मग ती दोघं आमच्याकडे यायला तयार झाली. आकाश भारतात गेला, आईबाबांचा फ्लॅट विकायला काढला. नाही म्हटलं तरी तो फ्लॅट विकताना आईबाबांना वाईट वाटलं. तिथल्या एकेका वस्तूवर त्यांचा जीव होता. अत्यंत कष्टानं त्यांनी संसार जमवला होता.

पण त्याचवेळी आयुष्याचे उरलेले दिवस आपण नातवंडांसोबत घालवू ही गोष्ट उमेद देत होती. दोनच महिन्यात सगळं काही मार्गी लावून आशुताईचा निरोप घेऊन आईबाबा आमच्याकडे अमेरिकेत आले. आशुताईलाही फार वाईट वाटत होतं. कारण आता भारतात तिलाही कुणाचा आधार नव्हता. मनातलं सांगायला आईएवढं हक्काचे कोण असतं?

माझी मुलं अक्षय आणि अंशिका यांना भेटून आईबाबा सुखावले. मुलंही आपल्या परीनं त्यांच्याशी जुळवून घेत होती. आईंना मुलांचे इंग्रजी एक्सेंट समजत नसत, पण खाणाखुणा करून त्यांचं संभाषण चालायचं. त्यांना इथं बरं वाटावं म्हणून मी बरीच मराठी, हिंदी पुस्तकं व मासिकं ऑनलाइन मागवून घेत होते. हळूहळू इथल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांनाही जमवून घेता आलं.

एक दिवस मी म्हटलं, ‘‘आई, इथं संध्याकाळी काही भारतीय बायका एकत्र जमतात. आपल्याकडे कसा कट्टा असतो, कट्टयावरच्या गप्पा असतात, तसंच! काही तर तुमच्या वयाच्या अन् मुंबईत राहून आलेल्याही आहेत. आज सायंकाळी आपण तिकडे जाऊ, तुमची ओळख करून देते मी. काही मैत्रीणी मिळाल्या की तुमचीही संध्याकाळ मजेत जाईल.’’

आई कबूल झाल्या. मग मी सायंकाळी त्यांना घेऊन कट्टयावर गेले. रूपा मावशी, विनिता मावशी, कमल मावशी अन् लीला मावशींशी ओळख करून दिली. त्या सर्व आईंच्याच वयाच्या होत्या. त्यांनी आनंदानं, प्रेमानं आईंचं स्वागत केले. रूपा मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या या कट्टयावर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता आपण रोज भेटूयात. कट्टयावरच्या गप्पांमध्ये, आपल्या वयाच्या आणखी एक सभासद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.’’

त्यानंतर आई रोजच त्या सर्वांसह बागेत जाऊ लागल्या. तिथं त्यांचे दोन तास अगदी मजेत जायचे. आता त्यांना इथं राहणंही आवडू लागलं. बाबांनाही इथं मित्र भेटले होते. त्यांनाही इथं आवडत होतं. सकाळी पायी फिरून येणं, सायंकाळी कट्टा, दुपारी वाचन वामकुक्षी व मला स्वयंपाकात मदत करण्यात आईंचा दिवस भर्रकन् संपायचा. रोज सायंकाळी घरी आल्यावर त्या मला तिथं काय काय गप्पा झाल्या ते सांगायच्या. एक दिवस मात्र त्यांचा मूड जरा नीट नव्हता. वालाच्या शेंगा मोडता म्हणाल्या, ‘‘आज रूपा सांगत होती इथं एक भारतीय जोडपं आहे. त्यातला पुरूष नपुंसक आहे. त्याच्या बायकोचं तिच्या ऑफिसमधल्या कुणाशी तरी सूत आहे म्हणे.’’

‘‘आई, इथं अशा गोष्टी सर्रास घडतात. फार कुणी त्यावर चर्चा करत नाही. मी ओळखते त्या दोघांना…दोघंही सज्जन आहेत.’’ मी म्हटलं.

‘‘डोंबलाचे सज्जन, अगं नवरा असताना बाईनं दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवायचे हे काय सज्जनपणाचं लक्षण म्हणायचं का?’’ आई चिडून बोलल्या.

मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांच्या पिढीला अन् भारतात तर हे सगळं भलतंच, अपवित्र किंवा पाप वाटणार. अर्थात् भारतात लपूनछपून अशा गोष्टी घडत असतातच. उघड झालं तर मात्र कठीण असतं. पण आपल्याकडेही रखेल, देवदासी, अंगवस्त्र बाळगणारे लोक होतेच की! श्रीमंत लोक तर उघड उघड हे करायचे. श्रीमंतांना अनेक गोष्टींची मुभा असते. एरवी लपून छपूनही लोक भानगडी करतात. इथं मात्र (म्हणजे अमेरिकेत) सगळं उघड असतं. लोक मोकळेपणानं अशी नाती स्वीकारतात. पण हे आईंना कुणी समजवायचं? मी गप्प बसले. त्यांच्यासोबत शेंगा मोडू लागले. विषय बदलला अन् वेगळ्याच विषयावर आम्ही बोलू लागलो.

आता आईंनाही बऱ्यापैकी इंग्रजीत बोलता येऊ लागलं. त्यामुळे मुलांशी त्या खूप गप्पा मारायच्या. मुलांनाही त्यांच्याकडून भारतातल्या गमतीजमती ऐकायला आवडायचं. आईची मला घरकामात खूप मदत व्हायची. इथं नोकरचाकर हा प्रकारच नसतो. सगळं स्वत:च करायला लागतं. आईंची घरकामतली मदत मला मोलाची वाटायची.

आता त्या इथं छानच रूळल्या होत्या. दर महिन्याला एकदा सगळ्या मैत्रिणी मिळून रेस्टारंण्टमध्ये जायच्या. एकत्र जमायच्या. तेव्हाही प्रत्येकीनं काहीतरी नवा पदार्थ करून आणायचा. आईंना ही कल्पना आवडली. त्या सुरगण होत्या. त्यांनी केलेला पदार्थ नेहमीच भरपूर प्रशंसा मिळवायचा. आता त्या सलवार सूट वापरायला लागल्या होत्या. नवी पर्स, मॅचिंग चप्पल वगैरेची त्यांना मजा वाटत होती. लिपस्टिकही लावायच्या. कधी कधी पत्ते नाही तर एखादा वेगळाच खेळ असायचा. एकूण त्यांचं छान चाललं होतं.

एकदा मी ऑफिसातून परतले, तेव्हा त्या ही त्यांच्या कट्टयावरून घरी परतल्या होत्या. माझी वाट बघत होत्या. त्यांना काहीतरी मला सांगायचं होतं. मी घरात आले तशी पटकन् दोन कप चहा करून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या.

‘‘काय म्हणतोय तुमचा कट्टा?’’

‘‘बाकी सगळं छानच आहे गं, पण काही गोष्टी मात्र फारच विचित्र असतात इथं. आज तर स्पर्म डोनेशनचा विषय होता चर्चेला. जर एखाद्या पुरुषाला शुक्राणू (स्पर्म) पुरेसे किंवा सशक्त नसल्यामुळे मूल होत नसेल तर त्याच्या बायकोच्या गर्भाशयात दुसऱ्या कुणाचे तरी शुक्राणु ठेवून गर्भ तयार करतात किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाच्या दोषामुळे पोटात मूल वाढवता आलं नाही तर ती आपलं मूल भाड्याचं गर्भाशय घेऊन (दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ ठेवून) मूल जन्माला घालू शकते. शी शी काय हा अधर्म? घोर कलियुग गं बाई!!’’

मी शांतपणे म्हटलं, ‘‘पण जर मूल हवं म्हणून अशी मदत घेतली तर त्यात वाईट काय आहे?’’

‘‘पण ज्या मातेच्या गर्भात ते मूल वाढेल, तिचेच गुणधर्म, दोष वगैरे घेऊन बाळ जन्माला येईल ना? मग ते मूल स्वत:चं कसं म्हणायचं?’’

यावेळी वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. मी बोलण्याचा विषय बदलायचा प्रयत्न केला, पण आई अजूनही तणतणत होत्या. ‘‘कसला देश आहे…अन् कसली माणसं आहेत. काही संस्कृती, संस्कार यांना नाहीतच जणू. यापुढची पिढी अजून काय काय करेल, कुणास ठाऊक?’’

माझ्या अमेरिकन झालेल्या मुलांना आजीचं हे वागणं, बोलणं फारच मागासलेलं, बुरसटलेलं वाटत होतं. ‘‘ममा, आजी असं का बोलते? जो तो आपला स्वतंत्र आहे ना आपल्या पद्धतीनं वागायला?’’ लेकीनं मला हळूच म्हटलं.

‘‘हो गं! पण आजी आताच भारतातून आली आहे ना, तिला हे सगळं विचित्र वाटतंय.’’ मी लेकीची समजूत घातली.

बघता बघता तीन वर्षं उलटलीसुद्धा. आईंना एकदा भारतात जाऊन आशाताईंना भेटायची फार इच्छा झाली होती. मुलांनाही सुट्या होत्या. मी त्यांची तिकिटं काढून दिली. बाबांना इथंच त्यांच्या मित्रांचे वाढदिवस असल्यामुळे मुंबईला जायचं नव्हतं. ते इथंच राहणार होते.

