कथा * डॉ. लता अग्निहोत्री
आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, ‘‘मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्याबाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते.’’ खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय...प्रचिती येतेय. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही तीन मुली होत्या तिला. म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न...वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते.
आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे, ‘‘कशाला विनाकारण स्वत:ला त्रास करून घेतेस? अगं प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतो.’’
‘‘पुरे पुरे, तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते? बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते तीन मुली, एक मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू? मग एकेकीचे कमेंट सुरू होतात.’’
‘‘हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात, तुम्हाला तर चार मुलं आहेत.’’
दुसरी म्हणते, ‘‘तीन मुली म्हणजे खूप टेंशन असेल ना हो तुम्हाला?’’
बाबा मध्येच तिला अडवायचे. ‘‘अगं, हे टेंशन त्या बायकांना येतंय...तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही, तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत. आम्ही त्यांना सांभाळतोय...तुम्ही अजिबात टेंशन घेऊ नका.’’
बाबा गंमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजीही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा, मृदुला अन् वृंदा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्दयावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली, तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात.