कथा * रूचिता साठे
आज सकाळपासूनच नीलाचं डोकं खूप दुखत होतं. कामात चित्त लागत नव्हतं.
सारी रात्र विचार करण्यात गेल्यामुळे रात्री डोळा लागलाच नव्हता. काय करावं?
करावं की करू नये? एकीकडे मुलीच्या शिक्षणाची काळजी दुसरीकडे तिच्या
शिक्षणासाठी पैसे उभे करण्याची काळजी. एकुलत्या एक मुलीला शिक्षण बंद कर
सांगायचं कसं? पण एका मुलीच्या शिक्षणाला किती लाख रूपये लागतात हेही
आधी कळलं नव्हतं. नवऱ्याची नोकरी साधारण, कमाई तुटपुंजी...तेवढ्यात
कसाबसा घरखर्च भागतो. थोडी मदत म्हणून नीलाही एक बारकीशी नोकरी
करतेय. पण ती फारशी शिकलेली नाही. तिला बऱ्या पगाराची नोकरीही करता
येत नाही. ती फार काळजीत आहे.
जर तिनं सरोगेट मदर होण्याचं ठरवलं तर तिचा नवरा सहमती देईल का? लोक
काय म्हणतील? परिचित व नातलगांची प्रतिक्रिया काय असेल? नीलाचे विचार
थांबत नव्हते.तेवढ्यात तिला अनिताची हाक ऐकून आली.
‘‘कसल्या काळजीत आहेस नीला? कपाळावर किती आठ्या घातल्या आहेस?’’
‘‘अगं, निशाच्या फिचीच काळजी आहे. पैसे भरायची मुदत आता संपत आली
आहे. अजून पैशांची सोय झाली नाहीए. नातलगही श्रीमंत नाहीत जे मदत करू
शकतील अन् केलीच मदत तर मी ते पैसे फेडणार कसे? घरी जाते अन् पोरीचे
उदास डोळे बघितले की पोटात तुटतं. इथं काळजीमुळे कामात लक्ष लागत
नाही.’’ नीलानं मैत्रिणीपाशी मन मोकळं केलं.
‘‘मला समजतेय गं तुझी ओढाताण...म्हणूनच मी तुला सरोगेट मदरबद्दल
सांगितलं होतं. अगं, त्यात काही वाईट किंवा कायद्याविरूद्ध वगैरे नाहीए.
कित्येक स्त्रियांना गर्भाशयातील दोषामुळे मूल जन्माला घालता येत नाही.
अशावेळी ती कुणा स्त्रीचं गर्भाशय भाड्यानं घेते. त्या स्त्रीचं मूल सरोगेट मदर
नऊ महिने आपल्या गर्भाशयात वाढवते अन् मूल जन्माला आल्याबरोबर
आईवडिलांच्या स्वाधीन केलं जातं.
‘‘गर्भाशय भाड्यानं देणाऱ्या स्त्रीच्या आरोग्याची सर्व काळजी ते कुटुंब घेतं.
तिच्यावर बाळाची काहीही जबाबदारी नसते. तिचा त्या संततीवर हक्कही नसतो.
त्या पतिपत्नीच्या स्त्रीबीज व पुरूष बीजाचं मिलन काचेच्या परीक्षण नळीत
प्रयोग शाळेत घडवून ठेवलं जातं. यात गैर किंवा अवैधानिक काहीच नाही.
सरोगेट आईला भरपूर पैसा मिळतो. तुलाही मिळणाऱ्या पैशात मुलीचं शिक्षण
पूर्ण करता येईल.’’ अनितानं समजावलं.
‘‘अनिता, तू माझ्या भल्यासाठीच सांगते आहेस. हे मला ठाऊक आहे पण माझे
पती याला मान्यता देतील का हे मला समजत नाहीए.’’ नीलानं आपली अडचण
सांगितली.
‘‘पुन्हा परिचित, नातलग...त्यांची तोंडं कशी बंद करायची?’’
‘‘हे बघ, तू फक्त नवऱ्याला समजव, त्याची संमती घे.’’ अनितानं म्हटलं, ‘‘मग
इतरांची काळजी करायची नाही. तसंही निशाला कोट्याला जावंच लागेल. तुलाही
एकदा गर्भाशय भाड्यानं दिलं की ‘लिटिल एंजल्स सेंटर’मध्येच रहावं लागेल.
तिथंच सर्व सरोगेट मदर्स राहतात. नातलगांना सांगता येईल मुलीच्या
शिक्षणासाठी मी तिकडे जातेय. अधुनमधून नवरा तुला भेटून जाईल...बघता