आई आणि मुलं आल्यामुळे आशुताईला खूप आनंद झाला. गेली तीन वर्षं ती ही फार एकटी पडली होती. आशुताईनं मुलांसाठी, आईसाठी खूप कार्यक्रम ठरवून ठेवले होते. रोज सगळी मिळून कुठं तरी भटकायला जायची. रोज घरात नवे पदार्थ केले जायचे. मुलांच्या आवडीनिवडी, कोडकौतुक पुरवताना आशुताईला खूप आनंद वाटायचा. निशांत म्हणजे माझे मेव्हुणे, आशुताईचा नवरा शिपवरच असायचा. आपल्या दोन मुलींना तर आशुताईनं एकटीनंच वाढवलं होतं. अर्थात निशांत पूर्ण क्रेडिट आशुताईना द्यायचा.

एकदा रात्री आईंना थोडं बेचैन वाटायला लागलं म्हणून त्या आपल्या खोलीतून बाहेरच्या हॉलमध्ये सोफ्यावर येऊन लवंडल्या. रात्री माझी व आशुताईची मुलं एकाच बेडरूममध्ये झोपत होती. एक खोली आईंना दिली होती. एक खोली आशुताईची होती. आईंना झोप येत नव्हती.

तेवढ्यात आशुताईच्या खोलीचं दार उघडलं. एक तरूण पुरुष खोलीतून बाहेर पडला. त्याला सोडायला गाऊनमध्येच असलेली आशुताईही खोलीबाहेर पडली. जाता जाता त्यानं आशुताईना पुन्हा मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अन् बाय करून तो निघून गेला.

आपली आई सोफ्यावर बसली आहे हे आशुताईला ठाऊकच नव्हतं. तो पुरुष निघून गेला अन् आईंनी ड्रॉइंगरूमचा दिवा लावून जोरानं विचारलं, ‘‘कोण आहे हा? तुला असं वागणं शोभतं का? तुझा नवरा इथं नाही, तुझ्या मुली मोठ्या होताहेत…’’

‘‘आई, जाऊ दे…तुला कळायचं नाही,’’ आशुताईनं म्हटलं.

आईचा पारा चढलेलाच होता. ‘‘मला कळायंचं नाही का? तुझी अक्कल शेण खायला गेली आहे, माझी नाही,’’ आईनं ताबडतोब फोन लावून अमेरिकेत माझ्या नवऱ्याला ही बातमी दिली.

क्षणभर तर आकाशही भांबवला. मग म्हणाला, ‘‘आई, तू आशुताईला काही बोलू नकोस, मला आधी सगळं प्रकरण समजून घेऊ दे.’’

‘‘तुम्ही ताबडतोब इथं या. मी काय म्हणते ते कळेल तुम्हाला.’’ आईंनी रागानं फोन आपटला.

दुसऱ्याचदिवशीची तिकिटं मिळवून आम्ही दोघं भारतात आलो. आम्हाला बघून आशुताई खूपच घाबरली. त्या दिवशी आम्ही काहीच बोललो नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिच्यापाशी हा विषय काढला. ती जे सांगत होती ते फार विचित्र होतं. ती सांगत होती,

‘‘दादा, तुला ठाऊक आहे. आमचं लग्नं आम्हा दोघांनाही न विचारता ठरवलं गेलं. मर्चंट नेव्हीच्या नोकरीमुळे निशांत सहा महिने बोटीवर असतो. त्या काळात त्याचे अनेक मुलींशी संबंध येतात. इथं तो येतो तेव्हाही त्याला माझ्यात फारसा इंटरेस्ट नसतो. तो घरातला कर्ता पुरुष म्हणून कर्तव्य पार पाडतो. आमच्या दोन मुलींसाठी खरं तर आम्ही एकत्र आहोत. हा फ्लॅट मला घेऊन दिलाय. घर खर्चाला भरपूर पैसाही देतो. मुलींना काही कमी पडू देत नाही, पण आमच्यात पतिपत्नी म्हणून तसा संबंध नाही.

मी त्याला या बाबतीत विचारलं तर तो म्हणतो तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुला हवं तर तू घटस्फोट घे. इतर कुणाशी संबंध ठेवायचे तर ठेव. फक्त बाहेर या गोष्टीची चर्चा व्हायला नको. बाहेरच्या जगात आम्ही पतिपत्नी आहोत. पण तशी मी एकटी आहे. मुलींना सोडून कुठं जाऊ? डिव्होर्स घेतला तर मुलींच्या लग्नात अडचण येऊ शकते. पण मलाही प्रेम हवंय. शरीराची ओढ काय फक्त पुरुषालाच असते? स्त्रीला शरीरसुख नको असतं?’’

आशुताई एवढं बोलतेय तोवर आईंनी तिच्या थोबाडीत मारलं. ‘‘लाज नाही वाटत असं बोलायला,’’ त्या ओरडल्या.

आकाशनं आईचा हात धरून तिला बाजूला घेतलं. ‘‘आई, शांत हो, मला आशुशी एकट्याला बोलू दे,’’ आकाश शांतपणे म्हणाला. त्यानं आईला तिच्या खोलीत नेलं.

आता आशुच्या खोलीत आम्ही तिघंच होतो. आशु सांगत होती, ‘‘इथं ही आकाशचे दोन तीन मुलींशी संबंध आहेत. त्यातली एक तर विवाहित आहे. तिच्या नवऱ्यालाही हे माहीत आहे. काल माझ्याकडे आलेला तरूण डायव्होर्सी आहे. एकटाच राहतो. आम्ही दोघं एकटेपणातून एकमेकांच्या जवळ आलो. निशांतला हे ठाऊक आहे. त्याला याबद्दल ऑब्जेक्शन नाही. फक्त हे सगळं चोरून घडतं. बाहेर कुणालाही काहीही ठाऊक नाही. तसं मुंबईतही कुणाला कुणाशी काही देणंघेणं नसतं. वेळही नसतो, तरीही समाजाची भीती असतेच,’’ बोलता बोलता आशुताई रडायला लागली.

मी तिला जवळ घेत म्हटलं, ‘‘ताई, तुम्ही, काळजी करू नका, आपण यावर नक्की तोडगा काढू. फक्त विचार करायला थोडा वेळ द्या.’’

आम्ही दोघं तिथून उठलो अन् बागेतल्या बाकावर येऊन बसलो. ‘‘आशुताई सांगते आहे ते जर खरं असेल तर यात तिचा काय दोष? पुरुषानं हवं तिथून शरीरसुख मिळवायचं अन् त्याच्या बायकोनं मात्र घुसमट सहन करायची हा कुठला न्याय?’’ मी म्हटलं.

आकाशनं मान हलवून संमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘तुझं म्हणणं खरंय, पण आईला कसं पटवून द्यायचं? ती तर आशुलाच दोष देणार?’’

मीही विचार करत होते ताई म्हणाली ते खरंय, स्त्रीच्याही शारीरिक गरजा असतातच ना? जर नवरा तिची शारीरिक भूक भागवू शकत नसेल तर तिनं काय करावं? खरं तर यात आशुची काहीच चूक नाही. समाजानं पुरुषाला झुकतं माप दिलंय म्हणून तो हवंय ते करेल का? जर तो शेजारी अन् आशू स्वखुषीनं एकत्र येताहेत तर हरकत काय आहे? जगात असे किती तरी लोक असतील.

‘‘आकाश, आपण आईंना समजावून बघूयात. प्रयत्न तर करायलाच हवा,’’ मी म्हटलं. तोही कबूल झाला.

शेवटी आम्ही आई व मुलांना घेऊन परत अमेरिकेत आलो आणि निशांत बोटीवरून घरी परतल्यावर पुन्हा लगेच मुंबईला आलो. आकाशनं निशांतला एकूण परिस्थितीबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं खरेपणानं आपल्या इतर संबंधांबद्दल कबूली दिली. ‘‘मी आशुपासून काहीही लपवलेलं नाही अन् तिलाही मी पूर्ण मोकळीक दिली आहे. फक्त आम्ही या गोष्टी आमच्यातच ठेवल्या आहेत. बाहेर हे कुणाला माहीत नाही. आकाश, तू अमेरिकेत राहतो आहेस, तुलाही यात काही प्रॉब्लेम वाटतो का?’’

‘‘प्रश्न माझा नाहीए. आईचा आहे. तिला कसं पटवून द्यायचं?’’

‘‘मी बोलेन त्यांच्याशी, उद्याच बोलतो.’’ निशांत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट आटोपल्यावर निशांत आईजवळ बसले, ‘‘आई, मला ठाऊक आहे तुम्ही माझ्यावर अन् आशुवर फार चिडला आहात. तुमचा रागही बरोबरच आहे. पण तुम्हीही जाणता की आमचं लग्न आमची संमती न घेताच तुम्ही मोठ्यांनी ठरवलंत. समाजाच्या रिवाजानुसार लग्न झालं, पण आम्ही दोघंही एकमेकांना अनुरूप नव्हतो, पुरक नव्हतो. आम्ही प्रयत्नही केला. पण कुठंतरी काही तरी बिनसलं हे खरं. निसर्ग नियमानुसार आम्हाला मुलंही झाली. म्हणजे संतानोत्पत्ती हा लग्नाचा उद्देश तर सफल झाला. पण आम्ही दोघंही संतुष्ट नव्हतो. पतिपत्नी म्हणून जी एकरूपता असावी ती आमच्यात नव्हती. कदाचित माझी भूक जास्तच असेल…त्यातून नोकरीमुळे मी सहा महिने घराबाहेर असतो. अशावेळी शरीराची गरज भागवायला मला दुसरा आधार शोधावा लागला. आशुलाही त्याच भावना आहेत. मी सुख भोगणार अन् माझी पत्नी इथं तळमळणार हे मला मान्य नाही. मीच तिला पूर्ण मोकळीक दिली आहे. तिला पूर्णपणे सुखावू शकेल अशा पुरुषाशी तिनं संबंध ठेवायला माझी हरकत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही सुखी होतो अन् आमचे आपसातले संबंधही चांगले राहतात. एकमेकांविषयी आमच्या मनांत राग, द्वेष, संताप नाही…’’

आई अजूनही रागातच होती. निशांतलाही ते समजलं. त्यानं अत्यंत प्रेमानं अन् आदरानं आईचा हात आपल्या हातात घेतला, ‘‘आई, मला कळंतय, या गोष्टींमुळे तुम्ही खूप दुखावला आहात. तुम्हाला खूप रागही आला आहे. पण मला एक सांगा, एखाद्या जिवंत माणसाच्या आनंदापेक्षा निर्जीव रीतीरिवाज किंवा नियम कायदे महत्त्वाचे आहेत का? अन् या गोष्टी पूर्वीही घडतंच होत्या. अगदी आपल्या महाभारतातही असे दाखले आहेतच ना?’’

एवढं बोलून निशांतने इंटरनेटमधून डाऊनलोड केलेले महाभारतातले प्रसंग सांगायला सुरूवात केली. ‘‘पांडूला एका ऋषीनं शाप दिल्यामुळे तो पत्नीशी रत होऊ शकत नव्हता. पण त्याला पुत्र हवा होता, तेव्हा त्याची पत्नी कुंतीनं तिला मिळालेल्या वराचा उपयोग करून वेगवेगळ्या देवांकडून पुत्रप्राप्ती करून घेतली. महाभारतातली पांडवांच्या जन्माची कथा काय सांगते? तिथंही नवऱ्याखेरीज इतर पुरुषांची मदत घेतली गेली ना?’’

महाभारतातच द्रौपदीची कथा आहे. द्रौपदीला पाच पती होते. कारण आईनंच पाचही भावांना तिला वाटून घ्यायला सांगितलं होतं. अर्जुनाला सुभद्रा आवडली अन् तो तिला पत्नी म्हणून घेऊन आला. भीमाला हिंडिंबेपासून घटोत्कच नावाचा मुलगा होता. धृतराष्ट्र राजाचा मुलगा युयुत्सु तर म्हणे एका वेश्येपासून झाला होता.

आता तुम्हीच बघा, तुम्ही रोज महाभारत वाचता, अगदी श्रद्धेनं वाचता. त्यातला खरा अर्थ तुम्हाला लक्षात आलाय का? आयुष्य स्वेच्छेनं, आनंदात घालवा. हसतखेळत घालवा. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास होता कामा नये, तुमचं सुख दुसऱ्याला दु:ख देऊन मिळवलेलं नसावं आणि कुणी कुणावर बळजबरी करू नये. असा साधा संदेश हे ग्रंथ देतात ना?

मग आज आम्ही, म्हणजे मी आणि आशु जर परस्पर सहमतीनं आमचं सुख मिळवतो आहोत तर त्यात गैर काय आहे? मी इथं नसताना तिनं मुलींना उत्तमरित्या एकटीनं वाढवलं, याचं मला कौतुक आहे, तिच्याविषयी अभिमान आहे. मी बोटीवर अत्यंत धोकादायक परिस्थितीत राहतो. मुबलक पैसा मिळवताना मला सतत धोक्यांना सामोरं जावं लागतं. याबद्दल आशुच्या मनात माझ्याबद्दल कौतुक आणि आदर आहे. आम्ही पतिपत्नी म्हणून नाही तर चांगले मित्र म्हणून राहतोय. यात चुकीचं काय आहे? आता तुम्ही समाजाचे नियम म्हणाला तर हे नियम केले कुणी? ज्यांनी कुणी हे नियम केले त्यांना समाजातला वेश्या व्यवसाय दिसत नाही? राजरोसपणे चालणारा शरीराच्या सौदेबाजार त्यांना खटकत नाही? हे नियम करणारे पुरुष असतात, स्वत:साठी पळवाटा काढतात अन् स्त्रियांना मात्र दु:खाच्या खाईत लोटतात. स्त्रियांना का हक्क नसावा हवं ते सुख मिळवण्याचा? नियम सर्वांसाठी सारखे असावेत. त्यात स्त्री पुरूष असा भेदभाव कशासाठी? अन् मी तर म्हणतो त्रासदायक ठरतील असे नियम, कायदे, कानून नसावेतच म्हणजे माणूस मुक्तपणे जगेल. नाहीतर मग चोरून लपवून काम करेल.’’

आई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून स्तब्ध झाल्या होत्या. नि:शब्द बसून होत्या. तिथंच बसलेली आशूताई गदगदून रडत होती. निशांतने उठून तिला मिठीत घेतलं. थोपटून  शांत शांत करत म्हणाला, ‘‘आशू, रडू नकोस, तुझं काहीही चुकलेलं नाहीए. माझ्याकडून  तुला पूर्ण मोकळीक आहे. तू तुझा आनंद मिळव.’’

खरं तर आईंना हे सगळं पचवायला जडच जात होतं पण निशांत आणि आशुताईंचे उजळलेले चेहरे बघून आम्ही ही सुखावलो होतो. वातावरणातला ताण कमी झाला होता.

आईंनी आशुताईला म्हटलं, ‘‘पोरी, मला क्षमा कर, फार वाईट वागले मी तुझ्याशी,’’ आशुनं आईला मिठीच मारली.

निशांतनं ज्या धीरगंभीरपणे अन् हुषारीने सर्व परिस्थिती हाताळली, त्याला तोड नव्हती. त्याच्या स्वच्छ मनाचं, प्रामाणिकपणाचं अन् समजावून सांगण्याच्या कसबाचं आम्हाला कौतुक वाटलं.

आकाश म्हणाला, ‘‘मला आता भूक लागलीये. आज आपण जेवण बाहेरूनच मागवू, निशांत जेवण ऑर्डर करतोस का?’’

निशांतनं लगेच विचारलं, ‘‘आई, पहिला पदार्थ तुम्ही सांगा?’’

वातावरण निवळलं. आम्ही आईंना घेऊन अमेरिकेत परत आलो. आता आईंना अमेरिकेतल्या गोष्टी विचित्र वाटत नव्हत्या. त्यांनी इथलं कल्चर समजून घेतलं होतं. मुलंही म्हणत होती, ‘‘आजी, आता बदलली आहे बरं का!’’

स्वार्थी प्रेम

कथा * जोगेश्वरी सधीर
खरं तर दीपाली दिसायला सुंदर होती. तिचं लग्न ठरण्यात कोणतीची अडचण
यायला नको होती. पण का कोण जाणे तिच्या आईवडिलांना त्यांच्या समाजातला
कुणी मुलगा पसंतच पडत नव्हता. देखण्या दीपालीचं लग्नाचं वय बघता बघता
निघून गेलं. वडील कॉलेजात प्रिन्सिपॉल होते. त्यांना कुणी योग्य मुलगा दिसतच
नव्हता.
शेवटी दीपालीनं एका गुजराती मुलाशी सूत जमवलं. अरूणचं अन् तिचं
प्रेमप्रकरण तीन चार वर्षं सुरू होतं. दीपालीचे वडील एव्हाना अंथरूणाला खिळले
होते. त्यांनी दीपालीला प्रेमविवाहाची परवानगी दिली.
दीपालीच्या लग्नासाठीच जणू वडिलांचे प्राण अडकले होते. तिचं लग्न झालं अन्
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरूणचं दीपालीवर मनापासून प्रेम होतं. त्यानं
अत्यंत सन्मानानं दीपालीला आपल्या घरी आणलं. घरातलं वातावरण कट्टर
गुजराती होतं. घरचा चांगला व्यवसाय होता. आर्थिक बाजू भक्कम होती. पण
सासूचा, कांतीबेनचा स्वभाव काही फटकळ दीपालीला आवडत नव्हता. अरूणचं
आभाळभर प्रेम मिळत असूनही तिची चिडचिड चालू असायची.
कांतीबेन अन् नारायण भाई हे जोडपं अत्यंत सरळमार्गी होतं. सामान्यपणे
गुजराती कुटुंबात सुनेनं साडी नेसावी, डोक्यावरून पदर घ्यावा. तोकडे, लांडे कपडे
घालू नयेत असे संकेत असतात. आपल्या सुनेनं ते पाळावेत अशी कांतीबेनची
अपेक्षा असणं यात गैर काहीच नव्हतं.

