कथा * रितु वर्मा
होय, त्याच्या आयुष्यातील मी एक चीअर गर्ल आहे आणि ही भूमिका मी गेली ३ वर्षे निभावत आहे. हे कोणते विचित्र नाव किंवा नाते आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे नाते अजिबात नाही, तर सर्व माहीत असूनही मला लागलेले हे विचित्र वेड आहे आणि स्वत:ला काहीतरी खास वाटावे म्हणून मी ते अनुभवतेय.
आजही मला तो दिवस आठवतो, कदाचित १५ जानेवारी असेल. एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, काही ओळखीचे मित्रही होते, म्हणून मी ती स्वीकारली. त्यानंतर तिथून मेसेज येऊ लागले, मीही उत्तरे देऊ लागले.
‘‘तू खूप सुंदर आहेस,’’ असा मेसेज आला.
मी लिहिले, ‘‘हा... हा... हा...’’
मेसेज आला, ‘‘अगं, मी खरं सांगतोय, तुझा पती खूप नशिबवान आहे.’’
मी पुन्हा लिहिले, ‘‘हा... हा... हा... पण या हा... हा... च्या आतल्या वेदनांमुळे, डोळयात पाणी आले,’’ त्याने संपर्कासाठी नंबर मागितला.
मी लिहिले, ‘‘एवढया लवकर? अजून मी तुला ओळखतही नाही... मला फक्त एवढेच माहीत आहे की, आपण एकाच शाळेत शिकलो.’’
मेसेज आला, ‘‘म्हणूनच मी नंबर मागतोय, पण सुंदर मुली नखरे करतात, हरकत नाही, देऊ नकोस.’’
मनात विचार आला, मी किशोरवयीन नाही आणि तो माझा प्रियकरही नाही, त्यामुळे दोन सुसंस्कृत लोकांनी एकमेकांना नंबर द्यायला काय हरकत आहे?
त्याच्या बोलण्यात काय जादू होती माहीत नाही, पण मी आनंदाने नंबर दिला. एका मिनिटात मला फोन आला. थोडासा विचार करून मी फोन उचलला. तिथून एक अतिशय निरागस हास्य ऐकू आले, असे हसणे ज्यासाठी मी आसुसले होते.
तो म्हणाला, ‘‘फक्त यासाठी फोन केला की, मी कोणी गुंड नाही. एक साधा माणूस आहे आणि तू खरोखरंच सुंदर आहेस.’’
मी थोडीशी लाजले, पण मला आतून आनंदही झाला होता. मी फक्त ‘‘धन्यवाद’’ म्हटले आणि फोन ठेवला. त्यानंतर काही वेळाने व्हॉट्सअॅपवर त्याचा मेसेज आला, ‘‘बोलल्याबद्दल धन्यवाद. आई आणि मुलीचा फोटो खूपच सुंदर आहे.’’