अरूण दीपालीला शांतपणे समजवायचा. थोडं धीरानं घे. सगळं चांगलं होईल
म्हणून सांगायचा पण हट्टी अन् मानभावी दीपालीला ते मान्य नव्हतं. एक
दिवस चिडून, भांडण करून ती माहेरी निघून गेली. आईनंही तिला समजूत घालून
परत पाठवण्याऐवजी उलट तिला अधिक भडकण्यातच धन्यता मानली.
दीपालीची बहीण राजश्री तर स्वत:च्या संसाराचा खेळखंडोबा करूनच बसली
होती. आता दीपालीच्या बाबतीतदेखील तिनं आगीत तेल ओतायचं काम सुरू
केलं. सासूला चांगली अद्दल घडवूया असं ती दीपालीला सांगायची.
मूर्ख दीपालीनं आई व बहिणीच्या सांगण्याप्रमाणे अरूणचं प्रेम ठोकरलं. बिचारा
अरूण किती वेळ यायचा. घरी चल, प्रेमानं संसार करू म्हणून विनवायचा पण
दीपाली ढम्म होती.. अरूणचं प्रेम तिला कळतंच नव्हतं. तिच्या आईलाही
विवाहित मुलगी माहेरी येऊन राहते याचं काही वाटत नव्हतं.
माहेरी दीपाली फक्त आराम करायची. दिवसभर तिची वहिनी एकटीच घरातली
कामं करत असायची. आई अन् दीपाली सकाळ संध्याकाळ भटकायला जायच्या.
घरात अन् बाहेर मनसोक्त हादडायच्या.
शरीराला कोणतीच हालचाल नसल्यानं अन् दिवसभर चरत राहिल्यानं दीपाली
आता चांगलीच गरगरीत झाली होती. अरूणला ओळखणाऱ्या लोकांना दीपालीचा
राग यायचा आणि अरूणची कीव यायची. दीपालीच्या ओळखीतले, नात्यातले
लोकही तिला टाळायला बघायचे. कारण अरूणचा चांगुलपणा त्यांनाही दिसत
होता. वारंवार तो तिला येऊन भेटत होता, घरी चल म्हणत होता ही गोष्ट
लोकांपासून लपून राहिलेली नव्हतीच.
दीपाली मजेत खातपीत, भटकंत होती. अरूण मात्र बायको सोडून गेल्यामुळे फार
दु:खी होता. त्याच्या आईवडिलांनादेखील वाटायचं. मुलाचा संसार बहरावा, आपण
नातवंडं खेळवावीत. पण हट्टी दीपाली सासरी गेलीच नाही. अरूणनंही आता
तिला भेटणं कमी केलं. फोन मात्र तो आवर्जून करायचा. अरूणनं दीपालीकडे

घटस्फोट मागितला नाही. त्याचं इतर कुठं प्रेमप्रकरण नव्हतं. आढयतेखोर
दीपाली घरी येत नव्हती. घटस्फोट देऊन अरूणला मोकळंही करत नव्हती.
अरूणचं मात्र दीपालीवर मनापासून अन् खरंखुरं प्रेम होतं. दीपालीशिवाय तो इतर
कुणाचा विचारही करू शकत नव्हता. बिचारा एकटाच आयुष्याचा आला दिवस
ढकलत होता. हल्ली त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. एकटाच आपल्या
विचारात दंग असायचा. एक दिवस असाच आपल्या नादात दुकानातून निघून
घरी येत असताना एका ट्रकशी त्याच्या कारचा अपघात झाला. डोक्याला फार
मोठी जखम झाली.
नारायण भाई अन् कांतीबेननं दीपालीला त्याच्या अपघाताची बातमी दिली. ती
भेटायला येईल असं त्यांना वाटत होतं. पण दीपाली काय किंवा तिची बहिण
अन् आई काय कुणीही त्याला बघायला इस्पितळात गेलं नाही. उलट त्या
परीस्थितीत दीपालीच्या आईनं अरूणच्या वडिलांना सांगितलं की दीपाली व
अरूणसाठी वेगळा ब्लॉक करून द्या.
अरूणचा अपघात जबरदस्त होता. तो त्यातून वाचला हेच नशीब. एवढी गंभीर
दुखापतही तो शांतपणे सोसत होता. आईवडिल त्याची सेवाशुश्रुषा करत होते. त्या
सगळ्या गडबडीत दीपालीसाठी वेगळा फ्लॅट घेणं, तो सजवून, सामानानं परीपूर्ण
करून घेणं, नारायणभाईंना जमलंच नाही.
एकुलत्या एक मुलाच्या सुखासाठी आईवडिल त्याचं वेगळं घर मांडून द्यायलाही
तयार झाले होते. पण निदान दीपालीनं येऊन नवऱ्याला भेटावं. त्याच्याजवळ
बसावं एवढी त्यांची इच्छाही त्या स्वार्थी मुलीला पूर्ण करावी असं वाटलं
नाही.काही महिने इस्पितळात काढून अरूण घरी आला. या काळात दीपाली
फक्त आपल्या नव्या फ्लॅटबद्दल चौकशी करत होती. जखमी, दुर्बळ झालेल्या
नवऱ्याला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या अरूणला भेटावं असं तिला
एकदादेखील वाटलं नाही.

अरूणला घरी आणल्यावर त्याचे वडिल त्यांच्या वेगळ्या फ्लॅटच्या व्यवस्थेला
लागले. वेगळं घर करून का होईना मुलाचा संसार सुखाचा होऊ दे, तो आनंदात
राहू दे एवढंच त्यांना वाटलं होतं.
पण अरूणला हे कळलं, तेव्हा त्याचं मन फारच दुखावलं. ज्या दीपालीवर आपण
वेड्यासारखं प्रेम केलं, ती दीपाली इतकी आत्ममग्न अन् स्वार्थी असावी हे त्याला
सहनच होईना. तो अगदी मिटून गेला. त्याचं हसणं, बोलणं कमी झालंच होतं, ते
आता पूर्णपणे बंद झालं. इतक्या महिन्यांत त्यानं दीपालीला फोन केला नव्हता.
तिनंही फोन केला नाही, येणं तर दूरच!
यापुढे तरी नव्या फ्लॅटमध्ये येऊन दीपाली सुखानं नांदेल याची त्याला शाश्वती
वाटेना. दीपालीवरच्या त्याच्या एकतर्फी का होईना, निस्सीम प्रेमामुळेच तो एवढे
दिवस जिवंत होता, पण आता त्याच्या मनांत फक्त निराशा होती. आयष्यातून
दीपाली गेली तरी त्याच्या मनांतली प्रेम भावना जिवंत होती. आता मात्र ते प्रेम
पार आटलं, नाहीसं झालं. आता त्याच्या जगण्याला काही अर्थच नव्हता.
हातापायाच्या जखमा आता बऱ्यापैकी भरून झाल्या होत्या. डोक्यावरचं बँडेज
मात्र अजूनही होतंच. विचार करून त्याचं डोकं भणभणत होतं. रात्री झोप
लागेना. आईवडिल शेजारच्या खोलीत झोपले होते.
तिरीमिरीत अरूण उठला अन् खोलीतून जिन्याकडे निघाला. अंधारात पायरी
दिसली नाही अन् तो जिन्यावरून गडगडत थेट खाली पोहोचला. क्षणार्धांत जीवन
ज्योत मालवली.
अत्यंत गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या अरूणला भेटायला दीपाली गेली
नव्हती, मात्र त्याच्या मृत्युची बातमी कळताच ती आपली आई, भाऊ, बहीण व
भाओजींना घेऊन नवऱ्याच्या संपत्तीतला वाटा मागायला आली.

तिच्या निर्लज्जपणानं सगळेच चकित झाले होते. एक गरीब स्वभावाच्या सज्जन
मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या त्या स्वार्थी, आप्पलपोट्या मुलीला बघून
सगळ्यांच्याच मनांत येत होतं की त्या निरागस मुलाच्या आयुष्याचा सत्यानाश
करून ही बया सासू सासऱ्यांकड संपत्तीतला वाटा कशी मागू शकते? यालाच प्रेम
म्हणतात? असा प्रेमविवाह असतो?

बाजारीकरण

कथा * रूचिता साठे

आज सकाळपासूनच नीलाचं डोकं खूप दुखत होतं. कामात चित्त लागत नव्हतं.
सारी रात्र विचार करण्यात गेल्यामुळे रात्री डोळा लागलाच नव्हता. काय करावं?
करावं की करू नये? एकीकडे मुलीच्या शिक्षणाची काळजी दुसरीकडे तिच्या
शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची काळजी. एकुलत्या एक मुलीला शिक्षण बंद कर
सांगायचं कसं? पण एका मुलीच्या शिक्षणाला किती लाख रूपये लागतात हेही
आधी कळलं नव्हतं. नवऱ्याची नोकरी साधारण, कमाई तुटपुंजी…तेवढ्यात
कसाबसा घरखर्च भागतो. थोडी मदत म्हणून नीलाही एक बारकीशी नोकरी
करतेय. पण ती फारशी शिकलेली नाही. तिला बऱ्या पगाराची नोकरीही करता
येत नाही. ती फार काळजीत आहे.

जर तिनं सरोगेट मदर होण्याचं ठरवलं तर तिचा नवरा सहमती देईल का? लोक
काय म्हणतील? परिचित व नातलगांची प्रतिक्रिया काय असेल? नीलाचे विचार
थांबत नव्हते.तेवढ्यात तिला अनिताची हाक ऐकून आली.

‘‘कसल्या काळजीत आहेस नीला? कपाळावर किती आठ्या घातल्या आहेस?’’
‘‘अगं, निशाच्या फिचीच काळजी आहे. पैसे भरायची मुदत आता संपत आली
आहे. अजून पैशांची सोय झाली नाहीए. नातलगही श्रीमंत नाहीत जे मदत करू
शकतील अन् केलीच मदत तर मी ते पैसे फेडणार कसे? घरी जाते अन् पोरीचे

उदास डोळे बघितले की पोटात तुटतं. इथं काळजीमुळे कामात लक्ष लागत
नाही.’’ नीलानं मैत्रिणीपाशी मन मोकळं केलं.
‘‘मला समजतेय गं तुझी ओढाताण…म्हणूनच मी तुला सरोगेट मदरबद्दल
सांगितलं होतं. अगं, त्यात काही वाईट किंवा कायद्याविरूद्ध वगैरे नाहीए.
कित्येक स्त्रियांना गर्भाशयातील दोषामुळे मूल जन्माला घालता येत नाही.
अशावेळी ती कुणा स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घेते. त्या स्त्रीचं मूल सरोगेट मदर
नऊ महिने आपल्या गर्भाशयात वाढवते अन् मूल जन्माला आल्याबरोबर
आईवडिलांच्या स्वाधीन केलं जातं.
‘‘गर्भाशय भाड्यानं देणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याची सर्व काळजी ते कुटुंब घेतं.
तिच्यावर बाळाची काहीही जबाबदारी नसते. तिचा त्या संततीवर हक्कही नसतो.
त्या पतिपत्नीच्या स्त्रीबीज व पुरूष बीजाचं मिलन काचेच्या परीक्षण नळीत
प्रयोग शाळेत घडवून ठेवलं जातं. यात गैर किंवा अवैधानिक काहीच नाही.
सरोगेट आईला भरपूर पैसा मिळतो. तुलाही मिळणाऱ्या पैशात मुलीचं शिक्षण
पूर्ण करता येईल.’’ अनितानं समजावलं.
‘‘अनिता, तू माझ्या भल्यासाठीच सांगते आहेस. हे मला ठाऊक आहे पण माझे
पती याला मान्यता देतील का हे मला समजत नाहीए.’’ नीलानं आपली अडचण
सांगितली.
‘‘पुन्हा परिचित, नातलग…त्यांची तोंडं कशी बंद करायची?’’
‘‘हे बघ, तू फक्त नवऱ्याला समजव, त्याची संमती घे.’’ अनितानं म्हटलं, ‘‘मग
इतरांची काळजी करायची नाही. तसंही निशाला कोट्याला जावंच लागेल. तुलाही
एकदा गर्भाशय भाड्यानं दिलं की ‘लिटिल एंजल्स सेंटर’मध्येच रहावं लागेल.
तिथंच सर्व सरोगेट मदर्स राहतात. नातलगांना सांगता येईल मुलीच्या
शिक्षणासाठी मी तिकडे जातेय. अधुनमधून नवरा तुला भेटून जाईल…बघता

बघता नऊ महिने जातात गं! पैसा आला की इतर गोष्टीही सोफ्याच होतात.’’
अनितानं परोपरीनं नीलाला समजावलं.
नीलाला तिचं म्हणणं पटलं. रात्री नवऱ्यापाशी विषय काढला. प्रथम तर त्यानं
स्पष्ट नकारच दिला, पण नीला आता निर्णयावर ठाम होती.
‘‘हे बघा, आपला काळ वेगळा होता. गरीबीमुळे आपण शिकू शकलो नाही. त्या
काळातही सरकारी शाळेत शिकलेली मुलं पुढे शिकून डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर
झाली, पण आताचा काळ वेगळा आहे. स्पर्धा फार वाढली आहे. मुलांना चांगल्या
कॉलेजात प्रवेश घेण्यासाठाही आधी कोचिंगक्लास करावा लागतो.’’

‘‘आपल्याला एकच मुलगी आहे. तिला उत्तम शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे.
तिला कोटा शहरातल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये अॅडमिशनही मिळालं आहे.
फक्त फी भरायची आहे. शिवाय तिथला राहण्याजेवण्याचा खर्च…या सगळ्यासाठी
पैसा हवाय. शिवाय पुढलं इंजिनियरिंगचं शिक्षण…ते तरी फुकट होणार आहे का?
इतका पैसा उभा करण्यासाठीच मी एक पर्याय निवडला आहे. त्यात अनैतिक,
कायद्याविरूद्ध किंवा कुणाला दुखवून लुबाडून असं काहीच करायचं नाहीए.

‘‘फक्त नऊ महिन्यांचा प्रश्न आहे. माझं गर्भाशय मी एखाद्या श्रीमंत
दाम्पत्यांला भाड्यानं देणार. त्यांचं मूल माझ्या गर्भाशयात वाढणार. त्याचा
मोबदला म्हणून मला दहा लाख रूपये मिळतील. नऊ महिने झाले, बाळ
जन्माला आलं की मी त्यांना ते सोपवणार की माझी जबाबदारी संपली. या नऊ
महिन्यांत माझ्या आरोग्याची काळजी, खाणं, पिणं, आौषधपाणी, राहणं वगैरे सर्व
व्यवस्था ते कुटुंब करणार. तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. मुलीच्या बरोबरीनं
आपलाही प्रश्न आहेच. कायदेशीर मार्गानं पैसा मिळतोय तर त्याचा फायदा
घ्यायला हवा ना? फक्त बाहेर कुणाला काही कळू द्यायचं नाही एवढी जबाबदारी
तुमची.’’

प्रॉपर्टीतला वाटा

कथा * डॉ. लता अग्निहोत्री

आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, ‘‘मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्याबाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते.’’ खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय…प्रचिती येतेय. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही तीन मुली होत्या तिला. म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न…वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते.

आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे, ‘‘कशाला विनाकारण स्वत:ला त्रास करून घेतेस? अगं प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतो.’’

‘‘पुरे पुरे, तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते? बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते तीन मुली, एक मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू? मग एकेकीचे कमेंट सुरू होतात.’’

‘‘हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात, तुम्हाला तर चार मुलं आहेत.’’

दुसरी म्हणते, ‘‘तीन मुली म्हणजे खूप टेंशन असेल ना हो तुम्हाला?’’

बाबा मध्येच तिला अडवायचे. ‘‘अगं, हे टेंशन त्या बायकांना येतंय…तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही, तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत. आम्ही त्यांना सांभाळतोय…तुम्ही अजिबात टेंशन घेऊ नका.’’

बाबा गंमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजीही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा, मृदुला अन् वृंदा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्दयावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली, तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात.

मग आई पटकन् दादाला किंवा ताईला म्हणायची, ‘‘अरे, ती लहान आहे, का तिला रडवता? घेऊ देत ना तिला काय हवंय ते? अशी कशी तुम्ही थोरली भावंडं?’’

बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. अमृत दादाला बिझनेसमध्ये रूची होती अन् गतीही होती. त्यामुळे त्यानं एमबीए करून व्यवसायात जम बसवला. कृष्णा अन् मृदुलाची लग्न चांगली स्थळं बघून करून दिली. अमृतदादाचंही लग्न झालं. शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेवजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई अन् बाबा, मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता. दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, ‘‘वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार…अमृतची मुळंबाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन.’’

सगळं कसं छान चाललेलं अन् एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई अन् मी, आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्नं झाली होती, पण माझं स्वप्नं अजून कोवळीच होती. बाबा माझं लग्नं थाटात करणार होते. पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरचं ओझं बनून गेले.

बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं. त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील असणं अन् वडील नसणं या दोन स्थितींमध्ये आकाशपातळा एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे. एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा.

बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे. अशाच एका भेटीत त्याला वरूण भेटला. उमदा, होतकरू, सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनांत भरला. वरूणला वडील नव्हते. आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्हालं असं वाटलं.

वरूणचा स्वत:चा व्यवसाय होता. घरात आम्ही तीनच माणसं होतो. सचोटीनं वागून, खूप कष्ट करून वरूणनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती. लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाठ भरला होता.

काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दु:ख आता पुसट व्हायला लागलं होतं. पण हल्ली वरूण रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायचे.

सुरूवातीला वाटलं, दगदग फार होतेय. विश्रांती कमी पडते, त्यामुळे पाय दुखत असतील. स्वत:चं घर बांधायचं म्हणून वरूणनं बँकेतून लोन घेतलं होतं. ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जिवाचा आटापिटा करत होते. मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव, मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर, झोपताना पायाखाली उशा ठेवून बघ असे अनेक घरगुती उपचार मी अन् आई करत होतो. त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. रात्र रात्र झोपेविना जायची. त्यानं चिडचिडेपणा वाढला होता. केस पांढरे झाले. चार महिन्यांत ते चाळीस वर्षांचे वाटू लागले होतेजवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं. नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती. मी रात्ररात्र त्यांचे पाय दाबत बसायची. कधी तरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं, मग म्हणायचे, ‘‘झोप तू आता.मला थोडं बरं वाटतंय.’’properti vata inside photo

शेवटी मुंबईला न्यायचं ठरलं. प्रियांश सातआठ महिन्यांचाच होता. आई आणि एक मित्र अखिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले. ‘‘तू काळजी करू नकोस. आम्ही तुला सगळं कळवू. तू फक्त तुझ्या अन् बाळाची काळजी घे,’’ वरूणनं अन् आईंनी मला वारंवार बजावलं.

ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते. त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते. ‘अजून तपासण्या चालू आहेत,’ एवढंच उत्तर मिळत होतं. आई म्हणायच्या, ‘‘रिपोर्ट अजून आले नाहीत. आम्हीही वाट बघतोय.’’

गेल्याच्या पाचव्या दिवशी अखिलेश, वरूण आणि आई परत आले. मला कळवलं नव्हतं, अवचितच आले अन् मी चकित झाले.

‘‘आई, अचानक आलात? निदान झालं का? आता उपचार व्यवस्थित करता येतील…डॉक्टर काय म्हणाले?’’

‘‘कुणी तरी बोला ना?’’ मी रडकुंडीला आले. वरूणचा चेहरा उतरला होता. आईंची स्थिती तर चरकातून पिळून काढलेल्या उसासारखी होती. त्यांनी मला मिठी मारली अन् आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरूणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून वरूणला वाढवलं, शिकवलं. मुलाचा बहरलेला व्यवसाय अन् संसार बघून ती आपलं दु:ख विसरली. सगळं छान चालू असतानाच मुलाला कॅन्सर झाला असून आता तो केवळ चार पाच महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती? आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला, अग्नी द्यायला वरूण मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होतं, तोच मुलगा आता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं?

डॉक्टरांनी निदान केलं की फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. जे काही दिवस हातात आहेत तेवढाच वरूणचा सहवास आम्हाला मिळणार.

ज्या घरात प्रियांशच्या दुडदुडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता, तिथं आज वरूणच्या वेदनेचा हुंकार अन् आईचे उसासेच फक्त ऐकायला येत होते. त्या दोघांना धीर देताना, सांभाळून घेताना मला रडायलादेखील फुरसत मिळत नव्हती. काहीतरी चमत्कार होईल, वरूण बरे होतील, या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते.

खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचं जाहीर केलं होतं. पण आईची वेडी माया, अन् पत्नीचा सप्तपदीतल्या वचनांवरचा भाबडा विश्वास आशा दाखवत होता. वरूण बरे होतील अशी आशा आम्हाला वाटत होती.

पण धर्म आणि आस्था नावाची काही गोष्टच नाहीए या जगात, तरीसुद्धा व्यक्ति जेव्हा समस्यांनी नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदुगिरीच्या मागेच धावायला लगातो. मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो. पेशंट अन् नातलग दोघंही हाय खातात.

आईची वेडी माया अन् पत्नीची भाबडी आशा, विश्वास, श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही. कसंही करून आपला रूग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते.

पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. धंदा पूर्ण बंद पडला होता. वरूणसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं. तो आजारी पडला. खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती. जेमतेम पाच महिने वरूण काढू शकले.

आईंची स्थिती तर बघवत नव्हती. प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता. पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आ वासून समोर उभे होते. धंदा बंद पडलेला. बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं. यामुळे लोनचे हफ्ते फेडणे अशक्य होतं. ते घर हातचं गेलं.

अवघड परिस्थितीतच आपलं कोण, परकं कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही. माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीनं शक्य ती सर्व मदत मला केली. मात्र अमृत दादा मोकळेपणानं वागत नाहीए खरं तर टाळतोय असं मला जाणवलं…पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते, इतकी हतबल द्ब्रा झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात. खरं तर आई अजून हयात होती. पण आता घरात आईची सत्ता नव्हती.

आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते. आई विधवा, तिची लेक मी ही विधवा…बाबा असतानाची आई मला आठवते. माझा गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व अमृतदादाला रागे भरून मला ती वस्तु मिळवून देत असे.

मनात सतत रूखरूख असायची की वरूणच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीए. दोघी ताई त्यांचं खाणंपिणं, खेळणी कपडे सगळं बघत होत्या. ती त्यांची माया होती. प्रियांशचा हक्क थोडीच होता. भाड्याच्या एका खोलीत मी प्रियांश अन् आईंना घेऊन राहत होते.

मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलिन झाला. नोकरी करणंही मला शक्य नव्हतं. लहानग्या प्रियांशला सांभाळायला कुणी नव्हतं.

समोर एक निरूद्देश आयुष्य होतं. दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्यकाळ. काय करू? कुठं जाऊ? कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते.

तेवढ्यात कृष्णाताई माझ्याजवळ येऊन बसली. मी एकदम दचकले…‘‘ताई! कधी आलीस? मला कळलंही नाही.’’

‘‘हो गं! ही वेल बघ, किती हौसेनं लावली होती. आठवणीनं रोज पाणी घालायची, केवढी बहरली आहे, पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारानं ती वर चढली होती ते झाडंच उन्मळून पडलं…आता ही वेल नाही जगायची.

माझ्यासारखीच ती ही आधारहीन झालीय. माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक?’’

‘‘फार विचार करतेस…चल उठ, असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील?’’

ताईनं तिथं पडलेला एक बांबू झाड उन्मळून पडल्यामुळे झालेल्या खडड्यात रोवला अन् ती वेल त्यावर चढवली.

‘‘बघ, मिळाला ना आधार तुझ्या वेलीला? आत वेल मरत नाही नक्की…’’ ताईनं हसून म्हटलं.

‘‘खरंच ताई, मानवी आयुष्यही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं?’’

‘‘प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो, वृंदा.’’ ताई गंभीरपणे म्हणाली.

‘‘म्हणजे? तुला काय म्हणायचंय?’’

‘‘वृंदा, अमृतदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकतेय. या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाहीए. मला नवल वाटतंय, आईही काही बोलत नाहीए. काय प्रॉब्लेम आहे तिला, मला समजंत नाहीए.’’

‘‘ताई, एक तर आता वय झालंय, दुसरं म्हणजे बाबांचं नसणं…तीही असहाय आहे गं! हे म्हातारपण ती दादाच्याच जिवावर जगणार ना?’’

‘‘पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का? तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना. घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे. तिला बाबांची पेन्शन मिळतेय. ती काही दादावर अवलंबून नाहीए.’’ ताई जरा रागातच बोलली.

‘‘ताई, अगं, आई समाजाला बदलू शकत नाही ना? आजही म्हातारे आईवडिल मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात गं!’’

‘‘खरंच गं बाई, माझी ही छोटीशी बहीण किती किती समजूतदार झालीय.’’ ताई कौतुकानं म्हणाली. मग बोलली, ‘‘ते सोड वृंदा, मी, मृदुला अन् तुझ्या दोन्ही भावोजींनी असं ठरवलंय की आम्ही दादाशी बोलू. आज काळ बदलला आहे, वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा. तसा कायदाही झाला आहे.’’

मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं वेडे, ही नातीगोती, हे संबंध आपल्याला अडीअडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना? अशावेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची?’’

शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रापर्टीतला काही हिस्सा तू वृंदाला दे. कृष्णा आणि मृदुलाताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो, ‘‘आम्हाला काही नको, पण वृंदाला मात्र वाटा मिळू दे. तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वत:हून तू पुढाकार घ्यायला हवा होतास.’’

पण अमृतदादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती. शेवटी कुणा नातलगानंच त्याला समजावलं ‘‘बाकी बहिणी मागत नाहीएत, एकीलाच द्यावं लागतंय, तेवढं देऊन मोकळा हो, उद्या कोर्टात केस गेली तर सरळ चार वाटे होतील, तुला फक्त एक हिस्सा मिळेल.’’ शेवटी अगदी नाइलाजानं दादानं निर्णय घेतला. वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही.

शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला. मीही लाचार होते. सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले…हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती.

शेवटी रक्ताचं नातं आहे. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का? काही नाही तर निदान मी माझ्या माणसांत होते…पण माझी समजूत चुकीची होती. इथं तर नात्यांची व्याखाच बदलली होती. कुणीच माझं नव्हतं.

घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते. नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या. मलाही हे सगळं नको होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी घरबसल्या मुलांच्या टयूशन्स घ्यायला लागले. शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होते. मला ट्यूशन्स मिळवून द्यायला त्यांनी मदत केली. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत होते.

वहिनी तर स्वत:हून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती. मी काही बोलेन तेवढ्याचं उत्तर ती द्यायची. दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा. आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची. तिनंही आता तिथं बसणं बंद केलं.

तिला कदाचित सूनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त रहायचं असेल. मला आईचा राग येत नव्हता, उलट कीव यायची तिचीच. माझ्यामुळे उगीचच तिच्या जिवाचे हाल होताहेत असं वाटायचं. दादाची मुलं पारूल आणि मनीष मोठी होती. माझ्या घरात यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होते. पण प्रियांश लहान होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो त्यांच्यात खेळायला बघायचा.

एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला. शेवटी मुलंच ते…मी मुलांना शिकवत होते, तेवढ्यात वहिनीचा कर्कश्य आवाज कानी आला. ‘‘घरावर हक्क दाखवताच आहात आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का?’’

मी गप्प बसले. लहान असला तरी चूक प्रियांशचीच होती. मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले. पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या. बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची.

एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते, तेवढ्यात वहिनी आरडा ओरडा करत आली, ‘‘तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय…हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला. मला हे सगळं नाही हं चालणार…’’

तेवढ्यात मनीष म्हणाला, ‘‘मम्मी, अगं तो पारूलच्या हातून फुटलाय, प्रियांशच्या नाही.’’

वहिनी त्याच्यावर ओरडली, ‘‘गप्प बैस मूर्खा, तुला काय कळतंय?’’

मुलं निरागस असतात. खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही. मी अजिबात वाद घातला नाही. वहिनीला सॉरी म्हटलं. माझ्यावर उपकार होते तिचे.

वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं. खरं तर मलाही तिथं राहणं नकोच होतं. पण तरूण एकटी विधवा, पदरात लहान मूल…कुठं जाणार? कशी राहणार? शिवाय ताई व भावजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता. निदान प्रियांश मोठा होई तो मला इथंच राहायला हवं.

आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची. त्याला कुठं जाऊ द्यायची नाही. उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरूवात व्हायला नको होती मला.

पण लहान मूल ते. किती त्याला बांधून ठेवणार? सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं. दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती. मी ट्यूशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती. आईची सेवा करत होते, तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला. तो खूप जोरात कळवळून रडत होता. पाठीवर, पायांवर पट्टीनं मारल्याचे वळ होते. कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक.

बापाविना पोरकं लेकरू, त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करतेय वहिनी? माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढतेय? त्याला जवळ घेऊन शांत केलं. वळांवर खोबऱ्यांचं तेल लावलं. त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते. शेवटी त्याला झोप लागली.

 

माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं. कितीही कायदे करा, कानून करा…पण माणसांचे विचार बदलत नाही. मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो. प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे.

आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असता ना? त्यावेळी दादानं काय केलं असतं? बहिणीला तिच्या पडत्या काळात, मदत म्हणून जी थोडी फार जागा त्यानं दिली, त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय? वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यांवर प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं.

समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय? तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात? आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते? खरंतर माहेराच्या सुखसमृद्धासाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते, पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात? का? का?…

पुन्हा चूक होणे नाही

कथा * सुदीप्ती सत्या

सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं…नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन् धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही.

खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होताएत तोवर मोबाइल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नणंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सीरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ‘‘ताई, नमस्कार बऱ्या आहात ना?’’

‘‘मी बरी आहे गं! पण मोहनाची तब्येत बरी नाहीए. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवतखात नाहीए. रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो…’’ बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं.

‘‘हे कधीपासून होतंय?’’

‘‘एखाद महिना झाला असावा, कदाचित जास्त ही…’’

‘‘ताई, रडू नका, मी आहे ना? आजच जाते मी तिला भेटायला. आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन…तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा?’’

‘‘नाही…’’

‘‘कमाल करता…इतका वेळ उपाशी आहात? आधी खाऊन घ्या. चहा घ्या अन् काळजी करू नका…मलाही आता भराभरा कामं आटोपायची आहेत. मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते…आजच जातेय मी मोहनाकडे…’’

फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात होताच.काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी पोरगी…आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ‘तिच्याकडून काही शिका’ असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते.मुलं हसून उडवून लावतात.  punhaa chuke hone naahi

दुपारचा स्वयंपाक आटोपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाचे भोपळयाचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. होस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राइज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठी ही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जातेय एवढं त्याच्या कानावर घातलं.

मोहनाचं कॉलेज अन् होस्टेल माझ्या घरापासून निदान पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं. दोन बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणूनच वरेचवर मला जाता येत नाही. इंजीनियरिंगच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला मोहनालाही जमत नाही.

मी होस्टेलवर पोहोचले, तेव्हा मोहनाची मैत्रीण भारती भेटली. ‘‘अरे मामी? नमस्कार…कशा आहात?’’ तिनं हसून विचारलं.

‘‘नमस्कार, कशी आहेस तू? मोहना कुठं भेटेल?’’

‘‘तिच्या रूमवर.’’

‘‘थँक्यू…’’ मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या केबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या अन् मोहनाच्या रूमवर पोहोचले. दार बंद होतं…कडी नसावी, पण मी दारावर टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं अन् मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली मोहना वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेनं बघत होती. आवाजानं दचकून तिनं विचारलं, ‘‘कोण आहे?’’ मला बघताच उठून बसली.

‘‘अय्या…मामी तू?’’ तिनं आनंदानं मिठी मारली.

तिचा चेहरा ओलसर होता…‘‘रडत होतीस का?’’ मी विचारलं.

‘‘नाही…’’

मी तिच्याकडे नीट बघितलं…पार कोमेजली होती पोर, हडकली होती. डोळे सुजल्यासारखे…मी प्रेमानं विचारलं, ‘‘काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीए म्हणून, अशावेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वत:च्या घरी जायचं…इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखववलंस का? काही औषधं वगैरे घेते आहेस का?’’ मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले.

‘‘अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू. मी चहा घेऊन येते.’’ पलंगावरून उतरत मोहनानं म्हटलं.

‘‘मी चहा घेऊनच निघालेय…तू कुठंच जाऊ नकोस. तुझ्यासाठी बघ मी मेथीच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे अन् तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय.’’ मी डबा तिच्यापुढे धरला. मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल…पदार्थ तोंडात टाकेल…बोटांनी ‘मस्त’ची खूण करेल. पण तसं काहीच झालं नाही.

‘‘नंतर खाईन,’’ म्हणत तिनं डबा शेजारच्या स्टुलवर ठेवला. डब्याच्या धक्क्यानं स्टुलावरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रिप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली. नीट बघितली. ‘‘काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत…तुला झोप येत नाही?’’ मी तिच्याकडे बघत विचारलं.

तिनं माझी नजर टाळली…‘‘नाही, तसं काही नाहीए. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून,’’ ती घाईनं म्हणाली.

‘‘तुला घ्यायचाय का?’’

‘‘नाही, मला नकोय.’’

‘‘तर मग राहू दे, मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय?’’

‘‘फारसा चांगला नाही…’’

मला जाणवलं, मोहना बोलताना नजर टाळतेय, एरवी आनंदानं चिवचिवणारी मोहना आज मोकळेपणानं बोलत नाहीए. माझं लग्न झालं, तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून आम्हा मामीभाचीचं गुळपीठ होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझीही ती फार लाडकी होती.

काहीतरी बिघडलंय खास. तिच्या मनावर ताण असेल तर तिनं बोलून मन मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूमपार्टनर भारती आली. तिनं वह्या पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली अन् बॅडमिंटनची रॅकेट व शटल उचललं.

‘‘मामी, हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बैचेन, सतत उसासे…मीच डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबालला आहे. धड जेवत खात नाही…मला तर वाटतंय की कुणाच्या तरी प्रेमात पडलीय.’’ भारतीनं हसत हसत म्हटलं.

‘‘गप्प रहा गं! तोंडाला येईल ते बोलतेय.’’ मोहनाचा चेहरा लाल झाला होता.

‘‘अगं मला नाही, तर निदान मामीला तरी सांग त्या लव्हरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी,’’ हसत हसत भारती बाहेर सटकली.

‘‘इडियट!’’ मोहनानं आपला राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले अन् विचारलं, ‘‘खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी.’’

तिनं पटकन् आपले हात ओढून घेतले. ‘‘कुणीच नाहीए.’’

मी तिचा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत घेतला. ‘‘अगदी खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जिवाभावाची थोर वयाची मैत्रीणही आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही?

माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडली आहे का? ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय डाचतंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर, माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेन, कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? होस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखी काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग.’’

मी वारंवार तिल विश्वास दाखवूनही मोहना जेव्हा काहीच बोलेना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते…तुझा प्रॉब्लेम तूच बघ.’’ मी उठून उभी राहिले.

‘‘मामी…’’ अत्यंत करूण स्वरात तिनं हाक मारली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले, पण कठोरपणे म्हणाले, ‘‘येते मी…’’

ती ताडकन् उठली अन् मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. ‘‘मामी, माझ्याकडून एक चूक घडलीय…’’

‘‘कसली चूक?’’ मी तिला शांत करत विचारलं.

‘‘एका पुरूषाशी संबंध.’’

विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीय पोर. कुणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी. मोहनाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला पण ही वेळ रागावण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्यासकट पलंगावर बसले.

यावेळी तिला प्रेमळ शब्दांची, आधाराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उणा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्त्याही करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. ‘‘तू तुझा प्रॉब्लेम सांग, प्रत्येक गोष्टीवर सोल्यूशन असतंच!’’ मी तिला समजावलं.

मोहनानं सांगितलं की ती नेहमीच होस्टेलच्या जवळ असलेल्या चंदन स्टेशनरीकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात. होस्टेलच्या सर्वच मुलीं त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे तीनचार व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात.

दुकानाचा मालक चंदन मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी रीताही अधुनमधुन दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो.

वरचेवर तिथे गेल्यामुळे मोहनाचीही चंदन व रीतासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी रीताची विशेष गट्टी होती. ती त्यांना कधी तरी चहा फराळही द्यायची. रीताला सात व पाच वर्षांची दोन मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कुणी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं मोहनाची रूममेट भारतीला विचारलं. कॉलेजनंतर दोन तास भारती बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्यूशन घेणं जमणारं नव्हतं. भारतीनं मोहनाला विचारलं. मोहना हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील. दोन तास सत्कारणी लागतील म्हणून मोहना कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व चंदनशीही ती अधिक मोकळेपणानं वागू लागली.

चंदन जरी विवाहित अन् दोन मुलांचा बाप होता तरीही थोडा भ्रमर वृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठ्ठास…मोहनाही अल्लड वयातली सुंदर तरूणी. दोघंही एकमेकांकडे चोरून बघायची.

आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती, पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती.

एक दिवस रीताच्या माहेराहून फोन आला. तिची आई सीरियस होती. हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या रीतानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं, चार कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली.

त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबड उठली. भराभर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहरात, शहराबाहेर चहू बाजूंनी अंगणात फिरत होत्या.

चंदननेही दुकान बंद केलं अन् तो घरात आला. रीता घाईनं गेली होती घरकामाचा पसारा पडून होता. मोहना मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता.

तेवढ्यात लुंगी बनियान अशा वेशातला चंदन चहाचे कप हातात घेऊन आला.

‘‘मोहना, चहा घे.’’

चहाचा कप त्याच्याकडून घेताना मोहनाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ‘‘ताई कधी येणार?’’ तिनं विचारलं.

तिथंच खुर्चीवर बसून चहा पित चंदननं म्हटलं, ‘‘लवकरच येईल.’’

‘‘चहा फारच छान झालाय,’’ मोहनानं हसून म्हटलं.

‘‘तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य!’’

अमृतनं बघितलं बाबा अन् टिचर गप्पा मारताहेत, तो तेवढयात तिथून पळाला.

‘‘अरे, अरे…अमृत…’’

कप ठेवून मोहना त्याला पकडायला धावली अन् तिचा पाय घसरला…पडलीच असती पण चंदननं सावरली तिला.

‘‘मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का?’’ त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं.

चंदनच्या बळकट बाहूंनी सावरलं अन् मोहनाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या कंरगळीला लागलं होतं. ती स्वत:ला सावरत करंगळी चोळू लागली.

‘‘दुखतंय का?’’

‘‘हो…’’

‘‘आणा मी नीट करतो.’’ म्हणत चंदननं कंरगळी धरून जोरात ओढली. मोहना किंचाळली…कटकन् आवाज आला अन् करंगळी बरी झाली.

तिच्या पावलावरून हात फिरवत चंदननं म्हटलं, ‘‘मोहना, तुझे पायही किती सुंदर आहेत. कोमल, रेखीव गोरेपान.’’

मोहनाच्या अंगावर रोमांच फुलले, तो काय बोलतोय हे लत्रात येण्याआधी ती बोलून गेली. ‘‘तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे हे काळेभोर केस किती छान दिसताहेत…’’

चंदननं तिला मिठीत घेतलं, चुंबन घेतलं, दोन तरूण देह एकांतात एकमेकांत विरघळले, कळत होतं तरीही सावरता आलं नाही.

दोघांनाही भान आलं, आपली चूक उमगली, मोहना घाईनं होस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती.

चंदनही स्वत:ला गुन्हेगार समजत होता. मोहना पश्चात्तापाच्या अग्नित होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या रीतानं, शिकवायला का येत नाही विचारल्यावर ‘प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही’ असं तिनं सांगितलं.

मोहनाची झोपच उडाली. आपण काय करून बसलो…आईबाबांनी केवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलंय अन्…आपल्या धाकट्या बहिणी…किती अभिमान आहे त्यांना मोहनाचा. हे सगळं घरी कळलं तर?

‘‘मामी हे सगळं कसं सहन करू?’’ मोहनाचा बांध पुन्हा फुटला.

‘‘शांत हो बेटा, ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस.’’ मी तिला थोपटून आश्वस्त करत होते, पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती…

‘‘मोहना, तुझे पिरिएड्स कधी झालेत…’’

‘‘नाही झालेत अजून…’’ तिनं निरागसपणे म्हटलं.

मला थोडं टेन्शन आलं. पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, ‘‘हे बघ, तू पटकन् आवर…दोनचार दिवस माझ्याकडेच रहायचंय, त्या हिशेबानं कपडे पिशवीत भरून घे.’’

‘‘पण मामी.’’

‘‘आता वेळ घालवू नकोस, मी वॉर्डनकडून चार दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते.’’

वॉर्डननं परवानगी दिली. वाटेत मी मोहनाला म्हटलं, ‘‘घरी  गेल्यावर माधवी, पल्लवी तुला बघून खूप खुश होतील…तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणानं वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ.’’

घरी पोचताच माझ्या मुलांनी मोहनाचा ताबा घेतला. ‘‘तू अशी हडकुळी का झालीस?’’ या प्रश्नावर तिनं ‘‘अभ्यासाचं टेंशन आलंय,’’ म्हणून सांगितलं.

माझ्या नवऱ्यानंही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेमालमपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली.

नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली. मोहनाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते.

रात्री मोहनाच्या आईला फोन केला. ‘‘तिला अभ्यास थोडा जड जातोय, पण ती सर्व करेल, मी तिला चार दिवस घरी घेऊन आलेय,’’ असं सांगून तिलाही आश्वस्त केलं.

मोहना जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यातले उदास भाव तिची मन:स्थिती सांगत होते.

रात्री ती पल्लवी माधवीबरोबर झोपली अन् अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रूसली होती. मोहनाला चंदनचं आकर्षण वाटलं याच चूक काहीच नव्हतं. पण तरूण वयातही स्वत:वर ताबा ठेवता आला पाहिजे. आईमुलगी, बाप लेक यांच्यात मोकळेपणाने चर्चा, संवाद व्हायला हवा. आज मोहना आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नादावल्या तर? आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे.

पल्लवी माधवीशी मीसुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री पुरूष संबंध, निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो, एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरूष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री…मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी.

हसती खेळती मुलगी. एखाद्या घटनेनं अशी हादरून जाते. कोमेजते…मोहनाला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणानं सांगू शकली, नाहीतर कदाचित तिनं ताण असह्य होऊन आत्महत्त्याही केली असती.

सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती. पण शेवटी एकदाची गेली.

आमचा नाश्ता अंघोळी आटोपून मी मोहनाला घेऊन बाहेर पडले. ‘‘आपण कुठं जातोय मामी?’’ तिनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. आपण तिच्याकडे जातोय.’’

डॉक्टरनं तपासून ‘काळजीचं कारण नाही’ म्हणून सांगितलं. ‘‘या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते. मी गोळ्या देतेय…सुरू केल्यावर पाळी सुरू होईल. पण ही अशक्त आहे, चांगलं खायला प्यायला घाला. इंजीनियरिंगच्या अभ्यासात तब्येत धडधाकट लागते,’’ डॉक्टरांनी हसून म्हटलं.

मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही मोहनासाठी एक सुंदरशी पर्स आणि सॅन्डल्स घेतल्या. तिच्या आवडीचं चॉकलेट आइस्क्रिम खायला घातलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं.

मोहनाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती.

दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाएकी तिनं मला मिठी मारली…‘‘मामी, आज मला इतकं छान अन् हलकं हलकं वाटतंय…’’

‘‘तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनांत कुढत बसले असते.

कदाचित मी माझं आयुष्य संपवून टाकलं असतं.’’

‘‘पण तू इतकं मला जपलंस, इतकी प्रेमानं वागलीस, त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं…’’

‘‘पण अजूनही मला स्वत:चाच राग येतोय. मनातून अपराधीही वाटतंय.’’ बोलता बोलता तिचे डोळे भरून आले.

मी तिला पलंगावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं. ‘‘बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती, पण तुला चूक कळली, पश्चात्ताप झालाय, यातच सगळं भरून पावलं.’’

‘‘आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिची बोच, तो सल घेऊन जगायचं नाही. पुढे केवढं मोठं आयुष्य पडलंय…ते जबाबदारीनं आणि आनंदात जगायचं.’’

‘‘तुझं काही चंदनवर प्रेम नव्हतं. जे घडलं तो एक अपघात होता. संबंध मनातून प्रेम उमलतं, तेव्हा निर्माण होतात. प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी यांच्यात आधी मनातून प्रेम निर्माण होतं, तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येतं.’’

‘‘आता चंदनला विसर. तो ही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाही कळलीच असणार.’’

‘‘लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजीनियर म्हणून स्वत:ला सिद्ध करशील.’’ मी हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला अन् तिच्या कपाळावर ओठ टेकले.

तिनं पुन्हा मिठी मारली. ‘‘मामी, पुन्हा एकदा थँक्स! किती धन्यवाद देऊ तुला.’’

थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला.

‘‘आई, आता मी एकदम छान आहे. अगं, मामी ना, डॉक्टर आहे. बघ, कशी ठणठणीत बरी केलीय मला.’’ मोहनाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें